Sunday, October 31, 2010

मला पुस्तकातला किडा म्हटलं तरी चालेल.

“ज्ञान मिळवण्यातली खरी मजा ही की,ते तुमच्याकडून कुणीही हिसकावून घेऊ शकणार नाही.”

मधूकर ह्यावेळी बारावीत पहिल्या दहात आला असं मला माझा मित्र रमेश पराडकर यांनी फोन करून आपल्या मुलाबद्दल सांगीतलं,तेव्हा त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो होतो.
त्याचे बरेच मित्र त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमले होते.त्याच्या कामगीरीची स्तुती करीत होते.मला ते बघून मधूकरबद्दल अभिमान वाटला.
सर्व सोहळा संपल्यावर मधूकर,त्याचे वडील आणि मी,गप्पा मारीत बसलो होतो.

मी मधूकरला म्हणालो,
“तुझे बाबा मला नेहमी म्हणायचे,की तुला सर्वजण पुस्तकातला किडा म्हणून चिडवत असतात.आणि त्याची तुला कधीही खंत नसायची.तू आता दाखवून दिलंस की, खणखणीत यश मिळवण्या्साठी किती परिश्रम घ्यावे लागतात. पुस्तकाचा किडा झाल्याशिवाय हे कसं शक्य होईल.”

मधूकर चेहरा आनंदीत करून अभिमानाने मला म्हणाला,
“हो! मी म्हणतो पुस्तकीकिडा.सर्व साधारणपणे पुस्तकातल्या किड्याबद्दल गैरसमज असा असतो की,त्यांच्या डोळ्यावर जाड ढापणं असतात,कंबरेला पट्टा असतो,दिलीप प्रभावळकरच्या भुमिकेतल्या बावळटासारखे दिसणारे ते असतात.आणि ते शिकत असताना काय करतात तर,पुढच्या वर्गाचा अभ्यास करतात,टीव्हीवर नेहमी डिस्कव्हरी चॅनल पहात असतात,मुलींनकडे वळून पण पाहत नसतात,आणि त्यांच्या जवळ नेहमीच पॉकेट कॅलक्युलेटर असतो.
काहींच्या बाबतीत हे खरंही असेल.आणि जे स्वतःची असली छबी अभिमानाने प्रदर्शीत करतात ते करो बाबडे!.”

मला त्याचं हे म्हणणं ऐकून वाईट वाटलं.मी त्याला म्हणालो,
“मला विचारशील तर तुमच्या सारखी हुशार मुलं,प्रत्यक्षात मात्र मनाला लावून घेत नाहीत.गुप्तता बाळगतात.आणि सांगायचं झाल्यास,वेळात वेळ काढून अभ्यास करण्याची तुमच्यात गुप्त क्षमता असते,तुम्ही वर्ग संपल्यानंतर गुरूजींना प्रश्न विचा्रता,तुम्हाला किती गुण मिळाले ते कुणाला सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि प्रत्यक्षात छुप्या पद्धतिने एकप्रकारे अभ्यास करण्यात मजा घेत असता. तुमचं हे वागणं कुणाला रुचलं जाणार नाही अशा लोकांत तुम्ही पुस्तकीकिडा असल्याचं प्रकट करून दाखवता.वयक्तिक दृष्ट्या मला त्यात काही गैर वाटत नाही.”

माझं म्हणणं ऐकून मधूकरचा चेहरा आनंदाने प्रफूल्लीत झाला.मला म्हणाला,
“मलाच मी प्रश्न विचारण्यात सदैव दंग असतो.माझी दृष्टी कमजोर असल्याने मी सदैव चष्मा वापरतो, पुढच्या वर्गात जाण्याची तयारी करीत असतो कारण माझ्या आईबाबानां तेव्हडाच शिक्षणाचा खर्च कमी यावा म्हणून,कॅलक्युलेटर वापरतो कारण मी काही आयीनस्टाईन नाही,अभ्यासात दंग असतो की लवकरात लवकर मी पदवीधर व्हावा म्हणून. त्याशिवाय वेळोवेळी पुस्तकं वाचत असतो कारण माझं ज्ञान वाढत असतं,रोज नवीन नवीन शिकायला मिळाल्याने ते शाळेत किंवा जीवनात नवीन उद्भवणार्‍या प्रश्नापासून सूटकारा देत असतं.

भरपूर परिश्रम घेऊन जास्तीत जास्त शिक्षण घ्यावं असं मला नेहमीच वाटत असतं.
जॉब असो,खेळ असो किंवा आणखी कुठचाही उपक्रम असो त्यांना सामना करताना चांगला दर्जा ठेवून काम करावं असं मला वाटत असतं. पार्ट्यांना जाऊन वेळ दवडण्यापेक्षा मला ह्यात स्वारस्य आहे.”

“पुस्तकं वाचत रहावं की पार्ट्यांना जावं यात काय निवडावं ह्याचं विवरण करावं असं तुला वाटणं सहाजीक आहे.
आलेला प्रत्येक हताश करणारा क्षण,एक,एक पावलाने तुला तुझ्या ध्येयाकडे नेत असतो असं मला वाटतं.
वाचलेलं प्रत्येक पुस्तक,क्रिकेट खेळातल्या कौशल्यापेक्षा, तुझी प्रगति करीत असतं,जर तू गावस्कर किंवा तेंडूलकर नसालस तर.”
मी मधूकरला म्हणालो.

“जास्त करून,हे सर्व संपादन करण्यात अटकाव आणायला माझा मीच कारणीभूत होण्याचा संभव आहे.
कुणीतरी म्हटलंय ते मला आठवतं की,
“ज्ञान मिळवण्यातली खरी मजा ही की,ते तुमच्याकडून कुणीही हिसकावून घेऊ शकणार नाही.”
मधूकर मला म्हणाला.

“म्हणूच तुला कुणी पुस्तकातला किडा म्हटलं तरी चालण्यासारखं आहे.”
उठता उठाता मी मधूकरला शुभेच्छा देत म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, October 28, 2010

सुधाताईची आजी.

“कुणीतरी म्हटलंय,
असं जीवन हे अपूर्व जीवन असतं,अगदीच थोडक्याच वेळात बरंच शिकण्यासारखं हे जीवन असतं.”

सुधाताईची आजी बॅण्ण्व वर्षाची झाली हे मला अलीकडेच कळलं.आणि तशात तिला स्मृतिभ्रम झाला आहे हे आत्ताच सुधाताईकडून कळलं.वाटलं आपण सुधाताईकडे जाऊन आजीला भेटून यावं.ती मला ओळखेल की नाही असं मनात आलं.पण तिने मला चांगलंच ओळखलं.मला बरं वाटलं.

सुधाताई बोलताना मला म्हणाली,
“घरात वृद्धावस्थेत असलेल्यांची-जेव्हा त्यांना स्वतःचीच काळजी घेणं शक्य होत नाही अशांची- सेवा करायला मला खूप आनंद होतो.
बोलायला सोपं आहे पण मी “शंभर गोष्टी” करण्याच्या यादीतून-जशा मी तुमच्यावर खूप माया करते असं मुलांना सांगावं,दारात आलेल्या पाहूण्याची विचारपूस करावी-अशा यादीतून ही गोष्ट निवडीत नाही.वृद्धावस्थेत असलेल्या लोकांची सेवा करणं म्हणजे जीवन कसं जगावं हे दाखवून दिलं जातं असंच नाही तर, मी पूर्ण विश्वास ठेवते की तेच खरं जीवन आहे.”

मी सुधाताईला म्हणालो,
“तुझ्या आजीला एकाएकी असं काय झालं?”

मला ती म्हणाली,
“माझी आजी बॅण्णव वर्षांची आहे.ती कित्येक दिवस माझ्या मामाकडे रहात होती.ती कित्येक दिवस स्मृतिभ्रमाने आजारी असावी.तिला स्मृतिभ्रम होत असल्याची लक्षणं मला अलीकडे दिसायला लागली त्यापूर्वी मला कल्पना नव्हती. ह्या रोगाबद्दल मला थोडीशी माहिती आहे.वृद्ध मंडळी आपल्या भ्रमात घरातून बाहेर पडून हरवली जायची असं मी ऐकलंही होतं.पण माझी आजी तशी नव्हती. माझे आजोबा गेले त्यानंतर माझ्या आजीने स्वतःचं छोटसं जग निर्माण केलं होतं.एकटेपणापासून तिने आपला सुटकारा करून घेतला होता.आपल्या दोन मुलांबद्द्ल-म्हणजे माझ्या आईबद्दल आणि माझ्या मामाबद्दल-फिकीर करीत असायची.”

हळू हळू तिच्या मनात भ्रम निर्माण व्हायला लागला. एकटीच बसून रहायची.मला वाटायचं तिच्या तिच त्याला कारण असावी.ती आपल्या मेंदूला त्रास द्यायला तयार नसावी.तिलाच लोकांना-अगदी तिच्या वयाच्या-भेटायला आवडत नसायचं.

जसं मी मागे वळून पहायला लागली तसा तो काळ मला आठवायला लागला.मी तिची खुशामत करायची पण माझ्या म्हणण्याला मिळणारी तिची ती निष्क्रिय,आक्रमणशील सहमति पाहून,आता माझा मलाच अंचबा वाटायला लागला की मी स्वतः माझ्या आजीला किती अल्प ओळखायची. त्यावेळी माझ्या ध्यानातही आलं नाही की माझी आजी मोहक तर होतीच त्याशिवाय तिचा स्वभाव गुंतागुंतीचाही होता.”

हे सुधाताईचं ऐकून मला एक किस्सा आठवला.मी तिला म्हणालो,
“तुझी ही वृत्ति पाहून मला तो विनोद सांगीतल्याशिवाय राहवत नाही.
त्या तरूण नातवाला आपल्या आजोबांना जीवनाची सूत्रंच कळलेली नाहीत असं वाटायचं.जोपर्यंत हा तरूण वर्षभर कुठे जाऊन आला नव्हता तोपर्यंत,पण तो जाऊन आल्यानंतर आपले आजोबा किती सुधारले आहेत ते त्याला कळून आल्याने तो चकित झाला.तुझं तुझ्या आजीबद्दलचं मत असंच सुधारलं असावं.”

माझं म्हणणं ऐकून सुधाताई जरा खजील झाल्यासारखी दिसली.मला म्हणाली,
“अलीकडे बरीच वर्ष माझी आजी माझ्या आईकडे रहात आहे.त्यावेळी आईकडे जाउन रहायला तिला कष्टदायी विस्थापन वाटलं होतं.पण नंतर काही वर्षांनी ती स्थिर झाली.सर्व काही चांगलं चालत होतं.तिची तब्यत सुधारली होती.आणि माझी मदत घेऊन ती आपल्याला सांभाळून रहायची.कधी कधी तिचा स्मृतिभ्रम पाहून मला वैताग यायचा.मी बरेच वेळा तिच्या विचारांची विसंगति पाहून हर्षित व्हायची. माझं मन दुखे पर्यंत ती मला हंसवायची. तिचा तो शब्दाचा अनभिप्रेत दुरोपयोग,हिंदी शब्दाचा खरा अर्थ आणि तिच्या मनाने ठरवलेला अर्थ, आणि ती हिंदी भाषा समजण्याची अपात्रता : उदाहरणार्थ,आम्ही कुणी घरी नसताना जर का फोन आला तर ती घ्यायची.
एकदा अशाच फोनवरच्या विक्रेकराच्या बोलण्याला प्रतिसाद देताना “चीनी” ह्या शब्दाची ती गफलत करीत होती.
तो चीनी-मातीच्या भांड्यांच्या सेटबद्दल बोलत होता,आणि हिला चीनी म्हणजे साखर विकण्याबाबत वाटत होतं.मी आणि माझी आई,नेहमीच आजीच्या “मग”-म्हणजे नंतर- आणि “mug”-म्हणजे प्याला- ह्या शब्दातल्या अर्थाला आणि त्याच्या साम्य उच्चारातून होणार्‍या घोटाळ्यातून होणार्‍या विनोदाला पोट दुखे पर्यंत हंसायचो.अर्थात त्या हंसण्यामुळे तिच्या मनाला दुखू न देण्याच्या प्रयत्नात असायचो.
माझी आजी दोनयत्ता शिकलेली होती.पण ती कविता करायची.

आता ह्या वयात तिचा शरिरांच्या अवयवांवरचा ताबा गेला आहे.जेमतेम संपर्क साधते.बरेच वेळा मनातून घोटाळलेली असते, उदास असते,घाबरीघुबरी झालेली असते.पण माझ्या आजीची सेवा करणं म्हणजे माझ्या जीवनाशी माझा सामना आहे असं मी समजून असते.त्यात बड्पन आलं,वेदना आल्या,समस्या आल्या,विसंगति आली,दुःखान्त घटना आली आणि हो!
प्रसन्नता आणि आनंद पण आला.ह्यालाच मी खरं जीवन समजते.मृत्यु्कडे रोजच एकटक पाहिल्यासारखं हे जीवन आहे.”

उठता उठता मी म्हणालो,
“कुणीतरी म्हटलंय,
असं जीवन हे अपूर्व जीवन असतं,अगदीच थोडक्याच वेळात बरंच शिकण्यासारखं हे जीवन असतं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
Shrikrishnas@gmail.com

Sunday, October 24, 2010

माझा मोत्या.

“चवदा वर्षं माझ्या घरात राहून माझ्या मोत्याने मला जबाबदारीने कसं रहावं हे शिकवलं असेलच.पण त्यापुढे जाऊन मला त्याने जगावं कसं हे ही शिकवलं.”

सुरेशने मला आज खास घरी बोलावलं होतं.मी त्याला माझ्या घरी भेटलो नाही.पण त्याने घरी मला निरोप ठेवला होता. कशासाठी ते मला घरी आल्यावर कळेल असंही माझ्या पत्नीकडे सांगून गेला होता.
मी ज्यावेळी त्याच्या घरी गेलो तेव्हा तो त्याच्या हॉलमधे एका मोठ्या फ्रेममधे कुत्र्याच्या फोटोला हार घालून त्याच्या समोर बसलेला पाहिला.
मी विचारण्या पूर्वीच मला म्हणाला,
“आज मोत्याला जाऊन पंचवीस वर्षं झाली.दरवर्षी तो गेल्यापासून मी असाच एकटा त्याच्या फोटोला हार घालून त्याच्या समोर बसून,त्याच्या जुन्या आठवणी काढून तो दिवस संपवतो.”

“मग आज मला बोलावण्याचं काय खास कारण?”
मी सुरेशला विचारलं.

“मी लहान असताना माझ्या आईकडे मला एक कुत्रा हवा म्हणून हट्ट धरला होता.तुम्हीच तुमच्या एका मित्राकडून मला एक पिल्लू आणून दिलं होतं.माझ्या आईला समजावणं महाकठीण काम तुम्ही केलं होतं.आज मोत्याला जाऊन पंचवीस वर्षं झाली.त्यावेळची ती घटना लक्षात आल्यावर तुमची आठवण आली.”
मला सुरेश आठवण काढून काढून सांगत होता.

“मोत्या गेल्या नंतरच्या माझ्या आयुष्यात मला त्याच्याबद्दल काय काय आठवलं ते तुम्हाला सांगायला हाच दिवस योग्य आहे असं वाटून तुम्हाला माझ्या मनातले विचार जास्त भावतील असं वाटून मी तुम्हाला बोलावलं.”

“सांग,सांग मला ऐकायला आवडेल”
मी सुरेशला म्हणालो.

“जीवन सुखाने कसं जगावं ह्याबद्दल हवी असलेली सर्व माहिती मी माझ्या मोत्याकडून शिकलो.आता तो या जगात नाही.
मी तर म्हणेन कुणालाही त्यांच्या मुलांनी जबाबदारी घेऊन कसं रहायचं हे शिकवायला हवं असेल तर त्याच्यासाठी एखादा कुत्रा घ्यावा.पारंपारिक विवेक हेच शिकवतो.निदान माझ्या बाबतीत हे खरं ठरलं आहे.”
सुरेश सांगत होता.

“पण माझ्या मोत्याने मला बेजबाबदारीबद्दल पण जादा शिकवलंय,जे कुणा दुसर्‍याला माहित नसावं.
जेव्हा मी आठ वर्षाचा होतो,तेव्हा मी माझ्या आईला-जी घरात कुठचाही प्राणी ठेवायला घृणा करायची-समजावण्याच्या प्रयत्नात होतो की मला घरात एक कुत्रा हवाय म्हणून.आणि तुम्ही ते काम केलंत.
मोत्या केसाळ होता.आणि खूप प्रेमळ होता.ह्या व्यवहारातून मी एक शिकलो की माझी आई सौदा करण्यात बरीच चौकस होती.

मोत्या त्याच्या चवदा वर्षावर हे जग सोडून गेला.तो पर्यंत तो बराच म्हातारा झाला होता.प्राण्यांच्या डॉक्टराची आणि आईच्या संमतीची त्याने मुळीच मदत घेतली नाही.तो गेला त्या वयात त्याला बराच गॅस व्हायचा.त्या त्याच्या वयात मी कॉलेजात असल्याने,माझ्या आईनेच त्याची देखभाल केली होती.

पण त्यापूर्वी जवळ जवळ दहा वर्षं रोज दोनदा मी मोत्याला पावसात,थंडीत,उन्हाळात बाहेर फिरवून आणायचो.मी त्याला आंघोळ घालायचो,त्याच्या केसावरून ब्रश फिरवायचो आणि त्याची देखभाल करायचो.मला तो मित्रासारखा होता.माझा त्याच्यावर भरवंसा होता.
पारंपारिक विवेक जसं पुर्वानुमान काढील अगदी तसं मी जबाबदार तरूण कसा असावा तसा होतो.मी लग्न केलं.मला दोन मुलं झाली.गेली तिस-पस्तिस वर्षं रोज मी माझ्या जॉबवर जातो,घाईगर्दीच्या प्रवासातून वाट काढीत शिष्टाचार बाळगून जातो,मिटींग्सना नियमीत हजर रहातो,ऑफीसचं बजेट सांभाळतो, ऑफीसमधल्या सहकार्‍यांकडून होणार्‍या वयक्तिक समस्या-कदाचीत ते लहान असताना एखादा कुत्रा संभाळण्यापासून वंचीत झाले असल्याने उदभवणार्‍या समस्या-सोडवतो.

कुटूंबाच्या पोषणाच्या,कपडालत्याच्या,मुलांच्या कॉलेज शिक्षणाच्या आर्थीक जबाबदार्‍या संभाळून असतो. त्यांच्याकडून होणार्‍या चुकांच्या पण जबाबदार्‍या घेतो.वेळ आल्यावर घरात पत्नीला कामाला मदत पण करतो. कुटूंबातल्या कुणाच्याही वेळी-अडचणीला अंगमेहनत आणि हातमेहनतीलासुद्धा पुढे येतो.मला वाटत नाही की ह्या पेक्षा आणखी किती जबाबदार्‍यांना मी पुढे आलो असतो.

परंतु,प्रारंभापासून,माझ्या मोत्याने मला परिचय करून दिलेल्या,त्या सुखाने जगायच्या, गुढ आकांक्षांचा पाठपुरावा मी करीत राहिलो.
मोत्या कधीच संबंध दिवस कामात नसायचा.त्याने कधीच अंशतःही काम केलं नाही.एक पैसापण कमवला नाही. काही उपयोगी कामही केलं नाही.कधी लग्न केलं नाही,मुलंही झाली नाहीत.आणि त्यांची देखभालही केली नाही.कधी ट्रॅफिकमधे अडकला नाही,कुठच्याही मिटिंगमधे भाग घेतला नाही,बजेट संभाळलं नाही.एखादं वर्तमानपत्र वाचलं नाही की पुस्तक वाचलं नाही.टीव्ही पहाण्यात मोफत वेळ घालवला नाही की आतंगवाद्यांच्या काळजीत राहिला नाही.”

सुरेशला थोडंसं भावनाप्रधान होताना पाहून थोडी गंमत आणण्यासाठी मी म्हणालो,
“फक्त कदाचीत नंतरचं कुठचं झाड शोधू ह्या काळजीत राहिला असेल.आणि ते करतानासुद्धा प्रदुषणाचा काय असर होईल ह्याचा नीट विचार करीत राहिला असेल.”

सुरेशला हे ऐकून भडभडून आलं.मला डोळे पुशीत म्हणाला,
“माझा मोत्या,संपूर्णपणे,भाबडेपणाने आणि सुंदर ढंगाने बेजबाबदार राहिला.तो जसा होता आणि ज्यासाठी होता तसा मी त्याच्यावर प्रेम करायचो.

तुम्हाला माझ्याकडून ऐकून अचंबा वाटेल की, मला सदैव माझ्या जीवनातून काय हवं असेल तर,मोत्यासारखं टीव्ही बघताना माझ्या केसाळ पाठीवरून हात फिरवला जावा, सकाळीच समुद्राच्या वाळुतून मोकाट धांवत सुटावं,धो,धो पावसात संध्याकाळच्या वेळी पडवीत अंगाची कळवट करून एखादं शास्त्रीय गाणं कुणीतरी रेडिओवर मोठयाने लावलेलं ऐकावं.
चवदा वर्षं माझ्या घरात राहून माझ्या मोत्याने मला जबाबदारीने कसं रहावं हे शिकवलं असेलच.पण त्यापुढे जाऊन मला त्याने जगावं कसं हे ही शिकवलं.”

शेवटे मी सुरेशला म्हणालो,
“खरंच,माणसाला एव्हडं कळतं म्हणूनच तो सुखी आहे.तुझ्या सारखा एखाद्या पाळीव प्राण्यालासुद्धा माणूस समजून तो जगातून गेल्यानंतर त्याच्या आठवणीतून किती भाऊक होतो हे तुझ्याकडे पाहून आनंद होतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, October 23, 2010

अमेरिकेतला भारतीय बाप.

“कारण तिला पण नवऱ्याने असली कामं करावीत म्हणजे अप्रशस्त वाटायचं आणि मोठी माणसं पण आपली टिंगल करायची.त्यामुळे आपण त्यावेळी ह्या सर्व गोष्टी पासून परावृतच असायचो.”

आज प्रो.देसाई जरा खूष दिसले.त्यांच्या धाकट्या मुलीला मुलगी झाली होती.
दोन एक महिने झाले असतील.मला ती बातमी त्यानी या पुर्वीच सांगीतली होती म्हणा.
पण आज काही विशेष त्याना सांगायचं होतं असे त्यांच्या चेहऱ्यावरून मी अनमान काढलं.

“काय भाऊसाहेब आज विशेष काय?” असे मी म्हटल्यावर ते जरा खूसखूसून हसले.
मला त्याना काही तरी सांगायचं होतं.मला ते म्हणाले,
“सामंत ,काय हो तुम्हाला आठवतं का,ज्यावेळेला तुम्हाला पहिलं मुल झालं तेव्हा तुम्ही कधी त्याला कौतूकाने घेऊन फिरवत होता त्याचे कपडे बदलणं त्याचे आपण पुर्वी लंगोट म्हणायचो- त्याला इकडे डायपर म्हणतात- तसं काही तुम्ही बदलायचा का त्याला कधी मांडीवर घेऊन झोपवलं आहेत का तुम्ही?बहूतेक नसणार कारण तुमच्यावर ती पाळीच कदाचीत आली नसणार.पण इकडे बघा आमचे जांवई हे सर्व करतात.
त्याना म्हणे इकडे ट्रेनींग देतात.ही मुलांची सर्व कामं इकडे आई बाबानां मूल होण्यापुर्वी शिकून घ्यावी लागतात.
त्याना ही सर्व कामं करताना पाहून मला जरा कौतुक वाटतं.
बापाला दुधाची बाटली पण द्यायचं शिकवतात.
म्हणजे बघा बापाला जवळ जवळ आईची कामं शिकवतात. आणि हे बाबा पण ही सर्व कामं अगदी आनंदाने आणि अगत्याने करतात.
आता आजी आजोबा झाल्यावर नातवंडाची हीच कामं आपल्याला करायला किती आनंद होतो.
सामंत,तुमचं म्हणण काय आहे याच्यावर ते जरा विस्तारने मला सांगा बघू.”

हे त्यांचं म्हणणं ऐकून,
“मी थोडा विचार करून मला काय म्हणायचं आहे ते मी तुम्हाला उद्या आपण भेटू तेव्हा चर्चा करूं.”
असं सांगितलं.

दुसऱ्या दिवशी जेव्हां आम्ही भेटलो तेव्हा ह्या विषयावर उहापोह केला.
मी म्हणालो,
“भाऊसाहेब,ह्याला मुख्य कारण इकडची कुटुंब संस्था आणि इकडची(म्हणजे अमेरिकेतली) परिस्थीती मुख्यतः कारण असावी.
अहो,त्यावेळी भारतात आपल्या एकत्र कुटुंब संस्थेमूळे किती माणसं जवळ असायची बघा.
त्यामुळे मुलाची ही कामं करायची पाळी बापावर कशी येणार?.आणि इतकं असून तसं करायला जरी जायचं तरी एक म्हणजे त्या वयात थोडी लाज वाटाची आणि बायको पण कामं करू द्यायची नाही. कारण तिला पण नवऱ्याने असली कामं करावीत म्हणजे अप्रशस्त वाटायचं आणि मोठी माणसं पण आपली टिंगल करायची.त्यामुळे आपण त्यावेळी ह्या सर्व गोष्टी पासून परावृतच असायचो.
उलट इथे आईबाबा आणि मूल ह्या शिवाय घरात कोणच नसतं.गडीमाणसं इकडे परवडत नाहीत. आणि ही कामं एकट्याची नसून दोघांची असतात हे पटवलं गेल्याने- विशेष करून पुरुषाला- त्यामुळे असली काम करणं भागच असतं.
आणि दुसरं म्हणजे मदतीला आजी आजोबा जरी भारतातून आले तरे त्यांचा सहा महिन्याचा व्हिसा असतो मग सहा महिन्यानी ते गेल्यावर ही कामं कुणी करायची सांगा?

आपण आजोबा म्हणून जेव्हां नातवंडाचे कौतुकाने लाड करत असतो ना, त्याचं पण कारण एका अनुभवी व्यक्तीने मला समजावून सांगीतलं.त्याच म्हणणं असं की तरुण बाप असताना सुप्त राहिलेली कौतुक करण्याची इच्छा आपण अजोबा झाल्यावर वसूल करतो.कारण आजोबांची टिंगल कोण कशी करणार?.
तसंच आजीला पण वयोमनाप्रमाणे जमत नसल्याने आजोबाला पण असली कामं वाटून मिळतात.हे त्या अनुभवी माणसाचे तत्वज्ञान.मला हे पटतं भाऊसाहेब ,तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही मला उद्या विचार करून सांगा ह्यानंतर आम्ही हा विषय इथे संपवला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, October 22, 2010

मस्त हंसायला मला बरं वाटतं.

“मस्त हंसायला मला बरं वाटतं कारण आपल्या दृष्टिकोनात आपल्याला बदल करता येतो.अगदी कायमचा.कदाचीत ती गोष्ट -एक माणूस एका दारुच्या गुत्यात जातो वगैरे-तुम्हाला माहीत असेलच.तर मी खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही-थोडा वेळ का होईना- ती गोष्ट तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच आयुष्यभर तुम्ही ध्यानात ठेवलेली असणार.अर्थात दारू पिणार्‍याच्या दृष्टीकोनातून म्हणा.”
गप्पा गोष्टी करीत असताना गुरूनाथ मला असं सांगत होता.

गुरूनाथ तसा फारच बडबड्या म्हटलंत तरी चालेल.आणि त्याबरोबरीने तो सतत हंसतही असतो.पण एखादा विषय घेऊन काहीतरी तो सांगून जातो. म्हणून गुरूनाथ बरोबर थोडा वेळ टाकायला मला आवडतं.आज मी त्याला मुद्दाम विचारलं,
“प्रत्येक वाक्यागणीक तू हंसत असतोस.ह्याच्या मागचं तुझं गुपीत काय आहे?”
त्यावर त्याने वरील प्रस्तावना केली.

मी म्हणालो,
“मला ती तुझी दारू पिणार्‍याची गोष्ट माहीत नाही”

“तुम्हाला ती गोष्ट माहीत नसेल तर सांगतो.”
असं म्हणून गुरूनाथ सांगू लागला,
“एक माणूस दारूच्या गुत्यात जातो आणि तीन ग्लासीसमधे व्हिस्कीचे तीन पेग मागवतो.तो ते तिन्ही पेग पितो. असं तो रोजच गुत्यात जाऊन करतो.शेवटी गुत्याचा मालक त्याला सांगतो,
“मी ते तिन्ही पेग एकाच ग्लासातून तुला देऊ शकतो.पण तो माणूस त्याला सांगतो,
“मला असं प्यायला बरं वाटतं.माझे दोन भाऊ आहेत.ते माझ्या गावाला असतात.मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो.ह्या ग्लासातला हा पेग माझा भाऊ दत्तू ह्याचा आहे.आणि हा पेग गणूचा आहे,अशा पद्धतीने प्याल्याने आम्ही तिघेही एकत्र पित बसलो आहो असं मला भासतं.”

आणि हे असं रोजचं चाललेलं असतं.गुत्याचा मालक तीन पेग तीन ग्लासात घालून त्या माणसाला देत असतो.
आणि एकेदिवशी तो माणूस गुत्याच्या मालकाला म्हणाला,
“मला आज फक्त दोन ग्लासात दोनच पेग द्या.”
“काय झालं?तुझ्या एका भावाला काय झालं का?”
गुत्याच्या मालकाने त्या माणसाला विचारलं.
“नाही,नाही”
तो माणूस म्हणाला.
“ते दोघेही अगदी सुरक्षीत आहेत.फक्त मी स्वतः आजपासून पिणं सोडून दिलं.”
गुत्याचा मालक मस्त हंसला.आणि ह्या दारू पिणार्‍या माणसाबद्दलचा आपला दृष्टीकोन त्याने बदलला.

तर सांगायची गोष्ट अशी की,जीवनातल्या सर्व कटकटी आपल्या मनातून येतजात असतात.आणि रागा रागाने त्याच पाऊलवाटेवरून दणद्ण करीत त्या एकसारख्या जात असतात.जसं डोंगरावर चढून जाणारे यात्री मागे यात्रेकडे वळून पहातात,पण कधीही मनात आणत नाहीत की एखादी लवकर जाणारी,साफसुथरी,आणखी मजा आणणारी पाऊलवाट वर चढून जाण्यासाठी असू शकते का? पण नाही त्याच पाऊलवाटेवरून दणदण करीत ते जात
असतात.”

मला गुरूनाथची गोष्ट ऐकून खरंच हंसू आलं.
मी म्हणालो,
“परंतु,योग्यवेळी केलेली एखादी कोटी किंवा गोत्यात आणणारी एखादी चूक आपल्याला चिखलातून बाहेर काढू शकते.कारण ती खुबीदार असते आणि त्याचवेळी अनपेक्षीत असते.”

“अगदी बरोबर बोललात”
असं म्हणत गुरूनाथ सांगू लागला,
“कोट्या किंवा खसखस अशाच कामाला येतात.आपण एक अपेक्षीत असतो आणि मिळतं दुसरंच.आणि ते सुद्धा विकृत करून पण निश्चितपूर्वक उचित असणारं.जगाकडे तिरक्या नजरेने पाहिल्यावर ते पहाणं तुम्हाला चिकटून रहातं. अशावेळेला तुमचा मेंदू नवा संपर्क साधतो-मला अलंकारीक किंवा लाक्षणीक रूपाने म्हणायचं नाही,तर अगदी शब्द्शः,आणि प्राकृतिक रूपाने म्हणायचं आहे-जसं तुम्ही नवीन भाषा शिकता किंवा नृत्यकरायला शिकता
तस्सं.तुमच्या मनातलं सूत्रं पक्क झालेलं असतं.”

मी म्हणालो,
“गुरूनाथ, तुझं ह्या मस्त हंसण्याच्या संवयीच्या स्पष्टीकरणाने मला एक मुद्दा सुचला.
जसं एखादं मस्त हंसं दिल्याने जग तुमच्याकडे नव्या दृष्टीकोनातून पहातं,तसं असंच एखादं मस्त हंसं, चारतर्‍हेचे लोक एकत्र आणू शकतं.
एखादवेळेला आपल्या सर्वांची भाषा एक नसली तरी एखादा मुक चित्रपट पहात असताना,त्याच जागी जोरजोराने हंसत असलो तर क्षणभर एकाच जगात असल्यासारखे असतो.थोपलेल्या हद्दीच्या शब्दापलीकडच्या जगात असतो.”

माझं हे ऐकून गुरूनाथ हंसत राहिला.मला समजलं ह्याला काहीतरी आणखी सांगायचं आहे.
“तुमच्या ह्या मुक चित्रपटाच्या मुद्यावरून मला एक गोष्ट आठवली.”
असं म्हणत सांगू लागला,
“जर तुम्हाला दोन व्यक्ति मिळून-जुळून रहाणार्‍या आहेत ह्याचं भाकीत करायचं असेल तर कशामुळे ते हंसू शकतात ते पहावं लागेल.हे खरं आही की प्रेम असल्यावर जातपातीची,शिक्षणाची आणि भाषेची सीमारेषासुद्धा पारकरून जाता येतं तरी त्या जीवनात जर का हास्यमय काही नसेल तर तुमच्या दीर्घकालीन सुखाची कुणी खात्री देऊ शकणार नाही.”

“मी कुठेतरी हंसत राहिल्याने होणार्‍या फायद्याबद्दल वाचलंय ते तुला सांगतो”
असं सांगून मी म्हणालो,
“शरीरात हास्यामुळे एन्डोर्फीन उत्पन्न होतं,आणि ते तणाव कमी करतं,आणि प्रतिकार शक्ती बळकट करतं. हास्यामुळे शरीराला मिळणारे लाभ मिळवण्यासाठी खरोखरच काहीतरी हास्यजनक झालंच पाहिजे अशातला भाग नाही.तुम्ही नुसते हंसू शकता.तुमच्या शरीराला त्याचं कारण कळायची जरूरीच नसते.काही लोक समुदायात व्यायाम करण्यासाठी म्हणून नुसते हंसत असलेले मी पाहिले आहेत.”

गुरूनाथ म्हणाला,
“मला सांगा तुम्ही कधी अशा परिस्थितीत होता का?
काही लोक एकत्र जमून एखादी समस्या सोड्वण्याच्या प्रयत्नात आहेत.पण त्यांना ते कठीण झालं आहे.कारण त्या समस्येचं उलघडणं चटकन दिसत नाही.नंतर काही कारणाने त्यातला एखादा त्यातल्या प्रत्येकाला हंसवायला कारणीभूत होतो.अशावेळी तणाव कमी होतो आणि निर्मितीक्षमता उफाळून येते.आणि काही मिनीटातच उत्तर सापडतं.तोपर्यंत ते कुणाच्याही लक्षात आलेलं नसतं.हे अनपेक्षीत असतं, पण होऊन जातं.”

“सरदारजीवर केलेले अनेक विनोद मला आठवतात आणि हंसू येतं.पण ते तेव्हड्या पूरतंच.तसे बरेच विनोद मी ऐकले आहेत पण सर्वच आठवत नाहीत.”
मी गुरूनाथला म्हणालो.

“माझ्या जीवनात आलेल्या बर्‍याचश्या गोष्टींचं मला विस्मरण झालं आहे.एखादी गोष्ट सहजगत्या माझ्या लक्षात असेल अशी कुणी अपक्षी करू नये पण ज्या गोष्टीमुळे मला मस्त हंसू आलं असेल अशी कुठलीही गोष्ट मी कधीही विसरलेलो नाही.”
हंसत,हंसत मला गुरूनाथ म्हणाला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, October 19, 2010

हक्क आहे तो तुझा

अनुवाद (तुम मुझे भूल भी जाओ......)



विसरलास जरी तू मला
हक्क आहे तो तुझा
मी तर केली प्रीति तुजवरती
नको विचारू कारण मला



माझ्या हृदयाचे माझ्या मनाचे
नको विचारू मोल मला
मला फसविलेल्या आठवांचे
नको विचारू परिणाम मला



का करावी मी प्रीति तुजवरती
का न करावी तू ती मजवरती
ह्या प्रश्नानी करू नको उद्विग्न मला
केलास बहाणा न सांगण्याचा
हक्क आहे तो तुझा



मी तर केली प्रीति तुजवरती
विसरलास जरी तू मला
हक्क आहे तो तुझा



जीवन एकमेव प्रीति नसे
ते अन्य काही असे
तृषा-भूकेने पछाडलेल्या ह्या जगती
प्रीतिच केवळ सत्यता नसे
ते अन्य काही असे
फिरविलेस जरी तुझ्या नजरेला
हक्क आहे तो तुझा



ना दिसेना तुला दुःख-वेदना
ना सुचेना तुला प्रीत-भावना
तुझीच मी हे मला कमी नसे
व्हावा तू माझा हे नशीबी नसे
दाह दिलास जरी माझ्या अंतराला
हक्क आहे तुझा



मी तर केली प्रीति तुजवरती
नको विचारू कारण मला
विसरलास जरी तू मला
हक्क आहे तो तुझा





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, October 16, 2010

मी आणि माझं लेखन.

का कुणास ठाऊक.काल रात्री प्रो.देसाई माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले,
“तुम्हाला लेखन करण्यात विशेष असं काय वाटतं?”
त्यांच्या ह्या प्रश्नावर मी खो,खो हंसायला लागलो.
“हंसू नका,मी गंभीर होऊन तुम्हाला विचारतोय” इती प्रोफेसर.

मी पण गंभीर होऊन त्यांना सांगू लागलो,
“मला लेखन करण्यात विशेष वाटतं.लॅपटॉप ऊघडलेला,बोटं कीबोर्डच्या कीझवर,विचार वाचकांसाठी आणि लेखनाला प्रारंभ.

प्रत्येक क्षणातले मनोभाव,प्रत्येक तोळाभर जमलेलं मनन स्क्रीनवरच्या नोटपॅडवर उतरलं जातं.दवडलेल्या प्रत्येक मिनीटाचा,प्रत्येक सेकंदाचा तोळाभरचा समय,तोळाभरची प्रतीति वाचकांसाठी असते.थोडक्यात सांगायचं तर मला लेखनात खूप गम्य वाटतं.जणू माझं अंतर,माझा आत्मा, माझं प्रेम त्या लेखनात असतं.लेखनात माझा आनंद सामावलेला असतो,मला मनापासून जे काय हवंय ते त्यात असतं.जी उमंग माझ्या शरीरातून तीव्रतेने वहाते,जी आसवं माझ्या डोळ्यांना मोहित करतात ती वाचकांपर्यंत पोहोचतात. माझ्या मनातले विचारसुद्धा असेच सहजपणे माझ्या शरीरातून वहातात आणि शेवटी दुःसहपूर्ण माझ्या बोटांच्या टोकापर्यंत वाहत जातात.”

“वाः वाः! ऐकून बरं वाटलं.आणखी काही तुमच्या लेखनाबद्दल वाटतं ते सांगा.मी आज तुमच्याकडून ऐकणार आहे. मी बोलणार नाही.”
प्रो.देसाई आता खुशीत येऊन मला म्हणाले.

मी पण तेव्हडाच खुशीत येऊन त्यांना म्हणालो,
“माझे लेख हे माझं वाचकांसाठी संगीत आहे.असं हे संगीत की जरी माझ्या गळ्यातून गायलं गेलं नाही तरी माझी समयाशी असलेली लय ठेवून असतं.एखादं लहान मुल आकाशात तार्‍यांकडे बघून आपल्या मनोकामना पूर्ण व्हायची इच्छा दाखवतं तसंच माझ्या लेखनाचं आहे.माझ्या मनातल्या कल्पना माझ्यातूनच,गोष्टी आणि चित्रं, निर्माण करण्यापासून ते वाचकापर्यंत पोहचण्यापर्यंत हे लेखन मला कधीच रोखत नाहीत.लेखन हे माझं स्वप्नं आहे जे रात्रीच्या,अंधकाराबरोबर,माझ्या डोळ्यांच्या पापण्यामागून माझा पाठलाग करीत माझ्याबरोबर सावली सारखं दिवसाच्या उजेडात आल्यावर माझ्या प्रत्येक पावलागणीक मला साथ देत असतं.”

“मी ऐकलंय की लेखक होणं इतकं सोपं नाही”
हे खरं आहे का?”
भाऊसाहेबांनी कशा दृष्टीने प्रश्न केला कळलं नाही.पण मी मात्र त्यांना म्हणालो,
“जरी मलाही अनेक वेळा सांगीतलं गेलंय की लेखक होणं फार कठीण काम आहे.काही शब्द लिहून झाल्यावर,
“माझं झालं,आता ब्लॉगवर टाकू या”
असं म्हणून लेखन केलं जात नाही.तरी लेखन म्हणजे माझं जीवन आहे,लेखन म्हणजे माझं प्रेम आहे,माझं स्वप्न आहे. माझं जीवनातलं अंतिम लक्ष,जे माझं मनोगत आहे, ते माझ्या मनःचक्षूपासून कधीच दूर केलं जात नाही.

पुढचा मार्ग महाकठीण असला….तसं पाहिलंत तर जीवनातल्या प्रत्येक मार्गावर खांच-खळगे आणि कठीण वळणं असतातच.माझं म्हणणं एव्हडंच आहे की माझ्या स्वप्नावर माझा भरवंसा आहे.

कधी अशीही वेळ येते-आणि माझी खात्री आहे की ती प्रत्येकाला येते- जेव्हा माझं मन आणि शरीर विचारांच्या आणि भावनांच्या भाऊगर्दीने एव्हडं भारावलेलं असतं,की जणू मला वाटतं की माझ्या वाचकांनी माझ्यापासून पाठ फिरवली आहे.आणि कुणी माझं ऐकायलाच तयार नाही.
अशा प्रसंगी जेव्हा अश्रूनी माझे डोळे भरून येतात,आणि पुढे माझ्या गालावर ओघळतात,तेव्हा मी माझा लॅपटॉप उघडतो, कीबोर्डवर बोटं ठेवतो आणि लिहायला सुरवात करतो.”

“मी मघाशी तुम्हाला म्हणालो की मी बोलणार नाही पण तुमचं हे ऐकून मला बोलल्या शिवाय राहवत नाही.”
अशी प्रस्थावना करीत प्रोफेसर म्हणाले,
“लेखनाकडून तुमच्याबद्दल कसलाच निर्णय घेतला जात नसतो. ते तुमच्या जवळ बसून तुमच्याकडे कमी लेखून बघत नसतं. जीवनचा मार्ग मोठा कठीण आहे,लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात याची तुम्ही पर्वा करण्या ऐवजी, तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटतं याचा विचार व्हावा,असं जरी सांगीतलं गेलं असलं तरी,दिलासा देणारी एक गोष्ट पक्की आहे की,तुमच्या मनात असलेलं कुठलही कष्टदायी गुपीत तुम्ही सांगत असताना,कोणतीही निर्णायक दृष्टी न ठेवता लेखन तुमचा हात हातात घेऊन, तुमच्या जवळ शांत बसून असतं.
मग तो लेख असो,कविता असो की आणखी काही असो तुमचं लेखन तुम्हाला सृजन करतं.”

भाऊसाहेबांचं म्हणणं मला इतकं पटलं,की मी लागलीच त्यांना थोडा भाऊक होऊन सांगीतलं,
“आणि कदाचीत,एखाद दिवशी,माझ्या लेखनाच्या मदतीने आणखी एखाद्या व्यक्तिला जाणीव होईल की,ह्या एव्हड्या जगात ती काही एकटी नाही.खरं सांगायचं झालं तर,मी जर का विश्वास ठेवीत असेन तर तो लेखनाच्या क्षमतेवर.”

माझं हे ऐकून भाऊसाहेब गप्प का झाले हेच मला कळेना.
“अहो,उठा सूर्यपण उगवला”
असं जेव्हा माझी पत्नी मला उद्देशून म्हणाली,तेव्हांच मला जाग आली.
स्वप्नातून जागा झाल्यावर,एक मात्र मी निश्चीत केलं,की आज संध्याकाळी तळ्यावर प्रो.देसायांची गाठ झाल्यावर हे सर्व सांगायला आज विषय बरा मिळाला आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, October 13, 2010

कल्पना वागळेंचं कुतूहल.

माझा मित्र मला कल्पना वागळेंच्या नृत्याला एकदा घेऊन गेला होता.मी ह्या बाईंचं नांव पूर्वी ऐकलं होतं.पण त्यादिवशी प्रत्यक्षात माझी आणि त्यांची भेट झाली.माझा मित्र त्याला कारण झाला.
मला त्यांचं नृत्य पहाताना, ह्या बाईंना आपल्या नृत्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगायचं आहे हे प्रकर्शाने जाणवत होतं.शहरात ह्यांचे बरेच ठिकाणी क्लासीस आहेत.आणि विद्यार्थीनींची बरीच गर्दी असते असं माझा मित्र मला सांगत होता.असं त्यांच्या शिकवण्यात आणि नृत्यात विशेष काय आहे ? हे समजण्याचं मला कुतूहल होतं.

माझ्या मित्राबरोबरच मी एकदा त्यांच्या घरी गेलो होतो.मीच त्यांच्याकडे विषय काढला.
मी त्यांना म्हणालो,
“एव्हडी मंडळी आपल्याकडे नृत्य शिकायला येतात त्याचं गुपीत काय आहे.?”
मला वागळेबाई म्हणाल्या,
“कुतूहल”
“प्रत्येक माणसात कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं कुतूहल असतं त्याबद्दल मला विशेष वाटतं.मला वाटतं कुतूहल ठेवून जगण्याने अविष्कार आणि अनुकंपा निर्माण होत असते.माझा,संप्रदायावर किंवा सामाजावर, विश्वास आहे. मला वाटतं,अविष्कार आणि अनुकंपा निर्माण करण्याच्या सवयीने समाजाला प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं जातं. तसंच मला वाटतं,जीवंत कला निर्माण केल्याने ही कुतूहलता विकसित होत असते,आणि त्याचं परिणामस्वरूप समाज मजबूत करण्यात होतं.म्हणूनच मी वचनबद्धता बाळगून माझ्यात ह्या जीवंत कलेची दिलचस्पी ठेवते आणि त्यामुळे ती माझ्यात आणि इतरात कुतूहल पैदा करते,आणि ज्या जगात आपण रहातो त्यात आपल्यात असलेल्या वचनबद्धतेला बळकटी आणली जाते.”

कल्पनाबाईंचं हे स्पष्टीकरण ऐकून मलाही त्यांचं जरा कौतूक वाटलं.इकडे तिकडे थोडंसं नाचायला आल्यावर किंवा एखाद्या हिंदी सिनेमात “आयटेम गर्ल” म्हणून नाचायला मोका मिळाल्यावर प्रसिद्धीच्या बळावर क्लासीस काढून बरेच जण पैसा कमवायचं हे एक साधन म्हणून धंदा करताना मी पाहिले आहेत.
म्हणून मी त्यांना म्हणालो,
“अगदी लहानपणापासून तुम्ही नृत्य करता का?”

“जरी अगदी माझ्या लहानपणापासून,मला हालचाल करायला यायला आल्यापासून, मी नाच करायला शिकले,तरी मधे माझ्या नृत्यात थोडा खंड पडला. मला बराच मोठा आजार आला होता.पण त्यातून मी बचावले.”
असं म्हणून वागळेबाई सांगायला लागल्या,
“त्यानंतर,परत नाच करायला सुरवात केल्यापासून मी नृत्यात नावीन्य पाहू लागले. मी शीघ्रनृत्यात डुबून गेले असं म्हटलं तरी चालेल.पण त्यासाठी, काहीतरी निर्माण करण्याची वचन बद्धता,मुक्त पसंती आणि रसिकता,तसंच उल्हासपूर्वक अनुकूलता असण्याची जरूरी आहे असं मला वाटायला लागलं.
मला असंही वाटायला लागलंय की शीघ्रता हे रंजनता,प्रामाणिकता आणि अचंबा वाटून घेण्याचं एक साधन आहे.मी सत्यतेची सतत पाठीराखीण आहे.आणि त्याचं मुख्य कारण मी मला स्वतःलाच ओळखून आहे.हाता-पायाच्या हालचाली शिवाय,शरीराच्या मुद्रासह इतर वाद्यांच्या संगतीत अगदी प्रामाणिक आणि साहसिकतेने झालेले हावभाव पाहून,मानवतेच्या कक्षा उघड्याकरून,विस्मयकारीक अपरिचित असलेली एकमेकातली नाती जोडली जातात अशी माझी धारणा आहे.”

खरोखरच नृत्यकलेचा मुलभूत अभ्यास करून,त्या विषयावर गाढं प्रेम करून,तसं करीत असताना त्यात आपल्याकडून काही भर टाकून ती कला विकसित करायचा,त्याचा प्रसार करायचा हा त्यांचा उद्योग बघून,मलाही वाटलं की त्यामुळेच ह्यांच्या क्लासला गर्दी होत असावी.
म्हणून मी त्यांना विचारलं,
“कशा प्रकारच्या स्टूंडंटसना आपण आपल्या क्लासात प्रवेश देता?”
मला म्हणाल्या,
“माझ्याकडे अगदी दर्जेदार नृत्य शिकायला येणार्‍यांची रीघ लागलेली असते.सुरवातीला काहीजण नृत्यात उत्सुकता दाखवतात. पण त्यातले किती टिकून रहातात सांगता येत नाही.पण मी त्याचा विचार करीत नाही. नृत्यावर मनापासून प्रेम करणारे कष्ट घ्यायला हीचकीच करीत नाहीत.असलेच स्टूडंट मला आवडतात.”
असं म्हणून वागळेबाई पुढे सांगू लागल्या,
“कुतूहल, प्रखर करून माझ्या मेंदूत गच्च बसावं अशी एखादी पद्धत विकसनशील करून घ्यायला मी बांधली गेली आहे असं मी मला नेहमीच समजते.आणि हे घडल्यावर आपल्या जवळची अंतरप्रेरणा आणि त्याचा असर त्याच क्षणी एक साथ राहावी याची मी अपेक्षा करते.असं झाल्यावर जोखिम घेण्यासाठी आणि सत्यता पाळण्यासाठी आपलं शरीर आणि सभोवताल तयार होण्यात मदत होईल असं मला खात्रीपूर्वक वाटतं.
सहानभूतिशील कुतूहलाची जोरदार ताकद असल्यावर आपल्यात नम्रपणा येऊन, आपण आदरपूर्वक राहून मनात येणार्‍या आकांक्षा ओळखून घेण्याच्या प्रयत्नात रहातो.”

मला वागळेबाईंचा विचार आवडला मी त्यांना म्हणालो,
“जीवन जगताना वाटेत आपल्याला येणार्‍या अपयशांची कदर केली पाहिजे,तसंच आपणाकडून घेतल्या जाणार्‍या परिश्रमांचाही आदर ठेवला गेला पाहिजे. नृत्याबरोबर तुमचं नातं, तुम्हाला तुमच्यात असलेल्या माणूसकीला, तुमच्याकडून कुतूहल काय ते समजून घ्यायला आव्हान देत असल्याने ते करीत असताना जेव्हडं जमेल तेव्हडं ह्या कलेत सहभागी व्ह्यायला त्यांना आवडलं पाहिजे.”

माझी ही टिप्पणी ऐकून बाईंना खूप बरं वाटलं असं मला दिसलं.
मला म्हणाल्या,
“अलीकडे मला अगदी स्पष्ट व्हायला लागलं आहे की माझी माझ्या नृत्याशी असलेली बांधिलकी नृत्यकलेत येणार्‍या बदलांशी शीघ्र न राहिल्यास, त्याची लोकांशी संबंध न ठेवण्यात परिणीती होऊन माझ्यात आणि माझ्या कलेत बाधा येऊ शकते. अधुनमधून जरी मला माझ्या नृत्यात आणि माझ्या जीवनात येणार्‍या बदलावाशी तत्पर रहाण्यात आणि त्यामुळे येणार्‍या जोखिमेशी तयार रहाण्यात हार होत असल्यासारखं वाटत असलं तरी नृत्यात असलेल्या प्रभावाची किंमत माहित झाली आहे.कारण सरतेशेवटी लोकांशी सहभाग असावा ह्यालाच मी जास्त महत्व देते.”

वागळेबाईंचा प्रामाणिकपणा मला खूपच आवडला.मी त्यांना शेवटी म्हणालो,
तुमच्याशी नृत्याविषयी चर्चा करून मला काहीतरी मिळवल्यासारखं मनापासून वाटतं.
“कस्चं कस्चं”
म्हणत त्यांनी मला कॉफी पिऊन जाण्याचा आग्रह केला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, October 10, 2010

असाच एक खवैय्या आचारी.

“तुम्ही तुमच्या अवघ्या आयुष्यात एकदा जरी एक कप चहा केलात किंवा एक पोळी भाजलीत तरी तुम्ही कळत-नकळत ह्या असामान्य पाककलेचा एक भाग होऊन जाल.”

मला आठवतं,त्या माझ्या कोकणच्या ट्रिपमधे एकदा मी एका रेस्टॉरंटमधे जेवायला गेलो होतो.माझ्या एका मित्राने मला इथे जेवण्याची शिफारस केली होती.मी जेवत असताना कॅशरच्या टेबलाजवळ एक व्यक्ति कॅशरबरोबर बोलताना माझ्याकडे बघून बोलत होती.जेवण झाल्यावर बिल देताना मी कॅशर जवळ त्या व्यक्तिची चौकशी केली.
“आमचा तो मुख्य आचारी आहे”
असं तो म्हणाला.नांव विचारल्यावर,
“मकरंद कुळकर्णी” असं म्हणाला.
मी माझं डोकं खाजवीत राहिलो.आणि कॅशर म्हणाला,
“तो तुम्हाला ओळखतो”
“असं आहे,तर मग मला त्याच्याशी बोलायला आवडेल”
असं मी म्हणताच,त्याने त्याला बाहेर बोलावलं.
“मला तुम्ही ओळखणार नाही कारण अगदी लहान असताना तुम्ही मला पाहिलंय.”
असं मला मकरंद म्हणाला.
“मग तू मला कसं ओळखलंस?”
सहाजीकच मी त्याला उलट प्रश्न केला.

“मघाशी तुम्ही वेटरला ऑर्डर देताना, त्याच्याबरोबर बोलत होता,तेव्हा मी स्वयंपाक घरातून ऐकल्यावर तुमचा आवाज परिचयाचा वाटला म्हणून डोकावून तुमच्याकडे पहात होतो.मालवणी हेल काढून तुमची बोलण्याची पद्धत, आणि त्या वेटरबरोबर हंसला तेव्हा तुमच्या उजव्या गालावरची खळी मला प्रकर्शाने जाणवली. मला तुम्ही ओळखाल न ओळखाल म्हणून मी पुढे आलो नाही.”
मला हे सांगताना मकरंद लाजून बोलत होता.
“तू मला अजून आठवत नाहीस.जरा विस्ताराने सांगशील का?”

असं मी म्हणाल्यावर मकरंद मला भूतकाळात घेऊन गेला.आणि त्याने माझी स्मृति जागृत केली.
“माझी आजी गेली.पण मी आणि माझी आई रहातो.तुम्हाला वेळ असेल तर माझ्या घरी तुम्ही अवश्य या.माझ्या आईला तुम्हाला इतक्या वर्षानी बघून खूप आनंद होईल.”
मकरंद मला म्हणाला.

मी त्याचा पत्ता घेतला आणि दुसर्‍याच दिवशी त्याच्या घरी गेलो.
मला त्याची आई म्हणाली,
“मकरंद बीए झाला.ते माझ्या जबरदस्तीमुळे.त्याचं ह्या कॉलेजच्या शिक्षणात विशेष लक्ष नसायचं.त्याला लहानपणापासून पाककला आवडायची.मला म्हणायचा मी बीए होऊन कुठेही कारकून म्हणून नोकरी करणार नाही.मला शेफ व्हायला आवडेल.शेफ व्ह्यायचं त्याच्या डोक्यात खूळ होतं.आणि त्याने ते पुरं केलं.आता एका रेस्टॉरंटमधे आचार्‍याचं काम करतो.पण लवकरच तो त्याच रेस्टॉरंटचा पार्टनर होणार आहे.”

मी मकरंदच्या आईला म्हणालो,
“कोण केव्हा काय होईल हे आपल्याला अगोदरपासून माहित नसतं.होऊन झाल्यावर आपण म्हणतो जे विधिलिखीत आहे ते झालं.खरंतर असं म्हणण्यापलीकडे आपल्या हातात काय आहे?.ज्याला जे हवं ते झाल्यावर तो सुखी झाला म्हणजे जीवनात आणखी काय हवंय.?”

मी येणार आहे म्हणून मकरंदाने आज सुट्टी घेतली होती. मला ही त्याच्याशी चर्चा करायला हवं होतं.
मी त्याला विचारलं,
“हा तुझा शेफ होण्याचा विचार कसा काय तुझ्या डोक्यात आला? त्यात वाईट काहीच नाही.आपल्याला जे आवडतं त्यावर आपण प्रेम करतो.फक्त कुतूहल म्हणून मी विचारतो.”
मला मकरंद म्हणाला,
माझ्या आईला नेहमीच विचारलं जातं की,तिचा मुलगा पाककलेत कसा काय स्वारस्य घ्यायला लागला?.आणि माझ्या आईकडून तिच्या नेहमीच्या अभिमानरहित,नम्रतेने दावा केला जातो की तिचाच आळशीपणा त्याला कारण आहे.
मला आठवतं,मी अगदी पाच वर्षाचा भुकेलेला मुलगा अंथरुणातून उठलो आणि आरडाओरडा करून सकाळचा नास्ता मागायला लागलो तरी माझी आई निवांतपणे आपला वेळ घेत घेत तिच्या अंथरूणातून उठून स्वयंपाक घरात यायची.

पण मला काही तेव्हडा धीर नसायचा.मग मी तिच्या शिवाय सुरवात करायचो.पहिल्यांदा अगदी साध्या गोष्टी असायच्या. गरम दुधाचा प्याला,आणि काहीतरी खायला,लाडू वगैरे घ्यायचो.नंतर अंड्याचा पोळा करायला शिकलो.त्यातही हळू हळू पोळ्याचे दोन,चार प्रकार शिकलो.तरीपण माझी आईच मला ह्या पाककलेच्या खूशी्साठी सुरवात करायला कारणीभूत झाली नाही,तर सदभिरूची असणारी माझी आजीही कारणीभूत होती.तिच्याबद्दल आणखी काही सांगण्यापूर्वी मी एक सांगेन की ती खरी खवैय्या होती.कुणीही जेवायला बोलवल्यावर त्यांच्या घरी मला नचुकता घेऊन जायची.किंवा आम्ही प्रवासात असलो तर ती चांगल्या रेस्टॉरंटमधे मला घेऊन जायची.आणि मला तिच्याबरोबर काहीही खायला भयभीती नसायची.माझ्या अगदी लहानपणातल्या दिल्यागेलेल्या ह्या स्वातंत्र्यामुळे माझ्यात ही खाण्याविषयी बेदरकार प्रवृत्ति निर्माण झाली.सरतेशेवटी,अतीशय असाधारण,कल्पनीय
स्वादांची छानबीन करण्याची स्वाधीनता मला घेता आली.ह्या अनेक रेस्टॉरंटमधे जाऊनच मला जेवण करायची स्फुर्ती मिळाली एव्हडंच नाही तर माझी आई आणि आजी ह्या दोघांनी मला त्यांना जे काही माहित होतं ते शिकवलं आणि मी ते शिकण्याचा ध्यास घेतला.”

मकरंद किती सहजपणे आपल्यात तयार होणारा आचारी, आपल्या पोथीबंद, विचाराच्या सीमा उलटून जाऊ शकतो हे सांगत असताना माझ्याही डोक्यात विचार आला.त्याच्या व्यवसायाचं समर्थन करण्याच्या दृष्टीने मी त्याला म्हणालो,
“कला,संगीत,करमणूकी सारखं,आहारसुद्धा संस्कृतीचा एक मुलभाग आहे.आहाराचं हे क्षणभराचं अस्तित्व असतं.कारण नंतर तो खाल्ला जातो,संपवला जातो. तरीपण त्या आहारात गतकालाचा इतिहास असतो,प्रथा असते.आचारी आणि त्याचा सभोवताल ह्यामुळेच घडला जातो.विविध समानान्तर लोकांत आहार दुवा जोडतो. एखादं भोजन,कुटूंबियात,मित्रमंडळीत घेतलं गेल्याने,एकमेकातलं बंधन आणि जाणीवा समक्रमिक बनवून,आणखी मजबूत करतं.त्याचप्रमाणे आचारी आपल्या निर्मितीमधून जगाशी दुवा साधून,आहाराचा उपयोग त्याच्या वयक्तिक शैलीचं आणि तत्वविचाराचं विवरण करण्यात करतो.आहारामुळेच आपण ह्या धरतीचं आणि त्यावरच्या प्राणीमात्रांची कदर करायला शिकतो.
जर का आपण आहाराला आपल्याशी बोलू दिलं तर,नेहमी धरतीमातेचा आवाजातून,आपल्याला जीवंत ठेवण्याच्या अवलंबनाची भेट दिली असल्याचं एकायला येईल.”

माझं हे ऐकून मकरंदला आनंद झाला. मला म्हणाला,
“विस्तवाच्या,धारदार चाकूच्या,चमच्याच्या आणि हाताच्या क्षमतेबद्दल मला विशेष वाटतं.आहार घेणार्‍या जगाला हाताचं कसब वापरून,समाजाला लागणार्‍या,महत्वपूर्ण बुद्धिजीवी विशिष्टता,लक्षात घेऊन त्या मधून मनात असलेला प्रत्येक समझ प्रेरित करून,संस्कृतीचं खरं सार काय आहे,खरं स्वरूप काय आहे हे स्पष्ट करण्याच्या प्रयत्नात ही क्षमता मला उपयोगात आणता येते याचं मला विशेष वाटतं.
मला आहार म्हणजे नुसतं जीवंत रहाण्यासाठीच एक मुलभूत साधन आहे एव्हडच वाटत नाही.तर आहार हा एक आत्म-अभिव्यक्तिचं एक महत्वाचं द्वार आहे,मार्ग आहे असं वाटतं.पाकशास्त्राच्या कलेवरचं माझं प्रेम हे एक छंद असण्याच्या पलीकडचं आहे.माझ्यातला तो एक उत्कट आवेश आहे.जरी टीव्हीवरच्या माझ्या आवडत्या आचार्‍याची पाककृतीची प्रत्येक हालचाल मी अभ्यासीत असलो,तासनतास,अगदी नवं पाककलेचं पुस्तक घेऊन नाक खुपसून वाचत असलो किंवा माझ्या स्वयंपाक खोलीतली स्वतःचीच चालाखी वापरीत असलो,तरी शेवटी त्या दिवसाचा तोच महत्वाचा भाग होऊन जातो.”

“अन्न म्हणजे स्वाधीनता आहे.अधुनमधूनची अन्नबाधा सोडल्यास अन्नावर अटकाव कधीच आणला जात नाही.अन्न हे एक स्वतंत्र प्रकार असून,ते सदैव विकसित होत असतं. पाककला ही अशी एकच कला आहे की तिच्याकडे जैविक आवश्यकता म्हणून बघीतलं जातं.”
मी मकरंदला म्हणालो.

“प्रत्येक प्रांतात ख्यातिप्राप्त व्यक्ति असतात.परंतु,कुठचाही जगनमान्य आचारीसुद्धा ह्या पाककलीची सुरवात आपल्या घरापासून करतो.आपल्या आईकडून किंवा आजीकडून शिकतो.ते शिक्षणसुद्धा एखाद्या चालू शेगडीवर आणि चालू स्वयंपाक घरात शिकतो.अन्य प्रांतातल्या एखाद्या कलेतल्या ख्यातिप्राप्त व्यक्तिबद्दल असं म्हणता येणार नाही.
माझ्या ह्या तेजीने विस्तारणार्‍या रंगपेटीमुळे मला माझ्या सभोवती असलेल्या आहाराच्या संपन्न जगात जाण्याची वाट सापडली,त्यामुळे मी जो आहेतो घडला गेलो.
अलीकडेच माझी आजी गेली.परंतु,तिने माझ्यावर केलेले संस्कार कधीच क्षीण होणार नाहीत.ती आणखी काही जरी असली तरी मला ती,मी जसा आहे तसा आचारी म्हणूनच होती.”
मकरंद मला म्हणाला.

मला रहावलं नाही.मी त्याला म्हणालो,
“तुम्ही तुमच्या अवघ्या आयुष्यात एकदा जरी एक कप चहा केलात किंवा एक पोळी भाजलीत तरी तुम्ही कळत-नकळत ह्या असामान्य पाककलेचा एक भाग होऊन जाल.
अशी कला जी आपल्या भोवती आणि आपल्या अंतरात जीवीत असते,प्रकट होत असते.”

आमच्या चर्चेत खंड आला जेव्हा मकरंदची आई मला म्हणाली,
“मकरंदच्या रेस्टॉरंटमधे जाऊन तुम्ही केव्हाही मकरंदच्या हातचं जेवू शकाल.पण आजचं हे जेवण मी शिजवलंय. मकरंदपण खूप दिवसानी तुमच्याबरोबर मी केलेलं जेवील.नाहीतर तो नेहमीच त्याच्या रेस्टॉरंटमधून जेऊन येतो. चला,जेवायला चला.”
आपल्या आईचं हे बोलणं ऐकून मकरंदच्या चेहर्‍यावरचा आनंद मला जास्त बोलका वाटला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, October 7, 2010

सुगंधाची धुंद.

.

आपल्यावर रागावून गेलेलं एक माणूस पुन्हा कधीतरी आपल्याला भेटायला आल्यावर प्रथम नक्कीच एक फुल देऊन स्वतःला अन मला आनंद देणार असं नेहमीच वाटणार्‍याला पहाटे एकदा स्वप्न पडतं.आणि मग…..

हरवलेले फूल आणून देताना
जेवढा तुला आनंद झाला
दुप्पटीने झाला आनंद मला
फुल ते हातात घेताना

सुगंध त्याचा दरवळला
उजळूनी जुन्या आठवणी
पाकळ्यावरचे ते थेंब दवांचे
आणिती डोळ्यात पाणी

क्षणभरचे ते स्वप्न पहाटेचे
करीते काम विलोभण्याचे
कुठले फूल अन कुठला सुगंध
जाईन पुन्हा त्या स्वपनात
होईन मी पुन्हा आनंदाने धुंद

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, October 4, 2010

आप्पा आणि गालावरची खळी.

“रांव रे! आप्पा येतां साईट दी.”
(गप्प बस! आप्पा येतोय.(आप्पाची बस येतेय) त्याला जाऊदे.साईड दे)

असले उद्गार १९३८-४५ च्या दरम्यान सावंतवाडी-बेळगाव किंवा वेगुर्ले-बेळगाव ह्या प्रवास मार्गावर ऐकायला मिळत असत.
त्याचं असं झालं आप्पाकाकांना धंद्यामधे-बिझीनेसमधे-जास्त दिलचस्पी होती.नाना आजोबांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी अण्णांकडे शब्द टाकला.
आणि आण्णा म्हणाले मुंबईहून मी त्याच्यासाठी(आप्पासाठी) एक नवीन बस (पॅसिंजर व्हेईकल)विकत घेतो.साधारण २०० रुपयांना (म्हणजे आताचे २० लाख रुपये होतील,आणि त्यावेळी गाड्या इंपोर्ट व्हायच्या.)बस विकत घेतली.
अण्णांचं लग्न झालं तेव्हा आप्पा एक वर्षाचे होते.आणि त्यांच्या आईचं (म्हणजे आमच्या आजीचं)निधन झालं होतं.माझ्या आईनेच त्यांना वाढवलं. अण्णांना आप्पा मुलासारखेच होते.

ही बस-सर्व्हिस आप्पा चालवीत असत.सुरवातीला आठवड्यातून २,३ वेळेला,आणि नंतर रोज आणि नंतर दिवसातून दोन वेळां वाडी-बेळगांव ट्रिप करीत असत.त्याशिवाय आणखी बर्‍याच लोकांच्या असल्या सर्व्हिसीस होत्या.पण आप्पांची एक खासियत होती. नियमीतपणा,सर्वांच्या अगोदर पोहोचायचं,कुणालाही नाखूश करायचं नाही,आणि हंसत,हंसत सर्वांचं स्वागत करायचं.

गोरा रंग,सफेद लांब बाह्यांचा शर्ट,डोक्यावर काळी टोपी,ती पण अर्धी मागे सरकलेली,कोट बरोबर घ्यायचा पण अंगावर कधीच घालायचा नाही तर तो डाव्या खांद्यावर लटकलेला असायचा,तोंडात पानाचा ठेचा,रंगदार पानाचा लाल-तांबडा रंग,दातां-ओठावर ठाम बसलेला,ओळखीचा माणूस दिसला की मधूर हास्य करीत उजव्या गालावरची खळी उठावदार दिसल्याने,समोरच्या माणसाला त्यांच्याबरोबर दोन शब्द बोलावंसं वाटायचं.आप्पांच्या
सावंतवाडी-बेळगाव आणि परत, अशा सकाळ संध्याकाळच्या दोन फेर्‍या झाल्यावर घरी आल्यावर आप्पा खांद्यावरचा कोट काकूकडे द्यायचे.मग काकू कोटाचे सर्व खिसे चाचपून चुरलेल्या नोटा आणि पोसाभरून चिल्लर-खूर्दा मिळून दिवसाची कमाई मोजून ठेवायची.

आप्पांच्या २५,३० वर्षाच्या वयावर त्यांच्यात तारूण्यातली बेदरकारी होती.मग नवी करकरीत इंपोर्टेड गाडी चालवताना वेगावर लक्ष कसं रहायचं.त्यात भर म्हणजे धुळीने माखलेले कोकणातले लाल रस्ते,प्रवाशाना वेळेवर पोहोचवीण्याची अंगातली चूरस,त्यामुळे रस्त्यावरून चालणार्‍या पादचार्‍यांना आणि आप्पांच्या पुढे धांवत असलेल्या इतर गाड्यांना ओव्हेरटेक करून आप्पांची बस भरधांव वेगाने जायची आप्पांच्या अंगातली धमक त्यांना रोखता कशी यायची?.आप्पांची बस निघून गेल्यावर मागे प्रचंड धुळीचा लोट यायचा.धुळीचा लोट पातळ झाल्यावर समोर पाहिल्यावर लांब गेलीली आप्पांची बस एक ठिपका कसा दिसायची.

गांवातले आणि गांवाबाहेरचे पोलिस आप्पांच्या खिशात होते.आप्पांकडून मिळणारी अधुनमधूनची चिरीमिरी, आणि पोलिस खात्यात वरच्या हुद्यावर असलेले त्यांचेच भाऊ अण्णा, ह्या सर्व गोष्टीकडे बघून आप्पांना ही बेदरकारी करायला एक प्रकारे रान मोकळं असल्यास नवल ते काय?.
पुढल्या गाडीतले पॅसिंजर मागे वळून पाहिल्यावर आप्पांची बस येताना दिसली तर,
“रांव रे! आप्पा येतां,वाईंच साईट दी.”
किंवा आप्पांची बस धुळ उडवीत पुढे गेलेली पाहून,
“आप्पा गेलोसां दिसतां”
असे उद्बार काढायचे.
पण आप्पा त्याबद्दल कधीही शेखी मिरवीत नसत.एखाद्या पोलिसाने नानांच्या कानावर, आप्पानी केलेली अलीकडची बेदरकारी सांगून झाल्यावर,जेव्हा अण्णांना कळायची तेव्हा अण्णांकडून आप्पांची जराशी कान उघडणी व्हायची.

आम्ही त्यावेळी अगदीच लहान होतो.पण आमच्यापेक्षा मोठ्या सख्ख्या किंवा चुलत भावात ह्याची चर्चा व्हायची.
त्यांचे मित्र आप्पांच्या वेगवान बस चालवण्याच्या संवयीबद्दल कौतूकाने चर्चा करायचे,आणि आमचे भाऊ आपल्या मित्रांना सांगायचे
“आमचे काका आहेत ते”
ते ऐकून आप्पांची धडाधडी पाहून आमची छाती फुगायची.
पण आप्पांनी कधी अपघात केले नाहीत.कदाचीत ह्यामुळेच इतरांच्या बस सर्व्हिसपेक्षा आप्पांची बस जास्त पॉप्युलर होती.कारण त्यांच्या बसची तिकीटं आदल्यादिवशीच खपून जायची.
“नानानुं,बेळगांवचा एक तिकीट होयां.”
असं कोणी घरी सांगायला आल्यावर,
“तिकीटां संपली.उद्याच्या तिकीटासाठी काल येत जा”
म्हणून नाना लोकांना सांगताना आम्ही ऐकायचो.नाना आप्पांचं ऑफीस संभाळायचे.ऑफीस कसलं? घरंच ऑफीस होतं.

पण आता त्या गोष्टीला जाऊन ६०,७० वर्षं झाली.आप्पांच्या क्षीण प्रकृतिकडे बघून ते दिवस प्रकर्षाने आठवतात. अलीकडे गोरेगांव स्टेशनवर गाडीची वाट पहात असताना गाडी जवळ केव्हा आली ते आप्पांना मुळीच कळलं नाही.लोकांनी ओरडा करे पर्यंत आप्पा,गाडीबरोबर थोडे फरफटत जाऊन, बाजूला पडले.आप्पाना अलीकडे कमी ऐकायला यायचं.त्याचाच,ही घटना व्हायला, परिणाम असणार.
मी त्यांना गोरेगांवच्या एका खासगी हॉस्पिटलात भेटायला गेलो होतो.तोंडाला मार लागून आप्पांची मान वाकडी झाली होती.

बरं वाटल्यावर आप्पा घरी आल्यावर मी त्यांना त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो.आप्पा जरी अपघातातून खणखणीत बरे झाले होते तरी तोंडाला लागलेल्या मारामुळे ते बोलताना जरा अस्पष्ट बोलायचे.त्याना हंसतांना पाहून मला खूपच वाईट वाटलं.ते त्यांचं मधूर हास्य आणि त्यांच्या उजव्या गालावर दिसणारी ती खळी त्यांचा चेहरा उठावदार करायला दिसतच नव्हती. “फेस रीकंस्ट्रकशनमुळे” जरी त्यांचा चेहरा सुधारला गेला असला तरी ती खळी डॉक्टर “रीकंस्ट्रक” करू शकले नव्हते.

मला पूर्वीची गोष्ट सांगताना विनोद करून जेव्हा अप्पा हंसायला लागले तेव्हा मी लागलीच माझा चेहरा दोन हातांनी झाकून घेतला.आता आप्पांना हंसताना पाहून मला येणारं रडूं माझ्या चेहर्‍यावरून मला लपवायचं होतं.आप्पांचा निरोप घेऊन झाल्यावर जिन्यावरून खाली उतरून जाताना माझ्या तोंडून सहजच बोललं गेलं,
“रांव रे! आप्पा येतां.वाईंच साईेट दी”
कुठे गेले ते दिवस?

आदल्या आठवडयात मला आप्पा गेल्याचा निरोप आला.ते पावसाळ्याचे दिवस होते.आकाश ढगांनी व्यापलेलं होतं.आणि मोसमी वार्‍याच्या जोराने ढगांचा आकाशातला प्रवाह धुळी सारखाच दिसायचा.त्यांच्या अंत्ययात्रेला जात असताना वर आकाशाकडे पाहून माझ्या मनात आलं आणि मी मनात पुटपुटलो,
“आप्पा गेलोसां दिसतां” नव्हे तर
“आप्पा गेलोच”
पण ह्यावेळेला जाताना धुळी ऐवजी, ढगांचा लोट मागे सोडत ते वर चालले आहेत.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, October 1, 2010

“भोजन”, खरा अर्थ हरवलेला शब्द.

“आमच्या कुटूंबात,आमच्या विश्वाचा मध्यभाग म्हणजे आमचं स्वयंपाकघर आणि मध्यभागी ठेवलेलं जेवणाचं टेबल, असं म्हटलं तरी चालेल.मी ज्या वयात शेगडी जवळ उभी राहून चहा करायला शिकले,तिथपासून आतापर्यंत मी माझा जेवणाबद्दचा जोश विकसीत करायला शिकले.”
माझी भाची पुष्पा मला आवर्जून सांगत होती.

त्याचं असं झालं,आम्ही सर्व टेबलावर बसून जेवण करीत होतो.त्यादिवशी कोजागीरी-पौर्णिमा होती.पुष्पा सातबंगल्याला राहायची.वरसोवाचा समुद्र तिच्या घरापासून अगदी जवळ.
मला तसंच तिच्या इतर मित्र मंडळीना बोलावून जेवणं झाल्यावर आम्ही पौर्णिमेच्या पिठूळ चांदण्यात मजा करायला जाणार होतो.बरोबर गरम दुधाची कॉफी घेतली होती.आणि फरसाणही घेतली होती.
जेवताना “भोजन” ह्या शब्दावर चर्चा चालली होती.

मला काहीतरी सांगावसं वाटलं म्हणून मी म्हणालो,
“जेवणातून आपण आपलं एकमेकाबद्दलचं प्रेम आणि जीवनातला आनंद वाटायला शिकतो असं मला वाटतं.माझ्या म्रुत्युशय्येवर मला जर का कुणी प्रश्न केला की माझ्या आयुष्यातल्या सर्वात उत्तम दहा घटना कोणत्या,तर मी नक्कीच सांगेन की, त्यातल्या निदान आठ घटना जेवणाच्या टेबलाभोवतीच्या असाव्यात.मस्त जेवण वाढलेलं असावं आणि माझे प्रेमळ कुटूंबिय सभोवताली बसलेले असावेत अशा घटना.बरेच वेळा,पण नेहमीच नाही,अशा घटना सणावारालाच घडत असतात.”

माझं बोलणं संपता संपता पुष्पा म्हणाली,
“सणावारावरून तुम्ही म्हणता ते मला पटतं.कारण जरी गणपतिचा सण बर्‍याच लोकांचा-इतर पंथांचा आणि धर्मांचा-जरी झालेला असला,तरी त्या उत्सवामागच्या धार्मिक भावना कमी झालेल्या नाहीत.माझे कुटूंबीय अगदी कडक प्रथा पाळून तो सण साजरा करतात.आणि हे सर्व जेवणाभोवती परिभ्रमण होत असतं.

गणपति उत्सव हा काही एकच सण नाही.दसरा सणा दिवशी माझी आई घरगुती श्रीखंड केल्या शिवाय रहात नाही. बरेच दिवस अगोदर भरपूर साय येईल असं दुध आणून,त्याचं दही मुरवून,मग दह्यातलं पाणी काढून घट्ट चक्का करून,त्यात केशर,वेलची,चारोळ्या-पिस्ता टाकून घोटून घोटून चवदार श्रीखंड तयार करते.बाजारातल्या श्रीखंडावर तिचा मुळीच विश्वास नाही.मेहनत पडली तरी चालेल पण तिचा श्रीखंड घरी बनवण्याचा हट्ट ती सोडत नाही. श्रीखंडाबरोबर खांडवा गव्हाच्या पिठाच्या पुर्‍या हव्याच.”

पुष्पाच्या नवर्‍याने आपला विचार सांगितला.तो म्हणाला,
“दिवाळी सण असाच साजरा होतो.त्यादिवशी जरी देवळात जाऊन देवा समोर नारळ फोडून तो देवा जवळ ठेवून उरलेल्या नारळाचा प्रसाद घरात आणून सर्वांना वाटल्यावर मग फराळाची चव घ्यायला सुरवात केली जात असली तरी,सकाळी उठून सुगंधी उटणं लावून आंघोळ करण्यापूर्वी पायाखाली कडू कारीट फोडून “शंभो,शंभो,शंभो असं त्रीवार ओरडून,संकासूराचा वध केल्याचं समाधान झाल्यावर त्या कारटाची कडू चव घेतल्यावरच गरम गरम पाण्याचा तांब्या अंगावर ओतला जातो.ह्या प्रथा न चुकता सांभाळल्या जातात.

दिवाळीचा सण येण्यापूर्वी आठ-पंधरा दिवस अगोदरपासून अनेक गोड पदार्थाच्या फराळाची तयारी मनावर कुठचाही ताण न आणता केली जाते.सर्वच तर्‍हेचे फराळ झाले पाहिजेत याची आवश्यकता न बाळगता त्याचा अनेक तर्‍हांचा संग्रह असला तरी चालतो.अर्थात जितक्या जास्त तर्‍हा तेव्हडं बरंच म्हणा.”

पुष्पा म्हणाली,
“तसे वर्षभरात बरेच सण येतात म्हणा.होळीच्या दिवशी पूरणपोळी,मकरसंक्रांतीला तीळगूळ आणि तिळाचे लाडू, कोजागीरी पौर्णिमेला मसाले दुध, नारळी पौर्णिमेला नारळी भात. एकनादोन असे अनेक सण कोकणात साजरे केले जातात.”

पुष्पा आणि तिचा नवरा आपलं म्हणणं केव्हा संपवतात याची मी वाट पहात होतो.कारण मला “भोजन” ह्या विषयावर जास्त बोलायचं होतं.चान्स मिळताच मी म्हणालो,
“अशा ह्या वेगवेगळ्या सणात कुटूंबीयाबरोबर भोजनकरण्याचा मनातला जोश म्हणजेच मानवी मनातली जडं असून ती खोलवर रुतलेली असावीत. आणि हे जेवणाचं टेबल किंवा पंगत बसण्याची खालची जमीन ही जागा म्हणजे एक पोषण करण्याचं,निर्भयत्वाचं,आणि शांती समाधानीचं स्थान आहे असं म्हणावं लागेल.आणि हा जोश आपल्या भाषेतल्या शब्द्वव्युत्पत्तित एव्हडा खोलवर रुतला आहे की “भोजन” म्हणजेच “साहचर्य” असं म्हणावं लागेल.”

माझं म्हणणं पुष्पाला इतकं पटलं की,ती मला म्हणाली,
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.कारण सतत वापरून वापरून “भोजन” हा शब्द अर्थ हरवलेला झाला आहे. यात सत्य आहे.कारण तुम्ही जे जेवता ते तुम्ही आहात. म्हणून कोण कसं आहे हे समजण्यासाठी,त्यांच्या अंतरात आणि आत्म्यात काय आहे हे समजण्यासाठी, जितकं त्यांच्याबरोबर मैलभर चालून समजणार नाही तितकं त्यांच्या बरोबर जेवणाच्या टेबलावर बसून भोजन केल्यावर समजेल.”

पुष्पाच्या नवर्‍याला समुद्रावर जायची घाई झालेली दिसली.
“चला आपण उठूया.हीच चर्चा गरम कॉफी आणि फरसाणाची चव घेता घेता समुद्वावर जाऊनच बोलूया.”
कल्पना सर्वांनाच आवडली आणि आम्ही सर्व जेवण आटोपून समुद्रावर जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com