Wednesday, April 29, 2009

नको करूस तू दूरावा

मनातल्या माझ्या दाहाला
सख्या तू विझवावा
नको करूस तू दूरावा
विसरून जा आता विरहाला

तू जरा भिजावे अन मी भिजावे
तुषारानी कारंजातून गीत गावे
तू न बोलावे अन मी न बोलावे
इशार्‍यातून अपुले भाव समजावे
ह्या रात्री वाट दे तुझ्या संकोचाला
विसरून जा आता विरहाला

हा केशभार अन पदर माझा
सख्या सर्वस्वी आहे तुझा
बाहूत तुझ्या मी पहुडले
भीतीचे विचार आता कसले
ह्या रात्री वाट दे तुझ्या दुःखाला
विसरून जा आता विरहाला



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, April 27, 2009

श्रेष्ठतम मैत्री.

पुरूषोत्तम आणि मी एकाच गावात वाढलो.शाळेत एकत्र शिकलो.हायस्कूलची परिक्षा पास झाल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला शहरात आलो.
मला आठवतं आमच्या सर्व मित्रमंडळीत शरद आणि पुरुषोत्तम यांची पहिल्या पासून गाढी दोस्ती होती.

अलिकडे मी सुट्टीत गावाला गेलो होतो. पुरुषोत्तमची आणि माझी खूप दिवसानी भेट झाली. तो पण आपल्या म्हातार्‍या आईवडलाना भेटायला म्हणून आला होता. एकदा फिरत फिरत आम्ही दोघे आमच्या गावातल्या नदिवर जाऊन जुन्या आठवणीना उजाळा देत बोलत बसलो होतो.
बोलता बोलता शरदची आठवण आली.मी पुरुषोत्तमाला कुतूहल म्हणून विचारलं,
“काय रे आपण सगळे एकत्र खेळायचो.एकत्र शाळेत जायचो.संध्याकाळी सगळे मिळून नदीवर पोहायला जायचो.पण तुझ्यात आणि शरद मधे मला नेहमीच खास दोस्ती दिसायची.तुम्ही दोघे अगदी सख्खे भाऊ कसे एकमेकावर प्रेम करायचा.हे कसं काय?”
पुरुषोत्तमला शरदची आठवण आली.हे मला त्याच्या चेहर्‍यावरून लक्षात आलं. आणि माझ्या ह्या प्रश्नाने त्याला मनापासून शरदच्या जून्या आठवणी काढून मला काही तरी सांगावं असं वाटलेलं दिसलं.

मला म्हणाला,
“मला वाटतं खर्‍या मैत्रीमधे फक्त दोघांमधला विश्वास आणि लगाव ह्यांच्या पेक्षा काही तरी जास्त असतं. एकमेकाच्या बुद्धिचं आदान-प्रदान असतं.खर्‍या मित्रांमधे एकमेकाच्या हृदयाशी संगति असते.एक मित्र जर का सुखी,दुःखी किंवा भयभयीत असला तर दुसरा त्याच्या भावनेचा वाटेकरी असतो. मानवजातितलं हे सर्वांत उच्चतम बंधन असतं.

कोकणातल्या माझ्या राहत्या खेड्यातल्या परिसरात माझा एकच खरा मित्र होता. मी माझ्या आणि त्याच्या जन्मापासून एकमेकाचे शेजारी होतो.त्यावेळी इतर तुझ्या सारख्या बाळगोपाळांसारखं आम्ही पण लहानपणातले खेळ,मस्ती-मजा यामधे आनंद घेत होतो.जरा मोठे झाल्यावर गावातल्या नदीच्या पाण्यात पोहायला शिकलो.
आमच्या बरोबर इतर समवयस्क दोस्त मंडळी पण पोहायला यायची.हे तुला आठवत असेलच.
आमच्या घरात दोन म्हशी,दोन बैल,एक दुभती गाय- कपिला- आणि तिचं लहानसं पाडंस- तानु- अशी जनावरं होती.नदीवर म्हशीना पाण्यात डुबायला आणि धुवायला नेताना आम्ही दोघे म्हशीवर बसून गप्पागोष्टी करीत घरून नदीपर्यंत जात असूं. नदीत डुंबताना आणि पोहून एका किनार्‍यावरून दुसर्‍या किनार्‍यापर्यंत जाताना अनेकदा इतरांशी पोहण्यात चूरस लावित असायचो.
माझा आणि माझ्या मित्राचा-शरदचा- नेहमीच पुढचा नंबर असायचा.
आमच्या दोघांतला दुवा साधायला थोडा वेळ घालवावा लागला.आमचा उन्हाळ्यात विशेषकरून बराच वेळ नदीवर जायचा.सकाळी लवकर उठून-ज्यावेळी इतर आमचे संवगडी अंथरूणात गुडूप झोपलेले असायचे- अशावेळी आम्ही दोघे नदीवर पाण्यात डुबत असायचो. आमच्या दोघातला हा मैत्रीचा दुवा सकाळच्या पोहण्याच्या संवयीने आणि ह्या नदीच्या साक्षीने तो जास्त असामान्य झाला.एकमेकाशिवाय नदीत पोहणं कठीण होत होतं. तेरा वर्षावरचा आमचा तो पोहण्याचा उन्हाळा शेवटचा होता.तो शेवटचा उन्हाळा होण्यासाठी आम्ही काही योजना केली नव्हती. परंतु, त्यावर्षी शरदचा एका गाडीच्या अपघातात शेवट झाला.
तत्क्षणी मला कळून चूकलं की हा अंत होता.तो खास दुवा कष्टदायी होऊन आता तुटला होता.माझं ह्या दुव्याशिवाय आता कसं होणार हे मला कळेना.”
मी म्हणालो,
“हो मला आठवतं,तुला एव्हडा धक्का बसला होता की तू आजारी पडला होतास. शरद गेल्यानंतर तू जवळ जवळ पंधरा दिवस शाळेत येत नव्हतास.एकदा आपले शाळेचे हेडमास्तर तुला बघायला घरी आले होते.आणि त्यानी तुझी समजूत घातली होती.”

“खरंय तुझं म्हणणं”
असं म्हणत पुरुषोत्तम सांगू लागला,
“जसं जीवन पुढे जात होतं तसं मला कळलं की मैत्रीचा हा दुवा कधीच तुटत नाही. आमच्यातला दुवा मृत्युला पण ओलांडून गेला होता.केवळ आम्ही दोघे शेजारी म्हणून हा दुवा नव्हता,तर ते एक पवित्र बंधन होतं.
अजून मी रोज सकाळी उठल्यावर त्याचं स्मरण करतो आणि त्याच्याबद्दलची सहयोगाची भावना माझ्याबरोबर सतत ठेवतो.माझ्या रोजच्या जीवनात त्याचा दुवा आणि त्या नदीतल्या पोहण्याची चूरस ह्या दोन गोष्टी माझ्या यशाला बढावा देते.”

“पण हायस्कूल संपल्यावर आपण सगळेच गाव सोडून शहरात पुढचं शिकायला आलो.”
असं मी त्याला आठवण देत म्हणालो.

“नंतर मी जेव्हा शहरात राहायला आलो,तेव्हा माझ्या लक्षात आलं की,माझ्या दोस्तीच्या दुव्यासारखी आणखी इतरांची पण दोस्ती असते.पण मला वाटत नाही सर्वच लोक तसं मानीत असावे.”
असं म्हणून पुरुषोत्तम बराच सद्गदित झालेला मला दिसला.त्याची समजूत घालण्याच्या इराद्याने मी त्याला म्हणालो,
“परंतु,अशा महत्वपूर्ण मित्राबरोबरच्या दोस्तीने दोघेही चांगले नागरीक बनत असावे. ही महत्वपूर्णता असते म्हणूनच ही दोस्ती नुसत्या दोन व्यक्ती मधल्या विश्वास आणि लगावा पेक्षा जास्त श्रेष्ठतम भासते.”
माझं हे ऐकून पुरुषोत्तमाला खूपच बरं वाटलं.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, April 25, 2009

असं वाटतं की झटकन पावसात ओलंचिंब होऊन जावं.

आज प्रो.देसाई फिरायला येणार नाहीत म्हणून निरोप द्यायला आलेली त्यांची मुलगी वृंदा आणि तिची मैत्रीण मालिनी मला तळ्यावर भेटल्या.मालिनीची माझ्याशी ओळख करून देत वृंदा म्हणाली,
“तुमच्याशी गप्पा मारायला बरं वाटतं.आमचे भाऊसाहेब तर तसं नेहमीच सांगतात.”
हे ऐकून मला अंमळ बरं वाटलं.
“ही माझी मैत्रीण मालिनी.हिला दोन मुलं आहेत एक मुलगी कॉलेजात जाते.”
मी वृंदाला म्हणालो,
“तू म्हणालीस की मालिनीला दोन मुलं आहेत आणि एक मुलगी कॉलेजात जाते.पण हिच्याकडे पाहिल्यावर ही दोन मुलांची आई वाटत नाही.असं हिचं काय गुपीत आहे की ती अशी दिसावी?”
असं बोलून मला एखाद्या विषयावर गप्पा सूरू करायची कल्पना सुचली.
वृंदा मला म्हणाली,
“ते तुम्ही मालिनीलाच विचारा.मला पण त्याचं कुतूहल होतं,पण तुम्ही विचारणं निराळं आणि मी विचारणं निराळं.”
हे ऐकून मालिनी म्हणाली,
“असं काही नाही.माझे विचार तुम्हाला पटतीलच असं काही नाही.पण तुम्ही आता विचारलंत तेव्हा सांगते.
“जोपर्यंत तुम्ही मनाने तरूण राहता तोपर्यंत तुम्ही वयस्कर होणार नाही.”
ही उक्ति मी कुठे वाचली ती आठवत नाही.कसं का असेना हे म्हणणं मला आवडतं आणि त्याप्रमाणे राहण्याच्या मी प्रयत्नात असते.
मी ह्या उक्ति प्रमाणे नेहमीच राहिली नसेन. हायस्कूलच्या पूर्वीच्या लाजवट दिवसात,आणि हायस्कूलच्या अभ्यासाच्या दबावाच्या दिवसात ह्या उक्तिपासून जरा दूर राहिले.हेच ते खरे दिवस की ज्यावेळी आपण प्रौढ होण्याच्या प्रक्रियेत असतो,आणि बालीश मुळीच न दिसण्याच्या प्रयत्न करतो.”
वृंदा म्हणाली,
“अग पण ते दिवस काही कायमचे नसतात.त्यानंतर केव्हडं आयुष्य पूढे पडलेलं असतं.”
मला हा वृंदाचा पॉईन्ट आवडला.
मी म्हणालो,
“मालिनी,एखादा संकल्प करायला तसंच काही तरी कारण किंवा एखादी घटना घडावी लागते.असं मला वाटतं”
“अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोललात.”असं म्हणून मालिनी सांगायला लागली,
“ते वर्ष मला आठवतं की जेव्हा मी माझं जीवन खर्‍या अर्थाने जगायला लागले.
ते आमचे शाळेतले शेवटचे दिवस होते.सर्वजण सुट्टीवर घरी तरी जाणार होतो किंवा आजोळी जाणार होतो.माझी मैत्रीण कविता एका कार अपघातात निधन पावली होती.टिनएजर असलेल्या त्या वयात एखादी मैत्रीण आपल्यातून अदृश्य व्हावी ही विश्वास ठेवण्यासारखी बातमी नव्हती.
कविताचे वडील काय म्हणाले ते माझ्या अजून लक्षात आहे.
“माझी कविता नेहमीच सर्वच करायला घाई घाईत का असायची,हे शेवटी आता माझ्या लक्षात आलं.मला आता समाधान वाटतं की,ती आपलं जीवन असं जगली कारण जरी ते जीवन अधूरं असलं तरी तिने तिला हवं हवं ते करून घेतलं.”

हे त्यांचं बोलणं माझ्या डोक्यात पक्कं शिरलं आणि माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला.
माझ्या लक्षात आलं की मला गणीतात किती गुण मिळाले हे माझ्या स्मृतीत मी कधीच ठेवणार नाही पण जीवनातली सहजता आणि मी माझ्या प्रियजनांच्या स्मृती काहीश्या चांगल्या लक्षात ठेवते.
लहान लहान गोष्टीकडे पहाण्यासाठी माझ्या जीवनाच्या दृष्टीने माझ्या विचाराना मी एकाग्र करून पहाते. लहान असण्यातली जिज्ञासा,आणि भावार्थ,उदाहरण म्हणून सांगायचं झाल्यास, जोरात आलेलल्या पावसाच्या सरीचा निनाद,समुद्राच्या किनार्‍यावरचा लाटांचा आवाज आणि त्या वातावरणातला जीवघेणा गंध,वीजेचा चमचमाट,आणि गावातल्या नदितल्या सळसळणार्‍या पाण्याच्या ओघात घेतलीली पहिली डुबकी.तसंच खुळचंट वाटलं तरी केलेली प्रश्नांची सरबत्ती. जसं आकाश नीळच कां? वगैरे.”
मालिनीचे हे विचार ऐकून मला तिच्या संकल्पाचं कारण समजायला लागलं.
“वा! छान विचार आहेत तुझे” असं मी म्हटल्यावर तिला बरं वाटलं.
ती पूढे म्हणाली,
“माझी आई मला नेहमी म्हणायाची,
“तत्क्षणी वाटणारी गोष्ट कर.”
ते ऐकून मला हंसू यायचं.पण त्यामुळे मला काहीही करायला मुभा मिळायची.दिसताच मी संधी घ्यायची.
माझ्या जीवनात मी यापुढे काय काय करणार आहे ह्याची मला यादी करायची आहे.अगदी अपूर्व गोष्टींची पण यादी करायची आहे. जश्या ताजमहाल पाहाणं, हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन येणं,अश्याच काही जगातल्या नाविन्याच्या गोष्टी पहाणं.आणि जेव्हा जेव्हा मी ह्या यादीत लिहायला जाते तेव्हा ती उक्ति,
“जोपर्यंत तुम्ही मनाने तरूण राहता तोपर्यंत तुम्ही वयस्कर होणार नाही”
हे वाचून बरं वाटतं आणि असं वाटतं की झटकन पावसात ओलंचिंब होऊन जावं.”
हे तिचं शेवटंच वाक्य ऐकून माझ्या मनातला विचार मला रोखून ठेवता आला नाही.

मी तिला चटकन म्हणालो,
“असंच एखाद्या शरिराने पिकलं पान झालेल्या माणसाचं मन मात्र तरूण असूं शकतं.आणि ते प्रत्येक व्यक्तिवर अवलंबून आहे.अलिकडेच मी एका हिंदी गाण्याचं मराठीत विडंबन केलं.तरूण मंडळीने ते ऍप्रिशीयेट केलं.कारण,
“या वयावर असं गाणं लिहिण्याचे ह्यांना विचार कसे सुचतात?”
असा विचार त्यांच्या मनात आला असावा. तसं गाणं मी लिहावं हे त्यांना अपेक्षीत नसावं.आणि ते स्वाभाविक आहे.
एका वाचकाने प्रतिक्रियेत चक्क लिहिलं,
“पिकल्या पानाचा देठ की हिरवा..”
हे वाचून मला गंमत वाटली.
“पिकलं पान” पूर्वी कधीतरी “हिरवं पान” होतं,त्यामुळे “हिरवं पान ” कसं असतं हे पिकल्या पानाला नक्कीच जाणवलेलं असतं.पण उलटं मात्र खरं नाही.

-reverse is not true-.
जे काही आत्ता असलेल्या हिरव्या पानाला पिकल्या पानाबाबत माहित असतं ते बरंचसं myth-मिथ्या- किंवा कल्पित असतं.कारण ते अनुभवलेलं नसतं. सर्वच गोष्टी समजण्यासाठी अनुभवायला हव्यात हे जरी जरूरीचं नसलं तरी काही गोष्टी अनुभवणं आवश्यक असतं.
जशी वेळ निघून जाते तशी त्या हिरव्या पानाची हिरवट कमी होते,क्लोरोफील कमी झाल्याने ते पिवळं दिसायला लागतं.त्या पिवळ्या पानाचा हिरवा देठ अगदी शेवटी शेवटी पिवळा होतो आणि नंतर पान सुकून गळतं आणि खाली पडल्यावर त्याच पानाला पाचोळा म्हणतात.तो देठ हिरवा असे पर्यंत नव्हे तर पिवळा झाला तरी गळून पडेपर्यंत अगदी हिरव्या पानाच्या बरोबरीत ते पिवळं पान त्या झाडाच्या फांदीवर असतं.सकाळच्या कुंद हवेतल्या त्या दंवबिंदूना सावरणं,पहाटेच्या त्या हळूच येणार्‍या अश्या वार्‍याच्या झुळकीबरोबर डुलणं,हे चालूच असतं.
म्हणून वाटतं मालिनी,
“पावसातलं ओलंचिंब होणं”
असं वाटत राहणं हेच तरूण मनाचं द्योतक आहे.माझ्या सारख्या दुसर्‍या एखाद्याला आता या वयावर वाटणं सोडूनच दे मनांत आणणं पण कठीण आहे.कारण तुझी ती उक्ति,
“जोपर्यंत तुम्ही मनाने तरूण राहता तोपर्यंत तुम्ही वयस्कर होणार नाही.”
त्याने पण वाचली पाहिजे.
तू अशी का दिसतेस त्याचं गुपीत मला कळलं.”




श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, April 23, 2009

झुणका खाल्ला रे बोरीवलीच्या हाटलामधे

आज सकाळी ट्रेड्मीलवर व्यायाम करीत होतो.कानाला इयरबड्स लावून आयपॉडवर हिंदी सिनेमानतली गाणी ऐकत होतो.
“झुमका गिरा रे बरेलीके बाजार मे”हे गाणं कानावर पडून मनात दुसरेच शब्द गुणगुणायला लागले “झुणका खाल्ला रे “

आणि नंतर त्या मुळ गाण्याचं विडंबन केल्यावाचून मला राहावेना.मग म्हटलं लिहायचंच.लिहिता लिहिता शब्द सुचत गेले.आणि गाणं तयार झालं.

झुणका खाल्ला रे
हाय
झुणका खाल्ला रे बोरीवलीच्या हाटलामधे
झुणका खाल्ला झुणका खाल्ला झुणका खाल्ला
हाय हाय हाय तिखट झुणका खाल्ला रे



सख्या आला नजर चुकवून खोलीत चोरी चोरी
म्हणे मला ये भरवतो तुला माझ्या लाडक्या पोरी
मी म्हणाले नको करू रे कसली तरी बळजोरी
किती विनवीले तरी सख्याने केली मला जबरी
हाय केली मला जबरी

मग काय झालं?

मग? मग झुणका खाल्ला रे दोघांच्या मर्जीमधे
झुणका खाल्ला रे बोरिवलीच्या हाटलामधे



गच्चीवर मी उभी अन खाली सख्याची गाडी
हंसत बोलला ये ग! खाली नेसून रंगीत साडी
फेक तुझी आंगठी किंवा दे सल्ल्याची निशाणी
गच्चीवरती उभी उभी मी शरमूनी झाले पाणी
हाय शरमून झाले पाणी

मग काय झालं?

देवाss! मग झुणका खाल्ला रे दोघांच्या प्रीतिमधे
झुणका खाल्ला रे बोरिवलीच्या हाटलामधे



बगीच्यामधे प्रियाने माझी घेतली एक फिरकी
पदर माझा ओढून म्हणतो मनात माझ्या भरली
नजर फिरवूनी मी पण तेव्हा गप्प जरा राहिली
हाय गप्प जरा राहिली
नजर वळवूनी गप्प राहूनी हळूच मी हंसली
सजणाशी मग छेडूनी मजला झाली हाथापायी
हाय झाली हाथापायी

मग काय झालं?

मग? झुणका खाल्ला रे मी सांगू कसं ते शब्दांमधे
झुणका खाल्ला रे बोरिवलीच्या हाटलामधे



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, April 21, 2009

जेव्हा डोळे पाणावतात.

जेव्हा डोळे पाणावतात.

मनोहरच्या आणि माझ्या नेहमीप्रमाणे गप्पा चालल्या होत्या.
“अलिकडच्या मुलांना शाळा कॉलेजात इतका अभ्यास असतो,की मान वर काढायला वेळ मिळत नाही.कारण तशी समाजात जिकडे तिकडे चूरस चालली आहे.मग लाखोनी शिकणार्‍या मुलांच्या परिक्षेत आणि पुढच्या करिअरमधे तशीच चूरस कायम राहिली तर त्यात नवल काय.?”
असं मनोहर मला म्हणाला.
मनोहरचं म्हणणं अगदी खरं वाटलं मला.जसजसं जग पुढे चाललं आहे तसतसं बदल हा होतच राहणार.आमच्या वेळेला असं असं होतं म्हणून आताही तसंच असलं पाहिजे हा काही प्रगल्भ विचार म्हणता येणार नाहीत.
“आमचे आजी आजोबा आणि आम्ही ह्या मधलं नातं,जवळीक,ह्या गोष्टी त्यावेळच्या त्या समाजाच्या जडणघडणीवर बर्‍याचश्या अवलंबून होत्या.ते त्यावेळच्या वातावरणात शोभून दिसायचं.पण अलिकडे जरी दुनियादारीच्या घाई गर्दीत तसंच वातावरण ठेवता नाही आलं,तरी माणसा-माणसा मधली ओढ,लपून छपून कुठेतरी वर उचंबळून येतेच.”
मनोहरला असं सांगून काही तरी नवीन घटना माझ्याकडे उघड करायची होती हे मी तेव्हांच ताडलं.
मला म्हणाला,
“माझ्या ताईची सासू अलिकडेच वारली.तिला मी भेटायला म्हणून गेलो होतो.ती घरी नव्हती पण तिची एकुलती एक मुलगी सुलभा एकटीच घरी होती.
सुलभाची आजी गेल्याचं सुलभाला बरचसं मनाला लागलेलं दिसलं.”
ती मला म्हणाली,
“ह्या वेळी दिवाळी संपता संपता उजाडलेली ती उदासिनता आणणारी सकाळ मला आठवते.मी शाळेत जाण्याच्या तयारीत होते आणि तशी चिंता करण्यासारखं काहीही उगवत्या दिवसाने माझ्या समोर आणून ठेवलं नव्हतं. तेव्हड्यात फोनची घंटा वाजली.

माझी आत्या मला म्हणाली की आजीला कसंस वाटतंय म्हणून तिला हॉस्पिटलमधे घेऊन जावं लागणार आहे.मला मनात थोडा धक्का बसला.कदाचीत आजी मला पुन्हा भेटणार नाही अशी चिंतेची पाल मनात चुकचुकली.

खरं तर आजी हॉस्पिटलात गेल्यानंतर जवळ जवळ आठ एक दिवसानी तिचं निधन झालं.तिला घरी आणली आणि तिचं शेवटचं कार्य करीत असताना पाहून मला जरासुद्धा रडूं आलं नाही.माझी आई, आत्या आणि काका खूपच रडत होते,दुःखकरून मुसमुसून रडत होते.परंतु,माझ्या डोळ्यातून एक टिप ही आलं नाही.”
मी सुलभाला म्हणालो,
“अगं,तुला तर आजी खूप आवडायची.तुझ्या लहानपणी मी पाहिलंय तू आणि आजी कितींदा खरेदीला गेलेल्या दिसायचा.”
“ माझी आजी मला आवडायची. पण मी जेव्हा ह्या अभ्यासाच्या रामरग्याड्यात अडकले तेव्हा तिच्याशी जवळीक केली नाही.”
असं म्हणून सुलभा तिची आजी गेल्याच्या त्या दिवसाच्या घटनेचं वर्णन करीत म्हणाली,
“जेव्हा बाकी सर्व रडत होते,दुःख करीत होते,त्यावेळी माझं आणि माझ्या आजीचं नातं ह्याचा मी विचार करीत असता मला आठवलं की तिच्या लहानपणाच्या दिवसा विषयी मी तिला कधीच विचारलं नाही.तसं न केल्याने मला बरंच दुःख झालं.

आणखी काही जून्या गोष्टी आजी कडून ऐकायच्या असतात त्या मी तिला विचारून घेऊन ऐकू शकले नाही.मी असं का करू शकले नाही याचा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी ह्या गोष्टीची चिंता केली नाही.मला त्यावेळी वाटायचं की मी आणखी थोडी मोठी झाल्यावर तिच्याशी जवळीक साधीन आणि तोपर्यंत मी थोडी पोक्तपण होईन.”

मी तिला म्हणालो,
“आता होऊन गेलेल्या गोष्टी बाबत खंत करण्यात काय उपयोग.माणसाची चूक होते.”
“म्हणून तर माणसाने चूकीतून सुधारलं पाहिजे.तिच चूक किंवा तसलीच चूक पुन्हा करणं म्हणजे आपल्याला माणूस म्हणून घेणं बरोबर नाही.”
“मग तुझं आता काय म्हणणं आहे?”
हा माझा प्रश्न पूरा होण्यापुर्वीच सुलभा मला म्हणाली,

“तथापि माझ्या ध्यानात आलं की माझा मोका मी घालवून बसले आणि याउप्पर आता मला कधीही हा मोका मिळणार नाही.तत्तक्षणी माझ्या लक्षात आलं की मी सचेत राहिलं पाहिजे.यदा कदाचीत माझं एखादं जवळचं माणूस असंच सोडून गेलं तर ही परिस्थिती येऊं नये म्हणून. अवतीभवती असलेल्यांबरोबर मी माझा थोडा वेळ खर्च करायला हवा.मी यातून शिकले की आला मोका साधला पाहिजे.ह्यासाठी मला त्यांच्याशी परिचित राहिलं पाहिजे.जीवनातला प्रत्येक क्षण संपादित करायला ह्याची जरूरी आहे.जे उदास असतील त्यांना दिलासा दिला पाहिजे, माझ्या आईला घरकामात मदतीचा हात पुढे केला पाहिजे,कुतूहल करून सहानुभूतिपूर्वक प्रश्न विचारून खरंच त्या व्यक्तिबद्दल चिंता दाखविली पाहिजे.”

खरोखरच सुलभाचे हे विचार ऐकून मी तिला पाठीवर शाबासकी देत म्हणालो,
“सुलभा, असं केल्याने तू अप्रत्यक्षपणे आजीला श्रद्धांजली दिल्यासारखीच होईल.”

“माझ्या आजीचं शेवटचं कार्य होत असताना मी मला बदललं.त्या अपूर्व क्षणापासून मी इतरांबद्दलची चिंतेची धारणा माझ्या मनात पक्की केली.ह्यापुढे कुणावर मी प्रेम करावं आणि त्यांच्या सानिध्यात राहावं ह्याची संधी मिळाल्यावर तो मोका हातातून सुटू देणार नाही असं मनात पक्कं केलं.”
तिला रडूं कोसळणार ह्याचा अंदाज बघून मी तिला जवळ घेत म्हणालो,
“वेडी रे वेडी,खूप मनाला लावून घेतलंस”
हुंदके देत देत मला बिलगून म्हणाली,
“माझ्या आजीला उचलून घेऊन जाताना पाहून मी खूप रडले.”
“हे ऐकून माझेही डोळे पाणावले.”
आणि मनोहरकडून हे ऐकून माझे पण.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, April 19, 2009

तारीफ करू का त्याची

हा चंद्रमुखी चेहरा
केसाचा रंग सुनेहरा
हे नीळसर नीळसर डोळे
हे लक्षण असे वेगळे
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची



कथा पुराणी तुझी
जाते ऐकवीली सदाची
तुला पाहूनी मानिले
योग्य असे जे ऐकले



ते मुरडत मुरडत चालणे
ते जादू टोणा करणे
शतःदा मी संभाळणे
मन काबूत ते नसणे
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची



लाली सकाळच्या किरणाची
रंगीत शोभा गालावरची
संध्याकालीन अंधाराची
जणू छाया ही केसाची
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची



तू तूडूंब नदी पाण्याची
दुधाळलेल्या फेसाची
मजा असे डुबण्याची
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची



मी शोधीत असे मंदीर
मंदीर माझ्या समोर
दूर कर हा पडदा
निघू दे हा अंधार



हे लाडीक लाडीक वागणे
मज करिते पुरे दिवाणे
तुज भरून पाहूदे मला
तो मस्त तुझा चेहरा
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, April 17, 2009

मरण्यातही कौशल्य आहे,अगदी अतिरिक्त गोष्टी असतात तसंच.

प्रो.देसायांना थोरला भाऊ आहे हे मला हल्लीच कळलं.काल प्रो.देसाई मला म्हणाले,
“माझा थोरला भाऊ माधव काही दिवस माझ्याकडे राहायला येणार आहे.आल्यावर मी त्याला नक्कीच तळ्यावर घेऊन येतो.”
कीडकीडीत शरिरयष्टीचे,काठीचा आधार न घेता चालणारे भाऊसाहेबांचा जुळाभाऊ वाटणारे माधव, भाऊसाहेबांपेक्षा दहा वर्षानी मोठे होते.पंचायशी वर्षावर त्यांची ठणठणीत प्रकृती पाहून मी त्यांना म्हणालो,
“तुमचं वय तुम्ही सांगितल्यावर मला कळलं. नाहिपेक्षा तुम्ही एव्हड्या वयाचे दिसत नाही.उलट भाऊसाहेब तुमचे मोठे भाऊ शोभतात.”
माधव मला म्हणाले,
चालंय,इतके दिवस काढले त्यात आणखी थोडे दिवस काढायचे.मी एक दिवस मरणार आहे हे निश्चित.आता मी मेल्यानंतर स्वर्गात जाईन की नरकात हे मात्र मला माहित नाही.किंवा कुणा दुसर्‍याची कुडीत जन्म घेईन किंवा कसं.किंवा नष्ट होऊन राख आणि मातीच्या रुपात निघून जाईन.पण एव्हडं मात्र नक्की त्यानंतर “मी” नसणार,कारण माझं शरिर,मन,आणि माझ्या स्मृति काय ते मला माहित झालं आहे.काहीही होवो,कसलाही माझा जीव असो,ज्याला रुढ अर्थाने आपण”अहम” म्हणतो किंवा ज्याला आपलं “मीपण”म्हणतो ते दारूण क्षणभंगूर असतं,ते कालांतराने संपूर्णपणे व्यतीत होतं. कुणाचं तरी स्वप्न असावं जणूं.”
“मला तुम्हाला कॉम्प्लीमेंट्स देण्याच्या दृष्टीने म्हणायचं होतं.आपण दीर्घायुषी व्हावं असंच मी देवाला म्हणेन.”
माझं हे ऐकून माधव जे मला सांगायला लागले ते त्यांचं सांगणं ऐकून घेणं मला क्रमप्राप्तच होतं.कारण प्रो.देसायांची सांगण्याची लकब,ऐकणारी व्यक्ति ही जणू आपला विद्यार्थी आहे,असं समजून विषयाला धरून सांगोपांग अर्थ विशद करण्याची हातोटी हे सर्व गूण ह्यांच्यात उतरले होते.भाऊसाहेब सुद्धा मला हाताने खुणवून ते काय म्हणतात ते शांतपणे ऐकण्याचा इशारा देत होते.
माधव म्हणाले,
“प्रत्येकाला माहित आहे की,जीवन हे एका क्षणात झालेलं असतं,ज्याला सुरवात, मध्य आणि शेवट आहे.माझ्या तरूण वयात मला वाटायचं,की जीवानाला अंत आहे. पण ही निकृष्ट निंदेची उपधी मला लागू आहे असं वाटत नसायचं.
पण ज्यावेळी मला एक असाध्य रोगाची बाधा झाली आहे हे कळलं तेव्हा मी चांगलाच बदललो.असं मला वाटतं. मनोवैज्ञानीक,तत्वज्ञ आणि कलाकारानी हजारो वर्षे चिंतन करून मृत्युची ही एक चिंताजनक मर्यादा आपल्या आकांक्षां समोर आणि आपल्या यत्ना समोर आणून ठेवली आहे.”
मी त्यांना मधेच रोखत म्हणालो,
“म्हणजे आयुष्यात एखादा टर्निंग-पॉइंट आला की मग माणसाचे विचार बदलतात असं वाटतं.”
“हो तुम्ही अगदी बरोबर बोललां”
असं म्हणत माधव पूढे सांगू लागले,
“मी ज्यावेळी तरूण होतो,तन्दुरूस्त होतो,साहसी होतो आणि चिरस्थायित्वावर विश्वास ठेवायचो आणि त्यावेळी जसं प्रफुल्लीत वाटायचं त्यापेक्षां आता कमी वाटायला लागलं असून, मृत्यु माझ्या सानिध्यात आहे हे जास्त भासायला लागलंय.

त्या माझ्या प्रफुल्लीत तारूण्यात जीवन मला कमी मोहक वाटत नव्हतं.ते आता वाटायला लागलं आहे. कारण माझीच कमजोरी माझ्या जवळच बसून असते. जरी माझी मी धारणा बदलली तरी माझं जीवन मला कमी किमतीचं भासत नाही. आत्ताच तर माझ्या शांती आणि खुशीवर उदासिनतेच्या रंगाची छटा आली आहे त्या उदासिनतेबद्दल माहिती असण्याची पूर्वी मला गरज भासली नाही,आणि माहिती करून घेण्याची आवशक्यता ही नव्हती. जीवन जगण्यात माझी भुमिका त्या ऋतुमधे येणार्‍या फुलांसारखी आहे मोसम संपल्यावर नव्या फुलांना वाट करून द्यावी तशी.तरी पण मला सोडून जावसं वाटत नाही.”
त्यांचे हे विचार ऐकून मला जरा त्यांच्या चिंतनात स्वारस्य घ्यावंसं वाटलं.मी त्यांना म्हणालो,
“तुम्ही फारच छान सांगता.तुम्हा दोघा भावामधे ह्या बाबतीत तरी काही फरक वाटत नाही.तुमच्याकडून आणखी ऐकावं असं वाटतं.”
मी असं म्हणण्याचीच फुरसद त्यांना हवी होती.
लागलीच माधव म्हणाले,
धारणा असणं ही एक गमतीदार गोष्ट आहे.तो सत्याचा स्विकार असतो.सत्य किंवा मत यांच्या निश्चिततेचा तो आभास असतो.इथे सत्य स्विकारणं महत्वपूर्ण आहे.मला वाटतं ही स्विकाराची वृत्तीच मला बदलूं शकली. अदृश्य होण्याच्या किंवा नष्ट होण्याच्या स्थिती जवळ मी येऊन ठेपलो असताना तसं होणार हे मी आता मानायला लागलो आहे. नष्ट होणं हा प्रस्थापित विचार आता मी नीष्टा राखून स्विकारायला लागलो आहे. ते सत्य मी स्विकारायला लागल्याने ते सत्य आता माझ्या धारणेचा आधारस्तंभ झाला आहे.”
भाऊसाहेब मधेच म्हणाले,
“अरे माधव,पण मला एक आठवतं की निसर्ग विनाशाबरोबर उत्पतीची पण सांगड घालीत असतो.” असं तुच एकदा म्हणाला होतास.”
“अजुनही मी तेच म्हणतो.”
असं म्हणत माधव पुढे म्हणाले,
“त्यामुळेच ह्या धारणेविषयी मी क्षणोक्षणी जास्त अभिज्ञ राहिलो आहे की जेव्हडा मी पूर्वी नव्हतो. मृत्युच्या निश्चिततेच्या अभिज्ञतेमुळे ते क्षण काही जास्त म्रुदु झाले अशातला भाग नाही.परंतु,त्यामुळे मला नसण्यापेक्षां असण्यावर जास्त लक्ष केंद्रित करायला सहाय्य मिळालं.मृत्युबद्दल मिळालेल्या बोधाने माझं जीवन सुखकर झालं नाही.परंतु,त्याने मला स्मरण करून दिलं आहे की हा मृदु श्वास किंवा ही पावसाची सर,हे प्रेमाचं अलिंगन,ह्या किरंगळीतल्या वेदना ही सर्व माझी सदासर्वदाची अनुभूति आहे.मृत्यु मला असं स्मरण देतो की-
” हे जीवन इरादा ठेऊन सर्वांना शिकवतं, काय तर -जग.ह्या क्षणी आणि क्षणोक्षणी.”
मनात मी म्हणालो,
“जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, April 15, 2009

“गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान”

पूर्वी होकाल(नवरी) कोकणातून मुंबईला जाताना बंदरावरून पडावातून जाऊन आगबोटीत बसायची.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला बंदरावर म्हणायचा,

“गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान”
(चाल:- गो चेडवाsss, पडावाssतून आगबोटीत जपाssन)

आता मुंबईहून अमेरिकेत जाणारी तिच होकाल मोटारीतून उतरून विमानात जाऊन बसते.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला विमान-तळावर म्हणतो,

गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
घो तुझो र्‍हंवतां बॉस्टनच्या चाळीत
ते का गो,कसला ‘घो’ पान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान



थैसरल्या जीवनात मोटारच साधान
सीटबेल्ट लावून बस चांगला पसरान
पायी,पायी चालूचा आता जा विसरान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


हाटेलात गेलंस मगे फास्ट फूड खाशीत
हॉटडॉग,बरगर तू सपाटून चापशीत
वजन तुझा वाढतालाच, जा असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान



थंय सगळे असतले कामात अडकान
वेळ नाय जाणा म्हणून म्हणशीत बोलान
गजाली मारूक कोणच नाय आयच्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


घो गेलो सकाळी की येतोलो रातचान
दिवसभर टिव्ही बघून जातलंस कंटाळान
मग म्हणशीत कंटाळलंय नको ह्या जीवान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


शनिवार-आयतवार ये मग फिरान
घो तुका नेतलो मॉल बघूक अलिशान
श्रीमंती देशाची बघ उघड्या डोळ्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


शेवटचा सांगतय नीट घे ऐकान
लवकरात लवकर जा होऊन पोटाच्यान
वेळ जावूक साधन! घे असां समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, April 13, 2009

एकाच रंगातून मिळणारी भरपूर समझ-ऊन्हाचा चष्मा.

काही लोकांचं जीवनच दुःखदायी असतं.बरेच वेळां त्याना वाटत असतं की आपण दुःख घेऊनच जन्माला आलो आहो.माझा चुलत भाऊ गिरीश ह्याचं जीवन काहीसं असंच आहे.आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात बिचार्‍याची दहा वर्षाची मुलगी एका अपघातात गेली.त्याच्याच हलगर्जीपणामुळे वीणा गेली हे त्याच्या मनाला लागलं होतं.वीणा गेल्याचा धक्का गिरीशला एव्हडा बसला की त्याला जीवनच नकोसं झालं होतं.पण निसर्गाची गंमत आहे बघा.निर्मीती ही निसर्गाची आवश्यक जरूरी असल्याने जीवनाचा र्‍हास होणे त्याला न लगे.

म्हणून कुणाचाही सहजासहजी मृत्युला मिठीमारण्याचा प्रयास निसर्गच उधळून लावतो.जसजसे दिवस जाऊ लागले तसतसं गिरीश आपल्या जीवनात जगण्याचे मार्ग शोधू लागला.अगदी साधीशी गोष्ट माझ्या नजरेतून त्यावेळी सुटली नाही ती म्हणजे आता तो सर्रास ऊन्हाचा चष्मा वापरायला लागला. त्या ऊन्हाच्या चष्म्याशिवाय कुणाच्या नजरेत नजर घालून बघण्याचं तो टाळीत होता.असं करण्याने त्याचे रोजचे व्यवहार जर का शाबूत ठेवून त्याला जगता आलं तर कुणाचं काय जाणार?असं माझ्या मनात आलं.
माझे आणि गिरीशचे संबंध भावाच्या नात्यापेक्षा मित्राच्या नात्याने जवळकीचे होते.त्यामुळे तो मला आपली सुखदुःख उघड्या मनाने सांगत असे.मीहून त्याच्याकडे विषय काढला नाही.त्याने आपणहून आपल्या भावनांना-स्टीमआऊट- करण्याच्या उद्देशाने मला एकदा तो म्हणाला,
“माझे डोळे नुसतेच बुबूळापुरते न झांकता पूर्ण डोळे झांकले जातील असा माझा गॉगल-सनग्लासीस-हा माझं नुसतंच उन्हापासून रक्षण करण्यासाठी नव्हता तर -गेल्या वर्षभरात मी पाहिलं आहे की- तो माझं पान्डित्य प्रदर्शित करीत होता.”
मी त्याला म्हणालो,
“गिरीश,तू दिवसभर हा ऊन्हाचा चष्मा वापरतोस ते पाहून मला राहून राहून वाटायचं की असं करण्यामागे वीणाचं अकालनीय जाणं हे असावं,आणि हे माझ्या केव्हांच लक्षात आलं होतं.परंतु,त्याच्या मागे तुझा उद्देश काय आहे ह्याच्याबद्दल मी जास्त विचार केला नाही.तो चष्मा तुला आवडतो,किंवा काही लोक एक फॅशन म्हणून वापरतात तसा काही तुझा स्वभाव नाही.पण कधीतरी तू मला त्याचं खरं कारण सांगशील याची मला खात्री होती.आणि कुठलीही गोष्ट तू विचारपूर्वक करतोस हे पण मला माहित होतं.तसंच माझ्या आणि तुझ्या विचारात खोलवर साम्य नसलं तरी कारणात साम्य असावं ह्याची मला खात्री होती.”
वीणाच्या जाण्याची आठवण करून दिल्यावर त्याला निदान मी तरी त्याच्याशी एकाच फ्रिक्वेन्सीवर आहे हे पाहून बरं वाटलं.

मला म्हणाला,
“माझी एकुलती एक मुलगी वीणा गेल्यापासून माझं आचरण आणि माझे विचार-मति- अस्तव्यस्त झाली होती.आणि साधा उन्हाचा रंगीत चष्मा डोळ्यावर लावून सर्वच गोष्टी एका रंगाखाली आल्या होत्या.
मी हा चष्मा उन्हासाठी किंवा बचावासाठी वापरून मनातल्या संवेदनाना बाधा आणीत नव्हतो.
जीवनातले सूक्ष्म कंगोरे जे मी संवारले होते त्यांच्याबद्दल माझी त्यांच्याकडे पहाण्याची- अवलोकनाची- नवी शैली म्हणून त्याचा उपयोग करीत होतो.माझ्या संवेदनाना नवीन आकार,ध्वनी, आणि रंग त्या चष्म्यामधून उभारून आला होता. नेहमीचंच पहाण्यात परिचित झालेल्या माझ्या डोळ्यावर अवलंबून राहाण्या ऐवजी मला निराळी दृष्टी अवगत करता आली. पलिकडल्या व्यक्तिविषयी अकथित अर्थ लावायला आपण आपल्या संवेदनामधून आपल्यालाच विनंती करीत असतो.
जीवन ह्याच रंगीत गुलाबी दृष्टीतून दाखवतं की, मृत्यू नुसताच जवळून निसटून जात नाही तर तो त्या व्यक्तिला स्तब्ध करतो-रोखून ठेवतो.”
मी त्याला मधेच थांबवून म्हणालो,
“गिरीश,मी तुला खरं सांगू का,होणारी गोष्ट होऊन जाते.मागे राहाणार्‍याला खचीतच जीवन जगण्यासाठी आपल्या मनाची समझ करून घ्यावी लागते.आणि तसं करीत असताना कशावर तरी श्रद्धा ठेऊन जगावं लागतं.तुला तसं नाही का वाटत?”

“हो मला तसंच काहीसं वाटतं”
असं म्हणत गिरीश पुढे सांगू लागला,
“मी समजलो होतो की जे काही मी अनुभवत आहे त्याचा केंद्रबिंदु माझी मुलगी- वीणा- आहे.
ती होती त्यावेळेला जसे मी कपडे चढवत होतो तसेच आताही चढवतो.तिला जसं मी गुडनाईट म्हणायचो तसंच आताही इतराना म्हणतो.तिला घेऊन त्या पांढर्‍या बगळ्यांच्या रांगा जशा निळ्या आकाशात दिसत होत्या तशा आताही दिसत असतात.
त्या ऊन्हाच्या चष्म्याने मला समझ आणण्यासाठी मदत केली ती अशी की निष्कपट आणि संकीर्णपणा कसलाच दृष्टांत दाखवित नाहीत असं सांगण्यासाठी. आणि खरोखर एक गोष्ट माझ्या लक्षांत आली की श्रद्धा डोळ्यांना दिसत नाही ती एक मनोदशा असते आणि ती श्रद्धाळूंची मार्गदर्शिका असते. त्या चष्म्यात एक अदृष्य संतुलन आहे की त्यामुळे मला एक गोष्ट समजायला समर्थन मिळालं की ह्या जगात प्रत्येक जण एकेमेकाशी संबंधीत असून हरएक तत्वाने एकमेकाशी जखडलेले आहेत.”
हे ऐकून मला खूपच बरं वाटलं होतं.निदान गिरीशला हळू हळू जीवनात रस आहे असं वाटू लागलं होतं. आणि हीच तर निसर्गाची खूबी आहे की जशी वेळ निघून जाते तशी दुःखावर आवर येऊन माणूस कसंतरी जगायला धडपड करीत राहतो. त्यानंतर तो जे काही मला सांगू लागला त्याने माझी खात्री झाली की,
“पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा”
गिरीशने कशी आपली समजूत करून घेतली हे मला ऐकावसं वाटलं.
तो म्हणाला,
सगळंच-लोक,स्थानं,संगीत- हे सर्व निरनीराळ्या रुपातल्या परछाया आहेत आणि हरएक सांगतात की जीवनात प्रयास करीत रहावं कारण प्रत्येकाची जीवन जगण्याचा समय ही एक मोजकी संख्या आहे.
मी खरोखरंच एक मुख्य गोष्ट माझ्या ऊन्हाच्या चष्म्यातून पाहिली की शब्द बोलले जावो तसंच क्षण,आणि लोक निघून जावो ते कधीच व्यतीत होत नाहीत.ते तिथेच असतात,फक्त मागे ऐकून किंवा पाहून झाल्यावर जरा निराळे दिसतात. आपण सगळे फक्त अपरिवर्तनशील श्वास आहोत आणि मार्गस्थ असतो.हे मी खरंच पडताळलंय आणि असं मानतो की वीणा अजून इथेच आहे,फक्त ती भिन्न आहे.
मी त्याला म्हणालो,
“खरंच,एव्हडासा तो उन्हाचा चष्मा पण त्या रंगीत चष्मातून तू जी काही समझ करून घेतलीस ते ऐकून मला फार बरं वाटलं.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, April 11, 2009

कृतज्ञतेवर माझा विश्वास आहे.

आज मी व प्रो.देसाई आमच्या एका सामूहिक मित्राच्या घरी गेलो होतो.खरं तर हा आमचा मित्र आता ह्या जगात नव्हता.पण त्याची एकूलतीएक मुलगी त्या घरात राहात होती.तिलाच भेटायला म्हणून गेलो होतो.

अलिकडे आमचा हा मित्र-अनिल धायगुडे- वरचेवर आजारी पडायचा.आता वयोमानामुळे आजार येत राहणं क्रमपात्र होतं,पण अनिलला जरा जास्तच त्रास होत होता.मुळात त्याला मधूमेहाची बाधा होती.हा छूपा रोग एव्हडा भयंकर आहे की तो सर्व शरिर निरनीराळ्या कारणानी खाऊन टाकतो.आणि बरेचवेळां स्थूल शरिरयष्टी असली की मधूमेहाचा शिरकाव हटकून होतो.

तशात त्याच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या.त्याशिवाय त्याच्या किडण्यापण नीट काम करीत नव्हत्या.
असं असतानाही तो एका अर्थी नशिबवान समजला पाहिजे. जाण्यापूर्वी त्याला त्याच्या नातीचं तोंड बघायला मिळालं. आपल्याच नातवंडाकडून आजोबा म्हणून घेण्याची त्याला फार इच्छा होती.
त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या मुलीने- मृदुलाने- आमचं स्वागत केलं.
अनिलच्या आजाराच्या संदर्भाने ती बोलल्याचं मला आठवतं,
“माझ्या बाबांना जरी रोगांनी पछाडलं होतं तरी पहिलं नातवंड बघण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाल्याचं पाहून त्यांच्या मनाला समाधान मिळालं होतं.कुठच्याही आईवडीलाना नातवंडाची इच्छापूर्ती होण्यासाठी कसलाही आजार सहन करण्याची तयारी असणं स्वाभाविक आहे.”
मी मृदुलला म्हणालो,
“मला आठवतं,त्याच्या बरोबर मी एका फर्निचरच्या दुकानात जाऊन सुंदर पाळणा विकत घेतला होता.तो घरी आणून त्याने लागलीच ऍसेंबल केला होता.”
हे ऐकल्यावर मृदूल पटकन म्हणाली,
“मी त्यांची ती पाळणा ठिकठाक करण्याची धडपड पाहून त्यांना म्हणाले होते,
”बाबा तुम्ही तुमच्या नातीला ह्या पाळण्यात झोपलेली पाहून खूपच खूष दिसता. पण असा विचार करा की अलिकडच्या तुमच्या जीवघेण्या आजारातून वाचण्यासाठी आणि त्यातून बरं होण्यासाठी तुम्ही केलेली धडपड आज नातीचं तोंड पाहून पूर्ण फळाला आली.असं नाही का तुम्हाला वाटत.?
त्यावर मला माझे बाबा म्हणाले ते मला अजून आठवतं,
” तिच्यासाठी मी त्या दुखण्यातून परत जायला तयार आहे”
प्रो.देसाई तिला म्हणाले,
” मला वाटतं,त्याला एक प्रकारची कृतज्ञता वाटत होती की ही इवलीशी बेबी त्याला पहायला मिळाली. आणि तिच्यासाठी तो जगू शकला.आणि त्यासाठी तो किती ही कष्ट झेलायला तयार होता.”
“ती वर्षाची झाल्यावर तो गेला असेल नाही का?”
मी मृदुलला विचारलं.
ती म्हणाली,
“हो ती वर्षाची झाल्यावर ते गेले.पण माझे बाबा त्यांच्या इच्छेनुसार गेले.ते आजारात ताटकळत राहिले नाहीत,आणि त्यांना कसल्या वेदनापण सहन कराव्या लागल्या नाहीत.त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं त्यांच्या अवतिभवती होती.आणि ते पण त्यां सर्वांवर प्रेम करायचे.”
मी मृदुलला म्हणालो,
“त्याच्या जाण्याने तुला खूपच शॉक बसला असेल.कारण तू त्यांची खूप आवडती होतीस.”डॅडीझ गर्ल” नव्हे काय?”
त्यावर ती म्हणाली,
“सुरवातीला मिळालेला दुःखाचा धक्का ओसरल्यावर, मी हळू हळू नेहमीच्या कामात ध्यान देऊ लागली. पण त्याने मला बरोबर वाटत नव्हतं.कारण भरपूर असं वाईट वाटत नव्हतं.मी त्यांच्या जाण्याच्या दुःखाने उजाडून जाईन अशी माझी अपेक्षा होती.तुम्ही म्हणता तशी मी”डॅडीझ गर्ल “होती.माझ्या नजरेत “त्यांच्याकडून कधीही चूक होणे नाही.”आणि शिवाय माझ्यासाठी त्यांच्या मनात गहरी समज होती.माझ्या मनोमनी होतं की सदैव मी त्यांच्यावर निर्भर होते, त्यांच्या मदतीसाठी, किंवा त्यांच्याकडून मिळणार्‍या करुणामय ध्यानासाठी.”
भाऊसाहेब म्हणाले,
“मला आठवतं तू काही दिवस तांबेगुरुजींचा सल्ला घेण्यासाठी येत होतीस,मला तू तिथे भेटायचीस.त्याचं काय झालं?”
भाऊसाहेबांना चांगलंच आठवतं ते लक्षात येऊन ती म्हणाली,
“हो तुम्ही तिकडे मला भेटायचा ते मला आठवतं. जोरदार दुःखाच्या धक्क्याच्या आभावी माझ्या मी मला भयानक अपराधी समजायला लागले. म्हणून मी गुरुजींचा सल्ला घ्यायला जायची.पण त्यानी जे मला सांगितलं त्याचं आश्चर्यच वाटलं.
गुरूजी म्हणाले,
“माझं ते दुःख ही एक सर्वसाधारण प्रतिक्रिया होती.ज्या कुणाशी चांगले संबंध असतात त्यांची अशीच प्रतिक्रिया असते.”
“आणि पुढे जाऊन गुरूजी म्हणाले,
ज्या संबंधांमुळे शब्द निःशब्द होऊन रहातात,आणि आकांक्षा अधुर्‍या रहातात ते संबंध वादळी विसंबंधन आणून जहरी दुःखाला निमंत्रीत करतात.एखाद्याचा मृत्यु झाल्यानंतर अचानक कसलीच सुधारणा होऊ शकत नाही.मग आपल्याला आपल्या संबंधातला दुरावा आणि त्याचं विभेदन दुसर्‍या कसल्याही प्रकारापेक्षा तीव्रतेने जाणवतं “
मी मृदुलाला म्हणालो,
“हे गुरुजींचे सुविचार ऐकून तुझ्यावर काय परिणाम झाला?”
ती म्हणाली,
“तत्तकाळ मी जे भाकीत करीत होते त्यापेक्षा काहिसं प्रबळ वाटायला लागलं. आणि ते भाकीत म्हणजे कृतज्ञता.
मी कशासाठी कृतज्ञ असावं?माझ्या बाबांचा विचार केला तर त्यांच्याबद्दल कसल्याही वाईट स्मृतिंचा पगडा माझ्या मनावर नव्हता.
त्यांनी कसलाही पक्षपात केला नव्हता,नव्हेतर प्रेम आणि शब्दपण रोखून ठेवले नव्हते. साध्या साध्या गोष्टीवर ते त्यांचं ध्यान केद्रीत करायचे नव्हेतर ज्या गोष्टी साध्या भासायाच्या त्यावर ते भान केंद्रीत करायचे,जश्या कुटूंब, शिक्षण ,मेहनत,सहनशीलता.
ह्या गोष्टीवर ते ध्यान ठेवायचे आणि ह्या गोष्टी अध्यारत आहेत असं ते कधीही मानत नव्हते.

एखादी व्यक्ति आपल्या अख्या जीवनाची संरचना आपल्या प्रेमळ व्यक्तिच्या हानिच्या धक्क्यापासून मुक्त ठेऊ शकते,आणि तिथपर्यंत पोहोंचण्याचं टाळू शकते. हे बघून मी मला भाग्यवान समजते.”
बराच वेळ गप्प बसून एकणारे भाऊसाहेब बोलते झाले.म्हणाले,
“ह्याचा अर्थ मृदुला,कृतज्ञता ही आनंददायी आणि मुक्त करणारी आहे.त्यावर माणसाचा विश्वास हवा.”
मृदुलेला ते ऐकून सतर्क व्हायला संधी मिळाली. आणि म्हणाली,
“माझ्या बाबांनी मला जे काय केलं त्याची मी निश्चितच परतफेड करू शकत नाही.पण मी एका गोष्टीचा दिलासा घेऊ शकते की त्यांच्याकडून मिळालेलं खरं इनाम म्हणजे त्यांनी मला जे काही दिलं ते परतफेडीची अपेक्षा न ठेवता दिलं.मी कृतज्ञ होऊन सांगेन की माझ्या बाबांची स्मृति मी कोणत्याही तर्‍हेचं दुःख मनात न ठेवता अनुभवते.
रोज मी खरी उदासिनता अनुभवते,जास्त करून जेव्हा मी माझी मुलगी वाढत असताना पाहून.आणि मनोमन विचार करते माझे बाबा हे अनुभवायला हयात असायला हवे होते. पण ह्या विचाराबरोबर कृतज्ञतेचा विचार येऊन मनात येतं,की शेवटचं आणि कदाचीत अत्युतम इनाम आईवडील आपल्या मुलांना देतात ते म्हणजे-पराधीन न रहाता पूढे जाण्याची क्षमता.





श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, April 9, 2009

कांद्दाची भजी.

ज्याला आपण कांद्दाची भजी म्हणतो त्याची रुचिदार चव कुणाला माहित नसेल असं वाटत नाही.एव्हडं काय आहे त्या भज्यात?असं कुणी विचारलं तर काय सांगणार?.कुणी विचारतं की ही भजी क्षुधावर्धक आहेत का?की कुणी विचारतं ही भजी खाऊन पोट भरता येतं का? तर काय सांगायचं.?
कांद्दाची भजी म्हटलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं.काही लोक मात्र तेलकट-तूपकट अश्या अर्थाने भज्यांकडे पाहून खायाला नाकं मुरडतात.
“नसेल खायची तर खायची जबरदस्ती करूं नका” असं कोणी गंमतीत सांगतं.
“उरली तर आम्ही फस्ता पाडायला तयार आहो” असं कुणी म्हणतं.
पण जर का कुणी आग्रहास्तव ही कांद्दाची भजी खाल्ली तर त्यांचा आशाभंग मुळीच होत नाही.ह्या भज्यांचा प्रकारांचा कोकणात,घाटावर नव्हे तर आता देशभर प्रसार झाला आहे.आता जो तो आपआपल्या पद्धतीत भजी बनवतो म्हणा. कोकणात श्रावणातल्या सरी वर सरी यायला लागल्या आणि बाहेर कुंद वातावरण पाहून गरम गरम कपभर चहाबरोबर कांद्दाची भजी खाण्यातली लिज्जत निराळीच म्हणावी लागते.

कांद्दाची भजी खायला घेतल्यावर एक एक भजा बरोबर कुणाची भजी करण्याची कशी पद्धत तर कुणाची कशी यावर चर्चा टाळता येत नाही.विषेश करून जमलेल्या स्त्री वर्गाची त्याबद्दलची चर्चा. कोकणातली कांद्दाची भजी,घाटावरची पद्धत,तर गुजराथमधली भजीया तर वर उत्तरेला म्हणतात ते पकोडे ह्या सर्वांची पाक-विधि- रेसीपी- चर्चीली गेली तर नवल नाही. भजाच्या नांवावर भजी केली गेली तरी बट्याट्याची भजी,उडीद डाळीची भजी,मेथीची भजी,तिखट मिरची घालून केलेली भजी,कच्च्या केळ्याची भजी आणखी असले किती ही प्रकार असले तरी कांद्दाची भजी ही सगळ्यात विरळी.कांद्दांच्या भजाची चव जशी विरळी तसा त्याचा खमंग वास ही विरळा.भजी तळली जात असताना,त्याचा पसरलेला वास कुणी लपवू शकणार नाही.

भज्याच्या प्रस्तावनेची ही जी जरूरी भासली त्याचं कारण अलिकडेच माझ्या दोन मामे बहिणी रेवती आणि यशोधरा आमच्याकडे राहायला आल्या होत्या.
दोघीही आलटून पालटून आपल्या लहानपणाचा भज्याचा किस्सा सांगत होत्या.
” आमच्या आजीचा ही कांद्दाची भजी करण्याचा हातोटा होता.त्याची आठवण येते. पण त्यावर आम्हाला त्या लहान वयात ते सगळं समजून घ्यायला जरा कठीणच प्रयास होता.पाकशास्त्रात यशस्वी व्हायला लागणारी वेळ देणं आणि यश मिळवीणं हे जरा जिकीरीचं होतं.पण आमच्या आईकडून आयतं खायायला मिळत असल्याने आम्ही मोठी होई तो त्याचं स्वारस्य घ्यायला जरा आमच्याकडून कुचराईच झाली. आता ती कांद्दाच्या भजाची रेसिपी एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरीत होत असताना एकाएकी आमच्यावर त्याची जबाबदारी आली.

ह्या वेळी श्रावणात आम्ही जेव्हा कोकणातल्या ट्रीपमधे एकत्र आलो तेव्हा आम्ही ठरवलं की आम्ही तो भजी कार्यक्रम आपल्या हाताने पार पाडावा.
आमच्या भावना संमिश्र होत्या.पण त्या भावना महत्वाच्या होत्या ह्याची आम्हाला जाणीव होती.
किंबहूना तसं वाटणं आवश्यक होतं.जेव्हा मशाल हस्तांतरीत होते त्यवेळी ती पुढे नेत गेलं नाही तर ती विझून जाण्याचा संभव असतो.ही जबाबदारी आम्हाला ठाऊक होती.भजी तयार करण्याच्या कारागीरीचं कौशल्य आणि त्याचं मौल्य आमच्या आजीपासून पिढीजात आहे हे आम्हाला समजत होतं.

माझी आई ही भजी करीत असताना आम्ही किती वेळा ते निक्षून पहात होतो. त्याची गणती करणं कठीण आहे.पण आता आम्हाला आश्चर्य वाटतं की ती कांद्दाची भजी तळून झाल्यावर गरम गरम खाताना कुरकुरीत वाटायला आणि चवीला रुचीदार वाटायला किती मेहनत ती घ्यायची.

ती पिवळीजर्द चण्याची डाळ ताजी दळून आणल्यावर त्याचं पीठ-बेसन- ठराविक भांड्यात घेऊन त्यात तो ताजा बनवलेला गरम मसाला ज्यात इतकी इतकी लवंग,मीरी,दालचिनी,धणे,सुक्या मिरच्या,बडिशोप, मेथी,तीळ घालून मंद विस्तवावर भाजून बनवलेली ताजी मसाला पूड,तो लाल रंगाचा कांदा उभा चिरून त्याला मीठ लावून कांद्दाला पाणी सुटूं देऊन मग त्यात ते ताजं बेसन घालून त्यात किसलेलं आलं, कोथिंबीर बारीक चिरून,लसूण ठेचून नंतर हळद तिखट घालून ते मिश्रण जमल्यास त्याच कांद्दाल्या सुटलेल्या पाण्यात मुरूं द्दायचं.आणि थोडा अवसर घेऊन मग तेलाला ठरावीक तापमान आल्यावर ते भजाचं मिश्रण मुठीत घेऊन मुठ हलवीत हलवीत तेलावर मिश्रण सोडून देत लालसर रंग आल्यावर भजी तेलातून झार्‍याने काढून घेऊन जरा थंड होऊ दिल्यावर कुरकुरीत होतात.
किती वेळां आमची आई असं करताना आम्ही पाहिलंय.पण आता वाटतं भजी करण्यात कोणताही बिघाड न होता प्रत्येक वेळी ती हे कसं करायची?तो एव्हडा लाल कांदा उभा चिरताना डोळ्यात पाणी न आणता ती कसं करायची?
आता कसंतरी,आम्ही संभाळून घेतो.डोळ्यातून पाणी नंतर येतं.

आईच्या डोळ्यात जेव्हा मोतीबिंदू पडलं आणि त्यानंतर तिचं ऑपरेशन झाल्यावर आमचे बाबा तिला कांदा चिरून द्दायचे.आता बाबा जाऊन एक वर्ष होऊन गेलं. आई जाऊन चार वर्ष झाली.वेळेचं ध्यान रहात नाही.जणू आमचं ह्रुदय घड्याळाच्या टिकटिक बरोबर संधान ठेवीत नसावं.आम्ही दोघीही आईबाबा शिवाय जगत आहो याची मनात संकल्पना करतो.ह्या आईबाबाशिवाय रहाण्याच्या संकल्पनेवर कुणी काही लिहिलं असेल काय हे पहाण्यासाठी आम्ही दोघीनी लायब्रर्‍या धुंडाळल्या.पण कुणीही पोक्त मुलांच्या वयस्कर आईवडीलांच्या नसण्याने आलेल्या त्या दुःखावर काही लिहिलेलं आढळलं नाही.

त्यांच्याआठवणी येतात.त्यांचे उद्गार आठवतात.त्यांचं प्रेम आठवतं,त्यांच्या शब्दांच्या पलिकडचे अर्थ आठवतात, त्यांचे आदर्श आणि त्यांच्या पाक-विधि आठवतात. अशा तर्‍हेने त्यांच्या समिप राहाण्याचा हा आमचा प्रयत्न म्हणा वाटलं तर.पण हे परिश्रम थोडे का होईना प्रतिकूल असले तरी उपयोगात आहेत.जे होतं ते परत आणीत नसलं तरी ते आम्हाला त्यांच्याजवळ आणतं.आणि आम्हाला वाटतं, ह्याच पद्धतिने आम्ही त्यांच्याशी संबंधात राहतो. हे आमचं ऐकून काहिना जरा विक्षिप्त वाटेल,किंवा असुखद वाटेल ज्यांची अशी हानि झाली नाही त्यांनाही असं विक्षिप्त वाटेल.आम्ही तेही समजूं शकतो.हा एक जीवन-चक्राचा भाग म्हणून साधारणशी उक्ति आहे असं वाटेल, अनिवार्य किंवा नैसर्गीक वाटेल.पण आपल्या मनाला हे तर्क-शास्त्र समजत नाही. बुद्धितः ते समजण्यासारखं आहे.तरी सुद्धा मनोभावनाना संतुष्ट करायला अशा तर्‍हेची हानि बरेच वेळा निःशब्द आणि दृष्टिपासून गोपनिय असते.आणि ह्या मनोभावना पाककृतीमधली साधी अनपेक्षित सामुग्री आणि त्यामधलं प्रेम यामधे कुठे तरी निगडीत असतात.”
मी मनात म्हणालो,
“साधी कांद्दाची भजी ती काय आणि ह्या माझ्या बहिणीनी त्याचा केव्हडा वास्तविक विषय केला.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, April 7, 2009

यमदुता कधी रे नेशिल तूं?

सत्येंद्र आजगांवकर म्हणजेच डॉक्टर बंडूमामा.माझ्या आईचा चुलत भाऊ.आईला सख्खे भाऊ नव्हते.बंडूमामा उंच,गहूवर्णी आणि लाघवी स्वभावाचा.मधूनच एक नाकाची पुडी दाबून दुसऱ्या नाकपुडीतून “सॉक,सॉक “असा आवाज काढायची संवय त्याला जडली होती. बंडूमामाची हजेरी त्यावरून ओळखावी.बंडूमामाची घरची गर्भश्रीमंती आणि घरच्या शैक्षणीक वातावरणाचा वारसा,यामुळे बंडूमामाला वैद्दकीय शिक्षण घेणं फारसं कठीण झालं नाही.शिक्षण पूरं झाल्यावर जे.जे. हॉस्पिटलमधे इंटरनशिप करीत असताना त्याला स्वतःलाच टी.बी.ची लागण झाली.
हे लक्षात येताच त्याला खूपच मानसिक धक्का बसला.त्याच हॉस्पिटलात तो ट्रिटमेंट घेऊ लागला.त्यावेळी या रोगावर जालीम असा उपाय उपलब्ध नव्हता. तरीपण स्वतः डॉक्टर असल्याने अर्ध्या आवश्यक गोष्टींची तो काळजी घेऊ शकल्याने हळू हळू बरा झाला.
आमच्या घरी तो “रिकव्हरी पिर्यड” मधे येऊन राहीला.माझ्या आईने त्याची खूप सेवा केली.हे अचानक आलेलं संकट त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळायला कारणीभूत झालं.त्याने लग्न न करण्याचं ठरवलं.पुन्हा त्याच्या डॉक्टरी शिक्षणाचा उपयोग त्याने करून घेतला.न जाणो ह्या रोगाने पुन्हा उचल खाल्ली तर त्याच्या बरोबर त्याच्या सहचरणीला आणि पुढे होणाऱ्या मुलाना नाहक क्लेश होऊ नये ह्या एक उदात्त विचाराने तो अविवाहित राहण्याच्या त्याच्या विचाराशी चिकटून राहिला.

आयुष्यात “टर्नींग पॉईंट्स “कसे येतात ते पहा.त्याच्या डॉक्टर ग्रुपमधल्या एका त्याच्या मित्र- डॉक्टरने सहज सुचना केली की,
“तू इकडे तिकडे डॉक्टरी व्यवसाय करण्या ऐवजी पांचगणीला एक टी.बी.स्यानीटोरीयम आहे.तिथे तूं इकडे तर व्यवसाय आणि इकडे तर तुझ्याच माहितीतला रोग असलेल्या रोग्याना उपाय आणि सुश्रुशा करण्याचे काम का घेत नाहीस?.नाहीतरी तुला संसार करायचा नाही,मग तिकडे तुला मिळेल तेव्हडा वेळ घालवून सेवेचे पुण्यपण मिळेल.”

हा त्याच्या मित्राचा सल्ला त्याला आवडला आणि त्या तयारीला तो लागला.त्या स्यानीटोरीयम मधे डॉक्टरांची पण जरूरी होती.पांचगणीला बंडूमामा स्थाईक झाल्याने मला सुद्धा एकदा त्याच्याकडे जायला मिळालं.

डोंगराच्या पायथ्याशी वाई गांव,डोंगर वर चढून गेल्यावर पांचगणीचे पठार आहे आणि वर चढत गेल्यास महाबळेश्वरचे थंड हवेचे ठिकाण आहे.पांचगणीपण खूप थंड असते. ब्रिटीशानी ही ठिकाणे शोधून काढून त्यांच्या सुट्टीतल्या आरामासाठी ती चांगलीच सोयीची केली होती. एका श्रीमंत पारशी गृहस्थ्याने पांचगणीला राहाण्यासाठी एक बंगला बांधला होता आणि त्याला व्यवसायासाठी मुंबईत रहावं लागायचं. त्यालाही उतारवयात टी.बी. झाला असताना त्याच्या डॉक्टरने त्याच्या पांचगणीच्या बंगल्यात राहाण्याचं सुचवलं होतं.त्यावेळीच त्याला स्यानीटोरीयम बांधण्याची कल्पना सुचली.असं मला तिकडच्या मुक्कामात राहिलो असताना कळलं.

त्याचं असं झालं,बंडूमामा तिथे असताना एका बिलीमोरीया नावाच्या श्रीमंत पार्श्याला पेशंट म्हणून ह्या स्यानीटोरीयम मधे उपायासाठी पाठवलं होतं.त्याची आणि बंडूमामाची चांगलीच दोस्ती जमली,इतकी की जेव्हा आणखी आराम मिळण्यासाठी त्या पारशाने इंग्लंडला थोडे दिवस वास्तव्य करण्याचं ठरवलं, त्यावेळी,
“तू पण माझ्या बरोबर माझा पर्सनल डॉक्टर म्हणून चल”
असं बंडूमामाला सांगितलं.त्यामुळे बंडूमामाला इंग्लंडला जायला मिळालं.मला आठवतं आम्ही त्याला सांताकृझ विमानतळावर पोहोचवायला गेलो होतो. आठवड्यातून त्यावेळी तिनदा इंग्लंडवरून फ्लाईट्स यायच्या जायच्या, आणि टर्मीनल कसलं अगदी विमानाला हात लावता येईल असा सेंन्डॉफ देता येत होता. जुन्या हिंदी सिनेमातला सीन डोळ्यासमोर जर आणला “सुनील दत्त इंग्लंडहून आल्यावर त्याला रीसीव्ह करायला हार घेवून वैजयंतीमाला उभी आहे ” असं आठवलं म्हणजे झालं.

तिकडून जाऊन आल्यावर बंडूमामाला बिलीमोरीयाने फोर्ट मधल्या बझारगेट स्ट्रीट्वर एक दवाखाना उघडून दिला.
आणि त्याच्या मागे त्याचाच एका चार मजली उंच इमारतीत अगदी वरच्या मजल्यावर एक फ्लॅट दिला.
बझारगेट वरचे भाजी विकणारे आणि काही गरिब विक्रिते डॉ.बंडूमामाचे कायमचे पेशन्ट झाले होते. “होटल मे खाना और मशिद मे सोना” हे जीवन जगत असताना अधून मधून तो आमच्याकडे रवीवारी दवाखाना बंद करून यायचा.
पुढे दिवस बदलू लागले.त्याच्या वयाला उतार येवू लागला.पुर्वी सारखा कामाचा रपाटा जमेना,हे कळू लागल्यावर बंडूमामाने आपला दवाखाना बंद केला. बिलीमोरीया पण निर्वतला. त्याच्या मुलांना पण जागा हवी होती.ह्या सगळ्यांचा विचार करून बंडूमामाने पण उर्वरीत आयुष्य कसं घालवावं याचा नीट विचार केला होता.बिचाऱ्याला बायका मुलं असती तर हा प्रश्न उद्भवला नसता.आणि तरुणपणी लग्न न करण्याच्या निर्णय घेताना एव्हडं दूरवर लक्षं कोण देतो म्हणा. त्यामुळे “आलिया भोगासी”करावं लागतंच.बंडूमामाची एक भाची मालाडला राहायची. तिची मुलं मोठी झाल्याने कामाधंद्दामुळे तिच्या पासून दूर राहायची.ती आणि तिचा नवरा दोघंच राहायची.त्यांच्याकडे तो राहायला गेला.पण जागेच्या आभावी झोपायला मात्र सामंत मास्तरांच्या गोरेगावातल्या संगीतशाळेत रात्रीचा जायचा.

सामंत मास्तरांचं आणि त्याच नात होतं.सामंत मास्तरांच्या वर्षातून एकदा होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या संगीताच्या जाहीर कार्यक्रमाला हटकून तो हजर राहायचा. मग त्यादिवशी कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला अक्षरशः अंग मेहनत आणि जरूर लागल्यास हात मेहनत पण करायचा.अशा प्रसंगी “डॉक्टरा,डॉक्टरा “असं ओरडून त्याला बोलावून लोक त्याची मदत घ्यायचे. “सॉक,सॉक”असा आवाज आल्यावर बंडूमामा आल्याचं कळायचं.

“दिवसा मागून दिवस चालले,ऋतुमागुनी ऋतू जीवलगा कधी रे येशील तूं”

हे आशाने गाईलेलं गाणं त्याला अतिप्रिय होतं.सामंत मास्तरांच्या प्रत्येक गुरुपौणीमेच्या संगीत कार्यक्रमाच्या दिवशी त्याची ह्या गाण्याची फर्माईश असायचीच. अलिकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला बंडूमामा हजेरी देवू शकला नाही.परंतु सामंत मास्तर मात्र बंडूमामाचे आवडतं गाणं कुणाला तरी त्याची आठवण म्हणून गायला लावतात.मालाडहून रात्री झोपायला संगीत शाळेत रोज यायचं त्याला आता जमत नव्हतं.
अलिकडेच मी त्याल भेटायला मालाडला गेलो होतो.मला म्हणाला,

“नाही रे मला,आता जमत, त्या स्टेशन वरच्या ब्रिजच्या पन्नास पन्नास पायऱ्या चढायला आणि उतरायला.वय आता ब्याएंशी झालं.खरं सांगु का तुला, आता नाही जगावंस वाटंत. भोगलं सगळं.आता फक्त यमदुताची वाट पहात आहे बघ.तो केव्हा नेईल असं झालंय”
ऐकून मला पण खूप वाईट वाटलं.माझ्या डोळ्यातून नॉनस्टॉप अश्रू वाहू लागले, कींव आली त्याची.

चेंज म्हणून मी रेडिओ चालू केला,आणि योगायोग असा रेडिओवर त्याच वेळी आशाचं गाणं लागलं होतं.
“दिवसा मागून दिवस चालले
ऋतु मागुनी ऋतु
जीवलगा कधी रे येशील तूं”

बंडूमामा ते गाणं ऐकत होता, की वार्धक्यात येणार्‍या डुलक्या काढत होता ते कळलं नाही.म्हणतात ना,माणसाला दोन मनं असतात,एक चांगलं आणि दुसरं वाईट विचार आणणारं,तसंच काहीसं माझं वाईट मन मला म्हणायला लागलं,
“दिवसा मागून दिवस चालले
ऋतू मागुनी ऋतू
यमदुता कधी रे नेशिल तू “

त्याचंच मन मला माझ्या मनातल्या गाण्यातून त्याच्याच इच्छेची जणू जाणीवच देत होतं.





श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, April 5, 2009

देवाने मुलींना असं का बनवलं?

(विडंबनाच्या विडंबनाचं विडंबन)
प्रेरणेतून प्रेरणा
मूळ कविता कुणा कवीची होती.फारच सुंदर कविता असावी. मुलीला पाहून ती आपली प्रेयसी व्हावी,असं कवीच्या मनात आलं असावं. परंतु,ती मात्र दुसर्‍यालाच निवडते असा काहीसा आशय त्या कवितेचा असावा.त्या कवितेचं विडंबन केलेली कविता माझ्या वाचनात आल्यावर,माझ्या मनात आलं की पुढे कधीतरी ती मुलगी कुणाची आई होणार मग ती आपली आई असावी असं वाटून त्या विडंबनाचं विडंबन केलं तर.?

देवाने मुलींना असं का बनवलं?
की बघताच ती मला आई सारखं वाटावं
सगळ्याच स्त्रीया मला आई सारख्या वाटतात
पण तिने कुणाही बाळाला मिठीत का घ्यावं?

कुणाचे डोळे,तर कुणाचे ओठ
प्रत्येकीचा काहीतरी वेगळाच गुण
प्रेमळ माझं मन,नाही आई म्हणत नाही
पहाताच तिला मन येतं भरून

कुणी हसून आपलंसं करतं
कुणी लाडावून हृदयाजवळ घेतं
प्रत्येकाची खूबी निराळीच असते
मग आपली आई कुठे आपलाजवळ उरते

कुणी अंगाई म्हणून झोपवतं
कुणी मांडीवर घेऊन शांत करतं
किती तर्‍हा झोपवण्याच्या असतात
मन हे वेडं प्रत्येक चेहर्‍यात फसतं

सगळ्याच आया कमाल करतात
नको नको म्हणताना खाऊ देतात
कुणा कुणाचा खाऊ घ्यावा
एकसाथ सर्व आया अंतराला भावतात


श्रीकृष्ण सामंत.(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, April 3, 2009

मी वर्तमानात रहात असतो.

” मी वर्तमानकाळात राहण्याचा प्रयत्न करतो.शुद्ध हवेची नेहमीच महक घेतो.माझ्या पत्नीबरोबर सकाळीच एक कप कॉफी झुरकण्यात मजा लुटतो.बागेतली पिवळी जर्द फुलपाखरं उडताना पाहून आनंदी होतो.”

काही व्यक्तींच्या नशीबात सदैव दुःखच असतं.अर्थात नेहमी सुखाचे दिवस मिळणं जरा अपवादात्मक आहे.पण जीवन जगायला सुखदुःखाची कमी अधिक प्रमाणात जरूरी भासते.होऊन गेलेल्या घटना आठवणीत आणून मन रिझवण्यात मजा येते. परंतु,काही घटना मनाला चटका लावून जातात.आणि त्यातही मृत्युशी दोन हात करण्याची पाळी स्वतःवर आल्यावर जवळच्या आपल्या प्रिय व्यक्तिला अशा घटनेतून जाताना पाहून मरणाची ही प्रकिया किती तापदायक असते हे जास्त कळतं.
सुधाकरचं असंच झालं.पण त्यातून तो सावरला.आणि भुतकाळातल्या गोष्टींचा विचार करून किंवा भविष्यातल्या होऊं घातलेल्या गोष्टींचा विचार करून आयुष्य कंठण्यापेक्षा वर्तमानात राहून वेळेचा सदुपयोग करण्याने सरतेशीवटी जी समाधानी मिळते ती विरळीच.
सुधाकर बरोबर माझं ह्या विषयावर जेव्हा चिंतन झालं तेव्हा मला कळून चुकलं की त्यानेपण ह्यातून कसा मार्ग काढला हे आठवणीत ठेवण्यासारखं आहे.
मी सुधाकरला म्हणालो,
“तूं मागे एकदां गंभीर अपघातातून बचावलास हे मला माहित आहे.अगदी मृत्युच्या तोंडातून बाहेर आलास असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.”
मला तो म्हणाला,
“मी जे समजत होतो,त्यापेक्षाही मला मृत्युशी आलेला अनुभव जास्त माहित झाला आहे.कदाचीत मला असा अनुभव हवा असावा हे वाटण्यापेक्षाही तो प्रत्यक्षात जास्त होता.
मला ज्या वेदना सहन कराव्या लागल्या त्याची प्रत्यक्षात मोज-माप करणं शक्यतेच्या पलिकडचं होतं.शारिरीक नाश काय आहे ते जीवनाच्या बचावासाठी अगदी टोकाची झुंज देत असतानाच्या घटकेपर्यंतची मला माहिती आहे.एव्हडंच नाहीतर माझ्या प्रिय व्यक्तिला मी गमावून बसताना मला झालेला मनस्ताप जाणवतो, ती व्यक्ति झुंज देत असताना त्या व्यक्तिला केलेल्या मदतीच्यावेळी मी त्यांचा अंतकाल येई पर्यंत हजर होतो.”

“पण तुझ्या त्या अपघाताचं काय झालं ते सांग” असं मी सुधाकरला म्हणाल्यावर तो अगदी गंभीर होऊन म्हणाला,
“मी माझ्या विशीत एकदा गंभीर अपघातात सापडलो होतो.हॉस्पिटलात येई पर्यंत कदाचीत मी जीवंतही नसतो.पंधरा दिवस मी इंटेंसीव्ह केअरमधे होतो.मोडलेलं शरिर आणि बाद झालेलं फुफ्फुस अशी माझी अवस्था होती.दोनदा मी मरणाच्या दाढेतून बचावलो.यमदूताला मला घेऊन जाणं सोपं होतं.पण ते जाणं माझ्यावर अवलंबून होतं.मी यमाशी झगडलो ते मरणाच्या भितीने नाही तर मी जीवनावर प्रेम करीत होतो म्हणून.
नंतर जेव्हा माझी आई क्षयाच्या रोगाने पछाडली होती,तेव्हा मी तिची सुशृषा केली.जेव्हा तिची वेळ समीप आली तेव्हा त्या प्रक्रियेशी मी परिचीत होतो.कारण मी स्वतः त्यातून गेलो होतो.अगदी सरतेशेवटी मी तिला डोक्यावर थोपटलं. दिलासा घेत घेत तिने प्राण सोडला.”
“का रे सुधाकर,काही व्यक्तिंच्या जीवनात सुखांपेक्षां दुःखंच फार असतात.”सुख जवापाडे दुःख पर्वता एवहडे ” हे कुणी म्हटलंय ते अक्षरशः तुझ्या बाबतीत खरं आहे नव्हे काय?”
असं मी त्याला म्हणताच,आपल्याच कपाळावर हात मारून मला म्हणाला,
“त्या कमनशीबी लोकांतला मी पण एक आहे. जेव्हा माझा तीस वर्षाचा मुलगा दोन वर्ष किडनीच्या रोगाला झुंज देत होता,तेव्हा मी त्याच्या सुद्धा बरोबर होतो. त्याच्या जीवनाच्या शेवटच्या वर्षी मी त्याची काळजी घेत होतो.आणि आम्ही एकमेकाचे साथी झालो होतो.नेहमीच आम्ही जीवन-मरणा विषयी चर्चा करून त्याच्या पलिकडे काय आहे ह्याचीही चर्चा करीत असूं.आणि त्याची जाण्याची घटका ज्यावेळी जवळ आली त्यावेळी मी त्याच्या नजरेत नजर घालून होतो. अगदी त्याचा शेवटचा श्वास संपेपर्यंत.त्यानंतर मात्र मी अगदी हवालदील झालो.”

पण असं झालं म्हणून आयुष्यात कच न खाता कसा राहिलो ह्याचं वर्णन करून सांगताना सुधाकर म्हणाला,
“मृत्युशी झालेल्या माझ्या मुठभेडने मला एक शिकवलं,जीवनला अध्यारत धरूं नका.जीवन शीघ्रगामी असूं शकतं.तसंच ते नाजूक आणि क्षणभंगूर असतं.आणि खरंच तर लहान लहान गोष्टी खर्‍या मतलबाच्या असतात.आयसीयू मधून जवळ जवळ दोन आठवड्यानंतर बाहेर आल्यावर मला जो पहिला शुद्ध हवेचा श्वास घेता आला तो मी कधीच विसरणार नाही.माझ्या नर्सने मला व्हिलचेअरवरून जेमतेम उघडलेल्या खिडकी जवळ नेलं तेव्हा मी जरा पुढे वाकून स्वच्छ हवेचा पहिला श्वास घेतला.मी आनंदात डुबून गेलो.तत्त-क्षणी मी संकल्प केला की अशा आनंदायी शुद्ध हवेची महक घ्यायला विसरायचं नाही.”

आणि पुढे जाऊन आपला संकल्प सांगत म्हणाला,
“मला खूप काम करावसं नेहमीच वाटतं.भविष्याबद्दल मी नेहमीच विचारात असतो. भूतकाळाचा मनात विचार आणतो. परंतु,वर्तमानकाळात राहण्याचा प्रयत्न करतो.शुद्ध हवेची नेहमीच महक घेतो.माझ्या पत्नीबरोबर सकाळीच एक कप कॉफी झुरकण्यात मजा लुटतो.बागेतली पिवळी जर्द फुलपाखरं उडताना पाहून आनंदी होतो.अग्रचिंतक राहणं हे माझं मोठ्ठं आव्हान आहे.माझ्या मी संतुष्ट न रहाता, माझं जीवन मी सहजंच जाऊ देत नाही.आयुष्यात येणारे मोठे महत्वाचे क्षण आणि लहान लहान आनंदाचे क्षण यात तालमेल असावा असं मला वाटतं.जेव्हा माझ्या जीवनाचा अखेरचा क्षण येईल तेव्हा मागे वळून बघून मला एक समाधानी व्ह्यायला हवी की मी माझी वेळ वर्तमानात अपव्ययीत केली नाही.”

खरंच सुधाकरच्या जीवनातून काही तरी शिकण्यासारखं आहे.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, April 1, 2009

एकांती होतील गुजगोष्टी तुला आठवून

मुर्ती तुझी बनवीली माझ्या आंसवानी
प्रीतिचे भाग्य बनवीले माझ्या विलापानी

नेत्रातल्या अश्रूंना पापण्यानी सावरले
रक्तातल्या शाईने चित्र तुझे रेखाटले
भेटण्या सजणा पाहिले उपाय करूनी
मुर्ती तुझी बनवीली माझ्या आंसवानी

श्रावणातल्या सुरम्य रात्री करीती बेचैन
एकांती होतील गुजगोष्टी तुला आठवून
वेडी होऊन मीच मला बांधिले शृंखलानी
मुर्ती तुझी बनवीली माझ्या आंसवानी
प्रीतिचे भाग्य बनवीले माझ्या विलापानी


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com