Sunday, August 31, 2008

सोन्याचं परिवर्तन

गावात आमच्या घराच्या बाजूला महारवडाची आळ होती.गरिब महार आणि चांभार जातीचे लोक बारिकबारिक धंदे करून आपली गुजराण करीत असत.त्यांची लहान लहान मुलं त्या आळीच्या बाहेर येवून मधल्या एका मोठ्या मैदानात खेळायला येत असत.आम्ही पण त्याच मैदानात क्रिकेट खेळत असूं.बाउंडरीवर बॉल मारला की लहान लहान मुलं बॉल परत फेकायची.अशा तर्‍हेने आमची ह्या मुलांशी दोस्ती झाली होती.सोन्या हा बाबू महाराचा मुलगा.
सोन्याची आई कधीकधी बांबूच्या पट्याची काही खेळणी आणि सुपे,रवळ्या टोपल्या सारख्या गोष्टी घेवून दारो दार विकायला जायची.त्यावेळी हा सोन्या तिच्या कंबरेवर बसण्याच्या वयाचा होता.तेव्हा पासून मी त्याला पाहिला होता.
त्याच्या आईचा आवाज,
“सुपा रवळ्यो टोपल्यो होयेत गे आई?”
असं घरासमोर मोठ्याने ओरडून माझ्या आईला बोलवावयाची.माझी आई तिच्या कडून एखाद दुसरी वस्तु विकत घ्यायाची.
“एकादी फाटकी पैरण नाय तर चड्डी माझ्या सोन्याक नेसूक आसा काय गे आई?”
हे ऐकून माझी आई माझे किंवा माझ्या धाकट्या भावाचे जूने कपडे तिला द्दायची.तर अशा परिस्थितीत वाढलेला हा सोन्या त्या दिवशी मला व्हि.टी. स्टेशनच्या हारभरच्या प्लॅटफॉमवर भेटला.
इतक्या वर्षानी दिसल्यावर ओळख कशी पटायची हा पण योगायोगच म्हटला पाहिजे.गाडी लेट झाली असल्याने तो बसला होता त्याच्या जवळच मी बाकावर बसलो.हारभर गाड्या नेहमीच लेट असतात ह्या विषयावरून आमचं बोलणं सुरू झालं.आणि त्याची बोलण्याची स्टाईल आणि हसंण्याच्या लकबीवरून माझी स्मृती तिस पसतिस वर्षावार गेली.राहवलं नाही म्हणून मीच त्याला विचारलं,
“तू सोन्या महार का रे?”
तो हो म्हणाल्यावर सहाजिक माझी ओळख करायला तो उत्सुक्त झाला.मला त्याने बरोबर ओळखलं.मग काय जुन्या आठवणीना कहर यायला लागला.दोघानी ठरवलं की आपण कुठे तरी निवांत बसून बोलूंया.क्राफोर्ड मार्केटच्या सदानंद रेस्टॉरंट मधे बसून बोलुंया म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो.संध्याकाळची वेळ होती. ऑफिसीस सुटल्यामुळे त्या रेस्टॉरंट मधे त्यामानाने गर्दी कमी असायची.एका निवांत जागी बसून दोन चहाला ऑर्डर देवून बोलायला सुरवात केली.जुन्या गोष्टी संपल्यावर मी त्याला विचारलं,
“तू आता काय करतोस?”
त्यावर सोन्या म्हणाला,
“गावाहून इकडे मुंबाईला आम्ही सर्व भावंडं आलो.आमचे आई बाबा दोघंही त्यापूर्वी निर्वतले.
इकडे आल्यावर आंम्ही सर्व आमच्या काकाच्या घरात ठाकूरद्वारला रहायला गेलो.चर्नीरोड स्टेशनच्या समोर पारसी अग्यारी वाडीत राहत होतो.
स्वतःच्या भूतकाळापासून स्वतःला दूर ठवणं हे जरा चमत्कारीक वाटतं.
एक दलित माणूस म्हणून मलाच नव्या जगात मी पहातो.मला वाटतं शिक्षणात अशी क्षमता आहे की हे शिक्षण एखाद्दाच्या जीवनात पूर्ण बदलाव आणू शकतं.
मला शिक्षणामुळे ह्या दलित जमातीतल्या जगातल्या एखाद्या सशाच्या बिळातून सुटका करून घेतल्या सारखं वाटतं.मी दीडशे किलोचा भरभक्कम त्या बिळातून सुटलो आणि इतरानी माझ्या पाठोपाठ यावं असा अपेक्षीत राहिलो.आणि आता त्या ऐवजी मलाच मी एका अनोळखी प्रदेशात येऊन,जास्त करून माझा मी राहून ह्या नवीन जीवना बद्दल आश्चर्य करीत राहिलो.
उदाहरणार्थ अलीकडे मी छोट्या छोट्या नाटकात भाग घेऊन पुर्वीच्या झोपडीतल्या चालू करमणुकीतून बाहेर पडलो.मी आता बारबालाच्या कार्यक्रमापासून दूर राहत गेलो.कारण आता मला स्त्रीमुक्तिच्या आंदोलनात डोकाऊन पाहून लक्षात आलं की तसल्या कार्यक्रमातून मिळणारी चेतना त्या स्त्रीयांच्या होणार्‍या शोषणाचं चिंतन करून फिकी वाटू लागली. अमली पदार्थ वाटणारा तो मवाली मंद दिव्याच्या प्रकाशात मोठ्या डीलर कडून ते पदार्थ घेऊन रेंगाळणारा तो आता त्याचंकाय झालं असेल.?
मी मात्र आता लायब्ररीत दलित लेखकांची पुस्तकं वाचण्यात मग्न असतो.आणि जुने माझे दोस्त आता तुरूंगात जीवन कष्टीत असावेत.

तसा मी मला नशिबवान समजतो कारण असलं काही मुर्खासारखं करून पकडला गेलो नाही.असाच मी जेव्हा रस्त्यावर मोकाट फिरायचो तेव्हा मला असलं काही करण्यात एक्सपर्टच समजत नव्हतो.परंतु त्या तारुण्याच्या काळात मी एका मुलीवर कविता लिहिल्याचं आठवतं.तिला माझा पूर्ण तिटकारा का येतो हा त्या कवितेचा आशय होता.ती कविता मी लोकल मासिकात प्रसिद्धिला दिली.त्यावेळी मला व्याक्रण म्हणजे काय आणि कवितेतले यमकासारखे बारकावे तरी काय हे काही समजत नव्हतं.
म्हणून मी पुन्हा शाळेत जाऊन हे शिकायला लागलो आणि एकातून एक निघायला लागलं.
माझी रस्त्यावरची दादागिरी आता हळू हळू जशी वाफ विरळ होऊन लोप पावते तशी व्हायला लागली.चांगल्या जीवनासाठी जगण्याची माझी इच्छा बळावत गेली.
आता सुद्धा मी झगडतोय पण निराळ्या प्रकारची लढाई आहे.लिहिण्या वाचण्याचे फायदे मला आता कळायला लागले आहेत.चर्चा करणं व्याख्यानं ऐकण्याचेही फायदे मला कळायला लागले आहेत.
माझी ही नवी लढाई आणि रणांगणं म्हणजे दलितांच शोषण,गरीबी,स्त्रीयांच शोषण आणि जातपातीचा धिक्कार अशा पॉलीसीवर चालू राहिली.मला वाटतं मी स्वतःच जागतं बोलतं -शिक्षणात असलेल्या क्षमतेमुळे माणसाचं परिवर्तन कसं होतं ह्याचं- उदाहरण होऊन बसलो आहे.माझी खात्री आहे की नव्या चहर्‍यांच पीक कॉलेज मधे आलं की मला ते प्रोफेसर म्हणून संभोततील.कदाचीत त्या हॉल मधे मी एकटाच दलित चेहर्‍याचा आणि दलित जमातीतला असेन.कदाचीत मला वेगळा पडल्याचा डंक दुखवत राहिल.पण मी त्या डंकाशी दोन हाथ करीन.कारण मला त्या बदलावर विश्वास बसला आहे की जो शिक्षणाने आलेल्या क्षमतेमुळेच होवू शकतो.

“सोन्याचं हे सर्व ऐकून मी खरोखरंच अचंबित झालो.म्हणतात ना,
“शेणातले किडे शेणात राहत नाहीत”
तसंच सोन्याचं पारिवर्तन एका सुशिक्षीत माणसात झालं.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, August 29, 2008

हे थेंब नसूनी असती तारे

हे थेंब नसूनी असती तारे
येती आकाशगंगे मधूनी सारे
एकावेळी शंभर शंभर उतरती
गगनामधूनी तुझ्याच अंगावरती

मोत्यापरी थेंब नभातूनी दमकत येती
वा कभिन्न रात्री काजवे चमकती
जसे पदरामधे शिरती तुफान वारे
हे थेंब नसूनी असती तारे
येती आकाशगंगे मधूनी सारे

जवळी बसून मला तू सुंदर दिसशी
हाताच्या विळख्यात तू तस्वीर होशी
जसे प्रतिबिंबामधे दिसती अनेक चेहरे
हे थेंब नसूनी असती तारे
येती आकाशगंगे मधूनी सारे



श्रीकृषण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, August 27, 2008

पुन्हा एकदा आमचे मित्र श्रीयुत. “मी, माझे, मला”

आज पुन्हा आमचे दोस्त श्रीयुत.”मी,माझं,मला”,
एका कार्यक्रमात भेटले.कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही परत घरी जायला निघालो.वाटेत इतर काही गप्पा झाल्यावर मी त्यांनासहज विचारलं,
“सध्या कसला विषय डोक्यात घोळत आहे.?”
माझा प्रश्न संपतो न संपतो तोच मला हे आमचे दोस्त म्हणाले,
“आता विचारलंत तर चला मी काय ते सांगतो.जवळच्या गुरूप्रसाद रेस्टॉरंट मधे बसून गप्पा मारुया.”
मनात म्हणालो,
“कुठली झकमारली आणि ह्या गृहस्थाना हा प्रश्न केला”
आता काय करणार स्वभाव भिडस्त पडला, नाही म्हणता येई ना.म्हटलं चला.
कॉफीची ऑर्डर देऊन झाल्यावर कसला ही विलंब न लावता ते म्हाणाले,
“ज्यावेळी माझं मलाच समजलं,की मला अजून तेव्हडं बुद्धिचातुर्य-विसडम- आलेला नाही त्यावेळी मी माझा मार्ग उघडा करून ज्याना ते आहे त्यांच्याकडून शिकाण्याचं ठरवलं.मला मीच आणखी एका प्रयत्नात टाकण्याचा चान्स दिला.
एखाद्दाला श्रद्धा असते ह्या विचारा बद्दल माझ्या मनात नेहमीच संभ्रम असायचा. माझ्या आयुष्यातला बराचसा वेळ एक तर मी कुठल्याही घटनेच्या निश्चीततेबद्दल मनात खोल इच्छा रूतून ठेवतो. नाही तर तितकीच ती निश्चीतता असंभवनीय ही असावी ह्या ही समजूतीवर भर देऊन राहतो. अशा ह्या दोन्ही विचाराच्या कात्रीत माझं मन मी द्विधा करून घेतलं आहे.
कधी कधी माझं मलाच समजूत घालून घेण्याच्या माझ्यात असलेल्या क्षमतेमुळे ह्या सिद्ध न होवू शकणार्‍या घटना काहीशा मानसिक धीर देणार्‍या ठरायच्या. परंतु ही सोय तात्पुरतीच असायची.जगात सुखापेक्षा दुःखंच जास्त असतात ही एक विचारस्रणी आणि जे काय घडतंय ते अर्थशून्य,जरूरी शिवाय आणि शुन्यकिमतीचं असतं ही दुसरी विचारसरणी ह्या दोन विचारसरणी मधे समझोता आणणं म्हणजे ही एक दोर्‍यावरची कसरतच होईल असं मला वाटतं.

एका टोका पासून दुसर्‍या टोकापर्यंत विचार करायला गेल्यावर माझ्या व्यवहारी जगात वावरताना ह्यातला वाद परावर्तीत होऊन कधी कधी अंतःकरणापासून जवळ वाटणार्‍या चमत्कारीक आध्यात्माची ओढ असायची आणि कधी कधी अलीकडे दिसणार्‍या त्या छंदीफंदी रात्रीच्या क्लबातल्या संगीताच्या धमाल वातावरणाची ओढ असायची.

श्रद्धा जोपासण्याचा मी आटोटोकाट प्रयत्न केला पण म्हणताना “श्रद्धे वर श्रद्धा” ठेवणं, तसं व्हायचं. सत्य शोधून काढणं कठीण व्हायचं.छोटी छोटी सुंदर प्रोत्साहीत करणारी देवावरची स्तुती करणारी कवनं हळू हळू वैतागी आणि दुःखी वातावरणात विरून जायची.

मला एक धक्का दायक शोध लागला की माझ्या आध्यात्मा वरील समजल्या गेलेल्या अडचणी ह्या आजूबाजूच्या वातावरणाशी संबंधीत नव्हत्या तर त्या माझ्याच आपमतलबी वृत्तीं मुळे होत्या.माझ्या जवळच्याना जे मी दुखवलं आणि दुःख दिलं ते मी माझ्या मतलबी राहण्याच्या स्टाईलमुळे झालं.
अनुभव हाच उत्तम शिक्षक आहे ह्याचा पडताळा मला माझ्याच कर्माचे भोग उपभोगून मिळाला. काहीना अनुभवातून मार्ग दिसतो, मला मात्र हे सहज शिकायला मिळालं नाही. मला कठीण मार्गातून हे शिकायला मिळालं. काही वर्ष मी मलाच हरूवून बसलो होतो.ऐहिक सुखं म्हणजे आनंदीआनंद असं वाटायचं. पण जर का ह्या वातावरणाकडे रेंगाळलेल्या पश्चातापी दृष्टीने लक्षात घेऊन पाहिलं नाही तर त्याची परिणीती एकाकीपणा आणि नैराश्यामधे होऊन ते एक दुष्ट चक्रच व्हायचं.
एकतर आपल्यात बदलाव करावा किंवा मरून जावं अशा पराकोटीच्या स्थितीला माझी मनस्थिती आली.मुलतः मी माझं मनच गमावून बसलो.माझ्या लक्षात आलं की ज्याला मी पूर्वी फूकाचे बोल समजत होतो ते बोल प्रत्यक्षात सत्यच सांगत होते.
“कुणाकडून घेण्यापेक्षा कुणाला तरी द्दावं”
असं कुणी तरी म्हटलंय.पण आता माझ्या लक्षात आलंय की अश्या गोष्टीवर श्रद्धेने न पाहता अनुभव म्हणून पाहणं जास्त संयुक्तिक ठरेल.
हा मार्ग मी तंतोतंत पाळतो असं नाही पण मनापासून सांगू शकतो की भारतीय कवयित्री-तत्वज्ञानी शांतीदेवीच्या उक्ति प्रमाणे
“जगात भरलेला सर्व आनंद दुसर्‍याला शुभ चिंतूनच अस्तित्वात आहे.उलट जगात भरलेलं सर्व दुःख स्वतःचच सुख पाहिल्यामुळे अस्तित्वात आहे.

माझे हे दोस्त,श्रीयुत.”मी,माझे,मला” स्वतःला काय वाटत असतं ह्याचं आख्यान भिडभाड न ठेवता दुसर्‍याला सांगण्यात आनंद घेतात.
बाहेर बराचसा काळोख झाला होता.मीच त्याना म्हणालो,
“आपण पुन्हा कधीतरी बोलूया.”
ते कबूल झाल्याचं पाहून सुटकेचा निश्वास टाकून मी त्यांचा निरोप घेतला.
आमचा भिडस्त स्वभाव आम्हाला असा नडतो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोर्नीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, August 25, 2008

वस्ती वसविली मी अगदी जगावेगळी

प्रतिमा तुझी माझ्या हृदया जवळी
वस्ती वसविली मी अगदी जगावेगळी

दैव माझे सजवूनी दिलास तू आकार
निष्कामी मला तू बनविलेस मुर्तिकार
शब्द नी शब्द ठेविला मी हदया जवळी
वस्ती वसविली मी अगदी जगावेगळी

आणूनी स्मरणात केली मी पुजा रात्रंदिनी
अचंबीत झालो ततक्ष्णी पाउलांची निशाणी पाहूनी
झुकवूनी मस्तक माझे वाहतो फुलांची ओंजळी
वस्ती वसविली मी अगदी जगावेगळी

करूनी गीतांची माला वाहिली मी तुझ्या गळी
दूर राहूनी पुकारले तुला सकाळ संध्याकाळी
कोणत्या कारणी दिलीस शिक्षा अशी आगळी
वस्ती वसविली मी अगदी जगावेगळी



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, August 23, 2008

आता दोषारोपाना जागा नाही आता फक्त प्रेम.

जाता जाता मी शिलाला म्हणालो,
“म्हणूनच मी प्रार्थाना करीत असतो,की मला रोज एक नवी चूक करू दे.त्या चुकेतूनच मी काही तरी नवीन शिकेन.आणि म्हणूनच मी मला माणूस समजेन.मात्र तिच चूक परत परत करणारा माणूस होऊच शकत नाही.”

हा पण एक योगायोगच होता.मी माझ्या पुतणीच्या मुलीच्या लग्नाला जातो काय आणि जवळ जवळ चाळीस वर्षानी मला त्या समारंभात शिलाची भेट होते काय.शिला अमेरिका सोडून कायमची इकडे राहयाला आली होती,हे तेव्हाच मला तिच्याशी बोलताना कळलं.प्रथम मी तिला ओळखलंच नाही.सहाजीकच आहे इतक्या वर्षानी पाहिल्यावर माणसाच्या चेहर्‍यात राहणीत जो बदल होतो तो पटकन लक्षात येत नाही.पण बोलण्याची ढब,हंसतानाची स्टाईल,चेहर्‍यावरचे भाव हे आपल्या मनात खोल रुतलेले असतात.
“अरे,तू मला ओळखलं नाहिस? मी शिला द्फ्तीदार.तुझ्या बरोबर कॉलेजात होते.प्रो.देसाई आपले पेट होते.”
एव्हडं बोलल्यावर मला तिला ओळखायाला वेळ लागला नाही.
नंतर ती मला म्हणाली,
“तुला लांबून पाहिल्यावर तुझी अंधूकशी आठवण आली.पण मग मी तुझ्या पुतणीलाच विचारून खात्रीकरून घतली,की तो तूच आहेस.”
मी तिला विचारलं,
” तुला मुलं किती?कुठे आहेत ती?”
थोडीशी मायूस झाली.मला म्हणाली,
“नरीमनपॉईन्ट वर मी फ्लॅट घेतला आहे.हे माझं कार्ड.वेळात वेळ काढून ये.”
त्याच वेळी मला वाटलं होतं की ती मला काही तरी जीवाभावाची गोष्ट बहूतेक सांगणार आहे.
ज्यावेळी मी तिच्या घरी गेलो,त्यावेळी आत तिचा एक पंचवीस तीस वर्षाचा मुलगा एका इझीचेअरवर झोपलेला दिसला.ती सकाळी दहाची वेळ होती.माझं स्वागत करून मला बसायला सांगितल्यावर,तिच्या मुलाला उठवून ती त्याला आत घेऊन गेली.
बहूतेक त्याला तिने आत त्याच्या खोलीत झोपायला सांगितलं असावं.एका नोकराला आमच्या दोघांसाठी चहाची ऑर्डर देऊन माझ्या जवळच्या सीटवर येऊन बसली.मला म्हणाली,
“तू आता जेवूनच जा”
तिचा आग्रह पाहून मी ओके म्हटलं.
तिला आपला मुलगा केदार त्याची कथा सांगायची होती.
मला म्हणाली,
“जेव्हा केदार ने कबूल कलं की त्याला दारूच्या व्यसानाची संवय झाली आहे,त्याच क्षणी मी कुणाला तरी दोषपात्र करायला किंवा कुठल्यातरी परिस्थितीला दोषपात्र करायला मार्ग हुडकण्याचा प्रयत्न करू लागले.मी त्याच्या मित्राना दोषी ठरवायचा प्रयत्न केला.मी त्याच्या वडलाना दोषी करण्याचा प्रयत्न केला,मी त्यांच्या-वडिलांच्या- माझ्या मधल्या सतत वाद होत असलेल्या वातावरणला दोष देण्याचा प्रयत्न केला.पण सरते-शेवटी मी मलाच दोष देण्याचा प्रयत्न केला.”

तुमचं मुल वाढत असताना ते पुढे व्यसनी होईल अशी तुम्ही अपेक्षा करीत नाही.मुल जन्माला आल्या क्षणापासून तुम्हाला आशा असते,तुम्हाला स्वप्न पडतात त्याच्या भविष्या बाबत,पण त्या भविष्याच्या यादीत त्याच्या व्यसनाधीन होण्याच्या शक्यतेची नोंद नसते.ही नोंद आपल्या मुलाबद्दल होऊ शकत नाही कारण व्यसनाधीन होण्याच्या क्रियेला सभोवतालचं वाईट वातावरण कारणीभूत असतं,वाईट संगोपन कारणीभूत असू शकतं.कुणाला तरी किंवा कशाला तरी दोष देणं भाग आहे.

ह्या असल्या गोष्टी माझ्या मनात येऊ लागल्या. त्याच्यावर बरेच उपचार केल्यावर आणि बरेच दिवस त्यामुळे त्याच्या पासून दूर राहिल्यामुळे,माझा जो एव्हडा कोंडमारा झाला होता त्यानंतर आता मला वाटू लागलं की कुणाचाच दोष नाही ह्या घटनेत.

केदारने दारूचं व्यसन लागल्याची कबूली दिल्यानंतर मी खूप माझी डोकेफोड केली.माझ्याच मुलाला हे व्यसन कसं लागलं हे मला समजेना.एव्हडा हूषार,उमदा,टॅलेंटेड आणि सगळ्यात प्रेमळ असलेल्या ह्याला हे कसं झालं?.सुरवातीची धक्का लागण्याची वेळ निघून गेल्यावर मी आत्मपरिक्षण करायचा प्रयत्न केला.त्याच्या आयुष्यातल्या “कां आणि कसं” ह्या गोष्टीचा पडताळा लावण्याचा प्रयत्न केला.माझं हवालदिल मन मला समजावू लागलं की मीच त्याला ह्या व्यसनातून परावृत्त करायला हवं होतं.कदाचीत मला त्या परिस्थितीत परत जायला मिळालं असतं तर मी माझ्याच चूका सुधारल्या असत्या.

पुढचे दिवस,आठवडे,महिने मी बारीक बारीक दुवे जमा करून त्याचा एक गोळा तयार करण्याचा प्रयत्न केला.कधी कधी मी हा नाद सोडायची तर कधी सोडायला द्दायची.दोष देण्याची माझी वृत्ति आता मला आशेचा किरण दाखवावला लागली.जे मला माझ्या मुलापासून दुरावत होतं त्या प्रेमाशीच मी दोन हात करायचे ठरवले.
केदारची मी रोज आठवण काढायची.तो घरातून बाहेर गेल्यावर मी मुसमुसून रडायची आणि त्याच्या सुरक्षते बद्दल आणि तो कुठे असेल ह्या बद्दल काळजी करायची.
कधी कधी मी रात्रीची एकदम जागी होऊन घाबरून जायची.पण माझा तो आईचा जीव मला उगाचच वाईट बातमी साठी सतर्क राहण्याचा इशारा द्दायचा.पण त्या सर्व दिव्यातून जाताना मी मनात एव्हडंच म्हणायची की माझं त्याच्यावर प्रेम आहे.

माझा मुलगा का आणि कसा व्यसनी झाला हे मला माहित नाही मी आता अशा पायरीवर येऊन बसली होती की माझ्या मनात म्हणायची काही हरकत नाही.आयुष्य असंच जात राहणार आणि केदार हा अजून माझाच मुलगा आहे.
सकाळी उठून जेव्हा आम्ही दोघं चहा पिण्यासाठी बसतो,त्यावेळी मी केदारला सुधारण्याचा उपदेश वगैरे देत बसत नाही.मी फक्त त्याच्यवर प्रेम करते.कधी कधी दुःख आणि वेदना असतात.पण दोषाला जागा नसते.माझ्या मनात फक्त प्रेमाचाच ओलावा असतो.”
हे सर्व शिलाच्या तोंडून ऐकून मी खूपच सद्गदीत झालो.कुणाच्या हातात असतं हे सगळं?असा माझ्या मनात विचार आला.चूक होऊन गेल्यावर सुधारून राहणं ह्याला माणुसकी म्हणता येईल.पण झालेल्या चुकीचे परिणाम आणि भोग मात्र सुटत नाहीत.मग ते भोग निमुटपणे भोगल्या शिवाय गत्यंतर नसतं.
जाता जाता मी शिलाला म्हणालो,
“म्हणूनच मी प्रार्थाना करीत असतो,की मला रोज एक नवी चूक करू दे.त्या चुकेतूनच मी काही तरी नवीन शिकेन.आणि म्हणूनच मी मला माणूस समजेन.मात्र तिच चूक परत परत करणारा माणूस होऊ शकत नाही.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, August 21, 2008

दर्शन प्रियाविणा व्याकूळ होते

पहा पहा वर्षाविणा जलधारा येते
दर्शन प्रियाविणा व्याकूळ होते

प्रियाविणा दुनिया एकाकी होई
दुःख मनाचे दुप्पट होत जाई
जागती दुःखे नशिबही झोपी जाई
लोलक नयनाचे अश्रूनी चमकते
पहा पहा वर्षाविणा जलधारा येते

विरहीण हार फुलांचे गुंफीत जाई
तुटली स्वपने मोती विखरून जाती
ज्योत दिव्याची विझली जाई
स्वप्नं मनातले विरून जाते
पहा पहा वर्षाविणा जलधारा येते

प्रीत आपुली दुनिया खेचून घेई
पिऊनी आंसवे दिवस निघून जाई
असता दूर प्रिया कसले जगणे
पगली दुनिया आता सोडून जाते
पहा पहा वर्षाविणा जलधारा येते



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, August 19, 2008

अवघे पाऊणशे वयमान.

अस्मादिकाना पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली.
१४ ऑगस्ट १९३३ हा माझा जन्म दिवस.नंतरचे सगळे वाढदिवस झाले.पण ह्यापुढे कसले वाढदिवस आता राहिले ते काढदिवस.
जन्मापासून दोन वर्षाचा होईपर्यंत,
कुकलं बाळ होतो.
त्यानंतर सहा वर्षाचा होईपर्यंत
अल्लड मुलगा होतो.
त्यानंतर अठरा वर्षाचा होईपर्यंत
शाळकरी होतो.
त्यानंतर बावीस/पंचवीस वर्षाचा होईपर्यंत
कॉलेज वीर होतो.
त्यानंतर थोडी वर्ष
चाकरमानी होतो.
त्यानंतर लग्न झाल्यावर
हाच मुलाचा/मुलीचा बाप होतो.
त्यानंतर मुलं मोठी होऊन शिकायला लागल्यावर
गृहस्थ झालो.
त्यानंतर पन्नासी उलटल्यावर
वयस्कर झालो
त्यानंतर साठी उलटल्यावर
म्हातारा झालो
त्यानंतर आता पंचाहत्तरी झाल्यावर
कदाचित थेरडा होईन
पण काय हरकत आहे असं म्हणून घ्यायला.हे कुणालाही चुकलेलं नाही.जो तो आपआपल्या अक्कले प्रमाणे बोलतो चालतो आणि वागतो.

“दंताजीचे ठाणे सुटले
नन्ना म्हणते मान
फुटले दोनही कान
अवघे पाऊणशे वयमान”

असं काही नाही मंडळी.
जवळचं वाचायला “ढापणं” लागली तरी दूरचं चांगलं दिसतं.
कान शाबूत आहेत.पाल चूकचूकली तरी स्पष्ट ऐकायला येतं
दात अजूनही शाबूत आहेत,कवळी लावावी लागली नाही.
मान ताठ करून अजून चालतो.
जीना चढताना,उतरताना आधार घ्यावा लागत नाही.
हे कसं शक्य झालं असं विचाराल मंडळी तर त्याच उत्तर-
सुपारीच्या खांडाचही व्यसन नाही.सुपारी आडकित्यात कशी कातरतात माहित नाही.
सुपारीचा बेडा कसा सोलतात माहित नाही.
“घुटूं” कधीच घेतलं नाही.वासाने उमळ येते.
“फुंकणीच्या” धुराने घुसमटायला होतं.
“बाळं” लागण्याचे दिवस आता गेले.
पन्नासी नंतर मेदुतले रोज ८० हजार न्युरान्स नाश पावतात असं म्हणतात.पण लेखन वाचनामुळे,लाखभर न्युरान्स नवे फायर होत असावेत.
पु.ल. म्हणतात,
“उतार वयात सकाळी उठल्यावर जर दोनही गुढगे दुखले नाहीत तर समजावं की आपण मेलो.”
तसं काही होत नाही.खडखडीत आहे.
हे काही माझं कौतुक म्हणून सांगत नाही मंडळी.
उद्दांच काही माहित नाही.आज आहे हे असं आहे.
एव्हडं मात्र खरं,

ते दिवस निघून गेले

मातेच्या मांडीवर माथे टेकून
थोपटण्याचा हट्ट करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले.

भावंडामधे हंसून खेळून
कधी मधी नाहक भांडून
क्षमा याचनाचे
ते दिवस निघून गेले

ग्रुहपाठ करून सुद्धा
शाळेत जाऊन
गुरुजीचा ओरडा खाण्याचे
ते दिवस निघून गेले

सुगंधी तेले चोपडून
केसाचा कोंबडा काढून
नेत्र पल्लवी करण्याचे
ते दिवस निघून गेले

घारीच्या पंखाचे बळ घेऊन
निळ्या नभाकडे न्याहाळून
ऊंच ऊंच भरारींच्या स्वपनांचे
ते दिवस निघून गेले

राजा राणीचा संसार करून
मनोरथाचे बंगले बांधून
विश्वाचे रहस्य उलगडण्याचे
ते दिवस निघून गेले

ग्रुहपाठाचे धडे घेऊन
संस्काराचे धडे देऊन
पिल्लांना जोपासण्याचे
ते दिवस निघून गेले

काऊ चिऊच्या गोष्टी सांगून
चिमण्या नातवंडाना अंगाई करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले

या यादीतील स्मृतीना
निश्चीत आहे अंत
त्यानंतर
दिवस निघून जाण्याचे
नसे कसला खंत

तेव्हा मंडळी आहे ते असं आहे.
माझ्या ह्या जन्मदिवशी तुमच्या शुभेच्छा मला लाख मोलाच्या आहेत.त्यामुळे ह्याच लेखातून आपणा सर्वांचे धन्यवाद.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, August 18, 2008

चांगल्या बातम्याही वाईट बातम्या सारख्या प्रसारित होऊ शकतात.

पूर्वी एकदा मी कंपनीच्या कामाकरिता राजकोट मधे गेलो होतो.कामाच्या जरूरीमुळे मला काही दिवस तिकडे मुक्काम करायची जरूरी भासली होती.संध्याकाळी काम आटोपून झाल्यावर बाहेर कुठल्यातरी चांगल्या रेस्टॉरंट मधे जेवायला जाताना चालत जायला मी जास्त पसंत करायचो.आणि रस्त्यावर एव्हडा ट्रॅफिक असायचा की छोटे छोटे मॉपेड चालवणारे नेहमी एकमेकाला आपटायचे,घासायचे,पडायचे.म्हणजे अगदी छोटासा अपघात व्हायचा.पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की कुणाचीही बाचाबाची होत नसे.एक्मेकाला सॉरी म्हणून निघून जायचे.कधी कधी सॉरी हा शब्द मोठ्याने ऐकायला यायचा तर कधी कधी ओठांच्या हालचाली वरून सॉरी म्हटल्याचं भासायचं.हे त्यांच फ्रेंडली वागणं पाहून मला कौतूक वाटायचं.
फक्त दोन अक्षरांचा शब्द किंवा पुटपुटणं आणि सर्व कसं शांतिने होऊन जायचं.हा केवळ एक सामान्य सदभावनेचा प्रतिसाद असायचा पण माझ्या मनावर त्याचा बरेच दिवस आठवणीत ठेवण्यासारखा परिणाम झाला होता.

दया,आस्था,आणि फिकीर हे एकमेकांचे रक्ताचे नातलग समजले पाहिजेत.आणि त्यांचा वापर करून मनाला मिळणारी समाधानी ही एक देणगी सारखी वाटली पाहिजे.
एकमेकाच्या वाटेत आल्यावर एकाने दुसर्‍याला आपण कळ सोसून जाऊ द्दावं आणि त्या दुसर्‍याला त्याचा आनंद वाटून त्यानेगोड स्मित करणं आणि हे स्मित म्हणजेच एक उपकृततेची पावती त्याने दिली आहे असं समजून, जाऊं देणार्‍याने सुखावणं, ह्या क्रियेतून दोघांच्याही मनात एक खूषिचा प्रकाश चमकून जातो.तसं पाहिलं तर ही एक साधी घटना आहे.पण ती एक उमद्दा प्रवृतीची ओळख आहे.शेवटी ह्या वृत्तिचा संबंध आस्था आणि फिकीर ह्यांच्याशी जुळला जातो,जी ही वृत्ति अलीकडे बरिचशी शॉर्ट सप्लाय मधे आहे आणि कमी कमी होत चालली आहे.

पण म्हणून आपली फसगत करून घेण्यात अर्थ नाही.कारण तसा विचार करून घेणं म्हणजे निराशा पदरी पाडून घेणं.कुणाकडून झालेल्या चूका ही वृत्ति सुधारून घेईल,जखमा भ्ररिल, आणि ह्या शतकात शांति आणि अमन आणून आता पर्यंत जगात झालेल्या अत्याचारांपासून ही वृत्ति डोकं वर काढील असं वाटत नाही.खूपच अपेक्षा केल्यासारखं होईल.

शांत सागरात स्फुरणिय प्रवास होणं ही काही बातमी होऊ शकत नाही पण खवळत्या समुद्रात फुटलेल जहाज आणि त्याची हानि ही मात्र बातमी होऊ शकते.वाईट बातम्यानाच जास्त प्रसिद्धि मिळते.परंतु आस्था आणि फिकीर असण्याने वाईटाबरोबर चांगली बातमी पण प्रसिद्धिला येऊ शकते.
जोपर्यंत आतल्या आवाजाचे स्मरण करणारे आणि काळजी घेणारे लोक अवतिभोवती असतील,जोपर्यंत त्यांचा आवाज दबला जाणार नाही,जोपर्यंत ते जागृत राहून पुढे सरसावतील तोपर्यंत रास्त गोष्टीना मरण नाही.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, August 16, 2008

दुःखामधे सुख लपलेले असते साजणा रे!

गगन समजे चंद्र सुखी चंद्र म्हणे तारे
लाटा सागराच्या म्हणती सुखी असती किनारे
दुःखामधे सुख लपलेले असते साजणा रे!

पर्वत राशी दूरूनी पाहूनी दिसती सुंदर छोटे
जवळ जाऊनी दृष्य पाहता भासती दगडी गोटे
कळी समजे बाग सुखी बाग म्हणे बहारे
दुःखामधे सुख लपलेले असते साजणा रे!

रात्र काळी म्हणते मनी दिवसा असे उजाळ
दिवस गरमीचे म्हणती गार ती संध्याकाळ
झडली पाने झाडावरूनी म्हणती सुखी वर्षाला
जलधरा सुखी म्हणते उन्ह ते रखरखणारे
दुःखामधे सुख लपलेले असते साजणा रे!

निर्धन माणूस हाव धनाची मनात धरी रे
धनवानाला चैन नसे जमवूनी माया उरी रे
एकमेका सुखी पाहूनी सुख स्वतः पुकारे
दुःखामधे सुख लपलेले असते साजणा रे!



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Thursday, August 14, 2008

द्दावं,द्दावं आणि द्दावं

“हे दातृत्वच मला दुसर्‍यांशी,जगाशी आणि देवाशी दुवा जोडायला मदतीचं होणार आहे”

माणसांची आयुष्ये खरोखरंच गोष्टींचा “एनसायक्लोपीडाया” आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होईल असं मला वाटत नाही.
प्रत्येक व्यक्तिची आयुष्यातली कथा दुसर्‍या व्यक्तिपासून निराळीच असते.घटना जवळ पास तशाच घडत असतील,पण अनुभव नक्कीच वेगळे असणार.आणि त्या त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा निराळाच असणार.
मंजूचे अनुभव ऐकून मला वाटलं ही पण एक एकण्यासारखी कथा आहे.त्यामुळे ती काय सांगत होती ते मी निमुटपणे ऐकून घेत होतो.फक्त तिची ती दुःखी कहाणी ऐकून थोडा मायुस झालो.पण त्यातुनही काही शिकण्यासारखं तिच्या तोंडून ऐकून काही तरी कमविल्यासारखं वाटलं.
मंजू म्हणाली,
“मी आयुष्य जगले भावनावश राहून आणि नेहमीच घाईगर्दीत राहून.आणि असं करताना मी बर्‍याच गोष्टी साध्य व्हाव्यात ह्याचा प्रयत्न करून.माझ्या मनात ज्या काही श्रद्धा होत्या त्याचा विचार करायला पण मला समय नव्हता.आणि ह्याला खंड आला जेव्हा माझी अठ्ठावीस वर्षाची मुलगी प्रिया आजारी पडे पर्यंत.ती जवळ जवळ एक वर्ष कोमात होती आणि मी तिची घरीच सेवा केली.आणि शेवटी ती माझ्या मांडीवर डोकं ठेऊन निर्वतली.ते अख्खं वर्ष माझं दुःखात आणि काळजीत गेलं.माझं सर्व जगच स्थीर झालं होतं.दुसरं काहीच करायला नव्हतं,फक्त आठवण आल्यावर मुसमुसून रडणं आणि पुन्हा आठवण काढणं.तरीपण मला बांधून ठेवणारी माझी श्रद्धा आणि माझी धारणा ह्याचा विचार करायला मला संधी मिळाली.

माझ्या लक्षात आलं की मी तीच पन्नास वर्षापूर्वीचीच अजून आहे.प्रिया एका संस्थेत काम करायची.अपंग मुलांच्या शाळेत ती विना मुल्य काम करायची.दिवसाचे आठ तास आणि आठवड्याचे सहा दिवस.तिच्या गरजाही कमीच असायच्या.ज्यावेळी ती गेली त्यावेळी तिच्या जवळ काही नव्हतं आणि तिला कशाचीही जरूरीपण नव्हती.तिच्या आजारपणात मी तिचं हंसणं, तिचा आवाज,तिचं औदार्य,आणि सौंदर्य हे मी गमावून बसले होते.आणि शेवटी तिची जवळीक आणि तिचा आत्मा पण.ती ज्यावेळी गेली त्यावेळी मी सर्वस्व गमावून बसले.पण नंतर माझ्या लक्षात आलं की तिला जे मी प्रेम दिलं होतं ते अजून माझ्या जवळ आहे.मी तिला दिलेलं प्रेम खरंच तिने माझ्याकडून घेतलं होतं का ह्याचा मला संभ्रम होत आहे. तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नव्हता.तिचे डोळे निस्तेज होते.पण मी तिला भरून भरून प्रेम दिलं आणि तेच प्रेम माझ्याजवळ राहूनदामदुपटीने वाढत आहे.
माझ्या मुलीला गमावण्यात झालेल्या दुःखाने मला एक प्रकारचं वैराग्य आलं होतं.जरूर नसलेल्या ओझ्याचा त्याग करून मला आवश्यक तेच मी संभाळत होते.प्रिया गेल्यामुळे मी आता कशाचाच हव्यास करत नव्हते. आता मला घेण्यापेक्षा देण्यात स्वारस्य राहिलं होतं.मी प्रेम करून घेण्यापेक्षा प्रेम करण्यात जास्त मन रमवित होते.माझ्या पतीवर,माझ्या मुलावर, माझ्या नातवंडावर जास्त जीव टाकू लागले आहे.आणि खरंच मला माहित नाही की मी त्या सर्वाना खरोखरंच आवडत असेन की नाही.मला त्याची फिकीर नाही.त्यांच्यावर प्रेम करणं ह्यातच मल आनंद मिळतो.
द्दावं,द्दावं,आणि द्दावं -माझं ज्ञान,माझा अनुभव,माझ्या अंगातली कला ह्यांचा मला काय उपयोग, जर का मी ते देण्यात सुख मानलं नाहीतर.?गोष्टी माहित असून नातवंडाना न सांगता ठेवल्यातर?पैशाची माया जमवून ती दुसर्‍याशी शेअर केली नाही तर?मला काही ते डोक्यावर घेऊन स्वर्गात जायचं नाही.हे दातृत्वच मला दुसर्‍यांशी,जगाशी आणि देवाशी दुवा जोडायला मदतीचं होणार आहे.”

परिस्थिती माणसाला कसा विचार करायला लावते.आणि त्या विचारातून इतरानी काय धडा शिकावा हे मंजूच्या उदाहरणावरून शिकण्यासारखं आहे पण व्यक्ति तशा प्रकृती हे पण तितकंच खरं आहे.म्हणून म्हणतो,
“आयुष्ये खरोखरंच गोष्टींचा “एनसायक्लोपीडाया” आहे”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, August 12, 2008

मनी माझ्या मी लागले घाबरू

केला विचार पत्र तुला लिहू
मनी माझ्या मी लागले घाबरू
माझे हे पत्र तू वाचशिल
का तू ते फाडून टाकशिल

केला विचार पत्र तुला लिहू
मनी माझ्या मी लागले घाबरू

रुसले मी मग तू समजाविशी
समजाविन मी जेव्हा तू रुसशी
जे जीवन राहिल उरूनी
नयनाश्रूनी जाईल वाहूनी
हे जीवन ही तुला अर्पूनी
समय घेईन मी मिळऊनी

केला विचार कसे तुला भेटू
मनी माझ्या लागले मी घाबरू

तेव्हा मी घाबरे मरण्याला
शिकविलेस कसे ते जगण्याला
एकाकी सोसले मी जीवनाला
आलास तू जणू चंद्र नभी उगवला
ठोकरिले मी माझ्याच सुखाला
काय म्हणू माझ्या वेडेपणाला

केला विचार कसे तुला भेटू
मनी माझ्या लागले मी घाबरू



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, August 11, 2008

विनम्र राहिल्याने अंगात एक प्रकारची क्षमता येते.

एका विद्वान माणसाने मला सांगितलं,
“तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे.”

कोकणातला पाऊस सर्वाना माहित आहे.एकदां पडायला लागला की मग मागे वळून बघणार नाही.
तो अति प्रचंड वृष्टीचा दिवस होता.दिवसाच रात्र झाली आहे असं वाटत होतं.ढगानी सारं आकाश व्यापलं होतं.सर्व घराच्यादारं खिडक्या लाऊन लोक घरात घुडूप होऊन बसले होते.अशा प्रसंगी माझ्या पतिना एका एकी हृदयाचा झटका आला.कुणाला मदतीला बोलवायला जायला शक्यच नव्हतं.पावसाच्या कहराबरोबर माझ्याही घरात असाच कहर झाला होता.
ती घटना होऊन गेल्यावर नंतर जवळ जवळ तीन चार दिवस पाऊस सतत पडत होता.मी घाराच्या पडवीत बसून त्या संततधारा बघत होते.मनात ना ना तर्‍हेचे विचार येत होते.

माझ्या घराच्या समोर नुसतं तळं झालं होतं रस्ता दिसत नव्हता.अशा परिस्थितीत दोन गृहस्थ खोरी फावडी घेऊन माझ्या घरासमोर माझ्यासाठी वाट करून देत होते.मी घरात जाऊन खिडकीतून त्याना न्याहाळत होते.माझी मलाच लाज वाटत होती.
माझ्या मनात पहिला विचार आला की मी यांची परत फेड कशी करूं? माझे केस मला फणी घेऊन विंचरायला त्राण नव्हता.माझ्या पतिच्या निर्वतण्यापुर्वीच्या आयुष्यात मी कधीही कुणाकडून मदत किंवा सहाय्य मागितलं नव्हतं.आणि त्याबद्दल मला विशेष वाटायचं.माझं स्वातंत्र्य आणि माझ्या क्षमतेवर मी मला बांधून घेतलं होतं.आता नुसती घरात बसूनपडणार्‍या पावसाकडे बघण्यात मी स्वतःला काय समजू?

आता माझ्यासाठी येणारी मदत आणि प्रेम मला स्विकारायला सोपं नव्हतं.मला शेजारी जेवण आणून द्दायचे.मला त्यांच स्वागत करायला ही त्राण नव्हता.पतिच्या एकाकी जाण्याने मी अगदीच हतबल झाली होती.पूर्वी मी अशी आळशी नव्हती.मी ओक्साबोक्शी रडत होती.शेवटी माझी शेजारीण मंदा मला म्हणाली,
“तुला जेवण आणून देणं हे तुझ्यासाठी विशेष काम मला पडतं असं मी समजत नाही.उलट मला असं करायला बरंवाटतं.तुला काही तरी माझ्या कडून मदत होते ह्याचा मला खूप आनंद होतो.”
त्या माझ्या अशा प्रसंगाच्या वेळी मदत करणार्‍या सगळ्यांकडून मी असेच उद्गार ऐकत होते.तिथल्याच एका विद्वान माणसाने मला सांगितलं,
“तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे.” आता मी पूर्वीची राहिले नाही.आता माझ्यात खूपच बदल झाला.माझ्या जीवनाचं लक्तर आतां उपकृततेने आणि विनयशिलतेने विणलं गेलं होतं.मी आश्चर्य चकित होऊन पाहू लागले की अशा परिस्थितीत माणसाला असाह्यतेतून पण धैर्य येतं.मला आता वाटायला लागलं की
विनम्र होण्यात अंगात एक क्षमता येते.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, August 9, 2008

रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले

तुझ्या माझ्या मनोरथाचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
बिछाने गारठलेले,श्वास भाजलेले
बाहू स्फुरलेले,ओठ नरमलेले
काही हरवून काही गवसण्याचे दिन आले

पावसाच्या सरीमधे दोन जीव भिजलेले
भिजलेल्या जीवानी दोन प्याले झोकलेले
मदिरा पिऊन झिंगण्याचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले

दवांनी पडावे फुलांवर,फुलानी अमुच्यावर
उमललेल्या फुलानी गंध उधळल्यावर
गुलाबी गुलाबी स्वपनांचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले

तुझ्या माझ्या मनोरथाचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, August 7, 2008

उलगता बाजार

“सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच.”
मी आणि माझी आई संध्याकाळच्या उलगत्या बाजारात जाऊन आमची घरासाठी रोज लागणारी खरेदी करतो.उलगत्या बाजारात जाऊन खरेदी करण्याचा फायदा असा की सकाळ पासून आलेले विक्रिकर-लोकं सध्याकाळी अगदी थकून जातात.आणि उरली सुरलेली भाजी,फूलं,फळं कमी किंमतीत किंवा वाटे काढून विकून टाकतात.फळं थोडी जास्त पिकतात,भाजीचा ताजेपणा कमी होतो,आणि फूलं तर बरिच कोमेजलेली असतात.ही फूलं देवाला वाहिली तरी त्याचं त्याला काहिच वाटणार नाही असं मनात येतं.आमच्या परिस्थितीचा कुणावरही ठपका ठेवता येत नसल्याने,
“काय करणार? ही परिस्थिती यायला तूच कारण आहेस मग तुला ताजी टवटवीत फूलं वाढत्या भावात सकाळीच आणून तुझ्या पुजेला कशी वहायला आम्हाला परवडणार. अशी तर अशी मानून घे देवा”
असं मनातल्या मनात पूजा करताना आईच्या तोंडून हळूवार आलेले उद्गार ऐकून तिची आणि त्या देवाची मला दया यायची.

यापूर्वी साकाळीच उठून दरखोरी करून ताज्या ताज्या गोष्टी खरेदी करून आणण्याचे आमचे दिवस सध्या तरी संपले होते.
आम्ही खेडेगावात राहत असल्याने आमच्या सारख्या जेमतेम परिस्थिती असलेल्या लोकाना ह्याचा खूपच फायदा होतो.

ह्या उलगत्या बाजारात खरेदी करण्यातही काही त्रुटी दिसून येतात.अगदी कठिण गोष्ट म्हणजे इतक्या स्वस्तात विक्रिकर विकायला तयार होत असताना इच्छा असूनही तुटपुंज्या पैशात सर्व खरेदी करण्याचा हव्यास कसा पूरा करायाचा असं हळहळून मनात यायचं.
“आणखी थोडे पैसे कमी दे वाटलंतर”
किंवा,
“आता पैसे नसतील तर उद्दा दे जमलं तर”
असं म्हणून तो माल गळ्यात टाकण्याच्या उद्देशाने नव्हे तर आमच्या परिस्थितीची किंव येऊन त्याने काढलेले उद्गार काळजाला भिडून जायचे.आम्हाला नाही जमलं तर आमच्या मागे उभे असलेले आमच्या सारख्याच परिस्थितीचे लोक
“तुम्ही नसाल घेत तर सांगून टाका आम्हाला तरी घेऊ देत”
असं कदाचित मनात म्हणत असतील,किंवा तो विक्रिकर आपल्या मनात म्हणत असेल,
“तुम्हाला नसेल घ्यायचं तर बाजूल व्हा त्याना तरी घेऊं द्दा असं जणू मनात म्हणत असेल”
असं उगाचच माझ्या मनात येऊन मन कष्टी व्हायचं.
आणि त्याही पेक्षा मन कष्टी व्हायचं की जेव्हां ते आमच्या चेहर्‍याकडे बघून आमच्या निर्णयाची क्षणभर वाट बघायचे.माझी आई कदाचित तसा माझ्या सारखा विचार करितही नसेल किंवा कदाचित तसाच विचार करूनही चेहर्‍यावर दाखवतही नसावी.बिचारी आई.

“काल घेतलेल्या वस्तू अजून आहेत आमच्याकडे”
असं सांगून एकदाचा पळ काढावा इथून असं वाटायचं.
त्या संध्याकाळच्या उलगत्या बाजारात खरेदी करायला मला खरंच कसंसंच वाटायचं.
एखाद्या माझ्या वर्गातल्या सुखवस्थु मैत्रिणीने माझ्या बाजूने जाताना मला पाहिलं असेल ह्या मरणाच्या भितीने मी चूर होऊन जायची.
एकदा मी माझ्या आईला माझी ही भिती सांगितली.तिच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून तिच्या नाराजीला मी कारण झाले ह्याचंच दुःख मला जास्त झालं.कधीकधी सकारण सुद्धा मला तिच्या बरोबर खरेदीला जाता आलं नाही तरी माझ्यामुळे तिच्या नकळत भावना दुखावल्या जातात ह्याचा विचार येऊन मी हताश व्हायची.
आणि यासाठीच मी सामावून घेण्याच्या क्ल्पनेला घट्ट पकडून धरायला लागली. कशातही सामावून घेणं म्हणजेच आगे बढो असा संदेश माझं मन मला देऊ लागलं.
सामावून घेण्याच्या ह्या वृत्तिमुळे दुसर्‍यापेक्षा आपली परिस्थिती निराळी आहे याची मला लाज वाटण्यापासून सुटका झाली.दुसर्‍या कसल्याही प्रसंगात अशी वेळ आली की मला तो संध्याकाळचा उलगता बाजार आठवतो.
त्याचं कारण सध्या आमचे असे दिवस आले असतील पण तेही दिवस काही कायमचे नसावेत.सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच.”

एकदा वासंतीला मी भेटलो असतां,
“कसं चाललं आहे?”
असं विचारल्यावर मला हे सर्व तिने सांगितलं.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, August 5, 2008

असूनी दोस्त करितो दुष्मनी

केला आहे दुष्टपणा दुष्टानी
केले तरी कुठे कमी दोस्तानी
येतो काळ आसाही जीवनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी

लागे दोस्तीला कुणाची नजर
बदल होता तुला नसे ती खबर
नाही राहिल्या आणा अन शपथा
साथ साथ मरण्याचा एकही इरादा
दौलतीला राहती सर्वस्व मानूनी
येतो काळ आसाही जीवनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी

प्रीतिचा लवलेश नसे तुझ्या नयनी
मित्र होऊनी अर्थ मैत्रीचा घे समजूनी
दौलत कसली कसली दोस्ती
नाती गोती सर्वच नावा पुरती
पश्चातापे जे होईल ते अनुभवूनी
सच्चाईचा मार्ग ही अंगिकारूनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी


श्रीकृष्ण सामंत (स्यान ओझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, August 3, 2008

प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो.

त्या दिवशी मी दिल्ली एअरपोर्टवर फ्लाइट चुकली म्हणून निवांत दुसरी फ्लाइट मिळेपर्यंत वेळ काढत बसलो होतो.माझी एक खूर्ची सोडून दुसर्‍या खूर्चीवर-व्हिलचेअरवर- एक सदगृहस्थ बसले होते.सायंटिफिक जगतात ते विषेश नावाजलेले होते.त्यांची विषेश गोष्ट अशी होती की त्यांना स्नायू हळू हळू क्षीण होण्याचा एक व्याधी झाला होता.तरीपण ते आपल्या कामात नेहमी व्यग्र असायचे.त्यांच्या बाजूला एक गृहस्थ बसून ते जे काही बोलत होते ते तो लिहून घेत होता.
लेट फ्लाइट बद्दल आमचा विषय निघाला आणि दोन तास इथं बसून राहण्याला पर्याय नव्हता.मीच त्यांच्याशी जास्त जवळीक आणून त्यांची चौकशी करू लागलो होतो.
त्यांची ही परिस्थिती पाहून मीच त्यांना प्रश्न केला की ते हे सर्व कसं मॅनेज करू शकतात.
त्यावर ते मला म्हणाले,
"मला नेहमीच वाटतं की मला पर्याय पहाण्याची क्षमता आहे.हरकत नाही मी काय करीत असेन,हरकत नाही मी कुठे असेन,हरकत नाही मी कसल्या प्रसंगातून जात असेन,पण मला पर्याय पहाण्याची क्षमता आहे.

आज मी कुणाची तरी मदत घेऊन माझ्या मनात आलेले विचार त्याच्या कडून लिहून काढण्याचा प्रयत्न करीत आहे.ह्या पूर्वी माझं आयुष्य हजारो कागदाच्या फोली घेऊन त्यावर काही ना काही तरी लिहिण्यात गेलं होतं.परंतु आता मला बोटात पेन धरून कागदावर खरडण्यासाठी ती बोटं वापरता येत नाहीत.

मला अशा प्रकारचा व्याधी झाला आहे,की हा व्याधी हळू हळू माझे एकएक शरिरातले स्नायू निकामी करून शेवटी माझ्या शरिरातले असतील ते स्नायू निकामी करणार आहे. सरते शेवटी मी सरकू शकणार नाही,बोलू शकणार नाही,आणि शेवटी श्वास पण घेऊ शकणार नाही.आत्ताच मी दुसर्‍यानवर अवलंबून आहे.म्हणून मी रोज माझ्या पर्याया विषयी तपासणी करीत असतो.

ह्या व्याधी बरोबर दिवस काढणं म्हणजे जणू कोर्टातल्या साक्षीच्या पिंजर्‍यात उभं राहून कोर्टाला माझ्याच विषयी मला काय माहित आहे ते सांगणं.मी कसा दिसतो,मी कसा वागतो,मी जगाशी कसा रदबद्ली करतो आणि हे सर्व आता झपाट्याने बदलत चाललं आहे.तरीपण ह्या बद्दला बरोबर मला अजून पर्याय पहाण्याची क्षमता आहे.
ज्यावेळी मी कागदावर लिहू शकत नाही हे मला कळलं,त्याचवेळी कुणा दुसर्‍याची मर्जी संपादून त्याच्याकडून लिहून घेण्याची खडतर खटपट मला करावी लागणार आहे हे ही समजलं.पण गंमत म्हणजे ह्या पद्धतीने मी पूर्वी पेक्षा जास्त लेखन करू लागलो.

आणि जास्त क्रियाशील पातळीवर रोज माझा पर्याय पहाताना मी कसा जगणार आहे? हे न पहाता, जर का मी जगलो तर?ह्या पर्यायावर आधार घेऊ लागलो आहे. माझ्यावर कुठल्याच प्रकारचा धार्मिक बंधनाचा पगडा नाही की जेणे करून मला आयुष्यरेषे बद्दल अमुकच तर्‍हेने विचार करावा लागणार आहे. आणि ह्या माझ्या व्याधीला त्यामुळे तिच्या मर्जीप्रमाणे काय करायचं हे करायला मुभा मिळणार नाही. आणि अगदी इथेच मला माझ्या पर्याय पहाण्याच्या क्षमतेचा खरा अर्थ मिळतो. ही व्याधी ही जणू मला फाशिची शिक्षाच आहे अशा दृष्टीने तिच्याकडे मी पहातो.किंवा ही व्याधी मला मी खरा कोण आहे हे पडताळण्यासाठी मिळणारं आमंत्रण समजतो.

कोर्टातल्या पिंजर्‍यातल्या साक्षिदारालासुद्धा त्याच्या बद्दलची मुलभूत दृष्टी बदलता येत नाही. मग माझी तरी माझ्या विषयी दृष्टी काय असणार? असला काही तरी विचार मी रोज मनात आणून शिकत असतो.आणि आता पर्यंत मी बर्‍याच विषेश गोष्टी शोधून काढल्या आहेत.पण ह्यातली एक गोष्ट इतर गोष्टीमधे जरा वरचढ आहे.माझ्या मधेच मी एक गोष्ट शोधून काढली आहे आणि ती अशी की आता मला माझ्यातच काळजी करणं आणि करून घेणं हे चांगलच कळायला लागलं आहे.
हा व्याधी होण्यापूर्वीच्या माझ्या आयुष्यात जेव्हडं मला माहित नव्हतं त्याहिपेक्षा जास्त आता मला माहित झालं आहे.

मी पूर्वी एव्हडा स्वतंत्र आणि स्वतःची खासगी ठेवायचो,तो मी आता आजूबाजूच्या मित्र आणि परिवारांकडे एव्हडा मोकळा झालो आहे की ते सर्व माझ्या जीवनाचा हिस्सा झाले आहेत.पूर्वी हे असं होणं मला महाकठीण होतं.मला वाटायचं की ह्या व्याधीच्या मगरमिठीत राहण्याशिवाय मला तरणोपाय राहिला नसून, खडतर आयुष्य काढणं आणि एकाकी राहण्याला पर्याय नाही. त्याऐवजी आता वाटतं नेहमीच पर्याय पहाण्याचा मला मार्ग मिळाला आहे, मला आता इतर शक्यतांचा वापर करता येईल. आणि आता ज्या गोष्टीला मी कटकट किंवा नकोशी म्हणायचो त्याच गोष्टीने माझं जीवन अविट गोडीने सुखद केलं आहे.ते तसं पूर्वी होतच पण आता मी तसं पहाण्याच्या पर्यायाची निवड केली आहे. ही गोडीच मला जणू ठसाकावून सांगते की मला कसलाही पर्याय पहाण्याची क्षमता आहे."
हे त्या गृहस्थांचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.आणि आयुष्यात पर्याय पहाण्याच्या त्यांचा विचार पाहून नविन काही तरी शिकलो.

Friday, August 1, 2008

तू काय बरे मिळवीशी

प्रीति मजसी करूनी
तू काय बरे मिळवीशी

दुःख पिडांची वस्ति जिथे
असे मी तिथला रहिवाशी
कमनशिबी असूनही मी
राहिलो आहे जीवानिशी
कसले स्वप्न मी पाहू
जे ऐकून तू लाजशी
शरमी मजसी करूनी
तू काय बरे मिळवीशी

साथ मला देऊनी
का कष्टी तू होशी
दुनिया माझी झाली एकटी
राहूदे तिला एकटी तशी
यात्रा या जीवनाची
असेल तुला साजेशी
साथी मला करूनी
तू का बरे पस्ताविशी

एकटाच मी नसूनी
अनेक दिवाणे पाहशी
शहनाईचे सूर गुंजूनी
प्रीतिचे तराणे ऐकशी
समजेल तुला जीवनातूनी
किल्मीषे अनेक जसजशी
जाशील मला विसरूनी
असे का बरे समजशी

प्रीति मजसी करूनी
तू काय बरे मिळवीशी


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com