Wednesday, September 30, 2009

जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र

(अनुवादीत. दो नैनों में आंसू भरे है..)

अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र

स्वपनांच्या छाया भरलेल्या नयनी
अपुल्या रात्रभर गैरांच्या होती दिनी
अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र

मिथ्या तुझ्या वचने वर्षे जाती व्यतीत
जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र
अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र

कशी सामावू नीज माझ्या नयनी
दोन्ही माझे नेत्र भरले त्या अश्रूनी


श्रीकृषण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, September 27, 2009

आसमंत भिजले कसे पेटले हे रान

(रिम-झिम गीरे सावन … मंझील)

ती….
बरसतो श्रावण रिम-झिम रिम-झिम
आनंदे उल्हासित होते माझे मन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन



बरसत होता घन हा असाच जेव्हा
भिजला होता पदर हा असाच तेव्हा
सांगशील सजणा का होते असे अजून
होते आनंदे उल्हासित माझे मन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान



अशाचवेळी श्रावण देई दाह निराळा
अशाचवेळी आसमंत दिसे फार वेगळा
तृप्त वारा वाहे मदमस्ती पिऊन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन



तो….
थेंबामधूनी वाजती तुझे घुंघरू जेव्हा
आशा मनातल्या न जावो विरूनी तेव्हा
कसे झाले स्वप्नाळू माझे दोन्ही नयन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन



मैफिलीमधे सांगू ते कसे कुणाला
हृदय आमुचे दिले कुणा अनोळखीला
हाय आता काय करावे जतन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, September 24, 2009

अमेरिकन काटकसरी झाला.

आता पर्यंत अमेरिकेत सोन्याचा धूर जळत होता.साधारण २००७ पासून सर्व धूर जळून गेला.अमेरिकन कफल्लक झाला.आणि त्याला तोच जबाबदार आहे. त्याची हांव,ग्रीड,नडली. आहे त्यापेक्षा अधिक हवं,दोन माणसांना पाच बेडरूमचंघर हवंच. मॉलमधे जायचं, दिसेल ते खरेदी करायचं, आणि घरी आणायचं.कालांतराने ते अर्धवट वापरून किंवा न वापरूनघरात झालेल्या वेअरहाऊसमधे दामटून टाकायचं.कां तर अमेरिकन एकॉनॉमी “अर्न ऍन्ड स्पेन्ड” वर चालते.क्रेडीट कार्डावर दहा दहा हजार,डॉलर्स कर्ज काढा.विनासायास ते मिळतं.मिनीमम पेमेंट दिलं तरी चालेल.व्याज मात्र वसूल होत रहातं.असेहे विचार सर्वसाधारण अमेरिकन करायचा.जी गोष्ट सर्व साधारण अमेरिकनची तिच विचारसरणी निरनीराळ्या सांपत्तिक स्थरातल्या अमेरिकनची.म्हणजे मग घरात सुधारणा करण्यात कर्ज काढा,जरूरी पेक्षा आणखी एखादी गाडी घेऊन घरा समोर पार्क करा.एक गाडी ऑफिसला जायला एक देशभर फिरायला,प्रवासाला जायला,एखादी पिक-अप चालू कामाला किंवा समुद्रात सहलीसाठी खरेदी केलेली याट (मेकनाइझ्ड होडी) ओढून न्यायला.कधी कधी मोठी याट समुद्रावर किनार्‍यावरच पार्क करून ठेवायची सोय असल्याने महिना शेकडो डॉलर्स देऊन पार्क करून ठेवली जायची.अश्या आणि अनेक तर्‍हेच्या चैन आणि मौज-मजा मारण्याच्या लाईफ-स्टाईला चाटावलेला अमेरिकन एकाएकी कफल्लक झाला.बरेच वेळा ही सर्व मजा पैसे कर्ज काढून व्हायची.

नाईन इलेव्हन झाल्यावर बूशने फतवा काढला होता.घरी बसूं नका प्रवास करा,खर्च करा.तरच आपली एकॉनॉमी टिकणार. काही प्रमाणात हे खरंही होतं.पण कुठच्याही गोष्टीचा अतिरेक झाला की भोवल्या शिवाय रहात नाही.
हे असंच चालायचं असं अंकल सॅमला वाटत राहिलं.वॉलस्ट्रीटवर कसलाच कंट्रोल नव्हता.कंट्रोल हा शब्द म्हणजे शीवी होती.
“आम्ही हवे तसे करणार!
आम्हाला कोण तुम्ही पुसणार?”असं होतं.

घरांच्या किंमती वाढतच होत्या.घरांच्या किंमती वाढतच रहाणार.तीन लाखांचं घरं हां हां म्हणता दहालाखावर खपायला लागली.ती सुद्धा पाच सात वर्षात.
“घर मिळेल का हो घर?”
हे बिलवलकरांचं नटसम्राट नाटकातलं वाक्य आठवलं.
“एक काय? हवी तेव्हडी घरं आहेत.तुमच्या जवळ पैसे नसले तरी चालेल.दर महिन्याला हाप्ता परवडतो तो अम्ही भरणार म्हणून खोटं खोटं लिहून द्या.एक दोन महिने हाप्ते भरल्यानंतर भरता नाही आले तर तुमचं घर बॅन्क ताब्यात घेईल आणखी काय होणार?. बर्‍याच लोकानी एक घर असताना दोन तीन घरात इनव्हेसमेन्ट केली.दोन चार महिने कसंतरी हाप्ते भरूं.चार महिन्यात घराची किंमत वाढणारच मग वाढलेली किंमत घेऊन घर बॅन्केला देऊन टाकूं.बॅन्क म्हणायची दुसरं गिर्‍हाईक मिळेपर्यंत आणखी घराची किंमत वाढणारच.तिसरं गिर्‍हाईक गाठून चढत्या भावात विकू. मधल्या लोकाना म्हणजे बॅन्क आणि गिर्‍हाईक या मधल्या लोकाना,उदा.घर विकण्याचे व्यवहार करणारे लोक,वकील लोक,ऍग्रिमेन्ट करून देणारे लोक,घर रहाण्यालायक आहे म्हणून तपासणी करून दाखला देणारे लोक इत्यादी,इत्यादी एक घर विकण्याच्या व्यवहारात येणारे जेव्हडे म्हणून अंतर्भूत होतात ते सर्व लोक आपली आपली फी घेऊन आपली तुंभडी भरून बाजूला व्हायचे.

बुश एकदा म्हणाल्याचं आठवतं,
“लाखोनी घरं विकली जात आहेत.अमेरिकन एकॉनामी आता मागे वळून पहाणार नाही.डावजोन्सच आंकडा तेरा हजार पर्यंत गेला.जगातल्या बॅन्का अमेरिकेत येऊन घरात पैसे इनव्हेस्ट करायला पुढे सरसावल्या.एखाद्याने घर घेतलं आणि पुढे त्याला परवडलं नाही आणि नुकसानी झालीच घरावर तर लोन देणार्‍या- इनव्हेस्टमेन्ट करणार्‍याना- नुकसानी होवू नये म्हणून इंश्युरन्स घ्या. कारण अशी घरं विकणं रिस्की आहे मग खात्री नाहीतर इनश्युरन्स मिळत होता. आणि एक दिवस उजाडला.घराच्या किंमती वर जाईनात. अश्यक्य,अश्यक्य.घराच्या किंमती वर गेल्याच पाहिजेत.गेल्या वीस वर्षात असं कधीच झालं नाही.आज कसं होणार?
पण झालं.डाऊ खाली घसरायला लागला.पत नसताना विकलेली घरं हाप्त्याच्या आभावी लिलावात काढण्याशिवाय उपाय नव्हता.बॅन्कांच रिस्क त्यांच्या आंगलट आलं.सगळीकडे तारांबळ उडाली.लाख्खोंनी घरं लिलावात जायला लागली. इन्श्युरन्स देणार्‍या बॅन्का आणि कंपन्या इन्श्युरन्सचे पैसे देऊन देऊन थकल्या. तोंडघशी पडल्या.बॅन्करप्ट झाल्या.

“दोन चार झाडं एव्हडी मोठ्ठी आहेत की ती पडून चालणार नाही.”बुशचे एकॉनामी पंडीत त्याला सांगायला लागले.
काय करणार कसं तरी करून ही झाडं-म्हणजेच मोठ मोठ्या बॅन्का दिवाळ खोरीत गेल्या तर संपलं.म्हणून त्यांना वाचवा.
कर्ज काढा,नांतवंडाना-पणतवंडाना कर्ज फेडीची जबाबदारी घ्यावी लागली तरी चालेल.चीन कडून हवं तर लोन घ्या पण ह्या बॅन्काना वाचवा-बेल आऊट- करा.

700 ते 800 बिलीयन डॉलर्स-म्हणजे सातलक्ष ते आठलक्ष कोटी डॉ्लर्स- कांग्रेस कडून पास करून घेतले.बुशचा फायन्यान्स सेक्रेटरी-अर्थमंत्री-प्रेस कॉनफरन्स मधे फक्त धाय धाय रडायचा तेव्ह्डा राहिला होता.

आणि ही सर्व रिपब्लिकन पार्टीची आणि बुशची कर्म कथा ओबामाच्या बोडक्यावर टाकली गेली.हवं ते करा रीस्क घ्या पैसे गुंतवा तरच भांडलवदारी-कॅपिट्यालिस्ट-पद्धती चालते.रीस्क घेऊन पैसे गुंतवणार्‍या वरच्या थराच्या लोकाना बोनस आणि काही इन्सेंटीव्ह देण्याचे करार झाले होते.त्यामुळे रीस्क घेऊन आता सर्व भांडवल बुडालं तरी त्यांना कायद्यानुसार बोनस आणि इन्सेंटीव्ह देणं क्रमपात्र झालं होतं.कारण नाही दिलं तर ते कोर्टात केस घालतील.मग जरी करदात्याचे उसने पैसे त्यांना द्यावे लागले तरी नाईलाज आहे.पैसा घेताना लाजलज्जा बाळगून चालत नाही.एक टक्का लोक गबर श्रीमंतझाले.99 टक्के लोक भिकारी झाले तर काय झालं?रीस्क घेऊन पैसा कमवला तर रीस्क घेणार्‍याला इन्सेंटीव्ह देणं क्रमपात्र आहे पण रीस्क घेऊन पैसे बुडवणार्‍याला सुद्धा पैसे देणं क्रमप्राप्त कसं आहे?.पैसे दिले नाहीत तर ते बॅन्का सोडून जातील ना? मग कसं व्हायचं? ह्या साठी त्यांना पैसे बोनस दिलेच पाहिजेत.राजकीय पार्ट्यांना इलेक्शनमधे हेच लोक पैसे देतात ना?
असं हे त्रांगडं घडत असताना गरीब आणि मध्यम वर्गीय अमेरिकन माणूस रसातळाला मात्र गेला.नोकर्‍या गेल्या घरं गेली लोक रस्त्यावर आले.पेन्शन फंड होते ते नव्हते झाले.रिटायर्डला आलेले लोक भिकारी झाले.कुणाकडे राहाणार?सरकारकडून अनएम्प्लॉयमेन्ट बोनस घेऊन दिवस ढकलायला लागले.जेम तेम गुजराण करायला लागले.सेव्हिंग केलं असतं तर आता लोकांकडे आणि सरकारकडे भीक मागायची पाळी आली नसती.आता घरी बसा,घरी जेवण करा.रेस्टॉरंटचे भाव परवडण्याच्या सीमे पलिकडे गेले.पाच डॉलरची डीश आता दहा डॉलरला मिळते.चार लोकांच्या कुटूंबाला रोजचे चाळीस डॉलर्स कसे परवडणार.त्यात चार दिवसाची ग्रोसरी येईल.घरी जेवण तयार केल्याशीवाय उपाय नाही.गॅस-पेट्रोल-एक डॉलर गॅलन वरून पाच डॉलर्स वर गेलं.गाड्या आता घरात राहिल्या.गाड्यांचा हाप्ता,घराचा हाप्ता,गाड्यांचा इन्श्युरन्स,मुलांचा शाळेचा खर्च माती धोंडे आता कसं परवडणार.जॉब मिळत नाही.दर महिना चार पाच लाख लोकाना कंपन्या जॉबवरून काढून टाकायला लागल्या.कारण कंपन्याना ऑर्डर्स कमी यायाला लागल्या,धंदे चालेनात.

इकडची भारतीय जनता त्यामानाने ह्या चटक्यापासून थोडी दूर होती.नव्वद टक्के लोक आपला जॉब सांभाळून होते.बरचसे इंजीनियर होते.त्यातल्या त्यात मराठी माणूस काटकसरी राहून पैसा करून होता.घरच्या बायकांवर संस्कार होते ना. “अंथरूण बघून पाय पसरावेत”आई वडील आजोबा आजीची सततची बोलणी, साधी राहणी उच्च विचारसरणी,उगाच शो नको.असे शब्द कानात घुमायला लागले असावेत.असले संस्कार ह्यावेळीच उपयोगी पडायचे.एखाद्या कॉलनीत मिक्स वस्ती असते तिथे त्याही दिवसात लॉनमोव करण्यासाठी ठेवलेला माळी मराठी माणसाच्या घरी अद्यापही यायचा.इतरानी काटकसरी साठी खर्चात काटछाट करण्याच्या उद्देशाने माळी काढल्याचं चटकन लक्षात यायचं.कारण लॉनमोवरचे आवाज कमी येऊ लागले. मराठी माणूस अजूनही महिन्यातून एक दोनदा इंडियन रेस्टॉरन्टना कुटूंबासकट भेट द्यायचा.गुजराथी लोकही असेच काटकसरी आहेत.ते ही अंथरूण बघून पाय पसरणारे.पण काही अपवाद असायचेच म्हणा.

आणि आता ओबामाच्या कारभारात नऊ एक महिन्यानी परिस्थिती थोडी फार सुधारायची चिन्ह दिसायला लागली आहेत.
हळू हळू लोकं खरेदी करायला लागले आहेत.सरकारी मदतही कमी घ्यायला लागले आहेत.तरी अजूनही साठ लाख लोक बेकार आहेत.काही ना जॉब मिळायला लागले आहेत.दर महिन्याला जॉबवरून काढून टाकण्याच्या संख्येत घट यायला लागली आहे.ओबामाचं स्टिम्युलस पॅकेज थोडं थोडं काम करायला लागलं आहे अशी चिन्ह दिसत आहेत.जॉबवर असलेला अमेरिकन आता सेव्हिंग करायला लागला आहे.ज्यांच्या बॅन्कच्या खात्यावर शुन्य टक्के सेव्हिंग असायचं त्यांच्या जवळ आता पाच टक्के सेव्हिंग दिसत आहे.क्रेडीट मिळायचं बंद झाल्याने पैशाची चणचण भासायला लागली आहे.परत काही तरी असं झालं तर? अशी भिती मनात बाळगून अमेरिकन काटकसरीत रहायला शिकला आहे.लॉन्ग विकेंडला घरात बसून रहायला लागला आहे.कारण प्रवास परवडत नाही.अवांतर खाऊन जाड झालेले लोक घरी बसून मिळालेल्या वेळात व्यायाम करायला लागले आहेत.त्यामुळे शरिराचे “हाबू ” झडायला लागले आहेत.नोकरी गेल्याने हेल्थ इन्श्युरन्स गेला.आता पुढे कसं व्हायचं.लोकांचे डोळे उघडायला लागले. ओबामाने युनिव्हर्सल हेल्थ स्किमवर बिल आणायचं ठरवलं आहे.आमचा डॉक्टर आम्ही ठरवणार सरकार काय म्हणून आम्हाला जबरी करणार? रिपब्लिकन पार्टीने लोकाना चिथवायला सुरवात केली आहे.कारण बिल पास झालं तर त्यांना इलेक्शनमधे पैसे पुरवणार्‍या खासगी हेल्थ इन्श्युरन्स कंपन्याना लोकांचीलूटमार करण्याची संधी हुकणार आहेत.

डेमोक्रेटीक पार्टीची वरचढ असल्याने ओबामा हेल्थ स्किमचं बिल पासकरून घ्यायला पुढे आला आहे.
भारतात नेहमीचीच वीस ते पंचवीस टक्के बेकारी असतेच.इकडे काही काळा पुर्वी अगदी शुन्य टक्के बेकारी असायची ती आता जवळ जवळ दहा टक्के झाली आहे.अमेरिकेत असं कधीच होत नव्हतं.उलट कामाला लोक मिळणं अवघड व्ह्यायचं.
आता दहा नोकर्‍यासाठी हजार लोक लाईनीत उभे असतात.मेकडॉनॉल्डचा खप मात्र वाढत चालला आहे.कारण जंक-फुड सगळ्यात स्वस्तात मिळतं.एक डॉलरला बिगमॅक खाऊन दिवसभर पोट भरलेलं रहातं. हे सगळं होण्याचं मुख्य कारण बॅन्कावर किंवा पैशाचा व्यवहार करणार्‍या कंपन्यावर कसलंच बंधन नव्हतं.भारतात ह्या बाबतीत पहिल्यापासून शिस्त होती.रिझर्व्ह बॅन्काचा धाक होता.इथे कुणाचाच धाक नसल्याने रीस्क घेतल्या शिवाय धंदा वाढत नाही म्हणून कसलंही रीस्क घ्यायला मुभा होती.त्याचा गैरफायदा घेतला गेला.अती तिथे माती झाली.आता ओबामाने फायन्यान्स रेग्युलेशन म्हणून बिल आणलं आहे.करदात्याचा पैसा भांडवल म्हणून सरकारने बॅन्काना दिला तरी बॅन्का क्रेडीट द्यायला काचकूच करीत आहेत.दुधाने ओठ भाजल्याने ताक फुंकून प्यायला लागले आहेत.पण त्यामुळे लहान लहान धंदे वर यायला कठीण होऊ लागलं आहे.

हे ही दिवस जातील.अमेरिका परत वर आल्याशिवाय राहणार नाही अशी प्रत्येक अमेरिकनाची धारणा आहे.इतिहासपण तेच सांगतो.1930 च्या डिप्रेशनमधे,अशीच तंगी आली होती.त्यातून अमेरिका वर आली.विंड एनर्जी,सोलर एनर्जी,हायब्रिड गाड्या अशा धंद्यात पैसे गुंगवणूक चालू झाली आहे.कॅलिफोरनीयात प्रत्येक नव्या बांधलेल्या घरावर सोलर एनर्जीची पॅनल्स बसवून सोय करून द्यायला आर्थीक उत्तेजन देण्यात येत आहे.ह्या नव्या क्षेत्रात लोकाना जॉब मिळायला लागले आहेत.जुने रस्ते, जुने पूल, जुन्या शाळा दुरुस्त करायला पैसे गुंतवले जात आहेत.त्यामुळे लोकाना कामं मिळण्याचे संभव वाढीला लागले आहेत.
“अमिरका देश” पुन्हा अमिरका होईल यात शंका नाही.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, September 19, 2009

संगोपन आणि आत्मनिर्णय.

माझा मित्र रघुनाथ खाडिलकर अगदी सुरवातीपासून बेफिकीर वृत्तिचा पण तोलूनमोजून निर्णय घेणारा असा होता.
काल त्याची आणि माझी गाठ एका सायन्स सेमिनारमधे पडली.
"अरे,परत तू ह्या विषयात भाग घ्यायला सुरवात कशी केलीस.तू तर सर्व सोडून जवळ जवळ संन्यास घेतलास असं मला
मागे भेटला होतास त्यावेळी म्हणाला होतास ते मला आठवलं.सोन्यासारखी कंपनी सोडून तू कसलंच काम न करण्याचा विचार केला होतास.ज्या कंपनीत तू होतास तिला वर यायला तू खूपच मेहनत घेतली होतीस.तुझ्या कर्तुत्वाच्या जोरावर सि.इ.ऒ. झालास म्हणून माझाच एक मित्र तुझा विषय निघाला त्यावेळी तुझी स्तुती करून सांगत होता.तुझं काही खरं नाही बाबा."
रघुनाथला काहीच बोलायला न देता मी माझंच म्हणणं दामटत त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करायला लागलो.

"चल आपण ह्या गर्दीतून कुठेतरी निवांत जागी जाऊन बोलूया.त्यावेळी मी तुला सर्व कामधाम सोडून संन्यास घेतला आहे
हे सांगितलं ते अगदी खरं आहे.पण त्याला बराच वेळ लोटून गेला.त्यावेळी माझा लग्न करण्याचा विचार नव्हता.
गेली कित्येक वर्षं मी कोण आहे? हे मी काय काय केलं? आणि त्यातून होणार्‍या माझ्या उपलब्धिनुसार तोलून मोलून मला मी ठरवीत होतो.तुला माहित आहे माझ्या शाळेत मी मेहनत घेऊन अभ्यास केला,आणि चांगले मार्क्स मिळवले, छात्रवृत्या मिळवल्या, आणि नावाजलेल्या शाळेत पुढल्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवला.नावाजलेल्या कॉलेजात प्रवेश मिळवून नंतर त्याच विद्यापिठाची पि.एच.डी घेतली.नंतर एका मोठ्या कंपनीत रिसर्च सायंटिस्ट म्हणून नोकरी पत्करली.
त्या तीथे मी राहिल्याने प्रत्येक होणारी गोष्ट परिपूर्ण होईतो त्यातून सुटका नाही अशा वृत्तिच्या माझ्या संवयी मुळे समाधानीत न राहाण्याच्या संवयीला मी प्रवृत्त झालो.संशोधनासाठी माझ्या अंगात असलेल्या आवेशाला जीद्दीची जोड म्हणून उत्पादनाची प्रखर इच्छा असणं,प्रोजेक्ट कार्यान्वित करणं, आणि कामात यशस्वी होणं,ह्या गोष्टी होत्या.आणि ह्या गोष्टींचा दृष्टीकोन ठेवल्याने मला पुरस्कार मिळाले,आर्थिक स्थिरता आणली गेली, काही तरी करून दाखवल्याची खूमखूमी आली आणि स्वाभिमानी पण झालो.पण त्यामुळे अधिक अधिक आवश्यक्यतेची अभिलाषा सतावू लागली आणि ती वाढू लागली. अधिक समय,अधिक अर्थ,अधिक पूर्ती असावी असं वाटूं लागलं.
"काहीतरी अधिक असावं" ह्या अगतिकेच्या मागे लागून लागून शेवटी कंटाळून मी माझा जॉब सोडला आणि घरी राहायला
लागलो." आम्ही जवळच्या लॉनमधल्या एका झाडाखाली बसल्यावर रघुनाथ मला सांगायला लागला.
"पण तू लग्न केलंस म्हणून मला कुणीतरी सांगितल्याचं आठवतं."मी म्हणालो.

"हो,माझं लग्न उशीरा झाल्याने मुलंही माझ्या वयाच्या मानाने अगदीच लहान होती.त्या दोन मुलांच्या संगोपनाची विशेष काळजी घेऊं लागलो.माझ्यासाठी निरनीराळे वेळ जाण्यासाठी चालू व्यवसाय शोधायला लागलो.आज कामाच्या आणि कमाईच्या दृष्टीतून विचार केल्यास मी अनुत्पादक आहे.आता माझ्या घरी प्रोग्रेस रिपोर्ट नाहीत,प्रेझेन्टेशन नाही,स्टाफ मिटींग्स नाहित.संशोधनाबद्दल लिखाण नाही,पेटंट घेण्यासारखं काहीच नाही.प्रत्येक दिवशी घरी मी काय करतो ते महत्वाचं झालं आहे.आणि ते नजरेत भरण्यासारखं नाही.जी काही पुंजी मी जमवून ठेवली आहे त्यात माझं आणि माझ्या बायको पोरांचं भागवीत आहे.माझ्या मुलांना खाऊन पिऊन सशक्त ठेवून त्यांना आनंदात पहात आहे."
अगदी बिनदास्त होऊन मला रघुनाथ सांगू लागला.

"तू तर अगदी जगावेगळा आहेस बघ.मी तुला लहानपणापासून ओळखतो.एकदा कॉलेजमधे प्रो.देसायाना चॅलेंज दिलं होतंस.
आणि शेवटी तुझंच खरं ठरलं.देसायानी पण मान्य केलं.तुझी त्या वयातली ती धमक पाहून मला वाटलं होतं की तू काहीतरी करून दाखवणार हे नक्कीच."

"काही तरी करून दाखवायची माझी खुमखूमी हळू हळू कमी व्हायला लागली.
उलटपक्षी मी कोण आहे? हा प्रश्न माझ्या जीवनात मला माझ्या नजरेत जास्त भरायला लागला आणि तो अत्यावश्यक आहे असं ही मला वाटायला लागलं.उदाहरण म्हणून सांगायचं झाल्यास,इतराना प्रभावित करताना मी कसा आहे,योग्य आहे की अयोग्य?मुलांवरच्या संस्काराच्या दृष्टीने मी सामाजिक चालचलनात आदर्श आहे का?माझी पोहोंच आहे ?की मी माघार घेतो?.असलीच जर पोहोंच तर ती कुणासारख्यांकडे आहे?मी दयाशील आहे का?मी माझ्यावर प्रेम करतो तसंच इतरांवरही करतो का? दररोजचं मुलांचं संगोपन करताना मी कसा वागतो? अशा तर्‍हेचे प्रश्न माझ्या डोक्यात घर करायला लागले."
मी म्हणालो,
"मुलांचं हंसणं खिदळणं,अश्रू ढाळणं,निराश होणं,आणि त्याबरोबर आईवडीलांनी पण सहनशिलता ठेवणं ह्या गोष्टी संगोपना
बरोबर जोड म्हणून येत असतातच. मग त्या गोष्टी तू कशा हाताळत होतास?"

रघुनाथ म्हणाला,
"जीवनाच्या मुल्यांबाबत माझ्या मुलांना शिकवताना, मी कोण? ह्या प्रश्नावर प्रभाव पडायला लागला.माझ्या जीवनात माझी
जागा काय आहे? आणि मला भविष्यात काय करायचं आहे? ह्यावर मी कोण?आणि मला काय व्हायचं आहे? अश्या तर्‍हेचे माझ्या मनातले प्रश्न अग्रगण्य वाटायला लागले.
आता माझ्या लक्षात यायला लागलंय की जेव्हडं मला माझ्या ह्या कामातून मिळतं तेव्हडं मला माझ्या डिग्रीमधून माझ्या संबंधीत अनुभवातून वगैरे,वगैरे जे मी माझ्या रेझ्युमेमधे देत असे त्यापेक्षा मिळतं.माझा विज्ञान विषय जास्त आवडीचा असल्याने जीवनातली माझी वर्ष मला सहनशीलता,वयक्तिक शिस्त,महत्वाकांक्षा वगैरे गोष्टींची उपलब्धी करण्याची क्षमता देऊन गेली."
"एव्हडं जर होतं तर मग तू पुन्हा असल्या सेमिनारमधे भाग घ्यायला कसा उद्युक्त झालास.का तुला आता घरी राहायचा कंटाळा आला आणि आता मुलं मोठी झाल्याने तुझा वेळ जायला तुला कठीण व्हायला लागलं?" मी त्याला विचारलं.

"तुझा ह्या प्रश्नाला मला प्रामाणिक उत्तर द्यायलाच हवं." असं म्हणत जरा गंभीर होऊन रघुनाथ सांगायला लागला,
"माझ्या पूर्वीच्या व्यवसायामधे उपलब्धि मिळण्यासाठी पीछ्छा पुरवण्याच्या माझ्या प्रयत्नात मी काही गोष्टी गमावून पण बसलो ह्याचं मला राहून राहून वाटायला लागलं.एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे गेल्याचं माझं मला वाटायला लागलं.मी आता माझ्या जीवनात संतुलन आणण्याचा प्रयत्न करीत असताना त्या जुन्या गोष्टी पुन्हा हळू हळू माघारी येऊ लागल्या आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास इतरांचा मनापासून आदर ठेवण्याची वृत्ति,वाचनाची आणि लेखनाची आवड आणि मी कोण आहे? हे जितकं लागू असतं तितकंच मी काय करतो? हे पण लागू असतं ह्या वरचा माझा दृढविश्वास.
ह्या सर्वांवर विचार करीत असताना माझ्या एका मित्राने फोन करून मला ह्या सेमिनार बद्दल कळवलं.मी मनात विचार केला इतक्या वर्षानी मला तुझ्या सारखी जूनी दोस्त मंडळी भेटतील.काही तरी नवीन ऐकायला मिळेल.आणि कुणास ठाऊक कदाचीत काही तरी करून दाखवायची माझी खुमखुमी पुन्हा जागृत होऊन नव्या प्रॉडक्टसाठी काम करण्यासाठी एखाद्याची ऑफर येईल."
"एव्हडं शिक्षण घेतलंस ते काही तू वाया जाऊ देणार नाहीस.तुला नक्कीच कुणाची तरी ऑफेर येवो" अशी शुभेच्छा देत

"आम्ही परत भेटूया"
अशा आशेवर एकमेकाला बाय बाय केलं.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, September 16, 2009

दयाशील असणं ही एक प्रकारची देणगी आहे.

“जेव्हा दयाशीलता आणि प्रेम ह्या मधली संदिग्धता जास्त स्पष्ट होत जाते तेव्हा त्या मधली बारकाई पाहून मी बराच प्रभावित होतो.”

कमलाकर धारणकर हा माझा शाळकरी दोस्त.आपल्या आईवडीलांचा एकूलता एक मुलगा.म्हणून लाडावलेला नव्हता. लहानपणापासूनच तो हुशार आणि शिस्त बाळगून होता.हे गुण त्याच्या अंगात उपजतच आले होते.कधी कधी आम्ही भेटलो की बालपणाच्या आठवणी काढून गप्पा मारतो.आणि आता ह्या वयावर त्यावेळच्या मनावर बिंबवून गेलेल्या आठवणीत ठेवण्यासारख्या घटनांचं चर्वीचरण करून एखाद्या तरी निर्णयाला येतो.कमलाकर मनाने अळकूळा होता. जरा मन दुखलं की रडायचा.

“तू लहानपणी खूपच भावनाप्रधान होतास.तसाच आता आहेस का? असं मी त्याला विचारल्यावर मला म्हणाला,
“जेव्हा दयाशीलता आणि प्रेम ह्या मधली संदिग्धता जास्त स्पष्ट होत जाते तेव्हा त्या मधली बारकाई पाहून अजूनही मी बराच प्रभावित होतो.
तुला मी माझी गंमत सांगतो,जेव्हा मी तिसर्‍या किंवा चौथ्या वर्गात होतो, त्यावेळी आमच्या वर्गशिक्षकानी दसर्‍याच्या सणाला वर्गात एक कार्यक्रम आयोजला होता.मी त्यावेळी माझ्या आईला म्हणाल्याचं आठवतं,
“आई,दसर्‍याच्या सणा दिवशी आम्हाला आमच्या गुरूजींनी पुजेचं सामान,रंगीत फूलं आणि सरस्वतीचा फोटो आणायला सांगून प्रत्येकाने सरस्वतीची पुजा करून झाल्यावर दसर्‍याच्या सणाचं महत्व जसं ज्याला माहित आहे तसं त्याने इतराना समजावून सांगायचं.मी एक पौराणीक गोष्ट वाचली आहे.ती सांगणार आहे.तू मला आशिर्वाद दे.”
त्याशिवाय आमच्या गुरूजीनी प्रत्येकाने आपलं रिपोर्ट कार्ड आई किंवा वडिलांची सही घेऊन न विसरता आणायला सांगितलं होतं. आणि जो कुणी रिपोर्ट कार्ड आणायला विसरेल त्याला दसर्‍याच्या पुजेत भाग घ्यायला मिळणार नाही.असं ही सागितलं होतं.”

मी कमलाकरला म्हणालो,
“हो मला आठवतं,तू तत्पर आणि वक्तशीर होतास.गुरूजी ह्या बाबत तुझं उदाहरण देऊन आम्हा सर्वांना सांगायचे.मला वाटतं तुझी आई याला कारण असायची.ती सारखी तुला मोठ्या लोकांची उदाहरणं देऊन सांगायची.होय ना?”

“माझ्या आईचे माझ्यावर खूप उपकार आहेत.ती आपल्या गुरूजींना भेटून नेहमीच माझ्याबद्दल चौकशी करायची”
डोळे पुसत कमलाकर आईची आठवण येऊन सद्गदीत झाला.अलीकडेच त्याची आई वारधक्याने गेली.
“त्या वयावर मी अभ्यासू विद्यार्थी म्हणून समजला जायचो.त्याशिवाय मी आज्ञाधारक आणि जबाबदार आहे असं ही इतर माझ्या मित्रात समजलं जायचं. माझ्या वडिलांची सही घेऊन सुद्धा मी जेव्हा रिपोर्ट कार्ड आणायला विसरलो तेव्हा त्यादिवशी मी एकदम उद्विग्न झालो.मला त्याचे परिणाम माहित होते. आमचे गुरूजी फार शिस्तीचे होते.मला सरस्वतीची पूजा करायला मिळणार नव्हतीच त्याशिवाय माझी तयार केलेली गोष्ट पण मला सांगता येणार नव्हती. माझ्या बाकावर मी निराश होऊन बसून राहिलो होतो आणि इतर मुलं पुजेची तयारी करीत असलेले पाहून,आशाभंग झालेल्या मला माझे अनिवार्य अश्रू भळभळून गालावरून खाली ओघळायचे काबूत ठेवता आले नाहीत.
पण जास्त वेळ गेला नाही,आमचे गुरूजी माझ्या जवळ आले, ओणावून माझ्या जवळ येऊन बसले आणि मला म्हणाले,
“रडूं नकोस,तू पण पूजेला लाग.आणि तुझी गोष्टपण सांग.परंतु,उद्या मात्र तुझं रिपोर्ट कार्ड आणायला विसरू नकोस.” उठल्यावर माझ्या डोक्यावरून त्यानी मायेने हात फिरवला.माझा विश्वास बसेना.माझ्या गुरूजींच्या अनपेक्षीत उपहारामुळे माझी निराशा कुठच्या कुठे लोप पावली.”

मी म्हणालो,
“मला तू त्या घटनेची आठवण करून दिलीस.मी विसरलोच होतो.”
कमलाकर म्हणाला,
“इतक्या वर्षानंतर ती घटना मला तंतोतंत आठवते.माझ्याकडून जे अपेक्षीत होतं ते मी करू शकलो नाही.पण माझ्या गुरूजीनी समजूतदारपणा आणि प्रेमळपणा दाखवून माझा आदर केल्यासारखं मला त्यावेळी वाटलं.त्यांना हवं असतं तर त्यांनी मला मज्जाव केला असता.आणि इतर विद्यार्थ्याना उदाहरण घालून दिलं असतं.पण त्यांना माहित होतं की एखाद्या लहान चूकीमुळे मला काही नवा धडा शिकवला जाऊ नये.पण मी मात्र त्यावेळी एक धडा शिकलो की दयाशील राहून आदर केल्याने एखाद्याला किती उत्साहित केलं जातं.”
“कमलाकर अजूनही तू दयाशील आहेस.कुणी जरी घरी येऊन काही मागू लागला तर तू नेहमीच तुझा दयेचा हात पुढे करतोस.” इती मी.

“तरी पण माझ्या जीवनात असं दयाशील राहणं जरा कठीणच गेलं.कधी कधी मी ज्याचं त्याचं कर्म ह्या समजूतीचं समर्थन करीत राहिलो.”असं सांगत कमलाकर पुढे सांगू लागला,
“करावं तसं भरावं ही वृत्ती मी बाळगली.तोलामोलाने पहाण्याची ही वृत्ती माझ्याच सुखाच्या आड येऊ लागली आहे असं मला वाटत राहिलं. जर का मी किती आणि काय काय गोष्टीचा हक्कदार आहे याची गणती ठेवीत राहिलो असतो तरमाझी कधीच समाधानी होणार नव्हती.आणि जर का मी माझ्या पात्रतेपेक्षा धन्यवान झालो असतो तर मी त्यासाठी मला लायक आहे असं समजणार नव्हतो. मला वाटलं माझ्या मलाच मी समज दिली पाहिजे की नियम मोडणार्‍या प्रत्येकाला जसं दंडीत केलं जात नाही तसंच प्रयत्न करणार्‍या प्रत्येकाला पुरस्कार दिला जात नाही.जीवनात सर्वच काही अनुकूल नसतं. आणि त्याबद्दल मी जेव्हा बारकाईने विचार करतो तेव्हा वाटतं त्यामानाने माझा कल असंतुलनाच्या भाग्याच्या बाजूकडे झूकतो.आणि हाच विचार आल्यावर असंच दयाशील राहून इतरांचा आदर करावा ह्या साठी मी मला प्रभावित करतो.

दयाशील राहून आदर ठेवण्यावर माझा विश्वास आहे. आदर मी मिळवला असो वा नसो दुसर्‍यानी दिलेला आदर स्विकार करण्यावर ही माझा विश्वास आहे. कधी कधी तुम्ही त्यासाठी भाग्यवान असता पण ते केवळ कुणी तरी तुमच्यावर प्रेम करतो म्हणून असेल.आणि म्हणूनच मी म्हणतो दयाशील राहून आदर करणं ही देणगी आहे, तो पुरस्कार नाही.”
“कमलाकर तू खूपच चांगला विचार सांगितलास आणि निर्णय घेतलास.मला तुझ्याशी बोलायला बरं वाटतं.काही ना काही तरी शिकवण्याची तुझी वृत्ती मात्र अजून कायम आहे.”
असं मी सांगितल्यावर कमलाकर खूश झाला.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, September 10, 2009

अंगात चांगूलपणा सहजासहजी येत नसतो.

“मी माझ्या लेखनात नेहमी, स्वातंत्र्य,कायद्याची अंमलबजावणी,ईश्वराचं महत्व आणि धर्मातून ईश्वराकडे पोहोचणं ह्या विषयावर लिहित असते.”

कमला पेंडसे यांचे बरेचसे लेख मी काही मासिकात वाचले आहेत.निरनीराळ्या विषयावरचे त्यांचे लेख वाचायला मला आवडतं.कधी तरी त्यांना प्रत्यक्ष भेटून हे विषय त्यांना कसे सुचतात म्हणून विचारावं असं माझ्या मनात नेहमी यायचं.
माझा मित्र नाना पेंडसे ह्याला मी एक दिवस सहज विचारलं,
“काय रे नाना, ही कमला पेंडसे जी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे ती तुझी आडनांव-भगीनी आहे का, की तुझं तिच्याशी खरंच नातं आहे.?”
आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाना म्हणाला,
“अरे ती माझी सख्खी चुलत बहिण आहे.दादरला गोखले रोडवर ती राहाते. गेल्याच रविवारी आम्ही सर्व तिच्या घरी जमलो होतो.तिच्या नातवाची मुंज होती.तुला तिला भेटायचं असेल तर आपण पुढल्या रविवारी जाऊं पाहिजे तर. कमल दादरच्या गर्ल्स हायस्कूल मधे मराठी विषय शिकवायची,निवृत्त झाल्यावर ती तिच्या मुलीकडे गोखले रोडवर राहते.तिला मराठीत लेखन करायला लहानपणापासून आवडायचं.आता तर ती फावल्यावेळात लेख,कविता लिहीत असते.”
“माझ्या अगदी मनातलं बोललास.नक्कीच आपण पुढल्या रविवारी जाऊया”
मी असं लगेचच त्याला म्हणालो.

माझी नानाने तिच्याशी ओळख करून दिल्यावर मला कमला म्हणाली,
“मी माझ्या लेखनात नेहमी, स्वातंत्र्य,कायद्याची अंमलबजावणी,ईश्वराचं महत्व आणि धर्मातून ईश्वराकडे पोहोचणं हे विषय अंतर्भूत करते.”
मी म्हणालो,
“मी नेहमीच तुमचे मासिकात लेख वाचतो.मला वाटतं प्रत्येकाने आपल्याला वाटतं ते लिहावं.कारण मनात जे विचार येतात ते कागदावर उतरल्यावर ती एक विचारांची निर्मिती होते.अगदी तसंच दुसरा लिहिल असं नाही.मला आठवतं लहानपणी शाळेत आमचे शिक्षक एक विषय द्यायचे.आणि आमच्याकडून त्यावर निबंध लिहून घ्यायचे.जेव्हडे वर्गातले विद्यार्थी तेव्हडे निबंधाचे निरनीराळे विषय लिहिले जायचे.ते गाणं आठवतं,
“एका बिजापोटी
तरू कोटी
जन्म घेती
सुमने फळे.”
तसंच काहीसं आहे.आपल्या मनात येणारे विचार ही एक निसर्गाची देणगी आहे. आणि तिला कुणी दाबून ठेवूं नये.तुला कसं वाटतं?”
कमला म्हणाली,
“माझा व्यक्तीस्वातंत्र्यावर दृढविश्वास आहे.स्वातंत्र्याची जरुरी असण्याचं कारण अख्या जगाच्या स्वास्थ्याला त्याचा उपयोग आहे.कारण प्रत्येक व्यक्तिला त्याच्या ताकदीत असलं तरच, त्याला त्याच्या मनाप्रमाणे करायला आणि सांगायला मुभा मिळते.प्रत्येक व्यक्तिला त्याच्या दृष्टीने आपल्या जीवनाबद्दल विशिष्ट योगदान करायचं असतं-आणि हे उघडच आहे की प्रत्येक व्यक्ति ही विशिष्टच असते,त्या व्यक्तिची शारिरीक आणि मानसिक ठेवणही विशिष्ट असते,तशीच त्या व्यक्तिची परिस्थिती पण विशिष्ट असते- त्यामुळे प्रत्येक व्यक्ति जे काही सांगेल ते आणखीन दुसर्‍या कुणा व्यक्तिकडून ऐकायला मिळेलच असं नाही.”
मी कमलाला म्हणालो,
“एखाद्या व्यक्तिला हवं तसं बोलायला दिलं आणि करायला दिलं,तर कधीतरी अशी एक वेळ येते की त्याचं हे बोलणं आणि करणं दुसर्‍या एखाद्याला वाटेल ते बोलायला आणि करायाला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या आड येऊ शकतं.परंतु,हे ही खरं आहे की केवळ बुद्धि आहे म्हणून एखाद्याने वाटेल ते बोलण्याचं स्वातंत्र्य घ्यावं किंवा कसं?.”
“तुमचं म्हणणं विचार करण्यासारखं आहे” असं सांगून कमला म्हणाली,
“मनात म्हणते की मी हे जेव्हा राजकारणाविषयी लिहित असेन अशाच वेळी फक्त ह्या गोष्टीवर-स्वातंत्र्यावर- विश्वास ठेवला पाहिजे.पण खरं पाहिलं तर कुटूंब आणि मित्रमंडळी असलेली एक स्त्री म्हणूनही मी अशा गोष्टीवर विश्वास ठेवते. मला खात्री नाही की ह्या विचारसरणीमुळे माझं जीवन सुखकर होईल किंवा कसं.
असं मी कां म्हणते कारण मला असंही दिसून यायला लागलं की प्रतिस्पर्धात्मक स्वातंत्र्याला तोलामोलाने पहाण्याच्या माझ्या प्रयत्नामुळे मी माझ्या आयुष्यात नवीन प्रश्न निर्माण करायला कारणीभूत होते की काय?
आणि त्यामुळे एका मागून एक येणार्‍या नाजुक गोष्टींची गणना करण्यासाठी मी मला त्यात अंतर्भूत करून घ्यायला लागले.मात्र असं केल्यामुळे मला त्यातुन अवसर मिळणं कठीण होत गेलं.”

“मग असं केलं का जात नाही”मी चर्चा पुढे नेत म्हणालो,
“वयक्तिक संबंधाना ही तत्वं वाटलं तर लागू करावीत,कदाचीत सर्वांना माहित असेलही की अशावेळी संबंधावर कसलीच आडकाठी येऊ नये म्हणून प्रेमळपणाचा वापर करणं हा त्यावर उत्तम उपाय आहे.पण प्रेमाचा वापर योथोचीत व्हायला खरंच कौशल्य लागतं. पुढे जाऊन,ह्याच तत्वाचा सामाजीक संबंधात वापर केल्यास त्याचा उत्तम उपाय म्हणजे प्रेमळपणा ऐवजी कायदाचा वापर करणं. राजनितीतले शास्त्रज्ञ त्याला “परस्परातील बंधनाची समझ” असं म्हणतात. ह्या बंधनाचा आदर केला गेला पाहिजे.आणि ही “परस्परातील बंधनाची समझ” जर का असफल होऊ लागली तर ज्यावर विश्वास ठेवावा त्या कायद्याकडून हस्तक्षेप केला गेला पाहिजे. तरच त्या बंधनावर विसंबून राहता येईल.”

प्रेमळपणा आणि कायदा याची आठवण येऊन कमला आपला अनुभव सांगताना म्हणाली,
“मी ज्यावेळी तरूण होते त्यावेळी ह्या प्रेमळपणे वागण्यातल्या अडचणी आणि कायद्याचं महत्व ह्या दोन्ही गोष्टीतली खरी मेख मला समजत नव्हती.मला वाटायचं माणसं स्वाभाविकपणे चांगली वागतात,आणि माणसांचे परस्पर संबंध नक्कीच चांगले असणार. आणि कायदा ही एक फाल्तु बाब असून ती लोकांशी फार कठोरपणे वापरली जाते आणि गरिबी संपुष्टात आली की शिक्षणाचा जास्त प्रसार होईल,आणि आपोआप लोक कायद्याचं उल्लंघन करायचं थांबणार.तसंच त्यावेळी खात्रीपूर्वक वाटायचं की मनुष्य स्वभाव लवकरच दोषहीन होणार आहे.”

“गरिबी आणि शिक्षण हे परत परस्परावर अवलंबून आहेत.म्युच्युअली इनक्लुझीव ज्याला इंग्रजीत म्हणतात तसं.गरिबी जाण्यासाठी शिक्षण हवं आणि शिक्षण मिळण्यासाठी गरिबी जायला हवी.पण शिक्षण असलं तरी कायदा तोडणारे काही कमी नाहित पण एव्हडं खरं की शिक्षणामुळे कायदा तोडण्याचे प्रकार कमी होतील.
कमला,मला तू एखादं उदाहरण देऊन सांगशील का? कदाचीत त्यामुळे तू म्हणतेस ते जास्त स्पष्ट होईल” असं मी म्हणताच थोडा विचार करून आणि आठवून कमला मला म्हणाली,
“मला आठवतं की मी त्यावेळी बाराएक वर्षाची होती.माझ्या आईची मैत्रीण तिला रस्त्यावर उद्भवलेल्या हिंदू-मुस्लीम दंग्याची माहिती देत होती.ते मी ऐकत होती.आणि त्यावेळी माझ्या मनात वि़चार आला की ही बाब मला विसरून चालणार नाही. कारण ज्यावेळी मी अगदी वयस्कर होईन त्यावेळी पुर्वीच्या अशा गोष्टी माझ्या कडून ऐकण्यात तरूण लोक स्वारस्य घेतील,कारण तोपर्यंत असल्या घटना व्हायच्या कधीच बंद झालेल्या असतील.पण कल्पना करवत नाही, ह्या क्षणी मला एव्हडा धक्का बसायला लागला आहे की अशा गोष्टी अलीकडे रोजच्याच झाल्या आहेत, आणि त्या त्यावेळी भयंकर वाटत असल्या तरी आता होत असलेल्या लाखो लोकांच्या प्राणांची हानी झालेली बघून ते काहीच नव्हतं असं वाटायला लागलं आहे.
मला आता दिसून येतंय की ह्या धरतीवर जे चांगलं म्हणून समजलं जातं ते सहजासहजी होत नसावं.ते निर्माण करावं लागत असावं.आणि ते तसंच ठेवण्यासाठी प्रेमाचं आणि कायद्याचं बंधन पाळावं लागत असावं.पण ज्या ठिकाणी निष्ठुरतेचा एव्हडा वरचष्मा आहे त्या ठिकाणी ह्या प्रेमाचा प्रबंध कसा करायचा?.सामाजीक संस्थेत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून कायद्याचं सुरक्षीत पालन कसं करायचं.?”

हे कमलाचे विचार ऐकून मला खूपच बरं वाटलं.नाना पेंडसेचे आभार मानायचे राहिले होते.ह्या विदुषी बरोबर चर्चा करून झाल्यावर हिचे लेख मला का आवडू लागले आहेत ते स्पष्ट झालं. पुढल्या खेपेला आणखी कुठल्यातरी दुसर्‍या विषयावर चर्चा करायला मिळावी म्हणून मी कमलला म्हणालो,
“पुढे कधी तरी भेटल्यावर आपण ईश्वराबद्दल तुझे काय विचार आहेत त्याची चर्चा करू या.”
ते मान्य करीत ती मला म्हणाली,
“जशी मी वयस्कर होऊ लागली आहे तशी ईश्वराच्या अस्तित्वावर माझा दृढ विश्वास बसू लागला आहे.आणि धर्म पालनाने आपण ईश्वाराशी संबंध आणू शकतो असं वाटायला लागलं आहे..पण हे अवगत होणं कठीण आहे. मी आशा करते की माझ्या ह्या लेखनामधून मी सत्याचा पाठपुरावा करण्याच्या प्रयत्नात राहीन.पण मला हे ही माहित आहे की हा ईश्वराचा विचार माझ्या मनात मी प्रथम बिंबवून ठेवल्या शिवाय त्याला काही अर्थ राहणार नाही.हे काही सोपं नाही. आणि कधीकधी माझ्या मनात एक विक्षिप्त कल्पना येते की जीवन जर का इतकं सुखकर हवं असेल तर अन्य विश्वात माझा जन्म व्ह्यायला हवा होता. ह्या बद्दल मला आपल्याला खूप काही सांगायचं आहे.आणि नंतर लिहायचं पण आहे.”
“तू ह्यावर लेख लिहित जावं.तुझ्या डोक्यातून येणारे विचार हे त्या ईश्वराचीच इच्छा समजून तरी लिही.”
असं मी सांगितल्यावर कमलाच्या चेहर्‍यावरचा आनंद लपला नाही.
“असं करायला ईश्वरच तुमच्या तोंडून बोलतोय असं मी समजू का?”
असं म्हणत म्हणत आम्ही दोघानी हंसत हंसत एकमेकाचा निरोप घेतला.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, September 6, 2009

जसं असायला हवं तसंच व्हावं.

“मी कुणालाही सर्व दुःख विसरून पुढे चला असं सल्ला देत नाही.कुणालाही तुमच्या वागणुकीत आता बदलाव आणा असं सांगत नाही.किंवा तुमच्या लक्षात येत असेल ते दुःख् दूर ठेवा असंही सांगत नाही.कारण दुःखाला त्याचा समय दिला गेला पाहिजे. असं मला वाटतं.”

मी आणि माझी पत्नी बरेच दिवसानी गोव्याला गेलो होतो,माझ्या वहिनीचं माहेर गोव्याचं.माझ्या लहानपणी मी तिच्याबरोबर गोव्याला जायचो.त्यांच्या शेजारच्या घरात राहणारं पास्कल-मेरी कुटूंब आणि त्यांची तिन मुलं पावलू,ज्युली आणि सुझान त्यावेळी माझ्यापेक्षा खूपच लहान होती.पास्कल आणि मेरी तर आता खूपच थकली आहेत.ज्युलीने जवळच्या चर्चात नन होऊन लोकांची सेवा करण्याचा मार्ग पत्करला होता.ती पण आता पन्नाशीत आली होती.आणि तिची धाकटी बहिण सुझान -आम्ही तिला सुझी म्हणायचो- तिने कॉटेज हॉस्पिटलमधे नर्सचा जॉब घेतला होता.पावलू मात्र इंग्लंडला पुढचं शिकायला गेलो तो तिथेच स्थाईक झाला.तिकडेच गोर्‍या मड्डमशी लग्न करून राहिला.त्याला दोन मुलं आहेत मिशाल आणि जॉन.पावलू अधून मधून ख्रिस्मसला गोव्याला येऊन जातो.बायको आणि मुलं पण येतात.
हे सर्व मला सुझी सांगत होती.मी आणि माझी पत्नी त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो.

संध्याकाळची वेळ होती.पणजीच्या समुद्रावर मस्त गार वारे वाहत होते.सुझीला मीच म्हणालो,
“आपण समुद्रावर फेर्‍या मारायला जाऊया तेव्हाडाच व्यायाम होईल आणि आपल्याला निवांत बोलता येईल.”
सुझीला माझी कल्पना आवडली.मला म्हणाली,
“अरे,पिकतं तिकडे विकत नाहीत असं काही तरी म्हणतात ना तसं आहे.इतका सुंदर समुद्र जवळ आहे पण आम्हाला कुठे आठवण येते चौपाटीवर जायची. कामाच्या रगाड्यात हे जमायचं कसं?”
थोड्या गप्पा मारत आम्ही चाललो.
“आता सूर्यास्त होई तो वाळूत बसून बोलूया”
अशी सुचना माझ्या पत्नीने केली.सुझीच्यापण तेच मनात होतं असं वाटलं.कारण व्यायामाच्या आभावी सुझीचं स्थुल शरिर तिला सहाय्य देत नव्हतं ते माझ्या लक्षात आलं होतं पण तिने सांगण्यापूर्वीच माझ्या पत्नीची सुचना तिला आवडली.
थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी सुझीला विचारलं,
“सुझी तू नर्सींगचं काम का पत्करलंस?”
“ज्युली नन झाली,तिने चर्चमधे काम करून लोकांची सेवा करायचं ठरवलं.मला लग्नं करायचं होतं आणि ज्युली सारखी लोकांची सेवा पण करायची होती.मला ह्या दोन्ही गोष्टी नर्स होऊन साध्य होत होत्या हे माझं नर्स होण्याचं मुख्य कारण आहे.माझा नवरा लुईस मुंबईला असतो मधून मधून मी त्याला मुंबईला भेटायला जाते तर कधी तो गोव्याला येतो.लुईसची पहिली बायको वारली. त्याला तिच्यापासून दोन मुलं आहेत.ती पण मुंबईला सेटल झाली आहेत.असं माझं जीवन आहे.”

सुझीची ही कथा ऐकून माझ्या मनात आलं की काही लोकांच्या जीवन जगण्याच्या पद्धती किती विचित्र असतात.ती इकडे, नवरा तिकडे, मधून मधून येणं जाणं, संसार करायचा आणि लोकसेवापण करायची.मला वाटतं ह्या किरिस्तांव लोकांच्या धर्मात लोकसेवेचं महत्व म्हणजेच देवाची सेवा असं मानून जीवन जगतात.खरं ते कठीण आहे,पण ज्याची त्याची मर्जी दुसरं काय!
मी सुझीला म्हणालो,
“जीवनात सुख आणि दुःख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे मिळत असतं.पण “सुख जवापाडे दुःख पर्वता एव्हडे” हे मात्र खरं.आणि तुझ्या ह्या कामात तसं पाहिलं तर रुग्णांना व्याधीमुळे सुखापेक्षा दुःखच जास्त असावं.आणि त्यांची सेवा करताना तुझ्यासारखीला त्या दुःखात वाटेकरी व्हावं लागणं क्रमप्रात्पच असणार नाही काय?”
कुठूनही सुझीकडून काही तरी जास्त ऐकावं म्हणूनच मी तिला असा प्रश्न टाकला.
सुझीला असा प्रश्न हवाच होता असं दिसलं.मला म्हणाली,
“मी कुणालाही सर्व दुःख विसरून पुढे चला असं सल्ला देत नाही.कुणालाही तुमच्या वागणुकीत आता बदलाव आणा असं सांगत नाही.किंवा तुमच्या लक्षात येत असेल ते दुःख् दूर ठेवा असंही सांगत नाही.कारण दुःखाला त्याचा समय दिला गेला पाहिजे. असं मला वाटतं.”
माझ्या पत्नीच्या चेहर्‍यावरचा अचंबा पाहून,सुझी पुढे म्हणाली,
“दःख करणं योग्य आहे असं मी मानते.जवळ जवळ रोजच जेव्हा मी ज्या हॉस्पिट्लमधे नर्सचं काम करते तिथे जाते,तिथे मी कुणाचं तरी रडणं ऐकते,हुंदके ऐकते,मुसमुसलेलं ऐकते.एका तरूण बाईने अकाली मुलाला जन्म देऊन ते मुल गेलं, एखादा ग्रुहस्थ विधूर झाल्याने आपल्या बायकोचे कपडे हातात धरून उभा आहे,किंवा एखादी आई आपल्या मुलाच्याजळलेल्या शरिराजवळ चिंता करीत उभी आहे,अशासारखी दृष्य रोजच मला दिसतात.माझ्या विचारावर आणि माझ्या भावनावर मी नियंत्रण आणता आणता माझं उदास मन अशाच एका जागी फरपटत आणून सो्डतं की ह्या जागे पासून सुटकारा मिळावा म्हणून आकांक्षा करावी तर तिथेच दुसरी कुठचीही इच्छा-आकांक्षा मनात येणार नाही असं वातावरण करून टाकलं जातं,कधी कधी सकाळी अंथरूणातून उठायचीसुद्धा इच्छा होत नाही.”

“पण मग तू हे आयुष्य जाणून बुजून का पत्करलंस?”
असा मी प्रश्न केल्यावर सुझी म्हणाली,
“असे काही दिवस येतात की मीच आश्चर्यचकीत होते आणि माझ्या मनात येतं, की माझ्या जॉबवर,माझ्या इतर संबंधावर, माझ्या स्वस्थतेवर पाणी सोडावं लागणार की काय? तरीसुद्धा असापण विचार माझ्या मनात येतो,की हीच उदासिनता मला त्यात जखडून ठेवून बरेच वेळां माझ्या जीवनात काही तरी विशेष प्रयोजन निर्माण करील की काय?ही उदासिनता खाली-हात येत नसते.मला वाटतं ह्या आपत्या,पीडा आपल्याच अंगात बळ आणण्यासाठी येतात.तोच त्यांचा येण्याचा उद्देश असावा.आणि दुसरा उद्देश असाही असावा की दुसर्‍याचं दुःखपण आपल्याला कळावं.”

“किती तुझे विचार आदर्श आहेत.तुझ्याकडून हे ऐकून तुझ्याबद्दलचा आदर द्विगुणीत होतो.” इती मी.
“कधीकधी हॉस्पिटलात असे रुग्ण येतात की त्यांची परिस्थितीपाहून देवाची पण मला कींव येते.आणि कधी कधी हे प्रसंग एकामागून एक येतात.डॉक्टर रुग्णाला तपासून जातात,पण सतत त्या रुग्णाकडे राहाण्याचं काम आम्हा नर्सीसचंच असतं. आम्ही त्यांची सेवा करून बरं करण्याची पराकाष्टा करीत असतो.पण शेवटी ज्याचं त्याचं नशीब म्हटलं पाहिजे.
हे असले धक्के मी आता सहन करायला सीझन झाली आहे.”
पुढे सुझी सांगू लागली,
“मी लहान असतानाचा माझ्या पहिल्या प्रसंगाने मला एव्हडा धक्का दिला की मी जवळ जवळ यमसदानालाच पोहोचले असं मला वाटलं होतं. आणि आता ह्या वयावर जेव्हा मी भिती दायक गोष्टींची स्वप्नं मनात आणू लागते आणि भविष्यात माझ्या हाताबाहेर असलेल्या परिस्थितीचा विचार करू लागते तेव्हा मला दिसायला लागतं की आणखी एखादा प्रसंग माझ्या डोक्यावर लटकायला लागला आहे की काय?कधीकधी,मला वाटतं एक आठवड्याची धोक्याची सुचना मला मिळाली आहे.कदाचीत दोन आठवड्याची असेल.आणि त्यानंतर जणू मी माझ्या आतच अज्ञात होण्यासाठी सरकत चालले आहे आणि फक्त माझ्या बाहेरून कवचच शिल्लक आहे असं वाटतं.आणि नंतर कवच फुटून वर आल्यावर उदासिनता संपून माझं पुनरउत्थान झालं आहे असं वाटायला लागतं.माझ्या मलाच हंसू यायचं,किंवा नव्या दिवसाकडे आशाळभूत होऊन पहायचे.”
मी म्हणालो,
“सुझी ही तुम्हा नर्सीसची कर्मकथा तू सांगीतली नसतीस तर तुमचं आयुष्यपण किती दुःखी आहे हे कळलं नसतं. शुभ्रसफेद झगा,डोक्याला सफेद पटका,कधी कधी गळ्यात स्टेथास्कोप आणि हंसरा चेहरा करून जेव्हा तुम्ही रुग्णाची विचारपूस करता त्याच्या मागे त्या रुग्णाच्या सुश्रूषे संबंधी तुमच्या मनात किती दडपण असतं हे आमच्या सारख्याच्या लक्षात येत नाही.”
“आणखी पुढे ऐक” असं म्हणत सुझी म्हणाली,
“आणि ह्यातून एक गोष्ट उदयाला येते. जणू एखाद्या चित्रपटातला एखादा देखावा ज्यात हिरो शेवटी स्वतःबद्दल अभिज्ञ होतो.त्यापूर्वी तो मार खाऊन स्वतःचे हाल करून घेतो,आणि त्या मारामारीच्या संवयीने स्वतःच योध्धा होतो.आणि योग्य वेळ आल्यावर त्याला स्वतःची क्षमता काय आहे हे लक्षात येतं.आणि नंतर तो एव्हडा शांत रहातो की विरोधकाशी दोन हात करतानासुद्धा धीरगंभीर असतो.मला वाटतं माझ्या जीवनात ह्या उदासिनतेविरूद्ध झगडण्यात असंच काहीसं इनाम मला मिळालं असावं. माझ्या आतून मिळालेल्या शक्तीवर आणि मनःशांतीवर मी विसंबून राहू लागले.तसंच माझी भिती आणि संवेदना कमी होऊं लागल्या.
मला वाटतं ज्या दुःखदायी रात्रीं आपल्या जीवनात येतात त्या कसल्यातरी कोषात आपल्याला जखडून ठेवीत असाव्यात आणि ह्याच कोषात जेव्हा आपण आपल्याला सामावून घेतले गेलेले असतो त्याच कोषातून आपण नंतर आपली दुर्बलता झुगारून देतो.मला वाटतं आपल्याला होणारे हे दुःखाचे दाहच आपल्यातले आणि आपल्या जीवनातले गुणदोष सांगतात. ते हे ही सांगत असावे की बळ,समानुभूती आणि धीटपणा ह्यांची आपल्याला आपल्या वयक्तिक चैनी पेक्षा आवश्यकता आहे.आणि त्यामुळे मी असा विचार करायला प्रवृत्त होते की दुःख-दाह येतील तसे सहन करायला तयार व्हायला पाहिजे.मी ह्या सेवेला वाहून घेतलं आहे.आणि आता मला मागे पहाणे न लगे.”
हे सर्व ऐकून मी सुझीला म्हणालो,
“सुझी,किती तुझे विचार उदात्त आहेत.पास्कल-मेरीने तुमच्यावर केलेले संस्कार, चर्चात जाऊन लोकसेवेचे,म्हणजेच ईश्वर सेवेचे तुम्हाला सतत मिळालेले धडे,तुझं शिक्षण ह्या सर्वांची गोळाबेरीज केली तरच तुझ्यासारखी व्यक्ती ह्या अशा उदात्त सेवेला वाहून घ्यायला तयार होते.सर्वच नर्सीस असा विचार करीत असतील असं मला वाटत नाही. खरं की खोटं?”
“खरं सांगू” सुझी म्हणाली,
”हे सर्व महत्वाचं आहे कारण आलेल्या प्रसंगांचं परत परत येण्याचं स्वरूप सुसंगत असेल तर त्या नव्याने येणार्‍या प्रसंगाला येऊं घातलेलं आहे,ह्या सत्यतेत मी जगत आहे.पण मी कदापीही भितीग्रस्त होणार नाही.शेवटी माझ्या उदासिनतेनेच मला येणार्‍या प्रसंगाला तोंड द्यायला धीर दिला आहे.आणि ते बस आहे.पण प्रत्यक्ष प्रसंग येईल तेव्हा मी तयार होऊन दिर्घ श्वास घेईनच.कारण मला माहित झालं आहे की मी जसं असायला हवं तसंच व्हावं याला मला पर्याय नाही.माझ्या नर्सींग जॉबला चिकटून राहायचं असेल तर त्यावर दुसरा उपाय नाही.”
सुझीचे हे विचार ऐकून सुन्न झालेली माझी पत्नी म्हणाली,
“मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून,सुझी म्हणते तसं “जसं असायला हवं तसंच व्हावं” हा सुझीचा विचार आपण इतराना सांगूया.असं ठरवून आम्ही घरी जायला निघालो.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, September 3, 2009

सातबंगल्याची विभा कर्णिक

विभा आणि तिचा नवरा ज्ञानेश कर्णिक हे जोडपं त्यावेळी अंधेरी वेस्टला सातबंगल्याला रहात होतं.सातबंगल्याच्या फिशरीज इन्स्टिट्युटमधे ज्ञानेश रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत असायचा.जवळच्या एका बिल्डिंगमधे तेराव्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट होता.माझी त्यांची ओळख वर्सोवाच्या चौपाटीवर सकाळीच फिरायला जात असताना झाली.विभाला त्यावेळी दोन लहान मुलं होती.आणि विभा जवळच्या वर्सोवा वेल्फेअर शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची.ही मंडळी आंध्रप्रदेश मधल्या चित्तूर ह्या गावात केव्हा गेली ते मला कळलं नाही.पण अलीकडे जेव्हा माझी विभाशी गाठ पडली तेव्हा मला सर्व हकिकत कळली.
जवळ जवळ पंचवीस वर्षानी ही मंडळी पुन्हा आपल्या सातबंगल्याच्या फ्लॅटमधे राहायला आली.आणि माझी गांठ पुन्हा वर्सोवा चौपाटीवर अशीच सकाळी विभाशी पडली.खरं मी तिला ओळखलीच नसती.सहाजीक आहे.ती आता पन्नास वर्षाची झाली होती.ह्या वयावर स्त्रीयांची शरिरयष्टी बदलते.पोक्तपणा बरोबर स्थुलपणा पण येतो.पण विभाचं तसं नव्हतं.फार तर विभा अपवाद समजली पाहिजे.तिच तिची शेवग्याच्या शेंगेसारखी शरिरयष्टी, गोरा रंग,चाफेकळी सारखं नाक,तोच लयबद्द आवाज,प्रत्येक वाक्याअंती खुदकन हंसण्याची लकब हे सर्व कायम होतं.पण विचारात पोक्तपणा जाणावला.मला तिने पटकन ओळखलं.
मला विभा म्हणाली,
“काका,जुन्या आठवणी नेहमीच येतात असं आपण म्हणतो आठवणी कधी जातात असं होत नाही.मी आजच चौपाटीवर सकाळीच पाय ठेवला त्यावेळी पंचवीस वर्ष मागे जाऊन माझी स्मृति जागृत करण्याचा प्रयत्नात होती.तुम्हाला पाहिल्यावर मी ओळखलं.”
“मी पण तुला ओळखलं.तुझ्यात काहीही बदल झालेला दिसत नाही.काही वेळेला देव एखाद्याला चीरतारुण्य देतो तसं तुझं आहे.ह्याचं काय गुपित तुझ्या जवळ आहे ते मला सांग.”
असं म्हटल्यावर विभा जरा लाजली पण लगेचच म्हणाली,
“ऐकायचं असल्यास आमच्या घरी या.ज्ञानेश पुन्हा थोडे दिवस चित्तूरला गेला आहे.मी आणि माझी मुलगीच आहो.माझे दोन्ही मुलगे अमेरिकेत असतात.हे शेंडे फळ मला चित्तूरला गेल्यावर झालं.आता इकडे भवन्स कॉलेजमधे तिला शिकायला आणली आहे.तुम्ही घरी या मग तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन.”

विभा चित्तूरला गेली कारण ज्ञानेशला तिकडच्या एका रिसर्च कंपनीने त्याला बोलावून डायरेक्टरच्या जागेवर घेतलं होतं.आणि मग त्याचं तिथेच मन रमलं.विभा तिकडे राहून तेलगु बोलायला शिकली.थोडं थोडं कानडी पण बोलायला शिकली.लोकल भाषा, राहतो त्या ठिकाणचे व्यवहार करायला खूप मदत करते.एका विकएन्डला मी विभाकडे गेलो होतो.त्यावेळी अवांतर गोष्टी मला तिच्याकडून कळल्या.
मला विभा म्हणाली,
“त्या दिवशी काका तुम्ही मला म्हणाला होता की माझं असं दिसण्याचं गुपित काय? मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगते.एक म्हणजे माझा काही गोष्टीवर दृढ विश्वास आहे.त्यापैकी एक म्हणजे कुणावरही करुणामय प्रेम करावं.त्याने शारिरीक बळ येतं.ते कसं ते मला माहित नाही.नंतर मी तुम्हाला माझ्या आयुष्यात झालेली एक घटना सांगेन.त्यामुळे मी काय म्हणते ते तुमच्या लक्षात येईल.पण सर्वसाधारणपणे जरूरी पुरतं खाणं आणि नियमीत व्यायाम घेणं ही चांगली प्रकृती ठेवण्याची गुरूकिल्ली आहे.अजून पर्यंत मी रोज पाच मैल चालते.जसं वय होतं तशी आपली हालचाल कमी होते,त्यानुसार आपला आहार पण बदलला पाहिजे.बॅंकेत पैसे सेव्हिंग आणि विथड्रॉ करतो तसंच काही ह्या शरिरातल्या फॅटचं आहे.फरक फक्त उलटा आहे.बॅंकेत पैसे जास्त सेव्हिंग करण्याच्या दृष्टीने आपण पहातो इथे शरिराच्या बाबतीत फॅट सेव्हिंग न करता विथड्रॉ करण्याच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे.एव्हडंच.”
मी, विभाला ती सांगणार होती त्या घटनेची आठवण करून देत म्हणालो,
“तुझे आणखी कसले दृढ विश्वास आहेत ते सांग”
“तेच मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी हा चहा घ्या”असं म्हणत विभा पुढे सांगू लागली,
“ज्या गोष्टीवर मी दृढ विश्वास ठेवते त्याबद्दल विचार करायला लागल्यावर पंधरा वर्षापूर्वी मला जो अनुभव आला त्याची मला आठवण येते.त्या अनुभवाने माझ्या मनातल्या अनेक दृढ विश्वासापैकी एकाला बळ आलं.करुणामय प्रेम हे नक्कीच भितीबद्दलचा तणाव कमी करतं हा त्यातला एक दृढ विश्वास आहे.त्याचा जो बोध झाला तो एखादा परंपरागत धर्मनिष्ट अनुभव नव्हता.तो काही धक्का देण्यासारखा उसळून माझ्यावर आला नव्हता.पण ते उदाहरण माझ्या मनातले दृढ विश्वास माझ्या अनुभवाला किती जीवंतपणा आणतात हे त्यातून दिसून आलं.”
“म्हणजे असं विशेष काय घडलं ” इती मी
“थोडक्यात सांगायचं तर माझ्यावर माझ्याच नोकराने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.त्यावेळी मी घरात एकटीच होते.ती घटना होत असताना माझ्या ध्यानात आलं होतं की त्याच्याकडून मला ठार मारण्याचा पण प्रयत्न झाला असता. त्यावेळी माझ्या हे ही मनात आलं होतं की मला भितीपोटी मरायचं नव्हतं.उत्तरदायित्व,म्हणजेच ज्याला अभिक्रिया (react)ऐवजी प्रतिक्रिया (respond)दाखवण्याची क्षमता,म्हणतात ती माझ्या दृढ विश्वासाची महत्वपूर्ण बाब होती,आणि त्यावेळी मला माहित झालं की जो मला दुःख देण्याच्या प्रयत्नात होता त्या इसमाशी मी भितीपोटी अभिक्रिया करीत होते.पण ज्यावेळी मी त्याला प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली,पण ती घाबरटपणाची नव्हती,उलटपक्षी माझ्या हृदयातली होती,म्हणून माझ्या जे काही मनात येत होतं ते मी माझ्या मुखावाटे येऊ देत होती.माझ्या अंगात -शारिरीक नव्हे- प्रचंड बळ आलं,आणि मला ज्ञातही झालं की जरी हा इसम माझी शारिरीक हानी करायला टपला होता तरी तो माझ्या आत्म्याला हानी करूं शकत नव्हता कारण माझा आत्मा पवित्र होता,पूर्णरूप होता.मी त्यावळेचं एव्हडं सांगू शकेन की तो इसम माझ्या चालीमुळे आणि माझ्या बातचीतीमुळे चक्रावला गेला.त्या बातचीतमधे मी हे ही त्याच्या निदर्शनाला आणलं की त्याने मला असं करूं नये.
मानसिक रूपाने पाहिल्यास त्या माझ्या अंतर्दृष्टितल्या विधात्याकडे माझा संवाद चालला होता की,
” हे दयाघना,मी मरण पत्करायला तयार आहे-त्या क्षणाला मला मरणाची भिती वाटत नव्हती-माझी बछडी मात्र आयुष्यमान होऊ देत.”
मला वाटतं माझ्या मनातल्या करूणामय प्रेमाबद्दलच्या दृढ विश्वासाचं मर्म ह्या इसमाच्या तावडीतून बचावण्यात कार्यरत झालं.दुसर्‍या एखाद्याने माझे प्राण घेतले असते.”
मी विभाला विचारलं,
“काय भयंकर प्रसंग तुझ्यावर आला. विभा,पण तुला एक विचारायचं आहे की,तू तिकडची लोकल भाषा-तेलगू-शिकलीस ती तुझ्या मदतीला आली का? कारण मला वाटतं अशा प्रसंगी भाषा एकमेकात जवळीक आणून आस्था निर्माण करीत असावी.”
“काका,तुम्ही माझ्या मनातलं बोललात” असं म्हणून विभा सांगू लागली,
“हो,त्या इसमाला मी परकी वाटली नाही.मी अस्खलीत तेलगूत बोलते असं पाहून त्याच्या चेहर्‍यावर खूनशीपणा ऐवजी सहानुभूती मला दिसली.
परंतु,ह्या विशिष्ट इसमाबरोबर माझी प्रतिक्रिया देत असल्याने मी अक्षरशः माझ्या हल्लेखोरापासून चालू पडले.त्याच्या कडून मला बोललेले शेवटचे शब्द होते,
”जा तुझ्या मुलांचा सांभाळ कर जा!”
हे ऐकून माझ्या मनात आलं की माझ्या त्या दयाघनाने माझी प्रार्थना ऐकली असावी.मुळ दृढ विश्व्वसाची प्रतिक्रिया निरनीराळी रूपं घेतात.अर्थात त्या त्या दृढ विश्वासावर ते अवलंबून असतं.मी नशिबवान होते की माझा दृढ विश्वास प्रेमावर होता भितीवर नव्हता.मला वाटतं आपल्या मनात जे दृढ विश्वास असतात ते आपल्या जीवनाची प्रतिबिंबं असतात.मला असंही वाटतं की वाटलं तर आपण आपल्या मनातला मुळ दृढ विश्वास बदलू शकतो.माझ्या आयुष्यात असल्या अतिप्रसंगाची पाळी पूर्वी कधीतरी आली असती तर माझा प्रतिसाद निराळाच झाला असता.”
मी विभाकडून सर्व हे ऐकत असताना एव्हडा अंतर्मुख झालो होतो,की मी मनात म्हणालो,
“स्त्रीला निसर्गाने प्रेमळपणा भरभरून दिला आहे.निसर्गाची निर्मिती करण्याच्या स्त्रीच्या क्षमते बरोबर तिला निसर्गाने प्रेमा बरोबर सहनशीलता,दया,समजूतदारपणा कमीपणा सहन करण्याची शक्ती विचार करूनच दिली असावी.आणि म्हणूनच हा निसर्ग टिकून आहे.धन्य,धन्य,विभा, तू बोलत रहा,मी ऐकत राहिन”
“माझ्या मते आपल्या मनात असलेले लहान मोठे दृढ विश्वास मुळ दृढ विश्वासाच्या आजूबाजूला त्याचं प्रतिबिंब म्हणून फिरत असावेत,आणि त्यांचा वास्तविकतेत बदल होत असावा.तसंच नवीन ज्ञान आणि अनुभव त्या वास्तविकतेची दखल घेत असावं.एखादा कांदा सोलावा तसं माझ्या मुळ दृढ विश्वासाचं आहे.त्याच्या पर्यंत पोहोचणं तसं थोडं जटिल असतं,ते चालू असतं आणि वेळ घेणारं असतं.तशी मी माझ्याशी समजून उमजून राहते.कारण मुळ दृढ विश्वासाची उत्पत्ति निरनीराळ्या जडांतून होत असते.आणि मला हे ही माहित झालंय की वास्तविकतेसाठी माझ्या अंतरदृष्टीत माझे दृढ विश्वास जीवंतपणा आणतात,आणि जमेल तेव्हडं त्यांच्यासाठी अभिज्ञ राहण्यासाठी उत्कंठा निर्माण करतात.”
हे सर्व ऐकल्यावर मी माझ्या खुर्चीवरून उठून विभाजवळ गेलो आणि तिच्या डोक्यावर हात फिरवीत तिला म्हणालो,
“असा प्रसंग वैर्‍यावर पण येऊं नये.तू नुसतीच दिसायला चीरतरूण दिसत नाहीस,तुझं मन पण चीरतरूण आहे आणि त्या तुझ्या मनात वयाचा पोक्तपणा मिसळून गेला आहे.”
हे मी म्हणालो ते तिने ऐकल्यावर विभाचा चेहरा पाहून मला ती पंचवीस वर्षापूर्वीची सातबंगल्याची विभा कर्णिक दिसली.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, September 1, 2009

प्रेमाची शिदोरी,प्रणयाचा मेवा

आज बे-एरियात अत्युतम हवा पडली होती.७०-७२ डि.-म्हणजे २१-२२ डि.सेंटीग्रेड- तापमान भर दुपारच्या उन्हात वाटायचं.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. पॅसिफिक ओशन- निसर्गाचा एअरकंडिशनर- फुल-स्विंग मधे चालत होता.मिशन हिलच्या शिखरावर हायकिंग करीत जाऊन शिखरावरच्या ट्रान्समिशन लाईनच्या टॉवरावरच्या सिमेन्टच्या चौथुर्‍यावर बसून निसर्गाचा आनंद घ्यायची सकाळीच माझ्या मनात हुक्की आली होती.नेहमी प्रमाणे आयपॉड घेऊन कानाला इयरबड्स लावून मराठी गाण्यांची मेजवानी घेत घेत मजल दरमजल करीत डोंगर चढून जात होतो.
शेवटी एकदाचं शिखर गांठलं.३३हजार व्होल्टसच्या इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन लाईनच्या चौथुर्‍यावर बसतो न बसतो तोपर्यंत बाबुजींच्या आवाजात खेबुडकरांचं ते "आम्ही जातो आमुच्या गांवा" मधलं देवाची पुज्या करतानाचं खूपच प्रसिद्ध झालेलं,
"देहाची तिजोरी,भक्तिचाच ठेवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा"
हे गाणं ऐकून मन खूपच प्रसन्न झालं.एकदा ऐकलं,दोनदा ऐकलं असं आणखी एक दोनदां ऐकण्यासाठी आयपॉडला रिपिट-मोड मधे टाकलं.
आणि का कुणास ठाऊक त्या ट्रान्समिशन लाईन्सच्या खाली मॅगनॅटिक फिल्ड्च्या प्रभावामुळे, की त्या सभोवतालच्या कुंद वातावरणामुळे माझ्या कवीमनाचा किडा चाळवला गेला.

देवाच्या भक्तिरसाच्या गाण्याच्या माहोल मधून माझं मन प्रीतिरसाच्या माहोल मधे केव्हा गेलं ते माझं मलाच कळलं नाही. मग ह्या गाण्याचं विडंबन म्हणा किंवा आणखी काही म्हणा करावंसं वाटलं.खिशातून एच.पी.चा पामपॅड काढून तिथेच कविता लिहायला सुरवात केली,

प्रेमाची शिदोरी,प्रणयाचा मेवा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

येते डोळे उघडूनी, जात माणसाची
मनी द्वेषट्याना का गं भिती प्रेमाची
सरावल्या लोकानाही विचंबा का वाटावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

उजेडात होते भेट,अंधारात प्रेम
ज्याचे त्याचे हाती आहे सुरळीत काम
दुष्ट दुर्जानांचा कैसा वाढे हेवा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

अर्थ जणु मिलनाचा होई त्यां विषारी
आपुलीच प्रीति पाहूनी होती ते वैरी
घरोघरी वाद अपुला कसा आवरावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

तुझ्या हातून सखये बातमी फुटावी
शांतपणे युक्ति तुझी तुच संभाळावी
मार्ग तुझा सुटण्याचा मला तो कळावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

साधेपणासाठी कुणी मुर्खपणा केला
बंधनात असुनी जगी बभरा झाला
आपुल्या सौख्यात घेऊ जरा विसावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com