Saturday, March 31, 2012

अंतरातल्या नाना कळा...९




"स्वर आले दूरूनी
जुळल्या सगळ्या आठवणी"


एक दिवस म्हणजे ह्या आठवड्याच्या सोमवारी मी माझ्या पत्नीला भेटायला गेलो नाही.सुधार सेंटरच्या सांगण्याप्रमाणे तिला स्वतंत्रपणे राहून ती स्वतःच प्रोत्साहित होण्यासाठी मी तिच्यापासून दूर राहिलो.


आज मंगळवारचा दिवस उजाडला.सकाळीच माझ्या मुलीने कामावर जाताना मला सुधार सेंटरवर सोडलं.माझ्या मुलीला आणि मला पाहून माझी पत्नी खूप आनंदी झालेली दिसली.कालच्या सकाळी फि.थे.च्या लोकांनी तिला अन्य व्यायाम देऊन पॅर्ललबारवर काही पावलं चालवली.असं करताना तिच्या पायाचे स्नायु तिला साथ देत आहेत.आजची तिची प्रगति पाहून माझ्या आशा वाढल्या आहेत.
सकाळी भरपूर व्यायाम झाल्याने थकून,दुपारचं तिचं जेवण झाल्यावर, ती तिच्या बिछान्यावर झोपली आहे असं पाहून कॉरिडॉरमधे व्हिलचेअरवर बसून येरझर्‍या घालणार्‍या पेशंटना हलो-हाय करीत मी फिरत होतो.


यु.सी.बर्कलीमधे प्रोफेसर म्हणून काम करीत असलेल्या एका तरूण पेशंटची मला माहिती मिळाली.त्याच्या मेंदूवर वाढत गेलेल्या टुम्यरची सर्जरी एक वर्षापूर्वी केली गेली होती.परंतु,दुर्दैवाने त्याला नंतर स्ट्रोक आला आणि सुधार केंद्रावर सुधारण्यासाठी त्याला पाठवलं आहे.बिचार्‍याचे हात पाय थरथरत असतात.बोलणंही नीट होत नाही.ह्या सुधार सेंटरवर गेल्या एक वर्षापासून त्याच्यावर फि.थे.आणि स्पिच थेरपीचे उपाय करून अलीकडे तो वॉकर घेऊन चालण्याच्या परिस्थितीत येत आहे.ह्या तरूण प्रोफेसरचं उभं आयुष्य अपंगावस्थेत जाणार आहे हे पाहून मी सद्गदित झालो.


जीवन किती बिनभरवश्याचं असतं ह्याचा विचार येऊन माझं मन चलबिचल झालं.ह्या वातावरणात सध्या माझा वेळ जात असल्याने एक एका पेशंटकडे बघून ही चलबिचल प्रकर्षाने जाणवते.ह्या सेंटरवरचा सगळाच स्टाफ,सर्व पेशंटना आदराने वागवणारा,दयाशील,कामात कुचराई न करणारा,समर्पित होणारा असा आहे.नव्हे तर त्यांना तसली शिकवणूकच आहे.इकडच्या संस्कृतितच ते भिनलेलं आहे.सकाळीच ह्या सेंटरवर आल्या आल्या भेटेल तो ओळख नसलेलाही,
हलो-हाय,
हाव आर यू डुईंग टूडे,
हाव यु डुइंग,
हॅव अ गुड डे,
मे आय हेल्प यु,
अशा तर्‍हेचे उद्गार,योग्य काळवेळ बघून, सहजतेने काढत असतात.
"वचने किम दरिद्रता"
ह्या संस्कृत वचनाचं जणू बाळकडू घेतलेले हे लोक असावेत असं मनात येतं.ह्यांच्यात राहून आमच्यासारख्याना पण ह्या चांगल्या सवई लावून घ्याव्यात असं वाटतं.


फेरफटका मारून झाल्यावर पत्नीच्या खोलीत मी आलो.अजूनही ती झोपली होती.तिच्या चेहर्‍यावर उमेदीची छटा दिसत होती.मला माझ्या कवितेतल्या चार ओळी आठवल्या,


दिवस ते गेले कुठे
 सांग ना! दिवस गेले कुठे
 नजर सांगत होती प्रीतिच्या अनंत कथा
 तरूण विश्व अन नव्हत्या कसल्या व्यथा
कठीण समयी निर्वाह केला कसा
 सांग ना! निर्वाह केला कसा



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, March 27, 2012

अंतरातल्या नाना कळा...८



करून हे एव्हडे सारे
कुणी पडे आजारी
सेवेचे कर्तव्य वाटे न्यारे


आज शनिवार,सुट्टीचा दिवस. आज पुन्हा माझ्या पत्नीला पहायला नातेवाईक, सुधार सेंटरवर आले होते.त्यात विशेष करून आमची चारही नातवंड आली होती.मोठा नातू-मुलीचा मुलगा- सहा फूट चार इंच उंच, गोरा पान, राजबिंड,इंजीनियर झाल्यावर त्याच विषयात पीएचडी करीत आहे.नात -मुलीची मुलगी-युसी.बर्कलीमधे कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.दुसरी नात-मुलाची मोठी मुलगी-ग्रॅज्युएट झाली आणि आता मेडिसीनसाठी सिलेक्ट झाली आहे.आणि तिसरी नात-मुलाची मुलगी-सहावीत शिकत आहे.ह्या सर्व नातवंडानी आल्या आल्या आजीला पाहून तिला गराडाच घातला.आजीला मिठ्या मारून तिच्या पाप्या घेऊन,सर्वात धाकट्या नातीने स्वतःच्या हाताने चितारलेले,गेटवेल सून,ग्रिटींग तिला देऊन तिचं मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न केला.आजीच्या चेहर्‍यावरून ते दिसत होतं.असलं हे औषध बाजारात मुळीच विकत मिळणार नाही.


रोजच्या प्रमाणे,पत्नीची थेरपी चालूच आहे.पॅर्ललबार ह्या फि.थे.च्या एका उपकरणात उभं राहून पावलं टाकण्याच्या मुख्य व्यायामात थोडी थोडी प्रगती दिसत आहे.हा थेरपीचा दुसरा आठवडा चालू झाला आहे.तिसर्‍या आठवड्यात तिच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.मला आणि मुलांना १९ मार्चला बोलावून मिटींग घेतली जाणार आहे.


पेशंटकडे रोज एव्हडा वेळ न घालवण्याचा मला सल्ला दिला आहे.पेशंटची सर्व देखभाल होत असल्याने,पेशंटच्या सुधारासाठी प्रेरणा मिळण्याची जरूरी असल्याने त्याला नातेवाईकापासून एकाकी ठेवल्याने उद्देश साध्य होतो असं सांगण्यात आलं.त्यामुळे अलीकडे आम्ही सर्व अधुनमधून  तिला भेटायला जात आहोत.


माझ्या मनाला हा सल्ला कसासाच वाटला पण नीट विचार केल्यावर सल्ल्यातली सत्यता नाकारता येणार नाही अशी मनाची खात्री झाल्याने आठवड्यातून एकदा आणि विकेंडला एकदा असं मी माझ्या पत्नीच्या सानिध्यात रहायचं ठरवलं.माझ्या पत्नीनेही मला धीर देऊन तसं करायला समत्ती दिली.हे मला जास्त प्रोत्साहक वाटलं.


आज सोमवारचा दिवस होता.आज मी सुधार सेंटरवर गेलो नाही.घरीच वेळ घालवला.रात्री झोपायच्या वेळी तिची फारच आठवण येत होती.जुन्या आठवणीने मनात काहूर केलं होतं.समुद्ररूपी संसाराच्या पुन्हा आठवणी येऊ लागल्या.वय होत चालेलं असताना मन भयभयीत होतं.समुद्रातही असंच होत होतं.


हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.त्रेपन्न वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे छत्तीस महिन्यांची सोबत, म्हणजेच जवळ जवळ  एकोणीस हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं.आणि आमच्याच होडीत निवांत वेळी कधी कधी मी माझ्या पत्नीला  विचारतो,
"उद्या कसं होणार?"
आणि ती पण कधी कधी  मला सहाजिकच म्हणते
"उद्या कसं होणार?"


तेव्हां मी तिला म्हणतो,
आज हा कालचा उद्या होता.आणि हाच आज उद्याचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्या होतच रहाणार आहेत. तेव्हां,
आता कशाला उद्याची बात?



स्वप्न विरल्यावर जागा झालो.वास्तवीकतेत आलो.उद्याची बात करायची जबाबदारी आली आहे ह्याची जाणीव झाली.
ही व्याधी होण्याआधी होती ती परिस्थिती परत आल्यावर रोजच घरी व्यायाम तिला करावा लागणार आहे आणि मला तिच्या जवळ बसून तिचा व्यायाम घ्यावा लागणार आहे.हे नक्कीच झालं आहे.
माझ्याच एका जुन्या कवितेची मला आठवण आली.


निरोगी मौज

पडूं आजारी
मौज हिच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी

मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी

खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे चालेल

करून हे एव्हडे सारे
कुणी पडे आजारी
सेवेचे कर्तव्य वाटे न्यारे


क्रमशः


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com



   

Friday, March 23, 2012

अंतरातल्या नाना कळा...७





"नजरेला दावी पाप
त्याला नेत्र म्हणू नये
विसरला आईबाप
त्याला पूत्र म्हणू नये."

ह्या ओळी माझ्या मुलांना लागू होत नाहीत. ह्याबद्दल मला धन्य वाटतं.गेले अठराएक दिवस ही मुलं कामावर त्यांचं शरीर घेऊन गेली तरी मनानी ती माझ्याबरोबर आणि आपल्या आईबरोबर रहातात.सुधार सेंटरवर त्यांचे दोन दोन तासानी फोन येऊन असलेल्या स्थितिची चौकशी करीत असतात. जमेल तेव्हा जातीने भेटून जातात.त्यामुळे आम्हाला केव्हडा धीर येतो.



पुनर्सुधार सेंटरवर येऊन आता बारा दिवस झाले होते.परंतु,प्रत्यक्ष थेरपी त्या आठवड्यातल्या बुधवारपासून झाल्याने आज थेरपीला सुरवात होऊन दहाच दिवस झाले होते.
आपलं शरीर आपल्याला दिसायला एकदमच चालू वाटतं.पण ते किती क्लिष्ट आहे हे नुसत्या फिझीकल थेरपी,ऑक्युपेशनल थेरपी.आणि स्पिच थेरपी ह्या घेतल्या जाणार्‍या उपायांकडे पाहून मनात येतं, ज्या निसर्गाने हे शरीर बनवलं आहे त्या निसर्गाची काय महती गावावी.?
माझ्या पत्निला फक्त फिझीकल आणि ऑक्युपेशनल थेरपीची गरज आहे.
ऑक्युपेशनल थेरपीबद्द्ल अगदी साध्या भाषेत सांगायचं झाल्यास,ज्या पेशंटना त्यांच्या रोजच्या जीवनात त्यांना हव्या असलेल्या आणि त्यांना लागणार्‍या जरूरीच्या गोष्टी उपचारात्मक उपायानी सुलभतेने प्राप्त होण्यास केलेली मदत.वयस्कर पेशंटना शारीरीक आणि संज्ञानात्मक बदल
होण्यास मदतीच्या रुपाने केलेला उपचार.
सर्व उपाय चालू आहेत आणि प्रगती मुंगीच्या पावलांनी पुढे पुढे चालली आहे.जागृत होणार्‍या स्नायुंची रोजरोजची सुधारणा आकडेवारीत,ग्राफवर आणि प्रत्यक्ष हालचालीवरून नजरआड होत नाही.


"डोन्ट युझ देन यु लूझ"
असं हे ह्या थेरपीचं ब्रिदवाक्य आहे.शरीराचा बाहेरचा अवयव नकळत वापरला जातो.त्यामुळे एरव्ही काही वाटत नाही.पण जर का एखादा अवयव वापरला गेला नाही की तो कधीतरी दुखू लागतो.आणि ह्याची परिणीती तो अवयव न वापरण्यात होतो.
"वापरात नाही म्हणून दुखतो आणि दुखतो म्हणून वापरात नसतो"
ह्या चक्रगतीत तो अवयव निकामी होतो.माझ्या पत्नीच्या पायांची तिच काहीशी परिस्थिती झाली.स्नायु कमजोर झाले.आणि आता त्यांना जोर आणायला व्यायामाशिवाय गत्यंतरच नव्हतं.


मला घेऊन माझ्या मुलीच्या घरी सोडायला माझ्या मुलाला आज जरा उशीर होणार होता.तसं मला त्याने सांगीतलं होतं.माझी पत्नी तिचं रात्रीचं जेवण झाल्यावर तिच्या बिछान्यावर पहुडली होती.तिला झोप कधी आली ते मला कळलंच नाही.
व्यायामाची तिला सवय नसल्याने सर्व अंग आंबलं असल्याने बिछान्यावर टेकल्यावर तिला झोप आली असावी.


तिच्या बिछान्यासमोरच खूर्चीवर बसून मी मुलाची वाट बघत बसलो होतो.दिवसभर त्या सुधार सेंटरच्या वातावरणात राहून माझं मनही थकलं होतं.मलाही डुलकी लागली.आणि परत मी माझ्या समुद्ररूपी जीवनात गेलो.


सुरवातीला समुद्रात आल्यावर किती प्रवास केला ह्याचा हिशोब करता यायचा.मध्य समुद्रात आल्यावर सुद्धा क्षितीज अजून दूरच वाटायचं. अजून किती पल्ला गांठायचा आहे कोण जाणे. मुलांच्या होड्या जवळच असल्याने धीर सुटत नव्हता.पण एकदा एकाएकी एक मोठी लाट येऊन आमची होडी जवळ जवळ उलटणार होती. मुलांनी आणि अगदी जवळच्या नातेवाईकानी होडी उलटण्या पासून वाचवली.पण तोपर्यंत त्या लाटेचा फटका माझ्या पत्नीला बसला.जवळ जवळ तिचा पुनर्जन्म झाला.त्यावेळी हे गाणं रेडिओवर ऐकलं की मन खूप भाबडं व्हायचं.

"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी"

बिचारी गेली एकवीस वर्ष तो फटका सहन करून उमेदीत जगत आहे.आयुष्य हे असंच असतं.
"मी कुणाचं वाईट केलं की देवाने मला ही शिक्षा देली.?"
असं ती मला म्हणते.
"पण माणसाचं सर्वच काही मनासारखं होत नसतं. देवाने "आशा" नावाची एक माणसाला क्षमता दिली आहे.त्याच्या वर आपण जगूया"
असं मी तिला नेहमी म्हणतो. ती तशी जगत आहे.हे घेण्यासारखं आहे.



माझा मुलगा माझ्या जवळ निमुट बसला होता हे मला कळलंच नाही.,
मला जाग आल्यावर माझा मुलगा मला म्हणाला,
"तुम्हा दोघांनाही मला उठवायचं नव्हतं."

माझ्या मनात चटकन येऊन गेलं,
"आदर्शाला जोपासितो
त्याला नाव ठेवू नये"


दहाएक मिनीटं तो तसा बसला होता.आम्ही दोघं पत्नीला जाग यायची वाट पहात होतो.जाग आल्यावर मी तिच्या डोक्यावरून हात फिरवून आणि मुलांने तिला जवळ घेऊन आम्ही तिला बाय बाय केला आणि घरी आलो.


क्रमशः

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 19, 2012

अंतरातल्या नाना कळा...६




सोडुया मोह आता
वेळेच्या वसुलीचा
आणि
विश्रांती विना श्रमाचा
अथवा पस्तावू
आनंद सुखाने जगण्याचा


मंगळवारपासून रोज सकाळी माझी मुलगी मला सुधार सेंटरवर सोडायला लागली.आणि मुलगा मला सेंटरवरून मुलीच्या घरी येऊन सोडायचा.आम्ही आमच्या मुलीकडे रहात असल्याने मुलगी मला सकाळी ह्या सेंटरवर सोडून,आपल्या आईचं दर्शन घेऊन तिला प्रेमाचं आणि आस्थेचं अलिंगन देऊन आपल्या कामावर जायला लागली.सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत मी माझ्या पत्नीच्या सानिध्यात रहायला लागलो.


ह्या सुधार सेंटरमधे दोन विंग्स आहेत.एका विंगमधे माझ्या पत्नी सारखे दोन तीन आठवड्यासाठी आलेले पेशंट रहातात.आणि दुसर्‍या विंगमधे बरेच उशीरा सुधार होणारे पेशंट रहातात.सत्याहत्तर पेशंटची सोय असलेल्या ह्या सेंटरवर नर्सिंगहोममधे ज्या सोयी पेशंटसाठी असतात त्या सर्व सोयी पुरवल्या जातात.


ह्या सेंटरवर फिजिओथेरपीसाठी लागणारी जीम असून स्न्यायुंच्या सुधारासाठी लागणार्‍या डायथर्मी देता येण्यासारख्या मशीन्स आहेत.स्नायुंनां शिथीलता आणण्यासाठी "इलेक्ट्रीकली इन्ड्युस्ड" उब देण्याची सोय ह्या डायथर्मी मशीनचा उपयोग करून केला जातो.
२८ फेबु.रोजी निर्धारण करणारा फि.थे.(फिजिओथेरपीस्ट) पत्नीच्या रूममधे येऊन तपासणी करून गेला.दुसर्‍या दिवसापासून तिला व्यायाम दिला जाणार असं त्याने सांगीतलं.आम्हाला हे सर्व नवीन होतं.इथली प्रत्येक गोष्ट माझ्या ज्ञानात भर घालणारी होती.


अपघाताने शरीराचा चेंदामेंदा झालेले पेशंट,परॅलेटीक पेशंट वाचा गेलेले पेशंट असे नाना व्याधीने पांगळे झालेल्या पेशंटना जीवन जगण्याच्या पातळीवर आणून त्यांचा पुनर्सुधार केला जातो.


दुसर्‍या विंग मधल्या बरेच उशीरा सुधार होणार्‍या पेशंटची देखभाल कशी करतात ह्याचं कुतूहल मनात आल्याने ते पहाण्यासाठी आणि त्याचबरोबर माझे पाय मोकळे करण्यासाठी म्हणून त्या विंगमधे सहजच फेरफटका मारण्यासाठी मी गेलो होतो.


ह्या विंगमधल्या पेशंटच्या शारीरीक अवस्था पाहून माझं मन खूपच गहिवरलं.जीवनाच्या संध्याकाळी माणसाची काय अवस्था होते आणि अशा लोकांची नीट देखभाल न केल्यास काय अवस्था झाली असती कुणास ठाऊक.
नकळत माझं मन, माझ्या आजी आजोबांच्या उतार वयातल्या माझ्या आठवणी, जागृत करायचा प्रयत्न करू लागलं.


त्या काळात शारीरीक बळाला कमतरता येऊ लागल्याने त्यांच्या हालचालीतही कमतरता दिसायला लागायची.शेवटी चालणंच बंद झाल्याने घरीच बिछान्यात निपचीत पडावं लागायचं.कसलीच हालचाल करायला न आल्याने शरीराचं सर्वच कार्य हळूहळू उताराला लागायचं.अन्न कमी जात गेल्याने शरीर क्षीण होऊन शेवटी अंत व्हायचा.


ह्या सुधार सेंटरमधे असं होऊ द्यायला मज्जाव आणण्याचा प्रयत्न होतो.त्यामुळे दिवसभर व्हिलचेअरवर बसून सेंटरच्या आवारात होणारे निरनीराळे कार्यक्रम पाहून,जेवणांच्या वेळी वाटल्यास डायनींग हॉलमधे बसून जेवावं अथवा तुमच्या रूममधे तुम्हाला जेवण आणून दिलं जातं ते जेवावं.मध्यंतरी पेशंटचा व्यायाम घेतला जातो.थोडक्यात तुम्हाला सक्रिय ठेवलं जातं.


मन उद्विग्न झालेल्या मनस्थितीत मी पुन्हा पत्नीच्या जवळ येऊन बसलो.तिचं रात्रीचं जेवण आटोपून ती आपल्या बिछान्यावर पहूडली होती.बिचारी उद्यापासून व्यायाम घेतला जाणार आहे त्याच्या काळजीत असावी.मी तिची होईल तेव्हडी समजूत घालीत होतो.असं रोज तिला सोडून मला मुलाबरोबर मुलीच्या घरी झोपायला जावं लागणार होतं ह्याही विवंचनेत ती असावी.माझ्या प्रकृतीची हेळसांड होऊ नये म्हणूनही ती चिंतेत असावी. तिचं मुकेपण मला जास्त बोलकं वाटत होतं.तेव्हड्यात माझा मुलगा योजल्या प्रमाणे मला न्यायला आला.मला घेऊन निघण्यापूर्वी आपल्या आईला त्याने अलिंगन दिलं.भरवशाच्या दोन गोष्टी तिला त्याने सांगीतल्या.


घरी आल्यावर मुलीने केलेल्या जेवणातले दोन घास मी कसेबसे खाल्ले.सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत बसायची अशा तर्‍हेची सवय नसल्याने मला खूप थकवा आला होता.
बिछान्यावर पडल्यावर झोप केव्हा आली ते मला कळलंच नाही.
जावई,सून आणि दोन्ही मुलं आमच्यासाठी घेत असलेले कष्ट पाहून माझी चिंता दूर झाली होती.पहाटेला जाग आल्यावर भूतकाळाची जाणीव व्हायला लागली.


आमच्या समुद्ररूपी संसाराच्या प्रवासात आम्ही कसे दिवस काढले त्याच्या आठवणी येऊ लागल्या.
ह्या प्रवासात एक पुत्ररत्न आणि एक कन्यारत्न झालं. प्रवासात उमेद आली.कष्ट पडत होते, अडचणी येत होत्या,भिती वाटायची,पण शांत समुद्रात कधी भविष्याची स्वप्न पडायची.सहप्रवासात कधी होड्याना होड्या लागायच्या,हंसत खेळत गुंता सोडवायचा.कधी थकवा यायचा पण भरंवसा प्रचंड असायचा. कधी कधी होडीत बाहेरून पाणी यायचं,सर्व मिळून त्याचा उपसा करायचा.मुलांची मदत व्हायची.नंतर काही होड्या किनाऱ्याकडे परत फिरल्या आमची पाळी आली त्यावेळी आम्ही दोघानी पण परत फिरायचं ठरवलं. कारण आता मुलं मोठी झाली होती.त्यांच्या पण आता होड्या तयार करायच्या होत्या.त्यांच्या होड्या तयार झाल्या.त्याना घेवून पुन्हा समुद्राच्या दिशेने प्रवास चालू केला.आता आमच्या होडीत आम्ही दोघंच होतो.प्रवास चालूच होता.मिळूनच प्रवासाला निघालो होतो.कुणी मागे तर कुणी पुढे.पण एकमेकांच्या दृष्टीक्षेपात होतो.जवळ जरी असलो तरी प्रत्येकाला आपआपल्या होडीतच दिवस काढायचे असतात.मागे वळून वळून मुलांच्या होड्या नीट चालल्या आहेत पाहून बरं वाटायचं.कधी कधी मनात काळजी पण वाटायची.


ते वसंत ऋतुचे दिवस होते.
“जीवनात ही घडी अशीच राहूदे.
प्रीतिच्या फूलावरी वसंत नाचू दे.”
असं गाणं मनात गुण्गुण करायचं.

क्रमशः

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, March 15, 2012

अंतरातल्या नाना कळा...५




"आपण करतो वेळेची वसुली
वेळच करते आपुली वसुली
घेतो श्रम विसरुनी विश्रांती
करते वेळ वसुली विश्रांतीची
श्रम आणि विश्रांतीचा हा लपंडाव
करितो आपुल्या प्रक्रुतीचा पाडाव"

२७ फेब्रु.२०१२
आज सोमवार.दुनियादारी चालू झाली.गडबड, सडबड, धावपळ चालू झाली.माझ्या पत्नीचाही हा हॉस्पिटल मधला सहावा दिवस.यथा योग्य नियमीतपणाने तिची देखभाल होत होती.ब्लडशुगर चेक,ब्लडप्रेशर चेक,सकाळचं तोंड धुणं,आवश्यक त्या औषधाच्या गोळ्या देणं,तिला साफ करणं, स्पॉन्ज बाथ देणं,ब्रेकफास्ट देणं वगैरे कामं होत होती.तोपर्यंत नऊ वाजले.संबंधीत डॉक्टरांची आपआपल्या पेशंटकडे रुटीन व्हिझीट्स सुरू झाल्या.


आमच्या किडनीच्या डॉक्टरबाईने,ती पत्नीच्याबाबतीत हॉस्पिटलकडून इनचार्ज होती,मला सांगीतलं की बहुदा आज तिला आम्ही डिसचार्ज देऊ.तिच्या किडनीच्या,हार्टच्या,मेंदुच्या,कण्या मणक्याच्या आणि रक्ताच्या टेस्ट्स नेगेटीव्ह म्हणजे सुरळीत आहेत.हॉस्पिटलच्या केस मॅनेजरला रिपोर्ट गेला आणि त्यात माझ्या पत्नीला रिहॅबमधे म्हणजे रिहॅबिलटेशन सेंटर म्हणजेच पुनर्सुधार सेंटर मधे हलवावयाला फर्मान निघालं.


केस मॅनेजर माझ्या मुलांना भेटली आणि तिने आमच्या घराच्या जवळपासच्या पुनर्सुधार सेंटरची लिस्ट देऊन प्रत्यक्ष सर्व सेंटवर जाऊन एका सेंटरची निवड करायला सांगीतलं.
माझ्या मुलांने आणि सुनेने तसंच माझ्या जावयाने आणि मुलीने हे काम विभागून घेऊन सर्वानुमते एका पुनर्सुधार सेंटरची निवड केली आणि केस मॅनेजरला कळवलं.


संध्याकाळी बरोबर चार वाजता ऍम्ब्युलन्स आली.हॉस्पिटलच्या बेडवरून माझ्या पत्नीला फुलासारखं उचलून पुनर्सुधार सेंटर्वर आणून सोडलं. मेकनाइझ्ड स्ट्रेचरवरून, हॉस्पिटलने आखून दिलेल्या मार्गावरून,ऍम्ब्युलन्स योजून दिलेल्या ठरावीक जागेवर हजर होती.सर्व काही वेल प्लान्ड होतं.


पुनर्सुधार सेंटरला हॉस्पिटलच्या केस मॅनेजरने फॅक्स करून पत्नीचे मेडिकल पेपर्स पाठवले.तिला कोणती फिझीकल थेरपी द्यावी,कोणती औषधं द्यावी, किती दिवसात तिच्यात अपेक्षीत सुधारणा व्हावी तिला कोणतं डायट द्यावं वगैरे वगैरे कळवण्यात आलं.


पुनश्च सोमवारी रात्री पत्नी हॉस्पिटल ऐवजी सुधार सेन्टरवर मुक्कामाला राहिली.मंगळवारी फिजीओथेरपीस्टचे विशेषज्ञ तिला पहातील आणि निर्धारण करतील असं आम्हाला सांगण्यात आलं.मोठ्या जड पावलानी आम्ही सर्व तिला एकटीला त्या सेन्टरवर सोडून घरी गेलो.


"तू तिकडे अन मी इकडे"
ही त्या गाण्यातली ओळ, मला त्या रात्री घरी आल्यावर बिछान्यावर पडल्यावर,सतत मनात येऊन झोपच देईना.
रात्री केव्हा झोप लागली हे मला कळलंच नाही.पण तरूणपणातले ते दिवस पुन्हा आठवायला लागले.का ते दिवस आता मला आठवत होते आणि त्यावर स्वप्न पडत होतं माझं मलाच कळेना.


समुद्रातला संसाररूपी प्रवास डोळ्यासमोर यायला लागला.
सुरवातीला समुद्रात आल्यावर किती प्रवास केला ह्याचा हिशोब करता यायचा.मध्य समुद्रात आल्यावर सुद्धा क्षितीज अजून दूरच वाटायचं. अजून किती पल्ला गांठायचा आहे कोण जाणे. मुलांच्या होड्या जवळच असल्याने धीर सुटत नव्हता.पण एकदा एकाएकी एक मोठी लाट येऊन आमची होडी जवळ जवळ उलटणार होती. मुलांनी आणि अगदी जवळच्या नातेवाईकानी होडी उलटण्या पासून वाचवली.पण तोपर्यंत त्या लाटेचा फटका माझ्या पत्नीला बसला.जवळ जवळ तिचा पुनर्जन्म झाला.त्यावेळी हे गाणं रेडिओवर ऐकलं की मन खूप भाबडं व्हायचं.

  "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
   अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी "

बिचारी गेली वीस वर्षं तो फटका सहन करून उमेदीत जगत आहे.आयुष्य हे असंच असतं.
"मी कुणाचं काय वाईट केलं की देवाने मला ही शिक्षा देली.?"
असं ती मला म्हणते.
"पण माणसाचं सर्वच काही मनासारखं होत नसतं. देवाने "आशा" नावाची एक क्षमता माणसाला दिली आहे.त्याच्या वर आपण जगूया"
असं मी तिला नेहमी म्हणतो. ती तशी जगत आहे.हे घेण्यासारखं आहे.


सकाळ केव्हा झाली ते कळलंच नाही.नेहमीप्रमाणे माझ्या मुलीने ह्या सुधार सेन्टवर मला सोडून ती आपल्या कामावर गेली.आमच्या मुलांची होणारी तिरपीट पाहून माझं मन खूप उदास होतं.त्यांचं जीवन हे एक सॅन्डवीच जीवन असं व्हायला लागलंय.एकीकडे आईवडीलांची जबाबदारी आणि दुसरीकडे त्यांच्या मुलांची जबाबदारी ह्या दोघांमधे त्यांचं जीवन सॅन्डवीच झालं आहे.आमच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना भागणार नव्हतं आणि मुलांची हेळसांड होऊन त्यांना परवडत नव्हतं.


"दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा."

ह्या गीतरामायणातल्या ओळी आठवल्या.तेव्हड्यात निर्धारण करण्यासाठी फिजीओथेरपीचे विशेषज्ञ आले आणि माझ्या विचाराची शृखंला तुटली.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Monday, March 12, 2012

अंतरातल्या नाना कळा...४




"ज्याच्या शरिरावर
होतो जो अत्याचार
त्याचा त्यालाच भोगावा
लागतो त्याचा परिणाम
केल्यामुळे अविचार"

२६ फेब्रु.२०१२
आज रविवार होता.हॉस्पिटलात सर्व सुन्न होतं.गर्दी अगदी कमी होती.आमचे जवळचे नातेवाईक माझ्या पत्नीला भेटायला आले होते.सोमवार ते शुक्रवार मरमरेस्तो काम करणार्‍या इथल्या लोकांना शनिवार रविवार हे दोनच दिवस अशा कामासाठी उपयोगी पडतात.शनिवारचा आठवड्याची साठलेली व्यक्तिगत कामं करण्यात उपयोगी होतो आणि मग रविवारी सोशल कामं, प्राथमिकता पाहून, करायला मिळतात.

माझी मुलं,यात सुन आणि जावई धरून,इतके दिवस आपला जॉब सांभाळून मला मदत करीत होतेच आणि मी फक्त माझ्या पत्नीच्या जवळ, मिळेल तो वेळ तिच्या सानिध्यात घालवायचो.

रिकामटेकड्या मनात जुन्या आठवणी गर्दी करून यायच्या.
काय हे जीवन?आपआपल्या धर्मातल्या,समाजातल्या रुढी नुसार आपण जीवन जगत असतो.अडचणीचे क्षण येतात,आनंदाचे क्षण येतात.गेला तो आपला दिवस.आहे तो दिवस, जगत रहायचं आणि तो दिवस संपल्यानंतर त्याला उद्या आपला दिवस म्हणावा लागणार.मात्र उद्याचा येणारा दिवस कसा तो आपल्याला मुळीच माहित नसतो.आपण योजीत असतो तसाच तो जाईल याची खात्री नसते.दिवस,आठवडे,महिने आणि वर्ष संपत असतात.

"आज" हा "कालचा" "उद्दया" असतो
 आणि
 "आज" हा "उद्दयाचा" "काल" असतो
 मग
 "उद्दया" जेव्हा "आज" होईल
 आणि
 "आज" चा "काल" होईल
 तेव्हा
 त्या "उद्दयाच्या उद्दयाला"
 "आजचा"  "उद्दयाच"  म्हटलं जाईल
 आता
 "आज" जे होत राहिलंय
 त्याचं
 "काल" म्हणून होत जाणार
 जे
 "उद्दया" म्हणून होणार आहे
 त्याला
 "आज" म्हणून म्हटलं जाणार.

 म्हणून त्या वयातही मनात येतं,
"आता कशाला उद्दयाची बात
 बघ उडुनी चालली रात
 भर भरूनी पिऊ
 रस रंग नऊ
 चल
 बुडुनी जाऊ रंगात”


आपल्या जीवनाचा इतिहास जमत असतो.मागे वळून पाहिल्यास आपलं काय चूकलं आपलं काय बरोबर होतं ह्याचं मुल्यनिर्धारण करता येतं.चुकातून सुधारणा करता येते.त्याने पोक्तपणा येतो.पण काहीवेळा म्हणावं लागतं,
"होणारे न चुके जरी तया येई ब्रम्हदेव आडवा."

१२ जून १९५८ साली माझी पत्नी माझ्या घरी आपलं रहातं घर सोडून आली.किती कठीण आहे हे असं करणं.  किती विश्वास होता तिचा. आपल्या आईवडीलाना मागेवळून पहाताना क्षणभर दुःखाने डोळे भरून यावेत आणि मान फिरवून समोर दुसऱ्या क्षणी पहाताना त्याच डोळ्यात भविष्यातल्य़ा सुखाचं तेज भरून यावं.
 काय हा विपर्यास!

आमच्या समुद्ररूपी संसारातल्या,प्रवासात एक पुत्ररत्न आणि एक कन्यारत्न झालं. प्रवासात उमेद आली.कष्ट पडत होते, अडचणी येत होत्या,भिती वाटायची,पण शांत समुद्रात कधी भविष्याची स्वप्न पडायची. सहप्रवासात कधी होड्याना होड्या लागायच्या,हंसत खेळत गुंता सोडवायचा.कधी थकवा यायचा पण भरंवसा प्रचंड असायचा. कधी कधी होडीत बाहेरून पाणी यायचं,सर्व मिळून त्याचा उपसा करायचा.मुलांची मदत व्हायची.नंतर काही होड्या किनाऱ्याकडे परत फिरल्या आमची पाळी आली त्यावेळी आम्ही दोघानी पण परत फिरायचं ठरवलं. कारण आता मुलं मोठी झाली होती.त्यांच्या पण आता होड्या तयार करायच्या होत्या.त्यांच्या होड्या तयार झाल्या.त्याना घेवून पुन्हा समुद्राच्या दिशेने प्रवास चालू केला.आता आमच्या होडीत आम्ही दोघंच होतो.प्रवास चालूच होता.मिळूनच प्रवासाला निघालो होतो.कुणी मागे तर कुणी पुढे.पण एकमेकांच्या दृष्टीक्षेपात होतो.जवळ जरी असलो तरी प्रत्येकाला आपआपल्या होडीतच दिवस काढायचे असतात.मागे वळून वळून मुलांच्या होड्या नीट चालल्या आहेत पाहून बरं वाटायचं.कधी कधी मनात काळजी पण वाटायची.

ते वसंत ऋतुचे दिवस होते.
“जीवनात ही घडी अशीच राहूदे.
प्रीतिच्या फूलावरी वसंत नाचू दे.”
असं गाणं मनात गुण्गुण करायचं.

क्रमशः

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
   

Thursday, March 8, 2012

अंतरातल्या नाना कळा...३




"देते शरीर इशारा अधुन मधुन
घेऊ काळजी शरीराची
त्या इशाऱ्या मधुन"


२५ फेब्रु.२०१२.
आज न्युरोलॉजीस्टने माझ्या पत्नीला चेक-अप केलं.तिच्या पायामधून येणार्‍या रिफलेक्सकडे तो जास्त ध्यान देत होता.नंतर त्याने एम आर आय करायचं ठरवलं.एम आर आय म्हणजेच मॅगनॅटीक रेझोनन्स इमेजींग.
ही टेस्ट, मॅगनॅटीक फिल्ड आणि रेडीओ वेव्ह एनर्जीच्या पल्सीस ह्यांचा उपयोग करून, शरीरामधल्या अवयवांचा आणि शरीरातील आतील संरचनेचा फोटो घेते.
तिच्या कमरेचा,पाठीचा आणि खांद्याचा एम आर आय घेतला.नंतर दुसर्‍या दिवशी मेंदूचा एम आर आय घेतला.


न्युरो डॉकटर निघून गेल्यावर कार्डीयालॉजीस्टने भेट दिली.तिने हृदयाच्या व्हिडीयो इमेजची टेस्ट घेण्याचं ठरवलं.रक्त ह्र्दयातून मेंदुकडे काय रेटने जातं आणि हृदयाच्या आजुबाजूला पाणी साठलं आहे काय? हे तिला पहायचं होतं.
किडनीच्या डॉक्टरने रक्त घेऊन त्यामधून किडनीच्या दृष्टीने काय माहिती मिळते काय ह्याचा शोध घ्यायचं ठेरवलं.
विशेष म्हणजे तिन्ही डॉक्टर्स भारतीय आहेत.दोन स्त्रीया आणि एक पुरूष.


माझी मुलगी थोडावेळ आपल्या आईबरोबर राहून आपल्या कामावर निघून गेली.एम आर आयच्या टेस्टच्या क्रियेमुळे माझी पत्नी इतकी थकली होती की मी तिच्या जवळ बसलो असताना ती झोपत असायची.ग्लानीत असायची.एम आर आयच्या पहिल्या तीन टेस्टमधे जवळ जवळ दीड तास तिला मशीनची धडधड आणि खडखड ऐकून आणि अगदी स्तब्ध राहून थकवा आलेला होता.तसंच,मेंदूच्या एम आर आयच्या अर्ध्या तासानेही तिला थकावट आलेली होती.


हृदयाची व्हिडोयो इमेज घेण्याची क्रिया मात्र एकदम शांत होती.मॉनीटरवर माझ्या पत्नीचं धडधडणारं ह्रुदय मला पहायला मिळालं.पन्नास ते ऐंशी परसेंटच्या रेंजमधे रक्त मेंदूकडे हृदयाने फेकलं पाहिजे.तिचं सत्तावन परसेंटने फेकलं जात होतं.आणि ते नॉरमल आहे असं डॉक्टर म्हणाली.हृदयाच्या आजुबाजूला पाणी मुळीच नव्हतं.


माझी पत्नी शांत झोपली आहे हे पाहून मीही थोडा आराम मिळावा म्हणून खूर्चीवर पाठ टेकून बसलो आणि मलाही डुलकी लागली.आणि भुतकाळातली स्वप्न पहाण्यात मी दंग झालो.


निसर्गातल्या अनेक गोष्टीमधे मला समुद्राने खूपच आकर्षित केलं.अशा ह्या समुद्र्रुपी संसारात मी आणि माझ्या पत्नीने त्रेपन्न वर्षापुर्वी होडी टाकली आणि प्रवासाला निघालो.तो अथांग सागर समोर पाहून मोठ्या विश्वासाने मोठ्या जिद्दीने दोघानी हातात वल्हं घेतली आणि मागे न पहाता होडी वल्हवायला लागलो. प्रवासात बरोबर आईवडिलांच्या आणि थोरामोठ्यांच्या आशिर्वादाची,आमच्या  भविष्या बद्दलच्या विश्वासाची, वाटेत येऊ घातलेल्या वादळांच्या शक्यतेची, आनंदी क्षणांच्या आशेची,पडले तरी कष्ट झेलण्याची, आणि समोर दिसणाऱ्या भव्य क्षितीजाकडे झेप घेण्याची मोठी पुरचुंडी घेवून प्रवासाला निघालो. आमच्या बरोबर अनेकांच्या अशाच होड्या होत्या.हसत खेळत,चर्चा करत जो तो क्षितीजाचाच वेध घेवून वल्हवत होता.
कधी समुद्र शांत असायचा,कधी खवळायचा,कधी लाटा यायच्या,कधी वारा बेफाम व्हायचा,कधी छोटी छोटी वादळं यायची,कधी कधी वाऱ्याच्या दिशेने शिडाची दिशा बदलावी लागायची.पण तरी सुद्धा समुद्र खुषीत दिसायचा.त्याला धीर नसायचा.आमच्या होडीला तो ठरू देत नव्हता.तो होडीला धरू  बघायचा.समुद्राचं पाणी हिरवं हिरवं पांचू सारखं दिसायचं.आणि सफेद फेसाची त्याच्यावर खळबळ असायची.मास्यांसारखीच आमच्या काळजांची तळमळ व्हायची.आमची होडी हा समुद्र खाली-वर ओढायचा.

“आला खुषीत समिंदर
 त्याला नाही धीर
होडीला बघतो धरू
ग! सजणी होडीला देई ना ठरू”

ह्या गाण्याची प्रकर्षाने आठवण यायची.


तेव्हड्यात,पत्नीच्या रक्तातली साखर पहायला,तिचं ब्लडप्रेशर पहायला नर्स आली आणि मला जाग आली.

क्रमशः

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 5, 2012

अंतरातील नाना कळा...२



२३ फेब्रुवारी २०१२

"एकांती कर कोमल माझा
हाती घेशील का?”

आज सकाळी माझी मुलगी आणि मी, रिजनल मेडिकल सेंटर सॅन होझे,ह्या हॉस्पिटलमधे जिथे माझ्या पत्नीला ऍडमीट केलं आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचलो.आम्हा दोघांना पाहून ती अतीशय खूश झाली.पायात एव्हडं पाणी का जमावं ह्याचा शोध घेण्यासाठी डॉक्टरांची हालचाल चालू झाली.रोजच्या तिला देत असलेल्या गोळ्यांचं लिस्ट कालच मी क्लार्कला दिलं  होतं.त्यातलं कलेस्टरोल-सिमव्हेस्टॅटीन-हे औषध देण्याचं ताबडतोब बंद केलं.ह्या स्टॅटीन गोळ्या कलेस्टरोल शरीरात कमी करण्याच्या प्रयत्नात साईड इफेक्ट म्हणून शरीरातल्या स्नायुवर असर करतात.

माझी मुलगी आज तिच्या जॉबवर गेली नाही.काल माझा मुलगा,मुलगी आणि मी माझ्या पत्नीला हॉस्पिटलमधे घेऊन आलो होतो.आज मुलगा संध्याकाळी आपल्या आईला भेटायला येणार असं ठरलं होतं.
मी माझ्या पत्नीजवळ बसून तिला दिलासा देण्यासाठी तिचा हात माझ्या हातात घेऊन बसलो होतो.माझी स्मृति त्रेपन्न वर्ष मागे गेली.

“माझा होशिल का
वसंत काली वनी दिनांती
एकच पुसिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा
हाती घेशील का”

ह्या गाण्याची आठवण एव्हड्या साठीच झाली की त्रेपन्न वर्षापुर्वी आम्ही पण तरूण होतो ना!.
मी पंचविस वर्षाचा होतो आणि पत्नी एकविस वर्षाची होती.ती आणि मी त्यावेळी कशी दिसायचो हे फक्त ह्यावेळी आमची स्मरणशक्तिच सांगू शकते.त्यावेळी “माझा होशिल का” हे गाणं पण प्रसिद्ध होतं. त्याची आठवण आज प्रकर्षाने आली.

तेव्हड्यात मुलगी मला सांगायला आली की  डॉक्टर तिच्या अनेक टेस्टस घेणार आहेत.प्रथम अनेक टेस्टससाठी बरच रक्त काढून घेतलं.तिची किडनी कशी चालत आहे हे पडताळण्यासाठी मुख्य काम होतं.मी थोडा फ्रेश होण्यासाठी व्हिझीटर्सना वापरायला परवानगी असलेल्या रेस्टरूममधे जायला निघालो.वाटेत जागो जागी भिंतीवर लहानशा पेट्या फिक्स करून ठेवल्या आहेत.हाताच्या तळव्याने एक पट्टी पुढे ढकलल्यावर तळव्यावर अर्धा चमचा पाण्यासारखा सुगंधीत द्र्व पडतो त्याने दोन्ही हात आणि तळवे फुसून घ्यायचे असतात.निरनीराळ्या दरवाजांच्या हॅन्डल्सला अनेकांचे हात लागत असल्याने आणि विशेषकरून रेस्टरूममधल्या दरवाज्यांच्या हॅन्डला अनेकांचे हात लागत असल्याने हे कीटाणुनाशक द्रव उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न असतो.
रेस्टरूममधून बाहेर आल्यावर पाय थोडेसे मोकळे व्हावेत म्हणून लांबच लांब कॉरिडॉरमधे एक फेरी घालत असताना पुन्हा मन भूतकाळात गेलं.

"गेली त्रेपन्न वर्ष एकाच व्यक्ति बरोबर प्रेमाने राहिलो."
असे उद्गार तोंडून यावेत हिच मुळी लग्नाच्या जीवनाची केव्हडी मोठी देणगी-म्हणजे गीफ्ट- असावी. एखाद्दया तरूण जोडप्याला प्रेम करताना पहाणं हे डोळ्यांना नक्कीच आनंददायी वाटतं, पण एखाद्दया वृद्ध जोडप्याला तसं पहाणं हे एक खरोखरचं भाग्य म्हटलं पाहिजे.
त्रेपन्न वर्ष एकमेकाशी नातं ठेवून रहाणं हेच जणू सन्मानाचं कारण आहे.त्रेपन्न वर्षाच्या लग्नगांठीची-म्हणजे ऍनिव्हर्सरीची-आठवण म्हणजेच प्रेमाची आठवण, एकमेकावरच्या विश्चासाची आठवण, एकमेकाच्या सहभागाची आठवण,सहनशक्तिची आठवण, चिकाटीची आठवण आहे.
आणि ह्या सर्व आठवणी जीवनाच्या प्रत्येक वर्षाला मागे पुढे होवू शकतात.इतके वर्ष रहाणं म्हणजेच एकमेकाच्या स्वभावाचं परिवर्तन होत असताना, एकात दुसरं मिसळून जाणं आणि त्यामुळे एक-दुसऱ्याला आणखी चांगलं करणं असं म्हणता येईल.

एखादं अपक्व-म्हणजेच इममॅच्यूर-प्रेम म्हणतं,
 "मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी जरूरी आहे म्हणून."
परंतु पक्व प्रेम म्हणतं,
"मला तुझी जरूरी आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो."
एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं.
ह्या आठवणीच्या स्वप्नात आणखी जाणार आहे असं वाटत असताना,माझ्या मुलीने मला बोलावून घेतलं.न्युरोलॉजीचा डॉक्टर पेशंटला,माझ्या पत्नीला, पहायला आला होता.

क्रमशः

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, March 1, 2012

अंतरीच्या नाना कळा....१



"दोन ध्रुवावर दोघे आपण
तू तिकडे अन मी इकडे"

माझ्या आयपॉडवर शेकडो मराठी गाणी स्टोअर करून रोज झोपण्यापूर्वी बिछान्यावरच ऐकण्याची सवय अलीकडे मी मला लावून घेतली.काही गाणी ऐकून झाल्यावर हळू हळू झोप यायला लागते.तसं वाटल्याबरोबर आयपॉड ऑफकरून कानातले स्पिकर बड्स काढून झोपेला जायला मला बरं वाटतं.

काल रात्रीचं पहिलंच गाणं होतं,
"दोन ध्रुवावर दोघे आपण
तू तिकडे अन मी इकडे."

हे गजानन वाटव्यांच, माझं आवडतं गाणं, ऐकायला मला फार आवडायचं.पण आजच्या परिस्थितीत ते थोडसं उदास करण्यासारखं वाटत होतं
त्याचं असं झालं,
हा योगायोग होता की आणखी काय होतं मला माहित नाही.पण आज सकाळीच मी माझ्या पत्नीला हॉस्पिटलमधे ऍडमीट करून रात्री नऊ वाजेपर्यंत तिच्या जवळ राहून घरी झोपायला आलो होतो.गेल्या त्रेपन्न वर्षाच्या लग्नाच्या जीवनात असं फारच थोडेवेळा झालंय की,माझ्या शेजारी माझी पत्नी रात्री झोपलेली नसावी.नाही म्हटल्यास बत्तीस वर्षापूर्वी मी अमेरिकेत, मेन फ्रेम कंप्युटरच्या ट्रेनींगसाठी सहा सात महिन्यासाठी, आलो होतो तेव्हा आमचं तसं झालं होतं.

माझ्या पत्नीचा पंचाहत्तरावा जन्म दिवस फेब्रुवारीच्या बारा तारखेला साजरा केला होता.बरोबर त्याच्या दुसर्‍या आठवड्यात हा प्रसंग माझ्यावर आला होता.अलीकडे तिला चालायला त्रास होत होता.म्हणून तिने चालायचं कमी केलं होतं.नंतर बाहेर व्हिलचेअर वरूनच जायला लागली.परिणाम,पायाचे स्नायू कमजोर होऊ लागले आणि पायात पाणी साचूं लागलं.पाय एव्हडे जड झाले की एक एक मणाचं ओझं बांधून चालायला सांगावं असं तिला वाटायला लागलं.

एमर्जन्सी भागात जाऊन तिला ऍडमीट करून घेतलं.
९११ ला बोलवावं की काय असं वाटत होतं.९११ ही इथली सेवा अत्यंत उपयुक्त सेवा आहे.फोन केल्यानंतर अवघ्या तीन मिनीटात ९११ ची गाडी तुमच्या घरासमोर येऊन ठेपते.पॅरॅमेडीक्स आणि त्यांचे तगडे साथीदार स्ट्रेचर घेऊन तुमच्या घरात येतात.पेशंटची त्याचवेळी प्रकृति तपासून जुजबी उपाय देऊन वाटल्यास हॉस्पिटलमधे नेऊन ऍडमीट करतात.९११ ला आम्ही बोलावलं नाही.आमच्या प्राईमकेअर डॉक्टरला फोन करून त्याला सर्व परिस्थिती सांगीतल्यावर त्याने हॉस्पिटलला ऍडमीट करायचा सल्ला दिला.

एमर्जन्सी वार्डात गेल्याबरोबार लागलीच मोबाईल स्टेचरवर तिला झोपवून इलाज करण्याच्या रूममधे घेऊन गेले.ब्लडशुगर,ब्ल्डप्रेशर,घेतलंच त्याशिवाय त्यांचा हॉस्पिटलचा गाऊन तिला नेसवून बाकी टेस्टससाठी तिला पेशंट वार्डाच्या रूममधे घेऊन गेले.हे सर्व करीत असताना मला एकट्याला शेवटपर्यंत तिच्या सोबत रहायला परवानगी दिली होती.
हार्टचा डॉक्टर,किडनीचा डॉक्टर,न्युरोलॉजीस्ट जमा झाले आणि त्यानी आपआपल्या पद्धतीने तिला तपासलं.रात्री तिला हॉस्पिटलमधे ठेवून घ्यायचं ठरलं.सर्व उपकरणांनी सज्ज असलेल्या बेड्वर तिला झोपवण्यात आलं.नर्सीस,त्यांच्या मदतनीस, नेमल्या गेल्या.

तोपर्यंत,आमच्या मुलीने,जांवयाने,मुलाने आणि सुनेने आप आपल्या परीने मदतीच्या कामाची विभागणी करून योजना ठरवली.आणि त्या रा्त्री मी माझ्या पत्नीचा निरोप घेऊन घरी आलो.

आमची चारही नातवंड मुग गिळून गप्प होती.आपल्या आजीबद्दल वाटणारी काळजी त्यांच्या मुक्या भाषेतून मला कळत होती.

वाटव्यांचं दुसरं कडवं ऐकताना माझं मन खूपच उदास झालं.

दिवस मनाला वैरी भासतो
तारा मोजीत रात्र गुजरितो
युगसम वाटे घडी घडीही
कालगती का बंद पडे?

क्रमशः

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com