Wednesday, May 27, 2009

चानी (च्यानी नव्हे चानी चांगल्यातला चा )

कोकणात खारीला-squirrel-चानी म्हणतात.हा तोंडाकडून उंदरासारखा दिसणारा प्राणी पूरा पाहिल्यास फारच मोहक वाटतो.पूर्वी परदेशात मोठ्या चान्यांच्या कातड्याच्या श्रीमंत स्त्रीया पर्स म्हणून वापरायच्या.प्रभू रामचंद्रांच्या लंकेपर्यंत सेतू बांधण्याच्या प्रयासात चानीचा वाटा होता.समुद्राच्या पाण्यात अंग भिजवून मग किनार्‍यावरच्या वाळूत लडबडून झाल्यावर अंगावरची वाळू पुलावर टाकायला मदत केल्याच्या प्रयत्नाबद्दल भावूक होऊन प्रभू रामचंद्रानी प्रेमाने तिच्या पाठिवरून बोटं फिरवली. तिच ती बोटं तिच्या पाठिवर दिसतात अशी आख्यायीका आहे.

"चानी" नावाची कादंबरी चिं.त्र्य.खानोलकरानी लिहिली आहे.त्यानंतर राजकमल कला मंदिरचा "चानी" म्हणून चित्रपट व्ही.शांताराम यानी ह्याच कादंबरीच्या आधारावर काढला होता. कोकणातल्या धामापूर ह्या गावात त्या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरझालं होतं.

हे सर्व एव्हड्यासाठी आठवलं की आमच्या कोकणातल्या घरातल्या मागच्या पोरसात चान्या खूपच दिसतात.ह्या चान्या ज्यावेळी काहीही कुरतडत असतात त्यावेळी मला अगदी वैताग येतो. ज्यावेळी घराच्या अगदी जवळ येऊन त्यांचे इवलुशे पाय एखाद्या वस्तूवर खरड खरड खरडतात त्यावेळी मला कशावरही ध्यान देता येत नाही.एव्हडा तो आवाज मला एकाग्र राहू देत नाही. परंतु,मी हे सर्व निभावून नेत असे कारण मी ह्या जगात काही एकटाच रहायला आलेला नव्हतो. एखादा लहानसा खडा तिच्या अंगावरून फेकून ओरडायचो,
"जा चालते व्हा इथून".
पण माझ्याकडे त्यांच लक्ष कुठे असायचं. खारी,मांजरं उंदीर माझे सहचर किंवा साथी आहेत असं मला वाटायचं.
रोज सक्काळी मी कोकणातल्या रानातून फिरायला जायचो.चालताना,पाया खाली सुकलेला पाचोळा चूरचूर करी असायचा. जांभळांची उंच झाडं,रातांब्याची झाडं-त्यावरच्या लालबूंद फळापासून कोकम करतात- तसंच केवड्याची बनं, औदुंबराची, वडाची, पिंपळाची मोठ मोठी झाडं गर्द रानाची आठवण करून द्यायची.

जवळपासची ओली दलदलीत जमीन,आणि मधून मधून येणारे मातीचे उंचवटे कित्येक वर्षापासून होणार्‍या स्तित्यंतराची आठवण करून द्यायची.रानटी गवताच्या कडेकडेने जाताना ओबडधोबड दगडांच्या राशीत रचून ठेवल्यासारखे दिसणारे पण नैसर्गिकरीत्या तयार झालेली संथ झर्‍याची वाट शेवटी उतारावर येणार्‍या मोठ्या डबक्यात जाऊन संपते ते पाहून निसर्गसुद्धा त्यानेच केलेले नियम तोडत नाही हे लक्षात यायचं. मी ह्याच झर्‍य़ाचं दोन ओंजळी स्पटिकासारखं स्वच्छ पाणी तहान भागवण्यसाठी पित असे.पण आता इथे वस्ती वाढत असल्याने पूर्वीचं वातावरण राहिलं नाही.पाणी दुषीत झालं असावं उगाचच वाटतं.
उजाडत आहे हे चारी बाजूच्या पिवळ्या किरणांनी झाडांच्या फांद्या फांद्यातून शिरकाव करून जमिनीवरचा रंग पिवळा केल्याने ध्यानात यायचं.पुढे गेल्यावर त्या सूर्यनारायणाचं दर्शन झाल्यावर मन अगदी प्रसन्न व्हायचं.सूर्य हे जीवन आहे असं कुणी म्हटलं ते खोटं नाही.

रात्री कधी तरी पाऊस पडून गेला असायचा.पाऊस कसला एखादी सर येऊन गेली असावी.कारण झाडा झुडपावरची पानं आणि फुलं ओली झालेली दिसायची.
मला आठवतं ऐन पावसाळ्यात मी ह्या ठिकाणी उभापण राहू शकत नव्हतो.चालायचं झालं तर चिखलातून फार कष्टाने पावलं टाकावी लागायची.वरून पावसाचे मोठाले थेंब उंच झाडांच्या पानात जमून खाली पडताना कुणी मुद्दाम अंगावर पाणी शिंपडीत असावं असं वाटायचं.जमलेल्या पाण्याच्या पाणवाटा आणि हवेतल्या प्राणवायुमुळे बनलेले बुडबुडे आपोआप बनायचे आणि फुटून पण जायचे.

कोकणातला पाऊस! तो पडून गेल्यावर धबधब्या सारखा पूर आणायचा.हे सर्व पाणी जातं कुठे म्हणून अचंबा वाटून शोध लावला तर दिसून येईल ह्या लहान लहान पाणवाटांचे झरे व्हायचे,हे झरे डबक्यांत ओतले जाऊन ती डबकी पूर्ण भरल्यावर ओतून जायची,आणि ती लबालब भरलेली डबकी दिसेनाशी होऊन त्यातून छोट्या तलावात रुपांतरीत व्हायची. आणि ते तलाव भरभरून नाले बनायचे.ह्याच नाल्यांची नदी बनून शेवट समुद्रात मिसळून जायची.आणि तो समुद्र इथून पाच पन्नास मैलावर दिसायचा. ह्या रानात पडलेल्या पावसाच्या थेंबांचा प्रवास अशा तर्‍हेने शेकडो मैलांचा व्हायचा.

कधी कधी एखादा लहानसा नाला ओलांडून जायचं झाल्यास कंबरभर पाणी असायचं.नाल्यात आत शिरताना चिखल आणि बाहेर पडतानाही चिखल असायचा.जरा पाणी जमा झालं की कोकणातली जमीन चिखलात रुपांतरीत होते.मग त्या चिखलात बेडूक,गोडे मासे आणि आजुबाजूला डांस उत्पन्न व्हायचे.एका हातात काठी असेल आणि दुसर्‍या हातात केवड्याचं फूल असेल तर ह्या डांसांचा उपद्र्व आणि गुणगुणणं चुकवायला दोन्ही हाताचा खांद्या कडचा भाग कानाजवळ उंचावून उपयोगात आणल्या शिवाय गत्यंतर नसायचं.

हे चिखलातले बेडूक हळू हळू चिखलातून बाहेर पडून झाडावर राहायला जायचे.माझ्या पायाच्या अंगठ्यापेक्षा मोठे नसलेले हे प्राणी ओरडायला लागले की माझ्या कानाचे पडदे एव्हडे कंप पावायचे की असलं संगीत कुठेही न ऐकल्याचं आठवायचं.
हे सर्व प्राणी त्याशिवाय सरपटणारे बुरयाटे-मास्यांचाच प्रकार- काही जंगली बदकं असल्या ह्या क्वचीतच दिसणर्‍या प्राण्यामधे मला मी हजर असलेला पाहून माझी मलाच गंमत वाटायची.
मला आठवतं मी इकडे केवळ कुतूहल म्हणूनच येत नव्हतो.किंवा मनोरंजन होण्यासाठी येत नव्हतो.इथे आल्यावर मला वाटायचं की मी पण ह्यांच्यातला एक प्राणीच आहे.निसर्गाची नाडी मला भासायची.ह्या कबिराच्या विणलेल्या शेल्यामधे मी एखादा टाकां असावा.
ह्या रानातून मी रोजच फेरफटका मारायचो.ते किटक,ते प्राणी,तो पाऊस ती झाडं,त्यांच्या सानिध्यात झाडांच्या पानावरची ओली माती माझ्या कपड्यांना लागायची.
कधी कधी मी घसरून चिखलात पडायचो.त्या चिखलात कुजून गाडलेली जूनी पानं,मेलेले बेडूक जवळून पहायला मिळायचे.
पहाटेचा काळोख संपून उजाडल्यावर हे निसर्गाचं मंदिर उजाळून यायचं.
जेव्हड्या निसंदेहाने मला हवेतून श्वास घ्यावा लागायचा,तहानेसाठी पाणी प्यावं लागायचं,भूकेसाठी खावं लागयचं तेव्हडंच मला वाटायचं की निसर्गाचा ह्या धरतीचा,पाण्याचा,आगीचा,हवेचा मी एक अंश आहे. म्हणूनच मी रोज पहाटे उठून ह्या रानातून फेरफटका मारायचो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

निसर्ग म्हणजेच मुक्ति देणारा,निवारण करणारा.

ह्यावेळी जेव्हा मी वेंगुर्ल्याला भेट दिली तेव्हा कोळी वाड्यातल्या माझ्या जुन्या मित्रांना निक्षून भेटण्याचं ठरवलं होतं.समुद्रामार्गे बाहेरून आलेला व्यापार्‍यांचा माल मांडवीवर उतरवतात.ही मांडवी म्हणजे समुद्राला मिळणारी खाडीच असते.बरेचसे कोळीवाडे ह्या मांडवीच्या परिसरात विखुरलेले आहेत.
फास्कू फर्नांडीस आणि पावलू फर्नांडीस हे दोघे भाऊ माझे जुने दोस्त आहेत.फास्कू आता इंग्लंडला स्थाईक झाला आहे असं मला कुणीतरी सांगतलं होतं.निदान पावलू भेटेल ह्या आशेने कोळीवाड्यात आज गेलो होतो.सकाळची वेळ होती.त्याच्या घरी गेल्यावर मला कळलं,पावलू आणि इतर कोळी समुद्र किनार्‍यावर गेले असून रापण ओढून दुपारच्या बाजारासाठी मासे निवडायला गेले आहेत.
वेंगुर्ल्याच्या समुद्रावर मला नेहमीच जायला आवडतं.किनार्‍यावर बरेच खपाटे लागले होते.आणि प्रत्येकाच्या रापणी ओढल्या जात होत्या.रापण ओढणं म्हणजे समुद्रात टाकलेलं जाळं ओढणं.त्यात अडकेलेले मासे किनार्‍यावर निवडून टोपल्यात जमा करायचे. किनार्‍यावर विचारत विचारत पावलूची रापण कुठे आहे ते कळलं.पावलूला हुडकून काढलं.मला बघून तो इतका खूश झाला की म्हणाला,
"चल आपण घरी जाऊया.दुपारी जेवायला आमच्याकडेच रहा.अगोदर आपण "काजूची" घेऊं या."
असं म्हणून माझ्याकडे मिष्किल बघत राहिला.मी पण हंसलो दोघे समजायचं ते समजलो.
जेवण झाल्यावर जुन्या गोष्टी निघाल्या.पावलू लहान असताना समुद्रात बुडून कालवश व्हायचा वाचला हे मला माहित होतं.पण संपूर्ण हातसा माहित नव्हता.
मी म्हणालो,
"काय रे झालं त्यावेळी? फास्कू कडून मी ऐकलं होतं.आता तू मला चांगला रंगवून रंगवून सांगशीलच कारण आता तू लेख लिहितोस लोकल वर्तमानपत्रात.मी वाचले आहेत ते."
पावलू जरा खजील होऊन मला म्हणाला,
"काय रे माझी टिंगल करतोस काय? मला आता पंचवीस वर्ष मागे जाऊन सर्व गोष्ट रंगवावी लागेल तुझ्यासाठी."
"मी आजचा दिवस तुझ्याकडेच घालवायला आलो आहे.तेव्हा मला वेळ भरपूर आहे तुला ऐकायला."
परत "काजूची" घेत घेत मला म्हणाला,
"ही घेतल्याशिवाय मला मूड येणार नाही.
निसर्गाच्या शक्तिवर माझा भरवंसा आहे.माझ्या अंतरातली घमेंड तो चांगलीच उतरूं शकतो. निसर्गाचं बळ केव्हढं तरी प्रभावशाली आणि रहस्यपूर्ण आहे आणि माझ्यात असलेला अहमगंड मिटवून टाकून ज्या गोष्टी अविनाशी आहेत आणि दृढ आहेत त्यांची रूपं मला त्याच्याकडून पहायला मिळाली.
वेंगुर्ल्याच्या समुद्रकिनारी अगदी लहानपणा पासून वाढलेला मी. निसर्गाचा सगळ्यात आश्चर्यजनक आणि हानिकारक डावखेळणारा जो-समुद्र त्याच्या सानिध्यात वाढलेला मी."
मी म्हणालो,
"अरे तुम्ही गाबित लोक समुद्राच्या अंगा-खांद्यावर खेळणारे,मग तुला कसला आला धोका?"

"मी पट्टीचा पोहणारा.मासे पकडणार्‍या जमातीत जन्माला आलो असल्याने समुद्राच्या पाण्यावर प्रेम करीत होतो.माझ्या वडीलांबरोबर समुद्राच्या पाण्यात मी पहिली डुबकी मारली.तुला माहित आहेच तुझ्या सारखं आजकाल मी लेखन करतो.समुद्र आणि समुद्राच्या मासेमारीबद्दल पोटतिडकीने लिखाण करतो.मी समुद्राचं आनंद देण्याचं वातावरण पाहिलंय तसंच त्याचा प्रकोप आणि त्याने केलेला विनाशही पाहिला आहे."
"तू काही ही म्हण,पण मला त्या समुद्राच्या लाटाबघून धडकी भरते.आणि तुम्ही लोक बिनधास्त लहान लहान होड्या घेऊन वल्व्हत असता."
असं मी मधेच त्याला थांबवून म्हणालो.
हाताने ऐक माझं असं दर्शवीत मला पावलू म्हणाला,

"समुद्राच्या अचाट शक्तिची ओळख मला एकदा अगदी चांगलीच जाणवली त्याला बराच काळ होऊन गेला.तो सुंदर उन्हाळ्यातला दिवस होता.आकाश अगदी निरभ्र होतं.गोव्याच्या दिशेने येणारा
गरम वारा वादळी हवे सारखा वाटत होता.जरी मी त्यावेळी नुकताच पंचवीशीतला तरूण होतो तरी अगदी लहानपणापासूनची माझी समुद्राशी ओळख होतीच. मी अगदी निश्चिंत होतो.समाधान होतो.तरीसुद्धा अंगात असलेला आवेश आणि तरूण रक्ताचा जोश असतानाही मी अगदी उजाड वातावरणाचे मूलभूत धडे विसरलो होतो.-मर्यादेत राहणं आणि एकटंच नसणं.समुद्रातले दर्दी पोहणारे ह्या घमेंडीला "मार खाणं"म्हणतात. उंचच उंच लाटेला हे संबोधून आहे.ह्या शक्तिमान लाटा किती शारिरीक हानि देऊं शकतात ह्याचं वर्णन करणारा धडा ऐकताना तो धडा जास्त गहरा वाटतो.

त्यादिवशी एक उंच प्रचंड आणि सुंदर लाट येते हे पाहून मी त्या लाटेत शिरायला नको होतं.त्या राक्षसी लाटेच्या जबड्यात मी खेचला गेलो होतो.आणि वळकटणार्‍या त्या लाटेच्या घडीत माझे दोन्ही पाय सुन्न झाले होते.माझ्या दोन्ही पायांच्या संवेदना गेल्या असं वाटायला लागलं. ती फुगलेली लाट निरंतर प्रचंड व्हायला लागली तसा मी किनार्‍याकडे झेप घेण्याच्या प्रयत्नात राहिलो.आता मी त्या लाटेच्या आधीनच झालो.आणि काही क्षणात त्या प्रचंड लाटेने मला किनार्‍यावरच्या वाळूत थुंकून टाकलं.मी अगदी स्तम्भित होऊन एकडे तिकडे पहात होतो.वारा सारा पूर्वी सारखाच वाहत होता.पक्षी एकमेकाला आकाशात पकडापकडी करीत होते. दुसरी लाट आली,वळकटली गेली आणि फुटली आणि हे होत असताना सूर्य किरणं पूर्वी सारखीच चमचमत होती.प्रकृतीवाद्यांचं म्हणणं "जपून चाल करावी".मी जवळ जवळ डुबलो होतो.
समुद्रातल्या माझ्या पोहण्याच्या अनुभवाचं नांवनिशाण नव्हतं. असलीच तर माझ्या मनातली फक्त समजूत होती.अनेक क्षेत्रात मनुष्य जसा अपरिचीतासारखा असतो तसं समुद्राचं क्षेत्रपण त्याला असतं.हा समुद्र रहस्यमय असतो,त्याचं क्षेत्र अज्ञेय असून त्याच्या प्रतापाचं प्रकटन अनुभवातूनच कळतं. मी मात्र त्या समुद्राच्या सामर्थ्याला मानतो.त्याची मनोहरता-असं म्हणणं कदाचित विरोधाभासी वाटेल-पण त्या सूर्याच्या उन्हाने चमकणार्‍या दिवशी वेंगुर्ल्याच्या समुद्राकडे बघून मी निसर्गाला मुक्ति देणारा,निवारण करणारा असं मानतो.त्यादिवशी मी वेंगुर्ल्याच्या समुद्रात माझा निरर्थक समय बरबात करीत होतो, आणि मला मात्र त्याने किनार्‍यावर फेकून देऊन माझी जागा मला दाखवली.जणू त्यादिवशी त्याने मला समजावलं की,
"जा तू तुझ्या गोतावळ्यात जा,त्यांची समज घाल आणि सांग त्याना त्या क्रमावलीत त्यांची जागा कुठे उचित आहे ती.त्यामुळे आपण सर्व एकमेकाचे समर्थक राहूं."
पावलू पित पित सांगत होता.पण मीच त्याला आवर घातला.
"मी आहे आणखी कांही दिवस वेंगुर्ल्यात.येईन तुझ्याकडे गप्पा करायला"
असं सांगून मी पावलूचा निरोप घेतला.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, May 23, 2009

आयुष्यात येणार्‍या धूसरपणाला मी मानते.

आज एक गंमतच झाली.ईंगळ्यांची यमी आमच्या घरी बसायला आली होती.तशी यमी मला लहानच.
आमच्या बालपणात कोकणात मृगनक्षत्रात पावसाच्यापहिल्या सरीत बाहेर अंगणात जाऊन पावसात न्हाऊन घ्यायची आमच्यात चढाओढ असायची.
“सर्वांत प्रथम तू सुरवात करायचीस होना यमे?”
असा मी प्रश्न केल्यावर यमी म्हणाली,
“हो एकदा मला आठवतं माझ्या अंगात एक ताप होता.ते ढगांचं गडगडणं,विजांचं चमकणं,पाहून मला अंथरूणात पडून रहायला कसंसंच वाटत होतं.मी बाबांचा डोळा चुकवून सर्वांच्या अगोदर अंगणात आले होते.”
“हो मला आठवतं त्यावेळी तुझ्या बाबांनी तुला बाहेर येऊन फरफटत घरात नेलं होतं.तू रडत होतीस. आणि काही वेळाने घरातून तू आमच्याकडे पावसात न्हाताना हताश होऊन पहात होतीस.आम्ही तुला चिडवायला वाकुल्या दाखवीत होतो.”
असं मी म्हणाल्यावर,
“अरे सगळ्यांचेच आईवडील बाहेर जास्त वेळ न्हाऊं नका आजारी पडायला होईल. आणि मग शाळा चुकेल”असं ओरडून सांगायचे.पण अंगणातली आरडाओरड ऐकून वाड्यातली सर्वच मुलं घरात बसायला कबूल नसायची.”
असं सांगून यमी म्हणाली,
“माझ्या लहानपणी कुणी पावसाळ्याला बघून किंवा ढगाळ आकाशाकडे बघून कुरकुर केली तर ते मला आवडत नसे.हे तर खरे माझे आवडीचे दिवस असायचे. प्रखर उन्हाचे दिवस मला जास्त बचैन करायचे. मला करडे ढग आकाशात तरंगताना पाहून,किंवा काळेकूट्ट पाण्याने भरलेले वादळी ढग जमलेल्या पाण्याचा भार ह्या धरतीवर मुक्त करणारे ढग पाहून मन प्रसन्न व्हायचं. वीजेची चकमक आणि ढगांची गर्जना ऐकून मी अचंबित व्ह्यायचे.
कधी कधी शांत करड्या ढगानी आच्छादलेलं आकाश मला परम संतोष द्यायचं.
ह्या धूसर रंगाच्या ढगानी आच्छादलेल्या आकाशाचं माझं वेड माझ्या प्रौढतेतपण वाढत गेलं.त्यावेळी मी माझ्या मुलांना आमच्या मागच्या परसात नेऊन झोपाळ्यावर बसवून गार हवेचा,नाकात शिरणार्‍या वासाचा,आणि आवाजाचा अनुभव घेण्यासाठी,आणि मृगनक्षत्राच्या आगमनाची आठवण करून देण्यासाठी जागृत रहायची.ह्या वातावरणाची त्यांच्या मनात भिती येऊ नये ह्याची दखल घ्यायची. लहानपणातल्या माझ्या मनातला ह्या वातावरणाचा विस्मय त्यांनाही अनुभवायला द्यायची.”
असं यमी आवर्जून सांगत होती.
मी म्हणालो,
“पण यमे,आतापण तुझ्या नातवंडाना पावसात न्हायाला देतेस का?
की अरे,पावसात भिजून आजारी व्हाल असं आजीच्या नात्याने त्यांना ओरडतेस?”
थोडं मिष्किल हंसून म्हणाली,
“काय रे माझी थट्टा करतोस.
आता मी वयस्कर झाली आहे. मुलंपण मोठी झाली आहेत.नातवंड पण आता नव्या जमान्यातली आहेत.माझ्या पतीना आणि मुलांना आणि नातवंडाना पण उन्हाळ्याचे दिवस चांगले वाटतात.आणि त्यांच्याबरोबर मी पण लख्ख उन्हाच्या दिवसांबद्दल प्रशंसा करायला लागली आहे.माझ्या कुंटूबाच्या आनंदात मश्गुल होण्यात मी माझ्या वृतीत बदलाव आणला आहे.

त्या माझ्या प्रौढवयात ज्यावेळी मी स्वतःच्या विचारधारांचं आणि मूल्यांचं अन्वेषण करायची त्यावेळी जास्तकरून प्रत्येक गोष्टीत माझी निवड एकतर फक्तकाळं किंवा सफेद ह्याच दृष्टीकोनातून पहाण्यात असायची. पटकन निर्णय घ्यायची. पटकन कोणतीही गोष्ट अस्वीकार करायची.आणि पटकन माझंच खरं मानायची. मला त्यावेळी वाटायचं की योग्य मार्गाची निवड करणं, नैतिकतेची वरची पातळी निवडणं ही एक ज्याची त्याची स्वाभाविक पसंती असते.”
“आणि त्यानंतर तू डॉक्टर झालीस.तुझ्या विचारसरणीत सहाजीकच त्यामुळे आणखी बदलाव आला असावा.”
“हो अगदी बरोबर बोललास”
असं म्हणून यमी म्हणाली,
”नंतर माझ्या डॉक्टरी पेशामधे जशी मी आजा‍र्‍यांना आणि त्यांच्या कुटूंबियाना हाताळायची तशी माझ्या लक्षात यायला लागलं की पुष्कळशी आव्हानं आणि जीवनात येणारी वादळं क्वचितच संपूर्ण काळी किंवा संपूर्ण सफेद असतात. माझे बरेचसे सहकारी एखाद्या आजार्‍याला तो व्यसनी आहे म्हणून निकाल द्यायचे, त्यावेळी मी समजायचे की ह्यातील बरचसे आजारी निष्ठा ठेऊन असायचे की एक ना एक दिवस ते सुधारणार आहेत.आपल्या आजारावर मात करणार आहेत.फक्त फरक एव्हडाच की त्यांच्याहून त्यांना सुधारायला ते असमर्थ आहेत.
मी ह्यातून शिकले की क्वचितच ह्या व्याधींची चिकित्सा अशीच काळी तरी किंवा सफेद तरी असावी.ह्या चिकित्सा पुस्तकात लिहिल्या प्रमाणे बहुदा नसायच्या.काही व्याधी तर अश्या आहेत की त्यांच्या चिकित्सा शंभर टक्के खात्रीलायक असणं दुरापास्त आहे. एखाद्या साध्या कानाच्या दुखण्याचं गांभिर्य अनेक छटामधे दिसून येईल.
हे प्रकृतीचे औषोधोपचार सर्व कूट प्रश्नात सामाविष्ट आहेत.त्यांना स्वाभाविक किंवा सहज उत्तरं नाहित.त्याचं उत्तर काळं तरी किंवा सफेद तरी असं मुळीच नाही.

परंतु,आता मात्र माझ्या बालपणात वाटायचं तसं ह्या धूसर वाटणार्‍या जीवनामधे मला शांती मिळायला लागली आहे.सहजगत्या आणि पटकन निर्णय घेणार्‍या बर्‍याच लोकांकडे बघून मी उदासिन होते.माझ्या कुटूंबात, माझ्या विचारसरणीत, माझ्या व्यवसायात,माझ्या मैत्रीत आणि माझ्या वयक्तिक मुल्यांत मला रंगांचा वर्णक्रम दिसतो,तसंच एक सातत्यही दिसतं.
ह्या धूसर वाटणार्‍या जीवनात मला उदासिनतेची नव्हे तर शांती आणि समाधानाची उपलब्धता होते.”
हा विषय बदलण्यापूर्वी मी यमीला म्हणालो,
“यमे,हा हवामानाचा परिणाम की वयोमानाचा परिणाम असावा?”
“तुझी आपली नेहमी थट्टाच असते”
असं म्हणून यमीने हा विषय बदलला.


श्रीकृष्ण सामंत (कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, May 21, 2009

जनावरांच्या सानिध्यात मिळणारी शांती.

“ते २००६ साल होतं.मी निवृत्त झालो होतो.निवृत्ती नंतर वेळ कसा घालवायचा हा माझ्या पुढे आलेला मोठा प्रश्न होता.हा प्रश्न मला एक आव्हान होतं.तशी आता पर्यंतच्या जीवनात मी अनेक आव्हानं स्विकारली आणि त्यातून बाहेर पण पडलो. पण हे आव्हान जरा जबरी होतं.मला हवी तशी आणि मला जरूरी आहे तशी एकही गोष्ट लक्षात येत नव्हती.मुंबईला माझ्या घरात बसून सतत चिंता करण्या पलिकडे काही जमत नव्हतं.मला वाटायचं की अशी चिंता करीतच माझं आयुष्य संपणार की काय? तसं माझं पैशाचं सेव्हिंग जरूरी प्रमाणे होतं.रस्त्यावर येण्याची काही पाळी नव्हती.एक निर्बल करणारी उत्कंठा होती की घर सोडून मुंबईहून बाहेर जाणं म्हणजे एक महत्वपूर्ण व्याप होता. “

माझा मावसभाऊ जून्या आठवणी काढून मला हे सांगत होता. आता हा माझा मावसभाऊ कोकणात मांडकूलीला राहत आहे. हे गांव कोकणात कुडाळ पासून तीन मैलावर आहे.भावाची शेतीवाडी,गाई-गुरं आहेत.घरही तसं मोठं आहे.मी त्याला भेटायला गेलो होतो.

“काही तरी स्वेच्छेने काम करावं असं मनात येत होतं. शेती आणि त्यासाठी लागणारी माहिती शहरात वाढलेल्या मला कुठून मिळणार.सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत मिटिंग्स मिटिंग्स आणि मिटिंग्स घेण्यात आणि मिटिंगला हजर राहण्यात आयुष्य गेलं.हातपाय मोडून कंबर कसून काम करायची जबाबदारी जरा हटकून वाटत होती.”

मी त्याला म्हणालो,
“लहानपणी मावशीकडे शाळेच्या सुट्टीत मी येऊन राहयचो. तिची शेती आणि गाई-गुरं संभाळून कंबर कसून काम करण्याची जीद्द मी पाहिली होती.जोताला लावलेली पवळ्या-ढवळ्या बैलाची जोडी आठवते, कपिला आणि तिचं वासरूं तानु आणि त्यांची नीगा ठेवण्याची कामं, मावशी नोकरांकडून करून घ्यायची. गाईला चारा घालून झाल्यावर सकाळच्या वेळी चकचकीत घासलेली पितळेची दुधाची चरवी आणून गाईच्या आंचळांना चरवीतल्या थंड पाण्याने झपकारून झाल्यावर तानुचा दावा सैल करून सोडून दिल्यावर ते चार खूरावर उंच उड्या मारीत आपली शेपटी उंच ताठ करून आपल्या आईच्या आंचळाना लुचायला जाताना आणि कपिलापण आपलं बाळ दुध प्यायला आल्यावर प्रेमाने त्याला चाटून चाटून गोंजारातना पाहून ह्या मुक्या प्राण्यांचं निष्पाप प्रेम बघून माझा जीव कासाविस व्ह्यायचा.तानु सुद्धा आपल्या आईचं दुध लुचता लुचता आणि जबड्यातून दुध बाहेर पडत असताना सुद्धा आणखी धार मिळावी म्हणून आईच्या आंचळाना ढुसक्या मारताना पाहून माझ्या मनात यायचं की किती हा अधिरेपणा? पण ती अधिरता नव्हती ते एक पुन्हा त्या मुक्या प्राण्याचं -तानुचं- गगनातल्या आनंदाचं प्रतिक असावं.”

माझं हे लहानपणातलं अनुभवाचं वर्णन ऐकून मला माझा भाऊ म्हणतो कसा,
“हे मीही पाहिलं होतं.पण एकदा मुंबईत आल्यानंतर इकडच्या दुनियादारीत आणि व्यापात जीवन इतकं गुरफटून गेलं होतं की,कधीतरी आईला भेटायला म्हणून कोकणात गेलो तर दोन चार दिवसाची धांवती भेट असायची,आणि मुंबईतल्या कामाचाच बोजा डोक्यावर सतत असल्याने हे बालपणातलं जीवन आठवून मश्गुल व्हायला मनस्थिती नसायची.
तू आता म्हणालास तेव्हा माझ्या आठवणी जागृत झाल्या.
पण कपिला बिचारी गेली.तानुला आता दोन पाडसं झाली आहेत.कपिले सारखीच तानू दूध भरपूर देते. आईच्याच वळणावर गेली आहे.”

“तू बरं केलंस.निवृत्त झाल्यावर तुझा इकडे येण्याचा विचार मला आवडला.नोकरी करणार्‍यानी शहरात विशेष करून मुंबई सारख्या शहरात गर्दी करून राहणं निराळं आणि निवृत्तीत आल्यावर संध्याकाळी बाल्कनीत बसून किती बसीस गेल्या आणि किती ट्रक रस्त्यावरून पास झाले ह्याची गणती करण्यात जीवन कामी लावण्यात काही अर्थ नाही.आणि जास्त करून तुझ्यासारख्या लोकानी ज्यांना कोकणात शेतीवाडी आहे अशा लोकानी तर जरूर तसं करूं नये.”
असं मी म्हणाल्यावर मला भाऊ सांगू लागला,
“तुला खरं सांगायचं तर ही प्राण्यांची ओढ मला निवृत्त होऊन इथे आल्यावर तू मघाशी वर्णन केल्यास त्या बालपणाच्या आठवणी येऊन मुंबईच्या त्या धकाधकीच्या जीवनाची उबग आणायची. ह्या प्राण्यांच्या सानिध्यात राहाण्यासारखं दुसरं स्थान मला जगात मिळणार नाही अशी मनात आता खात्री झाली आहे.
अश्या ठिकाणी मी आनंदी राहिन आणि माझी ह्या प्राण्यांना जरूरीही भासेल हे मनात येऊन माझ्या मनाला तृप्ति मिळायला लागली.
इथे येऊन राहण्यापूर्वी माझ्या मनात भय होतं आणि माझ्या जीवनाच्या त्या टप्प्यात कशाचीच खात्री नसलेल्या गोष्टींच्या विवंचनेत राहाण्याचं स्थित्यंतर त्यावेळी आलं होतं.”

आता माझी मनातली भिती गेली आहे.आणि त्याचं कारण हे मुकेप्राणीच आहेत. गाई,वासरं,बैल,शेळ्या,कोंबड्या हे पाळीव प्राणी मला आता परिचीत झाले आहेत आणि ते मला आत्मिक अनुभव देत आहेत.ह्या प्राण्यांच्या सानिध्यात असल्यावर एक कायापालट झाल्या सारखं वाटायला लागलं.शहरात राहून जी परंपरा अनुभवीत असायचो त्याचा विचार येऊन,
“गेली ३५ वर्षं मी कुठे होतो?”
असा प्रश्न कधी कधी आपसूप मनात येतो. आता मी ह्या मुक्या प्राण्यांच्या सानिध्यात त्यांचं अवलोकन करतो, त्यांना मदत करतो.त्यांचा साथी आणि सहयोगी अशीच भुमिका पार पाडताना माझं मन प्रसन्न होतं.
अलीकडे माझ्या लक्षात आलं की मी विचारही करूं शकणार नाही अश्या प्रकारे माझं क्षितिज मी विकसित केलं आहे. ह्या प्राण्यांची देखभाल करता करता मी स्वतःच माझा फायदा करून घेत आहे.
ह्या मुक्या प्राण्यांच्या सहवासात राहून माझ्या मनाला शांती मिळत आहे.”
जेवायची वेळ झाली होती.उठतां उठतां मी त्याला म्हणालो,
“हे सगळे समजूतीचे खेळ आहेत.जनावरांच्या सानिध्यात जर का तुला शांति मिळते,तर ते अगदी नैसर्गिक आहे.आणि ते तू सांगू शकतोस.पण क्षणभर विचार कर त्या मुक्या प्राण्यांना तुला त्यांच्या सानिध्यात पाहून त्यांना किती आनंद होत असेल.
मी तर म्हणेन तुम्हा दोघां मधली ही निसर्गाचीच ओढ असावी. फक्त ते प्राणी मुके असल्याने तुला तसं ते सांगू शकत नाहीत एव्हडंच.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, May 19, 2009

जुन्यात जूनं अलौकिक औषध.

अलिकडेच फार्मसूटीकल डिग्री घेऊन नोकरीला लागलेला माझा भाचा मला आपल्या नोकरीचा अनुभव सांगत होता.
मी त्याला म्हणालो,
"अनेक रोगावरची औषधं घ्यायला तुझ्या फार्मसीत लोक येत असतील.पण तुला विशेष वाटलेलं औषध कुठलं की ज्याने तुला कुतूहल वाटत असेल?"
मला म्हणाला,
"तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला.इतर अनेक औषधं
घ्यायला लोक येतात.पण जे लोक उदासिनता कमी होण्यासाठी-Anti-Depressant- औषधं घ्यायला येतात जसं Prozac किंवा Xanax सारखी औषधं घेऊन जातात त्यांच मला जास्त कुतूहल वाटतं.
तुम्हाला माहितच आहे की आत्ताच मी एक नवीन जॉब घेतला.एका फार्मसीत मी कामाला लागलो.मला हा माझा जॉब आवडतो आणि मी नियमीत जॉबवर जातो. क्वचीत वेळा आनंदी लोकांपेक्षा रागीष्ठ लोकांशी माझी गाठ पडते.ह्या रागीष्ठ लोकांचं मी पाहिलंय अगदी बरेच वेळा हे लोक कसलं ना कसलं राग कमी करण्याचं औषध घेत असतात.ह्यामुळे मला आश्चर्य वाटतं की कदाचीत ह्या लोकांच्या जीवनात- ह्या दोन चार गोळ्यांच्या औषधापेक्षा- आणखी काही तरी कमी पडत असणार.
शेकडो नव्हेतर हजारो वर्षापासून ह्या व्याधीवर हास्य हे अगदी नैसर्गिक औषध असावं हे सर्वांना माहित आहे.काही म्हणतात हंसत राहिल्यामुळे आपली शरिरातली प्रतिकार-शक्ति उचल खाते,हृदयाला मजबूत केलं जातं आणि उच्च रक्तदाब असला तर तो कमी होतो.
सर्वात महत्वाचं म्हणजे हंसण्यामुळे एखाद्याची चित्तवृत्ती उचल खाते.मनावरचा भार कमी होतो आणि सर्वसाधारणपणे सभोवतालचं वातावरण चांगलं वाटतं.
कुणी तरी म्हटलंय,
"औषधाच्या उपायाची कला अशी आहे की आजार्‍याला जमेल तेव्हडं आनंदी ठेवायचं आणि मग त्याचा रोग निसर्गच बरा करतो."
डॉक्टरकडे जाण्यापूर्वी तोंड ओळख म्हणून काही लोक सहजच मला ह्या व्याधीवर एखादं जास्त खप असलेलं औषध आहे का म्हणून कुतूहलाने विचारतात."
"मग तू डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय एखादं औषध सांगतोस का?"
ह्या माझ्या प्रश्नावर माझ्या भाचा मला सांगतो,
"ते कसं शक्य आहे?ते बेकायदा होईल.नव्हेतर माझ्या ज्ञानाची सीमा मी ओलांडल्या सारखं होईल."
माझा भाचा मला पूढे सांगतो,
"मी माझ्या एका डॉक्टर मित्राला एकदा विचारलं,
मला एक कोडं पडलंय ते मी तुला विचारतो, मागल्या कुठल्या वेळेला तुझा एखादा पेशंट हंसहंस हंसला आणि मग रडायला लागला, कां असं पण झालं असेल कां एखादा हंसण्याच्या औषधाची गोळी तुझ्याकडून मिळावी म्हणून वाट पहात होता.?"
तो माझा डॉक्टर मित्र मला म्हणाला,
" मला एक माहित आहे की, मनावरचा भरपूर भार आणि मनावरचं दुःख हे माणसाच्या जीवनात एखाद्या अघटित किंवा दुःखद घटनामुळे येतं."
हे त्या डॉक्टरचं मत ऐकल्यावर माझा भाचा मला सांगतो,
"ही वास्तविकता मला चांगलीच माहित आहे.माझी स्वतःचीच कथा मी एखाद्या मासिकात देऊ शकतो. माझ्यावर आलेल्या एकूण दुःखद प्रसंगातून माझ्या लक्षात आलंय की,ह्या सर्व हलक्या वेदना कमी करणार्‍या औषधापेक्षा अवतिभोवती असलेल्या जगाबरोबर हंसत रहाणं हे मला जास्त उपायकारक वाटतं.माझ्या जीवनातला अगदी दुःखद दिवस म्हणजे जेव्हा माझ्या अगदी जवळच्या मित्राचे वडील निधन पावले तो दिवस.

ते त्याचे वडील जणू मला माझे दुसरे वडील कसे होते.ज्या दिवशी मला त्यांची दुःखद घटना कळली मी तसाच दोन अडीच तासाचा गाडीचा प्रवास करीत माझ्या मित्राच्या घरी गेलो.
आम्ही दोघे आमच्या घरी परत येत होतो तेव्हा गाडीत अगदी शांत बसलो होतो.घर जवळ येता येता कुठून कुणाष्ठाऊक पाण्याचा पाईप फुटावा तसा माझा मित्र एकाएकी आम्ही पूर्वी ऐकलेला टीव्हीवरचा एक विनोद सांगू लागला.आणि त्या शांत वातावरणात एक हास्याची लहर निर्माण झाली.त्यावेळी आमच्या दोघांच्या लक्षात आलं की त्या उदास वातवरणात पण एखादा आनंदाचा फुलोरा उडतो.
मला अजून वाटतं की आमच्या विनोदितामुळेच- sense of humor- त्याच्या वडीलांच्या जाण्यानंतरच्या पुढच्या दिवसात आम्ही मार्ग काटू शकलो."
हे सर्व ऐकून मी माझ्या भाचाला म्हणालो,
" तुझ्या मित्राच्या वडीलांच्या दुःखद निधनाची गोष्ट आणि त्यानंतर तुमचा तो आनंदाचा फुलारा ह्याबद्दल जे मला तू सांगितलंस ते मला अगदी पटतं.पण
बाहेरच्या जगाला हे संवेदानाशून्य वाटेल.
परंतु,दिलीप प्रभावळकर आणि लक्शा बेरडे यांच्याजवळ असलेल्या हंसवण्याच्या शक्तिची मी अशावेळी जास्त कदर करतो."
माझं हे मत ऐकून माझा भाचा खूष झाला.
मला म्हणाला,
"हे विनोदी लोकच हंसण्याच्या ह्या जुन्यात जून्या नैसर्गीक औषधाचं नकळत फैलाव करीत असतात.
आणि Anti-depressant घ्यायची इतराना पाळी येत नसावी."
तसं पाहिलं तर माझ्या ह्या भाचाचं म्हणणं किती खरं आहे हे नाही काय?


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, May 17, 2009

बाबल्या मोचेमाडकर आणि आरती प्रभू

बरेच वर्षानी मी माझ्या आजोळी म्हणजे कोकणात आजगांवला जायला निघालो होतो.आजगांवला वेंगुर्ल्याच्या मार्गाने जाताना वाटेत शिरोडं लागतं.गोव्यात पण ह्याच नावाचं एक गांव आहे.ह्या शिरोड्या गावात वि.स.खांडेकर-प्रसिद्ध सिद्धहस्त लेखक,ज्ञानपीठ अवार्डचे मानकरी-राहत असायचे.वाटेत त्यांच घर लागतं.ह्या भागात येणारे टूरिस्ट वि.सं.च घर बघायला येतात.लांबून त्यांच्या घराला नमस्कार पण करतात. पण शिरोडं येण्यापूर्वी वेंगुर्ल्या मार्गे आजगांवला जायचं झाल्यास वाटेत मोचेमाडची नदी लागते.ती नदी पार करून जावं लागतं.

ह्यावेळी मी मोचेमाडला जरा उसंत घ्यायचा विचार केला.गरम गरम कांद्याच्या भजांचा वास आल्याने मी त्या ” हाटलात” शिरलो.एक प्लेट भजी आणि कपभर चहाची ऑर्डर दिली.जवळच पडलेलं लोकल वर्तमानपत्रात वाचत असताना,
“भावड्या मोचेमाडकराची खानावळ” अशी जाहिरात वाचली.मनात आलं “आपल्या” मुंबईला रहाणारा बाबल्या मोचेमाडकरची तर ही खानावळ नसेल ना?
“हाटलात” गल्ल्यावर बसलेल्या मॅनेजरकडे चौकशी केल्यावर कळलं की हो ती त्यांचीच खानावळ आहे.भावड्या हे बाबल्याच्या वडलांचं नाव.चाचपत चाचपत त्या पत्यावर गेलो.आणि खानावळीत डोकावून पाहिलं.
उघडा बंब खाली स्वच्छ पांढरा पंचा नेसून मला जवळ जवळ मिठी द्यायला तयार असलेला बाबल्या,
“अरे,तू हंय खंय?”
असा टिपकल मालवणीतून प्रश्न विचारीत माझ्या समोर येऊन ठपकला.
मी म्हणालो,
“बाबल्या,ह्याला म्हणतात, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी”
अरे मी विचार करीत होतो दुपारचं जेवण कुठे घ्यायचं?मी पेपर काय वाचतो आणि तुझी खानावळ काय जाहिरातीत दिसते?”
” मग चल जेवायला बस.मोचेमाडच्या नदीच्या खाडीतले गुंजूले आहेत,वेंगुर्ल्याहून मस्त पैकी सुरमई आणली आहे,गुंजूल्याचं तिखलं आणि सुरमईची तळलेली कापं खाऊन नंतर मस्त गप्पा मारूया.
अरे हो पण तू “घुटूं ” घेत नाहीस ना?पण हरकत नाही आज सोवळ्या ब्राम्हणाबरोबर पंगत आहे समजेन.”
हे बाबल्याचं आग्रहाचं भाषण ऐकून ते मालवणी जेवण मी कसं अव्हेर करणार?.
मी म्हणालो,
“असे योग पुन्हा पुन्हा येत नसतात.सर्व मंजूर आणि तू हवं तर तुला घूटू घेऊं शकतोस”
मालक आणि गिर्‍हाईक एकाच टेबलावर बसून मास्यांवर ताव मारायला लागलो. जेवणावर ताव मी मारत होतो आणि बाबल्या घूटूं चवीने पीत होता. तीरफळं घालून नारळ्याच्या जाड रसातलं तिख्खट तिखलं आणि उकड्या तांदळाचा गरम गरम भात मला एका तंद्रीत नेत होता तर बाबल्याची तंद्री जुन्या आठवणीच्या विश्वात त्याला घेऊन जात होती.
दुपारची वेळ असल्याने जेवायला दुसरी गिर्‍हाईकं येऊन जेवून जात होती.
“तू मुंबई सोडून लहान वयात इकडे आलास आणि आम्हाला विसरलास”
असं मी जरा लागट बोलल्यावर बाबल्या शेवटचा घुटूचा घोट संपवून मला म्हणाला,
“एव्हडं रातांब्याच्या सोलाचं सार आणि भात जेऊन घेतो आणि आपण वर माडीवर जाऊन गप्पा मारुया.”
माडीवर गेल्यावर बाबल्या बोलू लागला,
“त्यावेळी आम्ही मोचेमाडच्या नदीच्या खोर्‍यात ह्या गावात खानावळ काढली होती. मी त्यावेळी टीनएजर वयात होतो.मुंबईच्या शहरी वातावरणात वाढलेला मी ह्या खेड्यातल्या वातावारणात येऊन जरा बुजलो होतो.तसं मला शहरातून ह्या खेडवळ वातावरणात यायला आवडलं नव्हतं असं नाही.उलट मला नदी,नदीतल्या होड्या-खपाटे,मासे मारण्याच्या आणि जाळी टाकून मासे पकडून गावात विकायला आणण्याच्या कामात मजा यायची.”
हे ऐकून मी बाबल्याला म्हणालो,
“आजुबाजूचा डोंगराळ प्रदेश आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी हिरवी गार भाताची शेतं,डोंगर्‍याच्या माथ्यापासून खालपर्यंत त्या झाडांच्या गर्दीत काजूच्या झाडांची झूडपं, करवंदाची काटेरी झूडपं,झाडयाआब्यांची उंचच उंच झाडं,गावातल्या गुराख्यांनी चरण्यासाठी आणलेली गाई-गुरं आणि शेळ्या-बकर्‍या हे वातावरण पाहून कुणाही शहरातल्या सिमेंटकॉंक्रीटच्या जंगलात वाढलेल्या तुझ्या-माझ्या सारख्याला भारावून न गेल्यास नवलच म्ह्टलं पाहिजे.”
माझं हे आजूबाजूच्या प्रदेशातलं सृष्टीसौंदर्याचं वर्णन ऐकून मला बाबल्या म्हणतो कसा,
“तू पण माझ्या बरोबर त्यावेळी यायला पाहिजे होतं.मग तुझं कवी मन आणि माझं वाचनाचं वेड यातून काहीतरी घडलं असतं.”
मी म्हणालो,
“बाबल्या अजून तू ह्या खानावळीचा व्याप सांभाळून वाचनाचं वेड चालूंच ठेवलं आहेस कां?”
“अरे मी ह्या गल्यावर बसून चिं.त्र्यं.खानोलकर,मंगेश पाडगांवकर,वि.स. खांडेकर ह्यांची जवळ जवळ सर्व पुस्तकं वाचून फस्त केली आहेत.आरती प्रभू या नावाने चिं.त्र्यं.नी लिहिलेली कवितेची पुस्तकं त्यावेळी तू आणि मी आवडीने वाचायचो.आठवतं तुला?
“ये रे घना ये रे घना” ही कविता आणि लता का अशाने ते गायलेलं आणि श्रीनिवास खळ्यांचं संगीत ऐकायला काय मजा यायची.अजून ते गाणं कधीकधी रेडोयोवर लागतं.”
असं मी म्हणाल्यावर,बाबल्या आपल्या आयुष्यातल्या गंमती सांगू लागला,
“परंतु,मी आमच्या नवीन थाटलेल्या आमच्या फॅमेलीबिझीनेसला तसा तयार नव्हतो. त्या आव-जाव टाईपच्या लोकांच्या खानावळीत जेवायला येण्याच्या रोजच्या संवयीला मी मनापासून तयार नव्हतो. मुंबईतल्या त्या शहरातल्या विस्मयजनक आश्रीत असलेल्या जीवनशैलीशी आणि ह्या गावातल्या वातावरणाशी तुलना होऊच शकत नाही.
त्या वयात ह्या लोकांकडून काही चमत्कारीक घटना,गडबड असावी अशी वागुणूक आणि विस्मयजनक संकेत पहात असायचो.
एखाददिवशी मी अक्षरशः डोळ्यात पाणी आणायचो.एकदा मी माझ्या आईला विचारलं पण,
“आई हे लोक कुठून कुठून येतात गं!”
एक उदाहरण म्हणून सांगतो,
“तुम्ही मुलाला नदीत पोहायला पाठवू नका.कोणतरी म्हणत होतं की, मोचेमाडच्या नदीत मोरी-मुशी सारखे मांसे आहेत.”
असले बिनबुडाचे सल्ले माझ्या आईला द्यायचे.
मला माहित होतं की ह्या मोरी माशाला इंग्रजीत shark म्हणतात.हा मासा बहुदा खार्‍या पाण्यात असतो.आणि त्याला गोड्या पाण्यातले मासे खायला आवडत नाही. मोचेमाडच्या नदीचं पाणी अर्थात गोडं होतं,मोरी मासा समुद्रात पोहणार्‍या माणसांच्या शरिराचे लचके तोडतो.एव्हडीच भिती घालून मला नदीतल्या मजेदार जीवनापासून माझी फारकत करायला ही मंडळी पहात होती.मला खूप राग यायचा.
ही लक्षात आलेली एकच घटना मी तुला सांगितली. अश्या अनेक गोष्टी हे लोक जेवायला आले की करायचे. अश्या तर्‍हेच्या गोष्टी त्या वयात ऐकून आणि मिळालेला अनुभव घेऊन कुणालाही मनुष्याच्या शक्की स्वभावकडे बघून माझ्या सारख्याला त्यावेळी ह्या लोकांचं कौतूक वाटायचं आणि राग ही यायचा.
मला वाटायचं की हे लोक अज्ञानी आहेतच त्याशिवाय बुद्दु असून जागे असताना झोपेत चालल्यासारखं स्वतःच्या दिनक्रमात करीत असतात. मी मात्र ह्या लोकांपेक्षा नक्कीच तल्लख होतो.

पण जसं वय वाढत चाललं होतं तसा मी जास्त नम्र होत होतो.एक कारण की मी जसा जगात वावरायला लागलो तसा मी एखाद्या मठ्ठ व्यक्तिसारखा विस्मयजनक चूका करायला लागलो.मुख्यतः मी चलाख लोकांच्या सहवासात राहून चलाख व्हायला लागलो पण तसं पाहिलं तर आम्ही सर्व अजून मठ्ठच होतो.हळू हळू माझ्या लक्षात यायला लागलं की आपण बरेच जण असेच बर्‍याच गोष्टीबद्दल आणि बरेच वेळा संभ्रमात असतो.”
हे बाबल्याचं चिंतन ऐकून मी समजलो की बाबल्याचं घुटूं नक्कीच उतरलं होतं. आणि तो अगदी खुशीत येऊन बोलत होता.
“तसं पाहिलंत तर मानवाचा इतिहास ही एक अज्ञानता आणि पागलपणाची नामावली म्हणावी लागेल.आणि रोजचीच त्यात नवीन प्रकारच्या भयाची भर होत असते.पण हा इतिहास इतका सदोष असला तरी सगळेच भुकेने मरत नाहीत, बरेचसे तरूण भयंकर रोगाने मरत नाहीत,जीवन चालूच असतं.जरी ते जीवन उत्कृष्ट नसलं तरी बरचसं यथोचित असतं.”
मी बाबल्याला म्हणालो,
“आपल्याला शेती करता येते,दवादारू,संगीत,आणि कलेचं सानिध्य आहे. आता तर इंटरनेट आहे,टीव्ही आहे रेडियो आहे. जरी आपल्या अतृप्तीची आणि अपेक्षांची मोजमापं केली तरी ती समाधानकारक वाटतील.”
मला बाबल्या म्हणाला,
“तू म्हणतोस ते अगदी योग्य आहे.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती अशी की ही सर्व फलश्रुती “त्यांची” आणि “ते” लोक जे अज्ञानी आणि बुद्दु असे मला वाटले आणि ज्यानी माझ्या किशोरावस्थेत माझं जीवन हराम केलं त्यांची आहे.
मी मात्र चकित करणार्‍या ह्या मानवी आचारशिष्टतेची ही बलवत्ता मानतो. ही आचारशिष्टता जरी लडखडणारी, विपत्तीच्या सीमारेषेवर असणारी,दोन पाउलं पुढे आणि एक पाऊल मागे असलेल्या घोळात असलेली जरी भासली तरी असं असून सुद्धा आपण सर्व सांभाळून घेत आहोत.खरंच हे आश्चर्य करण्यालायक आहे.”
मी म्हणालो,
“अरे तुझी खरंच कमाल करावी लागेल.ह्या खानावळीच्या धंद्यात राहून सुद्धा तू तुझी साहित्यीक विचारसणी जास्त राखून ठेवली आहेस,हे अचंबा करण्यासारखे आहे.”
माझं हे ऐकून मला बाबल्या जरा मान उंचावून कॉलर ताठ केल्याचा बहाणा करून-कारण तो अजून वरून उघडाच होता-म्हणाला,
“हे तुझ्याकडून ऐकून मला बरं वाटतं.खरं सांगायचं तर चिं.त्र्यां.ची पण अशीच खानावळ कोकणातच होती.पण त्यांच धंद्यात लक्ष लागेना म्हणून ते सर्व गाशा गुंडाळून मुंबईला गेले.आणि मग ते साहित्यात किती नावजले हे तुला माहित आहेच?”
बोलण्यात वेळ कधीच निघून गेला होता.मला संध्याकाळची मोचेमाड ते शिरोडा ही एसटी गाठायची होती.आणि तिकडून तीन मैलांची पायी रपेट आजगांव पर्यंत करायची होती.
लगबगीने उठत मी बाबल्याला म्हणालो,
“परत येताना वेळ साधून तुझ्या खानावळीत जेवायला येतो.आजचं जेवण मस्तच होतं”
“येण्यापूर्वी फोन कर.म्हणजे खाडीतली ताजी सफेद सुंगटं घेऊन ठेवतो आणि मस्त सुंगटाची आमटी करतो आणि पेडव्याचं सूकं करून ठेवतो.मग परत चिं.त्र्यं.खानोलकरांवर आणि आरती प्रभूवर गप्पा मारूया?”
असं म्हणून झाल्यावर मला सोडायला बाबल्या एसटी स्टॅन्डवर आला.मात्र वरती खादीचा सदरा आणि गांधी टोपी घालायला आणि नेसता पंचा सोडून पांढरं स्वच्छ धोतर नेसायला विसरला नाही.
एसटी सुटता सुटता मी हंसत हंसत त्याला म्हणालो,
“बाकी एखाद्या मंत्र्याक लाजवशीत असो दिसतंस हां!”
हे ऐकून हाताने बाय बाय करणार्‍या बाबल्या मोचेमाडकराचा हंसरा निष्पाप चेहरा बघून मी मनात पुटपुटलो,
“बिचारा बाबल्या”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, May 15, 2009

“प्रतिसाद मनी धरोनी,कुणी लेख लिहित नसावे”

“प्रतिसाद मनी धरोनी
कुणी लेख लिहित नसावे”

लेखांची वाचनं अनेक होत असतात.लेखांना प्रतिसाद मिळाला की लेखकाला निश्चीतच बरं वाटतं.मग तो प्रतिसाद कसाही असो.लेखन ही ज्याची त्याची निर्मिती आहे असं मला वाटतं.सर्वच वाचक लेखक नसतात,पण लेखकाला मात्र वाचक असावं लागतं.त्याशिवाय त्याला त्याच्या लेखनाच्या विषयांची कल्पना येणार नाही.मात्र एखादा उस्फुर्त लेख लिहिला जाणं निराळं.अनेक प्रसिद्ध लेखकांची वाचनं प्रचंड असतात.ही वाचनं निरनीराळ्या भाषेतली पण असतात.
काही लेख इतके पारदर्शक असतात की त्यांना,
“लेख आवडला” किंवा,
“लेख छान लिहिला आहे”
ह्या व्यतिरीक्त वाचकाला काही लिहिण्याची जरूरी भासत नसावी.काही वाचकांना तेही लिहिण्याची जरूरी भासत नाही.आणि ते स्वाभाविक आहे.
आता ब्लॉग झाले आहेत.एखादा लेख वाचून त्याला ताबडतोब प्रतिसाद देण्याची सोय झाली आहे.पूर्वी वर्तमान पत्रात किंवा मासिकात लेख यायचे.अजूनही येतात म्हणा.आणि त्यावेळी त्या लेखाला ताबडतोब प्रतिसाद द्यायची सोय कुठे असायची?

अनेक लहान लहान लेखांचं एखादं पुस्तक लिहिलं गेलं तरी त्यावर देण्यात आलेली प्रतिक्रिया,किंवा एखाद्या पुस्तकावर “समिक्षा” म्हणून देण्यात आलेली प्रतिक्रिया कुठल्यातरी वर्तमानपत्रात आली तर यायची.
तर हे सर्व सांगण्याचा मतितार्थ एव्हडाच की,
“इंस्टंट प्रतिसाद ” मिळाला की लेखकाला वाचून बरं वाटतं.आणि ती त्याची इच्छा अलिकडच्या ब्लॉग लेखनाने पुरी होत आहे.ह्यावरून एक कविता सुचली ती अशी,
“प्रतिसाद”
(चाल:- प्रतिमा उरी धरोनी ह्या गाण्याची आणि आधार त्याच गाण्याचा)

प्रतिसाद मनी धरोनी
कुणी लेख लिहित नसावे
ते लेख निर्मितीचे
विचार करोनी लिहावे

उस्फुर्त भावनानी
स्वप्नात गुंग व्हावे
पुष्पात गंध जैसा
लेखात भाव तैसा

अद्वैत लिखणीचे
त्यां जीवनी असावे
तुम्ही सप्तरंग वाचनाचे
व्हावे अनेक मतांचे

विषय जीवनाचे
चर्चीत कुणी बसावे
का वाचकास वाटे
प्रतिसाद कुणा भावे

ते भावस्वप्न कुणाचे
बेकार कां करावे
प्रतिसाद मनी धरोनी
कुणी लेख लिहित नसावे



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com