Thursday, July 29, 2010

आत्म-घातकी जोखीम.

“असं पुन्हा होऊ नये म्हणून प्रे.ओबामाच्या सरकारने नियमात बदल आणून धंद्यात जोखीम घेतल्यावर नुकसानी झाल्यास एक कपुर्दाही ह्या अधिकार्‍यांना मिळणार नाही याची योजना करून ठेवली आहे.”

जेव्हा अमेरिकेतल्या भांडवलदारानी आत्म-घातकी जोखीम घेऊन भांडवलशाहीला कडेलोट होण्याच्या परिस्थितीला आणून सोडली, आणि प्रे.ओबामाने तसं न होण्यापासून त्वरीत उपाय योजना करून भांडवलशाही सावरली तेव्हाच लोकांच्या लक्षात आलं की अमर्याद आणि अविचारी गुंतवणूकीच्या स्वातंत्र्याला आळा घालणं क्रमप्राप्त आहे.पुर्‍या जगात भांडवलदारानी घेतलेल्या जोखमीचे दुषपरिणाम अनेक देशांना भोगावे लागले.विशेष करून युरोपीयन देशांना चांगलाच फटका बसला.

आज प्रो.देसाई माझ्या अगोदरच तळ्यावर येऊन बसले होते.
“अमेरिकन भांडवलशाही आणि आत्म-घातकी जोखीम “
अशा मथळ्याचं पुस्तक अगदी लक्ष केंद्रीत करून वाचत असताना पाहून मलाही त्यांचं जरा कौतूक वाटलं.मी विचारण्यापूर्वीच मला म्हणाले,

“मला हे पुस्तक पुरं नवाचता हातावेगळं करायला जमे ना.म्हणून मी म्हटलं तुम्ही येई पर्यंत जमेल तेव्हडं वाचावं.”
आणि मला पुढे म्हणाले,

“अमेरिकेतल्या मोठ्या गब्बर बॅन्कानी वाटेल तसं घरावर कर्ज काढणार्‍यांना कर्ज देऊन,घराच्या किंमती सदैव वाढतच रहाणार अशा खोट्या आशेवर राहून,पत असो वा नसो ज्याला त्याला कर्ज देऊन, लाखो घरांचा खप करून, त्या कर्जावरही विमा उतरवणार्‍या बॅन्काना ती कर्ज विकून,एक प्रकारचा जुगार खेळून,घरांच्या किंमती उतरण्याचा दाट संभव आहे,घरांच्या किंमती वाढणारा बुडबुडा फुटणार आहे ह्याची जाणीव होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष
करून, पैसे गुंतवणार्‍याना आणि इतर अनेक छोट्या-मोठ्या बॅन्काना अक्षरशः रसातळाला आणून सोडलं.”
भाऊसाहेबांचं हे मनोरंजक स्पष्टीकरण ऐकून मलाही जरा आणखी ऐकण्यात स्वारस्य वाटूं लागलं.

मी त्यांना म्हणालो,
“प्रत्येकाच्या अंतर-आत्म्यात एक विश्वास बसावा असं बळ असतं.मनुष्याचा सुरक्षीत मार्ग निवडण्याकडे बहूदा कल असतो. ह्यामुळे आपलं यश आणि अस्तित्व टिकवण्याचा मार्ग जवळ जवळ मोकळा होत असतो.धोका पत्कर्ण्याचा आपण क्वचितच मार्ग पत्करतो.पण हे मात्र खरं की जास्तीत जास्त धोका पत्करल्यावर जास्तीत जास्त फलदायी व्ह्यायला होतं.तुम्ही सांगता त्या मोठ्या बॅन्काच्या अधिकार्‍यानी जास्त फायद्यासाठीच हा मार्ग पत्करला
असावा. असं तुम्हाला नाही का वाटत.?

“तुमचा प्रश्न फार छान आहे”
असं मला म्हणत भाऊसाहेब पुढे सांगू लागले,
“आणि कधी कधी धोक्याचा मोका घेणं म्हणजे दोरीवर चालण्यासारखं असतं.काही धोके तसे जरा क्षुल्लक असतात. उदा.आपला सेल किंवा मोबाईल फोन, किंवा आपला लॅपटॉप घरी विसरणं,ह्या आधुनीक उपकर्णांच्या कटकटीपासून जरा विरंगुळा मिळावा म्हणून घेतलेला धोका तसा लहानच म्हणायला हवा.जरा जीवनात मजा असावी म्हणून हायवेवर जास्त वेगात गाडी चालवण्याचा प्रकार,हा काहीसा जरा मोठा धोका म्हणायला हवा.आणि
असा विचार करत करत नंतर माणूस पैशाच्या हव्यासाने बेफाम होऊन आत्म-घातकी जोखीम घ्यायला प्रवृत्त होतो. बॅन्केच्या अधिकार्‍यांना यासाठीच गब्बर पगाराच्या आणि बोनसाच्या नोकर्‍या असतात.पण हे सर्व करण्यापूर्वी पहिली गोष्ट म्हणजे आपल्यालाच आपण समजून घेतलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्याला “आपण” होण्याचा मार्ग शोधला पाहिजे.”

“बॅन्केचे आणि मोठमोठ्या भांडवलदारांच्या कंपनीच्या सिईओना धोका किंवा जोखीम घेण्याची सवय झालेली असते.ही जोखीम किंवा हा धोका घ्यायला हे लोक कसे प्रवृत्त होतात? कदाचीत तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकात ह्यावर सवित्सर चर्चा झालेली तुम्हाला आठवत असेल ना?”
मी प्रो.देसायांना सरळ सरळ प्रश्न केला.

प्रो.देसाई मला म्हणाले,
“मला जे आठवतं ते तुम्हाला सांगतो.
जो खरा धोका असतो तो एक क्रमवार प्रतिक्रिया चालू करतो. आणि लगोलग आपल्या लक्षात येतं की, आवेश,प्रेम आणि इच्छाशक्ति ह्यांना घेऊन आपण जे जन्माला आलेले असतो आणि ज्याचा आपण आपल्याबरोबर सांभाळ करीत असतो तेच आपण कधी कधी प्राप्त करण्याचा परिश्रम घेत असतो.कंपनीची धुरा सांभाळण्याच्या पदावर असलेल्याना ह्या गुणांची देणगी असावी.
अगदी खूशीत जीवन जगत असल्याने आपण आपल्याच अंतरात डोकावून ओझरतं दर्शन घेत असतो.हा दर्शन घेण्याचा फक्त सेकंद दोन सेकंदाचा क्षण असला तरी तो क्षण आपल्या अंतरातल्या जोषाच्या,आणि शक्तिच्या वलयाच्या गाभ्याचा शोध घेत असतो. आपल्यातल्या जोखीम घेण्याच्या क्षमेतेच्या समिप जाण्याच्या प्रत्येक दिवसाच्या आपल्या प्रयत्नाविषयी आपण कल्पना करीत असतो.”

हे ऐकून मी भाऊसाहेबाना म्हणालो,
“खरंच,ही आपल्यातली कल्पकताच आपल्या ध्येयाकडे आपल्याला ढकलत असते त्याचप्रमाणे आपल्या क्रियाशीलतेकडेही ढकलत असते. प्रत्येक व्यक्तिमधे अगाध सामर्थ्याचा,आवेशाचा आणि सृजनात्मकतेचा झरा वाहत असतो त्यामुळे आपण ज्याची तीव्र इच्छा करतो ते आपण प्राप्त करू शकतो.आपल्या अवगुणावर आपण सफलता आणू शकतो.”

“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.”
असं म्हणून थोडा गंभीर चेहरा करून प्रो. म्हणाले,
“पण हे सर्व मिळवण्यासाठी प्रथम आपल्याला आपल्या जीवनभरच्या प्रवासात आपल्यात जो चांगुलपणा आहे तो उद्देशपूर्ण शोधण्याच्या प्रयत्नात असलं पाहिजे.

सगळ्या धोक्यात मोठा धोका म्हणजे पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे जीवन जगणं.ज्यावर आपण प्रेम करतो ते करणं हे जीवनाचं खरं मर्म आहे.
कुणीतरी म्हटलंय की,
“जीवनात त्याला जास्त करून इनाम मिळतं जेव्हा तो करण्या लायक असलेलं काम खूप परिश्रम घेऊन करीत असतो.”

“आणि अगदी ह्याच्या उलट ह्या अमेरिकन भांडवलदारानी पाऊल टाकलं.”
माझ्या मनात आलं ते मी सांगायच्या प्रयत्नात राहून म्हणालो,
“म्हणजेच ह्यातला सत्याचा भाग असा की,तुम्ही जेव्हा अंगात जोष आणता तेव्हा ते काम तुम्ही सुलभतेने करू शकता.डोळे झाकून जेव्हा अपरिचित असलेल्या संभवतेच्या महासागरात आपण झेप घेतो तेव्हाच तो मोठा जोखमीचा भाग ठरतो.
बर्‍याच लोकांच्या हे लक्षात येत नाही की,त्यांच्यात असलेलं उत्कट जीवन जगण्याचं परिमाण किंवा ते जगण्याच्या प्रचंड क्षमतेची उपस्थिती किती असावी.आणि केवळ पैशाच्या हव्यासाने,किंवा अधाशी होण्याने ही अमेरिकन भांडवलदारी आपण काय करतो,ह्यात किती लोकांचं नुकसान होणार आहे,किती लोक रसातळाला जाणार आहेत ह्याची पर्वा नकरता आपलाच फायदा करून घेण्याच्या मागे लागले.कॉन्ट्रॅक प्रमाणे जसा कंपनीला फायदा करून दिला गेल्यास त्याचा मोबदला ह्या अधिकार्‍यांना देण्याचं कंपनीला बंधन असतं, तसंच यदा कदाचीत धंद्यात नुकसान झाल्यास कंपनी बुडाली तरी चालेल आपला फायदा बाजूला करून घेण्यात हे अधिकारी मोकळे असतात.”

“असं पुन्हा होऊ नये म्हणून प्रे.ओबामाच्या सरकारने नियमात बदल आणून धंद्यात जोखीम घेतल्यावर नुकसानी झाल्यास एक कपुर्दाही ह्या अधिकार्‍यांना मिळणार नाही याची योजना करून ठेवली आहे. त्यामुळे यापुढे आत्म-घातकी जोखीम न घेण्याचा त्याने इशाराच त्यांना दिला आहे.”
प्रो.देसायानी मी अपेक्षा करीत होतो तेच सांगून टाकलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, July 25, 2010

शॉवर खालचं गुणगुणं.

“प्रेम स्वरूप आई…” पासून “जीवनात ही घडी…” पर्यंत किंवा आजचं माझं आवडतं गाणं मी गाते.


माझी पुतणी-नंदा-हायकोर्टमधे वकीली करते.रोजच्या केसीस संभाळून,कामाचा रगाडा संपवून मग घरी उशीरा येते.परत घरी आल्यावर एका गृहिणीची कामं आहेत ती उरकावीच लागतात.मला हा तिचा दिनक्रम माहित होता.

अलीकडेच आमच्या बिल्डिंगच्या सोसायटीच्या काही केसीसबद्दल मला तिचा कायदेशीर सल्ला घ्यायचा होता.म्हणून मी तिला फोन केला.सर्व कामं आटोपून ती आरामात असेल म्हणून रात्री दहाला मी तिला फोन केला.ती आंघोळीला गेल्याचं तिच्या नवर्‍याने सांगीतलं.जाऊ देत. इतक्या रात्री त्रास नको म्हणून मी फोन ठेवला.परत दुसर्‍या दिवशीच तेच झालं.मग मी ठरवलं की तिला रविवारीच जाऊन प्रत्यक्ष भेटावं.

गेल्या रविवारी मी तिच्याकडे गेलो होतो.मला ती भेटली.जरा निवांत दिसली.म्हणून माझी तिच्याकडची कामं उरकून घेतली.आणि कुतूहल म्हणून तिला विचारलं,
“काय गं? तू रोज घरी आल्यावर रात्री आंघोळ करतेस का?
त्याचं विशेष काय कारण आहे.?जरा मला कुतूहल वाटलं म्हणून विचारलं.”

मला नंदा म्हणाली,
रोज मला आजुबाजूच्या लोकांचं-समाजाचं-मनावर दडपण येत असतं.मी कपडे कसे घातले,काळ्या कोटावर सफेद गळपट्टा कसा बांधते, मी केस कसे विंचरते,मी कशी बोलते,न्या्याधीशाकडे वाद कसा घालते,कशी चालते आणि वागते ह्याबद्दल इतर ज्यावेळी माझ्याबद्दल विचार करताना दिसतात, त्यावेळी मला चिंता लागते.हे दडपण दिवसातून तासनतास माझ्या डोक्यावर भार होऊन रहातं. माझ्या वकीली पेशामुळे रोज शेकडो लोकांना मी सामोरी जात असल्याने ह्या चिंतेत रहाते. शिवाय रोजच्या चिंता असतातच.दुसर्‍या दिवशीच्या केसीसचा अभ्यास करायचा, मुलांचा अभ्यास,घरच्या कटकटी ह्या चालूच असतात. दिवसाच्या शेवटाला मला अगदी दमायला होतं.”

मधेच मी तिला अडवून म्हणालो,
“आणि दिवसातून दोनदां म्हणजे सकाळी आणि हे रोज रात्री आंघोळ करण्याचं जादा काम घेऊन आणखी तुझं टेन्शन तू वाढवतेस असं नाही का वाटत तुला?”
माझ्या प्रश्ननाचा रोख कळायला ती वकील असल्याने तिला कठीण गेलं नाही.

हंसत,हंसत मला म्हणाली,
“काही कामं केवळ कामं म्हणून पहाता येत नाहीत.त्यात विरंगुळापण असतो त्याशिवाय त्यात फयदापण असतो. रात्रीची गरम शॉवरच्या खालची पंधरा मिनीटांची आंघोळ हा मला त्यातला एक प्रकार वाटतो.कामाच्या भाराखाली दबून गेल्यावर अशाच वेळी-आत्ताच गरम गरम शॉवरच्या खाली आंघोळ घेतली-ह्या अनुभवाची हताशपूर्ण आठवण यायला लागते. ती शॉवर खालची आंघोळ दिवसभरच्या इतरांच्या मागण्यांचं दडपण चक्क धुऊन टाकते.हे मला एक वरदान कसं वाटतं.”

“मला तुझं म्हणणं पटतं.”
असं सांगून मी तिला म्हणालो,
“ते गरम पाणी,सगळ्या विवंचना वितळून टाकत असणार.कुणीही जवळपास नसतं,कुणीही तुला निरखून पहात नसतं.आणि कुणीही तुझ्याबद्दल निवाडा घेत नसतं.तू आणि तूच फक्त असतेस. तुझ्या तू एकटीच सुखद वाटण्यार्‍या शुद्धित असतेस खरं ना?”

“तुमचं वर्णन अगदी मार्मिक आहे असं मला म्हणाली.
“रोज रात्रीच्या ह्या आंघोळीमुळे मला काहीतरी होतं.मी गुणगुणायला लागते.
अशावेळी मी काही करू शकत नाही.संगीताचे स्वर माझ्या मुखावाटे लहरत बाहेर येतात.
“प्रेम स्वरूप आई…” पासून “जीवनात ही घडी…” पर्यंत किंवा आजचं माझं आवडतं गाणं मी गाते.माझे वयक्तिक श्रोते माझ्या समोर असतात,आणि मी कशी गाते ह्याची त्यांना पर्वा नसते.शिवाय गाणं संपल्यावर माझे श्रोते मला उभं राहून टाळ्या देतात.
संबंध दिवसात माझ्या डोक्यावर भार टाकणार्‍या दडपणाला केवळ शॉवर खाली गायल्याने उतार येतो. गाण्यातला प्रत्येक स्वर रोजचा चिंतेचा भार आपल्याबरोबर वाहून नेतो आणि पुन्हा रात्रभर तो भार माझ्या मनात येणार नाही ह्याची तजवीज करतो.शॉवर घेऊन झाल्यावर माझं मन स्वच्छ होतं आणि निश्चिंत होतं.ती शॉवर खालची पंधरा-वीस मिनीटं,काहीही वाईट होऊ देत नाहीत, मला कसल्याही चिंतेत टाकत नाही्त.कपडे नेसून झाल्यावर आणि माझा चेहरा बाथरूम मधल्या वाफेने धुसर झालेल्या आरशात पाहिल्यावर माझ्या विषयी आणि माझ्या जीवनाविषयी समझोता करायला मी तत्पर होते.
शॉवर खाली गायल्या शिवाय मला वाटत नाही की मी,इतरांचं माझ्यावर आलेल्या दडपणाला, सामोरी जाईन किंवा कसं.
माझ्या विषयी मला बरं वाटायला मला जे योग्य आहे ते करण्यावाचून गत्यंतरच नाही.”

“शॉवर खाली आंघोळ घेताना गाण्या इतकं ते जर सुलभ असेल तर तू ते नक्कीच करत रहावं,कारण माझ्या एक लक्षात आलं की, ही चैन सगळ्यांनाच उपलब्ध नसावी पण तुला मात्र शॉवर खाली गाण्यात विशेष वाटतं हे मला पटतं.”
मी उठता उठता तिला म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, July 22, 2010

आठवणी.

स्मरण शक्तिबद्दल मला विशेष वाटतं.आपल्याला जर का स्मरणशक्तिच नसती तर जीवन अगदी कंटाळवाणं आणि अंधकारमय झालं असतं.
मनातल्या स्मृति प्रत्यक्षात आणून जीवन सुखकर होतं.पण स्मरण म्हणजे तरी काय?काहीतरी आहे म्हणून आहे काय?की,जे घेऊनच आपण जन्माला येतो?का ही गोष्टच काही निराळी आहे.?

लहानपणी मी कोकणात असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आमच्या मावशीकडे जायचो.दर वर्षी आम्ही तिच्याकडे जायचो.करली नदी ओलांडून गेल्यावर शेताच्या कुणग्यातून वाट काढत जावं लागायचं.उन्हाळा असल्याने नदी अगदीच कोरडी व्हायची.
पुलाचा कोणीच वापर करत नसायचा.नदीतल्या पाण्याच्या डबक्यांपासून दूरमार्ग काढून जाता यायचं.

मावशीचं कौलारू घर दुरून दिसायचं.पायवाटेवरून चालताना तिचं घर ठरावीक जागेवरून दिसायचं.कारण तिच्या घराच्या सभोवती माडाच्या झाडांची इतकी गर्दी झालेली असायची की घर छपून जायचं.दिवस मोठे असल्याने संध्याकाळ होऊनही काळोख व्हायला उशीर व्हायचा.
पिवळ्या रंगाने भिंती रंगवलेल्या असल्याने घर आजुबाजूच्या हिरव्यागार वातावरणात उठून दिसायचं.
घराच्या जवळ आल्यावर धुरकट वातावरणात लाकडं जाळल्याचा वास यायचा.कौलांच्या छपरामधून मिळेल त्या खाचीतून चुलीत जळणार्‍या लाकडांचा धूर हवा तसा बाहेर यायचा.जणू घराला आग लागली की काय असा दुरून भ्रम व्हायचा.

मावशीच्या घरात शिरल्यावर मस्त सुगंधी उदबत्यांचा वास येऊन मन प्रसन्न व्ह्यायचं.मावशी दारातच उभी असायची.डोळ्यात आनंदाची चमक आणि हंशात तृप्तिचे भाव उमटल्याने मावशीला कडकडून मिठी दिल्याशिवाय मन प्रसन्न होत नसायचं.आम्ही आल्याने मावशीच्या घरात सर्व वातावरण उत्तेजीत व्हायचं. त्यामुळे माझ्या मस्तकात जुन्या आठवणींच काहूर माजायचं. थोड्यावेळाने आम्ही सर्व मावशीच्या जेवण्याच्या खोलीतल्या लहानशा टेबलाच्या सभोवती येऊन बसायचो आणि इथेच चर्चा चालू व्हायची.

“आठवतं का?”
ह्या दोन शब्दानी चालू होणारी चर्चा मला याद आणायची की हे स्मरण,ही स्मरणशक्तिच आम्हा सर्वांना जवळ आणत असते.हेच दोन शब्द आपल्याला भूतकाळात नेऊन सोडतात.त्यावेळी सर्व काही औरच होतं असं वाटून अशा विषयाला हात घालून प्रत्येकाचा चेहरा आनंदाने प्रफुल्लीत झालेला दिसायचा.आणि हीच खरी त्या स्मरणशक्तिची किमया म्हटली पाहिजे.

आमच्या लहानपणीच्या आठवणी उफाळून यायच्या.
आमचे आजोबा आमच्याबरोबर काजूच्या झुडपाच्या रानातून डोंगरावरून खाली चालत जाताना कसे पाय सरकून पडले. पडल्यावर ते कसे खजिल झाले होते.त्याना पटकन उठता आलं नाही म्हणून नलुच्या- माझ्या मावस बहिणाच्या-हाताचा आधार घेऊन ते कसे उठले,बिचारे आजोबा पडलेले पाहून पुरूषोत्तम-माझा मावस भाऊ-ओक्साबोक्शी कसा रडायला लागला,आपले आजोबा आता जगणार नाहीत ह्याचं अपरिमित दुःख होऊन तो कसा रडत होता.

आजोबा त्यावेळी त्याला जवळ घेऊन सांगत होते,
“बाळा,आयुष्यात असं खूपदा पडायला होतं.पण खचून जायचं नाही.कुणाचा ना कुणाचा आधार मिळत असतो.तो घेऊन पुन्हा आपल्या पायावर उभं रहायचं.जसा मी आता उठून उभा राहिलो.”
आजोबांचं सांगणं बिचार्‍या पुरूषोत्तमाच्या त्त्या वतात त्याच्या डोक्यावरून जात होतं,पण तो उपदेश इतर आम्हां सर्वांना होता हे कळायला कठीण झालं नाही.
आमची दुसरी मावशी, लहानपणी तिला शाळेत खेळात मिळाली बक्षीसं एखाद दिवशी पहाटे उठून झाडून पुसून परत कपाटात कशी लाऊन ठेवायची.ती चमकदार धातूची बक्षीसं पाहून तिचा चेहरा किती आनंदी व्हायचा.

ह्या सर्व आठवणीनी मन उल्हासित व्ह्यायचं.
आठवणी तुमच्या जीवनाला पुर्णत्व आणतात.मला काही गोष्टींचं स्मरण व्ह्यायला लागलं की,कुणालातरी सांगावसं वाटत असतं. आपल्या आठवणीचा कुणी भागीदार झाला तर त्याला पण जीवनात नवीन ऐकायला आनंद होतो.ऐकणार्‍याच्या आणि सांगणार्‍याच्या भावना ह्या आठवणी ऐकून मतं बदलू शकतात.

जीवनातल्या प्रत्येक अमुल्य क्षणांना चिकटून राहावं.कारण कुणास ठाऊक कदाचीत ते क्षण महान स्मृति होऊन रहातील. आपल्याच मुलांना सांगायला त्या आठवणी उपयोगात येतील. कदाचीत त्या क्षणांचं स्मरण तुमच्या मेंदुत ताजं होऊन राहील. कदाचीत त्यांची उजळणी तुमच्या वयाबरोबर टिकून राहिल. मनात त्या स्मृति कायमच्या रहातील.मला तरी ते महत्वाचं वाटतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, July 19, 2010

नीटनेटका बिछाना.

“पण एक मान्य करावं लागेल की, गुबगूबीत,लुसलूशीत उशी कुणालाही कसलीही हानि नक्कीच करणार नाही.”

वसुधा करमरकरने वरळी सीफेसवर नवीन जागा घेतली आणि एक दिवस तिने मला आपल्या घरी बोलावलं होतं. तिच्या मुली आता चांगल्याच मोठ्या झाल्या होत्या.प्रत्येकाची बेडरूम होती.आणि वसुधाची स्वतःची बेडरूम होती.
मी तिच्या घरी गेलो त्यावेळी तिची जागा न्याहाळून पहात होतो.प्रत्येक बेडरूम्सना लहान बाल्कनी होती आणि बाल्कनीत बाहेर आल्यावर समुद्राचं मस्त दर्शन होत होतं.प्रत्येक बेडरूममधे हळूच डोकावून पाहिल्यावर माझ्या नजरेतून एक गोष्ट निसटली नाही आणि ती म्हणजे प्रत्येकाचा बिछाना.

एखाद्या मोठ्या होटेलमधे बिछाने करून ठेवले जायचे तसेच काहीसे नीटनेटके,आणि निरनीराळ्या रंगीत चादरीने आच्छादलेले बिछाने पाहून माझं सहज कुतूहल वाढलं.

वसुधाच्या लहानपणी मी तिच्या घरी वरचेवर जायचो.वसुधाचं घर अगदी नीटनेटकं दिसायचं.प्रत्येक वस्तू आपआपल्या जागी ठेवलेली दिसायची.कालच व्यवस्थीत फासून फुसून ठेवलेली आहे अशी प्रत्येक वस्तू दिसायची. हा व्यवस्थीतपणा म्हणजे त्यांच्या घरातला एक प्रकारचा “मॅडनेस” म्हटलं तरी चालेल.

मी कधी कधी वसुधेच्या आईला म्हणायचो,
“ही शिस्त आमच्या घरी अजिबात पाळली जाणार नाही.तुमच्या सर्वांची कमाल आहे.”
“वसुधाच्या आजीकडून ही शिस्त आमच्या घरात आली आहे.”
वसुधाच्या आईने एकदा मला सांगीतल्याचं आठवतं.
बहुदा,वसुधाने तेच आपले संस्कार आपल्या वरळीच्या घरात परीपूर्णतेला आणलेले दिसले.
मी वसुधाला म्हणालो,
“हा तुझ्या घरातला नीटनेटकेपणा आपल्याला खूपच आवडला.तुझ्या लहानपणी तुझ्या घरी आल्यावर जसं वाटायचं तसंच हे तुझं घर बघून आठवलं.”
माझी ही प्रशंसावजा टिप्पणी ऐकून वसुधाला मला वाटतं, तिचे जुने दिवस आठवले असावे.थोडेसे डोळे तिरके करून आणि भुवया उंचावून ती मला म्हणाली,

“प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यावर मला माझं अंथरूण-पांघरूण म्हणजेच माझा बिछाना नीटनेटका करायला अजूनही फार आवडतं.मला माहित आहे की रोज रात्री झोपल्यावर आणि नंतर सकाळी उठल्यावर आपण बिछान्याचा सगळा घोळ करून ठेवतो.पण एक मात्र नक्कीच की,सकाळी उठल्यापासून,दिवसभर कामं करून करून हाडांचा चोळामोळा झाल्यावर रात्री नरम गुबगुबीत उशा घेऊन अंथरूणात अंग झोकून दिल्यावर जे काय बिछान्यात वाटतं ते आगळंच म्हणावं लागेल.

मोठी होत असताना हळूहळू अंथरूण-पांघरूण नीटनेटकं करून बिछाना तयार करण्याची कला मी माझ्या आई आणि आजीकडून शिकले.पण मी लहान होती त्यावेळी आजीबरोबर बकबक करीत असताना ती तिचं अंथरूण नीटनेटकं कशी करायची ते न्याहळंत असायची.”

मलाही तिच्या लहानपणाची आठवण आली.विशेषकरून आमच्या बिल्डिंगमधला जिन्या खालच्या धोब्याची. एकवेळ सूर्य जरा उशिरा उगवेल पण वसुधाच्या घरी हा धोबी सक्काळी आल्याशिवाय गत्यंतर नसायचं.वसुधाची आजी दरवाज्यात त्याची वाट पहात असायची.आणि त्याला जरा उशिर होईल असं भासल्यास त्याला ऐकायला जाईल अशा आवाजात आपल्या मोडक्या हिंदीत ओरडून सांगायची,
“भय्याजी,तुमकू कैसा समजता नही? आठ बजनेको आया.हमकू भी काम है!”
भय्या हे आजीचं वाक्य पुरं होण्यापूर्वीच येऊन ठपकायचा.हो,त्याचं बरोबर आहे.वसुधाची आजी त्याचं कायम गिर्‍हाईक होत ना!
मी वसुधाला तिच्या आजीच्या ह्या वाक्याची आठवण करून दिल्यावर मला म्हणाली,
“मला माझ्या आजीची खूपच आठवण येते.शिस्त आणि स्वच्छता म्हणजे काय ह्याचं बाळकडू आम्ही तिच्याकडूनच प्यालो.
तुम्हाला सांगते,”
असं म्हणत मला सांगू लागली,

“त्यावेळी आमच्या घरात,आठवड्याभरात चादरी किंवा उश्या खराब झाल्यातरच घरी धुतल्या जायच्या, नाहीतर आठवड्याच्या शेवटी सर्वांच्या अंथरूणावरच्या चादरी,उश्यांची कव्हरं आणि पांघरूणं नविसरता धुतली जायची आणि स्वच्छ घड्याकरून कपाटातल्या कप्प्यावर नीट डाळून ठेवली जायची.दर आठवड्याला बिल्डिंगमधल्या जिन्याखालच्या धोब्याकडून चादरीना आणि उश्यांच्या कव्हरांना इस्त्रीकरून सकाळीच त्या आणून द्यायचं धोब्याचं काम असायचं.”

“त्याचा अर्थ तुमचं कपाट बिछान्याच्या उश्या,चादरी आणि पांघरूणं ह्यानी भरून जात असेल नाही काय?”
मी वसुधाला कौतूक म्हणून प्रश्न केला

“हो अगदी बरोबर.ते कपाट खास ह्या गोष्टी ठेवण्यासाठीच होतं.
एक सेट धोब्याकडे दिला असताना दुसरा सेट वापरात असायचा.”
वसुधा म्हणाली.आणि आपल्या शालेय जीवनातली एक आठवण सांगताना मला म्हणाली,

“मला आठवतं मी एकदा दहा दिवस शाळेतल्या मुलींबरोबर ट्रिपला गेले होते.प्रत्येक खोलीत दोन मुली झोपायचो. प्रत्येकाने आपली खोली नीट ठेवायची आम्हाला आमच्या बाईंकडून ताकीद दिली गेली होती. खोलीतला माझा भाग अर्थातच मी व्यवस्थीत ठेवायची.
माझ्या बरोबरची मैत्रीण कुरकूरन का होईना माझ्या संगतीत अंथरूण-पांघरूण व्यवस्थीत कसं ठेवायचं ते ती शिकली. ट्रिप संपल्यानंतर ह्यासाठी तिने माझे निक्षून आभार मानल्याचं मला आठवतं.”

“ते तुझे जीवनातले दिवस पार पडून आता बरीच वर्षं होऊन गेली. आता तुझा संसार तू करायला लागली आहेस.तुझं स्वतःच घर झालं आहे.गंमतीत सांगतो,तुझी खोली हा तुझा गढ झाला आहे आणि तुझा बिछाना हा तुझा खोलीतला बुरूज झाला आहे.”
मी वसुधाला माझा विचार सांगीतला.

“मला आठवतं-त्यावेळी आमची मुलं लहान होती-आमच्या आनंदाच्या दिवसाचा मी, माझा नवरा आणि आमची तीन मुलं आमच्या बिछान्यात एकमेकाला लिपटून पहाटेच्या प्रहरी पेंगुळण्यापासून प्रारंभ करायचो.”
वसुधा सांगत होती,

“खरं पाहिलंत तर आमची मुलं ह्या जगात आली ती मऊ,लुसलूशीत बिछान्यासाठी व्याकूळ होऊनच आली अशी मी कधी कधी कल्पना करते.लहान असताना माझी मुलं सकाळीच बिछान्यातून उठायला फार कुरकूर करायची.
एखादा आमचा दुःखाचा दिवस आम्ही सर्व आमच्या बिछान्यात एकत्रीत होऊन देवाची प्रार्थना करण्यात संपवायचो.

बिछाना करणं हा माझ्या जीवनातला एक गंमतीदार दुवा आहे.
तो दुवा असल्याने त्या दुव्यात भरपूर आठवणी आणि दिलासे, तसंच कुटूंब आणि घर सामिल व्हायला मदत होते. मला माहित आहे नीट बिछाना करण्याने जग काही जिंकलं जात नाही पण एक मान्य करावं लागेल की, गुबगूबीत,लुसलूशीत उशी कुणालाही कसलीही हानि नक्कीच करणार नाही.”
तेव्हड्यात, वसुधेच्या एका मुलीने गरम गरम चहा आणि भजी आणून आमच्या समोर ठेवली आणि ती हंसत हंसत निघून गेली.
चहा घेता घेता आम्ही निराळ्याच विषयावर बोलायला लागलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, July 16, 2010

शक्तिमान शब्द.

आज पाऊस खूपच पडत होता.रविवारचा दिवस होता.मासे खायची हूक्की आली होती.पण पावसात कोळीलोक समुद्रात पडाव टाकीत नाहीत.त्यांच्या मास्या्ची जाळीं गुंडाळी करून घरात ठेवलेली असतात.होड्या उलट्या करून माडाच्या झापाच्या छप्पराखाली किनार्‍यावर नीट डाळून ठेवलेल्या असतात.
मग मासे कसे मिळणार?

अंधेरीच्या मासळी बाजारात बर्फात ठेवलेले मोठे मासे-पापलेटं,सरंगे,सुरमई मिळतात.पण आमच्या सारख्या अट्टल मासे खाणार्‍याला हे मासे भाताच्या उंडीबरोबर-घासाबरोबर नाकाच्या वर पण जाणार नाहीत,तोंडांत जायचं तर सोडूनच द्या,कारण ते ताजे नसतात.
पण माझ्या ओळखीच्या काही कोळणी खाडीतले ताजे मासे अंधेरीच्या मासळी बाजारात घेऊन येतात हे मला माहित होतं.

गुंजूले,खेकडे,चिंबोर्‍या,सुळे,तिसर्‍या-शिंपल्या हे मासे अशावेळी खूपच चवदार लागतात.विशेषकरून त्यांचं झणझणी तिखलं किंवा नारळाचा रस घालून केलेली आमटी मस्तच होते.

चला काय मिळतं ते बघूया म्हणून धाके कॉलनीतून चालतच आंबोलीच्या रस्त्याने शॉर्टकट घेत बाजारात गेलो. विनय कोचरेकरला बाजारात शिरताना पाहिलं होतं.त्यावेळी मी कोळणीकडून मासे घेऊन पिशवीत टाकण्याच्या गडबडीत होतो.परत मान वर करून पाहिल्यावर विनय दिसेनासा झाला. अंधेरीच्या बाजारात तोबा गर्दी असते. उत्तरेकडून पार्ल्यापासून ते दक्षिणेकडून गोरेगांव पर्यंत लोकं रविवारचे हटकून अंधेरीच्या मासळी बाजारात येतात. एरव्ही स्थानीक जागी त्यांना मासे मिळतात पण त्या ठिकाणी मास्यांच्या प्रकारांची निवड बेताचीच असते.

विनय कोचरेकराला भेटायची खूपच इच्छा होती.बघू पुढल्या खेपेला! असं म्हणून मनाची समाधानी केली.
मासळी बाजारातून बाहेर पडल्यावर मास्यांना लागणारा मसाला म्हणजे-कोथिंबीर,लिंबू,आलं,कडीपत्ता हे सर्व आम्हा मासे अट्टल लोकांचं एक दुकान आहे तिकडे गेलो.आणि मनासारखं झालं विनय पण खेकडेच तेव्हडे घेऊन मसाला घ्यायला त्याच दुकानात आला होता.
मला पहिल्यावर टिपीकल मालवणीत हेल काढून म्हणाला,
“अरे तू असतोस कुठे?”
“तुला पण मी हाच प्रश्न करतो”
मी हंसत हंसत विनयला म्हणालो.

“तू काय आता सेंट्रल लायब्ररीत चीफ लायब्ररीयन झालास असं मी ऐकलं होतं.”
असं मी त्याला म्हणालो आणि पायी पायी चालत त्याच्याबरोबर घरी जायला निघालो.मासे, बासे होण्यापूर्वी घरी गेलेलं बरं असा आमचा दोघांचा विचार होता.विनय आंबोली रस्त्यावर फिल्म स्टुडियोच्या बाजूच्या वाडीत रहातो. त्याचं घर आल्यावर मला घरी बोलवत होता.पण मी माझ्या हातातली मास्यांचे पिशवी वर करून दाखवली आणि तो समजला.पुढच्या रविवारी नक्कीच येईन असं सांगून मी घरच्या वाटेला लागलो.

त्या रविवारी संध्याकाळाचा मी विनयच्या घरी गेलो होतो.
साहित्य,कविता वगैरे विषयावर आम्ही गप्पा मारीत होतो.चांगलाच रंगात येऊन विनय मला म्हणाला,

“मुखावाटे बोललेल्या शब्दांची क्षमता मी जाणतो.प्रत्येक स्वरातल्या सामर्थ्याविषयी मला विशेष वाटतं. अ-आ-इ-ई-उ-ऊ-ए-ऐ-ओ-औ-अं आणि अः पण.आणि हे स्वर विलक्षणपणे आपल्या चुलत भावंडांना-व्यंजनाना-क्रियाशील करतात,त्याबद्दल पण विशेष वाटतं.विरामचिन्हांच्या लयीबद्दल मला खास आदर आहे. प्रश्नचिन्हांच्या,अर्धविरामांच्या,उद्गारचिन्हांच्या,लंबवृत्तांच्या आणि शब्दाच्या लयीमधे हळूच बाधा आणणार्‍या क्षणभरच्या विरामांच्या आणि लगोलग स्पष्टीकरणाच्या भडीमाराचं साठवण ठेवणार्‍या कंसांच्या बळाची पण मला प्रशंसा करावीशी वाटते.

मला आठवतं कॉलेजमधे शिकत असताना तोंडावाटे बोलल्या गेलेल्या शब्दांच्या प्रेमात मी पडलो होतो.एकदा आमचे प्रोफेसर एका गुहेची दृष्टांतकथा सांगत होते.एकाएकी माझ्या लक्षात आलं की माझ्या डोळ्यांच्या मागे आतून काहीतरी चमकायला लागलंय.जणू माझ्या मेंदुच्या कडा फुगायला लागल्या आणि जहाजाच्या शीडासारख्या फडफडायला लागल्या.लेक्चर संपल्यावर मी माझ्या प्रोफेसरांना म्हणालो देखील की,
“सर,तुमचं लेक्चर म्हणजे एक स्वरमेळ आहे असं मला वाटतं”

हे खरं आहे की, जसे इतर लोक संगीतावर प्रेम करतात तसं मी ह्या मुखावाटे आलेल्या शब्दांवर प्रेम करतो.मला संगीत आवडत नाही असं नाही. ऐकतो आणि सोडून देतो.मला संगीत हे जेवणातल्या थाळीतल्या भाजी सारखं वाटतं.मात्र तोंडाने कथन केलेली गोष्ट गरम गरम जीरेसाळ भातावर हळदीच्या रंगाचं वरण वाढून त्यावर साजूक तुपाचा चमचा ओतल्यासारखा मुख्य जेवण आहे असं वाटतं.आणि त्या कथनात आलेले समर्पक वाकप्रचार हे झणझणीत वाटणार्‍या खोबर्‍याच्या चटणीतला मिरचीचा, कोथंबीरीचा जीभेच्या टोकाला आलेला स्वाद कसा वाटतो.”

लायब्ररीयनच तो! विनय लायब्ररीत दिवसभर पुस्तकांच्या गराड्यात राहून शब्दांचा सहवास कसा विसरेल.? म्हणून मुखावाटे आलेल्या शब्दांचं सामर्थ्य सांगताना सूर आणि व्यंजनापर्यंत खोलवर जाऊन विचार करायाला शेवटी त्याला भाग पडलं असावं असा मी माझ्या मनात विचार केला.आपणही थोडी माहिती द्यावी म्हणून अलीकडेच मी इंग्रजी अक्षरांचा स्मॉल-ट्रुथ म्हणून कसा वापर केला आहे ह्याची माहिती द्यावी म्हणून त्याला म्हणालो,
“तू हे जे काही सूर आणि व्यंजनाच्या समुहातून निर्माण झालेल्या शब्दांचं मार्मिक वर्णन केलंस ते ऐकून मी थक्कच झालो.तुला कदाचीत माहित असेलही, पण मी जे अलीकडे वाचलं त्या इंग्रजी अक्षरांच्या ताकदी बाबत तुलाच सांगणं योग्य होईल असं मला वाटतं.कारण शब्दांवर प्रेम करणार्‍या तुला कुठल्याही भाषेतला शब्द का असेना,त्यांचं महत्व ऐकून आणखी भाऊक व्हायला आनंद होईल.
एक कागद पेन्सिल मला जरा दे.म्हणजे मी तुला माझ्या म्हणण्याचं विवरण करून दाखवीन.”

विनयने कागद आणि पेन्सिल आणून दिल्यावर मी म्हणालो,
“जरूर तेच कागदावर लिहितो.
इंग्रजीमधल्या सूर आणि व्यंजनाला मिळून दिलेल्या आकड्यातून निर्माण होणार्‍या बेरजेवरून शब्दाची ताकद समजण्याचा प्रकाराला स्मॉल-ट्रुथ म्हणतात.जीवन शंभर टक्के बनवण्यासाठी आणि हे रोजच्या वापरातल्या शब्दातलं स्मॉल-ट्रुथ शोधण्यासाठी जर का,A ते z च्या अक्षरामधे A=1 तर B=2 असं करता करता Z=26 असं संबोधल्यास कोणत्याही शब्दाची ताकद अजमावली जाते.आपल्या जीवनात अनेक अर्थांचे शब्द महत्वाचे असतात.जसे-
प्रेम,ज्ञान,कष्ट,नेतृत्व,दैव,पैसा,वृत्ति वगैरे.त्या इंग्रजी शब्दांची टक्केवारीत ताकद पहायचं ठरवलं तर,
उदा.

LOVE=L+O+V+E=12+15+22+5=54%
kNOWLEDGE=11+14+15+23+12+5+4+7+5=96%
अशा तर्‍हेने हव्या त्या शब्दातल्या अक्षराच्या नंबराची गोळा-बेरीज केली तर,
HARDWORK=98%
LEADERSHIP=89%
LUCK=47%
MONEY म्हणजेच पैसे ना?
पैसे आयुष्यात महत्वाचे असं जो तो म्हणतो नाही काय?
पण
MONEY=72%, जीवनात ताकदीची आहे.

“असं जर आहे तर मग जीवनात 100% ताकदीचा शब्द कोणता?”
विनय अगदी उताविळ होऊन मला विचारायला लागला.
मुद्दामच जरा आवंढा गिळण्यात वेळ घालवण्याचा अविर्भाव करीत मी म्हणालो,

“प्रत्येक समस्येवर उपाय आहेच,फक्त आपली वृत्ति म्हणजेच- ATTITUDE- बदलली तरच, आपण ऊंची गाठू शकतो.
तेव्हा ATTITUDE ची ताकद अजमावल्यास,

ATTITUDE=1+20+20+9+20+21+4+5=100%
याचाच अर्थ आपल्या जीवनाकडे आणि कामधंद्या्कडे पहाण्याची आपली वृत्ति जीवनाला 100% यशस्वी बनवू शकते.
वृत्तिमधेच सर्व आलं.वृत्ति बदला आणि जीवन बदला.”

इंग्रजी शब्दातली ताकद अशीपण अजमावली जाते हे विनयने माझ्या कडून ऐकलं ते पहिल्यांदाच ऐकलं हे कबूल केल्याचं सांगून मला शेवटी विनय म्हणाला,
“शब्द कुठल्याही भाषेतला घ्या.मुखावाटे आलेल्या शब्दाची ताकद मी मानतो.शब्दातलं एखाद-दुसरं अक्षर जरी स्वतःहून काहीसं ताकदवान असलं, तरी दोन किंवा दोनापेक्षा अधीक अक्षराच्या समुहामुळे बनलेल्या शब्दाला निरंकूश ताकद असते हे मात्र निश्चित.हे शब्द मला भूरळ पाडतात,मला अचंबीत करतात,मला भयभीत करतात, मला वैताग आणतात,मला संतुष्ट करतात,नव्हेतर हे शब्दच माझ्या अस्तित्वाचा उगम आहे असं मला वाटतं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, July 14, 2010

तुमचा जादूवर विश्वास आहे का?

“त्यांच्या अस्तित्वाच्या पुस्तकाचं हे रोजचं एक पान आहे असं समजून ते रहातात.असं पुस्तक की त्याला शेवट आहे जो अगोदरच लिहिला गेलेला आहे.”

“कधी कधी स्पष्ट करून सांगता येणार नाहीत अशा गोष्टी घडत असतात.काही गोष्टीत तर अर्थच नसतो.तरीपण ती गोष्ट होऊन गेल्यावर आणि आपल्याला ती पुर्ण समजली नसल्यावर आपण स्वतःलाच विचारतो,
“ही जादू तर नसेल ना?
का हे विधीलिखीत आहे?
का हे कपोलक्ल्पीत आहे?
का आपल्या अंतरमनातले खेळ आहेत?”
हे काहीतरी तर्कसंगत आहे असं आपण मानतो.पण त्यात काहीच अर्थ नाही हे नक्कीच.
बरेच लोक अशा रोमांचकारी पण काल्पनिक वाटणार्‍या गोष्टीवर विश्वासून,
“सर्व काही आपोआप होणार”
असं आपल्या मनात म्हणून,
“विधीलिखीत आहे आणि जसं घडेल तसं आपल्याला राहिलं पाहिजे आपल्या हाती काही नाही”
अशी समजूत करून आपलं जीवन जगतात.
त्याचाच अर्थ ते त्यांना जे हवं आहे त्यासाठी संघर्ष करायला तयार नसतात.उलट ते प्रतिक्षा करीत बसतात.काही तरी जादू होईल असं त्याना वाटत असतं.
त्यांच्या अस्तित्वाच्या पुस्तकाचं हे रोजचं एक पान आहे असं समजून ते रहातात.असं पुस्तक की त्याला शेवट आहे जो अगोदरच लिहिला गेलेला आहे.”
मनोहर माझ्याशी गप्पा मारताना मला सांगत होता.

मला पुढे म्हणाला,
“मी एका तीस वर्ष वयाच्या बाईला भेटलो होतो.ती प्रकृतिने चांगलीच सुधृड होती.पण ती बरीचशी निषक्रिय म्हणा किंवा आळशी म्हणा हवं तर, अशी होती.स्वतःच्या अडचणीचं तिला भान नव्हतंच शिवाय इतरांच्या पण आपल्या कुटूंबियाना धरून.झालं शेवटी तिचा नवरा तिच्यापासून दूर राहायला लागला.तिच्या मुलांचा सांभाळ तिची आई करू लागली.इतकी ती अक्रियाशील होती की तिच्या आईला तिची मुलं सांभाळण्यापलीकडे दुसरा पर्यायच नव्हता.
काहीच करायला ती मागत नव्हती हीच तिची अडचण होती.तिने प्रयत्नपण केला नाही.
तिने जीवनातला आनंद घेतलाच नाही.कारण ती रिक्त होती. ती कशाची बरं वाट पहात असावी?
“जादूची”
ती म्हणायची.
“सर्व काही आपोआप होणार”
असं पुढे म्हणायची.
ही जादू अस्तित्वात नाही हे कळायला तिला फारच उशीर झाला होता.”

मनोहरचं हे स्पष्टीकरण ऐकून मला जरा गंमत वाटली.तो जे काही म्हणतोय त्यात तथ्य आहे हे नक्कीच.त्याला आणखी विचार करायची चालना देण्यासाठी मी त्याला अगदी निराळ्या विचाराचं उदाहरण देण्याचं ठरवून त्याला म्हणालो,

“उलट,अशीही एक वयस्कर बाई मला माहित होती की तिच्या जवळ काहीही उरलं नव्हतं तरीपण जीवन आनंदाने जगण्याची तिची इच्छा होती.”
आणि मी पुढे सांगू लागलो,

“मी पण एका वयस्कर बाईला भेटलो होतो.
सदा हंसतमूख दिसणारी ही आजुबाजूच्या परिसरात सगळ्यांना ठाऊक होती.सर्वांच्या अगोदर उठून सकाळीच पार्कमधे जाऊन भराभर चालण्याच्या व्यायामात दंग असायची.एखाद्या वीस वर्षाच्या तरूणीला लाज वाटेल अशी तिची दिवसभराची धामधूम असायची.
अशा धामधूमीचं तिचं वय नव्हतं हे सगळ्यांना माहित असून, आम्ही तिच्याकडे विस्मयाने पाहायचो.जीवनाचा हरएक क्षण तिने आनंदाने घालवला असेल.जो तिला भेटेल तो तिच्या सवयीचं पालन करण्याच्या प्रयत्नात असायचा. गेल्या तीन वर्षात जे तिने सफल केलं ते तिने गेल्या पंचायशी वर्षात सफल केलं नसेल. अठ्ठयाऐशी वर्षावर ती वारली. ती कविता करायची.दोन नवीन भाषा शिकली होती.भरपूर प्रवास केला होता.तिचं प्रारब्ध तिनेच बनवलं होतं.”

माझं हे ऐकून मनोहर मला म्हणाला,
“ह्या दोन निरनीराळ्या घटनामुळे लोक जादूबद्द्ल बोलतात आणि विश्वास ठेवतात त्या विषयी खरोखरच विचार करावा असं मला वाटू लागलं आहे.
तरीपण माझ्या मनात एक विचार येतो की,आपल्याला एकच आयुष्य मिळतं आणि ते प्रत्येकाने परिपूर्ण जगावं असही मला वाटतं. दिवसातलं एक मिनीट,महिन्यातला एक दिवस, वर्षातला एक महिनाही वाया जाऊ देऊ नये.काहीही आणि सर्वकाही शक्य आहे जर का आपण ते मिळवण्यासाठी झटलो तर.”

“तुझं म्हणणं मला शंभर टक्के पटतं”
असं सागून मी मनोहरला शेवटी म्हणालो,
“जीवन आश्चर्याने भरलेलं आहे.मला एका गोष्टीवर भरवसा आहे की वाट पहात बसलो तर काहीही होणार नाही. आणि जादू होण्याची वाट पहात राहिलो तर काहीच होणार नाही हे निश्चीत.जीवन आनंदाने जगावं हा आपला अग्रक्रम असला पाहिजे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, July 11, 2010

पसंत करीते मी तुला विस्मरणे

अनुवाद (भूलने वाले याद न आ…)

विवश मला नको करू
दुःख माझे नको दुरावू
तुझ्याचसाठी जीवन जगले
अन नाराजीने दुःखी झाले
ठोकर बसली अंतर तुटले
पसंत करीते मी तुला विस्मरणे

निष्टा माझी निष्काम झाली
दिवस न येता संध्या आली
फुले खुशीची का ना मोहरली
नयन भिडूनी का अंतरे दुरावली
फळ निष्टेचे मला मिळाले
पसंत करीते मी तुला विस्मरणे

नशा प्रितीची उतरली हृदयातून
त्यजीते प्रेम तुजवरी ओवाळून
नाते प्रितीचे दे इथेच तोडून
गीत अधूरे दे इथेच सोडून
का गावे असले हे गाणे
पसंत करीते मी तुला विस्मरणे

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, July 8, 2010

या,सुखानो या!

“ह्या जगात आपला ताबा ठेवण्यासारख्या फारच थोड्या गोष्टी असतात.आणि तुझं वयक्तिक सुख प्रदर्शीत करणं ही त्या ताबा ठेवण्यासारख्या थोड्या गोष्टीतली एक गोष्ट आहे.”

मला एक नवी सायकल माझ्या पुतण्यासाठी विकत घ्यायची होती.आम्ही दोघे मिळून विजय कारखानीसच्या दुकानात गेलो होतो.विजय माझ्या पुतण्याचा शाळकरी मित्र होता.विजय त्याच्या कारखान्यात सायकली ऍसेंबल करतो आणि दुकानात नेऊन विकतो असं कळलं.विजय स्वभावाने बोलका होता.अर्थात धंद्यात बोलकेपणाची जरूरी असते.त्यामुळे गिर्‍हाईकाला आपलसं करायला मदत होते.विजयने सांगीतलं की थोडावेळ थांबलात तर
कारखान्यातून नवं पाच गीअर्स असलेलं मॉडेल आम्हाला तो देऊ शकेल.लगेचच आमच्यासाठी त्याने त्याच्या दुकानात काम करणार्‍या माणसाला कारखान्यात पाठवून दिलं.आम्ही त्याची परत येण्याची वाट पहात असताना मी विजय बरोबर गप्पा मारीत होतो.

“सध्या धंदा कसा काय चालला आहे? “
असं मी विजयला विचारलं.

“चाललाय.पण काही धांवत नाही.”
असं विजय हंसत हंसत उत्तरला.आणि म्हणाला,
“माझी स्वतःची काही मूलभूत दृढमतं आहेत.जसा काळ पुढे चालला आहे तसं मला वाटतं ही माझी मतं मला रोजच्या जीवनात आणि ह्या धंद्यात सामोर्‍या येणार्‍या अडचणी पार करायला मदत करत राहिलीत.
ज्यावर माझा दृढविश्वास आहे आणि कदाचीत जे माझ्या जास्त मदतीला येतं त्या सुखाबद्दलच्या माझ्या मताविषयी मला विशेष वाटतं.”

मला हे ऐकून रहावलं नाही.मी विजयला म्हणालो,
“इतरांप्रमाणे तुझी सुद्धा हीच इच्छा असावी की जीवन सुखी असावं.आणि मला नेहमीच वाटत असतं सुखी व्हायला यश मिळणं हे सर्वतोपरी ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं.आपल्या हाताबाहेर असलेल्या बाहेरच्या गोष्टींचा प्रभाव,आणि बाहेरची परिस्थिती, बरेच वेळा ज्याला प्रारब्ध किंवा भाग्य असं म्हणतात, ह्यावर ते सूख अवलंबून नसतं असं मला वाटतं.”
विजय़च्या चेहर्‍यावर आनंद दिसला.त्याला माझ्याशी ह्याच विषयावर बोलायचं आहे असं दिसलं.

“माझ्या दृष्टीने ह्या माझ्या सुखाबद्दलच्या मताचं समर्थन करायला दोन तत्व कारणीभूत होत असावीत.सुखाबद्दल इच्छा प्राप्त व्हायला हीच दोन तत्वं जास्त महत्वाची आहेत.
पहिेलं तत्व म्हणजे माझी जीवनाकडे पहाण्याची वृत्ति.आणि गंमत म्हणजे ही वृत्ति दुसर्‍या तत्वाशी संलग्न असते.
आणि हे दुसरं तत्व म्हणजे,दुसर्‍यांना मदत करण्याची मनापासून अंगात असलेली आवड.”
विजय मला सांगू लागला.तेव्हड्यात त्याच्या एका नोकराने नवी करकरीत सायकल आमच्या समोर आणून ठेवली. माझा पुतण्या सायकलकडे निरखून पहात होता.त्याला ती आवडलेली दिसली.
तो त्याचा व्यवहार पूर्ण करायला गेला. तोपर्यंत मी विजयशी बोलत बसलो.

मी विजयला म्हणालो,
“कुठच्याही धंद्यात उन-पाऊस असतोच.ह्या उन-पाऊसावर धंद्याचं यश-अपयश अवलंबून असतं.पण धंद्यात चिकाटी हा सर्वोत्तम गूण असावा लागतो.हे जास्त करून गुजराथी लोकांकडून शिकण्यासारखं आहे.”

“आता मराठी लोक पण धंदा करायला पुढे सरसावले आहेत. माझ्याच बाबतीत बोलायचं झाल्यास मला नोकरी करणं पहिल्यापासून आवडत नव्हतं. पण तुम्ही म्हणता तसं धंदा चालू केल्यावर तो कसा चालेल हे काळच दाखवीत असतो.
निराशेने अंधकारमय झालेलं माझं पंधरा वर्षापूर्वीचं जीवन मला आठवतं.त्या जीवनाबद्दल सकारात्मक वृत्ति ठेवण्याऐवजी मी बाहेरून काय बदल होईल याची वाट पहात असायचो.धंद्यात बरकत येऊन मी सुखी होण्यासाठी माझ्या जीवनात काही गोष्टी घडून येण्याची आवश्यकता आहे अशी माझी समजूत करून घेऊन मी वाट पहात असायचो.

एकदा मी माझ्या आईला हा माझा विचार सांगीतला.
ती मला म्हणाली,
“वाट बघत रहाण्यात काही अर्थ नाही.सुख मिळवण्यासाठी तू स्वतः तुला सामिल करून घ्यायला हवं.”
तिने पुढे आणखी एका वाक्यात सांगीतलं,
“ज्यांचा सुखी होण्यासाठी सामिल होण्याचा प्राथमीक उद्देश, दुसर्‍यांसाठी काही करण्याचा असतो, तेच फक्त सुखी होतात.”

ही कल्पना बरीच वर्ष माझ्या बरोबरच विकसीत होत होती.आणि मला आता विश्वास वाटायला लागलाय की त्या कल्पनेत काहीतरी सत्य सामावलेलं आहे.एक प्रकारची आंतरीक समाधानी आणि सर्व काही आलबेल आहे असं वाटणारी मनस्थिती दुसर्‍या कुठल्याही मार्गाने शक्य होणार नाही ती मला इतरांच्या सुखात माझ्याकडून थोडीशी भर घालण्याने होते.”

विजयच्या आईचा उपदेश विजयकडून ऐकून मलाही विजयला थोडं सांगावसं वाटलं.माझा पुतण्याही आपलं सायकलबद्दलचं सर्व काम आटोपून आमच्यात येऊन बसला.

मी विजयला म्हणालो,
“तुझं दैव वाईट असल्याने किंवा तुला जे जे म्हणून हवंय ते मिळत नसल्याने तू सुखी होणार नाहीस याची तुला काळजी वाटूं नये.तुला जे काही हवंय त्यातल्या बर्‍याच गोष्टी तू कधीच प्राप्त करू शकणार नाहीस हे नक्कीच आहे. तरीसुद्धा तू सुखीच रहाणार, कारण जास्त करून,तुझे उद्देश साध्य करण्याचे तुझेच प्रयत्न पाहूनच, तू सुखी होणार.”

“तुम्ही म्हणता तसाच विचार करीत मी पुढे सरकत आहे.”
असं सांगत विजय मला म्हणाला,
“सुदैवाने मी जे काम करतो ते मला खूपच आवडतं.आणि त्याशिवाय माझं हे सायकलचं वर्कशॉप आहे.सायकलचे सुट्या भागाचे समूह आणून मी सायकली तयार करून घेतो आणि त्या विकतो.त्यासाठी माणसं ठेवली आहेत.त्या शिवाय भाड्याने सायकली पण देतो.हळू हळू मी मोटरसायकल्स आणि स्कुटरचे भाग आणून तेही बांधायला सुरवात केली आहे.माझ्या कारखान्यात लोकांची वरदळ होत असल्याने अनेक लोकांच्या भेटीगाठी होऊन ओळखदेख वाढल्याने एकप्रकारे इतरांची सेवा केल्याचं सूख मला मिळतं.
एक मात्र खरं की माझ्या लक्षाची उंची पाहून,आणखी काहीतरी यत्न करावे लागणार हे नक्कीच.मी पाहिलंय की माझ्या जीवनात माझ्या आवडीनिवडीत विभिन्नता आहे.आणि इतरांचा ज्यात सहभाग आहे अशा घटनात भाग घ्यायला मला विशेष आनंद होतो.आणि एक दिवस हाच माझा चेहरा माझ्या व्यक्तित्वाचा एक अनौपचारिक नक्षा बनून रहाणार.आणि इतर, माझा चेहरा पाहून संकेत ठरवायला मुक्त होतील”

मला विजयचा हा निर्धार आवडला.मी त्याला म्हणालो,
“माझी खात्री आहे की जसा तू मोठा होत जाशील तशी तुझ्या चेहर्‍यावरची दिखावट संभाळण्याची तुझी जबाबदारी वाढत जाणार. तुझं जीवन तू सुखी वा दुःखी ठेवशील तसा तुझा चेहरा प्रिय वा अप्रिय दिसणार..थोडेच लोक आपल्या हंसतमूख चेहर्‍यामागे खेद आणि असंतोष लपवून ठेवायला यशस्वी होतात.”

“म्हणजे ह्या तुमच्या म्हणण्याचा अर्थ असाच ना,माझं जीवन जर का खेदजन्य असेल तर ते माझ्या चेहर्‍यावर दिसल्याशिवाय रहाणार नाही.आणि तसं व्ह्यायला मीच दोषी ठरेन.”मला विजयने सांगून टाकलं.

“अगदी बरोबर”
असं म्हणत विजयचा निरोप घेताना त्याला मी म्हणालो,
“ह्या जगात आपला ताबा ठेवण्यासारख्या फारच थोड्या गोष्टी असतात.आणि तुझं वयक्तिक सुख प्रदर्शीत करणं ही त्या ताबा ठेवण्यासारख्या थोड्या गोष्टीतली एक गोष्ट आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, July 4, 2010

जीवनातली मजा.

मला मिठीत घेऊन,
“बाबा,मी हे केलं मी ते केलं”
हे ऐकल्यावर माझा चेहरा हंसण्याने प्रफुल्लीत व्हायचा.

“घरातून ऑफिसला जाताना आणि परत घरात आल्यावर हंसता चेहरा असावा.”
असं माझे वडील मला नेहमी सांगायचे.अगदी मी लहान असताना असं मला त्यानी सांगीतलेलं आठवतं.मी त्यावेळी ऑफिस म्हणजे काय हे समजायच्या वयातही नव्हतो.”
वडीलांची आठवण काढण्यासारख्या उपदेशाची आठवण येऊन मला अरविंद असं म्हणाला.

अलीकडेच त्याचे वडील गेल्याने मी त्याला भेटायला गेलो होतो. माझी त्याच्या वडीलांशी नेहमीच भेट व्हायची. पण अरविंद त्याच्या वडीलांसारखा डॉक्टर असला तरी तो सैन्यात डॉक्टर होता. कधी जर का मुंबईला आला तर मात्र मला भेटल्याशिवाय जायचा नाही.सैन्यातला पोषाख त्याला लहानपणापासून आवडायचा.आणि असा पोषाख वापरण्यासारखी त्याची शरीराची ठेवण पण उमदी होती.कॉलेजमधे असताना त्याने एनसीसी जॉइन केलं होतं.पण वडलांसारखी डॉक्टरकी करण्याचीही त्याला इच्छा होती.मग त्याच्या वडीलांनीच त्याला सुचवलं.
“डॉक्टर होऊन सैन्यात गेल्यावर तुझे दोन्ही उद्देश साध्य होतील”
असं अरविंद मला पूर्वी कधी म्हणाला होता.

“मी अलीकडेच माझ्या बाबांना,चेहरा हंसता ठेवावा ह्या त्यांच्या उपदेशाबद्दल विचारल्यावर ते म्हणाले होते की त्यांना ते आठवत नाही.पण मी त्यांना नेहमीच तसं करताना पाहिलंय.
माझे वडील आनंदात राहिले,आणि मला वाटतं मी पण त्यांचं अनुकरण करायला लागलो.त्यांचं ते तृप्त आणि आनंदी जीवन भोगण्यासाठी तरी.”
मला अरविंद सांगत होता.

मी त्याला म्हणालो,
“तुझे बाबा अनुभवी डॉकटर होते.त्यांच्या त्या उपदेशामागे अर्थ भरलेला आहे.
कामावर जाताना हंसत राहिल्याने तुम्ही तुमचं काम मजेत करता असा इशारा मिळतो.तुम्ही समाधान आहात, तुम्हाला लोक पसंत करतात आणि रोजची इतर दगदग संभाळूनही तुम्ही मजेत आहात हे दिसतं.जीवन जगण्यासाठी काम हेच सर्वकाही आहे अशातला भाग नाही.मुलांबरोबर घरी रहाणं,निवृतीत रहाण्याचा आवेश असणं,किंवा आणखी काही पुनरावृत्तिचे प्रयास करणं अशा गोष्टी असू शकतात. जगण्याचं एखाद्ं ध्येय ठेवल्यावर
तुम्ही व्यस्त राहू शकता.”

“तुम्ही म्हणता ते अगदी मला पटलं.”
अरविंदच सांगू लागला,
“माझे वडील डॉक्टर होते.एका मोठ्या हॉस्पिटलात ते काम करायचे.निरनीराळ्या रुग्णाबरोबर आणि त्यांच्या नातेवाईकांबरोबर त्यांचा दिवसभर संबंध यायचा.घरी आल्यावर खुसखुशीतपणे हंसून ते आम्हाला त्यांच्या गोष्टी सांगायचे.ते आपलं काम खूशीने करायचे हे उघड व्हायचं”

“मी तुला आणखी गंमत सांगतो”
असं म्हणत मी अरविंदला सांगीतलं,
“घरी येताना आनंदी चेहरा असल्यावर आपल्या जवळच्यांशी आपण आनंदात असतो हे सिद्ध होतं.तुमची घरची मंडळी, बायको-मुलं पहायला तुम्ही आतूर असता.दिवसभरात काय घडलं ते ऐकायला तुम्ही आतूर असता,मुलं शाळेत असतील तर त्यांच्या गृहपाठ करण्याच्या कामात मदत करायला तुम्हाला मजा येते,रात्री सर्वांबरोबर जेवायला आनंद होतो.थोडक्यात लयबद्द जीवन जगण्यात मजा येते.”

“ज्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर हंसं कमी व्हायला लागलं,ते त्यांना कळल्यावर, ते कामाचा भार वाढल्यामुळे तो कमी करण्याच्या प्रयत्नात राहिले.”
असं म्हणत त्याला त्याच्या लहानपणाची आठवण येऊन तो सांगू लागला,
“मी त्यावेळी किशोर वयात होतो.सकाळी,सकाळीच एमर्जन्सी कॉल आल्यावर त्यांना माझ्याबरोबर वेळ घालवायला कठीण जायचं. तसंच संध्याकाळीसुद्धा व्हायचं.ते म्हणायचे ,
“मला माहित आहे म्हणूनच मी असं करतोय”
माझे बाबा निवृत्त झाल्यावर त्यांचं रोजचं काम संपलं.आता त्यांची रोज हंसं चेहर्‍यावर आणण्याची कामगीरी संपुष्टात आली होती.पुढची काही वर्षं ते माझ्या आईबरोबर थोडी समाजसेवा करीत राहिले. वार्धक्याने अंथुरणावर पडून असलेल्या माझ्या आजोबांची सेवा करू लागले.आणि कधी कधी आजुबाजूच्या गावात जाऊन औषोध-पाण्याची मदत करू लागले.ते ह्या कामात गुंतल्याने पुन्हा थोडे हंसून कामं करू लागले.”

मी अरविंदला म्हणालो,
“तुझ्या बाबांचा उपदेश तू सैन्यात असताना कसा काय सांभाळू शकतोस.सैन्यातली ड्युटी म्हणजे दिवसाचे चोवीस तास काम.आणि तशात तू डॉक्टर मग काय विचारायलाच नको.”

“मी त्यांचा उपदेश लक्षात ठेवून रहायला लागलो.मी सैन्यात डॉक्टरकी करू लागलो.ते एक मला आव्हान होतं. आणि चेहर्‍यावर हंसू ठेवण्याचंही ते एक आव्हान होतं.मी सैन्यात सर्जन म्हणून असल्याने,रात्री,रात्री मला बोलावणं यायचं,दिवसा बाहेर मला काम करावं लागायचं.सैनिक रुग्णांची सेवाकरताना त्यांच्या जखमा पाहून बरेच वेळा मन खिन्न व्हायचं.तरीपण माझं काम ही एक अर्धी कामगिरी होती. माझ्या तीन सुंदर लहान मुली हे माझं विश्व होतं. काम संपताच त्यांचा सहवास मिळणार हे पाहून मन आतूर व्हायचं.घरी आल्याआल्या मला मिठीत घेऊन,
“बाबा,मी हे केलं मी ते केलं”
हे त्यांच्या तोंडून ऐकल्यावर माझा चेहरा हंसण्याने प्रफुल्लीत व्हायचा.”
असं सांगून अरविंद क्षणभर गप्प झाला.

मला भासलं की त्याला त्याच्या वडीलांची आठवण आली असावी. लहानपणी दवाखान्यातून त्याचे वडील घरी आल्यावर त्यांना मिठी मारून बोबड्या शब्दात तो जे काही सांगायचा ते मी पाहिलं आहे आणि ऐकलंही आहे. त्याचीच त्याला आठवण आली असावी.

त्याचा हात हातात घेत मी म्हणालो,
“मला वाटतं,आपल्या कामाच्या निवडीची,कामावर जाताना आणि कामावरून घरी येताना, जर का चेहर्‍यावर हंसू आणण्यात परिणिती झाली,तर आपलं जीवन समृद्ध,संपूर्ण,अर्थपूर्ण होतच शिवाय जीवनात मजा येते ती वेगळीच.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, July 2, 2010

लहान,लहान स्वप्नं.

“खरंच,तुझा हा अनुभव माझ्या नातीला सांगायला हवा. तिच्या वयावर नृत्य शिकायला तिला हुरूप येईल.”
मी प्रमीलेचा निरोप घेता घेता तिला म्हणालो.

माझी मुलगी आणि तिची मुलगी परदेशातून दोन,तीन महिने सुट्टी घेऊन माझ्या जवळ रहायला आली होती.माझ्या नातीचा सुरवातीचा वेळ मजेत गेला.नंतर तिला कंटाळा यायला लागला.तिला काही तरी व्याप द्यावा म्हणून माझी मुलगी मला म्हणाली,
“आपल्या शेजारच्या बिल्डींगमधे रोज वाद्यांचा आवाज येत असतो.नृत्य शिकण्याचा क्लास आहे असं वाटतं.कधी कधी तबल्या/डग्याचे बोल आणि घुंगूराचे आवाज पण ऐकायला येतात.आपण हिला थोडे दिवस नृत्य शिकायला नेऊया.”

मला तिची कल्पना आवडली.आम्ही त्या क्लासात गेलो.आणि माझ्या नातीचं नृत्य शिकण्यासाठी नाव घातलं.
एका मोठ्या बोर्डावर माजी विद्यार्थी/विद्यार्थिनींची नावं होती.प्रमीला सुखटणकर हे नाव वाचून,का कूणास ठाऊक,ती आपली पमी तर नव्हे ना? असं मनात आणून क्लासात चौकशी केली.आणि माझा अंदाज खरा ठरला.तिच्या पत्यावर मी तिला भेटायला गेलो.
तिच्या नृत्याबद्दलच्या अनुभवाचा माझ्या नातीला काही फायदा होईल हा पमीला भेटण्याचा माझा एक उद्देशही होता.

“नृत्य करायची मुळात आवड असल्याशिवाय केवळ शिकायचं म्हणून शिकण्यात अर्थ नाही. असं मला वाटतं.तुला काय वाटतं?
तू तर त्यात अनुभव घेतला आहेस.”
मी प्रमीलेला म्हणालो.

“लहानपणापासून माझ्या मोठमोठ्या स्वप्नांचा मागोवा घ्यायला मला आवडायचं.अशी स्वप्नं जी माझं जीवन प्रभावित करतील, माझ्या जीवनाला निश्चित अर्थ लावतील.”
पमी स्वारस्य घेऊन मला सांगायला लागली.
“पण माझ्या तीशीच्या वयातच माझ्या लक्षात आलं की लहान लहान स्वप्नं पण अनपेक्षीत आनंद आणून देतात.”

“पण काही कला लहानपणीच शिकायच्या असतात नव्हेतर शिकायची आवश्यकता असते असं मी ऐकलंय.”
मी पमीला म्हणालो.

“असंच काही नाही.माझंच उदाहरण तुम्हाला सांगते”
पमी सांगू लागली.
“असंच एक लहान स्वप्नं माझ्यासाठी जन्माला आलं जेव्हा मी आणि माझे आईवडील टीव्ही वर एक नाच-गाण्याचा कार्यक्रम बघत होतो.पार्श्व संगीताच्या वातावरणात,तसंच आकर्षक हालचाल, आणि चेहर्‍यावरच्या मुद्रा दाखवीत ती एव्हडीशी लहान मुलगी नृत्य करताना पाहून मीच मला रंगमंचावर सूरुचिपूर्ण ढंगात आणि सहजपणे नाचत आहे अशा क्ल्पनेत गुंगून गेली होती.
काही दिवस गेल्यावर मी माझ्या आईच्या खणपटीला लागले की,मला नृत्यकलेच्या क्लासात जायचं आहे आणि नाच शिकायचा आहे.”

“काय वय होतं तुझं?”
मी उतावीळ होत पमीला विचारलं.

“मी दहाएक वर्षाची असेन.
एका धंदेवाईक क्लासात मी आणि माझी आई दोघं गेलो.काऊंटरवर एक बाई गंभीर चेहरा करून बसली होती.
“दहा वर्षाची मुलगी? नाच शिकायला फार उशीर झाला.”
ती बाई कपाळावर आठ्या घालीत,नापसंती दाखवीत माझ्या आईला म्हणाली.
बरेच वेळा नाच शिकून सिनेमात नाचायला जाण्याचं कुणाचं तरी मोठं स्वप्न असतं ते मनात धरून माझं नाच शिकण्याचं लहानसं स्वप्न आहे ह्याचा गैरसमज करून घेत ती बाई म्हणाली असावी.”
पमीने सांगून टाकलं.

“दहा वर्षापेक्षाही लहान वयात नाच शिकायला जाणं ही अपेक्षा मला जरा अती आहे असं वाटतं”
माझं मत मी दिलं.

पमी म्हणाली,
“माझ्या त्या लहानपणातल्या दिवसात नृत्यकला ही काही शिकायचं म्हणून शिकायचं असं खूळ नव्ह्तं तर ती कला त्यावेळी माझ्या वयाच्या लहान मुलीना झपाटून टाकणारी होती.
सर्वांच्याच घरी मानलं जायचं की शास्त्रोक्त पद्धतिने आत्मसात केलेली नृत्यकला,त्यातले हावभाव,गीरक्या घेण्याची कला, पावलांची फतकट,ढोपरातून वाकून आणि हातांच्या कोपर्‍यातली बांक लक्षात ठेऊन अर्धनारीनटेश्वराची ढब, आणि अन्य कितीतरी शिकण्यासारखे प्रकार म्हणजेच मुक्ति मिळ्याल्यासारखी आणि अभिमान करण्यासारखी कामगिरी असायची.ते ज्याचं त्याचं स्वप्न असायचं.”

“मग तू तो विचार सोडून दिलास काय?”
मी पमीला आणखी बोलकं करण्यासाठी म्हणालो.

“छे,छे! मी कसली सोडून देते? माझं स्वप्न होतं ना?”
माझ्या प्रश्नाचा चांगलाच परिणाम पमीवर झाला,असं दिसलं.ती पूढे जाऊन म्हणाली.
“दुसर्‍या शनिवारी आमच्या शेजार्‍यांची मुलगी,माझी मैत्रीण,करिना आणि मी माझ्या आईबरोबर जवळच्याच बिल्डिंग मधे नृत्यकलेचा क्लास आहे असं समजल्यावर तिकडे गेलो.जवळ जवळ दोन एक महिने आम्हाला तेच तेच शिकवलं जायचं.मी तशी स्वभावाने उतावीळ असल्याने मला आणखी धडे घेत शिकत रहाण्यात स्वारस्य वाटेना.माझं नृत्य शिकण्याचं लहानसं स्वप्न अधूरंच राहिलं.

नंतर जवळ जवळ दोन दशकं मी माझी मोठी आणि महत्वाची स्वप्नं पूर्णत्वाला न्यायला मन केंद्रीत करीत राहिले. मी शाळा पूर्ण केली.कॉलेजमधून डीग्री घेतली.शहरात रहायला गेले.आणि संसार करायला पण सुरवात केली.फक्त माझ्या नृत्य शिकण्याच्या लहानश्या स्वपनाची कौतूक करण्यासारखी बाब म्हणजे टीव्हीवर नृत्याच्या होणार्‍या स्पर्धेच्या कार्यक्रमाला निष्टेने पहाण्याचा माझा सराव. मला अजून वाटायचं की नृत्यकरणं किती सुखदायी असतं,पण मी कदापी तो अनुभव घेऊन रंगमंचावर नाचेन हे शक्य नव्हतं.”

“मग तूझं स्वप्न पूर्ण केव्हा झालं?मोठ्या वयावर का?”
पमीला मला असं विचारावंच लागलं.

“अगदी बरोबर.मला हेच सांगायचं आहे की आंतरीक इच्छा प्रबळ असेल तर वय आड येत नाही.व्यवसाय म्हणून रंगमंचावर जाऊन नृत्य करण्याचं वय निघून गेलं तरी करमणूक म्हणून कुठच्याही वयावर रंगमंचावर जायला आणि नृत्य करायला कुणाचाही अटकाव नसतो.”
पमी आता मुद्याचं बोलायला लागली.

“एकदा माझ्या एका मैत्रीणीने मला लहान मुलांच्या नृत्याच्या स्पर्धेत प्रेक्षक म्हणून आमंत्रण दिलं.मी माझ्या लहान मुलीला घेऊन गेले होते.एक आजी शोभेल अशा वयाची बाई इतर लहान मुलांबरोबर स्पर्धा सुरू होण्यापूर्वीचा एक नृत्याचा भाग म्हणून नृत्य करीत होती.शरीराने एकशिवडी,केस पिकलेली,आजी, अगदी सहजगत्या नाचाचे निरनीराळे प्रकार करून दाखवीत होती.मी प्रेक्षकात बसली होती.मला तिचं नृत्य पाहून कौतूक वाटत होतं. आणि पुन्हा एकदा मझ्यात नृत्य करण्याचा आनंद प्रतीत होत होता.

समारंभ संपण्यापूर्वी तिच बाई रंगमंचावर येऊन मायक्रोफोनवरून बोलली,
“तुम्हाला कुणालाही नृत्याचं शिक्षण घ्यायचं असेल तर अर्ज भरा.पुढल्या शनिवारपासून नव्याने प्रारंभ होईल.नृत्य शिकायला कधीही आणि कुणालाही उशिर झाला असं मानू नका.”

मला त्यावेळी भास झाला की ती माझ्याच डोळ्यात डोळे घालून मलाच उद्देशून बोलत आहे.मी तिला मानलं.माझं लहानपणाचं लहानसं स्वप्नं साकार करायला सुद्धा उशिर झाला नव्हता.
काही आठवड्यांचे नृत्याचे धडे घेतल्यावर मला मुक्ति मिळाल्यासारखं वाटलं.माझ्या लहान स्वप्नाचा पाठपूरावा केल्याने मी सूखी झाले.”

“खरंच,तुझा हा अनुभव माझ्या नातीला सांगायला हवा. तिच्या वयावर नृत्य शिकायला तिला हुरूप येईल.”
मी प्रमीलेचा निरोप घेता घेता तिला म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com