Thursday, July 31, 2008

यश आणि अपयश

" आता तिने तिची भुमिका बदलली.तिने अपयश घेण्याचं रिस्क घेतलं.लोकांकडून नाराजी घेतली.कारण तिच्या आत्म्याला
शांतीची गरज होती. "

प्रो.देसायांची सर्वात धाकटी मुलगी सध्या त्यांच्याकडे राहायला आली होती.त्यांच्या धाकट्या नातीला घेऊन ते त्यादिवशी शाळेत घेऊन जाताना मी दुरून पाहिलं होतं.म्हटलं संध्याकाळी तळ्यावर भेटतील त्यावेळी चौकशी करूं.
भेटल्यावर मला म्हणाले,
" थोडे दिवस मुलगी माहेरपणाला आली आहे.आमच्या नातीला तोपर्यंत शाळेत बसवू या.
गेल्या आठवड्यापासून ती किंडरगार्टन मधे जाऊ लागली. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मी तिला शुभेच्छा दिल्या.
तेव्हा मी खोटं बोलत होतो.खरं म्हणजे मी तिला अयशस्वी हो अशीच इच्छा मनात करीत होतो.अपयशात काय क्षमता असते
त्यावर माझा विश्वास आहे.

यशस्वी होणं म्हणजे कंटाळवाणी प्रकार आहे.यश सिद्ध करून दाखवतं की तुम्ही असं काही करणार आहात की जे तुम्हाला माहित आहे की तुम्ही ते करूं शकता,किंवा काही तरी पहिल्यावेळी नचुकता करणार आहात,आणि जे कदाचित बहूचर्चीत यश होणार असावं.
पहिल्याचवेळी मिळालेलं यश हा एक नशिबाचा भाग असतो.पण पहिल्यावेळचं अपयश मात्र अपेक्षीत असतं.आणि ते स्वाभावीक असावं.

अपयशातून आपण शिकतो.एक म्हण आहे की ती चांगली सुग्रण की जिने बरीच घरची भांडी फोडली असावीत. तुम्ही जर का
स्वयंपाक घरात जास्त वेळ घालवलात तरच कदाचित तुम्हाला चांगलं शिजवायला येत असावं.
मला एकदा गंमत म्हणून एका स्वयंपाकी समुहा बरोबर उशिरा जेवण घेण्याची संधी मिळाली होती.कुणाला किती स्वयंपाक
करताना जळलं किंवा कुणाचे हात किंवा बोटं किती ठिकाणी कातरली ह्याचीच जेवण करताना त्यांची बातचीत होत होती.त्यामुळे स्वयंपाक करण्याच्या प्रोसेस मधे अपघाताच्या अपयशाने स्वयंपाकात किती क्रेडिबिलिटी मिळते ह्याच मोजमाप होत होतं.

मी कॉलेजमधे प्रोफेसर होण्याआधी वर्तमानपत्रात लेख लिहित होतो. प्रत्येक आठवड्यातला एखादा लेख त्या आठवड्यातला इतर लेखाच्या तुलनेत सर्वात कमी महत्वाचा निघावा ह्याची मला जाणीव असायची.एखादा लेख कमी महत्वाचा व्हावा असं वाटून मी काही लिहित नव्हतो. रोज मी चांगला लेख लिहिण्याचा प्रयत्नात असायचो. तरी पण एक लेख दुसर्‍या लेखापेक्षा कमी दर्जाचा व्हायचा. आणि हे काही वेळां प्रकर्शानं व्हायचं.

कमी महत्वाचा लेख मला आवडू लागला.माझ्या यशस्वी लेखाबद्दल असं दिसून आलं की तो यशस्वी होण्यासाठी मी नेहमीच्या ट्रिक्स वापरत होतो. उदा.लोकांच्या भावनेचा फायदा घेऊन त्यांना काळजाला भिडेल असं काहीतरी निरनीराळ्या तर्‍हेने लिहायचं. किंवा एखाद्दा गाण्यात कसं तेच शब्द निरनीराळ्या आवडणार्‍या चालीत गातात तसंच तेच शब्द निरनीराळ्या पद्धतीत लिहायचो. बरेच वेळा माझा न आवडलेला लेख लिहिताना मी आता पर्यंत परिचीत असलेल्या ट्रिक्स न वापरता लिहायचो. नव्हे तर नवी ट्रिक वापरल्यावर मला खात्री पण नसायची की ही ट्रिक उपयोगी होईल की नाही.

माझी मधली मुलगी नाटकात काम करायची.तिच भुमिका ती बरेच वेळा करायची.आणि त्यात ती चांगली यशस्वी पण झाली
होती.त्या भुमिकेतून बदल करण्याची तिला आवश्यकता नव्हती.तरीपण तिने तसं केलं.ती म्हणाली मला ह्या भुमिकेतून नवं
असं काही शिकायला मिळत नव्हतं.आणि त्यामुळे ती कंटाळली होती.आणि असं कंटाळून काम करून तिला स्ट्रेस यायला
लागला.त्यामुळे त्यात काही अर्थ राहिला नव्हता.
आता तिने तिची भुमिका बदलली.तिने अपयश घेण्याचं रिस्क घेतलं.लोकांकडून नाराजी घेतली.कारण तिच्या आत्म्याला शांतीची गरज होती.

माझी नात त्याबाबतीत खूपच दर्जा ठेऊन काम करणार्‍यापैकी होती.कदाचित ह्या बाबतीत जरा जादाच होती.ती अपयशाने खूपच नाराज व्हायची.मग मला तिची समजूत घालावी लागायची. परंतु मी तिला आठवण करून द्दायचो की त्यातून काय ती शिकली ,आणि पुढच्या खेपेला ती आणखी चांगलं कसं करू ही शकेल.मी तिला निश्चितच अपयश कसं चांगल असत हे
सांगण्याच्या भानगडीत पडायला मागत नव्हतो. कारण एव्हड्या लहानपणी तसा धडा शिकायचं तिचं वय नव्हतं. पण मी
तिला नक्कीच सांगू शकलो की अपयशामुळे जगबुडती तरी येणार नाही. खरंच,मी तर म्हणेन नशिबाने ती सुरवातच असेल."

डिसेंबरचे दिवस असल्याने काळोख जरा लवकरच व्हायचा त्यामुळे भाऊसाहेबांशी जास्त चरवीचरण नकरता मी निरोप घेतला.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, July 30, 2008

का झाला कठिण मार्ग जीवनाचा

का झाला कठिण मार्ग जीवनाचा
जवळी असूनी येई विचार दूर जाण्याचा

असे नसावे की जीवनी प्रेम नसावे
किंतू जीवनात कसलेही जीवन नसावे
का सुचले जावे मनी निर्णय घेण्याचा
जवळी असूनी येई विचार दूर जाण्याचा

मिळवूनी तुला रे सजणा जाशी तू रूसूनी
खूष मी माझ्या मनी जाशी मला तू रडवूनी
पापण्यातील स्वप्न देईल का मंत्र जगण्याचा
का झाला कठिण मार्ग जीवनाचा
जवळी असूनी येई विचार दूर जाण्याचा



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, July 28, 2008

नव्हतो ग! मी सजणे असा

नव्हतो ग! मी सजणे असा
केला बदनाम इतरानी जसा
दोष तुही दिलास थोडासा
गमविला मी जगाचा भरवंसा
नव्हतो ग! मी सजणे असा

असेल खरे जे दिसले नयनाला
सजणे! धोका मिळाला नजरेला
किती किती म्हणूनी वाद घातला
होता ग! हा इतरांचा दुष्ट फैसला
केला बदनाम इतरानी जसा
नव्हतो ग! मी सजणे तसा

ठोकरूनी तू माझ्या मनाला
सजणे! तोडून गेलीस प्रीतिला
इतर सगळे नाचले ह्या दिवाळीला
नव्हतो ग! मी सजणे असा
केला बदनाम इतरानी जसा

सजणे! नको विचारू ह्या दुखापतीला
दोष जखमेचा तुझ्याच आहे हाताला
नको विचारू कसले दुःख मनाला
दिला ग! इतरानी छ्ळवाद अपुल्याला
केला बदनाम इतरानी जसा
नव्हतो ग! मी सजणे तसा

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

मानसिक भितीने ग्रासलेला गुरुनाथ

“बाहेर पडल्यावर वाईट गोष्टीना पण तोंड द्यावं लागतं.पण माझा विश्वास आहे की न जाण्याने याचाही पेक्षा वाईट गोष्टीना सामोरं जावं लागतं”

मी एकदा माझी कार रिपेअर करण्यासाठी एका कारखान्यात टाकली होती.मोटर कारखान्याच्या मालकाने मला एक भली मोठी लिस्ट दिली आणि म्हणाला,
“ह्या लिस्ट मधले पार्टस तुम्ही अमूक अमूक दुकानातून आणा.हे पार्टस स्पेशल आहेत आणि आम्ही ते ठेवत नाही.”
ती लिस्ट घेवून मी त्या दुकानाच्या पत्त्यावर दुकानात गेलो.दुकानाच्या कॅबिन मधून आतून येणारा आवाज जरा परिचयाचा वाटला.म्हणून कौन्टरवरच्या त्या माणसाकडे जरा चौकशी केली की ते कोण बोलत आहेत.तो म्हणाला,
“ते आमचे मालक गुरुनाथ आजगावकर”
माझ्या चटकन लक्षात आलं की हा आपला आजगावचा गुरू तर नसेल, म्हणून मी माझं कार्ड देऊन त्या माणसाला सांगितलं की,
” एव्हडं माझं कार्ड देऊन ये तुझ्या मालकाला आणि मला भेटायचं आहे म्हणून सांग.”
लगेचंच ते कार्ड वाचून तो मालक बाहेर आला आणि मला बघून त्याने मला ओळखलं.मला त्याच्या कॅबिनमधे हात धरून घेऊन गेला.लंचची वेळ होती मला म्हणाला,
“मस्तपैकी मासे आणि चिकनचं जेवण अनंताश्रमातून मागवतो आपण जेवूया आणि बोलूया.”
इकडचे तिकडचे विषय झाल्यावर मी जुन्या आठवणी काढून त्याच्याशी बोलायला सुरवात केली.बरीच वर्ष झाली मी त्याला भेटलो नव्हतो.पण लहानपणाच्या त्याच्या काही विक्षीप्त संवयी मी विसरलो नव्हतो.गुरू बरेच वेळा घराबाहेर पडतच नव्हता.त्याला नेहमी कसली तरी भिती वाटायची.हे लक्षात येऊन मी त्याला म्हणालो,
“तू त्या संवयीतून बाहेर कसा पडलास?”
गुरू पण अगदी अंतःकरणा पासून माझ्याशी बोलू लागला,

“मला नंतर असं वाटू लागलंय,की संधी येण्याची वाट न पहाता ती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत रहावं.
हे शिकायला मिळालं मला माझ्या पुर्वीच्या भित,भित राहण्याच्या वृत्तिने.
मी अगदी लहान असताना सर्व गोष्टीची मला नेहमी भितीच वाटायची.उंच जिन्याच्या वर जाऊन चढून बसणं,छोट्या,छोट्या झुरळांना पहाणं वगैरे.आठ वर्षाचा असताना,मला माझ्या मोठ्या भावाबरोबर सार्वजनीक गणपति पहाण्यासाठी सुद्धा जायला भिती वाटायची.एका वर्षी एका मोठ्या सार्वजनीक गणपतिच्या विसर्जनाच्यावेळी माझा मोठा भाऊ अगदी समुद्रावर गेला होता.पण मी मात्र घरीच बसून होतो. मला भिती वाटायची की मी कदाचित त्या गर्दीत हरवून जाईन,कदाचित दंगा होऊन पोलिसांचा लाठिमार होईल,मलाच पकडतील वगैरे.
विसर्जनाच्या मजेचा आनंद घेण्याऐवजी मी माझा आत्मविश्वास गमवून बसलो होतो.

ह्या भितीमुळे मी सुरक्षित मार्ग जास्त अंगिकारला तो म्हणजे माझं शाळेत जाण्याचा मार्ग,त्यानंतर पुढे टेकनिकल संस्थेमधे पुढचं शिक्षण घेण्याचा मार्ग आणि त्यानंतर एका मोटार तयार करण्याच्या कारखान्यात मिळालेली नोकरी करण्याचा मार्ग हे सर्व मार्ग मला जरा सुरक्षित वाटत.सहा एक वर्ष या व्यवसायात राहून नंतर कंटाळा येऊ लागला.त्यातून माझी एक नविन भिती जन्माला आली. कारखानातल्या इतर कामगारासारखं आपण पण थकलेला,करपलेला आणि वेळेपूर्वीच म्हातरपण आलेला होऊ की काय असं सारखं वाटू लागलं.

मी ह्यातून बाहेर पडायचं ठरवलं.नाहितर पुन्हा जिन्याच्या वर चढून जाण्याच्या भितीची पुन्हा आठवण आणून खालच्याच पायरीवर बसून राहण्याची पाळी आणावी लागेल,गणपतिच्या विसर्जनाला जाण्याची भिती पुन्हा येईल.
त्यासाठी मी एक मोटरपार्टस विकण्याचं दुकान काढायाचं ठरवलं.त्याकरता यशस्वी बिझीनेस कसा करावा यावर पुस्तकं वाचायला सुरवात केली.हे करत असताना मला आयुष्यात कोणत्या अतिदुःखद प्रसंगाला तोंड द्दावं लागलं याचे विचार मनात येऊ लागले.आपल्या अठेठेचाळीस वर्षावर माझी आई अतिदुर्धर आजाराने मला कशी सोडून गेली हा प्रसंग आठवून त्या प्रसंगाची आणि माझ्या नव्या बिझिनेसमधे मी ठोकर खाल्ली तर त्या प्रसंगाची मी तुलना करून किती दुःख होईल याचा विचार करू लागलो.
हजार रुपये खिशात ठेऊन मी एका घाऊक मोटरपार्टस विकणार्‍या दुकानाच्या मालकाला फोन करून पाहिलं.माझं आश्चर्य म्हणजे त्याने मला सहकार्य द्दायचं कबूल केलं.आणि तिथून सुरवात झाली.

धंद्याच्या प्रगतीचा जिना चढून जाणं तितकं सोपं नव्हतं.एकदा मी चांगली मोठी ऑर्डर घालवून बसलो.जुनी भिती पुन्हा प्रवेश करू लागली.पण माझ्या आईच्या प्रसंगाची आठवण आणि त्या कारखान्यातल्या नोकरीची आठवण काढून त्या प्रगतीच्या जिनाच्या पायर्‍यावर चढून जाण्याची मनस्थिती आणू शकलो.
काही मिळवून दाखवणं हे काही यश मिळवणं असं नाही.प्रत्येक वेळी मी भितीच्या चकरातून बाहेर पडत असे त्या त्या वेळी जिंको न जिंको मी यशस्वी होत असे.इकडे तिकडे थोडीफर नुकसानी होतही असेल पण म्हणून मी नव्वद वर्षाच्या वृद्धाला शेवटी वाटावं की आपण तसं काहीच आयुष्यात केलं नाही म्हणून त्याने हताश व्हायच्या स्थितीला जावं तसा मी गेलो नाही.
बाहेर पडल्यावर वाईट गोष्टीना पण तोंड द्यावं लागतं.पण माझा विश्वास आहे की न जाण्याने याचाही पेक्षा वाईट गोष्टीना सामोरं जावं लागतं”

हे ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“मग आता तुझं कसं चाललं आहे?”
ह्या धंद्दावर तुझा चांगलाच जम बसलेला दिसतो मला.”
गुरूनाथ म्हणाला,
“आता मी पुर्वीचा राहिलो नाही.माझ्या वाचनात एक पुस्तक आलं,विषय होता,
“माणसाच्या अंगात उपजत कला असतात”
त्या पुस्तकात त्या कला एखाद्दाने कशा वापरायच्या- ज्या त्याला मुळात माहितही नसतील-ह्याची सुंदर माहिती दिली होती.ते पुस्तक वाचून मी माझं स्वतःचं आत्मपरिक्षण केलं.मला स्वतःला खूपच आत्मविश्वास वाढल्या सारखं वाटूं लागलं.आणि नंतर मी मागे वळून कधीच बघीतलं नाही.”
मला हवं असलेलं सामान गुरुनाथने त्याच्या नोकराच्याकरवी त्या कारखान्यात अगोदरच पाठवून दिलं होतं.आणि त्यामुळे मला त्याची ही कथा ऐकायला वेळ मिळाला.
त्याच्या दुकानातून बाहेर पडल्यावर माझ्या मनात विचार आला.की एखादी व्यक्ति करियर मधे वर यायला त्याला कोणतं कारण कारणीभूत होईल हे सांगणं कठिण आहे.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, July 25, 2008

कमकुवतपणा ही पण एक प्रकारची शक्तिच असते

“हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात आलं की हिनें आपल्या उद्देशाला किती वाहून घेतलं आहे.नवल नाही की ती मला म्हणाली “मला माझा जॉब आवडतो म्हणून.”

आमच्या बिल्डिंगच्या अगदी वरच्या माळ्यावर एक चतर्जी म्हणून बंगाली कुटुंब राहत होतं.राहत होतं म्हणण्याचं कारण बरेच वर्षानी ते आपलं घर सोडून कलकत्यात राहायला गेलं.पण इतकी वर्ष मुंबईत राहिल्याने त्यांच्या सर्व मुलाना मराठी अगदी अस्खलीत येत होतं.कदाचीत हे मुळचे बंगाली आहेत असं सांगणं पण जरा कठीण झालं असतं. त्यांच्या कुटुंबातली शंतनु आणि शर्मिला ही पहिल्यापासून स्मार्ट वाटायची.इकडच्या शाळेत सुद्धा त्यांचा वरचा नंबर असायचा.त्या पैकी शर्मिला जरा जास्त हुषार होती.पण कमनशिबाने तिला कॉलेज मधे त्यावर्षी चांगले मार्कस न मिळाल्याने तिचा मेडिकलला जाण्याचा चान्स हूकला.पण ती डगमगली नाही.तिला लोकांची सेवा करण्याचं प्रथम पासून वेड होतं.डॉक्टर नाही तर नाही निदान नर्स होऊन आपली इच्छा पुरी करायची तिने जिद्द ठेवली आणि कलकत्याच्या एका नावाजलेल्या नर्सिंग इनस्टीट्युट मधून चागलेमार्कस घेऊन उतीर्ण झाली.आणि नंतर खासगीत नर्सिंगचं कामं घेऊ लागली.
असाच मी एकदा ऑफिसच्या कामासाठी कलकत्याला गेलो असतां मला रस्त्यातच भेटली.मला आपल्या अपार्टमेंट मधे घेऊन गेली.जेवायचा आग्रह करीत होती पण मी काही जेवायला राहिलो नाही.पण म्हणालो चहाच्या कपावर आपण गप्पा मारूया.तुझं सेवावृत्तीचं काम कसं चाललंय असा मी तिला प्रश्न केल्यावर ती सांगू लागली,

“बर्‍याच अशा माझ्य मैत्रिणी अलिकडेच कॉलेज मधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडल्या आहेत.कोण ना कोण तरी मला एखाद दिवशी फोन करून आपल्या नविन जॉब बद्दल कुरकुर करून बोलत असते.सांगतात की त्यांच मन कसं रमत नाही त्या जॉबवर,त्याना हवं असलेलं काम कसं मिळत नाही. किंवा हव असलेलं यश त्यांना कसं मिळू शकत नाही. त्यांच भाषण ऐकून माझ मनोरंजन होत.मला वाटतं मैत्रिणी अशा साठीच असतात.

पण ह्या मुळे मला सुद्धा माझ्या कामाचा आढावा घेता येतो.मी नर्स असल्याने दोन मतिमंद असलेल्या बायकांची सेवा करण्याचं काम करते.बोलताना त्या ओरडून बोलतात.आणि कधी कधी संतापी होऊन त्याचे परिणाम न समजण्यासारखे वागतात.
स्वतः आंघोळ करू शकत नाहित.त्याना अन्न स्वतः शिजवता येत नाही.कधी कधी त्यांची वागणूक अशी असते की त्यानाएकदम हलता येत नसल्याने जाग्यावरून आरडाओरड करतात तर कधीकधी उठून एकदम मारायाला येतात.
रोज मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना हव्या असलेल्या कामात मदत करीत असते.आंघोळ घालणं,त्याना कपडे घालणं, त्याच्या साठी जेवण करून त्यांना भरवणं,त्यांना साफ करणं,त्याना बाथरूम मधे नेणं सकाळी त्या उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत हीसर्व कामं करावी लागतात.कधी कधी काही कारण नसतानाही -त्यांचे मी कपडे बदलत असताना- माझे केस उपटण्याचा प्रयत्न करतात.कधी कधी समोर ठवलेलं जेवण भिरकावून देतात.कधी कधी तर काही कारण नसतानाही अंगावर थुंकतात.

पण गंमत म्हणजे मला हा जॉब आवाडतो.मला माहित आहे की मी अजून तरूण असून मला खूप काही शिकायचं आहे. पण मी माणसात असलेल्या हतबलते वर विश्वास ठेवते. त्याचाच अर्थ असा होईल की आपल्याला दुसर्‍या माणसांची आवश्यकता आहे.
मला वाटतं असं काही जरूरीचं नाही की समाजाने ज्या गोष्टीला यशस्वी म्हटलं आहे त्याच गोष्टी यशस्वी आहेत. आपल्याला खरं काय हवं असतं की आपल्या सभोवताली जे लोक आहेत त्यानी भाग घेण्यात,हतबलांची उर्जितावस्था करण्यात,ऐकून घेण्यात,लक्ष देऊन आपली वेळ आणि उदिष्टे वापरली पाहिजेत.कुणी एखाद्दा मोठ्या कंपनीचा सि.ई.ओ असो किंवा एखादी पाच मुलांची आई असो.मला त्यात काहिही फरक पडत नाही.कुणीही परिस्थितीने संपुर्ण नसतो,त्या दृष्टीने काहीसा हतबलच असतो.एकमेकासाठीही तसाच असतो.

मी ज्या बायकांची सेवा करीत असते,त्यांच एक बरं आहे की त्यांच्या गरजा त्यानी पुर्णपणे विशद केल्या आहेत.कपडे घालायला ज्या ठिकाणी पांच मिनीटे घ्यावीत त्या ठिकाणी त्याना तासन तास लागतात.पण त्यांची ही कमतरता उदाहरण म्हणून ठिक आहे.तेवढं काही ते हतबल नसतात.त्यांच्या बरोबर राहून “कपडे काढा,कपडे घाला”हा उपदव्याप जरी दिसला तरी त्यांना त्यात काय पर्याय आहे ते दिसून येण्यात फायदा होतो.
जेव्हडे म्हणून माझे माहितीतले लोक आहेत त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसतं की त्याना जे काम जमत नाही ते पाहून त्यांनाच खूप लाजल्या सारखं होतं.त्याना ती एक कमतरता वाटते आणि जड अंतःकरण करून ते गोंधळलेले दिसतात. पण आमच्या ह्या पिढीत प्रचार केलेला असतो की यश संपादणं म्हणजेच तृप्ति मिळवणं आणि हे सतत आमच्या मेदूवर आघात केल्यासारखं केलेलं असतं.तसंच दुसरा आघात म्हणजे जर का तुम्ही स्वतःहून काम करू शकला नाही किंवा तुम्ही स्वतः तेव्हडे स्मार्ट नसाल किंवा तुम्ही स्वतः काम करायला समर्थ नसाल तर मग तुम्ही नालायक ठरता.
आता पर्यंत माझ्या जीवनात जे लक्षात ठेवण्यासारखे क्षण आले ते मी किती वेळां यशस्वी झालो हे नसून उलट ज्या ज्या वेळी मी माझ्याच मनात म्हणाले असेन
”मी मेले” ,”मला मदत करील का कुणी”
किंवा
“मला एखाद्दा मैत्रिणीची जरूरी आहे”
अशा प्रकारच्या क्षणाच्या वेळी मी माझीहून मला आधार घेते,मी माझ्याहून मला एक आकार आणण्याचा प्रयत्न करते, तेचक्षण जे मला मदतीची अपेक्षा करायला लावतात ते मला एक देणगी वाटू लागतात.
मला ह्या मतिमंद बायकांचे आभार मानले पाहिजेत. मदत करणं आणि मदतीची अपेक्षा पण करणं ह्यातला आनंद आम्हीशोधून काढला.मला वाटतं कधी कधी आमचा कमकुवतपणा ही पण आमची एक प्रकारची शक्तिच आहे.
हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात आलं की हिनें आपल्या उद्देशाला किती वाहून घेतलं आहे.नवल नाही की ती मला म्हणाली

“मला माझा जॉब आवडतो.”

तिची रजा घेऊन मी खाली उतरलो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॉलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, July 23, 2008

कुणी करील का प्रीति मजवरती

कसे मन जिंकतात लोक कुणाचे
कुणी देईल का मला धडे प्रीतिचे

कुणी करील का प्रीति मजवरती
देऊनी वचने करिल का ती पुरी
अशीच स्वप्ने ठेऊनी नयनी
भटकंती करीतो मी रानीवनी
काय म्हणावे ह्या नशिबाला
प्रीत देईना ती सुंदर बाला

कसे मन जिंकतात लोक कुणाचे
कुणी देईल का मला धडे प्रीतिचे

नसे पाहिला मी पाऊस नयनातून
नसे सोडिला मी हात हातातून
नेईल का कुणी मला त्याठिकाणी
भेटेल सुंदर बाला ज्याठिकाणी
काय म्हणावे ह्या नशिबाला
पत्ता देईना ती सुंदर बाला

कसे मन जिंकतात लोक कुणाचे
कुणी देईल का मला धडे प्रीतिचे


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, July 22, 2008

आमचे मित्र श्रीयुत “मी,माझं,मला”

“मला वाटतं आपण नेहमी एखाद्दा गोष्टी बद्दल, प्रश्न करावे,साशंक व्हावं,शोध करावा,पटकन विश्वास ठेऊ नये अशा वृत्तीचंअसावं.पटकन विश्वास ठेवायला किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला मी नेहमीच नकार देतो. “
हे गृहस्थ मला खूप दिवसानी दादरच्या टिळक पूलावर अचानक भेटले.त्यांच नाव जरी चटकन लक्षात आलं नाही तरी त्यांना आम्ही आमच्या पूर्वीच्या बिल्डिंगमधे राहत असताना आमचे शेजारी म्हणून टोपण नांवाने ओळखायचो.त्याना आम्ही गंमतीत
”मी,माझं,मला”
ह्या तिन शब्दानी संबोधायचो.
आणि अशा टोपण नांवाचं कारण म्हणजे त्यांची- स्वतःचे मनातले विचार सांगत असताना- एखादं तत्वज्ञान पण सांगूनजाण्याची वृत्ति.

मी फक्त त्यांना म्हणालो,
“कसं काय चाललं आहे?”
ते ऐकून मला म्हणाले,
“चला आपण खाली मामा काणेंच्या हॉटेल मधे बसू या थोडा वेळ”
मला चला म्हणावंच लागलं.
दोन प्लेट बटाटे वडे आणि दोन कप गरम गरम चहाची ऑर्डर देउन त्यानी सुरवातच केली सांगायला,
” मी अलीकडे आध्यात्मावर बरीच पुस्तकं वाचतोय.वय होत राहिलं की विचारांचा कल अशा गोष्टीवर जास्त जातो.आणि खरं खोटं माहिती करण्यासाठी विचाराला चालना मिळते.परत परत गंध उगाळून अर्थहीन झालेल्या वहिवाटीतल्या गोष्टी बद्दल-अशा गोष्टीवर सर्वानुमते विश्वास दाखविला गेला असल्याने- त्याबद्दल आपण खूप प्रामाणिक आहो असं दाखवायला जरा मलाकठीणच होतं.
आपण ज्या गोष्टीचं महत्व मानतो त्यावर आपला विश्वास जास्त असतो.
हे अपरंपार विश्व उंच आकाशात पाहिल्यावर जे डोळ्याचं पारणं फेडतं,ते निर्माण करणार्‍या त्या नजाणत्या आणि सर्वांवरसारखीच नजर ठेवणार्‍या अघात शक्तिवर माझा विश्वास आहे.
मला वाटतं आपण नेहमी एखाद्दा गोष्टी बद्दल, प्रश्न करावे,साशंक व्हावं,शोध करावा,पटकन विश्वास ठेऊ नये अशा वृत्तीचं असावं.पटकन विश्वास ठेवायला किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला मी नेहमीच नकार देतो. मनुष्याची उर्जितावस्था- उघड उघड प्रचारात असलेल्या गोष्टीवर सरळ सरळ गैरविश्वास दाखवून -नंतर त्याचा शोध घेण्यात वेळ खर्च केल्यावर होत असते. उच्च विचारसरणीच्या व्यक्तिं चिंतन करून,गुणगान करून,जगले आणि निर्वतले आणि असं करताना वेळोवेळी आलेल्या समाजातल्या समजूती हळू हळू पुढे ढकलत त्यांना पुर्णत्व आणण्याच्या प्रयत्नात राहिले.माझा एव्होल्युशन वरचा विश्वास वृद्धिंगत होत गेला.जीवन जगण्याचा मतितार्थ काय ते बुद्धिपुर्रसर विचार करून पृथ्वीवर हळू हळू होणार्‍या स्थित्यंतराच्या विचारसरणीची आणि दुसरं म्हणजे, एव्होल्युशन न मानणार्‍यांच्या विचारसरणीची सांगड घालून तो माझा विश्वास तसाच वाढत गेला.
चांगुलपणा,बुद्धिमत्ता,आणि नितीमत्ता ह्या गोष्टी आपल्यात कायम असाव्यात ह्यावर विश्वास ठेवल्याने मला आशावादी राहता येईल हे समजून बरं वाटतं.मी वरील गोष्टींचा बावू करीत नाही.पण त्यांचा विचार केल्याने मला जगायला उमेद येते.
ज्यामुळे लोक घाबरून स्पष्ट बोलण्या ऐवजी गोल गोल फिरून बोलतात त्याचा मला खूपच राग येतो.
परिस्थितीने पिचलेले,दाबून ठेवलेले,जे लोक असतात त्याना वर मान करायला होणार्‍या हालचाली बघून मला खूप समाधान होतं.
सर्व किल्मिष,जळमटां पासून मी पूर्ण अलिप्त झालो आहे, असं ढोंग करायला मला मुळीच आवडत नाही. पण ज्या ज्या वेळी मी मला ठराविक किल्मिषापासून नक्कीच दूर ठेवतो त्या त्या वेळी मला जगायला खूप उमेद येते.
सौंदर्य जरी शरिरात वास करीत असलं तरी ते आध्यात्माला धरून असावं असं मला वाटतं.देवाची स्तुतीपर गाणी ऐकून माझ्या अंतरात इतका आनंद होत नाही जितका मी छोटे छोटे पक्षी गुंजन करताना पाहून किंवा संध्याकाळची पांढर्‍या शुभ्र बगळ्यांची उडणारी आकाशातील रांग आणि त्यांच्या तोंडून येणारे ते गोड आवाज ऐकून होतो तेव्हडा. एखाद्दा मंदिरातून येणारा अगरबत्त्यांच्या सुवासापेक्षा संध्याकाळच्या हवेच्या झुळके बरोबर रात्रराणीच्या फुलांचा येणारा तो धुंद करणारा सुवास मला वेडा करतो.
सत्य कठोर असतं,आणि सर्वच सत्ये सुंदर नसतात.पण सौंदर्य हेच सत्य असते.कारण त्या सत्यात प्रेम सामावलेलं असतं.आणि प्रेमही सत्यात सामावलेलं असतं.जगातल्या उच्च कलाकृतींचं उद्दिष्ट सौंदर्य असतं.सौंदर्याचं सर्व ठिकाणी वास्तव्य असल्याने ते सर्वांना मोफत असतं.वैचारिक स्वातंत्र्यात आणि सौंदर्यात सत्य आणि चांगुलपणा सामावलेला पाहून माझाआत्मा आणि मन बळकट होतं.आणखी काय सांगू?”
हे सर्व ऐकून मी मनात म्हणालो,
कवी बोरकरांची ती कविता
“मी पण यांचे सरले हो!
जीवन ह्यांना कळले हो!”
असं ह्याचं अजून झालेलं दिसत नाही.होईल एक दिवस.
नुसतं कसं काय चाललं आहे? एव्हडंच विचारल्यावर हे त्यांच्या तोंडून केव्हडं ऐकावं लागलं,खरंच रे बाबा! आम्ही तुला”मी,माझं,मला”म्हणतो ते बरोबर आहे.”
“चला निघूया”
असं म्हणून मी पुढच्या कामाला गेलो.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com