Saturday, January 31, 2009

आपण सगळे एकमेकासाठी शिक्षक आहोत.

प्रो.देसायांच्या घरी आज आम्ही चर्चा करण्यासाठी जमलो होतो.चर्चेचा विषय होता “शिक्षक”.
भाऊसाहेबानी बर्‍याच विद्वानाना ह्या चर्चेसाठी बोलावलं होतं.नेहमी प्रमाणे काही लोक शिक्षक म्हणून आपला अनुभव सांगून गेले.काहीनी शिक्षक झाल्यामुळे आपल्या जीवनात काय काय समस्या आल्या त्याचे पाढे वाचले.काहीनी शिक्षक आणि मुलांमधल्या पारस्पारिक प्रभावाबद्दल मनोरंजक माहिती सांगितली. भाऊसाहेबानी आपले पण रुईया कॉलेजमधले गमतीदारअनुभव सांगितले.
मात्र एका वयस्कर व्यक्तिने “शिक्षक” म्हणजे फक्त शाळेत किंवा कॉलेजमधे शिकवणारी व्यक्ति असं न मानता,मोठ्या दर्शनशास्त्राच्या दृष्टिने किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टिने चर्चा करून सगळ्यांची खूपच करमणूक केली.मला तर ते ऐकून थोडसं,”हटके” विषयांतर केलेलं आवडलं. त्यांच नाव होतं प्रो.परांजपे.ह्या सगळं जग फिरून आलेल्या प्रो.कमला परांजपे थोडाकाळ इंग्लंडला ससेक्स शहरातल्या एका युनिव्हर्सिटीमधे शिकवत होत्या.तत्वज्ञान हाच त्यांचा तिकडे विषय होता.इकडे त्या उस्फुर्त बोलल्या.
परांजपे म्हणाल्या,
“आपल्या आयुष्यात खूप शिक्षक येतात.हे शिक्षक काही माणसं असतात,काही प्राणी,वनस्पती आणि दुसरे आपल्या जीवनातले अनुभवातून निर्माण झालेले शिक्षक असतात. काही वस्तविक आहेत, काही नाहीत.
आपले पहिले शिक्षक म्हणजे आपले आईवडील.ते आपला मानसिक विकास करतात.जीवनातली दीशा दाखवतात.त्यांचा एखादा प्रेमळ शब्द आणि आणि एखादी सम्मति खरोखरच त्या दिवसाची दीशा बदलू शकते.कधी कधी जीवनातल्या मार्गाची पुनकृति करू शकते.बरेच वेळा मी ऐकलंय की एखादा शिक्षक नकळत येऊन ज्याची अगदी जरूरी आहे तेच देऊन जातो.

माझी एक शिक्षिका आहे तिला असा विचार करायची जरूरी भासत नाही.तिच्या कडून मी शिकलेयं,की जीवित राहाण्यासाठी ह्या धरतीचा आदर असावा,पाण्याचा आदर असावा.माझ्या स्वतःच्या अनुभवाची विशिष्टता स्विकार करायला मी शिकलेयं. आणि इतरांच्या अनुभवाच्या विशिष्टतेची पण मी स्विकार करते.
त्या शिक्षिकेला अनोळख्याला आणि स्वतःच्या कुटूंबातल्याना मदत देताना मी पाहिलंय.काही निराधार लोकाना मी तिच्या दुकानाच्या बाहेर उभे राहिलेलं पाहिलं आहे.त्यांना माहित असायचं की ती त्यांना काही अन्न देणार आणि अदबीने त्यांची विचारपूस करणार.ती सर्वांशी अगदी दया करून वागते आणि तिला जमेल तेव्हडं चांगलं करण्याचा प्रयत्न करते.ती खूपच मेहनती बाई आहे.तिचं मी इथे नाव दिलं असतं तर ते पाहून तिला खूपच लाजल्या सारखं वाटलं असतं.ती खर्‍या अर्थाने शिक्षिका आहे.
एखादा उद्धट शब्द वापरणारी किंवा दुषकर्म करणारी शिक्षिका जीवनातली मनोहर्ता घालवून बसते.अशाने गुणगुण करणारं एखादं मूल पुन्हा कधीच गाणार नाही. एखादा कलाकार आपल्या वाखाण्याजोग्या प्रतिभेकडे पाठ फिरवील.प्रतिभा ही मुलांसारखी आहे.आपल्यातून जशी मुलं होतात आणि नंतर त्याची जोपासना करावी लागते तसंच प्रतिभेचं आहे.असं असूनही त्यांवर आपला हक्क नसतो. कारण असलेली प्रतिभा ही इतरांसाठी असते.ती त्याना परत द्दावी लागते.

एका माणसाची मी खूप प्रशंसा करायची.त्याचा सन्मान करायची.त्याच्या अंगात कला होत्या.त्याच्या वाडवडीलानी त्याला ज्ञानाचा साठा सुपूर्द केला होता.मला त्याच्याकडून शिकायचं होतं.वडीलधार्‍यांकडून मी नेहमीच शिकत असते.शेवटी आपल्यातला प्रत्येकजण आदल्या पिढीचा पाईक असतो आणि त्याला आपलं ज्ञान पुढच्याना प्रदान करायचं असतं.त्यामुळे ज्ञानाची वाढ होते.त्या माणसाजवळ जे होतं ते आम्हाला देण्यासाठी होतं.परंतु त्याने माझा अवमान करण्याचा प्रकार केल्याने मला त्याच्यावरच्या विश्वासाला बाधा आली.माझी कुचेष्टा झाली,मी खूपच रागावली आणि नंतर दुःखी झाली.
नंतर माझ्या लक्षात आलं.त्याच्या चारित्र्याची सत्यता माझ्याशी संवाद करीत होती पण मला तो संवाद ऐकायचा नव्हता.मला जे हवं ते मी त्याच्यात हुडकण्याचा प्रयत्न करीत होते.पण तो खराच कसा होता ते मी पहात नव्हते. कधी कधी अतिबुद्धिमान शिक्षक आपल्यातूनच येत असतो. आपण आपल्या मनाच्या वरवरच्या थरावर एव्हडे जखडले जातो की आपल्या प्रत्येकाच्या आतल्या बुद्धिमान शिक्षिकाचा आपल्याला विसर पडतो.खरंतर तो बुद्धिमान शिक्षिक आपल्याला योग्य दीशा दाखवू शकतो.नेहमी तो खरा अर्थ सांगू शकतो.कोणत्या मार्गाने जावं ते तो सांगू शकतो.तसंच कुठचा मार्ग पत्करू नये हे पण सांगू शकतो.आणि तो आपल्याशी नेहमी बोलतो आणि दयाळूपणे मार्ग दाखवित असतो.खरंतर आपण अशा शिक्षकाला किती तरी वेळा दुर्लक्षीत केलेलं असतं हे आपल्यालाच ठाऊक नसतं.
म्हणून म्हणते,
“जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांशी,तुमच्या आईवडिलांशी,इतर नातेवाईकांशी,मित्रमंडळींशी नव्हेतर तुमच्या शत्रूशी सुद्धा बोलता, तेव्हा किंवा,उगवलेल्या नव्या दिवसाच्या नव्या समस्या आल्यावर,किंवा दिवसाच्या शेवटी माथं टेकताना हे विसरूं नका की आपण सर्व शिक्षक आहोत आणि आपण एकमेकासाठी पण शिक्षक आहोत.”

प्रो.परांजपेबाईंचं हे भाषण ऐकून मला खूपच बरं वाटलं.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, January 29, 2009

चिनी म्हण–आणि रामदुलारी.

खरं सांगावं,खरं ओकू नये!
“स्पिक ट्रुथ डू नॉट स्पिक-औट ट्रुथ”

रामदुलारीची आणि माझ्या भावाची अलीकडे बरीच गट्टी जमली आहे.रामदुलारी कधीकधी आमच्या घरी येतो.कधी माझ्या भावाच्या क्लिनीक मधे माझगावला जातो नाहीतर माझ्या भावाला फोन करून विचारून ते दोघे कधी गिरगाव चौपाटीवर तर कधी जुहूच्या चौपाटीवर सूर्यास्त पहायला आणि गप्पा मारायला भेटतात.
ह्यावेळी तो आमच्या घरीच आला होता.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर माझा भाऊ त्याला म्हणाला,
“रामदुलारी आज तू कसला इष्यु घेऊन आला आहेस?”
तो माझ्या भावाकडे बघून हंसत हंसत म्हणाला,
“त्या दिवशी मी ऑफिसात संध्याकाळी घरी जायची वेळ झाल्यावरही जास्त वेळ बसलो होतो.माझा एक सहकारी अरविंद कानविंदे आणि त्याची सहकारी मैत्रीण सुलभा महात्मे आमच्या ऑफीसच्या स्टेशनरी ठेवतात त्या रुममधे बसून त्यांचे बिनदास काही प्रेमचाळे चालले होते.मी मला थोडे कोरे कागद हवे म्हणून त्या रूमकडे जाऊन दार उघडलं.मी थोडा लेट बसलो होतो ते त्याना माहित नव्हतं असावं. त्यांचा हा प्रकार माझे एक सिनीयर सहकारी मोहन मोकाशी यांना मी दुसर्‍यादिवशी सवित्सर सांगण्याचा प्रयत्न केला.त्यांना ते सर्व माझ्या तोंडून ऐकायला लाज वाटत होती. मला ते म्हणाले,
“रामदुलारी एक चिनी म्हण आहे,”खरं सांगाव खरं ओकू नये”
माझ्या भावाला रामदुलारी म्हणाला,
“मला ह्या म्हणीचा अर्थ कळला नाही.”
हे त्याच ऐकून झाल्यावर मधेच मी त्याला इंटरप्ट करीत म्हणालो,
“अरे रामदुलारी,मी तुला त्या म्हणीचा अर्थ सांगतो.
त्यासाठी माझ्या मानसशास्त्रज्ञ भावाची जरूरी नाही.
तू मोहन मोकाश्यांना,”ती दोघं प्रेमचाळे करीत होती” एव्हडं जरी सांगतलं असतस तरी त्यांना ते सत्य काय ते समजलं असतं.पण तू जेव्हा त्याना त्या प्रकाराची सवित्सर माहिती सांगायला गेलास त्यावर त्यानी तुला ती चिनी म्हण सांगितली. म्हणजे त्या म्हणीचा अर्थ असा की खरं सांगावं आणि ज्यावेळेला आवश्यक्यतेपेक्षा जास्त खरं सांगितलं जात त्यावेळी त्याला खरं ओकणं म्हटलं जात असावं.”
”बरोबर ना रे?”
असं मी माझ्या भावाला विचारलं.
त्यावर माझा भाऊ मला म्हणाला,
“अगदी बरोबर.मी हवं तर रामदुलारीला आणखी एक उदाहरण देतो.
समजा एखाद्दाची पत्नी आपल्या मैत्रिणीला म्हणाली,
“आमचे की नाही हे, रात्रीचे खूपच घोरतात.”
हे तिचं मैत्रिणीला सांगणं म्हणजे खरं सांगणं.
पण ती जर का मैत्रीणाला म्हणाली,
“आमचे की नाही हे रात्रीचे खूपच घोरतात. घॉर,घूर,टॉंस,फूंस असा आवाज काढतात. पिंजरा चित्रपटातल्या निळू फुले काढायचा अगदी तसा गं!.”
तर असं सांगणं हे खरं ओकणं झालं.घोरणारा असाच आवाज काढणार.तो कसा आवाज काढतो हे पुढे सांगणं अनावश्यक आहे.

“ऐसा क्या?”
असं म्हणून रामदुलारीने निःश्वास टाकला.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, January 27, 2009

“विविधतेतून अखंडता”

“क्वान्टम फिझीक्स शाखेतले शास्त्रज्ञ सांगतात ते काही खोटं नाही.वारली लोकांसारखेच ते विचार करीत असावेत.
“जगात असलेलं सर्व काही गतिबोधकतेने अत्यंत घनिष्ठ पातळीवर एकमेकाशी संबंध स्थापित करून असतं.”

प्रो.देसायांच्या एका नातीचं सर्व आयुष्य कलकत्यात गेलं.कारण भाऊसाहेबांचा एक जांवई कलकत्याचा.अर्थात ह्या कुटूंबावर बंगाली रीतीरिवाजाची बरचशी छाप पडली होती.एकदा ती माझ्या घरी राहायला आली होती.मला म्हणाली,
“काका,मला सकाळी सकाळीच उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे.”
मी तिला म्हणालो,
“संध्याकाळी,जुहू चौपाटीवर जाऊन आपण मावळत्या सूर्याचं दर्शन पोटभर घेऊ शकतो.पण उगवत्या सूर्याचं दर्शन तुला कलकत्या सारखं सकाळी सकाळीच मुंबईत दिसणं जरा कठीण.आणि आमच्या फ्लॅटमधून तर नक्कीच कठीण.नऊ नंतर सूर्य वर आल्यावर नक्कीच दर्शन होईल.”
त्यावर ती मला म्हणाली,
“कलकत्यात आज सूर्यपूजेचा सण असतो.त्याची मला आठवण झाली.कलकत्यात राहून बंगाली प्रथा मला जास्त परिचयाच्या झाल्या आहेत.”
मी तिला म्हणालो,
“हा सूर्यपूजेचा सण काय खास गोष्टीसाठी करतात.?”
मला म्हणाली,
“बंगाली लोक सूर्यावर भरवंसा करतात.मानवाच्या अनेक समस्यामधे भितीची,लोभाची,आणि विसरभोळेपणाची विफलता पाहून सूर्य त्यांना असंदिग्ध संदेश देतो. जेव्हा शोधकर्त्यांची मुळ-मानवाशी गाठ पडली तेव्हा त्याना पाहून त्यानी त्याना सूर्यपूजक म्हटलं. सूर्याशी आपलं नातं आहे आणि सूर्य ह्या धरतीवरचा मार्ग सदैव प्रकाशित करतो.
आपल्यातले बरेच लोक ज्या विधी करतात त्या सूर्याशी आपलं असलेलं नातं सुनिश्चित करण्यासाठी करीत असावे.
रात्रभर गोलाकार करून नाचल्याने आपल्याला जाणीव होते की आकाशातल्या त्या सूर्यमालेचा आपण एक भाग आहो. मानवजात असुरक्षित आहे आणि सूर्याच्या आणि धरतीच्या कृपेवर आपलं अस्तित्व निर्भर आहे.आणि हे अस्तित्व त्या पवित्र क्षेत्राच्या उद्देश्यामुळे आहे.मागे मी एका कोकणातल्या खेड्यात गेले होते. तिथे एक धार्मिक कार्यक्रम चालू होता.तो सूर्याच्या संबंधाने होता.सूर्याला तो एक आवश्यक सन्मान देण्याचा नम्र प्रयत्न होता.
आपल्या पृथ्वीचं स्थानांतर होत आहे.ते उघड दिसत आहे.धृवावर रहाणार्‍या लोकांकडून दृष्टप्तिला आणलं जातय की सर्व काही बदलत आहे.तिकडे खूप गरम होत आहे.भरपूर अशी थंडी पडत नाही.स्थाईक प्राणी अस्त-व्यस्त झाले आहेत.तिकडचा बर्फ वितळत आहे.
क्वान्टम फिझीक्स शाखेतले शास्त्रज्ञ सांगतात ते काही खोटं नाही.वारली लोकांसारखेच ते विचार करीत असावेत.
“जगातलं सर्व काही गतिबोधकतेने अत्यंत घनिष्ठ पातळीवर एकमेकाशी संबंध स्थापित करून असतं.”
हे लक्षात आल्यावर पृथ्वीच्या होणार्‍या लड्खडाहटला काही तरी अर्थ येतो.पृथ्वीच्या पोटातून किती म्हणून खनिजतेल काढलंजावं की त्याला काही बदलावच नसावा.
अलिकडेच मी एकदा कलकत्याला माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते.माझ्या मैत्रिणीच्या नातीचा जन्म होऊन चौथा दिवस झाला होता.बंगाली लोकात नवबालकाला चौथ्यादिवशी उगवत्या सूर्याचं दर्शन देतात. तिला घेऊन आम्ही दोघं हुगळी नदीच्या काठावर गेलो होतो.त्या नवबालकाला सूर्याशी नातं जोडण्याच्या कल्पनेने प्रदान करण्याचा विधी करायचा होता.ढगानी आकाश आच्छादलेलं होतं. थोडा काळोखही होता.थोडा थोडा पाऊसही पडत होता.काही वेळाने सूर्यदर्शन झालं. माझ्या मैत्रिणीने तिच्या नातीला वर उचलून घेऊन सूर्याचं दर्शन दिलं.आता तिचं सूर्याशी नातं जुळलं होतं.आणि यापुढे ती तिचं नातं विसरणार नाही.आणि आम्ही दोघंही ही जीवनाची पवित्रता आठवणीत ठेवणार होतो.”

ही तिची सर्व माहिती ऐकून माझ्या मनात आलं की आपल्या अखंड देशात किती लोक किती विविधतेचे रीतिरीवाज करीत असतात.बंगाली लोकांची हे प्रथा मला प्रो.देसायांच्या नातीकडून कळली.आणि तिला पण तिच्या आईचं एका बंगाल्याशी लग्न झालं म्हणून ही प्रथा कळली.

“विविधतेतून अखंडता” असं काहीसं म्हणतात हे खरं आहे.




श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, January 25, 2009

इच्छिला उषःकाल अंधःकार मिळाला

यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई
स्मृतीच्या आयुधाने मन जखमी होई
मनिषा हृदयाची परमार्श घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई

सज्जनता दुर्भाग्ये वैरी बनली
नटुनी थटुनही नववधू नाही बनली
हातावरची मेंदी एक ज्वाला बनली
सौभाग्याचे कुंकू एक कलंक होई
यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई

पापण्यातले स्वप्न पडून उध्वस्त होई
पावलांची साथ देऊनी मार्ग भिन्न होई
रात्रंदिनी अश्रूंची नदी वाहत जाई
यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई

इच्छिला उषःकाल अंधःकार मिळाला
मुसमुसत रडता अरुणोदय मिळाला
केली मी नाकाम लालसा उजाळाची
मेण बनुनी राहिले वितळत जीवनभरची
यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई

एकाकीपणात मिळाली स्मृतीची सावली
विनाश पाहूनी जमाना पण प्रसन्न होई
ढंग प्राक्तनाचे हयात बदलीत जाई
यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई





श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, January 23, 2009

हजेरीची ताकद

“हजेरी हे नाम आहे क्रियापद नाही.हजेरी म्हणजेच “असणं” काही “करणं” नाही”

“असण्यावर” माझी श्रद्धा आहे.अलीकडेच मला ह्याची आठवण आली.त्याचं असं झालं की कोकणात त्यावर्षी खूप मोठं वादळआलं होतं.नारळाची उंच उंच झाडं मुळासकट उन्मळून पडली होती.काही घरांची छप्परं उडून गेली होती.नळे कौलं तुटून घरं उजाड झाली होती.त्यादिवसात कोकणात नाही तिकडची गरबी असायची. असा निसर्गाचा कोप झाल्यावर जास्तीत जास्त हाल होतात ते गरिबांचे.स्थाईक कार्यकरत्यानी अपंगाना,वृद्धाना,आणि लहान मुलांना एका मोठ्या माल ठेवण्याच्य वखारीत आणून संरक्षण दिलं होतं.नुकसानीच्या आठवणीने लोक भयभयीत झाले होते.त्यांना कुणाची तरी आस्थापूर्वक चौकशीची जरूरी होती.गावातल्या इतर लोकांनी त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली होती.
मानसिक धक्क्यातून त्याना सावरण्याची जरूरी होती.बेळगावहून माझे दोन मित्र मुद्दाम मदतीला आले होते.त्यातला एक मनोविज्ञानीक होता.
बर्‍याच दिवसानी त्याची आणि माझी गाठ पडली.मी त्याला त्या वादळातल्या दिवसाची आठवण करून दिली.ते लक्षात आणून तो म्हणाला,
“त्या वखारीत जमलेल्या लोकाना आम्ही “मानसिक प्रथोमोपचार ” देण्यासाठी आलो होतो.अशावेळी थोडक्यात समजावून सांगून पेशंटना मानसिक तणावाच्या प्रक्रियेबद्दल शिक्षीत करण्याचं आणि ज्याना त्या उपचाराची जरूरी आहे त्यांचं परिक्षण करून त्यांच्यावर उपचार करण्याचं जे काय असेल ते शिक्षण घेऊन सुद्धा अचानाक माझ्या मनात केवळ आपल्या “असण्या”च्या ताकदीने उपचार होऊ शकतो त्याचं महत्व लक्षात आलं.
ज्यावेळी आम्ही वखारीच्या दरवाज्यातून आत शिरत होतो,त्यावेळेला ज्या पहिल्या व्यक्तीशी आमची गाठ पडली ती व्यक्ती कृतज्ञतेच्या उत्साहाने भरभरून आमच्या स्वागताला आली.मला धन्य वाटलं पण काहिसा मी मला अपराधी समजून गेलो.कारण अजून लोकांवर आम्ही खराच काही उपचार केला नव्हता.
हजेरी हे नाम आहे क्रियापद नाही.हजेरी म्हणजेच “असणं” ते काही “करणं” नाही.ज्या शिष्टतेत “असण्याला” इतकं महत्व नसतं जितकं “करण्याला” प्राथमिकता दिली जाते.तरी पण खर हजर असणं किंवा कुणालाही आपलं अस्तित्व भासणं ही एक मूक ताकद बरोबर घेऊन उचित साक्षीची स्विकृती झाल्यासारखी वाटते.कुणाचं तरी भावनीक ओझं घेऊन गेल्यासारखं,किंवा उपचाराची प्रक्रिया केल्यासारखं वाटतं. त्यात कुणाशी तरी घनिष्ट नातं असून कदाचीत जो समाज शिघ्रतापूर्वक नातं जुळविण्याच्या प्रयासात असतो त्या समाजाला हे नातं क्वचितच भासलं जातं.
प्रथमच,मी एकदा काही वर्षापूर्वी नकळत हजर राहण्याच्या प्रक्रियेत ओढला गेलो होतो.माझ्या एका मित्राची आई अचानक निर्वतली.ज्या दवाखान्यात ती गेली होती तिकडून मला फोन आला.माझं एक मन ताबडतोब तिकडे जाण्याचं सांगत होतं, पण एक मन सांगत होतं,की त्या मित्राच्या अत्याधिक आणि अगदी वयक्तीक दुःखात जाऊ नये म्हणून.माझं मन द्विधा झालं.माझ्या एका मित्राने त्यावेळी सल्ला दिला की “तू जा,तू तिथे हजर रहा.मी तसंच केलं.आणि मला त्याचा कधीच पश्चाताप होणार नाही.
त्या विधायक क्षणानंतर मी कुणाच्याही प्रसंगाला हजर राहायला जरी माझ्याकडून काही”करणं” झालं नाही तरी जाण्याची काचकूच केली नाही.
काही मित्रांबरोबर एका व्यक्तिच्या अगदी बिछान्याजवळ बसून होतो.त्याला त्याच्या दुखण्यात प्रचंड वेदना येत असल्याने त्या येऊ नयेत म्हणून मॉरफीन दिलं होतं. त्याला जाग आल्यावर आम्ही त्याच्याशी त्याच्या जीवनात होऊ घातलेल्या अनिर्वाय यात्रेची माहिती त्याला समजूत घालून सांगत होतो. त्याने नंतर तो जरा बरा झाल्यावर आपल्या आईवडीलाना सांगितलं की आमच्या निव्वळ हजेरीचा त्याला आधार वाटला.
मी माझ्याकडून उपचार करून घेणार्‍या आजार्‍याबरोबर हजर राहण्या पलिकडे कार्यान्वीत असतो.पण जवळ “असण्या” च्या उपचाराच्या क्षमतेबद्दल आणि त्या आजार्‍याला वाटणार्‍या आपल्या अस्तित्वाच्या जागृतते बद्दल प्रभावित असतो.खरं म्हणजे अशा स्थितीत कुणीही एकटं नसतं.
हजर रहाण्यातली क्षमता म्हणजे एक मार्गी रस्ता नव्हे.नुसतंच आपण दुसर्‍याला काही देत नसतो. तर ह्याने माझ्यात नेहमीच बदलाव होतो आणि तो पण आणखी चांगलं होण्यात, हा दुसरा मार्ग.”
हे सर्व माझा हा मनोविज्ञानीक मित्र लक्षात आणून आणून सांगत होता ते ऐकून मला त्या वादळाची राहून राहून आठवण आली.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, January 21, 2009

तू पुन्हा बोल ते हंसहंसूनी

अग माझ्या लाडक्या सजणे
तुला हे कसे ना कळे
की
आहेस अजूनी तू सुंदरी
अन मी पण आहे जवान
सजणे
करीन तुजवर मम प्राण बलिदान

तुझे हे नखरे अन लचकणे
नाही कुणा जमले
कसब करूनी चित्त जिंकणे
नाही कुणा जमले
पाहिले मी तुझ्या दो नयनी
तो स्वर्ग अन ही धरती

सजणे तुझे ते गोड बोलणे
तू पुन्हा बोल ते हंसहंसूनी
ह्या मम हृदयाचे धडधडणे
शमव शराबी रंग घोळवूनी
सजणे
मी प्रेमदिवाणा तुझा अजूनी
तू पुन्हा बोल ते हंसहंसूनी



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, January 19, 2009

सर्व देशाला जेवणाचं निमंत्रण.

“तिला सहनशीलता म्हणा,किंवा सहिष्णुता म्हणा,ती अंगात असली की दुसर्‍याला सन्मान द्दायला पुढाकार घेतला जातो आणि सरतेशेवटी स्नेह निर्माण होतो.एखाद्दाची खरीच पूर्ण ओळख होणं जरा कठीण आहे पण त्याच्याशी स्नेह करून राहायला किंवा त्याचा स्वीकार करायला हरकत येत नाही”

नेहमी प्रमाणे काल माझी आणि प्रो.देसायांची तळ्यावर भेट झाली. भाऊसाहेबांबरोबर एक गृहस्थ होते.माझी ओळख करत देत भाऊसाहेब म्हणाले,
हे शुभ्रतो चक्रबोरती.आमच्या कॉलनीत राहायला आले आहेत.आमच्या कॉलनीत जवळ जवळ बारा बिल्डिंग्स असून देशातले निरनीराळ्या प्रांतातून आलेले लोक राहतात.
शुभ्रतो मुंबईत आल्याआल्या प्रथम वसईला राहिले.नंतर ते गोरेगाव इस्टला बरीच वर्षे राहिले.अलिकडेच आमच्या कॉलनीत राहायला आले.मुंबईत इतके दिवस राहिल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटूंबियाना मराठी चांगलीच अवगत झाली.
हे मुळचे कलकत्याचे.नावारून तुम्ही ओळखलं असेलच.त्यांचं तिथे एक बुकस्टोअर होतं. तिकडे त्यांनी एक नाटक कंपनीपण काढली होती.मुंबईला आल्यापासून ते एका प्रसिद्ध पत्रकात रिपोर्टर म्हणून काम करतात.तुम्हाला आज रात्री त्यानी घरी जेवायला बोलवलं आहे.ते तुमच्या घरीच येऊन आमंत्रण देणार होते.पण मीच म्हणालो त्यांना नाही तरी आपण तळ्यावर भेटतोच,तिथे मी तुमची आणि त्यांची ओळख करून देईन मग तुम्ही त्यांना आमंत्रण द्दा.
शुभ्रतो मला म्हणाले,
“दर आठवड्याला रवीवारी मी माझ्या घरी जेवणाची पार्टी करतो.असं गेले तीस वर्ष करीत आलो आहे.ही माझी कलकत्यापासूनची सुरवात आहे. बोलवल्यातले पन्नास ते साठ टक्के लोक येतात.काही फोन करून- येणार नसल्यास- अगोदर कळवतात.खूप लोक जमले तर मग मी आमच्या घराच्या गच्चीत सगळ्यांना घेऊन जातो.
प्रत्येकजण आपल्या घरून एखादा पदार्थ घेऊन येतो.जमल्यावर एकमेकाची भेट होऊन एकमेकाच्या ओळखी होतात. निरनीराळ्या वयाचे,निरनीराळ्या प्रांतातले, तसंच निरनीराळ्या व्यवसायातले लोक जमतात आणि मी कसलीच बैठकीची सोय करीत नसल्यामुळे एकमेकात मिसळून गप्पागोष्टी करीत राहून आपली सोय करून घेतात, तेच बरं वाटतं. ह्या पेक्षा कसलीचांगली सोय होणार?
मला अस्त-व्यस्तपणा आवडतो. एकमेकाची ओळख करून द्दायला मला आवडतं. मला एक उपजत संवय आहे जे लोक येतात त्यांची नावं,ते कुठून आले,ते काय करतात,हे चांगलं लक्षात राहतं.त्यामुळे मला एकमेकाला ओळख करून द्दायला सोपं होतं.मला जर शक्य झालं असतं तर मी सगळ्या जगाची ओळख करून दिली असती.
लोकांचं अस्तीत्व माझ्या जीवनात महत्वाचं मी मानतो.बरेच लोक प्रवासाला गेले की निरनीराळी प्रेक्षणीय स्थळं बघायला जातात.मी मात्र मित्रमंडळीना भेटायला जातो,जादाकरून ज्यांना मी कधीच भेटलो नाही अश्याना.

दहा वर्षापूर्वी देशातल्या निरनीराळ्या प्रांतातली मी एक पुस्तीका छापली होती.गाईडबुकच समजा.कुठलीही प्रेक्षणीय स्थळं त्यात नव्हती. तसंच, कुठलेही शॉपींगमॉल आणि म्युझियम नव्हते.त्या ऐवजी त्यात मुख्य शहरातल्या बर्‍याच अशा होतकरू लोकांची त्रोटक व्यत्किचित्रं आणि ज्याना नवीन लोकाना भेटून ओळख करून घेण्याची आवड आहे अश्या लोकांची यादी असायची.शेकडो मित्रांची नाती ह्या प्रयत्नामुळे विकसीत झाली.त्यात काही लोकांची लग्नंपण करता आली.
माझ्या रवीवारच्या जेवणाच्या कार्यक्रमाने चर्चा-परिचर्चा घडवता येते.हल्लीच एका रवीवारी एक वीस वर्षाची पंजाबी मुलगी आणि एक पंचवीस वर्षाचा कलकत्याचा मुलगा यांची ओळख होऊन त्याचं रुपांतर त्यांच्या दोस्तीत झालं.माझ्या ह्या कार्यक्रमात देशातले चारही बाजुचे लोक असतात.बहुतेकाना हिंदी अवगत असतं. निदान दुसरी भाषा म्हणून.

एकदा गंमतच झाली.कॉलनीतल्या लोकांमधे एक कार्टूनिस्ट होता,एक पेंटर होता,एक ट्रक ड्रॅव्हर होता,एक बुकसेलर होता,एक न्युझपेपर एडिटर होता आणि काही विद्दार्थीपण होते,आणि काही निवृत्त लोक होते ह्यातले सर्वच काही कॉलनीत राहाणारे नव्ह्ते.काही त्यांचे पाहूणे म्हणून त्यांच्या घरी आले होते.ते त्यांच्याबरोबर जेवायला आले एव्हडंच.
मी पूर्वी पासून मानत आलो आहे की इतराना, व्यक्तीव्यक्तीना,देशवासियाना समजून घेणं अनावश्यक आहे.फारफार तर इतराना नुसतं सहन करून घ्यावं.
तिला सहनशीलता म्हणा,किंवा सहिष्णुता म्हणा,ती अंगात असली की दुसर्‍याला सन्मान द्दायला पुढाकार घेतला जातो आणि सरतेशेवटी स्नेह निर्माण होतो. एखाद्दाची खरीच पूर्ण ओळख होणं जरा कठीण आहे पण त्याच्याशी स्नेह करून राहायला किंवा त्याचा स्वीकार करायला हरकत येत नाही”

मी शुभ्रतोनां विचारलं,
“हे तुम्हाला आर्थिक दृष्ट्या जमतं कसं?”
मला म्हणाले,
“मी थोडा खर्च करतो,येणारे पाहूणे काहीतरी डीश घेऊन येतात,आणि अवांतर खर्च आला तर माझी न्युझपेपर कंपनी मला सहाय्य म्हणून देते. तुम्हाला आज आल्यावर कळेलचकी खाणं थोडं मचमच भारी असते.आणि भेटण्याचा उद्देश साध्य होतो.”
मी एकदा जावून आल्यावर शुभ्रतोचं म्हणणं मला खरं वाटलं.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, January 17, 2009

दूर असूनी सजण माझा भासे कसा तो जवळी
January 17, 2009 at 8:34 pm (अनुवादीत) · Edit

कधी हंसवी कधी रडवी
ही कसली गं! प्रीति
कधी घडवी कधी मिटवी
ही कसली गं! प्रीति
का न समझे वेडे मन माझे
ही कसली गं! लाचारी
का खळबळे हृदय माझे
ही कसली गं! धास्ती

जे स्वप्न पाहिले जागेपणी
ते आले कसे गं! वास्तवात
जरी सर्व काही मी गवसले
तरी भासे कसे गं! हरवले
का प्रभाव झाला उन्मादाचा
क्षण आला जीवनी लहरण्याचा

ही कसली गं! प्रेमासक्ति
ही कसली गं! अनुभूती
दूर असूनी सजण माझा
भासे कसा तो जवळी
कसे श्वसन झाले चंदनी
का मिळावी मला खूषी
का खळबळे हृदय माझे
ही कसली गं! धास्ती
कधी हंसवी कधी रडवी
ही कसली गं! प्रीति



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, January 15, 2009

जेव्हा मन आणि हृदय आकर्षित होतं.

“जे डोळ्याला दिसतं तेच भरंवशालायक असतं ह्या वर मी विश्वास ठेवत नव्हतो.पण आता माझ्या लक्षात आलं की पहाण्याची क्रिया डोळे झाकून आणि हृदय उघडं ठेवून केली जाते.मी ह्या म्हणण्याचं आता समर्थन करतो. असं हे रुपांतर व्हायला भरंवसा कारण आहे ह्यावर माझा विश्वास आहे.”

मनोहर पहिल्या पासून हुषार म्हणून समजला जायचा.त्याच्या डोक्यातल्या कल्पना आणि त्याचं वागणं जरा जगावेगळं म्हणावं लागेल.पण तसा तो हरहून्नरी होता.चांगली वकिली पास होऊन त्याला कोर्टात प्रॅक्टीस करण्या ऐवजी कंपनीना वकिली सल्ला द्दायला आवडायचं.
अलीकडेच माझ्या एका मित्राने नवीन इलेक्ट्रॉनीक कंपनी स्थापीत केली आणि त्याने मला त्याच्या ऑफिसात बोलावलं होतं.त्याच ऑफिसात माझी आणि मनोहरची गाठ पडली.
“तू इकडे काय करतोस ?”
असा मी त्याला प्रश्न केला.त्यावर तो मला म्हणाला,
“मी तुझ्या ह्या मित्राला वकिली सल्ला देण्यासाठी अधून मधून इकडे येतो.”
मला म्हणाला,
“चल आपण कॅन्टीनमधे जाऊन गप्पा मारूया”
चहा घेता घेता मला त्याने आपली कथा सांगायला सुरवात केली.
मला म्हणाला,
”कुठच्याही गोष्टीचं खरं स्वरूप हे ती गोष्टी किती परिचयाची आहे हे माहित असण्यापेक्षा आपला त्या गोष्टीवर किती भरंवसा आहे ह्या वर आहे.
जितका भरंवसा भक्कम तितकं त्यात माझं आड येणं कमी आणि मी जेव्हडा कमी आड येईन तेव्हडं जीवनात जे काही असेल त्याला मोकळीक जास्त रहाते.
जे नवीन उद्दोग करायला सुरवात करतात त्याना मदत करायच काम मी करतो. त्या पूर्वी जे नवीन कंपनी प्रस्थापित करून त्याची सुरवात करीत अशा लोकाना वकिली सल्ला देण्याची मदत मी करीत असे.त्या कामात चिकटून राहायला खूपच अहंकारी राहवं लागायचं.
पण माझ्या जीवनात एक आश्चर्यजनक घटना घडली.मला एक ठोकर बसली. माझ्या लक्षात आलं की मी जे काम करीत होतो त्या कामात मेंदूला वापरलं जात होतं,मनाला नाही.त्या कामात जोश होता,वेड नव्हतं.त्यामुळे मी खूप नाराज झालो.म्हणून मी त्या कंपनीतून सुटका करून घेऊन दुसरा मार्ग पत्करला.मी ते वेड कुठे हरवलं ते शोधू लागलो.आत्म-संशोधनाच्या ह्या लांब यात्रेवर निघालो आणि अजून त्या वेडाच्या शोधतच आहे.
रचनात्मक काम करण्याच्या क्रियेला मी पुन्हा अंगिकारलं.नवीन उद्दोग स्थापणं आणि काही तरी नावीन्य करणं मला आवडतं.आणि मी ठरवलं की ह्या नवीन उद्दोग स्थापणार्‍याना मदत करून त्यांचच भवितव्य निर्माण करण्याच्या उद्दोगाला लागावं.अर्थात हे एक आव्हान होतं.पण जेव्हा मी माझी फुशारकी कमी करतो तेव्हाच माझ्या चेल्याना वर यायला मी यशस्वी करतो अस मी पाहिलंय.
दिसताना जरी हा छोटासा फरक दिसला तरी एक मोठा दरवाजा उघडून त्यातून सर्व जगच शिरकाव केल्या सारखं आहे. ज्यांच्या बरोबर काम करतो तेच लोक शिरकाव करीत नसून त्यातून माझं कुटूंब,माझे मित्र,एखादी थंड वाराच्या झुळूक किंवा एखादी वीज चमकून पण आत शिरकाव करते. काही ज्ञानी लोक सांगतात की जग हे रिक्त आहे आणि नुसता आकार आहे आणि त्या दोघांच ते मिश्रण आहे.जगाचा आकार आपल्याला आपल्या पाच ज्ञानेंद्रियावरून कळतो- ते संघर्षाचं आणि हालअपेष्टाचं जग.पण रिक्त जग वाटतं तसं नसतं.आपल्या ज्ञानेंद्रियाला ते रिकामं किंवा एक पोकळी सारख वाटतं.पण ही ज्ञानेंद्रिये जेव्हा गडबडून जातात तेव्हा ही पोकळी सहानुभूतीने उजाळून निघते.
सत्यात,आपण ह्या दोन्ही जगात वावरतो.आणि मला वाटतं,की आपल्यात असलेल्या क्षमतेमुळे आणि इच्छाशक्तिमुळे ही दोन जगं आपण एक करून मन आणि हृदय सांधण्याचा प्रयत्नात असतो. ज्यामुळे हे जीवन बहूमूल्य होतं.
जे डोळ्याला दिसतं तेच भरंवशालायक असतं ह्या वर मी विश्वास ठेवत नव्हतो. पण आता माझ्या लक्षात आलं की पहाण्याची क्रिया डोळे झाकून आणि हृदय उघडं ठेवून केली जाते.मी ह्या म्हणण्याचं आता समर्थन करतो.असं हे रुपांतर व्हायला भरंवसा कारण आहे ह्यावर माझा विश्वास आहे.
ह्यातून मी दिलासा घेतो की आपण आपल्याला बदलू पण शकतो.आत्ता जो मी आहे तो वीस वर्षापूर्वी नव्हतो,गेल्या वर्षी नव्हतो,काल नव्हतो. जोपर्यंत मी उरलेल्या जगाला माझ्या जीवनात सामावून घेतो,आणि माझ्या भरंवशाला माझ्या अनुभवानुसार विकसित करायला देतो,तोपर्यंत हा दिलासा मला उपयोगी होतो.

सध्या मी तुझ्या ह्या मित्राला मदत करतोय ते त्याच्या इलेक्ट्रॉनीक कंपनी स्थापन करण्याच्या प्रयत्नात मदत म्हणून.एकदा तो त्यात सेटल झाला की मी मग ही कंपनी सोडणार.”
हे सर्व ऐकून मी मनोहरला म्हणालो,
“तुझं काही तरी जगावेगळंच असतं.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, January 13, 2009

“मम मरण पाहिले मी, म्यां डोळा”

सूर्यकांत सुखटणकर माझा शाळकरी दोस्त.मी त्याला सूर्याच म्हणायचो.तो शेवटी वकील झाला आणि मी इंजिनीयर.एरव्ही आमची दोस्ती कायम राहिली नसती पण आम्हा दोघानाही पहिल्यापासून मराठी नाटकं बघण्याचा नाद असल्याने कुठे ना कुठे नाटकाच्या थिएटरमधे आमची भेट व्हायचीच.
सूर्याची वकीली नीट नाही चायलायची.बिचारा दिवसभर कोर्टात राबून दिवसाची जेमतेम कमाई करायचा.मला वाटतं,एका एका व्ययसायाला ज्याचा त्याचा स्वभाव-धर्मगूण हा ही काही प्रमाणात मदत करीत असतो.तसं पाहिलं तर सूर्या अगदी साध्या स्वभावाचा.
छ्क्के-पंजे त्याला माहित नव्हते.ते ह्या वकीली व्यवसायाला प्रकर्षाने जरूरीचे असतात.खोट्याचं खरं आणि खर्‍याचं खोटं करायला चलाखी लागते ती त्याच्या जवळ उपजत नसावी.
सूर्याची म्हातारी आई अजून होती वडिल पूर्वीच निर्वतले होते.सूर्या आईवडीलांचा एकूलता एक मुलगा.सूर्याची पत्नी त्यामानाने चलाख होती.पण त्याकाळात पतीच्या सांपत्तीक परिस्थितीवर पत्नीचं वजन दिसून यायचं.तशात ती शिकलेली असून सुद्धा नोकरी करीत नव्हती.बायकानी बाहेर नोकरीला जाणं त्याकाळात जरा अप्रशस्त वाटायचं.सूर्याचंपण तेच मत होत.सूर्याला मुलं मात्र दोनचार होती.त्याकाळात मुलंही जास्त व्हायची.
मोठी मुलगी,शोभना.त्यानंतर मोठा मुलगा शरद.त्यानंतर एक मुलगी वंदना,मग तिसरी मुलगी डिंपल आणि धाकटं शेंडेफळ कुमार.
शोभनाचं लग्न समीर दिवाडकर बरोबर झालं होत.दिवाडकर,दिवाडकर आणि दिवाडकर नावाच्या अकौटंसी फर्म मधी तो पण वकीलकी करायाचा.त्याच्या फॅमिलीची ती फर्म होती.शोभना तशी बरीच सधन होती.आईबाबाना ती जरूरीच्यावेळी आर्थिक मदत करायची.स्वभावानेपण वडिलांसारखी साधी होती.मोठा मुलगा शरद जास्त शिकला नाही.पण गप्पीष्ट होता.कट्ट्या कट्ट्यावर गप्पा किंवा चकाट्या मारताना दिसायचा.कट्टयावरचे त्याचे मित्र त्याला ज्युनीअर जेठमलानी म्हणायचे.तो नेहमी वडलांच्या वकिलीबद्दल फुशारकी मारायचा.पण तो जेठमलानी सारखा “चापलूस” नव्हता.त्यालापण मराठी नाटकांची खूप आवड होती.अधून मधून जरूरी पडली तर नाटकात रोलपण करायचा.बहुतेकवेळां नाटकाच्या पडद्या आडची कामं करून चार पैसे मिळवायचा.शरदने लग्न केलं नाही.नशीबवान बिचारी ती होणारी पत्नी म्हटलं पाहिजे.दुसरी मुलगी वंदना ही तर आईसारखी चलाख होती. तिने तिच्या ऑफिसातल्या एका पंजाबी एक्झिक्युटीव्हला गाठून प्रेमविवाह केला आणि ती दिल्लीलाच राहायची. तिसरी मुलगी डिंपल ही मात्र छानछोकी रहाण्यात मश्गुल असायची.ती टीव्ही चॅनेलवर सा-रे-गा-मा-पा (सारेगमप) किंवा हर-दील-जो-लव-करेगा किंवा इंडियन-आयडोल असल्या कार्यक्रमात भाग घ्यायची.एखाद्दा आयटेम डान्समधेपण बॉलिवूड टाईप नाचणार्‍या मुलीत भाग घ्यायची.तिने राजेश सावंत नावाच्या नाचातल्या सहकार्‍याशी लग्न केलं.तिच्या मैत्रीणी तिला नेहमीच म्हणायच्या,
“अग, डिंपल तुझा नवरा अगदी राजेश खन्ना सारखाच दिसतो आणि नाव पण राजेश की ग!”
डिंपलला आपलं नाव डिंपल आणि नवर्‍याचं नाव राजेश हे पाहून कौतुक वाटायचं. तिला एकच मुलगी होती तिचं नाव तिने राखी ठेवलं होतं.पुढेमागे आपल्यासारखीच टेव्ही चॅनेलवर ती कार्यक्रम करू लागली तर तोपर्यंत निदान सा-रे-गा-मा-पा-धा-नी-सा नावाचा कार्यक्रम होईल आणि राखी सावंत म्हणून आपली मुलगी नावाजली जाईल हा मुलीचं राखी नाव ठेवण्याचा तिचा उद्देश असावा.
शेवटचा शेंडेफळ कुमार हा मात्र फार हुशार होता.आय- आय-टीत शिकून अमेरिकेत बॉस्टनला एका सॉफ्ट्वेअर कंपनीत काम करीत होता.त्याचं अजून लग्न झालं नव्हतं.

काल मला फोन आला आणि सूर्या मॅसीव हार्टऍटेकने गेला असं निरोप मिळाला. मी तसाच त्याच्या घरी गेलो.सर्व मंडळी शोकाकूल पाहून मलाही दुखः आवरेना.
किर्तनकार करतात तसं वरचं सर्व प्रवचन झाल्यावर मुळ आख्यानाला लागतो.
सूर्याच्या जवळ बसलो असताना त्या शांत चेहर्‍याकडे बघून मला दहा वर्षापूर्वीच्या एका घटनेची आठवण झाली.
त्याचं असं झालं,नाशकाला एका प्रसिद्ध कंपनीचं नाटक लागलं होत.हे नाटक आम्हाला मुंबईत चूकलं होत.म्हणून दोन दिवसासाठी मी आणि सूर्या सुखटणकराने नाशकाला जायचं ठरवलं.परतीच्या वेळेला,सूर्या मला म्हणाला,
“तू पुढे जा,मी नंतरच्या एस्टीने येतो.माझं एका अशिलाकडे काम आहे.जातान माझी ही बॅग मात्र तू ने.”
मी निघालो.घरी येऊन जरा फ्रेश होऊन सूर्याच्या घरी जायला त्याची बॅग घेऊन निघालो.त्याच्या चाळीत आल्यावर त्याच्या रूम जवळ खूपच गर्दी जमलेली दिसली.मला कळेना काय झालं ते.सूर्याची म्हातारी आई मुसमुसून रडत होती. इतक्या वर्षाच्या संसारातल्या खडतर जीवानात मुलाला लहानाचं मोठं करीत असताना दुःखाच्या प्रसंगात रडून रडून तिचे अश्रू सुकले होते. बिचार्‍या बर्‍याचश्या आईला ह्या अडचणीतून जावं लागतं. बाहेर असलेल्या त्याच्याच एका शेजार्‍याला विचारल्यावर कळलं की सूर्या मॅसिव हार्टऍटेकने गेला असा नाशिकहून फोन आला. मला शॉक बसलाच आणि अशक्य वाटलं.कारण चार तासापूर्वी मी त्याच्या बरोबर होतो.पण काय कुणासठाऊक हल्ली कुणाला काय होईल ते.काही सूर्याची मुलं जवळ होती.मोठी शोभना निरोप मिळाल्यावर ती आणि तिचा नवरा आला होता.शरद घरचाच तो तिथे होताच पण नंतर शेजार्‍या बरोबर टॅक्सी करून नाशकाला गेला.डिंपलपण आपल्या नवर्‍याला घेऊन आली होती.दिल्लीच्या मुलीला, वंदनाला कळवलं ती संध्याकाळ पर्यंत विमानाने यायला निघाली.अमेरिकतला मुलगा कुमार मात्र ताबडतोब येत नव्हता.खोलीत एका कोपर्‍यात एक वयस्कर गृहस्थ दाढीमिशी लांब असलेला डोक्यावर एक काळी टोपी आणि मान खाली घालून विचारात पडल्यासारखी चर्या करून बसलेला मला दिसला.मला वाटलं सूर्याचा कुणीतरी वयस्कर नातेवाईक असावा.बाकी मंडळी यायची असल्याने मी घरी जाऊन परत येतो असं शोभनाला सांगून घरी गेलो.रात्री नऊच्या दरम्यान मला फोन आला की,
“काका तुम्ही ताबडतोब परत या.इकडे आल्यावर तुम्हाला काय ते कळेल.”
मी सूर्याच्या घरी परत आल्यावर सर्व मंडळी हंसत होती आणि त्या सर्वा मधे सूर्या बसून हंसत होता.मला सूर्याचा राग ही आला आणि गंमतही वाटली.मला पाहून सूर्या म्हणाला,
“उद्दा संध्याकाळी आपण समुद्रावर भेटूया मी तुला सर्व किस्सा सांगतो.तुला इकडे ये-जाचे बरेच हेलपाटे झाले आहेत.तू दमला असशील,काळजी करू नकोस सर्व काही ठीक आहे.”
दुसर्‍या दिवशी समुद्रावर भेटल्यावर मला त्याने जे काय सांगितलं ते ऐकून हंसावं की रडावं हेच कळेना.
मला सूर्या म्हणाला,
“गेले कित्येक दिवस माझ्या मनात येत होतं की जर का मी मेल्याची बातमी माझ्या ह्या मंडळीना कळली तर ही कशी वागतात ते मला प्रत्यक्ष पाहायचं होतं.मग तू मला माझी ही क्रेझी आयडीया म्हण किंवा आणखी काही म्हण,हा प्रयोग करून पहायचं माझ्या डोक्यात कित्येक दिवस घोळत होतं,तो काल मी चान्स घेतला.”
मी आणखी प्रश्न विचारण्यापूर्वीच मला म्हणाला,
“तू म्हणशील असं करून तुला काय मिळालं?” तेच सांगतो.माझ्या आई पासून माझ्या सर्व मुलां पर्यंत कोण कोण काय काय बोलतं ते ऐकायचं होतं.म्हणून मी, तू नाशिकहून गेल्यावर लगेचच दुसर्‍या एस्टीने मुंबईत आलो.एका इराण्याच्या दुकानातून घरी तो फोन केला.बातमी ऐकून मंडळी घरी जमेपर्यंत कोपर्‍यावरच्या लॉन्ड्रीत माझे आंगावरचे कपडे उतरून घरी जमलेल्यांच्या गर्दीत वाट काढून एका खूर्चीवर बसलो होतो.तू माझ्याकडे निरखून बघायचास त्यावेळी मी हळूच दुसरीकडे बघायचो.तू येण्यापूर्वी मी त्या खूर्चीवर बसून कोण कोण काय काय बोलत होते ते कान लावून ऐकत होतो.”
मी सूर्याला मधेच थांबवून म्हणालो,
” किती रे तू निष्टूर वागलास.तुला कुणचीच कशी किंव आली नाही.?”
मला हंसत हंसत सूर्या कसा म्हणतो,
“वकिली करून करून खर्‍याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायची मला संवय झाली आहे.पण एक मला माहित झालं आहे की माणूस फक्त दोन वेळा नचूकता खरं बोलतो एकदा जर का तो भरपूर दारू प्याला असेल-तुझ्या भाषेत घूटूं घेतलेला असेल-तर किंवा दुसर्‍यांदा आपलं जवळचं कोण गेलं असं कळल्यावर त्या गेलेल्या माणसाशी झालेल्या प्रातारणा आठवून किंवा त्याच्याशी पश्चातापपूर्वक काही वागणूक झाली असल्यास माणूसकी म्हणून खरं सांगायचा संभव असतो.”
मी म्हणालो,
“मग सांगून टाक की रे काय ते लवकर कोण काय काय बोललं ते”
“ऐक तर” मला म्हणाला,
“सर्वांना दुःख झालं होतं आणि पश्चाताप ही झाला होता.पण फक्त दुःखं झालं होतं ते माझ्या आईला.तिला कसलाच पश्चाताप झालेला दिसला नाही.
तिच्या पोटात नऊ महिने वाढून,माझं तिने संगोपन करून एव्हडं मला वाढवलं.मला लहानपणी दम्याचा विकार होता.त्यावेळी दम्याची उबळ आल्यावर मी कसा कासावीस व्हायचो,त्याची आठवण ती इतराना सांगत होती.
पश्चातापाची यादी मात्र इतर वाचून दाखवीत होते.
बायको म्हणाली,
” कधी कधी घरी दमून भागून यायचे,कमाई काही इतकी व्हायची नाही.माझ्या बरोबर चिडाचिड करायाचे मग मी रागाने त्यांना काहीतरी बोलायचे ते तसं करायला नको होतं.त्यांचा तरी काय दोष होता.”
मोठी मुलगी शोभना म्हणाली,
“बिचार्‍यांच्या हाताला यश नव्हतं.पण कष्ट करायचे”
मोठा मुलगा शरद म्हणाला,
“मला अकदी पोटतीडकीने चांगलं शिकायला सांगायचे पण मी त्यांच बोलणं मनावर घेतलं नाही.त्याचा मला आता पश्चाताप होतो.”
धाकटी मुलगी डिंपल म्हणाली,
“मी खूपच त्यांच्या मनाविरूद्ध वागले.मला ते खूप शिकायला सांगायचे.त्याना माझं हे बॉलीवूड वगैरे आवडायाचं नाही.कुमार त्यांना आवडायचा कारण तो आय आय टीत शिकून अमेरिकेला गेला.त्याचा त्याना अभिमान वाटायचा.
एकदा एक अशी घटना घडली,मला ती आठवली की अजून वाईट वाटतं.आज तर प्रकर्षाने वाईट वाटतं.
मी त्या वयावर अल्लडच होते.”दुल्हनीया ले जायेंगे” ह्या पिक्चरला जायला मी खूप आतूर झाले होते.माझी मैत्रीण माझ्या घरी येणार होती.साडेपाच झाले तरी ती आली नाही.पिक्चर सहाचं होत,तेव्हड्यात बेल वाजली.मी मैत्रीण आली म्हणून आतूरतेने दरवाजा उघडायला गेले.आणि पहातो तर बाबा होते.मी पटकन म्हणाले,
“शीः! बाबा तुम्हीss? मला वाटलं की माझी मैत्रीण.”
मी असं बोलायला नको होतं. बिचारे थकून भागून आपल्याच घरी आले होते.मला आता त्याचा पश्चाताप होतो.कधी तरी मी त्यांची माफी मागणार होते.पण आता तसं कधीच करता येणार नाही.”
नंतर सूर्या म्हणाला,
“दिल्लीहून वंदना यायची होती.आणि कुमार तर अमेरिकेत होता.त्यामुळे हे ऐकलेलं लक्षात ठेवून माझ्या खूर्चीतून उठलो.लॉन्ड्रीत गेलो,दाढी मिशीचं वेषांतर काढलं आणि माझे नेहमीचे कपडे घालून घरी परत आलो.”
मी म्हणालो,
“तुला तसा पाहिल्यावर त्या सर्वांच काय झालं असेल.कल्पनाच करवत नाही.”
त्यावर सूर्या म्हणतो,
“अरे,काय सांगू? बायको जोर जोरात रडून माझ्या छातीवर बुक्क्यांचा वर्षाव करीत होती.किती शिव्या दिल्या असतील मला काही आठवत नाही.मुलं तर हंसत ही होती आणि रडत ही होती.मी मात्र माझ्या आईच्या मांडीवर डोकं टेकलं.ती मला जवळ घेऊन कुरवाळत होती.”
हे ऐकून मला डोळे पूसताना पाहून सुर्या म्हणाला,
“हे सर्व तू तुझ्यात आणि माझ्यातच ठेव.तो दाढीमिशीवाला कोण ते त्यांना माहित नाही.आणि त्यांचे संवाद त्याने ऐकले तेही त्यांना माहित नाही.म्हणूनच मी तुला काल समुद्रावर भेटूया असं म्हटलं.”

आज सूर्या निघून गेला.त्याचं गूपित मी फोडलं असा त्याच्याकडून तरी माझ्यावर आरोप येणार नाही.


श्रीकृष्ण सामंत.(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, January 11, 2009

मी माझ्यातच संतुष्ट आहे.

“माझ्या अशुद्ध बोलण्याच्या पद्धतीमुळे माझ्या व्यक्तिमत्वात काही फरक झालेला नाही.मला वाटतं मी कोण आहे त्याची व्याख्या मीच करावी आणि माझ्या जीवनात काय कारवाई करावी ते पण मीच ठरवावं.”

मी एकदा एका लायब्ररीत पुस्तकं चाळीत बसलो होतो.दोन तीन पुस्तकं मला आवडली आणि वाचायला न्याविशी वाटली.ती घेऊन मी काऊंन्टरवर गेलो.काऊंटरवर बसलेली व्यक्ति मला जरा वयाने लहान वाटली.मी कुतुहलाने त्याला विचारलं,
“तू शाळेत शिकत असशिलच.”तो हो म्हणाला.
“मी माझ्या फावल्या वेळात लायब्ररीत येऊन बसतो आणि वाचन करतो.कधी कधी मला लायब्ररीचे व्यवस्थापक मदत करायला सांगतात.आणि मी त्यांना आवडीने मदत करतो.नुसतच अभ्यासाची पुस्तकं वाचून शाळेतल्या परिक्षा पास होता येईल पण ज्ञान वाढवायचं झाल्यास आणखीन खूप वाचन केलं पाहिजे.आणि मला वाचनाची आवड आहे”
तेव्हड्यात लायब्ररीचे व्यवस्थापक काऊंटरकडे आले आणि त्यांनी त्या मुलाला मोकळं केलं.
मी त्या मुलाला घेऊन बाजूच्या कॅन्टीनमधे येतोस का विचारलं,आणि आम्ही दोघं कॅन्टीनमधे जाऊन दोन कप कॉफीवर चर्चा सुरू केली.
मी त्याला म्हणालो,
“तुझे विचार ऐकून मला तुझ्या बद्दल जरा कुतुहल वाटलं तू सांगशील का तुझी हकीकत”.
तो सुरवाती पासूनचे आपले अनुभव सांगू लागला,
“माझी घरची परिस्थिती खूपच गरिब आहे.पण मला शिक्षणाची खूप आवड आहे.आईवडील आणि घरातले इतर अंगमेहनतीची कामं करून उदरनिर्वाह करीत असल्याने शाळेत जायला कुणी विचारच केला नाही.मी वयाने लहान असल्याने मला तेव्हडा शाळेत जायचा चान्स मिळाला. सुरवातीला मी शाळेत गेल्यावर,
” तू गांवढळच का राहत नाहीस?”
माझ्या शाळेत इतर विद्दार्थ्याकडून मला हा प्रश्न प्रकर्षाने विचारला जायचा.मला असं दिसून आलं की माझ्या सारख्या गांवढळ व्यक्तिकडून काय अपेक्षा करावी ते लोकाना आपल्या डोक्यात अगोदरच ठरवून ठेवायला आवडत होत.
पण माझ्या मनात येत की मी जो आहे तो आहे आणि मी कसा असावा हे दुसर्‍यानी ठरवाव अस नसाव.
शाळेतल्या माझ्या पहिल्या दिवशी,मी गणिताच्या वर्गात गेलो होतो.माझ्या त्या वर्गातल्या दोन विद्दार्थ्यानी माझ्याकडे अंगुलीनिदर्शन करून माझं हसं उडवल होत. प्रथम मला वाटलं कदाचीत माझ्या पॅन्टची झीप उघडी असावी,किंवा माझ्यादातात काही तरी अडकलेल त्याना दिसत असाव.पण मी ज्यावेळी माझ्या सीटवर जाऊन बसलो,त्यावेळी एका विद्दार्थ्याला कुजबुजताना ऐकल,
“हा गांवढळ मुलगा कशाल शाळेत शिकायला येतोय?”
म्हणजे त्याचा अर्थ माझी झीप उघडी नक्कीच नव्हती. पण त्याच वर्गात एक गबाळ्या सारखे कपडे घालून डोळे अस्वच्छ असूनही बसलेला विद्दार्थी त्याना चालत होता.
त्यामानाने माझे कपडे ठिगळलेले असले तरी स्वच्छ होते.त्याना वाटायचं माझे कपडे नव्या सारखे दिसावे आणि ते अस्वच्छ असले तरी चालावे.काही मुलं माझ्या कपड्यांकडे निरखून बघत आणि काही तरी टाकून बोलत.हे मी सातवीत असताना व्हायचं.
माझ्या एका संस्कृत वर्गात मला गुरूजीने विचारलं,
“कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” याचा अर्थ काय?
मी पटकन सांगितलं,
“कर्म करीत जा फलाची आशा धरू नकोस”
हे ऐकून माझ्या वर्गातल्या इतर विद्दार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसून आलेला गहरा धक्का पाहून मला वेगळेपण आल्यासारखं वाटल.
आता मी मॅट्रिक व्हायला आलो आहे.मी सर्व वरचे क्लासिस घेतो.माझे घरचे कपडे पण मला हवेसे वाटतात तसेच आहेत.माझ्या मित्र निवडण्याच्या पद्धतीत पण मी दुजाभाव ठेवित नाही.शाळेतपण मी क्रियाशिलता ठेवतो.आणि कधी कधी मी अशुद्ध शब्दपण उच्चारतो.
माझ्या शुद्ध-अशुद्ध उच्चाराने माझं व्यक्तिमत्व बदलं नाही आणि माझ्या व्यक्तिमत्वाने माझे उच्चार बदले नाहीत. माझा माझ्यावर विश्वास आहे. मला वाटतं मी कोण आहे त्याची व्याख्या मीच करावी आणि माझ्या जीवनात काय कारवाई करावी ते पण मीच ठरवावं.शाळेमधली लोकप्रियता बहुदा शाळेतली विचारधारा अंगीकारण्याच्या तुमच्या स्वेच्छेवर अवलंबून असते.आणि मला कुणी तरी म्हणालं की प्रौढता आणणं तितक सोप नाही.दुसरा एखादा विकल्प म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाला- दुसर्‍यांच्या समाधानीसाठी आणि त्यांच्या पसंतीसाठी- बळी देणं.
खरंच,अस करणं जरा आकर्षित वाटत असेल,पण माझा स्वाभिमान राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नात मी थोडा अलोकप्रिय झालो असेन आणि कधीकधी माझी घृणाही आली असेल आणि त्याचा अंतही दृष्टीक्षेपात आला ही नसेल. पण दुसर्‍यानी माझ्याशी संतुष्ट असणं हे मी माझ्याशी संतुष्ट असण्याइतकं महत्वाच मानीत नाही.
आता मी मॅट्रिकची परिक्षा दिल्यावर नक्कीच कॉलेजात शिकायला जाणार.ह्याच लायब्ररीतल्या व्यवस्थापकानी मला इथेच काम करून काही पैसे कमविण्याचा मार्ग दाखवला आहे.त्याने मी माझा शिक्षणाच्या खर्चाला थोडा हातभार लाविन.आणि खचीतच माझी भरपूर शिकायची इच्छा पूर्ण करीन.”
मला त्या मुलाची जीद्द बघून खूपच आनंद झाला.त्याला मी सुयश चिंतीलं.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, January 9, 2009

इच्छेच्या पाऊलवाटा

माझी मामेबहिण सुमती कोकणातल्या एका खेड्यात रहाते.ती, तिचा नवरा आणि मुलं घराच्या मागे शेती करतात.घर मोठं आहे आणि मागे मांगर, विहीर आणि गाईबैलांचा गोठापण आहे.एक दिवस मी तिच्या घरी गेलो असताना मला ती तिच्या घराच्या मागच्या परड्यातून गाईगुरं दाखवीत खोल विहिरीची आणि आजूबाजूच्या शेतीची माहिती देत देत आपला अनुभव सांगत होती.एका जागेतून दुसर्‍या जागेत जाताना लहान लहान पाऊलवाटा झाल्या होत्या.ह्या पाऊलवाटावरून विषय निघाला.
मी तिला विचारलं,
“सुमती प्रत्येक पाऊलवाटांच्या टोकाला तू आखांडे घातले आहेस.हे अटकाव कशासाठी ?”
सुमती खेड्यात रहात असली तरी तिने कॉलेजचं शिक्षण पूरं केलं होतं.काही दिवस ती त्याच कॉलेजात लेक्चरर म्हणून पण होती.नंतर तिने शेतीत लक्ष घालायला सुरवात केली.आणि त्याचं कारण तिचा नवरा होता.कारण तो ऍग्रिकल्चरची डिग्री घेऊन ह्या खेड्यात शेती करायच्या इराद्दाने रहात होता.
माझ्या वरील प्रश्नाला तिने चक्क तत्वज्ञान देण्याच्या उद्देशानेच उत्तर दिलं.

“मला वाटतं आपल्या इच्छा-आकांक्षेचा मार्ग आपण नीट काळजीपूर्वक निवडला पाहिजे.चुकीची निवड झाल्यास परिणाम घातक होतात.
वास्तुशास्त्राच्या भाषेत मार्ग म्हणजे पायवाट,गवतातून चालून झालेली चिखलवाट असं समजल जात.एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पटकन जायच झाल्यास केलेल्या मार्गालापण पायवाट किंवा पाऊलवाट म्हणतात.ह्या निरनीराळ्या पाऊलवाटाच आहेत.
मी खेड्यात शेती करून राहते.आणि माझ्या परिसरात डझनावर पाऊलवाटा आहेत.परसातल्या मांगराकडे जाण्याची पाऊलवाट,गाईच्या गोठ्याकडे जाण्याची पाऊलवाट, विहीरीकडे जाण्याची पाऊलवाट.
ह्या पाऊलवाटा आपल्या इच्छेमुळेच तयार होतात. कारण आपल्याला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्याची इच्छा होत असते.मी सरसकट ह्या पाऊलवाटाना “इच्छेची पाऊल वाट ” असं समजते.
ह्या इच्छेच्या पाऊलवाटांचं चांगलच रक्षण व्हावं असं मला नेहमी वाटत असत.पण मला वाटतं त्यांच्या पासून काळजी पण घ्यायला हवी.
एका बाजूनी विचार केल्यास मी कडक नियमाच्या पालनाची सक्ति नापसंत करते.पण मी तसं करावं लागल तर मोठ्या कल्पकतेने ती आचारणात आणते. पण दुसर्‍या कुणाचे नियम तोडण्यापूर्वी दोनदा विचार करते. मी माझ्या मुलांच्या आणि पतीच्या इच्छेचा जसा सन्मान करते तसा माझ्या शेतातल्या पशुप्राण्यांचा पण सन्मान करते.त्यांच्या पाऊलवाटा ह्या त्यांच्या इच्छेनुसार झालेल्या असल्याने त्याचा ही सन्मान करते.पण माझा हा सन्मान दुधारी आहे कारण ह्या इच्छेच्या पाऊलवाटा आपल्याला संकटात आणू शकतात.
अलिकडेच अशीच एक पाऊलवाट आमच्या शेतीच्या बैलाला घातक ठरली.
त्याचं अस झाल,की तो बैल चरत चरत आमच्या घरा मागच्या परड्यात लुसलुशीत गवत खाण्याच्या इराद्दाने परड्याला घातलेल्या आखांड्याला ओलांडून येण्याच्या प्रयत्नात जवळच्या एका गायरीत-खड्यात पडला.ती त्याने केलेली त्याची इच्छेची पाऊलवाट असावी.जरी मी त्याला रोज खुराक देत असली आणि ते पुरेसं असल तरी त्याला ते गवत खायची इच्छा झाली असावी.
त्याच्या मागच्या पायाचं हाड मोडलं.त्याला उचलून घेऊन जाताना इतर गाई-बैलानी ते पाहिलं असावं.नंतर तो बैल उपचार करूनही शेवटी मेला.पण त्या इतर प्राण्यानी काय शिकल का? नाही. ते पण त्यांच्या इच्छेची पाऊलवाट करून असेच येण्याच्या प्रयत्नात असतात.अर्थात मी ती गायरी बुजून टाकली म्हणा.
अलीकडे मी त्या पाऊलवाटेच्या समोर भलाभक्कम आखांडा घालून त्या पाऊलवाटेला बंद करून टाकलं.हे माझ्या मनाविरुद्ध मी केलं.माझ्या स्वभावाला असं करणं परवडत नाही.पण कधी कधी मला अशा तर्‍हेच्या घटनेतून शिकूनमाझ्या विचाराना मोड घालावा लागतो.शेतकरी,आई आणि पत्नी म्हणून मला नियम घालून वागावं लागत.
उदाहरणार्थ, मी आणि माझे पती बर्‍याच गोष्टीवर सहमत नसतो.राजकारण,श्रद्धा आणि कधी कधी आम्हाला एकच संगीत ऐकायला आवडत नाही. त्यामुळे आमच्या इच्छेच्या पाऊलवाटा जर का आमच्या नात्यात आडकाठी आणू लागल्या तर आम्ही असेच मजबूत आखांडे-अटकाव घालून एकमेक आज्ञाधारी ढंगाने आपआपली बाजू संभाळतो.आणि बरेच वेळा ते कामी येतं.
बरेच वळा सीमेची जरूरी असते. ती लागू करायला जास्त प्रयास करावे लागतात.म्हणून मला वाटतं आपआपल्या इच्छेच्या पाऊलवाटा काळजीपूर्वक निवडायला हव्यात.त्या चुकल्या तर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात.माझ्या त्या मेलेल्या बैलाने आणि मी, मोठ्या मुष्कीलीने हे शिकलं आहे.”
सुमतीचं हे बोलणं संपल्यावर मी तिला म्हणालो,
“सुमती तू मला असं एक तत्वज्ञान सांगितलंस की ह्या इच्छेच्या पाऊलवाटा माझ्या कायमच्या लक्षात राहाणार.आणि एकलक्षात आलं की तू जरी आता शेतकरी झालीस तरी पूर्वीची लेक्चररशीप अद्दाप राखून आहेस.”
त्यावर मला हंसत हंसत म्हणाली,
“लेक्चर देण्यासारखा मला जर का स्टुडंट भेटला तर मी त्याला काय करू?”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, January 7, 2009

उजाळा देती माझ्या स्मृतिना

फिरूनी शोधूनी वाटे माझ्या मना
ते फुरसतीचे दिवस अन रात्र
उजाळा देती माझ्या स्मृतिना

थंडीतले उन कोवळे असे अंगणी
ओढूनी तुझा पदर माझ्या नेत्रावरी
पहूडलो असता अन कुशी वळताना
उजाळा देती माझ्या स्मृतिना

गरमीच्या रात्री वाहती थंड वारे
घेऊनी सफेद चादर माझ्या अंगावरी
पडूनी छतावरी तारे मोजीत असताना
उजाळा देती माझ्या स्मृतिना

किर्र रानातल्या त्या उंच पहाडावर
गुंजन करूनी भ्रमराची ती निस्तब्धता
चिंब भिजवीती ते क्षण नयानाना
उजाळा देती माझ्या स्मृतिना

फिरूनी शोधूनी वाटे माझ्या मना
ते फुरसतीचे दिवस अन रात्र
उजाळा देती माझ्या स्मृतिना


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, January 5, 2009

एका ऑफिस-सेक्रेटरीची कैफियत

“ज्यामुळे जगावंस वाटतं तेच काम करावं.”

माझ्या मित्राच्या तिनही मुली चांगल्या शिकल्यात.एक डॉक्टर आहे तर एक वकील आहे आणि तिसरी ही इंग्लिश घेऊन एम.ए.आहे.

“तुला कुठेही कॉलेजात लेक्चरर किंवा प्रोफेसर होता आलं असतं मग तू एका ऑफिसात सेक्रेटरीचा जॉब का पत्करलास? “

असं मी विचारल्यावर ती म्हणाली,

“मी सेक्रेटरी व्हावं असं मला का वाटायचं?कारण जसे हातमोजे हातात फिट्ट बसतात तसंच हे सेक्रेटरी होणं मला फिट्ट बसतं.मी ते काम करायला जाते ज्यावर मी प्रेम करते.ते काम म्हणजे जे सुनियोजित करण्यात जे सुव्यवस्थित करण्यात माझा वेळ जातो. दुसर्‍याना चांगलं वाटतं म्हणून ते काम करण्यापेक्षा मी जी आहे ते असण्यात मला गम्य वाटतं असं मी मानते.”
“गेल्या वर्षी मी प्रोग्रामर म्हणून काम करायचे.मी तो जॉब सोडला.आणि एक्झीक्युटीव्ह असिसटंट म्हणून जॉब घेतला हा जॉब मला आवडतो.ही उपधी जरा फॅन्सी आहे, खरं म्हणजे त्याला सेक्रेटरी म्हणतात.माझ्या नवीन जॉबबद्दल कुणी विचारल्यास मला थोडं सांगायला संकोच येतो.मी काय करते म्हणून नव्हे तर मी धरून इतर सुद्धा सेक्रेटरी असणं ह्यावर मनात काय आणतात त्याचा विचार येउन असं वाटतं.
मला नेहमीच वाटतं सेक्रेटरी होणं चांगलं आणि कदाचीत ते काम सक्षम आहे,जरी ते स्मार्ट,प्रभावशाली, आणि मौलिक नसेलही.मी इंग्लिशमधे एम.ए आहे.मी बर्‍याच प्रसिद्ध व्यक्तिंची मुलाखती घेतल्या आहेत.जे लोक माझ्या परिचयाचे आहेत ते नेहमीच मला विचारतात की,
“तू हा नीरस आणि कमी दर्जाचा जॉब का पत्करलास?”
माझ्या नवीन बॉसने पण मला विचारलं,
“तू हा जॉब करून कंटाळणार नाहीस ना?”
मी सेक्रेटरी व्हावं असं मला का वाटायचं?कारण जसे हातमोजे हातात फिट्ट बसतात तसंच हे सेक्रेटरी होणं मला फिट्ट बसतं. मी ते काम करायला जाते ज्यावर मी प्रेम करते.ते काम म्हणजे जे सुनियोजित करण्यात जे सुव्यवस्थित करण्यात माझा वेळ जातो.
माझ्या बॉसच्या दिवसभरच्या फारच व्यस्त कार्यक्रमात त्याच्या सर्वोच्य प्राथमिकतेत केंद्रीत होण्याचं चॅलेंज घ्यायला मला आवडतं.कसलीही अव्यवस्था असल्यास मी त्यात काम करू शकते.गुंतागुंतीच्या व्यवहारात काम करायला हेरगीरी करायला बरं वाटतं.फायलींग करणं आरामदायी वाटतं.
त्यातल्यात्यात कठीण भाग म्हणजे,माझ्या बरोबरच्या आणि इतरांच्या बरोबरच्या रुढिबद्ध लोकांशी समझोता करणं.मी एक मान्य करते की माझ्या बॉसला कॉफी आणून देण्याच्या कामामुळे थोडसं मला अडचणित टाकल्या सारखं वाटतं.पण खोलात जाऊन विचार केला तर कुणाला कॉफी आणून देणं काही अपमानकारक आहे असं वाटत नाही.मी तर म्हणेन की नम्रपणाचं ते एक प्रतिक आहे.काही लोकात चहापाणी देणं हे एक दुसर्‍याचा सन्मान केल्या सारखं मानलं जातं. माझ्या बरोबरीच्या आणखी सेक्रेटरी स्त्रीया ज्यांचा एकावेळी अनेक कामं करण्याचा हातखंडा असतो अशांच्या बरोबर राहायला मला आनंद होतो.
समाजात डॉक्टर,इंजीनियर,सायंटिस्ट,आर्किटेक्ट असल्यावर त्यांना जास्त सन्मानीत करतात आणि त्यांची मिळकत पण विशेष असते.असं असताना कुठल्यातरी पार्टीत कुणाची तरी भेट झाल्यावर हे सांगायलाही बरं वाटतं. पण माझी एक मैत्रीण मला सांगते,

“आपण काय करतो ती पार्टीतली चर्चा फक्त पाच मिनीटाची असते,पण तुम्ही जे जीवनात काम करता ते तुम्हाला दिवसभर रोजच करावं लागतं. काम किती विशेष आहे हे पहाण्यापेक्षा ज्या कामावर तुम्ही प्रेम करता ते करणं जास्त बरं वाटतं.असं मी तरी मानते.”
मी तिला म्हणालो,
“कामावर प्रेम केलं तरच आपला वेळ मजेत जातो.म्हणून कोणी काही म्हणो ज्यात आपला वेळ जातो तेच काम करावं”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, January 3, 2009

थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर

थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर
काटकुळ्याने बनलेले छोटेसे छप्पर

मागीले तुजवळी ते तर फार नसे
जो प्राण द्दायचा ते तर वचन नसे
नको ते मागणे आता या उप्पर
थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर
काटकुळ्याने बनलेले छोटेसे छप्पर

अंगणी माझ्या असावा एक झूला
सुगंधी मातीचा असावा एक चूला
थोडी थोडी आग आणि थोडा धूर
थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर
काटकुळ्याने बनलेले छोटेसे छप्पर

रात्र जाई निघुनी दिवस कसा जावा
बाजरीच्या शेतामधे कावळा उडावा
बाजरीच्या ताट्यासम मुले होवोत भरपूर
थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर
काटकुळ्याने बनलेले छोटेसे छप्पर


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, January 1, 2009

कामकरत राहणं जीवनाला गोड-सुखद बनवतं.

“मला ज्यावेळी विचारलं गेलं,की मी काय मानते?त्यावेळी उत्तर देण्यापूर्वी माझ्या लक्षात आलं की ह्याला उत्तर द्दायला आपण काय करतो त्याकडे नीट निरखून लक्ष दिलं पाहिजे.कारण आपण जे काय करतो त्याकडे सहजगत्या आणि इमानदारीने पाहिल्यास ज्याच्यावर आपला विश्वास आहे तेच आपण करीत असतो.आणि तेच आपण मानतो. “

शोभना मला ह्यावेळी भेटली तेव्हा आमच्या लहानपणच्या आठवणी काढून आम्ही बराच वेळ आनंदात घालवला.मी माझ्या आठवणी तिला सांगत होतो.ते सांगता सांगता शोभनाच्या कमाआत्याची आठवण मला निक्षून आली.
मी तिला म्हणालो,
“शोभना,तुझी कमाआत्या तुला खूप आवडायची.नव्हे तर तुला वरचेवर तुझ्या नातेवाईकांना भेट द्दायला तू बाजूच्या गावात अगदी खूप उत्साही होऊन जायचीश आणि तिला भेटायचीस.मी पण एकदा तुझ्या कमाआत्याकडे आलो होतो.ती तुला नेहमीच काही ना काही तरी उपदेश करायची.तू तिचं सगळं ऐकून घ्यायचीस आणि करायचं तेच करायचीस.मला आठवतं एकदा तुला तिने शिवणकाम, भरतकामावर लेक्चर दिलं होतं.सांग बघुया काय होत ते.”
शोभना म्हणाली,

त्यावेळी मी दहा वर्षाची असेन.जवळच्या गावात वरचेवर जाऊन माझ्या नात्यातले वयस्कर नातेवाईक राहायचे त्यांना भेटायला जायला मला आवडायचं.त्या नातेवाईकात कमाआत्या माझी एक वयस्कर आत्या होती.ती तिच्या एका अविवाहीत मुली बरोबर राहायची.मी माझ्या कमाआत्याला वरचेवर भेटायची.तिला मी सदानकदा विणकाम,भरतकाम किंवा शिवणकाम करीत असलेली पाहायची.तिला भेटल्यावर ती मला नेहमीच ती करते ते काम शिकून घ्यायला मागे लागायची.
म्हणायची,
“ही कला शिकून घेतलीस तर तुझ्या रिकामटेकड्या वेळेचा उपयोग काही तरी लभ्यांश मिळवण्यात होईल.”
मला तिला नकार देण्याचं कारण, कमाआत्या ज्या कामात वेळ घालायची ती कलाकृती रंगाच्या दृष्टीने आकर्षक नसायचीच त्याशिवाय त्या कामाची बनावट पण एव्हडं स्वारस्य घेण्यालायक नसायचं.मला हवं होतं ते म्हणजे आकर्षीत रंग असलेले गळपट्टे, हातमोजे,आणि झालर असलेले पेटीकोट असले प्रकार करायला मला आवडलं असतं.अशावेळी कमाआत्या मला एक तत्व सांगून जायची-जरी त्या तत्वामुळे माझ्या प्रवृतीत काही फरक पडला नसला तरी- त्याचा प्रभाव मात्र साफसाफ माझ्याभविष्यातल्या वागणूकीत कायमचा पडून गेला.
ती म्हणायची,
“कामकरत राहणं जीवनाला गोड-सुखद बनवतं”
वर नंतर म्हणायची,
“तू सिधीसाधी मुलगी आहेस.तुझ्यात काही उत्कृष्ठ अशी कला मला सध्या दिसत नाही.आतापासूनच तू तुझ्या सुखाच्या दृष्टीने कोणतं काम उपयुक्त ठरेल हे पाहिलं पाहिजे.
ह्या बनावटीच्या गोष्टी जरी तुला सटरफटर दिसल्या आणि त्यात तुला स्वारस्य नसलं तरी ह्या मी बनवलेल्या वस्तू अनाथाश्रमातल्या मुलांना वापरायला, वृद्धाश्रमातल्या लोकाना वापरायला आणि हॉस्पिटातल्या गरीब रोग्याना वापरायला जातात.
मला ते बनवून गरजूंच्या सेवेला कार्यान्वित करायला- कुणी जरी त्याची उपेक्षा केली तरी- धन्य वाटतं.माझ्या लक्षात आलंय की एखाद्दा आवश्यक कामाकडे ते कितीही नीरस असलं तरी पाठ फिरवणं ही एक घातक गोष्ट आहे.असलं कुठचंही काम नुसती भरपाईच करीत नाही तर ते अत्यंत गोड असतं.”

माझ्या आत्याचे हे बोलणं जरी माझ्या मनावर लगेचच परिणाम करू शकलं नव्हतं. तरी माझ्या कमाआत्याचं म्हणणं अगदीच काही फाल्तु नव्हतं.
मला ज्यावेळी विचारलं गेलं,की मी काय मानते?त्यावेळी उत्तर देण्यापूर्वी माझ्या लक्षात आलं की ह्याला उत्तर द्दायला आपण काय करतो त्याकडे नीट निरखून लक्ष दिलं पाहिजे.कारण आपण जे काय करतो ते सहजगत्या आणि इमानदारीने पाहिल्यास ज्याच्यावर आपला विश्वास आहे तेच आपण करीत असतो.आणि तेच आपण मानतो.
मी माझंच आश्चर्य करते कारण माझ्या लक्षात आलं की माझ्या ऍडल्ट जीवनात माझा वेळ ज्यात आत्याला समाधान वाटत होतं तशाच काहीशा प्रकारच्या कामात समर्पीत केला होता. अर्थात तसे उपयोगी कपडे मी तयार करीत नव्हते कारण आता फॅक्टरीमधे असले कपडे सर्रास बनवले जात आहेत त्यामुळे हाताने बनवायची गरज संपली होती.
मी अजाणपणे मर्मभेदी आणि पाठमोडून जाईल अशी कामं करीत राहिले.
कुणी तरी म्हटलंय,
“जे काही काम हाताला लागेल ते सर्व शक्तिसामर्थ्याने करावं”
मी म्हणालो,
“शोभना आपल्याला अनुभवी मंडळी जे काय सांगतात,ते ऐकून घ्यायला काहीच हरकत नसते.त्यांच म्हणणं अगदीच काही फाल्तु नसतं हे तुझं म्हणणं मला पटलं.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com