Thursday, January 31, 2008

जीवनाची फुलबाग करावी

जीवनाची फुलबाग करावी


मनाशी मन मिळवून प्रीती करावी
काही सुखदायी प्रतीज्ञा करावी

लज्जा कसली भिती कसली
जगण्या पुर्वी मरणे कसले
लांबच लांब सांवल्या पाहून
आनंदी आनंद भोवताली पाहून
जीवनाची फुलबाग करावी

सुखे येती सुखे जाती
उभी राहाती दुःखे सामोरी
आशा झाल्या एकाकी
सांगु पाहे जिंदगी
उमेद प्रजोलित करावी

विसरून जावे मनातून
अपमानाचे शल्य
एकांताला स्वर्ग करावे
तीव्र ईच्छा सफल समयी
खूष मनाला साथ द्दयावी
जीवनाची फुलबाग करावी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, January 29, 2008

रिम झिम पाऊस पडतोय

रिम झिम पाऊस पडतोय


रिम झिम पाऊस पडतोय
मन माझे उचंबळून येतय
परीसर सगळा भिजून गेलाय
मग दाह कसला होतोय

असाच सदा मेघ बरसला
असाच तुझा पदर भिजला
आजच सजणे माझे मन
असे का उचंबळतय

ह्याचवेळी दाह पावसाचा
ऋतु आहे कडक थंडीचा
वारा प्यालेल्या तुफानाचा
परीसर सगळा भिजून गेलाय
मग दाह कसला होतोय

थेंबामधूनी घुंघुर वाजती
आशा अपुल्या फोल होती
नयन पाहती स्वप्ने कसली
आजच सजणे माझे मन
असे का उचंबळतय


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, January 27, 2008

बोलेन तर ऐकवीशी दुषण तुझे

बोलेन तर ऐकवीशी दुषण तुझे


येती आशा उफाळून उरामधे
वसे छाया उदासीची नजरेमधे
कुठे घेवून आलो नशिब माझे
होतो मी तुझ्या दुनियेमधे
बोलेन तर ऐकवीशी दुषण तुझे

नयनी माझ्या आंसवे येती
असती माझ्या दुःखाचे साथी
मन ही नाही नाही आशा मनात
आहे फक्त मी अन माझा एकांत

नसे कसली नाराजी तुझ्याशी
अन दुराग्रह तुझ्या दुनियेशी
दिसू लागे मंझील नजरेला
लागे ठोकर माझ्या नशिबाला

असा दाह माझ्या मनी होई
जगु ना दे ना मरु देई
अबोल राहून जळे मन माझे
बोलेन तर ऐकवीशी दुषण तुझे


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, January 26, 2008

लळा जिव्हाळा शब्दच मोठे

लळा जिव्हाळा शब्दच मोठे



(लळा जिव्हाळा शब्दच खोटे
कोण कुणाचे नाही
राजा
कोण कुणाचे नाही)

ह्या ऐवजी

लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

पिसे,सनतडी.काड्या जमवी
चिमणी बांधी कोटे
दाणा,दाणा आणून जगवी
जीव कोवळे छोटे
चिमणा उचलूनी नेई बाळा
जगविण्या साठी त्याते
कोण कुणासाठी जगते
राजा कोण कुणासाठी जगते

रक्तहि सगळे नसते
असू शकते माया
कोण कुणाचे नसून ही
अंतरी असते दया
सांगायाची नाती नसेतना
प्रेम कुठे जाते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

माणुस सुद्धा प्रेम करतो
समजून दुसरा अपुला
दुसरा ओळखी उपकाराते
देई सर्वस्व त्याला
कोण कुणाचा जोडू
पाहतो या जगती नाते
लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, January 24, 2008

" लाख चूका असतील केल्या "

"लाख चूका असतील केल्या"

हे गृहस्थ आमचे शेजारी.शिरोडे गावाला जाताना नदी काठी एक टांक नावाचं छोटंस गांव आहे.भाऊ टांककार त्या गांवचे.
आमच्या घराच्या बाजुला त्यांचे वखारवजा घर होतं. चांगलं चिरेबंदी भिंतीचं,पुढचा भाग माल ठेवण्यासाठी जरुरी पेक्षा जास्त उंच आणि ऐसपैस,आणि त्याच्या मागे पांच,सहा खोल्या आणि मागे मोठे पोरस,त्यात चार पाच माडाची फळ देणारी झाडं,मधेच एक खोल विहीर एक उंच सोनचाफ्याचं झाड,आणि कपडे धुण्यासाठी जागोजागी,ढोण्या (कपडे धुण्यासाठी सिमेंटची बनवलेली टाकी)होत्या. विहीरीतून भरपून पाणी मिळत असल्याने ह्या ढोणीत पाणी घालून एकावेळी खूप कपडे धुता येतात.
अशा ह्या घरात पुढच्या भागात भाऊंची पेढी (ऑफीस) सजवली होती.दोन तीन कारकून असल्याने त्यावेळी प्रचारात असलेली ठरावीक पद्धतची पेढीची सजावट असायची.बैठक मारून खाली गादीवर बसायचं,त्यावर सफेद रंगाचं कव्हर,मागे टेकण्यासाठी लोड म्हणून सिलींडरच्या आकाराची गादी आणि त्याच्यावर तसेच सफेद कपड्याचं कव्हर आणि समोर लिहायाला सुखकर होईल असे चार पायाचे स्टूल (टेबल), त्याचा टॉप उघडल्यावर आत व्यवहाराची पुस्तके (चोपड्या),लाल आणि निळ्या शाईच्या बाटल्या (दौती), लिहीण्यासाठी टाक (पेन) आणि कागदावर लिहून झाल्यावर शाई वाळण्यासाठी वाळू. ही वाळू हाताच्या चिमटीत घेवून ओल्या अक्षरावर पिंजरल्यावर काही वेळाने ती कागदावरून झटूकन टाकल्यावर
शाई पसरत नसायची. ही झाली पेढीची सजावट.

भाऊंची स्वतःची बैठक वेगळी असायची.त्या जागी ते स्वतः क्वचितच बसायचे.बॅंकेतून पैसे आणून ते आपल्या ह्या बैठकीच्या त्यांच्या पेटीत ठेवायचे.त्याला कुलूप लावून त्याची चावी एका रिंगमधे ओवून त्याची सांखळी एका बोटांत गरगर गरगर फिरवत सगळीकडे फिरत रहायची त्यांचीच एक स्टाईल होती. वामनमूर्ती भाऊ अंगात झूळ्झूळीत मलमलची पैरण खाली मसराईजचे सफेद शुभ्र धोतर,गळ्यात दोन पदरी सोन्याची चेन,छातीवरचे दाट केस दिसतील अश्यातऱ्हेने पैरणीची बटणे उघडी ठेवायचे,तोंड पान खावून पुरं लाल झालेलं, डोक्यावर विरळ असे केस आणि एका हातात तपकरीची चांदीची डबी,पायात कोल्हापूरी चप्पल,आणि नाकातून बोलल्या सारख्या आवाजाने गडी नोकराकडून सर्व कामं करून घ्यायचे.

बेळगांव,कोल्ह्यापूर,गोवा,मुंबईवरून गांवात लागणारा माल भाऊ, घावूक मागवायचे.गावातले लोक फूटकळ घेवून विकायचे.भाऊंचा धंदा चांगल्यापैकी चालायचा.भाऊची घरातली मंडळीत एक मुलगी,बायको आणि म्हातारी आई.भाऊंची बायको घाटावरच्या एका श्रीमंत गृहस्थाची मुलगी होती.तिला गावातली मालवणी भाषा येत नसे,म्हणून भाऊ तिच्याशी शुद्ध मराठीत बोलत असत.बाकीच्याशी व्यवहार मालवणीतून चालायचा.भाऊंच्या धंद्दयात त्यांच्या बायकोच्या माहेरहून आर्थिक मदत झाली होती.

सकाळची आंघोळ पांघोळ पुज्या आरच्या झाल्यावर भाऊंची एक खेप मार्केट मधे जाण्यात जात असे.बाकी तोच ड्रेस फक्त डोक्यावर सफेद गांधी टोपी चढवली झालं.हातात नोटांच पुडकं घेवून जायचे.दुपारच्या जेवणाला लागणारा भाजी बाजार, आवडेल ती वस्तु घेण्यात आणि त्याची दरखोरी न करता,विकत घेण्यात त्याना विशेष वाटायचं. बाजारात बरोबर नेलेल्या गड्याबरोबर भाऊ भाजीची पिशवी पाठवून द्दयायचे आणि आजुबजुच्या ईतर व्यापाऱ्याबरोबर थोडावेळ गप्पागोष्टी मारून परत पेढीवर येवून बसायचे.
भाऊंचा धंदा चांगलाच दम बसलेला असल्याने त्याना गिऱ्हाईकाची वाट बघत बसायची जरुरी भासत नव्हती. आलेली कॅश आपल्या पेटीत जमा करून दुपारच्या बारा वाजण्यापुर्वी कॅनरा बॅंकेत जावून स्वतः जमा करायचे. ह्या बाबतीत त्यांचा नोकरावर विश्वास नव्हता.आणि दुसरे म्हणजे तिथून ते तडक मासळी बाजाराची वाट धरायचे. भाऊंना जेवताना मासे नसतील तर घांस तोंडात जात नसे.

मासळी बाजारात भाऊ मासे विकणाऱ्या कोळणीत चांगलेच प्रसिद्ध होते.त्याचं कारण असं की कोळीण सांगेल ते दाम देवून भाऊ मासे विकत घ्यायचे.भाऊंना कोळणी पण बाजारभावापक्षा पाच दहा रुपये जास्त भाव सांगत असत. त्यामुळे भाऊ बाजारात दिसताच कोळणींचा हा आरडाओरड व्हायचा."रे भाऊ, हयसर ये मरे,बघ तुझ्यासाठी ताजो सरंगो ठेवलसंय,बर्फातलो नाय " असं म्हणून आपला तेव्हडा सरंगा ताजा दुसऱ्यांकडे जावू नकोस असं भाऊंवर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न होत असे.पण भाऊ करायचं तेच करायचे.सरंगा आणि बांगडे गड्याबरोबर घरी पाठवून द्दयायचेआणि साधारण दोन वाजायच्या दरम्यान घरी जेवायला यायचे.
सरंग्याची आमटी,बांगड्याचं तिरफळं घालून केलेलं तिखलं, तळलेले सरंग्याची कापं आणि जिरेसाळ भात असलं जेवणाचं सागरसंगीत झाल्यावर झोप कुणाला येणार नाही?संध्याकाळचा चहा आणि बेकरीतली ताजी "भिस्कुटं" खावून झाल्यावर समोरच्या कल्पना मेडिकल स्टोव्हरच्या मालकाबरोबर गोष्टी रंगायच्या,त्यावेळी तिथे नियमाने, साफळे फौजदार,वैनतेयचे संपादक बापट,डॉक्टर वसंत पंडीत, निष्णात वकील निळकंठराव पुनाळेकर वगैरे बडीमोठी मंडळी संध्याकाळच्या अड्ड्यावर येवून जगातल्या सर्व विषयावर चर्चा व्हायची. संध्याकाळ लोटल्यावर पेढीचे व्यवहार जरा मंद व्हायचे. भाऊंच्या पेढीत पेट्रोमॅक्सची बत्ती पेटली की समजावं रात्र झाली.नऊ वाजता पेढी बंद झाल्यावर भाऊ रात्री थोडसंच खाऊन झोपायचे.

नंतर बरोबर रात्री दोन वाजायच्या सुमारास भाऊ उठायचे. रात्रीचे जोरजोरात खाकरून तोंड धुण्याचा आवाज झाल्यावर भाऊ उठल्याचे समजायचे.एक ग्लास पाणी पिऊन झाल्यावरनेहमीचेच कपडे करून डोक्यावर गांधी टोपी चढवून कंदील पेटवून सायकलला टांगायचे आणि कुत्रे मागे लागू नयेत म्हणून
एक छोटीसी काठी जवळ ठेवून सरळ तुळस गांवाच्या दिशेने कूच करायचे.बायजा नांवाची भाऊंची ठेवलेली बाई एका लहानश्या घरात राहायची.तिला एक छोटी मुलगी पण होती.भाऊ बायजाकडे पहाटे पर्यंत वेळ घालवायचे.हा त्यांचा आज कित्यक वर्षाचा रिवाज असायचा.उजाडल्यावर भाऊ आपल्या घरी परत यायचे.भाऊंच्या बायकोला हा त्यांचा संबंध माहित होता.पण ती बिचारी काहीही करू शकत नव्हती,फक्त हल्ली म्हणे तिने त्यांचाशी संबंध सोडला होता.जगाच्या लाजे करीता ती मान खाली घालून जीवन जगत होती.

आतापावेतो पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं.भाऊंच्या एकच एक मुलीचं लग्न झालं,भाऊनी बायजाच्या मुलीचं पण लग्न लावून दिलं होतं.बायजा पण आता थकली होती. भाउंचा पण पुर्वीचा दम खचला होता.अलिकडे ते बायजाकडे जायचे पण बंद झाले होते.तुळस गांवाला रात्री दोनला उठून सायकलेने जायला त्याना जमत नव्ह्तं. भाऊंची म्हातारी आई अलिकडेच निर्वतली होती.पेढीचे व्यवहार आता त्यांचा जांवई पाहत होता.बाजाराचे सर्व व्यवहार आता गडी नोकर पहात होते.
भाऊना हात धरून घरातून पेढीवर आणून बसवावं लागत होतं.मधून मधून भाऊ आपल्या जीवनाचा आढावा घेण्यात वेळ घालवीत.आपल्या आप्पल-पोट्या जीवना पलिकडे त्यानी दुसरं काही पाहिलं नव्हतं, त्याचा त्यांना खंत होत होता.एक दिवस भाऊना पऱ्यालिसीसचा ऍटॅक आला. सर्व कारभार संपला असं
त्यांच्या लक्षात आलं.शेवटी बायजा उपयोगी पडली नाही.त्यांच्या बायकोनेच त्यांची सेवा केली.ते त्यांच्या लक्षात पण आलं असणार.

"लाख चुका असतील केल्या
केली पण प्रीती"
हे गाणं त्याना किती लागू होतं देव जाणे.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, January 22, 2008

प्रीती नसे सर्वस्व जीवनासाठी

प्रीती नसे सर्वस्व जीवनासाठी


सोडशी सारी दुनिया कुणासाठी
शक्य नसे ही कृती प्रत्येकासाठी
प्रीती शिवाय असती अनेक कामे
प्रीती नसे सर्वस्व जीवनासाठी

न होवो मिलन देहाचे
होवू दे मिलन मनाचे
जवळी नसो बगिचा फुलांचा
येवूदे मंद वारा सुगंधाचा
न मिळो चंद्र जीवनामधे
असुदे प्रकाश मंद ज्योतीमधे

कोमेजल्या कळ्या पाहूनी
दुःख होई
बहरलेल्या फुलाना पाहुनी
चैतन्य येई
उजाडली जरी दुनिया एक
करीशी निर्माण विश्व अनेक
जरी वाटे मनाशी करावा
संसार नेटका
करण्या खुष ईतराना
जाशी तू एकटा


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया )
shrikrishnas@gmail.com

Monday, January 21, 2008

रुदन तू का करावे

रुदन तू का करावे


कथीली मी माझी कहाणी
परी तुझे नयन का ओले
बेतले संकट माझ्या मनी
परी तुझे नयन का भिजले

दुःख माझ्या अंतरी असावे
तू सहन का करावे
ते असती माझे नयनाश्रू
धार नयनी तुझ्या का असावी
दाह दुःखाचा मी पेटवीला
रुदन तू का करावे

भिजवीले नयन माझे कितीतरी
करणार नाही ओले ते तुझ्यापरी
जपून सारी उमेद माझी
राखीन सारी उमेद तुझी
दुःख तुला तुझ्या अश्रूनी द्दयावे
रुदन तू का करावे

आवरी तूं नयनाश्रू तुझे
ढाळीन अथवा मी अश्रू माझे
डुबवीन चंद्र ताऱ्याना
मी माझ्या आंसवा मधे
सच्चाईने दुनियेतून नष्ट व्हावे
रुदन तूं का करावे


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, January 19, 2008

"लाला मी पास की नापास ? "

"लाला! मी पास की नापास? "


लाला हा जन्माने मुसलमान होता असावा.बुटकीशी व्यक्ति,जेमतेम साडेचार फुट उंची,डोक्याला गुंडाळलेली पगडी (मुंडासे),खाली तोटके धोतर,वरती एक सदरा, रस्त्यातून चालताना मोकळे पाय,हातात आधाराला दांडका त्याची उंची थोडी त्याच्यापेक्षा जास्त,तोंड सतत पान खावून लाल दिसणारे,तिच तोंडातली लाल थुंकी दोन्ही बाजुच्या ओठाच्या फटीतून खाली ओघळणारी, मान सतत रस्त्याकडे खाली झुकलेली, चेहऱ्यावर दाढीचे खुंट,अशी ही व्यक्ति वेंगुर्ल्याच्या मेनरोड वरून सकाळी, मध्यांनी आणि तिन्हीसांजा झाल्यावर चालत जाताना हटकून दिसायची.वाटलंतर त्याला जाताना पाहून, दिवसाची घटका कळायला कठीण होत नसे.
वेंगुर्ल्याचे लाल मातीचे त्यावेळचे रस्ते आणि सतत पानाचा तोबरा लालाच्या तोंडात असल्याने,त्याचे कपडे वर पासून खाली पर्यंत लाल झालेले असायचे.तोंडातून ओघळणारी थुंकी अधून मधून कपड्याला फुसायच्या संवयीमुळेपण, त्याचे कपडे लाल दिसायला भर पडायची." जुम्मेके जुम्मे " न्हाण्याची संवय असल्याने पुढल्या शनिवारी तेव्हडे ते त्याचे कपडे पांढरे शुभ्र दिसायचे.
वेंगुर्ल्याच्या बंदराच्या दिशेने मार्केटच्या अगोदर उजव्या बाजूला डोंगराकडे चढत जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने अगदी वर गेल्यावर रस्ता संपतो,त्याच्या उजव्या बाजूच्या डोंगराच्या सपाटीवर तांबळेश्वराचं मंदीर आहे. त्याच्या उजव्या बाजूला उतरणीवर गांवाचं स्मशान आहे.ह्या स्मशाना जवळ एका पडक्या झोपडीत लालाचा, रात्रीचा झोपण्यासाठी मुक्काम असायचा. त्या स्मशानशांततेच्या एकांताच्या परिसरात लाला कसा राहायचा हे, गावातल्या लोकांचे भयभयीत आश्चर्य असायचं.त्यावेळच्या आमच्या लहान वयांत तर लालालादिवसा रस्त्यावर पाहून देवचार भुताटकीचा प्रतिनिधी असावा असंच वाटायचं.दिवसा प्रेतं जाळायला येणाऱ्या लोकाना लालाची झोपडी रिकामीच दिसायची,आत डोकावून पाहिल्यावर ईतःस्था पडलेली ऍल्युमिनीयमची कळकटलेली भांडी पातेल्या,लोटा आणि सुंभाच्या दांडीवर लटकणारी एकदोन लक्तरं दिसायची.मात्र रात्रीची प्रेतं घेवून येणाऱ्याना रात्री बारा नंतर लाला आत घोरत पडलेला दिसायचा.तो स्मशानाकडे ढुंकूनसुद्धा पहात नसे,असं नियमीत स्मशानयात्रेला जाणारे लोक म्हणायचे.तसंच प्रेत-संस्कार झाल्यावर लोकं निघून गेल्यावर ईकडे तिकडे पडलेले सामानसुमान, कपडेलत्ते पाहून लाला कशालाही हात लावत नसे.तो निरपेक्ष,निराधार,निस्पृह असावा असं लोकाच मत, त्याच्या विषयी पक्कं झालं होतं.कधी तरी तापाने फणफणला असेल तर " अल्ला,अल्ला " असं ओरडल्याचं कुणी तरी ऐकणारे सांगतात ह्या एकाच शब्दावरून लाला मुसलमान असावा अश्या निर्णयाला लोक आले होते.रस्त्यावरून फिरत असताना तसा तो अल्पभाषीच होता.एखाददुसरा शब्द कुणी ऐकला तर तो मराठीत,मालवणीत किंवा "अच्छा " असा उर्दूत असायचा त्यामुळे रस्त्यावर पहाणारे लोक लालाला मुसलमान संमजायचं की काय समजायचं ह्याच्या संभ्रमात असायंचे.त्याच्या धर्माचा विषय ओघाओघाने पुढे येणारच आहे.
सकाळी खाली गावात आल्यावर थेट तुळसुली गावापर्यंत जवळ जवळ तिन मैल चालत जायचा.मधे एका चहाच्या दुकानात बाहेरच त्याला रतीबाने एक कप चहा आणि बेकरीतला पाव खायाला मिळायचा. खांद्दयावरच्या झोळीत त्याचा एक कप असायचा तसंच एक ऍल्युमिनियमची थाळी आणि एक पांढऱ्या पोरसिलीनची तबकडी,त्यावर निळ्या गर्द रंगाची किनार असायची.दुपारचा मार्केट मधे आल्यावर सांळगावकरांच्या खानावळीच्या बाहेर बसल्यावर डाळ,भात एखादा माशाचा तुकडा आणि आमटी फुकट जेवायला मिळायची,तसंच बुधवारी आणि रविवारी मयेकरांच्या हॉटेलातून बशीभर मटण आणि दोन पाव दुपारचे मिळायचे.मटण लाला पोरसीलीनच्या तबकडीत न चुकता घ्यायचा लाला कुणाकडे काही मागायचा नाही.दुकानात बाहेर बसल्यावर हॉटेलचा पोऱ्या त्याला पाहून खाणं आणून द्दयायचा. लालाने कधीच भीक मागीतली नाही.कुणी त्याच्या कमंडलूत एखादं केळं,आंबा,चीकू सारखं फळ दान करायचा आणि लाला ती कधी खायचा किंवा एखाद्दया लहान मुलाला देवून टाकायचा.
मार्केटच्या आवारात असलेल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बांधलेल्या चौथुऱ्यावर दुपारची वामकुक्षी घ्यायचा.कधी कधी बाबल्याच्या पानाच्या गादी जवळ जावून उभा राह्यचा.दोन चार हिरवी खायची पाने,थोडी कुटलेली सुपारी,थोडा तंबाखू आणि एका पानावर चुना लावून त्याची पुरकंडी त्याच्या झोळीत बाबल्या टाकायचा.लालाला असं दान केल्यावर त्याच्या धंद्दयालाबरकत येईल अशी त्याची भाबडी समजूत असायची.
बाजूच्या दुकानाच्या उंबरठ्यावर दोन चार उपट्सुंभ गांवठी जुगार खेळत बसायचे.चार आण्याच्या (पावलीच्या) नाण्यावर माशी बसेल त्याला जुगार लागला असा नियम करून ईतरानी ठेवलेली नाणी त्याची व्हायची.उंबरठ्यावर रांगेत ठेवून दिलेल्या कुणाच्या नाण्यावर माशी बसेल हे ज्याचे त्याचे नशिब असायचे.कधी कधी पंधरा पंधरा मिनीटं माशी फिरकायची पण नसायची. लालाला ह्या जुगारात कसलीच उमेद नसायची.उभं राहायचं म्हणून तो उभा राहायचा.मात्र अन्वर खेळत असेल तर मात्र तो लालाला रोखून धरायचा.लालाच्या पायावर डोके टेकल्याशिवाय त्याला जुगारात लाभ होत नाही असा त्याचा अनुभव होता.आणि खरंच लालाच्या पायावर डोके ठेवून पावली त्याच्या पायावर घासल्याशिवाय त्याला लाभ होत नव्हता,पण ईतर म्हणजे गुरुनाथ,दाजी,दत्या वगैरे हिंदू मंडळी लाला मुसलमान असल्याने त्याच्या पायावर डोकं ठवणं त्यांना पसंत नव्हतं.धर्म बुडतो असा त्यांचा समज असायचा.अन्वर आणि लाला असताना ते जुगारातून काढता पाय घ्यायचे.लाला नसताना मात्र अन्वर कधी कधी हरायचा.
असं कां होतं?, म्हणजे लाला असताना अन्वर का जिंकतो हे चलाख पंढरीच्या लक्षात आलं.अन्वर नक्की काय करतो ते त्याने नीट लक्ष देवून हेरलं.आणि लालालाच्या पायावर डोकं न ठेवता,फक्त पावली लालाच्या पायावर पंढरी घासायचा.नंतर हटकून माशी पंढरीच्या पावलीवर बसायची.पंढरी जुगार जिंकायचा.
त्याचं गुपीत असं होतं की लालाचे मळलेले आणि कधी न धुतलेले पाय एव्हडे अस्वच्छ असायचे की त्याच्या पायावर घोंघावणाऱ्या माशा त्या घासलेल्या पावलीला आकर्षीत व्हायच्या. हे पंढरीच्या चलाख डोक्यात आलं.
अशातऱ्हेने दिवस चालले होते.आम्ही शाळेतून घरी येताना लाला दिसला की "लाला! मी पास की नापास? " असा प्रश्न केल्यावर, खाली मुंडी ठेवून चालत असलेला लाला हळू आवाजात फक्त म्हणायचा " पास ". हे ऐकून आम्हा सर्वांना बरं वाटायचं.असंच एकदां दाजी पराडकरने त्याला विचारलं,आणि तो परिक्षेत खरंच नापास झाला.त्याला खूप वाईट वाटलं.परिक्षेसाठीनीट अभ्यास न केल्याने नापास झाल्याचं दुःख दाजीला नव्हतं,तर लालाचं भाकित खोटं ठरलं याच त्याला जास्त दुःख झालं.पुढल्या खेपेला लाला दिसल्यावर दाजी त्याला म्हणाला"लाला तू झूट बोलतोस,मी नापास झालो."लाला पहिल्यांदाच रसत्यावर थांबून म्हणाला कसा, " बेटा मैने तुमको ’तुमना, पास’ असं बोललो होतो.मै झूट कभी नाही बोलत.अल्ला की कसम" दाजीच्या लक्षात आलं लाला "तुम, नापास" असं बोलला असावा.
लाला अलिकडे रोज रसत्यावर दिसत नव्हता.कधीतरी दिसायचा.साळगावकरच्या खानावळीतला पोऱ्या पण म्हणाला लाला थाळीत दिलेले नीट जेवत नाही.मयेकर हॉटेलवाले पण म्हणाले "लालाने अलिकडे मटण सोडलं थाळीत घेतो पण खात नाही". करता,करता लाला आता खाली उतरून यायचा बंदच झाला.
असंच एकदा तांबळेश्वराला गेलेल्या काही लोकानी सांगतलं की लाला "पैगंबरवासी" झाला.तो अल्लाला प्यारा झाला. कुणी तरी म्युनसिपालीटीला कळवलं.गाडी आली होती,पण लोकानी लालाला बेवार्शी न्यायला दिलं नाही.प्रश्न पडला लालाला पुरायचं की जाळायचं.त्या गर्दीतून अन्वर पुढे आला आणि म्हणाला " लाला मुसलमानच आहे.तांबळेश्वराच्या देवळाच्या बाजूला मी त्याला बरेच वेळा नमाज पाडताना पाहिलं आहे.आणि नेहमी ’अल्लाकी कसम’असंच म्हणायचा. आणि अगदी खाजगीत म्हणजे लघूशंका करताना मी त्याला पाहिलं आहे त्याचा सुंथा झाला आहे." एव्हडं सगळं ऐकल्यावर लोकानी त्याला तांबळेश्वरच्या पठारावरच एकेठिकाणी पुरला.
तांबळेश्वराच्या स्मशानात आल्यावर लोक न चुकता ईतर सामुग्री बरोबर एक फुलाचा हार आणायला विसरत नाहीत.सर्व संस्कार झाल्यावर बाहेर येवून लालाच्या कबरीवर आस्थापुर्वक हार घालतात आणि कबरीला हात जोडतात.आणि मुसलमान कबरीला हात लावून मग आपल्याच केसावरून हात फिरवतात.
कधी कधी शाळेतून येताना रसत्यावर लालाचा भास व्हायचा."लाला! मी पास की नापास? "असं विचारल्यावर आता उत्तर द्दयायला लाला नव्हता.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, January 18, 2008

दुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू

दुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू


नयनी माझ्या बसवूनी कसले वचन देवू
मनी आणूनी प्रीत तुझ्यावर किती करू

नको देवूस जन्माची खूषी
एखादे गोड हास्य तेव्हडे देशी
सामोरे तुला बसवूनी कसले गीत गावू
मनी आणूनी प्रीत तुझ्यावर किती करू

साथ अपुली न सुटो अशी शपथ घेवू
दुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू
दूर तुला ठेवूनी प्रीती व्यवहार कसा करू
नयनी माझ्या बसवूनी कसले वचन देवू
मनी आणूनी प्रीत तुझ्यावर किती करू

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, January 17, 2008

नसे काही कठीण निश्चया पुढे

नसे कठीण काही निश्चया पुढे


नको करू पर्वा
माझ्या मनाची
घे आहुति हवी तर
माझ्या प्राणाची
ऐकावीस फक्त एकदाच
माझी कहाणी

लागेल सामील व्हावे तुला
ही लोकयात्रा पुन्हा पुन्हा
होईल ओळख माझी खरी
निरखून खरा खरा गुन्हा

मित्रांना मैत्रिचा नसुदेत
अभिमान
घ्यावा कसा तरी परक्यांचा
अहसान

गगन हवे तर धरतीवर
कोसळून पडे
नसे कठीण काही
निश्चया पुढे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, January 16, 2008

तुझाच प्रीतीसाठी

तुझ्याच प्रीतीसाठी


हरवून बसलो मी सर्वस्व माझे
तुझ्याच प्रीतीसाठी
का सोडीले तुझ्या प्रीतीने मला
दारो दारी भटकण्यासाठी

आंसवे नयनातली नाही ओघळली
विचार मनातले नाही बोलले
छपवूनी मनात ते मी फिरतो
घुटकर मरण्यासाठी
तुझ्याच प्रीतीसाठी

झालीस ज्याची राहशी त्याची
लख लाख लाभो तुला प्रीतीची
थबकट माझी दुःखी चीतेवरी
जीवंत जळण्यासाठी
तुझ्याच प्रीतीसाठी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, January 15, 2008

गाडी अड्डा

गाडी अड्डा
सकाळी उठून घराच्या पडवीच्या पायरीवर बसलो होतो.दोन हातावर जबड्याचा खालचा भाग टेकून,हाताचे कोपर गुढ्घ्या जवळ मांडीचा आधार घेवून, दोन्ही पायाचे तळवे खालच्या पायरीवर ठेवून, विचार करीत बसलो असताना, मारुतीच्या देवळाच्या दिशेने घुंघुराचा मंजूळ आवाज कानावर पडत असताना, त्या सकाळ्च्या शांत वेळी ते सप्तसूर खूपच श्रवणीय वाटायचे.
नक्कीच बेळगांवहून बैलगाड्या येवू लागल्या असणार,आणि तीस ते चाळीस गाड्यांची एकच ताफा दिसणार,त्या ऊंच ऊंच धिप्पाड पांढऱ्या बैलांच्या जोड्या,सरळ लांबच लांब लाल पिवळी अणकुचीदार त्यांची दोन दोन शिंगे,एक एक शिंगावर ओवलेले छोटे छोटे घुंघरु,प्रत्येक बैलाच्या गळ्यात दुपदरी मोठ्या घुंघरांची लोंबत्या माळा, कधी कधी आंबोली घाटात चिक्कार थंडी पडत असल्याने बैलाना थंडी वाजूनये म्हणून त्याच्या पाठीवर घातलेली रंगीत गोणपाटाची शाल,बैलांच्या मानेवर आधार घेवून T आकाराच्या त्या जूंवर मधल्या दांडीवर गाडीला जोडल्या जाणाऱ्या टोकावर बैठक मारून बसलेला तो बेळगांवचा घाटी "पावणा (पाहूणा) " पाहून मजा यायची. पावणा गाडीतून खाली उतरला की लांब लचक झब्बा वरून असल्यामुळे कमरेखाली काय घातलं आहे हे पहाण्याची काही जरूरी वाटत नसायची,डोक्याला मुंडासं,आणि खांद्दयावर बैलाला मारण्याचा चाबूक एव्हडाच त्याचा पेहराव.
जरा मोठ्याने ओरडून जणू जुनीच ओळख आहे असा अविर्भाव करून "काय पावणं गाडीत काय आणलंत?" असा नेहमीचाच प्रश्न विचारल्यावर नेहमीच मिळणाऱ्या उत्तराचे अपेक्षीत शब्द कानावार यायचे "गुळ आनि ऊंस आनलं बघा! " नंतर एक दोन पासून तीस चाळीस पर्यंत बैलाच्या गाड्या मोजायच्या.शेवट्च्या गाडीच्या "पावण्याला" तोच प्रश्न विचारल्यावर तेच उत्तर यायचं.अशी ही रांग सरळ बाजाराच्या दिशेने जात रहायची आणि त्यानंतर गुंडू जोश्यांच्या किंवा टांककारांच्या किंवा बागायतकरांच्या वखारी जवळ येवून थांबायची.ह्या लोकांचे दलाल, बरोबर तो तो माल त्या त्या वखारीत नेवून उतरायचे. त्यात घाटावरून आणलेल्या गुळाच्या ढेपी,घाटावरचा ऊंस,गुरांसाठी उंसाची चिपाड घालून वैरणमिश्रीत पेंडींचे मोठे मोठे तुकडे,बटाट्याची पोती,घाटावरचा कांदा,शेंगदाण्याची पोती वगैरे,वगैरे. अर्थात एव्हढा माल ेउतरून घ्यायला बराच वेळ जायचा.मधल्या वेळात आमचे हे घाटावरचे पाहूणे दुपारची वेळ बाजारातल्या तेंडुलकरांच्या "हाटलातून" उसळ पाव,कांद्दयाची भजी आणि चहा घेवून माल उतरून, रिकाम्या झालेल्या गाड्या, द्लाल सांगतील तिथे नेवून, परत कोकणातून घाटावर जाणारा माल भरण्यासाठी नेत असत.माल भरत असताना बैलाना चारा आणि वैरण देवून त्यांची आपल्या सारखी दुपारची पोटपुजा करून घेत.कोकणातून जाणारा माल म्हणजे केरसुण्या,सुपे, रवळ्या,सुकी मासळी,आंबसोलं,फणस,फुले,काही गाड्यातून जळावू लाकडे,सावंतवाडीहून जाणारे लहान मुलांचे लाकडी खेळ,कोकणातला ऊंस वगैरे माल भरूनघ्यायचे.दुपार ऊलगता ऊलगता मासळी बाजारातून संध्याकाळच्या जेवणासाठी "उकडे तांदूळ,मिठमिरची सुकी मिरची आणि मासळी बाजारातून "मांसं" विकत घ्यायला " पावणं " विसरत नसत.दिवस संपता संपता मासळी बाजारात कोळणी कमी किंमतीत उरलेली मांसळी असल्या गिऱ्हाईकाला विकून टाकण्याची संधी दवडत नसत.भरभरलेल्या पिशव्या घेवून आपआपल्या बैलगाडीकडे जाताना कुणी विचारलं "काय पावणं मासळी बाजारातून काय खरेदी केलीत? " तर म्हणायचे "बांगडं" मग तो कुठचाही मासा असला तरी "बांगडं घेतलं" म्हणून सांगायचे.
आता हा कोकणातला माल घेवून जाणाऱ्या सर्व बैलगाड्या गाडीअड्ड्याच्या दिशेने निघायच्या.ही गाड्यांची रांग पुढे कोपरावरच्या कॅनरा बॅंकला वळसा घालून तांबळेश्वर मंदीऱ्याच्या दिशेने पुढे सरकायच्या आणि आमच्या घराच्या पोरसाच्या मागे गाडी अड्ड्यात येवून विसावायच्या.आंत शिरताना, अड्डा म्युनिसीपालीटीचा असल्याने चौकीवरचा शिपायी प्रत्येक गाडी मागे, पार्कींग चार्ज घ्यायचा.गाडीच्या मागून बाहेर आलेल्या ऊंसाच्या बंडलातून एखादा ऊंस ओढून घेवून चौकीत घरी नेण्यासाठी ठेवायला विसरायचा नाही."तळां राखतलो तो पाणी चाखतलोच नाय ?" असा निर्लज्यासारखा प्रश्न स्वतःलाच पुटपुटायला पण विसरायचा नाही.
आतापर्यंत स्रर्व बैलगाड्या अड्ड्यात मिळेलत्या जागी झाडाखाली उभ्या राहून विसावा घेण्याच्या तयारीला लागायच्या."हो,हो,हो" किंवा "प्यु,प्यु,प्यु " असा पुढच्या दोन ओठांचा चंबू करून बैलाना मानेवरच्या जूं पासून निराळे करण्यात आणि हलकेच बैल बाजुला झाल्यावर सर्व गाडीचा भार जमिनीवर टेकवायचे.गाडी चाकावर पुढे मागे होवू नये म्हणून दोन्ही चाकांच्या मागे आणि पुढे अडती लावायला विसरत नसत.मोकळे झालेल्या बैलाना गाडीलाच बांधून त्यांच्या समोर गवताच्या जुड्या मोकळ्या करून बाजूच्या विहीरीतून पाण्याची बादली भरून आणून ठेवायचे.आणि मग आपल्या संध्याकाळच्या जेवण तयार करण्याच्या तयारीला लागायचे. वहिवाटीने गाडीअड्ड्यात प्रत्येक झाडाखाली चीऱ्याच्या दगडांच्या तिन दगडांच्या चुली असायच्या त्यात जळावू लाकडांची आग करून एका कळकट ऍलिमिनीयमच्या मोठ्या टोपात उकडे तांदूळ धुवून भात करायला ठेवायचे.बाजूलाच पडलेल्या एखाद्दया गुळगुळीत असलेल्या दगडावर "बांगडं" कोयत्याने कापून साफ करून, तसल्याच पातेलीत ठेवायचे आणि मग येताना आणलेल्या पाट्यावरवंट्यावर बाजारातून आणलेला मिठमसाला आणि सुकी मिरची बारीक वाटून त्याची माश्याच्या आमटी साठी गोळी करून ठेवायचे.तोपर्यंत भात शिजून तयार झाल्यावर, मासे शिजवायला पातेलं चढवायचे." बांगडं " फोडणीला टाकल्यावर ती आमटी ढवळायला झाडाच्या फांद्दयावरची एखादी लहानशी डहाळी तोडून त्याच्यावरची पानं काढून,धुवून ती डहाळीच आमटी ढवळायला वापरायचे.
साधारण तिन्हीसांजा व्हायला येई पर्यंत गाडीतच वामकुक्षी घ्यायचे.तेव्हडीच त्यांना विश्रांती मिळायची. जाग आल्यानंतर मात्र एकमेकाला उठवून सगळे मिळून एकेठिकाणी बसून भात आणि " बांगडं "आणि त्याची आमटी यावर ताव मारून जेवायचे.लालबुंद तिखट आमटी आणि भात जेवताना नाकातून पाण्याची धार लागायची.मग गाडीत चुकून उरलेला एखादा गुळाचा खडा तोंडात टाकल्यावर बरं वाटायचं.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही वेंगुर्ल्याला गेलो की आमच्या पोरसातल्या मागच्या गडग्यावर(मागच्या भिंतीवर) बसून त्यांना जेवताना बघूनच आमचं पोट यथेच्छ भरून घ्यायचो."पावणं, एव्हडं तिखट,तिखट जेवण तुम्हाला जेवायला कसं काय जमतं " असं विचारल्यावर "कोकनी मिरची,लंय तिखट असते बाबा! पन आम्हाला लंय चांगली वाटते" असं आपलं प्रामाणिक मत द्दयायचे.
जेवण वगैरे आटोपल्यावर मंद कंदिलाच्या दिव्यावर ह्ळू आवाजात एखादा भजनाचा कार्यक्रम व्हायचा.दुरून येणारा त्यांचा गाण्याचा आवाज आम्हाला घरात ऐकायला यायचा.रात्रीच्या शांत वातावरणात अधून मधून झांझांचा आवाज विलोभनीय वाटायचा.जेवणं आटोपून आम्ही पण झोपी गेल्यावर मध्य रात्री बारा वाजायच्या पुर्वी किंचीत जाग आल्यावर झोपल्या जागीच पुन्हा घुंघुरांचा तोच आवाज स्पष्ट अस्पष्ट कानावर यायचा.आणि शांत झोप यायची.
सकाळी उठून मागच्या पोरसात जावून गाडी अड्ड्याकडेनजर टाकल्यावर सर्व अड्डा रिकामा झालेला दिसायचा.मध्य रात्रीच हे घाटावरचे " पावणं " पुन्हा परतीच्या मार्गावर बेळगांवच्या दिशेने रात्री बारा वाजताच निघून गेले होते. तो घुंघुरांचा रात्रीचा आवाज त्यांच्या परतीच्या प्रवासाची सप्तसुरात चाहूल देत होता.
आता काय, बैलगाड्या गेल्या आणि ट्रक आले.तिस चाळीस बैलगाड्या ऐवजी सर्व काम, तिन चार ट्रक बेळगांवहून माल आणण्यात पुरं पडायचे.सकाळीच ते ट्रक आल्याची खूण म्हणजे त्यांचा हॉर्नचा कर्कश आवाज आणि पेट्रोल जळल्याची असह्य घाण नाकात शिरून नकोशी व्हायची.तेंडुलकरांच्या " हाटलात " आता कोण जाणार? " रामभरोसे लॉजींग आणि बोर्डींग " मधे हे तिन चार बेळगांवचं " पावणं" कोट,टोपी,लेंगा घातलेले" ट्रक डायवर " म्हणून दुपारच्या जेवणाला जायचे.
"काय पावणं गाडीत काय आणलंत?" असा प्रश्न आता कोणाला विचारणार? घरासमोरून भर्कन निघून गेलेले ते ट्रक गाडीअड्ड्यात आता कशाला येणार?." रामभरोसे मधे" दुपारचे जेवण आटोपल्यावर परत कोकणातला माल घेवून त्याच संध्याकाळी ते बेळगांवला मुक्कामाला जायचे.
सकाळीच पडवी समोरच्या पायरावर आता बसल्यावर,सकाळच्या शांत वेळीचे ते सप्तसूर आणि ते घुंघुराचे आवाज अजुनही कानांत घुमत असतात.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, January 13, 2008

कसे समजावे

कसे समजावे


मन बहाल करूनी
कसे समजावे
जीवन काय आहे
प्रीती कुणावर करूनी
कसे समजावे
विरह काय आहे

ही चेहऱ्याची तेजी
ही अंगावरची कांती
तुला समक्ष पाहूनी
कसे समजावे
रवी काय आहे
अन
शशी काय आहे

भोळ्या तुझ्या चेहऱ्याने
दाखविली अनेक रुपे
सुंदर तुझ्या नयनानी
पाजले अनेक पेले
ध्यान माझे हरवूनी
कसे समजावे
उपेक्षा काय आहे

मार्गात तुझ्या येवून
ठेविले मी पाऊल
झाली जाणीव मला
मंझील काय आहे
प्रीती तुजवर करूनी
कसे समजावे
आनंद काय आहे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, January 11, 2008

मिळाले सांग काय तुला?

मिळाले सांग काय तुला


मनाला नाराज करूनी
पस्तावले मी प्रीत करूनी
लुटून माझी प्रीत
मिळाले सांग काय तूला

वसूनी कुणाच्याही मनी
का येशी माझ्या मनी
जावूनी कुणाच्याही मैफिलीला
मैफिली माझ्या का येशी

ठेवूनी माझ्या मनाला
दिलीस ठोकर प्रीतीला
सहारा मला देवून
बसलास नजर फिरवून

कसे समजावू मी मला
आकांक्षा मिळाल्या धुळीला
हंसणारे माझे नयन
करीती आता रुदन

होवूनी तुझीच दिवाणी
गाते तुझीच प्रीत कहाणी
आवाज माझ्या मनातला
नाही कधी तू ओळखला

घेवूनी माझ्या मनाला
दिलीस ठोकर प्रीतीला
लुटून माझी प्रीत
मिळाले सांग काय तूला
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

प्रेमी देती लुटू असलेल खजिना

प्रेमी देती लुटू असलेला खजिना


प्रेम करीतो यास्तव
देती लोक सजा
नादान हे घालती फुंकर
ठिणगीवर देवूनी हवा

देती बहूत वचने हे दिवाणे
प्राण राहो ना जावो
पुरे करीती आपुले सांगणे

तोला हवे तर मनाला
घेवूनी दौलतीचा तराजू
प्रीतीशी प्रीतीच्या धाग्याला
घेवूनी एकमेका शिवू

तख्त कसले कसला रत्नदागिना
प्रेमी देती लुटू असलेला खजिना
वचन घेतले मन देवूनी
द्दया सजा कठोर होवूनी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

बॉम्बेचे मुंबई आणि मधुकर सामंत

बॉम्बेचे मुंबई आणि मधुकर सामंत


" बंबई, बॉम्बे " ज्याला म्हणत होते,त्याला आता " मुंबई " किंवा स्टाईलमधे काही लोक हल्ली " मुंबाय " म्हणतात त्या मुंबापुरीला मुळ मुंबादेवी ह्या देवीच्या नांवावरून बहुतेक मुंबई असे नांव आले असावे.माझा मोठा भाऊ ह्या नामकरणाला कसा कारणीभूत झाला ही एक गंमतीदार गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे.खरं म्हणजे त्याचं नांव महाराष्ट्र सरकारच्या गॅझेट मधे ठळक अक्षरात लिहीलं गेलं आहे.

मधुकर लक्षमण सामंत आता बॅण्ण्व वर्षाचा असेल. मला आठवतं आमच्या लहानपणी आम्हाला हा कम्युनीस्टांच तत्वज्ञान सांगत असे.आमच्या ते डोक्यावरून जात असे.तरूण वयात कम्युनीस्ट असणं हे त्या दिवसात फॅशन समजली जात होती.रशियात पाऊस पडला की ईकडचे कम्युनीस्ट छत्री उघडतात असं गमतीने म्हणंत.

मधुभाऊ जसा वयाने मोठा होत गेला,तसं त्याचं कम्युनीस्ट तत्वज्ञानाचं वेड कमी कमी होत गेलं.मुळचा राजकारणी असल्याने कम्युनीस्ट प्रणालीला साजेशी, आणि त्याच्या मनाच्या ठेवणीशी जुळणारी, त्यावेळी जरा प्रसिद्धीला येवू घातलेली, महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबईत, स्थापन झालेली शिवसेना त्याला जॉईन करायला सोपं वाटलं.आणि त्या पार्टीत तो दिलचस्पी घेवू लागला.त्याच वेळी बॉम्बेचं मुंबई नामकरण करण्याचे आंदोलन जोरात चालू होतं.मधुभाऊ BALLB होता.आणि या विषयावर कायदेशीर लढाई पण देणे आवश्यक आहे हे शिवसेनेच्या पुढाऱ्याना समजावून सांगण्याचा त्याचा प्रयत्न सफल झाला.

त्याने स्वतःच्या नावाने मुंबई हायकोट्रात केस सादर केली.शिवसेनेने त्याला आर्थीक मद्त देण्याचं कबूल केलं, आणि त्याने पण नावाजलेली आणखी वकील मंडळी जमा केली.बरेच दिवस ही केस चालली. मधुभाऊने ऐतिहासीक कागदपत्रे जमा करून त्याचा कायदेशीर अभ्यास केला.पद्धतशीरपणे त्यांची मांडणी मांडून कोर्टाला पटवून दिलं.आणि शेवटी बॉम्बेचं मुंबई असं नामांतर करण्याचा कायदा झाला.
मधुभाऊचा शिवसेनेने जाहीत सत्कार केला.

अलिकडे मी मधुभाऊना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो.ह्या वयातही त्यांची स्मरणशक्ति शाबूत आहे. मला पाहिल्यावर त्याला खूप आनंद झाला.कारण त्यावेळच्या आठवणी त्याच्या कडून ऐकून घ्यायला, आता कुणीही उरलं नव्ह्तं.सर्व जुन्या आठवणींची उजळणी करून झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावरची
समाधानी बघून मला पण जरा बरं वाटलं.जाता,जाता मी त्याला म्हणालो, "मधुभाऊ, आता सर्व जगात बॉम्बेला मुंबई म्हणू लागले आहेत,हे पाहून मला खूप बरं वाटतं एक म्हणजे मुंबई ह्या नावाला बदलून बॉम्बे काय बंबई काय कोणी काहीही नावाने आपल्या मराठी शहराला संबोधीत होतं,ते आता नीट नावाने संबोधू लागले आणि दुसरं म्हणजे बॉम्बेचं मुंबई म्हणायला माझा मोठा भाऊ कारणीभूत झाला हे लक्षात येवून खूप बरं वाटतं."

वार्धक्याने त्याच्या सुरकुतल्या चेहऱ्यावर आणखी सुरकुत्या पडल्या त्या त्याच्या आनंदाने हंसण्याच्या होत्या हे फक्त मीच जाणू शकलो.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

थांबेना कुणी थांबुनी कुणासाठी

थांबेना कुणी थांबूनी कुणासाठी


नको राहूस हळवी एव्हडी
सौजन्य शोभते मर्यादा जेव्हडी
होवून हळवी जावूनी सीमे पलिकडे
घालीशी स्वतःला शिक्षेचे कडे

भार तुझ्या अंगाचा न पेले तुला
भार जीवनाचा पेलशी कसा
हवेची झुळुक करी अस्थीर तुला
तुफान असता करीशी संभाळ कसा

सदैव नसतो मार्गी फुलांचा सडा
मार्ग काट्यांचाही येतो पायतळा
जमाना बदले बदल तू जीवना
राहूनी हळवे बदल तू हळवेपणा

थांबेना कुणी थांबूनी कुणासाठी
पाहूनी निघून जाई टाळण्यासाठी
जमान्याचे प्रवासी आपण राहू थांबून
जमानाच झिडकारून जाईल आपणा सोडून

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

कुणाचा आहे हा ईशारा

कुणाचा आहे हा इशारा


जात आहे पुढे पुढे ही धरती
जात आहे पुढे पुढे हे गगन
होत आहे काय ह्या जगताला
कुणाचा आहे हा इशारा

जात आहे पुढे पुढे ही जीवन नय्या
कोण आहे हिचा नावाडी
न कळे जात आहे कुठे हे जीवनचक्र
कुणाचा आहे हा इशारा

हे हंसणे हे रडणे ही आशा निराशा
न कळे आहे काय हा तमाशा
रात्रंदिनी जात आहे कुठे हा मेळावा
कुणाचा आहे हा इशारा

अजब आहे हा सोहळा
अजब आहे ही कहाणी
नाही कसले ठिकाण
नाही कसले निशाण
न कळे कुणासाठी जात आहे
हा जगन्नाथाचा रथ
कुणाचा आहे हा इशारा

हे शहाणे हजारो झाले भटके
गुपीत त्याचे कुणी न समजे
ही साखळी जीवनाची करीते भ्रमंती
कुणाचा आहे हा इशारा

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

रामभाऊ गणेश माळगी

रामभाऊ गणेश माळगी


"रामभाऊ" असं न चुकता आम्हीच त्याला म्हणायचो.कुणी त्याला " रामा" म्हणायचे तर कुणी त्याला " रे,रामा " अशी साद घालायचे कुणी " रामा रे " असं पण म्हणायचे.सर्व साधारण त्याला "रामा" च म्हणायचे.तर हा रामा म्हणजेच रामभाऊ गणेश माळगी,अगदी लहान असताना त्याचे वडील माझ्या आईकडे त्याला घेऊन आले आणि तिला म्हणाले "हा माझा मुलगा तुझ्याकडे ठेव,शिक्षणात त्याचं लक्ष नाही,तुझ्या हाताखाली कामाला घे, आणि दोन घांस घाल.मला आता एव्हड्या मुलांना पोसायला जमत नाही."आणला त्यावेळा तो दहा वर्षाचा होता.आईने विचारलं, पण तो, शाळेत जायला तयार नसल्याचं तिला दिसलं. निदान घरी काम करून पोट तरी भरील, त्याच्या बापाच्या घरी त्याची उपासमार व्हायची ती तरी होणार नाही,असं आईच्या मनात आलं.अतिशय गरीब स्वभावाचा रामा, खूप आज्ञाधारक आणि प्रेमळ होता.आई सांगेल ती कामं निष्टेने करायचा. आईला त्याची खूप दया यायची.त्याला ती पोटभर जेवायला घालायची.पण एव्हडं जेवू घालून रामाची शरिरयष्टी दुष्काळातून आल्या सारखीच, असायची. आणि तो म्हातारा होई तो शरिर तसेच ठेवून होता.
हळू, हळू रामा आईची बाजाररहाट करायला लागला. आणि पुढे पुढे आपल्या आपणच वेळ बघून, "आई,जरा वांयंच बाजारात जावून येतंय़ं हां!,वेंगुर्ल्यासून माशाची येष्टी येंवचों टायम झालो दिसतां" असं आईने ऐकलं न ऐकलं असं बोलून "साधना कपडे का साबून ईस्तमाल की जिये " असं मोठं अक्षरात लिहीलेली पिशवी खांद्दयावर टाकून चप्पल पायातून सरकून चालू पडायचा."दहा वांजता वेंगुर्ल्याची गाडी कशी येणार काही तरी निमीत्त करून हा बाहेर भटकायला जातो."असं माझे वडील कुरकुरून पुटपुटायचे.त्यावर आई म्हणायची "बिचाऱ्याला घरात काम काम करून कंटाळा येत असेल." हे ऐकून वडील गप्प बसायचे.
रामा गटाराच्या बाजू, बाजूने मान खाली घालून चप्पल घसटत, घसटत बाजारा पर्यंत जावून यायचा.वाटेत काही रामाला ओळखणारे दुकानदार किंवा हॉटेलवाले गम्मत म्हणून त्याची फिरकी घ्यायचे "रामा मासळी कसली ईलीसा रे ?" यावर रामाचं नेहमीचं उत्तर "येंगुर्ल्यासून नुकतीच गाडी सुटली, असां भाटाचो गडी सांगी होतो.बांगडे खूप रापणीत लागले हत असां ऐकलां" असं धांदात खोटं सांगून वेळ मारून न्यायचा. घरी आल्यावर स्वतःला गिल्टी समजून, न बोलता सर्व कामें सिरयस होवून हाता वेगळी करायचा.आईच्या हे लक्षांत येत असे पण ती आईच्या ह्रुदयाने त्याला क्षमा करायची.आणि ते त्याच्या लक्षात यायचं.
रामाच्या तोंडात अस्सल मालवणी(कोकणी) शब्द होते.बाजारातून जावून आल्यावर काही ना काही बातम्या घरात येवून सांगायचा.
"डुबळ्याचो म्हातारो खवांचलो(वारला)"
"केसरकराचो जांवई सडोफटींग(एकटाच) आसा"
"भाटाचो पंप चॉं,चॉं करून आवाज करतां "
मधेच कधी तरी मराठी मिश्रीत मालवणी बोलायचा.
"आता तुझा बाबा येणार तुला फिरायला "होरणार" (नेणार)".
" मी हुंतलं(म्हटलं) म्हणून सांगू नका हां!" वगैरे, वगैरे.
आपण काही कमी नाही असं दाखवायचा त्याचा प्रयत्न असायचा.

काही वर्षानी आम्ही जेव्हा मुंबईला आलो तेव्हा तो पण आमच्या बरोबर मुंबईला आला.सावंतवाडी सोडण्यापुर्वी भेटेल त्याला सांगत राहिला, "आता तुम्हाला मी गमणार(दिसणार) नाही" आणि ऐकणारा काही तरी प्रश्न विचारणार याची अपेक्षा करीत थोडा पॉझ घ्यायचा."असांss कायss ? " असा प्रश्न झाल्याची खात्री झाल्यावर, " असां काय म्हणतांss? परत परत येणां जाणां काय सोपा नाही लांबचा प्रवास आणि खर्च काय कमी येतां म्हणून सांगू." असं स्वतःच्याच कल्पनेत असलेले विचार सांगायचा.

ठाण्याचा उत्तरसळला राहून तिथे पण लोकात पॉप्युलर झाला. "काय रामा कसं आहे?" "बरां आहे" म्हणून उत्तर द्दयायचा.दहाएक वर्षानंतर माझा धाकटा भाऊ सावंतवाडीला नवीन धंदा करण्यासाठी गेला तेव्हा रामा पण त्याच्याबरोबर गेला.आतां रामाला लोक "मुबईकर " म्हणून संबोधीत होते.त्याचा त्याला गर्व वाटायचा. सुरवातील लोकल लोकाना आपल्या मनातली भर घालून मुंबईचे मोठेपण वर्णन करून सांगायचा.माझ्या भावाच्या फॅक्टरीत पडेल त्या कामाची त्याला मदत करायचा.आतां भावाने त्याला घरीकाम न करता फॅक्टरीत काम करण्याचे जणू प्रमोशन दिलं होतं. आल्या गेलेल्याला "बाबाची" म्हणजे माझ्या भावाची मोठेपणं सांगायचा.त्याचा स्वभाव बघून लोक त्याच्याशी प्रेमाने वागायचे.आलेल्या माणसाला न विचारताही जादा माहिती द्दयायचा.माझ्या भावाला त्याला समजावून सांगावं लागायचं.वडीलांच्या जागी तो त्याला मानायचा.

त्याच्या "बाबाची" फॅक्टरी चांगली चालली होती.पण जसं वंय होत होत गेलं तसा रामापण थकत चालला होता.खाकी हाफपॅन्ट(शॉर्ट) आणि वरती मोठ्या बटनाचा बुश शर्ट आणि पायांत जूतं (चप्पल) घालून "बरां आहे" म्हणून जबाब देणारा रामभाऊ रास्त्यावर कमीच दिसायचा.घरचे लोक पण त्याला काम देत नसत.बसून खायला रामाला खूप जीवावर यायचं.आपल्या नात्याचा नाही, गोत्याचा,तरी केवळ घरातला म्हणून राहील्याने किती जिव्हाळा लावून होता.डॉक्टर म्हणाले रामा आता दिवस नाही काढणार.त्याचं हार्ट खूपच वीक झालं आहे.हे ऐकून घरची मंडळी तो अंथरूणाला लागल्यावर अक्षरशः सेवा करीत होते.वय ऐंशी झालं होतं.आणि एक दिवस रामाने ईहलोकाची दिशा धरली.अगदी रक्ताचं माणूस जातं तसं सगळे त्याच्या पश्चात रडले.तो गेल्याची बातमी ऐकून मला एका नावाजलेल्या कवितेचं रामभाऊची गोष्ट लक्षात घेवून परिवर्तन करावं असं वाटलं.

("लळा जिव्हाळा शब्दच खोटे
कोण कुणाचे नाही
राजा
कोण कुणाचे नाही")

ह्या ऐवजी

लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

पिसे,सनतडी.काड्या जमवी
चिमणी बांधी कोटे
दाणा,दाणा आणून जगवी
जीव कोवळे छोटे
चिमणा उचलूनी नेई बाळा
जगविण्या साठी त्याते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

रक्तहि सगळे नसते
असू शकते माया
कोण कुणाचे नसून ही
अंतरी असते दया
सांगायाची नाती नसेना
प्रेम कुठे जाते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

माणुस सुद्धा प्रेम करतो
समजून दुसरा अपुला
दुसरा ओळखी उपकाराते
देई सर्वस्व त्याला
कोण कुणाचा जोडू पाहतो
या जगती नाते

लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

देवू नये अपुले मन

देवू नये अपुले मन


देवू नये अपुले मन
कधीही सुंदरीला
करूनी ते अपुले
मिटवीतात ते धुळीला
जीवनभर लाविती
रोग अपुल्याला

पाहूनी प्रीतीचा आजार
इलाज करीती बेसुमार
वाढवून प्रीतीचा आजार
करीती खूपच उपचार

नसे कसलाही भरंवसा
ह्यांच्या प्रीतीचा
घेती मन हिसकावूनी
पश्चात ते विसरूनी जाती

देवू नये अपुले मन
कधीही सुंदरीला
लोक सांगती देती दगा
ह्या अपुल्या मनाला.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

डॉ.बंडूमामा

डॉ.बंडूमामा


सत्येंद्र आजगांवकर म्हणजेच डॉक्टर बंडूमामा.माझ्या आईचा चुलत भाऊ.आईला सख्खे भाऊ नव्हते.बंडूमामा उंच,गहूवर्णी आणि लाघवी स्वभावाचा.मधूनच एक नाकाची पुडी दाबून दुसऱ्या नाकपुडीतून "सॉक,सॉक " असा आवाज काढायची संवय त्याला जडली होती.बंडूमामाची हजेरी त्यावरून ओळखावी. बंडूमामाची घरची गर्भश्रीमंती आणि घरच्या शैक्षणीक वातावरणाचा वारसा,यामुळे बंडूमामाला वैद्दयकीय शिक्षण घेणं फारसं कठीण झालं नाही.शिक्षण पूरं झाल्यावर जे.जे. हॉस्पिटलमधे इंटरनशिप करीत असताना त्याला स्वतःलाच टी.बी.चा प्रादुर्भाव झाला.हे लक्षात येताच त्याला खूपच मानसिक धक्का बसला.त्याच हॉस्पिटलात तो ट्रिटमेंट घेऊ लागला.त्यावेळी या रोगावर जालीम असा उपाय उपलब्ध नव्हता.तरीपण स्वतः डॉक्टर असल्याने अर्ध्या आवश्यक गोष्टींची तो काळजी घेऊ शकल्याने हळू हळू बरा झाला.आमच्या घरी तो "रिकव्हरी पिर्यड" मधे येऊन राहीला.माझ्या आईने त्याची खूप सेवा केली.हे अचानक आलेलं संकट त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळायला कारणीभूत झालं.त्याने लग्न न करण्याचं ठरवलं.पुन्हा त्याच्या डॉक्टरी शिक्षणाचा उपयोग त्याने करून घेतला.न जाणो ह्या रोगाचा पुनर्संभव झाला तर त्याच्या बरोबर त्याच्या सहचरणीलाआणि पुढे होणाऱ्या मुलाना नाहक क्लेश होऊ नये ह्या एक उदात्त विचाराने तो ह्या बाबतीत हट्ट्वादी राहिला.

आयुष्यात "टर्नींग पॉईंट्स " कसे येतात ते पहा.त्याच्या डॉक्टर ग्रुपमधल्या एका त्याच्या मित्र डॉक्टरने सहज सुचना केली की "तू ईकडे तिकडे डॉक्टरी व्यवसाय करण्या ऐवजी पांचगणीला एक टी.बी. स्यानीटोरीयम आहे.तिथे तूं ईकडे तर व्यवसाय आणि ईकडे तर तुझ्याच जाणीवेतला रोग असलेल्या रोग्याना उपाय आणि सुश्रुशा करण्याचे काम का घेत नाहीस?.नाहीतरी तुला संसार करायचा नाही,मग तिकडे तुला मिळेल तेव्हडा वेळ घालवून सेवेचे पुण्यपण मिळेल. " हा त्याच्या मित्राचा सल्ला त्यला आवडला आणि त्या तयारीला तो लागला.त्या स्यानीटोरीयम मधे डॉक्टरांची पण जरूरी होती.पांचगणीला बंडूमामा स्थाईक झाल्याने मला सुद्धा एकदा त्याच्याकडे जायला मिळालं.

डोंगराच्या पायथ्याशी वाई गांव,डोंगर वर चढून गेल्यावर पांचगणीचे पठार आहे आणि वर चढत गेल्यास महाबळेश्वरचे थंड हवेचे ठिकाण आहे.पांचगणीपण खूप थंड असते.ब्रिटीशानी ही ठिकाणे शोधून काढून त्यांच्या सुट्टीतल्या आरामासाठी ती चांगलीच सोययुक्त केली होती.एका श्रीमंत पारशी गृहस्थ्याने पांचगणीला राहाण्यासाठी एक बंगला बांधला होता आणि त्याला व्यवसायासाठी मुंबईत रहावं लागायचं. त्यालाही उतारवयात टी.बी. झाला असताना त्याच्या डॉक्टरने त्याच्या पांचगणीच्या बंगल्यात राहाण्याचं सुचविलं होतं.तसं करत असताना त्याला ह्या स्यानीटोरीयमची कल्पना सुचली.असं मला तिकडच्या मुक्कामात राहिलो असताना कळलं.

आता मुळ विषयाकडे वळूया.त्याचं असं झालं,बंडूमामा तिथे असताना एका बिलीमोरीया नावाच्या श्रीमंत पार्श्याला पेशंट म्हणून ह्या स्यानीटोरीयम मधे उपायाला पाठवीलं होतं.त्याची आणि बंडूमामाची चांगलीच दोस्ती जमली,ईतकी की आणखी आराम मिळण्यासाठी त्याने इंग्लंडला थोडे दिवस वास्तव्य करण्याचं ठरवलं.आणि तू पण माझ्या बरोबर माझा पर्सनल डॉक्टर म्हणून चल असं बंडूमामाला सांगितलं.अशा तर्हेने बंडूमामाला इंग्लंडला जायला मिळालं.मला आठवतं आम्ही त्याला सांताकृझ विमानतळावर पोहोचवायला गेलो होतो. आठवड्यातून त्यावेळी तिनदा इंग्लंडवरून फ्लाईट्स यायच्या, आणि टर्मीनल कसलं अगदी विमानाला हात लावता येईल असा सेंन्डॉफ देता येत होता.जुन्या हिंदी सिनेमातला
सीन "सुनील दत्त इंग्लंडहून आल्यावर त्याला रीसीव्ह करायला हार घेवून उभी असलेली वैजयंतीमाला " आठवलं म्हणजे झालं.

तिकडून जाऊन आल्यावर बंडूमामाला बिलीमोरीयाने फोर्ट मधल्या बझारगेट स्ट्रीट्वर एक दवाखाना उघडून दिला.आणि त्याच्या मागे त्याचाच एका चार मजली उंच ईमारतीत अगदी वरच्या मजल्यावर एक फ्ल्याट दिला.बझारगेट वरचे भाजी विकणारे आणि काही गरिब विक्रिते डॉ.बंडूमामाचे कायमचे पेशन्ट झाले होते. "होटल मे खाना और मशिद मे सोना" हे जीवन जगत असताना अधून मधून तो आमच्याकडे रवीवारी दवाखाना बंद करून यायचा.पुढे दिवस बदलू लागले.त्याच्या वयाला उतार येवू लागला.पुर्वी सारखं कामाचा रपाटा जमेना,हे कळू लागल्यावर बंडूमामाने आपला दवाखाना बंद केला.बिलीमोरीया पण निर्वतला. त्याच्या मुलांना पण जागा हवी होती.ह्या सगळ्यांचा विचार करून बंडूमामाने पण उर्वरीत
आयुष्य कसं घालवावं याचा नीट विचार केला होता.बिचाऱ्याला बायका मुलं असती तर हा प्रश्न उद्भवला नसता.आणि तरुणपणी लग्न न करण्याच्या निर्णयाच्या वेळी एव्हडं दूरवर लक्षं कोण देतो म्हणा.त्यामुळे "आलिया भोगासी" करावं लागतंच.

बंडूमामाची एक भाची मालाडला राहायची.तिची मुलं मोठी झाल्याने कामाधंद्दयामुळे तिच्या पासून दूर राहायची.ती आणि तिचा नवरा.त्यांच्याकडे तो राहायला गेला.पण जागेच्या आभावी झोपायला मात्र सामंत मास्तरांच्या गोरेगावातल्या संगीतशाळेत रात्रीचा जायचा.सामंत मास्तरांचं आणि त्याच नात होतं.सामंत मास्तरांच्या वर्षातून एकदा होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या संगीताच्या जाहीर कार्यक्रमाला हटकून तो हजर राहायचा. मग त्यादिवशी कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला अक्षरशः अंग मेहनत आणि जरूर लागल्यास हात मेहनत पण करायचा.अशा प्रसंगी "डॉक्टरा,डॉक्टरा " असं ओरडून त्याला बोलावून लोक त्याची मदत घ्यायचे. "सॉक,सॉक" असा आवाज आल्यावर बंडूमामाची हजेरी कळायची.
"दिवसा मागून दिवस चालले,ऋतुमागुनी ऋतू जीवलगा कधी रे येशील तूं" हे आशा भोसलेने गाईलेलं गाणं त्याला अतिप्रिय.सामंत मास्तरांच्या प्रत्येक गुरुपौणीमेच्या संगीत कार्यक्रमाच्या दिवशी त्याची ह्या गाण्याची फर्माईश असायचीच.अलिकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला बंडूमामा हजेरी देवू शकला नाही.परंतु सामंत मास्तर मात्र बंडूमामाचे आवडतं गाणं कुणाला तरी त्याची आठवण म्हणून गायला लावतात.मालाडहून रात्री झोपायला संगीत शाळेत रोज यायचं त्याला आता जमत नव्हतं. अलिकडेच मी त्याल भेटायला मालाडला गेलो होतो.मला म्हणाला " नाही रे मला,आता जमत, त्या स्टेशन वरच्या ब्रिजच्या पन्नास पन्नास पायऱ्या चढायला आणि उतरायला.वय आता ब्याएंशी झालं.खरं सांगु का तुला आता नाही जगावंस वाटंत. भोगलं सगळं.आता फक्त यमदुताची वाट पहात आहे बघ." ऐकून मला पण खूप वाईट वाटलं.माझ्या डोळ्यातून नॉनस्टॉप अश्रू वाहू लागले,कींव आली त्याची.
चेंज म्हणून मी रेडिओ चालू केला,आणि योगायोग असा रेडिओवर त्याच वेळी आशा भोसलेचं गाणं लागलं होतं."दिवसा मागून दिवस चाललेऋतु मागुनी ऋतु जीवलगा कधी रे येशील तूं"बंडूमामा ते गाणं ऐकत होता, की वार्धक्यातल्या डुलक्या काढत होता ते कळलं नाही पण मला माझ्या कविमनाने त्या
गाण्याचं विडंबन केलेलं जाणवलं."दिवसा मागून दिवस चाललेऋतू मागुनी ऋतूयमदुता कधी रे नेशिल तू "त्याचंच मन मला गाण्यातून त्याच्याच ईच्छेची जणू जाणीवच देत होतं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

संपली माझी कहाणी

संपली माझी कहाणी


ह्या जगती असती अनेक गमती
असती लाखो दुखदेयी सोबती
जीवनसाथी जाई मज सोडूनी
संपली माझी कहाणी

संकटे मनी नशिबाने येती
इच्छुक दोघे भेटू न शकती
दिसे बहार नावापुरती
दोन फुले फुलू न शकती
मनोरथाची बाग उधळूनी
बरबात झाली जवानी
संपली माझी कहाणी

जीत अपुली दुनियेत नसे
मने देवूनी हरतो जसे
ओठावरती नशिबी दुषणे
प्रेमभरी ते गीत कुठे
मन ही नसे अपुल्या ठिकाणी
हर कहाणी झाली पुराणी
संपली माझी कहाणी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

हा असा एकांत

हा असा एकांत


प्रेमभरी दुनिया ही
भासे किती तरी तरुण
हे असे शांत शांत
हा असा एकांत

ह्या उंच उंच पर्वतांच्या
गर्वीष्ट सावल्या
सरसावती सांगण्या
नजर उंचावूनी पहाण्या

येती देवदूत स्वर्गातले
होवून मुग्ध बोलण्या
हे असे शांत शांत
हा असा एकांत

नसे कसली अडचण
नसे कसले दडपण
पाऊला पाऊला मागे
असे एक घसरण
ठसे पाऊलांचे
करीती एक निशाण

हे असे शांत शांत
हा असा एकांत
प्रेमभरी दुनिया ही
भासे किती तरी तरुण

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com