Monday, October 13, 2008

एका मनीमाऊचा किस्सा

आज प्रो.देसाई एका गृहस्थाना घेऊन आले होते आणि माझी ओळख करून देताना म्हणाले,
“गेली वीस वर्ष हे कैदी म्हणून तुरंगात होते.साध्याश्या गुन्हाचं पुराव्याच्या आभावी,गाढव कायद्दाने आणि नियतीने त्यांच्यावर हा अत्याचार कला होता.सुटून आल्यावर ते स्वतः आता असिस्टंट जेलर म्हणून काम करीत आहेत.त्यांच्या शिक्षेच्या काळात त्यानी मानसशास्त्रावर अभ्यास करून पीएचडी मिळवली आहे.
आमच्या शेजार्‍यांचे ते नात्याचे आहेत.तुमच्या बरोबर ओळख करून देण्यासाठी मी मुद्दामच याना तळ्यावर घेऊन आलो.”
त्यांच्याकडे पाहून मला खरोखरंच कुतुहल वाटत होतं.
पिळदार मिशी, घोगरा आवाज,मोठाले डोळे आणि चेहर्‍यावर किंचीतसं स्मित असलेले हे गृहस्थ खाकी शॉर्ट,त्यावर बरेच खिसे असलेला बुशशर्ट,हातात एक छोटीशी काठी असे हे व्यक्तीमत्व आणि त्यांचा पेहराव पाहून मला क्षणभर पु.लं च्या बटाट्याच्या चाळीतल्या कोचरेकर मास्तरांची आठवण आली.
“अग बाई! हे आपले कोचरेकर मास्तर का?मला वाटलं आपल्या चाळीचा गुरखा”
असं वर चाळीतल्या बायका गॅलरीत येऊन कोचरेकर मास्तराना उद्देशून म्हणाल्याचे संवाद कानात उगाचच गर्दी करीत होते.
“हलो हाय” चे सोपास्कार झाल्यावर मी त्याना म्हणालो,
“तुमचं खरोखरंच कौतूक केलं पाहिजे.एखादा तुरंगातल्या अनुभवाचा किस्सा सांगाल का?”
हे ऐकून भाऊसाहेबानीच त्याना सुनावलं,
“तो तुमचा मला सांगितलेला मांजराचा किस्सा सांगा.मला पण परत ऐकायला बरं वाटेल”
त्यावर ते गृहस्थ सांगू लागले,
“जवळ जवळ वीस वर्ष तुरंगात राहून मला कळून चुकलं की दायाशील असणं हा काही प्रोत्साहित करण्या सारखा गुण न मानता बरेच वेळा ती कमजोरी समजली जाते.
एकदा एक पांढरं काटकूळं, अस्वच्छ मांजर चुकून तुरंगाच्या आवारात आलं,मीच पहिला होतो की त्या मांजराला जवळ घेऊन कुरवाळत बसलो होतो.
कुत्र्याला किंवा मांजराला गेल्या वीस वर्षात मला कधी हात लावायची संधी मिळाली नव्हती.जवळ जवळ मी त्या मांजराला वीस मिनटं,एका कचर्‍याच्या डब्याच्या बाजूला आणि भटारखान्य़ाच्या मागे लोळून मजा करताना कुतुहलाने न्याहाळत होतो.ते मांजर बाहेरून जे व्यक्त करीत होतं ते मी माझ्या अंतरातून अनूभवत होतो.
माझ्या जवळ बसलेल्या मांजराला पाहून मला तो एक प्रकारचा माझाच सन्मान वाटत होता जणू काय मी दुसर्‍या एका प्राण्याचं जीवन संपन्न करीत होतो.
मला वाटतं,एकाद्दाला देखभालीची आवश्यकता असताना तसं करणं ह्यातच खरी माणूसकी आहे.

पुढे काही दिवस मी इतर कैद्दाना त्या मांजराला प्रतिक्रिया देताना पहात होतो.जेव्हा एखादा कैद्दांचा ग्रुप बाहेर उन्हात येत होता त्यातले कैक जण त्या मांजराच्या अंगावरून आळीपाळीने हात फिरवीताना पहात होतो.बहुतांश हे कैदी एकमेकाशी कधी बोलताना दिसत नसायचे.बरेच वेळा जेलर सुद्धा नेहमीचा त्यांच्या वर दादागीरी करण्याची प्रवृती सोडून त्या कैद्दाना त्या मांजराच्या अंगावरून हात फिरवणार्‍याना पहात मजा घेत होता.

दुधाच्या वाट्याभ्ररून आणि पाण्याच्या वाट्याभरून येत होत्या.पावाचे तुकडे कचर्‍याच्या डब्याच्या बाजूला नीट मांडून कावळे खाणार नाहीत याची काळजी घेतली जात होती.मांजर्‍याच्या अंगावरचे केस नीट कात्रीने कापून काही तिची नीगा ठेवीत होते.
काही कैदी म्हणाले,
“मांजर योग्य जागी आल्याने त्याला राजा सारखी वागणूक मिळत आहे.”
हे खरं होतं.पण मी ते स्रर्व न्याहळत असताना विचार करीत होतो की त्या मांजराने आपल्यासाठी काय केलं?
आमच्या कैद्दांच्या जीवनात काय त्रुटी आहेत ह्यावर खूप चर्चा होते.खरं म्हणजे आम्हाला सुधारण्याचे कार्यक्रम ठेवले पाहिजेत.मानसशास्त्र जाणारे लोक आमच्यासाठी आणले पाहिजेत.काही लोक अशीही चर्चा करतात की तुरंगातलं वातावरण दयाळू, सहनशिलतेचं, समजूतीने घेणारं असं असावं.पण मला वाटतं की हे सर्व गूण कैद्दातही असले पाहिजेत. जवळ जवळ वीस वर्ष तुरंगात राहून मला कळून चुकलं की दायाशील असणं हा काही प्रोत्साहित करण्यासारखा गुण न मानता बरेच वेळा ती कमजोरी आहे असं समजलं जातं.पण जनमानसात असं सांगितलं जातं की तुम्ही मान खाली घालून,इतर बाबतीत नाक न खूपसतां,तुम्ही तुम्हाला कमजोर न राहण्याच्या प्रयत्नात असलं पाहिजे.हे कसं शक्य आहे?

काही दिवसासाठी त्या जीर्ण-शीर्ण मांजराने त्या कैदखान्यातल्या वातावरणाच्या नियमाचा भंग केला होता.त्यानी ते मांजर आता इथून हलवलं होतं, बहूदा समुचित वातावरण असलेल्या घरात नेलं असावं.परंतु जाता जाता त्या मांजराने माझ्या आणि इतर कैद्दाच्या हृदयात चांगला प्रकाश टाकल्याचं पाहून बरं वाटतं.
ते काही पीएचडी झालेलं नव्हतं,किंवा अपराध-विज्ञानी नव्हतं,आणि मानसशास्त्री नव्हतंच नव्हतं.पण,
“मला कुणी इकडे मदत करेल कां?”
असा साधा प्रश्न विचारून ते मांजर आमच्यासाठी काहीतरी महत्वाची गोष्ट करून गेलं.त्याला आमची जरूरी होती आणि आम्हालाही त्या जरूरीची जरूरी होती.मला वाटतं आपणा सर्वांना तसं हवं असतं.”

एका सद्गुणी माणसाबरोबर दोन घटका घालवून आयुष्यात काही तरी शिकायला मिळाल्याचं मला समाधान झालं.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, October 12, 2008

काय झाले असे हे एका क्षणा

काय झाले असे हे एका क्षणा
मलाच मी हरववून गेले
वार्‍यासंगे ओढणी बोले
आला श्रावण आला सजणा
छेडी तो मला विनाकारणा
राहू कशी रे सांग तुजविणा
काय झाले असे हे एका क्षणा

नाव चिमुकली घेऊन आशेची
वाट धरी तो नावाडी पूर्वेची
ठुमकत ठुमकत घुंगर बोले
लपवीत छपवीत लज्जा सांगे
कळला ग! तुझा प्रीतीचा बहाणा
येणार येणार तो चितचोर दिवाणा
काय झाले असे हे एका क्षणा

संकुचीत होऊनी बहार फुलांची
लिपटूनी शरीरा सांगू लागती
लपूनी छपूनी चल ग! मैत्रीणी
घट्ट पकडूनी माझी करंगळी
मिळेल मिळेल तुला तुझाच साजणा
काय झाले असे हे एका क्षणा



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, October 10, 2008

“मी” माझ्या शरीरापेक्षा भव्य आहे.”

त्याचं असं झालं,नलू प्रधान मला अचानक खूप दिवसानी एका समारंभात भेटली.तिची आणि माझी लहानपणची ओळख.ती आणि तिचे आईवडील आणि तिची आजी आमच्या शेजारी राहायची. श्री.वा.य.प्रधान एअर लाइन्स मधे पायलट होते.काही दिवसाने त्यांचं कॅनडात मॉन्ट्रीयल इथे पोस्टींग झालं.नलू त्यावेळी सहा वर्षाची होती.नलू तशी दिसायला खूपच क्युट होती.पण बिचारी एक हाताने अपंग होती.आता मला ती भेटली तेव्हा ती मोठी बाई झाली होती.तिला दोन मुलं होती.तिचा पती फॉरेनर आहे.एका चांगल्या कंपनीत व्ही.पी. आहे.तिच्या अंगातले गुण पाहून त्याचं तिचाशी प्रेम जमलं.तिचं शारिरीक व्यंग त्याने नजरेआड केलं.नलूचा लहानपणी चेहरा जसा गोड होता तसा तो आताही आहे.बोलताना ती अगदी बारीक आवाजात पण मधूर लय काढून बोलते.तिच्याशी बोलत रहावं असं वाटतं.मी तिला घरी जेवायला बोलवलं होतं.बोलता बोलता ती सांगू लागली,

“काही लोक “मलाच” माझं शरीर समजतात.आणि म्हणून माझ्याकडे ते प्रतिकूल दृष्टीने पहातात. आणि माझी करूणा करतात. असं होऊन आता खूप काळ गेला आहे. हळू हळू त्यांच्या त्या माझ्याकडे पहाण्याच्या विचित्र नजरा आणि त्या अर्थपूर्ण हास्याकडे आता मी संपूर्ण दुर्लक्ष करायला शिकले आहे.
रोज आपण चित्रात सुंदर शरीर पाहतो.चित्रातल्या शरीरासारखं निर्दोष शरिर शोधून मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाची खात्री होते की,जे आपलं शरिर आहे तेच आपण आहोत.

वयात आलेल्या शरीराच्या स्तिथ्यंतरातून नंतर प्रौढ होऊन त्यानंतर वयस्कर होई तो पर्यंत मी बराच माझा काळ पिकणारे केस,आणि तोंडावरच्या सुरकुत्या ह्याचा विचार करण्यात घालवला. ज्यावेळी मी पन्नास वर्षाची झाले,त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझे आईवडील आता पर्यंत सांगत आले तेच खरं होतं.”मी” म्हणजे माझं शरीर नाही.

मी जन्मतःच दोषविरहीत शरीर घेऊन आले नाही.माझ्या डाव्या हाताला व्यथा होती.तो त्यामानाने तोकडा होता.पण एकाअर्थी मी भाग्यवान होते.माझे आईवडील अत्यंत समजूतदार होते.ते मनाने खंबीर होते.माझ्या वाणीतून “मला जमणार नाही”हे वाक्य त्यानी काढून त्या ऐवजी “मी मार्ग काढीन”असं वाक्य माझ्या वाणीत आणलं.त्यांचा विश्वास होता की मनाची,हृदयाची आणि अंतरआत्म्याची प्रगती तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोण होणार हे ठरवते.
मी माझ्या शरीराचा उपयोग बहाणा न समजता त्याचा उपयोग उत्प्रेरक-कॅटॅलिस्ट- म्हणून वापरला पाहिजे.

तरीपण माझं शरीर दुर्लक्षीत झालं नाही.माझ्या शरीराने शल्यक्रिया सहन केली,व्यायामाची फरफट करून घेतली,पोहण्याचे कष्ट घेतले,आणि शेवटी योगाभ्यास पण झाला.पण म्हणून हा सर्व उपचार माझ्या आयुष्यातला केन्द्रबिंदू नव्हता.मला माझ्या आईवडीलानी माझ्या शरीराचा सदैव सन्मान करायला शिकवलं.पण म्हणून हे पण लक्षात ठेवायला सांगितलं की शरीर हे महत्वाच्या बाबी अंगीकारलेलं एक वहान आहे.त्या बाबी म्हणजे माझा मेंदू,मन आणि अंतरआत्मा.शिवाय मला हे ही सागितलं जायचं की शरीर निरनीराळ्या आकाराचं,रंगाच आणि लांबीरुंदीचं असतं.आणि असं असूनही प्रत्येक व्यक्ति काही ना काही तरी अप्राप्तता घेऊन धडपडत आयुष्य काढीत असते.

माझ्या ह्या अपंग शरीरातून मी धैर्य,निर्धारण,निराशा आणि यश काय हे शिकले.माझं हे शरीर पेटी वाजवू शकत नाही,मोठ्या खडपावर चढू शकत नाही,परंतु त्याही परिस्थितीत अन्नाचा घास कसा घ्यायचा ते त्या शरीराने शिकवलं.वही हातात धरून लिहायचं कसं ते शिकवलं.ह्या माझ्या शरीराने दुसर्‍याचा सन्मान कसा करायचा ते शिकवलं-मग तो किडकीडीत असो,सशक्त असो की सुंदर असो- तरीही.
” मी” म्हणजे माझं वक्तव्य,माझ्या कल्पना,आणि माझं कार्य.”मी”आनंदाने,हास्याने, महत्वाकांक्षेने आणि ज्ञानाने परिपूर्ण आहे.
“मी” माझ्या शरीरापेक्षा भव्य आहे.”

तिचं बोलून झाल्यावर मी तिला म्हणालो,
“नलू तू खरोखर ग्रेट आहेस.तुझे विचार,तुझ्या आईवडीलांची तुला मिळाली शिकवण आणि त्याचा तू घेतलेला फायदा,आणि इतके दिवस तू त्यांच्या बरोबर कॅनडात काढलेस त्यामुळे तिकडचे संस्कार आणि विशेष करून अपंगाकडे अतिशय सन्मानाने पहाण्याची त्या लोकांची दृष्टी,आणि तुझी ही परसन्यालीटी पाहून मला असं वाटतं,सर्व त्रुटीवर मात करून तू “शरीरापेक्षाही भव्य” आहेस हे सिद्ध करून दाखवलंस.तुझ्या बद्दल मला खूप अभिमान वाटतो.”
त्यावेळच्या तिच्या बरोबर लहानपणी वाढलेल्या माझ्या कडून हे उद्गार ऐकून ती सद्गदीत झाली. आणि मी पण.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, October 8, 2008

त्याची मजला भ्रांत नसे

प्रीत केली मी तुजवरी
चुकले माझे यात कसे
इतकी प्रीत तुजवर झाली
त्याची मजला भ्रांत नसे

इतक्या मोठ्या बागेतूनी
फुल खुडले मी कसे
इतक्या मोठ्या नभातूनी
एकच तार्‍या चोरू कसे

गोड गुलाबी स्वपना मधूनी
जागे आपण झालो कसे
आवडशी तू मला एव्हडी
कारण त्याचे माहित नसे



श्रीकृष्ण सामंत (स्यान हिखे कॅलिफोर्नीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, October 6, 2008

विज्ञानशास्त्र, आपलं मन आणि जीवन विकसित करतं.

आज प्रो.देसाई बरेचसे मुडमधे दिसले.तळ्यावर जाता जाता ते मला वाटेतच भेटले.तिथूनच आम्ही अशा विषयावर बोलायला सुरवात केली,की मला वाटलं भाऊसाहेब आपल्या कॉलेज मधल्या जुन्या आठवणी न काढता काही तरी नवीन माहिती देतील.पण झालं उलटंच.
मी त्याना म्हणालो,
“भाऊसाहेब,आजकाल मुलांना नुसतं वर्गात शिकवत नाहीत.त्यांना जे वर्गात शिकवतात,त्याचं प्रॅक्टीकल दाखवण्यासाठी बाहेरपण घेऊन जातात. आणि अलीकडे सायन्स म्युझीयम,प्लॅनेटेरीयम,मुलभूत संशोधन करणार्‍या संस्था अशा ठिकाणी नेऊनत्याना माहिती देतात.त्यामुळे विज्ञानाचा प्रसार परिणामकारक होतो.तुम्हाला नाही का वाटत?”
मी एव्हडं बोलायचीच फुरसत,प्रो.देसायानी आपल्या लहानपणातल्या शाळेपासून सुरवात करून मला एक माहिती-वजा सुंदर लेक्चरच दिलं.

मला म्हणाले,
“मी अकरा वर्षाचा असेन,आमच्या शाळेतून एका विज्ञानशास्त्र म्युझियमला आमची ट्रिप जायची होती.ती होऊन गेल्यावर माझ्या मनात आलेल्या एका आशंकेने मी सद्नदीत झालो.असं कधी मला झालं नव्हतं.एकप्रकारचा पोटात गोळा आल्यासारखं झालं.
मला माहित झालं की आपली पृथ्वी हा एक खडकाळ ग्रह असून एका तार्‍याभोवती प्रदक्षिणा करतो आणि हा तारा इतर कोट्यानी तार्‍यांपैकी एक असून ते सर्व एका आकाशगंगेत आहेत आणि अशा कोट्यानी अब्जानी आकाशगंगा ह्या ब्रम्हांडात आहेत. ह्या विज्ञानशास्त्राकडे पाहून मला अगदीच खूजं वाटायला लागलं.

त्यानंतर अनेक वर्षानी विज्ञानशास्त्रा बद्दलचा आणि त्याचा समाजात आणि जगात असलेल्या भुमिकेच्या प्रभावाचा माझा दृष्टीकोन फारच बदलला.
अनेक दशकाचा माझा विज्ञान शास्त्राचा अनुभव मला आता पटवून देतो की हा प्रकार गौरव करण्या लायकीचा आहे.आपण ह्या ब्रम्हांडाच्या एका कोपर्‍यातून कल्पकता वापरून आणि दृढनिश्चय ठेवून अंतरिक्षाच्या बाह्य आणि आंतर क्षेत्राला स्पर्श करण्याच्या प्रयत्नात आहो.
आपण पदार्थविज्ञानाचे मुलभूत नियम शोधले.ज्या नियमामुळे तारे कसे चमकतात,प्रकाशाचा प्रवास कसा होतो,वेळेची समाप्ती कशी होते,अंतरिक्ष कसं विस्तारत आहे,ब्रम्हांडाची सुरवात होण्य़ापूर्वीचा किंचीत क्षण कसा होता ह्या सर्व गोष्टीत डोकावून पहाण्याचे नियम शोधले.
ह्यातली कुठलीही उपलब्धता आपण “आहोत ते का आहोत”? किंवा जीवनाचा मतितार्थ काय आहे? ह्याचं उत्तर देऊ शकली नाही. विज्ञानशास्त्र पण ह्या प्रश्नाचं आकलन करू शकणार नाही.परंतु जसं आपल्याला एखाद्दा खेळाचा जास्तीत जास्त अनुभव, त्याचे नियम काय आहेत हे कळल्यावर येतो त्याच प्रमाणे ब्रम्हांडाचे नियम,पदार्थ विज्ञानाचे नियम खोलवर कळू लागतील तसं तसं आपल्या जीवनाच्या अस्तित्वाविषयी आपण प्रशंसा करायला सुरवात करणार.

मला त्याचा पडताळा होतो जेव्हा मी माझ्या विद्दार्थ्यांच्या डोळ्यातली चमक पहातो.मी त्याना ब्लॅकहोल काय आहे बिग-बॅन्ग थेअरी काय आहे हे सांगितल्यावर मी त्यांच्या डोळयातली चमक पहातो. विज्ञानशास्त्रामुळे आपल्याला क्ळतं की ही काहीतरी प्रचंड विश्वव्यापी गोष्ट आहे की ती आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवते. म्हणून माझे विद्दार्थी मला भेटल्यावर ते त्यांचं गणीत आणि शास्त्र केवळ नीरस काम म्हणून पहातात त्यावेळी हे त्यांच पहाणं विपत्तिजनक वाटतं.त्यानी तसं करायला नको हे मला पटतं,पण जेव्हा विज्ञान म्हणजे काही वास्तविकतेचे मासले असून त्याचं पाठांतर करण्याची जरूरी नाही,आणि गणीतशास्त्र म्हणजे एक अमूर्त आकडेमोड असून त्यातली शक्ति ब्रम्हांडातलं रहस्य उकलू शकते हे न दाखवता शिकवल्यास ते कंटाळवाणं होईल आणि मुद्देसूत होणार नाही.

त्याहिपेक्षा जेव्हा माझा त्या विद्दार्थ्यांशी संपर्क येऊन कळतं की त्याना असं सांगितलं जातं की गणीत आणि शास्त्र समजण्याची त्याना क्षमताच नाही, असलं काहीतरी ऐकून खूप त्रास होतो.
मला वाटतं की शास्त्रातला आनंदीत करण्याचा भाग विद्दार्थ्याना समजावून सांगणं हे आपण त्यांच देणं लागतो.
मला वाटतं,मनातल्या भ्रमापासून ते मनात आकलन होईपर्यंतची ही प्रक्रिया अमुल्य असते,किंबहूना भावनाप्रधान अनुभव हा आत्मविश्वासाचा मुलभूत पाया असावा.
मला वाटतं विज्ञानाच्या वास्तविकतेचं मुल्यांकन जरी विवेकपूर्ण असलं,आणि त्याकडे काहींची व्यक्तिगत उदासीनता असली तरी विज्ञानशास्त्र धार्मिक आणि राजनैतीक विभाजनाला पूढे नेतं आणि त्यामुळे आपल्याला प्रतिरोधात जखडून ठेवतं.
मला वाटतं,अद्भुत रहस्याचा उलगडा आत्म्याला उभारा देतो जसं एखादं संगीत मन उल्हसित करतं.
मला वाटतं, विस्मयकारिक विज्ञाना बद्दलच्या कल्पना नुसतं मनालाच नाही तर आत्म्याला पण विकसित करतं.”

प्रों.देसायाना नुसती ट्रिगर पुरी असते.एका नावाजलेल्या कॉलेजात फिजीक्स डिपार्टमेंटचे इनचार्ज राहून इतकी वर्ष ज्ञानोपासना केली ती अशी उफाळून येते.माझाही वेळ मजेत गेला.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, October 4, 2008

एकाकी जीवनाला चैतन्याचा बहर येई

रे अनोळख्या! कोण तू असशी
पाहिले मी तुला ज्या दिवशी
हे जग सारे माझ्या नयनी
घेतले मी तसेच सामाऊनी

झालास तू गीतात माझ्या
सामील जणू ताल जसा
येऊनी तू जीवनात माझ्या
होशील फुलांचा जणू गंध तसा

स्वप्नाचा रंग दिसे माझ्या नजरेला
जणू चित्तातली धडधड लागली उतरणीला
प्रत्येक श्वासातून सूर येई बांसूरीला
वाटे शतवर्षानी प्रकाश मिळे ज्योतीला

अंधेर्‍या रात्री कुजबुज चमकत जाई
रात्र आल्यावरी मोगरा फुलून येई
तुला भेटूनी प्रीतिला मोहर येई
एकाकी जीवनाला चैतन्याचा बहर येई



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, October 2, 2008

“जीवन असं जगावं की नंतर पश्चाताप होऊ नये.”

असाच मी एकदा सूट्टी घेऊन गोव्याला गेलो होतो.गोव्याच्या समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक छोटी छोटी घरं आहेत.एक घर भाड्याने घेऊन मी थोडे दिवस राहत होतो.आमच्या बाजूच्या घरात एक जोडपं असंच काही दिवस मजेत घालवण्यासाठी येऊन राहिलं होतं.सुरवातीला आम्ही सकाळीच ऊठून समुद्र किना‌र्‍यावर फिरायला म्हणून जात होतो.सकाळीच कोळ्यांच्या मासे जाळ्यात पकडून टोपल्या भरभरून आणणार्‍या मोठ्या होड्या किनार्‍यावर आल्यावर कुतुहल म्हणून निरनीराळ्या प्रकारचे मासे निवडून आणलेल्या टोपल्यामधून आम्हाला हवे ते मासे त्यांच्याकडून विकत घेऊन दुपारच्या जेवणाला त्याचा उपयोग करायचो.ताज्या मास्यांची चव निराळीच असते.त्यामुळे रोज मासे खायची चटकच लागली होती.

आमचे शेजारी सुद्धा हळू हळू आमच्याच बरोबर सकाळीच ऊठून आम्हाला त्यांची कंपनी द्दायला लागले.त्यानाही मासे खाण्यात दिलचस्पी होती. त्यामुळे त्यांची आमची चांगलीच गट्टी जमली होती.हे आमचं शेजारचं जोडपं आमच्या नंतर आणखी काही दिवस गोव्याला राहाणार होतं.
अधिक चौकशी केल्यावर कळलं की त्यांच्या पत्नीला गोवं खूपच आवडायला लागल्याने त्यानी त्यांचा मुक्काम आणखी वाढवला होता. ते जवळपास आमच्या बरोबरच जायला निघणार होते.पण आता त्यानी विचार बदलला होता.बोलता बोलता कळलं की त्यांच्या बायकोला सर्विकल कॅनसरचा आजार झाला असून तिचा तो टर्मिनल आजार होता.हे ऐकून मला खूपच वाईट वाटलं.

गोवा सोडून परत निघण्यापूर्वी एकदा असेच आम्ही संध्याकाळी किनार्‍यावर त्यांच्या बरोबर फिरायला गेलो होतो.पौर्णिमेचा तो दिवस होता.समुद्राच्या फेसाळ लाटावर चंद्राचा प्रकाश पडून त्या जास्तच फेसाळलेल्या दिसत होत्या.थंड वारा पण आल्हादायक वातावरणात भर घालत होता.चालून चालून थोडे पाय दमले म्हणून जवळच वाळूत बसून गप्पा मारत होतो.
बोलता बोलता त्यांची पत्नी म्हणाली,
“माझ्या लहानपणी मला आठवतं माझी आई बरेच वेळा म्हणायची,
“जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये.
सदा सर्वदा प्रत्येकजण मरत असतो आणि जगत असतो.तुमचा काय अनुभव आहे ह्याचं यतार्थ चित्र तुम्ही तुमच्या मनात तयार केलं पाहिजे.तुमच्या बुद्धिमतेपूर्वक तुम्ही निवड केली पाहिजे.”
ती तशीच जगली.ती एका प्रसिद्ध मुलींच्या शाळेची प्रिन्सीपॉल होती.खेळाच्या दुनियेत तिनं नांव कमावलेलं होतं.आणि तिन सुदृढ मुलीना जन्म देऊन माझ्या वडीलाना संसारात मदत करून एका खेड्यात निवृतीच्या दिवसात लागणारं छोटसं घर बांधण्यात मदत करूं शकली.तिला हवं ते ती निमूटपणे करून आणि वयाच्या पंचायशी वर्षावर शांतिने निर्वतली.

पश्चाताप न होता आयुष्य़ जगणं हा मला तिच्याकडून मिळालेला धडा होता.मी माझ्या शिक्षणासाठी पैनपै जमवून शिकले आणि देशात जमेल तिथे प्रवास केला.चांगलं कार्य समजून समाजात जमेल तेव्हडी सेवा केली.पंचवीस वर्षाच्या माझ्या करियर मधे मी बर्‍याच मुलीना शिकवलं.
मी आणि माझ्या पतिने तिन मुलांच व्यवस्थित संगोपन केलं.आणि पाच नातवंडाच्या सहवासात आनंदाने जीवन कंठित आहो.
मी मला नशिबवान समजते की माझ्या पतिने मला माझ्या मर्जीचं जीवन जगायला संपूर्ण मूभा दिली.
मला आणखी शिक्षण मिळावं म्हणून त्याने घर संभाळून मदतीसाठी खूप धडपड केली.

अलीकडे एकाएकी माझ्या पोटात वेदाना येऊन खूप दूखू लागलं.आणि त्याचं निदान काढलं गेलं की मला सर्विकल कॅन्सर झाला आहे.त्याच्यावर उपाय म्हणून औषध उपचार केले गेले. मला डॉक्टर म्हणाले की मी जेमतेम एक वर्ष काढीन.पण मी माझं तत्वज्ञान सोडायला तयार नव्हते. मला जरा बरं वाटलं की मी माझ्या अनुभवाचं गाठोडं माझ्या पाठीवर मारते.मी मीत्रमैत्रिणीना भेटते,प्रवास करते,हंसत असते,चांगली पुस्तकं वाचते,नातवंडाबरोबर खेळते आणि जे माझ्यावर प्रेम करतात त्यांचा हृदयापासून सन्मान करते.

माझ्या जीवनावर माझा विश्वास आहे.कदाचीत एकवेळ अशी येईल-बहूदा डॉक्टरांच्या भाकिताच्या पलिकडे जाऊन-ज्यामुळे मला जगताना अत्यानंद व्ह्यायचा तो आनंद कमी होईल.त्यानंतर मात्र माझ्या आई सारखं मी करीन.माझ्या कुटूंबाबरोबरच्या माझ्या आठवणी मी ताज्या करीन.
आणि जो ऐकील त्याला मी सांगेन,
“जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये”

किनार्‍यावर एव्हाना खूप काळोख झाला होता.पण चंद्राच्या शितल चांदण्यात आणि त्या थंड वार्‍याच्या
वातावरणात त्यांच्या पत्नीची ही कथा ऐकून माझं मन खूपच उदास झालं .परंतु उद्दा सकाळीच मी गोवं सोडून परत जाणार असल्याने,त्यांची कंपनी पण सोडवत नव्हती.पण काय करणार कुठतरी थांबावं लागतच.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com