Sunday, June 29, 2008

ठाम मताचे आमचे बंडूतात्या.

तसं पाहिलंत तर आमच्या बंडूतात्याना प्रत्येक विषयात आपलं मत द्दायची दिलचस्पी आहे.मग ते कोर्टकचेरी पासून राजकरणापासून साहित्या पर्यंत तात्या आपलं मत देत असतात.आणि त्यांच ते मत नेहमी ठाम असतं.
मला एकदा म्हणाले,
"ह्या विषयावर माझं ठाम मत आहे आणि ते कधीच बदलणार नाही."
मी त्यांना म्हणालो,
"बंडूतात्या,ठाम मत म्हणजेच न बदलणारं मत नां?का तुमचं न बदलणारं ठाम मत म्हणजे काही विषेश आहे काय?"
अशा वेळी तात्या अळीमिळी गुपचिळी ठेवतात.
जेम तेम हायस्कूल (मराठी मिडीयम)पर्यंत शिकलेले बंडूतात्या मधे कोर्टकचेऱ्यात दिलचस्पी घेवू लागले होते.कायदेबाजी आणि वकिली-न्याक ते सर्व शिकल्याशिवाय कशी येणार?पण
"मला तितका काय गंध नाही"
असं म्हणता म्हणता तात्या, त्या विषयावर आपलं ठाम मत द्दायला विसरत नसत.
वकिलांच्या घोळक्यात सामावून घेण्यासाठी त्यानी एकदा काळा कोट शिवून घेतला होता.आणि तो कोट घालून ते चक्क कोर्टात जात असत.इतर वकिल तात्याना ओळखत असल्यामुळे ते त्याना काही म्हणत नसत.
"काळा कोट घातला तर कायद्दाने त्यात ऑबजेक्षन कसलं?"
असं मला एकदा त्यानी मी पृच्छा केल्यावर सांगितलं.

वकिल लोकांच्या घोळक्यात बसून त्यांच्या चर्चा ऐकून संध्याकाळी दाजीकाका,भाऊसाहेब देसाई,शिर्के फौजादार वगैरेंच्या घोळक्यात त्यांच्या बरोबर तळ्यावर जावून बसत.आणि ऐकलेल्या कोर्टातल्या केसीस समजावून सांगत.
इंग्रजीचा गंधही नसलेले बंडूतात्या हातात नेहमी टाईम्स ऑफ इंडिया घेवून फिरत.
एकदा अशीच गम्मत झाली.ह्या तळ्यावरच्या घोळक्याला बंडूतात्या म्हणाले,
"आज टाईम्सने जळजळीत अग्रलेख लिहिला आहे"
दाजीकाकाना हे तात्या सांगतात ह्याचा राग आला.ते त्याना म्हणाले,
"अर,तात्या तुला इंग्रजीचा गंध नाही.ए बी सी अक्षराची " ** " वर का खाली ते तुला माहित नाही.आणि तो अग्रलेख
जळजळीत लिहिला आहे असं म्हणतोस कुणावर इंप्रेशन मारतोस रे?
वकिलाचा कोट घातलास म्हणून काय वकिल झाला नाहिस.ते मारतात त्या गप्पा ऐकतोस आणि आम्हाला येवून सांगतोस. आम्ही का टाईम्स वाचत नाही असं तुला वाटतं का?"
हे दाजीकाकाचे उद्गार ऐकून बंडूतात्याने पळच काढला.

वर म्हटल्या प्रमाणे बंडूतात्याची खाशियत म्हणजे
"ह्या विषयात मला गंध नाही"
असे म्हणून सुद्धा त्या विषयावर आपल्या टिकेने कुणालाही डिवचणं सोडत नाहीत.
साहित्यात टिका मग ती कविता असो की लेख असो.
संगीतात टिका मग ती चालीवर असो की गाण्यावर असो.

अलीकडे एक गम्मतच झाली.गावात कुस्तीचे फड होते.बाहेरून किंगकॉंग नावाचा एक मल्ल आला होता.
कीडकीडीत असून सुद्धा तात्या त्याच्या बरोबर कुस्ती करणार म्हणून हट्टाला पेटले.
एक फटक्यात किंगकॉंगने तात्यांची पाठलावून चित केलं.
हार न मानता ते किंगकॉगला म्हणाले,
"पाठ लावलीस पोट कुठे लावलेस.?"
किंगकॉगने दुसऱ्या क्षणी, फटक्यात पोट लावलं.
हार न मानता परत ते किंगकॉंगला म्हणाले
"पोट लावलंस पाठ कुठे लावलीस?"
किंगकॉंगने हवं तेच केलं
पण कीडकीडीत पेहलवान-बंडूतात्या- हार मानायला तयार नसल्याने काय करणार?
कारण एकाच वेळी पोट आणि पाठ लावल्याशिवाय मी हार मानणार नाही असं त्यांच ठाम मत होतं.
एकाच वेळी पाठ आणि पोट लावणं शक्य नाही त्यापेक्षा तुच जिंकलास असं समजून
किंगकॉंगने ही त्याची अट ऐकून कुस्ती खेळायलाच माघार घेतली.
सारांश,
आमच्या ठाम मत असलेल्या बंडूतात्यांचं हे असंच आहे.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, June 28, 2008

का लपवूनी ठेविसी तुझे गुपित

पाहिले जेव्हा मी तुला
मन माझे गेले हरवूनी
धडधडून तेव्हा सागे ते मला
प्रीती जडली लपुनी छपुनी
ओठ ही सांगती मला
मन माझे गेले गुंतूनी

हकीकत माझी कशी तुला सांगू
आहे कोण मी ते कुठवर लपवू

का लपवूनी ठेविसी तुझे गुपित
प्रयत्न करूनी झाले सर्व मला माहित
जागो जागी आणुनी शब्द जिव्हेवर
सांगतील सर्वां अपुल्या प्रीतिचे गुणगान


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, June 26, 2008

आतला आवाज

“मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात. माझ्या आईने मला हे सिद्ध करून दाखवलं आहे.”
अशोक त्या दिवशी माझ्या घरी मुद्दाम म्हणून आला होता.त्याचे वडिल अलीकडेच निर्वतले होते.त्यांचे काही फोटो आणि त्यांनी जाण्यापुर्वी माझ्यासाठी काही पुस्तकं वाचायला म्हणून ठेवली होती.ती तो घेवून आला होता.त्याच्या वडिलांची चौकशी केल्यावर तो म्हणाला.

“हाताच्या बोटावर मोजले जातील एव्हड्याच तुमच्यासारख्या काही लोकाना माझ्या ह्या गोष्टी बद्दल माहित असावं.माझ्या वडिलाना असा एक असाध्य रोग झाला होता की त्यांचे सर्व स्न्यायु तो रोग हळुहळु आत्मसात करीत होता की ज्यामुळे ते नंतर नंतर चालू पण शकत नव्हते.
ती घटना एक आयुष्याला वेळण देणारी होती.

त्या घटनेमुळे मला कुठचच कायम स्वरुपाचं निर्णय घेण्यासारखं उदाहरण शिकवून जात नव्हतं.उलट त्या सर्व घटनने मी पुरा गोंधळून गेलो की कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर ठेवू नये.
आणि ही माझी सर्व हकिकत माझ्या वडिलांच्या निर्वतण्याच्या घटनेकडे जास्त केंद्रित नसून माझ्या आई बद्दल आहे.मला माझ्या आतल्या आवाजावर खूप विश्वास आहे. माझे वडिल त्या आजाराने पछाडले असताना देव माझ्या आईची सत्व परिक्षा घेत होता असं मी म्हणेन.किंबहूना मी म्हणेन आजाऱ्यापेक्षा सुश्रुषा करणाऱ्याचीच नेहमी त्रेधा होत असते. स्वतःच्या जीवाची देखभाल करून झाल्यावर त्या आजाऱ्याची पण देखभाल करणं म्हणजे एकाच व्यक्तिला दोन व्यक्तिचं काम करण्यासारखं आहे.आणि ते सुद्धा किती दिवस करावं लागेल हे माहित नसताना.

वडिल आजारी पडून घरी असल्यामुळे तिला उदरनिर्वाहासाठी नोकरी करावी लागायची.रोज कामावरून घरी आल्यावर तिला जेवण शिजवावं लागायचं.माझ्या वडिलाना तिला भरवूं लागायचं कारण स्वतःहून जेवण्याची त्यांची क्षमताच गेली होती.रात्री रात्री माझी आई जागरणं करायची कारण झोपेतही कदाचित ते घुसमटतील असं तिला वाटायचं.सकाळी उठून घरची कामं करून कामावर जायचं असलं तरी ती त्यांना आराम मिळावा याची पराकाष्टा करायची.
अखेरच्या दिवसात आपल्याला हॉस्पिटलमधे दिवस काढावे लागू नयेत ह्या वडिलांच्या एकच इच्छेकरता माझी आई तसे घडुनये म्हणून तिच्या मनातल्या भिती शी दोन हात करीत होती.

माझे वडिल खूप स्वाभिमानी होते.त्यांच्या त्या झुरत झुरत जाण्याच्या अखेरच्या दिवसात कुणी भेटायला येवू नये असं त्याना मनोमनी वाटत होतं.पण माझी आई त्यांच्या मनाविरुद्ध जावून त्यांच्या जुन्या मित्रांना बोलावून त्यांना माझ्या वडिलांचा अखेरचा निरोप घेण्याची संधी दिल्यावाचून राहिली नाही.आणि माझ्या वडिलानी जरी उघड उघड कबूल केलं नाही तरी प्रेत्यक मित्राची झालेली भेट त्याना खूप आनंद देवून गेली.
माझ्या आईने माझ्या वडिलांसाठी घेतलेली मेहनत पाहून माझ्या लक्षात आलं की तिने कंबर कसून एकट्या आधारावर त्यांची सेवा करून तिला जमेल तेव्हडं त्यांना जगूं देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आता माझी आई आरामात आहे.आता ती माझी काळजी घ्यायला लागली आहे.माझी आणि माझ्या वडिलांची ते आजारी असताना काळजी घ्यायची तशीच.निर्वतण्यापुर्वी माझ्या वडिलानी तिला सुचवलं होतं की त्यांच्या पश्चात ती माझी वडिलधारी म्हणून असणार.जरी ती माझे वडिल नसली ती जास्तित जास्त त्यांच्या सारखी वाटते.मधून मधून मला ती तशी गमतीत आठवण करून देते.मला जमेल तेव्हडी मी माझ्या आईला मदत करीत असतो.ती मला नेहमीच म्हणते की मला पाहून तिला माझ्या वडिलांची आठवण येत असते.

मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात. माझ्या आईने मला हे सिद्ध करून दाखवलं आहे.”
त्याचं हे सर्व ऐकून मी मनात म्हणालो,
“किती सत्य हा बोलतो. ह्या जगात किती लोकना कस कसले प्रॉबलेम असतात.”

श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 24, 2008

परि तुज सम आहेस तूच

लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या
परि तुज सम आहेस तूच


वहा रे! ते नजर फेकणे
वहा रे! ते नखरेल चालणे
कसा सावरू सांग माझे भूलणे

हा केशभार की काळे घन समजू
हे नयन तुझे की लख्ख बिजली समजू
कुणा कुणाला देशिल असली सजा
लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या
परि तुज सम आहेस तूच

तुही सुंदर ऋतु ही सुंदर असे
माझे मन माझ्या काबूत नसे
शांत परिसर करितो माझी दुर्दशा
पिण्या वाचून चढली मला नशा
लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या
परि तुज सम आहेस तूच


अबोल झालीस तू जर सजणे
टाळिन माझे मीच मरणे
आहेस जरी तू परी वा सुंदरी
कशास ठेविसी अशी मगरूरी
दाखविशील का किंचीत जरूरी
लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या
परि तुज सम आहेस तूच


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, June 22, 2008

प्रेमचि चटणी,प्रेमचि भाकर.

“प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.”

बऱ्याच वर्षानी मी गोव्याला माझ्या मोठया वहिनीच्या माहेरी गेलो होतो.लहानपणी नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या वहिनी बरोबर मी गोव्याला जात असे.
त्यामुळे त्यांच्या आजूबाजुच्या लोकांशी पुर्वी पासून ओळख होती.वहिनीच्या माहेरच्या बंगल्याच्या सभोवताली मच्छिमार लोकांची वस्ती होती.घर समुद्राच्या जवळ असल्याने ही अशी मिक्स वसाहत तयार झाली होती.
आणखी बरेच बंगले आजुबाजुला होते.पण शेजारच्या झोपडी वजा घरात एक ख्रिश्चन कुटुंब राहत असे. पास्क्ल,मेरी आणि त्यांची दोन मुलं टिम आणि ज्युली मिळून हा परिवार वहिनीच्या घराच्या जवळ शेजार म्हणून त्यांचा जाण्यायेण्याच्या वहिवाटीत होता.
टिम आणि ज्युली मोठी झाली आणि त्यांची लग्नं पण झाली होती.टिम इंग्लंडला कायमचा राहायला गेला होता.नोकरीच्या निमीत्ताने प्रथम तो तिकडे गेला आणि तिकडेच एका मुलीशी ओळख होवून तिच्याशी लग्न करून राहत होता.त्याला एक लहान मुल पण होतं. कधी तरी पास्क्ल आणि मेरीला त्यांच्या आईवडिलाना भेटायला म्हणून येत असायचा.हल्ली खूप वर्ष तो आला नाही म्हणून मला पास्कल ह्यावेळी भेटला त्यावेळी सांगत होता.
ज्युली प्रथम पासूनच चर्चच्या सेवेत राहून आता ती एक चांगली नन झाली होती आणि मुंबईला कुठल्याश्या चर्च मधे राहत होती.ती मात्र वरचेवर आईवडिलाना भेटायला येत असते.

ह्यावेळच्या माझ्या गोव्याच्या भेटीत पास्कलकडे एक पाच सहा वर्षाचा मुलगा मी पाहिला.
“हा कोण? “
म्हणून मी सहजच मेरीला विचारल्यावर मला म्हणाली “आमचा नातू” मला जरा नवलच वाटलं कारण त्यांच्या दोनही मुलाना मुल झालं असतं तर एव्हडं मोठ मुल नसतं.माझ्या तोंडावर आश्चर्य झाल्याचा भाव बघून मला पास्कल हंसत हंसत म्हणाला,
“ती एक आमच्या आयुष्यातल्या होणाऱ्या घटनेतली एक अशीच घटना आहे.”
आणि मग ती दोघं बसून मला सांगू लागली,
“तू इकडे बरेच दिवस आला नाहिस.आम्ही लुकसला चार वर्षापुर्वी आमच्या घरी आणून ठेवला.त्यावेळी तो अर्थात दोन वर्षाचा होता.त्याचे आईवडिल सुद्धा मासे मारिचा धंदा करायचे.त्या वर्षी गोव्याला खूप पाऊस लागला होता.आणि तशांत एक मोठं वादळ येवून बऱ्याच लोकांच्या होड्या मासे मारायला गेले असताना समुद्रात बुडाल्या होत्या.त्यात लुकसची आई आणि वडिल सापडले.खूप शोध करून सुद्धा ते मिळाले नाहीत
हे लहान मुल पोरकं झालं आमच्याकडे ठेवून ते नेहमी समुद्रात जात.रोज संध्याकाळी घरी परतल्यावर आपल्या घरी ह्याला घेवून जात.त्यानंतर ती संध्याकाळ कधी आलीच नाही.
आईवडिलांची वाट पाहून त्यादिवशी लूक खूप रडू लागला.त्यांची आठवण काढून त्याने घर डोक्यावर घेतलं.हात पाय आपटत जमिनीवर लोळायला लागला.
मेरी म्हणाली,
“मला तो सीन अजून आठवतो.मी त्याला घट्ट जवळ घेतलं त्यामुळे त्याला हातपाय आपटायची संधी दिली नाही.अर्ध्या एक तासाने तो माझ्या जवळच रडून रडून थकून झोपला.मी पास्कलला एका थाळीतून भात आणि माश्याची करी आणायला सांगितली.ज्यावेळी तो उठला त्यावेळी माझ्याकडे बघून परत हुंदके देत देत रडायला लागला.मी ती थाळी जवळ आणल्यावर लूक रडायचा थांबला आणि चमच्याने हळू हळू जेवू लागला.
पोट फुटेल एव्हडा तो जेवला.आणखी मागून मागून जेवला.
ती रात्र पौर्णिमेची होती.आम्ही दोघं त्याला घेवून समुद्रावर गेलो.चंद्राकडे बघून हातवारे करून मला दाखवू लागला.

मी म्हणाले,
“काय आहे ते? चंद्र आहे तो चंद्र”.
जणू चंद्राला हात लावायच्या प्रयत्नात असल्या सारखं हात वर करीत होता.परत त्याने रडायला सुरवात केली.हळू हळू परत आम्ही घरी आलो. त्याला आंघोळ घालताना परत रडायला लागला.मी त्याला आंघोळ घलता घालता त्याच्या बरोबर पाण्याशी खेळायला लागले.आंघोळ संपेपर्यंत खोलीत पाणीच पाणी झालं आणि तो खुदखुदून हंसत राहिला.मी त्याच्या अंगाला पावडर लावली आणि तो पर्यंत पास्कलने बाजारात जावून त्याच्यासाठी नवे कपडे आणले ते चढवले.नंतर तो आणि मी मिळून एक चित्राचं पुस्तक घेवून पहात होतो. तो त्या पुस्तकाची पानं परतायला लागला.शेवटी एका पिवळ्या वाघाकडे बघून “वाघ,वाघ”असं पुटपुटला.
दुसऱ्या दिवशी पास्कल पोलिसाला घेवून आला आणि त्याचा रीतसर आम्हाला ताबा मिळावा यासाठी त्याचे कागद पत्र तयार करू लागला.पोलिसाना पाहून लूकस माझे हात त्याच्या कंबरेशी घट्ट गुंडाळून मला बिलगून बसला.हे पहिले दिवस असे गेले.त्यानंतर तो बापुर्डा आणि लाजवट राहू लागला.थोड्याश्या कारणावर रडायचा आणि गप्प एका कोपऱ्यात जावून बसायचा.जेवण दिल्यावर मोठ्या कष्टाने खायचा.
आईवडिल दिसत नाहित ह्या शॉकनेच जणू तो बापुर्वाणा व्हायचा.मला त्याच्या त्या परिस्थितिला बघून खूप रडू यायचं.
आता तू पहातोस त्याला तो सहावर्षाचा स्मार्ट,आनंदी पहिल्या वर्गात शिकत असलेला मुलगा दिसतो.त्याच्या चेहऱ्यावर सदाचं हंसू असतं आणि वर्गात चांगला शिस्तीत वागतो असं त्याची टिचर सांगते.अभ्यास लक्ष देवून करतो.आमच्या घरी येणारे त्याला बघून म्हणतात खूपच सुखावलेला दिसतो.
मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मनात येतं,आणि आश्चर्य वाटतं की हे असं त्यावेळचं आईविना पोरकं मुल असं कसंबदललं.त्यासाठी काही डॉक्टरी उपचार,मानसशास्त्रज्ञ किंवा काही औषोध उपचार करावे लागले नाहित.आम्हाला आशा गोष्टीवर त्याच्यासाठी काडीचा पण पैसा खर्च करावा लागला नाही.
फक्त प्रेम,अगदी सिम्पल,सरळपणे देवू केलेलं प्रेम होतं.सुरवातीपासूनचं ते प्रेम होतं.त्यात निव्वळ माणुसकी,काळजी,संरक्षणाची खात्री,आणि एक विश्वासाची हमी होती.
प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishans@gmail.com

Saturday, June 21, 2008

करिन मी तुजवर प्रीति

छोट्या छोट्या रात्री
होत जातात लांब लांब
धावत पळत जाणाऱ्या झोपेला
सांगू कसे मी जरा थांब थांब

मनात माझ्या बेचैनी
प्रतिक्षा माझ्या नयनी
होईल जेव्हा अशी स्थिती
करिन मी तुजवर प्रीति

भोळा खूळा अशी माझी महती
नको विचारू मज इच्छा कोणती
घट्ट धरूनी मी तुला मिठ्ठीत
वाटे मला मी वसतो स्वर्गात

फुलासम खुलुनी मन देई सुगंध
स्पर्षूनी तुझ्या कायेला होई ते धुंद
निष्काम होवूनी सोडिल ते दोस्ति
होईल जेव्हा अशी स्थिती
करिन मी तुजवर प्रीति

झेप घेई मन आकाशी पक्षि होवूनी
स्वप्नी शोधे मंझिल घिरट्या घेवूनी
स्वप्ने स्वप्नेच असली जरी
होतात ती खरी कधितरी

डोळे राहूनी उघडे पाहू लागती स्वप्ने
करिती प्रतिक्षा होईल का कुणीतरी अपुले
हताश होवूनी नजरेत दिसेल सुस्ति
होईल जेव्हा अशी स्थिती
करिन मी तुजवर प्रीति

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, June 19, 2008

दुःख ही न थांबणारी क्रिया आहे.

“ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात”

आज प्रो.देसाई तिच्या भाचीला घेवून तळ्यावर आले होते.माझी ओळख करून देताना मला म्हणाले,
“ही वृंदा करंदीकर.ही कॉलेजात फिलॉसॉफीची प्राध्यापिका आहे.”
तिचा विषय़ लक्षात घेवून मी तिला म्हणालो,
“वृंदा, मला एक तू सांग त्या दिवशी माझं आणि प्रो.देसायांच “दुःखात सुद्धा आनंदाची छटा असूं शकते” ह्या विषयावर चर्चा झाली होती.त्यावर प्रो.देसाई मला म्हणाले की,
” वृंदाने मला एक कल्पित गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली होती.ती मला जशास तशी आता आठवत नाही.पण पुढल्या आठवड्यात ती आमच्या घरी येणार आहे तिलाच तुम्ही ह्या विषयावर बोलायला सांगा.ती तुम्हाला ती गोष्टही सांगिल आणि ह्या विषयावर आनंदाने आणि विस्ताराने बोलेल.”

त्याचा संदर्भ देवून मी वृंदाला म्हणालो,
“तुम्ही दोघेही प्रोफेसर असल्याने तुमची विचार करण्याची पातळी थोडी वरची आहे तेव्हा मला जरा विस्तारानेच सांग”
हे ऐकून वृंदा म्हणाली,
“दुःखाला उंची माहित नसते ना खोली.ती एक प्रकारची अंतरातली योग्य भावना आहे.योग्य हा शब्द त्या शब्दाच्या अर्थाच्या अनुषंगाने घेतला गेला पाहिजे.
कदाचित कुणी म्हणेल की,
“दुःखाची भावना असणं योग्य आहे असं म्हणणं म्हणजे शुद्ध मानसिक हतबलता असावी.”
पण ज्या काहीना दुःखाचा अनुभव आला आहे त्यानाच त्या भावनेच्या योग्य-अयोग्यतेचं महत्व समजणार. जवळचं माणूस गेल्याने नाजूक मनस्थिती असताना धक्का बसवू देणारं दुःख, हे योग्य दुःख आहे असं म्हटलं पाहिजे.
वृंदा पुढे म्हणते,
“अलीकडेच एक विख्यात व्यक्ति जे म्हणाली ते ऐकल्यावर माझ्या म्हणण्याला थोडी पुष्टी येते.ते त्या व्यक्तिचं म्हणणं खोलवर जावून विचारात घ्यायला हवं.”
ती व्यक्ती म्हणते,
” मी आता आपल्या मनाला कसं वाटून घ्यायचं ते शिकलो.जे काही वाटत असेल तसंच वाटून घ्यायचं. मग त्याच्या मागे कसल्याही भावना असल्यातरी. एव्हडंच की त्याला विरोध करायचा नाही. जे लोक सांगतात की ज्याना भावना वशच करीत नाही ते असं सांगून स्वतःशीच प्रामाणिक राहून बोलत नाहीत.”

भावनेशी जागृत असणं,म्हणजेच त्या वेळी वाटणाऱ्या भावनेशी जीवंत असणं,आणि ती भावना समजावून घेणं. दुःख,मानसिक धक्का किंवा दुःखावेग हे पण भावनेचेच प्रकार आहेत. ते प्रकार मनात आहेत असा भास होत असतो,ते मनात राहतात आणि मनातून निघूनही जातात.
एका विशीष्ट प्रकारे मनाला लावून घेणं- केवळ तसं लावून घेणं हे इतराना बरं वाटावं म्हणून जर असेल- तर अशा प्रकारच्या वागण्याने माझ्या मनावर खूप मोठा पगडा येतो. म्हणून मला जसं वाटतं तसंच वाटून घेण्याचा माझा प्रयत्न असतो.त्यामुळे माझ्या आणि इतरांच्या विचार-स्वातंत्र्याचा परिणाम माणसाच्या भावनेविषयी विचार केल्यावर तो परिणाम कसा असू शकतो ह्याच नीट आकलन व्हायला मदत होते.
असं एकदा का असल्या पगड्या पासून निराळं राहण्याचं स्वातंत्र्य घेतलं की आपल्या मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो, आणि दुःख होत असताना त्या दुःखाचीच ही दुसरी बाजू असावी असं वाटतं. हे गणीत असंच काहिसं जुळतं.”
हे त्या व्यक्तिचं म्हणणं सांगून झाल्यावर वृंदा पुढे म्हणाली,
अशीच आणखीन एक दुसरी व्यक्ति, तिच्यावर आलेल्या प्रसंगाची चर्चा करीत असताना त्या प्रसंगामुळे झालेल्या दुःखावर पडदा टाकण्याचा सल्ला मिळाल्यावर म्हणते,
“दुःखावर पडदा टाकण्याचा सल्ला असुंच शकत नाही.कारण दुःख ही न थांबणारी क्रिया आहे. ज्या व्यक्तिवर आपण प्रेम करतो ती व्यक्ति निर्वतल्याने, झालेल्या दुःखाला खंड आणूच शकत नाही कारण त्या व्यक्तिवर आपण सतत प्रेम करीत असतो-त्या व्यक्तिवर प्रेम करण्याची आपली क्रिया-सतत चालूच असते.”
हे सांगून झाल्यावर वृंदा म्हणते,
” ह्या ही व्यक्तीचं म्हणणं ऐकून माझ्याच म्हणण्याला परत दुजोरा मिळाल्या सारखं वाटतं.
आपल्या भावना सहन करताना त्या कितीही क्लेशदायी अथवा आनंददायी असल्या तरी त्या भावनां जागृत ठेवून आपल्यावर आणि इतरांवर विश्वास ठेवून राहण्याचं स्वातंत्र्य घेता आलं पाहिजे.
तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल आणि वाईटही वाटेल की माझ्या मुलाच्या आकस्मिक निधनाने मी पुर्ण एकाकी पडले.मानसिक उपाय करणाऱ्याना मला
उपाय द्यायचे होते,आणि माझ्या मित्रमंडळीना मी ती घटना निमूट स्विकारून आगे बढो असा सल्ला द्यायचा होता.
माझ्या बॉसला तर मी रोजच्या कामाच्याच दृष्टीने दुषपरिणाम न होता काम करीत रहावं असं अपेक्षीत होतं.खरं तर मी पुर्ण वेडी झाली होते.मी मनाने पुर्ण खचली होते.

अशा परिस्थितीत माझ्या एका मैत्रिणीने मला एका मानसिक उपचार करणाऱ्या आश्रमात नेलं.खरं म्हणजे मला त्या मैत्रिणीने आमंत्रण दिलं नव्हतं.मीच तिची मदत मागितली होती.त्या आश्रमातल्या विद्वान व्यक्तिने
मला खूपच चांगला सल्ला दिला.
तो मला म्हणाला,
“ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता,त्यांचा सन्मान करणं जरूरीचं आहे.त्यांच स्मरण करणं जरूरीचं आहे.त्यांच्याशी संवादात राहणं जरूरी आहे.त्याने तुमच्याशी जवळीक करणं जरूरीचं आहे.”
ह्या शब्दानी माझ्या उभ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.माझं आयुष्य वाचवलं गेलं.मी पुढचा मार्ग काटू शकले.मी माझ्या मुलाला स्मरणात आणू शकले.त्या स्मरणाचा सन्मान करू शकले.
सखोल विचार करण्याचा,अर्थपुर्ण विचार करण्याचा,
भासवून घेण्याचा,मार्ग मला मिळाला.मी खूपच उपकृत झाले.
प्रेम आणि आनंदाबरोबर दुःख सुद्धा आपल्याला जवळ आणतं. न भिता, धरसोडपणा न करता, भावनेशी जागृत राहणं म्हणजेच आपलं आपण होणं.आपल्या अंगातून ह्या योग्य भावना वाहू देणं म्हणजेच ह्या क्षणाला आपण आपलं अस्थित्व जाणणं. ह्या अस्थित्वाच्या सत्याशी प्रातारणा न केल्याने माझी मी म्हणून जगू शकले.
माझ्या मनात विचार येवू लागला आहे की ह्या एकवीसाव्या शतकातलं दुःखाचं आणि अघटीत घटनेचं सांवट जे सर्वांवर आलं आहे ते एखाद्या बाटलीत लोकांच्या भावना जबरदस्तीने इतकी वर्ष दाबून कोंबून ठेवलेल्याचा परिणाम असावा.
मला एका प्रख्यात लेखकाच्या काल्पनीक गोष्टीची आठवण येते.
ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात.दुःखातही तिला आनंद मिळतो,असा ह्या गोष्टीतला आशय आहे.

समाधानाची गोष्ट अशी की जेव्हा आपण दुःखी मनस्थितीत असतो,त्यावेळी सुंदरता आणि आनंदही आपल्या बरोबर असतो तसंच दुःख आणि पिडा ह्यांचही अस्थित्व आपल्या बरोबर असतं. असं समजून राहिल्याने, अशा गोष्टी मनात जागृत ठेवल्यामुळे अंतिम शांतीकडे जावून पोहचण्याचं हे एक पाऊल होणार आहे असं वाटूं लागतं.
हा जागृतीचा मार्ग कधीच संपणारा नसतो.खरोखरीचं दुःख आणि पिडा होते त्याचं खरेपण प्रामाणिकपणे सांभाळून ठेवल्यास,त्या पासून मनाला झालेली जखम लवकर बरी व्ह्यायला पुर्णपणे मनाच्या स्वाधिन व्हायची जरूरी असते आणि तसं केल्याने खरा अर्थ समजण्यासाठी आपलं मन आपल्याला वरच्या पातळीवर आणून ठेवतं.”
हे सर्व एकून मी वृंदाला म्हणालो,
“वृंदा खरंच तू ग्रेट आहेस.तुझं हे चिंतन ऐकून मला पण ह्या वयात काही तरी शिकल्या सारखं वाटलं. प्रो.देसाई ज्या अर्थी मला तुझा विचार ऐकायला शिफारस करतात त्याच वेळी मी समजून गेलो होतो,इथे काही तरी”ग्यानबाची मेख आहे”
“कसचं कसचं”
म्हणत वृंदा गालातल्या गालात हंसली,आणि आम्ही घरी जाययला निघालो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com