Tuesday, January 13, 2009

“मम मरण पाहिले मी, म्यां डोळा”

सूर्यकांत सुखटणकर माझा शाळकरी दोस्त.मी त्याला सूर्याच म्हणायचो.तो शेवटी वकील झाला आणि मी इंजिनीयर.एरव्ही आमची दोस्ती कायम राहिली नसती पण आम्हा दोघानाही पहिल्यापासून मराठी नाटकं बघण्याचा नाद असल्याने कुठे ना कुठे नाटकाच्या थिएटरमधे आमची भेट व्हायचीच.
सूर्याची वकीली नीट नाही चायलायची.बिचारा दिवसभर कोर्टात राबून दिवसाची जेमतेम कमाई करायचा.मला वाटतं,एका एका व्ययसायाला ज्याचा त्याचा स्वभाव-धर्मगूण हा ही काही प्रमाणात मदत करीत असतो.तसं पाहिलं तर सूर्या अगदी साध्या स्वभावाचा.
छ्क्के-पंजे त्याला माहित नव्हते.ते ह्या वकीली व्यवसायाला प्रकर्षाने जरूरीचे असतात.खोट्याचं खरं आणि खर्‍याचं खोटं करायला चलाखी लागते ती त्याच्या जवळ उपजत नसावी.
सूर्याची म्हातारी आई अजून होती वडिल पूर्वीच निर्वतले होते.सूर्या आईवडीलांचा एकूलता एक मुलगा.सूर्याची पत्नी त्यामानाने चलाख होती.पण त्याकाळात पतीच्या सांपत्तीक परिस्थितीवर पत्नीचं वजन दिसून यायचं.तशात ती शिकलेली असून सुद्धा नोकरी करीत नव्हती.बायकानी बाहेर नोकरीला जाणं त्याकाळात जरा अप्रशस्त वाटायचं.सूर्याचंपण तेच मत होत.सूर्याला मुलं मात्र दोनचार होती.त्याकाळात मुलंही जास्त व्हायची.
मोठी मुलगी,शोभना.त्यानंतर मोठा मुलगा शरद.त्यानंतर एक मुलगी वंदना,मग तिसरी मुलगी डिंपल आणि धाकटं शेंडेफळ कुमार.
शोभनाचं लग्न समीर दिवाडकर बरोबर झालं होत.दिवाडकर,दिवाडकर आणि दिवाडकर नावाच्या अकौटंसी फर्म मधी तो पण वकीलकी करायाचा.त्याच्या फॅमिलीची ती फर्म होती.शोभना तशी बरीच सधन होती.आईबाबाना ती जरूरीच्यावेळी आर्थिक मदत करायची.स्वभावानेपण वडिलांसारखी साधी होती.मोठा मुलगा शरद जास्त शिकला नाही.पण गप्पीष्ट होता.कट्ट्या कट्ट्यावर गप्पा किंवा चकाट्या मारताना दिसायचा.कट्टयावरचे त्याचे मित्र त्याला ज्युनीअर जेठमलानी म्हणायचे.तो नेहमी वडलांच्या वकिलीबद्दल फुशारकी मारायचा.पण तो जेठमलानी सारखा “चापलूस” नव्हता.त्यालापण मराठी नाटकांची खूप आवड होती.अधून मधून जरूरी पडली तर नाटकात रोलपण करायचा.बहुतेकवेळां नाटकाच्या पडद्या आडची कामं करून चार पैसे मिळवायचा.शरदने लग्न केलं नाही.नशीबवान बिचारी ती होणारी पत्नी म्हटलं पाहिजे.दुसरी मुलगी वंदना ही तर आईसारखी चलाख होती. तिने तिच्या ऑफिसातल्या एका पंजाबी एक्झिक्युटीव्हला गाठून प्रेमविवाह केला आणि ती दिल्लीलाच राहायची. तिसरी मुलगी डिंपल ही मात्र छानछोकी रहाण्यात मश्गुल असायची.ती टीव्ही चॅनेलवर सा-रे-गा-मा-पा (सारेगमप) किंवा हर-दील-जो-लव-करेगा किंवा इंडियन-आयडोल असल्या कार्यक्रमात भाग घ्यायची.एखाद्दा आयटेम डान्समधेपण बॉलिवूड टाईप नाचणार्‍या मुलीत भाग घ्यायची.तिने राजेश सावंत नावाच्या नाचातल्या सहकार्‍याशी लग्न केलं.तिच्या मैत्रीणी तिला नेहमीच म्हणायच्या,
“अग, डिंपल तुझा नवरा अगदी राजेश खन्ना सारखाच दिसतो आणि नाव पण राजेश की ग!”
डिंपलला आपलं नाव डिंपल आणि नवर्‍याचं नाव राजेश हे पाहून कौतुक वाटायचं. तिला एकच मुलगी होती तिचं नाव तिने राखी ठेवलं होतं.पुढेमागे आपल्यासारखीच टेव्ही चॅनेलवर ती कार्यक्रम करू लागली तर तोपर्यंत निदान सा-रे-गा-मा-पा-धा-नी-सा नावाचा कार्यक्रम होईल आणि राखी सावंत म्हणून आपली मुलगी नावाजली जाईल हा मुलीचं राखी नाव ठेवण्याचा तिचा उद्देश असावा.
शेवटचा शेंडेफळ कुमार हा मात्र फार हुशार होता.आय- आय-टीत शिकून अमेरिकेत बॉस्टनला एका सॉफ्ट्वेअर कंपनीत काम करीत होता.त्याचं अजून लग्न झालं नव्हतं.

काल मला फोन आला आणि सूर्या मॅसीव हार्टऍटेकने गेला असं निरोप मिळाला. मी तसाच त्याच्या घरी गेलो.सर्व मंडळी शोकाकूल पाहून मलाही दुखः आवरेना.
किर्तनकार करतात तसं वरचं सर्व प्रवचन झाल्यावर मुळ आख्यानाला लागतो.
सूर्याच्या जवळ बसलो असताना त्या शांत चेहर्‍याकडे बघून मला दहा वर्षापूर्वीच्या एका घटनेची आठवण झाली.
त्याचं असं झालं,नाशकाला एका प्रसिद्ध कंपनीचं नाटक लागलं होत.हे नाटक आम्हाला मुंबईत चूकलं होत.म्हणून दोन दिवसासाठी मी आणि सूर्या सुखटणकराने नाशकाला जायचं ठरवलं.परतीच्या वेळेला,सूर्या मला म्हणाला,
“तू पुढे जा,मी नंतरच्या एस्टीने येतो.माझं एका अशिलाकडे काम आहे.जातान माझी ही बॅग मात्र तू ने.”
मी निघालो.घरी येऊन जरा फ्रेश होऊन सूर्याच्या घरी जायला त्याची बॅग घेऊन निघालो.त्याच्या चाळीत आल्यावर त्याच्या रूम जवळ खूपच गर्दी जमलेली दिसली.मला कळेना काय झालं ते.सूर्याची म्हातारी आई मुसमुसून रडत होती. इतक्या वर्षाच्या संसारातल्या खडतर जीवानात मुलाला लहानाचं मोठं करीत असताना दुःखाच्या प्रसंगात रडून रडून तिचे अश्रू सुकले होते. बिचार्‍या बर्‍याचश्या आईला ह्या अडचणीतून जावं लागतं. बाहेर असलेल्या त्याच्याच एका शेजार्‍याला विचारल्यावर कळलं की सूर्या मॅसिव हार्टऍटेकने गेला असा नाशिकहून फोन आला. मला शॉक बसलाच आणि अशक्य वाटलं.कारण चार तासापूर्वी मी त्याच्या बरोबर होतो.पण काय कुणासठाऊक हल्ली कुणाला काय होईल ते.काही सूर्याची मुलं जवळ होती.मोठी शोभना निरोप मिळाल्यावर ती आणि तिचा नवरा आला होता.शरद घरचाच तो तिथे होताच पण नंतर शेजार्‍या बरोबर टॅक्सी करून नाशकाला गेला.डिंपलपण आपल्या नवर्‍याला घेऊन आली होती.दिल्लीच्या मुलीला, वंदनाला कळवलं ती संध्याकाळ पर्यंत विमानाने यायला निघाली.अमेरिकतला मुलगा कुमार मात्र ताबडतोब येत नव्हता.खोलीत एका कोपर्‍यात एक वयस्कर गृहस्थ दाढीमिशी लांब असलेला डोक्यावर एक काळी टोपी आणि मान खाली घालून विचारात पडल्यासारखी चर्या करून बसलेला मला दिसला.मला वाटलं सूर्याचा कुणीतरी वयस्कर नातेवाईक असावा.बाकी मंडळी यायची असल्याने मी घरी जाऊन परत येतो असं शोभनाला सांगून घरी गेलो.रात्री नऊच्या दरम्यान मला फोन आला की,
“काका तुम्ही ताबडतोब परत या.इकडे आल्यावर तुम्हाला काय ते कळेल.”
मी सूर्याच्या घरी परत आल्यावर सर्व मंडळी हंसत होती आणि त्या सर्वा मधे सूर्या बसून हंसत होता.मला सूर्याचा राग ही आला आणि गंमतही वाटली.मला पाहून सूर्या म्हणाला,
“उद्दा संध्याकाळी आपण समुद्रावर भेटूया मी तुला सर्व किस्सा सांगतो.तुला इकडे ये-जाचे बरेच हेलपाटे झाले आहेत.तू दमला असशील,काळजी करू नकोस सर्व काही ठीक आहे.”
दुसर्‍या दिवशी समुद्रावर भेटल्यावर मला त्याने जे काय सांगितलं ते ऐकून हंसावं की रडावं हेच कळेना.
मला सूर्या म्हणाला,
“गेले कित्येक दिवस माझ्या मनात येत होतं की जर का मी मेल्याची बातमी माझ्या ह्या मंडळीना कळली तर ही कशी वागतात ते मला प्रत्यक्ष पाहायचं होतं.मग तू मला माझी ही क्रेझी आयडीया म्हण किंवा आणखी काही म्हण,हा प्रयोग करून पहायचं माझ्या डोक्यात कित्येक दिवस घोळत होतं,तो काल मी चान्स घेतला.”
मी आणखी प्रश्न विचारण्यापूर्वीच मला म्हणाला,
“तू म्हणशील असं करून तुला काय मिळालं?” तेच सांगतो.माझ्या आई पासून माझ्या सर्व मुलां पर्यंत कोण कोण काय काय बोलतं ते ऐकायचं होतं.म्हणून मी, तू नाशिकहून गेल्यावर लगेचच दुसर्‍या एस्टीने मुंबईत आलो.एका इराण्याच्या दुकानातून घरी तो फोन केला.बातमी ऐकून मंडळी घरी जमेपर्यंत कोपर्‍यावरच्या लॉन्ड्रीत माझे आंगावरचे कपडे उतरून घरी जमलेल्यांच्या गर्दीत वाट काढून एका खूर्चीवर बसलो होतो.तू माझ्याकडे निरखून बघायचास त्यावेळी मी हळूच दुसरीकडे बघायचो.तू येण्यापूर्वी मी त्या खूर्चीवर बसून कोण कोण काय काय बोलत होते ते कान लावून ऐकत होतो.”
मी सूर्याला मधेच थांबवून म्हणालो,
” किती रे तू निष्टूर वागलास.तुला कुणचीच कशी किंव आली नाही.?”
मला हंसत हंसत सूर्या कसा म्हणतो,
“वकिली करून करून खर्‍याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायची मला संवय झाली आहे.पण एक मला माहित झालं आहे की माणूस फक्त दोन वेळा नचूकता खरं बोलतो एकदा जर का तो भरपूर दारू प्याला असेल-तुझ्या भाषेत घूटूं घेतलेला असेल-तर किंवा दुसर्‍यांदा आपलं जवळचं कोण गेलं असं कळल्यावर त्या गेलेल्या माणसाशी झालेल्या प्रातारणा आठवून किंवा त्याच्याशी पश्चातापपूर्वक काही वागणूक झाली असल्यास माणूसकी म्हणून खरं सांगायचा संभव असतो.”
मी म्हणालो,
“मग सांगून टाक की रे काय ते लवकर कोण काय काय बोललं ते”
“ऐक तर” मला म्हणाला,
“सर्वांना दुःख झालं होतं आणि पश्चाताप ही झाला होता.पण फक्त दुःखं झालं होतं ते माझ्या आईला.तिला कसलाच पश्चाताप झालेला दिसला नाही.
तिच्या पोटात नऊ महिने वाढून,माझं तिने संगोपन करून एव्हडं मला वाढवलं.मला लहानपणी दम्याचा विकार होता.त्यावेळी दम्याची उबळ आल्यावर मी कसा कासावीस व्हायचो,त्याची आठवण ती इतराना सांगत होती.
पश्चातापाची यादी मात्र इतर वाचून दाखवीत होते.
बायको म्हणाली,
” कधी कधी घरी दमून भागून यायचे,कमाई काही इतकी व्हायची नाही.माझ्या बरोबर चिडाचिड करायाचे मग मी रागाने त्यांना काहीतरी बोलायचे ते तसं करायला नको होतं.त्यांचा तरी काय दोष होता.”
मोठी मुलगी शोभना म्हणाली,
“बिचार्‍यांच्या हाताला यश नव्हतं.पण कष्ट करायचे”
मोठा मुलगा शरद म्हणाला,
“मला अकदी पोटतीडकीने चांगलं शिकायला सांगायचे पण मी त्यांच बोलणं मनावर घेतलं नाही.त्याचा मला आता पश्चाताप होतो.”
धाकटी मुलगी डिंपल म्हणाली,
“मी खूपच त्यांच्या मनाविरूद्ध वागले.मला ते खूप शिकायला सांगायचे.त्याना माझं हे बॉलीवूड वगैरे आवडायाचं नाही.कुमार त्यांना आवडायचा कारण तो आय आय टीत शिकून अमेरिकेला गेला.त्याचा त्याना अभिमान वाटायचा.
एकदा एक अशी घटना घडली,मला ती आठवली की अजून वाईट वाटतं.आज तर प्रकर्षाने वाईट वाटतं.
मी त्या वयावर अल्लडच होते.”दुल्हनीया ले जायेंगे” ह्या पिक्चरला जायला मी खूप आतूर झाले होते.माझी मैत्रीण माझ्या घरी येणार होती.साडेपाच झाले तरी ती आली नाही.पिक्चर सहाचं होत,तेव्हड्यात बेल वाजली.मी मैत्रीण आली म्हणून आतूरतेने दरवाजा उघडायला गेले.आणि पहातो तर बाबा होते.मी पटकन म्हणाले,
“शीः! बाबा तुम्हीss? मला वाटलं की माझी मैत्रीण.”
मी असं बोलायला नको होतं. बिचारे थकून भागून आपल्याच घरी आले होते.मला आता त्याचा पश्चाताप होतो.कधी तरी मी त्यांची माफी मागणार होते.पण आता तसं कधीच करता येणार नाही.”
नंतर सूर्या म्हणाला,
“दिल्लीहून वंदना यायची होती.आणि कुमार तर अमेरिकेत होता.त्यामुळे हे ऐकलेलं लक्षात ठेवून माझ्या खूर्चीतून उठलो.लॉन्ड्रीत गेलो,दाढी मिशीचं वेषांतर काढलं आणि माझे नेहमीचे कपडे घालून घरी परत आलो.”
मी म्हणालो,
“तुला तसा पाहिल्यावर त्या सर्वांच काय झालं असेल.कल्पनाच करवत नाही.”
त्यावर सूर्या म्हणतो,
“अरे,काय सांगू? बायको जोर जोरात रडून माझ्या छातीवर बुक्क्यांचा वर्षाव करीत होती.किती शिव्या दिल्या असतील मला काही आठवत नाही.मुलं तर हंसत ही होती आणि रडत ही होती.मी मात्र माझ्या आईच्या मांडीवर डोकं टेकलं.ती मला जवळ घेऊन कुरवाळत होती.”
हे ऐकून मला डोळे पूसताना पाहून सुर्या म्हणाला,
“हे सर्व तू तुझ्यात आणि माझ्यातच ठेव.तो दाढीमिशीवाला कोण ते त्यांना माहित नाही.आणि त्यांचे संवाद त्याने ऐकले तेही त्यांना माहित नाही.म्हणूनच मी तुला काल समुद्रावर भेटूया असं म्हटलं.”

आज सूर्या निघून गेला.त्याचं गूपित मी फोडलं असा त्याच्याकडून तरी माझ्यावर आरोप येणार नाही.


श्रीकृष्ण सामंत.(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, January 11, 2009

मी माझ्यातच संतुष्ट आहे.

“माझ्या अशुद्ध बोलण्याच्या पद्धतीमुळे माझ्या व्यक्तिमत्वात काही फरक झालेला नाही.मला वाटतं मी कोण आहे त्याची व्याख्या मीच करावी आणि माझ्या जीवनात काय कारवाई करावी ते पण मीच ठरवावं.”

मी एकदा एका लायब्ररीत पुस्तकं चाळीत बसलो होतो.दोन तीन पुस्तकं मला आवडली आणि वाचायला न्याविशी वाटली.ती घेऊन मी काऊंन्टरवर गेलो.काऊंटरवर बसलेली व्यक्ति मला जरा वयाने लहान वाटली.मी कुतुहलाने त्याला विचारलं,
“तू शाळेत शिकत असशिलच.”तो हो म्हणाला.
“मी माझ्या फावल्या वेळात लायब्ररीत येऊन बसतो आणि वाचन करतो.कधी कधी मला लायब्ररीचे व्यवस्थापक मदत करायला सांगतात.आणि मी त्यांना आवडीने मदत करतो.नुसतच अभ्यासाची पुस्तकं वाचून शाळेतल्या परिक्षा पास होता येईल पण ज्ञान वाढवायचं झाल्यास आणखीन खूप वाचन केलं पाहिजे.आणि मला वाचनाची आवड आहे”
तेव्हड्यात लायब्ररीचे व्यवस्थापक काऊंटरकडे आले आणि त्यांनी त्या मुलाला मोकळं केलं.
मी त्या मुलाला घेऊन बाजूच्या कॅन्टीनमधे येतोस का विचारलं,आणि आम्ही दोघं कॅन्टीनमधे जाऊन दोन कप कॉफीवर चर्चा सुरू केली.
मी त्याला म्हणालो,
“तुझे विचार ऐकून मला तुझ्या बद्दल जरा कुतुहल वाटलं तू सांगशील का तुझी हकीकत”.
तो सुरवाती पासूनचे आपले अनुभव सांगू लागला,
“माझी घरची परिस्थिती खूपच गरिब आहे.पण मला शिक्षणाची खूप आवड आहे.आईवडील आणि घरातले इतर अंगमेहनतीची कामं करून उदरनिर्वाह करीत असल्याने शाळेत जायला कुणी विचारच केला नाही.मी वयाने लहान असल्याने मला तेव्हडा शाळेत जायचा चान्स मिळाला. सुरवातीला मी शाळेत गेल्यावर,
” तू गांवढळच का राहत नाहीस?”
माझ्या शाळेत इतर विद्दार्थ्याकडून मला हा प्रश्न प्रकर्षाने विचारला जायचा.मला असं दिसून आलं की माझ्या सारख्या गांवढळ व्यक्तिकडून काय अपेक्षा करावी ते लोकाना आपल्या डोक्यात अगोदरच ठरवून ठेवायला आवडत होत.
पण माझ्या मनात येत की मी जो आहे तो आहे आणि मी कसा असावा हे दुसर्‍यानी ठरवाव अस नसाव.
शाळेतल्या माझ्या पहिल्या दिवशी,मी गणिताच्या वर्गात गेलो होतो.माझ्या त्या वर्गातल्या दोन विद्दार्थ्यानी माझ्याकडे अंगुलीनिदर्शन करून माझं हसं उडवल होत. प्रथम मला वाटलं कदाचीत माझ्या पॅन्टची झीप उघडी असावी,किंवा माझ्यादातात काही तरी अडकलेल त्याना दिसत असाव.पण मी ज्यावेळी माझ्या सीटवर जाऊन बसलो,त्यावेळी एका विद्दार्थ्याला कुजबुजताना ऐकल,
“हा गांवढळ मुलगा कशाल शाळेत शिकायला येतोय?”
म्हणजे त्याचा अर्थ माझी झीप उघडी नक्कीच नव्हती. पण त्याच वर्गात एक गबाळ्या सारखे कपडे घालून डोळे अस्वच्छ असूनही बसलेला विद्दार्थी त्याना चालत होता.
त्यामानाने माझे कपडे ठिगळलेले असले तरी स्वच्छ होते.त्याना वाटायचं माझे कपडे नव्या सारखे दिसावे आणि ते अस्वच्छ असले तरी चालावे.काही मुलं माझ्या कपड्यांकडे निरखून बघत आणि काही तरी टाकून बोलत.हे मी सातवीत असताना व्हायचं.
माझ्या एका संस्कृत वर्गात मला गुरूजीने विचारलं,
“कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” याचा अर्थ काय?
मी पटकन सांगितलं,
“कर्म करीत जा फलाची आशा धरू नकोस”
हे ऐकून माझ्या वर्गातल्या इतर विद्दार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसून आलेला गहरा धक्का पाहून मला वेगळेपण आल्यासारखं वाटल.
आता मी मॅट्रिक व्हायला आलो आहे.मी सर्व वरचे क्लासिस घेतो.माझे घरचे कपडे पण मला हवेसे वाटतात तसेच आहेत.माझ्या मित्र निवडण्याच्या पद्धतीत पण मी दुजाभाव ठेवित नाही.शाळेतपण मी क्रियाशिलता ठेवतो.आणि कधी कधी मी अशुद्ध शब्दपण उच्चारतो.
माझ्या शुद्ध-अशुद्ध उच्चाराने माझं व्यक्तिमत्व बदलं नाही आणि माझ्या व्यक्तिमत्वाने माझे उच्चार बदले नाहीत. माझा माझ्यावर विश्वास आहे. मला वाटतं मी कोण आहे त्याची व्याख्या मीच करावी आणि माझ्या जीवनात काय कारवाई करावी ते पण मीच ठरवावं.शाळेमधली लोकप्रियता बहुदा शाळेतली विचारधारा अंगीकारण्याच्या तुमच्या स्वेच्छेवर अवलंबून असते.आणि मला कुणी तरी म्हणालं की प्रौढता आणणं तितक सोप नाही.दुसरा एखादा विकल्प म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाला- दुसर्‍यांच्या समाधानीसाठी आणि त्यांच्या पसंतीसाठी- बळी देणं.
खरंच,अस करणं जरा आकर्षित वाटत असेल,पण माझा स्वाभिमान राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नात मी थोडा अलोकप्रिय झालो असेन आणि कधीकधी माझी घृणाही आली असेल आणि त्याचा अंतही दृष्टीक्षेपात आला ही नसेल. पण दुसर्‍यानी माझ्याशी संतुष्ट असणं हे मी माझ्याशी संतुष्ट असण्याइतकं महत्वाच मानीत नाही.
आता मी मॅट्रिकची परिक्षा दिल्यावर नक्कीच कॉलेजात शिकायला जाणार.ह्याच लायब्ररीतल्या व्यवस्थापकानी मला इथेच काम करून काही पैसे कमविण्याचा मार्ग दाखवला आहे.त्याने मी माझा शिक्षणाच्या खर्चाला थोडा हातभार लाविन.आणि खचीतच माझी भरपूर शिकायची इच्छा पूर्ण करीन.”
मला त्या मुलाची जीद्द बघून खूपच आनंद झाला.त्याला मी सुयश चिंतीलं.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, January 9, 2009

इच्छेच्या पाऊलवाटा

माझी मामेबहिण सुमती कोकणातल्या एका खेड्यात रहाते.ती, तिचा नवरा आणि मुलं घराच्या मागे शेती करतात.घर मोठं आहे आणि मागे मांगर, विहीर आणि गाईबैलांचा गोठापण आहे.एक दिवस मी तिच्या घरी गेलो असताना मला ती तिच्या घराच्या मागच्या परड्यातून गाईगुरं दाखवीत खोल विहिरीची आणि आजूबाजूच्या शेतीची माहिती देत देत आपला अनुभव सांगत होती.एका जागेतून दुसर्‍या जागेत जाताना लहान लहान पाऊलवाटा झाल्या होत्या.ह्या पाऊलवाटावरून विषय निघाला.
मी तिला विचारलं,
“सुमती प्रत्येक पाऊलवाटांच्या टोकाला तू आखांडे घातले आहेस.हे अटकाव कशासाठी ?”
सुमती खेड्यात रहात असली तरी तिने कॉलेजचं शिक्षण पूरं केलं होतं.काही दिवस ती त्याच कॉलेजात लेक्चरर म्हणून पण होती.नंतर तिने शेतीत लक्ष घालायला सुरवात केली.आणि त्याचं कारण तिचा नवरा होता.कारण तो ऍग्रिकल्चरची डिग्री घेऊन ह्या खेड्यात शेती करायच्या इराद्दाने रहात होता.
माझ्या वरील प्रश्नाला तिने चक्क तत्वज्ञान देण्याच्या उद्देशानेच उत्तर दिलं.

“मला वाटतं आपल्या इच्छा-आकांक्षेचा मार्ग आपण नीट काळजीपूर्वक निवडला पाहिजे.चुकीची निवड झाल्यास परिणाम घातक होतात.
वास्तुशास्त्राच्या भाषेत मार्ग म्हणजे पायवाट,गवतातून चालून झालेली चिखलवाट असं समजल जात.एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पटकन जायच झाल्यास केलेल्या मार्गालापण पायवाट किंवा पाऊलवाट म्हणतात.ह्या निरनीराळ्या पाऊलवाटाच आहेत.
मी खेड्यात शेती करून राहते.आणि माझ्या परिसरात डझनावर पाऊलवाटा आहेत.परसातल्या मांगराकडे जाण्याची पाऊलवाट,गाईच्या गोठ्याकडे जाण्याची पाऊलवाट, विहीरीकडे जाण्याची पाऊलवाट.
ह्या पाऊलवाटा आपल्या इच्छेमुळेच तयार होतात. कारण आपल्याला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्याची इच्छा होत असते.मी सरसकट ह्या पाऊलवाटाना “इच्छेची पाऊल वाट ” असं समजते.
ह्या इच्छेच्या पाऊलवाटांचं चांगलच रक्षण व्हावं असं मला नेहमी वाटत असत.पण मला वाटतं त्यांच्या पासून काळजी पण घ्यायला हवी.
एका बाजूनी विचार केल्यास मी कडक नियमाच्या पालनाची सक्ति नापसंत करते.पण मी तसं करावं लागल तर मोठ्या कल्पकतेने ती आचारणात आणते. पण दुसर्‍या कुणाचे नियम तोडण्यापूर्वी दोनदा विचार करते. मी माझ्या मुलांच्या आणि पतीच्या इच्छेचा जसा सन्मान करते तसा माझ्या शेतातल्या पशुप्राण्यांचा पण सन्मान करते.त्यांच्या पाऊलवाटा ह्या त्यांच्या इच्छेनुसार झालेल्या असल्याने त्याचा ही सन्मान करते.पण माझा हा सन्मान दुधारी आहे कारण ह्या इच्छेच्या पाऊलवाटा आपल्याला संकटात आणू शकतात.
अलिकडेच अशीच एक पाऊलवाट आमच्या शेतीच्या बैलाला घातक ठरली.
त्याचं अस झाल,की तो बैल चरत चरत आमच्या घरा मागच्या परड्यात लुसलुशीत गवत खाण्याच्या इराद्दाने परड्याला घातलेल्या आखांड्याला ओलांडून येण्याच्या प्रयत्नात जवळच्या एका गायरीत-खड्यात पडला.ती त्याने केलेली त्याची इच्छेची पाऊलवाट असावी.जरी मी त्याला रोज खुराक देत असली आणि ते पुरेसं असल तरी त्याला ते गवत खायची इच्छा झाली असावी.
त्याच्या मागच्या पायाचं हाड मोडलं.त्याला उचलून घेऊन जाताना इतर गाई-बैलानी ते पाहिलं असावं.नंतर तो बैल उपचार करूनही शेवटी मेला.पण त्या इतर प्राण्यानी काय शिकल का? नाही. ते पण त्यांच्या इच्छेची पाऊलवाट करून असेच येण्याच्या प्रयत्नात असतात.अर्थात मी ती गायरी बुजून टाकली म्हणा.
अलीकडे मी त्या पाऊलवाटेच्या समोर भलाभक्कम आखांडा घालून त्या पाऊलवाटेला बंद करून टाकलं.हे माझ्या मनाविरुद्ध मी केलं.माझ्या स्वभावाला असं करणं परवडत नाही.पण कधी कधी मला अशा तर्‍हेच्या घटनेतून शिकूनमाझ्या विचाराना मोड घालावा लागतो.शेतकरी,आई आणि पत्नी म्हणून मला नियम घालून वागावं लागत.
उदाहरणार्थ, मी आणि माझे पती बर्‍याच गोष्टीवर सहमत नसतो.राजकारण,श्रद्धा आणि कधी कधी आम्हाला एकच संगीत ऐकायला आवडत नाही. त्यामुळे आमच्या इच्छेच्या पाऊलवाटा जर का आमच्या नात्यात आडकाठी आणू लागल्या तर आम्ही असेच मजबूत आखांडे-अटकाव घालून एकमेक आज्ञाधारी ढंगाने आपआपली बाजू संभाळतो.आणि बरेच वेळा ते कामी येतं.
बरेच वळा सीमेची जरूरी असते. ती लागू करायला जास्त प्रयास करावे लागतात.म्हणून मला वाटतं आपआपल्या इच्छेच्या पाऊलवाटा काळजीपूर्वक निवडायला हव्यात.त्या चुकल्या तर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात.माझ्या त्या मेलेल्या बैलाने आणि मी, मोठ्या मुष्कीलीने हे शिकलं आहे.”
सुमतीचं हे बोलणं संपल्यावर मी तिला म्हणालो,
“सुमती तू मला असं एक तत्वज्ञान सांगितलंस की ह्या इच्छेच्या पाऊलवाटा माझ्या कायमच्या लक्षात राहाणार.आणि एकलक्षात आलं की तू जरी आता शेतकरी झालीस तरी पूर्वीची लेक्चररशीप अद्दाप राखून आहेस.”
त्यावर मला हंसत हंसत म्हणाली,
“लेक्चर देण्यासारखा मला जर का स्टुडंट भेटला तर मी त्याला काय करू?”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, January 7, 2009

उजाळा देती माझ्या स्मृतिना

फिरूनी शोधूनी वाटे माझ्या मना
ते फुरसतीचे दिवस अन रात्र
उजाळा देती माझ्या स्मृतिना

थंडीतले उन कोवळे असे अंगणी
ओढूनी तुझा पदर माझ्या नेत्रावरी
पहूडलो असता अन कुशी वळताना
उजाळा देती माझ्या स्मृतिना

गरमीच्या रात्री वाहती थंड वारे
घेऊनी सफेद चादर माझ्या अंगावरी
पडूनी छतावरी तारे मोजीत असताना
उजाळा देती माझ्या स्मृतिना

किर्र रानातल्या त्या उंच पहाडावर
गुंजन करूनी भ्रमराची ती निस्तब्धता
चिंब भिजवीती ते क्षण नयानाना
उजाळा देती माझ्या स्मृतिना

फिरूनी शोधूनी वाटे माझ्या मना
ते फुरसतीचे दिवस अन रात्र
उजाळा देती माझ्या स्मृतिना


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, January 5, 2009

एका ऑफिस-सेक्रेटरीची कैफियत

“ज्यामुळे जगावंस वाटतं तेच काम करावं.”

माझ्या मित्राच्या तिनही मुली चांगल्या शिकल्यात.एक डॉक्टर आहे तर एक वकील आहे आणि तिसरी ही इंग्लिश घेऊन एम.ए.आहे.

“तुला कुठेही कॉलेजात लेक्चरर किंवा प्रोफेसर होता आलं असतं मग तू एका ऑफिसात सेक्रेटरीचा जॉब का पत्करलास? “

असं मी विचारल्यावर ती म्हणाली,

“मी सेक्रेटरी व्हावं असं मला का वाटायचं?कारण जसे हातमोजे हातात फिट्ट बसतात तसंच हे सेक्रेटरी होणं मला फिट्ट बसतं.मी ते काम करायला जाते ज्यावर मी प्रेम करते.ते काम म्हणजे जे सुनियोजित करण्यात जे सुव्यवस्थित करण्यात माझा वेळ जातो. दुसर्‍याना चांगलं वाटतं म्हणून ते काम करण्यापेक्षा मी जी आहे ते असण्यात मला गम्य वाटतं असं मी मानते.”
“गेल्या वर्षी मी प्रोग्रामर म्हणून काम करायचे.मी तो जॉब सोडला.आणि एक्झीक्युटीव्ह असिसटंट म्हणून जॉब घेतला हा जॉब मला आवडतो.ही उपधी जरा फॅन्सी आहे, खरं म्हणजे त्याला सेक्रेटरी म्हणतात.माझ्या नवीन जॉबबद्दल कुणी विचारल्यास मला थोडं सांगायला संकोच येतो.मी काय करते म्हणून नव्हे तर मी धरून इतर सुद्धा सेक्रेटरी असणं ह्यावर मनात काय आणतात त्याचा विचार येउन असं वाटतं.
मला नेहमीच वाटतं सेक्रेटरी होणं चांगलं आणि कदाचीत ते काम सक्षम आहे,जरी ते स्मार्ट,प्रभावशाली, आणि मौलिक नसेलही.मी इंग्लिशमधे एम.ए आहे.मी बर्‍याच प्रसिद्ध व्यक्तिंची मुलाखती घेतल्या आहेत.जे लोक माझ्या परिचयाचे आहेत ते नेहमीच मला विचारतात की,
“तू हा नीरस आणि कमी दर्जाचा जॉब का पत्करलास?”
माझ्या नवीन बॉसने पण मला विचारलं,
“तू हा जॉब करून कंटाळणार नाहीस ना?”
मी सेक्रेटरी व्हावं असं मला का वाटायचं?कारण जसे हातमोजे हातात फिट्ट बसतात तसंच हे सेक्रेटरी होणं मला फिट्ट बसतं. मी ते काम करायला जाते ज्यावर मी प्रेम करते.ते काम म्हणजे जे सुनियोजित करण्यात जे सुव्यवस्थित करण्यात माझा वेळ जातो.
माझ्या बॉसच्या दिवसभरच्या फारच व्यस्त कार्यक्रमात त्याच्या सर्वोच्य प्राथमिकतेत केंद्रीत होण्याचं चॅलेंज घ्यायला मला आवडतं.कसलीही अव्यवस्था असल्यास मी त्यात काम करू शकते.गुंतागुंतीच्या व्यवहारात काम करायला हेरगीरी करायला बरं वाटतं.फायलींग करणं आरामदायी वाटतं.
त्यातल्यात्यात कठीण भाग म्हणजे,माझ्या बरोबरच्या आणि इतरांच्या बरोबरच्या रुढिबद्ध लोकांशी समझोता करणं.मी एक मान्य करते की माझ्या बॉसला कॉफी आणून देण्याच्या कामामुळे थोडसं मला अडचणित टाकल्या सारखं वाटतं.पण खोलात जाऊन विचार केला तर कुणाला कॉफी आणून देणं काही अपमानकारक आहे असं वाटत नाही.मी तर म्हणेन की नम्रपणाचं ते एक प्रतिक आहे.काही लोकात चहापाणी देणं हे एक दुसर्‍याचा सन्मान केल्या सारखं मानलं जातं. माझ्या बरोबरीच्या आणखी सेक्रेटरी स्त्रीया ज्यांचा एकावेळी अनेक कामं करण्याचा हातखंडा असतो अशांच्या बरोबर राहायला मला आनंद होतो.
समाजात डॉक्टर,इंजीनियर,सायंटिस्ट,आर्किटेक्ट असल्यावर त्यांना जास्त सन्मानीत करतात आणि त्यांची मिळकत पण विशेष असते.असं असताना कुठल्यातरी पार्टीत कुणाची तरी भेट झाल्यावर हे सांगायलाही बरं वाटतं. पण माझी एक मैत्रीण मला सांगते,

“आपण काय करतो ती पार्टीतली चर्चा फक्त पाच मिनीटाची असते,पण तुम्ही जे जीवनात काम करता ते तुम्हाला दिवसभर रोजच करावं लागतं. काम किती विशेष आहे हे पहाण्यापेक्षा ज्या कामावर तुम्ही प्रेम करता ते करणं जास्त बरं वाटतं.असं मी तरी मानते.”
मी तिला म्हणालो,
“कामावर प्रेम केलं तरच आपला वेळ मजेत जातो.म्हणून कोणी काही म्हणो ज्यात आपला वेळ जातो तेच काम करावं”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, January 3, 2009

थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर

थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर
काटकुळ्याने बनलेले छोटेसे छप्पर

मागीले तुजवळी ते तर फार नसे
जो प्राण द्दायचा ते तर वचन नसे
नको ते मागणे आता या उप्पर
थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर
काटकुळ्याने बनलेले छोटेसे छप्पर

अंगणी माझ्या असावा एक झूला
सुगंधी मातीचा असावा एक चूला
थोडी थोडी आग आणि थोडा धूर
थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर
काटकुळ्याने बनलेले छोटेसे छप्पर

रात्र जाई निघुनी दिवस कसा जावा
बाजरीच्या शेतामधे कावळा उडावा
बाजरीच्या ताट्यासम मुले होवोत भरपूर
थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर
काटकुळ्याने बनलेले छोटेसे छप्पर


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, January 1, 2009

कामकरत राहणं जीवनाला गोड-सुखद बनवतं.

“मला ज्यावेळी विचारलं गेलं,की मी काय मानते?त्यावेळी उत्तर देण्यापूर्वी माझ्या लक्षात आलं की ह्याला उत्तर द्दायला आपण काय करतो त्याकडे नीट निरखून लक्ष दिलं पाहिजे.कारण आपण जे काय करतो त्याकडे सहजगत्या आणि इमानदारीने पाहिल्यास ज्याच्यावर आपला विश्वास आहे तेच आपण करीत असतो.आणि तेच आपण मानतो. “

शोभना मला ह्यावेळी भेटली तेव्हा आमच्या लहानपणच्या आठवणी काढून आम्ही बराच वेळ आनंदात घालवला.मी माझ्या आठवणी तिला सांगत होतो.ते सांगता सांगता शोभनाच्या कमाआत्याची आठवण मला निक्षून आली.
मी तिला म्हणालो,
“शोभना,तुझी कमाआत्या तुला खूप आवडायची.नव्हे तर तुला वरचेवर तुझ्या नातेवाईकांना भेट द्दायला तू बाजूच्या गावात अगदी खूप उत्साही होऊन जायचीश आणि तिला भेटायचीस.मी पण एकदा तुझ्या कमाआत्याकडे आलो होतो.ती तुला नेहमीच काही ना काही तरी उपदेश करायची.तू तिचं सगळं ऐकून घ्यायचीस आणि करायचं तेच करायचीस.मला आठवतं एकदा तुला तिने शिवणकाम, भरतकामावर लेक्चर दिलं होतं.सांग बघुया काय होत ते.”
शोभना म्हणाली,

त्यावेळी मी दहा वर्षाची असेन.जवळच्या गावात वरचेवर जाऊन माझ्या नात्यातले वयस्कर नातेवाईक राहायचे त्यांना भेटायला जायला मला आवडायचं.त्या नातेवाईकात कमाआत्या माझी एक वयस्कर आत्या होती.ती तिच्या एका अविवाहीत मुली बरोबर राहायची.मी माझ्या कमाआत्याला वरचेवर भेटायची.तिला मी सदानकदा विणकाम,भरतकाम किंवा शिवणकाम करीत असलेली पाहायची.तिला भेटल्यावर ती मला नेहमीच ती करते ते काम शिकून घ्यायला मागे लागायची.
म्हणायची,
“ही कला शिकून घेतलीस तर तुझ्या रिकामटेकड्या वेळेचा उपयोग काही तरी लभ्यांश मिळवण्यात होईल.”
मला तिला नकार देण्याचं कारण, कमाआत्या ज्या कामात वेळ घालायची ती कलाकृती रंगाच्या दृष्टीने आकर्षक नसायचीच त्याशिवाय त्या कामाची बनावट पण एव्हडं स्वारस्य घेण्यालायक नसायचं.मला हवं होतं ते म्हणजे आकर्षीत रंग असलेले गळपट्टे, हातमोजे,आणि झालर असलेले पेटीकोट असले प्रकार करायला मला आवडलं असतं.अशावेळी कमाआत्या मला एक तत्व सांगून जायची-जरी त्या तत्वामुळे माझ्या प्रवृतीत काही फरक पडला नसला तरी- त्याचा प्रभाव मात्र साफसाफ माझ्याभविष्यातल्या वागणूकीत कायमचा पडून गेला.
ती म्हणायची,
“कामकरत राहणं जीवनाला गोड-सुखद बनवतं”
वर नंतर म्हणायची,
“तू सिधीसाधी मुलगी आहेस.तुझ्यात काही उत्कृष्ठ अशी कला मला सध्या दिसत नाही.आतापासूनच तू तुझ्या सुखाच्या दृष्टीने कोणतं काम उपयुक्त ठरेल हे पाहिलं पाहिजे.
ह्या बनावटीच्या गोष्टी जरी तुला सटरफटर दिसल्या आणि त्यात तुला स्वारस्य नसलं तरी ह्या मी बनवलेल्या वस्तू अनाथाश्रमातल्या मुलांना वापरायला, वृद्धाश्रमातल्या लोकाना वापरायला आणि हॉस्पिटातल्या गरीब रोग्याना वापरायला जातात.
मला ते बनवून गरजूंच्या सेवेला कार्यान्वित करायला- कुणी जरी त्याची उपेक्षा केली तरी- धन्य वाटतं.माझ्या लक्षात आलंय की एखाद्दा आवश्यक कामाकडे ते कितीही नीरस असलं तरी पाठ फिरवणं ही एक घातक गोष्ट आहे.असलं कुठचंही काम नुसती भरपाईच करीत नाही तर ते अत्यंत गोड असतं.”

माझ्या आत्याचे हे बोलणं जरी माझ्या मनावर लगेचच परिणाम करू शकलं नव्हतं. तरी माझ्या कमाआत्याचं म्हणणं अगदीच काही फाल्तु नव्हतं.
मला ज्यावेळी विचारलं गेलं,की मी काय मानते?त्यावेळी उत्तर देण्यापूर्वी माझ्या लक्षात आलं की ह्याला उत्तर द्दायला आपण काय करतो त्याकडे नीट निरखून लक्ष दिलं पाहिजे.कारण आपण जे काय करतो ते सहजगत्या आणि इमानदारीने पाहिल्यास ज्याच्यावर आपला विश्वास आहे तेच आपण करीत असतो.आणि तेच आपण मानतो.
मी माझंच आश्चर्य करते कारण माझ्या लक्षात आलं की माझ्या ऍडल्ट जीवनात माझा वेळ ज्यात आत्याला समाधान वाटत होतं तशाच काहीशा प्रकारच्या कामात समर्पीत केला होता. अर्थात तसे उपयोगी कपडे मी तयार करीत नव्हते कारण आता फॅक्टरीमधे असले कपडे सर्रास बनवले जात आहेत त्यामुळे हाताने बनवायची गरज संपली होती.
मी अजाणपणे मर्मभेदी आणि पाठमोडून जाईल अशी कामं करीत राहिले.
कुणी तरी म्हटलंय,
“जे काही काम हाताला लागेल ते सर्व शक्तिसामर्थ्याने करावं”
मी म्हणालो,
“शोभना आपल्याला अनुभवी मंडळी जे काय सांगतात,ते ऐकून घ्यायला काहीच हरकत नसते.त्यांच म्हणणं अगदीच काही फाल्तु नसतं हे तुझं म्हणणं मला पटलं.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com