Tuesday, September 30, 2008

का न्याहाळसी मला लज्जीत होऊनी

नयनातून माझ्या अश्रू टिप टिप ओघळती
सांगू कुणा हे साजणा! तुझी नसता संगती

का न्याहाळसी मला लज्जीत होऊनी
हाती नसे माझ्या काही आहे हतबल मी
दे इथेच मला तुझ्या शुभेच्छा
नाही राहिल्या कसल्याही इच्छा
वाटे जावे मरूनी
का न्याहाळसी मला लज्जीत होऊनी

प्रीतिची लज्जत तुझ्याच हाती सजणा रे!
ये भेटाया मज सत्वरी तुला मी विनवीते
जाई दिनकर मावळूनी
का न्याहाळसी मला लज्जीत होऊनी



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, September 28, 2008

आमचे अविवाहित स्नेही श्रीयुत अंत्या अंतरकर

मी माझ्या एका अविवाहीत स्नेह्याना म्हणालो,समजा क्षणभर आपण विवाहित आहात असं समजू.
आपल्याला सुंदर,सुलक्षणी,सुस्वभावी,सुगृहिणी,सुदृढ,समाधान पत्नी असती तर तिच्या सहवासात राहून,आपल्या बेफिकीर, बेफाम,बेसुमार,बेधडक,बेपर्वाई,बेभान,बेलगाम, वृत्तिला थोडा आळा बसला असता.
आपण लग्न बंधनात एकदाचे पडल्याने आपल्या आईला पण सुटकेचा निश्वास देता आला असता.
आपल्याला एक दोन मुलगे आणि एक दोन मुली असत्या तर एखाद्दा मुलाने आपल्यात असलेले संगीताचे कौशल्य आत्मसात करून आपला वारसा कायम ठेवला असता.दुसर्‍याने आपला व्यवसायाचा अभ्यास करून आपल्याला हातभार लावला असता.
मुलीने आपल्या सुंदर गळ्याचा वारसा घेऊन प्रख्यात गायीका झाली असती.
आपण अमक्या अमक्याची मुलं का?असं विचारणार्‍याला त्या मुलानी होय! म्हणून छाती फुगवून सांगितलं असतं.
आपण पण होय मी त्यांचा पिता आणि मला त्यांच्या बद्दल अभिमान आणि समाधान आहे.असं म्हटलं असतं.
एव्हड्या संस्कारीत कुटुंबात एकमेकानी एकमेकाची काळजी घेतली असती.
आणि इतरानी आपल्या वृद्धापकाळात आपल्याकडे बोट दाखवून
“वृद्धत्व हे वरदान कसं हे ह्यानाच विचारा”
असं सांगितलं असतं.
मी हे सर्व सांगत असताना आमचे स्नेही ऐकण्यात तल्लीन झाले होते.मला म्हणाले,
“अरे हो खरंच! मी असा कधीच विचार केला नाही.जगात आणि आजूबाजूला काय चालंय,वृद्धत्व आल्यावर त्यांचे कसे हाल होतात हेच चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं.आणि मी लग्नच केलं नाही हे मला बरं वाटत होतं.”
मी म्हणालो,
“काही हरकत नाही.झालं ते होऊन गेलं.आपण समजू कदाचीत ते विधीलिखीत होतं.पण लग्नच न करण्याचं जाणून बुजून जर प्रत्येकाने केलं तर हे जग पुढे कसं जाणार?निर्मिती कशी होणार?एका पिढीतून दुसर्‍या पिढीत वारसा कसा जाणार? ज्ञानाचा फैलाव कसा होणार?
श्री.पेठकरजी काय म्हणतात बघा,त्यानी तर खूपच लिहिलंय पण थोडक्यात असं,ते म्हणतात,
“वृद्धापकाळातील सुख दुःखाची मुळं तारुण्यात असतात.भावनेच्या आहारी न जाता, व्यवहारी वृत्तीने काही गुंतवणूक संपूर्णपणे स्वतःच्या नांवावर, जमल्यास मुलांना अंघारात ठेवून करावी.तसेच आजारपणाचा स्वतःचा आणि पत्नीचा विमा असावा. भावनिक पातळीवर, ‘प्रेम करावे म्हणजे प्रेम मिळते’ .
दुधापेक्षा साय जास्त महत्त्वाची, मुद्दलापेक्षा व्याज अधिक प्रिय. ही नातवंड आपली असली तरी ती ‘दुसर्‍यांची’ मुलं आहेत हे विसरू नये. ‘
मुलांनी म्हातार्‍या आईवडीलांचा मान राखावा. त्यांनी त्यांच्या काळात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला वाढवलं आहे हे विसरू नये.दोघांनीही लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे ‘शब्द’ हे शस्त्र आहे. सांभाळून वापरावे.
अशा प्रकारे सर्व पक्षांनी आपापले कार्य, स्वार्थ आणि गर्व विसरून, केले तर वृद्धापकाळ हा शाप ठरणार नाही.”
मी माझ्या स्नेह्यांना म्हणालो,
“माझं पण आपल्याला एक सांगणं आहे.
प्रेम आणि त्याग ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.आणि समजूतदारपणाच्या धातूने ते बनले आहे.आणि ते नक्कीच खणखणून वाजते.ह्या तिन्ही गोष्टीत जरा सुद्धा कमतरता आली की ते नाणं खणखणून वाजणार नाही.अशी सर्व खणखणीत नाणी कुटुंबात असली तर त्या कुटुंबाचा खजिना खणखणत्या नाण्यानी भरलेला असणार.एव्हडी परफेक्ट टांकसाळ असल्यावर काय बिशाद लागली आहे,
“वृद्धत्वाला शाप ठरायला?”
माझ्या स्नेह्यांच्या लक्षात आलं आणि ते त्यांच्या आवडत्या शैलित मला म्हणाले,
“च्याआयला! प्रत्येक वादाला दोन बाजू असतात हे माझ्या लक्षातच आलं नाही.घोड्याचा चष्मा लाऊन मी एकाच बाजूला बघत होतो.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, September 26, 2008

हे वेड माझे सांग रे! साजणा

झाली जर प्रीति तुजवरती
राहूनी बाहुपाशात तुझ्या
निद्रेत जाईन मी सत्वरी
हे वेड माझे सांग रे! साजणा
कमी कसे होईल याउप्परी

सांगती ह्या नशाधुंद नजरा
अन फूलांचे ते ताटवे
क्षण एक ही घालवू कसे
तुझ्या विना रे! एकटे
सारीच प्रीत उधळून तुजवरी
जादू करूनी जाईन तुजवरी
विसरूनी ती सर्व संकटे

क्षण ते पळ ते जाईन
स्वपना सम विसरून
परतव माझी सारी स्मृती
मलाच तू फिरून
जाईन दूर तुझ्या दुनियेतून
स्मरूनी तुला मन जाईल क्षीणून
हे वेड माझे सांग रे! साजणा
कमी कसे होईल याउप्परी



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, September 24, 2008

प्रो.देसायांबरोबर Q & A

काल माझी प्रो.देसायांबरोबर Q & A ची जुगलबंदी झाली.मी त्याना पहिला प्रेश्न विचारला,
“भाऊसाहेब मनात कल्पना निर्माण करायला आपल्या अंगात कोणते गूण असायला हवेत?”
ते म्हणाले,
“तुम्ही हा चांगला प्रश्न विचारलात.मी ह्या विषयावर पुर्वी माझ्या क्लासमधे सवित्स्रर लेक्चर पण दिलं होतं.पण आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मनात कल्पना निर्माण व्हायला आश्चर्य,मनातला संदेह आणि कसल्यातरी विषयाचं वेड असणं ह्या तीन गुणाची प्रथम आवश्यक्यता आहे.तसंच मनाची व्याकुळता आणि सदाची असमाधानी वृत्ति असणं हे पण आवश्यक आहे.”
हे ऐकून मी त्यांना पुढे म्हणालो,
“पण भाऊसाहेब,कल्पना आल्यानंतर त्याला मुर्तस्वरूप द्यायला भावना नकोत कां?”
प्रो.देसाई हंसून म्हणाले,
” भावना नाही तर आयुष्य कसलं?नुसत्याच भावना असून चालणार नाही तर त्या भावना प्रखर असाव्या लागतात.आणि तसं व्हायला आपल्याला भरपूर अनुभव असावा लागतो, आणि जर का आपल्याकडून आयुष्यात काही हाल अपेष्टा भोगल्या गेल्या असतील तरच त्यामुळे भावना प्रखर होतात.प्रखरता कमी झालेल्या भावना कधीच कामाला येत नाहीत.”
मी त्याना म्हणालो,
“मी पाहिलंय,की काही माणसं निराळ्याच जगात राहिल्या सारखी वागत असतात.ह्याचं कारण काय असावं?”
थोडा विचार करून भाऊसाहेब म्हणाले,
“एखाद्दा गोष्टीचं वेड लाऊन घेण्याचा ज्यांचा स्वभाव असतो,आणि ज्यांच्या मनात सतत प्रश्न असतात,
ते असे वागतात.आणि मुख्य म्हणजे ते त्यांच्या हृदय आणि मनाशी सारखेच बांधलेले असतात.”

मी दुसरा प्रश्न विचारण्या पुर्वीच प्रो.देसाई म्हणाले,
“असे लोक ज्ञानी असतात.पण नुसतं ज्ञान असून चालणार नाही.त्याला शिस्तीची पण जोड हवी. नाहीतर एखाद्दाच्या अंगात उत्साह आणि कुवत असते आणि अशावेळी तो जर प्रबळ झाला तर त्याला त्या प्रबलतेची किंमत मोजावी लागते”
असं म्हणून ते माझ्याकडे जरा कुतुहलतेने बघत राहिले.
ते पाहून मी भाऊसाहेबाना म्हणालो,
“किंमत मोजावी लागते म्हणजे एकझॅक्टली तुम्हाला काय म्हणायचं आहे?”

“मला माहित होतं तुम्ही हा प्रश्न मला करणार म्हणून.”
असं म्हणून मग मिष्कील हंसून लगेचच म्हणाले,
” ही किंमत अशा व्यक्तिला व्यथे मधे मोजावी लागते.आणि त्याचं मुख्य कारण घाई घाईने घेतलेल्या निर्णयामुळे,उतावळेपणाने घेतलेल्या निर्णयामुळे तसं होतं.”
त्यांच बोलून झाल्यावर मी त्याना म्हणालो,
“मग याचा अर्थ अशी व्यक्ती आपली मनःशांती गमावून बसणार नाही काय”?
हा माझा प्रश्न ऐकून अगदी गंभीर होऊन भाऊसाहेब म्हणाले,
“प्रत्येक व्यक्ति मनःशांतीसाठी नेहमीच इच्छूक असते.अश्या व्यक्ति दुसर्‍याच्या जीवनात डोकाऊन पाहून त्यांच्या जीवनातल्या सुखसमाधानाकडे पाहून त्यांचा हेवा करतात.तरीपण त्यांना सुखसमाधानी मिळावी की काय हे सांगता येत नाही.”
हे ऐकून मी त्याना विचारलं,
“हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असणार नाही काय?”
प्रोफेसर म्हणाले,
“प्रत्येक जण आपल्या स्वभावाशी चांगलाच परिचीत असतो.आणि आपल्या जीवनातून मार्ग काढीत असतो.जे निसर्गाने दिलंय ते ओळखणं,त्याचा स्विकार करणं,आणि निरनीराळ्या स्वभावातल्या अनेकताची प्रशंसा करणं हे त्याने मान्य करणं उत्तम होईल.मनात उदासीनता आल्यानंतर जर का मनात उल्हास आणि उत्साह आला,तर त्याची मनावर दूरवर छाप राहते.”
मी भाऊसाहेबाना विचारलं,
“तुम्ही तुमच्या कारकीर्दीत हे कसं काय हॅन्ड्ल केलंत?”
हे ऐकून त्यांच्या चेहर्‍यावर आनंदाची छटा आली आणि ती माझ्या नजरेतून निसटली नाही.
“माझ्या मनातलं तुम्ही विचारलंत”
असं म्हणून ते पुढे म्हणाले,
“माझ्या स्वभावाच्या भावूकपणामुळे मी फक्त पुस्तकं वाचून शिकवीत नव्हतो.माझ्या अनुभवाचा पण उपयोग करीत होतो.
त्यासाठी शिस्त आणि थंड स्वभाव ठेवून मग जर का मनात काही भ्रम आल्याने तुमच्याकडून काही झालं तर ती काही वाईट गोष्ट नाही.असं सांगून मी माझ्या विद्दार्थ्यांच्या मनावर छाप आणण्याचा प्रयत्न करीत असे.
जर का कुणाला लक्षात राहणारं असं नीरस आयुष्य घालवायचं असेल तर आपल्या आयुष्यातल्या दुर्बोध बाजूकडे आणि कमजोर कुवतीकडे जरा डोकाऊन पहावं लागेल.
त्या पलिकडे जाऊन आपल्या आयुष्यातल्या व्यथा आणि खळबळीतून शिकलं पाहिजे की आपल्या आनंदाची भागिदारी- ज्यांच्याकडे तो आनंद कमी आहे- त्यांच्याकडे करावी आणि तसं करायला प्रोत्साहीत होत रहावं जेणेकरून सर्वांच कल्याण होईल.हे मी माझ्या विद्दार्थ्यांना निक्षून सांगत असे.”
हे सर्व ऐकून मी प्रो.देसायांना म्हणालो,
” शेवटी काय ज्ञान अद्भुतच आहे पण बुद्धिचातुर्य त्याही पेक्षा आहे.”
अगदी खूष होऊन माझी पाठ थोपटत मला भाऊसाहेब म्हणाले,
“अगदी लाख मोलाचं बोललात”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, September 22, 2008

” पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.” …

वाचता वाचता वाचनात आलं म्हणून,ह्या विषयावर आज मी आणि प्रो.देसाई आणि त्यांच्या नविन पाहूण्या बरोबर जरा “वृद्धत्व शाप केव्हा ठरतं.”
ह्या विषयावर चर्चा करायचं ठरवलं.

त्याचं असं झालं,बराच वेळ मी तळ्यावर भाऊसाहेबांची वाट बघत बसलो होतो.अर्थात बरोबर पाडगांवकरांचं कवितेचं पुस्तक चाळण्यात वेळ घालवला.इतका उशिर झाल्याने येत नाहित असं समजून दूरवर एकदा न्याहाळून पहावं म्हणून नजर टाकली असता चार जण हलक्या पावलाने येताना दिसले.बरोबरचे एक गृहस्थ वॉकर घेऊन चालत होते.भाऊसाहेब थांबा,थांबा म्हणून मला हाताने खुणावत होते.जवळ आल्यावर त्या तिन गृहस्थांशी माझी त्यानी ओळ्ख करून दिली.
हे प्रो.घारपुरे,हे डॉ.तुळपुळे आणि हे श्री. नेरूरकर.
प्रो.घारपुरे आय.आय.टी खरगपूर मधून अलीकडेच रिटायर्ड झाले.डॉ.तुळपुळे व्ययसाय सोडून आता पंधरा एक वर्ष झाली.आणि नेरूरकर ए.जी.-अकौन्ट्न्ट जनरलच्या- ऑफीस मधे चाळीस वर्ष काम करून रिटायर्ड झाले.
सर्व वृद्ध एकत्र जमल्यावर वृद्धत्वाच्या गोष्टी निघणं स्वाभाविक होतं.
“वृद्धत्व शाप केव्हा ठरतं.”
ह्या विषयावर बोलूया असं भाऊसाहेबानीच सुचवलं.
म्हणाले,
“वृद्ध व्यक्तिचे सर्व साधारण दोन भाग पाडले जातात.जे वृद्ध ६० ते ७० वयोगटात असतात,त्याना तरुण वृद्ध म्हणतात,आणि जे सत्तर पेक्षा अधीक वयाचे असतात त्याना जास्त वृद्ध असं म्हणतात.
ही वृद्ध मंडळी सर्वसाधारणपणे क्रियाशील नसतात. त्यांचं जास्त प्रमाणात वास्तव्य कुटुंबातच असतं.
त्यांना आपलं वृद्धत्व वरदान किंवा शाप वाटतं.”
डॉ.तुळपुळे म्हणाले,
“ज्यांना आपलं वृद्धत्व शाप वाटतं त्याला काही कारणं ही असतात.
त्यांच्या सभोवताली अशी परिस्थिती निर्माण होते,की त्यांना आपल्या वृद्धत्वाची चीड येते आणि त्यामुळेच त्याना आपलं वृद्धत्व एक शाप असल्याची जाणीव होते.”
मी डॉ.ना म्हणालो,
“अशी का चीड यावी?”
त्यावर प्रो.घारपुरे सांगू लागले,
“मी सांगतो माझाच अनुभव आठवून.
ज्यावेळी ही मंडळी तरुण, वाढत्या वयाची आणि कार्यव्रत असतात,तेव्हा ते कामावरून घरी परत आले की त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
कधी त्यांची आई तर कधी त्यांची पत्नी आगतस्वागत करते.
घरात आल्या आल्या विचारपूस केली जाते.त्याना गरमागरम चहा किवा कॉफी करून दिली जाते.
त्यासोबत काही खायला दिलं जातं.हे सगळे अगदी स्वाभाविकपणे होत असतं.”
मधेच भाऊसाहेब इंटरव्हेन करून म्हणाले,
“कारण ते कमवणारे म्हणून घरच्यांसाठी महत्वाचे असतात.
त्यांचं मन सांभाळणं हे घरच्यांची जबाबदारी बनते.त्यांच्यासाठी प्रत्येकजण आपली जबाबदारी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करतो.”
मी डॉ.तुळपुळयाना म्हणालो,
“हे भाऊसाहेबांच म्हणणं तुम्हाला पटतं का?”
डॉ.तुळपुळे आपल्या व्यवसायाच्या विषयातल्या मानसिक परिस्थितीचा विचार करून म्हणाले,
“ह्या परिस्थितीत वृद्धत्वातामुळे स्वाभाविकपणे कळतनकळत बदल होत जातो.त्यांच्या निवृत्तीमुळे ही मंडळी अधिक काळ घरातच असतात.
बाहेर जाऊन आल्यानंतर त्यांच्या परत येण्याची फारशी दखल घेतली जात नाही,असं काहींच्या बाबतीत घडतं.काहींना तर पाण्याची किवा चहाची देखील घरच्यांकडे मागणी करावी लागते.”
इतका वेळ गप्प बसून ऐकत असलेले नेरूरकर हाताने खुणावत सांगू लागले,
“अहो,मला तर,
“इतक्या लवकर घरी कसे परत आला “
अश्या प्रकारच्या अनपेक्षित प्रश्नाना सामोरं जावं लागत होतं.
अशा वृद्ध व्यक्तींनी जास्त वेळ घराबाहेर रहावं,आणि आपल्याला मोकळीक मिळू द्यावी असं घरातील व्यक्तिना मनातून वाटतं.अशा परिस्थितीत आपलं वृध्दत्व हा एक शाप आहे,असं त्यांना वाटलं तर त्याना आपल्याला कसा दोष देता येईल?”
मी डॉ.तुळपुळ्याना विचारलं,
“डॉ.साहेब,हे आपल्याच घरातल्या प्रेमळ लोकाना असं कसं मनात येतं?”
डॉ.तुळपुळे जरा विचार करून म्हणाले,
“घरातील या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं त्याना अवघड जातं,व त्यामुळे मानसिक कोंडी होते.त्यांच्या तरुण सुनामुलांना त्यांची सदासर्वकाळ घरातली हजेरी नकोशी किवा अडचणीची वाटु लागते.”
“असं कसं म्हणता तुम्ही डॉक्टर”असं म्हणत,नेरूरकर आपला वॉकर पुढे सरकावून म्हणाले,
“तरुणपणात किवा वाढत्या वयात काही मंडळी काबाडकष्ट करून पैसा जमा करतात.
काटकसरीचं जीवन जगून पैसा साठवतात,या पैशाच्या आधारे घरदार उभं करतात.
सर्व भौतीक सुखसोयी घरात निर्माण करतात.हे सारं काही त्या व्यक्ती केवळ आपल्यासाठी निर्माण करीत नाहीत.त्यात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचं पण हित समावलेलं असतं.खरं ना?”
प्रो.देसाई आपला विचार सांगू लागले,
“कुटुंबियांच्या सुखासाठीच ते हे सर्व करीत असतात. त्यात त्यागापेक्षा कर्तव्याचीच भावना अधिक असते.पण वृद्धापकाळात याच व्यक्ती पैशाचा होणारा अपवय आपल्या डोळ्यानी पाहू शकत नाहीत.
कुटुंबातील काही व्यक्ती बेजबाबदारपणे खर्च करीत असतात.मात्र,त्यावर ते नियंत्रण घालू शकत नाहीत.
त्यांना असा पैसा उडविणं सहन होत नाही.म्हणून त्याना जर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,तर त्या व्यक्ती समजावून घेण्याऐवजी उलट जेष्टांचा अपमान करतात.
त्यांनी केलेले काबाडकष्ट विसरले जातात.काटकसर नजरे आड केली जाते.”
प्रो.घारपुरे जणू आपलाच अनुभव सांगण्याच्या अविर्भावात म्हणाले,
“त्यागाची खिल्ली उडवली जाते.उलट त्याना कडवट शब्दात सुनावलं जातं.
“कटकट करून नका,सहन होत नसेल तर डोळे बंद करून घ्या.”
“घरात शांततेने रहा”
अशा वृद्धाना,
“तोंड बांधून बुक्याचा मार”
सहन करावा लागतो.
या वृद्धव्यक्ती वारंवार होणाऱ्या अपमानामुळे मनातून दुःखी होतात.
आणि त्याना,
“परमेश्वराने मला हे दिवस का दाखवले?” असे वाटतं.
अशा व्यक्तीना आपले वृद्धत्व शाप वाटलं तर त्यांचा दोष किती?”
डॉ.तुळपुळे पेशंट कडून जमविलेल्या माहितीच्या आधारावर म्हणाले,
“अहो,माझा एक पेशंट होता.त्याला वरचेवर आजारी पडण्याचं कारण विचारताना मी त्याल म्हणालो,
“तुम्हाला काही मानसिक त्रास आहे का तुमच्या घरी?”
त्यावर मला कळलं,की काही कुटुंबात मुलं एकेकाळी कर्तबगारी दाखवणाऱ्या आपल्या आईवडिलांची रवानगी अडगळीच्या खोलीत करतात.आणि इतर सुसज्य खोलीत आपण राहतात.
अशा अडगळीच्या वा अडचणीच्या खोलीत राहताना आईवडिलांचं मन खूप दुःखी होतं.
पण परिस्थिती मुळे ते शरणांगत होतात.आणि तशा परिस्थितीत दिवस व्यथीत करतात.
पण त्यापेक्षाही त्याना दुःख होतं ते की आपली मुलं आपल्या जवळ येत नाहीत,जवळ बसत नाहीत.
बातचीत करीत नाहीत.विचारपूस करीत नाहीत.आपल्या आवडीनिवडी जपत नाहीत.
याचं दुःख ते सहन करू शकत नाहीत.पण त्यांचा नाइलाज होतो.”
हे ऐकून नेरूरकर म्हणाले,
“म्हातारपणी त्याना आपल्या जवळच्या लोकांकडून प्रेमाची, व दोन गोड शब्दांची गरज भासते.
पण ते ही त्यांच्या नशिबी नसतं.काही मुलाना तर आपले आईवडिल अडचणिचे वाटु लागतात.
अशा स्थितीत त्या आईवडिलाना आपले वृद्धत्व शाप वाटलं नाही तर नवलच.
अशा कुटुंबातली मुलं आपल्या आईवडिलांची आजारपणात घ्यावी तशी काळजी घेऊ शकत नाहीत.”
डॉं.तुळपुळे म्हणाले,
“त्यांना आपला औषधोपचार स्वतःच करावा लागतो. हातपाय साथ देत नसले तरी आणि डॉक्टरांकडे धड जाता येत नसलं तरी मुलं सोबत येत नाहीत.
आपली मुलं आपल्या म्हातारपणी आपली काठी बनतील आणि आपल्याला सुखात ठेवतील ही आशा फोल ठरतं.”
प्रो.देसाई बराच वेळ हे सर्व ऐकत होते.ते म्हणाले,
“अहो,मी तुम्हाला पुढे जावून सांगतो,की काही व्यक्ती आपण काही दिवसानी आजी अजोबा होवू,आपल्या नातवंडाना खेळवू त्यांच्याशी खेळू अशी स्वपनं बघतात.
मात्र, ते आजीआजोबा झाल्यावर त्यांच्या नशिबी वेगळंच दुःख येतं.
आजीअजोबा आपल्या नातवंडाना अर्थात आपल्या जमान्यातल्या गोष्टी सांगतात.
त्यांच्याशी खेळतात गप्पा मारतात.या त्यांच्या गोष्टी मुलाला किंवा सुनेला पसंत पडत नाहीत त्यामुळे सून किंवा मुलगा मुलाला रागवतात,मारतात हे आजी आजोबाना आवडत नाही.
आजीआजोबाना ओरडतात तुमच्यामुळे तो असा वाइट वागतो.
तुम्ही त्याच्यावर वाइट संस्कार करता अशी कडवट भाषा वापरतात.
नातवंडाना त्यांच्या पासून दूर करतात अशातऱ्हेने आजीआजोबांची स्वपनं धुळीला मिळतात.
आणि वरून अपमान सहन करावा लागतो.याचं त्याना दुःख होतं.
स्वाभाविकपणे त्याना त्यांचं म्हातारपण शाप वाटू लागतं.”
हे ऐकून प्रो.घारपुरे म्हणाले,
“अशा अनेक गोष्टी सांगता येतील.काही मुले त्याना खर्चाला पैसे देत नाहीत.
पण त्यांच्या देखत नको त्या गोष्टीवर मात्र नको तेव्हडा पैसा खर्च करतात.
हे पाहून त्या वृद्धाना आपण लाचार झाल्यासारखं वाटतं.
काहींची मुलं त्यांच्या गावात दूसरं घर घेऊन राहतात.आपल्या आईवडिलांशी तुटकपणे वागतात. याचं मरणप्राय दुःख झाल्याशिवाय कसं राहील.तर काहीजण फारच अभागी ठरतात.त्यांची रवानगी त्यांच्याच मुलांकडून वृद्धाश्रमात होते,ते मरण येत नाही म्हणून नशिबाला दोष देत जगतात.”
हे सर्व ऐकून मी डॉ.तुळपुळ्यांना विचारलं,
“सांगा डॉक्टर,हे सगळं ऐकून आणि बघून पुढे वृद्ध होणार्‍या मंडळीनी काय करावं?”
डॉ.तुळपुळे म्हणाले,
“पन्नाशीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या सर्व गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा.
आपल्या भावी जीवनाची आखणी त्याप्रमाणे करायला हवी.
म्हणजे त्यांना वृद्धापकाळात अशा परिस्थितीला सामोरं जाणं शक्य होईल.
त्यांनी इतरांच्या अनुभवावरून शहाणं व्हावयाला हवं.
ह्या चर्चेला समारोप करताना प्रो.देसाई म्हणाले,
“अर्थात ज्या वृद्धाना आपलं वृद्धत्व वरदान वाटतं त्यांच्या नशिबाचा हेवाच करायला हवा.”
हे बोलून झाल्यावर भाऊसाहेब माझ्याकडे बघून हंसले.
“समजने वालोको इशारा काफी है”
उठता उठता मी मनात पटपुटलो,
” दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.” …



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Saturday, September 20, 2008

नाचत गाजत येईल तिचा भाऊराया

लाडली लाडली बहिण माझी साजरी
ठुमकत ठुमकत चालेल जणू नवरी
नटून थटून येईल तिचा सांवरीया
नाचत गाजत येईल तिचा भाऊराया

थेंब थेंब घामाचे करीन मी मोती
त्या मोत्याची घालीन तिला साखळी
वरात येता पाहिल तिला सारी दुनिया
नाचत गाजत येईल तिचा भाऊराया

सोळा श्रृंगाराने बहिण माझी नटली
माथ्यावर बिंदी अन हळद फासलेली
नाकात नथ चढवूनी तिला नटवूया
नाचत गाजत येईल तिचा भाऊराया

पालखीच्या गादीवर ऐटीने बसलेली
गोरी गोरी पाऊले मेंदीने सजलेली
पापण्याच्या पालखीत तिला बसवूया
नाचत गाजत येईल तिचा भाऊराया

जाईल जेव्हा ती पतिदेवाच्या घरी
ओठावर हांसू अन येईल नयनी पाणी
राखीच्या सणाला तिला बोलवूया
ओवाळून जवळ घेईल तिचा भाऊराया



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, September 18, 2008

सुंदर चित्रं पहायला मला बरं वाटतं.

त्याचं असं झालं,मी निलकंठ केळकरांकडे माझ्या इनकमटॅक्सच्या काही कामा करता गेलो होतो.त्यांच्या ऑफिसात तशी बरीच गर्दी होती.मला जवळ बोलावून ते मला म्हणाले,
“तुम्ही घरात जाऊन बसा.ह्या सर्व कस्टमरांची सोय लावून मग मी आत येतो.आमची संध्या नागपूरहून थोडे दिवस माहेरपणासाठी आली आहे.तिच्याशी थोड्या गप्पा मारा.कालच ती तुमची आठवण काढून तुमची विचारपूस करीत होती.”
बरेच दिवस दिवस माझी आणि संध्याची भेट झाली नव्हती.एकदा आमच्या घरीपण ये असं मला तिला आमंत्रण पण द्दायला मिळणार असा विचार करून मी त्यांच्या घरात गेलो.

संध्या लहान असताना जरा मंद विचाराची वाटायची असं लोक म्हणायचे.पण आता ती बरीच सुधारली होती.तिचं लग्न होऊनदोन सुंदर मुलंपण तिला झाली होती.नवरा तिकडे नागपूरला एका बॅंकचा मॅनेजर होता.
मी संध्याला विचारलं,
” आता तुझं कसं चाललं आहे?”
मला म्हणाली,
“आता मी पूर्वीची राहिले नाही.लहानपणी मला कुणी जर सांगितलं,
“अमुक अमुक गोष्ट सिद्ध करून दाखव” आणि मी ते सिद्ध करायला सरसावले तरच इतराना वाटायचं मी नॉरमल आहे.पण मी तसं करायला कधीच जात नव्हते.नव्हे तर तसं करण्यात मला स्वारस्यच वाटत नव्हतं.
कारण प्रत्येक गोष्ट मी त्याचं एक सुंदर चित्र मनात आणून त्याकडे बघायची.ही माझी संवय मला आवडायची.”
लहानपणापासून मला प्रत्येक गोष्ट अशा तर्‍हेने बघायची संवय झाल्याने एखादी गोष्ट प्रत्यक्ष मनात त्याचं चित्र आणूनच मगमी ठरवते.मला कल्पना करून काही सुचत नाही.म्हणून मी चित्र आणि आवाज ह्याचा विचार करूनच काही गोष्टी डोक्यात आणते.तुम्ही जशा कल्पना करता तसं मला जमतच नाही.
माझा मेंदु कसा चालतो ते तुम्हाला सांगते.गुगल मधे सर्च-इंजीन कसं काम करतं?तुम्ही जर “प्रेम” हा शब्द मला दिला,तर मी माझ्या मेंदुतलं महाजाल वापरायला लागते.त्यामुळे माझ्या डोक्यात एका मागून एक चित्र यायला लागतात.एक मांजराचं पिल्लू त्याच्या आईच्या कुशीत झोपलेलं डोक्यात येतं.किंवा एखाद्दा हिंदी चित्रपटातलं गाणं हिरो हिरोईनच्या मागे धावत आहे असं दिसतं.

लहाणपणी माझे आईबाबा चांगलं आणि वाईट या मधला फरक मला एखादं उदाहरण देऊन दाखवायचे.जसं,माझी आई म्हणायची,
“तू तुझ्या शाळेत तुझ्या बरोबरच्याना मारत नाहीस कारण त्यानी तुला फिरून मारलं तर आवडणार नाही.”

ह्याचा अर्थ कळण्यासारखा आहे.पण माझ्या आईने मला,
“एखाद्दाशी चांगलं वागावं”
असं सांगितलं तर मला ते कळायला जरा जड जायचं. पण कुणी मला जर सांगितलं,
“कुणाला जर का फूल द्दावं”
तर त्यातून मला अर्थ कळायचा.
अशा तर्‍हेने मी माझ्या डोक्यात एक अनुभवाची लायब्ररी तयार करून नव्या प्रसंगी त्या लायब्ररीतून संदर्भ घ्यायची.त्यामुळे मला एखाद्दा प्रसंगाला तोंड द्दावं लागलं तर मी ह्या लायब्ररीचा उपयोग करून योग्य तो मार्ग काडून नव्या विचित्र परिस्थितीला सामोरी जायची.

जेव्हा मी मोठी झाले.म्हणजे जवळ जवळ विसएक वर्षाची झाले,तेव्हा जीवनचा अर्थ काय ह्याच्यावर खूप विचार केला.ह्यावयात मी माझ्या करियरची सुरवात केली होती.मला वाटतं काही तरी प्रॅकटीकल गोष्ट करून दाखवण्यात आयुष्याला काही अर्थ येतो.आणि माझ्या ह्या समस्येमुळे बरीच माहिती लक्षात घेऊन त्याचं एखादं चित्र डोक्यात तयार करण्यात मी वाकबगार झाले.

एका संस्थेला वृद्धाश्रम बांधायचा होता.मला माझ्या एका मैत्रीणीकडून याचा सुगावा लागला होता.तिच्या तर्फे मी त्या संस्थेच्या डायरेक्टरांची भेट घेऊन प्रत्येक वृद्ध व्यक्ती ज्या खोलीत आपलं वास्तव्य करणार असतील त्यांच्या खोलीची सजावट करण्याचं प्रोजेक्ट माझ्यावर घेतलं.वृद्ध व्यक्ती, तिच्या रोजच्या जरूरीच्या वस्तु, रात्री झोपण्याची तिची जागा,तिचा बिछाना,जवळपास भिंतीवर एखादं देवाचं किंवा देवीचं चित्र,मदतीला जरूर लागल्यास कुणालाही बोलवण्यासाठी लागणारी घंटा,रात्रीची तहान लागल्यास एखादा तांब्या आणि त्यावर फूलपात्र,ताज्या फुलांनी सजवला जाणारा एक फ्लॉवर- पॉट,अशा काहीशा गोष्टी मी त्या वृद्ध व्यक्ती आणि तिच्या गरजा ह्याचं चित्र डोक्यात आणून मग तयार करू शकले. हे सर्व झाल्यावर प्रत्यक्ष जेव्हा त्या आश्रमात लोक येऊन राहू लागले त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर आलेलं समाधान बघून मला काही तरी माझ्या मनात महत्वाचं मिळवल्याचं समाधान दिसू लागलं.

म्हणून मी म्हणते,
“ प्रत्येक गोष्ट मी त्याचं एक सुंदर चित्र मनात आणून त्याकडे बघते.ही माझी संवय मला आवडते.”
हे तिचं बोलणं ऐकून मी तिला म्हणालो,
“संध्या,तूं जे मला आता सांगितलंस त्यावरून मला असं वाटतं,की हे सगळे मेंदूचे खेळ असावेत.सर्वानीच इतरांसारखं असायला हवं असं काही नाही असं मला वाटतं.तुझ्या परीने तूं जर तुझे प्रश्न सोडवत असशिल आणि त्यासाठी तुला ती संवय चांगली वाटत असेल.तर त्यात गैर असं काहीच नाही असं मला वाटतं.”
असं म्हणे पर्यंत केळकर आपलं काम आटोपून घरात आले.मी आणि संध्याने हा विषय थांबवला आणि मी केळकरांना माझी इनकमटॅक्सची फाईल देत दुसर्‍या विषयावर बोलू लागलो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, September 16, 2008

नको दूर जाऊ सजणा रे!

मिटवूनी टाक असती जी अंतरे
दाह होई जो मनी
विझवूनी टाक सत्वरी
नको दूर जाऊ सजणा रे!

भिजूनी तू मला जरा भिजवावे
टिप टिप थेंबानी गात रहावे
तू न बोलावे मी न बोलावे
समजूनी जावे फक्त इशार्‍याने
आजच्या रात्री मन तुझे का घाबरे
मिटवूनी टाक असतील जी अंतरे
नको दूर जाऊ सजणा रे!

केशभार माझा पदर माझा
सर्वच आहे तुझेच सजणा
बाहूपाश तुझा श्वास तुझा
सर्वच आहे तुझेच सजणा
आजच्या रात्री मन तुझे का डळमळे
मिटवूनी टाक असतील जी अंतरे
नको दूर जाऊ सजणा रे!


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, September 14, 2008

सामान्य माणूस असामान्य गोष्टी करतो तेव्हा…..

कोकणातल्या तुळस नावांच्या एका खेड्यात रमाकांत तुळसकरने खूपच सामाजीक कार्य केलं आहे,असं माझ्या एका मित्राने मला सांगितल्याने मला माझ्या शाळेतला दोस्त रमाकांत तुळसकरची आठवण आली.हा तोच तर नसेल,असं कुतुहल मनात येऊन मी त्या खेड्यात मुद्दाम गेलो.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनातला तोच रमाकांत होता.मला इतक्या वर्षानी पाहून त्याला ही खूप आनंद झाला.
इकडतिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“काय रे बाबा! तू मला मुंबईत शिकत होतास असं कुणी तरी मागे सांगितलं होतं.मग तू मुंबईहून इकडे केव्हा आलास?”
मला रमाकांत म्हणाला,
“शिक्षण संपल्यावर थोडेदिवस नोकरी केली.पण माझं मन मुंबईत रमेना.मी मुंबईत सामाजिक कार्य आणि समाजसुधारणा वगैरे विषयावर खूप वाचलं आणि भाषणं पण ऐकली.मोठ्या मोठ्या गप्पा मारून आयुष्य फूकट घालवण्यापेक्षा आपण स्वतः काही तरी करून दाखवावं असं मनात आलं.मग करून दाखवायचं तर मग आपल्या गावातच का तसं करू नये असा विचार येऊन,मी मुंबई सोडली.आणि सरळ तुळसीला आलो.

मला असं वाटतं,आपण राहतो त्या पृथ्वीला भेडसावत असलेल्या समस्या बद्दल काळजी करीत राहून त्या समस्याना जर सामोरं न जाता राहिलो तर तसं करणं निव्वळ निष्फळ ठरेल.जर उपाय केले गेले तरच जग सुधारल जाईल.
माझी खात्री आहे की सामान्य व्यक्तिला असामान्य गोष्टी करता येतील.मला वाटतं सामान्य आणि असामान्य व्यक्ति मधला फरक कुणाला कसली उपदी आहे ह्या वर अवलंबून नसून त्या व्यक्ति आपलं जग आपणासर्वांसाठी किती चांगलं करतात ह्यावर आहे.काही लोक जे कार्य अंगिकारतात ते तसं कां करतात ह्याची मला कल्पना नाही.मी जेव्हा लहान होतो,तेव्हा मी मोठा झाल्यावर कोण होईन हे माहित नव्हतं. मला निदान काय व्हायचं नाही ते नक्कीच माहित होतं. मी मोठा होऊन, लग्न करावं,दोन चार मुलं असावीत म्हणजे सर्व साधारण लोकाना इच्छा असतात तसं व्हायचं नव्हतं.तसंच एखादा राजकारणी वगैरे नक्कीच व्हायचं नव्हतं.राजकारणाचा अर्थ तरी काय असावा हे पण मला त्यावेळी माहित नव्हतं.

माझा मोठा भाऊ जन्मापासूनच कानाने बहिरा होता.मी त्याचं नेहमी संरक्षण करायचो.एखादं व्यंग असणं हे आपलं कमनशीब समजलं पाहिजे पण म्हणून उभं आयुष्य जगण्यासाठी त्या व्यंगावर मात करून आपल्यात उपजिवीकेचे साधन असण्यासाठी शिक्षणा सारखी दुसरी गोष्ट नाही. आणि त्यातूनच मी हा मार्ग पत्करला ज्या मार्गाने मला जो मी आता आहे ते घडवलं.
ज्यावेळी मी आमच्या गावांत पहिला कार्यक्रम म्हणजे शाळा काढायचं ठरवलं त्यावेळी आम्ही फक्त तिनजण होतो.मला ह्या कार्या साठी लागणारी माहिती आणि दोनचार दुसर्‍या कल्पना असल्याने ही योजना कशी हाताळायची हे माहित होतं.
पण मनात यायचं समजा कोणी प्रतिसाद दिला नाही तर? कुणी पर्वाच केली नाही तर?पण एव्हडं माहित होतं की ह्या प्रश्नांना उत्तर म्हणजे एकच की हे चॅलेंज स्विकारायला हवं.मला एकट्याला त्याची क्षमता यायला मी माझ्या गावातल्या आणखी व्यक्तिंना बरोबर घेऊन होतो म्हणून.
रामू गाबित,दाजी सकपाळ,मुकुंद अवसरे ह्यांच्या सारखी गावातली शेकडो मंडळी मिळून आम्ही एकत्र आलो होतो. सगळे एकत्र येऊन गावात काही असामान्य बदल करायला पुढे सरसावलो होतो.
शाळेसाठी शाळा नव्हती.ते काम म्हणजे प्रत्येकाच्या अंगातली इर्षा होती. त्यामुळे अख्या गावात चैतन्य आणून काही निराळी गोष्ट ती आमची इर्षा हे करून दाखवीत होती.

माझी खात्री होती की मी जे काही माझा हक्क आणि माझी जबाबदारी म्हणून कार्य करीत होतो,ते माझ्या गावात दंगे मारामारीला प्रोत्साहन देणारं नव्हतं तर उलट ते कार्य म्हणजे गावातल्या सर्वांच्या समस्यांची सोडवणूक करायचा प्रयत्न होता.मला वाटतं अलीकडे धैर्याने आपलं मत सांगणं आणि धैर्याने माहिती मिळवणं ही पण एक कला झाली आहे. मला खात्री आहे की अशा गोष्टीवर विश्वास ठेवणं आणि गावातल्या लोकांना ते बोलून दाखवणं हे कदाचीत सर्वमान्यही नसेल आणि समाधान देणारं ही नसेल.पण मला वाटतं जीवन म्हणजे काही “पॉप्युल्यारीटी कॉनटेस्ट ” नाही.लोक माझ्या विषयी काय बरळत असतील त्याची मला पर्वा नाही,आणि माझ्यावर विश्वास ठेव,लोकानी खूप गरळ ओकली आहे.माझ्या पुरतं बोलायचं झाल्यास,माझ्या दृष्टीने मी योग्य कार्य करीत असताना कुणी दुसर्‍यानी ढुकून माझ्याकडे बघीतलं नाही तरी चालेल.
मला नक्की एव्हडं माहित आहे की शब्द वापरणं सोपं आहे.आपण जे कार्य करतो तेच आपल्यासाठी सत्यकथा आहे. आणि माझी खात्री आहे, जरूर तेव्हड्या सामान्य लोकानी आपल्या कार्याला पाठींबा दिला तर नक्कीच कसलंही असामान्य कार्य करायाला कसलीच आडकाठी येत नाही.
एव्हडं सगळं ऐकून झाल्यावर मला रमाकांत गावात फिरायला घेऊन गेला.रसत्यातला जो तो त्याला वाकून अभिवादन देतानापाहून मला त्याचं धन्य वाटलं.माझी प्रतिक्रिया येण्यापूर्वीच तो मला म्हणाला,
“सामान्य माणसाकडून मिळणारा हा प्रतिसाद मला मुंबईत राहून लाखो रुपये कमवून विकत घेता आला नसता.”
त्याची पाठ थोपटण्या पलिकडे मला त्याला शब्दाने शिफारस करण्यासाठी शब्दच आठवले नाहीत.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, September 12, 2008

आपण प्रत्येक जण आपआपल्यापरीनेच वेगळे असतो.

काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्यांचा नातू पण घरी आला होता.बरोबर त्याचा रुम-मेट पण थोडे दिवस त्याच्या बरोबर राहायला पण आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर आमच्या थोड्या गप्पा पण झाल्या.त्याच्याशी खूप बोलावसं वाटण्यासारखा त्याचा स्वभाव वाटला.मी त्याला गप्पा मारायला आपण तळ्यावर भेटू असं सांगून घरी परतलो.
संध्याकाळी त्याला एकटाच येताना पाहिलं.जवळ आल्यावर म्हणाला,
“भाऊसाहेब आणि सर्व मंडळी देवळात गेली आहेत.मला पण बोलवत होती.पण मी तुम्हाला अगोदरच तळ्यावर भेटू म्हणून प्रॉमीझ दिलं होतं,म्हणून मी देवळात न जाता तुम्हालाच भेटायचं ठरवलं.”
सकाळच्याच गप्पाचा विषय पुढे सांगत मला म्हणाला,
“कधी कधी मला वाटतं की मी पण इतरांसारखाच असावं.पण खरं नाही ते.मला वाटतं जे वेगळे असतील त्यांचा पण तेव्हडाच सन्मान ठेवला गेला पाहिजे.जगातला प्रत्येक जण जर का दुसर्‍यासारखाच असता तर ? प्रत्येक जण दुसर्‍यासारखच बोलला असता,वागला असता,तेच संगीत ऐकू लागला असता, तोच टी.व्ही. प्रोग्राम बघू लागला असता. असं झाल्यावर मग मात्र सर्व जग अगदी निषक्रीय,निष्तेज वाटलं असतं.
मला वाटतं जसे लोक असतात तसाच त्यांचा स्विकार करायला हवा.प्रत्येकात असलेला फरक तसाच महत्वाचा असतो आणि त्याला मान दिला गेला पाहिजे. उदा.ईतिहासातल्या गोष्टी पडताळून पाहिल्यास जगातले महत्वाचे लोक एकमेकापासून वेगळे समजले जातात.
सांगायचं झाल्यास,महात्मा गांधी,अब्राहम लिंकन,माऒ-त्से-तूंग,लेनीन.आईन्स्टाईन वगैरे.ह्या महान व्यक्तिनी प्रचंड असं काही कार्य केलं.पण काही लोकाना वाटतं,हे लोक विक्षीप्त होते.पण त्यांना त्यांच्या कार्यावर विशेष भरवंसा होता.
ह्या वेगळेपणाचा संदर्भ देण्याचं कारण मला पण बरेच वेळा अशा प्रसंगाला तोंड द्दावं लागलं आहे.

हे सर्व माझ्या प्रायमरी शाळेतून सुरू झालं.माझ्या लक्षात आलं,मी इतरांसारखा नव्हतो.माझी आई मला म्हणायची की मी ठराविक गोष्टीचा ध्यास घेत रहायचो.कमनशिबाने,माझ्या ह्या विषयात इतर शाळेतल्या मुलांना दिलचस्पी नसायची.माझ्या गुरूजीना पण नसायची.
गम्मत म्हणजे माझे हे गुरूजी एकदा मला म्हणाले की,” तू जर का साप आणि पालीचा आणखी एकदा उल्लेख केलास तर तुझ्यावर मी रागावणार.तुझं वर्गात लक्ष नाही असं ठरवून तुला मी शिक्षेला पात्र करणार.”
आणि इथ पासून मला मुलांकडून चिडवण्याची छळणूक चालू झाली.

तिसर्‍या इयत्तेत,मला माझे गुरूजी म्हणाले की मला त्याच त्याच गोष्टी बद्दल परत परत बोलण्याची संवय लागली आहे.नंतर मी माझ्या आईला ह्या बद्दल विचारलं,त्यावेळी ती म्हणाली,
” डोळ्यांसमोर आडपडदा आणून मला एका वेळेला फक्त एकच गोष्ट दिसते आणि दुसर्‍या एखाद्दा गोष्टीवर फोकस करायला जमत नाही.जसं मी ज्याला त्याला टार्झनच्या मर्दुमकी बद्दल सांगत बसतो कारण टार्झनच्या मर्दूमकीचं मला विषेश आकर्षण होतं. आणि त्यावळी टार्झन ही व्यक्ति शाळेत विशेष प्रसिद्धीत नसताना माझं असं करणं मी मला स्वतःलाच चिडवून घेण्याचं लक्ष करीत होतो.
मी वेगळा वाटायचो कारण मला इतर मुलापेक्षा निराळ्या विषयात दिलचस्पी असायची.पण म्हणून माझ्याशी एव्हडं निष्टूर आणि हलक्या वृत्तिने वागण्याची त्याना जरूरी नव्हती.मला सर्वात जास्त विषय आवडतो त्याची ही मुलं जास्त टर उडवायची.

देवमासा,ज्वालामुखी,चक्रीवादळ असल्या विषयावर मला शास्त्रीय माहिती असल्याने त्या विषयाची लोक टिंगल करीत असत.कुठल्याही स्पर्धेत भाग घेऊन मी असल्या विषयावर स्पर्धा जिंकली तरी मी जादा हुषार आहे म्हणून माझी अवहेलना व्हायची.
कुणास ठाऊक एखाद दिवशी मी इलेक्ट्रॉनीक इंजिनीयर होऊन टारझनचा एक रोबॉट पण बनवू शकेन.मला तसं स्वप्न पहाता येईल.नाही कां येणार?

कधी कधी मला वाटतं की मी पण इतरांसारखाच असायला हवा.पण खरं नाही ते.मला वाटतं जे इतरांसारखे नसतील त्यांचा पण तेव्हडाच सन्मान ठेवला गेला पाहिजे.कारण मला वाटत, आपण प्रत्येक जण आपआपल्यापरीनेच वेगळे असतो.”
हे सगळं ऐकून मला त्या मुलाबद्दल आणि त्याच्या विचारा बद्दल खरोखरंच कुतुहल झालं होतं.पुढल्या खेपेला मी जेव्हा भाऊसाहेबाना भेटलो त्यावेळी न विसरता ह्या मुलाचा विषय काढून त्याची जास्त चौकशी केली.
प्रो.देसाई म्हाणाले,
“अहो त्या मुलाला “Asperger’s Syndrome ” असल्याने तसं लहान असताना ह्या मुलाना त्यांच्या विषयी त्यावेळेला काय वाटतं ते तो सांगत होता. त्यांच म्हणणं त्यांच्या दृष्टीने अगदी बरोबर होतं.हळू हळू ती विकृती कमी होत जात ही मुलं नंतर नॉर्मल वागू लागतात.भाऊसाहेबाना त्यांच्या नातवाने हे त्याच्या बद्दल सांगितलं होतं. ही लहानपणातली विकृती असते.आता तो नॉरमल आहे.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, September 10, 2008

असशी तरी कोण तू?

फूलबाग जीवनाची सजविलीस तू
असशी तरी कोण तू?
माझ्या एकाकी मनाला फुलविलेस तू
असशी तरी कोण तू?

चाले मी एकटा कुणी मित्र नव्हता
बोले मी कुणाला कुणी साथी नव्हता
असूनी मी तुझाच गुपित ठेविलेस तू
असशी तरी कोण तू?

नसेल ना स्वप्न जे माझे समजावे
जीवलग समजावे की प्राणप्रिया समजावे
असूनी समोर चेहरा लपविलास तू
असशी तरी कोण तू?



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, September 8, 2008

बालपण देगा देवा!

“जेव्हा मी वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची आठवण मी तुम्हाला सांगतो”,
असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं.
प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते.
ते पुढे म्हणाले,

“त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली.
एका मोठ्या हॉलमधे, वयाने पंचाहत्तरीच्या आसपास असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून आमचं स्वागत करण्याच्याइराद्याने धडपडत उभे रहाण्याचे प्रयत्न करताने दिसले.
गोंधळलेल्या मनस्थीतीत असलेल्या त्या वयस्कर आजोबाना,
“बसा,बसा”
असं म्हणण्यापुर्वीच त्यांचं धडपडीचं हे चाललेलं दृश्य पाहून माझी मलाच अत्यंत लाज वाटली.

संचालकाने मला एका कोपऱ्यात नेऊन प्रत्येक चेहऱ्याच्या मागे दडलेली कथा माझ्या कानी घातली.
ते ऐकून क्षणभर माझ्या मनात आलं की जर का हा वृद्धाश्रम नसता तर कदाचीत ह्यातले बरेचसे आजीआजोबा रस्त्या भिक्षेंदाही करीत असते.ही संस्था जणू एखाद्या मुलासारखी असून आजीआजोबांच्या त्या कापणाऱ्या हाताना एखाद खोल रुतलेलं मूळ प्रेमाचा आधारच असावा.

एका आजीचा नवरा हयात नव्हता आणि तिला मुलगा पण नव्हता.समवयस्क मित्र,मैत्रीणी बरोबर ती बिचारी अन्ताक्षरी खेळत होती.ती मजा करत होती.तिला जवळचे नातेवाईक पण नव्हते.
ह्या अशा संस्थेमधे तिला संगीताच्या सुरात मित्र गवसले होते.ह्या संस्थेतल्या संगीताच्या सूरानी तिला शेवटच्या श्वासापर्यंत उसंत दिली होती.पण एका वृद्ध चेहऱ्याने माझ्या मनाला एव्हडी ओढ लावली होती, की भग्न आणि सुरकुतल्यांचे जाळं असलेला तो चेहरा आठवून माझं मन विचलीत झालं.

ते संचालक म्हणाले “पंधरा दिवसापुर्वी एक उमदा, लाघवी तरूण, ह्या आजीला इथे घेऊन आला,ती त्याची अनाश्रीत शेजारीण,तिला प्रेमाचे असं कोणी नाही. तिचा नवरा निर्वतल्या नंतर ती एकाकीच झाली.
क्षुल्लक पेन्शनची ती अपेक्षित आहे,ती एकटी असल्याने , आजारी पडली तर तिची देखबाल कोण करणार?,आणि दुसरंकाही झालं तर कोण बघणार?” म्हणून ह्या सुस्वभावी उमद्या तरुणाने प्रेमाचा ओलावा ठेऊन तिला एकडे आणून सोडली.

”धन्य,धन्य”, शेजारी असून सुद्धा शेजारधर्म पाळून आणि तिच्या भविष्याची खंत ठेऊन त्याने तिला इकडे आणून सोडलीत्याचा गौरव करीत मी माझ्याशी पुटपुटलो.

संचालक पूर्ण शांत राहून म्हणाले,
” अगदी खरं,पण ह्या तरुणाचा खरा गौरव अजून बाकीच आहे.हा मदतीचा हात पुढे करणारा उमदा तरूण तिचा सख्खा मुलगा आहे.”
“काय?”
असं म्हणताना, माझ्या हातातल्या चहाच्या कपातला चहा डुचमळला,पण मी काही थरथरलो नाही.

“होय,इथे आल्यावर पहिले दहा दिवस ती कधी हसलीच नाही,की काही बोलली नाही.
एखाद्या जीवंत मुडद्या सारखी ती अबोलच राहिली. अलीकडेच थोडा भराव वाटल्यावर म्हणाली,
“माझ्या मांसाचा तो गोळा आहे,असं मूल कुणाचं असूं शकतं का?”
आणखी माहिती देण्याच्या उद्देशाने संचालक बोलून गेले.

“काय?”
ह्या माझ्या निरपराधी प्रश्नाचे उत्तर, जीवंत मुडदा म्हणून भटकत होतं.
“वृद्धाश्रम म्हणजे काय कृतघ्ज्ञ आणि भांडकुदळ मुलांनी, घाण म्हणून आईवडिलांना फेकून देण्याची गायरी आहे काय? कृतज्ञअसण्याचा गूणाचा लोप होत आहे”
संचालक तावातावाने सांगत होते.

जंगली जनावराना, शाळेत न शिकता सुद्धा नैसर्गिक ओढ असते ती ह्या सुशिक्षीत समजणाऱ्या मुलांकडे नाही.गौरवशील घराची व्याखा म्हणे फ्रिज,गाडी, टी.वी.,सेलफोन असतो ते,अशी केली जाते पण ज्या घरात आंतरीक जिव्हाळ्याचे धागेदोरेनाहीत ते घर जरी बाहेरून “ताज महाल” वाटला तरी आतून एखादी “कबर” असते.

विभागलेल्या कुटुंबात आजीआजोबाना स्थान नसतं. आईवडिलानी आपल्या मुलांना
“ते आपल्या कुटुंबाचे भाग आहेत”
हे दर्शविलं पाहिजे.एक संघ राहिलं पाहिजे.

वयोमानामुळे वृद्ध माणसे कधी कधी “सरफिरे” होतात,हट्टी बनतात.
घरी कधी कधी वाद होतात.जसे दिवस जातात तसे वाद कमी होतात,संपर्क वाढतात.
पैशाच्या आणि तारुण्याच्या प्राप्तीमुळे मुलानी कृतघ्ज्ञ होवू नये.त्यांच्या वार्धक्यामुळे आलेल्या त्यांच्या अक्षमतेवर भाष्य करण्याचा चालून आलेला आपला अधिकार आहे असे ग्राह्य धरू नये.

घर हे एक जीवंत पुस्तक आहे.तरूण पिढी ते न बोलता वाचत असते जेव्हा मुलगा यश मिळाल्यावर कृतज्ञ होवून,नतमस्तक होवून (वाकून) आईच्या आशिर्वादासाठी पाया पडतो ते पाहून पुढची पिढी आपल्या आजी आणि आईकडे पुनरावृतीस प्रवृत्त होते.
हे काही शाळेत शिकवलं जात नाही,मुलं ते पाहून आणि समजून तसं करतात.

“तुम्ही काही आमच्यावर उपकार केले नाहीत, तुम्ही तुमचं कर्तव्य केलंत”
किंवा
“आम्हाला जन्म देण्याची आम्ही तुमच्याकडे याचना केली नव्हती”
असले उदगार काढणाऱ्या काही व्यक्ती निवडून काढायला कठीण नाहीत.असे विचार किंवा अशा विचाराची मुळधारणा असल्यावर तिकडेच सर्व संपतं. नमून वागण्यात जर कमीपणा मानला तर त्या मुलाची वृद्धी कशी व्हायची?.

अलिकडे, वडिलमाणसं सांपत्तिक परिस्थिती चांगली असल्यावर स्वतःची मंडळं स्थापून,
”आता आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे,चांगली पुस्तकं वाचायची आहेत,चांगली नाटकं पहायची आहेत, देशात आणिबाहेर जग फिरायचं आहे,घरातली कामं आणि कर्तव्यं करायची नाहीत.”
असं म्हणणारे नवीन आजीआजोबा दिसतात.
पन्नास वर्षापुर्वीचे ते आजी आजोबा आता राहिले नाहीत.

स्वतःचं स्वातंत्र्य ठेवण्यासाठी जरी अशी वृत्ति आणली आणि मुलांवर अवलंबून न रहाण्याचे जरी मनात असलं तरी तो संपर्क तो दुवा ठेवणं आवश्यक आहे,कारण आयुष्याच्या उतरणीवर मुलांची मिळणारी प्रेमाची आस्था मुकून जाणं योग्य नाही.
ही एकमेकाची जरुरी असते.हट्टवादी राहून शेवटी एकमेकास असून नसल्यासारखे होणं ह्यातून काही साध्य होत नाही.

हजारो लोक आजुबाजुला असून सुद्धा आपल्या यशाची शिफारस अथवा पाठ थोपटण्यासाठी आपलं माणूस जवळ नसल्यास किंवा,
”जीवन असंच असतं काळजी करू नको सर्व काही ठिक होईल पुढे जा मागे वळून बघू नको “
असं सांगणारे आपले वडिलधारे जवळ नसतील तर त्या यशाचा काय उपयोग?



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझेकॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, September 6, 2008

डाव वेळेने साधला

दुःखाच्या ह्या दरी मधे
रथ खुषीचा लोपला
प्रेमाच्या ह्या खेळा मधे
डाव वेळेने साधला

कुणी समजावे प्रेमातल्या
ह्या नीष्ठूर संकटाना
दोन जीवाने इच्छीले ते
इतराना काही केल्या पटेना

हंसण्या आधीच प्रीतिला
का आवडे रडायला
प्रेमाच्या ह्या खेळा मधे
डाव वेळेने साधला

नेत्रा समोर प्रीतिचा
पुरावा कोणत्या कारणा
म्हणावे जर ह्या जीवन
मग काय म्हणावे ह्या मरणा

प्रीतिचे दैव जाता निद्रे मधे
दाह दुःखाचा भोगला
प्रेमाच्या ह्या खेळा मधे
डाव वेळेने साधला



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, September 4, 2008

समाजाची सेवा करण्याचा संकल्प.

आज मी बराच वेळ प्रों.देसायांची तळ्यावर वाट बघत बसलो होतो.काळोख होत आला आहे आता काही भाऊसाहेब नक्कीच येत नाहीत असं मनात आणून जवळ जवळ उठलो होतो.तेव्हड्यात लगबगीने येणार्‍या प्रो.देसांयाबरोबर आणखी एक व्यक्ति येताना पाहिली.घरी कोणही नवी व्यक्ति आल्यावर भाऊसाहेब माझ्याशी त्याची ओळख करून देण्यात नेहमीच आनंद मानत.
“थांबा, थांबा तुम्हाला डॉ.धारणकरांची ओळख करून देतो.उद्दा ते चालले आहेत.”
असं मला लांबून ओरडून म्हणाले.
मी ते दोघे जवळ आल्यावर त्यांना म्हणालो,
“प्रोफेसरानी आपल्या नावाचा बरेच वेळां मला संदर्भ दिल्याचं आठवतं.विषेश म्हणजे आपण समाजाची सेवा करायला वाहून घेतलं आहे.आणि आपल्या जीवनावर एक पुस्तक पण लिहीत आहा असं मी त्यांच्या तोंडून ऐकलंय.आता प्रत्यक्ष तुमच्या तोंडूनच थोडं काही ऐकायला मला खूप आनंद होईल”.

एव्हडं बोलल्यावर डॉ.धारणकर सांगू लागले,

“नेहमीच यथायोग्यच काम करण्याच्या संवयीचं आणि नेहमीच स्वतःला आणखी सुधारणा करून घ्यायच्या संवयीचं उप -अंग म्हणजे कमी दर्जाच्या कामाबद्दल वाटणारं कुतुहल आणि सतत वाटणारी कमकुवतेची मनातली कुरकुर हेच असावं. समाजावर काहीतरी पॉझिटीव्ह प्रकाश टाकण्याची माझी जबाबदारी आहे असं मला नेहमीच वाटत असतं.त्यामुळेच मी हा संकल्प पूरा व्हावा म्हणून लोकसेवा करण्याचा एक भाग म्हणून मी वैद्यकिय शास्त्राचा अभ्यास करून आणि शास्त्रज्ञ होऊन, लागण होणार्‍या रोगाबरोबर दोन हात करण्याचा विडा उचलला आहे.
माझा हा प्रयत्न ही माझी मला मिळालेली देणगीच मी समजतो.समाजाला ह्या त्रासदायक समस्येतेतून परावृत्त करण्यासाठी ही देणगी माझ्या ह्या प्रयत्नाला आणि मदतीला सोप करते.

माझी तिन तत्वं आहेत.
पहिलं,
ज्ञानासाठी मला कधीही तृप्त न होणारी तहान आहे.ज्ञान आणि सत्य एकाच माळेचे दोन मणी आहेत अशी माझी धारणा आहे.प्रत्येक व्यक्ति रोज ज्ञान मिळवत असते.प्रयोगशाळेतून,शास्त्रावरिल लिहिलेल्या पुस्तकामधून,आणि आजार्‍याची देखभाल करून.हे करीत असताना मी क्वचितच कंटाळतो.
दुसरं,
उत्तमत्तोम मिळवीण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात मी विश्वास ठेवतो.म्हणूनच कमी दर्जाच्या कामाबद्दल वाटणारं कुतुहलआणि सतत वाटणारी कमकुवतेची मनातली कुरकुर हेच मला सतर्क ठेवतं.आणि हे कुतुहलच मला मायूस बनवतं.त्यामुळे माझ्यात एकप्रकारचं टेन्शन येऊन ते टेन्शन माझा एक दुवा वाटून मला माझ्या अपेक्षाना आधार देतं. त्यामुळे मी आता चांगला डॉक्टर आणि चांगला संशोधक झालो आहे.टेन्शन नसतं तर मी एव्हडा एकाग्र राहिलो नसतो.मी मनाशी ठरवलंय की मला हवं तेव्हडं सगळं ज्ञान मिळवता येणार नाही. त्यामुळे आणखी आणखी माहिती मिळवण्यासाठी मी धडपडत असतो.आणि तसं करण्यात मला मजा येते.
तिसरं,
डॉक्टर म्हणून मला ह्या समजाची सेवा करणं हा माझा गोल होवून राहिला आहे. माझं हे सर्व जीवन लोकांची सेवा करण्यात घालवलेलं आहे. त्यातला बराचसा भाग,संशोधन करण्यात,रुग्णांची काळजी घेण्यात,सांथींपासून लोकांचं संरक्षण करण्यात गेलं आहे.
आता हेच बघा,AIDS वर मी एकाग्र होऊन काम करू लागलो तेव्हा माझे सहकारी मला हा रोग “गे लोकांचा रोग” आहे आणि त्याकडे माझं ध्यान देणं हे निर्थक आहे असं म्हणायचे.मला ह्या रोगाची इथ्तंभूत माहिती असल्याने हा रोग समाजाचा र्‍हासाला कारणीभूत होणार हे मला त्यावेळीच माहित होतं.त्यामुळे ह्या रोगाचं उच्चाटन कसं होईल ह्याकडे मी माझं लक्ष केंद्रित केलं.
ह्या रोगाला काबूत आणायला आपण अपयशी होणं हा काही त्याच्यावर पर्याय होऊ शकत नाही.”
मी डॉ.धारणकराना विचारलं,
“मग तुम्ही काय करायचं ठरवलं?”
त्यावर ते म्हणाले,
” त्यामुळे त्या रोगाचं आणखी ज्ञान घेण्यावर मी भर द्दायला लागलो आहे.आणि यथायोग्य माहिती मिळेपर्यंत मी त्याच पिच्छा सोडणार नाही. कारण समाजाचं भलं हे माझ्या अस्तित्वा पेक्षां जास्त महत्वाचं आहे अशी माझी धारणा आहे.”
जाता जाता मी त्यांना म्हणालो,
“तुमच्या ह्या संकल्पाला घवघवीत यश येवो हीच माझी प्रार्थना.”
अशा दृढ-संकल्प करणार्‍या व्यक्ति बरोबर दोन घटका चर्चा करायला वेळ मिळवून दिल्या बद्दल मी प्रो.देसायांचे पण आभार मानायला विसरलो नाही.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, September 2, 2008

कळी संगे निर्दय भोंवरा मधूर गुंजन करतो कसे?

कसे विचारू ह्या गोमट्या कमलिनीला
लपून छपून भ्रमर होऊनी येई तो रात्रीला
घेऊनी खबर तुझी चोरीतो तुझ्या मनाला

का विचारसी तू असे त्या कळीला
प्रेमात होतोच असा घात त्या घटकेला
बाण फेकूनी नजरेने बोलाविते जादूला
खेचून घेता जवळी दोष का मग भ्रमराला

निर्दय भ्रमर गुंजन करूनी फिरतो गली गली
कसा करावा भरवंसा जो चुंबित जाई कळी कळी
चोखंदळ ह्या भ्रमराला साथ देईल कुठली कळी
विसरूनी जाई भान अपुले जेव्हा भेटे कमलिनी

कळी गोमटि भ्रमर सावळा, संगत कशी निभेल रे !
काळ्या मेघा संगे बिजली, कशी राहते विचार रे !
गोरे सावळे रात्रंदिनी, मिळवूनी घेती असे कसे?
रात्र काळी चंद्र गोमटा, रास मिलनाची करती कसे?
कळी संगे निर्दय भोंवरा मधूर गुंजन करतो कसे?



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com