Wednesday, February 13, 2008

शालूची शालीनता

शालूची शालीनता


शालूला तीन बहिणी आणि दोन भाऊ. मला आठवतं गाडीअड्ड्याचे पलिकडे शालू राहायची.त्यांच्या घरी दोन गाई होत्या.त्यांचे दूध विकून शालूची आई आपल्या चिल्लापिल्लांचा संभाळ करायची.शालूच्या वडीलांत काही अर्थच नव्हता.ह्या गृहस्थाने स्वतःच्या चंगळी शिवाय कांही केलंच नाही.सकाळी उठून घरा बाहेर पडल्यावर दुपारच्या पोटातल्या भूकाग्नीला शमवायला घरी यायचे."घडता घडता घडेल ते घडेल" अशा समजूतीत राहून दिवस काढायचे.शालूची आई तर त्यांना पुरी कंटाळून गेली होती.पण करणार काय? "रांदा,वाढा आणि उष्टी काढा"हा त्यावेळचा स्त्रीयांचा आयुष्यक्रम. परंतु,शालुचे आईकडचे आजोळ तसं श्रीमंत होतं म्हणून दोन गाई तिला देवून तिच्या उदनिर्वाचा पश्न त्यांच्याकडून सोडवला होता.लहानपणी आम्ही जास्त दुध लागलं तर शालूच्या घरी जावून आणायचो,हीच माझी शालूशी ओळख.त्यानंतर शालूला आजीआजोबांनी मुंबईला कॉलेजपर्यंतचं शिक्षण देवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता येवू दिली होती.
अलिकडे शालू मला एका कॉमन मित्राच्या लग्नात भेटली.ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिच्या वडीलांविषयी विचारलं.
मला म्हणाली
"मी लहान असतानाच आमचे वडिल आम्हाला सोडून घरातून निघून गेले.योगायोगाने अगदी अलिकडेच मला त्यांच एक पत्र आलं.माझा वाढदिवस ऑक्टोबरमधे झाला पण ह्या फेब्रुवारी मला त्यानी शुभेच्छाचं पत्र पाठवलं.माझा जन्मदिवस त्यांच्या कधीच लक्षात नसायचा.माझ्या आईशी त्यांच केव्हांच पटलं नाही.तिच्याशी शेवटचा झालेला एपीसोड हा खरा लकी ठरला.ती त्यांच्या पासून वेगळी झाली.तिच्याकडूनच मी दुसऱ्याला क्षमा करण्यात सुद्धा किती शक्ति असते हे तिच्याच वागण्याकडे पाहून त्या शक्तिवर विश्वास ठेवू लागले."
"तिने त्यांच्या विषयी कधीच तक्रार केली नाही.कधी काळी जर ते घरी आले तर त्यांच्याशी आदराने वागायला मला ती निक्षून सांगायची".
ती म्हणायची
"त्यांनी मला दुःख दिलंय,तुला नाही"
शालू म्हणाली
"नक्कीच मला सुद्धा त्यानी कधी कधी त्रास दिला आहे.माझ्या कॉलेजमधे येवून मझ्याजवळ पैसे मागायचे.आईला दुषणे द्दयायचे,माझ्या डिग्री समारंभाला मी त्याना बोलावलं नाही म्हणून त्याना राग पण आला होता.असं असलं तरी ते माझे वडिलच होते.ते आजारी झाले की मी त्यांची चौकशी करायची."
मी म्हणालो
"असले विचार फक्त मुलीच करू शकतात.मला वाटतं परमेश्वरानें स्त्रीजातीला हा मोठा गुणच दिला आहे."
त्यावर शालू म्हणाली
"मी त्यांची कधीच अवहेलना केली नाही.कारण कदाचित मी त्यांच्यावर कधीच प्रेम कलं नसेल. बहूदा माझं ज्यावेळी प्रेम करायचं वंय होतं त्यावेळी ते कधीच माझ्या जवळ नव्ह्ते. परंतु,वडिलांची उपेक्षा मी कधीच केली नाही. कदाचित माझे आजीआजोबा माझ्याजवळ होते म्हणून असेल.त्यानी मला लहान मुलांचे खेळ शिकवले. कुणी म्हणत हे सर्व वडलांकडून होणं चांगलं.पण मी म्हणते माझं आयुष्य आनंदात आणि आजीआजोबांच्या प्रेमात गेलं हे ही काही कमी नव्हतं."
मी म्हणालो
"पण तू जास्त करून तुझ्या वडिलांसारखीच दिसतेस."
शालूला हे ऐकून खूप बरं वाटलं.
ती म्हणाली
" हो! बऱ्याच दृष्टीने मी वडिलांचीच मुलगी आहे.माझी उंची,माझे डोळे, आणि माझे अकालनीय केस पिकणे.तसंच त्यांचा अनाकारण हट्टीपणा,आणि क्वचित वेळांचिडखोरपणा.पण मला त्यांची महत्वाकांशा आणि व्यवहारीपणा पण आला आहे."
"मी वकिल असून सुद्धा त्यांना जरुरीच्यावेळी मदत करू शकले नाही म्हणून माझा त्यांनी थोडे दिवस संबंधपण सोडला होता.मी त्यांच्या भावना ओळखू शकते.पण मी त्यांना बळी गेले नाही.आता ते माझ्याशी पुन्हा संबंध जोडू मागतात.मी पण तयार आहे.माझ्या सबंध आयुष्यात माझ्या वडिलानी माझ्या जवळ खूप गोष्टी मागितल्या पण क्षमा कधीही मागतली नाही.मी ती त्यांना ती न मागताच दिली आहे, कारण मी तसं करण्यात विश्वास ठेवते,आणि माझ्या डोक्यावरचा भार पण हलका होतो."

शालूची ही सर्व हकिकत ऐकून माझा तिच्या बद्दल वाटणारा आदर द्विगुणीत झाला.मी तिचा हात माझ्या हातात घेत तिला म्हटलं
"शालू,आपण कधी कधी म्हणतो ’नांवात काय आहे’ पण खरं सांगू,तुला जरी शालू म्हणतात तरी तुझ्या आईने तुझं मूळ नांव शालिनी ठवलेलं आहे.नांवाप्रमाणे खरंच तुझ्या अंगात शालिनता आहे."
शालू खूप जोराजोरात हंसली.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, February 11, 2008

प्रो.देसायांचा उद्वेग......

प्रो.देसायांचा उद्वेग......


काल प्रो.देसाई मला तळ्यावर भेटले.मला म्हणाले
"काय हा अत्याचार चालला आहे या जगात?आपण आपल्याला माणसं समजतो पण माणूसकी म्हणून काय राहिलीच नाही."
मी म्हणालो
"भाऊसाहेब आज कसल्या विषयावर मला लेक्चर द्दयायचं ठरवलंय? कळलं मला, पेपरातल्या बातम्या वाचून तुमचं मन उद्विग्न झालेलं दिसतंय."
मला म्हणाले
" मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगतो.तुम्हाला माझा विचार कसा वाटतो ते सांगा"
मी मनात म्हटलं भाऊसाहेब आपल्या मुळ पदावर गेलेले दिसतात.प्रोफेसर नां!.ते पुढे म्हणाले
" ज्यावेळी आपण जनावराना पाळीव करायला लागलो, त्याला आता दहा हजारच्या वरती वर्ष झाली असतील. त्यावेळ पासून आपण ईतर जगातले प्राणी आणि आपण माणूस ह्यात एक प्रकारचा वेगळेपणा दाखवायला सुरवात केली."
मी म्हणालो
"भाऊसाहेब तुम्ही आज मला बहुतेक प्राण्यावर लेक्चर देणार दिसतं."
जरा विचारात पडले आणि मग म्हणाले
" प्राण्यांकडून आपण माणसानी काय शिकलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय.माणसाने ह्या सर्व प्राण्यावर आपली सुप्रीमसी लादण्याचा प्रयत्न करीत, तो प्रयत्न अजून पर्यंत टिकून ठेवला आहे.ह्या जनावरांवर आपण माणसाने त्यांच्या अंगात असलेल्या गुणांचा दुर्लक्ष केलाच आणि त्याउप्पर त्यांच्यावर अत्याचार पण करीत आहोत.आणि ते सुद्धा हजारो वर्षे असं करीत आहो.आणि एखाद्दया माणसाचा अपमान करताना त्याला आपण "तू जनावर आहेस " अशी संबोधना करतो."
आंवढा गिळून पुढे म्हणाले
" जनावरांचे विजेते आणि ईतिहासाचे लेखक आपण, जनावराना ’ कृर,दुष्ट आणि अत्याचारी’ संभोधतो.आणि स्वतःला ’कनवाळू,बुद्धिवान आणि सुसंकृत’ समजतो.जनावरं जर बोलू लागली तर निराळीच गोष्ट ऐकायला मिळेल.माणासाने जर स्वतःला तोलून पाहिलं,आपण किती वर पर्यंत चढू शकतो,किती जोरात पळू शकतो, किती बारीक ऐकू शकतो,तर नक्कीच लक्षात येईल की आपण ह्या सर्व बाबतीत खूपच अपुरे पडतो."
आणखी मनोरंजक माहिती देत प्रोफेसर पुढे म्हणाले
" एखाद्दया जनावरांकडॆ तुम्ही बारकाईने बघीतलंत तर तुम्हाला कळेल,तुम्ही त्याच्या तोंडातला घांस काढून घ्यायला गेलात तरच ते तुमच्या अंगावर येईल,तुम्हाला चावायचा प्रयत्न करील.तुम्ही त्याच्या वाटेला गेला नाहीत तर तुमच्या भानगडीत पण पडणार नाही. ते अन्नाचा सांठा करून ठेवणार नाही.आपले पोट भरल्यावर कुणी का उरलेले अन्न खाईना त्याची कदर ते करणार नाही.एकदा पोटभरल्यावर तृप्त होवून निघून जाईल.हे सर्व गुण जनावराला निसर्गानेच दिले आहेत ना?मग माणसाने आपल्या वागणुकीकडे जरा डोकावून पाहिल्यास,कदाचित माणसालाच कुणी तरी जनावर म्हणण्याच्या लायकीचा माणूस नाही काय?"
प्रोफेसर बोलण्यात एव्ह्डे दंग झाले होते की क्लासात मी एकटाच आहे हे ते विसरून गेले असावेत.जरा फारमातच आले होते.
जरा खाकरून म्हणाले
"ह्या जनावरांची एखाद्दयाने जवळून पारख केली तर ज्यांच्या वर आपण अन्याय आणि अत्याचार केले त्यांची सभ्यता आणि उमदेपणा पाहून प्रभावीत होताना,गायीचा सौम्यपणा,कुत्र्याचा सामावून घेण्याचा गुण,बकरीचा साधेपणा, कुक्कुटाचा संभाळ करण्याचा गुण,गाढवाची सहनशिलता,शांतीने एकत्र राहण्याचा मेंढ्यांचा गुण, सश्याचा मैत्री ठेवण्याचा गुण,कुटुंबवत्सल बगळे,मांजराचासेल्फ कॉनफीडन्स,टर्कीचा जागृत रहाण्याचा गुण,तल्लखबुद्धि,स्नेह,आणि प्राणामिकपणा कुत्र्याचा आणि डुक्कराचा गुण पाहून छोटीशी लाज ठेवून राहिल्यास भला माणूस म्हणून घ्यायला काय अडचण आहे?"
एव्हडं बोलून झाल्यावर प्रोफेसर खूपच भावनावश झालेले पाहून मी म्हणालो
"भाऊसाहेब,तुम्ही खूपच मनाला लावून घेता,अहो हे असंच चालायचंच.शंभर टक्के समाजात नऊव्वद टक्के असलेच लोक असले तरी दहा टक्के तुम्हाला हवे तसे नक्कीच असणार नाही तर हा जगन्नाथाचा रथ चालला नसता."
माझा विचार प्रोफेसराना पटलेला भासला


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, February 9, 2008

दुःख मनातले जाईल वाया

दुःख मनातले जाईल वाया


अंग तुझे चंदनासम
मन तुझे दोलायम
कुणी नका देवू दोष मला
जर झालो मी हिचा दिवाना

तुझी देहयष्टी भावलेली
तुझे नयन काजळलेले
सिंदुरबिंब तुझ्या माथ्यावरी
लाल निखारे ओठावरती
जरी कुणावरी पडॆ छाया
दुःख मनातले जाईल वाया

तू सुंदर तनाची सुंदर मनाची
मुर्ती असे तुझी सुंदरतेची
जरुरी आहे आज मला तुझी
किती करू मी तुझी अपेक्षा
ना होई सहन यापुढे प्रतीक्षा


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, February 7, 2008

मासे पण शिकवतात

मासे पण शिकवतात


"आयुष्यात येणाऱ्या अडचणीना सामोरं कसं जायचं हे पाण्यातल्या प्रवाहाबरोबरच्या भोंवऱ्यात तरंगून आपला जीव कसा वाचवावा हे समजणाऱ्या माश्याकडून मी शिकलो" हे दत्तुचे शब्द माझ्या चांगलेच लक्षात राहिले आहेत.

त्याचं असं झालं त्यावेळी आम्ही वरसोवाला राहत होतो.आमच्या घराजवळ "फिशरीज रिसर्च इंन्सटीट्युट" आहे.एकदां मला त्यांच्या डिग्री समारंभाच्या कार्यक्रमाला आमंतत्रण होतं. त्या गर्दीत मला एक ओळखीचा चेहरा दिसला.त्याला ओळख विचारावी म्हणून त्याच्या जवळ जावून मी प्रश्न विचारण्याचं साहस केलं
"काय रे तू घोडग्यांचा दत्तु का?"
तो म्हणाला
"होय. मी पण तुम्हाला त्यावेळीच ओळखलं, ज्यावेळी तुम्ही आमच्या डायरेक्टरशी गप्पा मारत होता.पण तुम्हाला विचारायचं धारीष्ट केलं नाही.बरं झालं तुम्हीच मला विचारलंत ते"
आणि ह्या नंतर आमचा सहवास वाढत गेला.आणि आम्ही एकमेकाला वरचेवर भेटत होतो.

दत्तु आणि मी वेंगुर्ल्याला एकाच शाळेत शिकत होतो. तसा दत्तु मला खूपच ज्युनीअर होता.पुढच्या शिक्षणासाठी जसा मी मुंबईला आलो तसा दत्तु आणि त्याचे आईवडील त्याच्याही शिक्षणासाठी मुंबईत शिफ्ट झाले.
एकदा दत्तु माझ्या घरी जेवायला आला असता आपली माहिती सांगू लागला.
"माझ्या वडीलानी मुंबईला गिरगांवला खोताच्या वाडीत एक घरगुती खानावळ काढली होती.आणि त्यावेळी मी प्रभुसेमीनरी मधे शिकत होतो.त्यानंतर मी एलफिनस्टन कॉलेजनधे पुढचं शिक्षण घेवून एम.एससी झालो.आणि आता फिशरीज मधे पीएचडी केलं."
चहाचा कप वर उचलून बशीत चहा ओतत दत्तू सांगत होता.
"आपल्या माणसाच्या घरी बशीतून चहा भुरकायला बरं वाटतं.तुमच्याकडे कसला शिष्टाचार? "
असं म्हणत हंसत हंसत पुढे सांगू लागला.
"मी आणि माझे वडील दर रविवारी ’भाऊच्या धक्क्यावर’ समुद्रातून मासे पकडण्याचा छंद म्हणून जात असायचो. माझ्या गळाला पहिला मासा लागला त्यावेळी किती आनंद मला झाला म्हणून सांगू?" मी त्याला विचारलं "तुला फिशरीज रिसर्चचं बाळकडू ह्यामुळेच मिळालं का?" "ऐका तर खरं " असं म्हणत दत्तू पुढे सांगू लागला." पाण्याचा सागर दिसला की माझं मन निरनिराळ्या माशांसाठी वेडं होतं.त्याचं जास्त श्रेय माझ्या वडीलांचच आहे."

दत्तू तसा कोळी ज्ञातीतला.त्यामुळे गावाला सुद्धा ते कोळीवाड्यातच राहायचे.मोठ मोठे खपाटे घेवून दत्तूचे आजोबा आणि वाडवडील मांडवीवर मासे मारी साठी जायचे.
"माझी आयुष्यातली महत्वाची वेळ माझ्या वडीलांबरोबर मासे गळाने पकडण्यात गेली.पण माझ्या वडीलांच्या स्वभावाला दुसरा कांगोरा होता.ते चटकन रागवायचे.कधी कधी एकदम रागावून मला मारायचे.रागच्याभरात त्याना फक्त त्यांचीच बाजू खरी वाटायची.माझी बाजू ऐकून घ्यायची त्यांची तयारीच नसायची.पण त्यामुळे मी खचलो नाही,जरा कोडगा झालो,हतबल झालो,आणि थोडा कडवटपणा आला,पण दुसरा रविवार आल्यावर पुर्वीच्या आठवड्याचे सर्व विसरून परत दोघेही गळ घेवून जायचो."
दत्तु पुढे सांगत होता.
" काही वर्षानंतर माशां वरची माझी आवड जागृत ठेवूनमी ग्रॅज्युएट झालो. मी नेहमीच चांगला विद्दयार्थी म्हणून राहिलो.पण नेहमीच मी असुरक्षतेचा बळी राहिलो.मला कसलाच भरंवसा राहिला नाही.जणू माझ्यातून भरंवसाउचकून काढला गेला.माझा मार्ग मी शोधत राहिलो पण चक्कर घेतच राहिल्यानं सर्व शक्तिचे निराकरण झालं."
नंतर अगदी आनंदात येवून तो पुढे म्हणाला
" एका रात्री जणू ’नवलची घडले’,मी मासा खवळत्या पाण्यात कसा पोहतो यावर संशोधन करत असता, असं दिसून आलं की माशांना खवळत्या प्रवाहात सुद्धा पाण्याच्या भोंवऱ्यात स्नायुंचा कमीत कमी वापर करून तरंगण्याची क्षमता असते. माझ्या एकाएकी एक लक्षात आलं की अडचणी पण एखद्दयाला कमी धडपड करायला मदत करतात.आणि ह्याचेच आकलन होण्याची जरूरी मला फार दिवसापासून होती."
अगदी अभिमानाने दत्तु पुढे म्हणाला.
" माझ्या संशोधनावर मी खूप मेहनत घेवून मग मी पीएचडीसाठी युनिव्हर्सीटीमधे माझा थीसीस सादर केला.तो डिग्री देण्याचा समारंभ होता.
त्या ढगाळ संध्याकाळी माझे आईवडील वेळात वेळ काढून आले आणि माझ्या बाजूला उभे राहून माझा हात आपल्या हातात घेवून मी डिग्री घेताना मला जणू आशिर्वाद देत होते."
आपले डोळे पुसत दत्तु पुढे म्हणाला
" मला वाटतं,माझ्या आयुष्यातल्या अडचणीना मी सामोरे जाण्यासाठी मला त्यांच्याशी दोन हात न करता,त्याना वाट देवून बाजूला होणं जमू शकलं.प्रवाहाबरोबर जाण्याचं आणि भोंवऱ्यात मिळाल्यावर तरंगून घेणं, मी माशाकडून शिकलो. दुसऱ्या बद्दल कटुता न ठेवता मी जगायला शिकलो.एखाद्दयाला माफ करण्याच्या प्रकारापासून हे निराळं आहे. आयुष्यातल्या होणाऱ्या घटनांची व्याख्या मी अशा पद्धतीत करतो,आणि सामोरा जातो."
तो क्षणभर गप्प झाल्यावर,मी त्याला जवळ घेतलं,आणि म्हणालो
"पीएचडी होण्याच्या लायकीचाच आहेस."


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, February 4, 2008

सुखाचा शोध

सुखाचा शोध


"सुखी राहण्याच्या परिस्थितीची नुसती ईच्छा करून चालत नाही,किंवा ती परिस्थिती एक नशिबाने घडणारी गोष्ट म्हणून तिच्याकडे मनाची एकाग्रता करून चालत नाही."

मला वाटतं,आपल्या सुखाची परिस्थिती निर्माण करण्याची आपल्याच अंगात ताकद असते.ही जादू जगात
मनुष्य करू शकतो.सर्व साधारण जीवन हे पण एक असाधारण असतं.

एकदा,मी माझ्या घरातल्या खिडकीत बसून बाहेर बघत बसलो होतो.
"जीवनात ही घडी अशीच राहू दे.
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे"

हे आशाचं गाणं रेडिओवर लागलं होतं.ते गाणे ऐकण्यात तल्लीन असताना मनात विचार आला की आपण किती सुखी आहो.एव्हड्यात बाहेरच्या बसस्टॉप वरती एक गरीब जोडपं भर पावसात एकमेकाला खेटून उभं राहून ओलं होवू नये म्हणून खटाटोप करीत होतं त्यांच्यावर माझी नजर गेली.थंडीची त्यांना हुडहुडी भरली होती. बरीचशी ती दोघं बेचैन वाटत होती. अंगावर त्यांच्या फुटपाथवर विकत घेतलेले कपडे दिसत
होते."पाणेरी" किंवा तत्सम दुकानातून घेतलेले नव्हते. मला ठाऊक आहे कारण मी त्याच्यातून गेलो होतो. ते जोडपं पावसाच्या पाण्यापासून ओलं न होण्यासाठी एकमेकाला खेटून राहून प्रयत्नांची पराकाष्टा करीत होतं.पण नंतर मी त्यांच्याकडे निरखून पाहिलं तेव्हा ते एकमेकात खुषीने हंसत असताना दिसले.कदाचित एकमेकात विनोद करून हंसत होते.हे बघून मी एकाएकी त्यांच्या बद्दलची आलेली किंव सोडून देवून त्यांचा हेवा करू लागलो.

मनात म्हणालो काय गंम्मत आहे त्यांना पावसाचा त्रास होत नव्हता,त्यांच्या त्या तसल्या कपड्यांबद्दल त्यांना कसलाच त्रागा नव्हता,मी घरात आरामात बसलोय याचा पण त्यांना हेवा वाटत नव्हता.क्षणभर वाटलं त्यांच्या सारखं सुखी व्हावं.तो एक क्षण मला एक घटके सारखा वाटला.त्या क्षणात मला दिसून आलं की माझ्या सहानभुतीची त्यांना जरुरी भासली नाही,मला वाटलं होतं की त्यांना खूप कष्ट होत असतील पण तसं नव्हतं.आणि नंतर माझ्या चांगलच लक्षात आलं,आपल्याला आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण करण्याची प्रचंड ताकद आहे.मला वाटतं,आपण सगळे हे करू शकतो.जीवन जगतानाच आयुष्याच्या संदर्भाने सुखी राहता येतं. सुखी राहण्याच्या परिस्थितीची नुसती ईच्छा करून चालत नाही, किंवा ती परिस्थिती एक नशिबाने घडणारी गोष्ट म्हणून तिच्याकडे मनाची एकाग्रता करून चालत नाही. आपल्याच मनाच्या ताकदीने आपलीच आपल्याला मदत होवू शकते.सुखाचा शोध करू शकतो.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, February 3, 2008

मला वाटतं.........

मला वाटतं……
बरेच लोक आग्रह करतात की प्रत्येकाने दुसऱ्याकडे चांगल्या दृष्टीने (पॉझीटीव्ह ऍटीट्युडने) पहावं,जरी संबंध वाकडे येऊ लागले तरी ही.
हाच मार्ग प्रत्येकाला सुखी,समृद्ध आणि सौष्टव करतो.पण मुद्दा असा आहे की अशा परिस्थितीला सामोरं जाता आलं नाही की मनाला जरा धक्का बसतो.
प्रथम, पाडाव होत असल्याने थोडं वाईट वाटतंच,शिवाय हंसतमुख राहून जणू काहीच झालं नाही असा दृष्टीकोन ठेवायला जरा जड जातं किंवा मन कष्टी होतं.कदाचीत प्रत्येक वेळी काहीच झालं नाही असं होतही नसेल.
मला वाटतं, एकच मार्ग बरोबर असतो, असं पत्करून ह्या जीवनातले कष्टी समस्या सोडवता येणार नाहीत. प्रत्येकाची विचारपातळी वेगळी वेगळी असते,आणि आप-आपल्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्नास अटकाव आल्यास मग ते चांगल्या दृष्टीने अथवा वाईट दृष्टीने पाहीलं तरी योग्य होईल असं नाही.बरेच वेळा अशा दुर्धर परिस्थितीत प्रत्येकाला थोडं दुःखी कष्टी वाटतं. पण असं वाटणं म्हणजे काही मानसिक आजार नव्हे. जीवनात अडचणी येतात आणि प्रत्येक वेळी सुखी होता आलं नाही तरी ठिक आहे.
असंच एकदा एकाला ह्याचा पडतळा झाला.एकदा त्याला फ्लु झाला. डोकं खूपच दुखूं लागलं,बरेच आठवडे ते राहिलं.एका न्युरॉलाजीस्टने त्याला सांगितलं की त्या थंडीच्या दिवसात ह्या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच लोकाना मेंदुच्या रोगात झाला.पण त्याला त्याने विश्वासात घेऊन सांगितलं की,
“त्यातून तू बचणार आहेस”.
परंतु त्या रुग्णाला बरेच आठवडे ह्यामुळे मानसिक कष्ट झाले.त्याला वाटलं की त्याला ब्रेन ट्युमर किंवा सिझोफ्रेनीया झाला. समजुतदार व्यक्ति असून सुद्धा त्याला जमलं नाही.तो भावनाभ्रष्ट झाला होता.
नशिबानं,त्याने एका सायक्याट्रीस्ट मित्राला विचारलं,की तो खराच सिझोफ्रेनीक आहे का?.
तो म्हणाला
”नाही,तू फक्त गोंधळला आहेस,पण कसला मानसिक रुग्ण नाहीस. तू घाबरला आहेस एव्हडंच”
तो सायक्याट्रीस्टला म्हणाला
” माझे दोन मित्र मला आनंदी राहण्याचा आग्रह करतात.मी एक आठवडा तसा राहण्याचा प्रयत्न केला.पण त्याने उलट मी जास्त दुःखी झालो.”
तो त्यावर म्हणाला
“तू तुझ्या मित्रांना सांग,मी जास्त आनंदी राहावं असं मला वाटतं, पण सध्या आनंदी राहायलाच मी घाबरलो आहे.माझं हे घाबरणं नाहीसं झालं की मी तुम्हाला सांगीन.”
असा निरोप दिल्यावर त्याला जरा बरं वाटलं.त्याने त्याचाच मार्ग पत्करल्याने त्याला बरं वाटू लागलं.त्याचा गोंधळ त्याने त्याच्याच मार्गाने सोडवत गेल्याने त्याला असं दिसून आलं की नेहमीच माणसाने चांगला दृष्टीकोन ठेवून राहिलं पाहीजे, ह्या कल्पनेनेच तो घाबरला होता.
तात्पर्य काय तर ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या सारखं असावं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, February 2, 2008

तुजसम नाही पाहिली दुसरी

तुजसम नाही पाहिली दुसरी


पाहिल्या मी अनेक सुंदरी
परी
तुजसम नाही पाहिली दुसरी
हा देखणा चेहरा
हा नजरेतून बहाणा
हा मेघा सम केशभार
ही नयनातली विज
दे शिक्षा तू सत्वरी
तुज सम नाही पाहिली दुसरी

तू ही सुंदर सुंदरही ऋतु
मन माझे नसे काबू
मार्ग मोकळे
धडके अंतर सगळे
मदिरेविण नशा अंतरी
तुजसम नाही पाहिली दुसरी

जरी रोखीशी तुझे भाषण
येवो ना मला कधीही मरण
असशी तू परी अथवा सुंदर
का होशी एव्हडी मगरूर
ऐक कुणाचे थोडे तरी
पाहिल्या मी अनेक सुंदरी
परी
तुजसम नाही पाहिली दुसरी


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com