Friday, September 30, 2011

आईने विणलेली शाल.


“म्हणून मला वाटत असतं की,मला माझ्या आईने दिलेल्या ह्या विणलेल्या शालीतल्या प्रत्येक धाग्यातून माझी आई हळुवारपणे त्या शालीत तिचं प्रेम घट्ट धरून ठेवीत असावी.”

वैशालीला एक भाऊ आणि एक बहिण आहे.ती दोघं अमेरीकेत स्थाईक झाली आहेत.वैशालीचा नवरा दुबईत एका पेट्रोल कंपनीत कामाला असल्याने दुबईवरून ती अधुनमधुन, तिची आई एकटी असल्याने, तिच्याकडे रहायला यायची.दुबईला असताना ती रोज आईला फोन करून तिची जाग घ्यायची. वैशालीच्या गैरहजेरीत जवळचे नातेवाईक तिच्या आईची देखभाल करायचे. शिवाय एक विश्वासातली बाई तिच्या देखरेखीसाठी होती.

वर्षातून एकदा तिची दोन्ही भावंडं आईला भेटायला यायची.ती संधी साधून वैशाली आणि तिचा नवरा आईला भेटायला दुबईवरून यायची.अलीकडे वैशालीची आई खूपच थकली होती हे लक्षात आल्यावर वैशालीने आपल्या नवर्‍याशी बोलून आपला मुक्काम आईजवळच हलवला होता.आई जास्त दिवस काढणार नाही असं तिला डॉक्टरने सांगीतल्याने तिने तसा निर्णय घेतला होता.

तिची आई गेल्यावर मी वैशालीला भेटायला तिच्या घरी गेलो होतो.गप्पा मारीत असताना,तिने आपल्या अंगावर लोकरीची रंगीत शाल घेतली होती,
ती डोळ्यात भरण्यासारखी रंगीबेरंगी लोकरीची शाल पाहून मी त्या शालीची प्रशंसा केली.चेहर्‍यावर आनंद आणून मला वैशाली म्हणाली,
“अलीकडेच माझी आई गेली.जाताना मागे कसले पुरस्कार,कसली मोठी धनसंपत्ती किंवा सफलतेची कसलीही यादगारी ती ठेवून गेली नाही. असल्या गोष्टी ठेवून जाणं हे जगात एखाद्याच्या जीवनाचं सार समजलं जातं.

नाही,माझी आई काहीही ठेवून गेली असेल तर ते आम्हाला ठेवून गेली, आम्हाला मागे सोडून गेली.आणि काही ठेवून गेली असेल तर तिच्या प्रेमाच्या आठवणी,थोडसं तिच्याबद्दल, ते सुद्धा आम्हाला आठवण करून द्यायला की आम्ही कोण आहो ते. आमची आई जिथे झोपायची तिथे तिच्या जवळपास असलेल्या तिच्या कपाटात,किंवा टेबलाच्या खणात पसरलेल्या कागदाच्या खाली,तिने काळजीपूर्वक तिच्या भविष्यातल्या स्वप्नांच्या आठवणी नीट जपून ठेवल्या होत्या.एके ठिकाणी माझ्या लहानपणी माझ्यासाठी विणलेली लोकरी रंगीत शाल मी पाहिली. तिच ही आत्ता मी माझ्या अंगावर घेतली आहे.शिवाय मी पाठवलेली पोस्टकार्ड्स,पत्रं तिने जमा करून ठेवली होती.काही फोटोंच्या मागे,नावं,तारीख,भेटी दिलेल्या जागा लिहून ठेवल्या होत्या.आमच्या जीवनातल्या आठवणी त्यात होत्या.आम्ही तिला पोस्टाने पाठवून दिले्ली तिच्या जन्मदिवसाची शुभेच्छाची कार्डं,तिला दिलेल्या गिप्ट्स, सर्व तिने जपून ठेवल्या होत्या.
एका खणात अठ्ठावन वर्षापूर्वी तिच्या लग्नाला पाठवलेले शुभसंदेश होते त्यात आम्हाला शाळेत मिळालेली बक्षीसं आणि आमच्या करीअर मधल्या लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या आठवणींच्या नोंदी होत्या.

एखाद्या पडलेल्या इमारतीच्या मलब्यामधे काही मिळावं तसा माझ्या आईचा अठ्याहत्तर वर्षांचा इतिहास त्यात होता. एखाद्या उत्खननाच्यावेळी प्रत्येक लहानसहान गोष्टीची पहाणी जशी मोठ्या चित्रावर प्रकाश टाकते तसं झालं होतं.प्रत्येक उलगड्यात माझ्या आईत आणि तिच्या जगात मला काही तरी नवीन दिसायला लागलं होतं.तिच्या त्या जगात आम्ही केंद्र स्थानी होतो.

माझा भाऊ,माझी बहिणी,आमचं बालपण हे सर्व आमच्या आईच्या प्रेमाच्या शालीत हळुवारपणे लपेटलं गेलं होतं.माझी आई ह्या जगात आम्हाला मार्गदर्शन करायला नसणार तेव्हा आम्ही त्या शालीचा एक एक धागा भुतकाळातून भविष्यकाळात विसवून काढावा म्हणून जणू ते तिचं प्रेम वाट पहात होतं.

म्हणूनच मी मानते की ह्या मुल्यवान बाबी,दिसायाला जरी यःकश्चीत असल्या तरी,ते माणुसकीचे छोटे,मोठे अंश असतात.आणि छान जीवन जगल्याचं ते अनमान असतं.ह्या गजबजलेल्या जगात सनसनाटीच्या बातम्या पसरत असतात.परंतु,ह्या असल्या बिनबोभाटलेल्या,सौम्य असलेल्या गोष्टी गवसल्यावर त्या आपला सांभाळ करीत असतात.
हे लहानसे खजिने म्हणजेच जीवनात तिने दिलेलं योगदान म्हटलं पाहिजे. त्याचंच परिवर्तन आपल्यावर होत असतं.एकमेकावर प्रेम करण्याचा ते एक साधन असतं.

माझ्या आईसाठी,आम्ही तिचे प्रयोजन होतो,अर्थ होतो.आमची आई होण्यात तिचे ते पुरस्कार होते,तिचं अभिनंदन होतं.ह्या छोट्या छोट्या आठवणी घेऊन ती तिच्या भुतकाळाचं गाठोडं म्हणून जवळ बाळगत राहिली आणि नंतर आपला वारसा म्हणून ते गाठोडं आमच्या स्वाधीन करून गेली.
तिच्या पश्चात हा खजिना सापडल्याने जणू ती वाट पहात असलेल्या तिच्या मिठीत मी आहे असं मला वाटायला लागलं.

आपल्यापैकी बरेच काही असे आहेत की जे आजुबाजूच्या समुदाया समोर हावभावाचा अभिनय निर्माण करू शकतात.
पण बरेचसे आपण आपल्या छोट्याश्या दुनियेत दिवस गुजारतो.परंतु, ह्या छोट्याश्या दुनियेतच एकमेकाशी प्रेमाचे दुवे निर्माण करायला संधी प्राप्त होत असते आणि शेवटी त्यामुळेच ते दुवे आपल्याला एकत्रीत करीत असतात.

मला नेहमीच वाटत असतं की,दयाळू राहून,प्रेमळ राहून,दर दिवशी येणार्‍या अगदी साध्या सरळ क्षणांतून आपल्या भोवती असलेल्या ह्या मोठ्या विश्वाला आपण आकार देत असतो.आपण कोणही असलो आणि आपण कुठेही रहात असलो तरी,शेवटी आपल्यातला दुवा काय साधत असतं हेच खरं.
म्हणून मला वाटत असतं की,मला माझ्या आईने दिलेल्या ह्या विणलेल्या शालीतल्या प्रत्येक धाग्यातून माझी आई हळुवारपणे त्या शालीत तिचं प्रेम घट्ट धरून ठेवीत असावी.”

वैशालीचा निरोप घेऊन घरी गेल्यावर रात्री झोप येण्यापूर्वी मी पलंगावर पडलो असताना माझ्या डोळ्यासमोर, वैशालीच्या आईने विणलेली, ती लोकरीची रंगीत शाल येत होती.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, September 27, 2011

मी एक क्षुल्लक फूल आहे.



नयनातून तुझ्या आलेला
अश्रू समजून तू मला
कां बरं ठिपकू दिलीस
तुझ्या प्रेमाचा मी मोती
कां बरं मातीमोल केलीस

फुलबागेत न फुललेलं
मी एक क्षुल्लक फूल आहे
कसं असलं तरी
बहरलेली मी एक भूल आहे
तू मला फुलवून स्वतःच
कां बरं विसरून गेलीस
अश्रू समजून तू मला
कां बरं ठिपकू दिलीस

नजरचुकीने मी इथे आलो बघ
माहीत होतं हे नाही माझे जग
गाढ झोपलेल्या मला
कां बरं जागवून गेलीस
अश्रू समजून तू मला
कां बरं ठिपकू दिलीस

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, September 24, 2011

लिखीत शब्दांमधली क्षमता.

“माझ्या हृदयापासून मला माहित झालं आहे की हे जीवन सुंदर आहे आणि ते जगण्यालायक आहे.”

द्त्तात्रयाला, मी आणि काही त्याला दत्या म्हणतो इतर दत्ताजी म्हणतात. द्त्या लहानपणापासून फार हुशार होता.तो रहात होता त्या कोकणातल्या गावात शाळा नव्हती.म्हणून त्याच्या आजोबानी त्याला सावंतवाडीत शिकायला पाठवलं.तिकडे तो सहावी पर्यंत शिकला आणि नंतर रत्नागीरीला आपल्या आतेकडे रहायला गेला आणि तिथून त्याने मॅट्रिकची परिक्षा दिली.
दत्या घरचा श्रीमंत.माड,पोफळीमुळे नारळ आणि सुपारीचं उत्पन्न भरपूर यायचं.आपण शेतीवर अवलंबून राहिल्याने जास्त शिकलो नाही तरी आपल्या नातवंडानी भरपूर शिकावं असं त्याच्या आजोबाना मनोमनी वाटायचं.

द्त्या मॅट्रिक झाल्यावर रत्नागीरीच्या कॉलेजात गेला नाही.तो आपल्या गावात आला आणि गावतल्या काही प्रतिष्ठीत व्यक्तीना हाताशी धरून सहावी पर्यंत शिकवायची शाळा काढली.बरीच वर्ष तो ती शाळा चालवत होता.

त्याचा मुलगा पंढरीनाथ,मी त्याला पंड्या म्हणायचो काही त्याला पंढरी म्हणतात,वडीलांच्या शाळेत दहावी पर्यंत शिकला.पंड्या मोठा होईपर्यंत दत्याने सहावीची शाळा दहावीपर्यंत शिकण्यालायक केली होती.पंड्या दहावी संपल्यावर पुढच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी मुंबईला आपल्या एका नातेवाईकाकडे येऊन राहिला.बीए पर्यंत शिकून झाल्यावर तो नोकरी करणार होता.पण त्याच्या वडीलानी त्याला गावाला बोलावून घेतलं आणि
गावातल्या शाळेतला कारभार पहायला सांगीतलं.

पंड्या लेखन करण्यात खूप हुशार होता.त्याच्या कविता मधून मधून मुंबईच्या काही मासिकात छापायला यायच्या.
किसन ह्या टोपण नावाखाली तो कविता लिहायचा.छोटे लेख आणि निबंध पण मासिकातून द्यायचा.

पंड्याची ही उपजत आवड, त्याने गावातल्या शाळेत शिकायला येणार्‍या आणि ज्यांच्यामधे लेखनाची आवड असेल त्यांना हुडकून काढून, नियमीत शाळेच्या अभ्यासाच्या बाहेर त्यांची आवड विकसीत करायची एक शक्कल काढली.आणि अशा बर्‍याच मुलांच्या मनात लेखनाची आवड रुजवली.
आपल्या वडीलाना भेटण्यासाठी म्हणून आणि गावातली शाळा दाखवण्यासाठी मला तो एकदा आग्रहाने त्याच्या गावाला घेऊन गेला होता.
त्याची शाळ पाहून मला खूप आनंद झाला.

“ज्यांना काहीतरी उपजतच लिहायची आवड आहे अशाना लेखक होण्यासाठी लेखनात उत्तेजन देऊन लेख किंवा कविता एव्हड्या लहान वयात त्यांच्याकडून लिहून घेण्याची कल्पना तुला कशी सुचली?”
असा मी पंढरीला सरळ सरळ प्रश्न केला.

लेखनातून लिहिल्या गेलेल्या शब्दांच्या क्षमते विषयी मला नेहमीच खास असं वाटतं.
तरूण विद्यार्थ्यांबरोबर, ह्या शब्दांतल्या क्षमतेची भागीदारी करण्यात, माझे दिवस निघून जातात.
मी दहावीतल्या विद्यार्थ्यांना शिकवतो.हे सर्व विद्या्र्थी वृत्तांत लिहितात,
आठवणी लिहितात.त्यांच्या लेखनात, मी,माझा वर्ग आणि मुख्य म्हणजे ते स्वतः, वाटेकरी असतात.
लेखन एव्हडं जोरदार असतं की,मीही त्यांच्याबरोबर लिहिण्यात भाग घेतो, कारण त्यामुळे त्यांचा लेखनाचा विकास होत असताना ह्या सामुहीक प्रक्रियेत मी एकटा पडत नाही.
आठवणी लिहायच्या झाल्यास “त्यात काय हरकत आहे”-म्हणजे लिहायला,
असं समजून लिहिलं जातं.आपल्या जीवनात येत असलेल्या घटनांमधून अर्थ शोधून काढण्याचा तो प्रयत्न असतो. आणि असं करताना आपलाच सन्मान राखण्याचाही प्रयत्न असतो.

असा हा अर्थ शोधून काढण्याच्या प्रक्रियेत डोळे अश्रूनी थपथपतात किंवा डोळे हसून हसून ओलेही होतात,ह्या घटना,व्यक्ती किंवा स्थानं आठवणी म्हणून मेंदूत कोरल्या जातात.त्यामुळे रोजचा अनुभव संपन्न होतो.

पाऊस पडून गेल्यावर,मागच्या घराच्या परसात,एखाद्या डबक्यात पाणी साचल्यावर माझे आजोबा कागदाच्या होड्या बनवून मला जवळ बोलावून घ्यायचे.आणि माझ्यासाठी जादुने भरलेली प्रेमळ दुनिया निर्माण करायचे. त्यावेळी त्यांच्या तोंडून आलेले शब्द,उद्गार मी माझ्या आठवणीतून कागदावर लिहून काढल्यावर, ते शब्द वाचता वाचता त्या वातावरणात मला खोलवर नेऊन सोडतात.

जेव्हा मी माझ्याच विद्यार्थ्यांचं लिहिलेलं एखादं लेखन वाचतो,ते इतकं जबरं असतं,की माझ्या हृदयाला पीळ पडतो.मी असा कोण म्हणून आहे? की त्यांनी लिहिलेल्या त्या लेखनाला मला न्याय द्यावा लागावा.असं माझ्या मनात आल्याशिवाय रहात नाही.तसं करायला माझ्या जवळ शब्द उरत नाहीत. परंतु,त्या विद्यार्थी लेखकाच्या डोळ्यात मी पाहू शकतो आणि क्षणभरात माणूसजातीची आणि त्यांच्या विचारशक्तीची प्रशंसा करावी तेव्हडी
थोडीच असं मला वाटू लागतं.

एखाद्याने लेखन केल्यानंतर काही दिवसानी,आम्ही दोघं बसून,त्या लेखनात सुधारणा करतो,त्या लेखनाला उजाळा देतो,त्या लेखनावर ध्यान द्यायला पात्रता आलेली असते म्हणून त्याचं संपादन करतो,परंतु,खरंच सांगायचं झाल्यास त्या विद्यार्थी-लेखकाच्या डोळ्यात पहाताच क्षणी त्या विद्यार्थ्याची,धारीष्ट करून त्याने माझ्या बरोबर घेतलेल्या वाट्याची, आणि मला असं करू देण्याच्या त्याच्या समर्थनाची, माझ्याकडून नक्कीच प्रशंसा होत
असते.

हे लिखीत शब्द एकमेकाच्या संबंधामधे एव्हडं जाळं विणून ठेवतात की, प्रत्यक्ष संभाषणातून ते साध्य झालं असतं असं मला वाटत नाही.
माझ्या स्वतःच्या लेखनातून माझ्या आठवणी आणि माझ्या भावना मी इतरांना वाटत असतो. तसं बहुदा इतर वेळी माझ्याकडून होत नाही.
मला सांगा,मला वाटणारा माझ्या आजीबद्दलचा अनुभव सांगण्यासाठी माझी आजी निर्वतल्याची बातचीत करून त्या अनुभवाला न्याय देता येईल की एखाद्या सूंदर कवितेतून सफाईदारपणे लिहिल्याने जास्त न्याय देता येईल?
माझ्या वर्गात माझ्या विद्यार्थ्यांना,
“माझी आजी गेली.मला तिची खूप आठवण येते हे तुम्हाला सांगायचं आहे”
असं सांगण्याऐवजी मी माझ्या आजीवर लिहिलेली माझी कविता वाचून त्यांना दाखवली.

हात माझ्या आजीचा धरूनी
वाटे देवळातून यावे फिरूनी

लहान पडती पाऊले माझी
तशीच चाले माझी आजी

कधी न करे ती चालण्यात घाई
माझ्याच कलाने ती सदैव घेई

आवडे मजला आजी बरोबर चालाया
तिची न माझी नजर पडे फुले पहाया

बाबा अन आई करीती घाई कामावर जाण्या
माझी आजी घेऊन येई खाऊ मला भरविण्य़ा
देवाजीचे उपकार झाले आजीला बनविण्य़ा

प्रत्येक वेळेला आपलं लेखन, इतरना वाटून, एकमेकातला दुवा,माणूस म्हणून,गहिरा होत जातो.
वर्षाच्या अखेरीस,मी आणि माझे विद्यार्थी जेव्हडे एकमेकाना समजू शकतो तेव्हडं इतरांशी होत नाही.आम्हाला जीवनाच्या रोजच्या मार्गात,धाडस,
मनोहरता आणि करमणुक दिसत रहाते.
शाळेच्या शेवटच्या वर्षात,एकमेकातलं नातं दुरावलं जाणार याची खंत मला एव्हडी भासते की विचारू नका.पण पुढे पाऊल टाकावं लागतं.कारण त्याशिवाय गत्यंतरच नसतं. शिवाय माहित असतं की,नव्या वर्षात आणखी नवीन विद्यार्थी येणार आहेत ज्यांबरोबर मी पुन्हा लिखीत शब्दांच्या जादूचं आणि मनोहरतेचं वाटप करणार आहे.

मला माहित आहे की मी स्वतः लिहित रहाणार आहे.आणि असं करताना माझ्या हृदयापासून मला माहित झालं आहे की हे जीवन सुदर आहे आणि ते जगण्यालायक आहे.”

हे सर्व पंढरीकडून ऐकून झाल्यावर आम्ही दोघं दत्तात्रयाला भेटायला त्याच्या खोलीत गेलो.मला दत्तात्रय बराच थकलेला दिसला.मी निघताना त्याला म्हणालो,
“खरंच तू नशिबवान आहेस.गावात शाळा बांधून तू केलेलं समाज कार्य तुझा पंढरी,ते पुढे चालवीत आहे हे पाहून खरोखरच तुम्हा दोघांची कितीही वाखाणणी केली तरी ती कमीच होईल.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, September 21, 2011

टकमक पाही.

“माझ्या सर्वात लहान मुलाच्या, तो गाढ झोपला असताना,चेहर्‍याकडे निरखून बघायला मला आवडायचं.हळु हळु त्याचा चेहरा बदलणार आहे.
एकदिवस चेहर्‍यावर दाढी येऊन तो चेहरा खडबडीत होणार आहे,नंतर तो सुरकुतणारही आहे.आणि त्यानंतरचं विचारकरणंही सहन होत नव्हतं.”

अशोकला मी खुपदा पाहिलंय,साधे कांदे किंवा बटाटे विकत घेत असला तरी एक एक कांदा किंवा एक एक बटाटा हातात घेऊन वरून खालून आजुबाजू पाहून योग्य वाटल्यास तो निवडून घेऊन वजनाच्या काट्यावर टाकायचा. पहिल्यांदा पाहायची कुठचीही गोष्ट तो अगदी निरखून पहायचा.ही टकमक पहायची त्याची सवय जरा निराळीच वाटायची.

ह्याच त्याच्या सवयीवर मी अशोकशी त्यादिवशी बोलत होतो.
मी त्याला म्हणालो,
“एकदा आपण दोघे अंधेरीच्या मासळी बाजारात मासळी घ्यायला गेलो होतो.नेहमीच्या आपल्या कोळणीकडून आपण पापलेटाचा सौदा करीत होतो.
त्या कोळणीने दिलेली दोन पापलेटं मी माझ्या पिशवीत टाकली.तू सुद्धा दोन पापलेटं घेतलीस.पण त्यासाठी तिला तू टोपलीतली सर्व पापलेटं दाखवायला सांगीतलीस.ती तुला जीव तोडून सांगत होती,
“अरे दादा! सर्व पापलेटं ताज्या पाण्याची आहेत.”
एक दोन पापलेटं तिने मास्याच्या गळ्याखाली दाबून त्यातून पांढरं पाणी काढूनही तुला दाखवलं.पण तू शेवटी तुला हवी असलेली दोन पापलेटं
तुझ्या हातात वर ऊचलून वरून खालून,चारीही बाजूने न्याहाळून मग पिशवीत टाकलीस.
तुला माहित आहे? पुढच्या रविवारी मासे आणायला मी गेलो असताना ती कोळीण मला काय म्हणाली,
“तुमच्या बरोबर आलेला दादा भारीच चोखट-म्हणजे चौकस- माणूस होता.माझ्यावर त्याचा विश्वास नाही.”

मी हे सर्व अशोकला सांगीतल्यावर तो दोन मिनीटं खोखो हसत राहिला. आवंढा गिळून मला म्हणाला,
“मला माहित आहे की हे असं टकमक पहाणं शिष्टाचारात बसत नाही, तरीपण मला टक लावून पहायला आवडतं.
खरंतर टक लावून पहाणं,अनिमिष दृष्टी ठेवून पहाणं,अगदी निरखून पहाणं ह्याबद्दल मला विशेष वाटतं.असं करणं कधी कधी असभ्य वाटतं हे ही खरं आहे.इतरांसारखंच माझ्या आईनेसुद्धा बरेच वेळा मला सांगीतलं होतं की असं करणं अनपेक्षित आणि धक्कादायक दिसतं.पण मला नेहमीच वाटतं की,एखादी गोष्ट नीट समजण्यासाठी अगदी जवळूनच पहायला हवी.
मी वाचतो,ऐकतो चर्चा करतो आणि अर्थात लिहितोही.पण हे सर्व करण्यापूर्वी पहाण्याची क्रिया होत असते.

माझा हा दूरवरचा टक लावून पहाण्याचा पेशा,ज्याला कधी कधी दिवास्वप्न म्हटलं जातं,शाळेत शिकत असताना गणिताच्या वर्गात, खिडकीतून कटाक्षाने बाहेर बघण्याच्या सवयीतून कदाचीत झाला असावा. खिडकीतून दिसणार्‍या बाहेरच्या खेळाच्या मैदानाच्या कडेकडेला, झोपाळ्यांच्या जवळ लावलेल्या,काहीशा जोमाने उगवलेल्या झुडपांच्या लयबद्ध डोलण्याकडे पहाण्य़ात मी मोहित होत होतो.
बेरीज,गुणाकार,भागाकारापेक्षा हे पहाण्यात माझ्या मनावर सक्ती होत असावी.खरंच सांगायचं झाल्यास माझ्या ह्या दिवास्वप्नाच्या सवयीमुळे माझ्या आईने मला नंतर दुसर्‍या शाळेत घातलं होतं.

कोकणातलं आमचं घर,अवतिभोवतीच्या भात-शेताच्या मळ्याजवळ असल्याने,माझ्या खोलीतून एका खिडकीमधून गुरं चरताना दिसायची. तासनतास खिडकीच्या चौकडीवर माझी हनुवटी स्थिर ठेवून,जोमाने वाढलेल्या उंच उंच गवतामधून वारा आपली बोटं घालून गवत पिंजारताना मी टक लावून पहात असायचो. पावसाच्या दिवसात नदीवरून येणारे काळेकुट्ट ढग वेगाने क्षितीजाजवळ जाताना मी मन लावून पहायचो.
खिडकीतून टक लावून पहाण्यात मला मिळणारा हा दिलासा मला वाटतं माझ्या बालपणातून आणि नंतर तरूणपणातही चालू राहिला.ते देखावे माझ्या कल्पनेत आणि माझ्या हृदयात कोरले जाऊन बरीच वर्ष राहिले.

ह्या टक लावून पहाण्याचे अनेक क्षण होते.एकदा सकाळी मी रानातून फिरत जात असताना,डोंगराच्या माथ्यावर येऊन थबकलो.एका झाडाच्या बुंध्यावर कुणीतरी ह्रुदय-बाणाची आकृती कोरली होती.आणि त्यात चमकणारा रंग भरला होता.तो प्रकार माझ्या नजरेत भरला.थोडावेळ तिथेच उभा राहून मी एकटक त्याच्याकडे पहात राहिलो. आणखी पुढे फिरत जात असताना तो बुंध्यावरचा रंग भरलेला चमकणारा पॅच मला तहानेसाठी घेतलेल्या बाटली सारखा वाटत होता.ही मनावर झालेली छाप मी दिवसभर बाळगून होतो.

पहाण्याच्या क्रियेकडे लक्ष दिल्यास ही क्रिया सर्वांना करता येतं.त्याची सवय ठेवल्यास तो एक टक लावून पहाण्यातला भाग होईल.जशी वर्षं निघून गेली तशी मी माझ्या ह्या टक लावून पहाण्याच्या निपुणतेला थोडं दमाने घेतलं आहे.
कामाचा रगाडा निभावून नेण्यात विलंब होत असल्याने तसं करण्याची आवश्यकता भासू लागली.ह्या घाईगर्दीच्या जीवनात समोर येईल ती गोष्ट निरखून पहाण्याच्या सवयीमुळे एखाद्या कार्यक्रमला किंवा एखाद्या सभेला जायला विलंब व्हायला लागला.

एक दिवशी मी माझी फटफटी काढून,नेहमीप्रमाणे घाईघाईत जात असताना,वाटेत पाचसहा रानटी बदकं रस्त्याच्या एका बाजुकडून दुसर्‍या बाजुला जाण्याच्या प्रयत्नात मला आडवी आली.एरव्ही मी गाडी थांबवून त्या बदकांच्या लयीत चालण्याच्या आणि कर्कश पण तालबद्द ओरडण्याच्या क्रियेकडे निरखून बघण्यासाठी रस्त्यावर थांबून बघत राहिलो असतो.पण माझ्या मुलाच्या खेळण्यातलं बॅट्रीवर चालणारं बदक पाहिल्याने मला त्या
चालण्यातली लय माहित होती.त्यामुळे चटकन निघून गेलो.

अलीकडे बर्‍याच गोष्टी पहाण्यात येतात.आजुबाजूचं जग प्रतिमानी भरलेलं आहे.माझ्या अंगावरच्या टी-शर्टवर लिहिलेलं ब्रिद-वाक्य,माझ्या पत्नीच्या उजव्या हातावर गोंदलेलं पिंपळाचं इवलुसं पान,रात्रीचं निरभ्र आकाश तो माझ्या हातातला सेल-फोन वगैरे.
मी लेखक असल्याने एक टक पहाण्यासाठी दमाने घेण्याची मला सवयच झाली आहे. त्यामुळे जे काही मी बघत असतो,त्यातून अर्थ काढायला मी प्रवृत्त होतो.माझ्या सर्वात लहान मुलाच्या, तो गाढ झोपला असताना, चेहर्‍याकडे निरखून बघायला मला आवडायचं. हळु हळु त्याचा चेहरा बदलणार आहे.एकदिवस चेहर्‍यावर दाढी येऊन तो चेहरा खडबडीत होणार आहे,नंतर तो सुरकुतणारही आहे.आणि त्यानंतरचं विचारकरणंही सहन होत नव्हतं.
मी जे टक लावून पहातो ते माझ्या स्मृतीत ठेवतो.त्यामुळे जे टिकून रहाणार नाही तेही मी धरून ठेवू शकतो.”

अशोककडून हे त्याचं सर्व ऐकल्यावर मला त्याची कीव आली.
मी त्याला म्हणालो,
“साधी टकमक पहाण्याची तुझी सवय माझ्या नजरेत दिसली.पण त्याची पार्श्वभूमी काय ते तुझ्याकडून ऐकल्यावर मला खूपच बरं वाटलं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, September 18, 2011

झाडांच्या पानांचा बलवर्धक गुण.


“जीवन सुंदर आहे आणि ते जास्त सुंदर आहे कारण त्या पानांच्या ढीगार्‍यामुळे.
असं मला सतत वाटत होतं.”

पावसाळ्याच्या दिवसात कोकणात जायला मला नेहमीच आवडतं.ह्यावेळी मी माझ्या मावसभावाच्या गावी गेलो होतो.पाऊस यायला अजून वेळ होता. पण रोज संध्याकाळी नदीवरून जोराचा वारा आल्याने सगळं वातावरण थंड होतं.गरम गरम चहा घेत आम्ही मागच्यादारी गप्पा मारीत बसलो होतो. गप्पा मारीत असताना एकाएकी आणखी जोराचा वारा येऊन सगळी झाडं हलायला लागली.पानांची सळसळ ऐकायला आली.आणि काहीवेळाने
जमनीवर एव्हडी पान पडली की खालची जमीनच दिसेना.आम्ही घरात आलो.थोड्यावेळाने बाहेर जाऊन पाहिल्यावर मला कल्पना सुचली की ही
सर्व पानं गोळा करून एका कोपर्‍यात त्याचा ढीग करून ठेवावा.मी माझ्या भावाला तसं म्हणताच तो लागलीच कबूल झाला.पानांना सुंदर वास येत
होता.सर्व पानं जमा केल्यावर त्या एकत्रीत पानांचा वासही मिसळलेला वाटला.त्या वासाबाबत मी माझ्या भावाला सहज बोललो.

माझा भाऊ मला म्हणाला,
“ह्या वासावरून मला माझी एक जुनी आठवण आली.
मला आठवतं,तो माझा वाईट दिवस होता.म्हणून मी जरा बाहेर जाऊन यावं असं मनात आणून मागच्या परसात गेलो.म्हटलं,माझ्यामधे आणि
माझ्या रोजच्या कटकटीमधे थोडी दूरी आणावी.

परसात खूपच पानं पडली होती.पावसाळा येण्यापूर्वी पंधराएक दिवस कोकणात नेहमीच जोराचे वादळी वारे वहात असतात.त्यामुळे झाडांच्या
बर्‍याचश्या पानांची पडझड होत असते.आंब्याच्या,चिंचेच्या,फणसाच्या,उंच सोनचाफाच्या,जांभळाच्या,झाडांची पानं हमखास खाली जमीनीवर जमा
होतात.

म्हटलं, सर्व पानं जमा करावीत.आणि एका कोपर्‍यात त्याचा ढीग करून ठेवावा.तेव्हडाच व्यायाम होईल आणि बरोबर परसाची साफसफाईही होईल. माडांच्या झापांचे हिर काढून बनवलेली झाडू आणि एक मोठं गोणपाट बरोबर घेऊन कामाला लागलो.मला हे पावसाळ्यापूर्वीचे दिवस नेहमीच आवडतात.ढगाआडून येणार्‍या उन्हात काम करायला मला आवडतं. उन्हाळ्यात निरभ्र असलेलं आकाश,ह्या दिवसात ढगाळ होतं. लवकरच पाऊस येणार आहे त्याची ही जणू सुचनाच असते. आपला उत्साहही वाढतो.

गोणपाटावर जमा करून ठेवलेल्या निरनीराळ्या झाडांच्या एकत्रीत झालेल्या पानाना एक निराळाच सुवास येत होता.
का कुणास ठाऊक सहजच एक भन्नाड कल्पना मनात आली. हा पानांचा ढीग पसरवून आपण त्यात चक्क लोळावं.आणि सुगंधात धुंद व्हावं.

भन्नाड कल्पना एव्हड्यासाठीच म्हटलं कारण,ते दिवस असे होते की माझे केस पिकायला लागले होते.माझ्या वयाकडे पाहून पानात लोळण्याच्या
माझ्या कल्पनेला कुणी पोरकटपणा म्हणायचा.पण मला पहायला आजुबाजूला कुणी नव्हतं.त्यामुळे मी हातपाय पसरून चक्क उताणा पडून
आकाशाकडे बघत होतो.अगदी सुरवातीच्या क्षणापासून मस्त वाटत होतं. त्या पानाच्या ढीगार्‍यात वाळून पडलेली सोनचाफ्याची, जास्वंदीची, ओवळीची फुलंही पडली होती.पानांबरोबर त्या फुलांचा सुगंध मिसळून वास घ्यायला खूपच मजा येत होती.

त्या वयात तसा प्रकृतीने मी बराच वजनदार होतो.माझे खांदे आणि कुल्हाचा भाग त्या ढीगावर विशेष वजन पाडून,गोणपाटाच्या खालची जमीन मला लागत होती हे ही लक्षात येत होतं.पण माझे बाहू आणि तंगड्या वजन विरहीत आणि लोंबकळत आहेत असं वाटत होतं.अगदी शांत आणि हालचाल नकरता पडून होतो तोपर्यंत सर्व काही स्थीर वाटत होतं.आणि धगधगत्या चुलीत जळणारी लाकडं जशी चुरचुरून आवाज करतात तसं माझ्या श्वासामुळे काही वाळलेली पानं आवाज करीत होती.

मी माझे डोळे सताड उघडे ठेवून वर आकाशाकडे पहात असताना कृमी-किटक उडत असताना दिसत होते.कदाचीत लवकरच येणार्‍या पावसाची त्यांना जाणीव झाली असल्यामुळे असं होत असेल असं मला त्यावेळी वाटलं.
जमलेल्या पक्षांकडून हळूवार आवाज येत होते.जसे राजकारणी लोक भाषण देतात,जसे वसंत ऋतुत पक्षी गलबला करतात तसा तो आवाज नव्हता. एखादं कुटूंब जमून रात्री जेवताना हळुवार बोलत जेवत असतात तसा काहीसा तो आवाज होता.

थेट वीसएक मिनीटं मी काही हालचाल न करता तसा पडून होतो.आणि शेवटी घरात जावं असं वाटायला लागलं.त्या ढीगार्‍यातून मी हळूच उठलो. माझ्या शरीराचा आणि हातापायाची संपूर्ण छाप त्या पानाच्या ढीगार्‍यात मागे वळून पाहिल्यावर दिसत होती.बर्फात लोळून उठल्यावर जसं दिसतं अगदी तसं.मला बरं वाटलं.अगदी साफ बरं वाटलं नाही पण नक्कीच बरं वाटलं.

त्या पानांच्या ढीगार्‍यावरची ती छाप पाहून मला क्षणभर वाटलं की माझ्या सर्व कटकटी माझ्या पासून दूरावून त्या पानांच्या ढीगार्‍यात पडून आहेत.
घरात आल्यावर माझ्या टेबलावर बसून मी लिहायला लागलो तेव्हा माझ्या डोक्यातल्या केसातून तो वास अजून मला येत होता.
जीवन सुंदर आहे आणि ते जास्त सुंदर आहे कारण त्या पानांच्या ढीगार्‍यामुळे.
असं मला सतत वाटत होतं.”

हे सारं ऐकून मी माझ्या भावाला म्हणालो,
“निसर्ग स्वतःच सुंदर आहे.आपल्या डोळ्यातून ते सौन्दर्य आपल्याला दिसू लागतं.एव्हडंच नव्हे तर आपल्या इतर इंद्रियज्ञानातून निसर्गाची इतर
अंग दिसतात,भासतात. फक्त तसं व्हायला आपल्याकडे क्षमता असायला हवी.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, September 15, 2011

चालण्यातलं पथ्य


“रोजच्या जीवनातल्या घाईगर्दीच्या व्यापात चालण्याला अग्रतेच्या यादीत अगदी खालचा नंबर दिला जातो.”

माझा पुतण्या राजीव ह्याने अर्नाळ्याजवळ फार्महाऊस घेऊन खूप वर्षं झाली. मुख्य कारण असं की, त्याने ते फार्महाऊस त्याच्या आईवडीलांसाठी घेतलं आहे.शहरात राहून ते ह्या वयावर कंटाळायला लागले आहेत.राजीवला कमाईसाठी शहरात रहाणं भागच आहे.तो फार्महाऊसवर जाऊन येऊन असतो.काही दिवस फार्महाऊसवर येऊन रहाण्यासाठी माझा भाऊ रघुनाथ केव्हापासून माझ्या मागे लागला होता.माझा वीक-पॉइन्ट म्हणजे
नियमीतपणे रोज पायी चालायला जाणं.आज कित्येक वर्षं मी ते करीत आलो आहे.

रघुनाथचं पण तेच आहे.तो तर कोकणात असताना डोंगर चढून जायचा. असे किती डोंगर त्याने पालथे घातले असतील कुणास ठाऊक.आता ह्यावयात तो आणि त्याची बायको शहरात मुलाकडे येऊन राहिली आहेत. मुलानेच त्यांना आपल्या घरी आणलं.दोघेही शहरी जीवनाला कंटाळतात म्हणूनच अलीकडे त्याने फार्महाऊसवर जाऊन रहाण्यासाठी त्यांना सांगीतलं.

मुद्दाम वेळ काढून अलीकडेच मी रघुनाथकडे रहायला गेलो होतो. चालण्याबाबत आम्हा दोघांचं सूत जमत असल्याने माझाही वेळ मजेत जात होता. रघुनाथ रहातो त्या जागेसभोवतीचा परिसर खरोखरच रमणीय होता.भरपूर झाडी आणि हिरवे गार शेताचे मळे आणि मधूनच एखादं कौलारू घर दिसायचं.डोंगराची रांग दिसली असती तर अगदी कोकणात गेल्यासारखं वाटलं असतं.

एक दिवस आम्ही दोघे सकाळीच उठून चालायला गेलो होतो.
मी रघुनाथला म्हणालो,
“तू खरोखरंच लकी आहेस.ह्या वयात तुला तुझ्या मुलाने सुखात रहायला छान फार्महाऊस घेऊन दिलं आहे.”
हे ऐकून रघुनाथला अर्थातच खूप आनंद झाला.

मला म्हणाला,
“मुख्य म्हणजे मला कोकणात चालायला मिळायचं त्यासारखं इथे भरपूर चालायला मिळतं त्याचा मला खूपच आनंद होतो.चालणं हा माझा एक मॅडनेस आहेस असं म्हटलस तरी चालेल.”

मी रघुनाथला म्हणालो,
“मला पण चालायला आवडतं.पण तुझं चालणं भारीच आहे.म्हणून तू तुझी प्रकृती चांगली ठेवून आहेस.”
रघुनाथला चालणं ह्या विषयावर मी एक ट्रिगरच दिली.

मला म्हणाला,
“पायी चालण्यामधल्या क्षमतेचं मला विशेष वाटतं.मात्र क्षमतेमधून चालण्याच्या प्रकाराबद्दल नव्हे.अर्थात त्यामधेसुद्धा काही उपयोगी गोष्टी आहेत म्हणा.म्हणूनच म्हणतो,नुसतंच चालल्यामुळे जी मजबूती येते त्याबद्दल मला विशेष वाटतं.

मी जेव्हा रागावलेला असतो,निराश असतो किंवा माझं मन दुःखी होतं तेव्हा मी चालतो.तसंच मी जेव्हा खुशीत असतो,चैतन्यपूर्ण असतो किंवा चहा-कॉफी पिऊन वैतागतो तेव्हा चालतो.मी चालतो जेव्हा मी दमलेला असतो आणि जेव्हा मला बसून बसून खूप वेळ झालेला असतो आणि माझी कार्यशक्ती दबली गेलेली असते तेव्हा मी चालतो.जिथून सुरवात केली त्या जागी परत आल्यावर माझी मानसिकता,माझ्या भावना आणि माझं शरीर पूर्वस्थितीला येऊन पोहचतं.खरंच,पायी चालण्याने जीवनात एक प्रकारचं संतुलन येतं.मन प्रसन्न होण्यासाठी आणि शांत होण्यासाठी केलेला प्रयत्न अशी मी चालण्याची गणना करतो.

चालत राहिल्याने विचार करायला मला वेळ मिळतो,जागेपणी स्वप्न बघायला वेळ मिळतो आणि वाटेत दिसणार्‍या उमलून येणार्‍या फुलांच्या ताटव्यांकडे निरखून पहायला वेळ मिळतो.गाडीत बसून बाहेर पहात असताना ज्या गोष्टी दृष्टी आड होत असतात त्या गोष्टी मला त्यावेळी आठवण करून देत असतात की,सतत बदलणार्‍या विश्वात मी रहात आहे.

मी जेव्हा चालत असतो,तेव्हा मला वाटत असतं की येणार्‍या समस्यांचा कुठून ना कुठून उलगडा होत रहाणार आहे आणि जीवनात मिळणारा आनंद स्विकारला पाहिजे आणि त्या आनंदाला दाद दिली पाहिजे.लाक्षणिक अर्थाने मी एक पाऊल मागे असतो पण शब्द्शः मी एक पाऊल पुढे असतो.

रात्रीचा चालायला गेलो तर चांद्ण्य़ा आणि तारे मला वर दिसतात, ढगाळलेल्या वातावरणात चालायला पण मला बरं वाटतं.मला शांती हवी असेल आणि गलबलाट नको असेल तर मी एकटाच चालायला जातो. स्वच्छ हवा आणि व्यायाम हवा असेल तर मी माझ्या मोत्याला घेऊन बाहेर जातो.

मित्रांच्या गप्पागोष्टीत रमायचं असेल तर त्यांनाही घेऊन फिरतो.
मोत्याला घेऊन फिरायला गेल्यावर एक फायदा म्हणजे वाटेत दिसणारे शेजारी-पाजारी थांबून चर्चा करतात. त्यांच्याबरोबर मुलं असल्यास तीही माझ्या मोत्यावर कौतुकाने हात फिरवून आनंदी होतात.ते पाहून मला बरं वाटतं.

माझ्या दृष्टीने पायी चालणं हे एक व्यसन आहे आणि जबरदस्त सकारात्मक ताकद आहे.रोजच्या चालण्याच्या खुराकासाठी मी हपापलेला असतो.
मला नेहमीच वाटत असतं की,चालायचं असेल तर विचार करीत करीत चालण्याशिवाय गत्यंतर नाही.जीवनात समाधान मिळण्यासाठी चालणं अंगभूत आहे.असं असूनही रोजच्या जीवनातल्या घाईगर्दीच्या व्यापात चालण्याला अग्रतेच्या यादीत अगदी खालचा नंबर दिला जातो.किती चाललो अथवा किती वेगात चाललो हे तेव्हडं महत्वाचं नाही.चालण्यामधली क्षमता जास्त महत्वाची असते.

आता ह्या गावात खूप वर्षं जीवंत असलेल्या उंचच उंच झाडांच्या सावलीतून मी आनंद घेत घेत चालतो, भातशेतीच्या कुणग्याजवळून चालतो,फारजुन्या असलेल्या आणि जुन्या झालेल्या घरांच्या आळीमधून मार्ग काढीत चालतो.पण अमुक एका स्थळाला महत्व नाही.निरंतर चालण्याच्या क्रियेत, स्थळं फक्त नावीन्यात भर टाकतात.

“चालण्यातलं पथ्य” हा एक माझा सिद्धान्त आहे.तो असा की,मला हवं असलेलं आईसक्रीम आणि कुठचंही झटपट तयार केलेलं अन्न मी खाऊ शकतो.पण ते मला चालण्यातून कमवलं पाहिजे.प्रकृतीला मिळणारे फायदे आणि चालण्यातून होणारी उष्मांक जाळण्याची प्रक्रिया ह्यामधून माझ्या अंतीम लक्षाचा उद्देश साधायला खाण्याचा समतोल राखावा लागतो ह्यावर मी विश्वास ठेवतो.मी माझ्या ह्या सिद्धांतावर बरीच माहिती गोळा करीत आहे. कसं का असेना सिद्धांत सिद्ध झाले पाहिजेतच असं काही नसतं.

मला माहित आहे की लोकांना चालायला मजा येत नाही.लोक मला माहित आहेत पण मी त्यांना समजू शकत नाही.
मला वाटतं चालणं ही एक मत्ता आहे,साधन आहे,एक आमोद आहे आणि माझ्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे.असं मला वाटतं.”

रघुनाथचा शब्दानशब्द खरा होता.चालण्याबद्दल त्याने सांगीतलेलं हे ऐकून मी मनात म्हणालो रघुनाथचा हा चालण्याचा मॅडनेस अन-उपद्रवी आहेच त्याशिवाय ह्यावयात उच्चप्रत जीवन जगायला हा मॅडनेस खूपच फायद्याचा आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, September 12, 2011

स्मित स्मशानातलं.

“जीवनात सुखी असल्याशिवाय जीवन जगण्यात अर्थ नाही. आणि सुखी असण्यासाठी तोंडावर हसू असण्याची अत्यंत जरूरी आहे.हसू संसर्गजन्य
असतं.”

अरूणच्या आजोबांची आज चाळीसावी पुण्यतिथी होती.अरूण स्वतः पन्नास वर्षांचा झाला.दोन्ही घटना साजर्‍या करण्यासाठी होणार्‍या कार्यक्रमात
येण्यास अरूणने मला खास आमंत्रण दिलं होतं.

अरूणच्यावेळी अरूणची आई बाळंतपणातच गेली.अरूणला सहाजीकच आपली आई तिचा फोटो पाहून आठवते.अरूणला त्याच्या आजी,आजोबांनी
लहानाचा मोठा केला.
अरूणचे आजोबा डॅक्टर होते.आजी घर संभाळायची.आजोबांचा दवाखाना घरातच होता.येणारे जाणारे पेशन्टस अरूणला धाकले डॉक्टर म्हणूनच हाक मारायचे.पुढे अरूण डॉक्टर झाला नाही ही गोष्ट वेगळीच.

अरूण दहा वर्षाचा असताना त्याचे आजोबा गेले.चाळीस वर्षापूर्वीची आजोबांची आठवण काढून अरूण मला सांगत होता.
“ती घटना घडली तेव्हा मी चौथीत शिकत होतो.ती घटना म्हणजे माझ्या आजोबांचं त्या वर्षी निधन झालं होतं.त्यांची शस्त्रक्रिया झाली होती.अगदी
सहजपणे होणारी ती शस्त्रकिया होती.पण माझ्या आजोबांचं दैव आड आलं असावं.

माझं माझ्या आजोबांवर खूप प्रेम होतं.त्याचं पण माझ्यावर तेव्हडंच प्रेम होतं.मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकत होतो.आणि त्यांच्या अनुभवाचा
मला माझ्या आयुष्यात खूप उपयोग होत आहे.माझे आजोबा आमच्या गावात खूप प्रसिद्ध होते.ते दयाशील होते,दानशूर होते,मदत करणारे होते
आणि मुख्य म्हणजे ते व्यवसायाने डॉक्टर होते.त्या दिवसात डॉक्टराना व्हिझीटसाठी घरी घेऊन जायचे.माझे आजोबा वेळी अवळी कुणाच्याही घरी
व्हिझीट्ससाठी जायचे.गावातल्या लोकांना माझे आजोबा देवासारखे वाटायचे.पण माझ्या आजोबांना तसं म्हटलेलं आवडत नव्हतं.ते म्हणायचे,
“मला तुम्ही देवपण देऊ नका.नाहीपेक्षा माझ्यातली माणूसकी जाईल.”

माझे आजोबा गरीबांकडून पैसा घेत नसत.उलट त्यांना, जमलं तर, फुकट औषध द्यायचे.पण त्याची वसूली ते गावातल्या पैसेवाल्यांकडून करायचे.
माझे आजोबा गेल्याचं गावात कळल्यावर अख्खं गाव दुःखी झालं.
“डॉक्टर गेला पण त्याबरोबर एक माणूसपण गेला”
असं काही लोकांनी स्मशानात त्यांच्याबद्दल शब्द काढल्याचं मला आठवतं. आणि हे असं बोललं जाणं अपेक्षीत होतं.मी पण माझ्या वडीलांबरोबर
आजोबाना अखेरचं पोहोचवायला स्मशानात गेलो होतो. का कुणास ठाऊक सर्वांचं आपआपल्यापरीने बोलणं झाल्यावर मलाही माझ्या आजोबांबद्दल
बोलल्या शिवाय रहावेना.मी माझ्या वडीलांची सम्मती घेतली.इतर आजुबाजूचे लोक आवाक झाले.अवघा दहा वर्षाचा मुलगा स्मशानात येऊन
बोलण्याचं कसं धारिष्ट करतो ह्याचा अनेकाना अचंबा वाटला.
मी ज्यावेळी बोलायला म्हणून उभा राहिलो,त्यावेळी ज्याच्या त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते ते.दुःखी दिसत होते.
एक दिवस असाच मी माझ्या आजोबांच्या सहवासात होतो त्या दिवसाची आठवण सांगायचं मी ठरवलं.

मी म्हणालो,
“त्या दिवशी माझ्या आजोबानी सुखी जीवनाचा कानमंत्र मला दिला होता. ते म्हणाले होते की,
“जीवनात सुखी असल्याशिवाय जीवन जगण्यात अर्थ नाही.आणि सुखी असण्यासाठी तोंडावर हसू असण्याची अत्यंत जरूरी आहे.हसू संसर्गजन्य
असतं.”
प्रयोगाने सिद्ध करण्यासाठी मी, आजी आणि माझे आजोबा एक दिवशी गावात गेलो होतो.बाजारात बरेच लोक दिसतात म्हणून मला आजोबा
म्हणाले,
“या ठिकाणी आपण दिसेल त्याच्याशी हसूया.माझं म्हणणं पटण्याजोगं आहे की नाही ते तुला दिसून येईल.”
खरंच ज्यांच्याशी आम्ही हसलो ते सर्व आमच्याशी हसले.अगदी काळजीत दिसणारे,गंभीर दिसणारेसुद्धा आमच्या पांढर्‍या दंतपंक्ती दाखवल्यावर
हसले.
एक वृद्धा,असेल एंशी वर्षाची,आमच्याशी हसली.आम्हाला म्हणाली,
“एक युग होऊन गेलं असेल माझ्याशी कुणीही हसलं नाही.खरंच,आजचा माझा दिवस माझा होता.”
एक निमिषही न लागणारं साधं हास्य,दुसर्‍याला हसवू शकतं.एकाला जर हसवता आलं तर इतराना किती हसवता येईल.जीवनात कुणालाही हसायला अडथळा येत नसावा.
आज मला माझ्या आजोबांची उत्कटतेने आठवण येत आहे.मला माझ्या आजोबांनी, मी पाळण्यात असल्यापासून, वाढवलं.माझ्या गुरूच्या जागी ते
होते.तुम्हासर्वांना ते गेल्याने एव्हडं दुःख होतंय तर माझी काय स्थिती असेल याची कल्पना करा.म्हणून मी आजपासून ठरवलंय की,त्यांना खरी
आदरांजली द्यायची असल्यास त्यांचा कानमंत्र कायम लक्षात ठेवून तो इतरांनाही द्यावा”

माझं एव्हडं भाषण झाल्यावर,लोकांच्या चेहर्‍यावरचे दुःखाश्रू वाळून गेले आणि चेहर्‍यावर हसू दिसायला लागलं.खरंच हसू संसर्गजन्य होतं.त्या
दिवशी माझ्या आजोबानी मला महत्वपूर्ण धडा शिकवला आणि मी तो धडा माझ्या सोबत ठेवला आहे.एखादा दिवस वाईट असला तरी जग बुडती
होत नाही.कृतार्थ होण्यासाठी जगात बर्‍याच चांगल्या गोष्टी अस्तित्वात आहेत.मित्रमंडळी,कुटुंबिय जे माझ्या चेहर्‍यावर हास्य चमकवतात. मुकाटपणे कुढायला जीवन खूपच अल्प आहे.

त्या दिवसाच्या त्या घटनेमुळे आणि माझ्या आजोबांच्या बुद्धिकौशल्यामुळे माझ्या जीवनाला आकार आला.म्हणून मला वाटतं लोकांनी हसत रहावं. माझ्या मित्रमंडळींचं,कुटुंबीयांचं आणि अनोळख्यांचंसुद्धा जीवन सुखाचं जाण्यासाठी माझ्या आजोबांचा संदेश मी जीवंत असे पर्यंत इतराना देत
रहाणार”.

हे ऐकून मलाही गदगदून आलं.पण चेहर्‍यावर हसं ठेवीत मी अरूणला जवळ घेऊन म्हणालो,
“अरूण,खरंच तुझे आजोबा ग्रेट होते.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, September 8, 2011

एखादा स्पर्श


” मी त्याला केलेल्या स्पर्शामुळे तो माझ्यावर खेकसला.ह्याचं नंतर त्याला वाईट वाटलं आणि त्याने माझी माफी मागीतली.”

अलीकडे माझ्या पहाण्यात आलं आहे की,बॉलीवूडच्या विश्वात आणि टिव्हीवरच्या हिंदी सिरयल्समधे प्रथम भेटीत कोण कुणाला जवळ घेत असतो-हग देत असतो-कोण कुणाच्या गालानी गालाला स्पर्श करीत असतो.किंवा पाठ थोपटीत असतो.हे अलीकडे बरचसं आपण पाश्चात्यांकडून उचलून घेतलं आहे असं मला वाटतं.
आपल्या रीतीत पुर्वापार आपण प्रथम भेटीत आपलेच हात जोडून नमस्कार करतो.मोठ्यांना वाकून पायापडतो.पण स्पर्श असा होत नाही.

अप्पा कर्णीकांच्या घरात केव्हाही जा,घरात वयाने लहान मुलं असतील ती वाकून तुमच्या पायाला स्पर्श करून जातील.मोठी मंडळी तुमच्या जवळ येऊन तुम्हाला जवळ घेतील.मग असं करण्यात त्यामधे घरातल्या बायका,पुरूष दोन्हींचा सामावेश असेल.त्यांच्या घरात आपल्यापेक्षा वयाने मोठी असतील त्यांना मग आपण सहाजीकच वाकून नमस्कार करायला उद्युक्त होतो.ही ह्यांच्या घरातली रीत आजची नाही.फार पूर्वी पासूनची आहे.

अप्पांकडे गेल्यावर ह्या गोष्टींच मला कुतूहल असायचं.
म्हणून अप्पांना मी त्यादिवशी विचारलं,
“ह्या स्पर्शाच्या मागचं गौडबंगाल काय असावं.?”

लागलीच अप्पा मला म्हणाले,
“एखाद्याने एखाद्याला नुसता साधा स्पर्श केल्याने त्या स्पर्शाचा उबारा जीवशक्तीत खोलवर जाऊन त्याला होत असलेल्या क्लेशांचं रुपांतर, तो उबारा, सुखात करीत असावा.

मी अशा कुटूंबात वाढलो आहे की त्या कुटूंबातला प्रत्येकजण अगदी सहजपणे एकमेकाच्या पाठीवर हाततरी फिरवीत असूं किंवा एकमेकाच्या गळ्यात हात टाकत असूं.जेव्हा कुणी तुम्हाला स्पर्श करतो तेव्हा ह्या उबार्‍यातली उब तुमचा दिवस प्रसन्न करून टाकते.मला तरी स्पर्शाबद्दल विशेष वाटतं.

स्पर्शाबद्दल काय सांगावं.? स्पर्श असा असतो की जणू त्यातली ती दिलासा देणारी उब, एखाद्याच्या शरीरातल्या आणि जीवातल्या थंडीचं प्रमाण कमी करून टाकते.स्पर्श एखाद्याच्या आत्मसन्मानाचं पोषण करतो.सहजच एखाद्याकडून झालेला स्पर्श दुसर्‍याला आपणावर प्रेम केल्याचं आणि आपण त्याच्या मान्यतेत असल्याचं भासवतं.”

हे अप्पांचं ऐकून झाल्यावर मी त्यांना म्हणालो,
“एखादा त्याला झालेल्या स्पर्शाचा गैरसमज करून घेऊन,त्याचा अर्थ लैंगिकतेचा संकेत किंवा मनात काहीतरी काळंबेरं आहे असही वाटून घेऊ शकतो.”

त्यावर अप्पा म्हणाले,
“माझी तरी खात्री झाली आहे की मैत्रीपूर्वक झालेला स्पर्श हा माणसामाणसातला सुधार आहे.स्पर्श ही एक सम्मिलित स्वीकृति आहे, आणि मैत्रीमधली सूक्ष्म जवळीक आहे असं दाखवलं जातं.”

थोडावेळ थांबून थोडा विचार करून अप्पा मला पुढे म्हणाले,
“माझंच घ्या.कुणावरतरी कसलाही प्रसंग आला असेल,तेव्हा त्याच्या मनात आलेल्या प्रतिकूल भावना शोषून घेण्यासाठी,माझा हात सहजच त्याच्या
पाठीवरून फिरवला जातो.

एकदा काय झालं,माझा एक मित्र त्याच्या आईवडीलांबरोबर,कसल्यातरी विषयावर हुज्जा घालत होता.नंतर,तो चिडचीडला होऊन माझ्या जवळ
येऊन बसला.मला काहीच बोलता येत नव्हतं.मी काहीच बोलू शकत नसल्याने,त्याला दिलासा द्यावा म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवायला लागलो.दोन तीन मिनीटांनंतर माझ्याकडे पाहून मी हे का असं करतो म्हणून मला तो विचारायला लागला.त्यावेळी त्याला सांगायला माझ्या डोक्यात काहीच आलं नाही.

मी त्याच्या पाठीवरचा माझा हात काढून घेऊन,चकित होऊन मान खाली घालून बसलो असताना,त्याच्याकडून मिळणारी समज ऐकत होतो.
सर्वांनाच असा पाठीवरून हात फिरवलेला आवडत नाही हे त्याला सांगायचं होतं.हे त्याचं म्हणणं खरही आहे.मला वाटतं,ज्या लोकांना असा स्पर्श
केलेला आवडत नाही ते कदाचीत स्पर्शाशी अनभिज्ञ असावेत.

मी त्याला केलेल्या स्पर्शामुळे तो माझ्यावर खेकसला.ह्याचं नंतर त्याला वाईट वाटलं आणि त्याने माझी माफी मागीतली.मला त्याने सांगून टाकलं
की,माझ्याकडून झालेल्या स्पर्शाची त्याला वाखाणणी करावीशी वाटते, तसंच स्पर्शामुळे का आणि कसा दिलासा मिळतो हे त्याला समजत नाही
असही तो म्हणाला.तसंच मला ते करणं कसं सुचतं हेही त्याला कळत नाही असं त्याने मला सांगून टाकलं.
लोकं म्हणतील की,त्यांच्या अंगाला कुणी स्पर्श केलेला त्यांना आवडत नाही आणि तसं केल्यास त्यांना अगदी अस्वस्थ व्हायला होतं.मला वाटतं,असं म्हणणारे, स्पर्शास्पर्शातून होणार्‍या विकासापासून वंचित झालेले असावेत.”

मी अप्पाना म्हणालो,
“खरं म्हणजे,कुणालाही स्पर्श करणं म्हणजेच प्रत्येकाला स्पर्श हवा असं वाटणं, ह्याबद्दलचं ज्ञान असणं. असं मला वाटतं.”

“तुमचं अगदी बरोबर आहे”
असं म्हणून अप्पा पुढे म्हणाले,
“एखाद्याला दुःख झालं असताना त्याचा हात हातात घेऊन रहायला एखाद्याला का वाटावं?एखाद्याला दुखापत झाली असताना दुसरा सहज प्रवृति
म्हणून त्याला आपल्याजवळ ओढून घेतो,त्याला भिडून बसतो,त्याला मिठीत घेतो.
जेव्हा मी लहान होतो तेव्हा, यदा कदाचीत चालताना पडून माझ्या गुडघ्याला खरचटलं गेलं की, माझी आई लगेचच मला जवळ घेऊन माझ्या खरचटलेल्या जागेची पापी घेऊन फुंकर घालून म्हणायची,
“पटकन बरं होवो”
एखाद्याची ही अगदी साधी कृती,छोटसं प्रेम दाखवून जाते आणि होणार्‍या वेदना त्यामुळे निवळून जातात.लोकाना स्पर्श हवा असतो.जरी तसं
आजुबाजूला दिसलं नाही तरी त्याची जरूरी असते.एखादा सहज झालेला स्पर्श एखाद्याला जीवनभर सुखी करू शकतो.स्पर्श हा एखाद्या ठिणगी
सारखा असून कुणाच्याही जीवनात भडका पेटवून देऊ शकतो. म्हणूच मला स्पर्शाच्या क्षमतेविषयी खास वाटत असतं. आणि आमच्या घरातली ती
पूर्वीपासूनची रीत आहे.”

“तुमच्याशी चर्चा केल्यामुळे स्पर्शामागच्या भावना काय असतात ते मला कळलं.”
असं मी शेवटी अप्पांना म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrshnas@gmail.com

Monday, September 5, 2011

लेट ललित.


“आत्ता ही फ्लाईट लेट असल्याने,तू मात्र वेळेवर आला आहेस.”मी ललितला म्हणालो.त्यानंतर आम्ही दोघेही हसत हसत गेटवर जायला निघालो.

ललित अभ्यंकर आणि मी एकाच ऑफिसात काम करायचो.ललित तसा माझ्यापेक्षा वयाने थोडा लहान होता. मला त्याचा स्वभाव आवडायचा.मुख्य म्हणजे तो प्रमाणिक होता आणि माणूस होता.
एक मात्र त्याच्यात मी पाहिलं होतं की,त्याला वेळेची कदर नव्हती.एक एका माणसात तसं असतं.मला आणि ललितला नाटकं पहाण्याची फार आवड असायची.आलटून पालटून आम्ही एकमेकाची तिकीटं काढायचो.आमचं पेट नाट्यगृह म्हणजे पार्ल्याचं दिनानाथ नाट्यगृह.

अलीकडेच ललित माझ्या घरी आला आणि एका नवीन नाट्यप्रयोगाचे दोन पासीस आणून एक मला देत म्हणाला,
“तुम्ही तुमच्या वेळात जा.मी थेट नाट्यगृहात येतो.”
मी त्याला लागलीच म्हणालो,
“वेळेवर ये रे बाबा!”

ललित ऐकून हसला.हो म्हणण्यात अर्थ नाही हे त्याला माहित असावं.
आणि व्ह्यायचं तेच झालं.मी वेळेवर पोहोचून त्याची वाट पहात होतो.नाटकाच्या तीन घंटा होईपर्यंत साहेबांचं येण्याचं काही लक्षण दिसेना.मग मी आत गेलो आणि माझ्या बाजूच्या खुर्चीवर एक पुस्तक ठेऊन दिलं.त्याची वाट पहात होतो.शेवटी हे महाभाग एक प्रयोग झाल्यानंतर आले.
“काही नाही रे! प्रायोगीक नाटक होतं.एव्हडी धडपड करून येण्यात काही मला गम्य वाटलं नाही.”
असं मला नाक वरून करून म्हणाला.
मी मनात ठरवलं ह्या ललितला एकदा विचारून टाकायाचंच.
“तू कधीच वेळेचं भान का ठेवीत नाहीस?”

आम्ही जेव्हा दिल्लीला दोघे मिळून ऑफीसच्या कामाला जायचो,त्यावेळी फ्लाईट सुटे पर्यंत ललित दिसायचा नाही.आणि शेवटी विमानाचे दरवाजे बंद करायची वेळ आल्यावर हे गृहस्थ धावत धावत यायचे. मला कधी कधी फ्लाईटवरच्या एअर लाईन्सच्या लोकांना सांगावं लागायचं की,जरा थांबा.

कधी कधी आम्हाला आठवड्यातून दोन तीन वेळा विमानातून जावं लागायचं त्यामुळे एअर लाईन्सच्या लोकल स्टाफशी तोंडओळख चांगली होती.
त्यामुळे मी सांगीतलेलं ते लोक काही प्रमाणात ऐकायचे.आम्ही दोघे एकदा दिल्लीहून मुंबईला परत येत होतो.फ्लॅईट दोन तास लेट झाली होती.

टाईमपास म्हणून मी ललितला माझ्या मनात खात असलेला प्रश्न विचारला.
“ललित तुला कुठच्याही गोष्टीला वेळ का लागतो?”
माझा प्रश्न ऐकून, मला ललित म्हणाला,
“तुम्ही असं कधीतरी मला विचारणार ह्याची खात्री होती.आपल्याला आता चर्चा करायला भरपूर वेळ आहे. तुमचा प्रश्न मला आवडला.असं बघा,
सूर्योदय आणि सूर्यास्त रोज होत असतो.दिवसा दिवसातला फरक दाखवला जातो.म्हणून काही निसर्गाकडून एखाद्या दगडावर सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची वेळ कोरून ठेवलेली नसते.जर का निसर्गाने प्रत्येक फुलाला उमलवलं असतं,प्रत्येक झाडाला उगवलं असतं,प्रत्येक समुद्राच्या लाटेला ठरावीकच वेळी किनार्‍यावर आणून फुटवलं असतं,तर मग मी वेळेचं महत्व मानलं असतं.असं होत नसल्याने, तोपर्यंत, वेळेच्या सभोवती घुटमळत रहाण्याची गरज असावी असं मला वाटत नाही.

मी ज्यावेळी व्यायाम घेण्यासाठी बाहेर चालायला जात असतो त्यावेळी हाताला घड्याळ कधीच बांधत नसतो.बरोबर सेल फोनही घेऊन जात नसतो.माझा व्यायाम अर्ध्या तासात होवो वा दोन तास लागोत, मला समाधान होई तोपर्यंत मी चालत रहातो,किंवा आणखी चालायला काळोख खूपच व्ह्यायचा असेल तर त्यानंतर चालत नाही.किती वेळ झाला आहे किंवा कुणी माझ्यासाठी वाट बघत आहे ह्याची मी फिकीर करीत नाही.मी जेव्हडा चालतो तिच माझी वेळ.”

मी ललितला म्हणालो,
“वेळ साधली नाहीस तर तुझी बरेच वेळा कुचंबणा होत असेल नाही काय?”

“काय करणार? Old habits die hard तसं काहीसं आहे.”
असं सांगून ललित पुढे सांगू लागला.
“मी माझ्या शाळेतली एकरा वर्षं अशीच काढली.सकाळी लवकर सहाला उठायचं,आणि शाळेत जाण्यापूर्वी जरूरीची सर्व कामं करून घ्यायचो.आईने दिलेला खाण्याचा डबा दप्तरात ठेव,जरूरीची पुस्तकं घे,आमच्या घरात असलेल्या पोपटाला एक लाल मिरची आणि एक पेरू पिंजर्‍याचं दार हलकेच उघडून त्यात ठेव वगैरे.

पेन्सिल घेऊन कागदावर जरूरीची कामं लिहून ठेव,अशातला मी कधीच नव्हतो.उलट मी नेहमीच उशीरा येणारा म्हणून जाणला जायचो.मला “लेट ललित” म्हणायचे.एकदा काम हातात घेतल्यावर ते संपवायला किती वेळ लागेल हे मला कधीच माहित नसायचं.स्पष्टच सांगायचं तर असं करण्यात विशेष काही आहे याची मी कधीच कदर केली नाही.अशावेळी आमच्या बाहेर बांधून ठेवलेल्या मोत्याला पाण्याची गरज लागली असेल किंवा आईने शेजारच्या दुकानातून डझनभर अंडी आणायलाही सांगीतलं असेल तरी मला चालतं.

आमची शाळा बरोबर सकाळी आठ वाजता भरायची.शाळेत वेळेवर जाण्याची माझी मोठी समस्या असायची,आणि त्याबद्दल मला खूपच लाज वाटायची.अंगात एव्हडी क्षमता आणून मी जे करीन त्यात आनंद मिळण्यासाठी वेळेशी मी कधीच समझोता केला नाही.

पुढे कॉलेजात गेल्यावर मी,आमच्या फुट बॉल टीममधे होतो.एकदा फुटबॉलचे सामने होते.मी नेहमीप्रमाणे शाळेच्या मैदानावर उशीरा पोहोचलो.
माझ्या ऐवजी दुसर्‍या भिडूला घेऊन मला खेळ संपेपर्यंत बाकावर बसायला लावलं.ह्या गोष्टीचा मला रागही आला नव्हता किंवा मी निराशही झालो नव्हतो.

मला आठवतं माझ्या जन्म दिवशी माझ्या वडीलांनी मला एक सायकल घेऊन दिली होती.मला रोज कॉलेजला जाण्यासाठी त्यांनी ती दिली होती.आम्ही त्यावेळी शहराच्या बाहेर रहात असल्याने मला माझी सायकल घेऊन शहरात हुदडायला मिळत नव्हतं.
तो दिवस मला आठवतो.तो शनिवारचा दिवस होता.त्या दिवशी उत्तम ऊन पडलं होतं.मला त्यादिवशी माझी सायकल घेऊन कॉलेजमधले सामने पहायला जाण्याची हुक्की आली.घरून निघताना माझी सायकल मी हळू हळू चालवत होतो.वेळेवर कॉलेजच्या मैदानवर पोहचणार नाही असं वाटल्यामुळे मी जोरात पॅडल्स फिरवीत जायला लागलो.पण वेळेवर जायला जमलं नाही.माझ्या एका मित्राने मला त्याच्या गाडीतून घरी
पोहचवायला मदत करण्याचा प्रस्ताव दिला.मला ते ऐकून कससंच वाटलं.

तो इतका आनंदायी दिवस होता.घरून निघताना फक्त सामने पहाण्याचा एव्हडाच माझा उद्देश होता. मित्राच्या गाडीतून जाण्याऐवजी मला माझ्या सायकल वरून अगदी सावकाश घरी जायचं होतं.कारण सकाळी सामने पहायला निघाल्यावर वेळेवर पोहचण्यासाठी मला वेड्यासारखं घाई घाई करत यावं लागलं होतं.त्यामुळे शहरात हुदडायला मला मिळालं नव्हतं.ते आरामात मी साध्य करणार होतो.

आपल्या सर्वांना जगण्यासाठी फक्त एकदाच जीवन मिळत असतं. मी समजू शकतो की पूर्व नियोजीत कार्यक्रमाला वेळेवर हजर रहाणं अगदी अगत्याचं असतं.पण गावातून शहरात जाताना,इतर लोकानी त्यांच्या घरासमोर केलेल्या सुंदर बागेतल्या सुगंधी फुलांचा वास घ्यायला आपल्याला वेळ मिळत नाही. असं त्यावेळी मला वाटायचं.

खरंतर प्रत्येक जण त्याच्या उद्यासाठी एव्हडा घाईत असतो की,त्याला त्याच्या आजच्या दिवशी त्याच्याच अवतिभोवती असलेल्या सुंदर फुलांचे ताटवे बघायला अवधी नसतो.
म्हणूनच मी विचार करीत असतो की,सदासर्वकाळ मी वेळेवर पोहोचायला उशीर करीत असेनही,पण एव्हडं मला माहित झालं आहे की,शेवटी असं करण्यासाठी माझ्या जीवनातल्या दुसर्‍या काही गोष्टींची मी फारकत तरी करीत नाही.
म्हणूनच मला वाटतं की कुणीही वेळेसभोवती घुटमळत राहू नये.”

हे ललितचं सर्व ऐकून मला गंमत वाटली.तेव्हड्यात फ्लाईट-बोर्ड होत असल्याची अनाऊन्समेंट झाली. उठता उठता गंमत म्हणून मी ललितला म्हणालो,
“आत्ता ही फ्लाईट लेट असल्याने,तू मात्र वेळेवर आला आहेस.”
त्यानंतर आम्ही दोघेही हसत हसत गेटवर जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, September 2, 2011

संतुलन.



“कुणाच्याही भविष्यातल्या सुखी जीवनाच्या रहस्याचं टाळं उघडण्यासाठी संतुलन ही एक किल्ली म्हणावी लागेल.”

ARISTOTLE’S TABLE OF VIRTUES AND VICES आणि त्यावर J.A.K Thomson ह्याने लिहिलेले आपले विचार, हे पुस्त्क मी लायब्ररीतून आणलं होतं.ते वाचायला घेतल्यावर हातातून सोडवत नव्हतं. संध्याकाळी तळ्यावर जाताना वाचायला न्यावं म्हणून बरोबर घेऊन गेलो होतो.प्रो.देसाई येई पर्यंत जमेल तेव्हडं ते पुस्तक वाचून काढावं असा माझा उद्देश होता.शिवाय त्या पुस्तकावर आणखी एक दोन क्लेम्स आहेत असं मला लायब्ररीयन-बाईने सांगीतलं होतं.म्हणून पुस्तक लवकर वाचून पूर्ण करून लायब्ररीत परत नेऊन द्यावं हाही माझा विचार होता.

आज नवल म्हणजे भाऊसाहेब माझ्या अगोदरच तळ्यावरच्या आमच्या नेहमीच्या बाकावर बसूनम मीच त्यांना दिलेली चिं.त्र्य.खानोलकरांची “कोंडूरा”ही कादंबरी, वाचत बसले होते.मला पहाताच वाचलेल्या पानांची रिमायंडर स्ट्रिप पुस्तकात घालून मला म्हणाले,
“कोकणात, भूत-खेत, देवचार,मुंजा,जळती चुड,विवर,विहीर,आड,डोंगर,वडा-पिंपळाचं झाड,कभिन्न काळोख,अमावास्या असल्या शब्दांचा आणि त्यावारच्या विषयांचा भरपूर वापर करून अनेक लेखकांच्या कादंबर्‍या मी वाचल्या आहेत.कोकण्यातल्या भुताखेताच्या गोष्टींवर सुंदर विचार लिहिले मी वाचले आहेत.ही खानोलकरांची कांदबरीपण मला आवडली आहे.तुम्ही कोणतं पुस्तक वाचत आहात?”
असा प्रश्न करून माझ्या हातातलं पुस्तक मागून त्यावरचं हेडींग वाचत होते.
“हे पुस्तक मी फार पूर्वी वाचलेलं आहे.आणि त्यावरच्या माझ्या विचारांची टिप्पणी पण केलेली मला आठवते.”
असं पुढे म्हणून मी काय म्हणतो याची वाट पहात आहेत असं मला भासलं.
मी सहाजिकच म्हणालो,
“मग ऐकूया तुमचे विचार”

मला भाऊसाहेब म्हणाले,
“जेव्हा लोकं आपलं जीवन जगत असतात,वयाने मोठी होत असतात,शरीर आणि मन धरून मोठी होत असतात, तेव्हा त्यांच्या ह्या सुखी जीवनाचं रहस्य काय असावं ह्याचा शोध लावण्याचा ही लोकं आटोकाट प्रयत्न करीत असतात. भविष्यातल्या सुखी जीवनाच्या रहस्याचं टाळं उघडण्यासाठी किल्लीच्या शोधात असतात.
मला तरी असं वाटतं की जीवनात संतुलन असणं हा ह्या शोधाचा मुख्य आधार असावा.

कोणा एका तत्ववेत्त्याच्या-बहुतेक एरिस्टाटलच्या- सांगीतल्या जाणार्‍या नैतिकतेच्या अनेक मुद्यांचं हे तात्पर्य आहे असं समजून आधुनिक जगाला लागू व्हावं ह्या दृष्टीतून जीवनातल्या संतुलनाबाबत मला म्हणायचं आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या रोजच्या प्रयासात ह्या संतुलनाच्या वापराचं एव्हडं महत्व नसलं तरी,जीवनाच्या एका विशाल तस्वीरीचा एक भाग असण्यात त्याचं महत्व आहे.

आपण लहानाचं मोठं होत असताना,आपलं वय वाढत असताना निरनीराळ्य़ा प्रसंगाशी झुंज देत असताना, आपल्या पालकाकडून किंवा आपण ज्यांना मानतो अशा व्यक्तींच्या विचारातून,निर्णय घेण्यासाठी आपल्याला मार्ग सापडत असतो.योग्य आणि अयोग्य ह्या मधला फरक आपण शिकत असतो.आणि हळुहळू पोक्तपणा आल्यावर आपलाच आपण निर्णय घेत असतो.
असं असून सुद्धा तुमच्या तुम्हालाच जीवनात निर्णय घ्यायची खरी सीमा तेव्हा कळते जेव्हा तुमच्याकडून तुमच्या पसंतीचे निर्णय तुमच्याच जीवनाच्या आड येतात.

माझंच घ्या.मी माझ्या किशोर वयातच,शाळा कॉलेज संपल्यानंतर, आणखी काही उपद्व्याप करायचं ठरवलं होतं.उपद्व्याप म्हणजे,एक प्रकारची जनसेवा,गरीब वस्तीत जाऊन लहान मुलांना शिकवण्याची सेवा वगैरे.ह्या गोष्टी हळूहळू वाढतच गेल्या आणि त्याचबरोबर मला माझ्या शिक्षणाची आणि त्यासंबंधाची कामं संभाळावी लागायची.ह्या जीवनपद्धतीमुळे माझ्या जीवनातल्या अनेक बाबीवर त्याचा असर व्हायला लागला. माझ्या मनावर ताण यायला लागला.त्यामुळे वेळेवर जेवण घेणं आणि झोप घेणं ह्या गोष्टी होत नसल्याने माझ्या स्वास्थ्याला तेव्हड्या हितकारक रहात नव्हत्या.
त्यामुळे मी करीत असलेले उपद्व्याप आणि माझी रोजची आवश्यक कामं ह्यात मला संतुलन आणणं भाग पडायचं.मला आठवतं,त्या काळात माझ्या कानात सतत पडणारा माझ्या आईच्या तोंडचा शब्द म्हणजे “प्राधान्य”.

रोज लोकांना निर्णय घ्यायला सामोरं जावं लागतं.मग तो निर्णय, सकाळी गोड शिरा खाऊ की तिखट शिरा खाऊ पासून ते कामावर गेल्यावर बजेट संबंधी काय करायचं,इथपर्यंतचे निर्णय.
आणि घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे परिणाम दूरवर होत असतात.आहाराचा परिणाम प्रकृती स्वास्थ्यावर होतो आणि कामावरच्या निर्णयाचे परिणाम जॉबची पत संभाळण्यात होते. आणि समाजात असलेली आपली पत समजली जाते.म्हणून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत तडजोड म्हणून संतुलन ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं.

निर्णय घेण्यासाठी शोधून काढलेल्या मार्गात, मध्य-बिंदू गाठण्याचा प्रयत्न, नव्या निर्णयाची प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करतो.एखादी व्यक्ती एकाच निर्णयात स्वतःला गढून ठेवते तेव्हा तिच्या जीवनातल्या काही भागात दुसरं काहीतरी मिळण्यात उणीव आणण्याची पूर्वनियोजना झाली म्हणून समजावं.म्हणूनच संतुलनाचा विचार करून निर्णय घेतल्याने,काही कमजोर डाग नाहीसे होतात.

ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल हटवादी राहूच शकत नाही आणि तुमच्या मनात असलेल्या उद्देशाचा पिच्छाच करू शकत नाही.अगदी साधा अर्थ असा की,भविष्यातल्या तुमच्या उद्देशावर तुमचं लक्ष केंद्रीत असताना, तुमच्या जीवनाच्या हरएक अंगाचा आणि घेतलेल्या निर्णयाचा तुम्ही ताबा ठेवायला शिकलं पाहिजे.

हे संतुलन गाठणं थोडं जिकीरीचं आहे,परंतु एकदा का तुम्ही ते स्थापित केलंत की,जीवन बरंच सुखकारक जातं असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय निश्चित होतो आणि जीवनावर आणि त्याचबरोबर अचानक मिळालेल्या कलाटणीवर ताबा ठेवायला मदत होते.

एरिस्टाटलने,सुखी जीवनाची अपेक्षा करताना,सुख कशामुळे निर्माण होतं हे पहाण्याचा प्रयत्न केला होता. सदाचरणाचा त्याचा वापर पाहिल्यावर सुखी माणसाची व्याख्या कळते.तसंच,त्याने दिलेल्या सदाचरणाच्या यादीतून काढलेलं तात्पर्य सुखी जीवनाचा मार्ग दाखवतं.ह्याच तात्पर्याकडे मी संतुलनाच्या दृष्टीतून जीवनाकडे पहातो.”

मला प्रो.देसायांचे विचार आवडले.
मी त्यांना म्हणालो,
“एकदा का तुम्ही तुमच्या जीवनातल्या निर्णय घेण्याच्या संतुलानचा सूक्ष भेद जाणू शकला आणि तुमच्या रोजच्या व्यवहारात त्याचा उपयोग करू शकला की,मला वाटतं,ज्यावेळी तुमच्यावर निर्णय घेण्याची पाळी येईल,त्यावेळी ती घेणं तुम्हाला फारच सुलभ होईल.असं केल्याने लोकांच्या जीवनातल्या तणावाचा मोठा भाग दूर होईल.त्यामुळे जवळ असलेले उद्देश साध्य व्हायला मदत होईल.म्हणूनच कुणाच्याही भविष्यातल्या सुखी जीवनाच्या रहस्याचं टाळं उघडण्यासाठी संतुलन ही एक किल्ली म्हणावी लागेल. हे तुम्ही केलेल्या टिप्पणीचं तात्पर्य मला काढायला हरकत नाही.”

“द्या टाळी”
असं म्हणून भाऊसाहेबांनी आपला हात पुढे केला,त्याचवेळी मी समजलो की,वाचण्यासाठी ह्या पुस्तकाचा घेतलेला माझा चॉईस स्वारस्यदायक होता.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com