Saturday, April 28, 2012

ग्वाही




त्या दिवशी सेंट्रल रेल्वेचा संध्याकाळच्या वेळी काहीतरी घोटाळा झाला होता.प्रथम गाड्या अर्धातास लेट चालत आहेत अशी अनौन्समेंट झाली आणि नंतर काही अनौन्समेंटच होईना.सीएसटी-व्हीटी-स्टेशनात शिरतानाच मी आत गर्दी पाहून अंदाज केला होता की काहीतरी गडबड आहे.


मला माझ्या मेहुणीच्या घरी ठाण्याला जायचं होतं.थोडा वेळ विचार केला आणि जरा जवळच्या बाकावर बसावं म्हणून बसायला गेलो तर माझ्या शेजारी ललित बसला होता हे मी चटकन ओळखलं.त्यानेही मला ओळखलं.


त्याने चटकन उठून मला अलिंगन दिलं.आणि म्हणाला,
"आजचं गाड्यांचं काही खरं नाही.आपण थोडावेळ बाहेर जाऊया आणि गप्पा मारूया."
मी चटकन होकार दिला.आणि समोरच्या केळकरांच्या हॉटेलमधे शिरलो.दोन कप चहा मागवून आमच्या गप्पा सुरू झाल्या.


ललित त्याच्या लहानपणी आमच्या समोरच्या बिल्डिंगमधे रहायचा.बरेच वेळा तो त्याच्या घरात सापडण्या ऐवजी त्यांच्या शेजारच्या घरात दिसायचा.चंद्रकात आणि शारदा मांढरे हे त्यांचे शेजारी होते.त्यांना एक मुलगी होती नाव मोगरा.तिला ललित मोगराअक्का म्हणायचा.

बर्‍याचश्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.गप्पांच्या ओघात मी त्याला विचारलं,
"तुझे ते मांढरे शेजारी कसे आहेत?"
इतका वेळ मजेत गप्पा मारणारा ललित जरा गप्प झालेला मला दिसला
ललितने मला पटकन उत्तर दिलं नाही.त्याला उत्तर देणं कठीण होत होतं असं मला दिसलं.


पण थोडावेळ थांबून मला म्हणाला,
"मला जे वाटत आहे ते मी ह्या क्षणी सांगत आहे.माझा आशेवर विश्वास आहे.आशा हे एक प्रकारचं इंजीन आहे जे जीवनाची गाडी गतीत ठेवीत असते.ती शरीरातली ज्योत आहे जी माणसाला कार्यरत ठेवीत असते.मला माहित आहे की हे मी माझ्यासाठी सांगत आहे.माझी कहाणी ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल की मी का असं म्हणतो."
ललितची ही प्रस्तावना ऐकून मी जरा संभ्रमात पडलो.मी त्याला म्हणालो,
"माझ्या प्रश्नाने तुला उत्तर द्यायला त्रास होत असेल तर नको सांगू"


"नाही, नाही तसं काही नाही.उलट तुम्ही प्रश्न केला ते बरंच झालं.मला जरा तुमच्याकडे ओघ घालवायला बरं वाटेल."
असं म्हणून पुढे सांगू लागला.


"माझ्या लहानपणी दोन व्यक्ती माझ्या जीवनात आल्या होत्या ज्यांनी मला सदैव प्रेरित केलं.त्याचवेळी मी ताडलं होतं की हे माझे जीवनभरचे मित्र रहातील.चंद्रकांत हे खरे पुरूष होते.ते विमानाचा पायलट होते.घरच्या कंप्युटरवर ते मला बरोबर घेऊन फ्लाईट सीम्युलेशनचे धडे घ्यायचे.त्यांची पत्नी,शारदा ही चांगली वकील होती.त्याशिवाय तिला बागेत काम करून निरनीराळी फुलं लावायचा छंद होता.माझे आईवडील कामात असताना हे माझं शेजारी युगूल मला नेहमी कामात व्यस्त ठेवायचं.


त्यावेळच्या माझ्या त्या जीवनात मला मस्त मजा यायची.पण एकेदिवशी मला मरण काय असतं ते कळलं.
त्याचं असं झालं की,तो शनिवारचा दिवस होता.मी आणि माझे बाबा टीव्हीवर एक चित्रपट पहात होतो.आणि आमच्या दारावरची घंटी वाजली.


दार उघडल्यावर आमच्या समोर एक माणूस उभा राहिलेला दिसला.तो एका वर्तमान पत्राचा रिपोर्टर होता.त्याच्याकडून कळलं की माझे हे शेजारी त्यांच्या एका मित्राबरोबर प्रवासात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात ही दोघं कालवश झाली.ती माझी बालपणातली मजेची आणि आनंदाची वर्षं आता माझ्या जवळ स्मृती म्हणून राहिली आहेत.


पण जसा काळ पुढे जात होता तशी नवी आशा निर्माण होत होती.चंद्रकांत आणि शारदेला एक मुलगी होती, मोगरा.अलीकडेच तिचं लग्न झाल्याचं मला कुणीतरी सांगीतलं.ती जरी दिल्लीला रहात असली तरी आपल्या आईवडीलांच्या दुःखद निधनानंतरही ती आम्हाला भेटायला यायची.अलीकडेच त्यांना एक मुलपण झालं आहे.तिचं नाव त्यांनी कमळ असं ठेवलं होतं.दिसायला खूपच गोड आणि दुडूदुडू धावणार्‍या कमळला बघून खूप मजा यायची.कमळ जसजशी मोठी होत गेली तशी ती एका नव्या पिढीची आशा ठरत होती.


मला एक जुनं गाणं आठवतं.त्याचं शिर्षक होतं "ग्वाही"
आशेचं तो एक रुपकालंकार होता.

ऐकता नवजाताचे रुदन
अथवा
पिंपळ पानाचे स्पंदन
अथवा
विशाल नीळे गगन
नकळत मिळे ग्वाही
अन
समृध्द होई जीवन

जीवनाचं सार ह्यातूनच प्रस्तुत व्हायचं.
माझ्या शेजारांची झालेली दुर्घटना ज्यावेळी माझ्या आठवणीत यायची त्यावेळी,कमळाकडून मला भविष्यातल्या आशेची आठवण करून दिली जायची.
दिवाळीतल्या गोड जिन्नसातल्या करंजीतल्या गोड सारणा सारखी ही कमळ मला वाटायची.


मोगराअक्काने आता आणखी एका बाळाला जन्म दिला आहे.
छोटीशी मुलगी झाली.तिचं नाव तिने आशा ठेवलं आहे.
काय हा जीवनातला जोश म्हणावा.
सूर्य उगवून नव्या दिवसाला जन्म देतो.मला वाटतं जग सुंदर आहे."
असं म्हणून ललित थोडावेळ गप्प राहिला.माझ्या प्रश्नाने त्याला मी जुन्या आठवणीचा उजाळा दिला असं मला वाटलं.कारण तो बराच भावनावश  झालेला मला दिसला.


मी म्हणालो,
"मला माहित आहे तू मांढरे कुटूंबियाना किती मानायचास ते.त्यांची अशी ट्रॅजडी ऐकून त्यावेळी तुला काय दुःख झालं असेल ह्याची कल्पनाही करवत नाही.एव्हडे तुझे त्यांचे संबंध होते.पण तू फारच सकारात्मक विचार करून तुझ्या आठवणीना विसर पाडत असावास.सॉरी हं.मी तुला डिस्टर्ब केलं."

"तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.माझा ओघ मी घालवला.अमंळ हलकं वाटतं."
मला ललित म्हणाला.आणखी हातावरच्या घड्याळाकडे पाहू लागला.


तेव्हड्यात हॉटेलात कुणीतरी बोलताना ऐकलं की गाड्या चालू झाल्या.आम्ही लगेचच उठलो आणि स्टेशेनकडे वळलो.मी मात्र ठाण्याला माझ्या मेव्हुणीकडे जाण्याच्या विचार बदला.अगोदरच उशीर झाला होता.मी दादर स्टेशनवर उतरलो आणि वेस्टर्न रेल्वे घेऊन अंधेरीला गेलो.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Tuesday, April 24, 2012

त्या मेघासम तू भासते.



राहून सामील सर्वांमद्धे
राहशी तू नामा वेगळी
केवळ माझ्याशीच नसून
राहशी स्वतःशीही आगळी


मान उंचावून नजर उठते
कुणासाठीही झुकत नसते
नासिकेतून श्वसन वाढते
कुणासाठी अडत नसते
काही केल्या जो थांबत नाही
त्या वार्‍यासम तू भासते


केशपाश तुझा लहरत राही
पदरा आड तो छपला जाई
ओठ तुझे हलकेच थरथरती
दाता खाली दबले जाती
कोसळेल वाटूनी जो बरसत नाही
त्या मेघासम तू भासते



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, April 20, 2012

सिनेस्थेसीया नावाची व्याधी


"फुलबागेत न फुललेलं
मी एक क्षुल्लक फूल आहे."


विश्राम मेढेकर माझा जूना शाळकरी मित्र.मला आठवतं तो लहानपणापासून छान कविता लिहायचा.त्याला शाळेत कवी विश्राम म्हणूनच संभोदायचे.
अलीकडेच मी त्याला दादर स्टेशनवर भेटलो होतो.गर्दीतच त्याने मला हाक मारली.तो चर्चगेटवरून येणार्‍या गाडीतून उतरला होता.मला म्हणाला,
"चल आपण बरेच दिवसानी भेटलो आहो, मामा काण्यांचा बटाटावडा खायला जाऊया.खूप दिवसानी भेटलास जरा लहानपणाच्या गप्पा मारायला मुड आला आहे."

मला कुणी आग्रह केला तर त्याचं मन मला मोडवत नाही.आम्ही एक एक कप गरम चहा आणि बटाटावडा मागवला. बटाट्यावड्याबरोबर लालबूंद सुकी चटणी मिळते ती मला खूप आवडते.मामा काण्यांचा मोठा मुलगा बापूसाहेब काणे माझ्या परिचयाचे आहेत.माझे tifr मधले सहकारी होते.बापूसाहेब सॉफ्टवेअर इंजीनीयर होते आणि मी हार्डवेअर इंजीनीयर होतो.

मी एकदा बापूसाहेब काण्यांना म्हणालो,
"बटाट्यावड्याबरोबर तुम्ही जी सुकी लाल रंगाची चटणी देता ती मला एकदम चटकदार वाटते.बरं,कधीही ती चटणी खाल्ली की तिची टेस्ट तीच असते.ह्याच गुपीत काय आहे.?"
मला बापूसाहेब म्हणाले,

"ते एक सिक्रेट आहे,कोका कोलाचा जसा फार्म्युला सिक्रेट आहे अगदी तसाच.पण तुम्हाला ते सिक्रेट उलगडून सांगतो.तुम्ही काही मला परकी नाही."
माझी गम्मत करीत ते म्हणाले.
बापूसाहेब पुढे म्हणाले,
"कांद्याची भजी देऊन संपल्यावर भांड्यात तळाला भज्याच्या खूप चूर रहातो.तो चूर एकत्र करून त्यात थोडी मिरचीपूड घालून, चवीला थोडं मिठ घालून झाल्यावर मग तो चूर एकजीव करून त्याचा सुकी चटणी म्हणून वापर केला जातो."
काहीही फुटक जाऊ न देण्याच्या आणि युक्त्या करून काटकसरीत धंदा करण्याच्या मराठी माणसाच्या वृत्तीचं कौतूक करावं असं वाटतं.

चहा घेता घेता मी विश्रामला विचारलं,
"अरे,तू लहानपणापासून छान कविता लिहायचास.सध्या त्या़ची हालत काय आहे.?"
मला विश्राम म्हणाला,
"हालत कसली सध्या हालच आहेत."
शाळेत असताना विश्राम आमच्या मराठी गुरूजीना फारच आवडायचा.त्यांना कवितेची एक दोन कडवी लिहून दाखवायचा.एखादी कविता त्यांना आवडली की ते वर्गात त्याला वाचून दाखवायला सांगायचे.आणि बक्षीस म्हणून त्याला नवी करकरीत लायन पेन्सिल द्यायचे.ह्या सर्व जून्या गोष्टींची विश्रामला मी आठवण करून दिली.
त्यावर तो मला म्हणाला,
"आम्हाला शाळेत मराठीचा विषय शिकवायला जे शिक्षक होते ते स्वतः कवी होते.त्यांनी आपला कविता-संग्रह छापला होता. त्यांना नेहमीच वाटायचं की आपल्या विद्यार्थ्यापैकी काहीनी तरी कविता लिहाव्यात.

हाय स्कूलमधे शिकत असताना मराठीच्या विषयाचे शिक्षक कविता कशी लिहावी ह्याची माहिती देत असताना बरीच मुलं ते शिकायला कंटाळा करायची.त्याचं मुख्य कारण असं की प्रचारात नसलेले आणि दुर्बोध असलेले शब्द आणि भाषेचं अवैध व्याक्रण वापरल्याने शब्दांच्या अर्थाला म्यानात टाकून ठेवल्यासारखं झाल्याने आणि त्या शब्दांचा कवितेत वापर करायला जोर आणला गेल्याने अलीकडच्या प्रचारात असलेल्या भाषेत समजायला ती कविता कठीण व्हायची.
कवितेमधे आनंद घेणार्‍या मला, कुसुमाग्रज सर्वांसाठी नाहीत, हे समजू शकतं.पण बर्‍याच लोकांचं मन कविता ह्या शब्दानेच पूर्वग्रहदुषित होत असतं.

परंतु आमच्या ह्या कवी-शिक्षकाचं तसं नव्हतं.ते स्वतःच कवी असल्याने आणि त्यांच्या कविता खूपच लोकप्रिय असल्याने त्यांची, कविता लिहायला शिकवण्याची तर्‍हा, मला इतकी आवडायची की कविता लिहायला आवड नसलेल्यांना स्फुर्ती यायची हे पण मी पाहिलेलं आहे."

विश्रामचं हे ऐकून मी त्याला म्हणालो,
""पाठ्य पुस्तकाच्या पानात छापली जाऊन बंदिस्त रहाण्यात कवितेचं अस्तित्व नसतं.मला वाटतं,कविता ही एखाद्या तुफानातून निर्माण झालेली असंबद्ध लय असते.आणि दुसर्‍या दिवशी पडणार्‍या पहाटेच्या दवबिंदूंच्या सुगंधाने दरवळलेल्या ओल्या झालेल्या माती सारखी असते.अशी ही माती आपल्या अवतिभोवती असते,फक्त आपल्याला ती उकरून पहायला हवी."

माझं म्हणणं विश्रामला पटलं.
मला म्हणाला,
"मला आठवतं मी लहान असताना संगीतातल्या मौजेचा आनंद कधीच घेतला नाही.त्या ऐवजी मी माझ्या आजोळी आमच्या घराच्या मागे असलेल्या रानात जाऊन पिंपळाच्या झाडाखाली बसून ती जादूभरी पानांची सळसळ आणि सरसराहट,पिंपळाच्या फोफावलेल्या फांद्यावर वार्‍याने डुलणारी पानं बघून उत्तेजीत व्ह्यायचो.मला रेडिओवरची गाणी कधीच आवडली नाहीत.का ते माहित नाही.हे मी मोठा होई तोपर्यंत कळलं नाही.त्याचं कारण शोधून काढायला मी जास्तीत जास्त प्रयत्न करीत असायचो.पण कविता मात्र लिहीत राहायचो."

"मग त्यात खंड कसा आला.मघाशी तू मला म्हणालास हालत कसली हाल आहेत त्याचं काय कारण?"
मी विश्रामला विचारलं.
मला म्हणाला,
"त्याचं असं झालं की,त्यानंतर माझे आजीआजोबा निर्वतेले.आणि मला माहित झालं की माझ्याकडून एक मुक करार लिहिला गेला असावा.त्या रानातला तो मंत्रमुग्ध करणारा आवाज माझ्याकडून कधीच ऐकला गेला जाणार नव्हता.

एकदा मला आठवतं,त्या रानातल्या संगीतासारखा आवाज माझ्या कानावर आला.इतराना तो आवाज एखादी बाजापेटी वाजवल्यासारखा वाटला असावा.पण माझ्या करीता तो आवाज विस्फोटीत होऊन जीवन आणि चैतन्य उफाळून आल्यासारखं वाटलं.त्यापूर्वी मला वाटत असायचं ते जीवन आणि चैतन्य माझ्या दैवाला मी समर्पीत केलं असावं.

ही काही डामडौल दाखवणारी उपमा नव्हती.खरंच मी माझे डोळे झाकल्यावर,मला सर्वतर्‍हेचे रंग माझ्या नजरेला विनम्रपणे लयीत नाचताना दिसायचे.हे असं काय होतंय ते मला कळेना.

मला सांगण्यात आलं की, सिनेस्थेसीया नावाची व्याधी मला झाली आहे.नसविद्या शास्त्रानुसार,मेंदूतल्या,उत्तेजीत करणार्‍या मार्गात आणि प्रतिसाद देणार्‍या, मार्गात होणारा संभ्रम,असं त्याचं विश्लेषण आहे. पण ज्या कुणाला हा माझ्या सारखा व्याधी झाला असेल त्यांना माहित असावं की संभ्रम मुळीच नसावा.संभ्रम सोडून दुसरं काही तरी असावं.मी ह्या गोष्टीवर माझं ध्यान देत राहिल्यावर मला दिसून आलं की हे काहीतरी दूसरच असावं.

काही आकडे रंगीबेरंगी दिसायचे.विशेषकरून दोन हा आकडा एखाद्या बुद्धिबळाच्या पटावर प्रत्येक चौकानात असून हा आकडा नीळा नीळा दिसायच. काही शब्द लालबूंद किंवा रानातल्या हिरव्यागार वनस्पतीच्या रंगा सारखे दिसायचे.
हे सर्व माझ्या विचाराचे संकेत व्हायचे आणि माझ्या आश्चर्याची भाषा व्हायची.त्यामुळे ह्याचा अर्थ समजून घ्यायला माझ्या जीवनातली ही एक पराकाष्टा समजायला हरकत नाही.

माझ्या वडीलांचा बदलीचा जॉब असल्याने आम्ही निरनीराळ्या शहरात जाऊन रहायचो. मित्रमंडळी,शाळा आणि आजुबाजूचा समाज माझ्यासाठी,जसे एखाद्या गाडीचे गिअर्स एकातून दुसर्‍यात बदलावेत तसं माझं घरचं जीवन आणि माझं वयक्तीक जीवन हेलकावत असायाचं. माझे हे विचार टप्याटप्यानेसुद्धा एकत्र येऊन स्पष्टीकरण देत नव्हते.पण ज्यावेळी माझ्या सभोवतालचं क्षणभंगूर जग आपला आकार घालवून बसायचं तेव्हा काही निश्चीत गोष्टींचं मला आकलन व्हायला लागलं.

दोनचा आकडा नेहमीच नीळा रंगाचा वाटायचा.आणि पांढरा,लालसर आणि करडा रंग वार्‍याची झोत आल्यावरखडबडीत दिसायचे.अगदी माझ्या आजोबांच्या घराच्या मागच्या रानात जसं मला व्ह्यायचं अगदी तसं व्हायचं.
त्यानंतर मी कविता लिहायचं सोडूनच दिलं.माझा सगळा वेळ व्यथेत आणि त्याच्यावर डॉक्टरी उपाय करण्यात जायला लागला.त्यामुळे कविता करण्याच्या मनस्थितीतच मी राहिलो नाही.नाही म्हटल्यास कधी कधी चार ओळी उस्फुर्त सुचायच्या. दिसेल त्या कागदाच्या चिटोर्‍यावर त्या ओळी लिहून ठेवायचो.
खिशातून एक कागदाचं चिटोरं काढून मला म्हणाला,
"आत्ताच बघ,गाडीत बसलो होतो अगदी खिडकीच्या जवळ.
थंडगार हवेच्या झोतीने माझं मन उल्हासित झालं आणि कवितेचं एक कडवं मला सुचलं.दादर येण्यापूर्वा मी कागदावर लिहित राहिलो.तुला वाचून दाखवतो."

फुलबागेत न फुललेलं
मी एक क्षुल्लक फूल आहे
कसं असलं तरी
बहरलेली मी एक भूल आहे
तू मला फुलवून स्वतःच
कां बरं विसरून गेलीस
अश्रू समजून तू मला
कां बरं ठिपकू दिलीस

विश्रामची ही कविता ऐकून माझं मन खूपच गहिवरलं.कवितेतून हा हे कुणाला उद्देशून बोलत आहे हे मला कळेना.आणि तसं त्याला विचारणं मला धजेना.एक मात्र खरं कुणालाही एक लेख लिहून समजवता येणार नाही ते एखादा कवी एकाद्या कडव्यातून सुचवू शकतो हे निश्चीत.
मी मामा काण्यांचं बिल दिलं.आणि विश्रामचा निरोप घेताना त्याला म्हणालो,
"ह्या कवितेवरून तुझी ती सिनेस्थेसीया नावाची व्याधी नक्कीच लुप्त झाली आहे.ह्या कवितेवरून तरी मला तसं वाटतं.तू एक काम कर हे एकच कडवं मला तू वाचून दाखवलंस.पण संपूर्ण कविता लिहिल्यावर मला ती तू इमेलने पाठवून दे."
माझा इमेल ऍड्रेस मी त्याला दिला आणि विश्रामचा निरोप घेतला.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com




Tuesday, April 17, 2012

"मला पुनर्जीवी करू नका"




माझ्या पत्नीला बरं नाही आणि ती सध्या सुधार सेंटरवर ट्रिटमेन्ट घेत आहे हे प्रो.देसायांना कुणीतरी सांगीतलं.गेल्या विक-एन्डला ते माझ्या घरी आले होते.प्रो.नेरूरकरही त्यांच्याबरोबर आले होते.
तिच्या आजाराची सर्व चौकशी करून झाल्यावर ह्या वयावरच्या समस्येविषयी चर्चा करीत असताना भाऊसाहेब मला आपल्या शेजार्‍याची गोष्ट सांगत होते.


त्यासाठीच ते हॉस्पिटलात परत जायला तयार नव्हते.
"यापुढे मी जरका पुन्हा पडलो तर मला तिथे नेऊ नका,नको ती ऍम्ब्युलन्स नको त्या रस्त्यात जातानाच्या घंट्या अन नको त्या शिट्या"
सत्याऐंशी वर्षाचे प्रो.देसायांचे शेजारी,रिटायर्ड प्रोफेसर आणि एकदा बायपास झालेले हे सदगृहस्थ त्यांना सांगत  हो्ते.


"मला पुनर्जीवि करू नका"
असं लिहिलेला एक फलक त्यांनी आपल्या गळ्यात घालून ठेवला आहे.आणि घरातल्या रेफ्रिजरेटरवरपण एक स्टिकर लावला आहे.तसंच आपल्या

डॉक्टरना आणि तिन मुलांना हा त्यांचा विचार सांगून,त्यांना आपल्याशी सहमत व्हायला लावलं आहे.
संपूर्ण समाधानकारक मरण येण्याबाबत कोण कुणाला हमी देऊ शकत नाही हे त्या गृहस्थाना चांगलंच माहित आहे.त्यासाठी तयारी करावी लागते,त्यावर चर्चा करावी लागते आणि कागद पत्रं तयार करून ठेवावी लागतात हे ही त्यांना पक्कं माहित आहे."


प्रो.नेरूरकर म्हणाले,
"मला वाटतं,इतरांनी ह्या, अती गंभीर आणि अगदी वयक्तिक,खासगी, विषयावर कसा निर्णय घ्यावा ह्याची चर्चासुद्धा तितकीच गंभीर आणि खाजगी आहे असं वाटतं.भावनीक आणि साम्पत्तीक किंमत काय असावी ह्याचा अंदाजसुद्धा तेव्हडाच गहन आहे.
असंही मला वाटतं."


मी माझं मत देताना म्हणालो,
"मरण पुढे ढकलण्य़ाच्या विचाराची काही वर्षांपूर्वी  कल्पनासुद्धा करणं कठीण होतं,ते आता आधूनीक औषध-उपचाराना शक्य झालं आहे.पण उत्तरोत्तर प्रकृती कमजोर होण्यात,व्याधी होण्यात,बुद्धिभ्रम होण्यात आणि सरतेशेवटी कसलेही उपाय करून घेण्यास असमर्थता आणण्यात आपण गुंतले जातो.
पण जरका आपण समजून उमजून निर्णय घेतल्यास कदाचीत सुयोग्य परिणाम होण्यात यशस्वी होऊ शकतो."


प्रो.देसाई आपल्या दोन जवळच्या नातेवाईकांची माहिती देताना म्हणाले,
"लिलाताईने योग्य विचार करून आपल्या शेवटच्या दिवसांचा ताबा घेतला.कुसूमने ह्याबाबतीत कसलाच विचार न करून आपल्या नातेवाईकांना विश्वासात न घेऊन स्वतःच्या जीवनाच्या समारोपाबद्दल ती गेल्यानंतरही इतराना क्षतीग्रस्त करून ठेवलं होतं."


प्रो.नेरूरकर आपल्या जवळच्या मित्राची माहिती देताना म्हणाले,
"गुरूनाथ ठाकूर ह्या प्रसिद्ध वकीलाला, आपल्या वडीलांच्या अखेरच्या इच्छा अगदी स्पष्ट आहेत अशा समजुतीने, भरवसा बाळगून राहिल्यानंतर त्यांच्या पश्चात निर्माण झालेल्या कायदेशीर अडचणीना तोंड द्यायला नाकीनऊ आले.ज्या गृहस्थाने त्यांना जन्म दिला त्याच्यासाठी त्यांची ही अवस्था झाली होती.
तुम्हाला कितीही वाटत असेल की,आय.सी.युमधे न जाता किंवा जीवनाच्या अंतीम काळाची अतीशय सोय करून केलेली आहे म्हणून सर्व काही सुक्षम होईल तर तो गैरसमज म्हटला पाहिजे.जाणकारांचं ह्यावर एकमत आहे."


"तुमच्या अखेरच्या जीवनाच्या निवडीच्या तयारीचा निर्देश, अगोदरच कागद पत्रातून,करून ठेवून तुमच्यासाठी एखाद्याची त्यासाठी नेमणूक करून जाहिर करावं.नाहीतर कदाचीत त्यावेळच्या आलेल्या परिस्थितीत तुम्हाला ते जमेल न जमेल.
त्यातही अगदी सर्व बाजूने विचार करून केलेल्या कागद पत्रात शेवटच्या क्षणी लागणार्‍या गोष्टी अगोदरपासून अपेक्षीत करता येत नसतात."
प्रो.देसाई असं सांगून पुढे म्हणाले,
"आदीपासूनचे निर्देश आवश्यक आहेत पण जीवनाच्या अंतीम क्षणी केले जाणारे निर्देश परिपूर्ण असतीलच असं नाही आणि नसावेतही.
सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जीवन जगण्यासाठी काय आवश्यक असतं.?"



माझा एक मित्र विकी सागर हा आपल्या पत्नीबद्दल एकदा मला सांगत होता ते मला आठवलं.मी म्हणालो,
"प्रिती सागरचे केस खूप लांब होते.पंजाबी लोकात वयस्कर झालं तरी बायका निटनेटक्या रहाण्याच्या प्रयत्नात असतात.प्रितीचं असंच म्हणणं होतं.ती म्हणायची,
"मला मरण समयी विस्कळीत आणि अव्यवस्थीत केशभार ठेवायचा नाही."
तिला झालेल्या ब्रेस्ट कॅनसरमुळे तिचा मरण समय जवळ आला होता.तिची फोर्थ स्टेज आली होती.त्यासाठी तिने आपल्या लहान बहिणीबरोबर ब्युटी-पार्लरमधे जाऊन खांद्यावर रूळतील एव्हडे केस कापून घेतले होते.
तिला ज्यावेळी कळलं की तिच्या कागद-पत्रावर आणखीन एक सही असण्याची जरूरी आहे.तिने आपल्या जवळच्या मैत्रीणीला बोलावून तिची सहीपण घेतली होती.तिच्या कागद-पत्रात कसलेही लूझ-एन्ड्स ठेवायचे नव्हते.तिच्या नवर्‍याची किंवा नातेवाईकांची मधेच अडवणूक व्हायला नको असं तिला वाटत होतं.



तिने आपले दागीने आणि इतर मौल्यवान वस्तु माझ्या ताब्यात दिल्या होत्या.एव्हडंच काय तर तिने आपलं मंगळसूत्रपण काढून ठेवलं होतं.ती म्हणायची,
"देवाला नक्कीच माहित आहे की मी अगदी सुखाने माझं लग्नाचं आयुष्य भोगलं आहे ते!"

अंतीम समय आल्यावर तिने तिला आवडत असणार्‍या रंगाची साडी नेसली होती.ठसठशीत कुंकू लावलं होतं.अंगावर पर्फ्युम लावून घेतलं होतं. आता ह्या सर्व आठवणी आमच्या जवळ राहिल्या आहेत." प्रितीचा नवरा,विकी,हे सर्व सांगत होता.


प्रो.देसाई म्हणाले,
"जीवनाचा शेवट,ह्या विषयावरची चर्चा करणं तसं कठीणच आहे परंतु,त्यावरचे कागद पत्र आणि फॉर्म्स प्राप्त करून घ्यायला सोपं आहे.आणि ते पेपर्स  मोफतही असतात.कुणा वकीलाची गरजही भासत नाही.

परंतु,ही कागद पत्रं रोगविषयक विकट समस्या उत्पन्न झाल्यानंतर येणार्‍या अगणीक प्रश्नांचं भाकीत सांगू शकत नाहीत.त्यामुळे आपल्या नातेवाईकांशी आणि आपल्या डॉक्टरशी चर्चा होणं आवश्यक आहेच त्याशिवाय त्यांना निर्णय घेण्यासाठी आपल्याकडून थोडीफार सवलत देणंही महत्वाचं आहे."

प्रो.नेरूरकरानां गुरूनाथ ठाकूरची त्यांच्या वडीलाबाबत कशी पंचाईत झाली ते सांगायचं होतं.
"मी तुम्हाला सांगू का?"
असा प्रश्न करीत सांगू लागले,
"गुरूनाथ ठाकूरांचं असंच झालं.त्यांच्या वडीलाना पार्किनसनची व्यथा होतीच त्याशिवाय हळुहळू वाढत जाणारा बुद्धिभ्रमही झाला होता.ते जास्त दिवस जगणार नाहीत असे दिवस आल्यानंतर त्यांना लाईफ-सपोर्टची गरज नव्हती असं त्यांच्या वडीलानी आपलं मत दिलं होतं.
पण ज्यावेळी त्यांना जेव्हा हृदयाचे अनियमित ठोके पडायला लागले तेव्हा गुरूनाथने डॉक्टरना अतीदक्ष उपाय द्यायला कबुली दिली.
गुरूनाथ म्हणतात,
"असं करण्याने माझ्या वडीलांच्या अंतीम इच्छेचं मी उल्लंघन तर केलं नाही ना? खरंच मला माहित नाही. हृदयाचे अनीयमीत ठोके पडण्याचा संभव आहे हे मला मुळीच माहित नव्हतं."
ते पुढे म्हणतात,
"ती अंतीम स्थिती नव्हती आणी तो लाईफ-सपोर्टही नव्हता.पण आता मात्र ते डबल असंयमी झाले होते.ते त्यांचं दुर्दैवी जीवन झालं होतं.मी त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कसलंच सहाय्य करीत नव्हतो."


हे ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
"आणि ह्याचमुळे आमचे शेजारी स्वतःच्या मरणाची जबाबदारी घेत आहेत.विलंब होणारं मरण त्यांना नको होतं.
अशी वीरता दाखवली नाही तर दुर्लभ साधनांचा दुरूपयोग होईल असं त्यांना वाटतं. आणि ह्यासाठीच
"मला पुनर्जीवी करू नका"
असा फलक ते स्वतःच्या गळ्यात घालून ठेवतात.ते जातील तिथे तो फलक त्यांच्याबरोबर असतो.
"मी सुखी जीवन जगलो आहे.आणि मी तसंच पुढल्या जन्मात जगेन."
असं ते म्हणतात.


"आम्ही तुमची पत्नी आजारी आहे म्हणून कसं काय चालंय ह्याची चौकशी करायला आलो आणि बोलता बोलता ह्या प्रसंगाला न शोभणार्‍या विषयाची
चर्चा करून तुम्हाला नाहक मनस्ताप तर दिला नाही ना?"
प्रो.देसाई मला म्हणाले.प्रो.नेरूरकरानीही मान डोलावून आपलं तेच म्हणणं आहे असं मला दर्शवलं.
मी त्यांना म्हणालो,
"सुधार सेंटरवर गेल्यावर मी जे पाहिलं ते ह्या चर्चेपेक्षाही गंभीर आहे.तुम्ही नक्कीच माझ्या ब्लॉगवर जाऊन "अंतरातल्या नाना कळा"
 ह्या मथळ्याखाली मी अकरा लेख क्रमशः लिहिले आहेत ते जरूर वाचा. आणि त्यानंतर "बंद दरवाजा" हाही माझा लेख वाचावा.तुम्हाला आखोदेखा हाल दिसेल."
"जरूर वाचूं"
असं सांगून दोघानीही माझा निरोप घेतला.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, April 13, 2012

बंद दरवाजा




"केल्याने होते रे!
अन,
पाहिल्याने समजते रे!"


मला नेहमीच वाटत असतं की,
"प्रत्येक दरवाजा जो बंद केला जातो त्याचवेळी दुसरा कुठलातरी दरवाजा उघडला जात असावा",
असा एक वाकप्रचार असायला हवा.


पुनर्सुधार सेंटरवर आल्यानंतर अनेक पेशंटना पाहून माझ्या मनात जो विचार आला तो विचार एक वाकप्रचार म्हणून ह्या वयस्कर झालेल्या आणि अपंग झालेल्या लोकांच्या समोर पुन्हा पुन्हा वापरला जावा असं वाटायला लागलं.
तात्पूरत्या उपचारासाठी आलेल्या लोकांविषयी मी म्हणत नाही.उपचारासाठी खूपच वेळ लागणार आहे त्या वृद्धांविषयी मी म्हणत आहे.


जीवनात अनेक दरवाजे कधी कधी मुद्दाम म्हणून तर कधी कधी नकळत भोळेपणाने बंद केले जातात.जीवनातले हे दरवाजे काहींच्या जीवनात वारंवार त्यांच्या तोंडासमोर धाडकन बंद केले जातात.त्यांचेच आईवडील,भाऊबहिणी,मित्रमंडळी त्यांच्याच समोर निर्वतले जात असताना किंवा त्यांच्या आयुष्यात ह्या लोकांचा सहभाग असतानाही असं होत असतं.काहींच्या आयुष्यात, अशा प्रकारची दुर्घटना किंवा मानसिक आघात,हा रोजचाच भाग झालेला असतो.


एकत्रीतपणे रहाणार्‍यांचं आणि दरवाजा बंद करायला उभे असलेल्यांचं एकमत होण्यासाठी क्वचितच हा दरवाजा सताड उघडा ठेवला गेलेला दिसेल.एकत्र कुटूंब स्थीर असणं हे काही लोकांच्या जीवनात क्वचितच होत असतं.बरेच लोक हा प्रकार स्थीर असावा म्हणून फारच उत्सुक्त असतात.


मी, ह्या सेंटरवर असणार्‍यांच्या म्हणण्याचा आढावा घेत असताना,माझ्या नजरेतून एक गोष्ट निसटून गेली नाही की,त्यांच्या रूममधे कुटूंबातल्या लोकांचे हवे तेव्हडे फोटो त्या कुटूंबात ते होते त्यांची आठवण म्हणू टांगलेले दिसायचे. आपल्या कुटूंबियाना अलिंगनात घेऊन काढलेल्या फोटोत दिसणारी माणसं त्यांच्या जीवनात कालांतराने आपआपल्या मार्गाने गेलेली असतात.


दरवाजा बंद करण्यासाठी उभ्या असलेल्या हा नातेवाईकांशी गुंथून राहिलेल्या ह्या अभागी लोकांचा दरवाजा उघडा झाल्यावर समोर दिसणारा मार्ग भावूकपणे रहाण्याची कल्पना देतो.पण ह्या दरवाजातून दिसणारा मार्ग नेहमीच तुम्हाला वाटत असाव्यात त्या भावूक कल्पनेंचा नसतो. उलटपक्षी काहीसा,रोष,नाराजी,दुःख,अपराध आणि परित्यक्तता ह्या गोष्टीपण दाखवणारा असतो.ह्या सर्व भावना सामान्यतः प्रदर्शीत करताना ह्या लोकांना मी पाहिलं आहे.


सरतेशेवटी,आपण अशा दरवाज्यापाशी येतो,की जो वृद्धावस्थेशी जुळता मिळता असतो.असला हा दरवाजा  आठवणी सांगत असताना, त्या आठवणीत कटुता आणि मधुरता ह्याचं मिश्रण असतं असं प्रदर्शीत केलं जातं. हास्य-विनोद भरून असलेल्या,जेवणानंतर एखाद्या मधूर पदार्थांच्या थाळीने भरलेल्या,रात्री मागून रात्री झोप आणणारे,प्रेमाचे कडेकोट
बांधून मजबूत झालेल्या, अशा प्रकारच्या आठवणी वृद्धावस्थेत यायला हव्यात. परंतु,ह्या सुधार सेंटरवर मी अवलोकन केलेल्या  वृद्धावस्थेतला आनंदोत्सव दाखवणार्‍या बहारदार आठवणी मुळीच दिसत नाहीत.त्यांच्या आठवणी, वर्षानूवर्षाच्या  मनोव्यथेमुळे लवकर आलेलं वृद्धत्व चित्रीत करणार्‍या असतात.


 ज्या तर्‍हेने ते वयाने वृद्ध होत असतात त्या तर्‍हेने रहाण्या ऐवजी  हे लोक बरेचकरून जास्त वयस्कर भासू लागतात.इतर काही नशिबवान वृद्धांसारखं आनंदाने मश्गुल रहाण्या ऐवजी जीवनातला हा वास्तविक अध्याय आहे असं समजून ते रहात असतात.


प्रत्येक वाईट गोष्टीची चांगली गोष्टपण पीच्छा करीत असते.म्हणूनच एक दरवाजा बंद होत असताना दुसरा उघडला जातो.संधी घेण्यामधे मला विशेष वाटतं.प्रत्येक व्यक्तीला जीवनात यश मिळण्यासाठी समसमान संधी मिळायला हवी.


मला वाटतं,खडतर आयुष्य जगत असताना,वृद्धत्व आल्यावरही,मनोव्यथेतून,वेदनेतून,दुखावल्या गेलेल्या परिस्थितीतून जाताना त्यांना जे काही क्लेश झाले असतील त्यातूनही वर येण्याची क्षमता त्यांच्या अंगात असते.आपल्याला कुणीतरी मानावं ह्या मनस्थितीत ते असतात.


एखाद्याला दुःख झालं असताना त्याचा हात हातात घेऊन रहायला एखाद्याला का वाटावं?एखाद्याला दुखापत झाली असताना दुसरा सहज प्रवृति म्हणून त्याला आपल्याजवळ ओढून घेतो,त्याला भिडून बसतो,त्याला मिठीत घेतो.
जेव्हा मी लहान होतो तेव्हा, यदा कदाचीत चालताना पडून माझ्या गुडघ्याला खरचटलं गेलं की, माझी आई लगेचच मला जवळ घेऊन माझ्या खरचटलेल्या जागेची पापी घेऊन फुंकर घालून म्हणायची,
"पटकन बरं होवो"
एखाद्याची ही अगदी साधी कृती,छोटसं प्रेम दाखवून जाते आणि होणार्‍या वेदना त्यामुळे निवळून जातात.लोकाना स्पर्श हवा असतो.जरी तसं आजुबाजूला दिसलं नाही तरी त्याची जरूरी असते.एखादा सहज झालेला स्पर्श एखाद्याला जीवनभर सुखी करू शकतो.स्पर्श हा एखाद्या ठिणगी सारखा असून कुणाच्याही जीवनात भडका पेटवून देऊ शकतो. म्हणूच मला स्पर्शाच्या क्षमतेविषयी खास वाटत असतं.



माझी भावना अशी आहे की,प्रत्येक वृद्धाला आपलं कुटूंब असण्याची पात्रता असते.तसंच मला वाटतं की त्याला ह्या वयात स्वतःहून
जगाला सामोरं जावं लागू नये. खरोखरचं प्रेम आणि दया याचा अर्थ काय असतो ते समजायला ते पात्र असतात.शेवटी मला असंही वाटतं की,प्रत्येक वृद्ध, मोठं आणि सुंदर, स्वप्न पहाण्याच्या संधीला पात्र असतो.
उरलेलं आयुष्य जगताना,आशा आणि अनुभव समजून घ्यायला पात्र असतो.


ह्या सुधार सेंटरवर, माझ्या पत्नीच्या कारणाने मी आल्याने,आणि ते केंद्र ह्या लोकांना देत असलेल्या सेवेचा विचार करून मला वाटायला लागलं आहे की,हे केंद्र ह्या वृद्धांसाठी एक संकेतदीप झाला आहे.कारण प्रत्येक दरवाजा बंद झाल्यावर हा दुसरा दरवाजा अशा लोकांसाठी उघडला जातो.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

   

Monday, April 9, 2012

अंतरातल्या नाना कळा...११





"जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामील
जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफील"


आज सकाळीच मी सुधार सेंटरवर आलो.आज पत्नीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मिटिंग घेतली जाणार होती.मुलांनी आपल्या दुपारच्या सुट्टीत मिटिंगसाठी सेंटरवर यायचं ठरवलं होतं.आम्ही दोघं आणि आमची मुलं आणि सेंटरकडून सोशल वर्कर,फि.थे.चा एक्सपर्ट आणि नर्सिंगची हेड असे सर्व जमलो होतो.


सोशल वर्कर बाईने पत्नीच्या देखभालीची माहिती दिली.आणि तिच्याकडून मिळणार्‍या प्रतिसादाबद्दल सांगीतलं.ह्या बाबतीत ती बाई पत्नीवर खूश होती आणि तिला लवकर आराम मिळो अशी शुभेच्छा तिने दिली.


नर्सिंगच्या बाईने पत्नीला दिल्या जात असलेल्या औषधपाण्याची कल्पना दिली आणि शरीराच्या जरूरीच्या मोजमापाची-ब्लडशुगर,ब्लडप्रेशर वगैरे-समाधानकारक होत असलेली माहिती दिली.


फि.थे.च्या व्यक्तीने पत्नीच्या निरनीराळ्या अवयाच्या -हात पाय,कंबर वगैरेत व्यायामातून होत जाणारी प्रगति आणि त्यांचं मोजमाप किती समाधानकारक आहे ते सांगीतलं.


सुधार सेंटरचे हे लोक अशा निर्णयाला आले की असंच चाललं तर एप्रिलच्या अखेरीपर्यंत पत्नी वॉकर घेऊन स्वतंत्र पणे आपल्या पायावर चालेल.आम्हा सर्वांना हे ऐकून उमेद आली आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपआपल्या परिने काम करायचं ठरवलं.


मला राहून राहून ह्या मिटिंग नंतर प्रो.देसाय़ांची आठवण आली ते म्हणायचे,

"प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हायला हवी असल्यास त्यासाठी कष्ट आणि पीडा सहन करून किंमत मोजावी लागते.तसंच,ती आपल्याला हितकारक होण्यासाठी प्रेमाला अग्रेसर भुमिका द्यावी लागते..मला वाटतं, माझ्या काय किंवा आणखी कुणाच्या काय आपल्या धर्मामधूनच ही शिकवणूक मिळत असते."


मिटींग संपल्यावर माझी मुलं आपल्या कामाला गेली.जाताना त्यांनी आपल्या आईला भरपूर भरवसा दिला.
प्रेमाने अलिंगन दिलं.तिच्या डोळ्यात टपकणारे अश्रू आपल्या बोटांनी फुसले.
मी फक्त एव्हडंच म्हणालो,
"हे ही दिवस जातील"
तेव्हड्यात कुणीतरी शिंकलं.
माझी पत्नी लगेचच म्हणाली,
"ब्लेस यू"
असे वाकप्रचार वापरायची तिला आता इथे राहून सवय झाली होती.
माझी पत्नी व्हिलचेअर ढकलत आणि मी तिच्याबरोबर तिला सहाय्य देत तिच्याच सात नंबरच्या रूममधे आलो.
नर्सिस आणि त्यांच्या मदतनीसने येऊन पत्नीला तिच्या बिछान्यावर पडायला मदत केली.दोन तीन तासाची विश्रांती देऊन परत तिला उठवायला हा स्टाफ येतो.तिने सतत झोपून राहू नये हा त्यांचा उद्देश असतो.


ती लगेचच झोपी गेली.सकाळचा व्यायाम आणि दुपारच्या मिटिंगमुळे तिच्या जीवाला श्रम झाल्यासारखं वाटणं सहाजिक होतं.मीही तिच्या बेड जवळच खूर्चीवर बसलो होतो.मलाही थोडीशी डुलकी लागली.


मी लिहिलेल्या जून्या कवितेची कडवं माझ्या मनात एका मागून एक येऊ लागली.ही कविता थोड्याफार प्रमाणात ह्या प्रसंगाला लागू होत आहे असं मला वाटत राहिलं.

जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामील
जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफील

हे अंबर हे मेघ हे रस्ते हा वारा
हर एक गोष्ट घेते अपुल्या जागी निवारा
काढले अनेक दिवस नाराज होऊनी जगाशी
जीवन भासे यात्रा अन देवी तू मंदिरातील
जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफील


हर एक फुल महकते आठव तुझी देऊन
तुझ्या आठवानी जाते फुलबाग बहरून
हे तुळशी वृंदावन की प्रीतिचे ठिकाण
तू जवळ अथवा दूर असूनी आहेस काबील
जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामील


हर एक शय्या झगमगे प्रीतिच्या किरणानी
ही झगमग पाहूनी नको आशा अधूरी जीवनी
जीवन यात्रेत असते सहयात्रीची जरूरी
यात्रा एकाकी करील माझे जीवन मुष्कील
जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफील



यानंतर अधुनमधून



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishna@gmail.com

Wednesday, April 4, 2012

अंतरातल्या नाना कळा...१०



"सांजवेळी आली आठव सजणीची
हिच खरी समस्या असे जीवनाची"


१४ मार्च २०१२.
आज सुधार सेंटरवर येऊन एक आठवडा संपला. आज दुसर्‍या आठवड्याचा गुरवारचा दिवस.काल बुधवारी मी पत्नीकडे गेलो नव्हतो.माझी मुलं माझीही काळजी करायला लागली होती.दगदग होऊन मलाच जर का काही झालं तर त्यांची आणखी जबाबदारी वाढायची.फुर्ती,स्पुर्ती जरी माझ्या अंगात ह्या वयावर असली तरी वय साथ देईल असं नाही.म्हणून मलाही त्यांनी विश्रांती घ्यायला लावली.आणि मी ज्या दिवशी सुधार सेंटर जात नसायचो त्या दिवशी मुलं आळीपाळीने आपल्या आईला भेटून यायची.आणि मला संपर्कात ठेवायची.मला अजून चालायला काठी वगैरे लागत नाही.पण काठी हे झालं शरीराच्या गरजेचं.पण मनालाही काठीचा आधार लागत असावा. मला न समजणारी मनाला लागणारी काठीच जणू माझ्या मुलांनी मला द्यायला सुरवात केली.
हे लक्षात येऊन माझ्या एका कवितेतल्या ओळी मला आठ्वल्या,


थरारे मानेचा भार
सोसेना वेदना फार
मुलांनी जवळ रहायचे
काळजी वाचून जगायचे


एक दिवसाची सुट्टी घेऊन मी ज्यावेळी माझ्या पत्नीला भेटायला जातो आणि तिला सांगतो आज सबंध दिवसभर मी तुला संगत देणार ते ऐकून ती खूपच खूश असते.मला ते जाणवतं.माझ्या पत्नीची दुसर्‍या कुणाकडूनही सेवा करून घ्यायची कल्पनाही मला सहन होत नाही.हा आजार येण्यापूर्वी गेली कित्येक वर्षं मी तिच्या बरोबर सावली सारखा राहिलो आहे.जिने आपल्याला ह्या जगात गेली त्रेपन्न वर्षं सहवास दिला,ती स्वतः अशा असाह्य परिस्थितीत असताना मला जीवनात दुसरी कसलीही मजा आनंद देऊ शकणार नाही.


जेव्हा माणूस आपल्या जवळच्या माणसाची देखभाल करताना ते काम आहे असं समजून देखभाल करतो,त्यावेळी तो चिडचीडाही होऊ शकतो.पण तीच देखभाल तो सेवा म्हणून करतो त्यावेळेला तो मनोभावे काम करतो.असा माझा अनुभव आहे.


खरं म्हणजे ह्या सुधार सेंटरवर माझ्याकडून तिची कसलीच शारीरिक सेवा होत नाही.सर्वच्या सर्व सेंटरवरच्या नर्सिस आणि इतर लोक करीत असतात.पण का कुणास ठाउक  मी तिच्या सहवासात राहिल्याने नकळत तिच्या मनाला माझ्याकडून धीर दिला जातो हा पण सेवेतला एक प्रकार आहे असं माझ्या मनात येऊन मला बरं वाटतं.


आज  मी तिच्या नकळत फि.थे.लॅबमधे जाऊन तिच्या व्यायामाचं निरक्षण करीत होतो.आज तिच्या पॅर्ललबारवरच्या चालीची प्रगती मला चांगली दिसली.तिचा व्यायाम घेणारेही आशापूर्ण होते.व्हिलचेअरवर तिला बसवून स्वतः तीने चेअर कशी चालवायची ह्याबद्दल मी तिला मदत करीत होतो.तिला उमेदही येत होती.


ज्या खडतर परिस्थितीतून माझी पत्नी जात आहे ते पाहून,आणि तिचं दुःख हलकं करण्यात केले जाणारे उपाय उपयुक्त होत आहे ते पाहून माझ्या लक्षात एक गोष्ट आली की जीवन म्हणजेच एक परिवर्तन आहे.जीवन असंच चालत रहाणार.जीवनात कसलंच आश्चर्य नसणार अशा समजुतीवर रहाणं ह्या विचाराने माझं मन सुन्न होतं.जीवनात परिवर्तन येत राहिल्याने ते जगावं असं वाटतं.उत्कंठा प्रबल होते.अन्यायाशी दोन हात करता येतात.निरुत्साहावर उपाय साधता येतो.सरतेशेवटी जीवनात येणार्‍या परिवर्तनाने जो भारदारपणा येतो त्याच्याविना रहाण्याची कल्पनाच करवत नाही.येणारा प्रत्येक नवा दिवस, नवीन अनुभव,नव्यांची भेट,अनपेक्षीत सुख,आकस्मिक दुर्भाग्य घटना, अश्या गोष्टी आणतो.


येत्या सोमवारी म्हणजे १९ मार्चला सुधार सेंटरच्या लोकांशी आम्हा जवळच्या कुटूंबियाबरोबर माझ्या पत्नीच्या प्रगतिचा आढावा घेण्यासाठी मिटिंग आहे.पुढल्या आठवड्यात तिला वॉकर देऊन चालायची सवय करणार आहेत.


आज विकएन्ड असल्याने मी,माझे जावई आणि माझी मुलगी संध्याकाळी सुधार सेंटरवर पत्नीला आमची कंपनी देणार आहो.माझा मुलगा आणि माझी सुन सकाळपासूनच तिच्या जवळ आहे्त.तिला घराची आठवण येते आणि सेंटरवर अधुनमधून कंटाळा येतो.पण काय करणार? अंधारी रात्र संपल्यावरच दिवसाचा उजेड दिसणार.


दिवस जूने भुलायचे
काळजी वाचून जगायचे
स्वपनात मश्गूल होणें
सुखाची अपेक्षा करणे
सुखात दिवस काढायचे
काळजी वाचून जगायचे

झोपण्या सुंदर खोली
उबदार अंगावर शाली
श्वासात जीवन वेचायचे
काळजी वाचून जगायचे


क्रमशः



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com