Sunday, June 14, 2009

समयाकडून मिळणारा दिव्य दिलासा.

वनिता शर्मा माझ्या मुलीची शाळकरी मैत्रीण.कॉलेज संपून नंतर लग्न झाल्यावर ह्या मैत्रीणी आपआपल्या निर्माण केलेल्या जगात संसार करायला निघून गेल्या.पण पृथ्वी गोल आहे आणि जग लहान होत चालंय.परवां तिच्या ह्या मैत्रीणीचा फोन आला.घरी मी एकटाच होतो.माझ्या मुलीची तिने चौकशी केली.

कुणीतरी तिला पत्ता आणि फोन नंबर दिला होता. मी तिला म्हणालो,
” तू एक दिवस आमच्या घरी ये.मी तुला अगदी लहान पाहिली आहे.आपण सर्व बसून गप्पा मारूंया.”
“नक्कीच येईन”
असं सांगून तिने फोन ठेवला.
ज्यावेळी ती आली तिला पाहून मी खरोखरंच अचंबीत झालो.तिच्या लहानपणाची छबी जी माझ्या मनात होती तिला धक्काच बसला.
“तू अशी दिसत नव्हतीस.काय झालं तुला.तुझी तब्यत बरी आहे ना?”
असा मी प्रश्न विचारून झाल्यावर तिची चर्या पाहून मी सरळ सरळ असं विचारायला नको होतं असं मला वाटलं.
“तू सुंदर दिसायचीस.तुम्ही दोन्ही मैत्रीणी अभ्यासात ही हुषार होता आणि शाळेच्या नाटकात भाग घ्यायचा.”
तिची प्रशंसा करण्याच्या दृष्टीने आणि तिला बरं वाटावं म्हणून मी असं म्हणून माझ्या मला मी सांवरायला बघीतलं.
मला वनिता म्हणाली,
“काका,तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.पण माझ्या आयुष्यात तसंच काही घडलं.आणि मनाला लागणारी गोष्ट घडल्यावर प्रकृतीवर नक्कीच त्याचा परिणाम होतो.मी तुम्हाला कारण सांगते”

पंधरा वर्षापूर्वी माझ्या वडलांचा निघृण खून झाला होता.मध्यरात्री ते कामावरून परत येत होते.त्या दुर्दैवी रात्री एका माथेफिरूने त्यांच्या जवळ असलेले पैसे हिसकावून घेऊन झाल्यावर त्यांचा अंत केला.लांबून पहाणारे सांगतात,त्यांनी त्या दुष्टाशी दयावया करण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्यावर गोळी झाडली गेली.

जे लोक एखाद्या निरपराध्याचा आत्मा ह्या जगातून असा हिसकावून घेऊन कधीही परत येणार नाही अशा परिस्थितीत ह्या आसमंतात भिरकावून देतात त्यांच्या मनिस्थितीचा विचार करून माझ्या मनात नेहमी पेच निर्माण होत राहतो.”

मी आणि माझी मुलगी हे ऐकून खूपच दुःखी झालो.
माझी मुलगी तिला म्हणाली,
“तुझे वडील मला खूप आवडायचे.फिरतीवरून आल्यावर ते नचूकता नेहमी आपल्यासाठी च्युइंगम घेऊन यायचे.आपला हात मागे लपवून आपल्याला म्हणायचे,
“डोळे मिटा आणि उजवा हात पूढे करा.”
हातात वस्तु ठेवल्यावर म्हणायचे,
” सांगा काय ते?”
आणि आपण दोघीही मोठ्याने ओरडायचो,
“चिंगम!”
मग ते ओरडून सांगायचे,
“अंह,च्युइंगम”
आणि आपण मुद्दाम परत म्हणायचो,
“चिंगम”
आणि नंतर आपण सगळे तिघेही हंसायचो.आणि हा शॉट आपण कॉलेजात जाई पर्यंत करायचो.”
वनिता तिच्या वडलांच्या त्या दुःखी घटने नंतर आता विचाराने पोक्त झाली होती. कधी कधी माणसाच्या आयुष्यात “टर्नींग पॉइंट” येतो म्हणतात ना तसं.हे तिच्या बोलण्यावरून कळलं.

” एकाएकी आणि संक्षीप्तात डोंगरावरच्या रंगीबेरंगी फुलांच्या बहाराची रमणीयता पाहून निसर्ग आपल्या स्वरुपाचं अविरत प्रदर्शन करीत असतो असं वाटतं.
पुरामूळे झाडं उमटली जातात,घरं उद्वस्त होतात आणि लोक पुन्हा मागे फिरून आपली वस्ती उभारतात.आकाशातून एखादं विमान जमीनीवर पडून अपघात होतो, आतल्या लोकांचं त्या धुमस्त्या आगीत अंत होतो, त्यांच्या प्रियजनावर अविचलीत आणि दुर्दम आघात होतो.”
हे वनिताचं बोलणं ऐकल्यावर मी तिला म्हणालो,
“बोल,बोल तू काय बोलतेस ते ऐकायला मला आवडतं.वेदनेतूनच निर्मिती होते.तशीच विचारांचीपण निर्मिती होते”
वनिताला हे ऐकून खूपच बरं वाटलं.
ती पूढे म्हणाली,
“असं झाल्यावरही असल्या विनाशकारी घटनेचा परिणाम पाहिल्यानंतर जसा समय जात रहातो तसंच एखादं बी पेरलं जातं आणि त्यातून पुढला समय काय आहे ते हळू हळू स्पष्ट होत गेल्याचं दिसून येतं.अश्या ह्या नवीन रोपं उगवणार्‍या बियाणाकडून आसमंतात परिवर्तन करण्याची निसर्गाची क्षमता स्पष्ट होते.
होवून गेलेल्या कुठल्याही घटनेचं अशा तर्‍हेने रुपांतर करण्याच्या निसर्गाच्या क्षमतेकडे पाहून नकळत माझ्या मनात विचार येतो,
“निसर्गा मी तुला मानलं.”
माझ्या मुलीने तिला मधेच थांबवीत म्हटलं,
“वेळ कसा निघून जातो नाही काय?”

“माझे वडील गेल्यानंतर माझ्या दुःखाची पंधरा वर्षं होऊन गेली आणि मी अशा एका मनस्थितीत येऊन पोहचले आहे की,त्या निरपराध्याची-म्हणजे माझ्या वडीलांची, माझ्या मित्राची-आठवण काढून त्यांची हानी झाल्याचं पाहून,आणि त्याबरोबरीने त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रियजनांच्या शोकाला पाहून मी दुःख करीत राहाणं हे स्वाभावीक आहेच, आणि एव्हडंच नाही तर,ते अतिभयंकर कृत्य करणार्‍या त्या अपराध्याच्या आत्म्याचं सुद्धा मला दुःख करायला हवं असं वाटायला लागलंय.

जशी वेळ जात राहिली आहे, तसं माझ्या लक्षात यायला लागलं आहे-आणि जे इतरांच्या पण लक्षात येतं- की मृत व्यक्ति आपल्यात कशी वास करून राहते ते.
मी माझ्या वडीलांच्या स्मृतिचे झरोके त्यांच्या रुपात, त्यांच्या भावप्रदर्शनात,किंवा एखाद्या म्हणी मधूनही पहाते आणि समाधानी करून घेते.
उदाहरण द्यायचं झाल्यास,
“भुकेलेल्या अन्नाची चव कसली?”
मी वनिताला म्हणालो,
“मुलीचं वडलांवर नेहमीच जास्त प्रेम असतं.एकतर मुलगी ही भावी आई असते आणि स्त्रीला निसर्गानेच प्रेमळतेची देणगी दिली आहे.जननी जन्मदाती असं स्त्रीला म्हणतात मी तर स्त्रीला जननी प्रेमदाती म्हणतो”
वनिताला वडलांची आठवण आली.म्हणाली,
“जो पर्यंत माझा अंत होत नाही तो पर्यंत कसलीही विनाशकारी ताकद त्यांना माझ्यातून निखळून नेऊं शकत नाही. आणि म्हणूनच काही काळ निघून गेल्यावर त्या खून्याबद्दलची दुःखद व विषादग्रस्त, सहानुभूति मला वाटायला लागली आहे.तसंच माझ्या मनांत येतं की तो भिषण प्रकार झाला नसता तर माझी विचारसरणी अशी झालीच नसती. मला वाटतं त्या घटनेला दिलासा मिळण्याचा अवधी मिळाला.

असं बघा,आता हा माझा मुलगा तिचाकी घेऊन अंगणात फिरतोय तो माझ्या ह्या मांडीवरच वाढला ना?प्रत्येक वसंत ऋतुत जीवन नव्याने येतं,आणि हा ऋतू नवीन फुलं, गवत आणि झाडं देतं.रात्री सृष्टीचे तारे उंच आकाशात घुमत असतात. असं हे आपल्याला परिचीत असलेलं जीवन वाढतं आणि पोसतं.”

माझ्या मुलीला आणि वनिताला उद्देशून मी म्हणालो,
“आपल्या जीवनात आलेल्या आंबटगोड घटनाना पण जडं असतात.पण एक मात्र खरं की त्या घटनांची निराळीच सृष्टी असते.आणि अशा ह्या विक्षीप्त आणि अपरिचीत सृष्टीतलं भूदृश्य हृदयातून पोसलं जातं, बलशाली शक्तिरूपी सूर्य प्रकाशाने उजळलं जातं आणि समयाच्या जळाने भिजवलं जातं.”
मी माझ्या ह्या विचाराने वनिताला वेगळीच ट्रिगर देण्याचा प्रयत्न केला.पण आटोपतं घेत वनिता म्हणाली,
“अलीकडे ह्या निराळ्याच जगतात माझं मी परिवर्तन करून घेतलं आहे.समयाच्या बळाने मी दुर्दम समस्येत डुबून ह्या माझ्या नव्या सृष्टीतल्या उजाड आणि पडीक जमिनीतून जबरदस्तीचं बिज उगवण्याच्या प्रयत्नात आहे.”

उठता उठता मी वनिताला सांत्वन करीत म्हणालो,
“तू अशी दिसत नव्हतीस.काय झालं तुला. तुझी तब्यत बरी आहे ना?”
हा सुरवातीला प्रश्न विचारून तुला उगीचंच त्रास दिला असं त्या क्षणी मला वाटलं होतं.पण खरं सांगू का,मी तुझ्याकडून तुझे विचार ऐकून जीवनाकडे पाहायलो शिकलो.”
वनिताच्या डोळ्यात मला तिचे वडील दिसले.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, June 12, 2009

नका देवू कुणी दोष मला

अंग तुझे चंदनासम
नजर तुझी चंचल
हळुच तुझे खुदकन हंसणे
नका देवू कुणी दोष मला
झालो जर मी हिचा दिवाना

तुझी देहयष्टी भावलेली
तुझे नयन काजळलेले
सिंदुरबिंब तुझ्या माथ्यावरती
लाल निखारे ओठावरती
पडे कुणावरी तुझी छाया
दुःख मनातले जाईल वाया

तू सुंदर तनाची सुंदर मनाची
मुर्ती असे तुझी सुंदरतेची
वाण असो कुणा कदापी
परि जरुरी आज मला तुझी
केव्हाचा असे मी बेचैनलेला
नको बेचैन करू तू आता मला


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे केलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, June 10, 2009

वास्तविकता आणि भ्रम

" त्या बाईला दुःखाच्या वेदना होत असताना ती रडताना पाहून त्याच क्षणाला माझी धडधडणारी वेदना मला जर नसती तर मी तिच्यासाठी रडले असते का?"

सुमतीची परिस्थिती बघून मला कवी सुरेश भट्ट यांची आठवण आली.त्यांच्या पायाला पोलिओ झाला होता.सुरेश भट्टाना त्याबद्दल खूप खंत व्हायची. अगदी लहानपणी शाळेत वक्तृत्व स्पर्धेत त्यांना उस्फुर्त विषय देऊन बोलायला सांगितलं होतं. विषय होता,
"देवाने मला परत जन्म दिला तर!"
भट्टानी पहिलच वाक्य सांगितलं,
"मी देवाला सांगेन,देवा मला असा अपंग करू नकोस"
आणि त्यांचे डोळे पाण्याने भरले होते.
भटांचे वडिल डॉक्टर होत आणि आई एक प्रसिद्ध समाजकार्यकरती होती.

भटांच्या कविता वाचल्या तर बरेच वेळा त्यांच्या मनातलं उदासिनतेचं प्रतिबिंब दिसून यायचं.
असंच उदाहरण एका प्रसिद्ध मराठी संगित दिग्दर्शकाचं आहे.
सर्व काही मनासारखं असून केवळ अपंगत्वामुळे त्यांना नेहमी मायुसी येत राहते.
पण म्हणून ह्या दोन्ही व्यक्ति खंत करित राहिल्या नाहीत.एकाने कवितेची आणि साहित्याची भरपूर सेवा केली.आणि मनाला भावतील अश्या कविता लिहिल्या. तर दुसर्‍यानी अतिशय मोहक चाली देऊन गाणी ऐकण्याजोगी केली.

त्या दिवशी मी जेव्हा सुमतीला खूप दिवसानी भेटलो तेव्हा ह्या सर्व आठवणी फ्लॅशबॅक कशा माझ्या डोळ्यासमोरून गेल्या.
मी सुमतीला ह्या दोन व्यक्तिंची जी मला माहिती होती ती देत गेलो.ती निमूट सर्व ऐकत होती.नंतर मला म्हणाली,

"मला लहानपणीच पोलिओ झाला होता.मी त्यावेळी सहा वर्षाची असेन.मला अजून आठवतं की माझ्या पहिल्या इयत्तेतल्या त्या शाळकरी मैत्रीणी कडून दिले गेलेले आणि लक्षात ठेवण्याजोगे कटाक्ष आणि ते पहात असताना माझ्या चालताना येणार्‍या टोचर्‍या वेदना मला मसमुसून रडूं आणायच्या.माझ्या लक्षात आलं होतं की कुणालाही स्वतःमधे निमग्न असलेली रडकुंडी बेबी आवडत नसावी.

परंतु, तसं असलं तरी मला असं कधीच अनुचीत वाटलं नाही की माझ्या इतर शाळकरी मैत्रीणीना औषध घ्यावं लागत नाही, शारिरीक उपचार करावे लागत नाहीत,रक्त तपासावं लागत नाही,आणि कधी कधी इंजक्षन पण घ्यावं लागत नाही.मला ते जीवंत रहाण्यासाठी करावं लागत होतं,आणि त्या बालवयात मी ताडलं की ही वास्तविकता मला खाली ओढत नव्हती तर उलट उंचीवर नेत होती.

मला असं वाटतं की वास्तविकता ही भ्रमापेक्षा जास्त पसंत करण्याजोगी बाब आहे. सत्य मला जेव्हडं लवकर कळेल तेव्हडं लवकर त्याच्याशी मी अनुरूप होईन.वास्तविकता निवडल्याने मी कधी कटु बनले नाही किंवा दोषदर्षी बनले नाही. उलटपक्षी माझ्या लक्षात आलंय की वास्तविकतेचा अगदी पराकोटीचा घृणा येईल असा अनुभव घेतल्यावरही खर्‍या सुंदरतेला मी समजू लागले आहे.

मला आठवतं ज्यावेळी मला वाकून काही करता येत नव्हतं तेव्हा माझी आई मला मदत करायची.पण हळू हळू माझ्या लक्षात आलं की माझी आई मला जन्माला पुरवलेली नाही.म्हणून माझी मीच प्रयत्न करायचे.अनेकवेळा सकाळच्या वेळी माझे मला कपडे चढवायला कष्ट व्हायचे.माझ्या मीच मला म्हणायचे,
"हे काय खरं नाही."
दमून दमून कोंडमारा झाल्यावर शेवटी हे काम संपायचं.
माझ्या आयुष्यात आलेला एक उत्तम धडा मी शिकले.सत्य लपवणं काही बरं नाही-ह्या माझ्या कधीही बर्‍या न होणार्‍या व्याधी बाबत-जे दुःख माझ्या भाग्यात आलं आहे त्यापासून फक्त जेव्हडं मला जमेल तेव्हडं मी करावं.

नक्कीच,माझी टिंगल-मस्करी झाल्यावर मला वाईट वाटायचं.माझ्या काही मैत्रीणी माझी चालण्याची नक्कल करीत असताना मी त्यांना पाहिलं आहे. माझ्या पहिल्याच जॉबच्यावेळी माझ्या मागे माझा बॉस कुणाला सांगताना माझा "लंगडी" असा संदर्भ द्यायचा,ते माझ्या मनाला लागायचं. मला वाटत नाही की मला त्याने कमी सुरक्षित वाटायचं.किंवा मला कमी निश्चिंत वाटायचं.फक्त मला नवल वाटायचं की लोक किती संवेदनाश्यून्य असावेत.मला हळू हळू लक्षात यायला लागलं होतं की, स्वतःमधे निमग्न असणं ही अगदी सामान्य बाब आहे. आणि वर मी मनात म्हणायचे ते जर सामान्य नसलं तरी मला त्याचं काही देणं घेणं नाही.

मी सोळा वर्षाची असताना एका पावाच्या बेकरीत पुढल्या भागात विकण्यासाठी रचून ठेवलेल्या पाव-केक-बिस्किटाच्या दुकानात काम करायचे.एक बाई आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी केक विकत घ्यायला आली असताना रडत होती.ते लहान मुल एका उंच जागी चढून खाली पडलं होतं आणि गंभिर स्थितीत हॉस्पिटलात होतं.आपल्याच मुलांची ह्या लोकाना काळजी कशी घेता येत नाही? आणि मग त्या दुर्घटनेच्या दुःखाने ह्याना वेदना कश्या सहन होतात? असा मला प्रश्न पडला होता. आणि रडूं ही आलं होतं.

आज मी मलाच विचारते,
"त्या बाईला दुःखाच्या वेदना होत असताना ती रडताना पाहून त्याच क्षणाला माझी धडधडणारी वेदना मला नसती तर मी तिच्यासाठी रडले असते का?"
ह्यातूनच माझा दुसरा महत्वाचा धडा मी शिकले तो म्हणजे एक, त्या वेदना होणं,दुसरं,त्याला मिळणारा माझाच प्रतिसाद, आणि शेवटी इतराना होणारी वेदना पाहून मला रडूं येई त्याबद्दल मनात बसलेली माझी पक्की समज,अश्या ह्या तिन्ही गोष्टींचा विचार केल्यावर मी माणूस म्हणून मला दैविकतेचा,पावित्र्याचा, आणि त्या शाश्वततेचा आभास होत राहिला,आणि मी त्यातून एक परिभाषा शिकले."

मी सुमतीला विचारलं,
"ह्या अलंकारिक शब्दांचा मी अर्थ तरी काय काढावा?"
ती म्हणाली,
"सोप्यात सोपं म्हणजे दैविक संकेत मनात बाळगावा की माझ्यासाठी मी जेव्हडं करते तेव्हडंच दुसर्‍याबद्दल मी परवा ठेऊन करावं.
दोन दिवसापूर्वी माझे पती सहा महिन्याच्या टूरवर दक्षिणेत नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी गेले आहेत.ते पोलिसात आहेत.माझ्या मनातली पहिली प्रतिक्रिया म्हणजे माझ्यासाठी मी दुःखी झाले.दुसरी प्रतिक्रिया म्हणजे मी माझ्याशीच प्रातार्णा करू लागले की सर्व काही ठीक होणार आहे.ते नक्कीच सुरक्षीत घरी येणार आहेत.पण मला सत्य परिस्थितीशी सामना करण्याविना गत्यंतर नाही.एकतर मी विधवा होईन किंवा,देवावर विश्वास ठेवून माझ्या मनात तरी स्फोट होऊ देणार नाही.
त्यामुळे आता मी एकटीच घरी असल्याने माझे शेजारी,माझे सहकारी आणि माझे मित्रगण मला बरं वाटावं म्हणून झटत आहेत.
मग मला निराशजनक होऊन कसं चालेल?"

"आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन वास्तविकता नजरे आड न करता उगाचच भ्रमात राहून जीवन कसं जगू नये हे तुझ्या कडून ऐकून आणि कवी सुरेश भटांचं उदाहरण पाहून मला तरी वाटायला लागलं आहे की तुम्ही सर्व ग्रेट आहात."
असं म्हणून मी सुमतीची पाठ थोपटली.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, June 8, 2009

स्वप्न

(ॠणनिर्देशः हिंदीत,मराठीत,आणि इंग्रजीत लिहिणारे कवी आणि
"वाचून बघा"
ह्या ब्लॉगचे लेखक श्री. सतीश वाघमारे यांच्या
"ख्वाब"
ह्या हिंदी कवितेचा अनुवाद.)

स्वप्न

पहात आलो अनेक दिवस हे स्वप्न मी
तुजसम होऊन मलाच पाहिले मी
ह्या नयनातून त्या नयनात न्याहाळले मी
त्या मलाच तू पाहिलेस माझ्यातला मी

ऐटबाजी नजरफेक अन हास्याचे ताने
नखर्‍यांचे खंजीर अन निष्पापी बहाणे
पवनाचे पण आता असेच होई सतावणे
आणूनी सुगंधा फिरूनी होई माझे लुभावणे

दिनभर ही तुझी भ्रांती दर्शनाची
तुझी नी माझी रात्र असे स्वप्नाची
सांगाया दे स्मृती अपुल्या शपथेची
दाखव जरा असेल जर घडी विरहाची

मानले अजूनी जरी अतीव अंतरे असती
पाहूया दैवाची कोणती असे अनुमती
उमेदीची नित्य नवी अवलोभने वाढती
प्राप्त तुलाच करण्या उत्तूंग अभियाने येती



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, June 6, 2009

आठवणींची निर्मिती.

आज आमच्या शेजारांच्या घरात खूपच गडबड आणि आवाज होत होता.त्यांना दरवाजा खटखटून चौकशी करण्याचा माझा मानस नव्हता.पण काही वेळाने माझाच दरवाजा खटखटून गडकर्‍यांची भारती आली आणि मला म्हणाली,
"काका,एकदोन खूर्च्या कमी पडतायत,तुमच्या खुर्च्या मिळतील काय?"
मी म्हणालो,
"त्यात विचारायचं काय घे तुला हव्या तेव्हड्या. पण काय गं भारती कसली गडबड चालली आहे बर्‍यांच बायकांचा आवाज येतोय."
मला म्हणाली,
"आज आमच्या घरी "पॉटलक" आहे."
"म्हणजे ग काय?"
ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता हात करीत म्हणाली "मग सांगते. "
आणि नंतर ती गडबडीत यायचीच विसरून गेली.
तिची आई सरिता गडकरी अशीच दोन तीन दिवसानी गप्पा करायला आली होती.
त्या दिवसाची आठवण करून मी तोच प्रश्न तिला विचारला.
मला म्हणाली,
"अहो,अमेरिकेत त्याला "पॉटलक" म्हणतात ना तोच प्रकार इकडे करतात.
आमच्या आईच्या आणि मावशीच्या हाता खाली जेवण शिकून मी तयार झाले,आणि माझ्या हाताखाली माझी मुलगी आता जेवण करण्यात तयार झाली आहे.तिच्या मैत्रीणी महिन्याला एकदा सर्व जमून पार्टी करतात.हा एक चांगला सामाजीक कार्यक्रम असतो.त्यावेळी प्रत्येक जण आपआपली डीश तयार करून घेऊन येतात.सर्वच जणी ह्यामुळे एकमेकाची डीश वाटून घेऊन नुसती खात नाहीत तर त्यातून एकमेकाच्या डीश करण्याच्या पद्धतीची चर्चा करतातच आणि खाऊन त्यांच्या जीवाला तृप्ती मिळते.
माझी भारती सांगत होती की,एका पार्टीला तिच्या एका मैत्रीणीने आंब्याचं पन्हं करून आणलं होतं.ते सर्वांना इतकं आवडलं की त्याची करण्याची पद्धत सर्वांनी लिहून घेतली.नंतरच्या एका पार्टीला माझ्या मुलीने कानडी "एल्लापे" करून नेले होते ते खाऊन सर्वांनी फस्त केले.तुम्हाला माहित आहे की भारती कर्नाटकत दिली आहे.काही कानडी डीश ती शिकली आहे.उरलं सुरलं अन्न मग ही मंडळी घरी नेऊन आपआपल्या कामवाल्या बायकाना वाटतात असं माझी भारती मला सांगत होती.

तुम्हाला सांगू का,स्वयंपाकी फक्त स्वयंपाक तयार करीत नाहीत-म्हणजे जेवणाची निर्मिती करीत नाहीत- ते आठवणींची पण निर्मिती करतात.
माझ्या स्वतःच्याच जून्या आठवणीमधे स्वयंपाक करणार्‍या व्यक्तिंच्या पण आठवणी आहेत.
माझ्या लक्षात आलंय की ही मंडळी माझं पोट नुसतं रुचकर जेवण करून भरत नव्हती तर माझ्या स्मृतित सजीव गोड सुगंधाने भरलेल्या स्वयंपाक खोल्यांच्या छब्यांची निर्मिती करीत होती.

माझी आई आणि मावशी समारंभाला घरीच जेवण करीत.मला आठवतं माझी आई चवदार कोशिंबीरी करायची. चटण्यांचे अनेक प्रकार करायची.कोथिंबीर घालून नारळाच्या चूनाची चटणी,मिरचीपूड घालून खसखसट्लेल्या नारळाच्या चूनाची चटणी,कवटाच्या - हे पोपटी रंगाचं गोल आकाराचं कडक फळ असतं- किसात कैरीचा कीस टाकून केलेली चटणी,दाणे,सुकं खोबरं किसून,तीळ आणि सुक्यामिरच्या घालून कुटलेली सुकी चटणी,कच्च्या कैर्‍या कापून त्याच्या लहान लहान फोडी करून त्यात मिठ मिरची टाकून करमट करायची,अश्या नानातर्‍हेच्या चटण्या खाल्याची आठवण येते.
मी म्हणालो,
"तुझी मावशी सुद्धा स्वयंपाक करण्यात तरबेज होती ना?"
"माझी मावशी स्वयंपाकघरात काही अपरिचीत पाहूणी नव्हती.तिनेच मला समजायला मदत केली की विशेष पदार्थ तयार करून इतराना तृप्तीचा आनंद कसा देता येतो.माझ्या चक्षूस्मृतित ती आता दिसते.निरनीराळी कडधान्यं मिसळून खमंग पिठ घरच्याच जात्यावर दळून गरम गरम थालिपीठं करून त्यावर ताज्या लोण्याचा गोळा वाढून समोर ठेवायची."
"मला आठवतं तुम्ही सगळे लहानपणात सुट्टीत कोकणात न चुकता जात होता.जवळ जवळ अर्धी एस.टी तुम्ही बूक करायचा.डी.एन. नगरमधे एस.टीच्या खास गाड्या येऊन सर्वाना कोकणात जाण्याची सोय केली जायची हे मे महिन्यात व्हायचं त्याशिवाय गणपती उत्सवात परत ती सोय दिली जायची."
असं मी म्हटल्यावर सरिता आपल्या लहानपणाच्या गोष्टी अगदी तालात येऊन सांगायला लागली.

"लहान असताना मी माझ्या मावशीच्या घरी सुट्टीत जायचे.पिंगुळी गावात मावशीचं टुमदार घर होतं.आजुबाजूची वनश्री डोळ्यांना आल्हादायक वाटायची.जेवणाची सर्व तयारी झाल्यावर पाट-पाणी ठेवण्यासाठी मी तिला मदत करायचे.सर्वांना जेवायला बोलवल्यावर मावशी ताटात एक एक पदार्थ वाढायची.
उकडलेल्या बटाट्याची भरपूर कांदा घातलेली भाजी, पोरसातलं माजलेलं अळू काढून आणल्यावर स्वच्छ धूवून लसणीची फोडणी दिलेली अळूची लोण्यासारखी शिजलेली भाजी,गरम गरम उकड्या तांदळाच्या वाफेला खमंग वास येणारा भात,फणसांच्या घोट्या घालून केलेली हिंगाचा सुगंध येणारी डाळीची जाड आमटी आणि वाटी वाटी आमरस असा बडेजाव असायचा.

दिवाळी,दसरा,गणपती उत्सव हे सण फक्त धार्मिक आणि आणि सांस्कृतीक घटना लक्षात ठेवण्यासाठी नसून ते प्रसंग नातेवाईक आणि मित्र-मंडळीना एकत्र येऊन खास केलेले पदार्थ वाटून घेऊन खाण्यासाठीही आहेत.अन्न आणि स्मृति एकत्र असतात.

जशी मी वयाने मोठी होत चालेय,तशी माझे ह्या बाबतीतले विचार पण पोक्त होत चाल्लेत.स्वयंपाक करणारी व्यक्ति नुसतीच स्वयंपाक करीत नाहीत तर स्वयंपाक करण्या व्यतिरिक्त आठवणींची पण निर्मिती करते हे मी पक्क लक्षात आणलं आहे.
तुम्ही हंसता कां?"
असा मला सरिताने प्रश्न केल्यावर मी म्हणालो,
"पुढच्या खेपेला हे पॉटलक केलंत तर मला पण एक शेयर डीश आणून दे.मी पण माझ्या आठवणीची निर्मिती पुढे कधी तरी उपयोगात आणीन."
"हे आपलं बरं"
एव्हडंच सरिता बोलून जायला उठली.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gamil.com

Thursday, June 4, 2009

हा विचार आता सतावी मला

जीवन तुझ्या संगतित आणिते मला
चंद्राहूनी बेहत्तर दिसे धरती मम नजरेला

रिझवी सुगंध लालफुलांचा मम मनाला
दिन ढळता साद तुझी बोलावे मला

कधी गुण्गुणूनी वा कुजबुजूनी
स्मरण तुझे जागवी रात्र मला

हर एक भेट संपते वियोगामधे
हा विचार आता सतावी मला



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 2, 2009

“आनंदी आनंद गडे!”

आज बरेच दिवसानी प्रो.देसायांचा नातू आणि त्याचा मित्र असे दोघे लगबगीने माझ्याजवळ येताना पाहून मी समजलो की आज भाऊसाहेब काही तळ्यावर फिरायला येत नाहीत.
“आम्हाला पाहून तुम्ही समजला असालंच”
असं म्हणता म्हणता निमीश म्हणाला,
“हा माझा मित्र नितीन मतकरी.आत्ताच हा वकीली परिक्षा पास झाला, आणि सध्या एका कंपनीत काम करतो.सध्या म्हणण्याचं कारण, तो ही कंपनी सोडून दुसर्‍या एका कंपनीत वरच्या पोस्टवर जॉईन होणार आहे.”

हे ऐकून मी म्हणालो,
“बरं आहे तुमचं,आमच्या जमान्यात आम्ही एका कंपनीत काम करायला लागलो की निवृत्त होई पर्यंत त्याच कंपनीत चिकटून असायचो.आणि त्यावेळी आम्हाला तेव्हडे मोके मिळत नव्हते.पण एक मात्र खरं मोके मिळत नसतात मोके घ्यायचे असतात.पण ते राहूदे तुझे आजोबा आज येणार नाहीत ह्या शिवाय मला काहीतरी तुला सांगायचं आहे असं वाटतं.बोल.”

“हा माझा मित्र नितीन पुरा नास्तिक आहे.ह्याचा माझ्या आजोबांशी वाद चालला होता.
आजोबांचं म्हणणं असले वाद ही तरूणपणातली त्यांच्या शब्दात “खूळं ” असतात.जसं जसं वय होत जातं,दुनियादारी करावी लागते,जीवनात “ठक्केठोपे” खायची पाळी येते तसं तसं माणूस थोडा स्वभावाने नरम होतो.आणि मग थोडाफार देवाच्या अस्तित्वाला मानायाला लागतो.अर्थात ह्याला काही अपवाद असूं शकतात.
काका,तुमचं काय म्हणणं आहे ह्या विषयावर?”

मी म्हणालो,
“हे बघ नितीन, ह्या विषयावर अगणीत वाद झाले आहेत.तुला मला ते नवीन आहेत.तुझे आजोबा म्हणतात त्या अपवादातला मी पण एक आहे.पण हे सर्व बोलण्यापूर्वी तुझा हा मित्र नितीन काय म्हणतो ते तरी ऐकतो.बोल रे नितीन.”

“मला प्रथम श्रद्धे विषयी उघड उघड बोलण्यापूर्वी माझी श्रद्धा काय आहे ते सांगू देत.
मी देवावर विश्वास ठेवत नाही.देव आहे हे मी मानत नाही.काही श्रद्धा ठेवतात त्या देवावर, सर्वव्यापी परमेश्वरावर किंवा ज्याच्याजवळ ह्या विश्वाचं रहाटगाडगं चालवण्याचं बळ आहे त्या विधात्यावर, पण मी विश्वास ठेवीत नाही.
मी नास्तिक आहे.अनीश्वरवादी आहे. अज्ञेयवादामागे-ईश्वराचं अस्तित्व आहे की नाही यावरचा वाद-मला दडून राहायचं नाही.किंवा पैजे मागे लपून राहायचं नाही. माझी अशी श्रद्धा आहे की हे विश्व,ही सृष्टि भौतिक तत्वावर,आणि अंतरिक्षीय योगायोगावर चालते.”

नितीनला मधेच थांबवून मी म्हणालो,
“भाऊसाहेब सांगत आहेत ते त्यांच्या अनुभवावरून सांगत असावेत.अनुभव ही अशी गोष्ट आहे की ती अनुभवल्याशिवाय कशी कळणार.?खाडी पोहून जाण्याची कल्पना करता येईल पण ती पोहून गेल्या शिवाय अनुभव येणार नाही असं उदाहरण देता येईल.तरीपण तुझ्या विचारांचा पण आदर केला पाहिजे.”

नितीन म्हणाला,
” माझे हे विचार बर्‍याच लोकाना धक्कादायी वाटतात.माझ्या सर्वात दुःखदायी स्मृतिची ती संध्याकाळ,मला आठवण करून देते जेव्हा मी अगदी माझ्या तारुण्यात असताना माझ्या आईबाबाना -जे देवभाविक असून ज्यानी मला त्या माझ्या तरूणपणाच्या दिवसात एकाही मंदीरात नेण्यापासून सोडलं नाही,एकाही देवाच्या उत्सवात जाण्यास वंचित केलं नाही, त्यांना मी माझ्या श्रद्धेबद्दल आणि माझ्या देवावरच्या अविश्वासाबद्दल सांगितलं.त्यांना ऐकून मनस्वी धक्का बसला.त्याना माझ्या मोक्ष मुक्तिची काळजी वाटली आणि माझं नीट संगोपन करण्यास ते असफल झाले असं त्यांना वाटलं.त्यांनी अशी कल्पना करून घेतली की मी नैतिकतेची सीमा गमावून बसलो आहे.
जरी मी त्या कल्पित सर्वव्यापी परमेश्वराबद्दल मनुषाच्या मनात असलेली छबी स्वीकार करायला असमर्थ असलो तरी माझ्या जवळ जबर नैतीक श्रद्धा आहे.

मी मानतो की दुसर्‍या जीवजंतूना मारणं किंवा जखमी करणं हे अगदी अयोग्य आहे.मी शांतीवादी आहे.वाटेत एखादा कीडाजरी दिसला तर त्याला मारायला मी टाळीन.पण त्याचबरोबर मी हे ही मानतो की क्वचीत प्रसंगी कुणी जर का अत्याचार करीत असेल तर त्याच्याबरोबर दोन हात करणं जरूरीचं आहे.तसंच मी मानतो की मला माझं जीवन जगताना,योग्य निर्णय घेणं आणि प्रामाणिकता ठेवणं ह्यावर जास्त भर ठेवण्याची आवश्यकता आहे. एकदा मी बाजारात कुणाची तरी शंभराची नोट खाली पडलेली पाहून दोन बसस्टॉप त्या माणसाच्या मागे धावून त्याला परत करण्याचा प्रयत्न केला होता.

काका,तुम्ही म्हणता तेच मला वाटतं,
प्रत्येकाने दुसर्‍याचा आदर केला पाहिजे आणि त्याच्या श्रद्धेचापण आदर केला पाहिजे.अमूक देवायलाला पैसे द्या म्हणून माझा दरवाजा खटखटला तर मी पैसे द्यायला कबूल होत नाही. पण काही सामाजिक कार्याला मदत मागितली तर मी अवश्य देतो.”

मी नितीनला म्हणालो,
“प्रोफेसर म्हणतात त्याप्रमाणे ह्या वयात माझ्याही स्वभावात नरमपणा आला आहे.तरीपण मी ह्या वयात तुझ्या नास्तिक असण्याच्या श्रद्धेशीही सहमत आहे. पण माझ्या स्वभावाचा नरमपणा मी “सिलेक्टीव्हली” वापरतो.ज्यावेळी माझी पत्नी रोज देवाची पूजा करून झाल्यावर मला गणपतीच्या मुर्तिला नमस्कार करायला सांगते त्यावेळी निमुट नमस्कार करतो.आणि तिने दिलेला प्रसाद आणि तीर्थ न चुकता उजव्या हातात घेऊन प्राशन करतो.
माझा उद्देश एकच असतो की माझ्या असं करण्याने तिला जर का आनंद होत असेल तर सहाजीकच त्यात मलाही आनंद होतो.
तसंच तुझ्या सारखा नास्तिक जेव्हा म्हणतो की,
“हे विश्व,ही सृष्टि भौतिक तत्वावर,आणि अंतरिक्षीय योगायोगावर चालते.”
हे पण मला तंतोतंत पटत असल्याने तुझ्याशी मी देवाच्या अस्तित्वावर वाद घालायला प्रवृत्त होत नाही.आणि सहाजीकच तुलाही आनंद होत असावा.”

माझं हे म्हणणं ऐकून खूश होऊन नितीन म्हणाला,
“बरेच वेळा पाहिलंय की माझ्या सारख्या विचार असलेल्या माणसाची, देवावर विश्वास ठेवणारे लोक अवहेलना करतात. म्हणतात की आमच्या सारख्यांना नैतिक मुल्य नाहीत आणि आमच्या जीवनाला अर्थ नाही.मी एव्हडीच इच्छा करतो की माझं जीवन असल्या विचाराचं खंडण करण्यात गेलं तरी भले.

माझ्या आयुष्यातला अगदी आनंदाचा दिवस तो होता की जेव्हा माझी आई तिचं निधन होण्यापूर्वी काही वर्ष अगोदर ह्या माझ्या नास्तिकपणाच्या विचारावर माझं बोलणं आठवून मला म्हणाली होती की, त्या विचाराव्यतिरीक्त तिला माहित होतं की मी तिने दिलेल्या मुल्यांच पालन केलं आणि त्यामुळे मला स्वर्गात मोक्ष प्राप्त होणार.
मी जरी तिला स्वर्गात भेटू शकलो नाही तरी त्याहीपेक्षा माझा आनंद ह्यात आहे की निदान माझ्या श्रद्धेच्या आचरणाची तिच्याकडून मला पुष्ठि मिळाली होती.”

ह्या सर्व चर्चेत निमीश फक्त ऐकण्याचं काम करीत होता. मी काहीतरी त्याला विचारणार हे पाहून म्हणाला,
“काका,तुमच्या ह्या वयातल्या सर्वांना आनंदी करण्याच्या नरम स्वभावाचा उपयोग मी माझ्या ह्या वयात वापरायचं ठरवलं आहे.
त्यामुळे मी, माझे आस्तिक आजोबा आणि माझा नास्तिक मित्र नितीन असे आम्ही तिघेही आनंदी राहूं.तुमचं काय म्हणणं आहे?”

एव्हाना तळ्यावर काळोख झाला होता.उठत उठत मी दोघांची पाठ थोपटत म्हणालो,
“माझं एक म्हणणं की तू प्रो.देसायांचा नातू शोभतोस.आणि दुसरं नितीनचं “आर्ग्युमेंट” अगदी कोर्टात मांडल्या सारखं वाटलं.”

हे ऐकून दोघेही हंसायला लागले.आणि मी मनात पुटपुटलो,
“आनंदी आनंद गडे!
इकडे तिकडे चोहिकडे!”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com