Thursday, March 13, 2008

प्रो.देसायांना वाटतं……..

आज मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.बरेच दिवस तळ्यावर त्यांची भेट झाली नाही तेव्हां म्हटलं बरं तर आहे ना त्याना!।भाऊसाहेब वाचत बसले होते.मला पाहून त्याना बरं वाटलं असावं.
मी म्हणालो,"भाऊसाहेब काय वाचता?विशेष काही तरी विषय असणार।"भाऊसाहेब म्हणाले,"खूप दिवस टी.व्ही वर ग्रीनहाऊस इफेक्ट, एनव्हायरनमेंट,ग्लोबलवारमींग असे मोठे मोठे शब्द कानावर
येतात.म्ह्टलं काय आहे प्रकरण म्हणून जरा इंटरनेटवर गेलो आणि ह्या विषयावर काही पुस्तकं चाळली.त्यातून रेकमेंड केलेलं हे पुस्तक लायब्ररीतून आणून वाचत होतो.काय म्हणता बसा चहा घ्या."मी म्हणालो,"भाऊसाहेब मी जरा घाईत आहे.तुमची फक्त खबर घ्यायला आलो होतो.तुम्ही हे सगळं वाचून झाल्यावर मला तुमची बॉटम लाईन सांगा.उद्दया आपण तळ्यावर भेटू तेव्हा"असं म्हणून मी काढता पाय घेतला.दुसऱ्या दिवशी आम्ही तळ्यावर भेटल्यावर प्रो.देसायानी स्वतःहूनच विषय काढला.मला म्हणाले," सर्व प्राणीमात्रानवर आपणां माणसाचा आदर असला पाहिजे.मला वाटतं, माणासावर, ह्या पृथ्वीबद्दल आणि
पृथ्वीवरच्या जीवनाबद्दल एक नकळत जबाबदारी आली आहे.खरं सांगू तुम्हाला हे पुस्तक वाचल्यावर मला माझं लहानपण आठवलं.जमीन खणतां खणतां मला लहान जीवजंतू खालून येताना पाहून काय हा चमत्कार आहे असं वाटायचं.प्रत्येक जीव, सरपटणारा,वळवळणारा पाहून मला खूप अचंबा वाटायचा. अगणीत तास मी आमच्या पोरसात,काय काय चमत्कार ह्या जमीनीत असावा,याचा शोध करीत बसायचो.काही लोकाना कदाचित माझं हे चमत्कारीक वागणं पाहून तिटकारा येत असावा. हे प्राणी गिळगीळीत कीडे वाटत असतील.पण मला तर हे सगळे प्राणी, ह्या विश्वात निरनिराळ्या आकाराचे आणि प्रकाराचे दिसतात. आणि हे गिळगीळीत किडे जणू लहानात लहान राहून ह्या सर्व लहान मोठ्या प्राण्यांचे प्रतीनिधीत्व करतात असं वाटायचं।जीवन चक्राशी हे अगदी निगडीत वाटायचं. सर्व ऋतूमधे मला आवडणारा वसंत ऋतू."मी म्हणालो,"भाऊसाहेब,तुमच्या लहानपणाच्या आवडीच्या विषयाचीच आता उदोउदो होत आहे असं मला वाटतं जे तुम्ही अलिकडे वरचेवर सगळीकडॆ ऐकतां आहां."प्रो.देसाई मला म्हणाले,"अगदी बरोबर बोलला. वसंत ऋतूच्या अगदी सुरवातीला झाडावरच्या घरट्यांमधून बाहेर पडणारं ते पक्षांच पिल्लू आणि गडद निळ्या अंड्याचं ते घरट्यातून खाली पडणारं कवच, मी कितींदा पाहिलंय.निसर्गाच्या निर्मीतीचक्राची त्याच वेळेला मला जाणीव व्हायची.हा निसर्गाचा निर्मीतीचा दुवा पाहून मी ह्या गोष्टीबद्दल खूपच भारावून गेलो होतो आणि अजून पर्यंत ती जाणीव माझ्या मनात आहे.त्यामुळे ह्या वयात पण ग्रीनहाऊस ईफेक्ट, एनव्हायरनमेंट,ग्लोबल वारमींग हे शब्द कानावर पडल्याने माझ्या मनातले ते लहानपणातले खोल भारावून गेलेले विचार मला हे पुस्तक वाचायाला जणू आव्हान देत आहेत असं वाटलं.""पण भाऊसाहेब,हे आतांच जगात एव्हडं अवडंबर कसलं चाललं आहे?" असं मी त्याना विचारल्यावर ते म्हणाले,"तुम्ही फारच चांगला प्रश्न विचारलात. अहो,ह्या जीवनचक्राचा आदर करण्याचा लाभ घ्यायला सर्वच मनुष्यप्राणी तयार असलेला दिसत नाही.उलटपक्षी हा निसर्ग आणि हे विश्व सर्वांचं आहे ही भावना न बाळगता, निसर्गातल्या सोयी ह्या आपल्यापुरत्या गरजा समजून काही लोक त्याचा दुरूपयोग करीत आहेत.ह्या यंत्रयुगातल्या क्रांतीने जीवन यांत्रींक करून तो एक कारखाना केला आहे.आणि मनुष्याला आवश्यक असलेली मुबलक नैसर्गीक भिन्नभिन्नता पद्धतशीरपणे वाटेला लावली आहे.एकमेकावर अवलंबून असणाऱ्या जीवंत प्राण्यांच्या आवश्यक्यतेची,स्वतःहून केलेली हानी एव्हड्या टोकाला पोहोचवली गेली आहे,की कुठचाच पृथ्वीचा भाग रक्षीत राहिलेला नाही.वातावरणात एव्हडी विषारी टॉक्झीन्स भरमसाट प्रकाराने आपल्या यंत्रसामुग्री बनविण्याच्या हव्यासाने फेकली गेली आहेत की त्याची आता परिसीमा गाठली गेली आहे.त्यामुळे वातावरण धोकादायक शीगेला पोहचलं आहे.त्यामुळे हा वातावरणातला बदल सर्व तऱ्हेच्या जीवनाचं मुलभूत चक्रच बदलून टाकण्याचा इशारा देत आहे, ताकीद देत आहे.आणि त्यामुळे नवीन नैसर्गीक उत्पतीला वेळच मिळेनासा झाला आहे.मी म्हणालो," भाऊसाहेब हे जे तुम्ही मला सांगता, ह्याचे प्राणीमात्रावर नक्कीच दुष्परीणाम झाले असणार हे उघडंच आहे." कपाळावर आठ्या आणत भाऊसाहेब म्हणाले,"काय सांगू तुम्हाला,कॅन्सर झालेला, एखाद्दया डॉक्टरचाच जवळचा नातेवाईक, स्वतः आपल्या रोगाबद्दल अज्ञानात आहे आणि त्या डॉक्टरला मात्र त्याच्या रोगाची जाणीव असल्यानें त्या रोग्याचं कसं होईल याचा प्रश्न पडला आहे तसं ह्या विषयातल्या जाणकाराना पृथ्वीबद्दल वाटत आहे.तुम्हाला मी एकामागून एक विटंबना सांगतो.धृवावरील सर्व पोलर अस्वलांचं राहण्याचं बर्फ वितळत आहे.समुद्रातील कासवांच्या अंड्यांच्या उत्पतीवर गंडांतर आलं आहे.मोठ्या देवमास्यांच्या ठरावीक खाण्यावर संकट आलं आहे. समुद्रातल्या वनस्पतीचा मुळ रंग धुवून गेला आहे.ही थोडी फार उदाहरणं मी तुम्हाला सांगितली.त्याशिवाय वातावरणातल्या होणाऱ्या बदलाने मानवाच्या संस्कृतीवर आणि त्याच्या रहाणीमानावर दुष्परीणाम होत आहेत,इतके की तो आता जणू वातावरणाचा निर्वासीत झाला आहे.ह्या सर्व संकटावर मात करण्यासाठी फारच कमी प्रयत्न केले जात आहेत इतके की आणखी कांही थोड्याच
अवधीत पृथ्वीचं वातावरण संपुर्ण कायमचं बद्लून जाणार आहे.मला काळजी वाटते की,सर्व प्राणी मग ते आमच्या पोरसात असो की जगात आणि कुठे असो मानवाच्या हव्यासामुळे बळी जावूं नयेत."हे सर्व ऐकून मी प्रोफेसरना म्हणालो,"भाऊसाहेब,तुमची मात्र कमाल आहे.एखाद्दया विषयाच्या तुम्ही मागे लागला की पुरंपुर तो विषय तुम्ही पिंजून काढता। आणि इतराना कौशल्याने समजावून सांगता।रुईया कॉलेजचे प्रोफेसर उगीचच झाला नव्हता."भाऊसाहेबांच्या मिष्कील हंसण्यात माझ्या म्हणण्याला दुजोरा मिळाल्याचे पाहून मला बरं वाटलं


श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, March 11, 2008

मी शिकले माझ्या वडलांकडून

"काही गोष्टी त्यानी मला नकळत शिकवल्या।जसं काम करून आल्यावर धडपडत जिना चढून वर येवून ते त्यांच शेवटचंच येणं कसं झालं, ते पण."
ज्यावेळी वृंदा मला बोलता बोलता असं म्हणाली त्यावेळेला मला निश्चीतच वाटलं तिला काहीतरी मेसेज मला द्दयायचा आहे.वृंदा माझ्या एका मित्राची मुलगी.दहा वर्षापुर्वी तिचे वडील निर्वतले.त्यावेळेला मी तिला भेटलो होतो.त्यानंतर पांच वर्षापुर्वी मी तिला तिच्या लग्नात भेटलो.सध्या ती न्युझरिपोर्टरचं काम करते.
मला म्हणाली,
"काका,तुम्ही तुमची तब्यत चांगली ठेवली आहे.तुम्ही सुरवातीपासून काम करण्य़ाची एक शिस्त ठेवली होती. मी तुमचे उदाहरण माझ्या वडलाना नेहमी सांगत असायची।मला आठवतं तुम्ही नेहमी म्हणायचा, शरिर हे ही एक यंत्र आहे.कंप्युटर मधे त्याच्या मेमीरीच्या एखाद्दया मेमरी लोकेशन मधे जर बिघाड झाला तर कंप्युटर स्वतःच ते लोकेशन शोधून काढून बायपास करतो.आणि अशा तऱ्हेने आपलं काम अखंड चालू ठेवतो.तसंच काहीसं आपलं शरिर आपल्या व्याधी दुरुस्थ करतो. तरीपण आपण यंत्रालाही विश्रांती देतो,तशी शरिरालापण दिली पाहिजे हे मी माझ्या वडलाना नेहमीच सांगायची.ते
त्यानी कधीच ऐकलं नाही"
मी तिला म्हणालो,
"वृंदा, तू तरी आता तुझ्या प्रकृतीकडे लक्ष देतेस का?"
त्यावर ती म्हणाली,
"सध्या जे देशात वारे आहात आहेत,ते सर्व पश्चिमेकडून येत आहेत. लोकांकडून ज्या अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत त्यात ज्याला "वर्क एथीक्स" म्हणतात त्याचा पगडा तरुणाबरोबर इतर सर्वांवर पडत आहे. एकदा सकाळी घरातून ऑफिसमधे गेल्यावर घरी परत येण्याची वेळ ठरलेली नसते.कारण काम संपतच नाही.पांच वाजता घड्याळ बघून ऑफिस सोडण्याचे दिवस आता गेले.तसं करणं अगदीच चमत्कारीक वाटतं. माझ्या वडिलानी मला मरमरेसो काम कसं करावं ते शिकवलं.तासनतास काम करणं आणि कामाला वाहून घेणं हे मी त्यांच्याकडून पाहिलं.पण काही गोष्टी त्यानी
मला नकळत शिकवल्या.जसं काम करून आल्यावर धडपडत जिना चढून वर येवून ते त्यांच शेवटचंच येणं कसं झालं ते पण.
माझ्या वडलांचा स्वतःचा बिझीनेस होता.ते स्वतः कंपनीचे मार्केटींग करायचे.बऱ्याच ठिकाणी जावून त्यांच्या येणाऱ्या नव्या प्रॉडक्टबद्दल त्यांना लेक्चर द्दयावं लागायचं।बोलून बोलून खूप थकून जात असत. फिरतीचे काम बरंच असायचं. तशांत त्याना डायबेटीस होता.शिस्तीचे भोक्ते असल्याने शब्द दिल्यावर तो पाळण्याचा पराकाष्टा करायचे.या सर्व कारणानी त्यांना त्यांच्या या वागणूकीची किंमत शेवटी द्दयावी लागली.
ते अठ्ठावन्न वर्षावर निर्वतले.
आता त्याला दहा वर्षे होवून गेली,जेव्हा शेवटी माझे वडील त्या रात्री घरी आले होते.त्यानंतर मी त्यांच्या काम करण्याबद्दल खूप विचार केला.मी माझ्या मनात नक्की ठरवलं,मी धडपडत जिना चढणार नाही.माझा न्युझरिपोर्टरचा जॉब मला खूप आवडला असला तरी,मी मरमरेसो काम करणार नाही.
पण तसं करणं मला अगदीच सोपं झालं नाही.बोलून चालून मी माझ्याच वडीलांची मुलगी होते ना! कॉलेजमधे लायब्ररीचा दरवाजा उघडण्या पुर्वी मी दरवाज्यात उभी असायची.
माझे वडील मला एकदा म्हणाले,"मला कधी कधी चौपाटीवर जावून सूर्यास्थ पहायची इच्छा येते पण कामा मुळे मला तसं अजिबात करता येत नाही।"माझे वडील तसे सर्वपल्ली होत,लिखाण,बुद्धिबळ खेळण्यात वाकबगार होते,त्यांना दिलचस्पी होती,वसंतराव देशपांडे,सुधीर फडके,अरुण दाते यांची गाणी त्याना विशेषकरून आवडायची.म्हणजे ही झाली त्यांच्या आवडीनिवडीची प्रकाश टाकणारी यादी.पण ही यादी संपवून झाल्यावर सूर्यास्थ पहायला चौपाटीवर जायला त्यांना वेळ मिळत नव्हता.मला त्यांच्या ह्या "डेडलाईन" ची संवय लावून घ्यायची नाही.
मग ह्यातून एक प्रश्न उभा राहतो,मी जर पांच वाजता काम उरकून परत येऊन सूर्यास्थ बघायला चौपाटीवर गेले तर त्याचे पडसाद काय होतील.माझ्या करीयरच्या हाईटवर न पोहचण्याचा मी धोका घेते काय? कदाचीत शक्य आहे.पण निदान लवकर गेल्याने,माझ्या मंडळी बरोबर संध्याकाळी जेवण घेता येईल.आणि चौपाटीवर जावून त्यांच्याच बरोबर लांबवणाऱ्या सावल्यातून जाताना भरपूर सूर्यास्थ पहाण्याचा आनंद लुटता येईल.आणि हे नक्कीच काहीतरी मिळाल्याच्या समाधानीला योग्य किंमत
दिल्याचा आनंद होईल तो वेगळाच।


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, March 9, 2008

वाटे कशी तुझ्यावर प्रीत करू

नेत्री माझ्या सामावूनी
वाटे तुला वचन देवू
मनी माझ्या बसवूनी
वाटे कशी तुझ्यावर प्रीत करू


नाही कधी अपेक्षली
साऱ्या जगातली खूषी
थरथरत्या ओठानी फक्त
मागितले एक स्मित
वाटे बसवूनी तुला समोर
करावी तुझी खुषामत


नये सुटू साथ तुझी
वाटे तुला शपथ देवू
देवूनी तुला सर्व सुखे
वाटे तुझेच दुःख घेवू
कशा प्रकारे माझी प्रीत
तुझ्यावरती प्रकट करू


मनी माझ्या बसवूनी
वाटे कशी तुझ्यावर प्रीत करू


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, March 8, 2008

संभाळ रे मना

संभाळ रे मना
नाराजून अन नाराजवून
काय मिळणार
जिथे नसे आधार तिथे
जावून काय मिळणार


परतून ये
दुरावून अन दुरजावून
काय मिळणार
जे तुझ्यात सामावले
त्यावर दया करून
काय मिळणार


जीवनी अपुले मानुनी
जिथे नसे आधार तिथे
जावून काय मिळणार
ह्या बहरलेल्या फुलांचे
ताटवे करायला
कुणाला हवे असणार


तुला पाहीले तुला इच्छीले
पुजीले तुला ह्या मनाने
क्षणॊ क्षणी प्रथम क्षणी
अपेक्षिले ह्या मनाने
समजून उमजून भोळे होवून
काय मिळणार


खुशी असे ज्यांच्या नशिबी
नशिबवान ते खरेच असती
जे मनात वसती
ते मनस्वी होती


उमेदीशी खेळ करून
भले कसे होणार
जिथे नसे आधार तिथे
जावून काय मिळणार

रचले मनात जे होते
ते जिव्हेवर आले
जे हरवणे प्राप्त असे
ते गवसून काय होणार


संभाळ रे मना
जिथे नसे आधार तिथे
जावून काय मिळणार


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, March 6, 2008

गोव्याची ज्यूली आणि तिची श्रद्धा

" मी एक साधारण माणूस आहे.फक्त मी ज्याच्यावर विश्वास ठेवते,ज्यांच्यावर माझी श्रद्धा आहे त्यांवर मी लक्ष ठेवते."
"ज्युली तू किती ग्रॆट आहेस " असं मी तिला म्हणालो.

त्याचं असं झालं,
माझी मोठी वहिनी गोव्याची.पेडण्याला तिचे आईवडिल राहायचे.लहानपणी माझ्या वहिनी बरोबर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या माहेरी अनेक वेळा गेल्याचं आठवतं.उन्हाळ्यात विशेष करून गोव्यात फळफळावळ,फुलं आणि मासे यांची लयलूट असायची.मांडकूर आंबा मला खूपच आवडायचा.तसं पाहिलं तर आंब्यांचा राजा हापूस आणि त्यात वाद नाही.हापूस आंबा नीट पिकल्यावर त्याचा जो गंध दरवळतो तो कुणाकडून लपून राहणार नाही.तसंच हा हापूस आंबा नीट पिकल्यावर कापला की त्याचा आतला गर जास्त आणि त्याची बिज्याला कोकणात कोयरी म्हणतात ती खूप लहान असते,आणि बाहेरची साल अतिशय पातळ असते.हापूस आंब्याचा स्वाद काय विचारता!,कितीही खाल्ला तरी कमीच वाटतो.

पण माडकूर आंब्यात जरी हापूसच्या आंब्याचे सर्व गूण नसले तरी ह्या पिकलेल्या आंब्याचा बाहेरून दिसणारा केशरी रंग, आणि त्याचा जास्त गोलट आकार,पाहून आकर्शीत व्हायला होतं.आणि चव विचाराल तर अगदी स्वर्गातलं अमृत मागे पडेल. ह्या मांडकूर आंब्यासाठी, बांगड्या माशासाठी आणि नागचाफ्याच्या सुगंधाची आठवण येवून मी नेहमी गोव्याला जायला उत्सुक्त असायचो.

माझ्या वहिनीचं माहेरचं घर चिरेबंदी आणि मंगळोरी कौलांच आणि टुमदार होतं.शेजारी एक प्रशस्त चर्च होतं.तसं गोवं सुंदर सुंदर चर्चच्या इमारती बाबत खूप प्रसिद्ध आहे.त्यावेऴच्या पोर्तुगीझ राज्यकर्त्यानी खूप अशी चर्चं बांधली होती.वहिनीच्या शेजारी प्रशस्त झोपडीवजा एक घर होतं.पावलू फर्नांडीस आणि त्याचं कुटूंब त्या घरात राहायचं.पावलूं त्याची बायको मेरीयम,पावलूचे वडील फास्कू,आणि पावलूची दोन मुलं पास्कल आणि ज्युली असं छोटसं हे कुटूंब होतं.कोंबड्याची खूराडं आणि डूक्करांची पिलावळ त्यांच्या आवारात असायची.

आम्ही वहिनी बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत आलो की हे सर्व कुटूंब आमच्या सहवासात असायचं.अलिकडे मी खूप दिवसानी गोव्याला गेलो होतो.फास्कू तर केव्हांच निर्वतला होता. पावलू आणि मेरियम बरीच थकली होती. पास्कल गोवा सोडून गेला तो इंग्लंडला स्थाईक झाला होता.ज्युली मात्र लग्न न करताच घरातच होती.ती आता "नन" झाली होती.
मला भेटल्यावर मी तिला सहज विचारलं,
"जुली तू एकदम नन व्हायचं का ठरवलंस?"
मला म्हणाली,
"बाजूच्या चर्चात मी आईवडिलांबरोबर नेहमीच जायची, पास्कल निघून गेल्यावर त्याचं परत येण्याचं चिन्हं काही दिसेना. आईवडिलांकडे कोण बघणार?"
मी ज्युलीला म्हणालो,
"तू लग्न वगैरे काही केलंस का नाही?"
ज्युली जरा हंसतच मला म्हणाली,
"लहानपणी तुला आठवतच असेल,तुम्ही सर्व इथे यायचा,त्यावेळी तू पण आमच्या बरोबर रविवारी चर्चातही यायचास.""मी हिंदू असलो तरी तुमच्या बरोबर चर्चात येवू शकतो का? म्हणून पावलूला विचारलं होतंस.आणि पावलू तुला म्हणाला होता की येशूला सर्व धर्म सारखेच वाटतात. आपण सगळी त्याचीच मुलं.हे ऐकून तुला किती आनंद झाला होता.चर्चात आल्यावर येशूच्या मुर्तीकडे बघून तू किती भावनावश झाला होतास. मला म्हणालास ""ज्युली तू नन का होत नाहीस? ""मला पण नंतर नन व्हावंस वाटलं."

ज्युली पुढे सांगू लागली,
" विश्वास आणि श्रद्धा हे फक्त शब्दच नाहीत.मी मला ख्रिश्चन म्हणणं एक आणि त्यासाठी वाहून घेंणं दुसरी गोष्ट.नन होण्याने मला तसं जगायला मिळालं.’लव्ह दाय नेबर’ असं प्रत्यक्ष येशूने म्हटलंय आणि मी सुरवातीची नन होवून,आईवडील, शेजारी, मुलं पाहून सर्वांवर मनापासून प्रेम करू लागले.मुलान मी शिकवूं लागले.सुरवातीला हे माझं गोतावळ जरा लहान होतं.नंतर मी पेडण्याच्या नेहमीच आरडाओरड,भांडणसांडण, आणि नेहमीच उपासमारीनें पछाडलेल्या झोपडपट्टी परिसरात जणू येशूच्या मनातल्या गहिऱ्या आव्हाहनास दोनहात करण्यासाठी जात राहीले.त्या लोकांची दारूण परिस्थितीत मी पण सामील होण्याचा प्रयत्न करू लागले.रात्रीचे भांडणाचे आवाज,मुलांना हांक मारून आक्रंद करणारे ते आयांचे रडणे,तो होणारा अन्याय पाहून काही तरी करावं असं माझ्या मनात आलं."
मी म्हणालो,
" पावलू सांगत होता की आतां तू चर्चात कमी जातेस म्हणून"
"हो मी त्या चर्चातल्या, जगातल्या पिडीतांसाठी फक्त प्रार्थना करणाऱ्या नन ऐवजी, मी ती प्रार्थना सोडून देवून माझ्या हाताच्या बाह्या वर सरसावून ह्या लोकांसाठी वेळ द्दयायला लागले.आणि आता तर मडगांवच्या फांसावर जाणाऱ्या कैद्दयांच्या सेवेत वाहून घेतलं आहे."
मी म्हणालो,
"कमाल आहे ज्युली तुझी.लहानपणी आपण इकडे असताना असं कधीच विचारात आणलं नाही की कोण पुढल्या आयुष्यात काय करील.खरोखरच तुझं काम वाखाणण्या सारखं आहे."

त्यावर हंसत हंसत ज्युली म्हणाली,
"माझी श्रद्धा आणि माझा ज्यावर विश्वास आहे त्याच गोष्टीवर मी आता माझं लक्ष केंद्रीत करते आहे.येशूचं मोठ्यात मोठ्ठं आव्हान म्हणजे ’शत्रूवरपण प्रेम कर’आणि ह्या फांशीवर जाणाऱ्या कैद्दयात मला माझा शत्रू दिसायला लागला आहे.ज्यांचं पुरनवसन होणारच नाही,असं आपल्या समाजाला वाटतं,आपल्या सुप्रीमकोर्टाने सुद्धा फांशीची शिक्षेस कायद्दयाने मंजूरी दिली आहे.गेली कित्येक वर्षे मी ह्या लोकांच्या सानिध्यात असते.आणि माझ्या समोर सहा मानवाना फांशी दिली आहे.मरण्यापुर्वी मी त्यांना माझ्याकडे पहायला सांगितलं,जणू त्यांना मरणापुर्वी एक प्रेमळ चेहरा लक्षात राहावा. माझा प्रेमळ चेहरा त्यांना समजावत होता की ते आणि आम्ही सर्व केलेल्या कृत्यापेक्षा जास्त किंमतवान आहो."

मी ज्युलीला म्हणालो,
"केव्हडी तुला तू उन्नत करून घेतलीस.कुठून कुठे तू गेलीस."
ज्युली मग म्हणाली,
"पुढे आणखी ऐक,ह्या गुन्हेगारांच्या सहवासात राहून सगळं काही झालं असं नाही.मी त्यांच्या कुटुंबियानापण भेटते.आणि ज्यांचा बळी घेतला गेला त्यांच्या कुटूंबियाना पण भेटते.गुन्हा ज्यांच्यावर झाला त्यांच्या कुटूंबियाना आणि गुन्हा ज्यानी केला त्यांच्या कुटूंबियाना भेटून प्रेम करणं महा कठीण जातं,बरेच वेळा ज्यांची हानी झाली आहे त्यांच्या कुटूंबियाना माझा हा डबल रोल चुकीचा वाटतो.मला ते समजतं पण मी त्या दोघांनाही भेटण्याचा माझा हट्ट सोडला नाही.ज्यांची हानी झाली त्यांच्या कडून मी एक शिकले की त्यांना किती एकटं,एकटं वाटतं.त्यांच्या कुटूंबातल्या एकाचा काही गुन्हा नसताना खून व्हावा हे किती भयंकर आहे, त्यांच दुःख किती खोल आहे,त्यासाठी ते सर्वांपासून दूरच राहतात.परंतु त्यांना पण कुणी तरी भेटावं,त्यांच ऐकावं,त्यांच्या बद्दल काळजी दाखवावी असं सारखं वाटत असावं.एव्हडं करायला मला कसलंच काही ग्रेट केल्यासारखं वाटत नाही."
"ज्युली तू किती ग्रॆट आहेस " असं मी तिला म्हणालो.

त्यावर ती एव्हडंच म्हणाली,
" मी एक साधारण माणूस आहे.फक्त मी ज्याच्यावर विश्वास ठेवते,ज्याच्यावर माझी श्रद्धा आहे त्यावर मी लक्ष ठेवते."


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, March 4, 2008

नको तू जावू मला विसरून

चालले मी पुरी हताश होवून
तुझ्या दुनिये पासून दूर
नको तू जावू मला विसरून
बहार येई फुलबागेला
भ्रमर गातील तुझ्या गुणांना
येतील कधी एकांती
उदास तुझ्या आठवणी
कधी बहार पाहिली होती
कधी प्रीतही केली होती
येतील अश्रू माझ्या नयनी


चालले मी पुरी हताश होवून
तुझ्या दुनिये पासून दूर


निघून तू जाताना
ने माझ्या सदभावना
कुणाशी असला जरी किंतू
दोष नसे तुझा न माझा
असला तर तो नशिबाचा


होणारी घटना होवून गेली
चूक अशी कुणी न केली
प्रीत माझी रुदन करी
मन माझे आक्रंद करी
चालले मी पुरी हताश होवून
तुझ्या दुनिये पासून दूर
नको तू जावू मला विसरून


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, March 2, 2008

बहरला पारिजात दारी फुलें का पडती शेजारी?

अमिताभ बच्चनाक मालवणीतून फुक्कटचो सल्लो.
बाबारे, कुणी तरी म्हटला हा,"सूर्याकडून एक शिकूक होयां संध्याकाळ झाली रे झाली, की आपण अस्थाक गेलेला बरां."
तुझ्यापेक्षा मी मोठो आसंय (फक्त वय्यान रे!),माकां वाटतां मी तुका चार उपदेशाच्यो गोष्टी सांगितलंय तर तां गैर होवूंचा नाय.नायतरी माझ्यासारख्या मालवणी माणसाक विचारल्याशिवाय कोणाक उपदेश करण्याची उपजतच खाजच असतां म्हणा.
माणूस निष्कारण उपदेश करूंक लागलो की समजुक होया हेका म्हातारपण इला.म्हातारपण इल्याचे आणखीन काय काय खुणो आसत म्हणा. पु.ल.नी म्हणजे आमच्या पु.ल.देशपांड्यानी रे, नाय काय सांगितला,सकाळी उठल्यावर गुढगे दुखणत नाय असां झाला की समजुचा आपण खंवाचलो( म्हणजे मेलो रे!) तशीच आणखी एक खूण कोणी तरी सांगितली आसा.जर कोण तुमच्याकडून उपदेश घेवचो बंद झालो की समजुचा म्हातारपण इला.आणि जर कां कोणी म्हणालो हो उपदेश अमक्या अमक्याकडून मिळालो असतो! की समजुचां तो म्हातारो आतां हयात नाय.तू माझो शेजारी.जुहु चौपाटीवर सकाळीच फिरांक जाताना तुझ्या बंगल्यावरून जावचा लागा.तुका बागेत काम करताना हज्जारवेळां बघीतलंय.झाले आतां तेका खूप दिवस म्हणा.आता तूं माका ओळखूचस नाय.

बाबारे,(अशी सुरवात केल्यावर समजुक होयां,काय तरी उपदेश ऐकूचो लागतलो.)
"आयुष्य कमी किंवा जास्त ह्या काय नशिबावर अवलंबून नसता,आपल्या लाईफ स्टाईलवर असतां अशी माझी धारणा आसा.
तू हल्ली ज्यावेळी ६३ वर्षाचो होतस त्यावेळी तुका कसलो तरी आजार इलो होतो.६३ वयावर ३६ वर्षाचो असल्यासारख्या करून कामा करीत रव्हल्यास कसा चलताला बाबा?समजा, एखादी बाई ४१ वर्षाची आसा तिनां १४ वर्षाची स्वतःक समजून जर का बॉलीवूड डान्स केलो तर तेचे काय परिणाम होतले?.(तू बॉलिवूडचो राजो, तेव्हां तुका तां समजूक कठीण नाय म्हणा) असो प्रश्न मी माझ्या एका डॉक्टर मित्राक विचारलंय.तो काय म्हणालो माहित आसां?तो हंसत हंसत म्हणालो, "जास्त काही होणार नाही फक्त गुढगे,युट्रस,किंवा आंतडे डीसलोकेट होईल.ताबडतोब त्याचे परिणाम दिसतीलही,न दिसल्यास कांही काळजी नाही उतार वयावर ते सर्व निमुटपणे दिसायला लागतील एव्हडंच."४२ वर्षावर तुका नायकाय, जीवघेणो अपघात झालेलो,तेचे परिणाम आता तुका भोवतत.२४ वर्षाच्या तरुण मुलासारखो तूं फायटींग करूचो शॉट करताना, पुनीत नावाच्या नटान तुका शुटींगमधे बुक्को मारण्याचो सीन केलो आणि तू तो टाळण्यासाठी
उडी मारलंस आणि मग टेबलाचो कोपरो तुझ्या पोटांत गेलो आणि तुझां आंतडा आतुन दुखावला वगैरे वगैरे.आठवतां मां, तुका? त्यावेळां त्यामानान, तूं तरुण होतंस लवकर बरो झालंस आणि कामांक पण लागलंस.
खूप कचोऱ्यो खाल्लंस म्हणून तुझ्या पोटांत दुखतां म्हणून हल्लीच्या आजारात डॉक्टरास सांगून तू बघलंय,पण माझ्या मनात पाल चुकचुकली.तुझो तो जुनो आजार आतां तुका ह्या वयात त्रास देवूक लागलो असतोलो असां माझ्या मनात इला.आणि तांच तुकां डॉक्टरान सांगलां नाय रे?
"देवा असां नको होवू देत रे" असां आम्ही मनात म्हटलां विचार पायजेतर कुंदाक माझ्या बायलेक रे!

अरे राजा,तुका लिलावतीत नेल्यावर तां इतक्या अपसेट झालां कि रात्री तेच्या स्वपनात तुझी जया आयली आणि म्हणता कशी,
"त्या आजारात आणि ह्या आजारात मी ह्याला बरं वाटावं म्हणून ह्याच्यासाठी किती व्रते केली, ह्याच्यावर ओवाळून दानधर्म केले,सिद्धीविनायक मंदिरात जावून किती एकादक्षीणा केल्या.मी त्याला सांगत असते "अरे,प्रकृती सांभाळून काम कर,पण माझा त्याला राग येतो"

मी जां काय ऐकला तां आता तुका सांगतंय.तू म्हणे शंभर कोटी रुपये खंय तरी गुंतवलंस आणि एक कंपनी काढलंस,आणि हातोहात तुका लोकांनी फसवलां म्हणून मी ऐकलां.आपल्यासारख्याच सगळां जग आसां, असा समजून तू तेंच्यावर विश्वास ठेवून वागलंस,लोकांचो पैसो तो, मग तेंचो पैसो फेडूक नको काय? ते फेडून टाकण्यासाठी तू झटून मेहनत घेतलंस.जया सांगी होती,"फिजा,दिदार आणि कल हो न हो मधे माका ह्या वयात काम करुक लागला.फिजात तर माका बुरखो घालून काम करुक लागला."

बाबारे, सगळां देणां तू फेडलंस,त्यानंतर पैशाची तुझ्याकडे रीघ लागली.तू पब्लीक फीगर ना, मग तुका लोकांचा ऐकूक लागतलाच. पण लोक म्हणतत म्हणून भुरावून जावू नको बाबा."अमिताभजी तुम ऍक्टींग करो हम तुम्हारे सांथ है " असा लोक तुका सांगतत असा मी ऐकलां.पण तू तेंच्या नादाक लागू नको. काळजी घे तुझ्या प्रकृतीची.बाबारे, म्हटहा ना "जग हे दिल्या घेतल्याचे,नाही कोण कुणाचे" तां काय खोटां नाय.शेवटी नुकसान कोणाचा तुझाच मां?अभिषेकचा आता लगीन झाला.नक्षत्रासारखी तुका सुन मिळाली. तू आजोबा पण होशीत.तुका काय कमी आसा रे?पैसो म्हटलो तर दाबून पैसो तुझ्याकडे आसा.आणि ह्या वयात पैशाची कितीशी गरज आसा.मनः शांती मिळाली म्हणजे झाला.
तुका नाय असा वाटणां?हे सगळे लोक तुझ्या मागे लागतत आणि तुका काय काय आयडीया देतत.पण तुझ्या आंगातले गुण ह्या लोकानी घेवूक नको काय?आतां ह्याच बघ,माका आपलां दिसला तां सांगतय.तू हल्लीच्या आजारात लिलावती हॉस्प्रिट्लात होतंस.किती लोक घोळको करून तुझ्यासाठी बाहेर उभे असत. एकदाचो तू बरो झालंस. त्यावेळी हॉस्पिटलाच्या बाहेर किती तुफान गर्दी होती.तू दिशसीस म्हणून ताटकळंत उभे होते येव्हडे लोक.तुझी जया तुझ्या नविन "जलसा" बंगल्यांत वाट बघत होती.लोकानी तू तिकडे जाशीस म्हणून तुझ्या दर्शनासाठी तिकडे धांव घेतली.काही लोकानी तु सिद्धीविनायक मंदिरात पहिल्यानदां जाशीस म्हणून तिकडे धांव घेतली.तू शिरडीक जाझीस म्हणून तिकडे धांव घेतली.पण तू काय केलंस,तू सरळ तुझ्या "प्रतिक्षा" बंगल्याकडे गेलंस.कारण तुका तुझ्या आवशीची आठवण आयली.ती तुझी वाट बघत असतली तू मातृभक्त किती आसस ह्या, ह्यां लोकांक काय माहीत रे?पण आचरणात कोण
आणताहा या दिवसात? त्या बंगल्याकडे तुझ्या रखवालदारा शिवाय कोण चिटपांखरू पण नव्हता.बरो झालंस म्हणून सुरवातीक आवशीच्या पायावर डोक्या ठेवूक गेलस मां?पायावर डोक्या ठेवून नंतर तिना तुका जवळ घेतलां.त्या तुझ्या माऊलीक तुझ्या स्पर्शान निराळाच वाटलां.तुझ्या डोळ्यातली आंसवा तिना तिच्या कृश हातानी फुसत, तिना तुका आणखी जवळ घेतलां आणि तुझ्या कानात पुट्पुटून ती म्हणाली, "देवा माझा उरलेलां आयुष्य हेकांच दी" तां ऐकून तू किती सद्नदीत
झालंस,आठवतां ना तुका?

एका खयंच्या तरी सिनेमात तू त्या शशी कपुराक विचारतंस ना?
"काय आसां तुझ्याकडे?
माझ्याकडे आसां तसो, बंगलो,गाडी,नोकर चाकर आसत?
" त्यावर तो तुका सांगता मां,
"माझी आओस आसा माझ्याकडे."
आणि तां ऐकून तू कसो त्या सिनमधे गप्प बसतंस.पण खरां सागू तुझ्या खऱ्या आयुष्यात तुका त्या प्रश्नाचां उत्तर असा देवूक होयां,
"बंगलो,गाडी,नोकर चाकर माझ्याकडे आसंतंच शिवाय माझी आओस पण माझ्याक्डे आसां."
असां म्हणून किती धन्य वाटत असताला तुका?.
आता तुझी आवस गेली,आमकां पण खूप वायट वाटलां.

एखादो माका म्हणतलो, तुका काय करूंचा आसा.तो आपलां काय तां बघून घ्येत.पण खरां सांगू तुका मालवणी आम्ही असेच आसो.जरा फटकळ दिसलो ना तरी रसाळ फणसा सारखे.बाहेरून कांटेरी पण आतून रसाळ गऱ्या सारखे.तेव्हा तू काय मनांक लावून घेवू नकोस.माझा मात्र काम सांगूचा.आणि तुझा ऐकूचा.

हेंचो अर्थ तू काहीच काम करु नकोस असा नाय.अरे,तुझ्यो काही तरी आयुष्यातल्यो आठवणी लिही,तुझा आत्मचरित्र लिही,उगवत्या कलाकारासाठी काही शिकण्यासारख्या लिही,आईवडीलांक तू किती आदर ठेवून वागतंस, त्याचे काही इतरांवर चांगले संस्कार होतीत असां काही तरी लिही, तुझ्या वडिलांसारख्यो काही कविता कर .तुका जरी अलोट पैसो तुझ्या मेहनतीन मिळालो तरी तो लोकांकडूनच मिळालो मां? त्यातलो थोडो पैसो तरी लोकांक ह्या ना त्या निमीत्तान परत केलंस तर गोरगरीब तुका नक्कीच मानतलो,आशिर्वाद देतलो,असा तुका नाय का वाटणां? थोडीशी गांधीगीरीपण करूची लागता.

तू तसा करुचंस नाय म्हणा, कारण पैसो कोणाक नको झालोसा?. पण एक सांगतंय राजकारणांत मात्र अजिबात पडूं नको.
बाबा! मोठ्यां मोठ्याक पश्चाताप झालेलो मी बघितलंय.तुकापण पुर्वीचो अनुभव आसां म्हणा.राजीव गांधीच्या वेळी रे!ह्या वयांत "हेल्थ इज वेल्थ " असा काय म्हणतत नां तांच खरा.तू काय इतको म्हातारो झालंस नाय रे.पण बघ ज्या वयावर जां शोभतां तां करुक होयां नाय काय?ह्या वयावर आता लहान मुलांसारख्यो उडक्यो मारलंस तर तुका तां शोभताला काय? माकां सांग.हल्लीच तुझ्या घरावर कोणी म्हणे बाटल्यो फेकल्यो,दगड मारले म्हणून ऐकलां,माकां काय राजकारण समजणां नाय बघ.जां समजणां नाय मां तेच्यावर विचारला नाय तरी सांगुचा असा आमका मालवणी लोकांक मुळचीच संवय आसा.आता एखादो मालवणी ह्या वाचून माझ्यावर चिडतोलो नक्की,पण मी तेची पर्वा करणंय नाय.खरां सांगूक हरकत कसली रे?
राजकारण बरां नांय.मोठ्या मोठ्यानी हात टेकलेत बघ.होताचा नाय आणि नायचा होता करूंक येवंक होयां.गेंड्याचा कातडां आंगावर होया.ह्या बोटावरची थुकी त्या बोटावर करूक येवूक होयी.तां तुकां माकां जमुचा नाय.आपलो पिंड तसलो नाय.आणि बघ प्रत्येक काडीक दोन टोकां असतत.ह्या तुका सागूंक नको.तसाच प्रत्येक वादाक दोन बाजू असतत.दुसऱ्याचां म्हणणां पण बरोबर असू शकतां.तुका माहीत आसां मा, मराठी लोकांक नाटकां खूप आवडतत,आणि त्यातल्यात्यात आमका मालवण्यांक तर खूपच
आवडतत,मालवणीत धयकालो तर नाटकाचो उस्फुर्त प्रकार आसा. थोडा रामायण महाभारत माहित असलां म्हणजे झालां.मग अर्जुन रामायणात की राम महाभारतात होतो ही खरी माहिती असण्याची इतकी जरुरी नाय.फक्त नाटकाच्या मंचावर डायलॉग म्हटले म्हणजे झालां.तुका माहीत आसां त्यामुळे विनोद सुद्धा उत्पन्न होता तो.मछ्चींद्र कांबळी तुका म्हायत असतोलच.आता तो गेलो म्हणां नायतर तेना तुझ्या ह्या बाटल्या प्रकरणावर एक मालवणीत नाटक लिवला असतां
" बहरला पारीजात दारी,फुले कां पडती शेजारी?"
रुक्मिणी,भामिनोचो वाद तुका म्हायत आसां मां?श्रीकृष्णाक किती त्याच्या बाईलानी डोक्याक काणेर केलो तो?

आता जाता जाता एक शेवटचा सांगतय.आयुष्य एकदांच मिळतां ह्या काय तुकां सांगुक नको.तुझे जे जवळचे आसत ना त्यांच्या बरोबर जास्त वेळ घालंव.आणि तुका जोपर्यंत लोकां हवो हवोसो म्हणतत नां, तो पर्यंत तेंच्यातून आंग काढून घेतलेलां बरां असा माका वाटतां.आमच्या सुनील गावस्करान कसा केला.वेळीच बाजूक झालो. क्रिकेट मधून रे!.आमचो सुनील म्हणण्याचा कारण तो आमच्या वेंगुर्ल्याचो.उभ्यादाड्यांचो रे!
दुसरा म्हणजे अट्ट्ल बिहारीचा बघ.नावासारखे बाजपायजी आपल्या पणाशी अट्ट्ल आसत.आता परत पंतप्रधान होवूक मागणत नाय.अशी किती दाखले देवू मी तुका?
कुणी तरी म्हटलां बघ,
" सूर्यनारायणा कडून एक शिकूक होयां,संध्याकाळ झाली रे झाली, की आपण अस्थाक गेलेला बंरा"
होय नायतर, आपलां नांव रात्रीच्या भानगडीत नको बाबा!

.माझ्या अक्कलेप्रमाणे मी तुका सल्लो दिलंय.आता निर्णय का घेवचो तां तू बघ.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com