Friday, January 11, 2008

थांबेना कुणी थांबुनी कुणासाठी

थांबेना कुणी थांबूनी कुणासाठी


नको राहूस हळवी एव्हडी
सौजन्य शोभते मर्यादा जेव्हडी
होवून हळवी जावूनी सीमे पलिकडे
घालीशी स्वतःला शिक्षेचे कडे

भार तुझ्या अंगाचा न पेले तुला
भार जीवनाचा पेलशी कसा
हवेची झुळुक करी अस्थीर तुला
तुफान असता करीशी संभाळ कसा

सदैव नसतो मार्गी फुलांचा सडा
मार्ग काट्यांचाही येतो पायतळा
जमाना बदले बदल तू जीवना
राहूनी हळवे बदल तू हळवेपणा

थांबेना कुणी थांबूनी कुणासाठी
पाहूनी निघून जाई टाळण्यासाठी
जमान्याचे प्रवासी आपण राहू थांबून
जमानाच झिडकारून जाईल आपणा सोडून

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

कुणाचा आहे हा ईशारा

कुणाचा आहे हा इशारा


जात आहे पुढे पुढे ही धरती
जात आहे पुढे पुढे हे गगन
होत आहे काय ह्या जगताला
कुणाचा आहे हा इशारा

जात आहे पुढे पुढे ही जीवन नय्या
कोण आहे हिचा नावाडी
न कळे जात आहे कुठे हे जीवनचक्र
कुणाचा आहे हा इशारा

हे हंसणे हे रडणे ही आशा निराशा
न कळे आहे काय हा तमाशा
रात्रंदिनी जात आहे कुठे हा मेळावा
कुणाचा आहे हा इशारा

अजब आहे हा सोहळा
अजब आहे ही कहाणी
नाही कसले ठिकाण
नाही कसले निशाण
न कळे कुणासाठी जात आहे
हा जगन्नाथाचा रथ
कुणाचा आहे हा इशारा

हे शहाणे हजारो झाले भटके
गुपीत त्याचे कुणी न समजे
ही साखळी जीवनाची करीते भ्रमंती
कुणाचा आहे हा इशारा

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

रामभाऊ गणेश माळगी

रामभाऊ गणेश माळगी


"रामभाऊ" असं न चुकता आम्हीच त्याला म्हणायचो.कुणी त्याला " रामा" म्हणायचे तर कुणी त्याला " रे,रामा " अशी साद घालायचे कुणी " रामा रे " असं पण म्हणायचे.सर्व साधारण त्याला "रामा" च म्हणायचे.तर हा रामा म्हणजेच रामभाऊ गणेश माळगी,अगदी लहान असताना त्याचे वडील माझ्या आईकडे त्याला घेऊन आले आणि तिला म्हणाले "हा माझा मुलगा तुझ्याकडे ठेव,शिक्षणात त्याचं लक्ष नाही,तुझ्या हाताखाली कामाला घे, आणि दोन घांस घाल.मला आता एव्हड्या मुलांना पोसायला जमत नाही."आणला त्यावेळा तो दहा वर्षाचा होता.आईने विचारलं, पण तो, शाळेत जायला तयार नसल्याचं तिला दिसलं. निदान घरी काम करून पोट तरी भरील, त्याच्या बापाच्या घरी त्याची उपासमार व्हायची ती तरी होणार नाही,असं आईच्या मनात आलं.अतिशय गरीब स्वभावाचा रामा, खूप आज्ञाधारक आणि प्रेमळ होता.आई सांगेल ती कामं निष्टेने करायचा. आईला त्याची खूप दया यायची.त्याला ती पोटभर जेवायला घालायची.पण एव्हडं जेवू घालून रामाची शरिरयष्टी दुष्काळातून आल्या सारखीच, असायची. आणि तो म्हातारा होई तो शरिर तसेच ठेवून होता.
हळू, हळू रामा आईची बाजाररहाट करायला लागला. आणि पुढे पुढे आपल्या आपणच वेळ बघून, "आई,जरा वांयंच बाजारात जावून येतंय़ं हां!,वेंगुर्ल्यासून माशाची येष्टी येंवचों टायम झालो दिसतां" असं आईने ऐकलं न ऐकलं असं बोलून "साधना कपडे का साबून ईस्तमाल की जिये " असं मोठं अक्षरात लिहीलेली पिशवी खांद्दयावर टाकून चप्पल पायातून सरकून चालू पडायचा."दहा वांजता वेंगुर्ल्याची गाडी कशी येणार काही तरी निमीत्त करून हा बाहेर भटकायला जातो."असं माझे वडील कुरकुरून पुटपुटायचे.त्यावर आई म्हणायची "बिचाऱ्याला घरात काम काम करून कंटाळा येत असेल." हे ऐकून वडील गप्प बसायचे.
रामा गटाराच्या बाजू, बाजूने मान खाली घालून चप्पल घसटत, घसटत बाजारा पर्यंत जावून यायचा.वाटेत काही रामाला ओळखणारे दुकानदार किंवा हॉटेलवाले गम्मत म्हणून त्याची फिरकी घ्यायचे "रामा मासळी कसली ईलीसा रे ?" यावर रामाचं नेहमीचं उत्तर "येंगुर्ल्यासून नुकतीच गाडी सुटली, असां भाटाचो गडी सांगी होतो.बांगडे खूप रापणीत लागले हत असां ऐकलां" असं धांदात खोटं सांगून वेळ मारून न्यायचा. घरी आल्यावर स्वतःला गिल्टी समजून, न बोलता सर्व कामें सिरयस होवून हाता वेगळी करायचा.आईच्या हे लक्षांत येत असे पण ती आईच्या ह्रुदयाने त्याला क्षमा करायची.आणि ते त्याच्या लक्षात यायचं.
रामाच्या तोंडात अस्सल मालवणी(कोकणी) शब्द होते.बाजारातून जावून आल्यावर काही ना काही बातम्या घरात येवून सांगायचा.
"डुबळ्याचो म्हातारो खवांचलो(वारला)"
"केसरकराचो जांवई सडोफटींग(एकटाच) आसा"
"भाटाचो पंप चॉं,चॉं करून आवाज करतां "
मधेच कधी तरी मराठी मिश्रीत मालवणी बोलायचा.
"आता तुझा बाबा येणार तुला फिरायला "होरणार" (नेणार)".
" मी हुंतलं(म्हटलं) म्हणून सांगू नका हां!" वगैरे, वगैरे.
आपण काही कमी नाही असं दाखवायचा त्याचा प्रयत्न असायचा.

काही वर्षानी आम्ही जेव्हा मुंबईला आलो तेव्हा तो पण आमच्या बरोबर मुंबईला आला.सावंतवाडी सोडण्यापुर्वी भेटेल त्याला सांगत राहिला, "आता तुम्हाला मी गमणार(दिसणार) नाही" आणि ऐकणारा काही तरी प्रश्न विचारणार याची अपेक्षा करीत थोडा पॉझ घ्यायचा."असांss कायss ? " असा प्रश्न झाल्याची खात्री झाल्यावर, " असां काय म्हणतांss? परत परत येणां जाणां काय सोपा नाही लांबचा प्रवास आणि खर्च काय कमी येतां म्हणून सांगू." असं स्वतःच्याच कल्पनेत असलेले विचार सांगायचा.

ठाण्याचा उत्तरसळला राहून तिथे पण लोकात पॉप्युलर झाला. "काय रामा कसं आहे?" "बरां आहे" म्हणून उत्तर द्दयायचा.दहाएक वर्षानंतर माझा धाकटा भाऊ सावंतवाडीला नवीन धंदा करण्यासाठी गेला तेव्हा रामा पण त्याच्याबरोबर गेला.आतां रामाला लोक "मुबईकर " म्हणून संबोधीत होते.त्याचा त्याला गर्व वाटायचा. सुरवातील लोकल लोकाना आपल्या मनातली भर घालून मुंबईचे मोठेपण वर्णन करून सांगायचा.माझ्या भावाच्या फॅक्टरीत पडेल त्या कामाची त्याला मदत करायचा.आतां भावाने त्याला घरीकाम न करता फॅक्टरीत काम करण्याचे जणू प्रमोशन दिलं होतं. आल्या गेलेल्याला "बाबाची" म्हणजे माझ्या भावाची मोठेपणं सांगायचा.त्याचा स्वभाव बघून लोक त्याच्याशी प्रेमाने वागायचे.आलेल्या माणसाला न विचारताही जादा माहिती द्दयायचा.माझ्या भावाला त्याला समजावून सांगावं लागायचं.वडीलांच्या जागी तो त्याला मानायचा.

त्याच्या "बाबाची" फॅक्टरी चांगली चालली होती.पण जसं वंय होत होत गेलं तसा रामापण थकत चालला होता.खाकी हाफपॅन्ट(शॉर्ट) आणि वरती मोठ्या बटनाचा बुश शर्ट आणि पायांत जूतं (चप्पल) घालून "बरां आहे" म्हणून जबाब देणारा रामभाऊ रास्त्यावर कमीच दिसायचा.घरचे लोक पण त्याला काम देत नसत.बसून खायला रामाला खूप जीवावर यायचं.आपल्या नात्याचा नाही, गोत्याचा,तरी केवळ घरातला म्हणून राहील्याने किती जिव्हाळा लावून होता.डॉक्टर म्हणाले रामा आता दिवस नाही काढणार.त्याचं हार्ट खूपच वीक झालं आहे.हे ऐकून घरची मंडळी तो अंथरूणाला लागल्यावर अक्षरशः सेवा करीत होते.वय ऐंशी झालं होतं.आणि एक दिवस रामाने ईहलोकाची दिशा धरली.अगदी रक्ताचं माणूस जातं तसं सगळे त्याच्या पश्चात रडले.तो गेल्याची बातमी ऐकून मला एका नावाजलेल्या कवितेचं रामभाऊची गोष्ट लक्षात घेवून परिवर्तन करावं असं वाटलं.

("लळा जिव्हाळा शब्दच खोटे
कोण कुणाचे नाही
राजा
कोण कुणाचे नाही")

ह्या ऐवजी

लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

पिसे,सनतडी.काड्या जमवी
चिमणी बांधी कोटे
दाणा,दाणा आणून जगवी
जीव कोवळे छोटे
चिमणा उचलूनी नेई बाळा
जगविण्या साठी त्याते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

रक्तहि सगळे नसते
असू शकते माया
कोण कुणाचे नसून ही
अंतरी असते दया
सांगायाची नाती नसेना
प्रेम कुठे जाते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

माणुस सुद्धा प्रेम करतो
समजून दुसरा अपुला
दुसरा ओळखी उपकाराते
देई सर्वस्व त्याला
कोण कुणाचा जोडू पाहतो
या जगती नाते

लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

देवू नये अपुले मन

देवू नये अपुले मन


देवू नये अपुले मन
कधीही सुंदरीला
करूनी ते अपुले
मिटवीतात ते धुळीला
जीवनभर लाविती
रोग अपुल्याला

पाहूनी प्रीतीचा आजार
इलाज करीती बेसुमार
वाढवून प्रीतीचा आजार
करीती खूपच उपचार

नसे कसलाही भरंवसा
ह्यांच्या प्रीतीचा
घेती मन हिसकावूनी
पश्चात ते विसरूनी जाती

देवू नये अपुले मन
कधीही सुंदरीला
लोक सांगती देती दगा
ह्या अपुल्या मनाला.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

डॉ.बंडूमामा

डॉ.बंडूमामा


सत्येंद्र आजगांवकर म्हणजेच डॉक्टर बंडूमामा.माझ्या आईचा चुलत भाऊ.आईला सख्खे भाऊ नव्हते.बंडूमामा उंच,गहूवर्णी आणि लाघवी स्वभावाचा.मधूनच एक नाकाची पुडी दाबून दुसऱ्या नाकपुडीतून "सॉक,सॉक " असा आवाज काढायची संवय त्याला जडली होती.बंडूमामाची हजेरी त्यावरून ओळखावी. बंडूमामाची घरची गर्भश्रीमंती आणि घरच्या शैक्षणीक वातावरणाचा वारसा,यामुळे बंडूमामाला वैद्दयकीय शिक्षण घेणं फारसं कठीण झालं नाही.शिक्षण पूरं झाल्यावर जे.जे. हॉस्पिटलमधे इंटरनशिप करीत असताना त्याला स्वतःलाच टी.बी.चा प्रादुर्भाव झाला.हे लक्षात येताच त्याला खूपच मानसिक धक्का बसला.त्याच हॉस्पिटलात तो ट्रिटमेंट घेऊ लागला.त्यावेळी या रोगावर जालीम असा उपाय उपलब्ध नव्हता.तरीपण स्वतः डॉक्टर असल्याने अर्ध्या आवश्यक गोष्टींची तो काळजी घेऊ शकल्याने हळू हळू बरा झाला.आमच्या घरी तो "रिकव्हरी पिर्यड" मधे येऊन राहीला.माझ्या आईने त्याची खूप सेवा केली.हे अचानक आलेलं संकट त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळायला कारणीभूत झालं.त्याने लग्न न करण्याचं ठरवलं.पुन्हा त्याच्या डॉक्टरी शिक्षणाचा उपयोग त्याने करून घेतला.न जाणो ह्या रोगाचा पुनर्संभव झाला तर त्याच्या बरोबर त्याच्या सहचरणीलाआणि पुढे होणाऱ्या मुलाना नाहक क्लेश होऊ नये ह्या एक उदात्त विचाराने तो ह्या बाबतीत हट्ट्वादी राहिला.

आयुष्यात "टर्नींग पॉईंट्स " कसे येतात ते पहा.त्याच्या डॉक्टर ग्रुपमधल्या एका त्याच्या मित्र डॉक्टरने सहज सुचना केली की "तू ईकडे तिकडे डॉक्टरी व्यवसाय करण्या ऐवजी पांचगणीला एक टी.बी. स्यानीटोरीयम आहे.तिथे तूं ईकडे तर व्यवसाय आणि ईकडे तर तुझ्याच जाणीवेतला रोग असलेल्या रोग्याना उपाय आणि सुश्रुशा करण्याचे काम का घेत नाहीस?.नाहीतरी तुला संसार करायचा नाही,मग तिकडे तुला मिळेल तेव्हडा वेळ घालवून सेवेचे पुण्यपण मिळेल. " हा त्याच्या मित्राचा सल्ला त्यला आवडला आणि त्या तयारीला तो लागला.त्या स्यानीटोरीयम मधे डॉक्टरांची पण जरूरी होती.पांचगणीला बंडूमामा स्थाईक झाल्याने मला सुद्धा एकदा त्याच्याकडे जायला मिळालं.

डोंगराच्या पायथ्याशी वाई गांव,डोंगर वर चढून गेल्यावर पांचगणीचे पठार आहे आणि वर चढत गेल्यास महाबळेश्वरचे थंड हवेचे ठिकाण आहे.पांचगणीपण खूप थंड असते.ब्रिटीशानी ही ठिकाणे शोधून काढून त्यांच्या सुट्टीतल्या आरामासाठी ती चांगलीच सोययुक्त केली होती.एका श्रीमंत पारशी गृहस्थ्याने पांचगणीला राहाण्यासाठी एक बंगला बांधला होता आणि त्याला व्यवसायासाठी मुंबईत रहावं लागायचं. त्यालाही उतारवयात टी.बी. झाला असताना त्याच्या डॉक्टरने त्याच्या पांचगणीच्या बंगल्यात राहाण्याचं सुचविलं होतं.तसं करत असताना त्याला ह्या स्यानीटोरीयमची कल्पना सुचली.असं मला तिकडच्या मुक्कामात राहिलो असताना कळलं.

आता मुळ विषयाकडे वळूया.त्याचं असं झालं,बंडूमामा तिथे असताना एका बिलीमोरीया नावाच्या श्रीमंत पार्श्याला पेशंट म्हणून ह्या स्यानीटोरीयम मधे उपायाला पाठवीलं होतं.त्याची आणि बंडूमामाची चांगलीच दोस्ती जमली,ईतकी की आणखी आराम मिळण्यासाठी त्याने इंग्लंडला थोडे दिवस वास्तव्य करण्याचं ठरवलं.आणि तू पण माझ्या बरोबर माझा पर्सनल डॉक्टर म्हणून चल असं बंडूमामाला सांगितलं.अशा तर्हेने बंडूमामाला इंग्लंडला जायला मिळालं.मला आठवतं आम्ही त्याला सांताकृझ विमानतळावर पोहोचवायला गेलो होतो. आठवड्यातून त्यावेळी तिनदा इंग्लंडवरून फ्लाईट्स यायच्या, आणि टर्मीनल कसलं अगदी विमानाला हात लावता येईल असा सेंन्डॉफ देता येत होता.जुन्या हिंदी सिनेमातला
सीन "सुनील दत्त इंग्लंडहून आल्यावर त्याला रीसीव्ह करायला हार घेवून उभी असलेली वैजयंतीमाला " आठवलं म्हणजे झालं.

तिकडून जाऊन आल्यावर बंडूमामाला बिलीमोरीयाने फोर्ट मधल्या बझारगेट स्ट्रीट्वर एक दवाखाना उघडून दिला.आणि त्याच्या मागे त्याचाच एका चार मजली उंच ईमारतीत अगदी वरच्या मजल्यावर एक फ्ल्याट दिला.बझारगेट वरचे भाजी विकणारे आणि काही गरिब विक्रिते डॉ.बंडूमामाचे कायमचे पेशन्ट झाले होते. "होटल मे खाना और मशिद मे सोना" हे जीवन जगत असताना अधून मधून तो आमच्याकडे रवीवारी दवाखाना बंद करून यायचा.पुढे दिवस बदलू लागले.त्याच्या वयाला उतार येवू लागला.पुर्वी सारखं कामाचा रपाटा जमेना,हे कळू लागल्यावर बंडूमामाने आपला दवाखाना बंद केला.बिलीमोरीया पण निर्वतला. त्याच्या मुलांना पण जागा हवी होती.ह्या सगळ्यांचा विचार करून बंडूमामाने पण उर्वरीत
आयुष्य कसं घालवावं याचा नीट विचार केला होता.बिचाऱ्याला बायका मुलं असती तर हा प्रश्न उद्भवला नसता.आणि तरुणपणी लग्न न करण्याच्या निर्णयाच्या वेळी एव्हडं दूरवर लक्षं कोण देतो म्हणा.त्यामुळे "आलिया भोगासी" करावं लागतंच.

बंडूमामाची एक भाची मालाडला राहायची.तिची मुलं मोठी झाल्याने कामाधंद्दयामुळे तिच्या पासून दूर राहायची.ती आणि तिचा नवरा.त्यांच्याकडे तो राहायला गेला.पण जागेच्या आभावी झोपायला मात्र सामंत मास्तरांच्या गोरेगावातल्या संगीतशाळेत रात्रीचा जायचा.सामंत मास्तरांचं आणि त्याच नात होतं.सामंत मास्तरांच्या वर्षातून एकदा होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या संगीताच्या जाहीर कार्यक्रमाला हटकून तो हजर राहायचा. मग त्यादिवशी कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला अक्षरशः अंग मेहनत आणि जरूर लागल्यास हात मेहनत पण करायचा.अशा प्रसंगी "डॉक्टरा,डॉक्टरा " असं ओरडून त्याला बोलावून लोक त्याची मदत घ्यायचे. "सॉक,सॉक" असा आवाज आल्यावर बंडूमामाची हजेरी कळायची.
"दिवसा मागून दिवस चालले,ऋतुमागुनी ऋतू जीवलगा कधी रे येशील तूं" हे आशा भोसलेने गाईलेलं गाणं त्याला अतिप्रिय.सामंत मास्तरांच्या प्रत्येक गुरुपौणीमेच्या संगीत कार्यक्रमाच्या दिवशी त्याची ह्या गाण्याची फर्माईश असायचीच.अलिकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला बंडूमामा हजेरी देवू शकला नाही.परंतु सामंत मास्तर मात्र बंडूमामाचे आवडतं गाणं कुणाला तरी त्याची आठवण म्हणून गायला लावतात.मालाडहून रात्री झोपायला संगीत शाळेत रोज यायचं त्याला आता जमत नव्हतं. अलिकडेच मी त्याल भेटायला मालाडला गेलो होतो.मला म्हणाला " नाही रे मला,आता जमत, त्या स्टेशन वरच्या ब्रिजच्या पन्नास पन्नास पायऱ्या चढायला आणि उतरायला.वय आता ब्याएंशी झालं.खरं सांगु का तुला आता नाही जगावंस वाटंत. भोगलं सगळं.आता फक्त यमदुताची वाट पहात आहे बघ." ऐकून मला पण खूप वाईट वाटलं.माझ्या डोळ्यातून नॉनस्टॉप अश्रू वाहू लागले,कींव आली त्याची.
चेंज म्हणून मी रेडिओ चालू केला,आणि योगायोग असा रेडिओवर त्याच वेळी आशा भोसलेचं गाणं लागलं होतं."दिवसा मागून दिवस चाललेऋतु मागुनी ऋतु जीवलगा कधी रे येशील तूं"बंडूमामा ते गाणं ऐकत होता, की वार्धक्यातल्या डुलक्या काढत होता ते कळलं नाही पण मला माझ्या कविमनाने त्या
गाण्याचं विडंबन केलेलं जाणवलं."दिवसा मागून दिवस चाललेऋतू मागुनी ऋतूयमदुता कधी रे नेशिल तू "त्याचंच मन मला गाण्यातून त्याच्याच ईच्छेची जणू जाणीवच देत होतं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

संपली माझी कहाणी

संपली माझी कहाणी


ह्या जगती असती अनेक गमती
असती लाखो दुखदेयी सोबती
जीवनसाथी जाई मज सोडूनी
संपली माझी कहाणी

संकटे मनी नशिबाने येती
इच्छुक दोघे भेटू न शकती
दिसे बहार नावापुरती
दोन फुले फुलू न शकती
मनोरथाची बाग उधळूनी
बरबात झाली जवानी
संपली माझी कहाणी

जीत अपुली दुनियेत नसे
मने देवूनी हरतो जसे
ओठावरती नशिबी दुषणे
प्रेमभरी ते गीत कुठे
मन ही नसे अपुल्या ठिकाणी
हर कहाणी झाली पुराणी
संपली माझी कहाणी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

हा असा एकांत

हा असा एकांत


प्रेमभरी दुनिया ही
भासे किती तरी तरुण
हे असे शांत शांत
हा असा एकांत

ह्या उंच उंच पर्वतांच्या
गर्वीष्ट सावल्या
सरसावती सांगण्या
नजर उंचावूनी पहाण्या

येती देवदूत स्वर्गातले
होवून मुग्ध बोलण्या
हे असे शांत शांत
हा असा एकांत

नसे कसली अडचण
नसे कसले दडपण
पाऊला पाऊला मागे
असे एक घसरण
ठसे पाऊलांचे
करीती एक निशाण

हे असे शांत शांत
हा असा एकांत
प्रेमभरी दुनिया ही
भासे किती तरी तरुण

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com