Tuesday, July 31, 2012

"मी ही अशी"




"गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?"


दादर पश्चिमेला भवानी शंकर रोडवर इंदारा निवास ह्या बिल्डींगमधे आम्ही पहिल्या मजल्यावर रहायचो.तळमजल्यावर म्हणजे आमच्या खालीच देसाई कुटूंब रहायचं.देसायाना पाच मुलगे आणि एक मुलगी होती.मुलगी शेवटचीच म्हणून तिचं नाव सरला ठवलं होतं.
सरला शेंडेफळ असल्याने फारच लाडात वाढली होती.तिचे आईबाबा तिचे भरपूर लाड करायचेच त्याशिवाय पाच भावांना एकुलती बहिण म्हणून तेही तिचे लाड करायचे.त्यामुळे सरला खूपच लाडावून गेली होती.



पण भावंडात कधीतरी खटके उडायचे.मग क्वचित सरलावरपण राग काढला जायचा.सरला खूप बापुर्वाणी व्हायची.आमच्या सारख्या बाहेरून आलेल्याने चौकशी केली की म्हणायची,
"मी ही अशी"
आणि मग आपल्यावर कसा अन्याय होत आहे ते सांगायची.
म्हणजे तिच्या म्हणण्याचा उद्देश असा असायचा की,ह्या पाच भावांबरोबर राहून दिवस काढणं तितकं सोपं नाही.एखादा भाऊ म्हणायचा,
"तुझे खूपच लाड केले जात आहेत म्हणून तू अशी झाली आहेस"
कुणी म्हणायचा,
"तुझ्या जिभेला हाड नाही.वाट्टेलते बोलतेस"
वगैरे वगैरे.


मला तिच्या भावांचीपण कीव यायची.एकटी लाडावलेली बहिण असणं ही त्यांची एक व्यथाच झाली होती.
तिचं हे सगळं वागणं आणि अबलता बघून,आणि तिच्या भावांची व्यथा लक्षात येऊन, मला बत्तीस दातामधली एक जिभ आठवली.आणि कविता सुचली ती अशी,



दातांची व्यथा

एकदां जिभली बोले दातांना
मी अशी (बिचारी) एकटी असून  
बत्तीस भावांमधे कशी राहू रुसून


मला नाही हाड न काड
मी आहे स्नायुचा गोळा
चुकून फिरले इकडे तिकडे
दात करतात माझा चोळामोळा
कुणी विचारले काय झाले
तर सांगतात सर्व जीभ चावून


ऐकून हे जिभलीचे संभाषण
दात म्हणती लगेचच तिला
वाईट सवंय आहे तुला
घेतली जिभ लावली टाळ्याला


बडबड करिशी तूं भारी
निस्तरावे लागे आम्हांपरी
वटवट तुझी ऐकून
धमकी देती लोक वैतागून
गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?
(बिचारे दांत)




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Wednesday, July 25, 2012

एकदां काय जहालें!




स्तिथप्रज्ञ तो सूर्यनारायण
समजावी त्या माऊलीला (पृथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:


तो रविवारचा दिवस होता.प्रमोद,त्याची पत्नी आणि मुलं माझ्याकडे जेवायला आली होती.माझ्या पत्नीने सुकं मटण,वडे ताज्या सोलांची कडी आणि भात असा जेवणाचा बेत केला होता.जेऊन झाल्यावर दुपारी थोडी डुलकी काढून झाल्यावर जुहू चौपाटीवर जायचा विचार केला.माझी पत्नी काही आली 
नाही.
"मी आवराआवर करीन तुम्हीच जाऊन या"
असं मला म्हणाली.


इतर आम्ही चौपाटीवर गेलो.सुर्यास्त बघून झाल्यावर प्रमोद आणि मंडळी घरी जायला निघाली.मी बराच वेळ वाळूत पडून होतो.सुर्यास्त झाल्यानंतर आणखी थोडावेळ बसायला मला आवडतं.
विशेषतः सूर्य पुरा समुद्रात डुबून गेल्यावर आकाशात दि़सणारे ते पिवळे-लाल रंग बघायला मला मजा येते.
वाळूवर थोडा लेटून हा प्रसंग मी पहात होतो.तासाच बसून होतो.काळोख केव्हा झाला ते कळलंच नाही.सूर्यास्ताकडे पाहून मनात विचार आला,
"हे काय चाललं आहे?"


सूर्य,पृथ्वी,पहाट,सकाळ,दुपार,दिवस,संध्याकाळ,रात्र,काळोख वगैरे अखिंडीतपणे चालू आहे.सूर्य,पृथ्वी ह्या जोडप्याची बाकी ही सर्व मुलं आहेत आणि ह्या कुटूंबाचा संसार असाच अखंडितपणे चालू आहे अशीही कल्पना मनात आली.सूर्य,पृथ्वी ह्या जोडप्याची पाच मुली आणि दोन मुलगे,दिवस आणि काळोख,अशी कल्पना मनात येऊ लागली.


घरी गेल्यावर तसाच कागद पेन्सिल घेऊन कविता उतरून काढली.दुपारी यथेच्छ जेवल्यावर आम्ही रात्री जेवत नाही.एक एक कप कॉफी पिऊन आम्ही झोपायला गेलो.
सकाळी उठल्यावर चहा घेताना मी माझी कविता पत्नीला वाचून दाखवली.


"कसं हे तुम्हाला सुचतं?"
नेहमी प्रमाणे माझ्या पत्नीने मला प्रश्न केला.
ह्यावेळी मी तिचा प्रश्न ऐकून फक्त हसलो.
माझ्या हसण्याचा अर्थ तिला समजला असावा.
दोन्ही चहाचे रिकामे झालेले कप उचलून ती उठून गेली.
मी मात्र माझ्या मनात नेहमीचं उत्तर बोललो.
"अग! विचाराच्या प्रांगणात अक्कलेने केलेला शब्दांचा हा खेळ आहे दुसरं काय?"

कविता अशी होती.


कालाय तस्मै नम:

सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबूजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देई निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहूनी सूर्याला


ऐ्कूनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
नेम असे हा सूर्याचा
करी तो
उदय अन अस्त दिवसाचा


ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
श्रेय नको देऊं तू सूर्याला
नेम असे हा पण पृथ्वीचा
गर,गर फिरुनी सूर्याभोवती
जन्म दिला तिने आम्हा सर्वांना


पाणावल्या डोळ्याने
म्हणे पृथ्वी सूर्याला
भलेपणाचे "दिवस" संपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना


स्तिथप्रज्ञ तो सूर्यनारायण
समजावी त्या माऊलीला (पृथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, July 20, 2012

झाला समग्र पाश्चिमात्यां आनंद.





"म्हणून म्हणतो नका घालूं वाद"


निसर्गाने प्रत्येक प्राणीमात्राला अक्कल दिली आहे.प्रत्येक प्राणी आपल्या अक्कलेनुसार वागत असतो.आणि ते स्वाभाविक आहे.कदाचीत दुसर्‍याचं शिकून तो प्राणी आपल्या अक्कलेत भर घालील आणि मग ती घातलेली भर चांगली असेल किंवा वाईट.पण त्यानुसार तो आपल्या वागणूकीत फरक करील हे निश्चीत आहे.


माणूस ह्या प्राण्याला निसर्गाने जरा जास्तच अक्कल दिली आहे ह्यात शंका नाही.ह्या अक्कलेच्या देणगीमुळेच अनेक गोष्टी करता करता माणूस वाद घालायलाही शिकला.अर्थात प्रत्येकजण तो वाद आपल्या अक्कलेप्रमाणेच घालत असणार.ह्यावेळी मला प्रो.देसायांचे ते शब्द आठवतात.


ते म्हणायचे,
"अहो,सगळ्यांना सारखीच अक्कल असती तर सारेच ज्ञानेश्वर,शिवाजीमहाराज आणि स्वामी विवेकानंद झाले असते.ह्यावरून मला एक कविता सुचली.


म्हणून म्हणतो नका घालूं वाद

जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार
शक्य कसे झाले असते
ज्ञानेश्वराना सोळाव्या वर्षी
ज्ञानेश्वरी लिहीणे
अन
शिवरायाना सोळाव्या वर्षी
तोरणा जिंकणे


संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी
करूनी अमेरिकेची वारी
अचंबीत केली जनता सारी
ऐकूनी भाषणे आध्यात्मावरी
झाला समग्र पाश्चिमात्यां आनंद
कोण असती ते शिवाय विवेकानंद


जसे वाढे एखाद्याचे वय
होई कदाचीत अक्कलेचा क्षय
लहान मोठा न कळे त्याला
अपमानीत करूनी ज्याला त्याला
शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला


म्हणून म्हणतो नका घालूं वाद
असो समोर लहान अथवा थोर
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार
शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, July 15, 2012

नियतीचा निर्णय





"योग्य निर्णय मात्र
ठरवित असते नियती"

"ह्या धरतीवर बर्‍याच गोष्टींना दोन बाजू असतात.अगदी पृथ्वीपासून सुरवात केली तरी तिला उत्तर आणि दक्षीण धृव आहे.झाडांना शेंडा आणि मुळ आहे, काठीला दोन टोकं असतात अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.शेवटी,चांगलं प्रचलीत म्हणणं सांगायचं झाल्यास, वादालाही दोन बाजू असतात हे सांगता येईल."
शरद मला आपला मुद्दा समजावून सांगण्य़ाचा प्रयत्न करीत होता.
पुढे म्हणाला,
"कुणाही मध्यस्थ्याकडे जाऊन तुम्ही तुमची बाजू मांडलीत आणि त्याचा निर्णय विचारलात तर तो पटकन सांगेल की दुसरी बाजू मला ऐकली पाहिजे."
मी शरदला म्हणालो,
"तुझं म्हणणं मला पटतं.एखाद्याने डोळ्यासमोर एखाद्याचा खून केला आणि न्यायाधीशाला सांगीतलं तरी न्यायाधीशपण म्हणतो तरीपण मला दुसरी बाजू ऐकली पाहिजे."

नंतर काही दिवसानी का कुणास ठाऊक शरदचं ते वाक्य दुसरी बाजू ऐकली पाहिजे माझ्या सारखं मनात घोळायला लागलं आणि मग कविता सुचली.ती अशी,

दुसरी बाजू ऐकली पाहिजे

ताई म्हणे बाळूला
जावून सांगते आईला
तुच मारीलेस मला
ऐकून हे
आई म्हणे ताईला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

कोकरू म्हणे लांडग्याला
जावून सांगते मर्कटाला
तुच खाणार मला
अन
करीतोस मात्र नुसता बहाणा
ऐकून हे
मर्कट  म्हणे कोकराला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

प्रवीण मारे प्रमोदला
पोलीस सांगती कोर्टाला
ऐकून हे
जज्ज सांगे कोर्टाला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

अपराधी अन निरपराधी
बाजू मांडती अपुली
आईची प्रीती
मर्कटाची भीती
अन
जज्ज्याची कार्यपद्धती
वापरूनी ते ते मध्यस्थी
अपुल्या निर्णयास येती
शेवटी
योग्य निर्णय मात्र
ठरवित असते नियती


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Tuesday, July 10, 2012

सत्तेची ही कसली खूमखूमी




मालती मला नेहमी म्हणायची की तिच्या नवर्‍याचं आणि तिच्या मोठ्या मुलाचं कधीच पटलं नाही.दुसरे दोन मुलगे त्यामानाने वडीलांशी पटवून घ्यायचे.न पटणार्‍या त्या दोघांमधे मालतीने कधीही हस्तक्षेप केला की तिच कुणा एकाला वाकडी व्हायची.
"बरोबर तू त्यांचीच बाजू घेणार.तुझा नवरा पडले ते."
असं उद्धव,तिचा मोठा मुलगा तिला म्हणायचा.
आणि मुलाची बाजू घेतली की
 "बरोबर आहे तो तुझ्या पोटचा गोळा. तू त्याचीच बाजू घेणार"
 असं मालतीचा नवरा तिला म्हणायचा.
"माझी मात्र कात्रीत सापडल्यासारखी परिस्थिती व्हायची"
मालती मला म्हणायची.


मी मालतीला समजुत घालण्यासाठी म्हणायचो,
"अग,दोन व्यक्तिमधली ते पिढीचं अंतर आहे ना? मग ते तसंच व्ह्यायचं.एकमेकाने एकमेकाला समजून घेतलं नाही की हा वाद व्हायचाच.आईची स्थिती निराळी असते.तिला तडजोड करून घ्यायची निसर्गाचीच देणगी असते.अपवाद सोडल्यास आता जे काय तू म्हणालीस तशा प्रकारच्या बर्‍याच  घरातल्या तक्रारी असतात."


ह्या गोष्टीला आता खूप दिवस होऊन गेले.ह्यावेळी मी कोकणात गेलो होतो तेव्हा मला कुणीतरी सांगीतलं की मालती आणि तिचा नवरा कायमचे कोकणात रहायला आले आहेत.मालतीच्या नवर्‍याला परॅलिसीसचा आजार झाल्याने त्याला सतत कुणाचीतरी मदत लागायची.शहरात रहाण्यापेक्षा कोकणात कुणालातरी कामाला ठेवायला माणसं मिळतात.खर्चही कमी येतो.मुलांच्या आधाराने रहाण्यापेक्षा स्वतंत्र रहाणं कमी तापदायक आहे.असा विचार करून ती दोघं कोकणात येऊन राहिली. 


त्यांना भेटायला म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो.
मालती आपल्या उतार वयातल्या कर्मकथा सांगत होती.
मला म्हणाली,
"काय सांगू आमचे भोग आणि आमची कर्मदशा असं म्ह्टलं पाहिजे आणखी काय? उद्धवाकडून मानहानी शिवाय काहीच मिळत नव्हतं."


त्यांचा निरोप घेऊन घरी जाताना मी माझ्या मनात म्हणालो नवं सरकार येतं आणि सत्ता बदलते."
त्यातूनच मला एक कविता सुचली,

उद्धवा! अजब तुझे सरकार

उजाडूनी दिवस होतो सुरू
होतात अवहेलना अन तक्रारी
वाटते त्याही पेक्षा ती रात्र बरी


उजळणी दिवसाची होते रात्रीची
स्मरूनी बाचाबाची सकाळची
तू तू अन मी मी ची
अन खऱ्या खोट्याची


उद्धवा! अजब तुझे सरकार
जनार्धनाची हीच असे तक्रार
तुझ्याच दारी न्यायमंदिरी
खोटे बोलणे झाले असुनी
खरे मानण्याची कसली जबरी
सत्तेची ही कसली खूमखूमी



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, July 5, 2012

बघ उडुनी चालली रात




वामन मला म्हणाला,
"खरंच, जर का माणसाला उद्या काय होणार ते निश्चीतपणे कळलं असतं तर फारच हलकल्लोळ माजला असता.नीट विचार केला तर, निसर्गाने ही उद्याचं नकळण्याची कमतरता माणसाला दिली आहे, ती एक देणगीच म्हणावी लागेल."


"तुझ्याशी मी ह्यापेक्षा आणखी सहमत होऊच शकत नाही"
असं मी वामनला म्हणाल्यावर वामनला बरं वाटलं.


"आपण सगळे, जास्तकरून, दुःखीच झालो असतो असं मला वाटतं.कारण अख्या जीवनात दुःखच जास्त असतं.मग ते राजाचं जीवन असो वा रंकाचं असो.शिवाय अनर्थ घडले असते."
वामन मला असं म्हणाला.


आणि पुढे म्हणाला,
"आपलं भविष्य आपण हमखास बदलु शकलो असतो.नव्हे तर भविष्य ह्या शब्दाला अर्थच राहिला नसता.
"लग्नं स्वर्गात ठरतात आणि पृथ्वीवर होतात"
 ह्या म्हणण्याला अर्थच राहिला नसता.
"ह्या जन्मी पुण्य केलंस तर पुढचा जन्म चांगला मिळेल"
 ह्याही म्हणण्याला अर्थ राहिला नसता.कारण पुण्यावर आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे पाप करण्यापासून दूर राहिले असते.त्यामुळे कदाचीत पापं कमी झाली असती.
"उद्याचं काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक?"
 असं कुणी म्हटलंच नसतं.कारण उद्याचं, परवाचं आणि सर्व पुढचं अगोदरच माहित असतं."
हे वामनचं म्हणणं ऐकल्यावर आज,काल आणि उद्या हे शब्द माझ्या मनात काहूर करू लागले.आणि शेवटी ही कविता सुचली.


कशाला उद्याची बात?

आज, कालचा उद्या असतो
आणि
आज, उद्याचा काल होतो
मग
उद्या जेव्हा आज होईल
आणि
आज त्याचा काल होईल
तेव्हा
त्या उद्याच्या उद्याला
आजचा उद्याच म्हटलं जाईल
आता
आज जे होत राहिलंय
त्याचं
काल म्हणून होत जाणार
जे
उद्या म्हणून होणार आहे
त्याला
आज म्हणून म्हटलं जाणार आहे

म्हणून
"आता कशाला उद्याची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात"
ही कविता तिथल्या तिथे लिहून मी वामनला वाचून दाखवली.वामनला मतीतार्थ कळायला वेळ लागला नाही.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com