Wednesday, April 29, 2009

नको करूस तू दूरावा

मनातल्या माझ्या दाहाला
सख्या तू विझवावा
नको करूस तू दूरावा
विसरून जा आता विरहाला

तू जरा भिजावे अन मी भिजावे
तुषारानी कारंजातून गीत गावे
तू न बोलावे अन मी न बोलावे
इशार्‍यातून अपुले भाव समजावे
ह्या रात्री वाट दे तुझ्या संकोचाला
विसरून जा आता विरहाला

हा केशभार अन पदर माझा
सख्या सर्वस्वी आहे तुझा
बाहूत तुझ्या मी पहुडले
भीतीचे विचार आता कसले
ह्या रात्री वाट दे तुझ्या दुःखाला
विसरून जा आता विरहाला



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, April 27, 2009

श्रेष्ठतम मैत्री.

पुरूषोत्तम आणि मी एकाच गावात वाढलो.शाळेत एकत्र शिकलो.हायस्कूलची परिक्षा पास झाल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला शहरात आलो.
मला आठवतं आमच्या सर्व मित्रमंडळीत शरद आणि पुरुषोत्तम यांची पहिल्या पासून गाढी दोस्ती होती.

अलिकडे मी सुट्टीत गावाला गेलो होतो. पुरुषोत्तमची आणि माझी खूप दिवसानी भेट झाली. तो पण आपल्या म्हातार्‍या आईवडलाना भेटायला म्हणून आला होता. एकदा फिरत फिरत आम्ही दोघे आमच्या गावातल्या नदिवर जाऊन जुन्या आठवणीना उजाळा देत बोलत बसलो होतो.
बोलता बोलता शरदची आठवण आली.मी पुरुषोत्तमाला कुतूहल म्हणून विचारलं,
“काय रे आपण सगळे एकत्र खेळायचो.एकत्र शाळेत जायचो.संध्याकाळी सगळे मिळून नदीवर पोहायला जायचो.पण तुझ्यात आणि शरद मधे मला नेहमीच खास दोस्ती दिसायची.तुम्ही दोघे अगदी सख्खे भाऊ कसे एकमेकावर प्रेम करायचा.हे कसं काय?”
पुरुषोत्तमला शरदची आठवण आली.हे मला त्याच्या चेहर्‍यावरून लक्षात आलं. आणि माझ्या ह्या प्रश्नाने त्याला मनापासून शरदच्या जून्या आठवणी काढून मला काही तरी सांगावं असं वाटलेलं दिसलं.

मला म्हणाला,
“मला वाटतं खर्‍या मैत्रीमधे फक्त दोघांमधला विश्वास आणि लगाव ह्यांच्या पेक्षा काही तरी जास्त असतं. एकमेकाच्या बुद्धिचं आदान-प्रदान असतं.खर्‍या मित्रांमधे एकमेकाच्या हृदयाशी संगति असते.एक मित्र जर का सुखी,दुःखी किंवा भयभयीत असला तर दुसरा त्याच्या भावनेचा वाटेकरी असतो. मानवजातितलं हे सर्वांत उच्चतम बंधन असतं.

कोकणातल्या माझ्या राहत्या खेड्यातल्या परिसरात माझा एकच खरा मित्र होता. मी माझ्या आणि त्याच्या जन्मापासून एकमेकाचे शेजारी होतो.त्यावेळी इतर तुझ्या सारख्या बाळगोपाळांसारखं आम्ही पण लहानपणातले खेळ,मस्ती-मजा यामधे आनंद घेत होतो.जरा मोठे झाल्यावर गावातल्या नदीच्या पाण्यात पोहायला शिकलो.
आमच्या बरोबर इतर समवयस्क दोस्त मंडळी पण पोहायला यायची.हे तुला आठवत असेलच.
आमच्या घरात दोन म्हशी,दोन बैल,एक दुभती गाय- कपिला- आणि तिचं लहानसं पाडंस- तानु- अशी जनावरं होती.नदीवर म्हशीना पाण्यात डुबायला आणि धुवायला नेताना आम्ही दोघे म्हशीवर बसून गप्पागोष्टी करीत घरून नदीपर्यंत जात असूं. नदीत डुंबताना आणि पोहून एका किनार्‍यावरून दुसर्‍या किनार्‍यापर्यंत जाताना अनेकदा इतरांशी पोहण्यात चूरस लावित असायचो.
माझा आणि माझ्या मित्राचा-शरदचा- नेहमीच पुढचा नंबर असायचा.
आमच्या दोघांतला दुवा साधायला थोडा वेळ घालवावा लागला.आमचा उन्हाळ्यात विशेषकरून बराच वेळ नदीवर जायचा.सकाळी लवकर उठून-ज्यावेळी इतर आमचे संवगडी अंथरूणात गुडूप झोपलेले असायचे- अशावेळी आम्ही दोघे नदीवर पाण्यात डुबत असायचो. आमच्या दोघातला हा मैत्रीचा दुवा सकाळच्या पोहण्याच्या संवयीने आणि ह्या नदीच्या साक्षीने तो जास्त असामान्य झाला.एकमेकाशिवाय नदीत पोहणं कठीण होत होतं. तेरा वर्षावरचा आमचा तो पोहण्याचा उन्हाळा शेवटचा होता.तो शेवटचा उन्हाळा होण्यासाठी आम्ही काही योजना केली नव्हती. परंतु, त्यावर्षी शरदचा एका गाडीच्या अपघातात शेवट झाला.
तत्क्षणी मला कळून चूकलं की हा अंत होता.तो खास दुवा कष्टदायी होऊन आता तुटला होता.माझं ह्या दुव्याशिवाय आता कसं होणार हे मला कळेना.”
मी म्हणालो,
“हो मला आठवतं,तुला एव्हडा धक्का बसला होता की तू आजारी पडला होतास. शरद गेल्यानंतर तू जवळ जवळ पंधरा दिवस शाळेत येत नव्हतास.एकदा आपले शाळेचे हेडमास्तर तुला बघायला घरी आले होते.आणि त्यानी तुझी समजूत घातली होती.”

“खरंय तुझं म्हणणं”
असं म्हणत पुरुषोत्तम सांगू लागला,
“जसं जीवन पुढे जात होतं तसं मला कळलं की मैत्रीचा हा दुवा कधीच तुटत नाही. आमच्यातला दुवा मृत्युला पण ओलांडून गेला होता.केवळ आम्ही दोघे शेजारी म्हणून हा दुवा नव्हता,तर ते एक पवित्र बंधन होतं.
अजून मी रोज सकाळी उठल्यावर त्याचं स्मरण करतो आणि त्याच्याबद्दलची सहयोगाची भावना माझ्याबरोबर सतत ठेवतो.माझ्या रोजच्या जीवनात त्याचा दुवा आणि त्या नदीतल्या पोहण्याची चूरस ह्या दोन गोष्टी माझ्या यशाला बढावा देते.”

“पण हायस्कूल संपल्यावर आपण सगळेच गाव सोडून शहरात पुढचं शिकायला आलो.”
असं मी त्याला आठवण देत म्हणालो.

“नंतर मी जेव्हा शहरात राहायला आलो,तेव्हा माझ्या लक्षात आलं की,माझ्या दोस्तीच्या दुव्यासारखी आणखी इतरांची पण दोस्ती असते.पण मला वाटत नाही सर्वच लोक तसं मानीत असावे.”
असं म्हणून पुरुषोत्तम बराच सद्गदित झालेला मला दिसला.त्याची समजूत घालण्याच्या इराद्याने मी त्याला म्हणालो,
“परंतु,अशा महत्वपूर्ण मित्राबरोबरच्या दोस्तीने दोघेही चांगले नागरीक बनत असावे. ही महत्वपूर्णता असते म्हणूनच ही दोस्ती नुसत्या दोन व्यक्ती मधल्या विश्वास आणि लगावा पेक्षा जास्त श्रेष्ठतम भासते.”
माझं हे ऐकून पुरुषोत्तमाला खूपच बरं वाटलं.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, April 25, 2009

असं वाटतं की झटकन पावसात ओलंचिंब होऊन जावं.

आज प्रो.देसाई फिरायला येणार नाहीत म्हणून निरोप द्यायला आलेली त्यांची मुलगी वृंदा आणि तिची मैत्रीण मालिनी मला तळ्यावर भेटल्या.मालिनीची माझ्याशी ओळख करून देत वृंदा म्हणाली,
“तुमच्याशी गप्पा मारायला बरं वाटतं.आमचे भाऊसाहेब तर तसं नेहमीच सांगतात.”
हे ऐकून मला अंमळ बरं वाटलं.
“ही माझी मैत्रीण मालिनी.हिला दोन मुलं आहेत एक मुलगी कॉलेजात जाते.”
मी वृंदाला म्हणालो,
“तू म्हणालीस की मालिनीला दोन मुलं आहेत आणि एक मुलगी कॉलेजात जाते.पण हिच्याकडे पाहिल्यावर ही दोन मुलांची आई वाटत नाही.असं हिचं काय गुपीत आहे की ती अशी दिसावी?”
असं बोलून मला एखाद्या विषयावर गप्पा सूरू करायची कल्पना सुचली.
वृंदा मला म्हणाली,
“ते तुम्ही मालिनीलाच विचारा.मला पण त्याचं कुतूहल होतं,पण तुम्ही विचारणं निराळं आणि मी विचारणं निराळं.”
हे ऐकून मालिनी म्हणाली,
“असं काही नाही.माझे विचार तुम्हाला पटतीलच असं काही नाही.पण तुम्ही आता विचारलंत तेव्हा सांगते.
“जोपर्यंत तुम्ही मनाने तरूण राहता तोपर्यंत तुम्ही वयस्कर होणार नाही.”
ही उक्ति मी कुठे वाचली ती आठवत नाही.कसं का असेना हे म्हणणं मला आवडतं आणि त्याप्रमाणे राहण्याच्या मी प्रयत्नात असते.
मी ह्या उक्ति प्रमाणे नेहमीच राहिली नसेन. हायस्कूलच्या पूर्वीच्या लाजवट दिवसात,आणि हायस्कूलच्या अभ्यासाच्या दबावाच्या दिवसात ह्या उक्तिपासून जरा दूर राहिले.हेच ते खरे दिवस की ज्यावेळी आपण प्रौढ होण्याच्या प्रक्रियेत असतो,आणि बालीश मुळीच न दिसण्याच्या प्रयत्न करतो.”
वृंदा म्हणाली,
“अग पण ते दिवस काही कायमचे नसतात.त्यानंतर केव्हडं आयुष्य पूढे पडलेलं असतं.”
मला हा वृंदाचा पॉईन्ट आवडला.
मी म्हणालो,
“मालिनी,एखादा संकल्प करायला तसंच काही तरी कारण किंवा एखादी घटना घडावी लागते.असं मला वाटतं”
“अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोललात.”असं म्हणून मालिनी सांगायला लागली,
“ते वर्ष मला आठवतं की जेव्हा मी माझं जीवन खर्‍या अर्थाने जगायला लागले.
ते आमचे शाळेतले शेवटचे दिवस होते.सर्वजण सुट्टीवर घरी तरी जाणार होतो किंवा आजोळी जाणार होतो.माझी मैत्रीण कविता एका कार अपघातात निधन पावली होती.टिनएजर असलेल्या त्या वयात एखादी मैत्रीण आपल्यातून अदृश्य व्हावी ही विश्वास ठेवण्यासारखी बातमी नव्हती.
कविताचे वडील काय म्हणाले ते माझ्या अजून लक्षात आहे.
“माझी कविता नेहमीच सर्वच करायला घाई घाईत का असायची,हे शेवटी आता माझ्या लक्षात आलं.मला आता समाधान वाटतं की,ती आपलं जीवन असं जगली कारण जरी ते जीवन अधूरं असलं तरी तिने तिला हवं हवं ते करून घेतलं.”

हे त्यांचं बोलणं माझ्या डोक्यात पक्कं शिरलं आणि माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला.
माझ्या लक्षात आलं की मला गणीतात किती गुण मिळाले हे माझ्या स्मृतीत मी कधीच ठेवणार नाही पण जीवनातली सहजता आणि मी माझ्या प्रियजनांच्या स्मृती काहीश्या चांगल्या लक्षात ठेवते.
लहान लहान गोष्टीकडे पहाण्यासाठी माझ्या जीवनाच्या दृष्टीने माझ्या विचाराना मी एकाग्र करून पहाते. लहान असण्यातली जिज्ञासा,आणि भावार्थ,उदाहरण म्हणून सांगायचं झाल्यास, जोरात आलेलल्या पावसाच्या सरीचा निनाद,समुद्राच्या किनार्‍यावरचा लाटांचा आवाज आणि त्या वातावरणातला जीवघेणा गंध,वीजेचा चमचमाट,आणि गावातल्या नदितल्या सळसळणार्‍या पाण्याच्या ओघात घेतलीली पहिली डुबकी.तसंच खुळचंट वाटलं तरी केलेली प्रश्नांची सरबत्ती. जसं आकाश नीळच कां? वगैरे.”
मालिनीचे हे विचार ऐकून मला तिच्या संकल्पाचं कारण समजायला लागलं.
“वा! छान विचार आहेत तुझे” असं मी म्हटल्यावर तिला बरं वाटलं.
ती पूढे म्हणाली,
“माझी आई मला नेहमी म्हणायाची,
“तत्क्षणी वाटणारी गोष्ट कर.”
ते ऐकून मला हंसू यायचं.पण त्यामुळे मला काहीही करायला मुभा मिळायची.दिसताच मी संधी घ्यायची.
माझ्या जीवनात मी यापुढे काय काय करणार आहे ह्याची मला यादी करायची आहे.अगदी अपूर्व गोष्टींची पण यादी करायची आहे. जश्या ताजमहाल पाहाणं, हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन येणं,अश्याच काही जगातल्या नाविन्याच्या गोष्टी पहाणं.आणि जेव्हा जेव्हा मी ह्या यादीत लिहायला जाते तेव्हा ती उक्ति,
“जोपर्यंत तुम्ही मनाने तरूण राहता तोपर्यंत तुम्ही वयस्कर होणार नाही”
हे वाचून बरं वाटतं आणि असं वाटतं की झटकन पावसात ओलंचिंब होऊन जावं.”
हे तिचं शेवटंच वाक्य ऐकून माझ्या मनातला विचार मला रोखून ठेवता आला नाही.

मी तिला चटकन म्हणालो,
“असंच एखाद्या शरिराने पिकलं पान झालेल्या माणसाचं मन मात्र तरूण असूं शकतं.आणि ते प्रत्येक व्यक्तिवर अवलंबून आहे.अलिकडेच मी एका हिंदी गाण्याचं मराठीत विडंबन केलं.तरूण मंडळीने ते ऍप्रिशीयेट केलं.कारण,
“या वयावर असं गाणं लिहिण्याचे ह्यांना विचार कसे सुचतात?”
असा विचार त्यांच्या मनात आला असावा. तसं गाणं मी लिहावं हे त्यांना अपेक्षीत नसावं.आणि ते स्वाभाविक आहे.
एका वाचकाने प्रतिक्रियेत चक्क लिहिलं,
“पिकल्या पानाचा देठ की हिरवा..”
हे वाचून मला गंमत वाटली.
“पिकलं पान” पूर्वी कधीतरी “हिरवं पान” होतं,त्यामुळे “हिरवं पान ” कसं असतं हे पिकल्या पानाला नक्कीच जाणवलेलं असतं.पण उलटं मात्र खरं नाही.

-reverse is not true-.
जे काही आत्ता असलेल्या हिरव्या पानाला पिकल्या पानाबाबत माहित असतं ते बरंचसं myth-मिथ्या- किंवा कल्पित असतं.कारण ते अनुभवलेलं नसतं. सर्वच गोष्टी समजण्यासाठी अनुभवायला हव्यात हे जरी जरूरीचं नसलं तरी काही गोष्टी अनुभवणं आवश्यक असतं.
जशी वेळ निघून जाते तशी त्या हिरव्या पानाची हिरवट कमी होते,क्लोरोफील कमी झाल्याने ते पिवळं दिसायला लागतं.त्या पिवळ्या पानाचा हिरवा देठ अगदी शेवटी शेवटी पिवळा होतो आणि नंतर पान सुकून गळतं आणि खाली पडल्यावर त्याच पानाला पाचोळा म्हणतात.तो देठ हिरवा असे पर्यंत नव्हे तर पिवळा झाला तरी गळून पडेपर्यंत अगदी हिरव्या पानाच्या बरोबरीत ते पिवळं पान त्या झाडाच्या फांदीवर असतं.सकाळच्या कुंद हवेतल्या त्या दंवबिंदूना सावरणं,पहाटेच्या त्या हळूच येणार्‍या अश्या वार्‍याच्या झुळकीबरोबर डुलणं,हे चालूच असतं.
म्हणून वाटतं मालिनी,
“पावसातलं ओलंचिंब होणं”
असं वाटत राहणं हेच तरूण मनाचं द्योतक आहे.माझ्या सारख्या दुसर्‍या एखाद्याला आता या वयावर वाटणं सोडूनच दे मनांत आणणं पण कठीण आहे.कारण तुझी ती उक्ति,
“जोपर्यंत तुम्ही मनाने तरूण राहता तोपर्यंत तुम्ही वयस्कर होणार नाही.”
त्याने पण वाचली पाहिजे.
तू अशी का दिसतेस त्याचं गुपीत मला कळलं.”




श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, April 23, 2009

झुणका खाल्ला रे बोरीवलीच्या हाटलामधे

आज सकाळी ट्रेड्मीलवर व्यायाम करीत होतो.कानाला इयरबड्स लावून आयपॉडवर हिंदी सिनेमानतली गाणी ऐकत होतो.
“झुमका गिरा रे बरेलीके बाजार मे”हे गाणं कानावर पडून मनात दुसरेच शब्द गुणगुणायला लागले “झुणका खाल्ला रे “

आणि नंतर त्या मुळ गाण्याचं विडंबन केल्यावाचून मला राहावेना.मग म्हटलं लिहायचंच.लिहिता लिहिता शब्द सुचत गेले.आणि गाणं तयार झालं.

झुणका खाल्ला रे
हाय
झुणका खाल्ला रे बोरीवलीच्या हाटलामधे
झुणका खाल्ला झुणका खाल्ला झुणका खाल्ला
हाय हाय हाय तिखट झुणका खाल्ला रे



सख्या आला नजर चुकवून खोलीत चोरी चोरी
म्हणे मला ये भरवतो तुला माझ्या लाडक्या पोरी
मी म्हणाले नको करू रे कसली तरी बळजोरी
किती विनवीले तरी सख्याने केली मला जबरी
हाय केली मला जबरी

मग काय झालं?

मग? मग झुणका खाल्ला रे दोघांच्या मर्जीमधे
झुणका खाल्ला रे बोरिवलीच्या हाटलामधे



गच्चीवर मी उभी अन खाली सख्याची गाडी
हंसत बोलला ये ग! खाली नेसून रंगीत साडी
फेक तुझी आंगठी किंवा दे सल्ल्याची निशाणी
गच्चीवरती उभी उभी मी शरमूनी झाले पाणी
हाय शरमून झाले पाणी

मग काय झालं?

देवाss! मग झुणका खाल्ला रे दोघांच्या प्रीतिमधे
झुणका खाल्ला रे बोरिवलीच्या हाटलामधे



बगीच्यामधे प्रियाने माझी घेतली एक फिरकी
पदर माझा ओढून म्हणतो मनात माझ्या भरली
नजर फिरवूनी मी पण तेव्हा गप्प जरा राहिली
हाय गप्प जरा राहिली
नजर वळवूनी गप्प राहूनी हळूच मी हंसली
सजणाशी मग छेडूनी मजला झाली हाथापायी
हाय झाली हाथापायी

मग काय झालं?

मग? झुणका खाल्ला रे मी सांगू कसं ते शब्दांमधे
झुणका खाल्ला रे बोरिवलीच्या हाटलामधे



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, April 21, 2009

जेव्हा डोळे पाणावतात.

जेव्हा डोळे पाणावतात.

मनोहरच्या आणि माझ्या नेहमीप्रमाणे गप्पा चालल्या होत्या.
“अलिकडच्या मुलांना शाळा कॉलेजात इतका अभ्यास असतो,की मान वर काढायला वेळ मिळत नाही.कारण तशी समाजात जिकडे तिकडे चूरस चालली आहे.मग लाखोनी शिकणार्‍या मुलांच्या परिक्षेत आणि पुढच्या करिअरमधे तशीच चूरस कायम राहिली तर त्यात नवल काय.?”
असं मनोहर मला म्हणाला.
मनोहरचं म्हणणं अगदी खरं वाटलं मला.जसजसं जग पुढे चाललं आहे तसतसं बदल हा होतच राहणार.आमच्या वेळेला असं असं होतं म्हणून आताही तसंच असलं पाहिजे हा काही प्रगल्भ विचार म्हणता येणार नाहीत.
“आमचे आजी आजोबा आणि आम्ही ह्या मधलं नातं,जवळीक,ह्या गोष्टी त्यावेळच्या त्या समाजाच्या जडणघडणीवर बर्‍याचश्या अवलंबून होत्या.ते त्यावेळच्या वातावरणात शोभून दिसायचं.पण अलिकडे जरी दुनियादारीच्या घाई गर्दीत तसंच वातावरण ठेवता नाही आलं,तरी माणसा-माणसा मधली ओढ,लपून छपून कुठेतरी वर उचंबळून येतेच.”
मनोहरला असं सांगून काही तरी नवीन घटना माझ्याकडे उघड करायची होती हे मी तेव्हांच ताडलं.
मला म्हणाला,
“माझ्या ताईची सासू अलिकडेच वारली.तिला मी भेटायला म्हणून गेलो होतो.ती घरी नव्हती पण तिची एकुलती एक मुलगी सुलभा एकटीच घरी होती.
सुलभाची आजी गेल्याचं सुलभाला बरचसं मनाला लागलेलं दिसलं.”
ती मला म्हणाली,
“ह्या वेळी दिवाळी संपता संपता उजाडलेली ती उदासिनता आणणारी सकाळ मला आठवते.मी शाळेत जाण्याच्या तयारीत होते आणि तशी चिंता करण्यासारखं काहीही उगवत्या दिवसाने माझ्या समोर आणून ठेवलं नव्हतं. तेव्हड्यात फोनची घंटा वाजली.

माझी आत्या मला म्हणाली की आजीला कसंस वाटतंय म्हणून तिला हॉस्पिटलमधे घेऊन जावं लागणार आहे.मला मनात थोडा धक्का बसला.कदाचीत आजी मला पुन्हा भेटणार नाही अशी चिंतेची पाल मनात चुकचुकली.

खरं तर आजी हॉस्पिटलात गेल्यानंतर जवळ जवळ आठ एक दिवसानी तिचं निधन झालं.तिला घरी आणली आणि तिचं शेवटचं कार्य करीत असताना पाहून मला जरासुद्धा रडूं आलं नाही.माझी आई, आत्या आणि काका खूपच रडत होते,दुःखकरून मुसमुसून रडत होते.परंतु,माझ्या डोळ्यातून एक टिप ही आलं नाही.”
मी सुलभाला म्हणालो,
“अगं,तुला तर आजी खूप आवडायची.तुझ्या लहानपणी मी पाहिलंय तू आणि आजी कितींदा खरेदीला गेलेल्या दिसायचा.”
“ माझी आजी मला आवडायची. पण मी जेव्हा ह्या अभ्यासाच्या रामरग्याड्यात अडकले तेव्हा तिच्याशी जवळीक केली नाही.”
असं म्हणून सुलभा तिची आजी गेल्याच्या त्या दिवसाच्या घटनेचं वर्णन करीत म्हणाली,
“जेव्हा बाकी सर्व रडत होते,दुःख करीत होते,त्यावेळी माझं आणि माझ्या आजीचं नातं ह्याचा मी विचार करीत असता मला आठवलं की तिच्या लहानपणाच्या दिवसा विषयी मी तिला कधीच विचारलं नाही.तसं न केल्याने मला बरंच दुःख झालं.

आणखी काही जून्या गोष्टी आजी कडून ऐकायच्या असतात त्या मी तिला विचारून घेऊन ऐकू शकले नाही.मी असं का करू शकले नाही याचा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी ह्या गोष्टीची चिंता केली नाही.मला त्यावेळी वाटायचं की मी आणखी थोडी मोठी झाल्यावर तिच्याशी जवळीक साधीन आणि तोपर्यंत मी थोडी पोक्तपण होईन.”

मी तिला म्हणालो,
“आता होऊन गेलेल्या गोष्टी बाबत खंत करण्यात काय उपयोग.माणसाची चूक होते.”
“म्हणून तर माणसाने चूकीतून सुधारलं पाहिजे.तिच चूक किंवा तसलीच चूक पुन्हा करणं म्हणजे आपल्याला माणूस म्हणून घेणं बरोबर नाही.”
“मग तुझं आता काय म्हणणं आहे?”
हा माझा प्रश्न पूरा होण्यापुर्वीच सुलभा मला म्हणाली,

“तथापि माझ्या ध्यानात आलं की माझा मोका मी घालवून बसले आणि याउप्पर आता मला कधीही हा मोका मिळणार नाही.तत्तक्षणी माझ्या लक्षात आलं की मी सचेत राहिलं पाहिजे.यदा कदाचीत माझं एखादं जवळचं माणूस असंच सोडून गेलं तर ही परिस्थिती येऊं नये म्हणून. अवतीभवती असलेल्यांबरोबर मी माझा थोडा वेळ खर्च करायला हवा.मी यातून शिकले की आला मोका साधला पाहिजे.ह्यासाठी मला त्यांच्याशी परिचित राहिलं पाहिजे.जीवनातला प्रत्येक क्षण संपादित करायला ह्याची जरूरी आहे.जे उदास असतील त्यांना दिलासा दिला पाहिजे, माझ्या आईला घरकामात मदतीचा हात पुढे केला पाहिजे,कुतूहल करून सहानुभूतिपूर्वक प्रश्न विचारून खरंच त्या व्यक्तिबद्दल चिंता दाखविली पाहिजे.”

खरोखरच सुलभाचे हे विचार ऐकून मी तिला पाठीवर शाबासकी देत म्हणालो,
“सुलभा, असं केल्याने तू अप्रत्यक्षपणे आजीला श्रद्धांजली दिल्यासारखीच होईल.”

“माझ्या आजीचं शेवटचं कार्य होत असताना मी मला बदललं.त्या अपूर्व क्षणापासून मी इतरांबद्दलची चिंतेची धारणा माझ्या मनात पक्की केली.ह्यापुढे कुणावर मी प्रेम करावं आणि त्यांच्या सानिध्यात राहावं ह्याची संधी मिळाल्यावर तो मोका हातातून सुटू देणार नाही असं मनात पक्कं केलं.”
तिला रडूं कोसळणार ह्याचा अंदाज बघून मी तिला जवळ घेत म्हणालो,
“वेडी रे वेडी,खूप मनाला लावून घेतलंस”
हुंदके देत देत मला बिलगून म्हणाली,
“माझ्या आजीला उचलून घेऊन जाताना पाहून मी खूप रडले.”
“हे ऐकून माझेही डोळे पाणावले.”
आणि मनोहरकडून हे ऐकून माझे पण.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, April 19, 2009

तारीफ करू का त्याची

हा चंद्रमुखी चेहरा
केसाचा रंग सुनेहरा
हे नीळसर नीळसर डोळे
हे लक्षण असे वेगळे
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची



कथा पुराणी तुझी
जाते ऐकवीली सदाची
तुला पाहूनी मानिले
योग्य असे जे ऐकले



ते मुरडत मुरडत चालणे
ते जादू टोणा करणे
शतःदा मी संभाळणे
मन काबूत ते नसणे
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची



लाली सकाळच्या किरणाची
रंगीत शोभा गालावरची
संध्याकालीन अंधाराची
जणू छाया ही केसाची
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची



तू तूडूंब नदी पाण्याची
दुधाळलेल्या फेसाची
मजा असे डुबण्याची
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची



मी शोधीत असे मंदीर
मंदीर माझ्या समोर
दूर कर हा पडदा
निघू दे हा अंधार



हे लाडीक लाडीक वागणे
मज करिते पुरे दिवाणे
तुज भरून पाहूदे मला
तो मस्त तुझा चेहरा
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, April 17, 2009

मरण्यातही कौशल्य आहे,अगदी अतिरिक्त गोष्टी असतात तसंच.

प्रो.देसायांना थोरला भाऊ आहे हे मला हल्लीच कळलं.काल प्रो.देसाई मला म्हणाले,
“माझा थोरला भाऊ माधव काही दिवस माझ्याकडे राहायला येणार आहे.आल्यावर मी त्याला नक्कीच तळ्यावर घेऊन येतो.”
कीडकीडीत शरिरयष्टीचे,काठीचा आधार न घेता चालणारे भाऊसाहेबांचा जुळाभाऊ वाटणारे माधव, भाऊसाहेबांपेक्षा दहा वर्षानी मोठे होते.पंचायशी वर्षावर त्यांची ठणठणीत प्रकृती पाहून मी त्यांना म्हणालो,
“तुमचं वय तुम्ही सांगितल्यावर मला कळलं. नाहिपेक्षा तुम्ही एव्हड्या वयाचे दिसत नाही.उलट भाऊसाहेब तुमचे मोठे भाऊ शोभतात.”
माधव मला म्हणाले,
चालंय,इतके दिवस काढले त्यात आणखी थोडे दिवस काढायचे.मी एक दिवस मरणार आहे हे निश्चित.आता मी मेल्यानंतर स्वर्गात जाईन की नरकात हे मात्र मला माहित नाही.किंवा कुणा दुसर्‍याची कुडीत जन्म घेईन किंवा कसं.किंवा नष्ट होऊन राख आणि मातीच्या रुपात निघून जाईन.पण एव्हडं मात्र नक्की त्यानंतर “मी” नसणार,कारण माझं शरिर,मन,आणि माझ्या स्मृति काय ते मला माहित झालं आहे.काहीही होवो,कसलाही माझा जीव असो,ज्याला रुढ अर्थाने आपण”अहम” म्हणतो किंवा ज्याला आपलं “मीपण”म्हणतो ते दारूण क्षणभंगूर असतं,ते कालांतराने संपूर्णपणे व्यतीत होतं. कुणाचं तरी स्वप्न असावं जणूं.”
“मला तुम्हाला कॉम्प्लीमेंट्स देण्याच्या दृष्टीने म्हणायचं होतं.आपण दीर्घायुषी व्हावं असंच मी देवाला म्हणेन.”
माझं हे ऐकून माधव जे मला सांगायला लागले ते त्यांचं सांगणं ऐकून घेणं मला क्रमप्राप्तच होतं.कारण प्रो.देसायांची सांगण्याची लकब,ऐकणारी व्यक्ति ही जणू आपला विद्यार्थी आहे,असं समजून विषयाला धरून सांगोपांग अर्थ विशद करण्याची हातोटी हे सर्व गूण ह्यांच्यात उतरले होते.भाऊसाहेब सुद्धा मला हाताने खुणवून ते काय म्हणतात ते शांतपणे ऐकण्याचा इशारा देत होते.
माधव म्हणाले,
“प्रत्येकाला माहित आहे की,जीवन हे एका क्षणात झालेलं असतं,ज्याला सुरवात, मध्य आणि शेवट आहे.माझ्या तरूण वयात मला वाटायचं,की जीवानाला अंत आहे. पण ही निकृष्ट निंदेची उपधी मला लागू आहे असं वाटत नसायचं.
पण ज्यावेळी मला एक असाध्य रोगाची बाधा झाली आहे हे कळलं तेव्हा मी चांगलाच बदललो.असं मला वाटतं. मनोवैज्ञानीक,तत्वज्ञ आणि कलाकारानी हजारो वर्षे चिंतन करून मृत्युची ही एक चिंताजनक मर्यादा आपल्या आकांक्षां समोर आणि आपल्या यत्ना समोर आणून ठेवली आहे.”
मी त्यांना मधेच रोखत म्हणालो,
“म्हणजे आयुष्यात एखादा टर्निंग-पॉइंट आला की मग माणसाचे विचार बदलतात असं वाटतं.”
“हो तुम्ही अगदी बरोबर बोललां”
असं म्हणत माधव पूढे सांगू लागले,
“मी ज्यावेळी तरूण होतो,तन्दुरूस्त होतो,साहसी होतो आणि चिरस्थायित्वावर विश्वास ठेवायचो आणि त्यावेळी जसं प्रफुल्लीत वाटायचं त्यापेक्षां आता कमी वाटायला लागलं असून, मृत्यु माझ्या सानिध्यात आहे हे जास्त भासायला लागलंय.

त्या माझ्या प्रफुल्लीत तारूण्यात जीवन मला कमी मोहक वाटत नव्हतं.ते आता वाटायला लागलं आहे. कारण माझीच कमजोरी माझ्या जवळच बसून असते. जरी माझी मी धारणा बदलली तरी माझं जीवन मला कमी किमतीचं भासत नाही. आत्ताच तर माझ्या शांती आणि खुशीवर उदासिनतेच्या रंगाची छटा आली आहे त्या उदासिनतेबद्दल माहिती असण्याची पूर्वी मला गरज भासली नाही,आणि माहिती करून घेण्याची आवशक्यता ही नव्हती. जीवन जगण्यात माझी भुमिका त्या ऋतुमधे येणार्‍या फुलांसारखी आहे मोसम संपल्यावर नव्या फुलांना वाट करून द्यावी तशी.तरी पण मला सोडून जावसं वाटत नाही.”
त्यांचे हे विचार ऐकून मला जरा त्यांच्या चिंतनात स्वारस्य घ्यावंसं वाटलं.मी त्यांना म्हणालो,
“तुम्ही फारच छान सांगता.तुम्हा दोघा भावामधे ह्या बाबतीत तरी काही फरक वाटत नाही.तुमच्याकडून आणखी ऐकावं असं वाटतं.”
मी असं म्हणण्याचीच फुरसद त्यांना हवी होती.
लागलीच माधव म्हणाले,
धारणा असणं ही एक गमतीदार गोष्ट आहे.तो सत्याचा स्विकार असतो.सत्य किंवा मत यांच्या निश्चिततेचा तो आभास असतो.इथे सत्य स्विकारणं महत्वपूर्ण आहे.मला वाटतं ही स्विकाराची वृत्तीच मला बदलूं शकली. अदृश्य होण्याच्या किंवा नष्ट होण्याच्या स्थिती जवळ मी येऊन ठेपलो असताना तसं होणार हे मी आता मानायला लागलो आहे. नष्ट होणं हा प्रस्थापित विचार आता मी नीष्टा राखून स्विकारायला लागलो आहे. ते सत्य मी स्विकारायला लागल्याने ते सत्य आता माझ्या धारणेचा आधारस्तंभ झाला आहे.”
भाऊसाहेब मधेच म्हणाले,
“अरे माधव,पण मला एक आठवतं की निसर्ग विनाशाबरोबर उत्पतीची पण सांगड घालीत असतो.” असं तुच एकदा म्हणाला होतास.”
“अजुनही मी तेच म्हणतो.”
असं म्हणत माधव पुढे म्हणाले,
“त्यामुळेच ह्या धारणेविषयी मी क्षणोक्षणी जास्त अभिज्ञ राहिलो आहे की जेव्हडा मी पूर्वी नव्हतो. मृत्युच्या निश्चिततेच्या अभिज्ञतेमुळे ते क्षण काही जास्त म्रुदु झाले अशातला भाग नाही.परंतु,त्यामुळे मला नसण्यापेक्षां असण्यावर जास्त लक्ष केंद्रित करायला सहाय्य मिळालं.मृत्युबद्दल मिळालेल्या बोधाने माझं जीवन सुखकर झालं नाही.परंतु,त्याने मला स्मरण करून दिलं आहे की हा मृदु श्वास किंवा ही पावसाची सर,हे प्रेमाचं अलिंगन,ह्या किरंगळीतल्या वेदना ही सर्व माझी सदासर्वदाची अनुभूति आहे.मृत्यु मला असं स्मरण देतो की-
” हे जीवन इरादा ठेऊन सर्वांना शिकवतं, काय तर -जग.ह्या क्षणी आणि क्षणोक्षणी.”
मनात मी म्हणालो,
“जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com