Sunday, February 19, 2012

अनीश्वरवादी शंकर सुर्वे.




"तरीपण मला सोडून गेलेल्या माझ्या मुलाच्या आत्म्याशी माझं पुनर्मिलन होईल अशी आशा बाळगणारा मी, कसला अनीश्वरवादी आहे हे माझंच मला समजत नाही."


शंकर सूर्वे आज कित्येक वर्षं मनोवैज्ञानीक म्हणून व्यवसाय करीत आहे.त्याचा सहा वर्षाचा मुलगा लुकिमिया होऊन गेला.शंकरचं मुलावर अतिशय प्रेम होतं.मी ज्यावेळी ही दुःखद बातमी ऐकली तेव्हा काळजीत पडलो.शंकर हा आघात कसा सहन करणार ह्याचंच मला लागलं होतं.मनोवैज्ञानीक असला तरी तो माणूसच आहे.त्याने आपली समजूत कशी करून घेतली असेल ह्याबद्दल मला उत्सुकता होती.
मी ज्यावेळी त्याला भेटायला गेलो होतो त्यावेळी तो काय सांगतो ते निमूट ऐकून घ्यावं.स्वतः मनोवैज्ञानीक स्वतःच्या मनाला समजूत कशी घालतो ह्याचं मला कुतूहल होतं.


मला शंकर सांगायला लागला,
"गेली तीसएक वर्ष मनोवैज्ञानिक म्हणून काम करीत असताना,मला एक प्रश्न पडला आणि त्यातून मी एक शिकलो ते म्हणजे, जीवनात अगदी जवळच्यांचा मृत्यु किंवा तत्सम नुकसानी आणि विफलता आल्यानंतर माणूस ते सोशू शकतो याचं कारण काय बरं असावं?
आशा,आकांक्षा मनात बाळगून,असाह्यता आणि उत्कण्ठा ह्यापासून,आपला बचाव करावा लागतो कारण ह्याच गोष्टी आपल्या दुःखाला,खेदाला कारणीभूत असतात.काही लोक धर्माचा आधार घेऊन त्यांच्या आकांक्षा जीवनात सफल करण्याच्या प्रयत्नात असतात.आपल्या माथ्यावर दयाळू देवाचा मार्गदर्शक हात असल्याने आयुष्य सुखकर जाणार ह्या विचाराने ते सुस्थ असतात.


परंतु,माझ्या सारखे,कठीण प्रश्नांना सोपी उत्तरं सापडवून घेण्यात तयार नसणार्‍याना किंवा तशी तयारी ठेवण्यात इच्छा नाकारणार्‍याना,दुर्धर मार्गच उरतो आणि त्यामुळे जीवनात अनिश्चिततेत रहावं लागतं किंवा मुक्तिच्या क्षमते पुढे माघार घ्यावी लागते.


माझंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो.माझ्या सहा वर्षाच्या मुलाला झालेल्या लुकिमिया ह्या व्यथेवर उपाय म्हणून बोन-मॅरो ट्रान्सप्लान्ट करण्याच्या प्रयत्नात काही समस्या उभ्या राहिल्याने त्याला प्राण गमवावे लागले.मी त्याचा डोनर होतो.त्याच्या मृत्युशी दोन हात करताना,झालेले प्रयत्न ही मुक्तिच्या क्षमेते पुढे माघारच होती.स्विकार करणार नाही,समापन होऊ देणार नाही आणि विसरून नक्कीच जाणार नाही ह्या वृत्तिचं काही चाललं नाही.डॉक्टरांच्या प्रयत्नापुढे आणि डोनर म्हणून माझ्याकडून दिलेल्या बोन-मॅरोपुढे त्याला अपयश पत्करावं लागलं.


त्याला जीवदान मिळावं म्हणून मी केलेली प्रार्थना,हा एक निराशेचा प्रयत्न होता.माझ्या दृष्टीने मला सर्वात प्रिय असलेल्या माझ्या मुलाकरीता म्हणून माझ्या तरूण वयात धर्मावर भरवसा ठेवण्याच्या माझ्या आशेची त्यात भर झाली.जेव्हा तो गेला,ज्याच्या पेशीत अनियमीत परिवर्तन होत गेलं आणि त्याला तो बळी पडला आणि ते सुद्धा त्याचं शरीर अन्यथा सुदृढ असताना,माझा मात्र एक दृढविश्वास कायम झाला की,कुठचाच देव,जो अशी दुःखद घटना व्हायला कबूल होतो तो माझ्या विचारसरणीत एका क्षणाचाही चिंतन करण्यालायक नसतो.


अशा लोकांचा मी हेवा करीन की जे अशा प्रकारची दुःखद घटना घडूनही आपला विश्वास बाळगून रहातात आणि त्यातल्या हेतूचीही कल्पना करतात. मला तरी ते शक्य नाही.तरीपण मला सोडून गेलेल्या माझ्या मुलाच्या आत्म्याशी माझं पुनर्मिलन होईल अशी आशा बाळगणारा मी, कसला अनीश्वरवादी आहे हे माझंच मला समजत नाही."


मधेच शंकरला अडवून मी म्हणालो,
"अशा संस्कृतित आपण रहात आहोत की जिथे आपल्यावर अन्याय होऊ शकतो हा समझ व्यापक झाला आहे. प्रत्येक दुर्घटनेचा आरोप  दुसर्‍यावर ढकलल्यामुळे आपला त्यात काय वाटा आहे हे शोधून काढणं दुरापास्त होत आहे.किंवा सहज म्हणून स्विकारणं की जीवनात विपत्ति येणं हे वास्तवीक आहे हेही समजणं व्यापक झालं आहे."


मला शंकर म्हणाला,
"तुमचं शंभर टक्के बरोबर आहे."
शंकर जरा गंभिर होऊन मला पुढे म्हणाला,
"जास्त करून जबाबदारी आपल्यावर न घेतल्याने,उपचारात्मक ज्ञान आपण घालवून बसतो.हे ज्ञान घालवून बसल्यामुळे आपल्याला काय होतं ते इतकं महत्वाचं नाही पण प्रतिक्रिया देणं महत्वाचं आहे अशी वृत्ति आपल्यात बळावते.

जेव्हा आपण अस्तित्वाच्या निरंतर आवर्तनाला अर्थ आणण्यासाठी काही कल्पना करीत असतो तेव्हा  एकतर  चिरस्थायित्वाचं वचन देणार्‍या धर्माची जोपासना करावी किंवा अज्ञेयवाद मानून आणि जे अविदित आहे त्याला समर्पण व्हावं. जसं- जीवन आणि मरण,स्वप्न आणि निराशा आणि अनुत्तरित प्रार्थनेचे मर्मभेदी चमत्कार."


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, February 16, 2012

जीवनात गुणवत्ता येण्यासाठी.



"श्रद्धा,विश्वास आणि परोपकार हे गुण सूर्योदय-सूर्यास्ता एव्हडे,भरति-ओहटी एव्हडे,जुने आहेत.खरोखरच ते मनुष्य जातीसाठी चमत्कार करणारे आहेत."


ब्रिगेडीयर नरेन्द्र परब आमचा शेजारी.कोकणात त्यांचं घर आमच्या घरापासून जरा लांब असलं तरी गावात भेटाभेटी होऊन आमची ओळख वाढली होती.
नरेन्द्र दिल्लीत वसंतविहार मधे मिलिटरीच्या एका बंगल्यात रहातो.आता तो लवकरच निवृत्त होणार आहे. त्याची दोन्ही मुलगे सैन्यात असतात.
मी दिल्लीला कामासाठी गेलो की नरेन्द्राच्या घरी बरेच वेळा जातो.दिल्ली-मुंबईची शेवटची फ्लाईट घ्यायची झाल्यास संध्याकाळी कामं संपल्यावर थोडावेळ मी नरेन्द्राच्या घरी गप्पागोष्टीसाठी जातो.असाच एकदा मी त्याला भेटायला गेलो असताना मला नरेन्द्र सांगत होता,

"एकदा संध्याकाळच्या वेळी मी आणि माझी पत्नी आमच्या दोन मुलांसह आमच्या घरासमोरच्या बागेत विरंगुळा म्हणून बसलो होतो.आमची दोन्ही मुलं त्या विकएन्डला सुट्टी म्हणून घरी आले होते.आमच्या चौवीस वर्षाच्या मोठ्या मुलाच्या ह्या ट्रिपनंतर त्याचं परत येणं बरेच दिवसानी होणार होतं.तो ज्युनीअर लेफ्टनंट म्हणून इंडीयन नेव्हीमधे कामाला असतो.लहानगा वीस वर्षाचा जो आर्मीमधे प्राईव्हेट म्हणून कामाला आहे तो आपल्या भावाला भेटण्यासाठी आणि त्याला गुडबाय म्हणण्यासाठीच आला होता.


आम्ही त्यांच्या लहानपणाच्या आठवणी ताज्या करीत बसलो होतो.शिवाय कुटूंबातल्या इतर घडामोडीबद्दलही चर्चा करीत होतो.आमच्या ह्या अगदी जवळीक असलेल्या कुटूंबात जरा गंभीर वातावरण पण दिसून येत होतं.


माझं आयुष्य मी मिलिटरीत सेवा करण्यात व्यतित केलं.आता माझी निवृतिची वेळ आली आहे.त्याच आठवड्यात माझा जन्मदिवस होता.माझे दोन्ही मुलगे मला काही प्रश्न विचारत होते.त्यांना विचारायचं होतं की माझ्या दृष्टीने,जीवनात गुणवत्ता येण्यासाठी, महत्वाच्या गोष्टी काय असाव्यात.


मी थोडा वेळ विचारात पडलो.आणि एकाएकी जीवनातल्या तीन महत्वाच्या नैतिक गोष्टी मला आठवल्या. श्रद्धा,विश्वास आणि परोपकार ह्या तिनही गोष्टी जीवनात सर्व काही लाभकर होण्यासाठी मुलभूत आहेत.ह्याच गोष्टीतून जे काही चांगलं आहे ते उदयाला येतं.जे काही वाईट आहे ते मुळीच उद्भवत नाही.विधात्याला आणि समाजाला देण्याचं आपलं जे ऋण आहे ते कर्तव्यनिष्ट राहून प्रदान करण्याचं ह्या गोष्टी प्रतिनीधीत्व करतात.


माझ्या दोनही मुलांनी मला आपला आत्मविश्वास प्रकट करून सांगीतलं की त्याबद्दल म्हणजे माझ्या उपदेशाबद्दल आणि त्यातल्या सरळ-साध्या तथ्याबद्दल ते जागृत आहेत. माझ्या दोनही मुलांनी मला सुचीत केलं,की मी जरा त्या गोष्टींचं महत्व विस्ताराने सांगीतलं आहे.आणि जीवनात सुखी रहाण्याची कोशिश करण्यासाठी व्यवहारिक मार्ग सांगीतला एव्हडंच.


मात्र आम्ही तिघेही एका गोष्टीबद्दल सहमत होतो की,आपल्यात असलेल्या श्रद्धेची उच्चतम कसोटी म्हणजे आपला ईश्वरावर विश्वास असणं.अर्थात श्रद्धा हा परंपरेचा झरा आहे आणि त्यातूनच आपल्या कुटूंबाकडे, मित्रमंडळीकडे आणि देशाकडे आपल्या विश्वनितेचा प्रवाह वहात असतो.
पुढाकार आणि कल्पनाशक्ति ह्या श्रद्धेच्या उपजाती आहेत.तसंच सत्यनिष्ठा आणि आत्मविश्वास हे श्रद्धेचे मुलभूत स्तंभ आहेत.मनात विश्वास असल्याने संकल्प आणि निर्भयतेची पूर्ती होऊन कुठचीही गोष्ट साध्य करण्याची इच्छा शक्ति बळावते.निष्पत्ति आणि आक्रमकतेची प्रेरणा ह्या दोन गोष्टी अंगात क्षमता आणतात.
परोपकाराचा भला हात पुढे केल्याने,त्यातून करूणा,निस्वार्थता,दीनता आणि सहानुभूति ह्या सारखे जीवनात रंग आणणारे गुण उभारून येतात."


नरेद्राचं हे सर्व ऐकून घेतल्यावर माझं मत देताना मी त्याला म्हणालो,
"मला तुम्हा बाप-लेकांचं कौतूक करावसं वाटतं.अर्थात तुम्हा दोघां आईवडीलांचे संस्कार त्यांच्यावर असल्याने ह्या थरावरच्या चर्चा ते तुमच्याशी करू शकतात.एव्हडंच नाही तर देशसेवा करण्यासाठी तुझ्या पाऊलावर पाऊल टाकून दोघेही सैन्यात दाखल झाले आहेत.ही गोष्ट वाखाणण्यासारखी आहे. तुमची ही चर्चा ऐकून माझं मत मी तुला देतो. ह्या पृथ्वीवरचा शक्तिशाली माणूस किंवा एखादा अगदी अभिमानरहित माणूस आपल्या जीवनातला उद्देश,समाधानपूर्वक आणि यश संपादून तेव्हा गाठू शकतो जेव्हा,तो ह्या तुमच्या चर्चेत आलेल्या शाश्वत गोष्टी आणि त्याच्या उपजाती याना घेऊन जीवन जगत असतो. आणि यदाकदाचीत जीवन जगत असताना ह्यातल्या काही गोष्टी आपल्याकडून वेगळ्या केल्या गेल्या तरी त्या हुडकून काढता येतात."

आम्ही आमच्या गप्पा संपवून उठता उठता एका निर्णयाला आलो की,श्रद्धा,विश्वास आणि परोपकार हे गुण सूर्योदय-सूर्यास्ता एव्हडे,भरति-ओहटी एव्हडे,जुने आहेत.खरोखरच ते मनुष्य जातीसाठी चमत्कार करणारे आहेत.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
 

Saturday, February 11, 2012

औदासीन्य


"मला वाटतं,हे औदासीन्य माझं मौल्यवान साथीदार बनलं. माझ्या जीवनाला चांगली कलाटणी मिळाली."

माझी भाची अलीकडे बरेच वेळा आपल्याच तंद्रीत असते.मी एकदा माझ्या बहिणीला विचारलं,
"का गं,हिला काही प्रॉबलेम आहे का?"
माझी बहिण मला म्हणाली,
"डॉक्टरांच्या म्हणण्या प्रमाणे तिला क्रॉनीक डिप्रेशन आलं आहे.तिचा नवरा उच्च शिक्षणासाठी गेली दोन वर्षं अमेरिकेत आहे.त्याचा तिचा नियमीत संपर्क असतो म्हणा.
पण अलीकडे ती नेहमी काळजीत दिसायला लागली.
मी काही प्रश्न केले तर उडवाउडवीची उत्तरं देते.तेव्हाच मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि तिला तपासून तसं ते म्हणाले."


मालतीला असंच एकदा औदासीन्य आलं होतं हे मला ठाऊक होतं.मालती माझ्या मित्राची थोरली मुलगी. माझा मित्र मला म्हणाल्याचं आठवतं,
"आताशा, मालतीने औदासीन्यतेवर विजय मारला आहे.
ती ह्या व्यथेतून बाहेर कसं पडायचं ते आपल्या अनुभवातून नक्कीच कल्पना देईल."


माझ्या बहिणीला जरा दिलासा वाटावा म्हणून मालतीचा अनुभव तिच्या तोंडून ऐकून मग तो तिला सांगावा आणि मग माझ्या भाचीवर काय उपाय होऊ शकतो ते पहावं म्हणून मी अलीकडेच मालतीच्या घरी गेलो होतो.
मालतीला भेटल्यावर मी सरळ मुद्याला हात घातला.माझ्या भाचीची बॅकग्राऊंड सांगून मी मालतीला विचारलं,
"तुझा ह्या बाबत सल्ला काय आहे?"
मालती मला म्हणाली,
"सल्ला देण्यापेक्षा माझी कथा तुम्ही ऐकावी आणि त्यातून तुम्हाला योग्य ते काय सापडतं ते पहावं."
"ठिक आहे सांग तुझी कथा"
मी मालतीला म्हणालो.


सुरवात करून मालती म्हणाली,
"ह्या जानेवारी महिन्यात त्या गोष्टीची वर्ष-गाठ आहे.दोन वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या वेळी मी सुयांचा खोका घेऊन माझ्या बाथरूममधे गेले.बाथरूमला कडी लावून आत बसले.खोक्यातून निरनीराळ्या आकाराच्या सुयांमधून दोन जरा जाड दिसणार्‍या सुया बाजूला काढून घेतल्या. जमीनीवर बसले,आणि दोन्ही सुया माझ्या पायात घुसवल्या आणि पुरेसं रक्त पायावर दिसेल असं झाल्यावर त्या सुया काढून घेतल्या.हे सर्व करण्यासाठी त्यामागे कारण होतं.मला जखम करून घ्यायची होती.जखम पहायची होती आणि जखमेला स्पर्श करायचा होता.


बर्‍याच लोकानी ही घटना-यातना आणि निराशेचं जीवंत उदाहरण असं समजून- विसरून जायचं ठरवलं असतं.पण मी मात्र ध्यानात ठेवण्याचं ठरवलं होतं.कारण मला वाटतं ही घटना,मी कोण आहे आणि मी कोण होणार आहे,हे समजायला ठोस अशी बाब असं समजून गेले.त्यावेळी मला उदासीनतेची व्याधी झाली होती आणि माझं जीवन अस्ताव्यस्थ झालं होतं.माझ्या मला मी जखम करून घेणं तर्कसिद्ध वाटत होतं.


मला खूप यातना होत होत्या.त्यापासून सुटका करून घ्यायला यातनेचं अस्तीत्व आणि जखमेच्या रूपाने प्रत्यक्ष पुरावा स्वीकार करून पहायचं होतं. औदासीन्य घातक असतं.ते शरीरात फैलावतं आणि छपून असतं.एखाद्या कॅन्सर सारखं किंवा बंदुकीच्या गोळीने झालेल्या जखमेसारखं स्वतःला प्रकट करून घ्यायला नाकारत असतं.पण त्या दिवसाची माझी ती वेडपटपणाची सहल माझं औदासीन्य प्रकाशात आणायला कारणीभूत झाली.माझं दुखणं माझ्या चेहर्‍यावर प्रकाशमान झालं.एका काळोख्या गुहेतून ओढून काढून उन्हाळ्याच्या सूर्यप्रकाशात त्या औदासीन्याला मी आणलं.त्यानंतर आम्हा दोघांची असाधारण मैत्री जमली.


कित्येक वर्षं ह्या उदासीनतेला मी झुंझ दिली.त्याकडे दुर्लक्ष केलं.त्याचं सान्तवन केलं.ते नसल्याचा बहाणा केला.
पण जेव्हा औदासीन्य हा माझ्यातलाच एक भाग आहे असं समजून मी त्याला कवटाळलं आणि मदतीची शोध घेतला त्यावेळेला मी त्याच्याशी सामना करायचं ठरवलं.मी त्यातून शिकायला लागले.आणि त्याचा परीणाम म्हणजे माझं जीवन बदलायला लागलं आणि ते अशा तर्‍हेने बदलू लागलं की मी तसं कल्पनाही करू शकले नसते.


मला वाटतं,हे औदासीन्य माझं मौल्यवान साथीदार बनलं. माझ्या जीवनाला चांगली कलाटणी मिळाली.मी हातात घेतलेली कामं,माझे येणारे संबंध आणि जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन ह्या सर्वात सुधारणा दिसू लागली.कारण मी माझ्या व्यथेशी सामना करायला सुरवात केलीच आणि शिवाय त्याचा माझ्यावर होणारा प्रभाव मी स्वीकारू लागले.यापुढे मी दरवाजाला घट्ट कडी लावून ते छपवण्याचं बंद केलं.


औदासीन्य माझाच गुरू ठरला असं मला वाटू लागलं.माझ्यात आणि त्याचबरोबर इतरात असलेली क्लिष्टता मला ते शिकवायला लागलं.यातनेबरोबर खुशीचं अस्तित्व असतं.अपयशाबरोबर यश आणि वेडपटपणाबरोबर समझदारीचं अस्तित्व असतं.
उदासीनता मला,समानुभूति,सबूरी आणि विरोधाभास म्हणून, आनंदाचीही शिकवणूक देते.जीवनात हजर असलेल्या धुसर रेषा ज्यांना समर्पक उत्तर नाही किंवा कदाचीत उत्तर नाहीच नाही, त्या रेषा मला उदासीनतेतून दाखवल्या गेल्या.
ह्या धूसर रेषांपासून एव्हडं काही घाबरण्याचं कारण नसतं हे मला माहित आहे,उलटपक्षी ह्या रेषांकडून दुसर्‍याच कसल्यातरी जीवनातल्या रंगांची चमक दाखवली जाते.


एकदा काय गंमत झाली ते सांगते.मी एका पुस्तक विक्रीच्या दुकानाच्या बाहेर उभी होते.एक भिकारी दिसणारी बाई,माझ्या जवळ आली आणि तिने हात पुढे केला.तिच्या नजरेत माझी नजर गेली आणि मी माझा हात तिच्या हातात दिला.तिने मला सांगून टाकलं की मला फक्त हातात हात देण्यासाठी तिने हात पुढे केला.मी तिचा हात हातात धरून दोन शब्द बोलले.ती हसली आणि पुढे निघून गेली.आमच्या दोघांमधला थोड्याच वेळेचा पण तो जोरदार विनिमय होता.मला वाटतं,कदाचीत आम्हा दोघांमधला माणूसकीचा संपर्क तिने त्यादिवशी अनुभवला असावा.आणि हा संपर्क मी जो तिला दिला तो माझ्या औदासीन्याने,त्यातल्या सर्व क्लिष्टता ठेवून, मला जो दिला होता त्यातला होता."


मालतीने सांगीतलेला तिचा सर्व अनुभव मी माझ्या बहिणीला आणि भाचीला थोडक्यात सांगीतला.
माझी बहीण मला म्हणाली,
"मालतीचं ते बाथरूम मधलं प्रात्यक्षीक आणि भिकारी बाईशी आलेला संपर्क ही सर्व ज्यादा माहिती म्हणून लक्षात घेऊन झाल्यावर,मला वाटतं तात्पर्य हेच की ह्या व्यथेशी सामना करायला हवा.मनातल्या मनात कुढत राहू नये.आणि सर्वाशी संपर्कात रहावं."




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
 

Tuesday, February 7, 2012

अजाण असण्यातली क्षमता.




"माझा तर्क असा आहे की,मी उमेदीतून निर्माण होणार्‍या जादूवर आणि चमत्कारावर विश्वास ठेवायला लागलो आहे."


श्रीपादबरोबर माझा नेहमीच संवाद चालू असतो.आम्हा दोघांना ही सवय,सकाळच्या नऊ-पाचच्या अंधेरी-चर्चगेट डबल फास्ट आणि संध्याकाळच्या सहा-पाचच्या चर्चगेट अंधेरी स्लोमधे स्त्रीयांच्या फर्स्टक्लासच्या डब्याला लागून असलेल्या चिंचोळ्या दरवाजाच्या फर्स्टक्लासच्या डब्यात बसून लागली आहे.सकाळचा विषय कधीकधी आम्ही संध्याकाळीपण चालूच ठेवतो.


"माणूस कित्येक गोष्टीबद्दल अजाण असतो.प्रत्येक बाबतीत त्याला प्रूफ मिळेलच असं नाही.तरीपण एखाद्या गोष्टीबद्दल अजाण असणं म्हणजे कोणताच कमीपणा मानण्याची गरज नाही असं मला वाटतं."
मी श्रीपादचं मत काय आहे हे समजण्यासाठी एकदा त्याला म्हणालो.


"मी ज्या गोष्टीबद्दल जाणकार नाही त्यात असलेली क्षमता काय असते त्याबद्दल मला विशेष वाटतं."
श्रीपादने आपलं मत सांगायला सुरवात केली.
पुढे मला म्हणाला,
"ज्यात ठोस पुराव्याची आणि संभवतः,विश्वाबद्दल आणि आपल्याबद्दल माहितीची प्रचुरता आहे त्या गोष्टीबद्दल मी म्हणत नाही.बरचसं माझं जीवन, प्रकाशाच्या गतीबद्दल माहिती नसूनही,सुखाने पार पडलं आहे.किंवा माझ्या,पदार्थविज्ञान शास्त्राच्या शिक्षकाकडून मी जे काही शिकलो त्याची माहिती असून-नसूनही माझं जीवन सुखाने पार पडलं आहे.मला माझ्या शाळेत मिळालेल्या गुणावरूनही सिद्ध होईल की मला कितीतरी गोष्टी माहित नाहीत.


नव्हे,नव्हे मी त्या गोष्टीबद्दल म्हणत आहे की ज्या गोष्टींची तत्वतः माणसाला जाणकारी नसावी.
अर्थात काही मोठ्या गोष्टींची अलबत अजाणता असते. म्हणजे देवाचं अस्तित्व आहे की नाही?
आपल्या अस्तित्वातला अर्थ काय आहे?.
कष्ट-आपत्तीची भूमिका काय असावी?
ह्या असल्या गोष्टींही आपल्याला अजाण असल्याबद्दल मी  म्हणत नाही.
लहान लहान गोष्टींच्या अजाणतेबद्दल मी म्हणत आहे.


माझी खात्री आहे की, फुलपाखराच्या पंखाची फडफड आणि त्या फडफडीचा जगाच्या दुसर्‍या कोपर्‍यात त्याचे काय पडसाद होतात त्याची टिप्पणी तुमच्या वाचनात आली असेल.
ह्या असल्या अजाणतेच्या प्रकारावर मी विश्वास ठेवायला लागलो आहे.माझं मध्यवय जसजसं उडून चाललं आहे तसतसा माझा विश्वास ह्या बाबतीत बळावत आहे.


माझ्या मनातली मी तुम्हाला एक गंमत सांगतो.हल्लीच कधीतरी मी सकाळीच फार्मसीमधे औषधं आणायला गेलो होतो तेव्हा काऊंटरवर बसलेल्या त्या बाईचं आणि माझं हसणं झालं त्या हसण्य़ाने तिच्या त्या संबंध दिवसावर काय परिणाम झाला असेल कुणास ठाऊक.मला तरी वाटतं काहीतरी परिणाम झाला असावा.माझ्या मागोमाग येणार्‍या दुसर्‍या गिर्‍हाईकाकडे ते हसू तिने सुपूर्द केलं असावं.आणि ते गिर्‍हाईक दुकानाच्या बाहेर बसलेल्या गुरख्याबरोबर हसलं असावं.एका वयस्कर माणसाच्या हातातल्या पिशव्या गाडीत ठेवायला त्या गुरख्याने मदत केली असावी.गाडी चालू करून घरी जात असताना मनात विचार येऊन तो काही अगदीच एकांडा नव्हता असं वाटून घरच्या पायर्‍या चढताना तो वयस्कर गृहस्थ आपल्या शेजार्‍याशी हसला असावा.त्या शेजार्‍याने त्या वयस्कर गृहस्थाला चहाचं आमंत्रण देऊन नव्या वर्षाच्या दिवशी त्याच्याशी जुन्या आठवणी काढून गप्पा मारल्या असाव्यात आणि दोघांनीही जीवनात चार आनंदाचे क्षण समाविष्ट केले असावेत."


हे सर्व ऐकून घेतल्यावर मी श्रीपादला म्हणालो,
"ही सर्व तुझ्या कल्पनेची भरारी तर नसावी?कदाचीत तुझ्यात थोडं बळ येण्यासाठी तर नव्हे?किंवा कदाचीत तुला माहितच नाही.अजाणतेचा हा चमत्कार, रोजच तुला जो काही  माहित आहे तो तुझ्यातला चांगुलपणा तुला इतराना वाटण्याच्या प्रयत्नात ठेवीत असावा."


श्रीपाद मला म्हणाला,
"अजाणतेत असलेली क्षमता समजायला मला खूप वर्ष काढावी लागली.जीवनातली आरामदायी वर्षं,चांगलं घर,ताटात सुग्रास अन्नं,वंचित न राहिल्याची,मी कधीही भुका न राहिल्याची किंवा बेचैन न राहिल्याची ती अनेक वर्षं जी मी पार करून गेलो ती बहुदा अजाणतेच्या क्षमेतेमुळेच असावीत असं मला वाटायला लागलं आहे.


जशी वर्षं गेली तसं जीवन काय आहे ते मला कळलं.मला वाटतं अनेक वर्षं गेल्यावर सर्वांनाच जीवन काय आहे ते समजायला अनुभव मिळतो.मित्र मंडळी गेली,नातेवाईक गेले,कठीण दिवस आले आणि गेले.माझ्या प्रियजनांचं तसंच झालं.
प्रौढ वयातलं जीवन जगताना, जे काही असतील ते आनंदाचे आणि विपत्तिचे क्षण आपण सर्व अनुभवतो, तेव्हाच अजाण असण्याबाबत मी विचार करायला लागलो.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मला एक मुल आहे.आणि कुणाही आईवडीलाना माहित असावं की जीव जन्माला आणणं म्हणजे सर्व गोष्टीत बदलाव करून घेणं.
मी आशावादी राहून,प्रयत्नात राहून ज्याच्यावर माझं खूप प्रेम आहे त्या माझ्या मुलासाठी हे जग चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्नात राहिलो,मला वाटतं अजाणतेच्या क्षमतेनेच माझे डोळे उघडले."


"अजाण असणं हे एव्हडं महत्वाचं नाही.जाणकारी नसतानाही,कशाही तर्‍हेने प्रयत्न करून दयाळू रहाण्यात खरी क्षमता असते."
माझ्या मनातला विचार मी श्रीपादला सांगीतला.


"माझा तर्क असा आहे की,मी उमेदीतून निर्माण होणार्‍या जादूवर आणि चमत्कारावर विश्वास ठेवायला लागलो आहे.
उमेद काय असते ह्याबद्दल मी अजाण आहे. पण ती उमेद मनात बाळगून आजच्या दिवशी तरी माझं जग थोडसं चांगलं झालं आहे. आणि प्रत्येक दिवशी,एक हसूं,एक लोभस शद्ब,एक हात वर करून केलेला सन्मानाचा भाव,ह्या सर्व गोष्टीमुळे माझं जग आणखी चांगलं व्हायला मदत होईल.आणि हे सुद्धा त्याबद्दल मी अजाण राहूनही."
मला श्रीपादने आपला विचार सांगून टाकला.


चर्चगेटला गाडी आल्यावर उतरता उतरता मी
श्रीपादला मी म्हणालो,
"हे तुझं म्हणणं ऐकून मला तुझ्याशी आणखी सहमत न होणं अशक्य आहे"



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, February 4, 2012

जणूकाही....




"सर्व गोष्टी शक्यतेत सामाविष्ट करता येतात पण मला वाटतं मी व्यवहारिक माणूस म्हणून सध्या किंवा पुढेही त्या शक्यता माझ्यापासून दूरच ठेवाव्यात."


त्यादिवशी रमाकांत मला म्हणाला,
"कधी कधी मला वाटत असतं की,आपण सर्व माणसं जे आपल्याला विश्वासार्ह वाटतं त्यावरच विश्वास ठेवतो का?आणि नंतर मी मलाच विचारतो,
"मी पण मला विश्वासार्ह वाटतं त्यावरच विश्वास ठेवतो का?"
आणि क्षणभर माझी मलाच भीती वाटते.आणि स्वतःला म्हणतो,
"नाही नाही,मुळीच नाही"
पण आता मी,ज्यावर विश्वास आहे ते सांगत असताना,मला असं वाटतं की,ती शक्यता आपल्या मनात ठेवलेली बरी."


हे रमाकांतचं बोलणं ऐकून मला बोलल्याशिवाय रहावलं नाही.मी थोडा विचार करून त्याला म्हणालो,
"मला असं वाटत असतं की,कुठेतरी जीवनात आढळणार्‍या सर्व प्रश्नांना पूर्ण स्पष्टीकरण आहे.कुठेतरी पूर्ण सत्य अस्तित्वात आहे.आणि कधी कधी आपण त्या सत्याबद्द्ल जागृतही असतो.फक्त त्याचं आपल्याला स्पष्टीकरण देता येत नाही.अगदी स्पष्टीकरणाच्या जवळ जवळ जाऊन आपण एव्हडंच म्हणू की,
"जणुकाही"
"जणुकाही मी देवाबरोबर चालत होतो"
किंवा
"जणुकाही मला एकाएकी जीवनाचा सर्वार्थ कळला"
आणि त्यानंतर वेळ निघून जाते."


रमाकांतला माझं जणूकाहीबद्दलचं म्हणणं पटलं असं दिसलं.
"मला वाटतं की,बर्‍याचश्या आपल्या धर्मावरच्या श्रद्धा आणि तत्वज्ञान संबंधीच्या श्रद्धा,तसंच आपली बरीचशी कारीगरी-मला वाटतं ते सर्व क्षण माणसाचे  पुनःप्राप्तिसाठीचे प्रयत्न असतात.
माणसाचे "जणूकाही"ची चित्र किंवा वाटलं तर दृष्टांत म्हणा,सत्याचे काही आनंदमय आभास देऊ करतात पण पूर्ण सत्य मात्र नव्हे.निदान काही झालं तरी माझ्यासाठी नव्हे."
असं सांगून माझ्या मुद्यावर आपलं सत्याबद्दलचं मत त्याने देऊन टाकलं.


आणि रमाकांतने पुढे सांगून टाकलं,  
"तसं पाहिलंत तर माझ्या ह्या विचाराच्या स्तरावर मी साधारण पस्तीस वर्षाचा होतो तेव्हा येऊन ठेपलो होतो.म्हणजे बरोबर पंधरा वर्षा पूर्वी.पण मी पाहिलं मला तिथे विराम देता आला नाही.काहीसा,कुठेच काही नसल्याच्या मध्यावरही विराम देता आला नाही."



मी "जणूकाही" बद्दलच्या माझ्या मनात असलेल्या चित्राचा विस्तार करून रमाकांतला म्हणालो,
"माझं मला वाटू लागलं की,वास्तववादी श्रद्धा जोपासून मला माझं जीवन जगलं पाहिजे.सरतेशेवटी मी माझं स्वतःच चित्र रेखाटलं.मी म्हणेन ते चित्र कुठच्याही आघाताने प्रभावित होऊ शकणार नाही असं होतं.ते अशा तर्‍हेने कल्पित केलं गेलं होतं की,जीवनातल्या होऊ घातलेल्या निराशापासून माझं संरक्षण होऊ शकतं.पण त्यात कायमचं सूख मिळण्याच्या योजना नव्हत्या.पृथ्वीवरचं स्वर्गीय सूख नव्हतं.आणि आकाशमंडळातला आशेचा तारा नव्हता.ह्या सर्व गोष्टी शक्यतेत सामाविष्ट करता येतात पण मला वाटतं मी व्यवहारिक माणूस म्हणून सध्या किंवा पुढेही त्या शक्यता माझ्यापासून दूरच ठेवाव्यात."


रमाकांतला माझी ही चित्राबद्दलची कल्पना आवडलेली दिसली.हसत हसत मला म्हणाला,
"माझं चित्र दाखवतं की जीवन हे एखाद्या कारागीराने हातात घेतलेल्या कामासारखं आहे.तो स्वतः कारागीर असून चांगलं काम करण्याच्या तो प्रयत्नात आहे.आणि ह्या कामातूनच काम फत्ते होत असताना त्याला सुखावल्यासारखं होत आहे.
माझ्या लक्षात आलं आहे की,हा कारागीराचा तत्वविचार मला जे मी काय करीत असतो त्या प्रत्येक गोष्टीशी प्रयोग म्हणून वापरू शकतो.मग मी माझी सायकल दुरूस्त करीत असेन,एखादा निबंध लिहित असेन नाहितर राजकारणात भाग घेत असेन किंवा असंच काहीतरी करीत असेन.मात्र त्यातून मी एक कामाचा चांगला नमूना तयार करीत असेन. मी स्वतःच एक चांगला नमूना होत असेन.

अर्थात तुम्ही विचाराल चांगला ह्या शब्दाचा अर्थ काय?मी म्हणेन जसा मी तो नमूना चांगला पहात आहे तसा.मला वाटतं तुम्हीही चांगला म्हणाल जसा तुम्हाला वाटतो तसा.परंतु, ह्यामुळेच बरेच वेळा आपण सर्व मिळून एखाद्या गोष्टीचा असाच विचका करतो.पण हा सर्व विचका आपल्याकडून होऊन सुद्धा आपण उद्यासाठी आपली प्रगति करीत असतो."


आमच्या दोघांच्या संवादाला समारोप आणण्याच्या दृष्टीने मी रमाकांतला म्हणालो,
"भविष्यात उद्या आलेलाच असतो.उद्या आपण प्रयत्न करू.आणि असे अनेक उद्या माणसाच्या जीवनात येत रहाणार.मला वाटतं माणसाचं सूख प्रयत्न करण्यात असतं.अगदी परत परत प्रयत्न करण्यात असतं."
परत ह्याच विषयावर पुन्हा कधीतरी आणखी चर्चा करूया असं मी रमाकांतला उठता उठता सांगीतलं.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॉलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, February 1, 2012

लहान गोष्टींचा मोठेपणा.




"मीच का असा लहान लहान गोष्टींच्या मोठेपणाचा मोह पाडून घेणारा एकटाच असावा? माझी तशी अपेक्षा नाही."


माझ्या पुतण्याला बिझिनेस मॅनेजमेन्ट शिकण्यासाठी अहमदाबादला जायचं होतं.माझा भाऊ मला माझ्या घरी येऊन एकदा सांगत होता.माझा मित्र वामन खारकर अहमदाबादलाच हे शिक्षण घ्यायला फार पूर्वी गेला होता ते माझ्या भावाला माहित होतं.वामनकडून थोडी माहिती काढून घ्यावी
म्हणजे तिकडे रहायची सोय कशी आहे.होस्टेलचं जीवन कसं असतं.काटकसरीत कसं रहायचं.
काय काय वस्तू आणि गोष्टी इकडून घेऊन जायच्या वगैरे माहितीवर जर थोडा प्रकाश पडला तर बरं होईल हे माझ्या भावाचं म्हणणं होतं.


एकदा मी माझ्या भावाला आणि पुतण्याला घेऊन वामनच्या घरी गेलो आणि तुझा अनुभव सांग म्हणून वामनला विनंती केली.जुन्या गोष्टी चघळून चघळून सांगायला वामनला खूप आवडतं.त्याला मी विनंती केल्यावर त्याने लागलीच अशी सुरवात केली.  
वामन म्हणाला,
"मला लहान लहान गोष्टींचा मोह होतो.लहान,लहान म्हणजे क्षुल्लक गोष्टीबद्दल मी म्हणत नाही.त्या क्षुल्लक गोष्टी ज्यामुळे जीवनात काही लोकांना साधा आनंद मिळतो त्या नव्हेत.किंवा त्या क्षुल्लक गोष्टी, जश्या गोंधळून टाकणार्‍या इलेक्ट्रॉनीक गॅजेट्स, ज्यामुळे काही लोकांना विचित्रप्रकारचा आनंद होतो त्या नव्हेत.ज्यात कलात्मक वास्तु किंवा चित्र अगदी साध्या पद्धतीत आणि साध्या रंगात तयार करून दाखवण्याचा फार पूर्वी अट्टाहास करून दाखवला जायचा त्याही नव्हेत.त्या फारच तथ्यात्मक असायच्या.
मला त्या लहान गोष्टींचा मोह होतो ज्या अगदी कमी जागा व्यापतात.सध्याच्या जगात ज्याला दीर्घाकार किंवा भारी-भक्कम म्हटलं जातं तशा गोष्टी माझ्या बाबतीत थोड्या अनुपयुक्तच आहेत.


माझ्या लहानपणी,मला नक्कीच कबूल करावं लागेल,होत गेलेल्या संस्कारामुळे,
"मोठ्ठं म्हणजे चांगलं"
ह्या म्हणण्याला मी चिकटून असायचो.
सर्वात मोठा आईसस्क्रीम कोन? मस्त.
भावंडाबरोबर, सर्वांत मोठी झोपायची खोली मिळण्यासाठी,हुज्जत व्ह्यायची.त्यासाठी,गाल फुगवून रुसल्यासारखा चेहरा करून,आईकडे कुरकूर करून झाल्यावर,कितीही भोळसट असलं तरी लहान खोलीसाठी कोण कबूल होईल.?


पण मात्र कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी शहरात आल्यावर अठरा वर्षाच्या त्या वयात होस्टेलमधे,रिवाजाला अनुसरून,अगदी न्यानो गाडीच्या आकाराची लहानशी खोली पत्करावी लागायची.आणि त्याच्या पुढे जाऊन,एव्हडीशी ही खोली,दुसर्‍या एखाद्या अनोळख्याबरोबर विभागून घ्यावी लागायची.आणि तोही अनोळखी जाडा-लठ्ठ असायचा.


एकाएकी जागेचं महत्व फुलल्यासारखं दिसायला लागलं.पहिल्याच वर्षी, कॉलेजच्या शिक्षणासाठी आलेल्या इतर मुलांसारख्या मला,होस्टेलच्या समोर असलेल्या फॅन्सी स्टोअरमधे जाऊन महागड्या वस्तु विकत घेताना काही प्लास्टीकची भांडी जी एकावरएक ठेवता येतात,टांगून ठेवता येतात,लोटून ठेवता येतात,पण बर्‍याच वेळेला त्याची झांकणं नीट लागत नाहीत अशी भांडी विकत घ्यावी लागली.
असं असताना माझ्या बेडच्या खाली ती ठेवल्यावर जागेची थोडी बचत झाली.पण बरेच वेळा त्या भांड्यांचा वरचेवर वापर न झाल्याने त्यांच्यावर जी धूळ साचायची ती बघून धूळ माखवून ठेवण्यासाठीच त्याचं योग्य डिझाईन केलं गेलं आहे असं वाटायचं.


कॉलेजच्या शेवटच्या किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षात पदार्पण केल्यावर होस्टेल सोडून बाहेर कुठेतरी जागा शोधावी लागायची.काही बरोबरची मुलं जरा मोठाल्या खोल्या घेऊन रहायला लागली.मी मात्र माझे सामानाचे खोके घेऊन एका जुन्या उंच इमारतीमधे रहायला गेलो.त्या इमारतीचं नाव होतं "रिच पर्सन्स टॉवर".पण माझी खोली मात्र न्यानो सारखी लहानशीच होती.पण ती माझीच स्वतंत्र खोली होती.त्या खोलीत लहान लहान गोष्टी मावत होत्या.जशा हलक्या वजनाचा कंप्युटर,पुस्तकाचं छोटंसं कपाट,लहानश्या कपबशा ज्या अंगठा आणि दोन बोटात मावायच्या.त्यांना हाताचा सबंध पंजा उघडून पकडायची गरज नव्हती.आणि एका कोपर्‍यात, चुकून कोणी पाव्हणा-लावणा आलाच तर,त्याला बसायला माझ्या आजोबांची लहानशी खुर्ची
ठेवली होती.माझ्या वडीलांची ऐसपैस आराम खुर्ची ठेवून मला जागा अडवायची नव्हती.माझ्या ह्या खोलीत मला मी सवय करून घेतली ती अशी की रोजच्या लागणार्‍या आवश्यक गोष्टी माझ्या बिछान्यापासून एक दोन पावलावर मिळण्यासारख्या असाव्यात.त्यामुळे उरलेली खोली रिकामी असायची.


माझ्या ह्या गिचमिड करून रहाण्याच्या कॉलेजच्या सवयीला मागे टाकून आता् माझा हा लहान गोष्टीचा मोह पूर्वी पेक्षाही फारच प्रभावशाली ठरला आहे.आता जरी मला मोठी जागा-अपार्टमन्ट-घ्यायला परवडत असलं,चित्त-आकर्षक टीव्ही घ्यायला परवडत असलं आणि भली मोठी गाडी ठेवणं परवडत असलं तरी त्याच्या अनुनयाच्या संभावना त्यापेक्षा कमीच झाल्या.


वीजेच्या वापराच्या किंमती वाढायला लागल्याने,वीजेवर चालणार्‍या आधुनिक उपकरणाचा वापर,पेट्रोलचे भाव आणि माझा बॅन्क अकाऊन्ट ह्यांचा मेळ बसवण्याकडे अगदीच दुर्लक्ष करणं असंभवनीय झालं होतं.शिवाय मोठ्या गोष्टी खरेदी करण्यात लागणारी किंमत,लहान गोष्टीच्या खरेदीच्या मानाने संकटसूचक दिसू लागल्या.आणि लहान गोष्टीने सर्व काही भागून जायचंच म्हणा.
सुदैवाने,मला लहान लहान गोष्टींच प्रारूप नेहमीच जास्त दिखावटी वाटत असतं म्हणा.


मीच का असा लहान लहान गोष्टींच्या मोठेपणाचा मोह पाडून घेणारा एकटाच असावा? माझी तशी अपेक्षा नाही. आणि ते सुद्धा प्रचंड मोठ्या गोष्टीची चुरस करणार्‍यात आणि इतरांसारख्याच गोष्टी घेण्यात कल असणार्‍यांत?निदान आशा करायला हरकत नसावी."


वामनचा हा तिरका उपदेश आणि त्याने दिलेली माहिती मला नीट कळली.माझ्या भावाने वामनला आणखी बरेच प्रश्न विचारले.तेव्हड्यात वामन आमच्यासाठी चहा करायला आत गेला.ते पाहून मी माझ्या भावाला हळूच सांगीतलं की,मीच तुला सर्व समजावून सांगेन.चहा पिऊन झाल्यावर
वामनचे आभार मानून आम्ही जायला निघालो.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com