Friday, August 19, 2011

एक चॉकलेटची गोळी.


“माझी खात्री आहे की एखादी चॉकलेटची गोळी, कुठचाही भावुक प्रश्न उभा ठाकल्यास,ती गोळी तो प्रश्न सोडवू शकते.”

त्या दिवशी मी जे.पी.रोडवरून चार बंगल्याच्या दिशेने चाललो होतो.दुपारची वेळ होती.बाहेर प्रचंड उन आणि त्याबरोबर उष्मा होत होता.उन्हापासून सावरायला छत्री उघडून चालत होतो.अंधेरी स्पोर्ट्स कॉप्लेक्सच्या फुटपाथवर लांबून प्रमिलेला येताना पाहिलं.
“छत्री थोर तुझे उपकार”ह्या शिर्षकाखाली कुणीतरी छत्रीचे अनेक फायदे आणि उपकार मोठ्या कल्पकतेने लिहिल्याचं आठवलं.
पावसापासून,उन्हापासून वाचवायला,हातकाठी म्हणून वापरायला,कुणी अंगावर धावून आल्यास छत्रीची टोकदार बाजू वापरून संरक्षण करायला उपयोग होतो.तसंच कुणालातरी सामोरून येताना टाळायलापण छत्रीचा उपयोग करता येतो हा बेरकी विचार माझ्या मनात पटकन येऊन गेला.
पण त्याच क्षणी प्रमिलेवर हा उपाय करणं ठीक नाही असं माझं दुसरं मन मला सांगायला लागलं.

प्रमिलेसारखी साधीभोळी,नावासारखीच प्रेमळ,आदर करणारी,मोकळ्या मनाच्या मुलीने मला अशातर्‍हेने तिला टाळताना पाहिलं तर तिला खूपच वाईट वाटेल असं माझ्या त्या दुसर्‍या मनाला वाटलं.बरेच दिवस मी तिच्या घरी गेलो नव्हतो.ती बोलवायची पण मला ते जमलं नाही.तिचे आजोबा माझी खूप आठवण काढतात असं ती म्हणायची.त्यांचं वय झालंय.नंतर वाईट वाटायला नको वेळात वेळ काढून त्यांना भेटून आलं पाहिजे असं मला नेहमीच वाटायचं.पण गंमत काय आहे,घरी गेल्यावर प्रमिलेच्या तावडीत सापडल्यावर चार गोष्टी सांगीतल्याशिवाय ती मला सोडायचीच नाही.

शेवटी व्हायचं तेच झालं.
“मी तुम्हाला लांबून पाहिलं होतं.आज माझ्या आजोबांचा जन्म दिवस आहे.तुम्ही भेटला म्हणून त्यांना सांगीतलं आणि तुम्ही घरी त्यांना भेटायला आला नाहीत तर त्यांना नक्कीच वाईट वाटेल.”
मला प्रमिला लागलीच म्हणाली.
“चल तू पुढे हो, मी तुझ्या मागोमाग येतो.”
असं मी तिला सांगीतलं.

प्रमिलेला लहानपणापासून चॉकलेट खाण्याची आवड.आजोबांबरोबर बाजारात गेली की त्यांच्याकडे हटकून चॉकलेट मागायची.आजोबा तिच्याबरोबर आपणही चॉकलेट खायचे आणि तिलाही द्यायचे.आता एव्हडी मोठी झाली तरी तिच्या घरात एक मोठा गोल टिनचा चॉकलेटचा डबा असतो.त्यात ती विभिन्न प्रकारच्या चॉकलेटच्या गोळ्या भरून ठेवीत असते.कुणी लहान मुल घरी आलं की ती त्यातल्या एक दोन गोळ्या त्याला ती देतेच शिवाय माझ्या सारखा वयाने मोठा आला तरी त्याला ती डबा उघडून समोर ठेवते.
“निवडून तुमच्या आवडीची गोळी घ्या” असं सांगते.
प्रमिलेला आणि तिच्या आजोबांना चॉकलेट फार आवडतं हे मला माहित होतं.आजोबांच्या चॉकलेट आवडीची सवय प्रमिलेनेच त्यांना लावली होती.
त्यांच्या जन्मदिवशी कॅडबरी चॉकलेट त्यांना द्यावं म्हणून मी तिला पुढे जा असं सांगीतलं.कारण मला त्या दोघांसाठी चॉकलेट पॅकेट्स विकत घ्यायची कल्पना सुचली.

तिच्या घरी गेल्यावर तिच्या हातात एक पॅकेट आणि आजोबांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या हातात एक कॅडबरीचं पॅकेट दिलं.
आज मला चॉकलेटवर चारगोष्टी सांगायचं प्रमिलेने ठरवलं होतं असं वाटलं.आपल्या गोल टीन डब्यातली चॉकलेट गोळी घ्यायला माझ्या समोर डबा उघडला.मी रावळगावचं एक चॉकलेट घेतलं.आणि तोंडात टाकलं.माझ्याबरोबर हसली.थोडसं मला खटकलं.म्हणून मी तिला विचारलं,
“काय ग? लहान मुलासासारखा गोळी ताबडतोब तोंडात मी टाकली म्हणून हसलीस का?”

मला प्रमिला म्हणाली,
“अजीबात नाही.इतकी वर्ष मी चॉकलेट खात आली आहे,ह्या चॉकलेटच्या गोळीबद्दल मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगते.”
डबा बंद करून माझ्या जवळ येऊन बसली.तिचे आजोबाही आमच्या बाजूला बसले होते.
मला पुढे म्हणाली,
“माझी खात्री आहे की एखादी चॉकलेटची गोळी, कुठचाही भावुक प्रश्न उभा ठाकल्यास,ती गोळी तो प्रश्न सोडवू शकते.ती चॉकलेटची गोळी, लहान असो वा मोठी असो,नेहमीच उदास वातावरणाचं आनंदात रुपांतरीत करू शकते.वय झालं म्हणून काय झालं?एखाद्याने चॉकलेट तुमच्या हातावर ठेवलं तर तुम्हाला थोडं वेडंखुळं व्हायला काहीच हरकत नाही.

मला नेहमीच वाटत असतं की,प्रत्येकाच्या तोंडात छोटासा गोड-खाऊ दात कुठेतरी असतोच.शिवाय जीभेवर निरनीराळी चव समजण्यासाठी निरनीराळी जागा असते त्यात गोडचव ओळखण्याची जागा कुठच्याही वयावर संवेदनशील असतेच.
त्यामुळे चॉकलेटची गोळी तोंडात टाकल्यावर ती चाखण्याची तीव्र इच्छा जागृत होऊन नक्कीच बरं वाटतं.

हे पण शक्य आहे की प्रत्येकाने आपल्या आवडीची चॉकलेटची गोळी निवडून चाखली तर आजुबाजूच्या जगात नक्कीच गुण्यागोविंदाने जगावं कसं वाटेल.माझी खात्री आहे की एक चॉकलेटची गोळी कुणाच्याही चेहर्‍यावर हास्य आणल्याशिवाय रहाणार नाही.आणि ते हसूं दुसर्‍याला हसायला लावून हा हास्याचा प्रवास चालू राहून सर्वच सुखी झाल्यासारखे होतील.
मग त्या गोळ्या चॉकलेटच्या असोत,मिंटच्या असोत,रावळगावच्या गुळाच्या गोळ्या असोत नाहीतर कॅडबरीच्या किंवा साठेंच्या टॉफी असोत,त्यात जो चॉकलेटी प्रकार असतो त्याने मनाची तृप्तीच होते.

एखाद दिवस बराच कटकटीचा गेला असेल,दिवस संपता संपता कटकट वाढत गेली असेल पण जेव्हा मी घरी येते आणि हा माझा चॉकलेटचा गोल टिनचा डबा उघडते आणि पहिली गोळी तोंडात टाकते त्यावेळी जणू दिवस जागच्या जागी थांबल्यासारखा वाटतो.माझ्या सर्व कटकटी विरघळून गेल्या सारख्या वाटतात. आरामात पडून माझी आवडती गोळी चोखत रहाते.
गंमत म्हणून तुम्हाला सांगते.
मुलाकडीची मंडळी पाहून गेल्यावर मुलगी नापसंत असल्याचा निर्णय कळवल्यावर त्या मुलीला दुःखी रहाण्यात थोडा वेळ जातो,वाईट वाटण्यात थोडा वेळ जातो पण म्हणून काही सर्वच वेळ असा घालवण्यात हाशील नसतं अशावेळी मला वाटतं एक चॉकलेटची गोळी चघळल्यावर सर्व शीण निघून जाईल.
माझी एक मैत्रीण दिसायला अशी तशीच होती.नापसंती झाल्याचं समजल्यावर पिशवी भरून चॉकलेटच्या गोळ्या आणून त्यात ती तिची सर्व दुःख बुडवून टाकायची.जरी तिचं मन पूर्ण सावरलं गेलं नसलं तरी जे काय घडलं त्याचा विचार विसरून जाऊन आपल्या आवडत्या गोळ्या निवडून चघळण्यात तिला त्या वेळेचं नक्कीच चांगलं वाटण्यात रुपांतर करता यायचं.

म्हणजे ह्याचा अर्थ अस नव्हे की घरातलं कुणी गेल्याने दुःखाचा होणारा तणाव एका चॉकलेटच्या गोळीने कमी होईल.पण एक मात्र मला नक्कीच कबूल करावं लागेल की,मला आवडणारी एक गोळी माझ्या तोंडात चाखण्यासाठी टाकल्यावर त्यातून विरघळून निघणारा साखरी चांगूलपणा माझ्यात थोडीशी सुखाची भावना आणतो.

काही माझ्याशी सहमत होणार नाहीत.तुम्ही कधी जाणवून घेतलंय काय?कुणीतरी आपली आवडती गोळी तोंडात टाकल्यावर त्याचा चेहरा कसा दिसतो?मी पैजेने सांगीन की,त्याच्या चेहर्‍यावर सातमजली हसू दिसेल.सगळं आजुबाजूचं विसरून जाऊन तो मुळात उदास का झाला ह्याचाही विचार करायचा विसरून जाईल.

पुढच्या खेपेला तुम्ही मनातून कोसळला तर बाहेर जाऊन तुम्हाला आवडणार्‍या चॉकलेटच्या गोळ्या घेऊन या.तुमच्या जीभेवर ठेवा आणि काय होतं ते पहा.माझी खात्री आहे की येणार्‍या सर्व समस्यांचा उलगडा होईल.गोळी जीभेवर पडल्यावर साखर भरधाव वेगाने अंगात शिरून, उदास वाटण्याचं रुपांतर आनंदात करून दिवस चांगला जाईल.आनंदाचं एखादं मिनीट का होईना,तसं होत असल्याने, मला चॉकलेटच्या गोळीबद्दल विशेष वाटतं.”

प्रमिला हे मला सर्व सांगत असताना मी मधून मधून आजोबांच्या चेहर्‍याकडे बघत होतो.आजोबांना तिचं म्हणणं पूर्ण पटल्यासारखं मला दिसत होतं.
त्यांना मी दिलेलं कॅडबरी चॉकलेटचं पॅकेट त्यानी उघडून त्यातला एक तुकडा माझ्या हातात देत मला म्हणाले,
“माझ्या जन्मदिवशी मुद्दाम येऊन मला शुभेच्छा दिल्याबद्दल थॅन्क्स.”
आणि दुसरा तुकडा आपल्या तोंडात टाकून मला म्हणाले,
“प्रमिलेचा मी आजोबाच नव्हे काय?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, August 16, 2011

आणू कुठून ती खुशी सांग एकदा


अनुवाद

अंगीकारीलेस जे तुझे तुला
आणू कुठून मी ते सदा सर्वदा
भावते जी तुझ्या अंतराला
आणू कुठून ती खुशी सांग एकदा

तेच फुल मी ज्या सर्वांनी तुडवीले
तेच जीवन जे आंसवानी वाहिले
श्रावण वर्षा होऊन बरसणारा
आणू कुठून तो मेघ सांग एकदा
भावते जी तुझ्या अंतराला
आणू कुठून ती खुशी सांग एकदा

लालसा असे तुला इतरांची
अभिलाषा करिते मी मात्र तुझी
अंतरात तुझ्या दुःख अन दुःख
अंतरात मात्र माझ्या तू अन तू
चैन देईल तुझ्या अंतराला
आणू कठून तो उपाय सांग एकदा
भावते जी तुझ्या अंतराला
आणू कुठून ती खुशी सांग एकदा

प्रकट झाली माझी विवशता
निषप्रभावी माझी उदासीनता
वांछिले असता कधी निर्वाणाला
मिळे ना मज पाहूनी अनुपाताला
स्थिरचीत्त करण्या तुझ्या मनाला
आणू कुठून तो आशीष सांग एकदा
भावते जी तुझ्या अंतराला
आणू कुठून ती खुशी सांग एकदा

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, August 13, 2011

ज्यावेळचं त्यावेळी.


“दहा हजार फूट उंच डोंगर चढायला किंवा विमानातून पॅरॅशूटच्या सहाय्याने हवेत उडी मारायला होणार्‍या उल्हासित आणि चिंतातुर मनस्थितीला कुणाला पारखं व्हावसं वाटेल.?”

मी नवा फ्लॅट मागेच बुक केला होता.आणि आता तो तयार झाला होता.त्याचे उरलेले सर्व पैसे दोन दिवसात भरायची मला बिल्डरकडून नोटीस आली होती.
माझं देना बॅन्केत खातं होतं.बरीच अशी माझी डिपॉझीट्स मला कॅश करून घ्यायची होती.पण त्या बॅन्केच्या मॅनजेरने हे सर्व व्हायला आठ दिवस लागतील असं सांगीतलं.

मला चटकन मालतीची आठवण आली.ती देना बॅन्कच्या हेड ऑफिसमधे वरच्या हुद्यावर काम करीत होती.मालती हौस म्हणून गाण्याचे कार्यक्रम करायची.तिचा आवाज छान होता.लहानपणापासून तिचा हा छंद होता.अशाच एका गाण्याच्या कार्यक्रमात तिची आणि माझी ओळख झाली होती.

रविवारचा दिवस होता तिलाच भेटायला मी तिच्या घरी गेलो.मालती मला म्हणाली,
“तुम्ही काही काळजी करू नका.सोमवारी साधारण एक वाजता तुम्ही माझ्या ऑफिसात तुमचे सर्व डिपॉझीट्सचे पेपर्स घेऊन या.”
मी तिला म्हणालो,
“हे बघ,ते सर्व पेपर्स आता आणले आहेत.तुच ते तुझ्याबरोवर घेऊन जा.”

दुसर्‍या दिवशी सोमवारी मी मालतीच्या ऑफिसमधे गेलो.
गेल्या गेल्या माझ्या हातात हव्या असलेल्या रक्कमेचा चेक देत मालती मला म्हणाली,
“ह्या ह्या कागदावर सही करा.झालं, तुमचं काम संपलं आहे.
ज्यावेळचं त्यावेळी काम करायची मला सवय झाली आहे.
हे असं व्हायला त्याच्या मागे थोडी पार्श्वभूमीका आहे.
आपण चहा घ्यायला कॅन्टीनमधे जाऊया.तिकडे मी तुम्हाला माझे विचार सांगते.”

मी मालतीचे थॅन्क्स मानले आणि चेक नीट बॅगमधे ठेवून तिच्या बरोबर कॅन्टीनमधे गेलो.चहाचा पहिला घोट घेऊन झाल्यावर मालती मला म्हणाली,
“जीवनातून मार्ग काढायचा झाल्यास सोप्यात सोपा मार्ग म्हणजे ज्यावेळचं त्यावेळी करणं.न केल्यास खेद होण्यापलीकडे दुसरं मनाला दुःख होण्यासारखं कारण नसावं.आणि नंतर आलेली संधी त्याच क्षणी घ्यायला हवी होती पण बोटातून निसटली असं वाटायला लागावं.

मला आठवतं मी हायस्कूलमधे आठवीत असताना मला एक संधी आली होती.एका कार्यक्रमात स्टेजवर गाणं म्हणायची.मी ती संधी घेतली नाही.
कारण मी घाबरली होती.मला ते काम जमणार नाही असं वाटत होतं.नंतर काही महिने गाणं न म्हणण्याच्या माझ्या निर्णयाचा माझ्या मलाच मी दोष देत राहिले.
संशय आणि गोंधळ ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यात दुसरं काहीही आणायला मला वेळच मिळत नव्हता.

अगदी प्रामाणिकपणे मलाच मी विचारलं असतं,
“ज्यावेळचं त्यावेळी मी केलं असतं तर असं काय झालं असतं.?”
कुणास ठाऊक?मी दुसरी लता मंगेशकर झाली असती.
कदाचीत नसतेही.पण निदान खात्री करून घ्यायला माझ्या अंगाला काही झोंबलं नसतं.

जेव्हा मी माझ्या भवितव्याचा विचार करायची त्यावेळेला मला दिसून यायचं की मला अगदी साधी जीवन-शैली जगावी लागणार आहे. परंतु,काहीवेळा मला दिसून यायचं की वाटणार्‍या नव्या भीतीवर मी मात करीत आहे.किंवा एका नव्या साहसाचा मी पाठपुरावा करीत आहे.
अशा जीवनाचा विचार येऊन माझ्या मलाच हसू यायचं.

दहा हजार फूट उंच डोंगर चढायला किंवा विमानातून पॅरॅशूटच्या सहाय्याने हवेत उडी मारायला होणार्‍या उल्हासित आणि चिंतातुर मनस्थितीला कुणाला पारखं व्हावसं वाटेल.?
अर्थात,मला तसं वाटणार नाही कारण मी त्या दोनही गोष्टी कधीही केलेल्या नाहीत.

पण केलं असतं तर नंतर, काहीतरी तडीस नेल्याची,आणि पुढे कधीतरी ह्याहीपेक्षा काहीतरी सनसनाटी गोष्ट करण्याची उत्सुकता असल्याची कल्पना मला करता आली असती.जरी मला माऊंट एव्हरेस्ट चढून जाण्याची चुरस करता आली नाही तरी,अनुभवातून मला सांगता येईल की,ज्यावेळचं त्यावेळी करणं फायद्याचं असतं.

मला आठवतं, माझ्या हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात,मला एका नाटकात गाणं म्हणायला संधी मिळाली होती.त्यासाठी मला शहरात जाण्याची जरूरी होती. शहरातल्या नाटकाच्या मंचावर गाऊन दाखवणं, म्हणजे एव्हड्या गर्दी असलेल्या श्रोत्यांत,ज्यात अनेक दर्दी गायक बसलेले आहेत,मला जरा कठीण वाटलं होतं.पण मला हे ही माहित होतं की,माझ्यात गाऊन दाखवायचं थोडंफार कौशल्य आहे. शिवाय अशी आलेली मोठी संधी निसटून जायला मला नको होतं.

शहरातला भयंकर उष्मा,आणि त्यात गाण्याच्या चुरसीचा ताण हे असून सुद्धा मी माझ्यात असलेलं सर्व काही दिलं आणि त्याबद्द्ल मला अभिमानही वाटला. मला माहित होतं की माझ्याकडून इतकं काही चांगलं गायलं गेलं नव्हतं.पण मला त्यामुळे नाराज व्ह्यायला जरूरीचं वाटलं नाही.

दुसर्‍या कुठल्याही स्पर्धेत पुन्हा भाग घेऊन माझ्या मलाच आव्हान द्यायला माझी तयारी झाली होती.मी काहीही करू शकते हे माहित झाल्यावर, जीवनात,भरपूर धाडस करणं आणि मनाला समाधानी वाटून घेणं यासाठी,जगायला मी तयार होते.प्रश्न होता फक्त ज्यावेळचं त्यावेळी करणं.
जीवनात खेद वाटून रहाणं,ज्यात मला गम्य आहे ते इतर करीत आहेत ते मी पहात रहाणं आणि ते करायला मला धाडस न होणं हे काही योग्य नाही.

माझा सर्व वेळ खर्ची करून जीवनात काय काय सफल करून घ्यायचं आहे याची एका मागून एक यादी करण्यात माझा काही फायदा होणार नाही असं मला वाटतं.त्यापेक्षा मी माझ्या जीवनाकडे, ज्यावेळचं त्यावेळी साध्य करून घेण्यात,लक्ष देते.त्यामुळे जगात असलेला सर्व वेळ, मला नवी यादी करायला, प्राप्त होतो.

माझ्या लक्षात आलं आहे की,आठवीत असताना आलेली संधी मी घेतली नाही म्हणून काही ह्या शतकातली मोठ्यात मोठी घोडचूक झाली अशातला भाग नाही.पण अजूनही मला त्यानंतर झालेला खेद लक्षात आल्यावर दुःख होतं.
मला अजूनही वाटतं की,हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात शहरात जाऊन मोठ्या समुहात गायल्या नंतर त्याबद्दल वाटणं आणि आठवीत गाणं म्हणण्याची संधी आल्यावर माझ्या हातून ती संधी सुटली त्याबद्दल वाटणं,ह्या दोन्ही भावना वेगवेगळ्या होत्या.
मी ठरवलंय़ की,परत मागे वळून आठवीतल्या हुकलेल्या संधीच्या खेदाची भावना चुकूनसुद्धा मनात आणणार नाही.

म्हणून मी जाहिरपणे हेच म्हणेन,
“एखाद्या जॉबसाठी अर्ज करायचा झाल्यास आणि त्या जॉबला तुमच्याकडे असलेल्या अनुभवापेक्षा जास्त अनुभवाची गरज आहे असं वाटत जरी असलं तरी,ज्यावेळचं त्यावेळीच करावं.”

मालती जे काही मला सांगत होती ते मला पूर्णपणे पटलं होतं.
नव्हेतर मी पण मालती सारखाच विचार करीत आलो आहे.
उठता उठता मी तिला म्हणालो,
“तुझ्या सारखंच माझं आचरण आहे.ज्यावेळच्या त्यावेळीच मी हा फ्लॅट बुक केला होता.आणि तुझ्या सहकाराने मला त्या फ्लॅटचं पझेशन ज्यावेळचं त्यावेळी घेता येईल.आपल्या दोघांची विचाराची फ्रिक्वेन्सी जुळली हा मात्र योगायोग म्हटलं पाहिजे.”
माझं हे ऐकून मालती खूश झाली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, August 10, 2011

आजीचं सूर्यकिरण.


“हे सर्व लोक मला महत्वाचे वाटतात.मी त्या सर्वावर प्रेम करते.म्हातारपण फार कठीण असतं रे,माझ्या नातवा!”

अंधेरीला जाणार्‍या बस स्टॉपवर मी बसची वाट पहात एकदा उभा होतो.समोरच्या कॉलनीतून अशोकला येताना पाहिलं.तो पण बसने जाण्यासाठी बस स्टॉपवर आला.मला पाहून, मला हलो म्हणाला.

“रोज मी मनात म्हणत असतो,एकदातरी सवडीने तुला विचारावं.पण संधीच मिळाली नाही.तेव्हा आज तुला नक्कीच विचारतो,नचुकता दर रविवारी तू सातबंगल्यावरच्या वृद्धाश्रमात थोडावेळ जाऊन येतोस.असं मला कुणीतरी सांगीतलं.तिकडे तुझं कुणी नातेवाईक रहायला आलंय का?”
मी अशोकला सरळ सरळ प्रश्न केला.

तेव्हड्यात धाके-कॉलनीची स्पेशल बस आली.रिकामीच असल्याने आम्ही एकाच बेंचवर जवळ जवळ बसलो होतो.दोघेही आम्ही दादरला जात होतो.
त्यामुळे गप्पा मारायला चांगला वेळ मिळाला.तिकीटं काढून झाल्यावर अशोक मला म्हणाला,
“मला तुम्ही हे कधीना कधी विचारणार हे माहित होतं.
मला आत्ता खरोखरच आठवत नाही ते कसं घडलं ते.कदाचीत माझ्या आजी आजोबांवरच्या माझ्या प्रेमामुळे असावं.तसं पाहिलंत तर वयस्कर लोकांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे.जेव्हा मी त्यांच्या खोलीत जातो,ते मला ओळखतही नसले तरी,त्यांच्या चेहर्‍यावर जेव्हा आनंदाची छटा उमलते तेव्हा मला खूपच बरं वाटतं.

सातबंगल्याला आमच्या शेजारी एक वृद्धाश्रम आहे.अलिकडेच मी दर रविवारी त्या वृद्धाश्रमाला भेट देतो. त्यांचं भजन चाललेलं असेल किंवा कसलही प्रवचन चाललेलं असेल त्यावेळी मी त्यांच्यात जाऊन बसतो. अशाच एका रविवारी मला नेहमीच भेटणार्‍या,चेहर्‍यावर बर्‍याच सुरकूत्या असलेल्या,आजीला मी सामोरा गेलो.तिने माझा हात गच्च ओढून धरला.मला वाटलं भजन ऐकताना मी तिच्या जवळ बसावं म्हणून तिने असं केलं असेल.
उलट,ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली.तिच्या खोलीतल्या भिंतीवर बरेच फोटो लटकवलेले होते ते मला दिसले.तिच्या नातवंडांच्या-पंतवंडाच्या फोटोपासून ते तिच्याच आईवडीलांच्या फोटो पर्यंत बरेच फोटो होते.

मला ती ते फोटो का दाखवत आहे हे माझ्या लक्षात येईपर्यंत,
ती मला म्हणाली,
“हे सर्व लोक मला महत्वाचे वाटतात.मी त्यां सर्वावर प्रेम करते.म्हातारपण फार कठीण असतं रे,माझ्या नातवा!.मला ह्या वृद्धाश्रमात यायचं नव्हतं.
आणि जर मला शक्य झालं तर मी लागलीच सोडूनही जाईन.
“माझ्या नातवा,”तू माझी सहनशीलता वाढवलीस.
दर रविवारची मी तुझ्या येण्याची वाट बघत असते.माझ्या उदास वादळी जीवनात तू मला सूर्यकिरणासारखा वाटतोस.तू मला खास आणि महत्वाचा वाटतोस.तुझा पण एक फोटो मला ह्या भिंतीवर लावायचा आहे.”

माझी त्या आजीवर इतकी छाप पडलेली पाहून माझाच मला अचंबा वाटला.मला ती सूर्यकिरण म्हणाली हे ऐकून मला आवडलं.माझ्याच आयुष्यात अशीच सूर्यकिरणं आलेल्या घटनांची मी आठवण काढू लागलो.
एकदा खोलीत अगदी गडद काळोख होता.मी निपचित पडून होतो.त्या काळोखातून सूर्याचं एक किरण माझ्यावर पडलं.माझं जगच प्रकाशमान झालं.मला आशा निर्माण झाली.सूर्याच्या किरणाबद्दल मला विशेष वाटतं.

ह्या सूर्याच्या किरणांबद्दल विशेष गंमत म्हणजे ती नेहमीच येत असतात.विशेषकरून भयंकर वादळ येऊन गेल्यावर ती येतात.
सदानकदा निरभ्र आकाशाकडे पाहून ते आकाश किती विस्मयकारक असतं हे मी जाणलं होतं.पण त्या निरभ्र आकाशातल्या सौंदर्याकडे आवासून पाहायला वादळाचा अनुभव घेतला नसता तर कळलं नसतं.

ह्या सूर्यकिरणावर माझा विश्वास आहे.मला हवं त्यावेळी आणि हवं तसं हे सूर्यकिरण येईलच असं नाही.पण ती किरणं निरनीराळ्या प्रकारची असावीत.माझ्यासाठी, ती सुरकूतल्या चेहर्‍याची माझी आजी जी मला दर रविवारी वृद्धाश्रामात गेल्यावर भेटते,जी माझं नाव नेहमीच विसरून मला,
“रे, नातवा”
अशी हाक मारतेच आणि त्याचवेळी मला एक गोड हसू देऊन माझ्यावरचं प्रेम दाखवते, तसंच माझी धाकटी बहिण मला घरात येताना पाहून,
“दादा आला,दादा आला”
असं ओरडून जाहीर करते,ती किरणंच आहेत.

आनंद मिळण्यासाठी,ही किरणं माझ्या अंगावर पडतात.जीवनातल्या कठीण प्रसंगात,अंधाराच्या जागेत मार्ग काढण्यासाठी ही किरणं मला प्रकाश दाखवतात.मला माहित आहे की ही किरणं माझ्या अंतरात आहेत,वादळाच्यावेळी वादळ येऊन गेल्यावर ती दिसावीत म्हणून मी वाट पहात असतो.तसंच मी पण किरण बनुन दुसर्‍याच्या जीवनात फरक पाडीन अशा संधीच्या प्रतिक्षेत असतो.म्हणूनच मला कुणाचं तरी सूर्यकिरण व्हावं असं वाटत असतं.”

अशोकचं हे बोलणं ऐकून मला खरोखरच त्याच्याबद्दलचा आदर द्विगूणीत झाला.मी त्याला म्हणालो,
“अशोक,तू ग्रेट आहेस.नुकताच तू कॉलेजात जायला लागलास.वयस्कर लोकांत राहून त्यांच्या चेहर्‍यावरच्या आनंदी छटा पाहून तुला आनंद होतो हे तुझं अवलोकनच ग्रेट आहे.तुला चांगलं भवितव्य आहे.एकतर तू चांगला कवी होशील किंवा चांगला लेखक होशील असं मला वाटायला लागलं आहे.
माझ्या तुला शुभेच्छा आहेत.तुला विचारावं म्हणून आज मी संधीचा फायदा घेतला ते बरं झालं असं मला वाटतं.”

माझा हात आपल्या हातात घेऊन आवंढा गिळत अशोक मला म्हणाला,
“तुमच्या शुभेच्छाच मला बस आहेत”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrshnas@gmail.com

Sunday, August 7, 2011

जीवनाचा अर्थ-जगणं.

“शेवटी जीवनात कुठेतरी समतोलपणा आणावाच लागतो.”

मला आठवतं ती संध्याकाळची वेळ होती.तो शुक्रवार होता.ऑफिस बंद झाल्यावर मी घरी जायला निघालो होतो.फ्लोरा-फाऊन्टन जवळ आल्यावर पेपर विकणारी पोरं खास एडीशन म्हणून एकाच बाजूला छापलेलं एक पानी पेपर विकत होते.ठळक बातमी होती की,
“वेस्टर्न रेल्वेच्या मोटरमनचा अचानक संप.त्यामुळे सर्व गाड्यांची ये-जा ठप्प झाली आहे.”

चटकन माझ्या डोक्यात विचार आला की लवकरात लवकर घरी पोहचायचं झाल्यास सर्वात उत्तम टॅक्सीकरून जाणं.जास्त विचार करीत बसलं तर टॅक्सीपण मिळणं नंतर कठीण व्हायचं.
माझ्या नशीबाने एक टॅक्सीवाला अंधेरीला जायला कबूल झाला.टॅक्सीत बसणार तेव्हड्यात नंदनला समोरून धावत येताना पाहिलं.नंदन सातपुते आमच्या समोरच्या कॉलनीत रहातो.

“मी पण येतो रे,तुझ्याबरोबर आपण भाडं शेअर करू”
असं म्हणतच नंदन माझ्या मागोमाग टॅक्सीत येऊन बसला.आम्ही अंधेरीच्या दिशेने निघालो.
एकंदर अस्थिर परिस्थिती लक्षात येऊन मी नंदनला म्हणालो,
“जगणं फार कठीण झालं आहे.केव्हा काय होईल ते सांगता येणार नाही.घरून कामावर निघाल्यावर वेळेवर घरी पोहचूं किंवा कसं हे सांगणं कठीण झालं आहे. जीवनात सर्वात महत्वाचं काय आहे हे कळायला कठीण झालं आहे.”

“जीवनात सर्वात महत्वाचं काय आहे, ह्यावर बरीच मंडळी सहमत होत नाहीत.धन-दौलत,सत्ता-सामर्थ्य,प्रेम-जिव्ह्याळा, प्रसिद्धी-लौकिक,यश-सफलता….
सांगत राहिलो तर यादी वाढत जाईल.
मला मात्र,ह्या सर्व गोष्टी निरर्थक वाटतात,शिवाय एक, अतिशय ताकदवार गोष्ट सोडल्यास.
आणि ती म्हणजे जीवनात तुम्हाला स्वतःला खुशीत ठेवण्यात,आनंदी ठेवण्यात असलेली तुमच्यातली क्षमता.”
नंदन मला आपल्या मनात आलेला विचार समजावून सांगत होता.

मी नंदनला म्हणालो,
“लोकं आपल्याला महत्वाचं काय वाटतं त्याचा अर्थ लावण्यात,आपला वेळकाळ प्रचंड प्रमाणात खर्च करतात.हे लोक,आपलं अख्खं जीवन आणि त्यांना मिळत असलेल्या रिकामेपणाचा प्रत्येक सेकंद,चिंतन करण्यात,नियोजित कार्याची मोहीम करण्यात किंवा कंपनीत उच्चपदावर पोहोचण्यात, खर्ची घालतात.

माझं म्हणणं असं आहे की,वर्ष अखेर ह्या लोकांची लाखो रुपये कमवण्यात परिणती होते.ते स्वतःचं आयुष्य असंच जाऊ देतात.
कुणीतरी म्हटलंय,
“जन्माला आल्याआल्याच माणूस मरायच्या तयारीला लागतो.”

“मला तुमचं म्हणणं एकदम पटतं.मी माझेच शाळेत असतानाचे अनुभव आणि आता त्याबद्दल काय वाटायला लागलं आहे ते सांगतो”

असं सांगून नंदन पुढे म्हणाला,
“शाळकरी असताना,शाळा सुटल्यावर सरळ घरी जायचं,शाळेचा आठवडा संपल्यावर कुठे न जाता शनिवारी,रविवारी घरीच अभ्यास करीत रहायचं आणि आपला नंबर वर ठेवण्याच्या प्रयत्नात असायचं.कारण चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळण्यासाठी गुण चांगले असायला हवेत.हे नक्कीच महत्वाचं आहे.कारण चांगलं शिक्षण मिळणं महत्वाचं आहे.

शिक्षण घेतलं नाही,तर उर्वरित आयुष्यात, कुठे हाटेलात टेबलं पुसायला रहायचं नाहीतर कुणाच्या घराच्या लाद्या पुसायला राहून जेमतेम पैसे मिळवून, उदरनिर्वाह करायचा.
शेवटी जीवनात कुठेतरी समतोलपणा आणावाच लागतो.

चांगल्या कॉलेजात जाऊन यशस्वी झाल्यावर चांगला जॉब मिळण्याचा संभव वाढतो. हे असंच चालायचं असतं.खरा विचार केल्यावर वाटतं,शाळा कॉलेजात गेलेला जीवनातला वेळ, संपूर्ण जीवनातला, चांगला वेळ समजायला हवा.”

मी नंदनला म्हणालो,
“आमचे वाडवडील कुठे कॉलेजात गेले होते.ते पण जीवन जगत होतेच ना?त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच व्हायचा.महिन्या अखेर किंवा वर्षा अखेर जमा झालेली मिळकत संसारात खर्ची घालायचे.पण ते सर्व कमवण्यासाठी इतकी दगदग होत नसायची. आपलं शहरातलं हे जीणं खूपच दगदगीचं झालं आहे.जीवनात आनंद असा मिळत नाही”

थोडासा विचार करून नंदन मला म्हणाला,
“मी शाळेत पहिला नंबर मिळवणार्‍यापैकी नव्हतो.एखाद्या नावाजलेल्या कॉलेजात मला प्रवेश मिळेलच अशातलाही मी नव्हतो.एखाद्या प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजवर माझा फोटो येईल अशातलाही मी नव्हतो.कॅन्सरवर उपाय शोधणारा म्हणून माझं नाव व्हायला माझं अंधूकसं नव्हेतर अजिबात भाग्य नव्हतं.नोबेल-पीस-प्राईझचा तर विचारच सोडून द्या.

पण तुम्हाला सांगू का?जे आहे त्यात मी खुश आहे.जीवन हे काही तग धरून रहाण्यासाठी नसतं किंवा तुम्हाला नओळखणार्‍यांना तुम्ही कोण ते सिद्ध करून दाखवण्यासाठी नसतं.ह्यात कसलीही चुरस आहे असंही मला वाटत नाही.
जीवन हे आनंद मिळवीण्यासाठी असतं.माझ्या मते जीवनाचा अर्थ पुनरावर्ती असणं. जीवनाचा अर्थ- जगणं.”

अंधेरीला आल्यावर टॅक्सीतून उतरताना मी नंदनला म्हणालो,
“टॅक्सीचा खर्च तू माझ्याशी शेअर करू नकोस.तुझी कंपनी मिळाल्याने,प्रवासात गप्पा मारून, तुझे विचार शेअर करून माझी भरपाई झाली आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, August 4, 2011

वेगळंच आळसावणं.


“अगदी खरं पाहिलं तर,मला आळशी असण्यात विशेष वाटतं.कारण तसं राहिल्याने मी जो आज आहे तो तसा आहे.”

कामतांचा लाल्या आहे तसाच आहे.त्याच्या लहानपणी त्याचे वडील, शरद कामत, त्याच्यावर सतत ओरडताना मी पाहिले आहेत.
“अगदी आळशी आहे हा लाल्या.तोच त्याचा धाकटा भाऊ किरण पहा, सकाळी उठून आपल्या कामगिरीवर लागलेला असतो.कठीण आहे ह्या मुलाचं.”
कधी वेळ मिळाला असताना माझा मित्र शरद कामत,आपल्या मोठ्या मुलाच्या तक्रारी माझ्याजवळ करायचा.

“अरे,लहानपणी काही मुलं अशीच असतात.नंतर सुधारतात.जीवनात ठके-ठोपे खाल्यावर आपणच सुधारेल.”
मी शरदला दिलासा देण्यासाठी म्हणायचो.

आता लाल्या चांगलाच मोठा झाला आहे.एका हार्डवेअर कंपनीत चिफ फायनॅनशियल ऑफिसर -सीएफओ-आहे.त्याच्या मार्केटींग स्किलमुळे, ऍडमिनीस्ट्रेटीव्ह स्किलमुळेच तो ह्या पदावर येऊन पोहोचला हे उघड आहे.मी लाल्याला त्याच्या वडलांची कुरकुर त्याच्या लहानपणी काय असायची त्याची आठवण करून दिली.अर्थात,त्याच्या ह्या पदाच्या कौतुकाचा भाग म्हणून सांगत असताना त्या कुरकूरीचा संदर्भ देत होतो हे उघडच आहे.

लाल्या खदखदून हसला.मला म्हणाला,
“जगात असे बरेच लोक आहेत की,ते मिळालेल्या प्रत्येक कामगिरीवर मरमरेस्तो जीव ओतून काम करतात. सदासर्वकाळ आपल्यात जे काही आहे ते देत असतात.जगात असेही लोक असतात की,ती कामगिरी कितीही लहान असो,क्षुल्लक असो,त्यावर एव्हडं जोर देऊन,परिश्रम घेऊन वेळ घालवतात की,त्यांच्या कपाळावरून घामाच्या धारा वहायला लागतात.
हेच ते लोक,जगाला मान्य असलेल्या विचारधारा- घोर परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर सरतेशेवटी लाभांश मिळतो ही समजूत, साकार करतात.

मी काही ह्या लोकातला नाही. कामाच्या व्यापक कक्षेत मी अगदी ह्यांच्या विरूद्ध बाजूचा आहे.आळशी असणं मला चालतं.
माझा स्वतःचा असा खास आळशी-नमुना आहे.अनेक पापांच्या नामावलीत चवथ्या क्रमांकाचं पाप, जे आळसावणं, ते हे माझं आळसावणं नक्कीच नव्हे.माझ्या ह्या स्वतःच्या खास आळशीपणाच्या व्याख्येचा उगम कुठे सापडण्यासारखा नाही.
मग तो कुणी डिक्शनरीत,एखाद्या विश्वकोशात,किंवा चांभड्याचं आच्छादन असलेल्या नीट बांधणी केलेल्या आणि सेंट्रल-सीटी लायब्ररीत जपून ठेवलेल्या ग्रंथातपण सापडणार नाही.कामाच्या प्रत्येक मिळालेल्या संधीत नुसतं शैथिल्य आणणारा माझा आळशीपणा नक्कीच नाही.उलट माझा आळशीपणा,मलाच बाजूला सारून, केवळ आलेल्या संधीलाच शैथिल्य आणतो.

जरका तिच कामगिरी परिपूर्ण करायला एखादा सोपा उपाय असेल,आणि तो सुद्धा, थोडाच वेळ वापरून, थोडेच परिश्रम घेऊन, करायचा असेल तर मी तिथे हजर आहेच म्हणून समजा.पण एक मात्र, असं करताना त्या कामगिरीच्या समग्र गुणवत्तेचा त्याग केला गेला जात नसेल तरच मी ते काम अंगीकारतो. तसं करण्यासाठी मला जरा विरंगुळा घ्यावासा वाटला तर मी तो अवश्य घेतो. परंतु,हे सुद्धा करताना आणखी काही अत्यावश्यक बाबीची खबर घ्यायची जरूरी नसायला हवी.हे सगळं प्राथमिकता आणि कुशलता ह्या संदर्भाने असतं.

थोडक्यात म्हणजे,पटकन आणि परिणामकतेने काम करण्याची क्षमता असणं,काय करायला हवं त्याकडे लक्ष केंद्रित असणं,आणि ते पुर्णत्वाला आणणं, हेच मला खरा आळशी बनायला कारणीभूत करतं.
माझ्या आतापर्यंतच्या जीवनात जितकं आळशी असावं तितकं असण्यासाठी मी प्रयास केला.आणि माझी खात्री आहे की माझ्या सारखाच हे असं करायला योग्य आहे.मला आळशी ठेवण्यासाठी मी संधी निर्माण करायला सतत प्रयत्नात असतो.मग ती संधी माझ्या मित्रांबरोबर सिनेमाला जाण्याबद्दलची असो,घरच्या मंडळीबरोबर बाहेर कुठेतरी रात्री जेवायला जाण्यासाठी असो किंवा जराशी डुलकी घेण्यासंबंधी असो.

मी आळशी राहिल्याने,रोजच्या जीवनात येणार्‍या तणावाला मी विसरून जातो.त्यामुळे आरामात राहून, खरोखरीचा आनंद अनुभवतो.जीवनात मी घेतलेल्या ह्या आव्हानाला पाहून सर्वच माझ्याशी सहमत होतील असं नाही.त्याबद्दल मला त्यांचा आदर वाटतो.माझ्या शाळकरी जीवनापासून, शाळेत होत असणार्‍या चढाओढीच्या वातावरणात,मी माझ्या ह्या अंगभूत आळशीपणावर आलोचना करून घेतली आहे.जशा-अभ्यासात जास्त लक्ष दिलं असतं तर अख्या शाळेतून नावाजून आलो असतो किंवा क्रिकेटमधे जास्त स्वारस्य घेऊन मेहनत घेतली असती तर कॉलेजच्या टीमचा कॅप्टन झालो असतो वगैरे,वगैरे.

खरं म्हणजे,ह्या गोष्टीनी माझ्यात काही फरक पडण्यासारखं नाही.आणि त्यांनी फरक पडलाही नाही.मला मी जसा हवा होतो तसा मी आता आहे.ते मला पुरेसंही आहे.
मला नेहमीच वाटत असतं की,जीवन जगण्यासाठी एव्हडं काही मरायची गरज नाही.तसंच मला नेहमीच वाटत असतं की,काहीच न करणं जेव्हडं समाधानकारक आणि संतोषप्रद असतं तेव्हडंच काही करण्यातही असतं.
अगदी खरं पाहिलं तर,मला आळशी असण्यात विशेष वाटतं.कारण तसं राहिल्याने मी जो आज आहे तो तसा आहे.”

एव्हड्या मोठ्या पदावर असलेल्या लाल्याच्या जीवनाचं त्यानेच केलेल्या स्पष्टीकरणाने मी तर थक्कच झालो. बिचार्‍याचे वडील हयात असते तर त्यांनाही तसंच वाटलं असतं असं माझ्या मनात यायला उशीर लागला नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, August 1, 2011

असंच एक बालपण.



“आपल्या जन्म-दिवशी आपल्याला कोणतं बक्षीस मिळणार ही विवंचना असायची.इन्स्युरन्सचा हप्ता भरला पाहिजे ही काळजी नसायची.”

मयुरेशला मी त्याच्या अगदी लहान वयात पाहिलं आहे.आता तो कॉमर्स शिकून एका बॅन्केत नोकरीला आहे.त्याची बायकोपण त्याच बॅन्केत नोकरीला असते.सहा वर्षाची त्याला मुलगी आहे.
त्यादिवशी तो आणि मी गाडीत एकाच डब्यात जवळ जवळ बसलो होतो.संध्याकाळची वेळ होती.गाडी चर्चगेटहून निघाली तेव्हडंच.नंतर पुढची स्टेशनं थांबत थांबत पुढे सरकत होती.सिग्नल सिस्टीममधे काहीतरी बिघाड झाल्यामुळे सर्वच गाड्या अगदी हळू हळू चालल्या होत्या.
मयुरेश जांभया काढीत होता.दिवसभर काम करून कंटाळलेला दिसला.काहीतरी विषय काढावा म्हणून मी त्याला म्हणालो,
“काय तुझी छोकरी काय म्हणते?कितवीत आहे आता?”
मला मयुरेश म्हणाला,
“आता पहिलीत आहे.फार अभ्यासू आहे.पुस्तकं वाचायला तिला खूप आवडतात.रोज रात्री झोपण्यापूर्वी एक तरी नवी गोष्ट तिला सांगावी लागते.चुकून एखादी गोष्ट रिपीट झाली की तिच्या लक्षात लागलीच येतं. आपण ऐकली आहे म्हणून सांगते.मग मलाच लक्षात आणून दुसरी एखादी गोष्ट सांगावी लागते. त्यानंतर झोपते.”
मी मयुरेशला म्हणालो,
“बालपण आहे.जीवनात सर्वात चांगली अवस्था असलेलं वय.तसं पाहिलंस तर म्हातारपण पण चांगलंच असतं.फक्त दोन गोष्टींची जरूरी असते.एक म्हणजे तंदुरूस्थी आणि पैसे गाठीला हवेत.”
माझ्या म्हणण्याचा अर्थ मयुरेशला कळला.आणि आपल्या बालपणाची त्याला आठवण आली असावी.

मला म्हणाला,
“जीवानातल्या निरनीराळ्या अवस्थेमधे मला बालपणाबद्दल विशेष वाटतं.माझ्याप्रमाणे बर्‍याच लोकाना तसं वाटत असावं.बालपण ही माझी अशी अवस्था होती की मला थकणं हा शब्द माहित नसायचा.तसंच दमणूक काय असतं हे ही मला माहित नसायचं.दिवस लांब वाटायचे आणि रात्री लहान वाटायच्या. अंत नसलेला जोम अंगात असायचा.सकाळी उठल्यावर अंगात दुखरेपणा नसायचा.केवळ रात्र झाल्याने झोपावं लागायचं.खेळातल्या एखाद्या खेळण्यासारखं मला मी वाटून घ्यायचो. एकतर चालू नाहीतर बंद.
धावणं,उड्या मारणं,खेळणं हीच क्रियापदं मला माहित असायची.
नोकरीत असलेल्या कुणाच्यातरी गुलामासारखी माझी अवस्था नसायची.शाळेतलं जीवन म्हणजे तासा-तासाने वाजणार्‍या घंटे मधलं जीवन असायचं.
त्यावेळी माझी एकच एक मैत्रीण म्हणजे माझी आई.तिने हाक मारल्यावर धावत जाऊन तिला साद द्यायचो. त्यावेळी माझा चिंतेचा विषय म्हणजे माझं खरचटलेलं ढोपर नाहीतर मुरगळलेलं पाऊल.

माझ्या मित्र-मैत्रीणी नेहमीच माझ्या आसपास असायच्या.एखाद्या हाकेबरोबर सर्व जमायच्या.
“कामात व्यस्त असल्याने येता येणार नाही”
असली वाक्यं ऐकायला मिळायची नाहीत. पावसात भिजणं,उन्हात करपणं आणि थंडीत कुड्कूडणं ह्याबद्दल बालपणात काही विशेष वाटत नसायचं.
मजा यायची.

पोस्टमनने पत्र आणून दिलं की समजावं,आजी आजोबा भेटायला येत आहेत.घेतलेल्या कर्जाचा हप्ता फेडण्याची ते नोटीस-वजा पत्र नसायचं. बालपणातली एक गोष्ट मला आवडायची की त्या वयात रडणं म्हणजे कमकुवतपणा नसायचा.आई मदतीला येऊन सर्व काही ठीकठाक करणार आहे ह्याचं त्या रडण्यात आश्वासन असायचं.जीवनातली ही अवस्था नेहमीच असावी असं त्यावेळी वाटणं,आपण पुढे काय होणार आहो ते ह्या अवस्थेतच घडलं जाणं हे विचार करण्यासारखं आहे.
ह्या वयात एखादी दुःखद घटना म्हणजे एखादं कुत्र्याचं पिल्लू सायकलच्या चाकाखाली येणं.कामावर खाडे झाल्याने महिन्याचा पगार कमी मिळणार असलं ते दुःख नसायचं.

व्यस्त दिवस म्हणजे, शेजारच्या मुलांबरोबर क्रिकेट मॅचची पैज लावून, दिवसभर खेळण्यात वेळ घालवण्याचा दिवस.बॅन्केत जाऊन महिन्याची बिलं भरणं,किंवा रांगेत उभं राहून ट्रेनचा पास काढणं अशासाठी व्यस्त रहाणं नसायचं.आपल्या जन्म-दिवशी आपल्याला कोणतं बक्षीस मिळणार ही विवंचना असायची.इन्स्युरन्सचा हप्ता भरला पाहिजे ही काळजी नसायची.”

मयुरेशचं हे बालपणाबद्दलचं एकाएकी त्याच्या मनात आलेलं चिंतन ऐकून मला बरं वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“ह्या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे.अंधेरी जवळ आली आहे.स्टेशन येण्यापूर्वी मी माझ्या मनातलं तुला सांगतो,
त्या बालपणातल्या दिवसातल्या साधेभोळेपणाबद्दल,निष्कपटेतेबद्दल मला विशेष वाटतं.वाईट वृत्तीच्या माणसाला त्यावेळी बदमाश म्हणायचे, आतंकवादी म्हणत नसायचे.मला वाटतं,बालपणाची ही अशी अवस्था होती की त्याकडे मागे वळून पहावं असं वाटण्या सारखं होतं,आणि जरी ते दिवस निराशजनक असेनात का,उरलेल्या जीवनात खिन्नता असेना का,त्यावेळी निदान भरवसा होता,विश्वास होता,त्यावेळी स्वप्न रंगवता येत होती.म्हणूनच मलाही,तू म्हणतोस तसं, जीवनातल्या इतर अवस्थेपेक्षा माझ्या बालपणाबद्दल विशेष वाटतं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com