Wednesday, June 29, 2011

टरबूजाची गोष्ट.



“आजुबाजूच्या जगातलं, जसं त्यांना साध्या गोष्टीतून, आनंद आणि सौन्दर्य सापडायचं तसंच ते वर आकाशाकडे बघून सौन्दर्य-करत्या विधात्याचा गौरवही करायचे.”

ज्यांना टरबु्ज-कुणी खरबूजही म्हणतात-खूप आवडायचं,”माझा साष्टांग नमस्कार तुला” ही त्यानीच रचलेल्या कवितेची ओळ म्हणायला आवडायचं,आणि शहरात वकीलीचं शिक्षण घेतलं असल्याने,सुधारलेला पेहराव म्हणून पॅन्ट नेसायला आवडायचं,पॅन्ट त्यांच्या पोटावरच्या बेंबीच्यावर सहाईंच ओढून नेसायचे,त्या माझ्या निर्वतलेल्या आजोबांना नेहमीच वाटणार्‍या आनंदाविषयी मला विशेष वाटायचं.

माझे आजोबा पंचाण्ण्व वर्षं जगले.खायला,गायला आणि पॅन्ट वर ओढून नेसायला त्यांना भरपूर आयुष्य मिळालं.तरीसुद्धा जांभळ्या रंगाची पॅन्ट ते एंशी वयाचे होई तोपर्यंत वापरत नसायचे.आणि त्यानंतर त्यांच्या जांभळ्या रंगाच्याच दोन पॅन्ट्स नेसायला असायच्या.तोपर्यंत,माझी आई सांगायची,
“ते भारी झकपक,फॅशनेबल पोषाख करणारे होते.”
तिला हे माहित असायचं.
“तात्या आजगावकर” माझ्या आईचे वडील.माझे आजोबा.
जेवढा काळ मी त्यांच्या सहवासात होतो, जीवनावर प्रेम कसं करायचं आणि जीवन मजेत कसं जगायचं, हे इतर कुणाहीपेक्षा मला त्यांनी शिकवलं.

त्यांच्या उतार वयात,तात्या आजगांवकर गावातल्या आठवड्याच्या बाजारात जाण्यात विशेष आवड दाखवण्यापेक्षा ते काही वस्तु घेण्यात जास्त आवड दाखवायचे.काहीही वस्तु घेऊ देत,तात्या आजगावकर, न चुकता टरबूज घेऊन यायचे.ह्या लक्षणीय गोष्टीत ते मश्गुल व्हायचे हे पाहून आजुबाजूच्याना, जरा विलक्षण वाटायचं.जास्तीत जास्त लोक सांगायचे की त्यांना असं कधीही टरबूज सापडलं नाही की ते त्यांना आवडलं नाही.प्रत्येक नवं टरबूज त्यांना पहिल्यापेक्षा जास्त चवदार वाटायचं.एखादा शक्की म्हणेल की हे अशक्य आहे.एकदातरी सर्वात उत्तम चवदार टरबूज मिळून गेल्यावर नंतरचं खचीतच कमी चवदार निघावं.पण हे खरं नाही.

तात्या आजगावकरना खरोखरंच प्रत्यक्ष टरबूज जास्त भावायचं असं नाही,फक्त ते चवदार एव्हड्यासाठीच वाटायचं कारण ते खाताना त्यांची मनोभावना तशी असायची.त्यांना ते चांगलंच असायला हवं होतं,आणि ते चांगलंच असणार असं ते स्वतःला सांगत असावेत.असं करण्यामुळेच ते स्वतःची खात्री करायचे की ते चवदारच असणार.प्रत्येक बाबतीत त्यातलं सौन्दर्य पहाण्याच्या इच्छेमुळे माझे आजोबा, तात्या आजगावकर,जमेल तेव्हडं शोधून पहाण्यासारखं मजेदार जीवन जगले.

तात्या आजगावकरांच्या जीवनातल्या आनंदाचा आणि दिलाश्याचा आणखी एक उगम म्हणजे, देवाला ते आपल्याच लिहिलेल्या गीतातून गाऊन दाखवायचे.
“हे ब्रम्हांडकरत्या,किती असशी तू महान”
प्रार्थनेचे शब्द साधे आणि सूंदर होते.

“हे विधात्या,ब्रम्हांडकरत्या
किती असशी तू महान
अद्भूत चमत्कार करून
घडविलेस विश्व दोन्ही करातून
आकाश, सूर्य,चंद्र, तारे निर्मून
वीजा चमकवून अन गडगडून
दाविशी तव शक्ती विश्वाला
माझा साष्टांग नमस्कार तुला”

माझ्या आजोबाना,तात्या आजगांवकराना,ईश्वराच्या गौरवातून आनंद मिळायचा.जरी जीवन कष्टप्राय असलं तरी त्यांचा मुक्तिदाता,त्यांचा त्राता त्यांच्याबरोबर तिथेच असायचा.तात्या आजगावकर ही वास्तविकता लक्षात ठेवून असायचे.
हे त्यांनीच लिहिलेलं गीत तात्या आजगावकरांचं जीवन आणि वारसा प्रतिबिंबित करायचं.
आजुबाजूच्या जगातलं, जसं त्यांना साध्या गोष्टीतून, आनंद आणि सौन्दर्य सापडायचं तसंच ते वर आकाशाकडे बघून सौन्दर्य-करत्या विधात्याचा गौरवही करायचे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्नीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, June 20, 2011

जाळीमंदी पिकली करवंदं.



“पुसून अश्रू माझे त्याने
हसून बोलला तो पून्हा एकदा
करतो प्रेम मी
तुमच्यावर सदासर्वदा”

मला आठवतं मी आणि माझे वडील माझ्या लहानपणी जून महिन्यात खानोलीच्या घाटीवर चढून जाऊन करवंदं गोळा करायचो.आज शहरातल्या बाजारात एक बाई टोपलीभरून करावंदं विकायला बसली होती.ती पाहून मी, आठ-दहा वर्षाचा असतानाच्या, जीवनातून माझ्या स्मृती जागृत करायला लागलो.मी पुन्हा आठ वर्षाचा व्ह्यायचा प्रयत्न केला.आणि क्षणभर का होईना आनंदात डुबून गेलो.

कोकणात आमच्या घरातून बाहेर पडल्यावर पोस्टाच्या गल्लीत प्रथम वळावं लागायचं.पोस्टाची जागा घाटीच्या पायथ्याशी होती.त्यामुळे पोस्ट संपल्यावर दमाने घ्यावं लागायचं.घाटीची सुरवात होता,होता करवंदाची झुडपं दिसायला लागायची.वस्तीच्या जवळ असल्याने ह्या झुडपावरची फळं कधीच खुडायला मिळायची नाहीत.पोस्टात येणारे लोक,पोस्टात काम करणारे लोक करावंदासाठी आकर्षित व्हायचे.

माझ्या वडलांचा जन्म दिवस जून महिन्यातला.त्यावेळी फादर्स-डे असला काही प्रकार नसायचा.पण आता जून महिन्यातला करवंदांचा बहर पाहिल्यावर माझ्या वडलांच्या जन्म-महिन्याची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

आम्ही दोघं लांब हाताचे शर्ट घालून करवंदं काढायला जायचो.
करवंदांच्या झुडपात डहाळ्याना बरेच काटे असतात.आतली करवंदं खुडायला हात घातल्यावर काट्यामुळे सबंध हाताला चरे यायचे.कधीकधी रक्त दिसायचं.माझे वडील त्यावेळी आयोडीन सारखं औषध बरोबर घेऊन यायचे. एक दोन नव्हे तर पाच पंचवीस झुडपातून टोपलीभरून करवंदं खुडायची झाल्यास तेव्हडं खरचटायला होणं स्वाभाविक असायचं.पण मजा यायची.करवंदं भरून घेण्यास आम्ही गोणपाटाची पिशवी न्यायचो.त्यात करवंदं
चिरडली जायची नाहीत.

घाटी चढून जाताना ताज्या,रसबाळ,टपोरी करवंदाच्या झुडपाची झुडप माझी आणि माझ्या वडीलांच्या मालकीची आहेत असं आम्ही समजूत करून घ्यायचो.खरंतर डोंगरावरच्या झाडाची मालकी कुणाचीच नसायची.आणि आमच्यासारखे करवंदं गोळा करायला कुणी क्वचीतच यायचे.झुडपात करवंदं पाहिल्यावर लालसर रंगाची करवंदं सहज दिसायची.पण ती खायला आंबट असायची. अगदी झुडपाच्या आत काळीकुट्ट आणि कधीकधी वांगी रंगाची करवंदं दिसायची.त्याचबरोबर जिथे वांगी रंगाची फळ दिसायची त्याच्या जवळ काळी फळं नक्कीच असायची.काळी करवंदं अतिशय गोड लागायची.

मला मात्र जास्त न पिकलेली वांगी रंगाची फळं आवडायची.ती गोड-आंबट चवीला लागायची.करवंदं हातात फुटल्यावर हाताचा तळवा जांभळा व्हायचा आणि तोंडात टाकल्यावर जीभ तशीच लाल जांभळी दिसायची. करवंदाचा रस गोड आणि मिरमिरीत लागायचा.

करवंदं काढताना हाताला जरी चर्‍या आल्या तरी गोणपाटाची पिशवी भरली जायची ह्याचं समाधान वाटायचं.घरी आणून पिशवी मी माझ्या धाकट्या बहिणी जवळ द्यायचो.चिमटलेली फळं बाजूला करून गार पाण्यात उरलेली फळं धुऊन ती सर्व करवंदं माझी बहिण माझ्या आईकडे द्यायची.माझी आई त्यातही कच्ची असलेली फळं निवडून ती कापून त्याला मीठ-तिखट लावून त्याची करमट करायची.ती करमट खायला पण मस्त मजा यायची.मी लहानपणी माझ्या बहिणीबरोबर,”कोंबडा की कोंबडी” हा खेळ खेळायचो.प्रत्येकाच्या वाटयाला आलेल्या करवंदातून एकाने आपल्याकडच्या करवंदाचा चावा घेऊन ते आतून लालबुंद आहे की फिके आहे ते पहाण्यापूर्वी दुसरा ते काय असेल याचं भाकीत करायचा.कोंबडा म्हणजे लाल रंग आणि कोंबडी म्हणजे फिका रंग.ज्याचं भाकीत चुकेल त्याने समोरच्याला आपल्या वाट्यातलं करवंद द्यायचं.माझी बहिण नेहमीच हरायची. कारण मी माझ्या वडलांबरोबर करवंदं खुडायला जात असल्याने करवंदाच्या बाहेरच्या रंगावरून मला ते आतून लाल असणार की फिकं हे बरेच वेळा हटकून समजायचं.

आम्ही शहरात रहायला आलो तरी मी आणि माझे वडील खानोलीच्या घाटीवर जून महिन्यात करवंदं खुडायला यायचो.
नंतर काही वर्ष आम्हाला तिकडे जाता आलं नाही.अलीकडे मी घाटी चढून गेलो होतो.पूर्वी सारखं काही राहिलं नव्हतं.झुडपं होती पण करवंदं नसायची.
वरदळ वाढल्याने जो तो फळं काढून फस्त करायचा.पण मी जेव्हा जेव्हा घाटी चढून जातो तेव्हा तेव्हा माझं लहानपण अजून तिथेच आहे असं मला वाटतं.आणि ते नेहमीच तिकडे असणार.

मला वाटतं प्रत्येकाने मोठं होत रहाणं आवश्यक आहेच आहे.पण मागे लहानपण सोडून जाऊ नये.ह्या साध्यासुध्या आठवणीतून मिळणार्‍या असली आनंदाचा आणि सु्खाचा मी कधीही विसर पडू देणार नाही.ह्या लहान लहान गोष्टीचं आलोकन करायला मला आवडतं.त्यातल्या बारीकसारीक गोष्टीच मला आनंद देतात.कारण त्याही साध्या असतात.मोठ्या वयात येणार्‍या तणावपूर्ण आणि खिचकट जबाबदार्‍या जीवन कष्टप्रद करतात.

मोठं होऊ नये असं मला मुळीच म्हणायचं नाही. लहानपण्याल्या निरागस,निष्पाप आठवणी, जीवनाचा अंत येईपर्यंत सुखात ठेवतात असं मला म्हणायचं आहे.
आज फादर्स-डे असल्याने करवंदाच्या जाळीकडे मी माझ्या वडीलांबरोबर जायचो ते आठवलं.ते माझ्याशी कसे वागायचे तेही आठवलं, आणि त्याबरोबर नव्या धकाधकीच्या जमान्यात मी माझ्या मुलाकडे कसा वागतो तेही आठवलं.

वाटेत एका अनोळख्याला
जवळ जवळ आपटलो
“माफ करा”असे म्हणून मी
त्याच्या पासून सटकलो

“करा माफ”मला पण
म्हणत थांबला तो क्षणभर
औचित्याच्या वागण्याने
सुखावलो आम्ही दोघे वरवर

आपल्या घरी
स्थिती असते निराळी
लहान थोरासी चटकन
आपण वागतो फटकून

झाली त्यादिवशी एक गम्मत
होतो कामात मी दंग
चिमुकल्या माझ्या मुलाने
केला माझ्या एकाग्रतेचा भंग

“हो बाजूला”
म्हणालो मी वैतागून
गेला तो निघून
हिरमुसला होऊन
रात्री पडलो
असता बिछान्यात
आला विचार
माझ्या मनात
औचित्याच्या भारा खाली
अमुची रदबदली झाली
वागलो चांगले अनोळख्याशी
अशी समजूत करून
मी घेतली मनाशी

पाहता फुलांच्या पाकळ्या
पडल्या होत्या दाराशी
लाल, पिवळी अन निळी
खुडली होती
फूले त्याने सकाळी
आला होता घेऊन ती हातात
टाकण्या मला आश्चर्यात
आठवून तो प्रसंग पून्हा
वाटे मजकडून झाला गून्हा
जाऊन त्याच्या बिछान्याशी
जवळ घेतले मी त्या उराशी

पुसता फुलांच्या पाकळ्या विषयी
हसला तो मला बिलगूनी
बोले तो मज भारावूनी
“घेऊनी ती सर्व फूले
आलो होतो मी तुमच्याकडे
कारण आजच आहे “फादर्स डे”

मागूनी त्याची माफी
पुटपुटलो मी त्याच्या कानाशी
चूक केली मी सकाळी तुझ्याशी

पुसून अश्रू माझे त्याने
हसून बोलला तो पून्हा एकदा
करतो प्रेम मी
तुमच्यावर सदासर्वदा

रहावे ना मला ते ऐकून
म्हणालो मी ही भारावून

आवडशी तू मला अन
मुकलो मी तुझ्या
आश्चर्याच्या आनंदाला
दिसलास सुंदर तू फुलांमुळे
होते सुंदर तुझे ते फूल निळे

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, June 17, 2011

साध्याश्या गोष्टीतून मौज-मजा



“माणूस गर्भ-श्रीमंत असूनही त्याची आनंददायक बाब अल्पमोलाची असू शकते.”

आज सकाळी माझ्या कपात मी कॉफी ओतत होतो.माझ्या नाकाकडे दरवळून येणार्‍या त्या कॉफीच्या सुगंधाबरोबर सहजगत्या,गिळल्या जाणार्‍या त्या कॉफीच्या स्वर्गीय घोटामुळे, होणार्‍या आनंदाची बर्‍यापैकी मौज मी गेली कित्येक वर्ष रोज सकाळी लुटत आलो आहे.कॉफीचा स्वाद घेण्याच्या ह्या सहजचच्या कृतीचा विचार केल्यावर मला लक्षात आलं की ही सामान्य दिसणारी मजा जास्तीत जास्त दिलासा देते आणि जीवनातल्या अडचणी आणि दुःख सहनकरण्याजोगी अंगात क्षमता आणते.

घाई-गर्दीचं जीवन जगताना,नगण्य भासणार्‍या गोष्टी,जशा रुपयाचं नाणं मिळावं आणि लहानपणाची आठवण येऊन त्यावेळी ते खर्च करण्यातला रोमांच आठवावा.
तो रुपया,ओठ आणि टाळा चुरचूरून टाकणारं एखादं,पेय पिण्यात खर्च करायचा की त्या धनाच्या हंड्यातून, रस्त्यावरच्या भय्याच्या गाडीवरून, चार आण्याचा रंगीबेरंगी बर्फाचा गोळा घ्यायचा आणि उरलेल्या पैशातून कोपर्‍यावरच्या मिठाईच्या दुकानातून, पारदर्शक कागदात बांधलेले, बदामी हलव्याचे लाल आणि पिवळे गड्डे घ्यायचे असा संभ्रम व्हायचा.असं ते बालपण आठवायचं.

बरेच आपण साध्याश्या गोष्टीतून मौज-मजा करून घेत नाही-मान्सून चालू झाल्याबरोबर धडाकेबाज ढगांच्या गडगडातून,विजेच्या चकमकेतून,धो,धो पडणार्‍या पावसाच्या सरीतून,समुद्रावर जाऊन मिळणार्‍या मजेतून,किंवा पाऊस थांबायचं नावच घेत नाही असं भासत असताना घरात बसून पाडगांवकरांचा काव्य-संग्रह वाचण्यात दंग होऊन,गरम गरम चहा आणि तिखट कांद्याच्या भज्यांचा आनंद लूटण्यातून.

उलटपक्षी आपण काहीसं निरंतर कर्मोपासना समजून, सेल-फोनचा वापरकरून,लॅप-टॉपचा वापरकरून,किंवा तत्सम उपकरणांचा वापर करून,”स्टार-ट्रेक” मधल्या अर्धा माणूस अर्धं यंत्र असलेल्या काल्पनीक माणसासारखं भासवून जीवन जगतो. आपण आपल्यालाच अतिताण देऊन थकावट आणण्यास कारणीभूत होतो.

अलीकडेच मी कोकणात थोडे दिवस रहायला गेलो होतो.फिरायला म्हणून निघालो होतो.डोक्यात एक विचार आला आणि माझा मीच मनात वाद घालून समस्या कशी सोडवावी ह्याची चिंता करीत होतो.घाटी चढून झाल्यावर आणि उतार आल्यावर संथ वहात जाणारी मोचेमाडची नदी पहाण्यात दंग झालो.बाजूने एक गाडी वेगाने निघून गेली.त्यात परदेशी पर्यटक होते.ते बहुतेक गोव्याला जाण्यासाठी निघाले असावेत.गाडीच्या मागच्या खिडकीत माझं लक्ष गेलं.

एक लॅबरॅडोर जातीचा कुत्रा खिडकीच्या बाहेर डोकं काढून, आपले कान मानेवर फडफडते ठेवून,तोंड आवासून उघडं ठेवून,लांब जीभ, जबड्याच्या एका बाजूला लोंबती ठेवून, बाहेरची मजा लूटण्यात दंग दिसला.त्याचा तो हास्यास्पद वाटणारा चेहरा बघून मीच दात विचकून हसायला लागलो. आणि माझा उत्साह वाढला.मी माझ्या समस्येचा विचार दूर करून, त्या लॅबरेडॉरचा चेहरा आठवून,माझ्या समस्येऐवजी दूर वरून येणार्‍या वार्‍यामधून नदीच्या पाण्यात असलेल्या मास्यामुळे निर्माण झालेला एक प्रकारचा मला आवडणारा सुगंधाचा वास अनुभवून तल्लीन होत होतो,त्या कुत्र्यासारखा.

लहान लहान गोष्टी आपल्या उराशी बाळगून राहिल्याने, महत्वाचं काय आहे आणि त्याच्याशी आपला संबंध काय आहे ह्याची आपल्याला आठवण करून दिली जाते.ह्यामु्ळे कधीकधी आपण विनयशील बनतो-ज्याची आपल्याला वेळोवेळी पुन्हा ओळख करून घेण्याची जरूरी भासत असते.

हल्लीचीच झालेली गोष्ट सांगतो,मी घरी आल्यावर दाराशी एक मोठं पार्सल आणून ठेवलेलं पाहिलं.देवगडचे हापूस आंबे होते हे समजल्यावर मला हसू आलं.
माझी चुलत बहिण,मी शहरात राहत असल्याने, खर्‍या हापूस आंब्याना कसा दूरावतो,हे लक्षात घेऊन कोकणातून दरवर्षी एक आंब्याचं पार्सल पाठवीत असते.माझ्या घराच्या दरवाजावर टेकून ठेवलेलं ते पार्सल पाहून माझ्या मनात माझ्या बहिणीविषयी स्नेहशीलतेची अचानक प्रतिक्रिया उचंबळून आली.माझ्या बहिणीची दयाशीलता आणि औदार्य पाहून तिच्याविषयी आदर द्विगुणीत झाला.

कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं,
“माणूस गर्भ-श्रीमंत असूनही त्याची आनंददायक बाब अल्पमोलाची असू शकते.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 14, 2011

हळदीच्या पानातला पातोळा आणि माझी आजी.



“पण एक मात्र नक्की,मी माझ्या हृदयापासून समजायला लागलो की,एक हळदीच्या पानातला पातोळा आणि प्रेम करणारी माझी आजी जवळ असल्यावर कोणत्याही गोष्टीवर इलाज होऊ शकतो.”

माझ्या आजीची प्रत्येक गोड आठवण,बहुदा आमच्या मालवणी जेवणाशी संबंधित असते.वयाने वाढत असताना,माझ्या मामेभावंडाबरोबर,खेळण्यात आणि कधीकधी त्यातून लहान-मोठी भांडाभांडी करण्यात,लहान वयात सर्वच असं करीत असतात,बराच वेळ जायचा.
असं दिसून यायचं की,आमची आजी घरात काहीनाकाही शिजवत असायची.काहीनाकाही शिजवल्याचा घरात मस्त वास यायचा असं म्हटलं तरी चालेल. मी ज्यावेळी आजीकडे तिच्या घरी तिला भेटायला जायचो त्यावेळी माझ्या तोंडाला पाणी सुटायचं.

प्रत्येक सणवाराला,मला आठवतं,त्यांच्याकडे वेळ घालवायला गेलो असताना,माझ्या माम्या, मावश्या,माझी आई आणि आजी काहीनाकाही विशेष जेवणाचे पदार्थ करण्यात दंग असायची.आमचं जेवणाचं टेबल मस्त मस्त पदार्थांच्या भरभरून थाळ्यानी सजलेलें असायचं.फणसाची भाजी,वालीची भाजी,अळुचं फदफदं,झुणका,उकड्या तांदळाचा भात,डाळीची आमटी….यादी वाढत जायची.
पण माझी आवडती डीश म्हणजे,हळदीच्या पानातल्या पातोळ्या.
तांदळाचं पीठ,ओलं खोबरं,वेलचीपूड,गुळ,मीठ आणि कुणाला काही आवडलं तर जसं अंजीर,खजूर,अक्रोड वगैरे वगैरे घालून केलेलं सारण, तांदळाच्या कालवलेल्या थापटलेल्या पीठात घालून त्याचा हळदीच्या पानात सॅन्डवीच करून, मोदकपात्रात उकडलेल्या पातोळ्या मला खूप आवडाच्या.विशेषकरून हळदीच्या पानाचा सुगंध पातोळे खाताना मस्तच वाटायचा.अनेक पदार्थात पातोळ्या खायला माझा हात प्रथम जायचा.

आम्हा सर्वांचा आजोळी जमण्यात जेवणाचा भाग विशेष असायचा.अलीकडे पूर्वीसारखं ह्या भेटी वरचेवर होत नाहीत.पण ज्यावेळी आम्ही सर्व भेटतो, त्यावेळी जेवण असणारच हे नक्कीच.मला आठवतं त्यावेळी आमचे मामा,ज्या ज्या गोष्टीवर सहमत होऊ शकत नसत त्या सर्व गोष्टीवर वाद घालायचे. फक्त एक गोष्ट सोडून-जेव्हा जेवणाची वेळ यायची तेव्हा सर्वांचा वाद शांत व्हायचा.हे काय प्रकरण आहे हे माझ्या कधीच लक्षात आलं नाही.जेवणात काहीतरी आत्मिक गोष्ट असावी.नुसतच जेवण नव्हे तर प्रेम ओतून केलेलं जेवण.माझी आजी आपलं तनमन घालून हे पदार्थ करायची.ह्यातच मला जीवन जगण्यातला फरक वाटायचा.
अजून,अजून मला हळदीतल्या पानातल्या पातोळ्याबद्दल अचंबा वाटतो.कायतर सारण,तांदळाचं पीठ आणि हळदीची पानं.पण त्याच्यातल्या जादूचं काय?.आजोळला जाण्याची मला ओढ लागायची आणि माझी आजी खासकरून माझ्यासाठी ते करायची.

मला सर्वात बरं वाटायचं जेव्हा माझी आजी मला पातोळ्या देऊन नंतर आपल्याला घेऊन माझ्याबरोबर गप्पा मारायला बसायची. माझ्या आजीकडून,मी लहान असताना,ऐकलेल्या गप्पातल्या शहाणपणाच्या सर्व शब्दानी एक समुद्र भरून जाईल. मला अजून आठवतं,मी बाराएक वर्षाचा असेन. स्वयंपाकाच्या खोलीत तिथे ठेवलेल्या लहानशा टेबलाशी एका लहानश्या खुर्चीवर बसून आजीकडून काहीतरी जीवनातलं वागायचं शहाणपण,किंवा तिचा अनुभव मिळेल याची वाट पहाचो.आणि त्याचबरोबर ती काहीही तयार करीत असलेल्या पदार्थाचा नमुना चाखायला मिळणार याचीही वाट पहायचो.

हळदीच्या पानातल्या पातोळ्यामधे,तो एक पदार्थ असण्यापलीकडे आणखी काहीतरी विशेष असायचं.तो एक सुख-साधनाचा भाग असायचा.पातोळ्याच्या सारणात असलेलं सम्मिश्रण आणि हळदीच्या पानाचा सुगंध,मला आजोळी यायला आकर्षित करायचच,त्याशिवाय,मी कोण आणि कुठून आलो ह्याचंही स्मरण व्हायचं.जगाने माझ्यावर भिरकाऊन दिलेल्या,शारीरीक आणि मानसिक तणावावरचा तो इलाज ठरायचा.

मला आठवतं,मी सतरावर्षाचा झालो आणि अनेक गोष्टीवर विश्वासून रहायला लागलो आणि जीवनाबद्दल माझ्या मताला रुपांतरीत करायला लागलो.पण एक मात्र नक्की,मी माझ्या हृदयापासून समजायला लागलो की,एक हळदीच्या पानातला पातोळा आणि प्रेम करणारी माझी आजी जवळ असल्यावर कोणत्याही गोष्टीवर इलाज होऊ शकतो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, June 11, 2011

ती घाणेरीची फुलं.


Posted: Sun, 12 Jun 2011 00:51:57 +0000

“कधीकधी प्रभावशाली,काळाला थोपवून ठेवणारा,जीवनात परिवर्तन आणणारा क्षण,एखाद्या फुलाच्या अगदी साध्या,कोमल,पाकळीच्या पापुद्र्यात लिपटलेला असतो.”

असंच एकदा मी वाचत असताना, एका ब्लॉग लिहिणार्‍याने अनेक विषयावर जे ब्लॉग लिहिले जातात त्यावर आपलं मत दिलं होतं, ते मत माझ्या वाचनात आलं.सरतेशेवटी त्याला म्हणायचं होतं की अमुकच विषयावर ब्लॉग लिहावेत,आणि अमुक विषयावर ब्लॉग लिहू नयेत.त्याला बर्‍याच वाचकाच्या प्रतिक्रिया आल्या होत्या.मी त्याला नेहमीप्रमाणे कविता लिहून प्रतिक्रिया दिली होती.ती आज मला आठवली.

प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देऊनी सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे

नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
काय वाटेल ते लिहूनी
कर लेखनाची समृद्धी

आणि ह्या कवितेतून आठवायचं विशेष म्हणजे,त्या कवितेतला फुलांचा उल्लेख.त्यातल्यात्यात घाणेरीच्या फुलांचा उल्लेख.
वेळात वेळ काढून घाणेरीची फुलं पहायला,त्यांचा वास घ्यायला मला फार आवडतं.घाणेरीची निरनीराळ्या रंगाची फुलं न्याहाळत रहाण्याची माझी हौस अलीकडे जवळ जवळ संपुष्टात आल्यासारखं झालं आहे.

ही फुलं गुच्छात उमलतात.ही फुलं अतिशय सुंदर दिसत्तात. पण हिची लागवड मुद्दाम कोणी करत नाही.हे कुठेही उगवते आणि माजते.घाणेरी या नावाचा घाणीशी काही संबंध नाही कदाचित सांडपाण्यावर,शेताच्या आजुबाजूने किंवा बांधावर ही आपोआप उगवते म्हणूनच आपण हिला घाणेरी असं नाव दिलं असेल.या झुडपाच्या पानांना विशिष्ट प्रकारचा उग्र वास असल्याने याला घाणेरी म्हणत असावेत असं मला वाटतं.

गुजराथमधे घाणेरीला “चुनडी” असं म्हणतात.गुजराथी लोकांमधे हिच्या अनेकरंगी सुंदर फुलांमुळे हिला “चुनडी” असे नाव आहे असं मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं.
वेगवेगळे रंग किंवा एकाच रंगांची अनेक फुलं अश्या स्वरूपात ही असतात.
पिवळे ठिपके,निळा,पांढरा,लाल,जांभळा लाल ठिपके असे अनेक प्रकार आहेत..शिवाय या फुलांना मुंग्या लागतात.सहाजीकच ह्या फुलात मध असावा.
घाणेरीला कुणी टणटणीही म्हणतात.तिची काळी फळं चविला मधूर असतात.झुडपाची पानं खरखरीत असतात.घाणेरी झुडपांसाठी उत्तम म्हणायला पाहिजे.जनावरं हिची पानं खात नाहीत.अनेक पक्षी ह्या झुडपामधे घरटी बांधतात.त्यावरची फळं खातात.त्यांच्या विष्टेतून घाणेरीचा प्रसार होतो.
कलमं करून लागवड केल्यास बागेत लावायची विविध रंग असलेली रोपं तयार होतात.अमेरिकेत ही झाडं लोक आपल्या बागेत लावतात.ही कमी उंचीची फुलझाडं बागेला अतिशय शोभा देतात.

जीवनातली सहजता आणि सौन्दर्य,प्रौद्योगिक आणि काळ-प्रचलित संस्कृतिच्या भारा खाली अगदी अस्तगत झाल्यासारखी वाटल्यास नवल नाही. जीवनातल्या घाईगर्दीत,माझं नित्याचं अस्तित्वच एव्हडं लयाला गेल्यासारखं झालं आहे की माझ्या मलाच सततचं ध्यानात आणून द्यावं लागतं की,
“बाबरे! जरा सबुरीने घे.जीवनाचा आनंद लूट.”

कधीकधी प्रभावशाली,काळाला थोपवून ठेवणारा,जीवनात परिवर्तन आणणारा क्षण,एखाद्या फुलाच्या अगदी साध्या, कोमल, पाकळीच्या पापुद्र्यात लिपटलेला असतो.
घाणेरीच्या फुलांची गंमत म्हणजे,कोकणात ती कुठेही सापडू शकतात.त्यासाठी जगभर हिंडण्याची गरज भासत नाही.शिवाय मोठ्या कौशल्याने त्यांना जमा करायचीही मला गरज भासत नाही.

घाणेरीचं लहानात लहान फुल एखाद्या नवजात बालकाच्या इवलुश्या पायाच्या इवलुश्या बोटांइतकं चिमुकलं असतं,शिवाय झुडपावरचा सर्व फुलांचा बहरलेला झुपका पाहिल्यावर सूर्यास्तावेळी रंगाने पसरलेल्या पश्चिमेच्या आभाळासारखा दिसतो.तसंच एखाद्या शेताच्या सभोवती कुंपणासाठी ही घाणेरीची झुडपं वापरली जातात त्यावेळी बहरून आलेली त्यावरची ही फुलं पाहून, गावातल्या मैदानात जेव्हा लहान लहान मुलं एकत्र खेळत असताना,पोटभरून हसत असतात त्या त्यांच्या हास्यात मला ही फुलं दिसतात. ह्या फुलांचा बहरून आलेला झुपका किती मोठा आहे किंवा ती झुडपावर कुठच्या जागी बहरलेली आहेत ह्यात काही विशेष वाटत नाही.जिथे मी असेन तिथेच त्यांची मोहकता माझ्या डोळ्यात भरते.

घाणेरीची फुलं शोधून काढायला एव्हडं काही कठीण नसलं तरी ती फुलं अलगत खुडून काढायची असतील तर मात्र गोष्ट निराळी. कोकणात गेल्यावर मला भरपूर वेळ सापडतो.पण त्यावेळी कामात असताना काम आवरतं घेऊन घाणेरीची फुलं जमा करायला जायला जरा कठीण व्हायचं.
तसं पाहिलंत तर ही फुलं दिसायला अगदी साधी-सुधी,त्यामुळे त्यांचा थाटमाट कुणालाही ताबडतोब आकर्षित करून घेईल अशातला भाग नाही.कुणाला तरी मुद्दाम त्या फुलांची दखल घ्यावी लागेल.त्याचाच अर्थ वाटचालीपासून जरा बाजूला होऊन त्यांच्या जवळ जाऊन थोडं वाकून त्यांचं परिक्षण करावं लागेल.

त्यावेळी माझ्या हे ही लक्षात यायचं की,खूप प्रयत्नशील राहूनसुद्धा ही फुलं जमा करणं म्हणजे नेहमीच एक आकस्मिक प्रकार असायचा.बरेच वेळा एखादी योजून केलेली गोष्ट,जी रोजमरं काम दूर ठेवून आनंद उपभोगायला संधी देते, त्याबद्दल काहीतरी निश्चित असं सांगता येतं.परंतु,घाणेरीची फुलं जमा करायची असतील तर तो उपक्रम ह्या योजनेत मोडणार नाही.विशेषतः मी त्या आनंदाच्या क्षणाबाबत म्हणतोय की जे क्षण रोजमरं काम करीत असताना किंवा कधीकधी करीत नसतानाही उपभोगले आहेत. घाणेरीची फुलं जमा करणं हा काही एकदाच घ्यायचा अनुभव नाही.तो एक मनोनीत अनुभव असायला हवा.

तेव्हा कोकणात असताना मी कुठे कुठे म्हणून ही फुलं पहावीत?ती नेहमीच माझ्या अवती-भोवती असायची.बरेच वेळा घाणेरीचं फुल,एखाद्या लहान मुलाच्या हास्या सारखं वाटायचं.किंवा आमच्या मांगरावरच्या पत्र्यावर पडणार्‍या वादळी पावसाच्या थेंबातून निर्माण होणार्‍या संगीतासारखं वाटायचं.फुलं सापडायची झाली तर त्याची गुरूकिल्ली म्हणजे ती झुडपातून शोधून काढायची. ठरवून-सरवून पहायला गेल्यास मिळायची नाहीत पण कधीतरी झुडपात फटदिशी अचानक उपटायची.भविष्यात माझ्या स्मरणात भर घालण्यासाठी राहून जाणारी, पुढचा विचार म्हणून, असंख्य घाणेरीच्या फुलांकडे मी अपेक्षेने पहात आहे.ह्या मला वेड लावणार्‍या, अनोख्या, असाधारण असलेल्या जीवनातल्या अनुभवाचा आनंद उपभोगायला,मी कुठेही असलो तरी इतका काही व्यस्त असणार नाही.हे श्वास रोखून धरणारे आनंदाच्या अनुभवाचे क्षण उपभोगायला न मिळावे हे मला परवडण्यासारखं नाही,कारण ह्या दुनियेत माझं अस्तित्व क्षणभंगूर आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, June 8, 2011

कामसू कुसुम



“मात्र काळजी करू नका माझं घर नेहमीच एव्हडं अस्तव्यस्त नसतं,फक्त एव्हडंच की अलीकडे मला आणखी “महत्वाची” कामं करावी लागतात.”

बरेच दिवसानी,नव्हेतर बरेच वर्षानी मी कुसुमच्या घरी तिला भेटायला गेलो होतो.तिच्या एका गुढघ्याची सर्जरी झाली होती म्हणून मला कुणीतरी सांगीतलं म्हणून मी तिला भेटायला गेलो होतो.तिची मोठी मुलगी सुलभाच आता बारा वर्षाची झाली आहे.

मी कुसुमला म्हणालो,
“अलीकडे गुढघ्याची सर्जरी,विशेष करून बायकांची,फारच होत असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे.बरेचवेळा बायकांवरच घरची कामं करण्याची जबाबदारी येत असल्याने त्यांच्या शरीराची झीज जास्त होत असावी,आणि निसर्गानेही अगदी त्यांच्या जन्मापासून जबाबदारीची कामं त्यांच्यावर लादली असल्याने ती झीज होण्यात जास्त भर पडत असावी.
घरची सर्वच कामं ओघाने बायकानांच करावी लागतात.काहीवेळा एखाद-दुसरा पुरूष त्यांच्या मदतीला गेला की,
“ती तुमची कामं नव्हेत.तुम्ही इकडे लुडबूड करू नका.”
अशीही त्यांना प्रेमळ धमकी(?) मिळते आणि “बिचारा” पुरूष काय करणार,
“बरं तर”
असं म्हणून तो कामानिराळा (नामानिराळापण) होतो म्हणा.
हे झालं पुरूषाबद्दल.

आणि निसर्गतरी काय कमी आहे का?
प्रजोत्पति सारखी महा-जबाबदारी बायकांवर लादून, त्यांच्या शरीराची त्याने वाट लावलीच,शिवाय सहनशिलता, समजूतदारपणा, सोशीकता हे स्वभावगुण त्याना देऊन इतराना हा बायकांचाच मक्ता आहे असं अध्याहृत धरायला कारण दिलं आहे.हा सर्व भार सहन करता करता त्यांच्या शरीराची थोडी हानी होणं स्वाभाविकच आहे.त्यात भर म्हणून, शहराततरी, बायकांना व्यायाम कुठे घेता येतो?त्यामुळे शरीराचं वजन वाढून गुढघ्यावर भार पडत असावा असं मला वाटतं.
मी तर म्हणेन निसर्गाने माणसाच्या गुढघ्याचं डिझाईन करताना खास लक्ष दिलं नसावं.वय होत जातं तसं गुढघ्याचं दुखणं प्रकर्शाने जाणवतं.”

माझं हे लेक्चर कुसुम निमूट ऐकून घेत होती.तिलाही बरंच काही मला सांगायचं होतं असं दिसलं.आपलं घर स्वच्छ,टापटीप दिसावं म्हणून ती पूर्वी खूप मेहनत घ्यायची.
मी कधीही तिच्याकडे गेलो की तिच्या हातात एखादा पुसायचा कपडा किंवा पिसांची झाडू असायची किंवा मुलांच्या कपड्यांच्या घड्या करीत दिसायची.
मी कुसुमला म्हणायचो,
“अग, काम जरा बाजूला ठेऊन माझ्याशी गप्पा मारायला बस.”
मला म्हणायची,
“तुम्ही बोलत रहा मी सगळं ऐकतेय”

ह्यावेळी मात्र मला म्हणाली,
“मला असं वाटायला लागलंय की घरातली आणि घराची कामं रोखून ठेवता येतात.हे समजण्यासाठी मला खूपच काळ घालवावा लागला मात्र. जीवनातल्या महत्वाच्या कामांचं, तुमचं घर किती स्वच्छ आहे,ह्याच्याशी काही संबंध नसतो.

बारा वर्षापूर्वी माझी पहिली मुलगी सुलभा हिचा जन्म झाला होता,ते दिवस मला आठवतात.तासनतास मी घराची साफसफाई करण्यात वेळ घालवायची.कधी कधी सुलभाला कमरेवर घेऊन घर साफ करण्यात वेळ घालवायची.घरातली काम करणारी बाई काम करून जायची.तरीपण मी माझा आणखी वेळ टाकून साफसफाई करायची.खिडक्यांची तावदानं साफ कर,उंच काठी घेऊन कोळी-कोष्टकं काढ,स्टुलावार चढून व्हेन्टीलेटर साफ कर,प्रवेश दाराजवळच्या चपला,बुट नीट डाळून लाऊन ठेव अशी अनेक कामं माझ्या मी हुडकून स्वतःला व्यस्त ठेवायची.

एका मागून एक मुल जन्माला आल्यावर,लहान मुलांच्या कपडयांची संख्या वाढायची, त्यामुळे लॉन्ड्रीचं काम वाढायचं. इतस्ततः पडलेली मुलांची खेळणी उचलून ठेवावी लागायची. लहान-मोठ्या कपड्यांच्या घड्या करून ठेवाव्या लागायच्या. इतकी कामं वाढायची की मी मग अग्रतेप्रमाणे कामाची वाटणी करायची.
अनेक वेळा माझ्या मैत्रीणीना घरी बोलवायचं टाळायची,फोन घ्यायला टाळायची,कामाची धामधूम टाळायची.घर टापटीप ठेवण्याच्या वेडेपणामुळे हे सर्व करावं लागायचं.

मुलं जशी मोठी होत गेली तसं माझं साफसफाईचं झपाटलेपण अगदी शिखराला जाऊन पोहोचलं. माझे आईवडील यायचे झाले, अगदी दोन तासासाठीपण,की मी आदल्या रात्री जागून बाथरूम-टॉयलेट आणि फरशा चकाचक करून ठेवायची.
सुट्ट्यांच्या दिवशी किंवा सणावारा दिवशी हे टापटीपीचं माझं पागलपण उफाळून यायचं.माझ्याबरोबर माझे कुटूंबीयपण साफसफाई ठेवण्यासाठी धडपडीत असायचे,तेसुद्धा वर्षातून एक दोन वेळा येणार्‍या पाहुण्यांसाठी.

अलीकडे मला गुढघ्याची सर्जरी करावी लागली.त्यासाठी मी पंधरा दिवस हॉस्पिटलात होते.बरेच आठवडे मला जास्त चालायचं नव्हतं.ह्याच दिवसात मी शिकले की घरातली कामं रोखून धरता येतात.कामं थांबू शकतात.मुलांत वेळ घालण्या ऐवजी मी त्यांच्या खोल्या टापटीप ठेवण्यात वेळ घालवला हे लक्षात आल्यावर माझे डोळे उघडले.माझ्या लक्षात आलं की घराची टापटीप ठेवण्यात दवडलेला माझा वेळ घरातल्या लोकांत दवडण्यात मी मुकले.

अलीकडे माझं घर अजीबात टापटीपीत नसतं.खिडकीच्या तावदनावर धुळ असते, मुलांचे खेळ बिछान्यावर किंवा बिछान्याच्या खाली पडलेले असतात,आजच्या आज सर्व कपडे धुतलेच पाहिजे असं नसतं.मुलांबरोबर वेळ घालवावासा वाटला तर हातातलं काम बाजूला ठेवून त्यांच्यात जाऊन बसते.घरची कामं करायला हवीत हे खरं आहे,म्हणून आत्ताच्या आत्ता करायला हवीत असं नव्हे.
कुणी पाहुणे यायचे झाल्यास मी पागल होऊन साफसाफाईच्या मागे लागत नाही.माझी मीच कानऊघडणी करून घेते.येतात ते पाहुणे आपल्याला भेटायला येत आहेत.बाथरूमची फरशी किती चकमकत आहे किंवा बेसिन किती साफ आहे ते बघायला येत नसावेत.

पूर्वीचं आता राहिलं नाही.आता जरका कोणी सहज म्हणून माझ्या घरी आला तर,चपला.बुटांच्या ढिगार्‍यावर त्याचे पायताण त्याला काढून ठेवावे लागतील.घरात आल्यावर एखाद दुसर्‍या जमीनीवर पडलेल्या मुलांच्या खेळावरून ओलांडून जावं लागेल. खिडक्यांवरची धुळ बघून दुर्लक्ष करावं लागेल.
परंतु,एक मात्र नक्की, माझ्याकडून कुणाचाही आदर-सत्कार नक्कीच होईल.आणि जुन्या आठवणी काढून गप्पा रंगल्यावर गरम गरम कॉफीचा घोट घेण्यासाठी कप कुणाच्याही हातात नक्कीच मिळेल.
मात्र काळजी करू नका माझं घर नेहमीच एव्हडं अस्तव्यस्त नसतं,फक्त एव्हडंच की अलीकडे मला आणखी “महत्वाची” कामं करावी लागतात.”

तिचा निरोप घेता घेता मी कुसुमला म्हणालो,
“तुला आणखी महत्वाची कामं करावी लागतात हे मला तुझ्या प्रवेशदाराच्या दरवाजावरच कळलं.कारण चपला बुटांच्या ढिगार्‍यातच मी माझी चपलं काढून ठेवली आहेत.इतर पायताणं नीट डाळून ठेवलेली मला ह्यावेळी दिसली नाहीत.”

कुसुम खजील होऊन माझ्याकडे बघून हसली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, June 5, 2011

स्मिताचं स्मित.


कुणीतरी एका गाण्यात म्हटलेल्या दोन ओळी मला आठवतात,

“पोशाख करूनी होशिल तू संपन्न
देऊनी स्मित करिशी जेव्हा प्रसन्न”

ह्या दोन ओळी मी स्मिताशी बोलत होतो तेव्हा तिला म्हणून दाखवल्या.आणि तिला पुढे म्हणालो,
“अमेरिकेत चेहर्‍यावरच्या हास्याला खूप मानतात. दाताच्या डॉक्टरला भरपूर पैसे देऊन सगळ्य़ात उत्तम हास्य चेहर्‍यावर दाखवता येईल ह्याची योजना करायला लावतात.हसल्यावर चेहरा सुंदर दिसावा म्हणून बरेच लोक कुठच्याही सीमेला जाऊन पैसे खर्च करायला तयार असतात.काही ख्यातिप्राप्त व्यक्तिंचा हास्य हा खास मिळकतीचा भाग असतो.त्यावर काही लोक विमा घेतात. पुढे कधी चेहर्‍यावर हास्य ठेवता आलं नाही तर पैसे वसूल करतात.”
मी स्मिताशी हास्य ह्या विषयावर बोलत होतो.

स्मिता हसली किंवा तिने साधं स्मित करून दाखवलं तरी ती खूप सुंदर दिसते.एव्हडंच नाही तर स्मिताला ती बोलत असलेल्या प्रत्येक वाक्यागणीक, हसण्याची सवय आहे.तिच्या हसण्याच्या सवयीचं मला काय वाटतं हे सांगण्यासाठी मी हा विषय तिच्याकडे काढला.

मी दिलेली माहिती ऐकून स्मिता मला म्हणाली,
“ह्या गाण्यातल्या ओळी सर्वांनाच लागू आहेत.जास्तकरून मला.
मला ठाऊक आहे की माझ्या चेहर्‍यावरची एकच स्मित-रेषा माझा रूप-रंग बदलून टाकते,मग मी कसलेही कपडे घालेना.
मला हास्याबद्दल विशेष वाटतं.चेहर्‍यावरचं एक हास्य सुखाचं लक्षण आहे.हे जगत-मान्य आहे.

एक स्मित निरनीराळ्या गोष्टी प्रतित करतं.जेव्हा एखाद्याकडून भावनेचा आवेग येतो तेव्हा हास्य लपवलं जात नाही.सचिनने जेव्हा पहिल्यांदा माझ्याशी लग्न करण्याची कबूली दिली तेव्हा कित्येक मिनीटं माझ्या चेहर्‍यावरचं उत्तेजीत हास्य मला लपवता आलं नाही.”

स्मिताच्या हसण्यातली मनोहरता तिच्या दातात आहे असं मला वाटतं.अगदी लहानपणापासून तिचे बाबा तिला डेन्टीस्टकडे घेऊन जायचे हे मी पाहिलं आहे.काही काळ स्मिता ब्रेसिस वापरायची.अगदी नियमीतपणे डेन्टीस्टकडून दातातल्या कॅव्हिटीझ तपासून दात साफ करून घ्यायची.

“हो, मी लहान असताना माझ्या बाबांवर खूप रागवायची.मला डेन्टीस्टकडे जायला खूप कंटाळा यायचा.तोंड खूप दुखायचंसुद्धा.
पण माझे बाबा त्यावेळी माझ्यावर सक्ती करायचे.आणि आता त्या सक्तीचं फळ काय आहे ते मला कळायला लागलं आहे.”
स्मिता आपल्या लहानपणाची आठवण काढून मला सांगत होती.

मी स्मिताला म्हणालो,
“बाकी आमच्या सारख्यांना,आपल्या मनातल्या भावना प्रदर्शीत करायला हसू हे एक साधन आहे. आनंद,आशा-आकांक्षा, अभिमान,आणि प्रसन्नता दाखवायला एक साधं दात दाखवून हसण्याचं साधन आहे. कधी कधी हास्य भ्रामक असू शकतं. एखाद्या चित्रपटात व्हिलन,आपला प्लॉट यशस्वी झाल्यावर,चेहर्‍यावर एक बनावटी हसू आणतो ते आपल्या सहज लक्षात येतं.

खरं पाहिलस तर,मला,वाईट,कुत्सित हास्यापेक्षा,मनोहर हास्यांची जास्त जाणीव असते.मला सर्वात आवडणारं हास्य,ज्या हास्याची बरोबरी इतर कुठल्याही हसण्यात करता येणार नाही,ते म्हणजे एखाद्या निष्पाप,निरागस मुलाचं हसणं.अगदी अवर्णनीय हास्य. हसताना त्याच्या नजरेतच निर्मळ आनंद दिसतोच शिवाय त्याचं हसू तो रोखून धरूच शकत नाही असं भासतं. फ्लूच्या साथीपेक्षा हे हास्य संसर्गजन्य असतं असं मला नेहमीच वाटतं.”

स्मिता मला म्हणाली,
“मी नेहमीच ऐकत आले आहे की कपाळाला आठ्या घालण्यास लागणारे मसल्स हे हास्य दाखवण्यासाठी लागणार्‍या मसल्सपेक्षा खूपच जास्त असतात.मला गंमत काय वाटते की,अस असूनही लोकं आठ्या घालणं जास्त पसंत करतात.
अगदी सहजपणे पाहिलंत तर तोंडाचे दोन कोपरे वर करायला एव्हडी काही मेंदूची शक्ती किंवा एव्हडे काही कष्ट वापरावे लागत नाहीत.मग प्रयत्न करायला काय हरकत असावी.?”

“दरदिवशी तुझ्या पोशाखाला पूर्णत्व यायला एक परस्पर पूरक हास्याची तू भर घालतेस.तुला तसंच तुझ्या समोरच्याला एक हास्याचा मस्त तोफा तू देत जातेस असं म्हणायला मला हरकत नाही”.

मी स्मिताचं कौतुक करण्याच्या दृष्टीने तिला म्हणालो.
मला थॅन्क्स म्हणून सांगण्याऐवजी स्मिताने आणखी एक मोहक हास्य दाखवून माझे थॅन्क्स मानले असं त्यावेळी मला भासलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gamail.com

Thursday, June 2, 2011

लपविलास तू हापूस आंबा.



“सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.”

आता मुंबईत लवकरच पाऊस येईल.केरळात पाऊस पडायला लागला.दहा जून पर्यंत पाऊस मुंबईला येईल.बाजारात निरनीराळे प्रकारचे आंबे दिसत असतील. पण पाऊस पडायला लागल्यावर बाजारात हापूस आंबा कमी दिसायला लागणार आणि त्या आंब्याला चवही रहाणार नाही.म्हणून पाऊस पडण्यापूर्वी हापूस आंबा खाऊन तृप्ती करून घ्यावी म्हणून शेवटची हापूस आंब्याची पेटी मी अपना बाजारातून विकत घेतली.

एप्रिलपासून मिळणारा हापूस आंबा सुरवातीला कच्चा असतो.तो आडीत घालून पिकवावा लागतो.तेव्हाच तो पिकल्यावर अतीशय गोड लागतो.पण जूनपर्यंत मिळणारा हापूस नक्कीच पिकून तयार असतो.

ह्या वर्षी मला माझा मित्र रघूनाथ ह्याची खूपच आठवण आली.
त्याला हापूस आंबा अतीशय आवडायचा.खरंतर तो हापूस आंब्याव्यतिरीक्त दुसरा आंबा क्वचितच खायचा.जेमतेम पायरी आंब्याला चांगला म्हणायचा पण पायरीचा आमरस मात्र त्याला आवडायचा.तो म्हणायचा,
“आमरस खायचा तर तो पायरीचा आणि कापून खायचा तो हापूस.”

गेल्या वर्षापर्यंत तो माझ्याकडे आंबे खायला यायचा.त्याचं कारण कोकणातून मी हापूस आंब्यांच्या पेट्या मागवायचो.
रत्नागीरीचे-खरं म्हणजे देवगडचे-हापूस आंबे खाण्यालायक असतात.आमच्या वेंगुर्ल्याचे हापूस आंबेसुद्धा खायाला मस्त लागतात.
रघुनाथ आंब्याच्या दिवसात आमच्या घरी आल्यावर मला म्हणायचा,
“हापूस आंब्याची पेटी आणलेली दिसते”
“तुला कसं कळलं रे?”
मी त्याची फिरकी घेत म्हणायचो.

“अरे, हापूस आंब्याचा वास कधी लपवता येत नाही.एव्हडंच काय तर आंब्याचा बाठा चोखून टाकलास तरी त्याचा वास लपायचा नाही.सर्दी झाली असली तरी.”
असं मला लागलीच म्हणायचा.

मी पुढे काही बोलण्यापूर्वी,
“चल घेऊन ये सुरे-सूरी आंबा कापून खाऊया. तुझा देवगडचा हापूस आंबा मी पहिल्यांदाच ह्या वर्षी चाखणार आहे.बाहेर काय रे,आंबे विकणारे, सगळेच आंबे रत्नागीरी हापूस म्हणून सांगत असतात,ते काही खरं नसतं.तुझ्याकडचा असली रत्नागीरी हापूस आंबा असतो यात वाद नाही.

आंब्याची पेटी ठेवली होती तिकडे जायचा आणि त्यातून चांगले पिकलेले दोन तीन आंबे हातात घेऊन प्रत्येक आंबा नाकाजवळ नेऊन वास घेत म्हणायचा,
“माझी जीभ नुसती सरसरून चव घ्यायला आतूर झाली आहे.तू जरी काही म्हणालास तरी मला आंबा नको म्हणायला जमणारच नाही.”
हे सगळं रघुनाथकडून ऐकण्यापूर्वीच मी त्याच्या चेहर्‍याकडे लक्ष देऊन पहात असायचो.हळूच माझ्याकडे बघायचा हळूच खाली बघायचा,आंब्यांचा पिवळा केशरी रंग न्याहाळायचा.मी त्याला म्हणालो होतो,
“अरे लाजू नकोस आणखी दोन तीन आंबे घेऊन जा घरी हवं तर.मी तुझं मन जाणतो.एकदा पाऊस पडला की ह्या हापूस आंब्यांची चव जाणार. तुझ्यापासून आंबा मला लपवून ठेवता येणार नाही हे मला माहित आहे.”

ते मी त्याला बोललेले शब्द शेवटचेच ठरले.सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.
आज आंब्याची पेटी उघडल्यावर रघुनाथची प्रकर्षाने आठवण आली.रेडीओवर मालती पांडे यानी गायलेलं,गदिमाचं गाणं लागलं होतं.

“लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?”

लगेचच माझ्या कवीमनाला रहावलं नाही.ह्या गाण्याचं “विम्बलडन” सुचलं.
माझ्या मित्राला, रघुनाथाला मी ते गीत अर्पण करतो.
जणू रघुनाथच मला सांगतोय कवितेतून,

लपविलास तू हापूस आंबा
सुगंध त्याचा छपेल का
बाठा चोखून खपेल का?

जवळ फळे पण दूर ते सूरे
दात शीवशीवे जीभ सरसरे
लपविलेस तू जाणूनी सारे
रंग फळाचा छपेल का?

क्षणात बघणे,क्षणात लाजणे
मनात हवे पण,दिखावा नसणे
ही खाण्याची खास लक्षणे
नाही म्हणाया जमेल का?

पुरे बहाणे,आतूर होणे
मित्रा,तुझिया मनी खाणे
मित्रहि जाणे,मी पण जाणे
आंबा छपविणे सुचेल का?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com