Wednesday, July 29, 2009

अन सारखा जीव माझा धडधडतो

रात्रीच्या तळहातावरी चंद्रमा झगमगतो
त्याच्या कोमल किरणामधे तुला मी पहातो
अन सारखा जीव माझा धडधडतो
रात्रीचा तळहातावरी चंद्रमा झगमगतो

आलीस तू कोणीकडूनी जातीस तू कुणीकडे
विचार करीतो मी व्याकुळतेने
तू जणूं चंद्रमुखी अन कचपाश जणूं रजनी
जागवीले मला तुझ्या अभिलाषेने
नेत्रावर माझ्या नशेचा असर होतो
रात्रीच्या तळहातावरी चंद्रमा झगमगतो

एकान्ती माझ्या अन उदास मी असतां
दाखवीसी दिखावट तुझी
चिंता करितो आहेस तू खरोखरी
का फक्त असे परछाई तुझी
तुटलेल्या स्वप्नात जसा मी जातो
रात्रीच्या तळहातावरी चंद्रमा झगमगतो


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, July 27, 2009

मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो.

“जसं पृथ्वी गोल आहे असं आपण नेहमीच म्हणतो.जर का त्या गोष्टीत तुला शंका असेल तर अनेक मार्गानी तिची सत्यता पडताळून पहाता येते.”

अलीकडे मी नक्षत्राचे देणे ही डी.व्ही.डी पहात होतो.ती सुरेश भटांवर प्रोग्राम केलेली होती. मला त्यांच्या कविता फारच आवडतात.आशा,लता आणि हृदयनाथानी गायिलेली गाणी तर अप्रतिम आहेत.त्यांच्या कवितेच पुस्तक प्रो.देसायानी त्यांच्याकडे आहे असं मला कधीतरी सांगितल्याचं आठवलं.मी त्यांना फोन करून त्यांच्या नांतवाबरोबर कधीतरी पाठावून द्या म्हणून सांगितलं होतं.
तेच पुस्तक घेऊन त्यांचा नातू आज माझ्या घरी आला होता.तो अलीकडे औषधं बनविण्याच्या कंपनीत रिसर्च असिसटन्ट म्हणून जॉब करीत आहे.
“आजा-नातवाच्या” गोष्टी मला सांगण्यात तो नेहमीच दिलचस्पी घेतो.कारण मला ही तो त्याच्या आजोबासारखाच मानतो.

हल्ली त्याच्या आजोबांना बरं नसतं.त्यांच्या जुन्या आठवणी काढून काही ना काही तरी मला प्रत्येक भेटीत सांगत असतो.मी पण कधी कधी त्याला त्याच्या अजोबाबद्दल सांगायला आवडतं हे ध्यानात घेऊन एखाद्या विषयाची ट्रिगर देत असतो.त्याला ही बोलायला आवडतं.
आज मी तो भेटल्यावर त्याच्या नव्या जॉबबद्दल विचारणा केली.
भाउसाहेबांच्या नातवाला त्यांच्यासारखीच मुळ विषयाला हात घालण्यापूर्वी अवांतर सांगून नकळत विषयाकडे झेप घेण्याची हातोटी आहे.
मला म्हणाला,
“काका,मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा माझे आजोबा मला नेहमीच म्हणाल्याचं आठवतं.
“विश्वास ठेवीत जाऊ नकोस”
हो,ते म्हणत की मी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवित जाऊ नये कारण केवळ एक, ते छापलेलं होतं.
दोन,रेडिओवर किंवा टी.व्हीवर ऐकलं होतं.
तिन,कुणा विशेष व्यक्तिच्या संबंधात होतं.
म्हणून विश्वासपात्र आहे असं समजूं नको.
मी म्हणालो,
“हे तुझ्या आजोबांचं म्हणणं त्यांच्या अनुभवातून ते सांगत असावेत.कारण सगळ्याच गोष्टी अलीकडे विश्वासनीय नसतात.काही बातम्या सनसनाटी म्हणून विशेष करून टी.व्ही.वर सांगितल्या जातात,आणि कधी नंतर ते खरं नव्हतं म्हणून सांगून नंतर कधी तरी दिलगीरी प्रदर्शीत करतात.आणि बातमी ऐकणार्‍याने जर का त्यांची दिलगीरी ऐकली नाही तर तो पहिल्या बातमीवर विश्वास ठेवून जातो.त्यामुळे तुझ्या आजोबाना हा पूर्वीपासूनचा अनुभव असणार.”

अगदी बरोबर.त्यामुळेच माझे आजोबा मला म्हणायचे,
“प्रथम तुला ठरवायला हवं की जी माहिती तुला मिळत आहे ती तुला कितपत महत्वाची आहे,किंवा तिचं तुला किती प्रयोजन आहे.जर तसं काही नसेल तर सोडून दे.ज्या गोष्टीची आपल्याला किंमत नाही तिच्या मागे लागून समय आणि प्रयत्न बरबाद का करावा?.”
एव्हडंच नाही तर ते पुढे सांगायचे,
“तसंच अशी गोष्ट दुसर्‍याशी आदान-प्रदानसुद्धा करूं नये.त्यांचा समय व्यर्थ जातोच शिवाय कदाचीत चुकीची माहिती दिली जाते.ती गोष्ट जर का तुला महत्वाची असेल तर मात्र त्यात समय आणि प्रयत्न गुंतवणं ही एक गंभीर बाब होईल. खरं की खोटं हे तुला ठरवावं लागेल.परंतु,जर का त्यात तथ्य असेल तर मग त्यात विश्वास न ठेवण्यासारखं काहीच नाही.-जसं पृथ्वी गोल आहे असं आपण नेहमीच म्हणतो.जर का त्या गोष्टीत तुला शंका असेल तर अनेक मार्गानी तिची सत्यता पडताळून पहाता येते.”
मी आजोबांना म्हणालो,
“पण आजोबा,एव्हडा मोठा निर्णय मी कसा घेऊं?”
त्यावर अगदी दिलखूश होऊन हंसत हंसत मला म्हणाल्याचं आठवतं,
“अरे माझ्या लाडक्या नातवा,म्हणूनच तुला चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे.”

माझे आजोबा आता जरी थकले असले तरी त्यांच्या चेहर्‍यावरच्या हास्याची ती लकब अजून मी विसरलो नाही.मी त्यांचा उपदेश आता पर्यंत पाळीत आलो आहे.आणि म्हणून मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो.”
“पण हे तुला सगळीकडेच जमणार नाही.काही लोक तुला फारच चिकीत्सक आहेस असं नाही का म्हणणार?”
असं मी त्याला विचारलं.
“एक मला कबूल करावं लागेल की मी कधी कधी ह्यामुळे पेचात आलो आहे.मला आठवतं ध्रुव्व बाळाच्या गोष्टीबद्दल माझं स्पष्टीकरण माझ्या लहानपणी माझ्या मित्रांबरोबर आणि त्यांच्या आईवडीलांबरोबर सुरळीतपणे जाऊ शकलं नाही.
पण सरतेशेवटी मोठेपणी मी शास्त्रज्ञ झालो.त्याचं श्रेय मी माझ्या आजोबांना आणि माझ्या जिज्ञासेला देतो.
आता मला कुठच्याही गोष्टीवर विश्वास ठेवायची गरज वाटत नाही.मला जर का शंका आली तर मी त्यातलं तथ्य पडताळून कसं पहावं ह्याची माहिती मला कळली आहे. एक तर्फी विचारकरून नव्हे तर चारही बाजूनी विचार करून माझा मी निर्णय घेतो.”

मी त्याला म्हणालो,
“जगात खूप माहिती उपलब्ध आहे.तुझ्या आजोबांसारखे अनेकांना आजोबा असतील ही.पण कुणालाही तथ्य कसं शोधून काढायचं आणि जास्त महत्वाचं म्हणजे उघड्या मनाने चारही बाजूनी समस्येबद्दल विचार करीत असतां कसलाही मनांत शंका न ठेवता निर्णयाला कसं आलं पाहिजे हे समजायला हवं.”
माझा हा पॉईन्ट त्याला पटला.लागलीच मला म्हणाला,
“जर का तथ्य सहजासहजी कळण्यासारखं नसेल तर प्रयोग करून तथ्य शोधून काढणं मला जमतं.
एक खरं आहे की काही प्रयोग माझ्या आवाक्याबाहेरचे असतात.आणि काही बाबीवर आपल्याला प्रयोगही करता येत नाही.”
आणि भाऊसाहेबांचा नातू त्यांच्या सारखाच मुळ विषयाकडे जाताना माझ्या प्रश्नाकडे नकळत वळला.मी त्याला म्हणालो होतो की तुझा नवीन जॉब कसा चालला आहे.

मला म्हणतो कसा,
“काका,सुरवातीला तुम्ही माझ्या जॉबबद्दल चौकशी केलीत ना,त्याच जॉबमधे मी माझ्या आजोबांचा उपदेश कसा वापरू लागलो आहे ते सांगतो.आम्ही नवीन नवीन औषधाचा शोध लावीत असतो.हे शोध लावून झाल्यावर त्या औषधाचा उपायाचा पडताळा करून पाहायचं असतं.अनेक उदाहरणं देता येतील.
उदाहरण म्हणून माणसाच्या मननोदशेचं घ्या. नवीन औषधांच्या उपायांचं परीक्षीण करताना ज्या लोकांवर त्याचे प्रयोग चालतात त्यांना प्रत्यक्ष नवीन औषध किंवा नकली गोळी देऊन औषध खरोखर उपयोगी होत आहे की नाही हे पडताळलं जातं.ही सर्व माहिती ज्यांच्यावर प्रयोग होत आहे त्यांना किंवा जे प्रयोग करीत आहेत त्यांच्यापासून निर्णयाला येईपर्यंत गुप्त ठेवली जाते.ज्या लोकाना ती नकली गोळी दिली जाते ते लोक जणू आपल्यावर खर्‍याच औषधाचा प्रयोग होत आहे अशी समजूत करून घेऊन वागतात.ह्याला placebo effect असं म्हणतात.हा effect बरेच वेळा सूचक असतो.कधी कधी अगदी शंभर टक्के असतो.
हा प्रयोग काय सिद्ध करतो?ज्यांना खर्‍याच औषधाची गोळी आपल्याला दिली आहे असं वाटत असतं आणि प्रत्यक्षात गोळी दिलेली नसते ते सुधारले जातात. माणसाची मनोदशा खूपच प्रभावशाली असते.”
मी त्याला म्हणालो,
“परंतु,असं असेल तर मग साखर मिश्रीत गोळी देऊन, हे औषध आहे असं वर लिहून त्याचा placebo effect त्या रोग्याची काळजी घेईल काय?
असं जर आपण करू शकलो तर मग प्रकृतीस्वास्थ्य अगदीच सोपं झालं असतं.”
मला म्हणाला,
“पण त्याचं उत्तर नाही असंच आहे.आणि ते तसं देणं हे पण बेकायदा आहे.पण समजा हेच प्रयोग लहान मुलांवर केले.ह्या मुलांना काय चाललं आहे याची मुळीच माहिती नसते. मी नक्कीच सांगतो त्यांच्यावर placebo effect होणारच नाही.जणूं उंदीर,सश्यावर प्रयोग केल्या सारखं होईल.”
मी त्याला म्हणालो,
“ह्याचा अर्थ असा होतो की जस जसं आपण प्रौढ होत जातो तस तसं आपण हा placebo effect शिकत जातो.हे चांगलं आहे की वाईट आहे?”
माझी शंका त्याला आवडली.
“तुमचा प्रश्न मला आवडला.मी तुम्हाला प्रांजाळपणे असं सांगेन की मी जर का खरंच आजारी असेन तर मी स्वतःसाठी खरीच गोळी मागेन.
काका,मी माझ्या आजोबांशी सहमत आहे.विश्वास ठेवणं ही जरी प्रभावशाली शक्ति असली तरी ती दोन्ही तर्‍हेने कामात येते.असं जर आहे तर मग चान्स कशाला घ्यावा?
म्हणूनच मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो.”
“आजोबाचा नातू शोभतोस रे बाबा!”
असं म्हणून मी त्याची पाठ थोपटली.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, July 25, 2009

आज मला असे का भासले?

आज असे मला भासले
अघडीत घडण्या सरसावले
आज असे ही मला भासले
मन माझे कुठेतरी हरवले
अन्यथा
चीत्त का धडधडले
श्वास का थांबले
झोपेतूनी का खडबडले
आज मला असे का भासले?


चेहरा करी कुणाच्या नजरेची छाननी
कुणी आता रोजच येई स्वप्नी
नव्या ऋतूमधे लालसा येई मनी
भ्रमर गुंजन करी फुला भोवती फिरूनी
आज असे मला भासले
मन माझे नशेमधे डुबले
आज असे ही मला भासले
शुद्धितूनी मी कुठेतरी विसावले
अन्यथा
चीत्त का धडधडले
श्वास का थांबले
झोपेतूनी का खडबडले
आज मला असे का भासले?


धुंद मंद भोंवताल कुस वळुनी घेई
नीळ्या काळ्या ढगांची पडे सावली
थंड थंड वार्‍याची झुळूक तृप्ती देई
गूंज गूंज शहनाई मालकंस आळवी
आज असे मला भासले
कुणीतरी माझेच जहाले
आज असे ही मला भासले
दोघांमधेले अंतर कायमचे मिटले
अन्यथा
चीत्त का धडधडले
श्वास का थांबले
झोपेतूनी का खडबडले
आज मला असे का भासले?





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, July 23, 2009

“बट-शेवंतीची फुलझाडं.”

दादा कर्णिक रेल्वेत ऑडीटर म्हणून काम करून रेल्वेतूनच निवृत्त झाले.एक दिवशी मला भेटायला म्हणून माझ्या घरी आले होते.ऑडीटरचं मुळ काम म्हणजे हिशोब चोख तपासायचे, आणि त्यात काही गफलत दिसली तर ती मॅनेजमेन्टच्या नजरेस आणायची.
मी कर्णिकांना म्हणालो,
“हिशोबातली वास्तविकता पडताळून पहात राहिल्याने खर्‍या आयुष्यात पण त्याच दृष्टीने पहाण्याची तुम्हाला संवय झाली असेल नाही काय?”
मला दादा कर्णिक म्हणाले,
“गेल्या साठ वर्षाचं माझं जीवन- किंवा एकप्रकारची विस्फोटक स्थिती म्हटलं तरी चालेल- पाहिल्यास ज्या प्रकारे माझा निर्वाह व्हायचा आणि कधी कधी उन्नति पण व्हायची त्याचं मुख्य कारण मी नेहमीच नव्या वास्तविकतेला-realityला- तोंड देताना मन कुठच्याही विचारापासून मुक्त ठेवायचो. मी बेदरकारपणे रोजच्या आव्हांनांबद्दल,तसंच जीवनात स्थित्यंतरं आणणार्‍या घटनां घडण्याच्या संभवाबद्दल अपेक्षीत राहून, आलेल्या परिस्थितीला काबूत पण आणायचो.
अशा तर्‍हेने वागण्याची माझी ही पद्धत ज्याला मी माझी वयक्तिक विचारधारा असं समजू लागलो ती माझ्या पूर्ण जीवनकालात उदयाला आली. तिने मला प्रत्येक नव्या अनुभवाची त्याच्या विशेषताप्रमाणे अनुभवण्याला उद्युक्त केलं.
मात्र ह्या मार्गाचा माझ्या आयुष्यात मी अवलंब केला फक्त चांगल्या आणि वाईट परिस्थितीत सहारा घेण्यासाठीच.”
मी दादानां म्हणालो,
“हे असले विचार अगदी लहानपणापासून तयार झाले असतील नाही काय?”
“खरं सांगायचं तर मी कॉलेजमधे असताना माझे महत्वपूर्वक अंतरदृष्टीपूर्ण विचार तयार झाले.काही शिक्षक कडं प्रेम करायचे. विज्ञान शिकवणारे शिक्षक नेहमी फक्त प्रायोगीक कौशल्याचाच प्रयोगशाळेत तकादा लावित नव्हते तर निर्दोष इंग्रजीमधे लिहिण्याच्या सरावावर भर देत असत.त्यामुळे जे उचित असेल त्याला आपोआप ईनाम मिळणार हे शिकवलं गेलं.
गणिताच्या शिक्षकानी मला एका परिक्षेत अनुत्तीर्ण केलं.आणि त्यामुळे दृढतेची किंमत मला कळली.”

मी दादांना पुढला प्रश्न विचारण्यापूर्वीच मला म्हणाले,
“हे झालं शिक्षण घेण्याच्या वंयात.पण नंतर मला पुस्तक वाचनांचा भरपूर नाद लागला.
पुस्तकात लिहिलेल्या शब्दातून बोलणार्‍या पुस्तकाच्या लेखकानी माझ्या वयक्तिक विचारधारेला सुक्ष्म रूपाने सुधरवण्याचा प्रयास केला. अनेक लेखकांनी, विचार-तत्वज्ञान, धर्म,कायदे-कानू,राजकारण आणि अर्थशास्त्र वगैरे विषय पुस्तकात स्पष्ट करून सांगितले असले जरी तरी नीट विचारकरून पाहिल्यास त्यांच्याशी खरा संपर्क सीमितच राहतो. कारण खर्‍या वास्तविकतेशी त्यांचे ते विषय तुलना करू शकत नव्हते. म्हणून शास्त्रीय पद्धतीने शिकवल्या जाणार्‍या पद्धतींचा मी आदर करायला शिकलो.कारण ही पद्धत नेहमीच सुंदर स्पष्टीकरण करते. उगाच मनात गोंधळ करून देत नाही. जी क्षेत्रं वास्तविकतेला-reality ला- शोधण्याच्या प्रयत्नात असतात त्यावर मन केंद्रित करायला मी शिकलो होतो.”

“मला आठवतं,कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही थोडे दिवस आजारी होता.मी एकदा तुम्हाला भेटायला आलो होतो, त्यावेळी होमसिकनेस आल्याने मी थोडे दिवस गांवला जातो असं सांगून बरेच दिवस तिथेच होता.नंतर तुमचं लग्नाचं आमंत्रण मला मिळालं आणि आपली पुन्हा भेट झाली.”
अशी मी दादांना आठवण करून दिल्यावर मला म्हणाले,
”कॉलेज सोडल्यानंतर एक महत्वपूर्ण अंतरदृष्टी मला मिळाली. माझी मनस्थिती अगदी खालच्या थराला आली होती.माझ्या मनातली उदासिनता वृद्धिंगत होत गेली.
माझ्या आईवडीलांपासून आणि इतर जवळच्या नातेवाईकांपासून दूर राहिल्याने आत्मदयेत मला मी लोटून दिलं होतं.मला मिळालेल्या दुर्भाग्याचं दुषण मी माझ्या आईवडीलांवर टाकलं होतं.असंच एक दिवशी दुपारी विचार करता करता माझ्या डोक्यात आलं की माझ्या प्रेमळ आईवडीलांनी मला प्रेमाने आणि काळजीपूर्वक वाढवलं होतं.आणि त्यांच्या कठीण परिस्थितही जे त्यांना जमलं ते त्यानी केलं.आणि मग त्या क्षणांनंतर माझ्या वयक्तिक विचार-धारेत अचानक फरक झाला आणि मी त्यानंतर माझ्या नशिबाचा स्वामी मीच आहे अशी मनात धारणा ठेवली.आणि कुणालाही माझ्या अपयशाबद्दल दोष देण्याचं सोडून दिलं. आणि लग्न करायचं ठरवलं.”
मी म्हणालो,
“लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट असतो. तुम्हाला ही तसाच अनुभव आला असेल.”

“माझं लग्न झाल्यावर मी पूर्णतया एक नवा धडा शिकलो.खरी वचनबद्धता,विनम्रता आणि समझोता असल्यावर जीवनातलं असं हे सर्वांत महत्वपूर्ण नातं सफल होत असतं अशी माझी खात्री झाली.
एका सडाफटींग ब्रम्हचार्‍याचा एकाएकी सदगृहस्थ झाल्याचं माझ्यातलं परिवर्तन पाहून मला अचंबाच वाटला.आता माझ्या ह्या वयक्तिक विचारधारेची रोजचीच कसोटी पाहिली जायची आणि ती सुद्धा वास्तविकेतून.ह्या माझ्या विचारधारेत कालपरत्वे बदलाव होत गेला. बहुतांशी मी शिकलो की एकमेकाचा आदर केल्यामुळे आणि स्वतः कष्ट केल्यामुळे आपल्याला त्याचा मोबदला मिळतोच मिळतो.

दुर्दैवाने माझ्या पत्नीला अकाली आजार झाला.माझं आणि माझ्या मुलांचं जीवन खोल दरीत पडल्यासारखं वाटायला लागलं. माझ्या वयक्तिक विचारधारेकडून सुरवातीला काही ही समर्थन मिळालं नाही.फक्त समय जात गेला तशी जखम भरत गेली. वेदनांच रुपांतर चांगल्या आठवणींच्या यादीत झालं.आणि ह्या आठवणीच नंतर नंतर कठीण प्रसंगात माझ्याशी संवाद करू लागल्या.”
हे ऐकून मी दादाना म्हणालो,
“परंतु,तुम्ही तुमच्या विचारधारेचा पाठपूरावा काही सोडला नाही.आता निवृत्त झाला,ऑडीटरचं काम बंद झाल्याने तुमचा वेळ आता कसा जातो?”

“हळू हळू ह्या जीवनाच्या घाईगर्दीच्या पद्धतितून मी निवृत्त झालो आहे.लहान लहान गोष्टीतून आता मला समाधान मिळत जातंय. जोपर्यंत मी हयात आहे तो पर्यंत मला काम करावं लागणार आहे हे मला ठाऊक आहे.पण ह्यामुळे निराळ्याच प्रकारची मुक्ति मला मिळाली आहे. आता माझं मन खंबीर झालं आहे, तात्पर्य एव्हडंच की इतक्या वर्षाच्या विकसित झालेल्या माझ्या वयक्तिक विचारधारेने मला संकट पार करून जायला तयार केलं आहे. बरंय.”
असं म्हणून दादा कर्णिक माझा निरोप घेता घेता मला म्हणाले,
” आनुवंशिकता आणि नशिब ह्यांचा माझ्या जीवनात हिस्सा होताच होता. बट-शेवंतीच्या फुलझाडांकडे पहात मला फावला वेळ घालवायला मजा येते. “



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, July 20, 2009

सकाळी सूर्योदयाबरोबर उठावं, आणि रात्री सूर्यास्ताबरोबर झोपावं.

गेली तीस-पस्तिस वर्षं भाई नेरूरकर एका शाळेत शिक्षक म्हणून काम करीत आहेत.रोज पहाटे पांचला ऊठून दिवसाची सुरवात करायचे ते रात्री सर्व कामं आटपून झोपायला त्यांना अकरा वाजायचे.आणि परत दुसरा दिवस उजाडल्यावर परत तेच.
समाजातले सर्वच जण असंच करतात म्हणा.

भाई नेरूरकाराना मी म्हणालो,
“मला नेहमीच वाटतं की सकाळी सूर्योदय झाला की उठावं आणि सूर्यास्त झाला की झोपी जावं.ह्या माझ्या म्हणण्याचा खरा अर्थ काय असावा असं तुम्हाला वाटतं?”
“मला वाटतं, ते समजायला अगदी साधं आहे.रेखून दिलेला दिवसभरचा स्थापित केलेला कार्यक्रम जो आपल्या समाजावर लादला जातो त्या कार्यक्रमाला खंड आणण्याचा कुणीतरी प्रयत्न करायला हवाय असं मला वाटतं.असं मनात येऊन सुद्धा गेली तीस-पस्तिस वर्षं मी हेच करीत आलोय.आणि मी काही जगावेगळं करीत नाही.”
असं भाईनी मला लागलीच उत्तर दिलं.
आणि पुढे म्हणाले,
“आता माझं पंचावन्न वय होत आलंय,आणि दिवसभरच्या समय-सारणी-schedule- शिवाय राहण्याच्या स्वातंत्र्याचा मला लाभ उठवावा असं वाटतं किंवा दुसर्‍या अर्थी सांगायचं झाल्यास निदान मी माझ्यासाठी तजवीज केलेली समय-सारणी वापरून रहावं असं वाटतं. माझ्या सारख्या पहाटे पांचला उठून कामाला लागणार्‍या शिक्षकाचे हे मनातले नुसते मांडेच होवू नये एव्हडंच.वर्षभरात जवळ जवळ नऊ महिने मी ह्या पहाटे उठण्याच्या बंधनात असतो. त्याचा आता मला पण कंटाळ येऊं लागलाय.”
हे भाईंचं आरग्युमेंट ऐकून,ह्या वयावर भाईं सारख्या अनेक व्यक्ति असाच विचार करीत असावेत हे माझ्या केव्हाच लक्षात आलं.


मी भाई नेरूरकराना म्हणालो,
“आपला समाज समयामधे गुंतलेला असतो आणि त्यातच त्याचा व्यय झालेला असतो. आणि त्यामुळे लोक वर्तमानकाळात खर्‍या मजेत न राहता भविष्यात समय कसा जाईल ह्याच्या सततच्या विवंचनेत असतात.त्यांचं वर्तमान आरामात आणि निश्चिंत जाण्याऐवजी ते भविष्यात काय होणार आहे ह्या विचार्‍याच्या दबावाच्या दलदलीत रूतलेले असतात.”

“माझ्या अगदी मनातलं बोललात.”
असं म्हणत भाई मला म्हणाले,
“मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. दोन तिन मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो असताना आणि जुन्या बालपणाच्या आठवणी काढून आनंदात मश्गूल झालेलो असताना मधेच, राहून गेलेला घराचा हाप्ता पुढच्या आठवड्यात कधी भरूं? ह्या विवंचनेने मनावर दबाव आलेला होता, आराम मिळण्याऐवजी विवंचना वाढते.बॅन्केत तेव्हडे पैसे नाहित ह्या बद्दल काळजी वाढते.कारण पुढच्याच हापत्यात पैसे भरण्याचं समयाचं बंधन असतं ना!.”
मी म्हणालो,
हा समय ज्यावेळी विस्मयाच्या वातावरणाने भरून गेला पाहिजे त्याचवेळी विवंचनेच्या भाराखाली डुबून जातो. आणि म्हणून काहीवेळां हा समाजाचा समय- सारणीचा कसूर कुणीतरी झुगारून देण्याच्या प्रयत्नात असलं पाहिजे. असं तुम्हाला नाही का वाटत?”

भाई ह्याबाबतीत आपला निर्धार काय असावा ह्याचं विवेचन करताना मला म्हणाले,
“ही वेळ दाखवणार्‍या घड्याळाची बेडी मला नको होत आहे.मी मनगटात घड्याळ पण वापरत नाही.मी माझा सेल फोन पण बंद करून ठेवतो.ह्या सेल किंवा मोबाईल फोनचा अलीकडे होणारा उपयोग पाहून त्याला “सीन फोन” म्हणणं योग्य होईल असं मला वाटतं. कालातीत क्षेत्रात आता मी माझं अस्तित्व संभाळण्याच्या प्रयत्नात आहे,समय-सारणीचा विचार करीत नाही, कदाचीत माझ्या ह्या असं रहाणाच्या क्रियेला स्वेच्छेने राहणं असं म्हणता येईल.असं करायला खूप बरं वाटतं.खरंतर खूप मग्न झाल्यासारखं, खूप आनंदी झाल्यासारखं वाटतं.त्या त्या क्षणांना माझा तो निकृष्ट अहंभाव नाहिसा होतो आणि मी वर्तमानात असलेल्या क्षणात एकरूप होऊन जात आहे असं वाटतं.जीविताच्या,श्वसनाच्या आणि अस्तित्वाच्या चक्राकार गतीत आध्यात्मिक रूपाने ह्या सर्वांचा एकच हिस्सा झाल्यासारखं होतं, आणि समयाचा अंशच राहत नाही असं वाटतं.”

किती गंभीरपणे भाईंनी विचार करून असा निर्धार केला आहे हे त्यांच्याच तोंडून ऐकून मला पण अंमळ बरं वाटलं.
मी जाता जाता भाईना म्हणालो,
“म्हणूनच ह्या समाजातल्या सर्व संरचीत प्रतिबंधामुळे निर्माण झालेल्या समय-सारणीच्या दुर्गंधीचा निष्प्रभाव करून सूर्योदयाबरोबर उठणं आणि सूर्यास्ताबरोबर झोपी जाणं ही क्रिया मला ज्या सुगंधाचा वास हवा आहे त्याचं स्वातंत्र्य मिळवून देईल असं वाटल्यामुळे तुमचं काय मत पडतं हे मला पाहायचं होतं.”


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, July 18, 2009

माणसाच्या ज्ञानाला मर्यादा.

“माणसाच्या ज्ञानाला मर्यादा आहेत.त्यामुळे सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असणं कठीण आहे आणि तुम्ही म्हणता तसं मग ते बौद्धिक असो,व्यावहारीक असो वा अध्यात्मिक असो.”

आज बाहेर फारच उष्मा होत असल्याने मी प्रो.देसायांना म्हणालो,
“भाऊसाहेब आज तळ्यावर जाण्याचं रद्द करून आपण इथे आमच्याच घरी चर्चा करूंया”
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.अहो, मी तुमच्या घरी येईपर्य़ंत मला इतकं गरम झालं की सहन होई ना!.तरूणपणात भर उन्हात आमच्या गांवाला एका डोंगरावरून दुसर्‍या डोंगरावर चढून जाण्याची आमच्यात शर्यत लागायची.दोन तीन बाटल्या पाणी ढोसल्यावर जीव शांत व्ह्यायचा.पण एव्ह्डी कोलाहल होत नसायची.”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब आता “age became” हेच त्याचं कारण आहे.”
“ते राहू दे,पण तुम्हाला आज कशावर चर्चा करायची आहे ते सांगा.” इती प्रोफेसर.

” मानवजात अन्नशृंखलेच्या सर्वांत वरच्या पातळीवर असल्याने,तसंच “सर्वोच्य” बुद्धिमत्तेचं मानवजातीला रूप मिळाल्याने कुणालाही नेहमी असंच वाटतं की हे ज्ञानाचं ओझं आपलंच आहे.कुणाला वाटतं की जगाला ज्ञान देणं हे त्याचंच जणू कर्तव्य आहे, आणखी असं वाटत असतं जेव्हडं म्हणून कुणाला ज्ञान मिळवता येईल तेव्हडं ह्या- पृथ्वीगोलाचा नाश होई तो पर्यंत- मिळवलं पाहिजे.त्यामुळे कुणी बर्‍याच गोष्टींचा पाठपूरावा करीत असतो.पण त्यालाही मर्यादा आहेत. तुम्हाला कसं वाटतं?”
असा मी प्रोफेसरांना सरळ सरळ प्रश्न केला.

“पूर्वी माझा समज होता की मला सर्वच काही माहित आहे. हा माझा भ्रम आहे हे समजायला माझा तोडा वेळ गेला. आणि हे पण समजलं की वाळुतल्या कणा एव्हडं पण प्राप्त होऊं शकणारं ज्ञान सुद्धा मी मिळवू शकणार नाही. आणि हे मी आता मनापासून मानायला लागलो आहे.”

असं बोलून झाल्यावर भाऊसाहेबांनी थंड पाण्याची बाटली उघडून जवळ जवळ अर्धी बाटली पिऊन टाकली.
“भाऊसाहेब, आज माझ्या मुलीने बटरस्कॉच आइस्क्रिम आणलं आहे.ते खाण्यासाठी थोडी जागा पोटात ठेवा म्हणजे झालं.”
हे माझं बोलणं ऐकून त्यांचा चेहरा फुलला.त्यांना बटरस्कॉच आइस्क्रिम विशेष आवडतं, असं मला त्यांच्या मुलीने एकदा सांगितलं होतं.म्हणून माझ्या मुलीला मी ते मुद्दाम आणायला सांगितलं होतं.

चर्चेचा मुद्दा पुढे सरकवीत मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“काही गोष्टी अगदी उघड उघड आपल्या नियंत्रणाच्या पलिकडच्या असतात. काही गोष्टी जीवविज्ञानाच्या आज्ञेत असतात.आणि आपण काही ही करूं शकत नाही.सर्वच गोष्टींचं ज्ञान असणं कठीण आहे,मग ते बौद्धिक असेल,किंवा व्यावहारीक असेल किंवा आध्यात्मिक असेल.वाटेत खूपच अडथळे येत असल्याने प्राप्त होण्यायोग्य ज्ञान प्राप्त करणं जड जातं. “

थोडा विचार करून प्रोफेसर म्हणाले,
“मी तुम्हाला रोज चालवत असलेल्या आपल्या गाडीचं उदाहरण देतो.
जशी कुणाची गाडी साठ,सत्तर मैलांच्या वेगाने जात आहे,आणि अधून मधून आपल्या समोर असलेली गाडी ब्रेक लावित राहते.त्यामुळे कुणाला आपली स्पिड कमी करावी लागते, वा जबरदस्तीने थांबवावी लागते,किंवा मग ट्रॅफिक जाम झाल्याने अडकून बसावं लागतं. कुणी तिथेच विचार करीत राहतात.कदाचीत असंच कुणीतरी आपल्या जीवनाची गाडी अशाच रफ्ताराने नेत असावे.निस्सन्देह इतर उत्तरदायित्वपूर्ण वाहक ज्या ठिकाणाला जात असावेत त्यांच्या सोबत हे ही जात असावेत.आणि अडथळे येत असावेत.त्यामुळे तुम्ही म्हणतां तसं वाटेत खूपच अडथळे येत असल्याने प्राप्त होण्यायोग्य ज्ञान प्राप्त करणं जड जातं. “

हे भाऊसाहेबांचं उदाहरण मला माझ्या चर्चेच्या विषयाला फिट्ट वाटलं.आणि मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुमच्याकडून मला अशा समर्पक उदाहरणाची अपेक्षा होती.
परत त्या तुमच्या गाडीचं उदाहरण पाहिल्यास समोरच्या वाहकाला जसं कुणी टाळू शकत नाही.त्याने परतपरत ब्रेक लावावेत हे कुणाच्या हातात नाही.पण त्या वाहकाने तुमच्या वेगावर नियंत्रण आणलं असतं हे मात्र नक्की.
आणि तुम्हाला त्याप्रमाणे प्रतिक्रिया देणं भाग पडतं.शिवाय,त्याला टाळून पुढे जाता येत नाही कारण जवळच्या सर्व लेन्स गाड्यांनी भरलेल्या असतात. अगदी असंच जीवनाच्या गाडीचं आहे.”

“वाः! तुम्ही माझ्या उदाहरणाचा चांगलाच अर्थ काढलात.”असं खूशीने म्हणत,प्रोफेसर म्हणाले,
” सत्य समजून घ्यायला हवं असेल तर आपण चौकस राहिलं पाहिजे.निदान एव्हडं समजायला पाहिजे की आपल्याला त्याची माहिती आपल्या मित्रांकडून, आईवडीलांकडून, आणि इतरांकडून ज्या सर्वांना आपल्या मार्गात भेटतो त्यांच्याकडून घ्यायला शिकलं पाहिजे.

ज्या ह्या ग्रहाला आपण धरती म्हणतो त्या धरतीचे आपण निवासी आहोत.माणसाच्या ज्ञानाला मर्यादा आहेत.त्यामुळे सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असणं कठीण आहे आणि तुम्ही म्हणता तसं मग ते बौद्धिक असो,व्यावहारीक असो वा अध्यात्मिक असो.बरं ते राहूंदे बटरस्कॉच आइस्क्रिम कुठे आहे ते आणा पाहूं”
मी समजलो चर्चा इथेच थांबवून आइस्क्रिमवर तांव मारण्याची वेळ आली होती.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, July 16, 2009

दे वचन ह्या चंद्रमा समोर मला

दे वचन ह्या चंद्रमा समोर मला
ठेवीन स्मृतित अपुल्या प्रीतिला
दे हातात हात अलगद तुझा जरा
मिळेल आधार अपुल्या प्रीतिला खरा



हा चंद्रमा हे तारे छपतील ढगाआड
नाही ना तू छपणार माझ्या नजरेआड
बदलो दुनिया ना बदले अपुली प्रीती
राहू वचनबद्ध करूनी प्रीतिची स्वीकृति



दे वचन ह्या चंद्रमा समोर मला
ठेवीन स्मृतित अपुल्या प्रीतिला



रमणीय छायेत घेऊया हिंदोळे
विस्मरूनी दुःख जीवनातले सगळे
दुनियेतल्या दुःखाची काळजी कसली
करूनी प्राप्त तुला तृप्ती मनाची झाली



दे वचन ह्या चंद्रमा समोर मला
ठेवीन स्मृतित अपुल्या प्रीतिला





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, July 14, 2009

देवा! मला रोज एक नवी चूक करू दे!

“म्हणजे त्या चुकेतून माझी सुधारणा होईल.कारण चूकच केली नाही तर सुधरायचं कसं?”

“जेव्हा पासून मी माझ्या आईवडीलाना मला एक मुलगी पसंत आहे आणि मी तिच्याशी लग्न करायचा विचार करतोय असं सांगितलं त्यापासून त्यांच्याकडून उपदेशाचा माझ्यावर सतत भडिमार होत राहिला.जास्त करून माझ्या वडीलांकडून उपदेश जास्त येत होता.मी आणि ते एकदा एका रात्री जवळ बसून त्यांनी जे मला सांगितलं ते त्यांनी आपल्या मनात बरेच दिवस ठेवलं होतं.”

मी आणि दिपक एकदा लहानपणाच्या आठवणी काढून गप्पा करीत होतो.एखादी बालवयातली चूक पुढल्या जीवनात कशी त्रास देत असते,त्याबद्दल दिपक मला आपला अनुभव समजावून सांगत होता.

दिपक पुढे म्हणाला,
”मला वडील म्हणाले,
“दिपक,माझी अपेक्षा आहे की तुझ्याकडून त्या चूका होणार नाहीत ज्या माझ्याकडून लग्नाच्या बाबतीत झाल्या.”
त्यांनी मला सांगितलं, की त्यांनी त्यावेळी आणखी शिक्षण घ्यायला हवं होतं.कुटूंबासाठी त्याचा खूपच फायदा झाला असता.आणि म्हणूनच मला त्यांनी खूप शिकायला प्रोत्साहन दिलं.माझ्या आई बरोबर आदर-सन्मानाने वागायला मला ते नेहमीच सांगतात, कारण माझ्या आईला त्यांनी तशी आदराची वागणूक दिली नाही. ह्याचा त्यांना खंत होत असे.
“लक्षात असू दे”
मला म्हणाले,
“मी चूका केल्या तशाच चूका तू करीत नसलास तरी त्याचा अर्थ असा होत नाही की तू चूका करणारच नाहीस.”
माझ्या लक्षात आलं की,आपल्यापेक्षा मी चांगलं व्हावं म्हणून माझे वडील माझ्या चांगल्या भवितव्याकडे लक्ष देऊन असायचे.त्यांनी निवडलेल्या पर्यायाने त्यांच्या चुकल्या गेलेल्या मार्गापासून मला परावृत्त करण्याचे त्यांचे प्रयत्न होते.
चुका केल्यानेही त्यातून सुधारणा करण्याच्या वृत्तिवर मी भरवंसा ठेवतो.मी आठ/नऊ वर्षाचा असताना माझ्याकडून एक चूक झाली त्याची गंमत सांगतो.

माझे जवळचे नातावाईक काही करणास्तव आमच्या बरोबर राहायचे.त्यांच्या कठीण परिस्थितीत त्यांना माझ्या वडिलानी तात्पुरता आसरा दिला होता.तसं मला आणि माझ्या भावाला चारचौघात राहाण्याची संवय नव्हती.आमच्या बेडरूम मधे एकदा माझी ह्यातली एक लांबच्या नात्याची बहिण दरवाजा ढकलून बंद करून साडी नेसत होती.
मी दरवाजा उघडून आत जाण्याच्या प्रयत्नात असताना मला आत शिरताना पाहून लाजून ती स्वाभाविकच ओरडली.मी फारच भ्यालो.घरातल्या सर्व जाणत्या मंडळीना मी झालेला प्रकार समजावून सांगितला.
मी वयाने आठ/नऊ वर्षाचा निष्कपट मनाचा असल्याने,माझ्या मनात ते पाहिलेलं दृष्य घर करून होतं.
पुढे योगायोगाने माझ्या वर्गात आमचे वर्गशिक्षक न आल्याने त्यांच्या तासाला दुसरे शिक्षक आले होते. त्यांनी आम्हाला वेळ जाण्यासाठी मनात येईल ते चित्र काढायला सांगितलं. माझ्या मनात होतं ते हे एकच चित्र मी काढलं.

झालं, नंतर माझ्या वर्गशिक्षकाना ते चित्र दाखवण्यात आलं आणि माझ्या वडीलाना शाळेत बोलावून घेतलं गेलं.घरी आल्यावर माझ्या वडीलानी मला माझ्याकडूझालेल्या एका मागून एक चुकांचा परमार्ष घेतला.ही झालेली घटना मी कधीही विसरणार नाही.

तशी ती पहिली चूक अगदीच पापरहीत होती. पण माझ्या नंतरच्या आयुष्यात त्याचा प्रभाव होत गेला.
दरवाजा उघडून मी अचानक आत गेलो ही माझी खरी चूक नव्हती.खरी चूक मी दरवाजावर खटखट करून आत जायला हवं होतं. एकदां किंवा दोनदां खटखटून गेलो असतो तर ते दृश्य मला दिसलं ही नसतं आणि माझ्या मनात राहिलंच नसतं.आपल्याच चूकां आपला चेहरा घुरघुरून पहात असतात.फावला वेळ असताना सुखद विचारांच्या तन्मयतेत ह्या चूकांचे विचार आपल्याला नाहक तंग करीत असतात.
मला वाटतं आपण आपल्या चूका आपल्या लाभासाठी उपयोगात आणल्या पाहिजेत.त्यातून शिकलं पाहिजे.त्या आपल्याजवळ आपली ठेव म्हणून असतात.काही चूका अगदी नगण्य असतात.काही चूका झाल्यावर कुणाचा सल्ला घेण्याची आवश्यक्यता असते.पण सगळ्यात घोडचूक म्हणजे तिच चूक परत परत करीत राहाणं.”

हे ऐकून मी दिपकला म्हणालो,
मी देवाला रोज सांगतो.
“देवा! रोज मला एक नवी चूक करायला दे,म्हणजे त्या चुकेतून माझी सुधारणा होईल.कारण चूकच केली नाही तर सुधरायचं कसं?”


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, July 12, 2009

प्रेमाची शिदोरी,प्रणयाचा मेवा

आज बे-एरियात अत्युतम हवा पडली होती.७०-७२ डि.-म्हणजे २१-२२ डि.सेंटीग्रेड- तापमान भर दुपारच्या उन्हात वाटायचं.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. पॅसिफिक ओशन- निसर्गाचा एअरकंडिशनर- फुल-स्विंग मधे चालत होता.मिशन हिलच्या शिखरावर हायकिंग करीत जाऊन शिखरावरच्या ट्रान्समिशन लाईनच्या टॉवरावरच्या सिमेन्टच्या चौथुर्‍यावर बसून निसर्गाचा आनंद घ्यायची सकाळीच माझ्या मनात हुक्की आली होती.नेहमी प्रमाणे आयपॉड घेऊन कानाला इयरबड्स लावून मराठी गाण्यांची मेजवानी घेत घेत मजल दरमजल करीत डोंगर चढून जात होतो.
शेवटी एकदाचं शिखर गांठलं.३३हजार व्होल्टसच्या इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन लाईनच्या चौथुर्‍यावर बसतो न बसतो तोपर्यंत बाबुजींच्या आवाजात खेबुडकरांचं ते “आम्ही जातो आमुच्या गांवा” मधलं देवाची पुज्या करतानाचं खूपच प्रसिद्ध झालेलं,
“देहाची तिजोरी,भक्तिचाच ठेवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा”
हे गाणं ऐकून मन खूपच प्रसन्न झालं.एकदा ऐकलं,दोनदा ऐकलं असं आणखी एक दोनदां ऐकण्यासाठी आयपॉडला रिपिट-मोड मधे टाकलं.
आणि का कुणास ठाऊक त्या ट्रान्समिशन लाईन्सच्या खाली मॅगनॅटिक फिल्ड्च्या प्रभावामुळे, की त्या सभोवतालच्या कुंद वातावरणामुळे माझ्या कवीमनाचा किडा चाळवला गेला.

देवाच्या भक्तिरसाच्या गाण्याच्या माहोल मधून माझं मन प्रीतिरसाच्या माहोल मधे केव्हा गेलं ते माझं मलाच कळलं नाही. मग ह्या गाण्याचं विडंबन म्हणा किंवा आणखी काही म्हणा करावंसं वाटलं.खिशातून एच.पी.चा पामपॅड काढून तिथेच कविता लिहायला सुरवात केली,

प्रेमाची शिदोरी,प्रणयाचा मेवा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

येते डोळे उघडूनी, जात माणसाची
मनी द्वेषट्याना का गं भिती प्रेमाची
सरावल्या लोकानाही विचंबा का वाटावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

उजेडात होते भेट,अंधारात प्रेम
ज्याचे त्याचे हाती आहे सुरळीत काम
दुष्ट दुर्जानांचा कैसा वाढे हेवा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

अर्थ जणु मिलनाचा होई त्यां विषारी
आपुलीच प्रीति पाहूनी होती ते वैरी
घरोघरी वाद अपुला कसा आवरावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

तुझ्या हातून सखये बातमी फुटावी
शांतपणे युक्ति तुझी तुच संभाळावी
मार्ग तुझा सुटण्याचा मला तो कळावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा

साधेपणासाठी कुणी मुर्खपणा केला
बंधनात असुनी जगी बभरा झाला
आपुल्या सौख्यात घेऊ जरा विसावा
उघड दार हेमा आता,उघड दार हेमा



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, July 10, 2009

” मित्र हवा असल्यास एकच मार्ग आहे कुणाचा मित्र झालं पाहिजे.”

“मला वाटतं, लोक जोपर्यंत त्यांना जे वाटतं ते कसलीच भिडभाड न ठेवता बोलूं शकले तर त्यांना भविष्याबद्दल आशावादि राहायला काहीच हरकत नसावी.”

माझ्या आईच्या जून्या घराची डागडूजी करायला मला माझ्या गावी जावं लागलं.पैसे आहेत म्हणून सरळ कॉन्टॅक्टरला बोलवून घर दुरस्त करता येत नाही.हे मला गांवात गेल्यानंतर कळलं.म्युनिसिपालिटीची परवानगी असावी लागते.प्लान पास करून घ्यावा लागतो.वगैरे वगैरे.मी घेतलेल्या सुट्टीत ही कामं पुर्ण होतील ह्याची मला खात्री नव्ह्ती.पण एकदाचा म्युनिसिपालिटिच्या कचेरीत गेलो.चौकशी केल्यावर मला कळलं.म्युनिसिपालिटिचा निवडून आलेला सध्याचा अध्यक्ष बाबल्या हळदणकर होता.त्याच्या कॅबिनच्या बाहेर नांव वाचलं आणि बाहेर बसलेल्या पट्टेवाल्याला विचारलं,
“मला आत जावून साहेबाना भेटता येईल काय?”
” नाही” म्हटल्यावर मला सारांश सिनेमाची आठवण आली.हा बाबल्या माझा शाळकरी दोस्त नक्कीच असणार असं समजून जबरदस्तीने आत गेलो. सहाजिक इतक्या वर्षानी मला पाहून माझं त्याने स्वागत केलं.माझा घराबद्दलचा प्रॉबलेम ऐकून घेतल्यावर मला म्हणाला,
“डोन्ट वरी” तुझं काम होईल पण तू माझ्या घरी जेवायला कधी येतोस ते सांग.”
“आंधळा मागतो…” तसं माझं झालं.
मी त्याच्या घरी गेल्यावर गप्पाना सुरवात करताना पहिला प्रश्न केला,
“तूं राजकारणात केव्हा पासून पडलास?”
मला म्हणाला,
“तुला माहित आहे ना.मी शाळेत नेहमी सोशल कार्यात भाग घेण्यात दिलचस्पी घ्यायचो. तिच आवड पुढे माझ्या भावी जीवनात मी वापरली.एक साधा सदस्य म्हणून निवडून येता येता शेवटी अध्यक्ष झालो.”
मी म्हणालो,
“हे कसं काय तुला जमलं?”
बाबल्या म्हणाला,
” मला वाटतं,कुणाच्याही अभिव्यक्तिचं किंवा प्रकटनाचं स्वातंत्र्य जपून ठेवायचं असेल तर त्यांच्या दृष्टीकोनाचा आदर करून सर्वांना समानतेची उपलब्धता करून द्यायला हवी.
कुणाचंही तत्वज्ञान आणि त्याचं जीवन हे अनेक कारणानी प्रभावित झालेलं असतं.ही कारणं शब्दात प्रकट करायला मला जरा कठीण होतं.जाहिर बोलायला मला मी आवरतो कारण कदाचीत मी उपदेश देत आहे असं भासेल.”
मी म्हणालो,
“अरे मी तुझा मित्रच आहे.मला तुझं तत्वज्ञान आणि उपदेश ऐकायला आवडेल.”

“माझ्या खासगी आणि सार्वजनिक जीवनाबद्दलच्या विचारसरणीवर अनेकापैकी दोन दृढधारणानी प्रभाव टाकला आहे.”
बाबल्या स्वारस्य घेऊन सांगू लागला,
“मामूली वाटेल पण पहिलं कारण म्हणजे माझी खात्री झाली आहे की जे जीवनातून आपल्याला मिळतं ते सरळ सरळ आपण जीवनात काय घालतो त्या प्रमाणात असतं.दुसरं कारण, मी जरी कुणाशी असहमत असलो तरी त्यांच्या मतांचा मी आदर करणं आवश्यक आहे.माझ्या ह्या दीर्घ आणि काहीश्या व्यस्थ जीवनात मी पक्क ठरवलं होतं की मी जेव्हडा माझ्या जीवनाशी ऋणी आहे तेव्हडंच माझं जीवन मला ऋणी आहे.”

एव्हडं बोलून झाल्यावर माझ्या चेहर्‍याकडे बघून,पुढचं बोलूं की नको अशा नजरेने माझ्याकडे बघून हंसला.

“मी तुला एक प्रश्न विचारूं? हे सर्व सोशल कार्य तू कसं काय संभाळतोस.कारण राजकारणी लोकांना घरचं लाईफ पण असतं.”
हे ऐकून मला म्हणाला,
“ही माझी धारणा ठीक असेल-आणि ती असावी-तर ती माझ्या सर्व गतिविधिना -घर,रोजचं काम,राजकारण आणि शेवटी नातंगोतं -लागू होते.
जीवन काही एक मार्गाने जाणारं नसतं.मी जे काय आचरणात आणतो,जे बोलतो,विचार सुद्धा करतो त्याचा सरळ सरळ प्रभाव इतरांशी असलेल्या संबंधावर पडतो.”

“माझा असा समज आहे की राजकारणी लोक मैत्री करतात ती त्यांच्या राजकारणापूरतीच असते.पण माझ्या सारख्या मित्राला तुझ्या राजकारणात स्वारस्य नसतं.तर ते तू खासगीत कसं सांभाळतोस.?”
माझ्या ह्या बेरकी प्रश्नावर खूष होऊन बाबल्या मला म्हणाला,
“सांगतो,तू मला चांगला प्रश्न केलास.
ईमानदारीबद्दल,निष्कपटतेबद्दल,प्रामाणिकतेबद्दल, सौजन्यतेबद्दल आणि निष्पक्षतेबद्दल माझी प्रवृती दुसर्‍यांबरोबर खात्रीपूर्वक आहे ह्याची साक्ष देत असेल तरच मी दुसर्‍यांना त्या अवस्थेत माझ्याशी प्रवृत रहाण्याचं प्रोत्साहन दिल्या सारखं होईल.आदर आदराला जन्म देतो,संशय संशयाला जन्म देतो आणि नफरत नफरतेला जन्म देते.कुणी तरी म्हटलंय ते खरं आहे,
” मित्र हवा असल्यास एकच मार्ग आहे कुणाचा मित्र झालं पाहिजे.”

कुठचंही नागरिक स्वतंत्रतेचं पारंपारिक वरदान स्वयं-कार्र्यान्वित नसतं.पण ते कार्यान्वित व्हायला, भातृभाव,दयाळुपणा,सहानुभूति,मानवी शालीनता, संधी मिळण्याचं स्वातंत्र्य ही सर्व जीवनातली बहुमूल्यं सदैव हजर असायला हवीत.आणि ती यथार्थ होण्यासाठी आदराची आणि सतर्कतेची अपेक्षा करायला हवी.
हे सर्व सांगितलं ते खरोखर माझ्या श्रद्धेचं सार आहे.”

मी बाबल्याला म्हणालो,
“मघाशी तू म्हणालास,
“मी जरी कुणाशी असहमत असलो तरी त्यांच्या मतांचा मी आदर करणं आवश्यक आहे.”
हे तुझं म्हणणं मला पटतं,कारण कुणाच्याही दृष्टीकोनाकडे ध्यान दिलं की तुला ही अशा परिस्थितित कुणाकडूनही आणखी ज्ञान मिळू शकतं.”
माझा हा विचार बाबल्याला आवडला.मला म्हणाला,
“कुणाही देशाला किंवा एका व्यक्तिला बुद्धिमत्तेची अथवा प्रतिभेची एकाधिकारी नसते. अशावेळी एखादा देश किंवा व्यक्ति आत्मसंतुष्ठ असेल तर मला वाटतं चिंतित राहायला हवं. जो कुणी दुसर्‍याच्या दृष्टीकोनाकडे कान बंद करून राहतो,तो अशावेळी स्वतःच्या दृष्ठीकोनाकडे सत्यनिष्ठेने पहात नसावा. सर्व क्षेत्रातली समान आर्थिक संधी, संतोषजनक जीवनाची प्राप्ति, मुलांच्या नैतिक आणि आध्यात्मिक विकासाचं समुचित प्रावधान आणि सर्वांबरोबर मुक्त साहचर्य हे स्वाभाविक हक्क मिळण्यासाठी कायदा असल्यानंतर कसलाच प्रश्न उद्भवत नाही.
ज्यावेळी लोक मुक्तपणे विचार करतात आणि बोलतात त्यावेळी हे हक्क आपोआप सुरक्षित असतात.
मला वाटतं, लोक जोपर्यंत त्यांना जे वाटतं ते कसलीच भिडभाड न ठेवता बोलूं शकले तर त्यांना भविष्याबद्दल आशावादी राहायला काहीच हरकत नसावी.”

मी हे सर्व बाबल्या हळदणकराचं बोलणं ऐकून खूपच प्रभावित झालो.माझ्या आईच्या घराची दुरूस्ती बिनबोभाट होणार ह्याची मला बाबल्यासारखे गावातल्या म्युनिसिपालिटिचे अध्यक्ष असल्यानंतर कसलीच काळजी करण्याचं कारण नाही असं वाटलं. बाबल्या माझा जुना मित्र म्हणूनच नव्हे तर असे चारही बाजूने विचार करणारे राजकारणी असले तर काम करता जरी आलं नाही तरी त्याचं योग्य कारण निर्भिडपणे देतील ह्याची खात्री झाली.

निघता निघता मी बाबल्याला म्हणालो,
“माझी खात्री आहे एक दिवस तू आपल्या गावातून विधान सभेवर नक्की निवडून येशील.”
मनात म्हणालो,
“मी जरी कमी सुट्टी घेऊन आलो तरी बाबल्या हळदणकर माझं काम मी इकडे हजर नसतानाही पूरं करील”





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, July 8, 2009

“ह्या भेटीने माझ्या सन्मानाचं सार्थक झालं.”

“सुजाता, तुझा सन्मान होण्यास खरोखरंच तू पात्र आहेस.माझी ही भेट तू घरी गेल्यावर उघडून बघ.”

सुजाताचा ह्या वर्षाची उत्तम शिक्षिका म्हणून तिचा तिच्या शाळेत सन्मान केला गेला. सुजाताची आई त्याच शाळेत अनेक वर्ष शिक्षण देण्याचं पुण्य कार्य करून निवृत्त झाली होती.मी तिला आमच्या घरी बोलवून पार्टी दिली.जेवण वगैरे झाल्यावर मी सुजाताशी गप्पा केल्या.
“सुजाता तू तुझ्या आईमुळे शिक्षिका व्हायला प्रवृत्त झालीस का?” असं सरळ प्रश्न केला.
मला म्हणाली,
“मला वाटतं,जे ज्ञान आत्ता उपलब्ध आहे आणि उद्या विकसित केलं जाणार आहे त्यांच्या मधलं शिक्षक हे एक प्रवेश-द्वार आहे.माझ्या आईमुळे मी शिक्षक व्हायला जास्त प्रोत्साहित झाले ह्यात प्रश्नच नाही.
बर्‍याच विद्यार्थ्यांना वाटत असतं की शिक्षक केवळ काय करायचं आणि काय करूं नये हे सांगण्यासाठी असतात. असलं आचरण ठेवल्याने शिक्षण पद्धतित ही मोठी समस्या होऊन बसते.कारण अशाच आचरणाने त्या व्यक्ति आपल्या मुलांकडे आपले विचार व्यक्त करतात किंवा मुलांवर ते विचार प्रतिबिंबीत होण्याचा संभव असतो.”
“पण मला वाटतं शिक्षाकाचा पेशा,इंजिनिअर,डॉक्टर किंवा एखाद्या अकौन्टट पेक्षा जरा यथा तथाच समजतात.तुला नाही वाटत? “
हा प्रश्न मी तिला विचारून थोडं ज्याला हिंदीत “उकसाना” म्हणतात ना तसं केलं.
हे ऐकून सुजाता शांतपणे म्हणाली,
“मला वाटतं आपण शिक्षकांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे आदर दाखवित नाही.शिक्षकच देशाचं रूप तयार करतात.कशा प्रकारची देशाची जनता असावी हे निर्धारित करतात.प्रत्येकाला आपल्या सुरवातीच्या कक्षेपासून शिक्षाकांच्या आठवणी असतात. स्मृती आणि संकेत बरोबरीने असतात,ते अल्पप्रमाणात प्रत्येकाच्या आयुष्यात निर्धारित असतात.तसाच त्याचा प्रभाव अल्पसाच असेल,परंतु,नीट पाहिल्यास कुणाचं आताचं जीवन आहे ह्यामधे, आणि त्यावेळचे शिक्षक किती प्रगतिशील असतील त्यामधे काही ना काही संबंध असावा असं दिसून येईल.”
मी म्हणालो,
“माझे शिक्षक मला अजून आठवतात.
माझे जेव्हडे म्हणून शिक्षक होते ते सर्व माझ्या आठवणीत आहेत.काही शिक्षक मला आवडत नसत.
मला आठवतं काही शिक्षकांच्या वर्गात मला बसायला आवडायचं.कशा ना कशा तर्‍हेने आजचं माझं जीवन ह्या सर्व शिक्षाकामुळे घडलं आहे.मला माहित आहे की माझे राजकारणावरचे विचार माझ्या इतिहासाच्या शिक्षकामुळे आणि त्यांच्या मूल्यामुळे काहीसे निर्धारित झाले आहेत. माझ्या जीवनाचा अंत कसा व्हावा ह्याचा विचार बर्‍याच मोठ्या प्रकारे माझ्या बिझिनेस शिक्षकांच्या मूल्यावर निर्धारित झाला असावा.असेच हे काही प्रकार शिक्षकाडून विद्यार्थ्यावर चिरस्थायी प्रभाव करून जातात.”
सुजाता म्हणाली,
’मला आठवतं एकदा माझ्या वर्गात एक विद्यार्थी आमच्या शिक्षकाच्या अगदी तोंडावर अनादर दाखवित होता. मला आठवतं मी त्या विद्यार्थ्याला पूर्ण मूर्ख समजून गेले होते. कदाचीत माझी आई पण शिक्षिका होती म्हणून मला त्या विद्यार्थ्याबद्दल तसं वाटलं असेल. तसं असो वा नसो तरी पण एखाद्याने असं का वागावं?.
काही वेळा शिक्षक विद्यार्थ्याना उद्विग्न करतात.मी स्वतः एकदा शिक्षाकवर रागावले होते. आणि त्या शिक्षकांना सांगावसं वाटलं होतं.पण मी तसं करू शकले नाही कारण एक तर मी त्या शिक्षकाबरोबर आपत्तित आले असते आणि त्याशिवाय माझ्या आईवडीलांना कळल्यावर मी आणखी संकटात पडले असते.
मला वाटतं शिक्षकच विद्यार्थ्यांच्या भावी यशाला जास्त जबाबदार असावेत.शिक्षकच विद्यार्थ्यांना लागणारी निपुणता आणि रोजच्या व्यवहारात लागणारं संपर्क ठेवता येईल असं कौशल्य विकसित करतात. ह्या निपुणतेचा उपयोग समाजात निर्वाह करण्यात होतो.शिक्षक त्यांच्या जीवनातले अनुभव विद्यार्थ्यांशी वाटतात. त्यामुळे आपल्या चुका आपल्याच लक्षात येतात.हेच अनुभव आपलं सामर्थ्य आणि क्षमाता काय आहे ते दाखवतात. मग कुठचंही कॉलेज कुणी निवडु देत कुठच्याही पेशाचं अनुसरण करू देत त्या अनुभवाचा उपयोग झाल्याशिवाय राहत नाही.आपल्या आयुष्यात शिक्षक खरोखरच प्रभावशाली असतात यात वाद नाही.”

मला एका शिक्षकाची आठवण आली.
मी म्हणालो,
“सुजाता माझे एक शिक्षक मला आठवतात,त्यांना मी विसरणार नाही,ते माझे बायोलॉजीचे शिक्षक.त्यांना त्यांचा सन्मान अपेक्षीत होता आणि दुसर्‍यानाही ते सन्मानाने वागवित असत.आणि एकमेकाशी विद्यार्थ्यांनीपण मैत्रीपूर्ण रहावं अशी त्यांची अपेक्षा असे.माझे हे शिक्षक वृत्तिने कडक अणि सख्त असायचे.त्यांच्या व्याख्यानात स्वारस्य असायचं.कठीण विषयसुद्धा ते सोपे करून शिकवायचे.त्यांनी प्रवास खूप केला होता.बायोलॉजीच्या सम्मेलनाला जायचे,आल्यावर आम्हाला आधुनिक घटनेंची माहिती देऊन पूर्ण विषयावर सूचित करायचे.त्यामुळे ते शिकवीत त्या विषयात आमचं अप्रत्यक्षपणे स्वारस्य वाढलं होतं.ह्या शिक्षकांबरोबर त्यांच्या प्रयोग शाळेत काम करायला बरं वाटायचं. बायोलॉजी विषयावर प्रेम करायचं मी ह्या शिक्षकामुळेच शिकलो.ते नुसतेच चांगले शिक्षक नव्हते तर ते आमच्यावर ध्यान द्यायचे आणि आम्हाला सहाय्यपण द्यायचे.शाळा सुटल्यानंतर ते मागे राहायचे आणि शाळेच्या सुट्टीत शाळेत येऊन कुणाला जादा मदत हवी असल्यास द्यायचे. वरचा नंबर घेण्यासाठी ते आम्हाला आव्हान द्यायचे. “

“माझे पण असेच एक शिक्षक होते.कदाचीत अशाच सर्व कारणामुळे मी शिक्षिका होण्यास प्रवृत्त झाली असावी.”
असं म्हणून सुजाताने मला शिक्षण ह्या शब्दाचा चक्क अर्थ सांगितला.ती म्हणाली,
“शिक्षण ह्या शब्दाचा दृढ विचाराने अर्थ असा होईल की “ज्या प्रक्रियेने सर्वसाधारण ज्ञान, प्रदान करणं किंवा प्राप्त करणं,तर्क आणि निर्धारणाचा विकास करणं, आणि सर्वसाधरणपणे स्वतःला किंवा दुसर्‍याला प्रौढ जीवनात बौद्धिक रूपाने तत्पर करणं.”
कुणी कल्पना तरी करील का “शिक्षण” ह्या शब्दाचा अर्थ अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे, समर्पणामुळे आणि वचनबद्धतेमुळे आचरणात आणता येतो. ज्ञान मिळवणं आणि प्रशिक्षण घेणं जीवनाच्या मुख्य अवधित केल्याने उभ्या आयुष्यात व्हायचा तो फरक होतो.आणि जसं वंय होत जातं तसं आणखी आणखी ज्ञान मिळवणं हे ज्या त्या व्यक्तिवर अवलंबून रहातं. मनुष्य जातिला उन्नतिसाठी आणि उत्कृष्ठ होण्यासाठी प्रत्येक पिढीने जास्त ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नात असायला हवं.”

सुजाताचे हे विचार ऐकून मला तिचा खूपच आदर वाटला.
मी तिला आणलेली भेट तिच्या हातात देत म्हणालो,
“सुजाता, तुझा सन्मान होण्यास खरोखरंच तू पात्र आहेस.माझी ही भेट तू घरी गेल्यावर उघडून बघ.”
घरी गेल्यावर ती भेट तिने लगेचच उघडून पाहिली.आणि सद्गदीत होऊन मला लगेचच फोन करून म्हणाली,
“काका,ह्या भेटीने माझ्या सन्मानाचं सार्थक झालं”
ती सर्व श्रेष्ठ शिक्षकाची प्रतिमा होती.तो सानेगुरूजींचा फोटो होता.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, July 6, 2009

सांगेल कुणी कशी करावी ही चलाखी

कसे कुणी कुणाचे मन जिंकती
सांगेल कुणी कशी करावी ही चलाखी

कुणा प्रियतमेच्या मनी वसावे
प्रीतिचे वचन देऊनी सफल करावे
स्वप्न असे नेत्री सदैव बाळगूनी
भटकतो सर्व जगी समय काटूनी
अरेरे! कशी ही अमुची कमनशिबी
देईना हृदय अपुले कुणी रुपवती
सांगेल कुणी कशी मिळवावी संमती

नाही पाहिल्या कचपाशातल्या सरी
नाही रोखल्या नजरा पदरावरी
नेईल का कुणी अशाच जागी आम्हा
दिसेल अमुच्या मनातली प्रियतमा
अरेरे! कशी ही अमुची कमनशिबी
रहात असावी ती कुठल्या पत्यावरी
सांगेल कुणी कशी शोधावी सत्वरी


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Saturday, July 4, 2009

मृत्यु हा काही जीवनाचा शेवट नसावा.

“मृत होणं म्हणजेच सर्व वेदानापासून मुक्त होणं,पुर्ण समाप्ति मिळणं कारण त्यापलिकडे गेल्यास वेदनासकट कसलंच दुःख वाढणार नाही”

आज प्रो.देसाई माझ्या घरी प्रि.वैद्यांना घेऊन आले आणि तळ्यावर फिरायला जाऊंया म्हणाले. अलीकडे काळोख लवकर होत असल्याने मी त्यांना म्हणालो आपण आज आमच्या फ्रंटयार्डमधे बसून एक एक कॉफीच्या कपावर गप्पा मारूया.माझी सुचना दोघानांही आवडली.बाहेर गार वारा वहात होता.गप्पा मारायला मजा येईल असं वाटलं.

गप्पांना सुरवात करताना,मीच प्रि.वैद्यांना विचारलं,
“प्रेमाचा शोध कशासाठी?कुटूंबाचा आरंभ का करावा? चांगलं होण्यासाठी धडपड का करावी? जर का क्षणार्धात तुमचं अस्तित्वच समाप्त होणार आहे तर मग हे खटाटोप कशाला?”

माझं हे ऐकून आणि वैद्य थोडावेळ विचार करीत आहेत असं पाहून प्रो.देसाई म्हणाले,
“मृत्यु हा काही जीवनाचा शेवट नसावा. अखेर जर काहीच शिल्लक राहाणार नसेल तर ह्या धरतीवर आपलं अख्खं प्राकृतिक जीवन केवळ समृद्ध होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी का समर्पित करावं?”
हे ऐकून प्रि.वैद्य म्हणाले,
“भाऊसाहेब,तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.
पश्चात काही उरत नसेल तर जीवन व्यर्थ्य आहे. जीवनाच्या पश्चात जीवन असावं ह्या इराद्याने कदाचीत ह्या धरतीवर कुणी जीवंत असण्याची जरूरी असावी. कुणी का बरं असं म्हणावं, की शरिरातला अत्यंत महत्वाचा स्नायु -म्हणजेच हृदय-झिजून गेल्याने आणि बंद पडल्याने आपलं अस्तित्व संपतं.?
मला वाटतं, आत्मा शाश्वत असल्याने त्याला हृदयासारख्या पंपाची जरूरी नाही.जे लोक आपले जवळचे हरवून बसतात ते आपल्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या हृदयात घर करून असतात.”

आपल्याच आयुष्यातला प्रसंग सांगण्यासाठी वैद्य म्हणाले,
“माझे जेव्हा वडील दिवंगत झाले तेव्हा मी संपूर्ण घाबरा घुबरा झालो होतो.मला महित आहे की प्रत्येक जण आपल्या जीवनात ह्या प्रसंगातून कधी ना कधी जात असतो. मला तर सर्व जगच माझ्यावर खाली कोसळून पडल्यासारखं झालं.ते माझ्या वडीलांचं थंड आणि ताठ शरिर बघून जणू मी मनाने किती मजबूत आहे ह्याची परिक्षा घेतली जात आहे असं मला वाटत होतं.पण मी तसा मजबूत आहे.कारण मला माहित आहे की एक दिवशी मी माझ्या वडीलांना जाऊन मिळणार आहे.कारण जीवन पुढेच जात असतं.त्यांच्या पश्चात आता मी त्यांनाच माझ्या उरलेल्या आयुष्यात बरोबर घेऊन दिवस काढणार आहे. कुणाचं अस्तित्व राहण्यासाठी, कुणाचं प्रत्यक्ष शरिराने असणं आणि अप्रत्यक्ष हजर असण्याची जरूरी असावी असं मला वाटत नाही.”
मी म्हणालो,
“प्रेमाचा तुम्हाला काही स्पर्श होत नाही.मृताला काही तुम्ही कडकडून भेटू शकत नाही.पण जो पर्यंत तुमच्या मनात त्याबद्दल श्रद्धा आहे तोपर्यंत तुमचं ध्यान आणि तुमच्या स्मृति त्यांना तुमच्या समिप ठेवतात, जीवंत ठेवतात.”
माझा हा मुद्दा वैद्याना आवडला.ते म्हणाले,
“त्यासाठी कुणी धर्मनिष्ठ असायला हवं असं काही नाही.परवर्ती जीवनाबद्दल गत समयाच्या स्मृति देणारे विचार आणि उमेद असली म्हणजे झालं.
कुणी तरी म्हटलंय ते खरं आहे की,
” मृत होणं म्हणजेच सर्व वेदानापासून मुक्त होणं,पुर्ण समाप्ति मिळणं कारण त्यापलिकडे गेल्यास वेदनासकट कसलंच दुःख वाढणार नाही. जन्म घेण्यापुर्वीच्या अक्षोभाच्या स्थितीचा जो लाभ होता त्याच स्थितीकडे गेल्यासारखं होईल. कुणी जर का मृताचा शोक केला तर मग त्याने अजाताचा पण शोक करायला हवा.मृत्यु चांगला ही नाही आणि वाईट ही नाही. कारण चांगलं वाईट असायला कुणाला तरी प्रत्यक्ष विद्यमान असायला हवं.”

आता पर्यंत निमुट ऐकून घेत कॉफिचा झुरका मारीत बसलेले प्रो.देसाई कॉफिचा शेवटचा घोट घेऊन कप माझ्या हातात देत म्हणाले,
“मृत्यु नवजीवन आणतो.कुणी तरी मृत होतं आणि कुणी जन्माला येतं.मृत्यु कुणाच्या जीवनाचा अंत करीत नाही.उलट,मृत्यु उत्तम जीवन देतो की ज्यात संधी आहे आणि सुख-शांती आहे.आणि हा विचार पटण्यासारखा तेव्हा शक्य होईल जेव्हा कुणी ह्या गोष्टीवर भरवंसा ठेवील तेव्हा.कारण जरा का भरवंसाच नसेल तर विचाराचा आणि श्रद्धेचा आभाव असणं म्हणजेच कुणाच्या कसल्याही प्रकारच्या अस्तित्वाचा अंत असण्यासारखं वाटणं.
जर कुणी परिश्रम घेतले तरच त्याची दरमजल होईल.माझी श्रद्धा आहे की मृत्युच्या पश्चात जीवन आहे आणि जीवनानंतर मृत्यु आहे. आत्म्याबरोबर आणि प्राकृतीक जीवनाबरोबर जे ह्या धरतीवर स्थान घेऊन असतं, त्याच्या पलिकडलं हे जीवन-मृत्युचं कधी ही अंत न होणारं घटनाचक्र आहे. ह्या प्रयास घेणार्‍या मनुष्याच्या आत्म्याला कुणीही असफल करू शकणार नाही कारण तो सतत नवजीवनाला समृद्ध करीत असतो.”

काळोख बराच झाला होता.संध्याकाळच्या वेळी बारीक बारीक मुर्कूटं चावतात.त्यासाठी चर्चा इथेच थांबवून आम्ही घरात आलो.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, July 2, 2009

” हे विस्मित करणारं स्मारक ह्या धरतीवर कुणी बरं निर्माण केलं असेल?”

“एखादं लहान मुल आपल्या बोटांचं निरिक्षण करून आणि ती बोटं कुशलतेने वापरून ज्ञान घेण्याच्या प्रयत्नात असतं तेंव्हा ते ज्ञान अनियंत्रित आणि अपरिपक्व असतं.”

आज प्रो.देसाई जरा खुशीत दिसले.बरेच दिवस ते आपल्या मुलाकडे राहायला होते.मधून मधून माझ्याशी फोनवर बोलायचे.पण आज त्यांची तळ्यावर भेट झाल्यावर मी त्यांच्या आनंदी चेहर्‍याकडे बघून म्हणालो,
“भाऊसाहेब,चेहर्‍यावरच्या छटा इतक्या बोलक्या असतात की मनातलं शब्दात येण्यापूर्वी चेहर्‍यावरच्या छटा शब्दापेक्षा बोलक्या होतात.
तुम्ही मला आज कसलं तरी लेक्चर देणार आहात हे निश्चितच आहे.तुमच्या मुलाच्या लायब्ररीत फक्त कायद्याची पुस्तकं असतात.वकिलाला त्याची जरूरी असते.पण कायदेकानूवर तुम्ही चर्चा करणार नाही हे नक्कीच.तुमचा विषय काही तरी वेगळाच असणार.”
हे माझं बोलणं निमुट ऐकून घेऊन झाल्यावर प्रोफेसर
हंसत हंसत मला म्हणाले,
“आमच्या मुलाच्या शेजारच्या घरात प्रिन्सिपॉल वैद्य म्हणून एका गृहस्थाची भेट झाली.हे विद्वान गृहस्थ मला बौद्धिक व्यायाम द्यायला माझ्या मुलाकडच्या मुक्कामात साहाय्य करायला उपयोगी झाले.त्यामुळे मला पुस्तकं ह्यावेळी वाचावी लागली नाहीत.”
मी म्हणालो,
“मग आम्हाला तुम्ही बौद्धिक व्यायाम आज देणार हे नक्कीच”
“तुम्ही जर का काही पुस्तकं अलीकडे वाचली नसतील तर आजची आपली चर्चा तुम्हाला नक्कीच बौद्धिक व्यायाम देईल.”
असं बोलून झाल्यावर भाऊसाहेब, प्रि.वैद्यांबरोबर सुरवात कशी केली ते सांगायला लागले. भाऊसाहेब प्रि.वैद्याना म्हणाले,
“ज्यावर आपलं अत्यंत प्रेम असतं आणि जे अविचल राहावसं वाटतं त्याचा विध्वंस करण्यासाठी अस्त्रांची निर्मिती एखाद्या विचारातून झाली असावी.पर्यावरणाचा नाश करणं, गरिबीचं कालचक्र चालूच ठेवण्याचा प्रयास करणं,विषयुक्त केमिकल्स आपल्या शरिरात आणि ह्या पारितंत्रात मिलावट करण्याची कामं ह्या असल्याच विचारातून झाली असावीत. आपल्याला कसं वाटतं.?”
वैद्य म्हणाले,
“मला वाटतं कुठल्याही गोष्टीचं नुसतं मनन करून चालत नाही.मनन करणं हे विचारमग्नतेतून निर्माण होतं.मानव जातिचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या असल्या विचारमग्नतेच्या पुढे आपल्याला गेलं पाहिजे.
आपल्याला बुद्धिमत्तेची जरूरी आहे.ढोबळ अर्थाने बुद्धिमत्ता म्हणजेच जीवनाच्या मूल्यांची असलेली जागरूकता.ही बुद्धिमत्ता शिकण्यासाठी विचारमग्नतेचं आणि अनुभूतिचं म्हणजेच संवेदनाचं,मन आणि शरिराचं,विज्ञान आणि आत्म्याचं,ज्ञान आणि मूल्यांचं, मेंदु आणि ह्रुदयाचं एकीकरण व्हायला हवं.बुद्धिमत्ता आत्मसात करण्यासाठी विद्येची जास्त आणि प्रशिक्षणाची कमी जरूरी आहे.असं मला वाटतं.”
मधेच प्रो.देसायाना अडवून मी म्हणालो,
“भाऊसाहेब हे प्रि.वैद्यांचं म्हणणं मला पटतं.पण प्राचिन काळात विद्या प्राप्त करताना किंवा अध्ययन करताना अनुभूति आणि विचारमग्नता संयोजित केली जाऊन अंतर्ज्ञानाच्या उसळण्याने बुद्धिची वृद्धि होत होती. असं तुम्हाला नाही का वाटत?”

“वैद्यानी एक सुंदर उदाहरण दिलं आहे ते मी तुम्हाला ओघाओघाने सांगणारच आहे.तुम्ही बुद्धिच्या वृद्धिबद्दल जे काही म्हणत आहात त्यासाठी ते उदाहरण ऐकून तुमची समाधानी होईल असं मला वाटतं.”
असं सांगून झाल्यावर भाऊसाहेब आपला विचार सांगू लागले,
“एखादं लहान मुल आपल्या बोटांचं निरिक्षण करून आणि ती बोटं कुशलतेने वापरून ज्ञान घेण्याच्या प्रयत्नात असतं तेंव्हा ते ज्ञान अनियंत्रित आणि अपरिपक्व असतं.परंतु,हा ज्ञान मिळवण्याचा प्रकार मात्र आश्चर्याने भरलेला वाटतो आणि ही एक अलौकिक वयक्तिक उपलब्धि वाटते. ही उपलब्धि शालेय शिक्षणापेक्षा अगदी निराळीच वाटते. पुर्वीच्या त्या विद्या प्राप्तीतल्या अनुभवात सहायता असायची, आव्हानं असायची,प्रेम आणि आस्था असायची.
आता अगदी बालपणापासून ही विद्या मिळवण्याची प्रक्रिया समयपरत्वे हरवली जात आहे. आणि जसं शालेय शिक्षण मिळत आहे त्यामधे विचार करणार्‍याला,मनन करणार्‍याला फक्त पुरस्कार दिला जातो,पण अनुभूतिबाबत सर्वच निराशा आहे.”

प्रि.वैद्यांचं काय म्हणणं आहे पहा.ते म्हणतात,
“मनोभाव किंवा आवेश गाडले जात आहेत आणि कधी कधी घातक कारणाला ते विस्फोटीत करायला वापरले जात आहेत. त्या आवेशांचा उपयोग सुसंगत ज्ञानासाठी केल्याने कुशल अनुभूतिला चालना मिळेल असा विचार फार क्वचित केला जातो.”
लहान वयातला सुसंगत ज्ञानोपयोग आणि वयस्क असतानाचा असुसंगत ज्ञानोपयोग ह्यातला फरक समजण्यासाठी वैद्यानी असं हे उदाहरण दिलं.
ते म्हणतात,
“एखाद्या बाल वयातल्या तरूण व्यक्तिने क्षितीज्यावरचा सूर्योदय कधीच पाहिला नसावा अशी कल्पना करूया.अशा वेळी सूर्योदय पाहाण्याच्या त्या बाल तरूणाच्या पहिल्याच सामन्यात तो समुद्रातल्या खोल पाण्यात सतत बद्लणार्‍या पाण्याचा रंग पाहिल, सकाळच्या उगवत्या सूर्याचं ते तेजोमय बिंब पाण्यात परावर्तीत होऊन दूरवरच्या लाटांच्या शिखरावर नृत्य करताना पाहिल.त्या अफाट समुद्राची तेजस्विता उभारली जात असलेली पाहिल.त्या समुद्राच्या महातरंगाच्या होणार्‍या गर्जना ऐकील आणि त्या एका मागून एक येणार्‍या लाटातली महाशक्ति किनार्‍यावर येऊन आपटल्यावर त्या शक्तिचा परित्याग होत असताना तो पाहिल. अशावेळी किनार्‍यावर उभ्या असलेल्या त्याला त्याच्या चेहर्‍यावर पाण्याचे शिंतोडे उडलेले दिसतील. ते शिंतोडे सुकून जाता जाता चेहर्‍यावर राहून गेलेले मिठाचे पटल त्याला दिसतील.
अशा क्षणी ज्ञानप्राप्ती होत असताना ते बालमन विचारील,
” हे विस्मित करणारं स्मारक ह्या धरतीवर कुणी बरं निर्माण केलं असेल?”
कदाचीत अश्या क्षणी तो तरूण इश्वरावर भरवंसा ठेवील.
आणि नंतर ह्याच तरूणाला आपण समुद्रापासून अति दूरवर शाळेत पाठवून महासागराची फिझिक्स, केमिस्ट्री,आणि बायालॉजी शिकू दिली की त्या तरूणाच्या पहिल्या सामन्यात त्याला मिळालेल्या ज्ञानाच्या जागेचं हळू हळू हे तथ्यपूर्ण ज्ञान स्थान घेणार.”

हे वैद्यांनी दिलेलं उदाहरण भाऊसाहेबांकडून ऐकून मला त्यांना विचारल्या शिवाय राहवलं नाही.
मी म्हणालो भाऊसाहेब,
“प्रि.वैद्यानी दिलेलं सुंदर उदाहरण ऐकून मला वाटतं,खरं तर शिक्षणाच्या सहाय्याने मनुष्यजातिच्या समस्यांच्या रहस्यांचं उलघडण करण्याचा मार्ग धुंडाळाला जात असला तरी,ज्या ज्ञानाची आपल्याला जरूरी असते त्या ज्ञानापासून हे असंतुलीत शाळकरी शिक्षण आपल्याला वंचीत करत आहे. असं तुम्हाला नाही का वाटत?”
“मला खात्री होती की तुम्ही असंच काही तरी मला विचारल्या शिवाय राहणार नाही.”
असा शेरा देत प्रो.देसाई मला म्हणाले,
“खरं म्हणजे जे शिक्षण विस्मयतेला प्रोत्साहित करून सख्त बौद्धिक क्षमता देऊन आपल्याला सक्रिय करतं अशा शिक्षणाची आपल्याला जरूरी आहे.
अशा तर्‍हेचं ज्ञान विकसित होईल अशा वातावरणाचं ध्यान ठेवणारा समाज जेव्हा मनन आणि अनुभूति किंवा संवेदना म्हणा ह्या दोन्हींचा गौरव करतो आणि सुखशांती, आरोग्य, मैत्री,प्रेम,न्याय,स्वातंत्र्य,उत्तरदायित्व,लोकतंत्र आणि लाभकारी कामं ही सर्व मूल्यं सुनिश्चित ठेवण्याच्या प्रयत्नात असतो त्या समाजात अपेक्षीत फळ मिळणारच.”
मी म्हणालो,
“म्हणजे ह्याचा थोडक्यात अर्थ असा की, अशा तर्‍हेच्या ज्ञानासाठी मननाची जरूरी आहेच आहे, मात्र फक्त मनन अपुरं आहे.
आज खूप दिवसानी आपण दोघे तळ्यावर भेटलो आणि बौद्धिक व्यायामाला मिळालेला आराम आज भरून काढला.”
सुरवातीला भेटल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर दिसलेल्या बोलक्या छटा उठतां उठतां बरचसं बोलून गेल्या.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com