Tuesday, December 30, 2008

उदात्त आशयामागचं गुढ

“अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”

“करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे”

मी अंधरीहून हुतात्माचौकाला जाणारी बस घेवून सकाळीच काही कामासाठी जात होतो.शिवाजी पार्कला स्नेहा चढताना पाहिली.मला पाहिल्यावर माझ्या जवऴच्या सिटवर येवून बसली.बऱ्याच वर्षानी आमची भेट झाली होती.माझा मित्र शरद गडकरीची ही एकुलती एक मुलगी.अरूण कामत बरोबर लग्न झाल्यावर ती अमेरिकेला गेली. खूप वर्षानी ती पण शरदला बघायला म्हणून आली आहे असं तिच्या कडून कळलं.
” काय कांताकाका तुम्ही कुठे चालला?तुम्हाला वेळ असेल तर आपण खोदादसर्कलला उतरून एखाद्दया रेस्टॉरंटमधे बसून जरा गप्पा मारुया येता कां?”
असं म्हटल्यावर मी तिच्या बरोबर उतरलो.

चहा घेत असताना मी तिला म्हणालो,
“स्नेहा अजून तू मला कांताकाकाच म्हणतेस हे नांव तू विसरली नाहिस?”
स्नेहा मला म्हणाली,
“कसं विसरीन?तुम्हीच आम्हाला कांता अत्तराची ओळख करून दिलीत. त्यावेळी घरी तुमचा विषय निघाल्यावर तुमची ओळख कांताकाकानेच आम्ही करत असायचो.
मला आठवतं,तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा घरी आला होता,त्यावेळी घरात कांतासेंटचा घमघमाट आमच्या सर्वांच्या नाकातून चुकला नव्हता.कानात आतून वरती तुम्ही त्या सेंटचा छोटासा कापूस लावला होता.त्याला तुम्ही अत्तराचा “फाया” म्हणायचा.मधेच त्या फायाला हात लावून तुम्ही बोटाचा वास घ्यायचा.आणि तुमचा हात तुम्ही बसलेल्या खूर्चीला लागला की त्या खूर्चीच्या हाताला अत्तराचा वास दरवळायचा.तुम्ही येवून गेला आणि माझे वडिल नंतर घरी आल्यावर न चुकता विचारायचे,

“स्नेहल, तुझा कांताकाका येवून गेला का?”
माझ्या आईलासुद्धा परफ्युमचं वेड होतं.माझे बाबा तिला नचुकता परफ्युमची बाटली आणून द्दयायचे.
ह्यावेळच्या ट्रिपमधे मला अत्तराचं महत्व विषेश गोष्ट म्हणून मनाला लागली.आणि तेच तुम्हाला केव्हा एकदा सांगते असं झालं होतं.
बरं झालं योगयोगाने आपण भेटलो.
मला वाटतं सुहासीक अत्तरामधेसुद्धा एक प्रकारची नकळत ओढ असते. अत्तरातल्या सुवासाला आपल्या जवळ येणाऱ्या व्यक्तिला नकळत एखाद्दया सुंदर सुहासीक फुलाच्या सुगंधाची आठवण करून देवून जवळच्या वातावरणात प्रसन्नता आणण्याची ताकद असते.
आमच्या घरातल्या बाथरूममधे ठेवलेल्या माझ्या आईच्या पसंतीचं अत्तर पाहून सुद्धा मला एकंदरीत सर्वच प्रकारच्या अत्तराविषयी तशीच समजूत झाली होती. आणि मला आठवतं मी त्यावेळी पंधरा सोळा वयाची होती.त्या तरूण वयात कुणालाही इतर छानछोक्या लाईफ स्टाईल बरोबर अत्तराच आकर्षण विरळंच असतं. परंतु माझ्या आईच्या अत्तराची महती त्यावेळच्या माझ्या तोटक्या समजुतीशी तेव्हडीच तोटकी होती हे मला त्यानंतर खूप वर्षानी मी माहेरी आले तेव्हां लक्षात आलं.अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”
“असा काय मेसेज मिळाला सांग पाहू “असं मी तिला म्हणालो.
“तेच सांगते”
असं म्हणून स्नेहल सांगू लागली,
“त्याचं असं झालं, ह्यावेळी मी जेव्हां बरेच वर्षानी आले त्यावेळी आईच्या बाथरूममधे अशीच एक नवी करकरीत सुहासीक अत्तराची बाटली पाहिली.हे अत्तर माझ्या वडलानी नेहमीप्रमाणे बक्षीस म्हणून माझ्या आईला दिलं होतं.आई त्यांना आपणहून कधीच अत्तर आणायला सांगत नव्हती.ही अत्तराची बाटली बाथरूममधे पाहून त्यठिकाणी असलेल्या अनेक गोष्टीमधे, जश्या साबू,तेलं,श्यांपू, तसेच मनाला वैताग देणाऱ्या औषधाच्या बाटल्या, गोळ्या ह्यामधे ती जणू भर समुद्रातून संदेश देणाऱ्या लाईटहाऊस मधून येणाऱ्या बिकनसारखी मला वाटत होती.
ह्या औषधाच्या बाटल्या पाहून नक्कीच वाटत होतं,की माझी आई दिवसे दिवस वाढत जाणाऱ्या तिला झालेल्या व्याधिविरूद्ध होणारी लढाई हळू हळू हरते आहे. गेल्या पंधरा,अठरा वर्षापासून तिच्या सानिध्यात असलेला हा व्याधि आणि त्याच्या विरूद्ध दिवस रात्र बंड करणाऱ्या तिला तिच्या उपजत असलेल्या दोन गुणाना, एक म्हणजे तिचा तो सतत सतर्क रहाण्याची कला आणि दुसरा म्हणजे कधीही न थकणारा तिचा तो विनोदी स्वभाव ह्या दोन्ही गुणाना तिच्या शरिराने जणू जखडून ठेवून सहकार्य न देण्याचा विडाच उचललेला असावा.
तिचा हा व्याधि मी लहान होते त्यावेळी सुरू होवून हळू हळू पायांच्या लटपटणाऱ्या स्थिती पासून आता संपुर्ण पऱ्यालिसीसमधे रुपांतर व्हायला आणि ती अत्तराची बाटली घरात यायला एकच वेळ आली असावी.
माझ्या वडलानी आईसाठी इतकी वर्ष खूप खस्ता खाल्ला.ती इतकी वर्ष चालती बोलती राहिली त्यांत माझ्या वडलांच्या मेहनतीचा काही भाग निश्चीतच होता. आमच्या घरात तिचं आजारपण म्हणजे”सदा मरे त्याला कोण रडे” अशातला प्रकार होता.तिच्या आजारपणांत सुधारणा होण्याचं चिन्ह कमीच.माझे आईवडिल दोघे मिळून लांबच्या प्रवासाला कुठे जाण्याचाप्रसंग अशा परिस्थितीत कधी आलाच नाही.
ती आजारी होण्याच्या पुर्वी दोघं मिळून जावून खरेदी करताना आईच्या पसंतीची अत्तराची बाटली आणायला माझे वडिल कधी विसरत नसत.पण नंतर नंतर ते स्वतःच जावून सर्व खरेदी करीत आणि अर्थात अत्तर पण.
बाहेर जाताना माझी आई निटनीटकी रहात असे.आणि अत्तर न लावता ती कधीच गेली नाही.आणि आता तिला कुठेच जाता येत नसलं तरी माझे वडिल तिच्या साठी अत्तर न चूकता आणीत राहिले.माझे वडिल विचारी आणि शांत स्वभावाचे असल्याने त्याना तिच्या आजारपणात कराव्या लागलेल्या सेवेची अथवा पूर्वीच्या संवयीत होतं तसं जीवन जगायला आणि आता इतरांसारखं जीवन जगणं प्राप्त परिस्थिमुळे महा कठिण झालं आहे ह्याबद्दल त्यांच्याकडून कधीही भावनावश होवून कसलंच भाष्य केल्याचं आठवत नाही.”आलिया भोगासी असावे सादर” ही त्यांची सदाची वृती होती.
आता अगदीच लुळ्या परिस्थितीत असलेल्या माझ्या आईची माझे वडिल ज्या तत्परतेने सेवा करतात ते पाहून मला खूपच त्यांची किंव येते.मी आणि माझा नवरा अरूण फिलाडेल्फीया असताना त्यांना मी एकदा कळवलं होतं,की वाटलं तर, नव्हे नक्कीच तुम्ही एक नर्स किंवा आया ठेवून त्यांच्या कडून आईची सेवा करून घ्या तुम्ही खर्चाची मुळीच काळजी करू नका मी लागेल तेव्हडे पैसे इकडून पाठवित जाईन.त्यावर त्यांनी मला कळलवं होतं की,तू इकडची काळजी करूं नकोस.आणि खरं सांगू कांताकाका, तुमची ती मागे लिहीलेली कविता मला तुमचा रेफरन्स देवून त्यानी पाठवली होती.आठवते का तुम्हाला ती कविता?.”
“तू मला त्या कवितेचं शिर्षक सांग, बघ तुला आठवतं तर.” असं मी तिला म्हणालो.
त्यावर म्हणाली,
” मला शिर्षक ह्या वेळी आठवत नाही पण कवितेचा आशय आठवतो. तो असा,की चांगली लाईफ स्टाईल ठेवली तर आजारी पडणं कमी होतं.आजारी पडणाऱ्या व्यक्तिला आपली सेवा करून घ्यायला मौज वाटत असेल पण त्या आजाऱ्याची जो सेवा करतो त्याचे खूपच हाल होतात.
स्वतःच्या जीवाचं करून परत तसंच सर्व आजाऱ्याचं करावं लागतं.आणि तो अशा सेवा करणाऱ्या व्यक्तिला डबल व्याप होतो. तेव्हा आजारी न पडण्याची चांगल्या लाईफस्टाईलची तुम्ही त्या कवितेत एक गुरूकिल्ली पण दिली होती.
इतकही करून जर का कोण आजारी पडलाच तर मग मात्र सेवा करणाऱ्या व्यक्तिला तसं करताना मुळीच वाईट वाटत नाही,नव्हे तर तो आनंदाने त्याची सेवा करतो असं तुम्ही त्या कवितेत शेवटी म्हणता.हा आशय माझ्या चांगलाच लक्षात होता.
मी म्हणालो,
” आता आठवलं मला त्या कवितेचं शिर्षक काय आहे ते, “निरोगी मौज” बरोबर नां?”
“होय अगदी बरोबर. असेल कविता लक्षात तर सांगा पाहूं.
मी म्हणालो कविता अशी होती,

निरोगी मौज

पडू आजारी
मौज हीच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी

मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी

खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
आणि विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे बरे चालेल

करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे

ही तुमची कविता पाठवून त्यावर माझ्या वडलानी एकच व्याक्य लिहीलं

”सेवेचे कर्तव्य वाटे फारच न्यारे”
आणि हे वाचून मी काय समजायचं ते समजले.

ह्यावेळेला जेव्हां मी आले,तेव्हां माझ्या आईवडिलांच्या एकमेका बद्दलच्या असणाऱ्या समजूती बद्दल,आदरा बद्दल आणि एकमेकावरच्या प्रेमाबद्दलचा सराव पाहून माझी मी खात्री करून घेतली की या वयावरही ही सेवा वगैरे त्यांना ह्यामुळेच जमतं.
माझे वडिल ज्यावेळेला माझ्या आईला बाथरूम मधे नेवून तिची साफसफाई आणि कपडे उतर चढव करण्याचं कामं करतात,त्यावेळेला त्यांना त्या अत्तराची हटकून आठवण होते.पण त्या अत्तराचा सुवास दुर्गंध लपवण्यासाठी नसतो.तो सुगंध त्यांच्या जून्या दिवसांची फिर-याद, आणि आत्ताची, याद देत असतो.तिच्या सर्वांगाला अत्तर लावून जणू ते तिला सांगत असतात की त्यांची पत्नी त्यांना तिच्या शरिराहूनही प्रिय आहे,आणि ती त्यांचीच पत्नी आहे.
अत्तर लावून हेच त्यांना तिला सांगायचं असणार.
स्नेहलचं हे सर्व बोलणं ऐकून मी तिला म्हणालो,
”खरंच तुझ्या आईवडिलांच कौतुक केलं पाहिजे आणि त्याच बरोबर तुझं पण. पंधरा सोळा वर्षावर अत्तराविषयी तू सांगितलेले तुला वाटणारे विचार आणि त्याच अत्तराची बाटलीला पाहून तुला ह्या वयावर आलेले विचार ह्यातला फरक फक्त तुझं वय आहे नाही काय?”
असं म्हणून आम्ही जायला निघालो.
वाटेत मला ते तिचे “अत्तर” “फाया” हे सांगताना वापरलेले शब्द आठवून ते जुनं गाणं आठवलं.

“सुगंधाने झाले धुंद
जीव झाला बेबंद
देहभान मी विसरावे
अशी करा माया
अत्तराचा फाया तुम्ही
मला आणा राया”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, December 28, 2008

पायी प्रवासातली मजा.

“मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्‍याला देतात तेच लोक दुसर्‍याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात.त्यांच्या चेहर्‍यावरून ते त्याबद्दल ऋणी आहेत आणि आभारी आहेत हे प्रदर्शीत होत असतं”

श्रीधर केळकर बरीच वर्ष इंग्लंडमधे राहत होते.आता निवृत्त झाल्यावर परत ते भारतात कायमचे राहायला आले.इंग्लंडमधे असताना त्यांना मैलो- मैल पायी प्रवास करायची संवय होती.इथे आल्यावर त्यानी तेच करायचं ठरवलं.प्रथम प्रवासाचा मोठा पल्ला घेण्याऐवजी त्यानी मुंबईहून कोकणात आणि पुढे गोव्यात पायी प्रवास करायचं ठरवलं.
केळकर म्हणाले,
“इंग्लंडमधे राहात असताना कामावर जायच्यावेळी कुणाची ना कुणाची लिफ्ट मिळायची.त्यामुळे मी कामावर वेळेवर पोहोचायचो.रोज कुणी ना कुणी दयाळु होऊन उदार होऊन मला घ्यायचा.माझ्या मनात रोज एव्हडं यायचं की आज पण कालच्या सारखा चमत्कार होईल ना?
रोज ज्यांच्यावर लिफ्टसाठी मी अवलंबून असायचो त्याना त्यांच्या जीवनात कमी का चिंता आहेत,आणि असं असूनही एखादा तरी मला लिफ्ट द्दायचाच अगदी उदार होऊन.किती लोकानी अशी मला लिफ्ट दिली असेल याची मी काही यादी ठेवली नाही. परंतु मी त्याच्या येण्यावर निर्भर होतो.
ह्या घटनेवरून मी माझी एक समजूत करून घेतली आहे.ती अशी. दयाळु असणं म्हणजे श्वास घेतल्यासारखं आहे.श्वास जसा एक तर तो बाहेर टाकायचा किंवा आत घ्यायचा. एखाद्दा अनोळख्याकडून भेटीची याचना करताना एक प्रकारे मन उघडं असावं लागतं.एखाद्दाकडून अत्यंत दयाळुपणा अंगिकारताना त्या अगोदर थोडी मानसिक तयारी असावी लागते. मी ही क्रिया आदान-प्रदान केल्या सारखी समजतो.ज्या क्षणी अनोळखी त्याच्या मदतीचा,चांगुलपणाचा उपहार देतो तेव्हा ज्याला तो उपहार घ्यायचा असतो तो आपल्याकडून नम्रता, आभार, आश्चर्य, विश्वास, प्रसन्नता, निश्वास,आणि तृप्तीचा उपहार त्याला देतो.

इकडे आल्यावर जेव्हा मी पायी प्रवास करायला सुरवात केली तेव्हा संध्याकाळ होताच मी ज्या गावात गेलो असेन तिकडे एखादं घर बघून दरवाजा खटखटायचो आणि मला एक रात्र तुमच्या बाहेरच्या पडवीत झोपायला मिळेल का हे विचारून घेत असे आणि मी सकाळ होताच निघून जाईन म्हणून त्याचवेळी सांगत असे. मला कुणीही नकार दिला नाही. एकदा सुद्धा.काही तर आत घरात झोपायला सांगायचे. असा क्षण आला असता कधीकधी मी त्यांना थोडावेळ माझ्या आतापर्यंतच्या झालेल्या प्रवासाचे आणि मिळालेल्या अनुभवाच्या गोष्टी सांगायचो. ही मंडळी खूप स्वारस्य घेऊन मला ऐकायची.माझ्या सारखं करायला त्यांच्या क्वचितच मनात येत असेल पण ऐकायला उत्सुकता दाखवायचे.आणि ह्या ऐकण्याच्या बदल्यात मला कधीकधी एखादी स्विट डिश आग्रहाने खायला सांगायचे.
रत्नागिरी शहर सोडल्यानंतर जेव्हा मी दक्षिणेच्या बाजूने जायायला लागलो तेव्हा वाटेत आलेल्या बर्‍याचश्या खेड्यात माझं प्रेमाने स्वागत व्हायचं.
मला वाटतं जेव्हा चमत्काराचा झरा वाहतो त्यावेळा तो दोन्ही बाजूने वाहत असावा.प्रत्येक भेटी बरोबर सद्भावनेचं जाळं धाग्याच्या गुंत्याने विणलं जायचं ते देणार्‍या आणि घेणार्‍या दोघामधे.

एका गावात मी जरा रात्रीच पोहोचलो.खेड्यात वीज वाचवण्यासाठी तिन्हीसांजा झाल्या की जेवण करून मोकळे होतात. शाळकरी मुलं मात्र वीज नसल्यास कंदिलाच्या प्रकाशात रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यास उजळणी करीत असतात.मी दरवाजा खटखटल्यावर अशाच एका मुलाने दरवाजा उघडला.
“कोण पाहिजे आपल्याला?”
असं त्याने मला विचारलं.
मी त्याला म्हणालो,
“बाळा, तुझ्या घरात कोणी मोठं माणूस आहे का?”
त्याने आईला हांक मारली.
मी त्यांना म्हणालो,
”फक्त एक रात्रीसाठी मी आपल्या बाहेरच्या पडवीत झोपू का?”
माझी चौकशी केल्यावर त्यानी होकार दिला.
मला म्हणाली,
“आमची सर्वांची जेवणं झाली आहेत.मी तुम्हाला पिठलं भात करून देऊ का ? “
त्यानी जेवण्याचा आग्रहच केला.तसा मी वाटेत एका छोट्याश्या हॉटेलात चहा आणि भाजीपूरी खाल्ली होती.तो उकड्या तांदळाचा गरम गरम भात आणि हिंग मोहरीची फोडणी दिलेलं कढत पिठलं खाऊन मला निवांत झोप लागली.
मे महिन्याचे दिवस जरी गरमीचे असले तरी कोकणात रात्री सुखद थंडी पडते. एका खेड्यात रात्रीचं पोहचल्यावर बाहेर शेतीच्या परड्यात काही मंडळी लाकडांना आगपेटवून शेकोटी घेत बसले होते.मला पाहिल्यावर एक मुलगा उठून माझ्या जवळ आला.
नेहमीचाच प्रश्न
“तुम्हाला कोण पाहिजे?”
मी गंमतीत म्हणालो,
“तूच हवास”
तो जरा हसला.तेव्हड्यात इतर लोक उठून माझ्या जवळ आले.

मी त्यांना म्हणालो,
“तुमच्या शेकोटीची धग घ्यायला मला मिळेल का?”
“अर्थात “
असं म्हणून त्यांनी मला त्यांच्या घोळक्यात बसायला जागा दिली.आगीच्या शेकोटीत भाजलेले कणगी,करांदे आणि रताळी मला खायला दिली.आणि त्यांच्यापैकी एकाच्या घराच्या पडवीत मी रात्रीचा मुक्काम केला.

जेव्हा मी गोव्याला पोहोचलो तेव्हा मला बिचवर एक तरूण भेटला.हलो-हाय झाल्यावर आम्ही थोडावेळ वाळूत गप्पा मारीत बसलो.माझ्या पायीप्रवासाच्या स्किमचं त्याला कुतुहल वाटलं.त्याच्या अपार्टमेंटमधे मी माझ्या प्रवासाचे आठ दिवस राहिलो. त्याच्या सर्व कुटुंबियांशी माझा चांगलाच परिचय झाला.
मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्‍याला देतात तेच लोक दुसर्‍याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात. त्यांच्या चेहर्‍यावरून ते त्याबद्दल ऋणी आहेत आणि आभारी आहेत हे प्रदर्शीत होत असतं.खरं पाहिलंत तर जीवंत राहिल्यानेच त्या प्रचंड भेटीच्या प्राप्तीच्या एका टोकाला आपण सर्वजण आहोत हे निश्चीत.तरीपण असहाय,नम्र आणि ऋणग्रस्त आहोत असं दाखवायला आपल्यातले बरेच तयार नसतात.भेटीच आदान-प्रदान करून घ्यायला थोडी संवय व्हावी लागते पण त्यावेळी आपण निराशाजनक असता कामा नये.

कुणी म्हणेल असली उदारता स्विकार करायला सुद्धा एक प्रकारची सहानभूती असावी लागते.उदार राहण्यातली सहानभूती.
तसं पाहिलं तर ह्या माझ्या पायीप्रवासात मला कुठेतरी हॉटेलात किंवा एखाद्दा मोकळ्या पार्कमधे राहता आलं असतं.पण रात्र झाल्यावर कुणाच्या घरी जाऊन राहाण्याचा माझा उद्देश माझ्या प्रवसाची आणि अनुभवाची त्यांना माहिती होते.आणि माझी पण नवीन कुंटुबाची ओळख होते.
मात्र माझ्या ह्या पायीप्रवासाच्या संदर्भात मिळणार्‍या भेटींची अनावश्यक भावदर्शनात गणना करावी लागेल.
ह्या जगात जरी खराब हवामान असलं,मळकट भूतकाळ असला,नर्कात जाणारी युद्ध असली तरी ती सम्मिलीत होऊन आपल्यालाच एक प्रकारची मदत करीत असतात पण जर का आपणच विनम्र राहून त्याना मदत करू दिलीत तर.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, December 26, 2008

मनोमन प्रार्थना.

“कधीकधी कुणाजवळ बसून,ऐकून घेणं खूपच महत्वाचं असतं.”

जान्हवी लिखिते त्या हॉस्पिटलमधे जवळ जवळ तीस वर्ष कामाला होती.हे हॉस्पिटल एका छोट्याश्या शहरात होतं.निवृत्त होण्यापूर्वी तिच्या जागी येणार्‍या एका बाईला ती आपलं काम समजावून सांगत होती.मी बाजूला बसून ऐकत होतो.
लिखिते म्हणाली,
नेहमीची आमची कामं करीत असताना सकाळी प्रथम आल्याआल्या आपल्यासारखीच छोटीमोठी काम करणार्‍या लोकाना भेटून त्याना स्पर्श करून दत्तगुरूंची मुर्ती डोळ्यासमोर आणून त्याची आराधाना करून त्यांच्या आजच्या दिवसाच्या कामाच्या सफलतेची मी कामना करायची.आणि त्यासाठी प्रत्येकाला हुडकून काढावं लागायचं. बेसमेटमधे,बाथरूममधे,कॅन्टीनमधे,जिथे सापडतील तिथे जाव लागल तरी. ज्यावेळी मी त्याना शोधून काढून भेटायची तेव्हा ती नेहमी बिचकायची. आणि नंतर सद्गदीत व्ह्यायची.मला पण तसंच व्ह्यायचं.
बेसमेंटमधे ही माणसं शोधून काढीत असताना,एका नर्सला मी भेटायची.ती आपल्या कामात ह्या बाबतीत आणखी काळजी घ्यायची.तिचं काम असायचं,जेव्हा एखाद्दा पेशंटची ऑपरेशनची तयारी करायची असायची तेव्हा त्याला लागणारी सर्व टूल्स आणि इतर साधनं एके ठिकाणी नीट लावून ठेवायची.त्याची एक चेकलीस्ट बनवावी लागायची आणि सर्वात वरती त्या चेकलीस्टवर पेशंटचं नांव लिहावं लागायचं.अशावेळी ती सुद्धा त्या पेशंटचं नांव घेऊन त्याचं ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी देवाची मनोमन प्रार्थना करायची. असं ही बाई गेले चाळीस वर्ष करत आली आहे.
पुढे लिखिते म्हणली,
“माझी खात्री आहे की ती जे करीत होती ते कुणालाही माहित नसावं.आमच्या सर्वा पेक्षा जुनी काम करणारी ही बाई इतका महत्वाचा जॉब करीत असताना की जे काळजीपूर्वक आणि ठिक-ठिक कराव लागणारं काम करीत असताना प्रार्थना करायला विसरत नव्हती.
हे असं करीत असताना,कदाचीत ती त्या पेशंटना भेटतही नसावी किंवा पुन्हा भेटणारही नसावी.कदाचीत तिला ऑपरेशन कसंझालं हेही माहित नसावं.”
लिखितेला हे उदाहरण पाहून हॉस्पिटलच्या कामात पडद्दाआड किती गोष्टी होत असतात ह्याची साक्ष मिळाली.

एखादं अस अत्यंत जरूरीचं काम सुद्धा पेशंटच्या आणि त्याच्या कुटूंबाच्या नजरे आड होत असावं.ही सर्व काम करणारी मंडळी आपआपली नेमून दिलेली काम करत असणार.पण ह्या कामगारांचं जीवन किती मुल्यवान असतं आणि त्यांच्या कहाण्यापण किती मुल्यवान असाव्यात हे त्यांना समजत नसावं.
त्या बाईने लिखितेने विचारलं की जाता जाता इतर कामगाराना काही उपदेशपर सांगायचं आहे का?
लिखिते म्हणाली,
“काळजीपूर्वक ह्या असल्या केल्याजाणार्‍या मनोमन प्रार्थनांची कदर केली जावी.त्या होऊ द्दाव्यात आणि त्यांना कमी लेखलंजाऊ नये.”
मी मनात म्हणालो,
“कधीकधी कुणाजवळ बसून,ऐकून घेणं खूपच महत्वाचं असतं.”


श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, December 24, 2008

मी सरिता तु असशी सागर

चंद्रमाच्या चांदणीची ही जादू
ही वेळ अन अशी ही रात्र
ही लहर प्रीतिची नेई मला
नसे माहित कुठे ते मात्र

नको विचारू काय माझ्या मनी
जोवरी साथ देशी तू मजशी
माझेच ठिकाण नसे माहित मला
तुझ्या तुच प्रीतित मला हरविशी

माझे माझ्याच मनावर नसे भान
का ते समझावया नसे मी पात्र
ही लहर प्रीतिची नेई मला
नसे माहित कुठे ते मात्र

मी सरिता तु असशी सागर
मनमोहन माझ्या सजणा
घाल तुझ्या मनावर आवर
ऐकूनी माझे प्रेमगीत
डुलत रहा ह्या लहरीवर
भिजून गेलो तू मी अन रात्र
ही लहर प्रीतिची नेई मला
नसे माहित कुठे ते मात्र



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, December 22, 2008

नम्रतेचा अमुल्य धडा.

“शहरात येऊन मध्यमवर्गीयात राहून त्यांच जीवनचर्य अंगिकारून राहिल्याने माझे पूर्वीचे खेड्यातले दिवस विसरणं,मी कोण आहे हे विसरणं,मी कुठे होतो,आणि पुढे मला कुठे जायचंय ह्याचा विचार विसरून जाणं हे सर्व सहज सोपं होतं.”

माझा मित्र मोहन मोकाशी खूप दिवसानी मला भेटला.जुन्या गप्पा मारण्यात मजा येत होती.तो त्याच्या आठवणी मला सांगू लागला.शहरातली रहाणी आणि लोकांची एकमेकाशी वागणूक या विषयावर चर्चा होत असताना,रोजच्या घाईगर्दीच्या जीवनात बारीक बारीक कारणावरून बाचाबाचीचेच प्रकार जास्त होत असतात.असा त्याचा बोलण्याचा सूर होता.शक्यतो नम्रतेने राहण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो असं म्हणाला.आणि ह्याचं स्पष्टीकरण करताना त्याला मुंबईत आल्याआल्याच्या आठवणी येऊन त्याचा अनुभवाची मला गंमत सांगू लागला.
मला मोहन म्हणाला,

“काही वर्षापूर्वी मी मुंबई पहाण्यासाठी आलो असताना, शहरातली आणि देशातली धनसंपत्ती पाहिली. आणि तसेच रसत्यावर झोपडीत राहणारे,कमनशिबी भिकारी पण पाहिले.एकदा गेटवेऑफ इंडिया जवळ गेलो असताना समोरच्या एलिफंटाकेव्हझचा डोंगर पहाण्यात गर्क झालो असताना,मागून एक आवाज आला म्हणून वळून पाहिल्यावर,एक वृद्ध बाई हात पुढे करून उभी राहिलीली पाहिली. नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून मी माझ्या खिशात हात घालून जेवढी म्हणून मोड होती ती तिच्या हातात ठेवली.तिचा चेहरापण पाहिला नाही.भिकारी म्हणून तिच्या त्रासाला कंटाळून मी असं केलं.
पण ती आंधळी बाई हंसली आणि मला म्हणाली,
“तुमचे पैसे मला नकोत मला तुमच्याकडून रस्ता ओलांडण्याची मदत हवीय.”
माझ्या क्षणात लक्षात आलं मी काय केलं ते.मी पूर्वग्रहदूषित होऊन दुसर्‍या व्यक्तिची पारख माझ्या मनात आलेल्या कल्पनेशी जुळती घेऊन पाहिलं म्हणून हे झालं.
माझी मलाच घृणा आली.ह्या घटनेमुळे माझ्या मनातला श्रद्धेबद्दलचा महत्वपूर्ण मुद्दा जागृत झाला.मी नम्रतेला किती महत्व देतो त्याला पुष्ठि मिळाली. अगदी क्षणासाठी जरी ती नम्रता मी विसरलो असेनेही.
मी माझ्याविषयी विसरलो असेन ते म्हणजे मी एक खेडूत होतो.मी माझं गाव सोडून मुंबईला आलो त्यावेळी अवघा सतरा वर्षाचा होतो.दोन नव्या बॅगा, माझा भाऊ आणि बहिण,आणि खंबीर मनाची माझी आई असं सर्व गोतावळ माझ्या बरोबर होतं.
ह्या सर्व काळात मी हॉटेलात बश्या धुण्याच्या कामापासून वेटर होऊन गल्ल्यावर बसे पर्यंत कामं केली.नंतर थोडं शिक्षण घेत घेत असेच मामुली कामं करता करता नेटवर्क इंजिनीयर झालो.
माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी असे पुर्वग्रहदुषित प्रकार अनुभवले आहेत.मला आठवतं मी अठरा वर्षाचा असताना हॉटेल मधाला कपबशी उचलणारा पोर्‍या म्हणून कामाला होतो. एका मुलाचा पिता आपल्या मुलाला सांगत होता की शाळा शिकून यशस्वी झाला नाहीस तर माझ्या सारखी कामं करावी लागतील. अशीच वागणूक माझ्या नातेवाईकांकडून आणि मित्रमंडळीकडून मला मिळाल्याचं आठवतंय. त्यामुळे ते काय आहे ते मला कळलं होतं.खरं म्हणजे मला आणखीन चांगल माहित असायला हवं होत.
शहरात येऊन मध्यमवर्गीयात राहून त्यांच जीवनचर्य अंगीकारून राहिल्याने माझे पूर्वीचे खेड्यातले दिवस विसरणं,मी कोण आहे हे विसरणं,मी कुठे होतो,आणि पुढे मला कुठे जायचंय ह्याचा विचार विसरून जाणं हे सर्व सहज सोपं होतं.
त्या गेटवे वरच्या आंधळ्या बाईने मला मी स्वतःहून माझ्यात प्रेरीत केलेल्या आंधळेपणा पासून माझी मुक्तता केली.तिनेच मला नम्र राहाण्याची आठवण करून दिली.आणि बरोबरीने माझ्या डोळ्याची आणि मनाची कवाडं उघडी ठेवायलाही स्मरण करून दिल.
खरं म्हणजे हे आता सांगताना त्या बाईला रस्ता ओलांडून जायला मी मदत केली याची आठवण येऊन तिने अमुल्य धडा शिकवल्याबद्दल तिच्याजवळ माझी उपकृतता प्रकट करावीशी वाटते.”
एखादी बारीकशी गोष्ट जीवनात आपल्याच वागणुकीला कशी कलाटणी देतं हे मोहन कडून ऐकून गंमत वाटली.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, December 20, 2008

मनुष्याची प्रतिष्ठा.

“मला वाटतं,आपण आपल्याला पूर्णपणे विकसीत झालेलं,पूर्णपणे बुद्धिसंपन्न आधूनिक माणूस समजणं ही चूक होईल.आपलासर्व इतिहास,आपली खरी महानता,आपला सामजिक विकास,या गोष्टींचे अस्तित्व आपल्या पुढच्या भविष्यात आहे.”

आज माझी आणि प्रो.देसायांची भेट त्यांच्या घरीच झाली.काल त्यानी मला निरोप पाठवून तळ्यावर भेटण्या ऐवजी,घरीच या असं कळवलं होतं.मी पृच्छा केल्यावर तुम्हाला उद्दां ते इकडे आल्यावरच कळेल असं म्हणाले.मी त्यांच्या घरी गेल्यावर दहा पंधरा पुरूष,स्त्रीया खाली बैठक मारून बसलेल्या दिसल्या.मला प्रथम वाटलं काही तरी गाण्याचा कार्यक्रम असावा.पण आत गेल्यावर तबला,पेटी काही दिसली नाही.दोन खुर्च्या भिंतीजवळ ठेवलेल्या होत्या.एका खुर्चीवर भाऊसाहेब बसले होते. आणि एकावर एक तरूण तरतरीत उंच नीमगोरा गृहस्थ बसलेला दिसला.मला हाताने खुणवून भाऊसाहेबानी खाली बसायला सांगितलं.
त्या तरूण माणसाची ओळख देत प्रो.देसाई म्हणाले,
“हे गंगाधर परब,पीएचडी असून आपल्याच कॉलेजात फेलो म्हणून आले आहेत. मीच त्यांना मुद्दाम इकडे बोलावून एखाद्दा विषयावर बोलायला विनंती केली.आज ते “मनुष्याची प्रतिष्ठा” ह्या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.ते आपण ऐकूया.”
असं बोलून झाल्यावर डॉ.परब बोलू लागले,

“मला वाटतं,आपण आपल्याला पूर्णपणे विकसीत झालेलं,पूर्णपणे बुद्धिसंपन्न आधूनिक माणूस समजणं ही चूक होईल.आपला सर्व इतिहास,आपली खरी महानता,आपला सामजिक विकास,या गोष्टींचे अस्तित्व आपल्या पुढच्या भविष्यात आहे.”

मी जे म्हणतो त्यावर माझा विचारपूर्ण विश्वास आहे म्हणून.आणि त्यात पण मला संदेहही वाटतो.मला संदेह असण्याचं कारण मी अजून तरूण आहे म्हणून. आणि तरूणात अचूकता असते,हे विधान अविवेकपूर्ण आणि अशोभनीय ठरेल. आणि माझ्या ह्या वयावर, मला वाटतं,आपल्या श्रद्धेवरच्या निश्चीततेचं समर्थन करणं आणि तो विचार मजबूत आहे असं म्हणणं बरोबर होणार नाही.
अशी माझी समजूत असणं,हे एका अर्थी बरं आहे.कारण मी संशयवादी आहे.मला वाटतं माणसाचा विश्वास सतर्क्ततापूरक असावा,व तो त्याने जपून जपून सांभाळावा. त्याने त्याची प्रचिती अनुभवाशी पडताळून पहावी,आणि ती श्रद्धा त्याला घृणित, महागडी किंवा जटिल वाटली तर त्या श्रद्धेचा त्याने उघड उघड त्याग करावा.
पूर्वी म्हटल्या प्रमाणे मी तरूण आहे.जास्त शांत आणि कमी बेचैन जग, माझ्या पुढची पिढी जशी मागे वळून बघेल तसंमला मागे वळून दिसणार नाही.जेव्हडी म्हणून माझी आठवण जाईल तेव्हडं आठवल्यास,माझं जग जसं आहे तसं आपण सर्व पहात आलो आहे तसंच आहे.असं जग की जीथे युद्ध खेळली जातात आणी जीथे डोक्यावर सदैव युद्धाचा भयभयीतपणा आहे. असं जग की जे असाधारण गतीने पुढे जात आहे,आणि त्यात असाधारण बदलाव होत आहेत.असं जग की जीथे सर्व घटनेतली असाधारण घटना म्हणजे आपल्यात असलेली अक्षमता, आपल्यात असलेली सामाजीक विकासाची कमतरता,आपलं अज्ञान,आणि अमानुष विध्वंस करण्याची आपल्यात असलेली ताकद आणि ह्या सर्वांची आपल्याला झालेली धक्कादायक अनुभूती.

हे जग जरी जंगलासारखं वाटत नसेल,तरी प्रत्यक्षात एखादं नेहमीच काळंकुट्ट आणि नेहमी भितीदायक जंगल असतं तसं आहे.फार काळ होऊन जाई तो-मला सांगायला खेद वाटतो- आपल्यातले जे काही जगतील त्यांच्या आठवणीत राहील तो स्थिरतेचा काळ, स्विकारलेली मुल्यं,आणि स्विकारलेली शांतता.आणि असं असून हे सर्व होत असताना,ही निर्दयतेची आणि भयाची अवस्था कायम स्वरूपाची असेल आणि हे एव्हडंच मनुष्यप्राणी जास्तीत जास्त गाठू शकेल असं मी मानायच्या तयारीत नाही. जसं आता मी सांगतो तसं त्यावेळीही आग्रहाने सांगेन, की मनुष्यात उच्च पातळी गाठण्याची क्षमता आहे पणह्या क्षमतेचा प्रयत्न तो अत्यंत मंदगतीने आणि अनंत चूका करून नंतर ह्या अंधारातून सीमापार होण्यात ती क्षमता वापरील. कारण माझा मानवजातीवर भरवंसा आहे.

माझा हा भरवंसा काहीसा इतिहासावर आधारित आहे.मनुष्य हाच माझा जास्त आधार आहे.कधीतरी इतराशी व्यवहारीक संबंध येत असताना काही गंमतीदार प्रसंग घडतात.जे काहीसं माझ्या विचाराच्या पलिकडचं होतं.अचानक एखाद्दाला निरखून पहाताना धक्कादायक गोष्ट म्हणजे मी मलाच त्याच्यात पहातो.अर्थात हे क्वचितच होतं.कारण असं हे फक्त अपघाताने किंवा अतिदुःखाच्यावेळी किंवा अत्यानंदाच्यावेळी होत असावं.बहुतांशी माणूस स्वतःहून असा दुसर्‍यासारखा होत नाही.त्या क्षणात मी जर का त्याच्याकडे बघायचं धारिष्ट केलं तर त्याच्यात माझ्याच इच्छा,माझ्याच सुप्त श्रद्धा,मला हवी असलेली प्रेमाची जरूरी, माझं आंतरीक गांभिर्य आणि माझ्या इच्छा-आकांक्षा त्याच्यात पहात असतो.हा क्षण जणू एखाद्दा कोळोख्या खोलीत मी बसलोय आणि एकाएकी डोळे दिपवणारा प्रकाश पडावा आणि सगळी खोली लख्ख प्रकाशात दिसावी तसा वाटतो.
हे सर्व झाल्यावर काही काळ एक प्रकारचं दडपण माझ्या डोळ्यावर येऊन त्या खोलीचा आकार,त्यातली चमकदार विशिष्ठता, आणि सुस्पष्ठ रंग मला दिसतात. त्या क्षणात मनुष्याची प्रतिष्ठा जास्त प्रकर्शाने दिसते.
शेवटी,मला सांगायचं आहे की मी मुलांचा समर्थक आहे.मला मुलं आवडतात. कारण माझा समझ असा आहे की मुलं अजून त्यांची मानवता, शब्दांचा आणि रिति-रिवाजाचा आधार घेवून त्याचं संरक्षण करणं,एकाकी आशंकेत आणि संदेहात राहणं अशा गोष्ठींचा आधार घेऊन लपवायला शिकली नसावीत. ही मानवता त्या मुलांकडे आहे हे पाहून बरं वाटतं कारण ते उघड दृश्य आहे. मानवजातीला ते वरदान आहे.”
डॉ.परबांची बोलण्याची लकब आणि त्यांना जे काय वाटतं ते अस्खलीतपणे सांगण्याचं कसब पाहून आम्ही जमलेले बरेच जण प्रभावीत झालो.ह्या तरूण माणसाला आपलं भवितव्य गाजवता येईल असं मला वाटलं.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, December 18, 2008

कसे समजावू बलिदान प्राण केल्यावरती

लोक पुसती प्रीति किती तुजवरती
कसे समजावू बलिदान प्राण केल्यावरती

लोक पुसती प्रीति किती तुजवरती
तुच जीवलग अन प्रेम तुझ्या मैत्रीवरती
जीवश्च तू कंटश्च तू जीवलग मैतर तू
मनी जे वसे ते ओळखिशी तू

तुला भेटूनी भासे माझ्या मनाला
आली जवळीक तुझ्या न माझ्या नात्याला
ह्याहूनी उच्चतम असेल का जीवनी प्रीति
कसे समजावू बलिदान प्राण केल्यावरती

अशीच ही दोस्ती दाखवील अपुल्या करामती
एका थेंबातही समावून घेईल प्रीतिसागराती
क्षमता प्रीतिमधली बहर आणीते कळीला
हीरा बनवी चमकावूनी काळ्या दगडाला
तुही माझ्या भाग्याची आहेस दीपती
कसे समजावू बलिदान प्राण केल्यावरती

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com