Friday, February 29, 2008

म्हणून म्हणतो नका घालूं वाद

जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार
शक्य कसे झाले असते
ज्ञानेश्वराना सोळाव्या वर्षी
ज्ञानेश्वरी लिहीणे
अन
शिवरायाना तोरणा जिंकणे


संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी
करूनी अमेरिकेची वारी
अचंबीत केली जनता सारी
देवूनी भाषणे आध्यात्मावरी
झाला ऐकून पाश्चिमात्यां आनंद
कोण असती ते शिवाय विवेकानंद


जसे वाढे एखाद्दयाचे वय
होई कदाचीत अक्कलेचा क्षय
लहान मोठा न कळे त्याला
अपमानीत करूनी ज्याला त्याला
शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला


म्हणून म्हणतो नका घालूं वाद
असो समोर लहान अथवा थोर
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, February 27, 2008

योगायोग,योगायोग आणि योगायोग

"अनपेक्षीत घटनांची गुंतावळ ही माझ्या आयुष्याची एक मोठी खूण झाली आहे.मला वाटतं,माझ्या आयुष्यात आलेल्या योगायोगानी मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवला,कधी धक्का पण दिला आणि तो पण अशातऱ्हेने की मी कदाचीत तो मार्ग पत्करला पण नसता,पण त्यामार्गाने मला जाण्याची जरुरी भासली म्हणून तसं करावं लागलं.ह्या योगायोगांशी झुंझ देताना मला त्यासाठी अनपेक्षीत ठिकाणी जावून राहण्याची पाळी आली."

मुंबईहून मद्रासला जाताना ट्रेनमधे मला एक बाई भेटली ती सहज बोलता बोलता आपली कथा मला सांगू लागली.ती पुढे म्हणाली," माझी मावशी मद्रासला राहते.तिची परिस्थिती पण यथातथाच होती. पण मला एका चांगल्या जॉबची ऑफर आल्याने सुरवातीला तिच्या घरी राहून मग कुठेतरी जागा घेवून राहण्याचा माझा विचार होता.ट्रेनमधून उतरून झाल्यावर, थोडं फ्रेश व्हावं म्हणून स्टेशनच्या वेटिंगरूममधे गेले.तिथे एक वयस्कर बाई बेसीनवर तोंड धुवून नुकतीच बाहेर पडत होती,माझ्याशी शिष्टाचार म्हणून गालातल्या गालात हंसली,मी पण तिला प्रतीसाद दिला. बाहेर आल्यावर तिच बाई एका बाकावर बसून
कुणाची तरी वाट बघत बसली होती.मी पण जरा विश्रांतीसाठी तिथेच बसले.गप्पा करीत असताना मला तिच्याकडून कळलं की जिथे ती राहते त्याच्या जवळंच माझं भावी ऑफीस होतं.मला ती म्हणाली, "नाहीतरी तू मावशीकडे तात्पुर्तीच राहाणार आहेस त्यापेक्षा माझ्या घरी का राहायला येत नाहीस?मी पण एकटीच असते मला पण तुझी कंपनी मिळेल आणि भाड्याच्या रुपाने थोडे पैसेही मिळतील"
मला तिची कल्पना आवडली,आणि असा हा योगायोग येवून मी तिच्या घरी राहायला गेले.

परंतु,योगायोग हा नेहमीच सुखावह होईल याची खात्री नाही.आणि तसंच झालं.दोन वर्ष मी सुखासुखी तिच्याजवळ राहीले आणि एक दिवशी मी एकटीच घरी असताना एक अनोळखी माणूस घरात शिरून त्याने माझ्याशी जी हातापायी केली त्याने मला बराच धक्का अबसला.ही झालेली हातापायी आणि त्या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी आणि मला पुन्हा स्थिरस्थावर होण्यासाठी लागलेले परिश्रम तसेच वाया गेलेले दिवस, लक्षात घेता हा अत्याच्यारी आघात माझ्या नशिबी असाच योगायोगाने आल्याने त्याचा अर्थ काय असावा असा प्रश्न मला सतत भेडसावत राहिला"

गाडीचा वेग वाढतच होता.किती स्टशने गाडी पार करून गेली ह्याचा थांगपत्ता ह्या बाईची कथा ऐकण्यात येवू शकला नाही.
एक मोठी जांभई देत ती मला म्हणाली,
"माझ्या कथेने तुम्हाला बोअर होत तर नाही ना?"
माझ्या हातातलं पाडगांवकरांच्या कवितेचं पुस्तक मी बाजूला ठेवून तिचीच कथा ऐकण्यात स्वारस्य घेत होतो,हे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.
ती पुढे म्हणाली,
" मी हे सगळं पाठिशी टाकून,आणखी जोमाने चालू लागले, नव्हेतर पळू लागले.हे घर साडून मी एका दुसऱ्या अपार्टमेन्टमधे राहू लागले.नंतर मद्रासला बाय बाय करून परत मुंबईला आले.गोरेगांवला एका गुजराथी बाईच्या फ्लॅटमधे मला एक रूमची जागा भाड्याने मिळाली.नरीमन पॉइंट्मधे मेकरटॉवर्सच्या चवदाव्या मजल्यावर असलेल्या एका बॅन्केत मला जॉब मिळाला.मी थोडं संगीतात मन रमवू लागले. बाज्याची पेटी घेवून माझी मीच गाणी वाजवायला शिकण्याचा प्रयत्न करू लागले.दादर बुक डेपो मधून गाण्यांच्या नोटेशनची पुस्तके विकत घेवून त्यातून नोटेशन प्रमाणे सुरवातीला माझ्यामीच मराठी भावगीतं वाजवू लागले.मनाला शांती मिळू लागली.पेटी वाजावताना मी हळू हळू गाऊं ही लागले,मला माहित नव्हतं की माझा आवाज गाण्यालायक पण आहे ते.
एकदां असंच मेकर टॉव्हर्सच्या लिफ्टमधे चौवदाव्या मजल्यावर जाईपर्यंग विरंगुळा म्हणून हळूवार गाणं गुणगुणत होते,

"वसंत काली वनी दिनांती
एकच पुसिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा
हाती घेशील का?
माझा होशिल का?"

माझ्या बरोबर लिफ्टमधे एक उमदा गृहस्थ होता. आणि तो मराठी होता.माझं गाणं ऐकून त्याला राहवलं नसावं जणू काय पुर्वीची जुनीच ओळख आहे असां अविर्भाव करून मला म्हणाला,"किती सुंदर आवाज आहे तुमचा आणि ते इतकं जूनं गाणं खूप दिवसानी ऐकून खूपच बरं वाटलं.मी पण तबला शिकतो.
गोरेगांवला सामंतमास्तरांच्या संगीत शाळेत."हे ऐकून मला जरा त्याची जवळीक वाटली.
मी म्हणाले,
"मी पण गोरेगांवलाच राहते.कुठे आहे त्यांची संगीत शाळा? गुरु शिवाय ज्ञान नाही हे खरं"तो पर्यंत चौदावा मजला आला.लिफ्ट्चं दार उघडतांक्षणी त्याला त्याचा एक ओळखीचा माणूस भेटला आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तसंच राहून गेलं.आणि गम्मत पहा,असंच एक दिवस योगायोगाने तोच गृहस्थ मला गोरेगांव स्टेशनावर भेटला.
लिफ्टमधून निघता निघतानाचा माझा तो प्रश्न अजून त्याच्या लक्षात होता.मला म्हणाला,"ती सगीत शाळा ईस्ट गोरेगांवला बाबूराव सामंतांच्या सामंतवाडीत आहे.कुणालाही विचारा कुणीही तुम्हाला ती जागा दाखवून देईल."आणि एव्हड्यात गाडी आली आणि आमचं बोलणं तिथेच संपलं.पुढच्या वीकएण्डला मी चौकशी काढत त्या क्लासात गेले.
पेटी,तबला आणि गाण्याचे सुंदर आलाप ऐकून खूपच बरं वाटलं.सामंत मास्तर पेटी वाजवत होते,तोच हा गृहस्थ तबला वाजवत होता आणि एक मुलगी गात होती.ते गाणं पण मला अजून आठवतं,

"जीवनात ही घडी अशीच राहूदे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचूं दे"

आणि आता गम्मत पहा हा सगळा योगायोग शेवटी माझा आणि तबला वाजवणाऱ्या दिवाकर धोंडचा एकमेकाचे पुढे लाईफ पार्टनर होण्यात झाला."
मधेच मी तिला विचारलं,
"मग आता तुम्ही मद्रासला कां जात आहां?"
मला ती म्हणाली,
" मी तुम्हाला ते सांगण्यापुर्वी योगायोगाच्या महत्वाबद्दल आणि माझ्या आयुष्यातल्या योगायोगाबद्दल मी
केलेलं चिंतन तुम्हाला एक्सप्लेन करते. तशी मी धर्म मानते.मी त्यावर खूप वाचन पण करते.ह्या गोंधळलेल्या जीवनातसुद्धा एक शिस्त असावी,अशी माझी धारणा आहे.आणि जीवनातली प्रत्येक घटना सुद्धा कुठल्या तरी शिस्तीच्या चौकटीत बांधलेली असावी. योगायोग, ह्या जीवनातल्या शिस्तीला आव्हान देत असावा.म्हणूनच ह्या आव्हानाचं स्पष्टीकरण व्हायला हवं.मी माझ्या मनात असं ठरवून ठेवलंय की,हा
योगायोगच वेळोवेळी जीवनाला शिस्त आणतो.जीवनातल्या ह्या घटना आपण एखादी कला प्राप्त करून घेवून, निर्माण करू शकत नाही.पण आपल्या मार्गात ज्या घटना येतात त्यांचा घट्ट हात धरून ते कुठे नेत असतील ते पहावं. बऱ्याच असल्या योगायोगानी, मला पुढचा मार्ग काटायला लावलं.मला त्यानी दिशा प्राप्त करून दिली आणि त्या दिशेचा अर्थ समजावला.योगायोगाने मला दाखवून दिलंय की जीवन हे शक्यतानी ओतोप्रत भरलेलं आहे.वेटींगरूममधे भेटलेली ती बाई, लिफ्टमधे मला भेटलेले दिवाकर धोंड, गोरेगांव मधली ती गुजराथी बाई,शिवाय हातापायी करावं लागल्याचा तो मद्रास मधला प्रसंग, अशी
उदाहरणं आहेत.योगायोगावरअसा विश्वास ठेवून ’चलो रे,मुसाफीर’ असं माझं मलाच मी म्हणते.
मला वाटतं,मी मद्रासला आता का जाते ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्दयायला आता मला हरकत नाही.मी ही तुमच्या बरोबर गाडीतून मद्रासला जात आहे ती मी माझ्या वृद्ध मावशीला मुंबईला घेवून येण्यासाठी.तिला ह्या वयात माझ्या शिवाय कोणच नसल्याने तिच्या संमत्तीने माझ्या घरी आणून ठेवण्याचा मी बेत केला आहे.कदाचीत हा पण तिच्या आणि माझ्या आयुष्यातला योगायोगच असावा."
हे ऐकून मी तिला हंसत हंसत म्हणालो,
"आपण आता सहप्रवासी होवून मद्रासला चाललोय हा पण एक योगायोग नसेल कशावरून?"
तिच्या मिष्कील हंसण्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, February 26, 2008

खरंच हा तो तर नसेल

मन होई उच्छृंखल जेव्हां
वाटे उगीचच मनाला तेव्हां
हा तो तर नसेल
खरंच हा तो तर नसेल

कुणी लपून छपून जणू
असेल देत हळूच साद
झाली नसून संध्या
कुणी लावी दिव्याची वात
असे त्याचीच ही साद
असे त्याचीच ही खुणगांठ
खरंच हा तो तर नसेल

भास होई तो जवळ असल्याचा
पेटुनी दाह होतसे शरिराचा
वेष्टीते मज हवा अंगाची त्याच्या
हा तो तर नसेल
खरंच हा तो तर नसेल

मन होई उच्छृंखल जेव्हां
वाटे उगीचच मनाला तेव्हां
हा तो तर नसेल
खरंच हा तो तर नसेल


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, February 25, 2008

काळ्या ढगाभोवतालची चंदेरी किनार

"अरविंदनेच मला चंदेरी किनार दाखवली,आणि आता मी ती अल्यागेलेल्याला दाखवते."
असं, ज्यावेळी मला स्मिता अध्यारत बोलली,त्यावेळी मला पण तिची गोष्ट जास्त आत्मीयतेने ऐकावीशी वाटली.
स्मिता म्हणाली,
"त्याच कारण असं आहे.मोठ्या भिंगातून सर्व काही पहायची मला सवंय लागली आहे.अठ्ठावीस वर्षाच्या लग्नगांठी नंतर माझे पति मला दुरावले.त्याना फुफ्फुसाचा कॅनसर झाला.अतोनात सिगारेट ओढल्याचे हे कारण होतं."म्यां मरण पाहिले" असे म्हणण्या ऐवजी "म्यां मरण आणिले " असं त्यांच्या बाबतीत म्हणावं लागेल.अर्थात ती आता होवून गेलेली गोष्ट असल्याने त्याची चर्च्यापण निष्फळ आहे."
मी म्हणालो,
"स्मिता,आयुष्याचा जोडीदार अशातऱ्हेने सोडून जातो ही पण एक मोठी धक्कादायक घटना आहे नाही काय?"
त्यावर स्मिता म्हणाली,
" तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे.पण हे बघ,एकच घटना असेल तर तशी वाटेलही, पण आणखीनही तशीच घटना झाली तर कुणाला मोठी म्हणायचं आणि कुणाला छोटी म्हणायचं हेच समजत नाही.आता मला संसारात गम्य वाटत नाही.अरविंद, माझा सगळ्यात धाकटा मुलगा, एकवीस वर्षावर ज्यावेळी ही दुनिया सोडून जातो अशावेळेला माझ्या मनोमनी मी ह्या येणाऱ्या सर्व घटनांची एकप्रकारची उपकृतच झाली असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून मी मघाशी म्हणाले, मोठ्या भिंगातून सर्व काही पहायची मला सवंय लागली आहे.हल्ली मी प्रत्येक घटनेत चदेरी किनार पहाण्यात राजी होते. मी यापुढे माझा मुलगा बरोबर घेत असते.कुठची आई असं करणार नाही.? सांग मला.हा एव्हडाच पर्याय माझ्याजवळ राहिला आहे.त्याचं जड ओझं माझ्या डोक्यावर घेवून तरी फिरावं किंवा त्याच्या आठवणी काढून समारंभ करावे.
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर,काही महिने मी हा दुःखाचा डोंगर घेवून राहिल्यावर नंतर लक्षात आणलं आणि विचार केला दुःख आणि आनंद ह्यात कुणाशी समझोता करूं?. आणि त्यामधूनच ह्या काळ्याकुट्ट ढगासभोवतीची चंदेरी किनार पाहू लागले.आता मी लोकांत मिसळू लागले,मी लोकांची झाले. पण खरं सांगू का अरविंदच खरा लोकांचा झाला होता.
मला एकदां म्हणाला,
"मला ज्यांच्याशी बोलायला हवं त्या प्रत्येकाशी मी बोलत असतो."
मी त्याला माझी खात्री होत नाही अशा ढंगात विचारलं,
"प्रत्येकाशी बोललास?"
त्यावर म्हणाला,
"हो खरंच!पण कोण जर चुकला तर माहित करायला हवं"
स्मिता नंतर म्हणाली,
"पांच वर्षा नंतर त्याच्याच तत्वाशी मी चिकटून आहे"
मी स्मिताला विचारलं,
"घरातले सगळे तुझ्याशी सहमत आहेत का?
त्यावर ती मला म्हणते,
"माझी मुलगी मात्र जास्त जागृत असते.एखाद्दया अनोळखी व्यकतीला मी कसं काय? विचारण्यापुर्वीच मला ती चूप करते.
माहित असून सुद्धा, की मला तसं करून आनंद होत नाही."
"आल्यागेलेल्या असं विचारुं नकोस "असं वर अर्धवट हंसून मला समजावते.

स्मिता मला म्हणाली,
"अरविंद सुंदर मुरली वाजवायचा.त्याची ती लांबसडक बोटं,मुरलीवर फिरताना त्याने दोन ओठांचा चंबू करून मुरली फुंकताना त्याचा तो सुंदर चेहरा आठवतो.माझ्या तिनही मुलांमधे अरविंद स्मार्ट आणि मस्कऱ्या होता.पण त्याच्या त्या अकाली निधनाच्या कारणाचा सुरवातीला मला अचंबा वाटायचा.कधी नाही ते त्या वर्षी आम्ही सर्व कोकणात आजगांवला माझ्या अजोळी गेलो होतो.अरविंद त्या वर्षी एम.बी.बी.एसच्या पहिल्या वर्षात होता.माझ्या आईने त्याला दगडू महाराला बोलावून दोन लाकडाचे ओंडके कुऱ्हाडीने तोडून मांगरातल्या हंड्यात पाणी गरम करण्यासाठी जळण म्हणून त्या लाकडांचा उपयोग करायला सांगितलं असताना अरविंदने ते स्वतः तोडून जळणाला वापरले आणि घामाघुम झाल्याने विहीरीमधून थंड पाणी काढून न्हाण्यासाठी काय जातो? आणि तिन चार घागरी पाणी न्हावून शेवटची कळशी पाण्य़ात सोडल्यावर धप्पकन आवाज काय येतो?
हे पाहून बघणारे सांगू लागले
"जवळ असलेल्या माणसाने त्याला विहीरीत ढकलंले,"
"अरविंद तोल जावून पडला" असं दुसऱ्याने सांगितलं
तिसरा म्हणाला,
"अरविंदने बहुदा जीव दिला"
ऐकावं तेव्हडं खोटंच वाटू लागलं. अविश्वासनीय वाटू लागलं."
मी स्मिताला मधेच थांबवून विचारलं,
"पण स्मिता खरं काय ते तुला कळलं का?"

ती म्हणाली,
"तेच तर तुला सांगणार आहे.अरे,आजगांवला आमच्या शेजारच्या घरात शिरवईकरांची इंदू राहायची.तो अणि ती एकाच क्लासात पहिल्या वर्षाला होती.खूप दिवसानी मला ती भेटायला आली.
आणि मला म्हणाली,
"अरविंद बद्दलच्या ह्या अफवा ऐकून तुम्हाला काय वाटत असावं हे मी सहनपण करू शकत नाही.पण आता तुम्हाला ह्या मानसिक छळातून मुक्त केल्यास माझी सुटका होईल असं अलिकडे मला वाटू लागलं." इंदू पुढे सांगू लागली,
" अरविंद्ला एकदा मी क्लासात नीपचीत बसलेलं पाहिलं."
"काय रे तुला बरं वाटत का नाही?"
असं मी विचारल्यावर माझा हात हातात घेत म्हणाला,
"मला वचन दे की तू हे माझ्या आईला सांगणार नाहीस."
मला म्हणाला,
"मला हे कित्येक दिवसापासून होतंय.डोळ्या समोर काळोख येतो,चक्कर आल्यासारखी होते.परत काही दिवस बरं वाटतं.एकदा आपल्या प्रोफेरसना, माझा संदर्भ न देता,सिम्पटॉम्स सांगून पडताळा घेतला.आणि मग इंटरनेटवर जावून ज्यादा माहिती काढली.मला ब्रेन ट्युमरचा संशय येतोय.गुपचूप मी डॉक्टरना दाखवणार आहे.माझ्या आईला याचा मागमूसही लागता कामा नये. समजलं तर ती हाय खाईल,कदाचीत ती सहनही करू शकणार नाही.अलिकडेच माझ्या बाबांच्या जाण्याने ती एव्हडी कोसळली आहे की हे ऐकून ती उठणारच नाही."
पुढे तो म्हणाला,
" तिला जरा बरं वाटावं म्हणून आम्ही आमच्या आजोळी सर्व जाणार आहोत,तिकडून जावून आल्यावर मी डॉ. रांगणेकराना कन्सल्ट करणार आहे."
इंदू पुढे म्हणाली,
"बहुतेक त्याला विहीरीवर पाणी काढताना चक्कर आली असावी,आणि तो विहीरीत पडला असावा."
हे सर्व इंदूचे बोलणं सांगून झाल्यावर,
स्मिता मला म्हणाली,
" अरे,इंदूचं हे बोलणं ऐकून मग माझ्या लक्षात आलं की अरविंद त्यावेळी मला म्हणाला होता,
"मला ज्यांच्याशी बोलायला हवं त्या प्रत्येकाशी मी बोलत असतो."त्याचं काही आता खरं नाही हे त्याला माहित झालं होतं,असं मला वाटतं,म्हणून तो असा बोलत असावा.

अरविंदच्या जाण्याने मी पुरी मुग्ध झाली.आयुष्य चाचपडत जाण्य़ाची मला आता संवय झाली आहे.पण माझ्या अरविंदने मला चंदेरी किनार दाखविली आहे.आणि मी ते चंदेरी किनार इतराना दाखवायला सुरवात केली आहे.अरविंद त्याचं गुपीत मला त्रास होईल म्हणून ठेवून गेला,पण इंदू कडून ते बाहेर आलंच."
हे तिचं बोलणं ऐकून मला मालती पांडेचं ते गाणं आठवलं,आणि ते अरविंद्ला उद्देशून होतं.

"लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल कां?
प्रीत लपवूनी लपेल कां?"

त्या ऐवजी
"लपविलास तू व्याधी तुझा
परिणाम त्याचा छपेल का?
गुपीत लपवूनी लपेल कां?


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, February 24, 2008

पाहूनी तुझे मिष्कील डोळे

कळेना कशी ही प्रीतीची नशा
पिंजून करी माझी दुर्दशा
जणू पिकातून शिरे हा वारा
येवू लागे जीवनी आनंद सारा

मन मिरवे,फूल बहरे
निश्चय करी मी नवे
तुजसम सजणा,घेई मी आणा
शिकले मी नवीन बहाणा

पाहूनी तुझे मिष्कील डोळे
मन माझे भुलले
कशी मी मलाच सावरूं
माझे मलाच ते नकळे

मन हिरवे,पहाट उजाडे
नजरेला नजर भिडे
कळेना कशी ही प्रीतीची नशा
पिंजून करी माझी दुर्दशा

विझेल कशी आग अंतरीची
येई घडी कठिण समयाची
सहन करीते दुर्धर वेदना
उपाय नसती सौम्य करण्या
सजणा तुझ्या प्रीती विना


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, February 22, 2008

खोट्या सुखाचा आणि आशेचा मोह.

प्रो.देसाई म्हणतात,
“जीवनात सतत अडचणी येतच असतात,म्हणून जे काही नशिबात आहे ते होणार असं समजून जर त्या अडचणींचा स्विकार केला,आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या झिडकारल्या तर जीवनात काहीच मिळवलं जाणार नाही. माणसाने स्वतःला बळी झालो असं समजू नये. उलट माणसाने आपली स्थिती जास्तीत जास्त स्विकारणीय आणि योग्य करण्याचा प्रयत्नात असलं पाहिजे.माणसाच्या मनात श्रद्धा का असावी? ह्या प्रश्नाला उत्तर देता येत नाही,आणि त्याचं निवारण ही करता येत नाही.श्रद्धा कुणावरही लादता येत नाही, श्रद्धा करणाऱ्याचा श्रद्धेवर विश्वास असला पाहिजे.”
हे सर्व ऐकून मी म्हटलं,

“भाऊसाहेब,आज तुमचा विचार तरी काय आहे. आज कुठच्या विषयावर मला लेक्चर देणार आहात?”

यावर मला म्हणाले,
“आज मी तुम्हाला खोट्या सुखाचा मोह आणि खोट्या आशेचा स्विकार करीत राहणं ह्यावर थोडं काही सांगणार आहे.”
आणि मग पुढे म्हणाले,
” जबाबदाऱ्या आणि श्रद्धा याची सांगड घालून तृप्त झाल्यावर, मिळणारं समाधान कसं आनंदायी नसतं हे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.खरं म्हणजे मानवतेला आपला स्वभावगुणधर्म बदलता आलेला नाही.’प्रत्येक गोष्ट घडायला कारण लागतं’ असं म्हणण्या पेक्षा,’ प्रत्येक कारणामुळे गोष्ट घडते’ असं म्हटलं तर मला जास्त मान्य होईल.पण हे काही खरं नाही.”

“हे खरं नाही तर, खरं काय आहे भाऊसाहेब?”असा मी त्याना प्रश्न केला.

त्यावर ते म्हणाले,
” हे बघा, हे म्हणणं केवळ देवाला वस्तुस्थिति मानून किंवा आपल्या शक्ति बाहेर किंवा आपल्या समजुतीच्या पलिकडलं, किंवा आपण राहतो त्या समाजाच्या समजूतीच्या पलिकडलं असं समजून हे सर्व म्हटलं जातं.आणि ह्या समजुतीमुळे आपण आपल्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करायला जातो.जे आहे ते तसंच असणार,त्यामुळे माझा, ह्या मधला असलेला भाग, किंवा माझ्या हातून जे झालं ते अगोदरच ठरलेलं असल्याने मी त्यासाठी जबाबदार होत नाही,असं ’म्हणणं’ म्हणजे त्याचा अर्थ असा की जीवनात ज्या काही उलथापालथी होतात,किवा ज्या अडचणी येतात त्या नैसर्गिक असो अथवा माणसामुळे असो,आपल्या श्रद्धेच्या आधाराने त्याच्यावर मात करून सूख मिळवता आलं पाहिजे. असं म्हणण्या सारखं आहे”

मी विचारलं,
“मग भाऊसाहेब तुमचं काय म्हणणं आहे ते तर मला कळू द्दया.”

भाऊसाहेब म्हणाले,
“माझं म्हणणं असं आहे,की माणूस आपली करणी आणि भरणी ह्या दोनही गोष्टी ईश्वराच्या अंगावर टाकतो.आपल्या जीवनात होणाऱ्या उलथापालथी किंवा येणाऱ्या अडचणींच्या समोर जातो सामोरे जात नाही.खरं म्हणजे, ह्या दुखण्याला आपणच कारणीभूत असतो.आणि होतं ते बऱ्यासाठी होतं अशी समजूत करून सुखी होण्याचा प्रयत्न करतो.हे दुखणं मलाच कां? ते कधी बंद होणार?मी ते दूर कसं करूं? असे प्रश्न विचारून त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो.मग म्हणतो, ते टाळण्यासारखं नाही. आणि ते टाळायला आपल्या हातात काही नाही.”

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,असा विचार करण्यात काय चुकलं?”

त्यावर जरा श्वास घेत घेत भाऊसाहेब म्हणाले,
“सत्य परिस्थिती न्याहळल्यास,दिसून येईल की, वाईट होत असलं तरीसुद्धा सर्व काही आलबेल आहे अशी समजूत करून घेण्याचा हा एक अट्टाहास आहे.असल्या समजुतीतून मोकळीक करून घेणं, म्हणजेच खरी परिस्थिती स्विकारणं.आणि म्हणून मी म्हणतो, प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे वागून मगच आनंदात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.जे काय घडत असेल त्याला आपणच जबाबदार असल्याचे समजून राहिल्यास आपोआपच मनाला सुख मिळणार.”

मी म्हणालो,
"भाऊसाहेब,असा विचार करून कितीसे लोक जीवन जगत असतात?”

निरोप घेता घेता भाऊसाहेब मला म्हणाले,
“तुम्ही चांगला प्रश्न विचारलात.त्याला माझं एकच उत्तर आहे.जोपर्यंत आपलं काम आपल्याला समाधान देतं,आणि जोपर्यंत आपण आपल्या कामाशी एकरूप असतो,तोपर्यंत आपल्याला सुख मिळत राहतं.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, February 20, 2008

मंदाची बाईआज्जी

एक्दा गप्पा रंगल्यानंतर कुठचा विषय कसा येईल, आणि त्यावरची चर्च्या कुठे पोहोचेल हे सांगणं कठीण. असच आम्ही एकदा गच्चीवर गप्पा मारत बसलो होतो.का कुणास ठावूक विषय काय होता आणि मंदाने तो कुठे नेला.विषय होता त्यावेळची जुनी माणसं आणि त्यांच्या संवयी बद्दल.मधेच कुणीतरी कोकणातल्या समुद्राचा विषय काढला,आणि त्यावर आणखी काही सांगण्य़ापुर्वीच मंदाचा हुंदका ऐकला. मंदाला तिच्या आजीची आठवण येवून ती थोडी भावनावश झाली.तिला आजीचा विषय घेवून काही तरी सांगायचं होतं.
म्हणाली,
"माझ्या आजीला आम्ही बाईआजी म्हणायचो.विणकाम आणि शिवणकामात बाईआजीचा हातखंडा होता. खानोलीच्या घाटीवरून खाली उतरल्यावर समुद्रसपाटीवर बरीचशी घरं एका रांगेत बांधलेली होती.हिरव्या गार माडांच्या बनात ही घरं वरच्या डोंगरावरून हिरव्या पानांमधे ओवलेल्या मण्यांच्या माळे सारखी दिसायची.समुद्राच्या फेसाळ दुधाळलेल्या लाटा पाहून देखावा रम्य दिसायचा."
मी म्हणालो,
"मंदा, पण तुला समुद्राच्या विषयावरून आजीची आठवण आली का?"
ती म्हणाली,
"होय,एक म्हणजे आपण जुन्या माणसाबद्दल बोलत होतो आणि कुणी तरी कोकणातल्या समुद्रावर विषय काढला,आणि ह्या दोनही गोष्टी माझ्या बाईआजीशी निगडीत होत्या"
"मग पुढे काय झालं ते सांग"असं शरद तिला म्हणाला.

मंदा सांगू लागली,
" माझी बाईआजी वयाच्या त्रेचाळीस वर्षावर आजोबा गेल्याने विधवा झाली.पईपैसा जमविण्याशिवाय तिला गत्यंतर नव्हतं.
माझ्या आईचे आणि माझ्या दोन मावशांचे कपडे ती घरीच शिवायची.मला विणता येतं पण मला नीट शिवता येत नाही. शिवायला गेले तर वाकडं तिकडं शिवलं जातं.आणि मी त्यामुळे खूप हिरमुसली होते. शिवणासाठी बरीच सहनशीलता,थोडं गणीत,आणि जास्त नेमकेपणा असावा लागतो.तो माझ्याकडून होत
नसावा."
शिवणकामाच्या विषयातून हिला काय सांगायचं आहे हे कळण्यासाठी माझी जरा उत्सुकता वाढली.आणि मी म्हणालो,
"बरं पुढे"
माझ्याक्डे बघून हंसत हंसत म्हणाली,
" अलिकडे मी जराशी उत्सुक्त होवून काही काळ बसून गचाळा सारखं जरी एखादा फाटका शर्ट शिवला, एखाद्दया स्कर्टला हेम घातली,एखाद्दया जीनला पॅच लावला,तरी माझ्या एक लक्षात येतं की,मी जुळवाजुळवी जास्त करते.जास्त जमवून घेते.
त्यावरून माझं मन समाधान होतं आणि समजूत करून घेते, की मी सुई दोरा घेवून जे करते ते फाटलेलं शिवण्या पलिकडचं असतं.जगातल्या मोठमोठ्या संमस्या सोडवता जरी आल्या नाही तरी जवळ असलेल्या समस्याना ठिगळ घालू शकते.काही तरी गाठू शकते.कपड्याच्या बाबतीत,ते फेकून देण्यापेक्षा वापरात आणण्याचं समाधान होतं, उमेद येते."
मी म्हटलं,
"म्हणजे तुला म्हणायचं तरी काय ?"
मंदा म्हणाली,
"ठिगळ लावणं आणि नव दिसण्या सारखं दुरुस्थ करणं,यात फरक आहे.दुरुस्थ केल्याने मुळ गोष्टीचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो आणि ठिगळ लावण्याने त्याचा मागमूस राहतो,त्याशिवाय ठिगळ लावून पण वापरता येतं ह्याची साक्ष राहते.ज्यावेळी आपण तुटलेली नाती जोडतो,त्यावेळी नक्कीच वाटतं की दुरावण्यापेक्षा आपण जवळ असणं बरं,आणि कदाचीत उसवलेलं दुरुस्थ करण्यापेक्षा ठिगळ लावून जास्त मजबूत असणं बरं."
मी म्हणालो,
"तुझ्या बाईआजीचं काय झालं?"

मंदा म्हणाली,
"तेच तर सांगते,अगदी वंय झाल्यावर ती एकटीच असताना एकदा तिच्या घरात एक चोर शिरून त्याने चोरी करून सुद्धा तिला जखमी करून गेला.तिला खूप मानसीक धक्का बसला.आमच्या तोंडफटक्ळ कुटुंबातल्या कुणीही ही गोष्ट जाहिर केली नाही.मला तर पांच वर्षानी कळली.मला एक दिसून आलं की माझ्या बाईआजीने नवे कपडे शिवायचं बंद केलं.जे हाताजवळ येईल त्याला आता ती ठिगळच लावू लागली.जणू ती तिच्यावर झालेल्या आघाताच्या जखमेवर मलम लावून तिच्या दुखावलेल्या हृदयाचे, शरिराचे आणि मनाचे संबंध सांधत होती.जणू उसवलेली शिवण ठिगळ लावून ठेवत होती."
हे ऐकून मी म्हणालो,
"म्हणजे मंदा, तुला असंच म्हणायचं आहे ना की कपड्याची ठिगळ पुर्वी इथं फाटलं होतं हे लपवत नाही."
"अगदी बरोबर " मंदा म्हणाली
आणि वर पुढे म्हणाली,
" म्हणूनच म्हणते माझे ठिगळलेले कपडे,माझी गैरसमजाने दुरावलेली नाती अशीच ठिगळ लावून पहाताना बाईआजीची मला खूप आठवण करून देते"
शेवटी जाता जाता मी मनात म्हणालो विषय कसा येईल,आणि त्यावरची चर्च्या कुठे पोहोचेल हे सांगणं कठीण.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

Tuesday, February 19, 2008

डुबू न जावो मनभरी आशा

मार्ग प्रेमाचा असताना
संभाळून टाक पाऊले
मार्गात ह्या चालताना
म्हणती हात चोळले

कुणी न गाठे ही प्रेममंझील
पाऊले डगमडूनी हताश होतील

शोधीतो आम्हा हा बहार जमान्याचा
कुठे सोडून आलो आम्ही हा बगीचा

डुबू न जावो मनभरी आशा
नको फेकू तीर
बदलूनी नजरेची भाषा


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, February 18, 2008

"भेजा म्हणजे रे काय?.... भाऊ!"

"भेजा म्हणजे रे काय?.... भाऊ!"


त्या दिवशी मी सहज म्हणून टी.आय.एफ.आर मधे ( टाटा इनस्टीट्युट ऑफ फंडामेन्टल रिसर्च मधे) सकाळीच गेलो होतो.जुने मित्र भेटतील गप्पा सप्पा होतील आणि वेळ थोडा मजेत जाईल ही एक ईच्छा ठेवून गेलो होतो.तसे बरेच लोक भेटले म्हणा."हाय,हलो" बऱ्याच लोकांशी झालं आणि सह्ज म्हणून लायब्ररीत डोकावून पाहिलं. बरेच लोक वाचनात दंग होते.एक तरूण चेहरा ओळखीचा दिसला.पण मग डोकं खाजवावं असं वाटलं.हा चेहरा अजून इतका तरूण कसा राहिला.का वयोमानामुळे माझ्या मेंदुत फरक तर झाला नाही ना?.मी तरूण असताना हा अगदी असाच दिसायचा.
विनायक मोकाशी आणि मी एकाच वेळेला T.I.F.R मधे लागलो होतो.मोकाशी अजूनही असाच कसा राहिल?असा एक क्रेझी विचार मनात आला.अर्थात हा सगळा माझा भ्रम आहे हे मला लगेच कळलं म्हणा.जरा धारीष्ट करून त्याच्या जवळ गेलो,आणि त्याला विचारलं,
"तू विनायक मोकाशीचा मुलगा तर नाहीस नां?"
माझ्या वयाकडे बघून तो चटकन उभा राहिला आणि मला म्हणाला
"हो मी त्यांचा मोठा मुलगा. मी संजय.तुम्ही माझ्या वडलाना ओळखता?"
आणि मग सर्व जुन्या आठवणिची माझ्या कडून देवाण झाली.(घेवाण कशी होणार तो विनायक नव्हता विनायकचा मुलगा होता नां?)मला म्हणाला
"काका,आपण कॅन्टीनमधे जावून मोकळेपणाने बोलूया."
संजय आपल्या वडीलांसारखाच प्रेमळ आणि माणूसप्रेमी वाटला.हातातलं पुस्तक तसंच घेवून तो आणि मी कॅन्टीन मधे गेलो.त्याच्या कडून कळलं विनायक दोन वर्षापुर्वी वारला.त्याला शेवटी शेवटी ’अलझायमर’ झाला होता. संजय तो पर्यंत एमएस्सी झाला होता.आणि आता tifrच्या मोलेक्युलर बायालॉजीमधे पीएचडी करत होता. त्याच्या हातातल्या पुस्तकाच्या मथळ्यावरून तो मेंदूवर संशोधन करीत असावा असं मला वाटलं.
"पीएचडी" साठी तुझा कसला विषय आहे रे?"
असं मी त्याला वडीलकीच्या नात्यानेच विचारलं.मला म्हणाला,
"तसं अनेक विषयावर मला इंटरेस्ट होतं,पण बाबांच्या अलझायमर ह्या व्याधीकडे गेले सतत दोन वर्ष expose झाल्याने ’मेंदु हा आहे तरी काय’ह्याची उत्सुकता वाढून मग त्यांच्या पश्चात त्यांची आठवण म्हणून हा विषय घेवून मी पीएचडी करायचं ठरवलं."
स्वतः उठून त्याने लाईनीत उभं राहून, दोन कप एस्प्रेसो कॉफी आणि चटणी स्यॅन्डवीच एका मोठ्या डीश मधे तो घेवून आला.मला म्हणाला,"बाबांना असा ब्रेकफास्ट बराच आवडायचा"मला ते दिवस आठवले. आम्ही सर्व मिळून कामावर आल्यावर प्रथम काम सुरू करण्यापुर्वी कॅन्टीनमधे येवूनरोज हाच ब्रेकफास्ट घ्यायचो.गम्मत म्हण्जे डॉ.भाभा पण सर्वांबरोबर असेच लाईनमधे उभे राहून आपला ब्रेकफास्ट घ्यायचे. कुणीही केव्हडाही उच्च पदावर असे ना का सर्वांना नियम सारखा असायचा.वेटर आणून काही देत नसायचा.आणि दुसरं म्हणजे ’सोल्जर कॉन्ट्रीबुशन’, डॉ.भाभा पण स्वतःच्या खिशात हात घालून स्वतःचे पैसे द्दयायचे.
संजय आग्रह करीत मला म्हणाला
" आणखी काय काका?"
तो रांगेत उभा असताना मी त्याचं पुस्तक सहज म्हणून चाळलं.’मेंदुच्या’ विषयावर ते क्लासिक पुस्तक होतं.मी त्याच विषयावर त्याच्याकडून माहिती घेण्याचा विचार केला होता.मी म्हणालो,
"मला तुझ्याकडून थोडक्यात मेंदु म्हणजे काय चीज आहे ही माहीती हवीयं.मला माहित आहे की तो गंभीर विषय आहे आणि पांच दहा मिनीटात सांगता येणार नाही,पण तुला सांगता येईल तेव्हडं ऐकायचं आहे."
संजय मला म्हणाला,
"तुमचं म्हणणं बरोबर आहे,पण अगदी बेसीक गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो.सबंध मेंदु बद्दल नसांगता मेमरी म्हणजेच ज्याला स्मरणशक्ति म्हणतात ती काय ते सांगतो.स्मरणशक्ति ही एक संभ्रमात टाकणारी गोष्ट आहे.माहिती आणि विचार जसे एखाद्दया एनसायक्लोपिडीयामधे असते त्याच्यापेक्षाही शंभरपटीने जास्त माहिती ह्या तिन पौंडाच्या गोळ्यामधे भरलेली असते.स्वतःची डिसीझन घेणं,विचार करणं,आणि आपल्याला ह्व्या त्या गोष्टी करणं, हालचाल करणं ही सर्व कामं मेंदु करतो."
नंतर संजय मला म्हणाला,
"काका आपण माझ्या रुममधे जावूं या.आपण दोघे तिकडे आरामात बसून बोलूं."
मी म्हटलं,
"अरे तुझा वेळ मी घेत नाही ना?"
त्यावर तो मला म्हणाला,
"tifr ची खासीयत मी तुम्हाला काय सांगू?तुम्हाला सर्व माहित आहे.डॉ.भाभांच्या शिस्तित हे बसत नाही.त्यांच म्हणणं रिसर्च करणाऱ्यावर कसलीच बंधन असता कामा नयेत. जो तो त्याची जबाबदारी जाणतो.कांमाचा अपव्यय न होवू देण्याची त्याला ह्यामुळे संवय लागते.मझ्या संशोधनाच्याच संबंधाने आपण बोलत असल्याने मी माझ्या कामाचा अपव्यय करीत नाही असं माझं मन सांगतं.आणि तुम्हाला ही ह्या विषयात इंटरेस्ट असल्याने मला तुम्हाला हवी असलेली माहिती सांगायला पण बरं वाटतं."
नंतर आम्ही वर जावून त्याच्या रुममधे बसलो.संजय सांगू लागला,
"शॉर्टटर्म,लॉन्गटर्म,आणि ऍनसेसटरल असे मेमरीचे तिन प्रकार आहेत.माहिती लिहून ठेवणं, राखून ठेवणं(store करणं) आणि काढून त्याचा उपयोग करणं ही एक मेमरीची प्रोसेस आहे. काही वेळेला ही माहिती कायमची राखून
ठेवणं आणि नंतर कधी तरी उपयोगात आणण्यासाठी काढून घेणं हे त्या त्या जरुरी प्रमाणे ठरवलं जातं.ही माहिती किती वेळ राखून ठेवणं हे पण प्रोसेस ठरवते."
मी म्हणालो,
"म्हणजे आता आपण दोघे कॅन्टीनमधे असताना जे काय बोललो,पाहिलं हे सर्व जरुरी प्रमाणे राखलं जाणार,आणि काढून घेतलं जाणार. खरं ना?"
"अगदी बरोबर " संजय म्हणाला.
" ही माहिती ’चंक्स’ मधे राखली जाते.आणि ती ’टेम्परोल लोब’ मधे,किंवा मधल्या मेंदूत किंवा ’मेडीयल टेम्परोल लोब’ मधे किंवा आणखी अनेक ठेकाणी राखली जाते.अगदी आत राखली जाते.हे ’चंक्स’ नंतर वापरले जातात.
’रिकॉल,रिकलेक्शन,रिकगनिशन,आणि रिलर्नींग’असे चार प्रकार मेमरी प्रोसेसचे आहेत.रिकॉल म्हणजे भूतकाळातली माहिती आठवणं.रिकलेक्शन म्हणजे माहितीची ’रिकन्स्ट्रकशन करून मग आठवण करणं.रिकगनिशन म्हणजे पुर्वीची झालेली घटना आठवणीत ठेवून नंतर तिची उजळणी करून लक्षात आणणं.रिलर्नींग म्हणजे घटना परत परत आठवणं.म्हणजेच त्याच, त्याच घटनेची पुनावृत्ती करणं.मी म्हणालो,"म्हणजे संजय,तुला मी विनायक समजून पाहिलं ते ’रिकलेक्शन नाही काय?"
"अगदी बरोबर " संजय म्हणाला.नंतर सांगू लागला,
" मघाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ’रिकॉल,रिकलेक्शन,रिकगनिशन,आणि रिलर्नींग’हे प्रकार ’शॉर्टम’ मेमरीत मुळीच नसतात. ’शॉर्टम’ मेमरी ही काही सेकंडस ते मिनीट किंवा एक तास पर्यंतची आठवण असते.ह्या मेमरीला चंक्स ठेवायला अगदी थोड्याच प्रमाणात मेंदुत जागा असते.फोन नंबर डायल करताना,नंबर वाचून मग फोन केला जातो.नंतर तो नंबर विसरला जातो.थोड्या वेळा पुर्ती मेमरी ’इन युझ’असते.आणि ’लॉंग टर्म’ साठी राखली जात नाही.शॉर्टटर्म मेमरी नसती तर आपल्याकडॆ येणाऱ्या सर्व माहितीचा ओघ सांभाळताना आपल्या सर्व actions, हळू झाल्या असत्या.
मेमरी प्रोसेस मधली ही शक्यता शब्द,चित्रं,आवाज,वगैरे पाहून किंवा ऐकून त्याना पटकन ’रिकॉल’ करून थोडा वेळ आठवून आणि ती माहिती कायम राखून न ठेवता विसरून जाण्याने मेंदुतुन फुसून टाकली जाते.’लॉंग टर्म ’ मेमरीला अगणीत जागा मेंदुत असते.त्यातली माहिती ’वापरा नाहीतर विसरा ’ (use it or lose it) ह्या प्रकारात तेव्हा जाते, जेव्हा त्याचे मेमरीतले ’चंक्स’ न वापरल्यामुळे ढकलून दिले जातात, आणि ती जागा थोड्या वेळा पुर्ती दुसऱ्या ’चंक्स ’ नी भरली जाते.उत्तम ऊदाहरण म्हणजे आपण चावी कुठे ठेवली ती विसरतो,किंवा भेटायला जायला विसरतो वगैरे.जेव्हा मेमरी खूप overload होते,तेव्हा क्षुल्लक गोष्टी आठवत नाहीत.अशावेळी काही तरी शारिरीक activity करावी.त्यामुळे मेंदुला माहितीचे ’ चंक्स’ rearrange करायला वेळ मिळतो."
घड्याळाकडे पहात संजय मला म्हणाला,
"काका lunch hour संपत येणार.बोलता बोलता कधी वेळ गेला ते कळलंच नाही."
असं म्हणत आम्ही कॅन्टीनच्या दिशेने जायला निघालो. बरेच लोक जेवून गेल्यामुळे लाईन मोठी नव्हती.self service असल्याने गरम गरम स्टरलाईझड डिशीस हातात घेवून तेव्हडंच गरम जेवण घेत होतो.’मुलगतवानी सुप,ब्रेडचेस्लाईसीस,फ्राईडचिकन,सलाड, फ्राईड राईस आणि राईस पुडींग’ मी घेतलं,आणि टेबलाकडे गेलो.संजयने पैसे अगोदरच देवून टाकले होते.जेवायला सुरवात करण्यापुर्वी माझ्या सुपकडे बघून मला संजय म्हणाला,
"काका हे मुलगतवानी सुप माझ्या बाबांना खूप आवडायचं.मी एक दोन वेळां त्यांच्या बरोबर इकडे जेवायला आल्यावर मला आग्रहाने हे सूप घ्यायला सांगायचे.मला पण हे सुप खूप आवडतं,पण बाबा गेल्यापासून मी त्यांची आठवण म्हणून मी ह्या सुपाचा त्याग केला,वर्ज केलं."
त्याची ही पितृभक्ति पाहून मला पण खूप गहिंवरून आलं.संवयी प्रमाणे ते प्रेम बघून मला एका गाण्याच्या दोन ओळी आठवल्या त्या ओठात पुटपुटताना पाहून,संजयने विचारलं,
"काका त्या ज्यु लोकांसारखे जेवणापुर्वी तुम्ही काही प्रार्थना म्हणता की काय?"
आता मला राहवंलच नाही.मी म्हणालो
"तुला हे गाणं लागू होत नाही."
"पण म्हणून तर दाखवा.मला पण कविता आवडतात"असं त्याने म्ह्टल्यावर,
मी म्हणालो ऐक,
"नजरेला दावी पाप
त्याला नेत्र म्हणू नये
विसरला आईबाप
त्याला पूत्र म्हणू नये"
तो हंसल्यावर त्याच्या गालावरची खळी पाहून मला परत विनायकची आठवण आली.जेवण आटोपल्यावर संजय म्हणाला,
"वरती जावू या थोडी उरलेली मेमरी बद्दलची माहिती सांगतो."
असं म्हणत आम्ही परत त्याच्या रुममधे गेलो.संजय आता पुढचं सांगू लागला,"एपीसोडीक मेमरी"हा एक मेमरीचा पोटप्रकार आहे.ह्याची प्रोसेस अशी आहे, ही आठवण खूप वर्षानी सुद्धा सहजच आणता येते.जितकं जास्त feeling असेल तेव्हडी ही आठवण चांगली राखली जाते आणि चांगली आठवली जाते.लॉंन्गटर्म मेमरी आठवायला त्रास होवू लागला की त्याचं कारण वय होत जातं, तसं लोब्स बाद होतात.तसंच
बालपणातल्या आठवणी आठवतात पण वर्षापुर्वीच्या आठवणी आठवत नाहीत, ह्याचंही कारण वंय होणं आहे."
मधेच संजयला इंटरप्ट करून मी म्ह्टलं,
"विसरून जाईन तुला सांगायचं म्हणून आत्ताच सांगतो,तुला जेवताना आणि सकाळ पासून आपण बोलत असताना मी तुझ्या विषयी एक बारकाईनं पाहिलं तुझे बोलतानाचे हातवारे,ते मधेच बोलायचं थांबल्यावरचं ओठावर ओठ काही वेळ दाबून ठेवण्याची संवय,हंसताना तुझ्या उजव्या गालावर पडणारी खळी पाहून मला तुझ्या बाबाची,विनायकची आठवण येते."
"आता बोल"
हे ऐकून परत हंसत हंसत गालावरची खळी दाखवत म्हणाला,
"काका,जणू तुम्ही मला ऍन्सेसट्रल मेमरीची माहिती द्दयायची आठवणच केलीत.ह्याच प्रकारच्या मेमरीबद्दल मला शेवटचं सांगायचं होतं.नकळत पण इनबिल्ट राखून राहिलीली ही मेमरी प्रत्यकाच्या genes मधे असते.ते instinct वागणं त्याच्यामुळेच दिसतं.वरचं माझ्या बद्दलचं तुमचं observation हे त्याच ऍन्सेसट्रल मेमरीमधे मोडतं. आणखी एक उदाहरण म्हणजे लहान मुल आंगठा कसं चोखतं,भूक लागल्यावर कसं रडतं,आपण एकमेकाला कसं अलिंगन देतो,दरवाजा कसा उघडतो हे सर्व प्रकार त्यातच येतात.काका बोलता बोलता चार वाजले.मी तुम्हाला अगदी basic ते सर्व मेमरी बद्दल सांगितलं.आता आपण कॅन्टीन
मधे गरम गरम चहा घ्यायला जावूया."
कॅन्टीन मधे जाता जाता मी त्याला म्हणालो
"तुला विनायकने संजय हे नांव अगदी योग्य ठेवलंय.महाभारतातला संजय जो आंधळ्या धृतराष्ट्राला त्याच्या महालात बसून कुरुक्षेत्रातली युद्धाची माहिती देत होता.ती त्याच्या मेमरीच्याच जोरावर नाही काय?आणखी एक गम्मत सांगतो.हिंदीत मेंदुला "भेजा" म्हणतात,तसंच "भेजा"म्हणजे हिंदीत दुसरा अर्थ पाठवलं,किंबा पाठवणे.एका मुंबईतल्या पोस्ट्मनची आणि एका उत्तर भारतीयाची पत्रावरून "तुमकु भेजा नही" ह्या वाक्यावर जुगलबंदी कशी झाली हा विनोदी post माझ्या ’कृष्ण उवाच ’ website वर जरूर वाच."

चहा घ्यायला बसल्यावर संजयने दोन कप गरम गरम चहा आणि दोन ’अकुरी on टोस्ट ’आणले.एका ब्रेड्स्लाईसवर उडदाची आणि चणाडाळीची कुटून केलेली तिखट चटणी फासून त्यावर चण्याच्या पिठाची जाड पेस्ट लावून मग ऑव्हन मधे toast बनवतात.हा toast चहा बरोबर खायला खूपच मजा येते.
संजय मला म्हणाला,
"काका हा अकुरी on टोस्ट माझ्या बाबांना खूपच आवडायचा.त्यांची आठवण काढून मी न चुकता हा टोस्ट खातो."
चहा घेवून झाल्यावर संजयचा निरोप घेताना खूपच वाईट वाटलं.ह्याच्या रुपाने विनायक मोकाशाने माझ्या मेमरीत ही रेकॉर्ड केलीली आठवण निश्चीतच episodic memory असावी.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, February 16, 2008

पहाशी मजकडे प्रेमाने कधीतरी

पहाशी मजकडे प्रेमाने कधीतरी


मानले जरी तू असशी बेहद सुंदरी
मी पण दिसत नाही कांहीतरी
पहाशी मजकडे प्रेमाने कधीतरी
वचन देवूनी का होशी बावरी

कळेना मजला सुंदरी आज
आहेस तू खूष का नाराज
तिरकी नजर अन तीखा रिवाज
पाहूनी तुला अंगात येई शिरशीरी
पहाशी मजकडे प्रेमाने कधीतरी

साथ देशी दोन पाऊले
सुकखर होईल सारे जीणे
सोडून दे दुनियेचे भिणे
तोडून मन नको होवू करारी
पहाशी मजकडे प्रेमाने कधीतरी


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, February 13, 2008

शालूची शालीनता

शालूची शालीनता


शालूला तीन बहिणी आणि दोन भाऊ. मला आठवतं गाडीअड्ड्याचे पलिकडे शालू राहायची.त्यांच्या घरी दोन गाई होत्या.त्यांचे दूध विकून शालूची आई आपल्या चिल्लापिल्लांचा संभाळ करायची.शालूच्या वडीलांत काही अर्थच नव्हता.ह्या गृहस्थाने स्वतःच्या चंगळी शिवाय कांही केलंच नाही.सकाळी उठून घरा बाहेर पडल्यावर दुपारच्या पोटातल्या भूकाग्नीला शमवायला घरी यायचे."घडता घडता घडेल ते घडेल" अशा समजूतीत राहून दिवस काढायचे.शालूची आई तर त्यांना पुरी कंटाळून गेली होती.पण करणार काय? "रांदा,वाढा आणि उष्टी काढा"हा त्यावेळचा स्त्रीयांचा आयुष्यक्रम. परंतु,शालुचे आईकडचे आजोळ तसं श्रीमंत होतं म्हणून दोन गाई तिला देवून तिच्या उदनिर्वाचा पश्न त्यांच्याकडून सोडवला होता.लहानपणी आम्ही जास्त दुध लागलं तर शालूच्या घरी जावून आणायचो,हीच माझी शालूशी ओळख.त्यानंतर शालूला आजीआजोबांनी मुंबईला कॉलेजपर्यंतचं शिक्षण देवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता येवू दिली होती.
अलिकडे शालू मला एका कॉमन मित्राच्या लग्नात भेटली.ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिच्या वडीलांविषयी विचारलं.
मला म्हणाली
"मी लहान असतानाच आमचे वडिल आम्हाला सोडून घरातून निघून गेले.योगायोगाने अगदी अलिकडेच मला त्यांच एक पत्र आलं.माझा वाढदिवस ऑक्टोबरमधे झाला पण ह्या फेब्रुवारी मला त्यानी शुभेच्छाचं पत्र पाठवलं.माझा जन्मदिवस त्यांच्या कधीच लक्षात नसायचा.माझ्या आईशी त्यांच केव्हांच पटलं नाही.तिच्याशी शेवटचा झालेला एपीसोड हा खरा लकी ठरला.ती त्यांच्या पासून वेगळी झाली.तिच्याकडूनच मी दुसऱ्याला क्षमा करण्यात सुद्धा किती शक्ति असते हे तिच्याच वागण्याकडे पाहून त्या शक्तिवर विश्वास ठेवू लागले."
"तिने त्यांच्या विषयी कधीच तक्रार केली नाही.कधी काळी जर ते घरी आले तर त्यांच्याशी आदराने वागायला मला ती निक्षून सांगायची".
ती म्हणायची
"त्यांनी मला दुःख दिलंय,तुला नाही"
शालू म्हणाली
"नक्कीच मला सुद्धा त्यानी कधी कधी त्रास दिला आहे.माझ्या कॉलेजमधे येवून मझ्याजवळ पैसे मागायचे.आईला दुषणे द्दयायचे,माझ्या डिग्री समारंभाला मी त्याना बोलावलं नाही म्हणून त्याना राग पण आला होता.असं असलं तरी ते माझे वडिलच होते.ते आजारी झाले की मी त्यांची चौकशी करायची."
मी म्हणालो
"असले विचार फक्त मुलीच करू शकतात.मला वाटतं परमेश्वरानें स्त्रीजातीला हा मोठा गुणच दिला आहे."
त्यावर शालू म्हणाली
"मी त्यांची कधीच अवहेलना केली नाही.कारण कदाचित मी त्यांच्यावर कधीच प्रेम कलं नसेल. बहूदा माझं ज्यावेळी प्रेम करायचं वंय होतं त्यावेळी ते कधीच माझ्या जवळ नव्ह्ते. परंतु,वडिलांची उपेक्षा मी कधीच केली नाही. कदाचित माझे आजीआजोबा माझ्याजवळ होते म्हणून असेल.त्यानी मला लहान मुलांचे खेळ शिकवले. कुणी म्हणत हे सर्व वडलांकडून होणं चांगलं.पण मी म्हणते माझं आयुष्य आनंदात आणि आजीआजोबांच्या प्रेमात गेलं हे ही काही कमी नव्हतं."
मी म्हणालो
"पण तू जास्त करून तुझ्या वडिलांसारखीच दिसतेस."
शालूला हे ऐकून खूप बरं वाटलं.
ती म्हणाली
" हो! बऱ्याच दृष्टीने मी वडिलांचीच मुलगी आहे.माझी उंची,माझे डोळे, आणि माझे अकालनीय केस पिकणे.तसंच त्यांचा अनाकारण हट्टीपणा,आणि क्वचित वेळांचिडखोरपणा.पण मला त्यांची महत्वाकांशा आणि व्यवहारीपणा पण आला आहे."
"मी वकिल असून सुद्धा त्यांना जरुरीच्यावेळी मदत करू शकले नाही म्हणून माझा त्यांनी थोडे दिवस संबंधपण सोडला होता.मी त्यांच्या भावना ओळखू शकते.पण मी त्यांना बळी गेले नाही.आता ते माझ्याशी पुन्हा संबंध जोडू मागतात.मी पण तयार आहे.माझ्या सबंध आयुष्यात माझ्या वडिलानी माझ्या जवळ खूप गोष्टी मागितल्या पण क्षमा कधीही मागतली नाही.मी ती त्यांना ती न मागताच दिली आहे, कारण मी तसं करण्यात विश्वास ठेवते,आणि माझ्या डोक्यावरचा भार पण हलका होतो."

शालूची ही सर्व हकिकत ऐकून माझा तिच्या बद्दल वाटणारा आदर द्विगुणीत झाला.मी तिचा हात माझ्या हातात घेत तिला म्हटलं
"शालू,आपण कधी कधी म्हणतो ’नांवात काय आहे’ पण खरं सांगू,तुला जरी शालू म्हणतात तरी तुझ्या आईने तुझं मूळ नांव शालिनी ठवलेलं आहे.नांवाप्रमाणे खरंच तुझ्या अंगात शालिनता आहे."
शालू खूप जोराजोरात हंसली.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, February 11, 2008

प्रो.देसायांचा उद्वेग......

प्रो.देसायांचा उद्वेग......


काल प्रो.देसाई मला तळ्यावर भेटले.मला म्हणाले
"काय हा अत्याचार चालला आहे या जगात?आपण आपल्याला माणसं समजतो पण माणूसकी म्हणून काय राहिलीच नाही."
मी म्हणालो
"भाऊसाहेब आज कसल्या विषयावर मला लेक्चर द्दयायचं ठरवलंय? कळलं मला, पेपरातल्या बातम्या वाचून तुमचं मन उद्विग्न झालेलं दिसतंय."
मला म्हणाले
" मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगतो.तुम्हाला माझा विचार कसा वाटतो ते सांगा"
मी मनात म्हटलं भाऊसाहेब आपल्या मुळ पदावर गेलेले दिसतात.प्रोफेसर नां!.ते पुढे म्हणाले
" ज्यावेळी आपण जनावराना पाळीव करायला लागलो, त्याला आता दहा हजारच्या वरती वर्ष झाली असतील. त्यावेळ पासून आपण ईतर जगातले प्राणी आणि आपण माणूस ह्यात एक प्रकारचा वेगळेपणा दाखवायला सुरवात केली."
मी म्हणालो
"भाऊसाहेब तुम्ही आज मला बहुतेक प्राण्यावर लेक्चर देणार दिसतं."
जरा विचारात पडले आणि मग म्हणाले
" प्राण्यांकडून आपण माणसानी काय शिकलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय.माणसाने ह्या सर्व प्राण्यावर आपली सुप्रीमसी लादण्याचा प्रयत्न करीत, तो प्रयत्न अजून पर्यंत टिकून ठेवला आहे.ह्या जनावरांवर आपण माणसाने त्यांच्या अंगात असलेल्या गुणांचा दुर्लक्ष केलाच आणि त्याउप्पर त्यांच्यावर अत्याचार पण करीत आहोत.आणि ते सुद्धा हजारो वर्षे असं करीत आहो.आणि एखाद्दया माणसाचा अपमान करताना त्याला आपण "तू जनावर आहेस " अशी संबोधना करतो."
आंवढा गिळून पुढे म्हणाले
" जनावरांचे विजेते आणि ईतिहासाचे लेखक आपण, जनावराना ’ कृर,दुष्ट आणि अत्याचारी’ संभोधतो.आणि स्वतःला ’कनवाळू,बुद्धिवान आणि सुसंकृत’ समजतो.जनावरं जर बोलू लागली तर निराळीच गोष्ट ऐकायला मिळेल.माणासाने जर स्वतःला तोलून पाहिलं,आपण किती वर पर्यंत चढू शकतो,किती जोरात पळू शकतो, किती बारीक ऐकू शकतो,तर नक्कीच लक्षात येईल की आपण ह्या सर्व बाबतीत खूपच अपुरे पडतो."
आणखी मनोरंजक माहिती देत प्रोफेसर पुढे म्हणाले
" एखाद्दया जनावरांकडॆ तुम्ही बारकाईने बघीतलंत तर तुम्हाला कळेल,तुम्ही त्याच्या तोंडातला घांस काढून घ्यायला गेलात तरच ते तुमच्या अंगावर येईल,तुम्हाला चावायचा प्रयत्न करील.तुम्ही त्याच्या वाटेला गेला नाहीत तर तुमच्या भानगडीत पण पडणार नाही. ते अन्नाचा सांठा करून ठेवणार नाही.आपले पोट भरल्यावर कुणी का उरलेले अन्न खाईना त्याची कदर ते करणार नाही.एकदा पोटभरल्यावर तृप्त होवून निघून जाईल.हे सर्व गुण जनावराला निसर्गानेच दिले आहेत ना?मग माणसाने आपल्या वागणुकीकडे जरा डोकावून पाहिल्यास,कदाचित माणसालाच कुणी तरी जनावर म्हणण्याच्या लायकीचा माणूस नाही काय?"
प्रोफेसर बोलण्यात एव्ह्डे दंग झाले होते की क्लासात मी एकटाच आहे हे ते विसरून गेले असावेत.जरा फारमातच आले होते.
जरा खाकरून म्हणाले
"ह्या जनावरांची एखाद्दयाने जवळून पारख केली तर ज्यांच्या वर आपण अन्याय आणि अत्याचार केले त्यांची सभ्यता आणि उमदेपणा पाहून प्रभावीत होताना,गायीचा सौम्यपणा,कुत्र्याचा सामावून घेण्याचा गुण,बकरीचा साधेपणा, कुक्कुटाचा संभाळ करण्याचा गुण,गाढवाची सहनशिलता,शांतीने एकत्र राहण्याचा मेंढ्यांचा गुण, सश्याचा मैत्री ठेवण्याचा गुण,कुटुंबवत्सल बगळे,मांजराचासेल्फ कॉनफीडन्स,टर्कीचा जागृत रहाण्याचा गुण,तल्लखबुद्धि,स्नेह,आणि प्राणामिकपणा कुत्र्याचा आणि डुक्कराचा गुण पाहून छोटीशी लाज ठेवून राहिल्यास भला माणूस म्हणून घ्यायला काय अडचण आहे?"
एव्हडं बोलून झाल्यावर प्रोफेसर खूपच भावनावश झालेले पाहून मी म्हणालो
"भाऊसाहेब,तुम्ही खूपच मनाला लावून घेता,अहो हे असंच चालायचंच.शंभर टक्के समाजात नऊव्वद टक्के असलेच लोक असले तरी दहा टक्के तुम्हाला हवे तसे नक्कीच असणार नाही तर हा जगन्नाथाचा रथ चालला नसता."
माझा विचार प्रोफेसराना पटलेला भासला


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, February 9, 2008

दुःख मनातले जाईल वाया

दुःख मनातले जाईल वाया


अंग तुझे चंदनासम
मन तुझे दोलायम
कुणी नका देवू दोष मला
जर झालो मी हिचा दिवाना

तुझी देहयष्टी भावलेली
तुझे नयन काजळलेले
सिंदुरबिंब तुझ्या माथ्यावरी
लाल निखारे ओठावरती
जरी कुणावरी पडॆ छाया
दुःख मनातले जाईल वाया

तू सुंदर तनाची सुंदर मनाची
मुर्ती असे तुझी सुंदरतेची
जरुरी आहे आज मला तुझी
किती करू मी तुझी अपेक्षा
ना होई सहन यापुढे प्रतीक्षा


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, February 7, 2008

मासे पण शिकवतात

मासे पण शिकवतात


"आयुष्यात येणाऱ्या अडचणीना सामोरं कसं जायचं हे पाण्यातल्या प्रवाहाबरोबरच्या भोंवऱ्यात तरंगून आपला जीव कसा वाचवावा हे समजणाऱ्या माश्याकडून मी शिकलो" हे दत्तुचे शब्द माझ्या चांगलेच लक्षात राहिले आहेत.

त्याचं असं झालं त्यावेळी आम्ही वरसोवाला राहत होतो.आमच्या घराजवळ "फिशरीज रिसर्च इंन्सटीट्युट" आहे.एकदां मला त्यांच्या डिग्री समारंभाच्या कार्यक्रमाला आमंतत्रण होतं. त्या गर्दीत मला एक ओळखीचा चेहरा दिसला.त्याला ओळख विचारावी म्हणून त्याच्या जवळ जावून मी प्रश्न विचारण्याचं साहस केलं
"काय रे तू घोडग्यांचा दत्तु का?"
तो म्हणाला
"होय. मी पण तुम्हाला त्यावेळीच ओळखलं, ज्यावेळी तुम्ही आमच्या डायरेक्टरशी गप्पा मारत होता.पण तुम्हाला विचारायचं धारीष्ट केलं नाही.बरं झालं तुम्हीच मला विचारलंत ते"
आणि ह्या नंतर आमचा सहवास वाढत गेला.आणि आम्ही एकमेकाला वरचेवर भेटत होतो.

दत्तु आणि मी वेंगुर्ल्याला एकाच शाळेत शिकत होतो. तसा दत्तु मला खूपच ज्युनीअर होता.पुढच्या शिक्षणासाठी जसा मी मुंबईला आलो तसा दत्तु आणि त्याचे आईवडील त्याच्याही शिक्षणासाठी मुंबईत शिफ्ट झाले.
एकदा दत्तु माझ्या घरी जेवायला आला असता आपली माहिती सांगू लागला.
"माझ्या वडीलानी मुंबईला गिरगांवला खोताच्या वाडीत एक घरगुती खानावळ काढली होती.आणि त्यावेळी मी प्रभुसेमीनरी मधे शिकत होतो.त्यानंतर मी एलफिनस्टन कॉलेजनधे पुढचं शिक्षण घेवून एम.एससी झालो.आणि आता फिशरीज मधे पीएचडी केलं."
चहाचा कप वर उचलून बशीत चहा ओतत दत्तू सांगत होता.
"आपल्या माणसाच्या घरी बशीतून चहा भुरकायला बरं वाटतं.तुमच्याकडे कसला शिष्टाचार? "
असं म्हणत हंसत हंसत पुढे सांगू लागला.
"मी आणि माझे वडील दर रविवारी ’भाऊच्या धक्क्यावर’ समुद्रातून मासे पकडण्याचा छंद म्हणून जात असायचो. माझ्या गळाला पहिला मासा लागला त्यावेळी किती आनंद मला झाला म्हणून सांगू?" मी त्याला विचारलं "तुला फिशरीज रिसर्चचं बाळकडू ह्यामुळेच मिळालं का?" "ऐका तर खरं " असं म्हणत दत्तू पुढे सांगू लागला." पाण्याचा सागर दिसला की माझं मन निरनिराळ्या माशांसाठी वेडं होतं.त्याचं जास्त श्रेय माझ्या वडीलांचच आहे."

दत्तू तसा कोळी ज्ञातीतला.त्यामुळे गावाला सुद्धा ते कोळीवाड्यातच राहायचे.मोठ मोठे खपाटे घेवून दत्तूचे आजोबा आणि वाडवडील मांडवीवर मासे मारी साठी जायचे.
"माझी आयुष्यातली महत्वाची वेळ माझ्या वडीलांबरोबर मासे गळाने पकडण्यात गेली.पण माझ्या वडीलांच्या स्वभावाला दुसरा कांगोरा होता.ते चटकन रागवायचे.कधी कधी एकदम रागावून मला मारायचे.रागच्याभरात त्याना फक्त त्यांचीच बाजू खरी वाटायची.माझी बाजू ऐकून घ्यायची त्यांची तयारीच नसायची.पण त्यामुळे मी खचलो नाही,जरा कोडगा झालो,हतबल झालो,आणि थोडा कडवटपणा आला,पण दुसरा रविवार आल्यावर पुर्वीच्या आठवड्याचे सर्व विसरून परत दोघेही गळ घेवून जायचो."
दत्तु पुढे सांगत होता.
" काही वर्षानंतर माशां वरची माझी आवड जागृत ठेवूनमी ग्रॅज्युएट झालो. मी नेहमीच चांगला विद्दयार्थी म्हणून राहिलो.पण नेहमीच मी असुरक्षतेचा बळी राहिलो.मला कसलाच भरंवसा राहिला नाही.जणू माझ्यातून भरंवसाउचकून काढला गेला.माझा मार्ग मी शोधत राहिलो पण चक्कर घेतच राहिल्यानं सर्व शक्तिचे निराकरण झालं."
नंतर अगदी आनंदात येवून तो पुढे म्हणाला
" एका रात्री जणू ’नवलची घडले’,मी मासा खवळत्या पाण्यात कसा पोहतो यावर संशोधन करत असता, असं दिसून आलं की माशांना खवळत्या प्रवाहात सुद्धा पाण्याच्या भोंवऱ्यात स्नायुंचा कमीत कमी वापर करून तरंगण्याची क्षमता असते. माझ्या एकाएकी एक लक्षात आलं की अडचणी पण एखद्दयाला कमी धडपड करायला मदत करतात.आणि ह्याचेच आकलन होण्याची जरूरी मला फार दिवसापासून होती."
अगदी अभिमानाने दत्तु पुढे म्हणाला.
" माझ्या संशोधनावर मी खूप मेहनत घेवून मग मी पीएचडीसाठी युनिव्हर्सीटीमधे माझा थीसीस सादर केला.तो डिग्री देण्याचा समारंभ होता.
त्या ढगाळ संध्याकाळी माझे आईवडील वेळात वेळ काढून आले आणि माझ्या बाजूला उभे राहून माझा हात आपल्या हातात घेवून मी डिग्री घेताना मला जणू आशिर्वाद देत होते."
आपले डोळे पुसत दत्तु पुढे म्हणाला
" मला वाटतं,माझ्या आयुष्यातल्या अडचणीना मी सामोरे जाण्यासाठी मला त्यांच्याशी दोन हात न करता,त्याना वाट देवून बाजूला होणं जमू शकलं.प्रवाहाबरोबर जाण्याचं आणि भोंवऱ्यात मिळाल्यावर तरंगून घेणं, मी माशाकडून शिकलो. दुसऱ्या बद्दल कटुता न ठेवता मी जगायला शिकलो.एखाद्दयाला माफ करण्याच्या प्रकारापासून हे निराळं आहे. आयुष्यातल्या होणाऱ्या घटनांची व्याख्या मी अशा पद्धतीत करतो,आणि सामोरा जातो."
तो क्षणभर गप्प झाल्यावर,मी त्याला जवळ घेतलं,आणि म्हणालो
"पीएचडी होण्याच्या लायकीचाच आहेस."


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, February 4, 2008

सुखाचा शोध

सुखाचा शोध


"सुखी राहण्याच्या परिस्थितीची नुसती ईच्छा करून चालत नाही,किंवा ती परिस्थिती एक नशिबाने घडणारी गोष्ट म्हणून तिच्याकडे मनाची एकाग्रता करून चालत नाही."

मला वाटतं,आपल्या सुखाची परिस्थिती निर्माण करण्याची आपल्याच अंगात ताकद असते.ही जादू जगात
मनुष्य करू शकतो.सर्व साधारण जीवन हे पण एक असाधारण असतं.

एकदा,मी माझ्या घरातल्या खिडकीत बसून बाहेर बघत बसलो होतो.
"जीवनात ही घडी अशीच राहू दे.
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे"

हे आशाचं गाणं रेडिओवर लागलं होतं.ते गाणे ऐकण्यात तल्लीन असताना मनात विचार आला की आपण किती सुखी आहो.एव्हड्यात बाहेरच्या बसस्टॉप वरती एक गरीब जोडपं भर पावसात एकमेकाला खेटून उभं राहून ओलं होवू नये म्हणून खटाटोप करीत होतं त्यांच्यावर माझी नजर गेली.थंडीची त्यांना हुडहुडी भरली होती. बरीचशी ती दोघं बेचैन वाटत होती. अंगावर त्यांच्या फुटपाथवर विकत घेतलेले कपडे दिसत
होते."पाणेरी" किंवा तत्सम दुकानातून घेतलेले नव्हते. मला ठाऊक आहे कारण मी त्याच्यातून गेलो होतो. ते जोडपं पावसाच्या पाण्यापासून ओलं न होण्यासाठी एकमेकाला खेटून राहून प्रयत्नांची पराकाष्टा करीत होतं.पण नंतर मी त्यांच्याकडे निरखून पाहिलं तेव्हा ते एकमेकात खुषीने हंसत असताना दिसले.कदाचित एकमेकात विनोद करून हंसत होते.हे बघून मी एकाएकी त्यांच्या बद्दलची आलेली किंव सोडून देवून त्यांचा हेवा करू लागलो.

मनात म्हणालो काय गंम्मत आहे त्यांना पावसाचा त्रास होत नव्हता,त्यांच्या त्या तसल्या कपड्यांबद्दल त्यांना कसलाच त्रागा नव्हता,मी घरात आरामात बसलोय याचा पण त्यांना हेवा वाटत नव्हता.क्षणभर वाटलं त्यांच्या सारखं सुखी व्हावं.तो एक क्षण मला एक घटके सारखा वाटला.त्या क्षणात मला दिसून आलं की माझ्या सहानभुतीची त्यांना जरुरी भासली नाही,मला वाटलं होतं की त्यांना खूप कष्ट होत असतील पण तसं नव्हतं.आणि नंतर माझ्या चांगलच लक्षात आलं,आपल्याला आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण करण्याची प्रचंड ताकद आहे.मला वाटतं,आपण सगळे हे करू शकतो.जीवन जगतानाच आयुष्याच्या संदर्भाने सुखी राहता येतं. सुखी राहण्याच्या परिस्थितीची नुसती ईच्छा करून चालत नाही, किंवा ती परिस्थिती एक नशिबाने घडणारी गोष्ट म्हणून तिच्याकडे मनाची एकाग्रता करून चालत नाही. आपल्याच मनाच्या ताकदीने आपलीच आपल्याला मदत होवू शकते.सुखाचा शोध करू शकतो.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, February 3, 2008

मला वाटतं.........

मला वाटतं……
बरेच लोक आग्रह करतात की प्रत्येकाने दुसऱ्याकडे चांगल्या दृष्टीने (पॉझीटीव्ह ऍटीट्युडने) पहावं,जरी संबंध वाकडे येऊ लागले तरी ही.
हाच मार्ग प्रत्येकाला सुखी,समृद्ध आणि सौष्टव करतो.पण मुद्दा असा आहे की अशा परिस्थितीला सामोरं जाता आलं नाही की मनाला जरा धक्का बसतो.
प्रथम, पाडाव होत असल्याने थोडं वाईट वाटतंच,शिवाय हंसतमुख राहून जणू काहीच झालं नाही असा दृष्टीकोन ठेवायला जरा जड जातं किंवा मन कष्टी होतं.कदाचीत प्रत्येक वेळी काहीच झालं नाही असं होतही नसेल.
मला वाटतं, एकच मार्ग बरोबर असतो, असं पत्करून ह्या जीवनातले कष्टी समस्या सोडवता येणार नाहीत. प्रत्येकाची विचारपातळी वेगळी वेगळी असते,आणि आप-आपल्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्नास अटकाव आल्यास मग ते चांगल्या दृष्टीने अथवा वाईट दृष्टीने पाहीलं तरी योग्य होईल असं नाही.बरेच वेळा अशा दुर्धर परिस्थितीत प्रत्येकाला थोडं दुःखी कष्टी वाटतं. पण असं वाटणं म्हणजे काही मानसिक आजार नव्हे. जीवनात अडचणी येतात आणि प्रत्येक वेळी सुखी होता आलं नाही तरी ठिक आहे.
असंच एकदा एकाला ह्याचा पडतळा झाला.एकदा त्याला फ्लु झाला. डोकं खूपच दुखूं लागलं,बरेच आठवडे ते राहिलं.एका न्युरॉलाजीस्टने त्याला सांगितलं की त्या थंडीच्या दिवसात ह्या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच लोकाना मेंदुच्या रोगात झाला.पण त्याला त्याने विश्वासात घेऊन सांगितलं की,
“त्यातून तू बचणार आहेस”.
परंतु त्या रुग्णाला बरेच आठवडे ह्यामुळे मानसिक कष्ट झाले.त्याला वाटलं की त्याला ब्रेन ट्युमर किंवा सिझोफ्रेनीया झाला. समजुतदार व्यक्ति असून सुद्धा त्याला जमलं नाही.तो भावनाभ्रष्ट झाला होता.
नशिबानं,त्याने एका सायक्याट्रीस्ट मित्राला विचारलं,की तो खराच सिझोफ्रेनीक आहे का?.
तो म्हणाला
”नाही,तू फक्त गोंधळला आहेस,पण कसला मानसिक रुग्ण नाहीस. तू घाबरला आहेस एव्हडंच”
तो सायक्याट्रीस्टला म्हणाला
” माझे दोन मित्र मला आनंदी राहण्याचा आग्रह करतात.मी एक आठवडा तसा राहण्याचा प्रयत्न केला.पण त्याने उलट मी जास्त दुःखी झालो.”
तो त्यावर म्हणाला
“तू तुझ्या मित्रांना सांग,मी जास्त आनंदी राहावं असं मला वाटतं, पण सध्या आनंदी राहायलाच मी घाबरलो आहे.माझं हे घाबरणं नाहीसं झालं की मी तुम्हाला सांगीन.”
असा निरोप दिल्यावर त्याला जरा बरं वाटलं.त्याने त्याचाच मार्ग पत्करल्याने त्याला बरं वाटू लागलं.त्याचा गोंधळ त्याने त्याच्याच मार्गाने सोडवत गेल्याने त्याला असं दिसून आलं की नेहमीच माणसाने चांगला दृष्टीकोन ठेवून राहिलं पाहीजे, ह्या कल्पनेनेच तो घाबरला होता.
तात्पर्य काय तर ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या सारखं असावं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, February 2, 2008

तुजसम नाही पाहिली दुसरी

तुजसम नाही पाहिली दुसरी


पाहिल्या मी अनेक सुंदरी
परी
तुजसम नाही पाहिली दुसरी
हा देखणा चेहरा
हा नजरेतून बहाणा
हा मेघा सम केशभार
ही नयनातली विज
दे शिक्षा तू सत्वरी
तुज सम नाही पाहिली दुसरी

तू ही सुंदर सुंदरही ऋतु
मन माझे नसे काबू
मार्ग मोकळे
धडके अंतर सगळे
मदिरेविण नशा अंतरी
तुजसम नाही पाहिली दुसरी

जरी रोखीशी तुझे भाषण
येवो ना मला कधीही मरण
असशी तू परी अथवा सुंदर
का होशी एव्हडी मगरूर
ऐक कुणाचे थोडे तरी
पाहिल्या मी अनेक सुंदरी
परी
तुजसम नाही पाहिली दुसरी


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com