Wednesday, September 29, 2010

अस्तित्व.. असाही एक विचार.

“माझं तर म्हणणं आहे की सरळ आणि साधेपणाने जीवनाचा आनंद घेण्यासाठी जे शक्य होईल ते करावं.”

“एक दिवस आपण सर्व ईहलोकाला जाणार आहोत.हे एक सत्य आहे शिवाय कुणीतरी जन्माला येणार आहे, हे ही एक सत्य आहे.एखादा दिवस आपल्याला अस्तित्वात आणतो आणि तसाच एखादा दिवस कसलाही विचार न होता, आपल्याला जीवनातून मिटवतो.”
प्रो.देसाई मला असं म्हणाले.

मी आज त्यांच्या घरी गेलो होतो.गेले कित्येक दिवस त्यांना सर्दी-खोकल्याने बेजार केलं होतं.त्यामुळे तळ्यावर यायचं त्यांनी तुर्तास बंद केलं होतं.मी मात्र नियमीत तळ्यावर फिरायला जात होतो.कुणी तळ्यावर भेटलं तर त्यांच्याकडून भाऊसाहेबांची प्रकृती कशी आहे ते कळायचं.आज स्वतःच जाऊन त्यांची विचारपूस करावी म्हणून त्यांच्या घरी जाण्याचा विचार केला.

“ह्या जीवनात,एकट्याने किंवा बरोबरीने,सुखाने जगण्याची जबाबदारी,नियतीने आपल्यावरच सोडून दिली आहे.
ह्यासाठीच आपली धडपड, आपल्या सुखासाठी झाली पाहिजे,उपलब्धिसाठी किंवा दुसर्‍याकडून प्रशंसेसाठी किंवा समाज विकसीत करण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा वाढवून घेण्यासाठी नव्हे.अशी माझी धारणा आहे.”
असं पुढे म्हणून माझ्याकडून काय प्रतिसाद येतो त्याची ते वाट पहात होते.

मी त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब,हा आज आपल्या मनात विचार का आला?
आपल्याला बरं नाही म्हणून मी पाहायला आलो.”
माझ्या समोर पेपरातल्या एका बातमीचं काटण देत मला म्हणाले,
“मी आता चांगलाच बरा झालो आहे.हे वाचा अमेरिकेकडे दहा हजार न्युक्लिअर बॉम्ब आहेत.रशियाकडे सात हजार आहेत. इस्राईलकडे अमेरिकेने दिलेले शंभर बॉम्ब आहेत.भारत,पाकिस्तान,चीनकडे शेकडोंनी बॉम्ब आहेत.पण इराणने एकही बॉम्ब बनवूं नये म्हणून सर्व त्या देशाच्या मागे लागले आहेत.कुणाचं बरोबर किती आणि चूक किती ह्या वादात न जाता मला एव्हडंच वाटतंय हे सर्व आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या जगण्याच्या विचाराच्या पलीकडचं झालं आहे.आपलाच आपण सर्व नाश करायला तयार झालो आहो.जग फारच स्वार्थी होत चाललं आहे.

जेव्हा फैसला करण्याची पाळी येते तेव्हा,बल्बचा शोध कुणी लावला,बॉम्बचा शोध कुणी लावला,कोण युद्ध जिंकला ह्याचा विचार करायची गरज भासत नाही.गरज भासते ती ही दूरची यात्रा कुणी आनंदाने भोगली याची.
हे जग एकाकी आणि मतलबी आहे ह्या वास्तविकतेवर मात केली गेली पाहिजे.एका कुत्र्याची दुसर्‍या कुत्र्यावर मात करणारं हे जग आहे.आणि प्रत्येकाला मोठा कुत्रा व्हायचं असतं.पण उत्तम कोण आहे हे कळण्याची खरीच जरूरी आहे का?.मी जे आज जगात बघतोय,पेपरात वाचतोय त्यावरून माझ्या लक्षांत आलं की जगात काय ही चूरस चालली आहे.?शेवटी आपण सर्वनाशाकडे झेप घेत आहो.तुमचं काय मत आहे?”

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुमचंच कुत्र्याचं उदाहरण घेऊन माझ्या मनात काय विचार आला ते सांगतो.
मला तर केवळ,सुखाने आणि शांतीने जगण्यासाठीचं अस्तित्व बाळगणारा,व्यवस्थीत पोसलेला,उत्तम अनुभव घेतलेला,बाहेर भटकंती करायला मिळणारा जसा हवा तसा जीवनातला अनुभव घेणारा कुत्रा व्हायला आवडेल.
सगळ्यात बलवान,उत्तम प्रशिक्षित झालेला,आणि कुठच्याही चूरशीला तुडवून टाकणारा कुत्रा व्हायला मी कबूल होणार नाही.”

“मला खरंच काय वाटतं ते मी तुम्हाला सांगतो.”
असं म्हणत प्रो.देसाई म्हणाले,
“आता पूर्वी सारखं शिक्षण राहिलं नाही.हल्लीचा नवसमाज, मुलांना गुलाम होण्यासाठी, प्रशिक्षण द्यायला रूपांतरीत झाला आहे.शाळेत जाण्यापूर्वी मुलांना काहीच माहित नसतं. नवसमाजाचा पुढे होणारा गुलाम म्हणून त्यांच्या दूरवरच्या शिक्षणास प्रारंभ केला जातो.त्यातले बरेचसे, एक दिवस डॉक्टर,वकिल,किंवा एखाद्या धंद्याचे प्रबंधक होणार हे अपेक्षिलं जातं.”

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे.
आपणा सर्वांकडून हीच समजूत करून घेतली आहे की ह्यातलं एखादं काहीतरी होणं म्हणजे मोठी उपलब्धि झाल्यासारखं आहे.आणि हा एक मोठा संकल्प पूरा केल्या सारखं आणि मोठी जबाबदारी पार केल्यासारखी आहे.
खरं तर,आपलं जबरदस्तीने मत-परिवर्तन केलं गेलंय की,कागदमोड करणं,तासनतास टेलिफोनवर बोलत रहाणं, आणि पैसे कमवणं म्हणजे सुखाकडे जाण्याचा संकेत आहे.”

“मला तुम्ही स्वार्थी म्हटलंत तरी चालेल.”
असं म्हणून भाऊसाहेब सांगू लागले.
“माझं तर म्हणणं आहे की सरळ आणि साधेपणाने जीवनाचा आनंद घेण्यासाठी जे शक्य होईल ते करावं.कदाचीत एक दिवस समुद्राच्या किनार्‍यावर भटकत जावं,किंवा एखाद्या दुपारी एखादं वाद्य वाजवीत बसावं.

ज्यात रस नाही ज्यात कसला ढंग नाही, पण दुर्दैवाने, पैसे आवश्यक आहेत असं वाटणारी इर्षा बाळगून,केवळ जन्मापासून अंगात सर्व तर्‍हेची हांव योजनाबद्द झाल्याने तशी अभिलाषा बाळगून आवश्यक नसलेल्या महागड्या वस्तू विकत घ्याव्या असं वाटावं असा विचार न येता, साध्या सुखाचा विचार यायला हवा. शाळेत जाण्यापूर्वी आपल्याला वस्तूंचे आकार कसे असतात, निरनीराळे प्राणी कसे दि्सतात हे घरी शिकवलं जातं. नंतर शाळेत
लिहण्या-वाचायला शिकवून हायस्कूलमधे जाण्यासाठी तयार केलं जातं.चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवण्यासाठी चांगले गुण मिळवण्यासाठी लक्ष केंद्रीत केलं जातं.पुढे आयुष्यभर काम मिळण्यासाठी कॉलेजात शिक्षण दिलं जातं.शेवटी आपण डॉक्टर,किंवा वकील होतो.कारण त्यांना भरपूर पैशाची कमाई करता येते.पैसा कमवणं चालू झालं की संसारात लागणार्‍या दुनियादारीसाठी पैशांचा व्यय होत रहातो.मुलांचं शिक्षण आणि पुढे त्यानीही आपल्या पावलावर पाऊल ठेवावं म्हणून हा प्रयत्न असतो.निवृत्तिसाठी मग बचत करावी लागते.”

मी प्रो.देसायांना मधेच थांबवीत हंसत हंसत म्हणालो,
“आणि पिकलं पान होण्यापूर्वी आपण निवृत्त होतो.आणि काहीही करायला मोकळे होतो.सर्व जग आपलंच आहे अशी मनोधारणा होते.मिळणार्‍या स्वातंत्र्याचं स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडतो, सुख उपभोगायला सुरवात होते आणि एक दिवस हृदयाला झटका येतो.आणि घराच्या दारातच प्राण सोडतो.”

प्रोफेसर म्हणाले,
“ह्या जीवनाच्या मार्गावर कसेही तुम्ही चालला तरी,तुमच्या कहाणीचा शेवट,दुसर्‍या कुणाच्या काहाणीचा जसा होतो तसा होतो. तुम्हाला उदास होण्यासाठी मी हे म्हणत नाही.मला फक्त एव्हडंच दाखवून द्यायचं आहे की,जीवन हे काही तुम्हाला, खूप परिश्रम घेऊन, हवंय तिथं नेण्यासाठी,नाही.
कारण प्रत्येक व्यक्ती त्याच ठिकाणी जाते. जीवन अशासाठी असावं की जिथे आत्ता आहात आणि आत्ता जो वेळ तुमच्यासाठी आहे त्यासाठी खर्ची करायला आहे. तुम्ही ज्यात आनंद घ्याल त्यासाठी जीवन आहे .तुम्हाला आर्थीक फायदा किती झाला आणि राजकारणातला फायदा किती झाला त्यासाठी नाही.
प्रत्येक दिवसा गणीक आपण आपल्याला आठवण ठेवून विचारलं पाहिजे की,आपण आपलं जीवन मजेत घालवतो? कां नाही?जीवनातला प्रत्येक क्षण आपण कसलीतरी मजा करण्यात घालवला पाहिजे.त्यामुळे,त्या क्षणी केलेला मजेचाच अनुभव नव्हे तर जो वेळ आपण आठवणी साठवण्यात, नाती-गोती साधण्यात,आणि अनुभव मिळवण्यात घालवतो त्या आनंदाचा अनुभव मिळवण्यात घातला पाहिजे.”

“तुम्ही बरे व्हा नंतर आपण ह्या विषयावर चर्चा करू “
असं म्हणत मीच जायला निघालो.कारण लेक्चर द्यायला प्रोफेसरांचा हात कोण धरणार?मीच विषय आवरता घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, September 26, 2010

तोडीले हृदय एका धनहीनाचे

अनुवादीत (चांदीकी दिवार न तोडी…..)

स्थंभ चांदीचा नसेल तोडीला
तोडीले हृदय प्रीतिने ओथंबलेले
एका धनवन्ताच्या कन्येने
तोडीले हृदय एका धनहीनाचे

देण्या साथ दुःखामद्धे घेतली
शपथ जिने काल परवा
सुखाकरिता अपुल्या आज
झाली कुणा अनभिज्ञाची
शहनाईच्या गुंजे खाली
दबली हाय एका बावळ्याची
धनवन्तानी जुळविले नाते
त्या बावळ्याच्या दुःखाचे
एका धनवन्ताच्या कन्येने
तोडीले ह्रुदय एका धनहीनाचे

कसे समजावे प्रीतिला ज्यांना
चांदी सोने हे सर्वस्व त्यांना
धनवन्ताना वाटे जगती
हृदय म्हणजे एक खेळणे
दुःख सोसावे अनादीकाल
हृदयाने केवळ रडत रहाणे
मना वाटे करावे खेळणे ह्रुदयाचे
मना वाटे तोडावे नाते हृदयाचे
एका धनवन्ताच्या कन्येने
तोडीले हृदय एका धनहीनाचे

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, September 23, 2010

शरीर जसं उपेक्षित तसंच कौतुकास्पद.

“ज्यावर तुमचं अतोनात प्रेम आहे अशा व्यक्तीच्या जवळ शांत आणि निःशब्द होऊन पडून रहाण्यातल्या शरीराच्या कौशल्याबद्दल मला कौतूक वाटतं.”

ह्यावेळी मी थंडीच्या दिवसात कोकणात गेलो होतो.तो डिसेंबरचा महिना होता.दिवाळीही यायची होती.माझ्या भावाकडे माझा मुक्काम होता.माझ्या दोन पुतण्या कॉलेजात शिकतात.मागच्या पुढच्या वर्गात आहेत.
संध्याकाळच्या वेळी बाहेर खूप छान थंड पडलं होतं.जेवणं झाल्यावर आम्ही सर्व बाहेर अंगणात खूर्च्या टाकून बसलो होतो. वर आकाशाकडे पाहिल्यावर मात्र ढगाळ दिसत होतं.कधी कधी दिवाळीच्या मोसमात पावसाच्या सरी येऊन जातात.वळवाचा पाऊस म्हणतात.तसंच काहीसं वातावरण होतं.

कॉलेज कसं काय चालंय, ह्याची विचारपूस झाल्यावर,माझ्या डोक्यात एक चर्चेचा विषय आला.मी दोन्ही पुतणींना म्हटलं,
“आपण आपल्या शरीराशी बरेच वेळा “टेकन फॉर ग्रॅन्टेड” असं समजून वागतो.तसं पाहिलंत तर शरीर हे खरोखरच खिचकट बाब आहे.बरेच वेळा शरीराच्या काही भागांची उपेक्षा झालेली असते तर कधी कधी आपण काही भागांचं कौतूकही करतो.जे नकळत उपेक्षित होतं त्याबद्दल मला विशेष वाटतं.मला तुमच्या दोघांकडून तुमचे विचार ऐकायचे आहेत.”

“तुमचं पण मत आम्हाला ऐकायचं आहे.”
अचल, मला म्हणाली.आणि आपला विचार तिने सांगीतला.
“एखाद्या हिरव्या पानांनी खच्चून भरलेल्या झाडाच्या फांद्यातून सकाळचा सूर्य जेव्हा डोकावून पहात असतो,ते दृश्य मान वर करून पहात असताना सूर्याच्या किरणाच्या प्रखर प्रकाशामुळे नकळत माझ्या नाकाच्या शेंड्याला गुदगुदल्या होऊन मला शिंका येतात त्याची मला फार गंमत वाटते.”

मी म्हणालो,
“सकाळच्या उन्हात, अंगणात कुत्र्याची लहान लहान पिल्लं एकमेकाशी मस्तीखोरपणे अंगावर धाऊन जाऊन पडापडी करतात तेव्हा माझ्या ह्या गालापासून ते त्या गालापर्यंत उत्पन्न होणार हंसू मला भावतं.”
माझी दुसरी पुतणी -लता- ती संगीतात विशेष ध्यान देत असते.ती अलीकडे शास्त्रीय संगीताच्या क्लासात पण जाते.

लता म्हणाली,
“नुकतीच पावसाची सर पडून गेली आहे.असंच एखाद्या चांद्ण्या रात्री अंगणात थंडगार हवेची झुळूक अंगावरून जात असताना रेडिओच्या दिल्ली स्टेशनवरून नॅशनल कार्यक्रम चालला असताना शास्त्रोक्त संगीताची तान ऐकायला मला मजा येते.अशावेळी गोड दुधामधे वेलची टाकून केलेल्या गरम गरम कॉफीचा दरवळणारा सुगंध नाकात गेल्यावर खूपच बरं वाटतं.कॉफीचा झुरका घेताना कप जवळ आणून ओठातर्फे कॉफीचं तापमान अजमावयाला निराळीच लज्जत येते.”

माझं मत मी दिलं,
“थंडीच्या दिवसात, भर दुपारच्या उन्हात,अमुकच ठिकाणी जाण्याच न ठरवता, फिरायला जायला मला बरं वाटतं. एखाद्या ओढ्याच्या कडेने जाताना लाजाळूच्या झुडपाना नकळत स्पर्श झाल्याने पानं आपोआप मिटताना पाहून खूप आनंद होतो. निसर्गाने त्या लाजाळूच्या झाडाला दिलेली ती स्पर्शाची स्वाभाविकता पाहून माझ्या अंगात एक आनंदाची उर्मी येते.
लहानश्या गोष्टीतली मोठी सुखसमाधानी,आणि मोठ्या गोष्टीतली लहानशी सुखसमाधानी पाहून माझं मन प्रसन्न होतं.”

अचल मराठीत विषय घेऊन शिकत असल्याने,तिच्या मनात साहित्याविषयी-प्रेमाविषयी- विचार आला नसता तर नवलच होतं,ती म्हणाली,
“ज्यावर तुमचं अतोनात प्रेम आहे अशा व्यक्तीच्या जवळ शांत आणि निःशब्द होऊन पडून रहाण्यातल्या शरीराच्या कौशल्याबद्दल मला कौतूक वाटतं. मग ते लहान मुल असो किंवा एखादा बापया असो.मला कसं वाटत असतं ते कुणालातरी ओरडून सांगावसं वाटतं.प्रत्येक क्षणाचा शांत श्वास ती व्यक्ती घेत असताना,ते अनुभवून माझ्या शरीरात आणखी,आणखी जान भरून येते.त्या जवळ असलेल्या व्यक्तीमुळे माझं अस्तीत्व आहे याची मला जाण येते.
आणि म्हणूनच मला माणसाच्या शरीराचा प्रभाव,आणि त्यात असलेली क्षमता ह्याचं विशेष वाटतं”.

मी वयस्कर असल्याने सहाजीकच अलीकडे माझे शरीराचे काही अवयव खालावत जात असल्याने माझं लक्ष माझ्या कातडीकडे जास्त केंद्रीत होतं.त्याचा विचार येऊन मी म्हणालो,
“शरीराच्या कातडीचं मला विशेष वाटतं. सूर्याच्या उन्हात बसल्यावर उन्हाच्या उबेने कातडीला थोडासा काळसरपणा येतो आणि थंडीत हळूवारपणे मेलेली कातडी पडून जाते आणि कातडीवरच्या सुरकुत्या कमी कमी होत जातात.हे पाहिल्यावर निसर्गाचं कौतूक करावं तेव्हडं थोडंच असं म्हणावसं वाटतं.कातडीला कंप येऊन सुख ज्या तर्‍हेने कातडीतून वाहून जात असतं,जसं नसा-नसातून रक्त वाहत असतं,अगदी तसं कातडीचं सुखाच्या संबंधाने
आहे.”

आमच्याकडून होणार्‍या ह्या एकामागून एक,शरीराच्या भागांच्या उपयुक्ततेबाबतच्या विचाराच्या चर्चेमुळे ,एरव्ही उपेक्षीत राहिलेली, माहिती कौतूकाच्या रुपाने स्पष्ट होत आहे हे पाहून लताला हंसू आलं.ती खाली पायाकडे बघून हंसत होती हे पाहून मी अंदाज केला की ही काहीतरी पायांबद्दल आपला विचार सांगण्याच्या तयारीत आहे.आणि माझा अंदाज खरा ठरला.

लता म्हणाली,
“पायाच्या बोटांबाबत मला तसंच विशेष वाटतं. पायांच्या बोटांना जेव्हडी संवेदना असते तेव्हडी आपल्या शरीराच्या इतर भागाना त्याचा अनुभव नसतो.आपण कुठेही जात असताना,तोल सांभाळता,सांभाळता,पायाखाली आलेली जमीन आणि त्या जमीनीची संरचना अनुभवताना पायाची बोटं कार्यभार संभाळून मागे काय होतं आणि पुढे काय होणार आहे हे सांगण्याच्या प्रयत्नात असतात.”

हे लताचं ऐकून अचलला प्रेम ह्या विषयाला धरून आणखी सांगावसं वाटलं.ती म्हणाली,
“मला हातांच्या बोटांचं पण फार कौतूक करावसं वाटतं.एखाद्या कोड्याची अनेक तुकड्यातून जुळवाजूळव करून कोडं जसं रूपांतरीत करता येतं अगदी तशीच ही हाताची बोटं असतात.
आपल्या प्रेमळ माणसाला मिठीत घेतल्यावर त्याच्या पाठीच्या कण्यावरच्या मणक्यांवर ही हातांची बोटं अगदी फिट्ट बसतात. ही मिठीतली संवेदना ज्याला इंग्रजीत “स्पाईन-चिलींग- म्हणतात तशीच काहीशी असते.”

आपल्या तोंडाविषयी काहीतरी बोलावं असं मला वाटलं.मी म्हणालो,
“माणसाच्या तोंडाबाबत मला विशेष वाटतं.शरीराच्या अनेक भागा पैकी हा भाग माझा सगळ्यात पसंतीचा आहे. ओठाच्या हालचालीवरून एकमेकाचा आजचा दिवस कसा गेला ते कळायला सोपं होतं.
जीभेचं काय विचारता? समुद्रात असलेली एखादी होडी वलव्हताना वल्ह्याचं सततचं काम म्हणजे पाण्याला ढकलणं. अगदी तसंच हे जीभेचं वल्हं, शब्दांना बलपूर्वक ओठाच्या बाहेर जाऊ देण्याचं,किंवा दातांच्या मागे अधांतरी तरंगत ठेवण्याचं काम करतं.”

ओठाविषयी बोलण्याचा मक्ता नक्कीच अचलचा.तिने सांगून टाकलं,
“ओठांचं काय सांगावं? ओठाचं हवादार चुंबकत्व मला खूपच पसंत आहे.हे ओठ जेव्हा आपल्या प्रेमातल्या व्यक्तीच्या ओठाशी परिचीत होतात,आणि एकमेकाचं संवरण निर्माण करतात,त्यावेळी जवळीकेच्या सीमेचं प्रतीक काय आहे ते दाखवतात.”

दिसायला सुंदर आणि सरल नासिकेची,चाफेकळी सारखं आपलं नाक उडवीत लता म्हणाली,
“मला माहित आहे की सर्वात खास असं शरीराचं वैशिष्ट म्हणजे नाक.नाकाला वासाबद्दलची संवेदना असल्याने प्रत्येक वेळेला नाकाचा उपयोग झाल्यावर माझ्या मेंदुला,सुस्पष्ट जुन्या आठवणी आणि हृदयविदारक विचार,तो वास सांगत असतो.”

दोघी बहिणीत अचलचे डोळे जरा मोठे. हरिणाक्षी म्हटलं तरी चालेल.आम्ही तिच्या डोळ्यांची नेहमीच स्तुती करीत असतो. आणि आपल्या टपोर्‍या डोळ्यांचा तिला अभिमानही आहे.तिने लगेच चान्स घेतला.लताकडे आणि माझ्याकडे बघत अचल म्हणाली,
“पण डोळे मात्र, आपल्याला आपण कशावर विश्वास ठेवावा,हे स्वीकार करायला लावतात.ते जणू दुर्बीणीसारखे, द्रुतमार्गाच्या -म्हणजेच आपल्या मनाच्या-कडेवर बसल्यासारखे असून सतत आपल्याला आठवण करून देत असतात की,आपण एकटेच नसून, आपल्या बरोबर आजुबाजूला आणखीन काही अस्तीत्वात आहेत.आणि आपण आपले डोळे बंद केल्यावर आपल्याच कल्पना शक्तीच्या कक्षेत ते आपल्याला सोडून देतात.
डोळ्यांकडून मला,झाडांमधून वर आकाशाकडे नजर लावून सुर्याकडे पहाण्याची, देणगी मिळाली आहे.

माझ्या डोळ्यांकडून मला काय पहायला मिळतं आणि मिळत नाही हे शक्य झाल्याने, ह्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.मी जे पहाते,त्याचा मी शोध घेते.आणि ज्याचा मी शोध घेते,त्यापासून मी शिकते.आणि जे मी शिकते त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.”

हे अचलचं सुंदर वाक्य संपता संपता वार्‍याची अशी जोरदार वावटळ आली आणि वाटलं की नक्कीच पाऊस पडणार. पावसाने आम्हाला वारनींग दिली.आणि पडायला लागला.खुर्च्या उचलून नेत आम्ही सर्वानी घरात पळ काढला. आणि आमची चर्चा तुर्तास संपली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, September 20, 2010

चेहर्‍यावरचं हास्य.

“हसर्‍या चेहर्‍याबद्दल मला विशेष वाटतं.मित्र-मंडळी आणि घरचे लोक यांच्या विषयी, मला आवडत असलेल्या माझ्या स्मृतिंची, मला जेव्हा आठवण येते,तेव्हा नक्कीच माझ्या चेहर्‍यावर हंसू येतं.”
प्रो.देसायांची नात मला सांगत होती.

त्याचं असं झालं,प्रो.देसायानी त्यांच्या नातीबरोबर-मनीषाबरोबर- मला हवं असलेलं एक पुस्तक “हास्य फवारे” पाठवून दिलं होतं.पिशवीतून पुस्तक काढून मला देताना मनीषाने पुस्तकाचं शिर्षक वाचून माझ्याशी हंसतच असं म्हणाली.

पुढे सांगू लागली,
“माझे आजोबा हे पुस्तक वाचत असताना मी त्यांना पाहिलं.चेहर्‍यावरच्या हास्याबद्दल मला काय वाटतं ते मला त्यांना सांगायचं होतं.विषय काढणार तेव्हड्यात कुणी त्यांना भेटायला आलं आणि ते सर्व राहून गेलं.म्हटलं तुमच्याबरोबर चर्चा केली तरी काही हरकत नाही.”

“मग सांग ना.मला तुझं म्हणणं ऐकायला आवडेल”
मी मनीषाला म्हणालो.

मनीषा सांगू लागली,
“पुन्हा जर का ह्या आठवणी मी काढल्या, तर त्या आठवणी काढताना त्यावेळी आलेल्या माझ्या चेहर्‍यावरच्या हंसण्याचा अंतर्भाव, माझ्या स्मृतित झाला नाही तर त्या आठवणींच खरं परिमाण दिसणार नाही.
माझं हे हास्य आणि माझी ती मित्र-मंडळी एका क्षणार्धात गोठून गेली असताना, काढला गेलेला एखादा फोटो पाहिल्यावर, तत्क्षणी मला त्या आनंदाच्या क्षणाकडे गेल्या सारखं वाटतं आणि आपोआप एखादं नवं हंसू माझ्या चेहर्‍यावर येतं.”

मी म्हणालो,
“तुला हे अगदी लहानपणापासून अनुभवलं जात होतं का?

“हो अगदी शालेय शिक्षणापासून”
अशी सुरवात करीत मनीषा म्हणाली,
“माझ्या त्या शालेय शिक्षणाच्या दिवसात एकदा,एका वर्गातून दुसर्‍या वर्गात जाताना,माझ्या एका मैत्रीणीने केलेला विनोद ऐकून,जरी त्यावेळी माझ्या ध्यानात आलं नाही तरी,माझ्या चेहर्‍यावर टिकून राहिलेलं ते हंसू वाटेत भेटलेल्या इतर मैत्रीणींकडून हास्य मिळवण्यात जे रुपांतरीत होत होतं,ते दुसर्‍या वर्गात जाऊन बसे पर्यंत होत होतं.

त्या दिवशी काही असंभवनीय लोकांकडूनपण माझ्याशी हास्य केलं जात होतं.माझे पूर्वीचे गणिताचे शिक्षक की ज्यांना मी बरेच वर्ष पाहिलं नव्हतं, त्यांच्याकडूनसुद्धा खात्रीपूर्वक मुस्कुराहट मला त्यावेळी मिळाली होती. ओळखीच्या मैत्रीणी आणि मैत्रीणींच्या मैत्रीणी,ज्यांना मी ओळखतही नव्हते, अशांकडूनही माझ्याशी हंसलं जात होतं,जणू त्या फार पूर्वीपासूनच्या मैत्रीणी असाव्यात असंच काहीसं.
ह्या सार्‍या घटनांमुळे,तिसर्‍या वर्गात चालत जाई तोपर्यंत,माझ्या दातांचं चांगलंच दर्शन इतराना होत होतं.

“मला वाटतं हंसण्याने जेवढा लोकांशी दुवा ठेवता येईल तेव्हडा शब्दांनी ठेवता येणार नाही.”
असं मी म्हटल्यावर,मनीषा म्हणाली,
“त्या दिवसाचा तो अनुभव, सबंध दिवसभर, माझी चित्तवृत्ति-मुड- वाढवून गेला.
मी जर का हंसत राहिली तर मला दुःखी चेहरा ठेवताच येणार नाही असं मला वाटतं.ज्या ज्या वेळेला मला उदास आणि मंद असल्यासारखं वाटतं, त्या त्या वेळी मी माझ्या आवडत्या हास्यप्रधान घटनांकडे स्वतःला झोकून देते.

दोन घटना मला आठवतात.एक म्हणजे माझ्या खरड वहितली पानं उगाचंच मी भरभर वाचल्यासारखी करते किंवा दुसरी म्हणजे, माझ्या आवडत्या बटर-स्कॉच आईसक्रिमची आठवण काढून प्रसन्न व्हायला बघते.हे आईसक्रिम खाताना एकदा एका विनोदावर एव्हडी हंसत होते की आईसक्रिम केव्हा वितळलं ते कळलंच नव्हतं.ही घटना आठवून माझी उदास चित्तवृत्ति अशीच त्या आईसक्रिम सारखी वितळून जाते.कधी कधी,निराश होऊन, तो माझा
कपाळावर आठ्या आलेला चेहरा,आरशात पाहून,माझ्या मलाच, चेहरा हंसण्याजोगा करण्यासाठी केलेली जबरदस्ती लक्षात आणून मुळात मी मला निराश का करून घेतलं,हेच विसरून जाते.

कधी कधी माझ्या मैत्रीणीबरोबर संध्याकाळचा फेरफटका मारून आल्यावर अति हंसण्यामुळे थोडीशी वेदना मला जाणवते.अशा प्रसंगी मी त्यांच्या बरोबर एव्हडी आनंदात असते की हंसून हंसून माझे, नंतर शिथिल झालेले गाल, दुखत रहातात.माझं सततचं हंसणं एव्हडं पराकोटीला जायचं की माझे स्नायू कडक होऊन,जणू काय शंभर उठा-बशा काढल्या सारखं वाटायचं.
चेहरा जरी थकलेला झाला तरी ह्या बारीक बारीक वेदनांचा त्याग करायला मी कबूल नसायची.
थोडासा वेळ जरी कष्टप्रद वाटलं तरी माझे ते दुःखादायी गाल माझ्या त्या आनंदी घटनाकडे आणि अनुभवाकडे माझा दुवा लावण्याच्या प्रयत्नात असायचे हे मला जाणवायचं.
ह्या सर्व अनुभवावरून मला वाटतं, अशावेळी हंसरा चेहरा आणि थकलेले गाल मला बरे वाटावेत ह्यात काही गैर नसावं.”

“ह्यात काहीच गैर नाही.निदान मला तरी तसं वाटत नाही.नाहीतरी उद्या मी प्रो.देसायाना तळ्यावर भेटणार आहेच.हे पुस्तक पण बरोबर घेऊन जाईन.
आणि चर्चेत तुझं नांव न सांगता तुझा किस्सा आणि अनुभव त्यांना सांगीन.बघुया त्यांच काय मत होतं ते.”
असं मी सांगीतल्यावर मनीषा खूश झालेली दिसली.

“पुढल्या आठवड्यात मी तुमच्या घरी येईन.”
असं सांगून तिने माझा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, September 17, 2010

प्रेमवेडे दवा म्हणती वेदनेला या जगती

अनुवाद. (और इस दिल मे क्या रख्खा है…..)

ह्या अंतरी अन्य काही दिसणार नाही
दिसेल तुला तुझीच प्रीति लपविलेली
चिरून पहाशील जेव्हा हृदय माझे
दिसेल तुला तुझीच वेदना लपविलेली

किस्से प्रेमाचे श्रवण केले इतरांकडूनी
प्रितीचे धडे ऐकिले गेले तुझ्याकडूनी
जुळता हृदय तुझ्याशी किती पाहिली स्वप्ने
तरूण मनावरी नकळत असर किती झाले
प्रेमवेडे दवा म्हणती वेदनेला या जगती
ह्या अंतरी अन्य काही दिसणार नाही
दिसेल तुला तुझीच प्रीति लपविलेली

नजरेत माझ्या अशी ही दशा तुझी
दशा ही तुझी अन दया माझी
धडधडत्या उरावर प्रीति असे तुझी
प्रीति ही तुझी अन पूजा माझी
तुजविण नसे मजला कसली स्मृती
केवळ तुच तू असशी मम अंतरी
पहाशील हृदयाने प्रीतिची पूजा केलेली
ऐकशील प्रीतिला खुदा म्हणून नावाजलेली
ह्या अंतरी अन्य काही दिसणार नाही
दिसेल तुला तुझीच प्रीति लपविलेली

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, September 14, 2010

सकीनाबानूकडचा गणपति.

“मिडीयाच्या झोती खाली यांचा उदो उदो होत असेल पण आम्ही आमच्या घरी पिढ्यान पिढ्या गणपति उत्सव साजरा करतो.”

“अगदी सकाळची वेळ होती.नुकतीच,पावसाची सर पडून गेली होती.झाडांच्या मागून सूर्यनारायणाने,डोकावून पहायला, नुकतीच सुरवात केली होती.
पावसाने ओलसर झालेली झाडांची पानं,सूर्य किरणामुळे मधून मधून चमकल्यासारखी दिसत होती.
घराच्या पडवीत एका कोपर्‍यात मोत्या, अंगाची गुंडाळी करून निवांत झोपला होता.बाहेर थंड असलं तरी घरात त्यामानाने उबदार वातावरण होतं.
गणपतिची मुर्ती प्रस्थापीत झाली होती.उदबत्तीचा घमघमाट येत होता.निरनीराळ्या फुलांनी, फुलांची परडी भरली होती.विशेष करून तांबड्या रंगाची फुलं-जासवंदीची,गुलाबाची,कमळांची,लाल देवचाफ्याची-डोळ्यात भरून येत होती.गणपतिबाप्पाला म्हणे लाल रंगाची फुलं फार आवडतात.

त्या वर्षी ईद आणि गण्पति उत्सव एकाच दिवशी आले होते.जवळचे नातेवाईक दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आमच्या घरी जमा झाले होते.
उकडीच्या मोदकांचा वास मधून मधून नाकावरून जात होता.आमचे आईबाबा आरतीची पूस्तकं साफसूफ करून इतर नातेवाईकांना देत होते.कारण आरतीची वेळ झाली होती.
मी,माझी धाकटी बहिण आणि मोठा भाऊ.स्वच्छ आंघोळ करून बाप्पा जवळ आरतीची वाट बघत बसलो होतो.
हे सर्व वातावरण मला मनापासून आवडतं.गणपतिची पूजा करायला आम्हाला आवडतं.”
सकीनाबानू मला सांगत होती.

सकीना आणि उस्मान मुळचे कोकणातले.पिढ्यान पिढ्या कोकणात वास्तव्य झाल्याने इकडच्या मुस्लीम धर्माच्या लोकाना सगळेच सण आपलेसेच वाटतात.त्यातल्या त्यात गणपति उत्सव अगदी जवळचा वाटतो.मला आठवतं काही मुसलमानांच्या घरात गणपतिची मुर्ती आणून ते सण साजरा करायचे.सकीनाबानूच्या घरात असंच करायचे. सकीना मुळात खूप हुशार होती.तिच्या वडीलानी तिला जास्ती जास्त शिकवायचं ठरवलं होतं.ती बी.ए. पर्यंत मराठीत विषय घेऊन शिकली.तिला आणखी शिकायचं होतं.पण वडीलानी तिला लग्न करण्याचा आग्रह केला. मग नवर्‍याची सम्मती असल्यास पुढे शिकावंस असं तिचे वडील तिला म्हणाले होते.पण संसाराच्या आणि दुनियादारी्च्या भंवर्‍यात सापडल्यावर तिला विचार बदलावा लागला. पुढे उस्मानशी लग्न झाल्यावरही तिने गणपति पुजायची तिच प्रथा घरात चालू ठेवली उस्मानबरोबर भेंडीबाजारात संसार थाटल्यावर दोन-तिन मुलं झाल्यावर त्यांना भेंडीबाजारातली जागा अपुरी पडू लागली.
माझ्याच सल्ल्यावरून हे कुटूंब अंधेरीत रहायला आलं.
अंधेरीत आल्यावर मला ते न चूकता गणपति दिवशी घरी बोलवायचे.आता त्यांची मुलं मोठी झाली होती.पण लहानपणापासून सकीनाने केलेले त्यांच्यावरचे संस्कार त्या मुलांनीही चालू ठेवले होते.
ह्यावेळी मी सकीनाच्या घरी गेलो होतो त्यावेळी ती मला आपल्या लहानपणाच्या आठवणी सांगत होती.
“ज्या ज्यावेळी आम्ही गणपति उत्सवाविषयी बोलू लागलो की लोकं सांगायची,
“ओ,सकीना तुम्ही मुस्लिम लोक.तुम्ही गणपति उत्सव साजरा करू शकत नाही.”
पण मला नेहमी वाटतं आम्हाला कुठलाही उत्सव साजरा करायला आवडतो.आणि मला गणपति उत्सव साजरा करायला विशेष आवडतो.माझा वयक्तिक विश्वास ह्या उत्सवाच्या धार्मिक बाबत नसून दुसर्‍या बाबतीत आहे.ही दुसरी बाब म्हणजे ह्या उत्सवात निर्माण होणारं मंगल वातावरण,लहान मुलांपासून वयस्कर मंडळी पर्यंत प्रत्येकजण घरात कुणी तरी नवीन पाहुणा आला आहे आणि त्याचा आदर-सत्कार करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे ह्या इरशेने वावरत असतात त्या बाबतीचं त्याचं वागणं,गणपतिला आवडणारे उकडीचे मोदक खास ह्या सणाला केले जातात त्याच्या मागचा घरातल्या बायकांचा उत्साह,आणि सर्वजण प्रेमाने भारलेले दिसतात त्या बाबत.

बरेच लोक माझ्या ह्या मताशी सहमत होणार नाहीत.पण मला वाटतं गणपतिचा सण फक्त धार्मिक बाबतच असता, फक्त गणपतीची मुर्ती प्रस्थापीत करण्यापर्यंत असता, आणि लोकं जमून उत्सव साजरा करण्यासाठी नसता,तर गणपतिच्या उत्सवात एव्हडं प्रेम आणि उत्साह उतू आलेला दिसला नसता.माझं म्हणणं जरा स्वार्थीपणाचं दिसेल- आणि कदाचीत असेलही.पण मला वाटतं माझं म्हणणं सत्य आहे. आजकाल देशात हा गणपतिचा सण एव्हड्या ठिकाणी साजरा केला जातो ते काय सगळे हिंदूच असतील का?अनेक पंथाचे,धर्माचे लोक हा सण देशभर आणि जगभर साजरा करतात.
अलीकडे तर निरनीराळ्या धर्माचे प्रतिष्टीत लोक, आमच्या धर्माचे धरून,उदा.सलमान खान,अमीर खान वगैरे घरी गणपति आणून पुजतात, असं मी वाचलं आहे.मिडीयाच्या झोती खाली यांचा उदो उदो होत असेल पण आम्ही आमच्या घरी पिढ्यान पिढ्या गणपति उत्सव साजरा करतो.”

मला सकीना हे सर्व उघड करून सांगत होती.मला तिला विचारावसं वाटलं म्हणून तिला म्हणालो,
“हिंदूंचे इतर आणखी अनेक सण आहेत.मग गणपतीचा सण तुला का आवडतो?”
“मला तुम्ही छान प्रश्न विचारला.माझ्या मनातलं, खरं,खरं ते मी तुम्हाला सांगते”
असं म्हणून उकडलेल्या मोदकाची प्लेट मला देत म्हणाली,
“बघा तुम्हाला खाऊन कसे वाटतात मोदक.माझ्या आई, आजी पासून उकडीचे मोदक कसे करतात ते आम्ही शिकत आलो आहो.”
आणि नंतर माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सकीना म्हणाली,

“आम्ही गणपतिबाप्पाचा सण साजरा करतो कारण आम्हाला त्यात चमत्कृति आढळते.ती सण आल्याची घटना, तो आवाज,सुवास,भावना,प्रेम ही सर्व गणपति सणाची चमत्कृती आहे.हे सगळं इतकं प्रभावशाली आहे की ते शब्दात वर्णन करणं जरा कठीण आहे. त्यात सुखाच्या,आकांक्षेच्या आणि जोषाच्या भावना आहेत.गणपति उत्सवाचा सुगंधच माझ्या नाकात भरतो.
जेव्हा मी श्वास घेते तेव्हा माझी ज्ञान-शक्तिच जागृत होते.अगरबत्यांचा सुगंध,फुलांचा सुगंध,कापूर जाळल्याने येणारा सुगंध,जमा झालेल्या लोकांनी आपल्या अंगाला लावलेल्या निरनीरळ्या पर्फ्युमचा सुगंध मला वेड लावतो.
कधी कधी वाटतं हे सर्व सुगंध एखाद्या बाटलीत भरून ठेवून मग त्याचा फवारा सगळीकडे मारावा.

गणपतिबाप्पाच्या आरत्या ऐकून मला खूप आनंद होतो. मला स्वतःला आरत्या पाठ म्हणता येतात.ह्या निरनीराळ्या आरत्यांच्या चाली आणि त्याच्या बरोबर वाजवलेले झांझांचे घंटानाद ऐकून माझं मन वेडं होतं.मला ह्या आरत्या गायला खूप आवडतं.”
“तुला व्यक्तिशः हा सण आवडत असेल पण घरातल्या इतरांनाही हा सण साजरा करायला मजा येते का?”
मी सकीनाला विचारलं.

माझा नवरा उस्मान धरून,माझ्या कुटूंबातसुद्धा सर्वाना गणपति सणाची ताकद भावते.कारण आम्ही सर्व एकत्र जमून गणपतीच्या सणाच्या प्रथा भक्तिभावाने सांभाळतो.प्रथम आम्ही सकाळी उठून गाडी बाहेर काढून गणपतिच्या कारखान्यात जाऊन, आम्ही अगोदरच ऑर्डर देऊन ठेवलेली मुर्ती घरी घेऊन येतो.हे काम म्हणजे एक आमची महा जोखीम आहे अशा तर्‍हेने जपून ती मुर्ती घरी आणतो.एव्हड्या गर्दीतून वाट काढून आपलीच मुर्ती
शोधून काढून मग त्या मुर्तीकडे आईबाबांच पण लक्ष वेधून आपल्या ताब्यात घेऊन घरी सुखरूप आणण्यात केव्हडं साहस असतं.पूर्वी आम्ही मिळेल ती मूर्ती घेत असायचो.पण बरेच वेळां आई म्हणायची ही नको ती, किंवा बाबा म्हणायचे ती नको ही, त्यामूळे एक मताने बाप्पाची मुर्ती मिळत नसायची.त्यावर उपाय म्हणून आता सर्वानुमते ठेरलेली मुर्तीच आम्ही अगोदर ऑर्डर करतो.आणि आदल्या दिवशीच बाप्पाला घरी आणतो.
मग रात्रभर आमचा सर्वांचा सजावट करण्यात वेळ जातो.गणपतिबाप्पाचा चौरंग आणि आजुबाजूची जागा छान सजवतो.ह्या साठी पूर्वी आम्हाला आमच्या शेजार्‍यांचा सल्ला घ्यावा लागायचा.पण आता सर्व सवयीने होतं.सर्व खोली झगमगते.खोलीतला प्रकाश उबदार आणि लुभावणारा वाटतो.हा दिवस मला खूपच आवडतो.”

पुन्हा लहानपणाच्या आठवणी सांगण्यासाठी सकीना म्हणाली,
“लहानपणचं मला आठवतं.त्यादिवशी माझी बहिण, मी आणि माझा भाऊ बाजारात जाऊन शॉपींग करायचो. आजुबाजूचे लोक आनंदात आणि कामात व्यस्त असतात हे पाहून मजा यायची.त्या वयात शॉपींग करायला मला मजा यायची कारण आम्ही भावंड त्या दिवशी भांडत नसायचो.”

आरत्या होऊन गेल्यावर आम्ही सर्व नातेवाईक आणि मित्र मंडळी एके ठिकाणी जमून गप्पा गोष्टी करायचो.दुपारी मोदकाचं प्राधान्य असलेलं जेवण जेवायचो.संध्याकाळी नवे कपडे नेसून बाहेर आणि शेजारी इतर लोकांचे गणपति आणि सजावट पहायला जायचो,त्यावेळी खूप उत्साह यायचा.
प्रत्येकाच्या घरी सुगंधाची लयलूट घेता यायची.”

“खरंच,ह्या सर्व प्रथामागे काही तरी चमत्कृती आहे हे नक्कीच.मला तुझं म्हणणं पटतं.”
असं मी तिला म्हणाल्यावर मला म्हणाली,
“तुमचं म्हणणं मला ऐकायचं आहे.”

मी माझं मत तिला सांगताना म्हणालो,
“ह्या प्रथेमागे काही तथ्य आहे म्हणून लोक तसं करातात,किंवा गंमत म्हणून ते तसं करतात अशातला भाग नाही.
आता तुझं ऐकून विचार केल्यावर माझ्या लक्षात येतं की सर्वच गोष्टी प्रत्येकाला आकर्षक वाटतील असंच नाही. काही लोक दीड दिवसासाठी गणपति

आणतात.रात्रभर जागून केलेली सजावट आणि इतर मेहनत दीड दिवसात संपवली जाते.परंतु,त्यातच खरी प्रथेची खासीयत आहे.सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी “काम” ह्या सदरात येतात त्या अशावेळी गंमत म्हणून स्वीकारल्या जातात.कारण ज्याला त्याला गणपती उत्सावाच्या वातावरणातली तडफ असते,मनःस्थिती असते.हाच त्या चमत्कृतीचा एक भाग आहे असं मला वाटतं.”

“माझं मत मी तुम्हाला सांगते”
असं सांगून सकीना म्हणाली,
“ह्या चमत्कृतीत सर्वांनी भागीदार व्हायला हवं.मी आणि माझं कुटूंब, आम्हाला गणपति सण साजरा करायला मिळतो म्हणून, भाग्यवान समजतो.
मला माहित आहे काहींना एकवेळचं जेवण दुरापास्त असतं.मग सण साजरा करणं दूरच राहिलं.म्हणून आम्ही घरात ह्या दिवशी जास्त जेवण शिजवतो.जमेल त्यांना वाटतो.एका अर्थी ह्या सणाच्या चमत्कृतीत त्यांना भागीदार करतो.मला वाटतं प्रत्येक माणूस ह्या भावनेशी पात्र असायला हवा.”

“माझ्या दृष्टीने वर्षातून एकदाच येणार हा गणपतिचा सण प्रत्येकाला आनंदी आणि उत्तेजित करतो.दीड दिवसाठी जीवनातलं दुःख विसरायला लावतो.
गणपति उत्सवाचा समय म्हणजे मन प्रसन्न ठेवण्यासाठी,गाणं,वाजवणं करण्यासाठी,देण्या आणि घेण्यासाठी, हसणं,हंसवण्यासाठी आहे.जास्त करून कुटूंबाला एकत्र येण्यासाठी,प्रेम वाटण्यासाठी आहे.”
मी सकीनाला म्हणालो.

“माझाही ह्यावर विश्वास आहे.मला गणपती सण आवडतो.”
असं म्हणून गरम मसाले दुधाचा कप मला देत सकीना म्हणाली,
“गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या”
ही आरोळी, तुमच्या सकट सर्वाना सांगून जाते की,
“ह्याला जीवन ऐसे नांव”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, September 11, 2010

झरोका

“घर बांधायचं झाल्यास,मोठ्ठ्या खिडक्या असूद्यात.तुमच्या दिवास्वप्नाना सीमाबद्धता नसावी.”

काल मी डॉक्टर अरविंदच्या नव्या दवाखान्याच्या बांधणीच्या उध्गाटन समारंभाला गेलो होतो.मला त्याने बांधकामाचा नकाशा दाखवला.शस्त्रक्रिया करण्याची खोली सोडल्यास बाकी खोल्याना मोठमोठ्ठ्या खिडक्या होत्या. आणि ते प्रकर्शाने जाणवत होतं.म्हणून मी डॉ.अरविदला विचारलं,
“मुद्दाम म्हणून प्रत्येक खोलीला एव्हड्या मोठ्या खिडक्या असण्याचं तुझं प्रयोजन काय आहे?”

“मायक्रोसॉफ्ट विंडो हे नाव आपल्या सॉफ्टवेअरला देताना बिल गेटला बहूतेक घरातल्या खिडक्यावरून कल्पना आली असावी.”
मला अरविंद हंसत हंसत म्हणाला.

“विंडो मधून पाहिल्यावर त्याचं मायक्रोसॉफ्टवेअर दिसायला लागतं.म्हणजेच घरातल्या खोलीतून बाहेर बघायला आपण खिडकीचा वापर करतो तसाच काहीसा आभास त्याला त्याच्या सॉफ्टवेअर विंडोमधून होऊन, त्याने प्रचंड प्रोग्राम्स लिहून घेतले असावेत.”
मी पण अरविंदला गंमतीत म्हणालो.

“मी काही मायक्रोसॉफ्ट विंडोबद्दल बोलत नाही.कारण मला त्यातली विशेष माहिती नाही.जरी मी त्यांचा प्रशंसक असलो तरी.
मला वाटतं,प्रत्येकाच्या जीवनात खिडक्या असाव्यात.
वसंत ऋतू येण्यापूर्वी-उन्हाळ्याच्या उष्म्या नंतर-सूर्याची कोवळी किरणं, खिडकीतून पाहिल्यावर, रस्यावरच्या पायवाटावरून हंसत असताना दिसतील, आणि रस्त्यावरून ,चमकणार्‍या रंगाच्या मोटारीतल्या खिडक्यातून, पाहिल्यावर डोळे मिचकावलेले दिसतील.”
अरविंद म्हणाला.नंतर म्हणाला,
“तसंच,माझे डोळे,भकास भिंतीवरून,टोले देणार्‍या घडयाळाकडे आणि नंतर खिडकीकडे वळत जातात,तेव्हा खिडकीच्या बाहेर,काही झाडांची हिरवीगार पानं,आळसावलेल्या वार्‍यामुळे हलकेच सळसळताना मला दिसतात आणि माझं ध्यान अकाशातल्या ढगांकडे जातं.हे सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर आल्यावर मला खिडकीचं महत्व चटकन लक्षात येतं.”

मी अरविंदला म्हणालो,
खिडकीचा मुळ उद्देश घरात काळोख होऊ नये म्हणून आणि बाहेरच्या प्रकाशाला आत प्रवेश देण्यासाठी असतो. आता काय घरात फ्लोरोसंट दिवे आले आहेत.खिडक्या नसतील तर घर बांधण्याच्या खर्च थोडा कमी होत असावा कारण तेव्हडं सामान कमी लागतं हे उघडच आहे.कदाचीत संवरण भिंतीच्या अलीकडच्या फॅशनसाठी काही लोकांना खिडकीशिवाय घर बांधणीसाठी मनधरणी करायला विशेष वाटत असेल.पण अशा लोकाना माझा प्रश्न
असा आहे की बाहेरच्या मनोहरतेचं काय?”

“तुमच्या मेडिकल सायन्सप्रमाणे तुमचे खिडकीबद्दल काय मुद्दे आहेत ते ऐकायला मला बरं वाटेल.”
मी अरविंद्ला म्हणालो.

अरविंद म्हणाला,
“खिडक्यामुळे नैसर्गीक प्रकाश येतो.तो कुणी आयता तयार करू शकत तर नाही ना?
मेडीकल सायन्सच्या म्हणण्याप्रमाणे दीर्घकालिक आजार बरे व्ह्यायला सूर्य प्रकाशाची मदत होते.शरीराशी सूर्यकिरणांचा संपर्क येऊन व्हायटॅमीन D चा पुरवठा होतो.त्यामुळे शरीरातली हाडं आणि मेंदुचा विकास होतो.त्याचं कारण शरीरात एन्डोरफीनचं उत्पादन व्हायला सूर्यकिरणाचा उपयोग होतो. हे एन्डोरफीन शरीरात खुशी आणायला तसंच वेदनांपासून मुक्ति मिळायला सहयोग करतं.नुसतं, सूर्यकिरण आत आणून शरीरात रासायनीक प्रक्रिया
करण्यापलिकडे खिडक्यांची मदत होत असते.वास्तविकता आणि अवास्तविकता दाखविण्याच्या उंबरठ्याचं काम ह्या खिडक्या करतात.एखादी पातळ कांच, आतल्या कृत्रिम प्रकारे थंड केलेल्या हवे मधला, आणि बाहेरच्या थंड नैसर्गिक हवे मधला, अंतरपाट असतो.ही खिडकी घरातल्या आतल्या जीवनाला बाहेरच्या समाजाशी संबंध ठेवायला दूवा म्हणून असते.मनन करण्याचा तो एक उंबरठा असतो.
एखादा,निःशब्द होऊन खिडकीच्या बाहेर टकमक बघत असला तर बहुतांश त्याचं ध्यान डागळलेल्या स्मृति उजळण्यासाठी नसतात,कदाचीत मनात आलेल्या एखाद्या परिस्थितिची कल्पना करण्यात किंवा एखादं पूर्वदृश्य आठवणीत आणण्यात ते ध्यान उपयोगात असावं.खिडकीतून बाहेर पहात असताना दिवास्वप्न करणार्‍यांची दिवास्वप्न प्रकट होत असतात.खरंतर,अशावेळी कुणाच्याही कल्पना-शक्तिचा आदर करायला हवा.वाटल्यास चक्र कुणी शोधून काढलं? म्हणून कुणालाही विचारून पहा.कल्पनाशक्तिचंच ते एक द्योतक आहे.”

“हे तुझं ऐकून मला काही विचार सुचले.”
असं म्हणत मी अरविंदला सांगीतलं,
“खिडकीच नसलेल्या घरातल्याना बाहेरच्या दृश्याची काय कल्पना येणार?.
वार्‍याची झुळूक कशी असते,गवताचा सुवास कसा असतो हे कसं कळायचं?जवळच्याच एखाद्या खिडकीतून आपल्यालाच आपण दिवास्वप्न पहाताना पकडलं तर आपल्याच कल्पना प्रज्वलित होतात.ह्यात वाईट काय आहे.? कल्पना हे एक विकासाचं इंधन आहे असं म्हणातात ते काही खोटं नाही.

अगदी लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की मोठ्ठी स्वप्नं पहात असावं.
आपली प्रत्येकाची व्यक्तिगत खिडकी असावी.त्यातून संधी मिळण्यासाठी,समय गाठण्यासाठी उपयोग करता आला पाहिजे.”

माझं हा विचार अरविंद्ला आवडला.आणि म्हणाला,
“शेवटी गंमतीने सांगायचं झाल्यास, विमानातून जाताना, बसमधून जाताना,आगगाडीतून जाताना आपण खिडकीसाठी का धडपडत असतो?
प्रत्येक जण ह्या खिडकीचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करीत असतो.प्रत्येकाच्या विभिन्न आकांक्षेची खिडकी एक निशाणी असते.म्हणून मला खिडकीबद्दल विशेष वाटत असतं.
तुरूंग खिडकीविना असतो.खिडकीविना जीवन एकाकी आणि बुरसटलेलं असतं.तेव्हा घर बांधायचं झाल्यास,मोठ्ठ्या खिडक्या असूद्यात.तुमच्या दिवास्वप्नाना सीमाबद्धता नसावी.”
एव्हड्यात गुरूजी सांगायला आले की मुहूर्त जवळ आला आहे.आपण पुढच्या कामाला लागूया.तो पर्यंत लोकंही जमली आणि आमची चर्चा संपली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, September 8, 2010

सुटका

“प्रत्येकाला जीवनात रोजच्या कटकटीपासून थोडी सुटका हवी असते असं मला वाटत असतं.रोजचं जीवन आणि त्यातले व्याप हे संभाळण्यात आपण ज्यावेळी खूपच मेटाकुटीला येतो तेव्हा अशी कुठेतरी जागा असावी की त्या जागेत जाऊन इतरापासून हरवून जावं असं वाटणं स्वाभाविक आहे.”
माझ्या प्रश्नाचं अंशतः उत्तर म्हणून माधवी मला सांगत होती.
टेबलावरचा पुस्तकांचा ढिगारा पाहून कुतूहल म्हणून मी तिला प्रश्न केला होता.
“अशावेळी एव्हडी पुस्तकं वाचायला तुला सुचतं तरी कसं?”
ह्या माझ्या प्रश्नाचं ते अंशतः उत्तर होतं.

माधवी,माझ्या मित्राची-निलेश पाडगांवकरांची- एकच एक मुलगी.रिक्षा-स्कूटरच्या अपघातात तिच्या पायाला लागलं होतं. म्हणून ती गेले पंधरा दिवस एका खासगी क्लिनीकमधे उपचार करून घेत होती.
माझा मित्र रोज रात्री अकरा वाजे पर्यंत तिच्या बिछान्या शेजारी बसून तिला कंपनी देत होता.आज त्याला अतिशय जरूरीच्या कामाकरता बाहेर गावी जावं लागणार होतं,म्हणून मला त्याने आजची रात्र तिला कंपनी देण्याची विनंती केली.
त्यासाठी मी तिच्या क्लिनीकमधे गेलो होतो.
माधवी कॉलेजच्या शेवटच्या वर्गात शिकत होती.तिच्या बिछान्या शेजारी असलेल्या टेबलावर पुस्तकांचा ढिग होता.

माधवी मला पुढे सांगत होती,
“मग ती जागा टीव्ही पहाण्याची असो,सिनेमा थियेटर असो,पुस्तकं वाचण्याची लायब्ररी असो किंवा मनात आलेली कुठचीही शांतता असलेली जागा असो.कुठचंही स्थान की ज्या ठिकाणी एखाद्याला अस्तव्यस्ततापासून दूर जाऊन आराम मिळेल,बेचैन असताना चिंतामुक्त रहायला मिळेल,किंवा खूपच राग आला असल्यास शांत व्हायला मिळेल तर किती बरं वाटेल?.
वास्तविकतेतून सुटका मिळवून देण्याची,मनाला अवसर आणून देण्याची कुठली का मदत असेना ती मिळाली तरी चालेल असं वाटत असतं.”
असं म्हणून माझ्या चेहर्‍यावरची प्रतिक्रीया काय? हे न्याहळून बघत होती.
माझ्या प्रश्नाचं थेट उत्तर तिने दिलं नाही हे पाहून मी म्हणालो,
“अजून तू मला माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर दिलं नाहीस.”

“सांगते ऐका”
असं म्हणून शेजारच्या ग्लासातलं पाणी पिण्याची इच्छा दाखवून मला ग्लास द्यायला सांगून ते पाणी पिऊन झाल्यावर मला म्हणाली,

“मला आठवतं मी शाळेत असताना,लागोपाठ तिन वर्षात माझ्यावर तिन शस्त्रक्रिया झाल्या.माझ्या डाव्या हाताचं हाड दुखावल्याने,डाव्याच पायच्या गुडघ्याला खेळताना इजा झाल्याने,आणि परत उजव्या पायाच्या गुडघ्यावर तश्याच प्रकारची इजा झाल्याने ह्या शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागल्या.”

“लहानपणी तू खूपच धडपडी होतीस,तोल जाऊन पण पडायचीस.म्हणून तुझ्या बाबाला मी म्हणायचो,
“तुझी माधवी,”पाडगांवकर” आडनावाची शोभून दिसते.”
जूनी आठवण येऊन मी माधवीला सांगीतलं.

“त्यावेळी मला तुमचा खूप राग यायचा.पण मला जवळ घेऊन,
“गंमतीत बोललो”
असं म्हणून मला दिलासा द्यायचा.त्याने मला बरं वाटायचं”
असं म्हणून माधवी पुढे सांगू लागली,

“त्या तिन शस्त्रकियांमुळे माझे शाळेचे दिवस बुडाले हे उघडंच आहे.माझे शाळकरी मित्र-मैत्रीणी कधीतरी भेटायचे. पण माझे मित्रमंडळीत वेळ घालवायचे दिवस बरेचसे फुकट गेले होते.गुडघ्यांच्या इजेने मला बिछान्यावर झोपून संपूर्ण विश्रांती घ्यावी लागली होती.माझं शरीर जेव्हा निष्क्रिय झालं होतं तेव्हा मन क्रियाशील रहाण्यासाठी काही मार्ग धुंडाळणं मला क्रमप्राप्त होतं. झोपून झोपून कंटाळा येत राहिला.

त्या काळात मी माझ्या बालपणातल्या जीगर दोस्तांची-छोट्या,छोट्या पुस्तकांची-मदत घेतली. पुस्तकाच्या एक एक पानातून भरभर जाऊन त्यातल्या गोष्टी पुन्हा वाचून, लिहिलेल्या शब्दात हरवून जायची.माझ्या अवतीभोवती सुंदर देखावे,जादूचे किस्से आणि विनोदाचे फवारे असायचे.जेव्हा माझ्या सभोवतालचं सर्वकाही दहशतपूर्ण वाटायचं आणि ते हाताळायला कठीण जायचं, तेव्हा गोष्टीतल्या निरनीराळ्या पात्रांची मदत घेऊन मला आराम वाटायचा. रात्रीचं, वेदानामुळे मला जेव्हा असह्य व्हायचं तेव्हा भूतं,पर्‍या,उनाड मुलं,जासूस आणि पिंजर्‍यातले पक्षी ह्या सर्व कल्पीत कथेतल्या चिन्हीत व्यक्ती,माझे जीवश्च-कंठश्च व्हायचे.”
डॉक्टरकडे जाण्याच्या भेटी आणि त्यांच्याकडून मिळणार्‍या इलाजाची आठवण येऊन मी थोडीशी घाबरीघुबरी झाले किंवा असहाय झाले की ह्या चिन्हीत व्यक्ती माझा सहारा बनायच्या”.

“वाः! मोठी हुशार आहेस.तुझ्या पुस्तक वाचनाचं,गौप्य माझ्या लक्षात आलं.
हे साहित्यातले तुझे स्नेही तुला अशावेळी हवं ते द्यायचे. मग ते मोठ्याने रडणं,जोरात हंसणं, धैर्य,बळ, सहानुभूती, उपदेश असेनातका,त्यावेळी ते तुला तुझे स्नेही वाटायचे.
खरं ना?”

“खरंच तुम्ही माझ्या मनातलं बोललात”
असं म्हणून माधवी सांगू लागली,
“त्या काळात आणि अजूनही माझ्या जीवनात सामना करायला पुस्तकं वाचणं हा मला एक मार्ग झाला आहे.थोडा काळ दुसर्‍या जगात जीवन जगायला आणि थोडा अवसर घ्यायला पुस्ताकाकडून मला मार्ग सापडतो.वास्तवीक जगात मी तशी थोडीशी लाजवट आणि सतर्क असते.पण मी जेव्हा वाचन करते तेव्हा माझ्या साहित्य-मित्रांसारखं मी मला धैर्यबाज, शूर आणि सहासी आहे असा बहाणा करू शकते.

मी त्यावेळी,जरी बिछान्याला खिळून होते तरी,एखाद्या आकर्षक देशात गेल्याचं किंवा एखाद्या स्वैर कल्पनेतल्या बेटावरच्या सफेद वाळूत माझ्या पायाची बोटं मी रूतून बसले आहे असा बहाणा करायची.जर का माझ्या जवळ माझी पुस्तकं नसती तर त्या तिन वर्षातल्या तिन शस्त्रक्रीयेतल्या वास्तवीकेतून निभावून जाण्यासाठी कोणता मार्ग मी काढला असता याची कल्पनाच करवत नाही.”

मी म्हणालो,
“पण आता तू मोठी झालीस.अजून तू अशावेळी पुस्तकांचाच सहारा घेतेस कां?तुझ्या टेबलावरच्या पुस्तकांचा ढिग बघून असं माझ्या मनात येतं म्हणून विचारतो.”

“आता जरी माझ्या जीवनात मी एक सर्व साधारण मुलगी म्हणून पदार्पण केलं असलं तरी पुस्तकं माझ्या मदतीला असतात.एखाद वेळेला माझा माझ्या मैत्रीणीशी वाद झाला किंवा एखादी कठीण समस्या सोडवण्याचा माझ्यावर प्रसंग आला तर मी माझ्या पुस्तकाच्या कपाटातून एखादं पुस्तक काढून निराळ्या विश्वात रमून जाते.”
मला माधवी म्हणाली.

“बोल,बोल तुझ्या मनातलं ऐकायला बरं वाटतं.”
असं मी म्हणाल्यावर, घड्याळाकडे बघायला लागली.
“अकरा वाजले की तुम्हाला घरी जावं लागणार.पण मी तुम्हाला पटकन सांगून टाकते.”
असं म्हणून सांगू लागली,

“जरी मी माझ्या जीवनात, नवीन नवीन, पाऊलं टाकण्याच्या प्रयत्नात असले तरी जेव्हा मी नव्या पुस्तकाची नवी करकरीत पानं परतवीत असते किंवा जुन्या मित्र-पुस्तकाची कोरम झालेली,सुरकुतलेली पानं परतवीत असते,तेव्हा मला माहित असतं की माझा आत्मा मी निर्मळ करीत आहे,आणि प्राप्त परिस्थितीचा सामना करायला मी समर्थ आहे.

माझ्या पुस्तकातल्या गोष्टी आणि ज्या विश्वातून त्या आलेल्या असतात तिथून मला त्या स्वैर कल्पनांचे डोस देत असतात पण त्याबरोबर वास्तवीक विश्वाचं मुल्यमापन करायलाही मदत करतात.

ही माझी एक सुटका करून घेण्याची पद्धत आहे आणि प्रत्येकाला त्याची स्वतःची पद्धत माहित असणार असं मला वाटतं.”
तेव्हड्यात नर्स आली आणि मला जाण्याचा इशारा केला.

“माधवी तुझ्या सहवासात वेळ मजेत गेला.तुला लवकर आराम मिळो.टेक केअर.”
एव्हडं म्हणायला नर्सने मला मुभा दिली.

“गुडनाईट काका,यूटू”
हे माधवीचे शब्द माझ्या कानात घरी जाई पर्यंत घुमत होते.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, September 5, 2010

ह्या स्वप्नावरी नको करू तू प्रीत

अनुवाद.(मै तो एक ख्वाब हूं…..)

आहे मी असेच एक स्वप्न
ह्या स्वप्नावरी नको करू तू प्रीत
असेच जर नकळत घडले प्रेम
नको करू तयाला तू व्यक्त

होऊनी निशःब्द जाईल ही हवा
फिरूनी येणार नाही उपवनी केव्हा
तुझ्याच करकमलानी ह्या पवनाला
नको करू उगाच तू बंदिस्थ

अंतरी तुझ्या प्रीतिचे रखरखते निखारे
ठेव लपवूनी तुझ्याच उरात ते सारे
करूनी कलंकीत ह्या प्रीतिला
नको करू तिचा तू बाजार

फांदीवरूनी तुटलेले गुच्छ कळ्यांचे
पडूनी होतात त्यांचे ताटवे फुलांचे
रात्र अथवा दिवस भेटती अवकाशात
विसरूनी जा त्या नशीबाला
नको करू त्याकरीता तू आकांत

आहे मी असेच एक स्वप्न
ह्या स्वप्नावरी नको करू तू प्रीत

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, September 2, 2010

चित्तवृत्ति

“माझ्या मैत्रीणीची मी तुम्हाला ओळख करून देते.ही शुभदा.शुभदा नवरे.”
राधिका दम खात म्हणाली.
“आणि ह्यांची मी तुला येता येता ओळख सांगीतली आहे.”
असं माझ्याकडे बघून शुभदाला सांगू लागली.

त्याचं असं झालं,
आज प्रो.देसाई भेटतील म्हणून तळ्यावर वाट पहात बसलो होतो.भाऊसाहेबांबरोबर काहीतरी नवीन विषय काढून चर्चा करावी अशी माझ्या मनात इच्छा आली होती.बर्‍याच वेळा नंतर लांबून राधिका-भाऊसाहेबांची मोठी मुलगी-आणि तिच्याबरोबर एक मुलगी,बहुतेक तिची मैत्रीण असावी,लगबगीने माझ्या दिशेने येताना मी पाहिलं.
ठीक आहे.प्रोफेसर नाहीत तर नाहीत, निदान त्यांच्या मुलीशी गप्पा मारण्यात वेळ जाईल अशी मी समजूत करून घेऊन त्यांची जवळ येण्याची वाट पहात होतो.त्यां जवळ आल्यावर मी राधिकेला म्हणालो,

“मला समजलं.तुम्ही दोघं येता असं पाहून,भाऊसाहेबांची आज बुट्टी आहे हे कळायला मला जास्त वेळ लागला नाही. पण ते राहूदे तुम्ही दोघं हातवारे करून कोणत्या विषयावर बोलत होता.मला सांगायला हरकत नसेल, तर मला ऐकायला आवडेल.”

“मी शुभदाला म्हणाले,मला नेहमीच वाटतं की चित्त-वृत्ति सदाची परिवर्तनशील असते.आणि निमीषात बदलता येते.एक मात्र खरं की समयातला एखादा क्षण पुसून टाकता येत नाही किंवा बदलून टाकता येत नाही.मात्र पाठ वळवून त्याकडे पहाता येतं.
आम्ही चित्तवृत्तिबद्दल-इंग्रजीत ज्याला mood म्हणातात- त्याबद्दल बोलत होतो.
राधिका मला सांगू लागली.
“आणि हे सागण्याचं कारण असं की”

शुभदाच मला म्हणाली,
“मला नेहमीच वाटतं की सूर्याच्या उन्हातून सूख आणि आनंद मिळतो असं जे म्हणतात,ते रीमझीम पावसात कधीच न्हाहालेले नसावेत.ढगाळ वातवरण काही नेहमीच उदासिनता आणीत नसतं.तसंच उन्हामुळे वातावरण सदैव उल्हासित असतं असंही नाही.बर्‍याच लोकाना पावसाळी वातावरण, उदास आणि निराशजनक वाटत असेल, पण कुणी थांबून त्यामधला आनंद घेतला तर,उदासिनते पेक्षा काळ्या ठीक्कर ढगाच्या तळात आणखी काही
छ्पलेलं असतं हे त्यांना दिसेल.आणि हे सर्व प्रत्येकाच्या चित्तवृत्तीवर अवलंबून असतं.”
मला ह्या दोघींची भावावस्थाबद्दलची चर्चा ऐकून मजा वाटली.
माझ्या मनात आलं ते मी सांगावं असं मला वाटलं.
“मी सांगू का?”

असा प्रश्न करून त्या दोघी होय म्हणाल्यावर मी म्हटलं,
“त्यासाठी एखाद्याला नृत्यविशारद होऊन अंगात चपलता आणून पावसात नाचून त्या पावसाच्या अस्तित्वाचा आनंद उपभोगण्याची जरूरी भासत नसते.निसर्गाच्या निखाल़स आनंदातला ह्या लवलेशाचा रस घेण्यासाठी,योग्य वेळ साधून आणि जरी आकाश ढागाळ असलं तरी एखाद्याने प्रयत्न केल्यास,त्याच्या अंतरात त्याल रोशनी स्थापीत करता येते असं मला वाटतं.”
“तुमचं म्हणणं मला पटतं.”
असं शुभदा मला म्हणाली.

“छ्परावर टप,टप,टप आवाज करणारे पावसाचे थेंब,जमीनीचा ताजा सुगंध,आणि आपल्या अंगावर पडणारीक हलकीशी पावसाची रीपरीप हे सर्व काही आपल्या आवडीचा एक लवलेश आहे असं समजावं, असं मला नेहमी वाटतं.”
असं आपलं मत तिने दिलं.

राधिकाने आपला मुद्दा सांगताना म्हणाली,
“मुडवगैरेवर माझा विश्वास नाही.
मी रोजच माझ्या मनात आठवणी जपून ठेवते. आणि माझ्या जीवनाचा ह्या आठवणी एक भाग म्हणून माझ्याजवळ चिरकाल असतात. काही दिवस, आणखी चांगले गेले असते, असं मनात आलं तरी मी जशी आज आहे तशी व्हायला रोजचा दिवस माझ्यात वाढ करीत असतो, असं मी समजत असते.

एखाद्या दिवशी सुरवात जरी चांगली झाली नाही,तरी तो दिवस वाढत असताना हळू हळू चांगला होत जातो आणि माझ्या जीवनात येणार्‍या लोकांकडे पाहून आणि होणार्‍या गोष्टींचा स्वीकार करून जीवन जगावं असं वाटतं.त्यामुळे माझी चित्तवृत्ति कधी ही विचलीत होत नाही.”
“आयुष्यात असं चालायचंच.
“चित्तवृत्ति ठीक असेल तरच मला काम करायला मजा येते, नाहीतर मला कामात स्वारस्य नाही.”
असं म्हणणार्‍यापैकी मी नाही. असं माझा अनुभव सांगतो.”

असं म्हणून चर्चेला जरा जोर यावा म्हणून मी पुढे त्या दोघीनांही सांगून टाकलं.
“मी, प्रेम आणि दुःख, निरर्थकता आणि विकलता अनुभवली आहे.शिवाय परिश्रमाचा काळ उपभोगत असताना, माझ्या हितचिंतकानी मला सावरलं आहे.जीवन धोक्यात टाकण्या योग्य नाही.पण जर का तुमच्या मदतीला कुणी असेल,आणि घेतलेले धोके घेण्यालायक नव्हते असं असताना ते लोक जरका तुमच्या बाजूला असतील तर ठीक आहे.मात्र चित्तवृत्ति संभाळत राहिल्यास हे होणे शक्य नाही.”

“मला वाटत असतं की मी कोण आहे आणि मला काय आवडतं ह्याने फरक पडत नाही.पण मी कुठे आहे ह्याने फरक पडतो.काही लोक संगीतकार होण्यासाठी परिश्रम घेतात कारण त्यांना संगीत आवडतं.काहींना कलेचा उत्कट शौक असतो,कारण त्यांना नृत्य करायला आवडतं.काहीना डॉक्टर, वकील,पहेलवान,शिक्षक किंवा त्यांच्या आवडीप्रमाणे जसे ते प्रेरीत होतात तसं काहीतरी व्हावसं त्याना वाटतं.पण असं मनासारखं झालं नाही म्हणून प्राप्त परिस्थितीत आपली भावावस्था संभाळून जगाचा व्यवहार करीत राहिलं पाहिजे.”
शुभदाने आपला विचार सांगीतला.

मी म्हणालो,
“प्रत्येकाच्या जीवनात काहीना काहीतरी संभाळून ठेवलं जात असतं.एखाद्याचं व्यक्तीत्व कसं असायला हवं हे सुद्धा त्याच्या जीवनात संभाळून ठेवलं जात असावं.
माझं कुठल्याही गोष्टीवर प्रेम असलं तरी,जोपर्यंत आजुबाजूला असे लोक असतात की जे माझ्या प्रेमात भागीदार होतात,किंवा त्या गोष्टीवरचं माझं उत्कट प्रेम पाहून ते स्वीकार करतात, तोपर्यंत त्या विशिष्ट गोष्टीपासून मला सूख मिळणं कठीण जातं.
मला नेहमीच वाटतं की,आपल्या अंगात आलेल्या जोषाचे इतर भागीदार असायला हवेत आणि त्यांनीही त्यात आनंद घ्यायला हवा,त्या जोषाने इतर प्रेरित व्ह्यायला हवेत,तो जोष असा निरखला जायला हवा की त्यामुळे हजारोंची अंतरं हलली पाहिजेत.”
“मी तुम्हाला थोडक्यात सारांशात सांगते”
राधिका म्हणाली,
“कारणास्तवच मी माझ्या हृदयाला अनुसरून वागते.आणि त्या काराणामूळे,ज्याला खरा आनंद म्हणतात, तो मला मिळतो.”

“पण चित्तवृत्तिबद्दल तुम्हाला अशी चर्चाच का करावी लागली?”
असा सरळ सरळ प्रश्न मी केला.
माझं हा प्रश्न पाहून दोघींही हंसल्या.
“मी स्पष्टीकरण केलं तर तुझी हरकत नाही ना?”
असं शुभदाला राधिकेने विचारलं.तिने मानेने रुकार दिल्यावर,
“मी सांगते”
असं म्हणून राधिका सांगू लागली.
“अलीकडे माझा नवरा,मुड घालवून बसलेला असतो.काही काम सांगीतलं तर,
“माझं मुड नाही”
असं म्हणून कामाची टाळाटाळ करतो.संसार करायचा झाल्यास एकट्यावर काम टाकून दुसर्‍याने आपल्या चित्तवृत्तिचे चोचले करून कसं चालेल?”
असं शुभदा आपल्या नवर्‍याच्या अलीकडच्या वागुणीकीची तक्रार वजा मनातली खंत माझ्याकडे बोलून दाखवीत होती.
मीच म्हणाले आपण हे सर्व काकांकडे बोलून बघूया.चार शब्द आपल्या अनुभवाचे ते सांगतील.म्हणून आम्ही, माझे बाबा तळ्यावर येणार नाहीत, ह्याची संधी साधून तुम्हाला भेटायला आलो.नाहीतर घरीच बसून चर्चा करीत राहिलो असतो.इकडे तर सध्याच्या सूंदर हवेत चालणं होईल आणि चर्चाही होईल.असा आमचा विचार झाला.

“ह्या चर्चेत प्रो.देसाई हवे होते.”
असं मी म्हणालो.
दोघीनीही चेहरा गंभीर केला आणि म्हणाल्या,
“चला काळोख झाला आपण निघूया”

श्रीकृष्ण् सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com