Friday, November 7, 2008

दुःखाची देवाण-घेवाण.

श्रीधर त्या दिवशी आपल्या पत्नी बरोबर तळ्यावर फिरायला आलेला पाहून मला आनंद झाला.आणि त्या आनंदात भर पडण्याचं कारण त्याच्या अंगावर एक चिमुकलंस मुल पाहून झाला.
गेल्या वर्षी मी त्याच्या घरी गेलो होतो ते त्याचं सांत्वन करण्यासाठी.त्याला त्यावेळी लग्न होऊन वर्ष झालं होतं आणि नवीन पाहूण्याच्या आगमनाच्या बातमीने तो खूपच खूष झालेला दिसला होता.मुलाचा जन्म झाल्या नंतर ती त्याची खूषी जास्त दिवस टिकली नाही.दुरदैवानं ते मुल होता होताच गेलं.त्या धक्क्यातून सावरता सावरता हे दुसरं मुल पाहून मला सहाजिकच आनंद झाला.मला त्याच्या बरोबर त्या घटनेचा विषय काढायचा नव्हता.पण त्यानेच तो विषय काढला आणि म्हणाला,
“मला वाटतं,दुःख करणं बरं असतं.कधी कधी माणूस दुःख कसं करायाचं ते विसरून जातो.गेल्या वर्षी झालेल्या घटनेची आठवण येण्यासाठी तुम्हाला पाहून मला अवसर मिळाला.
माझी पत्नी सातव्या महिन्यावर गरोदर होती.आणि तिचा रक्तदाब एकाएकी उंचावला.तिची लिवर बंद पडायच्या मार्गावर आली.तेव्हा डॉक्टरनी तिचं सिझरीन करून बाळंतपण कराण्याचं ठरवलं त्यामुळे आईचे आणि बाळाचे प्राण वाचणार होते.
पहिल्यावेळी जेव्हा माला माझ्या मुलाचं दर्शन झालं,ते त्याला इनक्युबेटर मधे ठेवलं असताना.त्याच्या नाकापासूनच्या श्वास नळ्या नर्ससीस साफ करीत होत्या.एखादा पाण्यातला मासा पहातो तसं त्याने मला पहिल्यांदा पाहिलं असा मला भास झाला.मी अशी कमजोर चिमुकली बेबी पहिल्यांदाच पाहिली असेल.
पुढल्या दोन आठवड्यात माझ्या पत्निची प्रकृती बरीचशी स्थिर झाली होती.पण माझ्या मुलाची स्थिती खपूच बिघडली होती.अपरिपक्वपणे जन्मलेल्या बाळाची फुफ्फुसं कोपर्‍यातल्या त्या कोळ्याच्या जाळ्यासारखी नाजूक,कमजोर असतात आणखी हलक्याश्या दबावाखाली चक्काचूर होतात.क्षणभर मला वाटलं की मी त्याला माझ्याच छातीच्या आत ठॆवावं आणि माझी फुफ्फुसं देऊन श्वास घ्यायला मदत करावी.आम्ही त्या बाळाला आमच्या छातीजवळ घेतलं,त्याच्या इवल्याश्या कपाळ पट्टीवर हात ठेवला आणि शेवटी सगळ्या तारा आणि नळ्या दूर सरकवून त्याच्या हाताच्या मागे एकच बोट सरकवून हाताला आधार द्दायला यशस्वी झालो.
काही वेळाने त्याची फुफ्फुसं निकामी झाली आणि आम्हाला तो सोडून गेला.तो कधीच रडला नाही.मी आणि माझ्या पत्नीने दोघानी त्याला जवळ घेतलं, त्याला आंघोळ घातली,त्याचे केस पुसले,त्याला इवलेसे कपडे घातले आणि मग तो त्याच्या शेवटच्या प्रवासाला निघून गेला.एक देवदूत येऊन त्याने आमच्या मुलाच्या सभोवती हात घालून त्याला उचलून घेऊन जणू एखादं सोन्याचं नाणं खिशात ठेवतात तसंच ठेवलं असं माझ्या मनात आलं.त्यावेळी तुम्ही माझ्या घरी आला होता ते मला आठवलं.
जसे दिवसा मागून दिवस जाऊ लागतात,तसं तुम्ही डोळे मिटून तुमच्या दुःखाला एक एका बोटातून निसटू देऊन,अपरिमीत झालेली हानी तुमच्याच आत प्रस्थापीत करायला बघता.तुम्ही आणि तुमचं दुःख ह्या मधली ही देवाण घेवाण म्हटली पाहिजे.मनातल्या तणावाचा पूढे मागे होणारा हा एक झोका समजला पाहिजे.एखादी होडी पालथी होवून पाण्यात डुबून जावी असं जीवन वाटतं.सरते शेवटी तुमचं दुःख तुम्हाला स्थीर करतं,आणि आलेल्या वाईट परिस्थितीत स्थैर्य निर्माण करतं.
मी एक चांगला पति आहे.तसाच चांगला बाप आणि चांगला माणूस म्हणून माझ्या हानीकडे मी पहातो.मी दयाशिल,आणि सहानुभूती ठेवणारा आणि जरूरी प्रमाणे गोष्ट करणारा आहे.आमचं लग्न नव्याने रुपाला आलं.आमच्या संबंधात असलेली घाण मुलाच्या मरणाच्या भट्टीत जळून गेली.आपल्या मुलाजवळ त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्याच्या सहवासात राहायला मिळणारं भाग्य थोड्याच भाग्यवान लोकांच्या नशिबात असतं.आणि माझा मुलगा त्याच्यावर प्रेम करणार्‍यांच्या बाहूपाशात राहून मग गेला.
आता दहा महिन्यापूर्वी माझ्या पत्निने एका सुदृढ मुलीला जन्म दिला.आणि माझ्या मुलाच्या जाण्याने झालेल्या हानीची भरपाई माझ्या मुलीच्या जन्माच्या आनंदाने भरून आली.कारण आता आमच्याकडे काय राहिलं आहे त्याची आम्हाला जाणीव झाली.देवदूताने आपले दोनही हात फैलावले आहेत.जेव्हा माझी मुलगी माझ्याकडे पहिल्यांदा पाहू लागली तेव्हा मी तिला जवळ घेऊन सुखावलो.आता मी खूष आहे.
माझी पत्नीपण आनंदात असते.त्यामुळेच मी सुरवातीला म्हणालो की मला वाटतं,दुःख करणं बरं असतं.कधी कधी माणूस दुःख कसं करायाचं ते विसरून जातो.”
मला त्याचं हे सर्व बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं.विषय बदलण्यासाठी मी लगेचच त्याला विचारलं ह्या मुलीचं नांव काय तू ठेवलंस.तो समजायचा ते समजून गेला.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gamil.com

Wednesday, November 5, 2008

तनुलिचं गद्य,पद्य

तनुलीचे आजीआजोबा जेव्हा परत जायला निघाले त्यावेळी तनुली आपल्या आईबाबाबरोबर त्यांना पोहचवायला गेली होती. त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की हे आता परत येणार नाहीत,त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून नंतर ती मनांत म्हणाली

का असे गेलात तुम्ही
ना बोलता ना सांगता
सहवासाच्या संगतीची
हिच का हो वाच्यता?

नंतर घरी अल्यावर आईबाबांचे बोलणे तिने ऐकले.

आईबाबा आले घरी
म्हणती एकमेकामधे
ठेऊया हिला उद्या डेकेअरमधे

तनुली रात्री झोपली नाही.आजीआजोबांची तिला सतत आठवण येत होती.

झोप येई ना मला
वाटे आईला मज भूक लागली
जवळ घेऊनी देई दुदु मला
कसे सांगू मी तिला
येई आठवण त्यांची मला

दुसर्‍या दिवशी डेकेअरमधे टॉम,जेरी,क्याथरीन आणि सेरा म्हणाली तिला
” रडूं नकोस अशी, येतील तुझी आईबाबा संध्याकाळी.”
मी मनात म्हणाले
“कसं सांगू मी त्याना की,आईबाबांचे पण आईबाबा असतात,ते आता कसे परत येणार?”

समजाविले मला आईने रात्री
रडूं नकोस तूं त्याच्यासाठी
येतील ते पुढच्या वर्षी
आहे मला त्याची खात्री

हे एकून तनुलीला बरं वाटलं.ती आईला म्हणाली.

लाविला मी त्यांना लळा
रडुन सुकला माझा गळा
असतील ते तिथे बेचैन
जातील हे ही दिवस झटकन
होईन मी तोवरी मोठी पटकन

लुडुलुडु चालण्या एव्हडी
गुलुगुलु बोलण्या एव्हडी
घेतील ते मज कमरेवरती
सांगिन मी मग त्यांना सत्वरी
“का असे गेलात तुम्ही
ना बोलता ना सांगता
सहवासाच्या संगतीची
हिच का हो वाच्यता?”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Monday, November 3, 2008

बार-ऍट-लॉ

त्यादवशी मी मुंबईच्या चौपाटीवर अमळंसा फिरायला गेलो होतो.सूर्य अस्थाला जाण्याची वेळ आली होती.
सूर्यास्त पहायला मला खूपच आवडतं.तिथे ठेवलेल्या एका बाकावर बसायला गेलो.आणि त्याच बाकावर आणखी एक बसलेली व्यक्ती माझ्या बरोबर जणू जूनी ओळख आहे असं दाखवून माझ्याशी हंसली.मी पण हंसलो.मला खरंच त्या गृहस्थाला ओळखता आलं नाही.
“अहो मी,समीर शिरवईकर.गोव्याला आपण शेजारी शेजारी राहयचो.तुम्ही तुमच्या वहिनीच्या माहेरी लहानपणी सूट्टीत राहायला यायचा.कित्येक वर्षानी आपली भेट झाली.”
मी त्याना म्हाणालो,
“तुम्ही मला पटकन इतक्या वर्षानी कसं ओळखलत?”
“तुमच्या गालावरची खळी कुठे लपणार.तुम्ही माझ्या जवळ बसताना हंसलात त्याचवेळी मला लक्षात आलं.
की तुम्ही सामंतच असणार.”
“मग तुम्ही काय करता?”
असा पुढचा प्रश्न मी त्याना केला.
“मी कॉलेजात कायदा शिकवतो.आता काळोख बराच झालाय.मी चर्चगेट स्टेशन समोरच राहतो.चला आपण माझ्या घरीच जांऊया.”
नंतर आम्ही दोघे चालत चालत त्यांच्या घरी गेलो.
मला समीर म्हणाला,
“सध्या माझी बायको आणि मुलगी गोव्याला गेली आहेत.आता जेवायची वेळ झाली आहे आपण गिरगावतल्या अनंताश्रमातून डबा मागवूया.”
मला कुणाचा आग्रह टाळता येत नाही.मी ओके म्हणालो.
त्याने त्याच्या नोकराला पाठवून सरंग्याची तळलेली काप,तिसर्‍याचं सुकं,कोलंबीची आमटी,तळलेली कोलंबी,सोलाची कढी,भात आणि चपात्या आणायला सांगितल्या.
डबा येई पर्यंत,काही तरी बोलत रहावं म्हणून मी त्याला म्हणालो,
“तू ह्या वकिलाच्या लाईन मधे गेलास त्याचं मला नवल वाटत नाही.कारण मला आठवतं,तू त्यावेळीसुद्धा तुझे मामा लंडनला राहतात आणि ते बॅरिस्टर आहेत,त्यांच्या सारखं तुला शिकायचं आहे म्हणायचास ते मला आठवतं.तसच केलंस की काय?”
समीर म्हणाला,
“हो मी मामाकडे लंडनला राहात होतो.तिथे बार -ऍट -लॉ झालो.आणखी इकडे आल्यावर थोडे दिवस प्रॅक्टीस करत होतो.मला मुळात शिकवायची आवड असल्याने मी इकडच्या लॉ-कॉलेज मधे शिकवतो आणि प्रॅक्टीस पण करतो.”
मी म्हणालो,
“तू क्रिमीनल केसीस घेतोस,मग त्या लाईनची मला माहिती ऐकायला मजा वाटेल”
समीर सांगू लागला,
“मी माझ्या विद्दार्थ्याना नेहमी सांगतो की कुणाचाही बचाव करायला मागे पुढे पाहू नका.मग त्या व्यक्तीने काही केलेलं असो.
“तुम्ही पटाईत गुन्हेगाराचा बचाव कराल काय?तुम्ही एखाद्दा खून्याचा बचाव कराल काय?”
असे मला नेहमीच प्रश्न विचारले जायचे.माझं त्याला एकच उत्तर असायचं,
”होय,मी करीन.”
आणि असंच उत्तर हवं.कारण मला वाटतं,कुणी काहिही केलेलं असलं तरी त्या व्याक्तीची कमीत कमी कुणी एकाने तरी बाजू घेतली पाहिजे.
माझं पूरं आयुष्य गुन्हेगाराच्या वकिलाचं काम करण्यात गेलं.मी जनतेचा समर्थक होतो.माझी अशिलं अत्यंत घृणा येईल असे कल्पना करवणार नाही असे गुन्हे केलेले असायचे.मी माझं सर्व कसब वापरून,रचनात्मकता आणून,असेल ती दृढता लक्षात घेऊन त्यांचा बचाव करायचो.
शेवटाला माझ्या अशिलाना कहिना काही कारणाने गुन्हेगार ठरवलं जायचं. कारण गुन्ह्याची गार्‍हाणी ऐकणार्‍या न्यायपालीकेचं ते स्वरूप होतं.कारण कुणावरही गुन्हेगारीचा आरोप झाल्यावर त्या न्यायपालेकेशी मुकाबला करणं कठीण काम होतं.त्या प्रांतात असलेली त्यांची शक्तिशाली ताकद,साधन, पोलीस यंत्रणा,आणि अभियोग त्या व्यक्तीवर फेकलेले असायचे.आणि फक्त त्याचा बचाव करणारा म्हणजे एक वकील.पण असं अजीब असून सुद्धा मी बर्‍याच लोकांची सुटका करण्यात मदत केली आहे.कधी कधी मी न्यायमूर्तीला कायदेशीर तृटी दाखवून राजी करत असायचो.कधी कधी ज्युरींकडून “निरपराधी” म्हणून निकाल मिळायला यशस्वी व्हायचो.

बर्‍याच लोकांची मी सुकटा करून घेत असे ते दोषी असायचे.काही सुटून पुन्हा गुन्हा करायचे.एकाला तर खूनाच्या गुन्हातून मुक्त केल्यावर सुटल्यावर त्याने दुसर्‍या कुणाचा खून केलेला असायचा.आणि मी परत त्याचा बचाव केला असायचा.तरीपण त्याला शिक्षा व्हायची पण त्यावेळी माझ्या कडून त्याचा बचाव करण्याचा जोश कमी नसायचा.
हे काम करून आता तीस वर्ष झाल्यावर मला आता कसं वाटत असेल असं विचारलंत तर मी म्हणेन मला माझ्या कामाचा गर्व आहे.माझ्या विवेकाशी नैतीक संवाद ठेवून मी झुंज दिली म्हणत असाल तर खरंच आहे ते.
कोर्टात मी गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तिशी सामना केला आहे.त्यांच जीवन,शरिर,बहूतेक वेळा त्यांचा आत्मा, कायमचा दुखावलेला असायचा.बरेच वेळां मी त्यांच्या डोळ्यात माझ्या कुटूंबातली व्यक्ति पाहायचो.कधी कधी त्यांच्या डोळ्यात मी मलाच पहायचो.

माझ्याच आतल्या माझ्याशी होणारा संघर्ष भिषण असायचा.आणि तो संघर्ष रात्रीच्या जागरणात,चिंतेत, आणि उदासिन ठेवण्यात माझा वचपा काढायचा. पण अखेर शेवटी,मी जे काय अंगिकारलं होतं त्यावरच्या माझ्या श्रद्धेची माझ्या आशंकावर जीत व्हायची.
मला माहित आहे की बर्‍याच लोकाना हे कळायला जरा कठिण व्हायचं.खरंतर काही ऐकून भयभयीत व्हायचे.आणि क्षणभर दर्शवायचे पण.

लोकशाहीचा हा एक फायदा आहे की प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तीस्वातंत्र्य संभाळलं जातं.आपण कायद्दाचा आधार घेऊन निषेध करण्यासारखं जरी कुणाचं वर्तन पाहिलं तरी त्याला कायद्दाचं संरक्षण दिलं जातं.ते वर्तन कसंही असलं तरी त्या व्यक्तीची बाजू घेणारी आणखी एक व्यक्ती असूं शकते.
हे संरक्षण काढून घेतलं की आपले लोकशाहीचे सर्व हक्क निरर्थक होतात.वकिलाकडून जर का प्रतिकार झाला नाही तर तो वकिल आणि ज्यांच्यावर अभियोग चालवला जातो ते त्याचे प्रतिनीधी असतात, त्या सर्वांच्या स्वातंत्र्यावर गदा येते. कारण जे शक्तीशाली असतात ते त्यांच्या शक्तीचा गैरवापर ज्यांच्याजवळ नाही त्यांच्यावर करू शकतात.

माझ्या विद्दार्थ्याना मी अशावेळी त्या लोकांसाठी झुंज द्दायला सांगतो.परंतु,ती झुंज फार दृढ निश्चय ठेवून,त्यांच्याकडे असलेल्या प्रतिभा,आणि कौशल्याची वापर करून झाली पाहिजे.
तुम्ही काहिही गुन्हा केलेला असो एक व्यक्ती तुमची बाजू घेणारी असली पाहिजे.त्याचमुळे आपलं व्यक्तीस्वातंत्र्य जोपसलं जाणार.अशी माझी श्रद्धा आहे.”
वेळ कसा गेला ते कळलंच नाही.तोपर्यंत अनंताश्रमातून डबा आला.भूकही दाबून लागली होती आणि त्यातल्या त्यात अनंताश्रमातलं मालवणी जेवण.मग काय विचारता!


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, October 31, 2008

मुलीला आपली आई माहित हवी.

रेवती त्यांच्या भावंडात सर्वात लहान.तिला त्यामानाने आईचं सूख मिळालं नाही.आणि ह्याबद्दल तिला नेहमीच वाईट वाटत असतं.ती नेहमी म्हणते माझी आई असती तर मी तिला एका मागून एक प्रश्न विचारले असते.
असं मला ती म्हणाल्या नंतर मी तिला विचारलं,
” असे कोणकोणते प्रश्न तू तिला विचारले असतेस?”
त्यावर ती म्हणाली,
“आईला हसायला केव्हा यायचं?ती लहान होती तेव्हा कुणा देवाची प्रार्थना करायची?एखाद्या वाईट दिवशी ती कशी वागायची.?तिला लहानपणी गाणं गायला आवडायचं काय?रस्त्यावरून चालताना ती डाव्या बाजूने चालायची की उजव्या.? वगैरे वगैरे.”
हे ऐकून मी रेवतीला म्हणालो,
“तुझे हे प्रश्न पाहून तू तुझ्या आईला किती मिस करतेस हे मला चांगलंच लक्षात येतं.”
रेवती मला म्हणाली,
“मी पाच वर्षाची असतानाच माझी आई निर्वतली.तिला फिट्स यायच्या.गेली त्यावेळी ती ४२ वर्षाची होती.मला माझ्या आईबद्दल काही माहित नाही.माझे वडील खूपच चांगले आहेत.आणि मला आणखी तीन भावंडं आहेत. मी सर्वात लहान असल्याने माझ्या भावंडाना माझी आई चांगलीच माहित होती.ती सर्व माझ्यापेक्षा नशिबवान आहेत.आमच्या आईचं निर्वतणं हे आम्हा सर्वांना दुःखदायक होतं.माझी काही माझ्या आई बाबत अनुमानं आहेत.खूप दिवसाच्या काळजीपुर्वक ऐकण्यातून ती अनुमानं मी काढली आहेत.माझी आई तशी दोषदर्शी होती तशी ती हजरजबाबी होती.तिच्या चेहर्‍यावर पटकन हसूं दिसायचं. लहान मुलांकडे तिची जिव्हाळ्याची नजर असायची.लिहायला आणि वाचायला तिला खूप आवडायचं.सगळा परिसर तिच्यावर प्रेम करायचा.तिची गैरहजेरी आम्हाला खूपच जाचते.

अलिकडेच मी माझ्या गीताला जन्म दिला.मी तिला म्हणते,
“गीता,मी तुझी आई आहे.तू माझ्यात अडकली आहेस.माझ्या बद्दल तुला काही माहित हवं असेल तर ते माहित होई पर्यंत मी तुला वाटतं तितकी तुझ्या अपेक्षे प्रमाणे नसेनही.पण माझ्या बद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी तुला माहित असणं आवश्यक आहे.
जोपर्यंत मी ह्या जगात आहे तोपर्यंत मला तू काहीही विचारून घ्यावस.मला नेहमी वाटतं मुलीला आपली आई माहित हवी.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, October 29, 2008

मुलांना आहे तसंच खरं ते सांगाव

रमाकांत परूळेकर आणि त्यांच कुटूंब रत्नागिरीतल्या एका लहानशा परूळे नावाच्या गावात राहातात.रमाकांतचं बरंचस आयुष्य मुलं आणि त्यांच शिक्षण ह्यावर केंद्रित आहे.
ते गावातल्या शाळेत शिक्षक होते.अगदी पहिली पासून ते आठवी पर्यंत प्रत्येक वर्गात त्यांनी शिक्षक म्हणून आपला अनुभव घेतला होता.आता गावात आणखी दोन तीन शाळा झाल्या आहेत आणि ते सध्या शाळेच्या स्कूल बोर्डाचे सभासद आहेत.
परूळ्याला आमच्या घराचं दैवत आदिनायण,त्या दैवताचं पुरातन मंदीर परूळ्यात आहे.ते पहाण्यासाठी मी अलीकडे गेलो होतो.
मंदिरातल्या पुजार्‍याने मला रमाकांत परूळेकरांची ओळख करून दिली.आणि त्यांच्याच घरी मी दोन दिवस राहयला होतो.ह्या मुक्कामात माझी त्यांची चांगलीच ओळख झाली.अनेक विषयावर आमची त्या वेळात चर्चा झाली.हे गृहस्थ परूळ्यात शाळा चालवत होते.त्या संदर्भाने मुलांबद्दल विषय निघाला.
त्यावर ते म्हणाले,

“मला वाटतं जिथे वयस्कर लोक पण आपल्या क्षमतेची हतबलता दाखवतात,तिथे लहान मुलं तोंड द्दायची आणि अर्थ समजायची स्पृहणीय क्षमता दाखवतात.
ही मुलं अस्विकारणीय गोष्ट स्विकार करू शकतात हे पाहून मी चकितच होतो.

त्या दिवशी मला एका मित्राचा फोन आला की त्याच्या बायकोला कॅन्सर झाला आहे असं डॉक्टर म्हणतात.
“मुलांच्या कानावर ही गोष्ट घालू कां?”
असं त्याने मला विचारलं.
“बेलाशक सांग “
असं मी त्याला सागितलं.आणि म्हणालो,
“होय,मला वाटतं तूं सांगावस.त्यांना सत्य कळायला हवं.किती ही मर्मभेदी ते सत्य असे ना का?”
बरेच वयस्कर लोक मुलानी प्रामाणिक असावं असा आग्रह करतात.पण आपल्यापैकी कितीजण आपल्या मुलांबरोबर प्रामाणिक असतो.विषेश करून कठिण विषय असतो तेव्हा,मृत्यु,कामवासना,लाचखोरी,आपली स्वतःची कमजोरी वगैरे वगैरे असताना.

मला वाटतं मुलाना सत्य सांगणं हे त्यांच्या जीवनात त्यांच्या ज्ञानासाठी अत्यावश्यक असतं,त्यांच्या दृढविश्वासाठी,आणि त्यांच्या आचरणासाठी आणि मान्यतेसाठी पण. ह्याचा अर्थ मुलाना नाहक भयभयीत करण्याची जरूरी आहे असं नाही.
बर्‍याच लोकाना वाटतं की मुलाना सत्य न सांगणं हे त्याना सुरक्षीत ठेवण्यासाठी केलं जातं.
आपण जेव्हा मुलांनबरोबर प्रामाणिक असतो तेव्हा त्यांच्या अंतर्बोधाला मान्यता देत असतो.आपण असं मान्य केलं -होय,लोक मतलबी असतात,आजोबांना पिण्याचे प्रॉबलेम आहेत,नवरा बायकोत भांडणं होऊन त्यानी वेगळं होणं हे दुःखदायी आहे,वगैरे वगैर-तर मुलाना आपण त्यांच्या सद्स्द्वेक बुद्धिवर भरंवसा ठेवायला उद्दुक्त करतो.ती मुलं आपला आतला आवाज स्विकार करून त्यावर विसंबून राहतील.आणि तो आतला आवाज त्याना आयुष्यभर साथ देईल.

एखादी विशेष घटना व्हायची असल्यास त्या घटने बद्दल मुलांमधे काही तरी विचित्र समझ येते.आपलं अप्रामाणिक हंसू पाहून सुद्धा त्याना समज येते,आपण बेचैन झालो असलो तरी त्यांच्या लक्षात येतं,आपण असत्य केव्हा बोलतो तेही त्यांना कळतं.
एक दिवशी मी माझ्या थोरल्या दोन मुलींबरोबर तळ्यावर फिरायला गेलो होतो.वातावरण अगदी शांत आणि सुखद होतं-अगदी आंतरीक बातचीत करायला परफेक्ट-ध्यानी मनी नसता एका मुलीने मला विचारलं,
“बाबा पूर्वी तुम्ही कधी दारू प्यायचा का?”
मी एकदम अचंबीत झालो.पण मुलीनी हेका सोडला नाही.त्यानी मला पकडलं होत.आणि त्याना ते अवगत पण होतं.तेव्हा मी सत्य ते सांगितलं.यद्दपी काहीसं संक्षीप्तात.त्या व्यसानाबाबत परिणाम- प्रवर्तक आणि स्पष्ट सांगताना प्रलोभनाचं आणि संकटाचं पण बोलणं झालं.मला वाटतं माझा प्रामाणिकपणाच व्यसानाच्या धोक्यापेक्षा जास्त परिणामकारक झाला.

काळ पुढे चालला आहे आणि तशीच मुलं पण.ह्या मुली आता कॉलेज मधे आहेत.मी जरी आयुष्यात पालक म्हणून भरपूर चूका केल्या तरी माझ्या मुलांबरोबर शुद्ध आणि मोकळं नातं ठेवलं आहे.मला वाटतं माझं त्याच्यांशी सत्यवादी असणं मला फायद्याचं झालं आहे.कारण माझी खात्री आहे की ती मुलंपण माझ्याशी तेव्हडीच प्रामाणिक आहेत.”

हे परूळेकरांचे विचार ऐकून क्षणभर मला असं वाटलं की देवळात येण्याच्या निमित्ताने ह्यांचा अनुभव आणि विचार ऐकण्याचा हा योगायोग होता.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलोफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, October 27, 2008

निःशब्द होता सारा परिसर

जहाली असता अर्धी रात्र
निःशब्द होता सारा परिसर
दाहलेल्या मनाची ऐका
रंजलेली ही नीतिकथा

धुमसलेले उश्वास येती वणव्यातून
चांदण्या सांगती डोळे मिचकावून
लोळ हा धुराचा असेल आला धरतीवरून
सांगुया ढगाना विझविण्या पाणी शिंपडून

चंद्र सांगे चांदण्याना ऐकून हा कोलाहल
नसे तसे काही जाहले त्या धरतीवर
गोरगरीब बिचारे राहती त्यांच्या वस्तीवर
घामाच्या दाहाने जाळ पेटती हृदयावर

सांगती चांदण्या प्रवाही होण्या सागराला
जलधारा ओसंडण्या सांगती त्या मेघाला
सांगे चंद्रमा जेव्हा आग लागे हृदयाला
अश्रूंच्या जलधारा विझवीती त्या आगीला


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, October 25, 2008

“मेल्यावर जीवाचं काय होतं?”

माझी मेहूणी हेमा माझ्या पत्नी पेक्षा तशी बरीच वयाने लहान.गेले कित्येक वर्ष ती आपल्या नवर्‍याबरोबर इंग्लंडला एडिंबरा इथे राहाते.आता ती आजी झाली आहे तिची नातच पाच वर्षाची झाली आहे.
ह्या गणपतिच्या सणाच्या दिवसात ती तिच्या नातीला घेऊन आमच्याकडे महिनाभर राहायला आली होती.तिच्या नातीला गणपती उत्सव कसा साजरा करतात हे तिला दाखवायचं होतं.
एक दिवशी बोलता बोलता आमचा विषय निघाला की,
“मेल्यावर जीवाचं काय होतं?”
हेमाला गेल्या वर्षाचा एक जुना प्रसंग आठवला.ती म्हणाली,
“मला काय वाटतं आणि त्यावेळी काय घडलं ते तुम्हाला आठवून आठवून सांगते.प्रस्तावना करताना ती म्हणाली,

“मी काही अशी एकटीच मनुष्यप्राणी नाही की ह्या पृथ्वीवर येऊन धप्पकन पडली आहे आणि दिशाहीन होऊन इकडे तिकडे भटकत आहे.मी ह्याच पृथ्वीचा एक भाग आहे आणि तिला सोडून कुठेही जात नाही.”

माझी नात माया चार वर्षाची होती,आणि अलीकडेच तिने आमच्याकडे असलेल्या मांजरा विषयी पृच्छा केली. आमचं मांजर म्रृत पावलं.मायाला हे माहित पण होतं.ती एव्हड्यासाठी अचंबित झाली होती की ते मांजर कुठे गेलं? आणि तिचं काय झालं?कारण ते आता तिच्या खुर्चीच्या खाली म्यांव,म्यांव करीत नाही आणि मायाच्या चमच्यातून टपकणार्‍या थेंबांसाठी बेचैनही होत नाही.
अशाच क्षणी मला राहून राहून वाटायचं की मी ज्या बाबीवर श्रद्धा ठेवते ते काय आहे हे मला कळावं.
माझे आईवडील सरळ सरळ म्हणायचे,
“मेल्यावर आपलं काय होतं आपल्याला ठाऊक नाही.”
मी लहान असताना कदाचीत एक अखंड वर्ष त्या प्रचंड रहस्याचं चिंतन करण्यात घालवलं.माझ्या गादीवर पडून गुबगुबीत पांघरूणाच्या आत भविष्यातल्या शास्वत अस्तित्वहिनतेचं दृष्य डोळ्या समोर आणून अस्तिपंजर परिस्थितीत येऊन आपलं अस्तित्वात नसणं ह्याची ही दुखद घटना पहात असायची.हा विषय माझ्या डोक्यावर भूत कसा बसायचा.
माझ्या मायाची वृत्ति थोडीशी निकोप वाटली.
तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याची अशी काहीशी कल्पना त्यावेळी माझ्या मनात आली.
थोडासा जड निश्वास टाकून मी मायाला म्हणाले,
”मृगी-आपलं मांजर- शेतात गेलं आहे.जेव्हा असा घरातला पाळलेला प्राणी मरतो तेव्हा त्याला जमिनीत पुरतात,आणि त्यांच मग गवत,फूल किंवा झाड होतं.”
मी मायाच्या सुळसुळीत केसातून हात फिरवीत,तिच्या तुकतुकीत गालाला स्पर्श करून तिची काय प्रतिक्रिया येते ते पहात होते.ती जरा सुद्धा विचलीत झालेली दिसली नाही.उलट एक दिवस आपलं फूलात रुपांतर होतं हे ऐकून ती खूष झाली.
त्या गोष्टीने मी मलाच प्रभावीत करून घेतलं.ह्या आमच्या दोघांच्या समजूती आदान-प्रदान केल्यावर माझ्या चांगलच लक्षात आलं की,ज्यावर माझी श्रद्धा आहे ते जणू माझ्या जीवनातले छोटे छोटे कंगोरे-गांव भटकणं,निसर्गाच्या सृष्टीसौंदर्याचा उपभोग घेणं,सहानुभूतीचं ऋण ठेवणं,उंच,उंच इमारतींचा आणि भयभयीत करणार्‍या समुद्राचा आवाज ऐकून विस्मयीत होणं,प्रेम करणं,विज्ञान काय ते माहिती करून घेणं आणि आई होण्याचं निसर्गाचं गुढ आकलन करून घेणं,हे सर्व जणू एकाएकी माझ्या दृढविश्वासात समाभिरूप झाल्यासारखं वाटलं.जमिनीत एकरूप होऊन वनस्पतिचं खत होण्यात माझं भवितव्य असावं असं माझं म्हणणं नसून माझ्या जीवनात आणखी काहीतरी जीवन आहे असं मला म्हणायचं आहे.
मी काही अशी एकटीच मनुष्यप्राणी नाही की ह्या पृथ्वीवर येऊन धप्पकन पडली आहे आणि दिशाहीन होऊन इकड तिकडे भटकत आहे.मी ह्याच पृथ्वीचा एक भाग आहे आणि तिला सोडून कुठेही जाऊ शकत नाही-जसा एखादा कोनाड्यातला कोळी,किंवा खिडकीच्या दारावरची धूळ,किंवा त्या पुरलेल्या मांजरा सारखी.

मी मायाला विचारात पडून चूरूचूरू कुरमुरे खाताना पाहून,आजूबाजूला अपरिचित शांती अनुभवली.माझं नातं जुळल्या सारखं वाटलं,,मी नम्र झाले आणि सर्वांत जास्त की मला आनंदी झाले.
जीवन,मरण ही दोन्ही माझ्या सभोवती आहेत,जणू माझ्या श्वासात सामावली आहेत असं वाटू लागलं.
नंतर मी माझ्या नातीचा हात हातात घेतला.आणि शेताच्या मेरी वरून जाताना चिखलातून आम्ही चालत गेलो.आम्ही दोघी झाडावरची नवी हिरवी पालवी सूर्याच्या किरणात चमकताना पाहिली, हिरवा पहाडीभाग हवे बरोबर लहरताना पाहिला, हिरवीगार भाताची रोपटं वार्‍या बरोबर डुलताना पाहिली.आणि ह्याच्याही पलिकडे काही न दिसण्यासारखं असलं तरी चालेल असं वाटलं.आणि त्याचं कारण,जीवन चिरस्थायी असून ते प्रत्येक फूलाच्या बहरात सामाविष्ट असतं असं मनोमनी वाटलं.”

ही सर्व घटना सांगून झाल्यावर हेमा क्षणभर गोरीमोरी होऊन माझ्या प्रतिक्रियेची जणू वाट पहात आहे असं मला वाटलं.मी जरा सुद्धा निराशा न करता तिला म्हणालो,
“हेमा,तू ही घटना सांगून मला स्थंभीत केलंस.हा सगळा मेंदूचा खेळ तर नाही ना? असं मला क्षणभर वाटलं बघ.हे असे विचार मनुष्याच्या कसे डोकयात येतात.का हे निसर्गाची आपलं रूप दाखवण्याची चाल तर नसावी?”
हेमा म्हणाली,
” परत अशीच घटना घडली तरी असेच विचार येतील अशी श्वासवती नाही.”
किती समर्पक आहे हे हेमाच उत्तर?



श्रेकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com