Monday, December 14, 2009

“पुन्हा कधीतरी नक्कीच भेटूंया!”

“आपल्या कडून झालेली प्रत्येक क्रिया आणि उच्चारलेला प्रत्येक शब्द पुढे काय करू शकेल किंवा काय करणार आहे हे ज्या उमेदीतून निर्माण होणार आहे ती उमेद अगोदरच माहित असणं म्हणजेच खूश असणं,म्हणजेच प्रसन्न असणं.”

अगदी लहानपणापासून म्हणजेच सहा सात वर्षाची असल्या पासून सुधा, शाळा संपून घरी आल्यावर संध्याकाळी आपल्या मैत्री्णीना जमवून “टीचर,टीचर ” खेळायची. टीचर स्वतः सुधा व्हायची.आणि इतर मैत्रीणी तीच्या विद्यार्थीनी असायच्या.सुधा टीचर सारखं दिसण्यासाठी आपल्य शाळेतल्या खर्‍या टीचरची कॉपी करून मग तो पार्ट संध्याकाळी आपल्या लुटूपुटूच्या वर्गात करायची.आणि त्यासाठी आपल्या मोठ्या बहिणीच्या साड्या त्या वयात सुद्धा स्वतः नेसायची. एव्हड्या लहानपणी साडी नेसायचं कसब सुधाने केवळ संवयीने आत्मसात केलं होतं.

सुधा कानडे नंतर खूप शिकली.पण तीचा कल शिक्षीका होण्याकडेच होता.बी.ए. झाली इंग्रजी घेऊन एम.ए झाली.नंतर लहान मुलांच्या मनोविज्ञानावर प्रबंध लिहून डॉक्टरेट पण घेतलं.आणि अंधेरीच्या एका शाळेत प्रवेश करून नंतर असिस्टंट प्रिन्सीपॉल होऊन रिटायर्ड झाली.एव्हडी तीच्याबद्दलची माहिती मला होतीच.पण काल मी आणि माझा पुतण्या त्याच्याच गाडीतून लोखंडवाला कॉम्पलेक्समधे त्याच्याच घरी जाण्याच्या वाटेवर असताना धाके कॉलनी जवळ सुधाला रस्त्यावरून आमच्या उलट्या दिशेने जाताना त्यांने पाहिलं.गाडी बाजूला पार्क करून मला म्हणाला,
“सुधाबाईंची जरा दखल घेऊन येतो.खूप दिवसानी मला त्या दिसल्या आहेत.”

मला माहित नव्ह्तं की सुधा माझ्या पुतण्याला पण शिकवत होती. मी गाडीत बसलो आहे ते त्याने सुधाला सांगीतल्यावर ती त्या गाडीपर्यंत आली.आणि आपल्या घरी यायचा मला आग्रह करू लागली. जवळच्याच बिल्डींगमधे तीचं घर होतं.मला पण कुणाचं मन मोडायला आवडत नसल्याने,
“पुन्हा कधीतरी नक्कीच येईन”
असं म्हणायला जरा माझ्या जीवावर आलं.आणि सुधाचा आग्रहही मनस्वी होता.त्या बिल्डींगला पाचच मजले होते. बिल्डींगच्या पाचव्या मजल्यापर्यंत चढत गेलो. बिल्डींगला पाच पेक्षा जास्त मजले असल्यास कायद्याने लिफ्टची जरूरी लागते असं असल्याने ह्या बिल्डींगवर पाचव्या मजल्यापर्यंत चढत जाणं भाग होतं.मी वरपर्यंत एका दमात मजले चढून गेल्याचं पाहून सुधा जरा खजील झाली.
“तुम्ही तिकडे हायकींग वगैरे करता त्यामुळे इथे हे मजले चढणं तुम्हाला सोपं गेलं असेल”
असं म्हणून सुधाने मला थॅन्क्स वजा शाबासकी दिली.

तिच्या पाचव्या मजल्यावर हवा मस्त येत होती.जुहूच्या समुद्रावरून सुटलेले गार वारे आणि तिच्या फ्लॅटमधे असलेल्या क्रॉस व्हेन्टीलेशनमुळे चौपाटीवर बसल्याची मजा येत होती.
“पाचव्या मजल्यावर यायचे कष्ट पडले तरी एकदा आल्यावर हे हवेचं सुख सर्व क्षीण घालवून टाकतं.”
असं म्हणून मी सुधाला तीने म्हटलेल्या थॅन्क्सचे प्रत्युत्तर म्हणून,
“नो, इट्स माय प्लेझर “
असं म्हटल्यासाखंच केलं.
थोडा वेळ बसून झाल्यावर माझ्या पुतण्याने,
“तुम्ही गप्पा मारीत बसा.मी तास-दीडतासात तुम्हाला न्यायला येतो”
असं सांगून आम्हाला गप्पा मारण्याची संधी देऊन तो गेला.

सुधा रिटायर्ड झाल्यावर आता अंधेरीतल्या एका झोपडपट्टीत असलेल्या गरीब मुला-मुलींच्या शाळेत शिकवायला जाते.तीचा मुलगा अवी अमेरिकेला गेला आणि तिकडेच लग्न करून स्थाईक झाला. असं मला सुधा म्हणाली.सुधाचे पती चार वर्षापुर्वी हार्ट ऍटेक येऊन निर्वतले ही वाईट बातमी मला तीने सांगीतली.आता ती एकटी असल्याने सहाजीकच वेळ जावा म्हणून आणि शिकवण्याची हौस म्हणून ती त्या शाळेत जाते.
मी तीला तीच्या लहाणपणातल्या “टीचर टीचर” खेळाची आठवण करून देत म्हणालो,
“सुधा, मला वाटतं काही व्यक्ती टीचर व्यवसाय म्हणून घेतात.काही ना टीचींग करायची आवड असते.पण तू मात्र “बॉर्न टीचर” आहेस.”
तीच्या लहानपणाच्या संवयी अजून माझ्या आठवणीत आहेत हे ऐकून सुधा थोडी लाजली आणि मला म्हणाली,
“काका,त्याचं काय आहे,माणसाला आपल्या कामात स्वारस्य वाटलं पाहिजे आणि तसं वाटायला त्याचं त्या कामावर प्रेम पाहिजे.तुम्हाला कसं वाटतं?”
मी म्हणालो,
“यात काहीच वावगं नाही.पण तुझ्या शिक्षीकेच्या पेशात नासमज मुलांची जबाबदारी असल्याने त्यांना समज आणण्याच्या प्रयत्नात स्वतःला मोठ्या शिस्तीत ठेवायला मनावर दबाव आणावा लागतो.तो दबाव सकाळी उठण्यापासून ते शाळा सुटे पर्यंत असतो.”

“मी तुम्हाला माझा विचार सांगते”
असं म्हणून सुधा पुढे म्हणाली,
“मला नेहमीच वाटतं की आपलं मन सकाळीच प्रसन्न असतं.नसेल तर असलेलं बरं.जर ती प्रसन्नता सक्काळी पाच वाजता आली तर मी अंथरूणातच पडून राहण्याच्या प्रयत्नात असेन.मी एका शाळेत शिक्षीकेचं काम करते.पाचवीच्या वर्गात भाषा शकवते. आमचा दिवस सकाळी सातला चालू होऊन संध्याकाळी पाचला संपतो.सर्वच दिवशी सकाळची वेळ आरामात असते अशातला भाग नाही.आपण सूर्योदय होण्यापूर्वीच अंथरूणातून उठवले जाऊन सकाळची नित्यकर्मं करण्यात ढकले जातो.पण प्रसन्नता येते ती सहज म्हणून येत नाही ती आलीच पाहिजे म्हणून येते.”

“तू काय लहान मुलांच्या मनोभावनेचा अभ्यासच केला आहेस तेव्हा तुला समजायला सगळं सोपं जात असेल.”
असं म्हणून मी सुधाकडून आणखी काय माहिती मिळते ते बघत होतो.

मला म्हणाली,
“मी नेहमीच विचारात असते की माझ्या विद्यार्थ्यांची सकाळ कशी जात असेल.माझे विद्यार्थी/विद्यार्थीनी आणि त्यांचे आईवडील त्यांच्या मुलानी सकाळी शाळेत सात वाजता हजर रहाण्यासाठी ती नुसताच सकाळच्या झोपेचाच त्याग करतात असं नसून त्याहूनही अधीक काही करीत असावेत.

नुसतच नित्याचं काम करण्यासाठी सगळे मिळून आपण एव्हडा लांब दिवस वापरतो कां? सकाळची वेळ माझ्या विद्यार्थ्याना कठिण जात असेल तर ते माझ्या दृष्टीने ठिक आहे. त्याशिवाय शाळाही त्यांना कठिण वाटत असेल तरीही माझ्या दृष्टीने ते ठिक आहे.पण हेच जर सर्व काही असेल -म्हणजे सकाळ पासून रात्रीपर्यंतचे हे एव्हडे परिश्रम -तर मग मात्र त्यांनी अंथरूणातच असलेलं बरं.”
मी म्हणालो,
“ही मुलं आपल्याकडून प्रेमाची,सद्भाभावनेची आतुरतेने अपेक्षा करीत असतात.”
“अगदी बरोबर”
असं म्हणत सुधा म्हणाली,
“माझ्या विद्यार्थ्यांना सकाळच्या पाचच्या अंथरूणातल्या त्या प्रसन्नतेपेक्षाही खोल आणि बहुमुल्य प्रसन्नता सकाळी वाटली पाहिजे.सकाळी उठल्यावर कालच्यापेक्षा आज त्यांच्यात जरा जास्त सुधारणा झाली आहे असं त्यांना वाटलं पाहिजे.”

“त्यांची सकाळची वेळ कशी असावी,हे आपल्या हातात नसतं.कुणाचा काय प्रॉब्लेम तर कुणाचा काय? खरं ना?
एखादी सकाळीच उठून दिवसभर स्वतःशीच बडबड करायला मागत असेल,दुसरा एखादा पुस्तकातल्या धड्यातल्या प्रत्येक शब्द समजून घेण्यासाठी सकाळी धड्पडून उठत असेल”
मी सुधाला म्हणालो.

“काही मुलांचे चेहरेच सांगतात की त्यांच्यावर दिवसभरातली किती संकटे आहेत ती. मला त्यांना सल्ल्ला द्यावासा वाटतो की त्यांनी त्यांना रोज सकाळी नवीन व्यक्ती म्हणून पहावं”
हे सांगून सुधा म्हणाली,
“काका, मी तुम्हाला एका विद्यार्थीनीचं उदाहरण देऊन सांगते.
पुष्पा नावाच्या माझ्या एका विद्यार्थीनीच्या सकाळ कशा असतात ते मला माहित नाहीत.गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मला कळलं की ती जरा विशेष विद्यार्थीनी आहे.गेली दोन वर्षे ती पाचवीतच आहे.माझ्या वर्गात येऊन तीने मला अगदी थकवलं असं म्ह्टलं तर अ्तीशयोक्ती होणार नाही..मला आठवतं एके दिवशी सकाळी ती माझ्याकडे अगदी फुरगंटतच आली.
सकाळी तीच्या मैत्रीणी बरोबर तीचा काहीतरी वाद झाला. सर्व दिवसच फुकट गेला असं तीला सकाळीच वाटायला लागलं.मी तीला आमच्या शिक्षकांच्या खोलीत बोलावलं.थोडसं चिडचीडूनच मी तीला सांगीतलं,
“रोज सकाळी माझ्या खोलीत येऊन तू “नमस्ते टीचर” असं मला म्हणून जा.आताच इथून बाहेर जा आणि लगेच आत येऊन तसं म्हण.काही शब्द न उच्चारता ती बाहेर गेली आणि आत येताना म्हणाली “नमस्ते टीचर”.आणि गेलं वर्षेभर ती मला असं म्हणते.
तीच्या त्या रोजच्या फसव्या हंश्याने, “नमस्ते टीचर” म्हणण्याने माझी फसगत झाली असेल.पण माझी खात्री झाली झाली होती की आदल्या दिवसाचं संकटाचं ओझं उतरून रोज पुष्पा माझ्या खोलीत सकाळी येऊन कुणी तरी नवीन व्यक्ती म्हणून यायची. काराण मला वाटतं प्रसन्नतासकाळीच येते.”
मी सुधाला म्हणालो,
“आदल्या दिवशी झालेलं कठिण पांडित्य घेऊन आपण रोज सकाळी उठतो. ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनात येत असलेली वास्तविकता बरेच वेळां अपरिहार्य असते असं मला वाटतं.”

“पण म्हणून त्यासाठी आपल्याला बेचैन व्ह्यायचं कारण नाही. खूश असणं,किंवा प्रसन्न असणं, म्हणजे काही मस्तीखोर असणं नव्हे,किंवा भोळसट असणं नव्हे.उलटपक्षी खूश असणं म्हणजेच उद्देशपूर्वक उन्नती करण्याच्या इराद्यात असणं.”
आपल्या कडून झालेली प्रत्येक क्रिया आणि उच्चारलेला प्रत्येक शब्द पुढे काय करू शकेल किंवा काय करणार आहे हे ज्या उमेदीतून निर्माण होणार आहे ती उमेद अगोदरच माहित असणं म्हणजेच खूश असणं म्हणजेच प्रसन्न असणं.”

असं म्हणून सुधा दरवाजा उघडायला गेली.सुधाचं हे प्रसन्नतेवरचं भाष्य ऐकत असताना दारावरची बेल वाजलेली मी ऐकलीच नाही.
माझा पुतण्या मला नेण्यासाठी आलेला पाहून एक तास केव्हा संपला आणि सुधाशी बोलण्यात वेळ केव्हा निघून गेला हे मला कळलंच नाही.
ऊठता उठता मी सुधाला म्हणालो,
“तू खाली गाडी जवळ मला बोलवायला आली होतीस तेव्हा माझ्या मनात तुला सांगायचं आलं होतं की पुन्हा केव्हा तरी भेटूया.पण तसं मी तुला सांगीतलं नाही ते मी माझ्या मनातच ठेवलं.तुझ्याकडून एव्हडं ऐकल्यावर खूपच बरं वाटलं.पण आता जाता जाता मला तुला नक्कीच सांगावसं वाटतं
“पुन्हा कधी तरी नक्कीच भेटूंया”
असं म्हणून आम्ही-मी आणि माझा पुतण्या- पाच मजले भरकन खाली उतरत गेलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, December 12, 2009

इंद्रधनुष्याचा पाठलाग.

“माझा प्रयत्नावर विश्वास आहे.जरी पकडू शकले नाही तरी इंद्रधनुष्याचा पाठलाग करण्यावर माझा विश्वास आहे.”

वसुंधरा नाडकर्णी एक चांगली पत्रकार आहे हे मला माहित होतं.एका स्थानीक वर्तमानात ती रिपोर्टर म्हणून सुद्धा काम करायची.अलीकडे ती पर्यावरणावर अभ्यास करीत आहे.पर्यावरण हा सध्या बहूतचर्चीत विषय झाला आहे.काही श्रीमंत देश स्वतःच्या जरूरी साठी आणि उर्जा मिळवण्यासाठी पृथ्वीवर भरपूर प्रदुषण करून आपली उर्जीतावस्था करून घेऊन श्रीमंत झाले आहेत आणि यापुढे प्रदुषण कमी केलं नाही तरी पृथ्वीवर हाः हाः कार होईल म्हणून विकसीत होऊ घातलेल्या देशांवर प्रदुषण न करण्याचा दबाब आणीत आहेत.
जगात ह्या विषयावर अनेक चर्चासत्रं चालू आहेत.माझा मित्र आणि मी अशाच एका चर्चासत्रात गेलो होतो.माझ्या मित्राने माझी वसुंधरेशी ओळख करून दिली होती.

त्यानंतर मी एकदा मुंबईहून दिल्लीला जात असताना माझी आणि तीची विमानात गाठ पडली.
“तू पर्यावरणाच्या विषयात का पडलीस?”
असा मी तीला प्रश्न केला.
माझा प्रश्न ऐकून ती थोडी हंसली. मला ही थोडं नवल वाटलं आणि ते तीच्या ध्यानात ही आलं. मला म्हणाली,
“मी का हंसले ते मी तुम्हाला नंतर सांगीन.पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगोदर देते”.
वसूंधरा म्हणाली,
“मला खूप लेखन करायचं आहे.एक दोन कादंबर्‍या लिहिण्याचे विषय मनात घोळत असतात.पण मुलतः मला पत्रकारीकता आवडते.म्हणून शास्त्रीय विषयावर लिहीते आणि त्यावर रिपोर्टींग पण करते.पर्यावरण आणि प्रदुषण हे विषय सध्या शिखरावर आहेत.त्याचाही अभ्यास करीत आहे.आणि जमेल तसं एका कादंबरीचं तात्पूरतं,कच्चं लेखन करून ठेवीत आहे.ह्या विमानाच्या प्रवासात मला असं कच्चं लेखन करायला खूप संधी मिळते.”
“म्हणजे मी आज तुझा वेळ खाणार आहे त्यामुळे तू मला शिव्या देत असणार ना?”
असा हंसत हंसत मी तीला प्रश्न केला.
“नाही,नाही तसं काही नाही.तुमच्याबरोबर चर्चा करून माझा फायदाच होणार आहे.”
“ते कसं?”
असा कुतूहलाने मी वसुंधरेला प्रश्न केला.
“त्याचं असं आहे तुम्ही “कां” प्रश्न करून मला माझ्या बालपणाची नव्हेतर माझा आता पर्यंतच्या जीवनाची झटक्यात आठवण करून दिलीत.आणि मघाशी मी त्याचाच विचार करून हंसले होते.”

असं तीने म्हटल्यावर मी मनात म्हणालो नाहीतरी ही़च्या बद्दल बरीच माहिती माझ्या मित्राने मला सांगीतली होती.आता काही गोष्टी प्रत्यक्ष तीच्याच तोंडून ऐकायला संधी मिळाली आहे.

“माझ्या मैत्रीणी मला म्हणत,तीन,चार वर्षाचं वय म्हणजे “कां” म्हणायचं वय.ह्याच वयात माझी मुलगी मला विचारायची,
“आकाश निळं कां आहे? पाण्याला रंग कां नाही?
आणि असेच काही शास्त्राला लागून असलेले प्रश्न मला विचारायची जे मला संभ्रमात टाकीत असत.तीने प्रश्न विचारल्याबरोबर मी ताबडतोब माझ्या लॅपटॉपकडे धांव घ्यायची आणि गुगलवर जाऊन माहिती काढायची.आणि तीला सांगायची.
निदान असे प्रयत्न तरी माझ्याकडून व्हायचे.एकदा तीने मला प्रश्न केला,
“आई,”
असं म्हणून ती वर आकाशाकडे आपले सुंदर गोल डोळे टवकारून पहात मला म्हणाली,
“हे इंद्रधनुष्य आपण कसं पकडू शकतो?”
मी वसुंधरेला मधेच अडवीत म्हणालो,
“तू तीला सांगीतलं असशील की सूर्य प्रकाश पावसाच्या थेंबातून कसा शिरकाव करून बाहेर पडतो,आणि तसं झाल्यावर त्या प्रकाशाचं सात रंगात कसं रुपांतर होतं वगैरे.”
मला ती म्हणाली,
“मुळीच नाही. खरं तर तीला इंद्रधनुष्य कसं तयार होतं हे विचारायचं नव्हतं.ते पकडायचं कसं? हे विचारायचं होतं. कारण ते तीला पकडता येत नव्हतं.
माझ्या मनात यायचं की तीला मी सांगावं का? की माझे बाबा, कुठचीही अशक्यप्राय असलेली गोष्ट साध्य करून दाखवायचे ते?
पण तेव्हड्यात माझ्या विचारात गुंगून गेलेल्या मतीला माझ्या नवर्‍याच्या घोघर्‍या आणि विश्वासपूर्वक आवाजाने खंड आणला.त्याने तीला सांगीतलं,
“तुला खरोखरच वेगाने धावावं लागणार.इतकं वेगाने की तू जणू त्या इंद्रधनुष्यावर आदळतेस की काय असं वाटलं पाहिजे मगच ते तुला पकडता येईल.”
“मी खूप जोरात धावते” माझी मुलगी त्याला म्हणाली.
“हो छकुले,तुझं खरं आहे.”
मी म्हणाले,
“पण तू धावण्यात थोडी मागे पडतेस.”

मी विचार केला तीची निराशा का करावी? कधी ना कधी ती मोठी झाल्यावर देवाच्या पर्‍या असतात त्या हट्ट न करणार्‍या लहान मुलांच्या स्वपनात येतात आणि तू देवाला आवडतेस म्हणून निरोप देऊन जातात. हे आम्ही तीला सांगीतलेलं किती खरं होतं ते कळणारच आहे मग त्यावेळीच इंद्र्धनुष्य पकडण्याबद्दल खरं सांगायचं का?

परंतु, माझ्या हे ही लक्षात आलं की, ती काय,मी काय आणि माझा नवरा काय जीवनात इंद्रधनुष्याचा पाठलाग करीत असतो.माझ्या पाचवीच्या वर्गातली माझी शिक्षीका जेव्हा मला म्हणाली होती की मी चांगलं अक्षर काढून लिहू शकत नाही तेव्हा मी तीला खोटं ठरवायचं ठरवलं होतं.आणि शेवटी मी त्यात यशस्वी झाले.त्यानंतर मी पत्रकारितेत डीग्री घेतली.काही वर्ष पत्रकार म्हणून काम केलं.एक दोन पुस्तकं लिहीली.संपादक झाले.एका मासिकाचं संपादन केलं.आणि आता स्वतंत्र सायन्स रायटर पण आहे.”
“तुझा नवरा काय करतो?”
असा मी तीला प्रश्न केला.
वसुंधरा म्हणाली,
“माझ्या नवर्‍याला कुठेही नोकरी करायला आवडत नाही.
जेव्हा माझ्या नवर्‍याला रेडीमेड कपड्याचं नवीन दुकान घालून धंदा करायचा होता तेव्हा मी सातव्या महिन्यावर गरोदर होते.त्यावेळी आम्ही दोन इंद्रधनुष्यांचा पाठलाग केला होता.अगोदरच आम्ही रहात्या अपार्टमेंटचा हाप्ता भरत होतो आणि आता धंद्याच्या लोन वर दुसरा हाप्ता भरायला लागलो.माझ्या नवर्‍याला दोन वर्ष मिळकत नव्हती.अशा परिस्थितीत मी माझ्या नवजात मुलीला वाढवत होते.तीचे कपडे बदलायचं,पाळणा ओढून तीला झोपवायचं,आणि तीला पाजायचं.ही कामं करण्यात माझा वेळ खर्ची जायचा.आणि हे करीत असताना रकानेच्या रकाने लेखन करायचं,आणि
संसाराला मदत करायची.हे करीत असताना माझ्या पाचव्या वर्गातल्या शिक्षीकेने मी जे करू शकणार नाही म्हणून मला सांगीतलं होतं तेच मी करीत होते.”

“मग आता तू काय करतेस?”
असं मी विचारल्यावर ती म्हणाली,
“अजून सुद्धा मला सृजनात्मक लेखन कसं करायचं त्यावर क्लासीस घ्यायचे आहेत.माझा इंद्रधनुष्य पकडण्यासाठी पाठलाग चालूच आहे. पंधरा वर्षापूर्वी मी कॉलेज सोडलं.ऑलजीब्रा,जॉमेट्री आणि इतर विषय विसरून गेले आहे.तरीपण मी त्या इंद्रधनुष्याचा पाठलाग करीत आहे. कारण मला कादंबर्‍या लिहायच्या आहेत.मी पाठलाग करीत आहे कारण माझा प्रयत्नावर विश्वास आहे.जरी पकडू शकले नाही तरी इंद्रधनुष्याचा पाठलाग करण्यावर माझा विश्वास आहे.”

वसुंधरा आणि मी आणखी अनेक विषयावर बोलत होतो ते प्रवास संपेपर्यंत.शेवटी दिल्लीला उतरल्यावर,
“पुन्हा असेच कधी तरी भेटूं”
असं म्हणत आम्ही आमच्या मार्गाला लागलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, December 10, 2009

मी आणि माझी आई.

“मी तीच्या जखमावर फुंकर घालीत आहे.पण मला वाटतं तीच्या काही जखमा इतक्या गहिर्‍या झाल्या आहेत की ते व्रण तीचा अंत होई तो रहाणार आहेत.”

वासंती बाहेरून दरवाजावर ठोकत आहे आणि आतून कुणीही तिला दरवाजा उघडून आत घेत नाही हे वासंतीच्या बाबतीत पाहिलेलं दृश्य अजून मला आठवतं.त्यावेळी वासंती अगदी लहान होती.असेल चार पाच वर्षाची.मी त्यावेळी तिला जवळ घेऊन आमच्या घरी न्यायचा प्रयत्न करायचो पण ती माझं ऐकत नसायची.

वासंतीची आई भारी शिस्तीची होती.तीला आपल्या मुलांनी लहान असताना सुद्धा जबाबदारीने वागवलेलं आवडायचं. पण वासंती त्या शिरस्त्यात बसत नव्हती.आणि त्यामुळे हे असले प्रकार वरचेवर व्हायचे.

खूप वर्षानी वासंती आमच्या घरी आली होती.गप्पा करताना हा दरवाजाचा विषय निघाला.
मला म्हणाली,
“मला आठवतं ती एक घटना सांगते.त्यावेळी मी तीन,चार वर्षाची असेन.मला पक्कं आठवतं,मी लाल रंगाचा झगा घातला होता. छातीवर गुबगुबीत सस्याचं विणलेलं चित्र होतं.मी घरात येण्यासाठी दरवाजाच्या बाहेरून दरवाजावर ठोठावत होते. बाहेर काळोख पडला होता.ते थंडीचे दिवस होते.माझी आई मला दरवाजा उघडून आत घेत नव्हती.
“नीट वागायचं कबूल आहेस का?”
आई आतून मला विचारायची.
मी मनात म्हणायची,
“नाही कबूल होणार.”
पण मला घरात यायचं होतं.मी दमली होती. बाहेर थंडी होती.बाहेर काळोख ही झाला होता.मला भिती वाटत होती कसलीही कबूली देऊन तीने मला आत घ्यावं अशा प्रयत्नात मी होती.
मी वासंतीला विचारलं,
“ती असं का करायची?”
“आता लक्षात नाही ती तसं का करीत होती.मी जरा हट्टी आणि हेकेखोर स्वभावाची होती.कदाचीत माझ्या स्वभावाचा आईला वैताग आला असावा.मी नक्कीच तशी होती.कदाचीत माझ्या आईने तुम्हाला तसं सांगितलं ही असेल.मी टीनएजेर होई तो तशीच होती.हाताबाहेर गेलेली म्हणा हवं तर.”
वासंतीने तीच्या स्वभावानुसार खरं ते सांगून टाकलं.

“तुझी आई कडक स्वभावाची होती.मला आठवतं,मी तीला एकदा म्हणालो होतो की मुलं लहान असताना हट्टी असतात. मोठी झाल्यावर सुधारतात.पण मग ती मला तुझ्या धाकट्या बहिणीचं उदाहरण देऊन सांगायची की काही मुलं जात्याच तशी असतात.तुझ्या धाकट्या बहिणीची ती फार स्तुती करायची.”

माझं हे ऐकून वासंती म्हणाली,
“माझी आई माझ्यात बदलाव व्हावा म्हणून प्रयत्नात असायची, माझ्या धाकट्या बहिणी सारखी मी व्हावी म्हणून प्रयत्नात असायची. माझी धाकटी बहिण माझ्या आईची का्र्बन कॉपी होती. जबाबदार,प्रामाणिक, चांगल्या आचरणाची, सच्ची.
माहित आहे का माझी आई मला नेहमी काय म्हणायची?
“तू कधीच इतरांसारखी होणार नाहीस”
“अरेरे, हे काही मला माहित नव्हतं का?” मी मनात म्हणायची.

मी वासंतीला म्हणालो,
“तुला हे जर माहित होतं तर तू अशी का वागायचीस?”

“आईचं खरं होतं.हो,मी काहीतरी विकृत गोष्टी करायची आणि वर खोटं बोलायची.मी माझ्या आईकडून न मिळणार्‍या संमत्तीची धसकी घेतली होती शिवाय मी तीच्या मर्जीत बसत नाही हे समजून इतकी भयभीत व्हायची की ती काही म्हणाली तरी मी तीला होय म्हणायची.
मी कुणालाही दोष देत नाही.माझ्या आतापर्यंतच्या जीवनाचं मुल्य-मापन करीत असताना मी मलाच म्हणते की मी जे करते ते असं कां करते? “

वासंतीचे हे प्रामाणिक उद्गार ऐकून मला वाईट वाटलं.मी म्हणालो,
“तू तुझ्या आईला ह्या बाबत कधी विचारलंस का?
डोळे ओले करीत वासंती म्हणाली,
“ह्या पुढे माझी आई मला कधीच मदत करू शकणार नाही.कारण आता ती ह्या जगात नाही.
“मी भाग्यवान आहे”
असं ती मला म्हणायची. आणि वर म्हणायची,
“कुणी भाग्यवान व्हावं अशी आशा करणार्‍याच्या पलीकडे मी भाग्यवान आहे.”
आणि तरीसुद्धा मी गोंधळ घालायची.त्या गोंधळाचा तीला कंटाळा यायचाच आणि माझा ही तीला कंटाळा यायचा.”
मी वासंतीला विचारलं,
“आता तुला कसं वाटतंय?”
ती म्हणाली,
“आता मी परत घराच्या बाहेर अडकली आहे.फक्त ते अडकणं जरा अलंकृत आहे.मी जर का खरीच अडकली असेन तर माझ्या आईच्या जीवनात अडकली आहे असं म्हटलं पाहिजे.तशीच चार,पाच वर्षाची मला मी वाटते.बरीच दशकं मी दरवाजा ठोठावीत आहे असं सारखं वाटतं.आणि तीने मला आत घेतल्या सारखं केलं आहे असं ही वाट्तं.पण मला वाटतं माझं उरलंसुरलं जीवन मी दरवाज्याच्या बाहेरच काढणार आहे.माझ्या मला मी समजले आहे की मी आवेशजनक बाई आहे आणि मी विचार न करता काहीही करते.मी नेहमीचीच तशी आहे.”

वासंतीला धीर देण्याच्या उद्देशाने मी तीला म्हणालो,
“कदाचीत असं असणंच बरं.घरात घेणं म्हणजे शर्तीने घेतल्यासारखं वाटतं.”
मला म्हणाली,
“माझ्यात माझ्या धाकट्या बहिणीचा एकही गुण नाही.त्यातला थोडासा अंशही माझ्यात नाही.आणि भविष्यातही तो गुण माझ्यात नसणार.अखेर मी असंच म्हणेन की मी तशी नाही ते ठीक आहे.मी तसं होण्याचा प्रयत्न केला आणि करीतही राहीन पण आता माझा तो प्रयत्न दरवाजाच्या बाहेर राहून माझ्या आईच्या शर्तीची भिती असलेला नसेल.
मला माहित आहे की माझी आई माझ्यावर प्रेम करायची.पण मला हे ही माहित आहे की ती प्रेम करायची कारण तीला दुसरा उपाय नव्हता. बोलून चालून ती माझी आई होती.
मी तीला आवडत नव्हते असं काही नाही.माझी ती जन्मदात्री होती. माझं व्यक्तीमत्व असंच होतं. त्यामुळे जर का माझं तिच्याशी नातं नसतं तर खचीतच मी तीला न-आवडणार्‍यापैकी असते.खरंच तीने कधीच प्रेम केलं नसतं.
मी जशी मोठी व्हायला लागले तसं माझ्या लक्षात यायला लागलं की जे कोण आहेत ते जसे आहेत तसेच असतात.माझी आई पण.मी पण.”
आम्ही दोघं मैत्रीत न रहाण्याचं कारण आमच्यात पराकोटीची भिन्नता होती. मला तीने मदतीचा हात बरेच वेळा पुढे केला होता. माझं तीच्यावर प्रेम होतं.तरी पण मी तीला खूप ताप दिला आहे. आणि मी मलाच त्यासाठी दुषणं देते.आता माझ्या मनात सर्व ठीक ठाक वाटण्यासाठी एव्हडंच मी म्हणू शकते.”

“ते जाऊ देत.आता तुझी आई नाही.तुझी तू स्वतंत्र आहेस.दोन मुलं पण तुला आहेत,मग त्यांच्याशी तुझं कसं चालंय?”
मी जरा काचरतच वासंतीला विचारलं.

“आता मी माझ्याच घरात रहाते.त्यामुळे दरवाजाच्या बाहेर राहायची आता माझ्यावर पाळी नाही.माझ्या घरात माझ्यावर सर्व प्रेम करतात. मी त्यांना हवी हवीशी वाटते.मी गोंधळ करते पण प्रेमळ हातानी माझं स्वागत होतं.गोंधळ झाला तरी तो सुधारला जाऊं शकतो असं मला आश्वासन दिलं जातं.
माझी मुलं दरवाजाच्या बाहेर कधी ही नसणार.मी त्यांना समझ दिली आहे आणि मी वचनबद्ध आहे. ती माझी आज्ञा मोडू शकतात. माझ्या वस्तु मोडू शकतात माझं मन मोडूं शकतात.ती हट्टी असूं शकतात.पण त्यांना घरात येण्यासाठी जोरजोरात दरवाजावर ठोकायला लागणार नाही. मी माझ्या मला कुठेतरी कोंडून ठेवीन पण माझ्या मुलांना दरवाजा कधीच बंद नसणार.”

“वासंती तू जरी तुला हट्टी आणि हेकेखोर स्वभावाची आहेस असं म्हटलीस तरी तू स्वपनाळू पण आहेस.नाहीपेक्षा जुन्या गोष्टी आठवून तू तुला एव्हडं अंतर्भूत करून घेतलं नसतस.”
असं मी वासंतीला म्हणालो.तीला हे मी म्हटलेलं फारच मनस्वी वाटलं.अगदी गंभीर होऊन मला म्हणाली,

“त्या मुलीची पडछाया मला दिसते.माझ्या आईच्या दरवाजावर त्या तीच्या चिमुकल्या मुठी आपटताना दिसतात ती मुसमुसून रडत आहे.ओरडत आहे.श्वास लागल्यासारखी ती हुंदके देत आहे.चिमुकली तीची छाती वरखाली होत आहे.तीचे काळेभोर डोळे आंसवानी थबथबले आहेत.ते अश्रू तीच्या त्या झग्याला ओले करीत आहेत.ती खूपच दुःखी झाली आहे. असं दृष्य माझ्या डोळ्यासमोर येतं.मी तीच्या जखमावर फुंकर घालीत आहे.पण मला वाटतं तीच्या काही जखमा इतक्या गहिर्‍या झाल्या आहेत की ते व्रण तीचा अंत होई तो रहाणार आहेत.”

मी वासंतीचा हात माझ्या हातात घेऊन त्यावर थोपटीत म्हणालो,
“जीवन म्हणजे एक कथानक असतं.प्रत्येकाची कथा वेगळी वेगळी.
“दोन घडीचा डाव ह्याला जीवन ऐसे नाव”
असं कुणीसं म्हटलंय ते अगदी खरं आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, December 7, 2009

दिवस ते गेले कुठे

कुणाच्या तरी आयुष्यात कधीकधी असे ही दिवस येतात की प्रश्नावर प्रश्न विचारून सुद्धा एक ही उत्तर मिळत नाही.कारण उत्तर देण्यासारखं जीवनात काही ही राहिलेलं नसतं.

दिवस ते गेले कुठे
सांग ना! दिवस गेले कुठे
नजर सांगत होती प्रीतिच्या अनंत कथा
तरूण विश्व अन नव्हत्या कसल्या व्यथा
घरटे ते जळले कसे
सांग ना! घरटे जळले कसे

निष्ठा माझी विसरलास कसा
सांग ना! निष्ठा विसरलास कसा
छपली आहे तुझजवळी माझ्या मनाची दशा
कंपीत हृदयामधे दिसेल कशी मनातली आशा
कठीण समयी निर्वाह केला कसा
सांग ना! निर्वाह केला कसा

प्रीतिची प्रथा तू सोडलीस कशी
सांग ना! प्रथा सोडलीस कशी
राहिले आता मी अन माझी बाग उजाडलेली
संपले मनोरथ अन माझी यष्टी मरगळलेली
दिपावर झेपवून पतंग जळला कसा
सांग ना! पतंग जळला कसा

दिवस ते गेले कुठे
सांग ना! दिवस गेले कुठे

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, December 5, 2009

माझी मात्र मानवतेवरची श्रद्धा अटल आहे.

“जगात अलीकडे मनुष्य जीवनाचा जो विध्वंस चालला आहे ते पाहून मनात येतं की हा जीवनाचा रथ कुठच्या दिशेला चालला आहे.? शे-पाचशे लोकांचा मृत्यु ही रोजचीच बाब झाली आहे. जग अगदी लहान होत चालल्याने जगातल्या कुठल्याही कोपर्‍यातली बातमी जणू आपल्या गावातल्या बातमी सारखी वाटू लागली आहे.
ही मनुष्य जीवनाची हानी मग ती कुठच्याही धर्माची असो,किंवा कुठच्याही लष्कराची असो, माणसाला निसर्गाने दिलेल्या बुद्धिमत्तेचा दुरूपयोग म्हणून तर ही मनुष्य हानी होत नसेल ना?”

तळ्यावर आज प्रो.देसाई आणि प्रि.वैद्याना एकत्र आलेले पाहून त्यांच्याही बुद्धिला थोडीशी चालना मिळावी म्हणून आणि माझ्या प्रमाणे त्यांनाही ह्या विषयावर काय वाटतं हे समजण्यासाठी म्हणून बोलायला सुरवात केली.

प्रो.देसाई म्हणाले,
“मला नेहमीच वाटतं की माणसाचं मन सर्वसाधारणपणे चांगलंच असतं.माणसाचं मन जन्मतःच संवेदनशील असतं.स्वतःला कुणी स्वीकृत करावं व स्वतः दुसर्‍यांना स्वीकृत करावं ह्या साठी त्याचं मन उतावीळ असतं.अगदी साध्यासुध्या आनंदाला आणि जीवन जगण्याला मोका मिळावा म्हणून त्याचं मन भुकेलेलं असतं.
कुणाची हत्या करायला वा स्वतःची हत्या व्हावी म्हणून ते मन कधीही इच्छा करीत नाही. काही प्राप्त परिस्थितीत जरी दुष्टवृत्तीने त्याच्यावर काबू आणला तरी ते मन परीपूर्ण दुष्टवृत्तीचं होत नाही. थोडा फार चांगुलपणाचा अंश त्याच्यात असतोच. आणि तो चागुलपणाचा अंश कितीही अप्रभावी झाला तरी तो त्या चांगुलपणाची पुनःस्थापना करण्याच्या प्रयत्नात असतो.”

प्रो.देसायांचं हे म्हणणं ऐकून प्रि.वैद्य थोडेसे विचारात पडलेले दिसले.
“तुम्हाला काय वाटतं वैद्यसाहेब ?”
असा मी त्यांना सरळ प्रश्न केला.
ते म्हणाले,
“मला माझ्या जीवनात आनंद वाटतो कारण मी आजुबाजूच्या लोकांत आणि त्यांच्या विकासात निरंतर स्वारस्य घेऊ इच्छितो.असं स्वारस्य घेण्याने त्यांच्या बद्दलच्या ज्ञानाची माझ्या ज्ञानात भर पडते आणि त्यामुळे मनुष्याच्या अंगात असलेल्या चांगुलपणावर विश्वास वाढतो.
माणुसकीत माझा भरवसा आहे.पण मी भावूक होऊन भरवसा ठेवीत नाही.मला माहित आहे की अनिश्चीतता, भयभीती, आणि भुकेच्या वातावरणात माणूस अगदी ठेंगणा झालेला दिसतो आणि नकळत तो असा बनला गेला असण्याचा संभव आहे.”

माझंही मत द्यावं म्हणून मी त्यांचं ऐकून म्हणालो,
“एखाद्या दगडाखाली उगवण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोपट्याची धडपड कशी असते अगदी तसंच माणसाचं झालं आहे.ती शीळा बाजूला केल्यावरच ते रोपटं सहजपणे प्रकाशात फोफावून येतं.आणि फोफावून वर येणं ही त्या रोपट्याची स्वाभाविक क्षमता असते.फक्त मृत्युच त्याला अंत आणू शकतो. माझीपण आपल्यासारखी ह्या बाबतीत माणूसकीवर श्रद्धा आहे. त्याशिवाय आणखी कुठच्याही श्रद्धेची मला जरूरी भासत नाही.”

प्रो.देसाई काही बोलत नाहीत असं पाहून प्रि.वैद्य आपला मुद्दा पुढे सरकवीत म्हणाले,
“ह्या धरतीवरच्या एकूण आश्चर्यात,आणि जीवजंतूच्या आयुष्यात मी ध्यान-मग्न झालो आहे.त्यामुळे स्वर्ग आणि देवदूताबद्दल मी विचारच करीत नाही. माझ्या स्वतःच्या जीवनाच्या अंतापर्यंत विचार करायला ही वेळ मला भरपूर आहे.दुसर्‍या कसल्याही जीवनापेक्षा माणूस म्हणून मला जन्माला आल्याने सार्थक झाल्यासारखं वाटतं.”

प्रो.देसायाना बोलकं करावं ह्या उद्देशाने मी त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब,मनुष्याच्या जीवनातला आशय तरी काय असावा”?
“माणसाच्या हृदयात असलेली एव्हडी अगाध श्रद्धा आणि प्रकाशाकडे झेप घेण्याची त्याची क्षमता पाहून मानवाच्या भविष्यात आशा आणि विश्वास ठेवण्यासाठी ह्या धरतीवरचा माझ्या जीवनातला आशय आणि कारण मला कळलं आहे. माणसाची व्यावहारिक बुद्धि कधी ना कधी हे नक्कीच सिद्ध करू शकेल की परस्परातली सहायता आणि सहयोग ह्या दोन गोष्टी सर्वांच्या सुरक्षतेसाठी आणि सुखासाठी विवेकपूर्ण बनल्या गेल्या आहेत.”
प्रो.देसाई असं म्हणून माझ्याकडे हंसत हंसत मलाच म्हणाले,
“सांगा अशावेळी तुम्ही काय कराल?
मला बोलू देण्यापुर्वी प्रि.वैद्य,
“मी सांगतो”
असं सांगून मला हाताने खुणावीत म्हणाले,
“अशा तर्‍हेच्या श्रद्धेचा विनीयोग जर का मनुष्य स्वतंत्र राहून आपली उन्नती करून घेण्यात करील तर अशा परिस्थितिला चांगलं रूप आणण्यात माझ्या सारख्या एकट्यालाही सदैव सतर्कता ठेवून आणि उद्देश्यपूर्ण क्षमता आणून ते करता आले तर तेव्हडाच हातभार लागेल.अशी परिस्थिति मला वाटतं,सुरक्षितता आणि मित्रत्वाच्या आवश्यकतेवर पायाभूत असते.काही गोष्टी माझ्या मनापासून मला आशाजनक वाटतात जशा सगळ्या जगातल्या अन्न उत्पादनाचा नीट विनीयोग केला तर ह्या धरतीवरच्या सर्व माणसाना पुरण्याइतकं अन्न आपल्या जवळ शिल्लक राहिल.आपलं औषधीय शास्त्रासंबंधाचं ज्ञान एव्हडं परीपूर्ण आहे की सगळ्या मानवजातीचं आरोग्य सुधारता येईल. आपल्याकडे असलेलं संसाधन आणि शिक्षणातलं ज्ञान ह्यांचा नीट प्रबंध केला तर जागतीक तुलनेत मनुष्यजातीच्या बुद्धिमत्तेची पातळी उंचावता येईल.ह्या जगातल्या काही देशाजवळ अगोदरच असलेल्या अशा तर्‍हेच्या फायद्याचा संपूर्ण जगाच्या तुलनेत कसा प्रबंध करायचा एव्हडंच शोधून काढावं लागेल.”

“आता तुम्ही बोला”
असं मला म्हणून प्रि.वैद्य मिष्कील हंसले.प्रो.देसाई पण मला म्हणाले,
“तुमचं सांगून झाल्यावर हा विषय समाप्त करू या.कारण आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत मला गेलं पाहिजे.”
मी माझं मत दिलं.
माझी रोपट्यापासून दगड दूर करून ठेवण्याची उपमा आचरणात आणली पाहिजे.एकमेकात असलेल्या आणि एकमेकावर असलेल्या माणसाच्या विश्वासाच्या आधारे हे करणं शक्य आहे.अर्थात सर्वांजवळ एकाच वेळी ही श्रद्धा असेल असं नाही.पण जास्तीत जास्त लोकांत अशी श्रद्धा बळावयाला हवी.
पाच पन्नास वर्षापूर्वी कुणीही जागतीक अन्नाचा साठा,जागतीक आरोग्याची जरूरी,जागतीक शिक्षण असल्या गोष्टींचा विचारही केला नसता. आजबरेच लोक ह्याचा विचार करायला लागले आहेत.
आजच्या ह्या अन्धाधुंध विध्वंसाच्या काळात माझ्या मनात येणारा प्रश्न असा की,
बुद्धिमंताजवळ ह्यावर कृती करायला वेळ राहिला आहे काय?
कारण मला वाटतं हा, मृत्यु आणि अज्ञान किंवा जीवन आणि बुद्धिमत्ता ह्यातला संघर्ष आहे.
माझी मात्र मानवतेवरची श्रद्धा अटल आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, December 3, 2009

विष प्राशन केले तीने दवा समजूनी

अनुवाद.( होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा….)

विसरली ती मला विवश होऊनी
विष प्राशन केले तीने दवा समजूनी

असाव्या कथील्या अनेक कथा अंतराने
न वाहता प्राशीली आसवे लोचनाने
जाळीली मम प्रेमपत्रे बंद कक्ष करूनी
उच्चारीले अनेक शब्द जिव्हेवर आणूनी

विसरली ती मला विवश होऊनी
विष प्राशन केले तीने दवा समजूनी

नजर चोरीली तीने व्याकूळ होऊनी
मनातील स्वप्ने दुभंगलेली पाहूनी
चित्र माझे भिन्तीवरचे हटवूनी
मी तळमळत आहे असे पाहूनी
विष प्राशन केले तीने दवा समजूनी

आठवूनी मजला मनोकामना उसळली
दिखाव्याच्या हंसण्याने दुःख्खे नाही छपली
नाव घेता माझे लोचने पाण्याने भिजली
सखीच्या खांद्यावरची मान नसेल उठवली
नजर चोरीली तीने व्याकूळ होऊनी

कचपाश मोकळे पाठीवर सोडूनी
सांवट दुःखाची चेहर्‍यावर आणूनी
वीज डोळ्यामधली फेकीली चमकूनी
गालावरची लाली गेली काही सांगूनी
नजर चोरीली तीने व्याकूळ होऊनी

विसरली ती मला विवश होऊनी
विष प्राशन केले तीने दवा समजूनी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्नीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, December 1, 2009

प्रतीरोध-क्षमता ही हृष्ट-पुष्ट होण्यापलिकडची बाब आहे.

"एका शहाण्या-सवर्‍या माणसाने मला चांगला उपदेश केला.
"ज्या कामावर तू प्रेम करतेस ते काम करायचं ठरव."


मला कंटाळा आला की कोकणात निरनीराळ्या गावात जाऊन रहायला आवडतं.मग थोडे दिवस राहायचं झालं तर निदान तीथे एखादं हॉटेल असण्याची जरूरी आहे.पण सर्व ठिकाणी हॉटेलं असतील असं नाही.कुणा कडून माहिती काढून कोण कुठे रहातं ह्याचा उद्योग सहाजीकच निघण्यापूर्वी करावा लागतो.मग ओळख काढून त्यांच्या घरी रहायला मजा येते.

सावंतवाडी जवळच्या एका गावात जायचा योग आला. एकदा मुंबईहून एस.टीने प्रवास करताना सावंतवाडी येण्यापूर्वी ह्या गावात एस.टी थांबली होती.गाडीला काहीतरी काम निघाल्याने प्रवाशाना एक तास पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरून विश्रांती घ्यायला कंड्कटरने मुभा दिली होती.गावाचा परिसर मला खूपच आल्हादायक वाटला.भरपूर झाडी आणि बाजूने नदी वहाते.कोणाची ओळख काढून इथेच मुक्काम करावा असं वाटलं.जवळच्या हॉटेलात चहा आणि भजी घेऊन टेबलावर पडलेला ताजा पेपर वाचत होतो. त्यात स्थानीक कार्यक्रमाबाबत एक जाहिरात होती. कविसंमेलनाची ती जाहिरात होती. संमेलन दुसर्‍या दिवशी होतं.मी पण थोड्या कविता लिहिण्याच्या प्रयत्नात असतो.त्यामुळे ह्या कार्यक्रमात स्वारस्य घ्यावं असं वाटलं.फारतर सावंतवाडीत मुक्काम करावा लागेल एव्हडंच.

सावंतवाडीहून,आणि गोव्याहून काही होतकरूं कवीसंमेलनात भाग घ्यायला येणार होते.एक दोन स्त्रीयाही होत्या.सर्वांची नावं छापली होती.एका स्त्रीचं नाव ओळखीचं वाटलं. कवयित्री साधना तिरोडकर.हॉटेलात मालकाकडे चौकशी केल्यावर कळलं की नदीकिनारी एका मोठया वाड्यात लहान लहान घरं आहेत,तीथे ती रहाते.आमची एस.टी. बिघडल्याने सावंतवाडीहून मेकॅनीक आल्यावर गाडी दुरूस्त होईल असं कळल्यावर हॉटेल मालकाच्या एका मुलाला घेऊन मला जी साधना वाटते ती तीच का म्हणून तीच्या घरी जायचं ठरवलं.आणि योगायोग असा की साधना माझ्या ओळखीची निघाली.
पूर्वी माझ्या कॉलेजात ती पण होती.मला पाहिल्यावर सहाजीकच तीने मला घरी रहाण्याचा आग्रह केला.
"तू कॉलेजात असताना कविता करायचीस ते मला ठाऊक होतं.तुझं नाव त्या हॉटेलातल्या पेपरात वाचलं नसतं तर केवळ तुला पाहून मी काही ओळखलं नसतं."

माझं बोलणं संपल्यावर साधना थोडी हंसली.
"तुझ्या हंसण्यावरून मात्र मी तुला ओळखलं असतं"
असं मी पुढे म्हणाल्यावर साधना मला म्हणाली,
"तू हंसला नसतास तरी मी तुला ओळखलं असतं.तुझं ते कोकणी हेल काढून-हेळे काढून बालणं माझ्या पक्कं लक्षात होतं.बाकी तुझा चेहरा आहे तसाच आहे फक्त टक्कल पडलं आहे.खरं तर तुझे केस त्यावेळी कुरळे कुरळे होते"

"ते जाऊं दे"
साधना माझी आणखी काही तरी फिरकी घेईल त्यापूर्वीच मी विषय बदलून तीला म्हणालो,
"पण तू ह्या खेड्यात केव्हा पासून राहायला आलीस.?
"संमेलन उद्या आहे.आज रात्री आपण भरपूर गप्पा मारूया."
असं म्हणून साधनाने मला रहायचा आग्रह केला.
जेवण झाल्यावर रात्री गप्पा झाल्या.
"तुझीच प्रथम हकीकत सांग"
असं मी साधनाला म्हणालो.

"इतराप्रमाणे मी पण अगदी कठीण काळ पाहिला आहे."
साधना मला म्हणाली.
"आजारपण,विश्वासघात,जवळच्यांचा मृत्यु वगैरे वगैरे.ज्या ज्या वेळी मी अशा कठीण काळातून जात असे त्यावेळी मनात म्हणायचे प्रत्येक व्यक्ती ह्या असल्या एक ना दोन प्रसंगातून जात असावी. आणि मी बरेचवेळा प्रतिरोध-क्षमतेचा म्हणजे ज्याला resilience म्हणतात त्याचा विचार करायची.सुखी जीवनासाठी प्रत्येकात थोडीतरी प्रतिरोध-क्षमता असायाला हवी."

मी म्हणालो,
"अलीकडे आपण ह्या क्षमतेचा जास्त विचार करीत नाही.त्याऐवजी पुस्तकातून किंवा टीव्हीच्या कार्यक्रमातून "अतिरिक्त विचार करा" किंवा "झालं गेलं विसरून जा" असा विचार दाखवला जातो ते पहातो."
"अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं"
असं म्हणून साधना म्हणाली,
"ह्या विचारातून परंपरागत पद्धतीने मनाला लागलेले घाव भरून काढण्याचे उपचार असले तरी अलीकडे माझ्या लक्षात आलंय की जे काही घाव होतात ते समयाचा आधार घेऊन माझ्यातून एखाद्या गाळणीतून गाळून घेतल्यासारखं केल्यावर मग मी जगाला कसं तोंड देऊ शकेन त्यातला फरक मला उघडपणे दाखवून देतात.
माझ्या तीशीतल्या वयात मी ह्या गोष्टींचा विचार करून निराश व्हायचे.आणि त्यामुळे मला तोंडावर हंसू आणणं पण कठीण व्हायचं.कधी कधी सकाळ होता होता जीव नकोसा व्हायचा.माझी निराशा त्यावेळी खूपच वाढली होती."

"मला आठवतं मी तुझ्या घरी एकदा आलो होतो.तेव्हा तू आजारी आहेस असं कळलं.आणि तू घरी नव्हतीस."
असं मी तीला म्हणालो.
"अखेर माझी बरेच महिन्यासाठी एका इस्पीतळात रवानगी झाली होती.मला फारच डिप्रेशन आलं होतं.पण माझं नशीब जोरदार होतं.मी लवकर बरी झाले होते.ते इस्पीतळातले अठरा महिने महाकठीण होते.मी माझ्या मुलांपासून, नव‍र्‍यापासून आणि माझ्या इतर मैत्रीणीपासून दूर राहिले होते.ह्या झालेल्या नुकसानीची मला खूपच खंत लागली होती.परत हृष्ट-पुष्ट व्हायला ज्याची जरूरी आहे ती गोष्ट, ज्याला काही लोक प्रतीरोध-क्षमता म्हणतात ती आणणं मला महाकठीण झालं होतं.
पण त्यानंतर माझ्या जीवनचक्राच्या धारेवरून केंद्रभागी येण्यात माझ्यात बदल झाला होता.
माझं संकंट निवळलं होतं पण माझी नुकसानी खूप झाली होती. माझ्या प्रौढ जीवनात मी पत्नी,आई आणि शेजारी म्हणून माझं जीवन जगले होते.आता माझी मुलं जवळ नाहीत.माझे पती निर्वतले. त्यामुळे मी एकटीच झाले होते.दुसरं जीवन जगण्याची मला जरूरी भासूं लागली.
"मग तू शहर सोडून इकडे रहाण्याचा विचार कसा केलास?"
असा मी साधनाला प्रश्न केला.

ती म्हणाली,
"एका शहाण्या-सवर्‍या माणसाने मला चांगला उपदेश केला.
"ज्या कामावर तू प्रेम करतेस ते काम करायचं ठरव."
तेव्हाच माझ्या लक्षात आलं की प्रतीरोध-क्षमतेची अन्य रूपं असतात.मी बराच विचार करून ह्या गावात येऊन राहायचं ठरवलं.खरं तर माझं सासर तिरोड्याचं.पण माझी एक मावशी इथे रहाते तीची सोबत मिळेल म्हणून मी ह्या गावात रहाण्याचा विचार केला.माझ्या नवर्‍याच्या विम्याच्या आलेल्या पैशामधून एक जूनं घर इथे मी विकत घेतलं.मला इकडे फारसं कोणी ओळखत नव्हतं.मला लहानपणापासून बाग-काम करायचा नाद होता.घराच्या पुढे आणि मागे परसात मी सूंदर फुलांची झाडं लावली.घरातल्या खोल्यांची रंगरंगोटी करून घेतली.एक सर्वसाधारण बाई एक सर्वसाधारण जीवन जगते आहे असा विचार करून इकडे रहात आहे."

मला साधनाची एकंदर परिस्थिती ऐकून गहिवर आला.तीला बरं वाटावं म्हणून मी म्हणालो,
"जसं तळ-शिळेतून गाळून निघालेलं पाणी खोल झर्‍याला मिळून मग तो झरा एकाद्या जलाशयाला जाऊन मिळतो तसंच तू तुझं दुःख आणि तुझी खंत तुझ्यातून गाळून तुझ्या स्वतःच्या जलाशयात तीला जाऊं दिलंस."

विषय बदलण्यासाठी मी साधनाला पुढे म्हणालो,
"तुझ्या कविता लिहिण्याच्या नादाचं पुढे काय झालं ते सांग."
परत जरा हंसून साधना मला म्हणाली,
"मला आठवतं मी अगदी तरूण वयात दोन चार कवितेच्या ओळी लिहायची.लिहून झाल्यावर त्या ओळी वाचून माझाच मला आनंद व्हायचा.मधे दहाएक वर्षाचा खंड पडला.आता मी स्वतंत्रपणे कविता लिहून अलीकडे एक संग्रहपण छापून घेतला आहे.माझी प्रत्येक कविता म्हणजे निराशेतून आणि आनंदातून मार्ग काढून घेण्याचा एक प्रयत्न असतो.माझी प्रत्येक कविता म्हणजे नवीन मोका असतो तो आठवण करून देतो की ती कविता एक प्रतीरोध-क्षमतेचं नवीन रूपच आहे."

"मग तुझी एखादी कविता मल वाचून दाखवंच"
असा मी तिला आग्रह केला.
"माझ्या तानुचा-माझ्या मुलीचा- आज वाढदिवस आहे.लहानपणी ती एकदा पाय घसरून पडली होती.तीचा एक हात दुखावला गेला होता.आणि तो बरा होता होता परत ती त्याच हाताला दुमडून पडली आणि परत तिला प्लास्टर लावावं लागलं होतं.हे तिला सर्व नवीनच होतं.
तिन आठवडे हात प्लास्टरमधे असणार हे तानुलीला खरंच वाटत नव्हतं.सतत कुणालाही मदत करणारी तानु,एका जाग्यावर निमुट न बसाणारी तानु,सतत बागेत फुलांबरोबर स्वगत करणारी तानु,आज हिरमुसली होवून बसलेली पाहून मला एक कविता सुचली.ती मी तुला वाचून दाखावते"
असं म्हणून साधना वाचायला लागली,
"कवितेचं शिर्षक आहे"

"छळकुटा देव"

किती छळसी रे तू देवा
का करिसी तानुलीचा हेवा?
करिते ती सर्वांची सेवा
का पाडीसी तिला पुन्हा पुन्हा
कसली शिक्षा
अन कसला गुन्हा


बागेत बागडणारी
ती तानुली
फुलाना खुडणारी
ती तानुली
पक्षा संगे गाणारी
ती तानुली
फुल-पांखरासवे पळणारी
ती तानुली
बसे होवूनी हिरमुसली
घरी दिवसभरी


समजून घे रे देवा
पाडू नको तिला पुन्हा पुन्हा
करी झटकन उपाय
तिच्या दुखापतीला


ऋणी होवू आम्ही
तुझ्या ह्या मेहरबानीला
पुन्हा आणिल ती घरी चैतन्याला
आनंदी होवू आम्ही फिरूनी
बघुनी तिच्या मधुर हास्याला


"किती सुंदर विचार आहे.मला तुझी कविता खूपच आवडली.तुझा कवितासंग्रह पण मी वाचून काढणार आहे.उद्या नाहीतरी तू तुझ्या तुला आवडणार्‍या कविता संमेलनात वाचणार आहेस."
असं मी साधनाला म्हणालो.
"रात्र खूप झाली आहे.आता आपण झोपूया."
असं साधनाने सांगीतल्यावर आम्ही झोपायला गेलो.
दुसर्‍या दिवसाच्या कवीसंमेलनाच्या उमेदीत मी केव्हा झोपलो ते कळलंच नाही.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com