Saturday, May 24, 2008

दाखविली मातेची व्यथा कौतुके

तू जन्मी येता देवून प्रचंड वेदना
न्याहळते ती तुला घेवून गोड चुंबना
घेई तुला ती माऊली पोटाशी
रडून मात्र तू जग डोक्यावर घेशी

वेळी अवेळी जवळ घेवूनी
पाजिते ती तुला घेवूनी पदराशी
दुदु पिताना तू मात्र तिला
लाथेने धुसक्या मारिशी

शिकविले चालण्या जिने तुला
हांक मारता दूर धावशी सोडून तिला
तुला खेळण्या आणे ती खेळणी
एक एक करूनी टाकशी तू मोडूनी

गोड खाऊ करूनी देते तुला बशी
जमिनीवर तू खाऊ तुझा उडवून देशी
छान छान कपडे तुला तिने आणिले
खेळुनी मातीत तु ते सर्व मळविले

शिकवीण्या शाळेमधे घेवून गेली तुला
न जाण्याचा रडूनी गोंधळ तू घातला
संगीत शिकण्या दाखल केले शाळेला
रियाज करण्याचा सराव तू सोडुनी दिला

मित्रासंगे घेवूनी गेली ती सिनेमाला
दूरच्या रांगेत सांगशी तिला बसायला
पाठवी तुला ती दहा दिवसाच्या शिबीराला
नाही लिहिले एक ओळीचे पत्र तिला

शाळा कॉलेज संपवूनी झालास तू मोकळा
विचार करिला तिने तुझ्या साठी आगळा
विचारे तुला ती करियर कसली घेशी
म्हणशी तू तिला तुला कशाला चौकशी

सुचविले तिने तुला कराया लग्नाला
आई…प्लिज! असे म्हणालास तिला
झाले लग्न तुझे थाटाने
बदली करून घेतलीस हट्टाने

म्हणाली ती घरात पाळणा हलू दे
म्हणालास तू निर्णय आम्हाला घेवू दे
नाही जमले भेटाया तिला
तिच्या पन्नासाव्या वाढदिवशी
म्हणालास तू “होतो बिझी त्यादिवशी”

नंतर एकदा झाली ती आजारी
पत्र पाठविले तिने तुला सत्वरी
आले तुझ्या मनी झडकरी
म्हातारी मंडळी ताप देती भारी

एके दिवशी शांतपणे ती निघून गेली
पश्चातापाची वीज तुझ्या मनात चमकली

(एका लेखाच्या आधारावर काव्य माझे)

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, May 22, 2008

अंजली अंजली तूच माझी रागिणी

अंजली अंजली पुष्पांजली
फुले देवून देतो ही पुष्पांजली
पायी तुझ्या ही स्वरांजली
गीतात गातो ही गीतांजली
प्रिय वाटे ही कवितांजली

प्रीतीने भरलेले तुझे भोळे मन
तुला पाहूनी सजणी धडके हे मन
जेव्हां मनी माझ्या वाजे प्रीतीची बांसुरी
तेव्हां स्वप्नी माझ्या खुलते एक चांदणी

जीवनाची बहार मिळे मला
प्रीतिचे शिखर मिळे मला
अंजली अंजली तूच माझी रागिणी
संगीतलहरीने डोले माझे मन
प्रीतिरागिणीने डोले माझे तन

भासे मला कशी जादू जाहली
दिसे मला गोड स्वप्ने मनी छपली
गोड गोड धुने सरगमची
धुंद धुंद लहरी सुरांची

प्रीतिच्या पुजनी सुरांच्या जीवनी
फुलानी भरलेली ही पुष्पांजली
लहरीची तुला नृत्यांजली
गीताने भरलेली ही गीतांजली
कविना माझी ही कवितांजली

पाहिले तुला जेव्हां झालो तुझा तेव्हां
प्रीति कशी होईल तुजविणा
कविता कशी होईल तुजविणा
चंद्रमाच्या चांदणीसम तू सजणी
फुलांच्या फुलदाणीसम तू सजणी
अंजली अंजली तूच माझी रागिणी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, May 20, 2008

“ही तुमचीच मुलगी का?”

कुणी तरी म्हटलंय.
” एखाद्दयाला समजून घेण्यातच वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार. “

काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.गेले दोन तिन दिवस भाऊसाहेब तळ्यावर येत नव्हते.म्हटलं आपण स्वतः जावून त्यांची चौकशी करावी.त्यांच्या घरी पाहुण्यांची गडबड दिसत होती.जरा जपून जपून आत गेलो.मला पाहून कुणीतरी दार उघडलं.मला पण ती मुलगी जरा अनोळखी वाटली.तिने “भाऊसाहेबाना सांगते” म्हणून सांगून मला आत बसायला सांगितलं.
मला पाहून भाऊसाहेब म्हणाले,
“तुमचीच आठवण काढली होती.आम्ही सर्व तळ्यावर जात होतो.वाटलं तुम्ही आम्हाला भेटणारच.मी तुमची माहिती माझी पुतणी आली आहे तिला सांगत होतो.”
तिला हांक मारीत,
“अगं भावना जरा बाहेर ये.ह्यांच्याच बद्दल मी तुला सांगत होतो.चला आता आपण सगळेच मिळून तळ्यावर जावू या.”
असं म्हणत आम्ही लागलीच बाहेर पडून तळ्यावर जायला निघालो.भावनाच्या अंगावर एक छोट्टशी मुलगी झोपली होती.तिला तसंच थोपटंत थोपटंत ती आमच्या बरोबर यायला निघाली.बोलत बोलत आम्ही सर्व तळ्यावर येवून पोहचलो.एका लांब रूंद बाकावर आम्ही सर्व बसलो.भावनाने त्या मुलीला आपल्या मांडीवर घेवून ती बाकावर बसली.त्या झोपलेल्या मुलीला पाहून मी तिला म्हणालो.
“किती निष्पाप चेहऱ्याची ही मुलगी आहे.तिचे हे कुरळे केस,तरतरीत नाक अणि एव्हडीशी जीवणी पाहून खरंच कौतुक करावसं वाटतं” असं मी सहजच भावनाला म्हणालो.


माझं ते कौतुक ऐकून भावना अशी काय हंसली की तिचं हंसणं काहीतरी बरचसं सांगून गेल्याचं मला भासलं.
मी जरा तिला भित भितच विचारलं,
“काय गं! माझं काय चुकलं काय?”
मला म्हणाली,
” काका,व्यक्ति तशा प्रकृति”
मी तिला विचारलं,
“म्हणजे गं काय?”
प्रो.देसायांकडे पाहून जणू त्यानीच तिला मला काहीतरी सांगावसं असं अगोदरच सांगून ठेवलं आहे आणि ती आता त्यांची संमती घेत आहे असं भासवून सांगू लागली.
“माझ्या मुलीकडे बघून एका बॅंकेतला कारकूनाने एकदा मला विचारलं,
“ही तुमचीच मुलगी का?” ते मला आठवलं.
असा प्रश्न ऐकून घेण्याची माझी ही काही पहिलीच वेळ नव्हती.असल्या खोचक प्रश्नाला खोचक उत्तर देण्याची माझ्या मनात कधीही तयारी असायची. पण त्या ऐवजी माझ्या मुलीसाठी तिच्या जीवनात येऊ घातलेल्या प्रश्नावर मी माझ्या एकाग्रतेत जास्त लक्ष घालीत असे.
खोचकपणे विचारलेल्या प्रश्नाला मी जराशी घुसमटली जायची आणि त्या कारकूनाला मी म्हणाले,
“ती सुंदर आहे,हुशार आहे,आणि शिस्तीत वागणारी आहे.”
माझ्याकडे तो कारकून जरासा विस्मयीत होवून म्हणाला,
“असं,असं”
जणू त्याच्या तो प्रश्नच मला समजला नाही असं त्याला वाटलं.
मी मनात हसले,मला त्याचा प्रश्न त्याचवेळी कळला होता,आणि त्याला खरं उत्तर द्दयायला सुचू लागलं होतं.
श्वेताला मी त्या अनाथाश्रमात पहिल्यांदा पाहिलं होतं.अगदी नाजूक प्रकृतीची,कानाने ऐकू न येणारी काहीशी सावळ्या वर्णाची ती त्यावेळी दोन वर्षाची होती.मी त्यामानाने जास्तच गौर वर्णाची असल्याने लोकांच्या नजरेत हा विरोधाभास यायचा.
श्वेताचे डोक्यावरचे ते काळेभोर कुरळे कुरळे केस,नाजूक चेहरा,तिच्या गालावर एक छोटासा काळा ठिपका,तुकतुकीत कान्ती आणि काळेभोर टुकटुकीत डोळे पाहून कुणाचेही लक्ष जाईल असं तिचं लक्षण होतं.तिला पाहून एकच नाव ठेवायचा विचार येईल “संपुर्णा”
आपल्या अंतरात नेहमीच कुत्सित विनोदाची चाड ठेवून रहाणारे बरेच लोक असतात. डोळ्याला घोड्याचा चष्मा लावून फक्त समोरच्याच नजरेने पहाण्याची त्यांना संवय असते.
त्यामुळेच अगदी पहिल्यांदाच अशाच एका अनोळखी व्यक्तिने माझ्या आणि श्वेताच्या नात्यासंबंधी प्रश्न विचारला होता.आम्हीच दोघं जणू सारखे दिसत नाही हे विसरूनच गेलो होतो.दुसऱ्यावेळी असाच काहिसा प्रश्न विचारल्यावर मी अगदी अदबीने कल्पना दिली की मी आई आणि ती माझी मुलगी आहे,पण तिची जात काही मला माहित नाही.
विसाव्या वेळी असाच प्रश्न विचारल्यावर मी त्या व्यक्तिचा प्रश्न कसा असंदर्भीत आहे हे त्याला समजावून सांगितलं.चाळिसाव्या वेळी असाच प्रश्न विचारल्यावर मी प्रश्न ऐकला नाही ऐकला असंच दाखवलं.
आता बराच काळ लोटून गेल्यावर त्या प्रश्नामागचा आशय माझ्या जीवनाचा मोठ्यात मोठा धडा झाला तो असा.
नातं,हे असा दुवा आहे,की त्याची गहिरता जन्मावर,रंगावर,जातीवर असण्या पेक्षाही खोल आहे.आपल्या पैकी ज्याना खऱ्या प्रेमाचा अर्थ समजला आहे त्यांना ते त्यांच्या अंतरातूनच कळतं.आणि त्याची जाणीव असणं ही एक खास देणगी समजली पाहिजे.
ज्यावेळी एखाद्दयाचं मन मोकळं असतं,आणि नवीन नातं जुळवून घेण्याची तयारी असते, त्यावेळी एकमेकात साम्यच जास्त दिसू लागतं.कधी कधी मनात नवी नाती जुळवण्याची इच्छा येते,कुणी तरी अगदी जीवाभावाचं वाटतं,कधी कधी जवळीक असून सुद्धा मनात कायमचं नातं जुळत नाही.पण सभोवतालच्या माणसांबद्दल आस्था रहाते.एकदा एखाद्दया बद्दल चांगला समज झाल्यावर, वरवरच्या तर्कावरून समजूत करून घेण्याची गरज भासत नाही.
म्हणूनच मघाशी तुम्ही श्वेताचं कौतुक केलंत ना,ते ऐकूनच मी म्हणाले होते,
“व्यक्ति तशा प्रकृती”
आता तुमच्या सर्व लक्षात आलं असेल ना?
कुणी तरी म्हटलंय.
” एखाद्दयाला समजून घेण्यातच वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार. “
खरंच भावनाकडून हे सर्व ऐकून असं मला वाटलं.प्रो.देसायानी आज मला भावनाच्या तोंडून सुंदर लेक्चरच दिलं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, May 18, 2008

सजणे! तू कमाल करीशी

पिटुया का आज आपण
अपुल्या प्रीतिचा डंका
का दाखवुया आज आपण
अपुल्या ओळीखीची शंका

करू का भरल्या सभेत
तुजवर जीवघेणी प्रेमचेष्टा
का करूया अपुल्या आपण
प्रयत्नाची आसूरी पराकाष्टा

सांगण्या तू घाबरशी
मनाला लावून घेशी
सजणे! तू कमाल करीशी

नजर लाजूनी तू हसशी
गोड बोलूनी तू लुबाडशी
गरम श्वासातूनी नरम स्पर्शातूनी
मनातल्या ताऱ्याना गुदगुदल्या करीशी

विचारता मतलब तुझ्या मनातला
लालबूंद तुझा चेहरा करीशी
सजणे! तू कमाल करीशी

का न तू गुपचुप राहशी
कसला नवा न्याय आणिशी
अजब तुझे हे वागणे
का एव्हडा गहजब करीशी
सजणे! तू कमाल करीशी

सजणा!
समजू कशी प्रीतिची भाषा
का समजू निव्वळ निराशा
कधी काळी तू मज भेटशी
उलट सुलट प्रश्न करीशी
सजणा! तुही कमाल करीशी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, May 16, 2008

" त्या अनोळख्याने माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."

"मला वाटतं,मी माझे डोळे उघडे ठेवून सर्वांकडे पाहत असावं.आणि त्यांच्या बुध्दितून शिकावं.मला वाटतं,आपले जवळचे आपण गमावले तरच आपलं सर्वस्व आपण गमावतो.
मला वाटतं, त्या अनोळख्याने मला त्या झालेल्या बोलण्यातून माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."असे उद्गार काढण्याची माझ्या एका मित्रावर पाळी आली.ती त्याची कथा सांगताना,
मला म्हणाला,
" मनुष्याच्या आत्म्यावर माझा विश्वास आहे आणि इतरांबरोबर दुवा ठेवण्याच्या आत्म्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. सभोवतालच्या वातावरणा बद्दल जागृततेची क्षमता असण्यावर माझा विश्वास आहे.अपेक्षा नसतानाही माझ्या आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या घटना मधे आलेल्या एका घटनेवर माझा विश्वास आहे."
आणि मला पुढे सांगू लागला,
"त्यादिवशी मी शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घरी आलो.सर्दी खोकला जब्बर झाल्याने कधी एकदां अंथरूणावर पडतो असं झालं होतं.शेजारच्या घरात पार्टी चालली होती त्यांच्या आवाजानें माझी झोप जागृतच होती.
माझ्या तुटपुंज्या स्वप्नाचा बाहेरून येणारा आवाज भंग करू शकला.कांचा फूटल्याचा आवाज मला पुर्ण जागं करू शकला.माझ्या खिडकीतून दिसणारं रात्रीचं आकाश आगीच्या डोंबाने शेंदूरी रंगाचं दिसू लागलं.अरुंद जिन्याला आगिच्या ज्वाळानी घेरलं होतं.बाहेर जाण्याचा तिथूनच दरवाजा होता.माझे शेजारी माझ्या किचनच्या खाली उभे राहून तिकडच्या खिडकीतून उडी मारण्याची मला आवर्जून सांगत होते.

दोन तिन आठवड्यानंतर मी सर्व प्रकरणांची जंत्री घेत घेत ज्यावेळी विमानात बसून सीट बेल्ट लावून झाल्यावर त्या घटनेचा विचार करू लागलो तेव्हा मला राग आणि संतापाने घेरलं,
"मलाच हे असं कसं झालं"
असा विचार मनात आला.
"मी जवळ जवळ मृत्युच्या जबड्यातून बाहेर पडलो होतो आणि माझं सर्वस्व मी गमावून बसलो होतो.मी असं काय केलं होतं की मलाच हे प्रायश्चित मिळालं?"
माझ्या शेजारच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला बघून मी माझ्या ह्या विचारातून बाहेर पडून त्याच्याशी बोलायला लागलो.तो दिल्लीला चालला होता आणि तो डॉक्टर होता.मद्रासला झालेल्या सायंटीफिक कॉनफरन्सला हजर राहून दिल्लीला आणखी काही कंपनीच्या कामाला चालला होता.त्याचं आणि माझं साध्या साध्या गोष्टीवर बोलणं चाललं होतं. परदेशातही तो बरेच फिरून आला होता.गेल्या वर्षी मेडिकल कनव्हेनशनसाठी तो पॅरिसला गेला होता.नंतर मी त्याला आणखी प्रश्न विचारले. त्याच्या फॅमिली बद्दल आणि तो कुठल्या प्रांतात राहतो त्याबद्दल.त्याचे डोळे थोडे पाणवळल्या सारखे दिसले.
तो महाराष्टात मुंबईत राहत होता.असाच एकदा तो युरोपला गेला असताना,मुंबईत झालेल्या दंगलीत त्याची अख्खीच्या अख्खी फॅमिली मारली गेली होती.असं सांगता सांगता त्याने माझा हात हातात घेवून घट्ट धरला.माझे पण ते बघून डोळे पाणावळले.मी माझे डोळे पुसले.
मी ज्यावेळी त्याची बोटं माझ्या हातात कुरवाळली,तेव्हा माझ्या मनात क्षणभर आगीत झालेल्या माझ्या नुकसानीचं स्मरण माझ्या दैवाच्या अगणीत उपकाराच्या भावनेत रुपांतरीत झालं.मी त्या आगीतून जीवंत होतो.जळलो पण नव्हतो.माझे नातेवाईक मला सभोवताली घेरून होते,माझे प्रिय मित्र मला आधार देत होते.मला हवं असलेलं सर्व काही माझ्या जवळ होतं.

माझ्या ह्या प्रवास-मित्राचं नंतर काय झालं ते मला माहित नाही.आम्ही एकमेकाचे पत्ते किंवा फोन नंबर्स घेतले नाहीत.आम्ही एकमेकाला गुडबाय म्हटल्यानंतर मला लक्षात आलं की मला त्याचं फक्त पहिलं नांवच माहित होतं.पण त्याची ती कथा मी माझ्याबरोबर घेतली होती.त्याची ज्या ज्यावेळी मला आठवण यायची त्यावेळेला मी त्याचे मनात आभार मानत होतो कि तोच मला जीवनात मोठा फरक काय असतो ते स्मरण करून देत होता.

मला वाटतं,मी माझे डोळे उघडे ठेवून सर्वांकडे पाहत असावं.आणि त्यांच्या बुध्दितून शिकावं.
मला वाटतं,आपले जवळचे आपण गमावले तरच आपलं सर्वस्व आपण गमावतो.
मला वाटतं, त्या अनोळख्याने मला त्या झालेल्या बोलण्यातून माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, May 14, 2008

शोधित मी असतो तिला

शोधित मी असतो तिला
रात्रीच्या स्वप्ना मधे
मिळे ना ती मला
पहाटेच्या उजाळ्या मधे

मधूर प्रीतिचे स्मरण
माझ्या सजंणीचे स्मरण
घेतलेल्या वचनाचे स्मरण
दिलेल्या नकाराचे स्मरण
लपलेला असे एकच किंतू
ह्या सुंदर अश्या कुढी मधे
शोधित मी असतो तिला
रात्रीच्या स्वप्ना मधे

होतात जे असेच दुःखी
ते होतात तसेच सुखी
राहती जे दुखावलेल्या मनाने
बोलती ते सदैव नाराजीने
आहे पुरा गुंतलो मी
उदासिनतेच्या जाळ्या मधे
शोधित मी असतो तिला
रात्रीच्या स्वप्ना मधे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, May 13, 2008

“जसा व्याप तसा संताप!”

तिचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.मनात म्हणालो “आपण प्रकृती बद्दल इतका गंभीर विचार कधीच केला नाही.
anorexia चा कधी विचारच आला नाही.कुणीसं म्हटलंय ना “जसा व्याप तसा संताप!” हेच खरं.”

रघूवीर देशपांडे आमचे जुने शेजारी.त्यांच्या मुली आता मोठया झाल्या.त्यात त्यांची मोठी मुलगी,अंजना म्हणजेच आता सौ. रंजना रमाकांत रणदीवे जिला आम्ही गंमतीत “अंरंरर” म्हणायचो ती आता दोन मुलांची आई झाली आहे.ती दोन मुलांची आई झाली तरी अजून तिची तब्यत ठेवून आहे.तशीच किडकीडीत,पण सतेज चेहऱ्याची,चुटपुटीत आणि सदैव एनर्जीने भरलेली अजूनही असते.आणि हे असण्याचं कारण तिची लहानपणची मैत्रिण शोभा.
मला केव्हा कळलं,की मी तिला एकदा मुद्दाम अर्थात कुतहलाने विचारलं,
“ह्या वयात सुद्धा तू अशी तब्यत ठेवून कशी आहेस?”
हे ऐकून ती मला म्हणाली,
“ह्या सर्वाचा कारण माझी जीवश्च कंटश्च मैत्रिण शोभा.मला आठवतं शोभा त्यावेळी आरशात पण बघायला घृणा करायची.अगदी निष्ठुरपणे ती आपलीच चामडी ओढायची आणि चिमटे घ्यायची,जणू प्रत्येक वेळी असं करून तिच्या शरिरावरच्या कमतरताना शिक्षाच करायची. तिचे हात आणि पाय ह्या असल्या आघाताने चट्टे आलेले दिसायचे.शोभा नेहमीच दुर्मुखलेली दिसायची,आणि त्याबाबत तिला काही वाटतही नव्हतं.रखरखत्या आणि दमट उन्हाळ्यात सुद्धा ती स्वेटर चढवायची आणि थरथरण्याचा अविर्भाव करून त्यातच काही विशेष केल्याच्या आनंदात असायची.सहजगत्या माझ्या मनात आलेल्या तिच्या बद्दलच्या हेव्याची आणि तिच्या त्या कमजोर सौंदर्याच्या कौतुकाची मला आठवण यायची.तिचे ते किडकीडीत शरिर,आणि फ्फु केल्यास वाऱ्यावर उडून जाण्याईतप असलेल्या त्या शरिराची, कल्पना येतायेताच ती त्याग करून काय मिळवीत आहे याचं गांभिर्य लक्षात आणलं.”

मी अंजनाला म्हणालो,
“हे तिने कसं आचारणात आणलं?”

त्यावर माहिती देत म्हणाली,
“सुरवातीला ती तांदळाची पेज,किंवा तत्सम सुपं घ्यायची.मग जरा वरच्या थराचं लंघन करायला लागली.नंतर नियमाने चुर्ण घ्यायची. मग दिवसातून सफर्चंदा सारखं एखादं फळ खायची.कधी कधी अर्ध सफर्चंद खायची. शेवटी तिची सर्व खाण्यावरची इच्छाच मेली. आम्ही तिच्या मैत्रीणी,तिला सुरवातीला काहीच बोलत नव्हतो.त्यावेळी आम्ही सर्व एकशिवडी प्रकृती ठेवण्यात वेड लागल्या सारखे मनात ठेवून डायटींग करणं हे आमच्या आयुष्याचं ब्रिद वाक्य असायचं.असं करताना काही खाण्याच्या गोष्टीचा त्याग करायला कसलेच सीमा नव्हती.
त्यामुळे शोभाची वागणूक पाहून तिला स्वारस्य न दाखवणं म्हणजे एक तऱ्हेने तिच्या आनंदाला आणि तिच्या स्वपनाना तिलांजली दिल्यासरखं होत होतं,आणि चूपचाप बसणं म्हणजे तिच्यावरच्या प्रेमाची परिसीमा दाखवणं असं होत होतं.

मी अंजनाला म्हणालो,
“तुम्हा मुलींना ’शेवग्याच्या शेंगेसारखी’ आपली प्रकृती ठेवण्याचं एका ठरावीक वयात एक प्रकारचं वेडंच असतं नाही काय?”
अंजना म्हणते,
“त्या वयात प्रत्येक मुलगी कुठचा तरी एक दिवस जागी होवून स्वतः दिसते त्या आपल्या शरिराकडे पाहून कष्टी मनाने जागृत होत असते. आमच्या सारख्या अतिजागृत मुलींसाठी हा दिवस जरा लवकरच उगवतो,आणि येणाऱ्या प्रत्येक पहाटेला रेंगाळत ठेवतो.
परंतु,मी मला anorexia-म्हणजेच स्थुल होण्याच्या भितीने आहाराकडे दुर्लक्ष करणं- होवू दिला नाही.कदाचीत मी खंबीर मनाची असेन किंवा नसेन.कारण शोभा आमच्या सर्वांत अतिशय खंबीर असावी.ती तिच्या शरिराच्या सांगाड्यात सर्व काही दोषविरहीत कोरून ठेवलं आहे असं समजत असावी.तिच्या शरिराचं वजन प्रत्येक पौंडाने कमी होण्यात तिला आपलं भविष्य लपलेलं आहे असं वाटायचं.कायपण भविष्य म्हणायचं?.
तिच्या वडीलानी तिला शेवटी नर्सिंग होम मधे नेवून परत आणल्यावर ती जरा निरोगी दिसू लागली.पण बरीच मानसिक रुग्ण दिसू लागली.तिला पुन्हा नर्सिंग होम मधे न जाता ह्या रोगावर घरी बसून आणि घरच्या लोकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या आधारावर उपचार करायचा होता.
इतरांप्रमाणे मी पण थोडी साशंक होते.तिला परत नर्सिंग होम मधे नेल्यावर मी काही विषेश विरोध दाखवला नाही.ती घरी राहून बरं होणं पसंत करीत होती पण आमचा कुणाचा त्यावर विश्वास नव्हता.आम्ही ती आशा केव्हाच सोडली होती.
मी माझ्या मनात समजूत करून घेत होते की कदाचीत डॉक्टर आणि मनोवैज्ञानीकांकडून तिच्यावर आमच्या संगतीत राहण्यापेक्षा जास्त चांगले उपचार होणार.पण खरं सांगयचं तर कुणाचीच तिच्या रोगावर मात करण्याची हिम्मत झाली नाही आणि तिच्या येवू घातलेल्या मृत्युशी झुंज द्दयायला हिम्मत झाली नाही.मी तिला माझ्या दृष्टीतून आणि मनातून काढायला बघत होते.मी तिच्यावर पाणी सोडलं होतं.मी तिच्यावरचा विश्वास सोडला होता.तिच्या मनाची क्षमता आणि तिची इच्छाशक्ति ह्या दोन्ही बद्दल मी साशंक होते.
माझ्या लक्षात आलं नाही की प्रत्येक व्यक्ति स्वतंत्र असते आणि डॉक्टर काही जादूगार नसतात.मला वाटतं तिने पण तसंच समजून तो नाद सोडला आणि शेवटी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा सांगायचा मतितार्थ असा की शोभा सारखी एक टोकाची भुमिका न घेता मी सुद्दृढ, सशक्त राहून माझ्या शरिरावर प्रेम करू लागले.
कोणत्याही परिस्थितीत प्रेम म्हणजेच, श्रद्धा असणं आणि विश्वास असणं.कधीही हताश न होणं म्हणजेच प्रेम.अगदी संकटाची पराकाष्टा झाली असतानाही इच्छा-शक्ति घालवू न देणं आणि मनुष्याच्या बदलावाच्या क्षमतेचा संशय पण मनात न आणणं म्हणजेच प्रेम.मला वाटतं प्रत्येक व्यक्तिने विनाअट प्रेमात असावं”

हे तिचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.मनात म्हणालो “मी प्रकृती बद्दल इतका गंभीर विचार कधीच केला नाही.
anorexia चा कधी विचारच आला नाही.कुणीसं म्हटलंय ना ’जसा व्याप तसा संताप!’ हेच खरं.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com