Sunday, December 14, 2008

जीवनगृहाची घडण.

“मला वाटतं,प्रेम,करुणा,आणि सत्य ही मनुष्यजातिची सामाहिक सम्पती असावी.जीवन हे आत्माच आहे आणि आत्म्याला कुठलीच सीमा माहित नसते.”

डॉ.संजय धारणकरची आणि माझी जूनीच ओळख आहे.कारगीलची लढाई सुरू झाल्यावर त्याने एका फार्मसीटीकल कंपनी मधली नोकरी सोडून सैन्यात भरती करून घेतली.देशप्रेमाच्या भावनेने भारावून जाऊन सैन्यात दाखल होऊन जखमी सैनिकांची सेवा करायची कल्पना त्याच्या मनात आली.जरूर वाटली तर युद्धाच्या जागी जाऊन जखमी रुग्णसैनिक ज्या छावणित उपचारासाठी आणतात त्याठिकाणी पण जाण्याची तयारी त्याने दाखवली होती.हे सर्व मला माहित होतं. पण युद्धावर तो जखमी झाला आणि त्यानंतर त्याला सैन्यातून सुट्टी मिळाली हे मला आत्ताच त्याच्या तोंडून कळलं.
संजयच्या स्वभावाचा कल पहिल्या पासून काही तरी धडाडी करून दाखवण्याकडे झूकत असायचा.आणि त्या दृष्टिने त्याने सैन्यात भरती करून घेतली ह्या बद्दल मला विषेश काही वाटलं नाही.पण युद्धावर जाऊन जीवावर बेतण्या इतक्या परिस्थितीत तो सापडला त्यानंतर त्याचा स्वभाव फारच बदलून गेला असं वाटतं. ह्या खेपेला मला भेटल्यावर जे काही तो बोलू लागला त्यावरून मला असं वाटलं की माणसाचा स्वभाव परिस्थिती प्रमाणे बदलू शकतो.पूर्वीचा संजय धारणकर आता राहिला नव्हता.आध्यात्मिक विचार धारणा माणसाला मरणाच्या दाढेतून वाचल्यानंतर जास्त प्रकर्षाने जाणवते.
“संजय तुझ्यात इतका बदल कशामुळे झाला?”
ह्या माझ्या साध्या प्रश्नाला त्याने जे सांगितलं ते ऐकण्यासारखं आहे.
मला तो म्हणाला,
“कारगीलच्या लढाईत मला शत्रूकडून सुटलेली एक सुसाट गोळी लागली.त्यामुळे मी आपत्तीत सापडलो होतो.मी लष्कराच्या मेडिकल युनिटमधे डॉक्टर म्हणून होतो. त्या घटने नंतर स्वास्थ्यलाभ व्हायला मला बरच कठीण झालं होतं. त्यानंतर माझ्या युवावस्थेची लवचिकता आणि फॉर्मच गेला.माझ्या जीवनात येणार्‍या पुढच्या मार्गात आत्मसन्मानाच्या,कटुतेच्या आणि आत्मदयेच्या अडचणी आल्या.
पहिली अनुभूती आली ती एकलेपणाची.त्यानंतर जास्त जाणीव झाली ती लोक मलाच मदत करण्याच्या प्रयत्नात आहेत त्याची.आणि सरतेशेवटी मला जाणीव झाली ती मुलतः मी मलाच सावरण्याची.आणि जरी ती मला माझ्याच प्रयत्नातून सफल करायची होती तरी मला मी कधीच एकटा न राहता माझी उपलब्धी हा इतरांचा ही हिस्सा व्हावा असं वाटायचं. त्यामुळे माझी पुनःप्रतिष्ठा व्हायला मदत झाली.आणि नंतरची माझी मोठी समस्या म्हणजे इतर काय बोलतात आणि करतात याचा नीट अर्थ लावणं.कारण इतरात सामावून घेतल्याशिवाय माझी प्रगती होणं शक्य नव्हतं.
माझ्या तरूण वयात मला शिल्पकार व्हायचं होतं.काही तरी घडवणं माझ्या हातून झालं पाहिजे असं मला त्यावेळी वाटायचं.पण मी माझी ही इच्छा निराळ्या तर्‍हेने उपलब्ध केली. माझ्या एक ध्यानात होतं की घर बनवायचं झालं तर मचाणाशिवाय ते बनू शकत नाही.हे माझं मचाण मी ठरवलं. मी डॉक्टर असल्याने इतरांची सेवा करण्याची माझी जबाबदारी हेच माझं मचाण असं मी ठरवलं .कदाचीत माझा अनुभव कुणाच्या संकटकाळी उपयोगात यावा.
त्या बंदूकीच्या गोळीने माझ्या जीवनात स्थित्यंतर आलं.मी मनाने पोक्त झालो.माझ्या तारुण्यातल्या चंचल स्वभावाला थोडं संतुलन आलं.नाहीतर ही स्वभावातली चंचलता, एकाग्रता आणि उपलब्धता मिळवायला बाधा आणू शकली असती.
आता डॉक्टर म्हणून रुग्णाना पुनःप्रस्थापीत करताना जीवन सदा प्रफुल्लीत राहतं.एका अर्थी मला जी पीडा झाली ते चांगलंच झालं.मी इतरांची सेवा करू शकलो.
माझी झालेली ती जखम आणि त्यापासून होणार्‍या वेदना ह्यामुळे काहीतरी करण्याची धमक माझ्यात आल्याने मी कटुतेला तिलांजली दिली.आणि माझ्या मनात असलेल्या बदला घेण्याच्या विचाराचे हनन केले. ज्याने माझ्यावर गोळी झाडली होती त्या शत्रूपक्षाच्या सैनिकाला जखमी करून ताब्यात घेतलं होतं.तेव्हा मला माहित होतं की ज्याला त्याच्या विद्वेषा बद्दल काहीच वाटत नसलं तरी त्याच्याशी मला बोलता येईल.आणि त्यामुळे मला माझ्या अस्तित्वात मान खाली घालून राहण्यापेक्षा गौरवाने राहता येईल. मला वाटतं ह्याचं कारण मला असलेली कर्तव्याची समझ.अनुभवाने मला दाखवून दिलं होतं की तो माझ्यातला बदल माझ्या चांगल्यासाठीच असावा.

मला वाटतं,मनूष्य आपल्या जीवनात आनंद आणि खेद असतानाही आशा आणि उमेद बाळगून वाढत असतो,आणि तुलनेने दोन्ही गोष्टीची प्रशंसा करतो.
मला वाटतं,प्रेम,करुणा,आणि सत्य ही मनुष्यजातिची सामाहिक सम्पती असावी. जीवन हे आत्मा आहे आणि आत्म्याला कुठलीच सीमा माहित नसते,जेवढी निसर्गाला माहित असावी,की ज्या निसर्गामुळे सुदैवाने आपणच तिची अंतिम प्रतिकृती आहो.मी मानतो की जीवन कसं घडवावं ह्याची आपल्याला जी माहिती मिळाली असते त्याहीपेक्षा जीवनातला अनुभवच हा जीवनाच्या घडणीचा मुख्य पाया आहे.
मौखिक शब्दातून मला अर्थ जाणवतो,कारण तो माझ्या अनुभवाशी अनुरूप असतो आणि मी सत्याकडे जसा पहातो तसा त्याचा निर्देश असतो. एकमेकाशी संपर्क असण्यात माझा विश्वास आहे.तरीपण संकल्पनेतून येणार्‍या बाधा स्विकार करायला माझ्या मनावर दबाव येतो.आणि ह्यातच जीवनातला संघर्ष आणि करुणेचं अस्तित्व असतं.
माझी कमतरता हीच माझ्या जीवनातल्या दर्जाचा मापदंड आहे.तरीपण मी मला नरमाईने नियंत्रीत ठेवतो.कारण कुणालाही त्याला आलेली महत्ता ही परिपक्वता आल्याने येत नाही तर त्याच्या जीवनाचा विकास कसा होतो त्यावरून येते असं मला वाटतं.”
हे सर्व डॉ.संजयचं तत्व ज्ञान ऐकून मी मनात निश्चीत ठरवलं की खरंच, जीवन कळण्यासाठी खडतर प्रसंग येऊन जावा लागतो.
उगिचच कवी बा.भ. बोरकरानी म्हटलंय,
“जीवन यांना कळले हो!
मीपण ह्यांचे सरले हो!”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, December 12, 2008

रामदुलारीला राग का आला?

रामदुलारीची आणि माझ्या धाकट्या भावाची ओळख योगायोगानेच झाली.माझ्या भावानेच मला ही गोष्ट सांगितली.
त्याचं असं झालं,एकदा माझा भाऊ वरसोवा-फौन्टन बसमधे चढायला धाकेकॉलनी बस स्टॉपवर उभा होता.त्याच्या बरोबर दोन चार लोक त्या बसमधे चढले.मागच्या सीटवर जागा भरपूर होती.म्हणून हा ही मागच्या सीटवर बसला.त्याच्या शेजारी एक माणूस बसला होता,तो सारखा चुळबूळ करीत होता.का कुणास ठाऊक त्याला शेजारच्या माणसाचं अंग त्याच्या अंगाला जरा लागलं की तो थोडा अपसेट झाल्या सारखा होऊन आपलं बसणं नीट करायला पाहायचा.
भाऊ पुढे म्हणाला,
“बसमधे बरीच गर्दी होत राहिली.कंडक्टर जरा वयाने मोठाच असावा.कारण त्याची तिकीटं देण्याची रफ्तार जरा मंदच होती. जवळ जवळ अंधेरी स्टेशन जवळचा स्टॉप येई पर्यंत तो तिकीट विचारायला मागे आलाच नाही.”
माझ्या भावाला सांताक्रुझला आशा पारेख हॉस्पिटलच्या बस स्टॉपवर उतरून काही कामाला जायचं होतं.माझा भाऊ मानसशास्त्राचा कंसल्टंट आहे. आणि बरेच वेळा तो मराठामंदीरमधे लेक्चर्स द्दायला जातो.

”कंडक्टर घाई घाईत पार्लं सोडल्यावर तिकीट विचारायला मागच्या सीट जवळ आला.मी हात पुढे करून एकदाचं तिकीट काढून घेतलं.हा शेजारी चुळबूळ करणारा माणूस इकडे तिकडे बाहेर बघण्यात दंग झाला होता.वयाने तसा पंचवीस तीशीतला दिसला.बाकी सर्वानी तिकटं काढून झाल्यावर कंडक्टरने नेहमीच्या संवयीत त्याला विचारलं,
“तुमको किधर जाना है रे?जलदी बोलो.”
त्याला जो राग आला तो त्याला सहन झाला नाही.तो उठून कंडक्टरच्या अंगावर धाऊन गेला. आणि संतापून कंडक्टरला म्हणाला,
“क्या तमीझ है क्या? आपको किधर जाना है ऐसा पुछना चाहिये.”
पुढे माझा भाऊ सांगायला लागला,
“एकतर बस मधे गर्दी तोबा होती.आणि तशात मे महिन्याची गरमी.त्या जाड कपड्यात घामाघुम होऊन कंडक्टर वैतागलेला होता आणि हा हिंदी कसं बोलायचं तो शिकवतो हे पाहून संतापलेल्या कंडक्टरने जोरात घंटी मारून बस मधेच थांबवली आणि त्या माणसाला सरळ खाली उतरायला सांगितलं. तोपर्यंत मला हवा तोच बसस्टॉप आला होता.त्या माणसाबरोबर मी ही असे आम्ही दोघे बसमधून उतरलो.मी त्याच्याशी हंसलो आणि तो काहीसं बोलायला जवळ आला पाहून मी त्याला जवळच्या रामभरोसे हॉटेलमधे चहा घेऊं या म्हणून सुचवलं. आम्ही दोघानी चहाच्या कपावर बसमधे झालेल्या घटनेचा थोडा उहापोह केला.त्यावरून मला कळलं ह्या माणसाचं नाव रामदुलारी असून, हा जॉब शोधण्यासाठी एक दोन दिवसापूर्वी मुंबईत आला आहे.ह्याने वारणासीच्या कॉलेज मधून हिंदीत एम.ए केलंय.त्याला त्या कंडक्टरने “एकेरीत” संबोधलेलं आवडलं नाही.मुंबईच्या रीती-रिवाजाला आणि कलोक्युअल भाषेला तो अपरिचीत होता. म्हणून त्याने रागाने त्या कंडक्टरशी असा बनाव केला.मी त्याची समजूत घातली.आम्ही एकमेकाचे पत्ते दिले-घेतले आणि परत भेटू असं म्हणून आपआपल्या मार्गावर गेलो.

बर्‍याच दिवसानी मी एकदा जुहु चौपाटीवर संध्याकाळचा फिरायला गेलो होतो.मला सूर्यास्त बघायला खूप आवडतं.अचानक ह्या रामदुलारीला समोरून येताना पाहिलं.त्यानेच मला पहिलं ओळखलं.थोडे चाललो.आणि मग गप्पा मारण्यासाठी,वाळूवर सुक्या जागेवर बसलो.आता त्याला कुठेतरी जॉब मिळाला होता.आणि तो खूष होता.
रामदुलारी मला म्हणाला,
“आता मी त्यावेळसारखा कुणाशीही बोलीचालीवर रागवत नाही.मला बरेचसे इकडचे रीती-रिवाज समजले आहेत.”
त्याने रागावण्याच्या विषयाला हात घातला आणि माझ्याही मानसशास्त्राच्या अभ्यासाचा जरा मला पुळका येऊन मनात आलं ह्याला काही तरी राग,क्रोधावर थोडं लेक्चर द्दावं.नाहीतरी सूर्यास्ताला थोडा वेळ होता.
मी त्याला म्हणालो,
“हे बघ रामदुलारी,क्रोध जीवनवृतीचा विनाश करतं.क्रोध नातीसंबंध तोडतो.तुला वाटेल की क्रोध केल्याने मनावरचा ताण कमी होतो किंवा तू किती भावूक आहेस हे दाखवतं असं.पण राग केल्याने सर्वदा तुझा फायदा होण्याऐवजी तू नुकसानीतच येतोस. तुझे सहकारी, तुझे जवळचे प्रियजन,आणि मुलं तुझ्या क्रोधापूढे काहीवेळ नतमस्तक होतील पण काही काळ गेल्यावर तुला हवं ते करणार नाहीत.आणि हे अगदी नैसर्गिक आहे की जर कोण कुणाला रागाने भयभयीत करीत असेल तर ते विफल करायला दुसरा मागे पूढे पहाणार नाही.
क्रोधी व्यक्ति आपलाच विनाश करून घेते.रागामुळे संघर्ष किंवा सुटका करून घेण्याची मानसिकतेची प्रतिक्रिया तयार होते.त्यामुळे शरिरावर परिणाम होतो. तू जर रागवायचं सोडून दिलस तर आयुष्यात तुझी प्रभावशाली सुधारणा होईल.
मी पण एकेकाळी रागिष्ट होतो.मी सांगतो त्या ह्या गोष्टीचा मला आणि माझ्या सारख्या इतर रागीष्टाना उपयोग झाला.
मनापासून कबूल करा की रागीष्ट असल्याने फायद्या पेक्षा तोटेच जास्त आहेत.
बर्फा सारखं थंड रहा.राग हा जर का पर्याय ठरवलात तर तुम्ही तुम्हाला बरेच वेळा रागवण्याच्या मनस्थितीत ठेवाल.आणि हा बहूदा बरेच वेळा तुमचा भ्रम ठरेल.
राग काबूत ठेवायला सुरवातीला जरा कठीण जाईल,पण हळू हळू सुधारणा होईल.मी जवळ जवळ रोजच रागीष्ट राहत असे. नंतर एखाद्दा महिन्याला राग येत असे.नंतर कदाचीत वर्षातून एकदोनदा अंगावर येऊन ओरडण्याचा प्रसंग आला असेल.
डोक्यात रागाची तीडीक येईपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करीत राहिलात तर कदाचीत नंतर स्वतःला थांबवू शकणार नाही. त्यामुळे राग येण्याची थोडीशी सुद्धा जाणीव होण्यापूर्वी सतर्क राहिलं पाहिजे,जरी चेहर्‍यावर रागाच्या लालीची छटा आली तरी किंवा शरिरात बेचैनी येण्यापूर्वीही, किंवा कसही.प्रत्येक वेळी राग येण्याची थोडीजरी भावना झाली तर एक दीर्घ उसासा घ्यावा. स्वतःलाच विचारावं राग करण्याची आवश्यक्यता आहे का?
कुणालाही रागीष्ट व्यक्ती आवडत नाही.असे लोक सरफीरे,किंवा भांडखोर म्हणून ओळखले जातात. कायमचे रागिष्ट असतात अशा व्यक्ति विषयी तुम्हाला काय वाटत असेल.?तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहिलेलं आवडेल काय?असाही आपल्या मनाकडे प्रश्न करावा.
क्षणभर सुद्धा तुमच्या मनात आणू नका की तुमची मनोभावना प्रदर्शीत करण्यासाठी तुम्हाला क्रोध दाखवायची जरूरी आहे.सर्वात सफलता असलेले आणि प्रभावोत्पादक लोक क्वचितच क्रोधी असतात.
मोठ्या हुद्दावरचे लोक,सि.ई.ओ,सिनीयर कंसल्टंट,असलेले लोक चर्चा करीत असताना, त्यातले बरेचसे शांत आणि ध्यान केंद्रित करणारे असतात.
ध्यान केंद्रित करणं नक्कीच होय! - क्रोधी होणं नक्कीच नाय!
लोकांकडून आपण आपल्याला जास्तीत जास्त स्विकारलं जावं असं वागावं.कोणही मुद्दाम म्हणून फाल्तूपणा करीत नाही किंवा उदासिनता दाखवीत नाही.बरेचजण त्यांना जमेल तितकं चांगलं करण्याच्या प्रयत्नात असतात.तुझ्या माझ्यात आहे तशी त्यांच्यातही उणीव असू शकते.तेव्हा “काय हा फाल्तू माणूस आहे” असं म्हणण्या ऐवजी ” तो पण माणूस आहे “असं म्हणावं.
समजा एखादी आपल्याकडून चूक झाली तर स्वतःवर राग काढण्यापेक्षा ती चूक स्विकारावी किंवा सुधारण्याचा प्रयत्न करावा. कारण राग करून आपल्याला कसलीच मदत होत नाही.
काही गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर आहेत ह्याचा स्विकार करावा.”हे काही बरोबर नाही” असं म्हणण्या ऐवजी “असं होऊ शकतं” असं म्हणावं.
क्रोध करण्या ऐवजी कृतज्ञता असावी.नक्कीच तुझा बॉस उदासीन असेल,नक्कीच तुझा जॉब,तुझी पत्नी,तुझी मुलं आणखी चांगली होऊ शकतील.पण “ग्लास अर्ध भरलंय” अशी वृत्ती ठेवल्याने निश्चीतच आपण आपल्याला दुःखी करून घेतो.
एखादी समस्या निर्माण झाली तर त्यावर शोक करीत बसू नये.सुधारायचा प्रयत्न व्हावा.एक लहान पाऊल टाकलं तरी मदत होऊ शकते.
मनातला क्रोध काढून टाकल्याने तू नक्कीच सुखी आणि यशस्वी होशिल.माझ्यावर विश्वास ठेव.

हे माझं सगळं लेक्चर ऐकून घेत रामदुलारी शांत बसला होता.
“खरंच,तुमची ओळख झाल्याने मला काही तरी तुमच्याकडून शिकायला मिळालं”
असं मनापासून बोलून गेला.
सूर्यास्त होऊन काळोख बराच झाला होता.आम्ही जायला निघालो.”
हे माझ्या भावाचं सर्व भाषण ऐकून मी त्याला म्हणालो,
“एका होऊं घातलेल्या सर्फर्‍याला तू माणसात आणलंस.हे एक चांगलं पुण्यकर्म केलंस.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, December 10, 2008

जुलूम कुणाचा मानवाचा का जीवनाचा

जीवनी नसे जेव्हा लवलेश प्रीतिचा
जुलूम कुणाचा मानवाचा का जीवनाचा

अपराध्या मिळते शासन,असे ठाऊक सर्वां
कुणी अपराधी का व्हावा नसे कुणा पर्वा
जीवनी नसे जेव्हा लवलेश माणूसकीचा
जुलूम कुणाचा मानवाचा का जीवनाचा

लागती अनेक दुषणे परि प्राप्त असे जगणे
निंदेचे अन बदनामीचे वीष पिण्या लागणे
जीवनी नसे जेव्हा लवलेश करूणेचा
जुलूम कुणाचा मानवाचा का जीवनाचा

बोलत राहिला तो अपुल्या जीवनासाठी
शब्द एकच ऐका म्हणे तो त्याच्यासाठी
जीवनी नसे जेव्हा लवलेश सहानुभूतीचा
जुलूम कुणाचा मानवाचा का जीवनाचा



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, December 8, 2008

दीर्घ आयुष्याची गुरूकील्ली.

“समूहात गाणं म्हणजेच तल्लीन होऊन गाणं.समूहात गाताना इतर वाद्दांची जरूरी भासत नाही.तसंच सर्वांमधे विलीन होऊन गाईल्याने स्वतःला समूहात विलीन झाल्यासारखं वाटतं.”
मी मधे खानोलीला जत्रा पहायला गेलो होतो.जत्रेला खूपच मजा आली.त्यानंतर मी एक आठवडा खानोलीत मुक्काम केला होता.विषेश करून मला खानोलीची समुद्रचौपाटी खूपच आवडते.आणि जास्तकरून घाटीच्या माथ्यावरून फेसाळलेला तो समुद्र पाहून मन प्रसन्न होतं.आठ दिवसाच्या मुक्कामात मी रोज घाटीवर चढून जात असे.रोज कोण ना कोण तरी गावातले प्रतिष्टीत बरोबर फिरायला यायचे किंवा वाटेत भेटायचे.असेच एकदा मला प्रमोद खानोलकर आणि त्यांचे स्नेही विजय खानोलकर भेटले.घाटी चढून जाताना आमच्या गप्पा व्हायच्या.ह्या दोघानी गावात एक भजन मंडळ स्थापलं होतं.आणि त्या भजन मंडळाची आणि संगीताची ते मला माहिती देत होते.
प्रमोद खानोलकर मला म्हणाले,

“आमच्या गावात भजन मंडळ आहे.गावातल्या जस्तीत जास्त लोकांना ह्यात सामील करून घेण्याच्या उद्देशाने मी आणि माझा हा मित्र कार्याला लागलो.त्यासाठी गाण्याचा अनुभव असण्याची जरूरी नाही हे आम्ही अगोदरच सांगितलं.आमच्या भजन मंडळातले काही लोक तर कधीच पूर्वी गाईले नव्हते.आता आमच्या ह्या मंडळात जवळ जवळ पंधरा वीस लोक सामील झाले.

मला वाटतं,गाण्याचे खूप फायदे आहेत.दीर्घ आयुष्य लाभण्याची ती एक गुरूकील्ली आहे,शरिराला सौष्ठव येतं,स्वभाव संतुलीत राहतो,नवीन मित्र मिळतात,बुद्धिला चालना मिळते,हजरजबाबी व्हायला होतं.कुठेतरी वाचनात आलं की संगीताने,आणि नृत्याने
जीवन आनंदी आणि निरोगी राहतं.
खरं तर,त्यात शारिरीक फायदे पण खूप आहेत.मुळात गाताना फुफ्फुसाचा एव्हडा वापर होतो की दिवसाभर्‍यात तेव्हडा वापर होणार नाही.उच्चस्वरात गाईल्याने गांभिर्यता कमी वाटून,संतुष्ट व्हायला होतं.समुहात गाईल्याने समुहाबद्दल जागरूकता येते.तल्लीन व्हायला होतं.मीपण कमी होऊन आम्हीपण येतं.समानुभूति येते नैतिकता वाढते.
रोज संध्याकाळी आमचा कार्यक्रम असा असतो.भरपूर पाण्याचे तांबे आणून ठेवतो, काही अल्पाहार असतो,भजनाची काही पुस्तकं असतात, काटेकोरपणे वेळेची आठवण ठेवतो आणि सुरवातीला थोडा जोश आणतो.
गाण्याची निवडही काटेकोर असते.शब्दसंपन्न असलेली,स्वर संपन्न असलेली,तालमेल असलेली,गाण्यात प्रकटन असलेली गाणी निवडतो.
आणि ज्यावेळी लोक तालमेल ठेवून लांब सूरात गातात तेव्हाच खरी मजा येते. उच्चसूरात गाणं हेच काही सर्व नसतं. त्याला आणखी दोन पेहलू आहेत.पहिला ताल.सर्वानी मिळून ताल धरला की रोमांचकता येते आणि गाण्याची गति जेव्हा वाढते तेव्हा ते जास्त प्रभावशाली वाटतं.पण दुसरी गोष्ट जपावी लागते ती गाण्यातला भाव.गाण्यातला ताल आणि स्वर यांची सुसंगती सांभाळताना गाण्यातला भाव प्रभावी असावा लागतो.एकाच सूरात गाणं म्हटलं जात असताना आणि वेगवेगळी लय सांभाळताना जर सगळं जुळून आलं तर ब्रम्हानंदच होईल.

अशा तर्‍हेची समुहातली गाणी जर का शाळेत गाईली गेली तर मला वाटतं, लहान मुलांच चारित्र विकसीत करता येईल,आणि त्याही पेक्षा त्यांच्याकडून सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. आम्ही त्या दृष्टीने आमच्या गावातल्या शाळेत हा प्रयोग करून पहाणार आहो.”
हे सगळं ऐकून मला गावात कसे लोक आपला वेळ घालवतात आणि भजनासाठी भजन नसून त्याचा सामाजीक दृष्टीने कसा विचार करतात हे खानोलकरांकडून ऐकून बरं वाटलं.मी त्याना म्हणालो,
“तुमचा संगीता बद्दलचा अभ्यास खूपच खोलवर आहे.मला तुमच्याकडून बरचसं शिकायला मिळालं.तुमच्या नवीन नवीन प्रयोगाला माझ्या शुभेच्छा”



श्रीकृषण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, December 6, 2008

दोन अनोळख्या मधला एक दूवा

“ती मुलगी,दहाऐक वर्षाची असेल संकोचशील झालेली ती माझ्या जवळ येऊन मला एक मासिक वाचायला देऊन गेली.मी तिच्याकडून ते मासिक घेतलं.तिच्या त्या अबोल वागण्यातून जे बोल माझ्या कानी आले ते जणू म्हणाले ” वेळ जात नसेल तर वाचा” आणि माझ्या तोंडूनपण जो अबोल शब्द निघाला तो पण “धन्यवाद” असाच होता.”

माझ्या एका मित्राने मला सांगितलेली ही एक गोष्ट.
हा माझा मित्र संजय एका सुश्रुषागृहात रुग्णाची सेवा करण्याच्या कामगिरीवर होता.काही कुष्टरोग झालेले रुग्ण सुद्धा त्या सुश्रुषागृहातल्या एका विंगमधे इलाजासाठी आलेले होते.एका पंचविस- तिसच्या तरुणाला कुष्टरोगाची नुकतीच लागण झालेली होती.आणि त्यावर उपायासाठी तो बरेच दिवस इथे राहून आता बरा झाल्यामुळे घरी जायला त्याला परवानगी दिली होती.
त्याच्या घरी त्याचे म्हातारे आईवडिल होते.लग्न झाल्यावर काही दिवसानी ह्या रोगाची त्याला लागण झाली होती.हे लक्षात आल्यावर त्याच्या पत्नीने त्याच्याशी काडीमोड घेतलेला होता.नशिबाने मुलं वगैरे काही नव्हती.
ज्या बसस्टॉपवरून घरी जायला निघाला होता,त्याच बसस्टॉपवर ही मुलगी आणि तिची आई बससाठी उभी होती.हे त्याने पाहिलेलं होतं.त्याच्या डाव्या हाताची सारी बोटं घळून पडल्याने तो हात मुंडा दिसत होता.तेव्हडंच एक वैगुण्य त्याच्या हाताकडे बघितल्यावर दिसलं जात होतं.बस आल्यावर सर्व मिळेल त्या सीटवर बसले.ह्याला पण खिडकी जवळ जागा मिळाली होती. बसमधल्या प्रवाशाकडे जाणून बुजून तो नजरा नजर करीत नव्हता.पण त्याच्या हाताकडे बघून कुणीही त्याच्या बाजूला बसत नव्हतं. त्यामुळे त्याच्या बाजूची सीट प्रवासात रिकामीच होती.त्यामुळे त्याला त्याचं वेगळेपण प्रकर्षाने जाणवत होतं.
नंतर तो रुग्ण संजयला म्हणाला,
“काही वेळा नंतर ती मुलगी,दहाऐक वर्षाची असेल संकोचशील झालेली ती माझ्या जवळ येऊन मला एक मासिक वाचायला देऊन गेली.मी तिच्याकडून ते मासिक घेतलं.तिच्या त्या अबोल वागण्यातून जे बोल माझ्या कानी आले ते जणू म्हणाले

” वेळ जात नसेल तर वाचा”

आणि माझ्या तोंडूनपण जो अबोल शब्द निघाला तो पण

”धन्यवाद”

असाच होता.ती फक्त माझ्याशी हंसली.
ती तिच्या आई जवळ जाऊन बसली असावी.कुठे बसली ते मी पाहिलंच नाही.कारण ते मासिक तिच्याकडून घेतल्या नंतर मी खिडकीच्या बाहेर बघून अश्रू ढाळीत होतो. तिचं ते छोटसं सहानुभूतिचं भावप्रदर्शन बर्‍याच वर्षानी मी अनुभवलं होतं.”
ही सर्व हकिकत त्या रुग्णाने पुन्हा चेकअपसाठी त्या सुश्रुषागृहात गेला होता त्यावेळी संजयला सांगितली.नंतर संजय म्हणाला,
” कुष्टरोगातून पूर्ण बरा झालेल्या ह्या त्यावेळच्या रुग्णाची बर्‍याच वर्षानी माझी गाठ पडली.ते जूने दिवस आठवून आणि ती बसमधली घटना आठवून मला तो रुग्ण म्हणाला,
” दोन अनोळख्या व्यक्ती दूवा साधण्यासाठी प्रयत्न करतात त्या दुव्याचं मला विषेश वाटतं.
त्या मुलीला इतक्या वर्षानी आठवत ही नसेल ती घटना.
मी आपली मनात समजूत करून घेतो की ती आता मोठी झालेली असावी.अशीच इतरांशी दुवा ठेवीत असावी.आणि कदाचित तिच्या मुलांनापण असंच करायला शिकवीत असावी.मला वाटतं त्यावेळी तिच्या आईनेच मला ते मासिक वाचायला म्हणून बक्षीस दिलं असेल.तिने ते मासिक मला का दिलं ह्याचं महत्व मला वाटण्या ऐवजी ते तिने दिलं हेच जास्त महत्वाचं वाटतं.
तिचंच हे उदाहरण घेऊन निरनीराळ्या लोकांशी निरनीराळे दूवे ठेवण्याच्या प्रयत्नात मी असतो.असं मी करतो हे पाहून बर्‍याच लोकाना कळतही नसेल की मी असं का करतो ते.पण मला नक्कीच माहित आहे हे मी करतो ते त्या छोट्या मुली मुळे.
तिने देऊ केललं ते मासिक माझ्या सारख्याला- ज्याला इतर टाळत होते- ते आठवून माझ्या जीवनात त्याचा सतत प्रतिध्वनी येत असतो.माझं पण इतराना केलेलं हे सहानुभूतिचं भावप्रदर्शन त्यांच्या मनावर तसाच परिणाम करीत असावं.आणि त्यावेळच्या त्या छोट्या मुलीला आता जी मोठी बाई झाली असावी तिला मी आठवून एकच म्हणेन “धन्यवाद”.
हे त्याचं सारं ऐकून झाल्यावर संजय त्या रुग्णाला म्हणाला,
“ज्यावेळेला तू ती हकिकत मला सांगितलीस त्यावेळेला ती कोण मुलगी हे मी तुला मुद्दामच सांगितलं नाही.पण आता इतक्या वर्षानी सांगतो.
तिच्याही वडिलाना तुझ्यासारखीच कुष्टरोगाची लागण झाली होती.आणि ज्या दिवशी तुला घरी जायला सांगितलं त्याच दिवशी तिची आई आणि ती छोटी मुलगी आपल्या वडिलाना आमच्या सुश्रुषागृहात दाखल करायला आली होती.तुला त्यानी तिथं पाहिलं असावं.आपल्या वडिलाना सोडून ती दोघं तुझ्याच बसमधे बसून परत जात होती.तुला खिडकीजवळ एकटा बसलेला पाहून तिच्या आईला आणि तिला तिच्या वडिलांना असंच टाळलं जात होतं ह्याची आठवण येऊन तुला ते मासिक तिने आणून दिलं असावं.”
हे माझं सर्व सांगणं ऐकून झाल्यावर तो मान दुसरीकडे वळवून त्या घटनेची आठवण काढून ढळाढळा अश्रू ढाळत होता.
मी त्याला जवळ घेऊन म्हणालो,
“तुला कधीना कधी कळावं असं मला नेहमी वाटायचं.आज योगायोगाने भेटलास म्हणून एकदाचं सांगून टाकलं.त्यावर तो काय बोलला ते मी ऐकलं नाही पण त्याचे ते अबोल शब्द हेच मला सांगत होते,
“धन्यवाद”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, December 4, 2008

ज्यावर तुम्ही प्रेम करता तेच करावं.

मी एकदा प्राईव्हेट टॅक्सीने मुंबईहून कोल्हापूरला जायला निघालो होतो.टॅक्सीचा मालक मला म्हणाला,
“साहेब तुमच्या बरोबर एक गृहस्थ थेट कोल्हापूरला जाणार आहेत.तुम्ही त्यांना घेऊन गेलात तर तुम्हाला प्रवासात कंपनी मिळेल आणि ते तुमच्याशी जातं भाडं पण शेअर करतील.”
मी म्हटलं ठीक आहे.जायच्या वेळी ते गृहस्थ आले.पिळदार अंगाचा, डोक्यावर अगदी मुद्दाम तुरळक केस ठेवलेला,अंगात सफेद झब्बा,आणि खाली शुभ्र मसराईझ्ड धोतर,गळ्यात एक भरजरी सोन्याची सांखळी,झब्ब्याचं वरचं बटण बळेच न लावलेलं,पण छाती तुळतुळीत एक ही केस नसलेली,पायात कोल्हापूरी चप्प्ल,निमगोरा, असा असामी खड्या आवाजात मला “जय महारष्ट्र” म्हणत टॅक्सी जवळ येऊन उभा ठाकला.
त्याचं ते दुपदरी शरिर बघून मीच त्याला म्हणालो तुम्ही मागेच बसा मी ड्राईव्हरच्या बाजूला पुढच्या सीटवर बसतो.त्याला ती माझी सुचना आवडली.इतका लांबचा प्रवास असल्याने अंमळसं सगळ्यांनाच ऐसपैस बसायला आवडेलच.
प्रवासात जेव्हा गप्पाना रंग चढला तेव्हा ते गृहस्थ मला म्हणाले,
“मला वाटतं जे लोक जे काही करतात त्याबद्दल त्याना आत्मसन्मान वाटला पाहिजे. जरी इतर कुणीही त्याबद्दल गैरसमज करून घेतला किंवा तिरस्कार केला तरीही.
मी व्यवसाईक कुस्तीगार आहे.गेली जवळ जवळ दहा वर्षे.ह्या माझ्या व्यवसायातून माझी गुजराण व्हायची. पण माझ्या कुस्ती खेळण्याच्या व्यवसायाला लेबल चिकटवलं जायचं.फाल्तू खेळ,खतरनाक शौक,बिनडोकी शारिरीक प्रदर्शन अशा पद्धतीची उपनावं लावली जायची.

मी ज्यावेळी शाळेत जायचो,त्यावेळी एकदा माझ्या गुरूजीनी मला सर्वांसमोर तंबी दिली होती की मी जर का अभ्यासात जास्त लक्ष न देता कुस्ती खेळण्यात वेळ घालवला तर,मला पुढे चांगलं उपजीविकेचं काम मिळणार नाही.माझं भवितव्य निराशाजनक होणार.

त्या निराशाजनक काळात मी कुस्ती खेळायचं अजिबात सोडलं नाही.आणि त्यात उत्तरोत्तर प्रगती करीत राहिलो. तरीपण बरेच वेळा माझे प्रयत्न विफल व्हायचे.पण माझ्या लक्षात आलं की एखाद्दा गोष्टीत निपूण व्हायचं असेल तर प्रयत्न करीत राहायचं.मग जरी खरचटणं झालं,थोडा मार बसला,एखादा हात पाय मुरगळला,लोकांनी टिंगल केली तरी.
देशात अलीकडे कुस्तीच्या खेळाला समाजातल्या मुख्यधारेत चांगलीच मान्यता मिळाली आहे.पण अजूनही काही प्रतिकूल रुढिबद्द लोक आहेत.कुस्तीला अनुकूल असलेले जे लोक मला माहित आहेत ते सामाजाचे उत्तरदायी नागरीक आहेत.त्यातले बरेच लोक वडील,घरंदाज,जगप्रवास केलेले,आणि सफल ठेकेदार आहेत.त्यांचा पेहराव आणि राहाण्याची स्टाईल ही आमच्या विश्वातली संस्कृती असावी.

तर असा मी चाळीसीतला,पती आणि तीन मुलांचा बाप,एक मोठी जबाबदारीची आणि दायीत्वाची लांबलचक यादी घेऊन असलेला आहे.आणि मला जरी खूप उपाधी असल्या जश्या-सि.ई.ओ. एक्झीक्युटीव्ह प्रोडयुसर,सिनीयर कनस्लटंट,फॉऊन्डेशन चेअरमन,फाल्तु अभिनेता तरी सुद्धा मला ज्याचा खास अभिमान आहे तो म्हणजे “व्यवसायीक कुस्तीगार” म्हणून. ही उपाधी मी जरूरीच्या कागदपत्रावर लिहीतो.जरी मला कुठल्यातरी सुरक्षा नाक्यावर,कस्टम ऑफिसात तपासणीला जावं लागलं तरी.

हे खरं आहे की,कुस्ती खेळणं ही काही लोकांच्या दृष्टीने ग्रेट गोष्ट नसेलही पण मी जे काय करतो त्याचा मला अभिमान आहे.माझ्या आईवडीलानी माझ्या ह्या वेडाबद्दल त्याची कधीही उपयुक्तता विचारली नाही.
माझं हे उदाहरण मी एक दिवस माझ्या मुलांकडे पासऑन करणार आहे.माझा मोठा मुलगा उत्साही कुस्तीगार आहे.तो मजा म्हणून कुस्ती खेळतो आणि ते मला पुरेसं आहे.
कदाचीत तुम्ही श्रेष्टतमस्थानावर पोहचूं शकणार नसाल.पण ज्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्ही करीत असाल तर त्यात जे सुख आणि आनंद आहे ते तुम्ही धनवान आणि विख्यात जरी असला तरी त्यात नाही.”

आणखी बर्‍याच गप्पा प्रवासात झाल्या.पण त्या कधीतरी पुढच्या वेळी.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, December 2, 2008

आईची विटंबना.(रामपुरी ते रायफल)

माझ्या आईवर झालेली जखम आणि त्या जखमेच्या वेदनानी कण्हण्याच्या तिच्या किंकाळ्या ऐकून माझं मन सून्न झालं.काही लिहावसंच वाटत नाही.एक दोन लेखनं केली,पण ती लेखनं सादर करायला मला मनंच होत नाही.आईने किती म्हणून जखमा सहन केल्या.कधीही तिने जर हात उचला तर आपल्या संरक्षणासाठीच उचलला. पण तिने कधीही हातात काठी घेऊन कुणाला मारायला आपल्या घराबाहेर पडली नाही.इतकी क्षमता असून तिने कधीही कुणाच्या घरात जाऊन कसली ही अभिलाषा केली नाही.आल्या- गेलेल्या पाहुण्याला आनंदाने सामाऊन घेतलं.”आवो जावो तुम्हारा घर” अशी वृत्ति ठेवून ती राहिली. इतिहास साक्षी आहे.म्हणून ती आजतागायत जीवंत आहे.बाहेरच्या आगांतूकानी येऊन खूप तिची लुटालूट केली.कुणी तिचे दागिने लुटले,कुणी तिची देवघरं उद्व्हस्त केली.तिच्या गळ्यातला हिरा पळवून नेऊन आपल्या मुकूटात रोवून ठेवला.पण म्हणून ती कधीही दीन झाली नाही.यवनानी शेकडो वर्ष तर फिरंग्यानी दिडशे वर्ष तिच्याच घरात राहून धुमाकूळ घातला, लूट केली.पण तेच आगांतूक आपलं तोंड काळं करून निघून गेले. तिची बाराशे कोटी मुलं आपआपल्या परीने जगताहेत.
तिची होत असलेली भरभराट शेजा‍र्‍यापाजार्‍यांच्या डोळ्यात खूपते.तिची प्रगती खूंटवण्यासाठी ते आपली पराकाष्टा करीत आहेत.पण अशी कुणाची प्रगती खूंटेल का?
ती म्हणते,
“असे खूप आघाद माझ्यावर झाले आहेत.खूप जण जखमा करून गेले आहेत.किती रक्त सांडलं गेलं आहे. वाईट वाटून तुम्ही दुःखी व्हाल.पण हे ही दिवस जातील. आघात करणारेच हरतील.भविष्यात काय लिहून ठेवलं आहे हे कुणालाच माहित नाही. पण एक गोष्ट खरी आहे की झालेल्या चूकातून शहाणं व्हायला हवंय.आणि माझा माझ्या बाराशे कोटी मुलांवर विश्वास आहे.”

मुंबईत असताना आमच्या लहानपणी घरात चाकू असलाच तर पेन्सिलीला टोक काढण्यासाठीच असायचा.मोठं धारदार हत्यार बाळगायला त्या काळात बंदी होती. जातीवादावरून किंवा अन्य कारणावरून दंगे किंवा भांडणं झालीच तर चाकूचे वार व्हायचे. किंवा लाठ्या काठ्याने डोकी फोडली जायची.हे चाकू मुंबईत तरी चोरबाजारात मिळायचे.हा चोरबाजार भेंडी बाजाराच्या आसपास भरायचा.ह्या चाकवाना रामपुरी म्हणायचे.रामपुरी चाकू म्हणजे मोठा चाकू समजायचा.आणि हे चाकूने भोसकाभोसकीचे प्रकार हाताच्या बोटावर मोजण्या इतके व्ह्यायचे आणि त्यातून एक दोन मरायचे.

त्यानंतर जमावाकडे दुसरं अस्त्र म्हणजे दगड किंवा सोडावॉटरच्या बाटल्या असायच्या.त्या एकमेकावर फेकून मारायचे.त्याने पाच दहा डोकी फुटायची. त्यावेळच्या पोलिसाकडेपण दंडुके-बॅटन- असायचे.त्यावेळच्या पोलिसांचा ड्रेस गमतीदार असायचा. शिवाजीचे मावळे वापरायचे तसे डोक्यावर पगड्या असायच्या आणि त्याचा रंग पिवळा जर्द असायचा आणि पेहराव असायचा जांभळ्या रंगाचा बुशकोट आणि खाली शॉर्ट-हाफ प्यॅन्ट-असायची.पायात पठाणी चप्प्ल असायचं.पोलिस गमतीदार जोकर दिसायचा.आम्ही पोलिसाला लहानपणी “जांभळी बाटली पिवळा बूच” असं गमतीने म्हणायचो.पोलीसाच्या कमरेला हे पिवळ्या रंगाचे दंडुके-बॅटन लटकत असायचे.त्याचा वापर त्याला क्वचितच करावा लागायचा.आणि मोठ्या दंग्यात गाड्या भरून पोलीस आले की त्यांच्याकडे लांब काठ्या असायच्या.लाठीमार करून जमावाला पांगवायचे.त्याहून गंभीर जमाव झाल्यास रायफली घेऊन पोलिस यायचे. ह्या रायफलीतून एका वेळी एक गोळी झाडली जायची.बरेच वेळा गोळीबार पोलिस हवेतच करायचे.दंगे काबूत यायचे. त्यामुळे मनुष्य हानी कमीच व्ह्यायची. पोलिसांच्या साहेबाकडे मात्र पिस्तूल असायचं आणि कमरेला एका चामड्याच्या पिस्तुलाच्या आकाराच्या पाऊचमधे ठेवलेलं असायचं.

पिस्तुल प्रत्यक्षात कसं दिसतं ते आम्हाला कधीच पाहायला मिळालं नाही.पण नाही म्हटलं तरी वांद्र्याच्या वांद्राटॉकीझमधे चार आण्याचं तिकिट काढून आम्ही इंग्लिश फिल्म बघायला जायचो. “झोरो इन टाऊन” किंवा “डेथ ऑफ गॅन्गस्टर” असले फायटिंगचे चित्रपट बघायला मजा यायची.त्यात पिस्तुलं म्हणजे काय ते पहायला मिळायचं.तेव्हड्या लहान वयात मोठ्या भावाबरोबर चित्रपट बघायला गेल्यावर इंग्रजी काही कळत नसायचं.मोठा भाऊ हंसायचा त्यावेळी आम्ही हंसायचं.एक मात्र खरं धावत्या घोड्यावर बसून बंदूकीच्या गोळ्या एकमेकावर झाडण्याच्या दृश्याने त्यांची मर्दूमकी बघायला मजा यायची.एक मात्र इंग्रजी शब्द अजून आठवतो” हेंज-जॉफ” म्हणजेच हॅन्डस अप”

जशी मुंबईची वस्ती वाढू लागली तसे गुन्हेगारपण वाढायला लागले.जरा आधूनीक हत्यारं गुंडाना मिळायला लागली. अलीगढ वरून गांवठी पिस्तुलं मिळायला लागली.उत्तरप्रदेशच्या अलिगढमधे गावठी पिस्तुलं बनावायचे बेकायदा कारखाने बरेच होते. ही पिस्तुलं मुंबईत स्मगल व्हायची.कधी कधी मुंबईचे पोलिस अलिगढमधे जाऊन बेकायदा कारखान्यावर छापे टाकायचे.
मुंबईत त्यावेळी नावाजलेली मराठी वर्तमानपत्रं म्हणजे लोकमान्य,नवशक्ति आणि केसरी.लोकसत्ता आणि सकाळ ही वर्तमानपत्रं आत्ता आत्ताची.परदेशातल्या बातम्या सोडाच एखाद दुसरा भोसकून मेल्याची एखादी बातमी दिसायची.अमेरिकन कॉटनबाजाराचे नंबर मात्र एका ठराविक जागेत दिसायचे.त्या नंबरावर काही लोक सट्टाबेटिंग खेळायचे.

मुंबईची वस्ती आणखी वाढायला लागल्यावर,चोर्‍यामार्‍या दंगेधोपे जातीय दंगल वाढायला लागली.आता नवीन अस्त्र म्हणजे गांवठी बॉम्ब फुटायला लागले.नाहीतर बॉम्ब हा प्रकार फक्त लष्कराकडेच असायचा.ह्या गांवठी बॉम्बच्या वापराने एक्का दुक्का मेल्याची बातमी यायची.गांवठी बॉम्ब बनवायचे मुंबईतपण कारखाने निर्माण व्हायचे.धारावीत त्यांचं जास्त प्रमाण असायचं. हे बॉम्ब विझवण्यासाठी मुंबईपोलिसांच स्पेशल खातं असायचं.हळू हळू सर्रास पिस्तुलं मिळायला लागली.अर्थात बेकायदा वापर व्हायचा.आता पेपरात एकदोन ऐवजी चारपाच दुर्घटनाच्या बातम्या यायच्या.हवालदारपण आता थोडे स्मार्ट व्हायला लागले. पुर्वीचा गचाळ पेहराव जाऊन पोलीस आता जांभळी टोपी आणि खाकी कपडे वापरायला लागले.

एके४७,बिके५७,सिके६७ ही पोलीसांच्या कमरेवरच्या बिल्ल्यावरची नंबरांची नांव असायची.”अरे त्या एके४७ला बोलाव.किंवा बिके५७ला हांक मार” अशी भाषा बोलली जात होती.
एके४७ ही मशीनगन असते हे त्यावेळी पोलिसानासुद्धा माहिती नसावी.मशिनगन्स फक्त लष्करात असतात हे ऐकलं होतं.
पण आता गुंड जाऊन अतीरेकी आले.गावठी बॉम्ब जाऊन आरडीएक्सचे बॉम्ब आले.हात ग्रेनेड सर्रास वापरायला लागले. सुईसाईड बॉम्बचं नवीन टेकनीक आलं.आता पुढे रेडिओऍकटीव्ह बॉम्ब येतील.पुढे सेटलाईटवरून लेझर बिम वापरून संहार करण्यात येतील. कदाचीत पोरटेबल न्युकलीयर बॉम्ब येतील.डर्टीबॉम्ब येतील.काय कुणाष्टाऊक कुठे चालला आहे हा जग्नाथाचा रथ?

कुणाचा आहे हा इशारा

जात आहे पुढे पुढे ही धरती
जात आहे पुढे पुढे हे गगन
होत आहे काय ह्या जगताला
कुणाचा आहे हा इशारा

जात आहे पुढे पुढे ही जीवन नय्या
कोण आहे हिचा नावाडी
न कळे जात आहे कुठे हे जीवनचक्र
कुणाचा आहे हा इशारा

हे हंसणे हे रडणे ही आशा निराशा
न कळे आहे काय हा तमाशा
रात्रंदिनी जात आहे कुठे हा मेळावा
कुणाचा आहे हा इशारा

अजब आहे हा सोहळा
अजब आहे ही कहाणी
नाही कसले ठिकाण
नाही कसले निशाण
न कळे कुणासाठी जात आहे
हा जगन्नाथाचा रथ
कुणाचा आहे हा इशारा

हे शहाणे हजारो झाले भटके
गुपीत त्याचे कुणी न समजे
ही साखळी जीवनाची करीते भ्रमंती
कुणाचा आहे हा इशारा



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com