-
अगदी खूश होऊन भाऊसाहेब हिंदीत म्हणाले,
“नेकी और पुछ,पुछ?”नाहीतरी आता वसंत ऋतूला सुरवात व्हायला लागली आहे.बरेच दिवस थंडीला कंटाळून बाहेर फेरफटका टाकायला मिळाला नव्हता.संध्याकाळच्या वेळी एखादा स्वेटर चढवून,सोसण्या एव्हडी थंडी असल्याने,तळ्यावर जायची तलफ आली.
प्रो.देसायाना फोन करून विचारलं.
“आज पासून तळ्यावर भेटायचं का?”
अगदी खूश होऊन भाऊसाहेब हिंदीत म्हणाले,
“नेकी और पुछ,पुछ?”
हे ऐकल्यावर माझ्या मनात आलं की आज प्रो.देसायांकडून काहीतरी खास ऐकायला मिळणार.आणि तसंच झालं.मला भेटल्यावर म्हणाले,
“मी नेहमीच म्हणत असतो की जीवन ही एक देणगी आहे.जीवनातला येणारा प्रत्येक दिवस,तुम्हाला एक चांगलं पाऊल पूढे टाकण्याची संधी देत असतो.कुठेतरी वाचल्य़ाचं आठवतंय,
“नकारात्मक दृष्टी ठेऊन रहाणारा तो, की जो येणार्या संधीत अडचणी निर्माण करतो आणि सकारात्मक दृष्टीने पहाणारा तो, की जो अडचणीतून संधी निर्माण करतो.”मी म्हणालो,
मला आठवतं माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे की,
“चेहर्यावर हसूं ठेवीत शाळेत गेलास आणि एखाद्या पेन्सिलची जरूरी भासल्यास कुठूनही सापडते.एखादी लहानशी गोष्ट सुद्धा तुझ्या चेहर्यावर हसूं आणू शकते.मित्रांच्या घोळक्यात केलेला एखादा विनोद किंवा चेहर्यावर चांगला भाव प्रदर्शित करून तुझा दिवस प्रफुल्लित होऊ शकतो.”“अगदी बरोबर आहे तुमच्या आजोबांचं म्हणणं”
असं सांगून प्रो.म्हणाले,
“मला वाटतं ह्या असल्या प्रशंसात्मक,आशाजनक,सकारात्मक प्रवृत्तिमुळे काही ही होऊ शकतं.कारण खरंच काहीही होऊ शकत असतं.तुम्ही कुणाच्या प्रेमात पडू शकता,नवीन मित्र मिळवू शकता,नव्हेतर जग बदलू शकता.भविष्यात काय लिहून ठेवलं आहे ते कुणाला ठाऊक आहे?.तेव्हा काहीतरी चांगलं होणार याच्या तयारीत राहिलं पाहिजे.ही खुशी-मजा संसर्गजन्य आहे असं म्हटलं तरी चालेल.उजाडलेल्या नव्या दिवसाचा परिपूर्ण उपयोग करून घेणं ही त्या दिवसाची सुरवात होऊ शकते.तुमच्या आनंदाची भागीदारी कुणाशी केली गेली तर.दुःख आणि उदासीन रहाण्यापासून जगाला वाचवलं गेलं तर काय हरकत आहे?.मानतो मी की हे माझं बोलणं थोडं नाटकी दिसतं,पण त्यात फरक करता येतो.सुरवातीलाच हसतमुख राहिल्याने जगाला दैदिप्यमान करता येतं.”“मी माझी एक गोष्ट तुम्हाला सांगतो”
असं सांगून मी प्रोफेसराना म्हणालो,
“मला आठवतं काही वर्षापूर्वी मी माझ्या आजोबांबरोबर रहायला गेलो होतो.माझे आजोबा जातीचे शिकारी होते. छेर्याची सिंगल-बार बंदूक घेऊन ते कवड्याची शिकार करायचे.त्यांचा नेम ऊज्जू होता.उडत्या कवड्याला सुद्धा मारायचे.झाडावर बसलेल्या कवड्याला उडून जाण्यासाठी मला टाळ्या मारायला सांगायचे.आणि कवडा फांदीवरून उडाल्यावर, नेम धरून शिकार करायचे.रानात रानडुक्कराची टोळी आली म्हणून गावातले लोक सांगायला
आल्यावर शिकार करायला त्यांच्या जवळ डबल-बाराची बंदूक होती ती खांद्यावर घेऊन बाहेर पडायचे.मला शिकार करण्यात गोडी वाटावी म्हणून मुद्दाम मला घेऊन जायचे.एकदा मला आठवतं त्यांच्या लहानश्या खोलीत मी गेलो होतो.काही कारणाने मी बराचसा उदासीन झालो होतो. समोर एक सोफा होता त्यावर लवंडलो होतो.त्यांच्या खोलीत भिंतीवर लटकवून ठेवलेलं सांबराचं लांब शिंगाचं मुंडकं, खोलीच्या मध्यावर पसरवून ठेवलेलं बिबट्या वाघाचं कातडं, खिडक्यांच्या गजापासून लटकवून ठेवलेले चित्र विचित्र पक्षांच्या भुसा भरून ठेवलेल्या कृति,मधेच भिंतीवर टांगून ठेवलेली डबल बाराची बंदूक ह्या सर्वांकडे कौतूकाने पहात होतो.ते सर्व पाहून माझं कुतूहल जागृत झालं.मला उदासीन झालेला पाहून त्यांना काहीतरी वाटलं असावं.पण मला काही बोलले नाही.काम करत राहिले.
एकाएकी,नकळत हुबेहूब दिसणारा आणि अनुभूति देणारा एक उंदीर माझ्या अंगावर येऊन पडला.मी किचाळलो.
कामात व्यग्र असलेले माझे आजोबा,लाल चेहरा करून,हसत हसत जोरात ओरडले,
“अरे तो नकली उंदीर आहे.”
असं म्हणून आणखी हसत राहिले.मला पण माझं हसूं आवरत नव्हतं.माझी उदासिनता पार निघून गेली होती.”मी पुढचं सांगण्यापूर्वीच प्रोफेसर मला म्हणाले,
“ह्यातच सकारात्मक रहाण्याची क्षमता असते.”
आणि पुढे सांगू लागले,
“आपल्याकडून जमलं तर हीच सोनेरी किरणं जगाला उजळून टाकता येतात.ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी प्रत्येक क्षणाला कृतज्ञ रहावं.कारण कृतज्ञता,संतुष्टता आणते आणि त्यामुळे सकारत्मक व्ह्यायला होतं.
कुणीतरी म्हटलंय,
“जे तुमच्या जवळ आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा.त्यामुळे जास्त मिळण्यात सांगता होते.पण जर का जे नाही त्याकडे लक्ष केंद्रीत केलं तर संतुष्ट होण्याइतकं कधीच मिळणार नाही. विचार केल्यावर ह्यात काही तथ्य आहे असं मला वाटतं.तुम्ही आनंदात असाल तर जग तुमच्याशी आनंदात राहिल.जीवनात ह्याचीच जरूरी असते.”मी प्रोफेसराना म्हणालो,
“थोडक्यात,तुमचं म्हणणं आहे की आनंदी रहा.आनंदात रहा आणि संपूर्ण जीवन जगा.आयुष्य एकदाच मिळतं.बरोबर ना?
चला तर आता काळोख होत आलाच आहे.आपण निघूया आणि उरलेलं आयुष्य संपूर्ण जगूया. कारण जीवन ही एक देणगी आहे.”श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrkrishnas@gmail.com
Sunday, March 13, 2011
जीवन एक देणगी.
Thursday, March 10, 2011
गीत माझे ऐकशील जेव्हा
(अनुवाद.)
असा कसा विसरशिल तू मला
गीत माझे ऐकशील जेव्हा
संगे माझ्या गुणगुणशील तेव्हा
चांदण्या रात्री बहरलेल्या बागेत
गुजगोष्टी प्रीतिच्या केल्या अनेक
त्या घटनांची जेव्हा येईल आठव
प्रीति सुमनांना तुझ्या अंतरी साठव
हातात हात घेऊन चालत होतो
निशीगंधाचे फुल दिले मी तुला
अशी कशी विसरशिल ती संध्याछाया
गीत माझे ऐकशील जेव्हा
संगे माझ्या गुणगुणशील तेव्हा
गाठी भेटी मधूनी मिळतसे विरंगुळा
एक काळ येऊनी गेला वेगळा
असा कसा विसरशिल तो सगळा
गीत माझे ऐकशील जेव्हा
संगे माझ्या गुणगुणशील तेव्हा
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Monday, March 7, 2011
ढगातला खेळ आणि माझे आजोबा.
“मी दुसरंच पाहायचो,दुसरंच ऐकायचो,दुसरंच हुंगायचो आणि त्यामुळे माझी पूर्वीची विचाराची साखळी तुटायची.परत सांधली जायची नाही.”
वसंत ऋतुचं आगमन होणार आहे ह्याची चाहूल लागायला लागली आहे.थंडी अंमळ कमी होऊ लागली आहे.मागच्या बागेत तर्हेतर्हेचे पक्षी येत आहेत.गोड गाणी गाऊन,आवाज करून वसंताच्या आगमनाची आठवण करून देत आहेत. अशावेळी चौपाटीवर जाऊन शांत समुद्राच्या वातावरणात थोडा वेळ घालवावा म्हणून माझ्या नातीने मला सुचना केली.
समुद्र म्हणजे मला तरी जीव की प्राण आहे.तासनतास समुद्रावरच्या वाळूत बसून उंच उंच लाटांकडे पहात रहावं.कुठची लाट किती जोरात फुटणार आहे त्याचं मनात भाकीत करून जास्त फेस आणून फुटलेली लाट जास्त मोठी असते असं मनाशी समजावं.पश्चिमेकडचाच समुद्र दिसत असल्याने, सूर्योदय पहाण्याचा योग येत नाही.पण सूर्यास्त काही कमी सूंदर नसतो.सूर्याकडे उघड्या डोळ्यानी बघवतं अशा स्थितीत सूर्यबिंब खूपच अल्हादायक वाटतं.आणि हे बिंब खाली खाली समुद्रात बुडायला जात असताना आपला रंग इतका बदलतं की दुपारचा हा रखरखीत दिसणारा सूर्य मावळतीला इतका सुंदर असेल अशी कल्पनाही करवत नाही.सूर्य रखरखीत आहे तसाच आहे पण हे वेळेचे, वातावरणाचे आणि हवेच्या जाड-पातळ असण्याच्या स्थितीचे खेळ आहेत हे लक्षात आलं तरी,
“मानसीचा चित्रकार तो
मावळतीचे सूर्यफूल ते,सूर्यफूल ते करतो”
ह्या कवितेच्या ओळी आठवून निसर्गाचं कौतूक करावं तेव्हडं थोडच असं वाटल्याशिवाय रहात नाही.
पण हा झाला खेळ सूर्यफूलाचा.त्यापूर्वी होणारा ढगांचा खेळ खेळायला मला तितकच आवडतं.
माझ्या नातीला हा सूर्यास्ताचा देखावा आवडतोच त्याशिवाय माझ्या सारखाच ढगांचा खेळ खेळायलाही आवडतो. आणि हा ढगांचा खेळ मला माझ्या आजोबांनी शिकवला.आणि मी आता तो ढगातला खेळ माझ्या नातीला शिकवण्याच्या प्रक्रियेत असतो.
माझे आजोबा मला आणि माझ्या भावाला घेऊन वेंगुर्ल्याच्या चौपाटीवर जायचे.चौपाटीवर जायला आमच्या घरून एक तास तरी लागायाचा तेव्हा,
तसंच, खानोलीची घाटी चढून वर गेल्यावर फेसाळ समुद्र दिसायचा.घाटीच्या अगदी उंचीवर पोहोचायला वीस मिनीटं तरी लागायची तेव्हा,
आणि तसंच, आमचा हात धरून शाळेत जायला दहा मिनीटं लागायची तेव्हा,
आमचे आजोबा आमच्याबरोबर ढगांचा खेळ खेळायचे.
धूर सोडणारं आगगाडीचं इंजिन, एखादी मोठी घूस किंवा मोठा कासव पाहायला त्या आकाशातल्या कापसाच्या धुरात मला मुळीच कठीण जात नसायचं.पण माझे अजोबा,वरच्या श्रेणीचा आकार पहायचे.आणि आम्हाला वर्णन करून सांगायचे.
“तो तिचा हात आहे.तिच्या हातात एक छोटसं कुत्र्याचं पिल्लू आहे.दिसलं त्या पिल्लाचं शेपूट?”
असा वर आम्हाला प्रश्न करायचे.
असंच एकदा माझी आजी,आजोबा आणि आम्ही दोघे भाऊ, वेंगुल्याहून गोव्याला जात होतो.आमची बस एका माळरानात आल्यावर बंद पडली. आजुबाजूला सगळं उजाड रान होतं.बसच्या ड्राइव्हरने आम्हाला सांगीतलं की दुसरी बस येई तोपर्यंत आम्हाला बाहेर उघड्यावर किंवा बसमधे बसून रहावं लागणार.आजी बसमधे बसली आणि आम्ही आणि आमचे आजोबा बाहेर एका खडकावर जाऊन बसलो.
माझ्या आजोबांनी आकाशात एका ढगात एक मोठा राक्षस पाहिला.त्या राक्षसाचं आमचे आजोबा वर्णन करून सांगत होते.हळू तो राक्षस मोठा होत गेला.त्याचे केस पिंजारायला लागले.पंधरा एक मिनीटात तो राक्षस नाहिसा झाला.फक्त अवघ्या पंधरा मिनीटा नंतर तो आकाशाचा भाग होता तसा मुळीच दिसेना.
पुढे जीवनात माझ्या लक्षात आलं की हे आपलं जीवनसुद्धा आकाशातल्या ढगांच्या रचनेसारखं आहे.माझ्या ध्यानात यायचं की माझा दिवसाचा नित्यक्रम काही वेळेसाठी मुळीच बदलायचा नाही.पण माझे विचार त्या क्रमाच्या पुढच्या भागाबद्दल त्या त्या दिवशी किंवा त्या त्या क्षणाला बदलत रहायचे.
मी दुसरंच पाहायचो,दुसरंच ऐकायचो,दुसरंच हुंगायचो आणि त्यामुळे माझी पूर्वीची विचाराची साखळी तुटायची.परत सांधली जायची नाही.
जेव्हा आकाश पूर्ण ढगाळलेलं असायचं आणि ढगांच्या विचित्र काळसर छटा दिसायच्या त्यावेळी माझ्या लक्षात यायचं की जीवन असंच काळकूट्ट आणि घृणित असतं.म्हणून त्यातून लहान-सहान गोष्टी पाहून,चेहर्यावर हसू आणायला हवं.सरतेशेवटी सूर्याची किरणं येऊन स्वच्छ प्रकाश दिसून माझा दिवस जोशपूर्ण होणार आहे असं नक्कीच वाटायचं.
ज्या आकाशाला कधीही स्पर्श करता येणार नाही ते सदासर्वकाळ त्याच जागी असणार.अगदी साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते ती म्हणजेच त्या आकाशाकडे पाहून आनंद मिळू शकतो नव्हेतर मिळवता आला पाहिजे.
जीवनातल्या साध्या,सध्या गोष्टी दुर्लक्षीत होतात.वाटत असलेल्या एखाद्या महत्वाच्या गोष्टीकडे वस्तुनिष्टपणे न पहाता एक पाऊल मागे घ्यावं असं मला वाटतं.आणि आकाशाकडे पाहून एखादं फुलपाखरूं,एखादा ससा किंवा एखादी, कुत्र्याचं पिल्लू हातात घेतलेली, मुलगी पहावी.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmai.com
Friday, March 4, 2011
मिष्टान्न आणि मालवणी जेवण.
दुर्गाश्रमात काशीनाथ म्हणून एक वयस्कर वाढपी होता.तो पण आमच्या गावचा.मी जेवायला गेल्यावर तो माझी चांगलीच खिदमत ठेवायचा.मला गाववाला म्हणूनच संबोधायचा.मला जरा करपलेला तळलेला मास्याचा तुकडा आवडायचा.पापलेटच्या आमटीतला मास्याच्या शेपटीकडचा तुकडा आवडायचा.बांगड्याच्या तिखल्यातल्या तुकड्याचं पण असंच असायचं.गरम गरम वाफ येणार्या भातावर मास्यांची आमटी कालवून जेवायला मला आवडायचं. सोलकडी बरोबर शेवटचा भात जेवताना मात्र मला थंड झालेला भात आवडायचा.अशा बारीक-सारीक गोष्टी कडे तो माझी खिदमत करताना लक्ष द्यायचा.आणि वर,
“काशीनाथा रे! तेंका काय होयां होयां तां बघ रे!”
असं ओरडून गल्ल्यावर बसून ड्रॉवर मधल्या पितळेच्या कपात असलेल्या चिल्लरीचा आवाज करीत कानविंदे त्याला सांगायचा.इतकी बडदास करून झाल्यावर जेवण मोफत जेवायला मला कसंसंच व्हायचं.एक दोनदा मी कानविंद्याला समजावून पण सांगीतलं.
“अहो,कानविंदे हा तुमचा धंदा आहे.धंद्यात मित्र वगैरे कोणी नसतं.”
“तां तुम्ही माका सांगू नका.धंदो काय तो माका ठावक आसा. तुमच्या जेवणाचे पैसे घेओन मी काय बंगलो बांधतलंय नाय”
असं टिपीकल मालवणी शब्दात आणि हेळ्यात बोलून मलाच गप्प करायचा.
वसंताबरोबर जाण्यात माझा हाही एक उद्देश होता.पैसे मी देओ नाही तर वसंता देओ कानविंदे वसंताकडून पैसे स्वीकार करायचा.
ह्यावेळच्या जेवणात काशीनाथने आमची विशेष बडदास्त ठेवली होती.त्याला माहित होतं की मला मास्यांत सर्वात बांगडे जास्त आवडतात.
“आज सगळा बांगड्याचा जेवण आसां”
काशीनाथ मला पहाताच म्हणाला.
“बांगड्याचा तिखलां,बांगड्याची शाक,बांगड्याची आमटी आणि तळलेलो बांगड्याचो तुकडो.आणि सोलाची कडी.”
काशीनाथने आपलं मनातलं मेनुकार्ड वाचून दाखवलं.
खरंतर वसंता अट्टल गोड खाणारा.
“आमका सगळां होयां”
असं वसंताने नबोलता हाताच्या भाषेत काशीनाथला सांगीतलं.
मी आणि वसंता पोटभर जेवलो.बाहेर भय्याकडून दोन मसालापानं तोंडात कोंबून टॅक्सीत जाऊन बसलो.
“जुहू चलो”
असं वसंता ड्राईव्हरला म्हणाला.जुहूला जाण्यात वसंताच्या मनात काय होतं ते मला जुहूला बास्किन-रॉबीन्सच्या जवळ टॅक्सी थांबवल्यावर लक्षात आलं.
“अरे आपण आत्ताच मास्यांचं जेवण जेवलो आता आइस्क्रीम?”
असा मी त्याला प्रश्न केल्यावर,टॅक्सीचे पैसे देता देता मला म्हणाला,
“नंतर सगळं सांगतो.”
चॉकलेट आइस्क्रीमच्या मोठ्या डीश ऑर्डर करून झाल्यावर मला म्हणाला,
“कुठेही मला जेवण झाल्यानंतर दिल्यागेलेल्या शेवटच्या गोड डीशबद्दल-dessert बद्दल- विशेष वाटतं.दुर्गाश्रामात आइस्क्रीमची अपेक्षा करणं वेडेपणाचं होईल.पण मग मी इथे जुहूला येण्याचा विचार केला.”
नंतर मला म्हणाला,
“माझ्या समोर ठेवलेल्या एक पौंड रंगीबेरंगी चॉकलेटचीप आइसक्रीमचा अर्धा भाग मी फस्त केल्यावरही माझी अनावर होणारी, गोड खाण्याची, तीव्र इच्छा अपूरी राहून उरलेल्या आइस्क्रीमचा फडसा पाडायला प्रचंड उत्सुक असते.माझे गोड खाऊ दात कानात खुखूसायला लागले आणि जीभ लोभस होऊन चळवळ करीत गोड बोलायला लागली की,मग घरात नसलं तर मला बाहेर जाऊन काहीतरी गोड खायाला जाण्याविना गत्यंतरच नसतं.”
“ही तुझी लहानपणापासूनची सवय मला माहित आहे.”
मी वसंताला म्हणालो.
“हो! ही माझी लहानपणापासूनची सवय असल्याने ते ऐकून तुमच्या मनात माझ्या स्थुल प्रकृतीची छाप येऊन जाणं स्वाभाविक आहे.पण मी तसा स्थुल नव्हतो आणि नाही. ह्याचं श्रेय मी माझ्या शरीराच्या चयापचयाला देतो.त्या तसल्या नको असलेल्या आणि येण्याचा संभव असलेल्या, दिवसाचा विचार करायलापण मी धजत नाही की ज्या दिवशी गोड डीश माझ्या खाण्याच्या यादीतून अन्यायपूर्ण मज्जावीत केली जाईल.”
“ती पाळी तुला येण्याचा संभव बराच कमी आहे.त्याचं कारण तू नियमीत व्यायाम घेत असतोस.अर्थात जसं वय होत जातं तसं खाण्याकडे लक्ष द्यावं लागतं.किती खातोस त्यापेक्षा काय खातोस हे महत्वाचं ठरत असतं.आणि गोड खाणं बर्याच वेळेला काबूत ठेवावं लागतं असं म्हणतात.”
मी वसंताला म्हणालो.
“तू तर गोड खातोस ते षौक म्हणून खातोस.तुझ्याकडून मला ऐकायचं आहे तुझं गोडपूराण.”
त्याचे विचार ऐकण्यासाठी मी वसंताला ट्रिगर दिली.
लगेचच मला म्हणाला,
“मला वाटतं गोड पक्वान्न हे ह्या पृथ्वीतलावरचं एक महत्वाचं अन्न आहे.मला तर,नेहमीच गोड पक्वान्नाच्या थाळीला पाहून आलेला हृदय-धक्का कुठल्याही गोष्टीपेक्षा अमुल्य वाटतो. माझ्या रेफ्रिजरेटरचा दरवाजा उघडून,मस्तपैकी थंडगार रस-मलाई ते चॉकलेटी रंगाचे साखरेचा रस शोषून गबदूल झालेले गुलाब-जाम, जे लहानश्या गोल चमच्यात काढून घेताना चमच्याला लागलेला पाघळून खाली भांड्यात पडणारा साखरेचा रस पाहून माझ्या जीभेच्या चवीच्या कोंबाना-बड्सना- इतकं भंडावून सोडतो की जे लोक माझं हे वर्णन ऐकून माझ्या गोडखाऊ वेडाशी सहभागी होत नसतील त्यांना समजावून सांगणं जरा जिकीरीचं आहे असं मला वाटतं.
माझ्या समोर आणून ठेवलेली गोड पक्वान्नाची थाळी आणि त्यातलं गोड पक्वान्न,ज्यांच्या दृष्टीने ते भरपूर वाढलं आहे असं वाटतं, त्यांना,मला अधाशासारखा एका मिनीटात त्याचा फडशा पाडताना पाहून, बरेच वेळा माझ्या गोड मिष्टांन्न खाण्याच्या परिमाणाचा त्यांचा अंदाज साफ चुकलेला असतो असं मला वाटतं.आकाश-मंडळातलं काळं भुयार-ब्लॅक होल-जसं भिंगरणार्या असंख्य तार्यांना गिळंकृत करून आसमंतात शून्यता आणतं अगदी तसंच माझं पोट रिक्त रहातं. हे माझं अपूर्व लक्षण माझ्या मनावर एव्हडा भार आणतं की,माझ्यावर, आणखी हवं,हवं असं वाटून घायचा तर्क करावा अशी जबरी होते.
माझे मिष्ट दात कधीच समाधान नसतात.अगदी स्पष्ट सांगायचं तर,मला वाटत नाही की मी कधीही मिष्टान्न खाऊन तृप्त झालो आहे अशा निर्णयाला येईन.
मला वाटतं एखादी व्यक्ति सर्व प्रकारच्या व्यापक आमोद-प्रमोदाचा षौक करते,जसं केशर घालून पिवळं जर्द झालेलं फ्रिझमधलं श्रीखंड,बेदाणा, चारोळ्या,पिस्ते घालून घोटून,घोटून केलेली थंडगार बासूंदी,बदाम.पिस्ते असलेलं कसाटा आइस्क्रीम,असल्या गोष्टी पाहून त्या व्यक्तिला वेळेचं आणि ह्या भौतिक जगात आपण रहात असून जीवनाशी निगडीत असलेल्या सर्व समस्यांशी संबंध ठेवून आहोत ह्याचं भान रहात नसावं.”
मला वसंताचं हे गोडपूराण ऐकून एक मुद्दा सुचला.
मी म्हणालो,
“तुझं हे गोडपूराण ऐकून माझ्या मनात असा विचार आला की एखाद्या अशाच गोड पक्वान्नाचा अधाशासारखा स्वाद घेत असताना एखाद्या व्यक्तिला जीवनातल्या समस्यांना सामोरं गेल्यामुळे,जर का खरोखरंच दुःखी आणि उदास वाटत असेल तर त्याला गंभीर स्वरूपाच्या मदतीची जरूरी आहे असं मला वाटतं. ग्लोबल वॉरमिंग,भांडवलशाहीतली आर्थिक मंदी असल्या प्रश्नापासून विरंगुळा मिळायला हा षौक उपयोगी आहे असं मला वाटतं.”
माझं हे ऐकून वसंता बराच खूश झालेला दिसला.मला म्हणाला,
“भरपूर साजूक तूप घालून आणि थोडं दूध घालून,वेलची घातलेला मधूनच मनुका दाढेखाली येतील असा चपचपीत तूपाचा गोड शिरा, दुधात पाव कुसकरून थोडी वेलची आणि साखर घालून वर तांबसर रंग येईपर्यंत अवनमधे चारशे डीग्री तपमानाला ठेवून बेककरून केलेलं खरपूस पावाचं पुडींग,गरम गरम पिवळ्या धमक जिलेब्या आणि रूट-बिअर सिरप वर टाकून केलेलं थंडगार बटर-स्कॉच आइस्क्रीम हे माझे चार फूड-ग्रूप आहेत.दुसरं काही नसलं तरी ह्या अन्नावर मी तग धरून जीवंत रहिन.प्रत्येक रात्री जेवण झाल्यावर गंभीर निर्णय घेताना ह्यातल्या कुठल्या अन्नाचा मी षौक करावा ह्याचा मला विचार करावा लागत असतो.”
बराच वेळ झाला होता.बोलण्याच्या नादात वसंता आणखी एखादी आइस्क्रीमची डिश ऑर्डर करील ह्याची मला भीती वाटत होती आणि तसं होऊ नये म्हणून समारोप करताना मी त्याला म्हणालो,
“वसंता, रोज रात्री तुला असे षौक करून तन्मय व्ह्यायला आवडतं हे उघडच आहे. गोड पक्वान्न हा नुसताच तुझा षौक नाही.संपूर्ण मानवतेला तेव्हड्या काही गोड नसणार्या समस्यांपासून क्षणभराची उसंत असण्याची जरूरी असताना हा षौक कामाला येईल असं मला वाटतं.म्हणूनच एखाद्या गोडपक्वान्नाची लज्जत घेतली तर बरं असं तुला वाटत असावं.सतत गोडपक्वान्न खाऊन दिवसातल्या सर्व समस्या सुटतील अशातला प्रकार नाही पण ते गोडपक्वान्न निदान मधुर परमानंद तरी देईल हे खचित असा निष्कर्ष काढायला काही हरकत नाही.”
घरी परत जाताना मी विचार करू लागलो की एव्हडा गोडखाऊ वसंता, कानविंद्यांच्या दुर्गाश्रमात तिखट,आंबट मास्यांचं जेवण चापून जेवत होता याचा अर्थ हा चवदार मालवणी जेवणाचा असर तर नसावा?
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Tuesday, March 1, 2011
एक झोका अन प्रणयाचा एक मोका.
“दिनेश हॉस्पिटलमधून आला”
असं शारदा म्हणाली. आम्ही दोघंही बाल्कनीत त्याला पाहायला उठलो.
शारदेचं लग्न एका डॉक्टर बरोबर झालं.ती त्याच्या बरोबर सौदीअरेबियात गेली.तिला भारत सोडून जायला बरं वाटत होतं.त्याची काही कारणं असली तरी शरदपासून दूर जाणार आहे ह्यात तिला आनंद होत होता.
दिनेश डॉक्टर म्हणून सौदीअरेबियातल्या एका मोठ्या हॉस्पिटलात नोकरी करण्यासाठी गेला होता.भरगच्च पगाराची नोकरी होती.सुरवातीला शारदा तिकडे रहायला खूश होती.पण जस जसे दिवस जायला लागले तस तसे तिला घरी एकटेपण जाणवायला लागलं.दिनेश दिवसभर कामावर असल्याने त्याचा वेळ जात होता.
शारदा, नंतर एकटीच खरेदी करायला बाहेर पडायची.पण बाहेर प्रचंड उष्मा आणि बायकांना बुरखा घातल्या शिवाय बाहेर फिरता येत नव्हतं हे तिला फारच जाचायला लागलं.भारतात परत जाऊन आपण एखादं लहानसं हॉस्पिटल काढावं असा प्रस्ताव तिने दिनेश समोर ठेवला.दिनेशला ते मान्य झालं.दिनेश आणि शारदा तशी घरची बरीच श्रीमंत होती.त्यामुळे त्यांना ते सहजच जमून आलं.
कोकणात असताना शारदाचं आणि शरदचं चांगलंच जमलं होतं.आम्ही म्हणायचो की ती शरदशीच लग्न करून संसार करणार.
“लग्न वरती ठरत असतात.आपल्या हातात काही नाही.”
असं दिनेशशी लग्न झाल्यावर एकदा शारदा मला म्हणाल्याचं आठवतं.शरदच्या संबंधाने ती म्हणत होती ते मला कळायला वेळ लागला नाही.शरदचं मात्र लग्न झालंच नाही.शारदेला हे माहित होतं.तिच्या लग्नालाही तो आला होता. नंतर कधीतरी तिला तो घरी भेटून जायचा.
असंच एकदा मी शारदेकडे तिला भेटायला गेलो होतो. तेव्हा शरद गेल्याची वाईट बातमी मला तिने सांगीतली होती. तिच्या घराच्या बाहेरच्या खोलीत एक झोपाळा होता. त्यावर आम्ही दोघं बसलो होतो.जुन्या आठवणी काढून ती माझ्याशी गप्पा मारत बसली होती.
“खूप दिवसानी मी झोपाळ्यावर बसलो आहे.लहानपणी झुल्यावर बसून खूप उंच उंच झोके घेतले ते आठवायला लागलं आहे.”
असं मी तिला म्हणताच मला म्हणाली,
“झोपाळ्यावर झोके घेतल्याचं कुणाला आठवत नसावं?.तुम्ही लहान असताना एखाद्या झोक्यावर कदाचीत तुमच्या बाबांनी किंवा आईने तुम्हाला झोके दिले असतील,मोठ्या बहिणीने किंवा तुमच्या भावाने तुम्हाला झोपाळ्यावर बसवून उंच झोके दिले असतील किंवा कदाचीत स्वतः तुमच्या तुम्ही झोके घेतले असतील.सुरवातीला एकट्याने झोके घेताना तुम्ही थोडे घाबरूनही गेला असाल किंवा नसालही.
“फार उंच झोके घेऊं नकोस”
उंच झोके घेताना पडायला होईल आणि लागेल म्हणून तुमच्या आईने तुम्हाला सांगीतलेही असेल.”
शारदेला पण तिच्या लहानपणची आठवण येऊन मला ती झुल्याबद्दल सांगत होती.
“कसंही झालं तरी झोके घेत असताना परतीच्या झोक्याने तुमच्या तोंडावरून जाणार्या वार्याने होणारा आनंद,तसंच, असं होत असताना विस्कळीत होऊन उडणारे तुमच्या डोक्यावरचे केस भुरभूरताना होणारा आनंद विरळाच म्हणायला हवा.झोका उंच उंच आकाशात जाण्यासाठी झोपाळ्याला दिला गेलेला बळाचा वापर कसा होत होता हेही त्यावेळी तुमच्या नक्कीच लक्षात येत असावं.”
मला पण झुला किती आवडायचा ते माझ्या कल्पनेतून मी शारदेला सांगत होतो.
आणि पुढे तिला म्हणालो,
“खेळाची मैदानं,पार्कस,झाडाच्या मोठ्या फांद्या,वडाच्या पारंब्या ह्या झोका घेण्याच्या अशाच काहीश्या जागा असल्याने तुमच्या बाळपणापासून तुम्ही त्याचा आनंद घेत वाढत असता.तुम्ही त्यातून वाढत असता म्हणजेच तुम्ही त्यातून बाहेरही पडत असता.तुम्ही बाहेर पडत असता कारण तुम्ही मोठे होत असता आणि तसं तुमच्या मनातही म्हणत असता.”
“पण हे म्हणणं काही खरं नाही.”
मला मधेच अडवीत शारदा मला म्हणाली.आणि पुढे सांगू लागली,
“झोके घेणं म्हणजेच जीवनातली अगदी साध्यातली साधी मजा करणं.झोके घेण्याच्या आनंदातून परागंदा व्हायला काहीच कारण असूं नये.
माझ्यासाठी मात्र माझ्या कुमारी-वयातल्या साठून राहिलेल्या स्मृती, झोपाळ्याशी निगडित आहेत.माझ्या मनात असलेला माझा प्रियकर-शरद- ज्याच्याशी मी त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रणय केला त्या झोपाळ्याला संबोधून आमचा प्रणय होत होता.शरदच्या घराच्या मागच्या पोरसात असलेल्या झोपाळ्या जवळ आम्ही कित्येक वेळा भेटत असूं.कधी कधी आमच्याबरोबर आमच्या आणखी मित्र-मैत्रीणी असायच्या.काहीवेळा आम्ही फक्त दोघंच असायचो.”
नकळत झोपाळ्याचा विषय काढला गेल्याने, शरद गेल्याचं मनात आणून,लहानपणीच्या आठवणी येऊन शारदा बोलत आहे हे मी तेव्हाच ताडलं.
“आम्ही जसे मोठे होत गेलो तसे जीवन आणि प्रेम ह्यावर आमचं दोघाचं खोलवर बोलणं ह्या ठिकाणी व्ह्यायचं.
कधी कधी शाळेतल्या अगदी अर्थशून्य गोष्टीवर आमची चर्चा व्हायची.”
मला शारदा सांगत होती.
“जास्तीत जास्त उंच झोका घेण्यापासूनच्या स्पर्धेपासून,झुल्यानेच आम्हाला हवं तसं हिंदोळत ठेवावं अश्या दोलायमान मनस्थितीपर्यंत आम्ही असायचो.
त्यावेळी झुला,माझ्या बालिश आनंदापलीकडे, माझ्या अंतराचा एक भाग झाला होता.
माझ्या प्रणयाच्या सुरवातीचा,मध्य आणि अखेरच्या अवस्थेचं प्रतीक म्हणजे हा झुलाच होय.आमचा प्रणय त्या झुल्यासारखाच होता असं तुम्ही म्हणाल, असा मी तर्क केला, तरी ते तुमचं म्हणणं मला ऐकायला आवडेल.”
“मला पण तुझ्याकडून आणखी ऐकायला आवडेल.”
असं मी म्हणताच शारदा म्हणाली,
“जसं झुल्याला ढकलतात तसं सुरवातीला आमच्या प्रणयाचं झालं.प्रणयातला खरा आनंद मिळायला ढकलण्यासाठी काहीसं बळ लागलं.पण एकदा त्याची सुरवात झाल्यावर नंतर रुकावट आली नाही.शब्दशः आणि रुपकात्मकतेने नंतर आमच्या उंच भरार्या होत होत्या.आम्हाला दोघांना मिळून मजा येत होती आणि आम्ही तरूण-प्रीतीच्या प्रचलतेचे शोध घेत होतो.अखेरीस थोडसं मंदगतीत येऊन नंतर एकाएकी झुल्यावरून उड्याच घ्याव्या लागल्या. शाळेची पुन्हा सुरवात होणार असल्याने हे सगळं थांबवावं लागणार आहे हे आम्हाला माहित झालं होतं.आम्ही गती थोडी मंद करू शकलो
होतो.पण जमिनीवर पाय घासल्याशिवाय ते शक्य नव्हतं.पण नंतर अर्धवट मंदगती झाली असतानाच उडी घेतली. आम्हाला माहित होण्याअगोदरच सर्व संपत आलं होतं, शिवाय त्याला काही इलाज नाही हे ही आम्हाला माहित होतं.
आमची उन्हाळी-सुट्टी संपली होती.पण आमची प्रीत मात्र हिंदोळ्यावर योग्य वेळ साधून बसून होती.”
शारदेचं लग्न होऊन इतकी वर्ष होऊन गेली तरी शरदबद्दलच्या भावना आणि त्याच्या आठवणी शारदेच्या मनात जागृत होत्या.पण आता तो कायमचाच गेल्याने त्या जास्तच उफाळून वर येणं अगदी स्वाभाविक होतं.
“माझ्या मनातलं शेवटचं सांगते”
असं म्हणत मला शारदा म्हणाली,
“त्यानंतर जरी मी आणि तो झुला,दिव्व्या मधून तरून गेलो होतो तरी कुणीही मला त्याचा आनंद उपभोगायला यापूढेही वंचित करू शकणार नाही हे मला माहित होतं.शक्य आहे की,तुम्हाला वाटत असेल त्यापेक्षा मला त्याचं प्रतिनिधित्व जास्त भावतं.
माझ्यासाठी तो झुला माझ्या बालपणाच्या स्मृतिंचं प्रतिनिधित्व करतोच शिवाय माझ्या युवावस्थेत ते थोडं जास्तच करतो.”
मला खरोखरच शारदेची कीव आली मी तिला म्हणालो,
“भूतकाळात गेल्यावर,तू त्या स्मृतिंची निवड केल्यास हा हिंदोळा त्या आठवणींकडे तुला केव्हाही घेऊन जाणारच.मला वाटतं की तुझ्या झुल्यासाठी आणि त्यावर झोके घेण्यासाठी तू कधीही तुला वयस्कर झालीस असं मुळीच वाटून घेऊ नकोस.”
एव्हड्यात खाली गाडीचा हॉर्न वाजल्याचं आम्ही दोघांनी ऐकलं.
“दिनेश हॉस्पिटलमधून आला”
असं शारदा म्हणाली. आम्ही दोघंही बाल्कनीत त्याला पाहायला उठलो.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Saturday, February 26, 2011
कपभर कॉफी.
“मला कॉफीबद्दल विशेष वाटतं कारण,रोजच्या जीवनातल्या कटकटी संभाळताना एखादा कॉफी-ब्रेक खूपच उपयोगी होतो.”
मला कॉफी विषयी जरा विशेष वाटतं.जरी मी अगदी फटकळ होऊन असं सांगत असलो तरी त्यात बरचसं तथ्य आहे. कॉफीचा एक कप.
मला आठवतं की,ती संध्याकाळची वेळ होती.गार वारा वहात होता.घराच्या बाहेर खुर्च्या टाकून बसावं आणि गप्पा माराव्यात असं माझ्या चुलत बहिणीने-साधनाने- सुचवलं.
कोकणात दिवाळीच्या दिवसात मी तिच्या घरी गेलो होतो.
तिची आणखीन भावंडं पण येणार आहेत,एक तिचा भाऊ लंडनहून येणार आहे,आईवडीलांचं आता वय झालं आहे,सगळे मिळून एकत्र येऊन ह्या वर्षी दिवाळी साजरी करूया असा विचार झाला आहे असं मला साधनाने-फोन करून सांगीतलं होतं म्हणून मी कोकणात त्यांना कंपनी देण्यासाठी गेलो होतो.
त्या दिवाळीला थंडी फार छान पडली होती.लंडनहून आलेला,प्रकाश आणि त्याची मंडळी तर फारच खुश होती. प्रकाशाच्या लहान मुलांना कुणीतरी तिकडे सांगीतलं होतं की भारतात नेहमीच गरमी, उष्मा असतो.
प्रकाश मला म्हणा्ल्याचं आठवतं,
“मी माझ्या मुलांना खात्रीपूर्वक सांगीतलं होतं की प्रचंड उष्मा होतो तो मुंबई सारख्या शहरात.कोकणात त्यामानाने थंड असतं.पण ह्यावेळची थंडी अप्रतिमच आहे.ती सर्व खुशीत आहेत.”
आम्ही बाहेर जाऊन बसल्यावर,साधनाच्या मुलीने-मृणालने-सुचवलं की मी गरम गरम कॉफी प्यायला घेऊन येते.मृणाल दिवाळीच्या सुट्टीत कॉलेजच्या होस्टेला रामराम ठोकून आठ दिवस रहायला आली होती.
प्रकाशची पत्नी आणि मुलं दुधाशिवाय डार्क कॉफी पितात.त्यांना कॉफीमधे साखर मुळीच आवडत नाही.जितकी कडू कॉफी असेल तितकं छान.कधी कधी त्यांना कोल्ड कॉफी आवडते.प्रकाश मात्र पुर्वीच्या सवयी प्रमाणे दुध आणि साखर घालूनच कॉफी पितो.
साधनाला दुध कमी,साखर कमी अशी कॉफी आवडते.मृणालला कॉलेजमधल्या सवयीने दुधाशिवाय पण साखर घातलेली कॉफी आवडते.मला मात्र मी सागीतलं की, भरपूर दुध घालून आणि त्यात वेलचीची पुड घालून केलेली, सत्यनारायणाच्या पुजेला करतात तशी कॉफी आवडते.आमच्या सर्वांच्या ह्या आवडी निवडी नीट लक्षात ठेऊन मुणालने कॉफी तयार केली होती.
सहाजीकच कॉफी पिता,पिता कॉफीवरच गप्पा चालू झाल्या.
प्रकाशने सुरवात केली.तो म्हणाला,
“सकाळ होताच तो कॉफीचा पहिला प्याला घेतल्यावर माझी सकाळ उदयाला येते.तो सुमधूर कॉफीचा सुवास आणि त्यातली गोड साखर ह्या दोन्ही गोष्टी मला अंथरूण सोडायला प्रवृत्त करतात.
खरंतर नुसत्याच कॉफीच्या चवीपेक्षा काहीतरी अर्थपूर्ण घटना होऊ घातल्या आहेत असं वाटायला लागतं.
जरा खुळ्यासारखं वाटत असेल पण कॉफी घेतल्यानंतर माझे दरवाजे,खिडक्या उघडल्या आहेत,भिंती कोसळल्या आहेत ज्यामुळे मी कोणताही निर्णय घेण्यास प्रवृत्त झालो आहे आणि श्वास घ्यायला मोकळा झालो आहे असं मला वाटतं.
एखाद्या जवळच्या नातेवाईकाच्या आजारात त्याला कंपनी द्यायला होस्पिटलमधे जागरण करून आल्यावर,ऑफीसात न संपलेलं कामं घरी आणून पूर्ण करायला रात्रभर जागरण केल्यावर,दोन दिवसात कोणत्याही कारणाने हप्ता भरलाच पाहिजे अशी घराच्या हप्त्याची नोटीस बॅन्केकडून आल्यावर,दोन तासाची गाढ झोप द्यायला कॉफीचा एक कप उपयोगात आणता येतो.जीवनात येणार्या अडचणींना तोंड द्यायला कॉफी मला तरून जायला मदत करते.”
साधनाने आपलं कॉफीबद्दलचं मत दिलं.ती म्हणाली,
“मला कॉफीबद्दल विशेष वाटतं कारण,रोजच्या जीवनातल्या कटकटी संभाळताना एखादा कॉफी-ब्रेक खूपच उपयोगी होतो.भाराभर कामं उरकताना थोडा विराम घेऊन चवदार कॉफीचा एक कप खूपच कामाला येतो.जीवनातल्या वास्तविकतेपासून दोन मिनीटांचा विरंगुळा मिळतो.ती कॉफीची सूंदर चव जीभेवर एकरूप झाल्यावर नेहमीच्या प्रश्नापासून लक्ष दुसरीकडेच केंद्रीत करतं.
मला आठवतं माझी आई त्यावेळी काही दिवस हॉस्पिटलात होती. तासनतास तिच्या बिछान्याजवळ किंवा बाहेर लॉउन्जमधे मी आणि माझे बाबा वेळ घालवत असायचो.त्या जागेवर बसल्यावर सततच्या काळजीत रहायचो.मला आठवतं मधेच कधीतरी माझे बाबा कॉफी घ्यायला जाऊया म्हणून सुचना करायचे.कॅन्टीनमधे गेल्यावर,सर्व काळज्या दूर झाल्यासारख्या क्षणभर वाटायच्या.थोडावेळ तरी नको वाटणार्या शांततेपासून आणि अनिश्चित वातावरणापासून निकास राहिल्या सारखं वाटायचं.”
त्यानंतर मृणालने आपला कॉफीबद्दलचा अनुभव सांगीतला,
“मला कॉफीबद्दल विशेष वाटतं कारण,सकाळ उजाडल्यावर सर्व काही व्यवस्थीत व्ह्यायला एक एक कॉफीच्या कपावर थोडीशी इकडची-तिकडची बातचीत करून होस्टेलमधल्या माझ्या इतर मैत्रीणींशी संपर्क ठेवायला सोपं होतं. अंथरूणातून लवकर उठायला सकाळच्या कॉफीच्या कपाची आठवण प्रोत्साहन देते.कुठल्याच अडचणीविना एकमेकाची कामं करायला उत्साह देते.
कॉफी ही एक प्रकारचा उपहार म्हणायला हवा.मला एक गोष्ट आठवते ती सांगते.
होस्टेलमधल्या माझ्या एका मैत्रीणीच्या आईचं निधन झालं होतं.माझी मैत्रीण घरी जाऊन परत आल्यावर तिच्याकडे बोलायला आमच्या जवळ शब्द नव्हते.आमच्याजवळ फक्त तिला जवळ प्रेमाने कवटाळून घ्यायला,खांद्यावर मान टेकून रडायला आणि तिला आधार द्यायला होतं.शिवाय आमच्याजवळ द्यायला कॉफीने भरलेला कप होता.पहिले काही दिवस ती सकाळी उठून वर्गात जाण्यापूर्वी आम्ही तिला कॉफी प्यायला घेऊन जायचो.आम्हाला तिच्याबद्दल किती अगत्य आहे हे त्या कपातून प्रदर्शित व्हायचं.”
मी माझं मत दिलं,
“मला कॉफीबद्दल विशेष वाटतं,कारण सकाळी एक कप भरून कॉफी घेतल्यावर त्या सबंध दिवसात येणारी, ताण देणारी कामं मी विसरून जातो.कॉफी घेतल्यावर मला वाटत रहातं की मी कोणतही काम सफलतेने पूरं करीन.
कॉफीच्या एका कपाने स्वस्थचित्ताने रहायला मदत मिळते,जरूरीचा परावर्तक वेळ मिळतो.एव्हडंच काय तर माझ्या इमेल,माझे फोन मी थोडावेळ दुर्लक्षीत करू शकतो.लोकांना कॉफी पित बसल्याने निवांत बसता येतं.
जर का तुम्हाला कॉफी आवडत नसेल तर चहा घ्या दुसरं काही तरी घ्या पण कामाच्या कटकटीतून स्वतःच्या मनाला विरंगुळा द्या.कॉफी पिण्यासारखं वेळ काढण्यात तुम्हाला जे काय आवडतं,त्याच्यासाठी दिवसातून थोडातरी वेळ काढा.”
आमचं हे कॉफी आख्यान होता होता बाहेर बरंच गार वाटू लागलं.आणि जास्त करून प्रकाशच्या मुलांना थंड वाटायला लागलं हे विशेष.
मला प्रकाशचा मुलगा म्हणाला,
“ही इकडची थंडी जरा मजेदार वाटली.कारण तिकडे थंडीबरोबर पाऊस पडायला सुरवात होते आणि असं बराच वेळ बाहेर बसायला मिळत नाही.”
आम्ही प्रत्येकजण आपआपला रिकामा कॉफीचा कप घेत घरात आलो.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Wednesday, February 23, 2011
कुस्ती.
ठाण्याला मुकुंदराव सामंत एका शाळेत हेडमास्तर होते.माझ्या पत्नीकडून त्यांचं माझ्याशी नातं होतं.मुकुंदरावांच्या सहवासात आल्यावर मला एक समजलं की त्यांना शरीर-सौष्टव असणं आणि कुस्तीच्या खेळाबाबत विशेष वाटायचं.ते स्वतः उठून रोज सकाळी व्यायाम शाळेत जाऊन नियमीत व्यायाम करून यायचे.
त्या व्यायाम शाळेतच त्यांचा एक विद्यार्थी येत असायाचा.
मला वाटतं त्याच्याकडूनच मुकुंदरावाना कुस्तीबद्दल विशेष वाटायला कारण झालं असावं.कारण हा त्यांचा विद्यार्थी-माणीकराव-कुस्तीच्या फडात त्यांना घेऊन जायचा.
मला एकदा मुकुंदरावानी फोन केला आणि ठाण्यात नौपाड्यात जंगी कुस्तीचे खेळ होणार आहेत ते बघण्यासाठी आमंत्रण दिलं होतं.
मला जरी कुस्तीबद्दल एव्हडं आकर्षंण नसलं तरी मुकुंदरावांचा शब्द मोडवत नव्हता.आणि मुकुंदराव पण कसे ह्याकडे आकर्षित झाले हे पण एक कुतूहल मला होतं.
आता हा मुकुंदरावांचा विद्यार्थी, माणिकराव, बेळगावात एक मोठी कुस्तीची शाळा काढून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे असं कळलं.तसंच कर्नाटकात चुरशीच्या कुस्तीचे मेळावे भरवून मोठा व्यवसाय चालवीत आहे असंही कळलं.
अलीकडे मी बेळगावला गेलो होतो.बेळगावला माझ्या पत्नीचं माहेर आहे.माणिकरावाबद्दल मी माझ्या मेव्हण्याकडे चौकशी केली.त्याने त्याच्याशी माझी गाठ घालून द्यायचं ठरवलं.
हा माणिकराव बेळगावच्या कॅम्प-एरीयात छोटसं घर बांधून रहात आहे असं मला माझ्या मेव्हण्याने सांगीतलं.
त्याच्या घरी गेल्यावर मला त्याने ओळखलं.पण मी मात्र त्याचा विद्यार्थी वयातला चेहरा डोक्यात ठेवल्याने त्याला ओळखूं शकलो नाही.
उंच भरदार छातीचा,अंगात मलमलचा झब्बा घातलेला,खाली सफेद लुंगी घातलेला काळा वड्डर दिसणारा माणिकराव माझ्या जवळ येऊन बसला आणि माझ्या मांडीवर जोरात थाप मारून हंसला.
“मुकुंदराव हेडमास्तर आता खूपच थकले आहेत.अलीकडेच मी त्यांना ठाण्याला भेटून आलो”
असं मला म्हणाला.
“तुम्हाला आवडणार नाही अशा गोष्टी लोकं कधीकधी करायला सांगतात.असं झाल्यावर त्यांच्याकडे मुळीच लक्ष देऊ नका.तुमच्या जे काही डोक्यात येतं त्याकडे लक्ष केंद्रीत करा.तुमच्या भविष्यात वापरायला त्या कल्पनांचा उपयोग करा.”
असं सामंतसर म्हणायचे,ह्याची मी त्याला आठवण करून दिली.
“मी त्यांचा हा उपदेश पक्का लक्षात ठेवून माझ्या आयुष्याची आंखणी केली”
असं सांगून मला माणिकराव म्हणाला,
“मला वाटतं,तुमच्या अंतःकरणात जे काही आहे त्याचाच मागोवा घ्यावा.ते शाश्वत असे तोपर्यंत त्याचा जीवनात उपयोग करून घेऊन त्यात आनंद मानावा.तुम्हाला जे भावतं त्यासाठी जावं.शिवाय ज्यात तुम्ही प्रवीण आहात आणि जे करून तुम्हाला आनंद मिळतो तेच करण्यासाठी तुमच्या जीवनातला उद्देश असूं द्यावा कारण जीवन एकदाच मिळतं. लोक कदाचीत म्हणतील की,तुम्ही करता ते मुर्खपणाचं आहे,पण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करावं,तुमच्या मनाला लावून घेऊ नये.मगच तुमचा उद्देश साध्य होऊन तुम्हाला जिंकल्याचं सामाधान मिळेल.
“ज्या गोष्टी करण्यात तुम्ही निपूण आहात आणि त्या गोष्टी तुमच्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी होत असतील तर जरूर करा.”
असं ही सामंतसर म्हणायचे.
असं सांगून माणिकराव मला म्हणाला,
“मी त्यांच्याकडूनच शिकलो की,ज्या गोष्टींची तुम्ही उपेक्षा करता,ज्या गोष्टी करायला नको होत्या असं ज्यावेळी तुम्हाला वाटत असतं,त्या न केल्याने तुमचं जीवन नक्कीच सुखकर होईल,रोमांचक होईल.
एखादी न आवडणारी गोष्ट करणं भाग आहे असं असेल तर गोष्ट निराळी.दुसरे लोक आनंदी होतील ह्यापेक्षा तुम्ही आनंदी व्हाल असंच करा.उलट केलंत तर पस्तावायला होईल.
पहिली योजना जमली नाही तर पर्यायी योजना असावी.”
“तुझ्या कुस्तीच्या व्यवसायावरून ते उघडंच आहे”
मी म्हणालो.
मला माणिकराव म्हणाला,
“असा विचार मी माझ्या मनात विकसीत करण्याचं कारण मला शरीर-सौष्टव ठेवण्याबद्दल लहानपणापासून आवडायचं. त्यासाठी शाळा संपल्यावर मी व्यायाम शाळेत जायचो.सामंतसर मला तिथेच भेटायचे.मला त्यांच्या घरी बोलवायचे. आणि उपदेश द्यायचे.शाळेनंतरचं ते माझं दुसरं जीवन झालं होतं.पुढे जमलं तर कुस्त्या खेळण्याचा माझा मानस होता. आणि पुढे जमलं तर त्यातून करीअर करायचाही विचार होता.शाळेचा अभ्यासक्रम संपल्यावर कॉलेजमधे पण मी तो नाद चालू ठेवला म्हणजे जवळ जवळ सात आठ वर्षं तरी मी कुस्त्या खेळत राहिलो.रोजच मी माझ्यात सुधारणा करीत होतो.माझा उद्देश असा होता की मला कुणीतरी प्रायोजित करून माझा तो व्यवसाय व्हावा आणि माझ्याच मजेसाठी म्हणून त्याचा मी उपयोग करावा.कुस्तीचा प्रकार ह्यातलाच आहे इकडे तर मजा इकडे तर व्यवसाय.काही लोक हे मानत् नाहीत.त्यातून व्यवसाय करता येईल हे ही मानत नाहीत पण देशभर हा व्यवसाय झाला आहे.सकारात्मक विचार ठेवल्यावर सरतेशेवटी त्याचं फलस्वरूप दिसून येतं.
अनेक गोष्टीत मला भरवसा आहे त्यातली ही एक महत्वाची गोष्ट आहे.
सामंतसर मला नेहमीच सांगायचे,
“तुम्ही करत रहा लोक तुम्हाला समर्थन देतील.तुमचा उद्देश साध्य व्हायला कष्ट घ्या,त्या उद्देशाच्या मागे लागा जणू तो तुमच्या जीवनात काही मिळवून देण्यासाठी आहे असं समजून वागा.”
मला अगदी तंतोतंत त्यांचं म्हणणं पटतं.”
“सामंतसर काही आता बेळगावला प्रकृति कारणाने,येऊ शकणार नाहीत.पण मी त्यांना भेटल्यावर तुझा हा व्यवसाय आणि तुझी ही प्रगती,मी त्यांना वर्णन करून सांगेन.त्यांना नक्कीच आनंद होईल.”
असं मी माणिकरावाला सांगून उठता उठता त्याने सामंतसरांसाठी भेट म्हणून माझ्याजवळ लाकडातून कोरलेली एका मल्लाची प्रतिकृती देण्यासाठी म्हणून दिली.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
