Monday, May 28, 2012

बाठा चोखून खपेल का?


रघूनाथला जाऊन आज एक वर्ष झालं.आज त्याची आठवण आली.आंब्याच्या राजाचीपण आठवण आली.हापूस आंबे बाजारात यायला लागले असतील.
रघूनाथ हे जग सोडून जाण्यापूर्वी माझ्या घरी आंबे खायला आला होता.त्याला मी त्यावेळी म्हणालो होतो.


"तुझ्यापासून आंबा मला लपवून ठेवता येणार नाही हे मला माहित आहे.”

ते मी त्याला बोललेले शब्द शेवटचेच ठरले.सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.
आज आंब्याची पेटी उघडल्यावर रघुनाथची प्रकर्षाने आठवण आली.रेडीओवर मालती पांडे यानी गायलेलं,गदिमाचं गाणं लागलं होतं.

“लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?”

लगेचच माझ्या कवीमनाला रहावलं नाही.ह्या गाण्याचं “विम्बलडन” सुचलं.
माझ्या मित्राला, रघुनाथाला मी ते गीत अर्पण करतो.
जणू रघुनाथच मला सांगतोय कवितेतून,

लपविलास तू हापूस आंबा
सुगंध त्याचा छपेल का
बाठा चोखून खपेल का?

जवळ फळे पण दूर ते सूरे
दात शीवशीवे जीभ सरसरे
लपविलेस तू जाणूनी सारे
रंग फळाचा छपेल का?

क्षणात बघणे,क्षणात लाजणे
मनात हवे पण,दिखावा नसणे
ही खाण्याची खास लक्षणे
नाही म्हणाया जमेल का?

पुरे बहाणे,आतूर होणे
मित्रा,तुझिया मनी खाणे
मित्रहि जाणे,मी पण जाणे
आंबा छपविणे सुचेल का?

श्रीकृष्ण सामंत  (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, May 21, 2012

सरतेशेवटी




सुगंध त्याचा दरवळला
उजळूनी जुन्या आठवणी
पाकळ्यावरचे ते थेंब दवांचे
आणिती डोळ्यात पाणी


सरतेशेवटी माझी पत्नी सुधार सेंटरवरून गेल्या आठवड्यात घरी परत आली.घरातल्या सर्व कुटूंबियाना,मित्र मंडळीना खूप आनंद झाला.
तिच्या पायाची सूज कमी होण्याची औषधं देऊन,सर्वांगाला,विशेषतः पायाना योगय तो भरपूर व्यायाम देऊन तिला वॉकरवर चालण्याईतपत  तयारीकरून डिसचार्ज देण्यात आला.

घरी आल्यानंतर यापुढे दोन महिने एका केअरटेकर कंपनीचे ओ.टी(ऑक्युपेशन थेरपी),पी.टी.(फिझीकल थेरपी)ची मंडळी आमच्या घरी येऊन तिला जमेल तेव्हढी इंडीपेन्डट करण्याचा प्रयत्न करणार.हा त्यांचा पुढील दोन महिन्याचा प्रोग्राम राहिल.तिच्या वयोमानाकडे लक्ष देऊन,तिच्या शरीराच्या बळाकडे लक्ष देऊन हे सर्व केलं जाणार.
आमच्या मुलांनी(मुलगी,मुलगा,जावई,सून आणि नातवंडं)ह्यांनी घेतलेले परीश्रम आणि इतर मित्र मंडळी आणि नातेवाईकानी दिलेल्या शुभेच्छा ह्यामुळेच हे असं घडू शकलं ह्यात संदेह नाही.

माझी पत्नी घरी आल्याच्या दुसर्‍या दिवशीच्या सकाळी, माझ्या मुलीने घरामागच्या बागेत जाऊन गुलाबाच्या झाडावरचं नुकतच फुललेलं सुगंधीत तांबडं फूल आणून आपल्या आ़ईच्या हातात देऊन तिचं स्वागत केलं.

माझी पत्नी घरी नसताना मला पहाटे पहाटे,आशेची निराशेची,स्वप्न पडायची.माझ्या पत्नीच्या हातातलं तिच्या मुलीने दिलेलं ते गुलाबाचं फूल पाहून माझं एक स्वप्न मला आठवलं आणि त्याबरोबर एक कविता सुचली.

आपल्यावर रागावून गेलेलं एक माणूस पुन्हा कधीतरी आपल्याला भेटायला आल्यावर प्रथम नक्कीच एक फुल देऊन स्वतःला अन मला आनंद देणार असं नेहमीच वाटणार्‍या मला पहाटे एकदा स्वप्न पडतं.आणि मग…..

हरवलेले फूल आणून देताना
जेवढा तुला आनंद झाला
दुप्पटीने झाला आनंद मला
फुल ते हातात घेताना

सुगंध त्याचा दरवळला
उजळूनी जुन्या आठवणी
पाकळ्यावरचे ते थेंब दवांचे
आणिती डोळ्यात पाणी

क्षणभरचे ते स्वप्न पहाटेचे
करीते काम विलोभण्याचे
कुठले फूल अन कुठला सुगंध
जाईन पुन्हा त्या स्वपनात
होईन मी पुन्हा आनंदाने धुंद



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Monday, May 7, 2012

हिच खरी समस्या असे जीवनाची






सांजवेळी आली आठव सजणाची
हिच खरी समस्या असे जीवनाची


ओठावरती ढंग आणिला हास्याचा
विस्मरूनी सजणा हर्ष आणिते क्षणाचा
अचानक हे काय झाले
चेहर्‍यावरी रंग चढला विषादाचा


केला अहंभाव दूर असताना
ठेविले दूर अंतरातून सजणाला
करूनी यत्न विसरले विषादाला
परी जाऊनी दूर विनाश घेऊनी आला


सांजवेळी आली आठव सजणाची
हिच खरी समस्या असे जीवनाची




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Saturday, April 28, 2012

ग्वाही




त्या दिवशी सेंट्रल रेल्वेचा संध्याकाळच्या वेळी काहीतरी घोटाळा झाला होता.प्रथम गाड्या अर्धातास लेट चालत आहेत अशी अनौन्समेंट झाली आणि नंतर काही अनौन्समेंटच होईना.सीएसटी-व्हीटी-स्टेशनात शिरतानाच मी आत गर्दी पाहून अंदाज केला होता की काहीतरी गडबड आहे.


मला माझ्या मेहुणीच्या घरी ठाण्याला जायचं होतं.थोडा वेळ विचार केला आणि जरा जवळच्या बाकावर बसावं म्हणून बसायला गेलो तर माझ्या शेजारी ललित बसला होता हे मी चटकन ओळखलं.त्यानेही मला ओळखलं.


त्याने चटकन उठून मला अलिंगन दिलं.आणि म्हणाला,
"आजचं गाड्यांचं काही खरं नाही.आपण थोडावेळ बाहेर जाऊया आणि गप्पा मारूया."
मी चटकन होकार दिला.आणि समोरच्या केळकरांच्या हॉटेलमधे शिरलो.दोन कप चहा मागवून आमच्या गप्पा सुरू झाल्या.


ललित त्याच्या लहानपणी आमच्या समोरच्या बिल्डिंगमधे रहायचा.बरेच वेळा तो त्याच्या घरात सापडण्या ऐवजी त्यांच्या शेजारच्या घरात दिसायचा.चंद्रकात आणि शारदा मांढरे हे त्यांचे शेजारी होते.त्यांना एक मुलगी होती नाव मोगरा.तिला ललित मोगराअक्का म्हणायचा.

बर्‍याचश्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.गप्पांच्या ओघात मी त्याला विचारलं,
"तुझे ते मांढरे शेजारी कसे आहेत?"
इतका वेळ मजेत गप्पा मारणारा ललित जरा गप्प झालेला मला दिसला
ललितने मला पटकन उत्तर दिलं नाही.त्याला उत्तर देणं कठीण होत होतं असं मला दिसलं.


पण थोडावेळ थांबून मला म्हणाला,
"मला जे वाटत आहे ते मी ह्या क्षणी सांगत आहे.माझा आशेवर विश्वास आहे.आशा हे एक प्रकारचं इंजीन आहे जे जीवनाची गाडी गतीत ठेवीत असते.ती शरीरातली ज्योत आहे जी माणसाला कार्यरत ठेवीत असते.मला माहित आहे की हे मी माझ्यासाठी सांगत आहे.माझी कहाणी ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल की मी का असं म्हणतो."
ललितची ही प्रस्तावना ऐकून मी जरा संभ्रमात पडलो.मी त्याला म्हणालो,
"माझ्या प्रश्नाने तुला उत्तर द्यायला त्रास होत असेल तर नको सांगू"


"नाही, नाही तसं काही नाही.उलट तुम्ही प्रश्न केला ते बरंच झालं.मला जरा तुमच्याकडे ओघ घालवायला बरं वाटेल."
असं म्हणून पुढे सांगू लागला.


"माझ्या लहानपणी दोन व्यक्ती माझ्या जीवनात आल्या होत्या ज्यांनी मला सदैव प्रेरित केलं.त्याचवेळी मी ताडलं होतं की हे माझे जीवनभरचे मित्र रहातील.चंद्रकांत हे खरे पुरूष होते.ते विमानाचा पायलट होते.घरच्या कंप्युटरवर ते मला बरोबर घेऊन फ्लाईट सीम्युलेशनचे धडे घ्यायचे.त्यांची पत्नी,शारदा ही चांगली वकील होती.त्याशिवाय तिला बागेत काम करून निरनीराळी फुलं लावायचा छंद होता.माझे आईवडील कामात असताना हे माझं शेजारी युगूल मला नेहमी कामात व्यस्त ठेवायचं.


त्यावेळच्या माझ्या त्या जीवनात मला मस्त मजा यायची.पण एकेदिवशी मला मरण काय असतं ते कळलं.
त्याचं असं झालं की,तो शनिवारचा दिवस होता.मी आणि माझे बाबा टीव्हीवर एक चित्रपट पहात होतो.आणि आमच्या दारावरची घंटी वाजली.


दार उघडल्यावर आमच्या समोर एक माणूस उभा राहिलेला दिसला.तो एका वर्तमान पत्राचा रिपोर्टर होता.त्याच्याकडून कळलं की माझे हे शेजारी त्यांच्या एका मित्राबरोबर प्रवासात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात ही दोघं कालवश झाली.ती माझी बालपणातली मजेची आणि आनंदाची वर्षं आता माझ्या जवळ स्मृती म्हणून राहिली आहेत.


पण जसा काळ पुढे जात होता तशी नवी आशा निर्माण होत होती.चंद्रकांत आणि शारदेला एक मुलगी होती, मोगरा.अलीकडेच तिचं लग्न झाल्याचं मला कुणीतरी सांगीतलं.ती जरी दिल्लीला रहात असली तरी आपल्या आईवडीलांच्या दुःखद निधनानंतरही ती आम्हाला भेटायला यायची.अलीकडेच त्यांना एक मुलपण झालं आहे.तिचं नाव त्यांनी कमळ असं ठेवलं होतं.दिसायला खूपच गोड आणि दुडूदुडू धावणार्‍या कमळला बघून खूप मजा यायची.कमळ जसजशी मोठी होत गेली तशी ती एका नव्या पिढीची आशा ठरत होती.


मला एक जुनं गाणं आठवतं.त्याचं शिर्षक होतं "ग्वाही"
आशेचं तो एक रुपकालंकार होता.

ऐकता नवजाताचे रुदन
अथवा
पिंपळ पानाचे स्पंदन
अथवा
विशाल नीळे गगन
नकळत मिळे ग्वाही
अन
समृध्द होई जीवन

जीवनाचं सार ह्यातूनच प्रस्तुत व्हायचं.
माझ्या शेजारांची झालेली दुर्घटना ज्यावेळी माझ्या आठवणीत यायची त्यावेळी,कमळाकडून मला भविष्यातल्या आशेची आठवण करून दिली जायची.
दिवाळीतल्या गोड जिन्नसातल्या करंजीतल्या गोड सारणा सारखी ही कमळ मला वाटायची.


मोगराअक्काने आता आणखी एका बाळाला जन्म दिला आहे.
छोटीशी मुलगी झाली.तिचं नाव तिने आशा ठेवलं आहे.
काय हा जीवनातला जोश म्हणावा.
सूर्य उगवून नव्या दिवसाला जन्म देतो.मला वाटतं जग सुंदर आहे."
असं म्हणून ललित थोडावेळ गप्प राहिला.माझ्या प्रश्नाने त्याला मी जुन्या आठवणीचा उजाळा दिला असं मला वाटलं.कारण तो बराच भावनावश  झालेला मला दिसला.


मी म्हणालो,
"मला माहित आहे तू मांढरे कुटूंबियाना किती मानायचास ते.त्यांची अशी ट्रॅजडी ऐकून त्यावेळी तुला काय दुःख झालं असेल ह्याची कल्पनाही करवत नाही.एव्हडे तुझे त्यांचे संबंध होते.पण तू फारच सकारात्मक विचार करून तुझ्या आठवणीना विसर पाडत असावास.सॉरी हं.मी तुला डिस्टर्ब केलं."

"तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.माझा ओघ मी घालवला.अमंळ हलकं वाटतं."
मला ललित म्हणाला.आणखी हातावरच्या घड्याळाकडे पाहू लागला.


तेव्हड्यात हॉटेलात कुणीतरी बोलताना ऐकलं की गाड्या चालू झाल्या.आम्ही लगेचच उठलो आणि स्टेशेनकडे वळलो.मी मात्र ठाण्याला माझ्या मेव्हुणीकडे जाण्याच्या विचार बदला.अगोदरच उशीर झाला होता.मी दादर स्टेशनवर उतरलो आणि वेस्टर्न रेल्वे घेऊन अंधेरीला गेलो.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Tuesday, April 24, 2012

त्या मेघासम तू भासते.



राहून सामील सर्वांमद्धे
राहशी तू नामा वेगळी
केवळ माझ्याशीच नसून
राहशी स्वतःशीही आगळी


मान उंचावून नजर उठते
कुणासाठीही झुकत नसते
नासिकेतून श्वसन वाढते
कुणासाठी अडत नसते
काही केल्या जो थांबत नाही
त्या वार्‍यासम तू भासते


केशपाश तुझा लहरत राही
पदरा आड तो छपला जाई
ओठ तुझे हलकेच थरथरती
दाता खाली दबले जाती
कोसळेल वाटूनी जो बरसत नाही
त्या मेघासम तू भासते



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, April 20, 2012

सिनेस्थेसीया नावाची व्याधी


"फुलबागेत न फुललेलं
मी एक क्षुल्लक फूल आहे."


विश्राम मेढेकर माझा जूना शाळकरी मित्र.मला आठवतं तो लहानपणापासून छान कविता लिहायचा.त्याला शाळेत कवी विश्राम म्हणूनच संभोदायचे.
अलीकडेच मी त्याला दादर स्टेशनवर भेटलो होतो.गर्दीतच त्याने मला हाक मारली.तो चर्चगेटवरून येणार्‍या गाडीतून उतरला होता.मला म्हणाला,
"चल आपण बरेच दिवसानी भेटलो आहो, मामा काण्यांचा बटाटावडा खायला जाऊया.खूप दिवसानी भेटलास जरा लहानपणाच्या गप्पा मारायला मुड आला आहे."

मला कुणी आग्रह केला तर त्याचं मन मला मोडवत नाही.आम्ही एक एक कप गरम चहा आणि बटाटावडा मागवला. बटाट्यावड्याबरोबर लालबूंद सुकी चटणी मिळते ती मला खूप आवडते.मामा काण्यांचा मोठा मुलगा बापूसाहेब काणे माझ्या परिचयाचे आहेत.माझे tifr मधले सहकारी होते.बापूसाहेब सॉफ्टवेअर इंजीनीयर होते आणि मी हार्डवेअर इंजीनीयर होतो.

मी एकदा बापूसाहेब काण्यांना म्हणालो,
"बटाट्यावड्याबरोबर तुम्ही जी सुकी लाल रंगाची चटणी देता ती मला एकदम चटकदार वाटते.बरं,कधीही ती चटणी खाल्ली की तिची टेस्ट तीच असते.ह्याच गुपीत काय आहे.?"
मला बापूसाहेब म्हणाले,

"ते एक सिक्रेट आहे,कोका कोलाचा जसा फार्म्युला सिक्रेट आहे अगदी तसाच.पण तुम्हाला ते सिक्रेट उलगडून सांगतो.तुम्ही काही मला परकी नाही."
माझी गम्मत करीत ते म्हणाले.
बापूसाहेब पुढे म्हणाले,
"कांद्याची भजी देऊन संपल्यावर भांड्यात तळाला भज्याच्या खूप चूर रहातो.तो चूर एकत्र करून त्यात थोडी मिरचीपूड घालून, चवीला थोडं मिठ घालून झाल्यावर मग तो चूर एकजीव करून त्याचा सुकी चटणी म्हणून वापर केला जातो."
काहीही फुटक जाऊ न देण्याच्या आणि युक्त्या करून काटकसरीत धंदा करण्याच्या मराठी माणसाच्या वृत्तीचं कौतूक करावं असं वाटतं.

चहा घेता घेता मी विश्रामला विचारलं,
"अरे,तू लहानपणापासून छान कविता लिहायचास.सध्या त्या़ची हालत काय आहे.?"
मला विश्राम म्हणाला,
"हालत कसली सध्या हालच आहेत."
शाळेत असताना विश्राम आमच्या मराठी गुरूजीना फारच आवडायचा.त्यांना कवितेची एक दोन कडवी लिहून दाखवायचा.एखादी कविता त्यांना आवडली की ते वर्गात त्याला वाचून दाखवायला सांगायचे.आणि बक्षीस म्हणून त्याला नवी करकरीत लायन पेन्सिल द्यायचे.ह्या सर्व जून्या गोष्टींची विश्रामला मी आठवण करून दिली.
त्यावर तो मला म्हणाला,
"आम्हाला शाळेत मराठीचा विषय शिकवायला जे शिक्षक होते ते स्वतः कवी होते.त्यांनी आपला कविता-संग्रह छापला होता. त्यांना नेहमीच वाटायचं की आपल्या विद्यार्थ्यापैकी काहीनी तरी कविता लिहाव्यात.

हाय स्कूलमधे शिकत असताना मराठीच्या विषयाचे शिक्षक कविता कशी लिहावी ह्याची माहिती देत असताना बरीच मुलं ते शिकायला कंटाळा करायची.त्याचं मुख्य कारण असं की प्रचारात नसलेले आणि दुर्बोध असलेले शब्द आणि भाषेचं अवैध व्याक्रण वापरल्याने शब्दांच्या अर्थाला म्यानात टाकून ठेवल्यासारखं झाल्याने आणि त्या शब्दांचा कवितेत वापर करायला जोर आणला गेल्याने अलीकडच्या प्रचारात असलेल्या भाषेत समजायला ती कविता कठीण व्हायची.
कवितेमधे आनंद घेणार्‍या मला, कुसुमाग्रज सर्वांसाठी नाहीत, हे समजू शकतं.पण बर्‍याच लोकांचं मन कविता ह्या शब्दानेच पूर्वग्रहदुषित होत असतं.

परंतु आमच्या ह्या कवी-शिक्षकाचं तसं नव्हतं.ते स्वतःच कवी असल्याने आणि त्यांच्या कविता खूपच लोकप्रिय असल्याने त्यांची, कविता लिहायला शिकवण्याची तर्‍हा, मला इतकी आवडायची की कविता लिहायला आवड नसलेल्यांना स्फुर्ती यायची हे पण मी पाहिलेलं आहे."

विश्रामचं हे ऐकून मी त्याला म्हणालो,
""पाठ्य पुस्तकाच्या पानात छापली जाऊन बंदिस्त रहाण्यात कवितेचं अस्तित्व नसतं.मला वाटतं,कविता ही एखाद्या तुफानातून निर्माण झालेली असंबद्ध लय असते.आणि दुसर्‍या दिवशी पडणार्‍या पहाटेच्या दवबिंदूंच्या सुगंधाने दरवळलेल्या ओल्या झालेल्या माती सारखी असते.अशी ही माती आपल्या अवतिभोवती असते,फक्त आपल्याला ती उकरून पहायला हवी."

माझं म्हणणं विश्रामला पटलं.
मला म्हणाला,
"मला आठवतं मी लहान असताना संगीतातल्या मौजेचा आनंद कधीच घेतला नाही.त्या ऐवजी मी माझ्या आजोळी आमच्या घराच्या मागे असलेल्या रानात जाऊन पिंपळाच्या झाडाखाली बसून ती जादूभरी पानांची सळसळ आणि सरसराहट,पिंपळाच्या फोफावलेल्या फांद्यावर वार्‍याने डुलणारी पानं बघून उत्तेजीत व्ह्यायचो.मला रेडिओवरची गाणी कधीच आवडली नाहीत.का ते माहित नाही.हे मी मोठा होई तोपर्यंत कळलं नाही.त्याचं कारण शोधून काढायला मी जास्तीत जास्त प्रयत्न करीत असायचो.पण कविता मात्र लिहीत राहायचो."

"मग त्यात खंड कसा आला.मघाशी तू मला म्हणालास हालत कसली हाल आहेत त्याचं काय कारण?"
मी विश्रामला विचारलं.
मला म्हणाला,
"त्याचं असं झालं की,त्यानंतर माझे आजीआजोबा निर्वतेले.आणि मला माहित झालं की माझ्याकडून एक मुक करार लिहिला गेला असावा.त्या रानातला तो मंत्रमुग्ध करणारा आवाज माझ्याकडून कधीच ऐकला गेला जाणार नव्हता.

एकदा मला आठवतं,त्या रानातल्या संगीतासारखा आवाज माझ्या कानावर आला.इतराना तो आवाज एखादी बाजापेटी वाजवल्यासारखा वाटला असावा.पण माझ्या करीता तो आवाज विस्फोटीत होऊन जीवन आणि चैतन्य उफाळून आल्यासारखं वाटलं.त्यापूर्वी मला वाटत असायचं ते जीवन आणि चैतन्य माझ्या दैवाला मी समर्पीत केलं असावं.

ही काही डामडौल दाखवणारी उपमा नव्हती.खरंच मी माझे डोळे झाकल्यावर,मला सर्वतर्‍हेचे रंग माझ्या नजरेला विनम्रपणे लयीत नाचताना दिसायचे.हे असं काय होतंय ते मला कळेना.

मला सांगण्यात आलं की, सिनेस्थेसीया नावाची व्याधी मला झाली आहे.नसविद्या शास्त्रानुसार,मेंदूतल्या,उत्तेजीत करणार्‍या मार्गात आणि प्रतिसाद देणार्‍या, मार्गात होणारा संभ्रम,असं त्याचं विश्लेषण आहे. पण ज्या कुणाला हा माझ्या सारखा व्याधी झाला असेल त्यांना माहित असावं की संभ्रम मुळीच नसावा.संभ्रम सोडून दुसरं काही तरी असावं.मी ह्या गोष्टीवर माझं ध्यान देत राहिल्यावर मला दिसून आलं की हे काहीतरी दूसरच असावं.

काही आकडे रंगीबेरंगी दिसायचे.विशेषकरून दोन हा आकडा एखाद्या बुद्धिबळाच्या पटावर प्रत्येक चौकानात असून हा आकडा नीळा नीळा दिसायच. काही शब्द लालबूंद किंवा रानातल्या हिरव्यागार वनस्पतीच्या रंगा सारखे दिसायचे.
हे सर्व माझ्या विचाराचे संकेत व्हायचे आणि माझ्या आश्चर्याची भाषा व्हायची.त्यामुळे ह्याचा अर्थ समजून घ्यायला माझ्या जीवनातली ही एक पराकाष्टा समजायला हरकत नाही.

माझ्या वडीलांचा बदलीचा जॉब असल्याने आम्ही निरनीराळ्या शहरात जाऊन रहायचो. मित्रमंडळी,शाळा आणि आजुबाजूचा समाज माझ्यासाठी,जसे एखाद्या गाडीचे गिअर्स एकातून दुसर्‍यात बदलावेत तसं माझं घरचं जीवन आणि माझं वयक्तीक जीवन हेलकावत असायाचं. माझे हे विचार टप्याटप्यानेसुद्धा एकत्र येऊन स्पष्टीकरण देत नव्हते.पण ज्यावेळी माझ्या सभोवतालचं क्षणभंगूर जग आपला आकार घालवून बसायचं तेव्हा काही निश्चीत गोष्टींचं मला आकलन व्हायला लागलं.

दोनचा आकडा नेहमीच नीळा रंगाचा वाटायचा.आणि पांढरा,लालसर आणि करडा रंग वार्‍याची झोत आल्यावरखडबडीत दिसायचे.अगदी माझ्या आजोबांच्या घराच्या मागच्या रानात जसं मला व्ह्यायचं अगदी तसं व्हायचं.
त्यानंतर मी कविता लिहायचं सोडूनच दिलं.माझा सगळा वेळ व्यथेत आणि त्याच्यावर डॉक्टरी उपाय करण्यात जायला लागला.त्यामुळे कविता करण्याच्या मनस्थितीतच मी राहिलो नाही.नाही म्हटल्यास कधी कधी चार ओळी उस्फुर्त सुचायच्या. दिसेल त्या कागदाच्या चिटोर्‍यावर त्या ओळी लिहून ठेवायचो.
खिशातून एक कागदाचं चिटोरं काढून मला म्हणाला,
"आत्ताच बघ,गाडीत बसलो होतो अगदी खिडकीच्या जवळ.
थंडगार हवेच्या झोतीने माझं मन उल्हासित झालं आणि कवितेचं एक कडवं मला सुचलं.दादर येण्यापूर्वा मी कागदावर लिहित राहिलो.तुला वाचून दाखवतो."

फुलबागेत न फुललेलं
मी एक क्षुल्लक फूल आहे
कसं असलं तरी
बहरलेली मी एक भूल आहे
तू मला फुलवून स्वतःच
कां बरं विसरून गेलीस
अश्रू समजून तू मला
कां बरं ठिपकू दिलीस

विश्रामची ही कविता ऐकून माझं मन खूपच गहिवरलं.कवितेतून हा हे कुणाला उद्देशून बोलत आहे हे मला कळेना.आणि तसं त्याला विचारणं मला धजेना.एक मात्र खरं कुणालाही एक लेख लिहून समजवता येणार नाही ते एखादा कवी एकाद्या कडव्यातून सुचवू शकतो हे निश्चीत.
मी मामा काण्यांचं बिल दिलं.आणि विश्रामचा निरोप घेताना त्याला म्हणालो,
"ह्या कवितेवरून तुझी ती सिनेस्थेसीया नावाची व्याधी नक्कीच लुप्त झाली आहे.ह्या कवितेवरून तरी मला तसं वाटतं.तू एक काम कर हे एकच कडवं मला तू वाचून दाखवलंस.पण संपूर्ण कविता लिहिल्यावर मला ती तू इमेलने पाठवून दे."
माझा इमेल ऍड्रेस मी त्याला दिला आणि विश्रामचा निरोप घेतला.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com




Tuesday, April 17, 2012

"मला पुनर्जीवी करू नका"




माझ्या पत्नीला बरं नाही आणि ती सध्या सुधार सेंटरवर ट्रिटमेन्ट घेत आहे हे प्रो.देसायांना कुणीतरी सांगीतलं.गेल्या विक-एन्डला ते माझ्या घरी आले होते.प्रो.नेरूरकरही त्यांच्याबरोबर आले होते.
तिच्या आजाराची सर्व चौकशी करून झाल्यावर ह्या वयावरच्या समस्येविषयी चर्चा करीत असताना भाऊसाहेब मला आपल्या शेजार्‍याची गोष्ट सांगत होते.


त्यासाठीच ते हॉस्पिटलात परत जायला तयार नव्हते.
"यापुढे मी जरका पुन्हा पडलो तर मला तिथे नेऊ नका,नको ती ऍम्ब्युलन्स नको त्या रस्त्यात जातानाच्या घंट्या अन नको त्या शिट्या"
सत्याऐंशी वर्षाचे प्रो.देसायांचे शेजारी,रिटायर्ड प्रोफेसर आणि एकदा बायपास झालेले हे सदगृहस्थ त्यांना सांगत  हो्ते.


"मला पुनर्जीवि करू नका"
असं लिहिलेला एक फलक त्यांनी आपल्या गळ्यात घालून ठेवला आहे.आणि घरातल्या रेफ्रिजरेटरवरपण एक स्टिकर लावला आहे.तसंच आपल्या

डॉक्टरना आणि तिन मुलांना हा त्यांचा विचार सांगून,त्यांना आपल्याशी सहमत व्हायला लावलं आहे.
संपूर्ण समाधानकारक मरण येण्याबाबत कोण कुणाला हमी देऊ शकत नाही हे त्या गृहस्थाना चांगलंच माहित आहे.त्यासाठी तयारी करावी लागते,त्यावर चर्चा करावी लागते आणि कागद पत्रं तयार करून ठेवावी लागतात हे ही त्यांना पक्कं माहित आहे."


प्रो.नेरूरकर म्हणाले,
"मला वाटतं,इतरांनी ह्या, अती गंभीर आणि अगदी वयक्तिक,खासगी, विषयावर कसा निर्णय घ्यावा ह्याची चर्चासुद्धा तितकीच गंभीर आणि खाजगी आहे असं वाटतं.भावनीक आणि साम्पत्तीक किंमत काय असावी ह्याचा अंदाजसुद्धा तेव्हडाच गहन आहे.
असंही मला वाटतं."


मी माझं मत देताना म्हणालो,
"मरण पुढे ढकलण्य़ाच्या विचाराची काही वर्षांपूर्वी  कल्पनासुद्धा करणं कठीण होतं,ते आता आधूनीक औषध-उपचाराना शक्य झालं आहे.पण उत्तरोत्तर प्रकृती कमजोर होण्यात,व्याधी होण्यात,बुद्धिभ्रम होण्यात आणि सरतेशेवटी कसलेही उपाय करून घेण्यास असमर्थता आणण्यात आपण गुंतले जातो.
पण जरका आपण समजून उमजून निर्णय घेतल्यास कदाचीत सुयोग्य परिणाम होण्यात यशस्वी होऊ शकतो."


प्रो.देसाई आपल्या दोन जवळच्या नातेवाईकांची माहिती देताना म्हणाले,
"लिलाताईने योग्य विचार करून आपल्या शेवटच्या दिवसांचा ताबा घेतला.कुसूमने ह्याबाबतीत कसलाच विचार न करून आपल्या नातेवाईकांना विश्वासात न घेऊन स्वतःच्या जीवनाच्या समारोपाबद्दल ती गेल्यानंतरही इतराना क्षतीग्रस्त करून ठेवलं होतं."


प्रो.नेरूरकर आपल्या जवळच्या मित्राची माहिती देताना म्हणाले,
"गुरूनाथ ठाकूर ह्या प्रसिद्ध वकीलाला, आपल्या वडीलांच्या अखेरच्या इच्छा अगदी स्पष्ट आहेत अशा समजुतीने, भरवसा बाळगून राहिल्यानंतर त्यांच्या पश्चात निर्माण झालेल्या कायदेशीर अडचणीना तोंड द्यायला नाकीनऊ आले.ज्या गृहस्थाने त्यांना जन्म दिला त्याच्यासाठी त्यांची ही अवस्था झाली होती.
तुम्हाला कितीही वाटत असेल की,आय.सी.युमधे न जाता किंवा जीवनाच्या अंतीम काळाची अतीशय सोय करून केलेली आहे म्हणून सर्व काही सुक्षम होईल तर तो गैरसमज म्हटला पाहिजे.जाणकारांचं ह्यावर एकमत आहे."


"तुमच्या अखेरच्या जीवनाच्या निवडीच्या तयारीचा निर्देश, अगोदरच कागद पत्रातून,करून ठेवून तुमच्यासाठी एखाद्याची त्यासाठी नेमणूक करून जाहिर करावं.नाहीतर कदाचीत त्यावेळच्या आलेल्या परिस्थितीत तुम्हाला ते जमेल न जमेल.
त्यातही अगदी सर्व बाजूने विचार करून केलेल्या कागद पत्रात शेवटच्या क्षणी लागणार्‍या गोष्टी अगोदरपासून अपेक्षीत करता येत नसतात."
प्रो.देसाई असं सांगून पुढे म्हणाले,
"आदीपासूनचे निर्देश आवश्यक आहेत पण जीवनाच्या अंतीम क्षणी केले जाणारे निर्देश परिपूर्ण असतीलच असं नाही आणि नसावेतही.
सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जीवन जगण्यासाठी काय आवश्यक असतं.?"



माझा एक मित्र विकी सागर हा आपल्या पत्नीबद्दल एकदा मला सांगत होता ते मला आठवलं.मी म्हणालो,
"प्रिती सागरचे केस खूप लांब होते.पंजाबी लोकात वयस्कर झालं तरी बायका निटनेटक्या रहाण्याच्या प्रयत्नात असतात.प्रितीचं असंच म्हणणं होतं.ती म्हणायची,
"मला मरण समयी विस्कळीत आणि अव्यवस्थीत केशभार ठेवायचा नाही."
तिला झालेल्या ब्रेस्ट कॅनसरमुळे तिचा मरण समय जवळ आला होता.तिची फोर्थ स्टेज आली होती.त्यासाठी तिने आपल्या लहान बहिणीबरोबर ब्युटी-पार्लरमधे जाऊन खांद्यावर रूळतील एव्हडे केस कापून घेतले होते.
तिला ज्यावेळी कळलं की तिच्या कागद-पत्रावर आणखीन एक सही असण्याची जरूरी आहे.तिने आपल्या जवळच्या मैत्रीणीला बोलावून तिची सहीपण घेतली होती.तिच्या कागद-पत्रात कसलेही लूझ-एन्ड्स ठेवायचे नव्हते.तिच्या नवर्‍याची किंवा नातेवाईकांची मधेच अडवणूक व्हायला नको असं तिला वाटत होतं.



तिने आपले दागीने आणि इतर मौल्यवान वस्तु माझ्या ताब्यात दिल्या होत्या.एव्हडंच काय तर तिने आपलं मंगळसूत्रपण काढून ठेवलं होतं.ती म्हणायची,
"देवाला नक्कीच माहित आहे की मी अगदी सुखाने माझं लग्नाचं आयुष्य भोगलं आहे ते!"

अंतीम समय आल्यावर तिने तिला आवडत असणार्‍या रंगाची साडी नेसली होती.ठसठशीत कुंकू लावलं होतं.अंगावर पर्फ्युम लावून घेतलं होतं. आता ह्या सर्व आठवणी आमच्या जवळ राहिल्या आहेत." प्रितीचा नवरा,विकी,हे सर्व सांगत होता.


प्रो.देसाई म्हणाले,
"जीवनाचा शेवट,ह्या विषयावरची चर्चा करणं तसं कठीणच आहे परंतु,त्यावरचे कागद पत्र आणि फॉर्म्स प्राप्त करून घ्यायला सोपं आहे.आणि ते पेपर्स  मोफतही असतात.कुणा वकीलाची गरजही भासत नाही.

परंतु,ही कागद पत्रं रोगविषयक विकट समस्या उत्पन्न झाल्यानंतर येणार्‍या अगणीक प्रश्नांचं भाकीत सांगू शकत नाहीत.त्यामुळे आपल्या नातेवाईकांशी आणि आपल्या डॉक्टरशी चर्चा होणं आवश्यक आहेच त्याशिवाय त्यांना निर्णय घेण्यासाठी आपल्याकडून थोडीफार सवलत देणंही महत्वाचं आहे."

प्रो.नेरूरकरानां गुरूनाथ ठाकूरची त्यांच्या वडीलाबाबत कशी पंचाईत झाली ते सांगायचं होतं.
"मी तुम्हाला सांगू का?"
असा प्रश्न करीत सांगू लागले,
"गुरूनाथ ठाकूरांचं असंच झालं.त्यांच्या वडीलाना पार्किनसनची व्यथा होतीच त्याशिवाय हळुहळू वाढत जाणारा बुद्धिभ्रमही झाला होता.ते जास्त दिवस जगणार नाहीत असे दिवस आल्यानंतर त्यांना लाईफ-सपोर्टची गरज नव्हती असं त्यांच्या वडीलानी आपलं मत दिलं होतं.
पण ज्यावेळी त्यांना जेव्हा हृदयाचे अनियमित ठोके पडायला लागले तेव्हा गुरूनाथने डॉक्टरना अतीदक्ष उपाय द्यायला कबुली दिली.
गुरूनाथ म्हणतात,
"असं करण्याने माझ्या वडीलांच्या अंतीम इच्छेचं मी उल्लंघन तर केलं नाही ना? खरंच मला माहित नाही. हृदयाचे अनीयमीत ठोके पडण्याचा संभव आहे हे मला मुळीच माहित नव्हतं."
ते पुढे म्हणतात,
"ती अंतीम स्थिती नव्हती आणी तो लाईफ-सपोर्टही नव्हता.पण आता मात्र ते डबल असंयमी झाले होते.ते त्यांचं दुर्दैवी जीवन झालं होतं.मी त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कसलंच सहाय्य करीत नव्हतो."


हे ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
"आणि ह्याचमुळे आमचे शेजारी स्वतःच्या मरणाची जबाबदारी घेत आहेत.विलंब होणारं मरण त्यांना नको होतं.
अशी वीरता दाखवली नाही तर दुर्लभ साधनांचा दुरूपयोग होईल असं त्यांना वाटतं. आणि ह्यासाठीच
"मला पुनर्जीवी करू नका"
असा फलक ते स्वतःच्या गळ्यात घालून ठेवतात.ते जातील तिथे तो फलक त्यांच्याबरोबर असतो.
"मी सुखी जीवन जगलो आहे.आणि मी तसंच पुढल्या जन्मात जगेन."
असं ते म्हणतात.


"आम्ही तुमची पत्नी आजारी आहे म्हणून कसं काय चालंय ह्याची चौकशी करायला आलो आणि बोलता बोलता ह्या प्रसंगाला न शोभणार्‍या विषयाची
चर्चा करून तुम्हाला नाहक मनस्ताप तर दिला नाही ना?"
प्रो.देसाई मला म्हणाले.प्रो.नेरूरकरानीही मान डोलावून आपलं तेच म्हणणं आहे असं मला दर्शवलं.
मी त्यांना म्हणालो,
"सुधार सेंटरवर गेल्यावर मी जे पाहिलं ते ह्या चर्चेपेक्षाही गंभीर आहे.तुम्ही नक्कीच माझ्या ब्लॉगवर जाऊन "अंतरातल्या नाना कळा"
 ह्या मथळ्याखाली मी अकरा लेख क्रमशः लिहिले आहेत ते जरूर वाचा. आणि त्यानंतर "बंद दरवाजा" हाही माझा लेख वाचावा.तुम्हाला आखोदेखा हाल दिसेल."
"जरूर वाचूं"
असं सांगून दोघानीही माझा निरोप घेतला.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com