Sunday, June 8, 2008

खुषी न मिळता मिळते रुसणे

तुझ्या प्रीतित मन माझे का तडपते
फुलासम असे तुझा चेहरा
हृदय मात्र तुझे पाषाणा सम शोभते

कळ्या न मिळता मिळती कांटे
खुषी न मिळता मिळते रुसणे

तोडूनी सारे संबंध मोडूनी सारी नाती
होवून वेडा रमलो मी
करूनी तुझ्यावर प्रीति

अमृत न मिळता विष मिळे
काय मी अपेक्षिले अन काय दैवे योजिले

मोकळ्या तुझ्या केशभारी
गेलो मी गुरफटूनी
मुष्किल झाले जगणे मुष्किल झाले मरणे
खुषी न मिळता मिळते रुसणे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

लोकशाहीत कायद्याचं महत्व

“हे पुस्तक मी माझं वाचून झाल्यावर तुम्हाला वाचायला देईन.कदाचित तुमचं वाचून झाल्यावर मला तुम्ही आणखीन काही विचाराल,आणि मला त्यावर बोलायला पण आवडेल.”

“लोकशाहीत कायद्याचे महत्व” अशा शिर्षकाचं एक पुस्तक घेवून प्रो.देसाई आज तळ्यावर आले होते.त्यांचं ते पुस्तक अजून पुर्ण वाचून झालं नव्हतं.
मी त्याना म्हणालो.
“भाऊसाहेब,पुस्तकाच्या शिर्षकावरून मला दिसतंय सध्या जे जगात “हम करे सो कायदा” चाललं आहे त्यावर तुम्ही कुठेतरी अपसेट झालेले दिसताय.”
माझं हे बोलणं ऐकून ते म्हणाले,
“अगदी बरोबर.हे सगळे जगातले लोकशाही देश आहेत त्या देशात एक तर त्या त्या देशातले लोक तरी, नाहीतर त्या देशाचं सरकार, कायदा मोडून आपलं म्हणणं सिद्ध करायला सरसावतात.हे काही खरं नाही.”
हे ऐकून मी विचारलं,
“मग भाऊसाहेब काय खरं आहे ते तर थोडक्यात सांगा.”
प्रो.देसायाना माझ्याकडून ट्रिगरच हवी होती.
मला म्हणाले,

“हे बघा,अमूक अमूक गोष्टीवर माझा विश्वास असावा हे काही माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही.देवाचं अस्थित्व आहे ह्यावर माझा विश्वास असणं किंवा नसणं किंवा कदाचित तुमच्या समजुती नुसार अस्थित्व नसणं, हे पण माझा विश्वास असणं,नसणं ह्याच्या व्यतिरीक्त आहे असं म्हटलं पाहिजे.
ह्या खोलीच्या चार भिंतींच अस्थित्व आहे हे माझा त्यावर विश्वास असण्या नसण्यावर अवलंबून नाही.
ह्या भिंती जिथे आहेत त्या जागी मी जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मी नक्कीच आपटून टक्कर देणार आणि मी कितीही पोटतिडकीने त्यांच अस्थित्व नाही असं म्हणालो तरी त्यांच अस्थित्व नाकारू शकत नाही.

उलटपक्षी,माझं असं मत झालं आहे की काही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्यावर माझा विश्वास असुनही त्यात फरक होऊ शकतो.काही गोष्टीचं अस्थित्व असतं जोपर्यंत त्याच्या अस्थित्वावर आपल्या मनात विश्वास असतो तोपर्यंत.ह्या माझ्या म्हणण्याला उदाहरण म्हणून साम्य दाखवायला कायद्याच्या अस्थित्वाबद्दल बोलता येईल. कायदा अस्थित्वात असतो जो पर्यंत आपण सर्व मानतो की हो! कायदा आहे. आणि तो असला पाहिजे असं आपण निश्चयाने म्हणतो तोपर्यंत.
तो कायदा अस्थित्वात असतो जोपर्यंत आपण तो तसा असला पाहिजे याचा आग्रह करतो तो पर्यंत.आणि सर्वच- किंबहूना त्याच्या अस्थित्वावर विश्वास नसणारेसुद्धा- तो अस्थित्वात आहे असं समजून वागतात हे लक्षात ठेवण्यासारखं आहे.ज्या क्षणी आपल्यातले बरेच, आग्रह धरून म्हणतील की कायदा आपल्यावर नाही, किंवा कायदा आपलं काहीही करू शकत नाही, त्या क्षणी कायद्याचं अस्थित्व संपतं. जणू एखादा साबणाचा बुडबुडा हवेत तरंगत जातो आणि मग अदृश्य होतो तसं.
कायद्याच्या अस्थित्वाचं महत्व समजूनच मी कायदा मानतो.आपल्या समाजात त्याचं अस्थित्व असणं ही आपल्या समाजाची फारच मोठी कमाई आहे.समाजात त्यामुळे शिस्त येते.
कायदा आपलं रक्षण करतो.मत-भिन्नता असली तरी कायद्यामुळे समाज चालतो.जगायला भिती वाटत नाही.कठीण परिस्थितीत किंवा आपल्या अस्थित्वाला शह निर्माण झाला असता आपण कधी कधी समजून चालतो की कायदा आपलं संरक्षण करण्या ऐवजी आपल्याला धोका आणतोय.बऱ्याच वेळेला समाजात असे प्रसंग येतात.आणि कायदा मोडण्यापर्यंत आपली मजल जाते.पण ज्यांचा कायद्याच्या अस्थित्वावर विश्वास आहे ते कदापिही विचलीत होणार नाहित.

जो कोण कायदा मोडून दुसऱ्यावर अत्याचार करायला पहातो,तो यशस्वी होईल म्हणून, त्याला शह देण्यासाठी आपण कायदा मोडून चालणार नाही.कारण कायद्याच्या अस्थित्वावरच समाज शेवट पर्यंत टिकून राहणार आहे हे निश्चीत.”
माझ्या म्हणण्याला उत्तर देवून झाल्यावर प्रो.म्हणाले,
“हे पुस्तक मी माझं वाचून झाल्यावर तुम्हाला वाचायला देईन.कदाचित तुमचं वाचून झाल्यावर मला तुम्ही आणखीन काही विचाराल,आणि मला त्यावर बोलायला पण आवडेल.”
नंतर आम्ही घरी जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, June 6, 2008

दोष होता केला मी तो चुकून

विसरू कसा तुला
नसे मी तेव्हडा गैरविश्वासू
तक्रार कशी करू आता
असली तरी नाहीस देत भासू

होतो गेलो मी समजून
भेटीतून गेलो प्रीत मिळवून
एक तुझ्या शिवाय दुःखातून
नाही गेलो काहीही मिळवून

नाजूक मनाला गेलीस तू तोडून
सहज गतीने गेलीस तू खेळून
दोष होता केला मी तो चुकून
काय मिळवू मी दुषण तुला देवून

देशिल का तुझे दुखणे मला
मिळेल शांती सर्वदा त्यातून
कमनशिब माझे असे समजून
जाईन मी एकदाचे तुला विसरून

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, June 5, 2008

गाते बुलबुल दिवाणी

पुर्वेकडूनी येते लहरत हवा
खुलविते मना गाऊनी गाणे
कानामधे कुणी तरी गुणगुणे
तो आला
तो वसंत आला वसंत आला
घेऊनी फुलांचा बहर खुलवी जीवाला

आम्र वनातूनी मधूर सुरांचा नाद
घेऊनी फांदी वरी गुंजन करी कोकिळा
सुमधुर फुलांच्या सुवासातून लहर
हवेची घेऊ लागे किंचीतसा हिंदोळा

मना लोभवी शीतल संध्याराणी
रंगुनी गेली ऋतुमधे मोहक वनराणी
उमंग आली दिवसामधे
गाते बुलबुल दिवाणी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, June 4, 2008

आभार,आभार तुझे रे! संगीता

मानू कशी कृतज्ञता त्या संगीताची
जे देई मला झडकरी स्फुर्ति गाण्याची

जगू कसा मी त्या संगीताविना
प्रश्न पुसितो ठेवूनी प्रामाणिकपणा

कसले जीवन जगावे गाण्याविना
कसले जीवन जगावे नृत्याविना
कसले कोण आपण अपुल्याविना

उपकृत होवूनी म्हणतो आता
आभार,आभार तुझे रे! संगीता

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 3, 2008

“इलो रे,इलो!” कोकणातला पाऊस.

“शीरा मारां! ही काय पडण्याची रीत झाली?”
कोकणातला पाऊस अनुभवल्या शिवाय कसा असतो तो कळणं कठीण.
”नेमिची येई मग पावसाळा”
हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार.

मृग नक्षत्र ७ जूनला लागत.शेतकऱ्या पासून लहान मुला पर्यंत एप्रिल,मेचा उन्हाळा सहन करून झाल्यावर केव्हा एकदा पाऊस येईल असं होतं.मला आठवतं त्यानुसार, मृग नक्षत्र आलं की अगदी नियमीत त्या दिवसात पाऊस यायचाच.
“घडाम,घुडूम आकाशात व्हायचं.कडाड,कुडुम” होवून लाखो दिवे पेटवावेत तसं आकाशात क्षणभर सगळं उजाळून जायचं.
“इलो रे! इलो”
हे दोन शब्द ज्याच्या त्याच्या तोंडातून बोलले जायचे.ऐकून बरं वाटायचं.
कुणीतरी एखाद्दया व्यक्तिला संभोधून बोलावं तसं पावसाला बोलायचे.त्याच्या विषयी अनुद्नार काढण्यापासून ते त्याचं स्वागताचं संभाषण करण्यापर्यंत सर्वांची मजल जायची.तो पाऊस बिचारा सर्व ऐकून घ्यायचा.मालवणीत एक म्हण आहे,
“पावसान झोडल्यान आणि नवऱ्यान मारल्यान तर कोणाकडे जावून सांगतलय?”
आणि तसंच पावसाच्या बाबतीत व्हायचं.तो त्याला हवं तेच करायचा.
कोकणातले लाल मातीचे रस्ते,एप्रिल,मे मधे वाऱ्याच्या वावटळी येवून जी काय रस्त्यावरून धूळ उडून जायची ती जायची. पण उरलेली धूळ काय कमी असायची. एकदा का पावसाच्या सरी वर सरी यायला लागल्या की पावसाने लाल रस्ते धुवून निघायचे आणि रस्त्याच्या बाजूच्या गटारातून लाल पाणी धो,धो वहात कुठे जायचं कुणास ठावूक.पण मुंबईतल्या इराण्याने “पाणीकम चहाचे” भरून भरून लाखो कप जणू गटारात ओतून टाकल्या सारखं वाटायचं.
आम्ही लहान असताना त्यावेळी आमच्या घराच्या पडवीत बसून रस्त्यावरून जाणायेणाऱ्या लोकांचे स्वगत किंवा बरोबरच्याशी होणारे संवाद ऐकण्यात मजा लूटायचो.
“इलो रे,इलो!
हो आता पिच्छो पाडल्या शिवाय रव्हचो नाय!
आता धुम्शाण खूप झालां बाबा!
वषाड पडो! नुकसान केल्या शिवाय हो आता सोडूचो नाय!
केंव्हा एकदा त्वांड घेवोन जाय्त असां झालां!
असोच मधून मधून उघाडी ठेवून रव्ह.ह्या वेळेक तरी आमच्यावर उपकार कर!
शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली?
गेले आठ दिवस जांवचां, नांव म्हणून काढणां नांय!
गेले आठ दिवस नुसतां झोडपून काढल्यान!
येतानां गर्जून येतां,आणि जातानां पण गर्जून जातां!”

हे पावसाळ्याच्या दिवसात निरनिराळ्या दिवशी आणि दिवसाच्या निरनिराळ्या वेळचे उद्गार ऐकायला यायचे. डोक्यावर ताज्या भाजीचं ओझं किंवा विकून झाल्यावर रिकाम्या झालेल्या टोपल्या घेवून परत जाताना विक्रेकर बायका आणि पुरूष त्यांच्या मनात आलेला सर्व शीण त्या बिचाऱ्या पावसावर असले शेरे देवून कमी करून घ्यायचे.
कुणी तरी म्हटलंय ना,
“माळावर बोंब मारायला पाटलाची परमीशन कशाला?”
तसंच,
“पावसावर टीका करायला कोणाची कोण परवानगी घेत नसतो.?
पाऊस येण्यापुर्वी एक दोन महिने अगोदर,लोकं आपआपली घरं शाखारून घ्यायची.मंगळौरी घरांची कौलं असलेले घरमालक कामगाराना घरावर चढवून कचरा साफ करून घ्यायचे. पावसाचं कौलावरून येणारं पाणी पन्हळातून खाली जमिनीवर आणल्या जाणाऱ्या ह्या पन्हळांना पण साफ करून घ्यावं लागायचं. पण दुसऱ्या प्रकारच्या कौलाना मात्र संपुर्ण काढून साफ करून मग नीट ओळीत लावावं लागायचं.त्याला घर शाखारून घेणं म्हणायचे.
त्याशिवाय झोपडी वजा घरं असायची त्यांच्या वर माडाच्या झाडांच्या पानाच्या-झावळ्यांच्या-विणून केलेल्या झापांना शाखारून घ्यावं लागायचं.ह्या दिवसात हे काम करणाऱ्या कामगाराना पोटा पुरता मोबद्ला मिळून पोट भरायाचा मार्ग मोकळा व्हायचा.तो कामगार पावसाचे अन्य तर्हेने आभार मानायचा.

कोकणात पावसाच्या दिवसात सर्व आसमंत गार गार होवून जायचं.कावळे,चिमण्या,कबूतरं वगैरे पक्षी बिचारे झाडांच्या फांद्दयांचा आडोसा घेवून निमुट दिवस काढायचे.जरा उघाडी मिळाली की कावळे कुणी उष्ट्या हाताने काही अन्न बाहेर फेकलं असल्यास तेव्हडंच गीळून दिवस काढायचे.कावळ्या कडून एक शिकण्या सारखं आहे की उष्टं अन्न खाताना आपल्या भाईबंधाना कांव कांव करून बोलावून घेवून ते अन्न सर्व मिळून खायचे.हे माणसाने आप्पलपोटेपणा कसा नसावा हे शिकण्यासारखं आहे.
कोकणातल्या शहरातून जरा खेड्यांत गेल्यास पावसाळ्यात येणाऱ्या मजेची नुसती आठवण मन बेचैन करून टाकतं.शेतकरी भर पावसात डोक्यावर इरली घेवून शेतात काम करायचे.ही इरली पण बांबुच्या पट्ट्याची बनवतात. मुस्लीम बायका चेहरा उघडा ठेवून बुरखा कसा घेतात तसाच बांबुच्या पट्ट्यांचा बनवलेला हा बुरखा पुढून उघडा असतो आणि डोक्यावरून ते पाठीवर खालपर्यंत जाईल असा अर्थात हा बुरख्या पेक्षा जाड असूनही पावसात काम करताना भिजून न जाण्यासाठी अंगावर घेवून शेतकरी शेतात काम करीत असतात.
ह्या इरल्यामुळे दोन हात मोकळे राहिल्याने वाकून जमिनीवर काम करतां येतं.भात लावणीच्या दिवसात प्रत्येक कुणग्यात-चौकोनी आकाराच्या पट्ट्यात- एका टोका पासून दुसऱ्या टोकापर्यंत एका ओळीत बसून, रोपं पेरत-trans plant- करत,कामाचा शीण कमी होण्यासाठी मिळून गाणं गात, इंच इंच पुढे सरकतानाचं दृष्य पाहून शेतकरी घेत असलेली मेहनत पाहून ह्यावेळी असं मनात यतं ते गाणं,
“आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
करू काम स्मरू नाम
मुखी राम हरी रे”
मुंबईहून कॉलेजच्या सुट्टीत कोकणात घरी आल्यावर मावशीच्या खेड्यात जावून तिच्या झोपडीवजा घराच्या वरच्या माडीवर जावून अशा पावसाच्या
दिवसात खिडकीत बसून बाहेर दिसणारी हिरवी गार शेतं बघून मन प्रसन्न व्हायचं.
अशावेळी न सांगता मावशी भरपूर साखर घातलेला कप भरून चहा आणि थाळी भरून खमंग कांद्दयाची भजी घेवून यायची.अशा पावसातच हे कॉम्बीनेशन एनजॉय करता यायचं. एकदा असाच सुट्टीत आलो असताना मला आठवतं मी बसलो होतो. पुढल्या खिडकीत बसून श्रीहरी असंच बाहेरचं पावसाळी वातारण पाहून मुरलीवर, मंगेश पाडगांवकरांचं,

“लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे”

हे गाणं सुंदर सुरात वाजवत होता.आणि खाली वाकून वाकून पहात होता.मी सहज वाकून खाली पाहिल्यावर साधना, एरव्ही मुंबईत कॉलेजात स्लीव्हलेस टॉप आणि खाली जीन अशा ड्रेस मधे वावरणारी,आज आजीचं नऊवारी पातळ आणि लांब बाह्यांचा ब्लाऊझ घालून हातात दोन घागरी घेवून विहीरीवर पाणी आणायला जात असलेली दिसली.साधना श्रीधरची शेजारीण. ती पण अशीच कॉलेजच्या सुट्टीत आजीकडे थोडे दिवस राहायला आली होती.तिला उद्देशूनच ते गाणं होतं हे समजायला मला वेळ लागला नाही.माझ्याकडे पाठकरून श्रीहरी बसल्याने त्याला मी पण खाली पहात होतो ते दिसत नव्हतं. विहीरीतून दोन घागरी पाणी भरून, डोक्यावर चूंबळ ठेवून त्यावर एक घागर, आणि दुसरी घागर कंबरेवर घेवून लचकत मुरडत येताना पाहून श्रीधरने आपलं गाणं बदलं होतं.

“पाण्या निघाली सुंदरी
मन ठेविले दो घागरी
चाले मोकळ्या पदरी
परी लक्ष तेथे “
ह्या गाण्याचे सूर आतां मुरलीवर वाजवायला लागला.
माझ्याच वयाचा माझा मावस भाऊ-श्रीहरी- तो पण कॉलेजच्या सुट्टीत आपल्या आईला भेटायला नेहमी सारखा आला होता.ह्या वेळी त्याची प्रेयसी-गर्ल फ्रेन्ड- साधना पण तिच्या आजीकडे सुट्टीत कोकणच्या पावसाची मजा एन्जॉय करायला आली होती.जुलै महिन्यात कोकणातल्या पावसाला कहर यायचा.वर्षातून बाकीचे दिवस कोरड्या रहाणाऱ्या नद्या ह्या दिवसात तुडूंब भरून वहायच्या.विहीरी पण एरव्ही पाणी अगदी तळाला गेलेल्या, जुलै महिन्यात काठोकाठ भरायच्या.
मी हा त्यांचा रोमान्स पाहून एन्जॉय करीत होतो.
का कुणास ठाऊक त्याचं माझ्याकडे लक्ष का गेलं ते.तो जरासा लाजला.ते पाहून मी पण एक जुनं गाणं आठवून गुणगुणलो

” नको वाजवूं श्रीहरी मुरली रे
तुझ्या मुरलीने भूक तहान हरली
नको वाजवूं, नको वाजवूं
श्रीहरी मुरली”
हे ऐकून,माझ्या जवळ येवून म्हणाला,
“वा! सर्व भजी आणि चहा फस्त केलास आणि
म्हणतोस भूक तहान हरली”
आणि नंतर आम्ही दोघे खूप जोरा जोरात हंसलो.
काही वर्षानी श्रीहरी आणि साधनाचं लग्नं पण झालं आणि आता त्याना शाळेत जाणारी दोन मुलं पण आहेत.
जुलैभर कहर करून झाल्यावर ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला हा पाऊस जरा उघडीप घेतो.कदाचीत ती निसर्गाचीच जरूरी असावी.भातशेती पण एव्हांतोपरी अंग धरते.आणि मधूनच उघडीप मिळून उन मिळाल्याने कोवळे दुधाळ भाताचे दाणे पोसले जातात.

भर पावसात मात्र सुकी मासळीच खावी लागते.सुकी कोलंबी-सुंगटं- सुके बांगडे पाऊस येण्यापुर्वी साठवण करून ठेवलेले असतात त्याचा वापर होतो.शिवाय भर उन्हात एप्रील मे मधे सांडगे,पापड,कुरडुया उन्हात वाळवून तयार केलेला साठा अशावेळी उपयोगी येतो.तसेच वाळवून ठेवलेल्या फणसपोळया आणि आंब्याची साठं उपयोगी पडतात.

नद्यांचे पूर जरा कमी झाल्याने जाळी टाकून मासे मिळण्याची वेळ येते.पावसात सुळे,गुंजूले.शेतकं,काळूंद्री नावाचे मध्यम आकाराचे मासे मुबलक मिळतात.मग घरोघरी सुळ्याची खोबऱ्याच्या रसातली आमटी,आणि गुंजुल्याचं जागच्याजागी-घट्ट-तिरफळं घालून केलेलं तिखलं,लालबुंद कोकमाचं सार-सोलकडी- आणि साप्पाटून भात मिळाल्यावर काय विचारतां?
कोकणातला पावसाळा ह्या सर्व कारणाने चांगलाच लक्षात राहतो.
” नेमिची येई मग पावसाळा”
हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, June 1, 2008

विनम्रता

आज प्रो.देसाई ज्यावेळेला तळ्यावर आले त्यावेळी मी एक पुस्तक वाचण्यात गर्क झालो होतो.ते माझ्या जवळ येवून केव्हा उभे राहिले आहेत ते मला कळलंच नाही.
मला म्हणाले,
“कसल्या विषयात एव्हडे मग्न झाला आहात?”
मी त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब,मी एका प्रसिद्ध लेखकाचं विचार चिंतन वाचत आहे.हे पुस्तक हातातून सोडवत नाही.”
प्रो.देसाई मला म्हणाले,”काय विषय आहे असा?”
मी म्हणालो,
“विषय तसा साधा आहे.पण तुम्ही नक्कीच तुमचा विचार जास्त विस्तारून सांगाल.”
विषय आहे “The Presumption of Decency “
हे ऐकून प्रोफेसर मला म्हणाले,
“मी ह्या डीसेन्सी-म्हणजेच विनम्र राहून दुसऱ्याचा सन्मान करणं- ह्या बद्दल मला काय वाटतं ते तुम्हाला थोडक्यात सागतो.”
मी पुस्तक बंदच केलं. आणि भाऊसाहेब कसलं लेक्चर देतात याची प्रतिक्षा करीत म्हटलं,
“बोला आता तुमचंच ऐकुया”

मला सागू लागले
” जशी एखादी व्यक्ति वेळेचा आणि साधनाचा विचार करून पाऊल टाकते तशा प्रकारचा विचार करणारा मी मला समजतो. एखादा साधा गुन्हा झालेला पण मला क्षणभर का होईना आत्मघातकी वाटतो आणि माझा मीच वैतागतो.
एखादा टॅक्सीवाला नियमितपणे वेग सांभाळून कायद्याचे बंधन पाळून टॅक्सी चालवित असतो ती त्याची विनम्रता असते. माझ्या घाई साठी वेगाचा नियम तोडतो त्यावेळी त्याने केलेली ही घटना सुद्धा माझी मलाच लज्जास्पद करते. त्याने जाणून बुजून केलेल्या चुकीचा, दंड म्हणून त्याला देऊ घातलेली टिप मी पंधरा पर्सेंन्टने कमी केली तरी पुढची माझी सगळी वेळ हा टॅक्सी ड्रायव्हर देशातल्या कुठच्या प्रांतातून आला,ह्याला टॅक्सी घ्यायला कुठच्या बॅंकेने पैसे दिले असतील असल्या गोष्टीचा विचार करून माझा मीच जरा घुश्यात राहतो.
एखादा बातमी-पत्राचा संपादक मी पाठवलेल्या टिपणाचा उलटा अर्थ लावून ते परत पाठवून देतो तेव्हा, त्याचा मला व्यक्तिशः खूप राग येतो,एखाद्या रेस्टॉरंटने माझं बुकींग आयत्या वेळेला नाकरणं,किंवा राजकारणी माणसाने मी विरोध केलेली पॉलीसीच खंबीरपणे आचारणात आणण्याचा प्रयत्न करणं, ह्याचा ही मला खूप राग येतो. पण हे असले आचरण पाहून विनम्रता नजरे समोर ठेवून प्रसंग टाळता येतात.
आमच्यासारखी शैक्षणिक जगात वावरणारी व्यक्ति काही प्रमाणात उद्धट असणं स्वाभाविक आहे. त्याशिवाय माझं व्यक्तिमत्व काहीसं तसंच असून, मीच बरोबर आहे आणि दुसरा कुणीतरी चूक करत असतो असं माझ्या मनात आणून माझ्या मनाचं समाधान करून घेतो हे मी रास्त करतो असं मी मानत असतो.
कुणाकडून कुणाला चुकीचं मार्गदर्शन झालं असेल असं समजून राहणं ही एक बाजू झाली पण ते झालं याचं कारण ते वाईट प्रवृत्तीचे आहेत म्हणून असं झालं, असं समजणं दुसरी गोष्ट झाली.उगीचच त्रागा करणाऱ्यांचा, किंवा अगदी दारूण स्थितित असलेल्यांचा, कुणी मुद्दाम द्वेष करीत नसतो.खरं म्हणजे द्वेष करण्याजोगी व्यक्ति ती, की जी एकतर दुष्ट प्रवृत्तीची असते किंवा तिच्या जवळ मुळीच विनम्रता नसते. तसं पाहिलं तर द्वेषकरण्याची प्रवृत्ती ही एक भावनिक स्थिति आहे, आणि ती सहजगत्या टाळता येते. स्वतःहून कुणाचा द्वेष करणं खरंच तापदायक असतं. त्या वृत्तिमुळे आपल्या सद्सद्विवेक विचारावर पगडा येतो,आणि त्यामुळे एखादी व्यक्ति मनात डूक धरून दुसऱ्या व्यक्तिला कष्ट देण्यात प्रवृत्त होत असेल तर, त्यापासून काहीही चांगलं होत तर नाहिच नाही.

विनम्रता असणं हा व्यक्तिवरचा एक चांगला संस्कार आहे.आणि ही विनम्रताच, एखाद्याला त्याचा जेव्हा द्वेष करण्याकडे कल होतो तेव्हा त्याला गोंधळात जाण्यापासून परावृत्त करते. मन घट्ट करून एखाद्याने समजूत करून घेतली की आपल्या सभोवतालचे लोक आपल्या सारखेच विनम्र आणि सभ्य आहेत,आपल्या सारखेच प्रयत्न करून सन्मानाने गोंधळातून स्वतःला सोडवून घेणारे आहेत,अशी समजूत करून घेतल्यावर अशा लोकांना दुषणं देणं म्हणजे आपल्या आपणच स्वतःला अविचारी वृत्तिचे महात्मे समजून घेणं.

आपण विनम्र आहो असं समजून वागणं म्हणजे सर्व काही झालं असं नाही.उलट त्या वागण्यात सत्यता असली पाहिजे.त्यात सत्यता नसेल तर एखादी व्यक्ति विनम्र असूनही बेजबाबदार लोकांवर सतत चिडचिडेपणा करीत राहणार.उलटपक्षी योग्य मार्ग तो की जो माणसा-माणसातली हतबलता लक्षात घेवून मोठ्या मनाने निर्णय घेण्याकरीता सफलता आणतो.
सभोवतालचं जग विचाराने अपरिपक्व असलं म्हणून ते भयंकर आहे अशी समजूत करून चालणं योग्य होणार नाही. त्यांचं वागणं चुकीचं असलं म्हणून काही ते दुष्ट विचाराचं आहेत असं मानणं हे खरं नाही.
दुसरे विनम्र असतीलच अशी समजूत करून घेवून मी नेहमीच यशस्वी होईन असं ही नाही.पण मला यशस्वी होण्यासाठी माझ्याकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली गेली पाहिजे.इतरांसारखा मी पण बराचसा दोषी असू शकेन. पण विनम्र होण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे.आणि मी विश्वास धरला पाहिजे की इतरही माझ्या सारखेच प्रयत्नशील असावेत.”
हे सर्व ऐके पर्यंत तळ्यावर काळोख झाला होता.भाऊसाहेब चर्चेच्या ओघात घरी जायला उशिर होतोय हे विसरूनच गेले.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com