Saturday, June 16, 2012

अविच्या बाबांची खंत



अरगेड्यांचा छोटा अविनाश,त्याच्या बाल्कनीत उभा होता.खाली रस्त्यावरून त्याने त्याच्या बाबांना येताना पाहिलं.चटकन त्याच्या लक्षात आलं की आज फादर्स डे आहे.आपल्या बाबांना फुलं देऊन त्यांना हॅपी फादर्स डे म्हणावं असं मनात आणून तो मागच्या बागेतून फुलं काढून त्या फुलांचा गुच्छ बनवून बाबांना सरप्राईझ करावं असं मनात आणून खाली जायला निघाला.
नंतर काय रामायण झालं ते मला एकदा अरगडे सांगत होते.मला म्हणाले,
"आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले “मूड” संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही."
असं सांगून फादर्स डे दिवशी आपल्या मुलाबरोबर झालेला प्रकार त्यांनी मला वर्णन करून सांगीतला.ते आठवून मला कविता सुचली.आज फादर्स डे असल्याने ती कविता आज आठवली,

वाटेत एका अनोळख्याला
 जवळ जवळ आपटलो
 “माफ करा”असे म्हणून मी
 त्याच्या पासून सटकलो


“करा माफ”मला पण
 म्हणत थांबला तो क्षणभर
 औचित्याच्या वागण्याने
 सुखावलो आम्ही दोघे वरवर


आपल्या घरी
 स्थिती  असते निराळी
 लहान थोरासी चटकन
 आपण वागतो फटकून


झाली त्यादिवशी एक गम्मत
 होतो कामात मी दंग
 चिमुकल्या माझ्या मुलाने
 केला माझ्या एकाग्रतेचा भंग


“हो बाजूला”
 म्हणालो मी वैतागून
 गेला तो निघून
 हिरमुसला होऊन
 रात्री पडलो
 असता बिछान्यात
 आला विचार
 माझ्या मनात
 औचित्याच्या भारा खाली
 अमुची रदबदली झाली
 वागलो चांगले अनोळख्याशी
 अशी समजूत करून
 मी घेतली मनाशी


पाहता फुलांच्या पाकळ्या
 पडल्या होत्या दाराशी
 लाल, पिवळी अन निळी
 खुडली होती
 फूले त्याने सकाळी
 आला होता घेऊन ती हातात
 टाकण्या मला आश्चर्यात
 आठवून तो प्रसंग पून्हा
 वाटे मजकडून झाला गून्हा
 जाऊन त्याच्या बिछान्याशी
 जवळ घेतले मी त्या उराशी


पुसता  फुलांच्या पाकळ्या विषयी
 हसला तो मला बिलगूनी
 बोले तो मज भारावूनी
 “घेऊनी ती सर्व फूले
 आलो होतो मी तुमच्याकडे
 कारण आजच आहे “फादर्स डे”


मागूनी त्याची माफी
 पुटपुटलो मी त्याच्या कानाशी
 चूक केली मी सकाळी तुझ्याशी


पुसून अश्रू माझे त्याने
 हसून बोलला तो पून्हा एकदा
 करतो प्रेम मी
 तुमच्यावर सदासर्वदा


रहावे ना मला ते ऐकून
 म्हणालो मी ही भारावून


आवडशी तू मला अन
 मुकलो मी तुझ्या
 आश्चर्याच्या आनंदाला
 दिसलास सुंदर तू फुलांमुळे
 होते सुंदर तुझे ते फूल निळे



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 12, 2012

मागे वळून मी पाहिले





"माझेच मरण मला पाहून हंसले."


त्या दिवशी एक गम्मतच झाली.जवळकरांच्या जीममधे मी गेलो होतो.बरीच तरूण मंडळी एकाग्र चित्ताने व्यायाम करताना दिसली.
जवळकरानी मला मुद्दामच त्यांच्या जीममधे बोलावलं होतं.
मागे मी जेव्हा त्यांना भेटलो होतो तेव्हा सुधृढ प्रकृती विषयी आमची चर्चा चालली होती.ते मला म्हणाले की,अलीकडे तरूणाना आपल्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल बरीच दिलचस्पी वाढली आहे.हवं तर तुम्ही माझ्या जीममधे येऊन बघा.किती तन्मयतेने लोक व्यायाम करीत असताना तुम्हाला दिसतील.
जवळकरांचे ते शब्द मला जास्त परिणामकारक वाटले,
ते म्हणाले होते,
"जगणं आणि मरणं हे निसर्गाच्या नियमात बसत असतं.पण आयुमर्यादा वाढवायची असेल तर मात्र आपल्या जीवनाची आपणच काळजी घ्यायला हवी.
खरोखरच ते दृश्य बघून मला माझ्या लहानपणाची आठवण आली.आमच्या शाळेत मल्लखांबावर व्यायाम घेण्याची सोय होती.ह्या आधूनीक जीममधली बरीचशी उपकरणं पाहिल्यानंतर एका मल्लखांबामधे किती गोष्टी सामवल्या आहेत ते माझ्या लक्षात आलं.
त्यानंतर मला एक कविता सुचली,

मागे वळून मी पाहिले
माझेच मरण मला पाहून हंसले
हंसण्याचे काय  कारण पुसता
म्हणाले ते
आलीच वेळ नेण्याची, न विसरता


असते मी सदैव सर्वांच्या मागे
सावली होऊन पहाते कोण कसा वागे
झडप घालते पाहून त्याला गाफील
जो न समजे जीवन असे मुष्कील


खातो मी सदैव हेल्थी फूड
ठेवीतो माझे मी आनंदी मूड
घेतो मी नियमीत व्यायाम
का मी नये राहू इथे कायम


जनन मरण असे निसर्गाचा नियम
घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची
वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची
जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त
मरणे हे तरी असे उद्याचे सत्य



 श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 5, 2012

देवबाप्पाचा चिमुकला तलाव.



"हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल"


एखादा, कोणत्या विषायवर अथवा कोणत्या गोष्टीवर भावनाप्रधान होईल हे सांगणं जरा कठीणच आहे.हेमंत माहात्म्याच्या नातवाबद्दल असंच काहिसं झालं.

त्याचं असं झालं,हेमंत माहात्मे काल मला बाजारात भेटला.थोडा चिंतेत दिसला.त्याच्या थोरल्या मुलीला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याने डॉक्टरने तो काढून टाकण्याचा सल्ला दिला.
हेमूच्या पंचवीस वर्षे वयाच्या नातवाला,आईची मनस्थिती पाहून दया येत होती.ह्या विषयाकडे तो भावनाप्रधान होऊन विचार करीत होता.
"डॉक्टरने जरी आईची समजूत घातली होती तरी आपल्या शरीरातला एक अवयव निखळला जाताना तिला मनस्वी दुःख होत होतं.स्त्रीला निसर्गाच्या निर्मितीची मिळालेली निसर्गाचीच देणगी किती अमुल्य वाटावी ही तिच्या चेहर्‍यावरची छटा पाहून तिच्या मुलाला कळत होतं की ते दुखः प्रकट करणं तिला शब्दांच्या पलिकडचं होतं."
असं सद्गदीत होऊन हेमंत आपल्या नातवाला वाटणार्‍या चिंतेबद्दल मला सांगत होता.


"रोज रोज शस्त्रक्रियाकरून डॉक्टरना कसल्या भावनाच राहिलेल्या नाहीत?गर्भाशय म्हणजे एखादी निकामी किंवा कुचकामी पिशवी असून ती फेकून देण्यालायक असते अशी वृत्ती त्यांच्यात आलेली असते.अर्थात पेशंटला वाचवण्यासाठी तो निर्णय त्या डॉक्टरना घ्यावा लागतो हे उघडच आहे म्हणा.
पण ज्या माऊलीचा तो अवयव, ज्यातून तिने निसर्ग उत्पति केलेली असते त्या अवयवाबद्दलच्या तिच्या भावना तिलाच ठाऊक असणार."
असं नातू त्याच्या आजोबांना म्हणाला.


आणि नंतर आपल्या आजोबांना पुढे म्हणाला,
"मी सुद्धा आईच्या शरीराचा एक हिस्सा होतो.आईच्या उदरात नऊ महिने राहून,तिच्या कष्टाला जो मी कारण झालो,त्याबद्दल मलाही अशावेळी विशेष वाटणं स्वाभाविक आहे.पण काय करणार? निसर्गाचे नियम पाळावेच लागतात ना? एखादी गोष्ट कुचकामी झाली,निकामी झाली,हानीदायक झाली,की निसर्गच तिची विल्हेवाट लावतो.पण हे आईला समजावून कसं सांगायचं.?"
डोळ्यातून ओघळणार अश्रू पुशीत तो आपल्या आजोबांना सांगत होता.


"माझा नातू मला नेहमीच लहान वाटाणार.पण ह्या वयातही तो पोक्त विचाराचा आहे.आणि त्याच्या आईवर त्याचं अत्यंत प्रेम आहे."
असं म्हणत,
"डॉक्टरांची चूक नाही म्हणा.त्यांच्या संवयीचा परिणाम."
असं आपलं मत देणार्‍या हेमूकडून हे ऐकून त्यांच्या नातवाच्या मनात आलेली भावना कवितेतून जास्त परिणामकारक प्रकट करता येईल असा विचार करून मला ही कविता सुचली होती.

कळला गे आई! तेव्हा
खरा जीवनाचा आशय
काढतील तुझा जेव्हा
तो अमुल्य गर्भाशय

गे! होईल तिची भली मोठी यादी
होती ती अमुची चिमुकली गादी
घेऊन अमुचे चिमुकले शरीर
अमुच्या चिमुकल्या गादीवर
पोषण केलेस अमुचे किती कष्टाने
सारे पूरे नऊ महिने

भरभरून त्यामधे होता ऑक्सिजन
पंपावीना होतसे सर्क्युलेशन
पोहत होतो होऊन आम्ही
तुझेच चिमुकले मुल
हो गे आई!
तो होता देवाचा स्विमिंगपूल

करू नको गे! दुःख त्याचे
सांगू कसे मी तुला ते

रीत असे निसर्गाचीही
निरुपयोगी झाल्या वस्तुची
निकाल लावे तो झडकर
म्हणूनच,
द्या टाकून झाला वापर
असेच म्हणत असेल तो डॉक्टर.


माझी ही कविता मी हेमंतला त्याच्या नातवासमोर वाचून दाखवली तेव्हा दोघानीही मला मिठीत घेतलं.
"माझ्या आईची सर्जरी यशस्वी झाल्यानंतर आणि ती पुर्ण बरी झाल्यावर मी तिला ही तुमची कविता वाचून दाखवणार असं मी म्हणतो."
असं त्याने म्हटल्यावर,माझ्या मनात आल्याशिवाय राहिलं नाही की,पुढे येणारी प्रत्येक पिढी किती प्रगल्भ विचाराची होत असते.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, June 1, 2012

होकाल( नवरी)




मला वाटतं विसाव्या शतकातल्या पूर्वार्धातली ही परिस्थिती असावी. कोकणातून मुंबईला नोकरीसाठी जाणार्‍या व्यक्तिबद्दल कोकणातल्या इतराना त्यावेळी थोडा कमीपणाच वाटायचा.
स्वतःची शेती असून,त्यात चांगली कमाई होत असताना मुंबईत जाऊन गिरणीत चाकरमान्याचं काम करण्यात काय विशेष आहे? उलट ह्याला दळभद्रीपणाच म्हणावा लागेल अशी समजुतकरून घेऊन कोकणी माणूस त्या चाकरमान्याची अप्रत्यक्षपणे अवहेलनाच करायचा.
जग बदलत चाललं आहे.बदल होत रहावा.त्यातून उर्जितावस्था होत असते हे मानायला त्यावेळचे ते लोक तयार नसायचे.

"सावंताचो बाबलो म्हुम्हंयेक जातासा म्हणे.मेल्याक कसली अवदसा सुचली.हंय़ वाडवडीलांची एव्हडी मिळकत आसा.थंय म्हुम्ह्यंत जावून कबुतरांच्या घुराड्यासारख्या चाळी्तल्या खोलीत दिवस काढतलो.फाट-फाआटे चपाती-भाजीचो डबो घेवून गिरणीत चाकरमानी म्हणून कामावर जातलो.काय म्हणे तर महिन्या अखेर नकद पैसो हातात मिळता.
ह्याका अवलक्षण म्हणुचा नाय तर काय?"

अशी सावंताच्या बाबल्याबद्दल चर्चा, इतर लोक,पूर्वसाच्या किंवा रामेश्वराच्या, देवळाच्या आवारात किंवा वडाच्या चौथुर्‍यावर बसून, शिळोपाच्या गप्पातला विषय म्हणून चर्वीचरण करण्यात मश्गुल व्ह्यायचे.

त्यातलाच एक विषय म्हणून कधी कधी,
"कामतांच्या इंदूक मुंबईत दिला म्हणे.नाबरांचो झील दादरच्या पोस्टात कामाक आसा.हल्लीच तो इंदूक बघून गेलो.पसंत केल्यान.येत्या मे महिन्यात इंदू बोटीन मुंबईक जाताला."
अशीही इंदूची चर्चा व्ह्यायची.


पूर्वी होकाल(नवरी) कोकणातून मुंबईला जाताना बंदरावरून पडावातून जाऊन आगबोटीत बसायची.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला बंदरावर म्हणायचा,
बाई गं!,पडावातून आगबोटीत चढताना जरा जपून चढ.आणि त्यानंतर तिचा बाप तिला मुंबईची तिच्या दृष्टीने लागणारी आवश्यक ती माहिती-उपदेश-द्यायचा.

“गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान”
(चाल:- गो चेडवाsss, पडावाssतून आगबोटीत जपाssन
घो तुझो र्‍हवतां शिमीटाच्या चाळीत
तेका गो कसला घोपान?
असं एक मालवणीत गीत लिहिलं गेलं.
म्हणजेच,
बाळे,पडावातून आगबोटीत बसताना जरा जपून बस.तुझा नवरा वरळीला सिमेंटच्या चाळीत रहातो.वगैरे,वगैरे..)
पण आता वीसाव्या शकताच्या उत्तरार्धात आणि एकवीसाव्या शतकात हीच होकाल मुंबईहून अमेरिकेत जायला निघते.कारण जग सुधारत चाललं आहे.बदल होत राहिला आहे.आणि तो झालाच पाहिजे.

तेव्हा मुंबईहून अमेरिकेत जाणारी  तिच होकाल बोटीने प्रवास करण्याऐवजी, पडावातून आगबोटीत बसण्याऐवजी, मोटारीतून उतरून विमानात जाऊन बसते.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला विमान-तळावर नव्या परिस्थिती काय म्हणेल,ह्याचा विचार येऊन ही कविता सुचली,

गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
घो तुझो र्‍हंवतां बॉस्टनच्या चाळीत
ते का गो,कसला "घो" पान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान



थैसरल्या जीवनात मोटारच साधान
सीटबेल्ट लावून बस चांगला पसरान
पायी,पायी चालूचा आता जा विसरान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


हाटेलात गेलंस मगे फास्ट फूड खाशीत
हॉटडॉग,बरगर तू सपाटून चापशीत
वजन तुझा वाढतालाच, जा असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान



थंय सगळे असतले कामात अडकान
वेळ नाय जाणा म्हणून म्हणशीत बोलान
गजाली मारूक कोणच नाय आयच्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


घो गेलो सकाळी की येतोलो रातच्यान
दिवसभर टिव्ही बघून जातलंस कंटाळान
मग म्हणशीत कंटाळलंय नको ह्या जीवान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


शनिवार-आयतवार ये मग फिरान
घो तुका नेतलो मॉल बघूक अलिशान
श्रीमंती देशाची बघ उघड्या डोळ्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


शेवटचा सांगतय नीट घे ऐकान
लवकरात लवकर जा होऊन पोटाच्यान
वेळ जावूक साधन! घे असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, May 28, 2012

बाठा चोखून खपेल का?


रघूनाथला जाऊन आज एक वर्ष झालं.आज त्याची आठवण आली.आंब्याच्या राजाचीपण आठवण आली.हापूस आंबे बाजारात यायला लागले असतील.
रघूनाथ हे जग सोडून जाण्यापूर्वी माझ्या घरी आंबे खायला आला होता.त्याला मी त्यावेळी म्हणालो होतो.


"तुझ्यापासून आंबा मला लपवून ठेवता येणार नाही हे मला माहित आहे.”

ते मी त्याला बोललेले शब्द शेवटचेच ठरले.सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.
आज आंब्याची पेटी उघडल्यावर रघुनाथची प्रकर्षाने आठवण आली.रेडीओवर मालती पांडे यानी गायलेलं,गदिमाचं गाणं लागलं होतं.

“लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?”

लगेचच माझ्या कवीमनाला रहावलं नाही.ह्या गाण्याचं “विम्बलडन” सुचलं.
माझ्या मित्राला, रघुनाथाला मी ते गीत अर्पण करतो.
जणू रघुनाथच मला सांगतोय कवितेतून,

लपविलास तू हापूस आंबा
सुगंध त्याचा छपेल का
बाठा चोखून खपेल का?

जवळ फळे पण दूर ते सूरे
दात शीवशीवे जीभ सरसरे
लपविलेस तू जाणूनी सारे
रंग फळाचा छपेल का?

क्षणात बघणे,क्षणात लाजणे
मनात हवे पण,दिखावा नसणे
ही खाण्याची खास लक्षणे
नाही म्हणाया जमेल का?

पुरे बहाणे,आतूर होणे
मित्रा,तुझिया मनी खाणे
मित्रहि जाणे,मी पण जाणे
आंबा छपविणे सुचेल का?

श्रीकृष्ण सामंत  (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, May 21, 2012

सरतेशेवटी




सुगंध त्याचा दरवळला
उजळूनी जुन्या आठवणी
पाकळ्यावरचे ते थेंब दवांचे
आणिती डोळ्यात पाणी


सरतेशेवटी माझी पत्नी सुधार सेंटरवरून गेल्या आठवड्यात घरी परत आली.घरातल्या सर्व कुटूंबियाना,मित्र मंडळीना खूप आनंद झाला.
तिच्या पायाची सूज कमी होण्याची औषधं देऊन,सर्वांगाला,विशेषतः पायाना योगय तो भरपूर व्यायाम देऊन तिला वॉकरवर चालण्याईतपत  तयारीकरून डिसचार्ज देण्यात आला.

घरी आल्यानंतर यापुढे दोन महिने एका केअरटेकर कंपनीचे ओ.टी(ऑक्युपेशन थेरपी),पी.टी.(फिझीकल थेरपी)ची मंडळी आमच्या घरी येऊन तिला जमेल तेव्हढी इंडीपेन्डट करण्याचा प्रयत्न करणार.हा त्यांचा पुढील दोन महिन्याचा प्रोग्राम राहिल.तिच्या वयोमानाकडे लक्ष देऊन,तिच्या शरीराच्या बळाकडे लक्ष देऊन हे सर्व केलं जाणार.
आमच्या मुलांनी(मुलगी,मुलगा,जावई,सून आणि नातवंडं)ह्यांनी घेतलेले परीश्रम आणि इतर मित्र मंडळी आणि नातेवाईकानी दिलेल्या शुभेच्छा ह्यामुळेच हे असं घडू शकलं ह्यात संदेह नाही.

माझी पत्नी घरी आल्याच्या दुसर्‍या दिवशीच्या सकाळी, माझ्या मुलीने घरामागच्या बागेत जाऊन गुलाबाच्या झाडावरचं नुकतच फुललेलं सुगंधीत तांबडं फूल आणून आपल्या आ़ईच्या हातात देऊन तिचं स्वागत केलं.

माझी पत्नी घरी नसताना मला पहाटे पहाटे,आशेची निराशेची,स्वप्न पडायची.माझ्या पत्नीच्या हातातलं तिच्या मुलीने दिलेलं ते गुलाबाचं फूल पाहून माझं एक स्वप्न मला आठवलं आणि त्याबरोबर एक कविता सुचली.

आपल्यावर रागावून गेलेलं एक माणूस पुन्हा कधीतरी आपल्याला भेटायला आल्यावर प्रथम नक्कीच एक फुल देऊन स्वतःला अन मला आनंद देणार असं नेहमीच वाटणार्‍या मला पहाटे एकदा स्वप्न पडतं.आणि मग…..

हरवलेले फूल आणून देताना
जेवढा तुला आनंद झाला
दुप्पटीने झाला आनंद मला
फुल ते हातात घेताना

सुगंध त्याचा दरवळला
उजळूनी जुन्या आठवणी
पाकळ्यावरचे ते थेंब दवांचे
आणिती डोळ्यात पाणी

क्षणभरचे ते स्वप्न पहाटेचे
करीते काम विलोभण्याचे
कुठले फूल अन कुठला सुगंध
जाईन पुन्हा त्या स्वपनात
होईन मी पुन्हा आनंदाने धुंद



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Monday, May 7, 2012

हिच खरी समस्या असे जीवनाची






सांजवेळी आली आठव सजणाची
हिच खरी समस्या असे जीवनाची


ओठावरती ढंग आणिला हास्याचा
विस्मरूनी सजणा हर्ष आणिते क्षणाचा
अचानक हे काय झाले
चेहर्‍यावरी रंग चढला विषादाचा


केला अहंभाव दूर असताना
ठेविले दूर अंतरातून सजणाला
करूनी यत्न विसरले विषादाला
परी जाऊनी दूर विनाश घेऊनी आला


सांजवेळी आली आठव सजणाची
हिच खरी समस्या असे जीवनाची




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com