Tuesday, August 14, 2012

पुढील कार्यक्रम थोड्या विश्रांती नंतर




मायबाप वाचकहो,
आज मी ७९ वर्षाचा झालो.काल माझ्या डाव्या डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रकिया यशस्वी झाली.आज माझ्या जन्मदिवशी माझ्या डोळ्यावरची पट्टी डॉक्टरानी काढून मला नवीन दृष्टी दिली.उर्वरीत आयुष्यासाठी माझ्या ह्या जन्मदिवशी मला मिळालेली ही एक अमुल्य गीफ्टच समजायला हवी.डॉकटरानी थोडे दिवस विश्रांती घ्यायला सांगीतलं आहे.तेव्हा भेटू विश्रांती नंतर.तोपर्यंत माझी आठवण काढून ८०० वर लिहिलेल्या पोस्टची वाचनं जरूर करा.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, August 6, 2012

समस्या,समस्या आणि समस्या





"वृद्धत्व शाप केव्हा ठरतं आणि वरदान केव्हा ठरतं."


"हे काय चाललं आहे?"
वृद्धांची ससेहोलपट व्हायला काय काय कारणं असावीत? असा विचार येऊन माझं मन खुपच चलबिचल व्हायला लागलं.
आणि मग मनात येईल ते लिहीत गेलो.

वृद्ध मंडळी सर्वसाधारणपणे क्रियाशील नसतात.त्यामुळे त्यांचं जास्त प्रमाणात वास्तव्य कुटुंबातच असणं स्वाभाविक आहे.
काहीना आपलं वृद्धत्व वरदान वाटतं तर काहीना ते  शाप वाटतं.
ज्यांना आपलं वृद्धत्व शाप वाटतं त्याला काही कारणं ही असतात.
त्यांच्या सभोवताली अशी परिस्थिती निर्माण होते,की त्यांना आपल्या वृद्धत्वाची चीड येते आणि त्यामुळेच त्याना आपलं वृद्धत्व एक शाप असल्याची जाणीव होते.

ज्यावेळी ही मंडळी तरुण, वाढत्या वयाची आणि कार्यव्रत असतात,तेव्हा ते कामावरून घरी परत आले की त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
कधी त्यांची आई तर कधी त्यांची पत्नी आगतस्वागत करते.
घरात आल्या आल्या विचारपूस केली जाते.त्याना गरमागरम चहा किवा कॉफी करून दिली जाते.
त्यासोबत काही खायला दिलं जातं.हे सगळे अगदी स्वाभाविकपणे होत असतं.
ह्याचं मुख्य कारण ते कमवणारे म्हणून घरच्यांसाठी महत्वाचे असतात.
त्यांचं मन सांभाळणं हे घरच्यांची जबाबदारी बनते.त्यांच्यासाठी प्रत्येकजण आपली जबाबदारी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करतो.

पण हळू हळू वृद्धत्वातामुळे स्वाभाविकपणे कळतनकळत सर्व गोष्टीत बदल होत जातो.त्यांच्या निवृत्तीमुळे ही मंडळी अधिक काळ घरातच असतात.
बाहेर जाऊन आल्यानंतर त्यांच्या परत येण्याची फारशी दखल घेतली जात नाही,असं काहींच्या बाबतीत घडतं.काहींना तर पाण्याची किवा चहाची देखील घरच्यांकडे मागणी करावी लागते.

काहीना तर,
"इतक्या लवकर घरी कसे परत आला?"
अश्या प्रकारच्या अनपेक्षित प्रश्नाना सामोरं जावं लागत होतं.
अशा वृद्ध व्यक्तींनी जास्त वेळ घराबाहेर रहावं,आणि आपल्याला मोकळीक मिळू द्यावी असं घरातील व्यक्तिना मनातून वाटतं.अशा परिस्थितीत आपलं वृध्दत्व हा एक शाप आहे,असं त्यांना वाटलं तर त्याना कसा दोष देता येईल?
घरातील या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं त्याना अवघड जातं,व त्यामुळे मानसिक कोंडी होते.त्यांच्या तरुण सुनामुलांना त्यांची सदासर्वकाळ घरातली हजेरी नकोशी किवा अडचणीची वाटु लागते.


तरुणपणात किवा वाढत्या वयात काही मंडळी काबाडकष्ट करून पैसा जमा करतात.
काटकसरीचं जीवन जगून पैसा साठवतात,या पैशाच्या आधारे घरदार उभं करतात.
सर्व भौतीक सुखसोयी घरात निर्माण करतात.हे सारं काही त्या व्यक्ती केवळ आपल्यासाठी निर्माण करीत नाहीत.त्यात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचं पण हित समावलेलं असतं.हे खरं आहे.

कुटुंबियांच्या सुखासाठीच ते हे सर्व करीत असतात. त्यात त्यागापेक्षा कर्तव्याचीच भावना अधिक असते.पण वृद्धापकाळात  याच व्यक्ती पैशाचा होणारा अपवय आपल्या डोळ्यानी पाहू शकत नाहीत.
कुटुंबातील काही व्यक्ती बेजबाबदारपणे खर्च करीत असतात.मात्र,त्यावर ते नियंत्रण घालू शकत नाहीत.
त्यांना असा पैसा उडविणं सहन होत नाही.म्हणून त्या व्यक्तीना जर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,तर त्या व्यक्ती समजावून घेण्याऐवजी उलट जेष्टांचा अपमान करतात.
जेष्टानी केलेले काबाडकष्ट विसरले जातात.काटकसर नजरे आड केली जाते.

त्यागाची खिल्ली उडवली जाते.उलट त्याना कडवट शब्दात सुनावलं जातं.
"कटकट करून नका,सहन होत नसेल तर डोळे बंद करून घ्या."
"घरात शांततेने रहा"
अशा वृद्धाना,
"तोंड बांधून बुक्याचा मार "
सहन करावा लागतो.
या वृद्धव्यक्ती वारंवार होणाऱ्या अपमानामुळे मनातून दुःखी होतात.
आणि त्याना,
"परमेश्वराने मला हे दिवस का दाखवले?" असे वाटतं.
अशा व्यक्तीना आपले वृद्धत्व शाप वाटलं तर त्यांचा दोष किती?


"तुम्हाला काही मानसिक त्रास आहे का तुमच्या घरी?"
असा प्रश्न विचारल्यावर कळतं की,काही कुटुंबात मुलं एकेकाळी कर्तबगारी दाखवणाऱ्या आपल्या आईवडीलांची रवानगी अडगळीच्या खोलीत करतात.

आणि इतर सुसज्य खोलीत आपण राहतात.
अशा अडगळीच्या वा अडचणीच्या खोलीत राहताना आईवडीलांचं मन खूप दुःखी होतं.
पण परिस्थिती मुळे ते शरणांगत होतात.आणि तशा परिस्थितीत दिवस व्यथीत करतात.
पण त्यापेक्षाही त्याना दुःख होतं ते की आपली मुलं आपल्या जवळ येत नाहीत,जवळ बसत नाहीत.
बातचीत करीत नाहीत.विचारपूस करीत नाहीत.आपल्या आवडीनिवडी जपत नाहीत.
याचं दुःख ते सहन करू शकत नाहीत.पण त्यांचा नाइलाज होतो.

म्हातारपणी त्याना आपल्या जवळच्या लोकांकडून प्रेमाची, व दोन गोड शब्दांची गरज भासते.
पण ते ही त्यांच्या नशिबी नसतं.काही मुलाना तर आपले आईवडील अडचणीचे वाटु लागतात.
अशा स्थितीत त्या आईवडीलाना आपले वृद्धत्व शाप वाटलं नाही तर नवलच.
अशा कुटुंबातली मुलं आपल्या आईवडीलांची आजारपणात घ्यावी तशी काळजी घेऊ शकत नाहीत.
त्यांना आपला औषधोपचार स्वतःच करावा लागतो. हातपाय साथ देत नसले तरी आणि डॉक्टरांकडे धड जाता येत नसलं तरी मुलं सोबत येत नाहीत.
आपली मुलं आपल्या म्हातारपणी आपली काठी बनतील आणि आपल्याला सुखात ठेवतील ही आशा फोल ठरतं.


काही व्यक्ती आपण काही दिवसानी आजी अजोबा होवू,आपल्या नातवंडाना खेळवू त्यांच्याशी खेळू अशी स्वपनं बघतात.
मात्र, ते आजीआजोबा झाल्यावर त्यांच्या नशिबी वेगळंच दुःख येतं.
आजीअजोबा आपल्या नातवंडाना अर्थात आपल्या जमान्यातल्या गोष्टी सांगतात.
त्यांच्याशी खेळतात गप्पा मारतात.या त्यांच्या गोष्टी मुलाला किंवा सुनेला पसंत पडत नाहीत त्यामुळे सून किंवा मुलगा मुलाला रागवतात,मारतात  हे आजी आजोबाना आवडत नाही.
आजीआजोबाना ओरडतात तुमच्यामुळे तो असा वाइट वागतो.
तुम्ही त्याच्यावर वाइट संस्कार करता अशी कडवट भाषा वापरतात.
नातवंडाना त्यांच्या पासून दूर करतात अशातऱ्हेने आजीआजोबांची स्वप्नं धुळीला मिळतात.
आणि वरून अपमान सहन करावा लागतो.याचं त्याना दुःख होतं.
स्वाभाविकपणे त्याना त्यांचं म्हातारपण शाप वाटू लागतं.

अशा अनेक गोष्टी सांगता येतील.काही मुले त्याना खर्चाला पैसे देत नाहीत.
पण त्यांच्या देखत नको त्या गोष्टीवर मात्र नको तेव्हडा पैसा खर्च करतात.
हे पाहून त्या वृद्धाना आपण लाचार झाल्यासारखं वाटतं.
काहींची मुलं त्यांच्या गावात दूसरं घर घेऊन राहतात.आपल्या आईवडीलांशी तुटकपणे वागतात. याचं मरण:प्राय दुःख झाल्याशिवाय कसं राहील.तर  काहीजण फारच अभागी ठरतात.त्यांची रवानगी त्यांच्याच मुलांकडून  वृद्धाश्रमात होते,ते मरण येत नाही म्हणून नशिबाला दोष देत जगतात.


पन्नाशीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या सर्व गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा.
आपल्या भावी जीवनाची आखणी त्याप्रमाणे करायला हवी.
म्हणजे त्यांना वृद्धापकाळात अशा परिस्थितीला सामोरं जाणं शक्य होईल.
त्यांनी इतरांच्या अनुभवावरून शहाणं व्हावयाला हवं.
अर्थात ज्या वृद्धाना आपलं वृद्धत्व वरदान वाटतं त्यांच्या नशिबाचा हेवाच करायला हवा.
अशावेळी मनात येतं,
 "दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा."


एका अविवाहीत व्यक्तीने आपला विचार सांगीतला,
"व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं तर या बाबतीत तरी मी सुखी आहे! लग्न न करून मुलंबाळं विचारतील की नाही, मान देतील की नाही ही भानगडच आपण ठेवली नाही! आम्हाला आमच्या वृद्धापकाळात  त्या मुलासुनांचं प्रेमही नको आणि त्यांचा तिरस्कार -हेटाळणीही नको!  दुनियेला फाट्यावर मारत जगलेलं आयुष्य असं मुलाबाळांसमोर, लेकीसुनांसमोर मिंध व्हावं हे आपल्याला मंजूर नाही!

आमचा बुढापा हा एकट्याचाच असेल, अकेला असेल याची आम्हाला कल्पना आहे. परंतु निदान मुलानातवंडांचे पाश तर नसतील! मुलं विचारतील की नाही? सूनबाई आदर ठेवेल की नाही? नातवंड खिल्ली तर उडवणार नाहीत ना? असल्या नसत्या चिंता मागे लागणार नाहीत! नकोच ते सांसरिक पाश!
एकटा आलो होतो, एकटा राहीन आणि एकट्यानेच मुकाट जाईन!
उद्या हातपाय थकले तर एखाद्या स्टार-वृद्धाश्रमात जाऊन नक्कीच राहीन. तिथे पैसा फेको तमाशा देखो असा सिंपल मामला असतो!
स्वत:च्याच घरी वृद्धाश्रमात ठेवल्यागत रहायचं किंवा मुलाबाळांनी उचलून वृद्धाश्रमात नेऊन टाकायचं त्यापेक्षा स्वत:हूनच आपल्याच मर्जीने, आपल्याच मस्तीत तिथे गेलेलं बरं!"


प्रो.देसायाना ज्यावेळी ह्या विषयाबद्दल मी बोललो तेव्हा ते मला म्हणाले,
"ह्याच विषयावर माझ्या एका मित्राशी माझी चर्चा झाली.त्याने चिंतन करून,खोल विचार करून अतिशय मार्मिकतेने जे मला सांगीतलं ते मी तुम्हाला

थोडक्यात सांगतो.
वृद्धापकाळातील सुख दु:खाची मुळं तारुण्यात असतात. मुलांवर विसंबून राहायचे दिवस कधीच संपले. बाहेरील जगातील वाढती महागाई, वाढती स्पर्धा, वाढती आत्मकेंद्रित वृत्ती पाहता प्रत्येकाने वृद्धापकाळातील आर्थिक, मानसिक, भावनिक गरजांचा विचार आणि तजविज तरूणपणातच करायला सुरुवात केली पाहीजे.


आपल्याकडे गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितला आहे. ह्या वानप्रस्थाश्रमात संसारात राहून संसारातून मन काढून घेण्यास सांगितले आहे. हे वाचायला सोपे वाटले तरी आचरणात आणणे कठीण असते. ह्याला कारण जसे स्त्री लग्न झाल्या पासून स्वयंपाकघर हाताळत असते. संपूर्ण घरात तिचा वावर आणि हुकुमत असते. हेच म्हातारी झाल्यावर सुन आल्यामुळे तीच्या हाती सर्व ताबा द्यावा लागतो आणि स्वतःला दुय्यम स्थानावर उतरावे लागते. हे 'डाऊन साईझींग' स्वीकारणं कठीण जातं. जिथे हुकूम सोडायची (चांगल्या अर्थाने), मार्गदर्शन करण्याची सवय लागलेली असते तिथे हुकूम ऐकण्याची (चांगल्या अर्थाने) आणि मार्गदर्शन स्विकारण्याची वेळ येते. इथे सासू सूनेत खटके उडायला सुरूवात होते. म्हातारपणात सुख कमी आणि दु:ख जास्त अशी परिस्थिती येते. गमतीने असे म्हणतात की 'सासू' म्हनजे 'सारख्या सूचना' आणि 'सुन' म्हणजे 'सुचना नकोत'.


जी स्थिती स्त्रीयांची तिच स्थिती पुरुषांची. आजवरच्या आयुष्यात संपूर्ण घर त्यांच्या भोवती नाचत असतं. घरात काय हवं, काय नको, घर कसं सजवावे वगैरे निर्णय त्यांच्या इच्छेनुसार होत असतात.स्वतः कमवत असल्याने 'स्वेच्छेने' खर्च करण्याची मुभा असते. निवृत्ती नंतर मुलगा नोकरीत स्थिरावलेला असतो. हळूहळू तो 'कर्ता' पुरूष होत असतो. नव्या जमान्याच्या नव्या कल्पना त्याला सत्यात उतरवायच्या असतात. हाती पैसा असतो.

(कित्येकदा मागिल पिढीच्या तुलनेत कितीतरी अधिक). नविन काळाची गरज अणि भरपूर पैसा हाताशी असल्यामुळे लॉ ऑफ मार्जिनल युटीलीटीच्या नियमानुसार तो मुक्त हस्ते खर्च करीत असतो. जे मागील पिढीला उधळणे वाटते. आपण इतक्या काटकसरीत संसार केला पण मुलांवर त्याचा व्हावा तसा परिणाम, संस्कार झाला नाही अशी वैफल्यपूर्ण भावना ज्येष्ठांच्या मनात घर करू लागते. तसेच आता घरात आपले काही चालत नाही. सगळे निर्णय मुलगा घेतो. (आणि त्याची आई त्याला साथ देतेय, हे दुसरे दु:ख) आपली पत्नीही आपल्या सोबत नाही, तिलाही आपल्याबाबतीत सहानुभूती वाटत नाही असे एकांगी विचार मनात घोळायला लागतात. एकेकाळचा कर्ता, कर्तबगार माणूस दुखावतो, कोषात जातो, विक्षिप्त वागायला लागतो.

लहान मुलं जशी स्वतःकडे मोठ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रडतात, हट्ट करतात, मस्ती करतात त्या प्रमाणे ती ज्येष्ठ व्यक्ती लहान सहान निर्णयात दखल देऊ लागते, न विचारता सल्ले देऊ लागते, स्वतःचे ज्येष्ठत्व इतरांवर ठसवू पाहते. ते इतरांना जाचक होते. संघर्ष, वादावादी सुरू होते. ज्येष्ठ दुखावतात एकटे पडू लागतात.


हे सर्व पूर्ण नाही तरी अंशतः टाळणे शक्य असते. आजकालच्या काळात आर्थिक दृष्ट्या मुलांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण म्हातारपणाची सोय तरूणपणातूनच करायला हवी. ज्यातून स्थायी स्वरूपात काही मिळकत होत राहील अशी गुंतवणूक करावी. भावनेच्या आहारी न जाता, व्यवहारी वृत्तीने काही गुंतवणूक संपूर्णपणे स्वतःच्या नांवावर, जमल्यास मुलांना अंघारात ठेवून करावी. कारण वडीलांची आर्थिक गुंतवणूक माहित असेल तर कधी कधी मुले ती त्यांच्या किंवा घराच्या वाढत्या गरजांसाठी भावनिक दडपण आणून (आम्ही तुम्हाला सांभाळत नाही का? तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?) मोडायला लावतात. सर्वच मुले असे वागतात असे नाही. पण अनेक दु:खी ज्येष्ठांची ही शोकांतिका आहे. तसेच आजारपणाचा स्वतःचा आणि पत्नीचा विमा असावा.

दुसरी गोष्ट आहे मानसिक. इतकी वर्षे घर चालविल्या नंतर म्हातारपणी स्वखुषीने सुत्रे मुलांच्या हाती सुपूर्त करावीत. त्याना त्यांचे निर्णय घेऊ द्यावेत. त्यांना कर्तव्यपूर्तीचा आनंद घेऊ द्यावा. त्यांना त्यांचा 'संसार ' उभा करण्याचा आनंद मिळवू द्यावा. त्यांच्या चांगल्या निर्णयांचे तोंड भरून कौतुक करावे. त्यांनी विचारला तरच सल्ला द्यावा. चूका फार सौम्य करून दाखवून द्याव्यात. आता ते 'कर्ते' आहेत हे मनाने स्विकारावे. आपण एक
पाऊल मागे घ्यावे.

भावनिक पातळीवर, 'प्रेम करावे म्हणजे प्रेम मिळते' (मिळतेच असे नाही) हे तत्व अंगीकारावे. मुलांशी, नातवांशी प्रेमाने वागावे. म्हणजे आम्ही काय क्रुरतेने वागतो की काय? असे कोणी म्हणेल. पण प्रेम जे त्यांना समजेल, दिसेल, रुचेल ते असावे असे मला म्हणायचे आहे. पुरुष निवृत्त होतात पण बायकांना सहजासहजी निवृत्ती मिळत नाही. त्यांना ती मिळावी असा विचारही आपल्या मनात येत नाही आणि कित्येक केसेस मध्ये त्यांनाही ती नको असते. पण वयोमानानुसार त्यांचेही हातपाय थकतात. रजोनिवृत्तीनंतर हाडांचा ठीसूळपणा वाढीस लागतो. घरातील माणसे संखेने वाढलेली असतात. शारिरीक काम वाढलेले असते. म्हणजे एकीकडे ताकद कमी झालेली असते तर दूसरीकडे श्रम वाढत असतात. पत्नी आता आपले न ऐकता मुलाचे ऐकते ही भावना पतीच्या खुळ्या मनात घर करत असते त्यामुळे एकीकडे कुरकुरणारा पती आणि दूसरीकडे 'डिमांडींग' तरून पिढी ह्या चरकात ती बिचारी पिळून निघते. अश वेळी पुरुषाने तिला घरकामात शारिरीक मदत करावी. तिने आपल्याशी कसे वागावे ह्याच्या अपेक्षा न ठेवता आपण तिच्याशी चांगलेच वागावे, बोलावे. तिच्या कामाचा भार कमी करावा. वाटून घ्यावा. कमी कमी होऊ पाहणारा 'संवाद' चालू ठेवावा. तिची होणारी ससेहोलपट समजून घ्यावी. ती कमी करण्यासाठी आवश्यक ती मदत करावी. तिला, मुलांना भावनिक आधार द्यावा तुम्हाला तो आपोआप मिळत जातो.

मोकळा वेळ कसा वापरावा, हा एक मोठा प्रश्न असतो. मानसोपचार तज्ञांशी, फॅमिली डॉक्टरांची विचारविनिमय करून शारिरीक व्यायामासाठी पोषक अशा हालचाली होतील असे पाहावे. समविचारी (रडणारे, कुढणारे नाही) मित्र जमवावेत. वाचन करावे, थोडेफार आध्यात्मिक वाचन करण्यासही हरकत नाही. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ देऊ नये. आयुष्यभर नोकरीच्या/व्यवसयाच्या धबडक्यात न जमलेल्या हौशी (वयानुरुप) भागवाव्यात. निसर्गाला वाचावे, जाणून घ्यावे. म्हातारपणी बागकाम 'निर्मिती आनंद' मिळवून देतो. नातवंडांमध्ये आपले बालपण शोधावे. आपल्या मनःस्वास्थासाठीही हे चांगले असते. दुधापेक्षा साय जास्त महत्त्वाची, मुद्दलापेक्षा व्याज अधिक प्रिय. ही नातवंड आपली असली तरी ती 'दुसर्‍यांची' मुलं आहेत हे विसरू नये. 'त्यांच्या' इच्छेचा मान राखून नातवंडांवर संस्कार करावेत. नातवंडांसमोर आपल्या मुलांचे, त्यांच्या आई-वडीलांचे दुर्गुण उगाळू नये.

मुलांनी म्हातार्‍या आईवडीलांचा मान राखावा. त्यांनी त्यांच्या काळात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला वाढवलं आहे हे विसरू नये. त्यांच्या मानसिक अवस्था जाणून घेऊन निर्माण होणारे गुंते अतिशय हळूवार हाताने सोडवावे. थोडेफार त्यांच्या कलाने घ्यावे, थोडेफार आपले घोडे दामटावे. म्हातारपणी आई-वडीलांच्या अपेक्षा असतात मुलांनी त्यांना 'वेळ' द्यावा. वेळ द्यावा म्हणजे नुसता तास आणि मिनिटात मोजता येईल असा नाही. एकत्रित कुटुंबाचा आनंद मिळवून देईल असा वेळ द्यावा. त्या वेळात आई-वडीलांच्या इच्छा आग्रहपुर्वक पूर्ण कराव्यात. त्यांच्या इच्छेनुसार कार्यक्रम आखावेत. त्यांना अतिश्रम होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. त्यांची शारीरिक, भावनिक सेवा करावी. हे कायम करावे लागत नाही पण महिन्यातून एकदा किंवा दोन तिन महिन्यातून एकदा जमवून आणले तरी चालते. ज्येष्ठांना आपल्याला अडगळीत टाकलेले नाही, आपल्याला स्वयंपाकीण बाई किवा मुलांना साभाळणारी आया म्हणून वागविले जात नाही तर आपले ही ह्या कुटुंबात काही स्थान आहे. मुलं आपल्याला प्रेमाने वागवताहेत ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते. त्यांना जगायला नवा हुरूप मिळतो. दोघांनीही लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे 'शब्द' हे शस्त्र आहे.

सांभाळून वापरावे. संतापाच्या भरात तत्क्षणी प्रतिक्रिया व्यक्त करण्या ऐवजी शांत झाल्यावर हळू शब्दात, शब्दांची चांगली निवड करून आपली भूमिका संमजावून सांगावी.

अशा प्रकारे सर्व पक्षांनी आपापले कार्य, स्वार्थ आणि गर्व विसरून, केले तर वृद्धापकाळ हा शाप ठरणार नाही.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com