Saturday, January 28, 2012

मासा गळाला लागेतोपर्यंत.




"मासे पकडणार्‍या कोळ्याला गळाला ओढ लागेपर्यंत इतर गोष्टीचं चिंतन करायला वेळ सापडतो तसंच काहीसं माझं झालं आहे."


आज मी प्रो.देसायाना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो.डिसेंबरचा महिना म्हणजे थंडीचा उच्चांक.तळ्यावर जाऊन गप्पा करण्याचे विचारसुद्धा मनात येणं कठीण आहे.


मला पाहून भाऊसाहेब फारच खूश झाले.
मला म्हणाले,
"माझ्या मनात तुम्हाला सांगण्यासारखं काहीतरी सतत घोटत होतं.मी तरी तुमच्या घरी यावं किंवा तुम्हाला माझ्या घरी बोलवावं असा मनात विचार येत होता."


"मलाही घरी बसून वाचन करून कंटाळा आला होता.तुमच्याकडून नवीन काय शिकण्यासारखं आहे ते पाहावं म्हणून मीच तुमच्याकडे यायला निघालो."
मी प्रो.देसायाना माझ्या मनातला विचार सांगीतला.


माझ्या मनातला विचार मी तुम्हाला सांगतो.असं म्हणून भाऊसाहेब म्हणाले,
"मला आठवतं काही वर्षापूर्वी मी एक पावरफुल बायनॉक्युलर घेऊन आकाशातले तारे पहाण्याचा छंद करीत होतो.आणि माझ्यासारख्यासाठी लिहिल्या गेलेल्या खगोल विद्दे वरची पुस्तकं वाचीत असायचो.मी एक मोहित झालेला  खगोल तज्ञ म्हणून स्वतःला समजत होतो.


आतापर्यंत आपल्याला माहित असलेल्या लोकांत ज्यानी विश्वाचा अभ्यास केला आहे ते म्हणतात सूर्य हा एक नगण्य तारा आहे.त्यामानाने तपमान नसलेला  हा एक  नीहारिकेत निर्धारीत केलेला तारा आहे.मिल्की-वे,मला "वे"ला मिल्कीव्हे,"व्हे" म्हणजे मठ्ठा म्हणायला आवडेल.तर हा मिल्कीवे आपल्या बहिणी आणि भावांनी बनलेला आहे आणि आपण सर्व एका केन्द्रा सभोवती फिरत आहोत.आणि हे केन्द्र कुठच्यातरी जागी जात आहे.कुठे ते काही मला माहित नाही.माझे भाऊ आणि बहिणी कोट्यांनी-अब्जानी मोजले जातील एव्हडे आहेत.आणि आपली ही आकाश गंगाच अनेकातून एक आहे. किती ते मला माहित नाही.


आपला सूर्यतारा एव्हडा लहान आहे आणि त्याचं पिल्लू आपली पृथ्वी एव्हडी चिमुकली आहे की मी ज्यावेळेला तिच्या आकाराचा विचार करतो तेव्हा मला मोठ्या कॅनव्ह्यासवर पडलेला एक ठिपका कसा दिसावा तसं वाटतं.


माझ्या अस्तित्वाने काय फरक पडतो?.मी किंवा माझा देश किंवा हे सर्व विश्वच एव्हडा कसला प्रभाव पाडू शकतं?.
मी स्वार होऊन कुठे चाललो आहे?त्याला काही अर्थ आहे का?ह्या सर्वाचा स्वामी कोण आहे?त्याच्या मनात तरी काय आहे? असे मला प्रश्न पडतात.


ह्याचाच मी विचार करीत असतो.हे सर्व काही प्रचंड आहे,अपरिहार्य आहे,अदम्य आहे आणि मी जर का डोळे झाकून त्याचा विचार करीत राहिलो तर ते मला एक प्रकारचं निराशात्मक चित्र दिसतं."


प्रो.देसायांचा हा विचार ऐकून माझ्या अनेक आठवणीतली एक आठवण माझ्या मनात जागृत झाली.
मी त्यांना म्हणालो,
"मला आठवतं मी असाच एकदा सुट्टीत कोकणात गेलो होतो.नेहमी प्रमाणे डोंगर चढून वर जायची सवय असल्याने त्या सकाळी मी त्या डोंगरावरच्या रानात काही बकर्‍या, मिळेल तो पाला झाडावरून ओरबडून, तोंडात चावत चावत फिरत होत्या हे पहात होतो.त्यांच्या लोकरीसारख्या कातडीवर खाजकुली सारखी वनस्पती चिकटून त्याची पानं आणि फुलं मधेच कुठेतरी अंगावरून सुटून जमीनीवर पडत होती.हे दृश्य पाहिल्यावर मी नेहमीच त्यांच्या अंगावरची ती चिकटलेली पानं दूर करण्याच्या प्रयत्नात असायचो.


पण ह्यावेळी कुणास ठाऊक,माझ्या लक्षात आलं की,त्या वनस्पतीचा आणि ह्या जनावरांचा निकटचा संबंध असावा.त्या बकर्‍या काहीतरी महत्वाची भुमिका बजावीत होत्या.ही वनस्पती आपल्या अंगावरून नेत जात असताना त्या पाना-फुलातून त्या वनस्पतीच्या उत्पतिचा फैलाव करीत होत्या. बकर्‍या त्या वनस्पतीची वाहनं झाली होती.


मंद वार्‍यावर तरत जाणारे म्हातारीचे केस म्हणजेच कापसी झुपका अशाच प्रकारची बिजं वाहून अन्य वनस्पतीचा फैलाव करायला कारणीभूत होत असतात.बकर्‍या आणि त्यांच्या अंगावरची खाजकुली हे सर्व एका मोठ्या योजनेचा भाग असावा.आणि मीही त्यातलाच-त्याच योजनेतला- भाग असावा.असं मला नेहमीच वाटत असतं.


मला वाटतं,ह्या एकट्या दुकट्या पृथ्वीवर ही फैलाव होण्याची कल्पना फलद्रुप व्हावी अशी योजना असावी.पण जसजशी माणसाची संख्या वाढत आहे तसतशी ही योजना पार पडायला अडचणी यायला लागल्या आहेत.


खूप वर्षापूर्वीपासून मी ज्यावेळी मुंबईसारख्या शहरात रहायला आलो त्यावेळपासून मला दिसून आलं की,शहरातले लोक घाईगर्दीचं जीवन जगत आहेत,कुठच्याही गोष्टीचा लगोलग निर्णय घेत आहेत.त्यामानाने खेड्यातले लोक खूपच मंद आहेत.अस्तित्वासाठी कदाचीत त्यांना अशी धडपड करणं
भाग पडत आहे.


गळाला चिंगूळ लावून वहात्या नदीच्या प्रवाहात गळ टाकून मासा गळाला केव्हा लागेल ह्या प्रतिक्षेत असलेल्या एखाद्या मासे पकडणार्‍या कोळ्याला गळाला ओढ लागेपर्यंत इतर गोष्टीचं चिंतन करायला वेळ सापडतो तसंच काहीसं माझं झालं आहे.


आकाशातले तारे,डोंगरावर चरणारी जनावरं आणि खाजकुलीची वनस्पती ह्यांचं चिंतन करण्यात मला मजा येते.ह्या मजेतूनच मला सुख मिळतं. सन्तुष्टता मिळते,शांती मिळते."

एकमेकाचे विचार ऐकून संध्याकाळ मजेत गेली ह्याचा खूप आनंद झाला.एक एक कप गरम कॉफी घेऊन आम्ही संध्याकाळ साजरी केली.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

     

Wednesday, January 25, 2012

मद्यमद चोरि तप--व्यथा व्यसनीची.




"खरं सांगायचं तर व्यसन-निवृत्ति करून घ्यायला खूपच कटकटीचं असतं.मी तिच तिच चूक परत परत करतो.सबुरीने कसं घ्यावं मला समजत नाही."


मी अनेकदा बंगलोरला गेलो आहे.अर्थात माझ्या कंपनीच्या कामास्तव मी गेलो आहे.मला आठवतं असंच एकदा मी बंगलोरला असताना सकाळचा नास्ता घ्यायला मी रहात होतो त्या होटेल जवळच्या एका रेस्टॉरंटमधे इडली सांभार खायला गेलो होतो.मी जिथे बसलो होतो त्या टेबलाजवळच्या  खडकीतून मी सहज बाहेर पाहिलं ते जरा संभ्रमात टाकण्यासारखं होतं. लाकडाच्या फ्रेमवर चटया ठोकून उभारलेल्या एका शेडमधे लोक येत जात होते.त्या शेडच्या आत काळोख असल्याने आत काय चालंय ते मला स्पष्ट दिसत नव्हतं.पण बाकडे आणि टेबलं मांडलेल्या जागी लोकं ग्लासभरून पेयं घेऊन यायचे.आणि गप्पा मारीत पीत बसायचे. काही लोक बाकड्यावर न बसताच गट्टकन ग्लासतलं पेयं पिऊन बाहेर पडायचे.


काही वेळानं मला कळायला कठीण झालं नाही की हे सर्व लोक आत मिळणारी दारू पिऊन यायचे. टॅक्सीवाले,रिक्षावाले,डोक्यावर ओझं वहाणारे, अधुनमधून पांढरपेशे दिसणारे काही लोकही त्यात होते. एव्हड्या सकाळी हे घेण्यासाठी हे लोक तत्परतेने यायचे म्हणजे सहाजिकच ते व्यसनी-ऍडिक्ट-झालेले लोक असणार असा मी कयास केला.


मुंबईला ज्यावेळी मी परत आलो तेव्हा हा सिन माझ्या मनात सतत घोळत होता.माझा एक मित्र एकनाथ करंडे हा मनोवैज्ञानिक असल्याने त्याच्याकडे ह्या विषयावर बोलावं म्हणून एकदा त्याची मी भेट घेतली. त्याला मी पाहिलेला प्रकार सवित्सर वर्णन करून सांगीतला आणि विचारलं,

जेव्हा हे व्यसनी लोक तुझ्याकडे उपाय करण्यासाठी म्हणून येतात तेव्हा तू ह्या लोकाना कसा हाताळतोस.?
मला एकनाथ म्हणाला,
मी तुला एका अशाच व्यक्तीची माझ्याशी पहिली मुलाखात झाली ती सांगतो.त्यावरून तुला थोडी फार कल्पना येईल की ह्या लोकांच्या मनात काय चाललेलं असतं."
असं सांगून एकनाथ मला त्या पेशंटचे विचार सांगू लागला,
"मी व्यसनी असणं हेचमुळी माझ्या जीवनाचा आधारस्तंभ झाला आहे असं मला वाटतं.व्यसनाशिवाय मी जगूच शकत नाही.प्रेमीयुगूलं येतात आणि जातात,युद्ध जिंकली जातात आणि हरली जातात.शोकान्त आणि विजयोल्लास सारख्याच फरकाने घोडदौड करीत येतात.पाऊस पडत असतो,बर्फ पडत असतं,तारे आकाशातून निखळून पडतात.ह्या सर्वांमधून माझं व्यसन माझ्याबरोबर असतंच.त्याचा वापर मी करो न करो ते माझ्या सोबत असतंच."


मी हे त्याचं तत्वज्ञान निमूटपणे ऐकून घेत होतो.तो पेशंट पुढे मला म्हणाला,
"आम्ही व्यसनी लोक जमून घोळका करून बसतो आणि एकमेकाच्या कहाण्या ऐकतो. आम्ही,संवेदना,स्वीकार,सत्यनिष्ठा,नम्रता आणि हारमानणं ह्या गोष्टी कार्यरत ठेवण्याच्या प्रयत्नात असतो.मी स्वतः मात्र ह्या सर्व गोष्टी कार्यरत ठेवण्यात कुचकामीच आहे.


व्यसनाधीन म्हणून,माझं जीवन मी कठोर रहाण्यात,उद्धट असण्यात आणि ताबा मिळवण्य़ात विशेषज्ञता प्राप्त करण्यात वापरलं आहे.चलाखी करण्यात मी चांगलाच कसबी आहे.भयानक सहजतेने मी खोटं बोलतो. मला प्रामाणीक रहाण्याची इच्छाच नाही.कुणीतरी माझ्याकडे लक्ष द्यावं आणि मला समजून घ्यावं ह्याची मला जरूरीच भासत नाही.माझ्या व्यसानाला मी बढावा देत रहावं असं मला वाटतं.बरेचवेळा हे काय जे मी म्हणतो तेच मला हवंसं वाटतं."


त्या पेशंटला मधेच थोडं थाबवीत मी त्याला प्रश्न केला,
"सिनेमा-नाटकातून व्यसन-निवृत्ति दाखवली जाते पण ती बरीच यातनादायक, प्रभावशाली पण सरतेशेवटी फलदायी असते.खरं सांगायचं तर व्यसन-निवृत्ति करून घ्यायला खूपच कटकटीचं असतं.तुझं ह्यावर काय म्हणणं आहे?


तो मला म्हणाला,
"मी तिच तिच चूक परत परत करतो.सबुरीने कसं घ्यावं मला समजत नाही.खरं सांगायचं सोडूनच द्या, खरं कसं ओळखायचं हेच मला कळत नाही.कबूल व्ह्यायला मला आवडत नाही,माझ्यावर माझा ताबाच नसतो.हे असंच जीवन जगायचं ह्याची मला कल्पनासुद्धा करवत नाही.मी कमजोर, निर्बल अनुपयुक्त आहे असं माझंच मला वाटतं."


हे ऐकून मी त्याला म्हणालो,
"एव्हडं मात्र नक्की की तुला तुझ्यात सुधारणा केली पाहिजे असं मला वाटतं.उठण्यासाठी कितीही धडपड केली आणि जमलं नाही तरी तुला उठलंहे पाहिजेच आणि हे सगळं ठुकरावून दिलं पाहिजे.तुला यात यश येईल का हे जरी माहित नाही असं जरी वाटत असलं तरी मला वाटतं तू यशस्वी होशील."


माझ्या ह्या सांगण्याने त्याला थोडा हुरूप आला मला म्हणाला,
"जीवनाच्या प्रत्येक क्षणातून जमवून घेण्याच्या मी प्रयत्नात असतो.माझ्या लक्षात आलंय की तसं मी करू शकतो.आता ह्या क्षणी मी घाबरा घुबरा झालो आहे.पण ते ह्या क्षणापूरतंच आहे.माझंच व्यसन माझ्या कानात पुटपुटतं,
"बाबारे!अगदी बरोबर मला माहित आहे की तुला बरं वाटावं म्हणून तू काय करू शकतोस ते."
पण आणखी एखाद्या क्षणात मला बरंही वाटेल.त्यामुळे त्या नंतरच्या क्षणाची मी प्रतिक्षा करीत असतो."


हे त्या पेशंटचं म्हणणं सांगून झाल्यावर,एकनाथ मला म्हणाला,
"अशावेळी पेशंटचा सकारात्मक विचाराचा धागा पुढे पुढे नेत काही तरी उत्तेजन देण्यासाठी मी त्याला म्हणालो,
"मला वाटतं अशाच तर्‍हेने तू तुझं जीवन सुखकर करू शकतोस. अगदी प्रत्येक वेळी एका एका लहान क्षणातून.
अगदी ह्या क्षणाला तू चांगली निवड करू शकतोस.ह्या क्षणाला तू सत्य सांगू शकतोस.ह्या क्षणाला जे तुझ्या जवळ आहे त्याबद्दल तू कृतज्ञ राहू शकतोस.हा क्षण असताना तू क्षमा करू शकतोस.पाच मिनीटानंतर तू वेडपटपणा करू शकतोस.पण ह्या क्षणाला तू तुझं जीवन बदलू शकतोस.
सरते शेवटी मला वाटतं,एव्हडं सर्व तुझ्या जवळ आहे.अगदी ह्या क्षणाला.जे आहे ते भरपूर आहे.फरक करून घ्यायला ते भरपूर आहे.चांगला माणूस व्ह्यायला ते भरपूर आहे.ह्या सर्वातून पार व्हायला जसा तू हवा आहेस तसा तू आहेस."
एकनाथने त्याच्या पेशंटच्या पहिल्या भेटीत त्याचं ऐकून घेऊन नंतर त्याला आपला उपदेश देऊन दुसर्‍या भेटीत त्याच्या वागणूकीत काय सुधारणा होईल ते पाहूनच पुढची स्टेप घेणार असं मला सांगीतलं.

मी उठता उठता एकनाथला म्हणालो,
"कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं संगीत विद्याहरण नाटकातलं गाणं ह्यावेळी मला आठवलं,

मद्यमद चोरि तप दाऊनि सुख नरा ।
चौर्यकरी; बलभास; शापयोग्या सुरा ॥

ही वारयोषिता दारूणा सेविता ।
भस्म करिते जना,व्याधी भयंकरा ॥"



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
 

Saturday, January 21, 2012

कमाआत्या.




"कुणास ठाऊक त्या माझ्या कठीण काळात मला वाचनाचा छंद लागला नसता तर आज जी मी आहे ती झालेच नसते."


"कमाआत्याचा आजचा ,तिच्या सेवेचा म्हणा किंवा तिच्या नोकरीचा म्हणा,शेवटचा दिवस.ती आज हॉस्पिटल मधून निवृत्त झाली आहे.आमची कमाआत्या जरी नर्स म्हणून त्या हॉस्पिटलात काम करीत असली तरी आम्हाला घरी ती अर्धी डॉक्टरच होती.बारा,बारा तास तिथे काम करून आणि तेव्हडाच वेळ डॉक्टरांच्या सानिध्यात राहून शरीराच्या व्याधी विषयी कमाआत्याला बरीच माहिती झाली आहे."
ललिता मला आपल्या आत्याची माहिती सांगत होती.


योगायोगाने मी ललिताला भेटायला तिच्या घरी गेलो होतो.कमाआत्या हारतुरे घेऊन मी येण्यापूर्वीच घरी आली होती.हारतुरे देऊन तिचा सत्कार झाला होता.तिला सेन्डऑफ मिळाला होता.



" शरीराला मामुलीशी इजा झाली की आमचा प्रायमरी डॉक्टर कमाआत्याच असायची.कसली जखम झाली, एखाद्या भागाला सुज आली,कुठे बॅन्डेज लावायची पाळी आली की आमची कमाआत्या पुढे यायची.तिच्या इलाजाने सुधारलं नाही की ती आम्हाला डॉक्टरकडे जायला सांगायची.कारण ह्या व्यवसायतल्या तिच्या मर्यादा तिला माहित होत्या."
ललिताने असं सर्व सांगून नंतर माझी आणि कमाआत्याची ओळख करून दिली.



"तुम्हाला सुरवातीपासूनच ह्या सेवेत काम करायची इच्छा होती का?"
मी कमाआत्याला प्रश्न केला.



"हो!असं एका शब्दात मी तुम्हाला सांगीतलं तर ते बरोबर होणार नाही."
कमाआत्या मला म्हणाली.



"प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक घटना काही कारणास्तव होत असते असं मला नेहमी वाटतं.फक्त समस्या हीच असते की ज्या गोष्टीमुळे किंवा घटनेमुळे आपण उदास होतो त्यातली चांगली बाजू आपण शोधून काढायला असमर्थ असतो."



अशी प्रस्तावना करून कमाआत्या मला पुढे म्हणाली,
"माझ्या तरूणपणी मी माझ्या जीवनात नेहमीच रागावलेली असायची.नेहमीच माझ्या मनात यायचं की माझ्या वाट्याला एव्हडं कमी का असतं आणि इतराना मात्र कसं एव्हडं मुबलक मिळतं.नव्हे,नव्हे मी ऐहिक सुखाबद्दल किंवा भौतिक वस्तुंबद्दल म्हणत नाही.खरं म्हणजे ज्याला स्वातंत्र्य म्हणतात त्याबद्दल मी म्हणते.स्वातंत्र्याला,मला वाटतं,मी दुरावले होते.माझ्या वयाची इतर,त्यावेळेला बाहेर जाऊन मजा करायला मुक्त होती.
मला नेहमीच वाटायचं की,मला एव्हडं ज्ञान आहे आणि मी ते आणखी प्राप्त करू शकले असते.फक्त मला ते करायला मुभा हवी होती.


माझे बाबा खूपच शिस्तशीर होते.जुन्या वळणाचे होते.मुलीनी घरी रहायचं.आणि त्यांना सांगीतलं जाईल तेच करायचं.माझ्या आजोबांनी स्थापन केलेली एक खानावळ होती.माझे वडील तिच खानावळ पुढे चालवायचे. आम्हा मुलीना खानावळीसाठी जेवण करायला स्वयंपाकघरात काम करायला मुभा होती.
मी बारा वर्षांची असताना शाळा सोडली.आणि घरीच काम करायला लागले.जेवण करायला मदत करायचे.उपहासाने विचार केला तरी माझं उदास रहाण्याचं हे कारण मुळीच नव्हतं.


माझ्या बरोबरीच्या बर्‍याच मुली नृत्य,गाणं नाटक शिकायला जायच्या.मला नेहमीच वाटायचं मला जर का तसं करायला घरून परवानगी मिळाली असती तर माझं जीवनही प्रभावशाली झालं असतं.रांधा,वाडा उष्टी काढा ह्या उक्तीप्रमाणे माझं आयुष्य मी जगत होते.कुणाशीही मैत्री करायला मोका मिळत नव्हता. मला असं दिसून आलं  होतं की माझं जीवन सुखाचं व्हायला मला ज्यात गम्य आहे ते करायाला मिळायला हवं.


त्यावेळी आमच्या घरात एक लहानसा रेडिओ होता.मी धरून मला आणखी सहा भावंड होती.मला ज्या गाण्यात आवड असायची ती गाणी ऐकायला मला संधी मिळत नसायची.फावल्यावेळात मला जे हवं ते करायला मिळत नसल्याने मी तासन तास वाचनात वेळ घालवायची.कथा कादंबर्‍या,मासिक अंक, दिवाळी अंक मला वाचायला मजा यायची.


माझ्या जीवनात मागे वळून पाहिल्यावर माझीच मला चीड यायची.माझं बालवय आणि कुमारवय माझ्याकडून हिसकावून घेतलं गेल्ं होतं.आणि त्यातून आणखी चीड यायची की ह्यातून बाहेर पडायला मला कुणाचंही सहाय्य मिळालं नाही.इतरांच्या मुलांना जे मिळालं त्याला मी मुकले,माझ्या स्वातंत्र्याला मी मुकले जीवन खरोखरच अन्यायपूर्ण होतं.


हे समजून घ्यायला मला खूप वर्ष घालवावी लागली की ज्या गोष्टीकडे मी माझ्या आयुष्यातला मज्जाव असं समजून घेत होते तेच माझ्या आयुष्यात मला चांगल्या स्थानावर न्यायला कारणीभूत झालं.


माझ्या वडीलांच्या पश्चात आम्हाला ती खानावळ बंद करावी लागली.मी शाळेत जाऊन जमेल तेव्हडं शिकले.नंतर मी नर्सिंग कोर्स केला.एका हॉस्पिट्लात मला काम मिळालं.तिथे काम करीत असताना मला रुग्णांची सेवा करायला मिळून त्यांची स्वप्न साकार करायला मोका मिळाला.


मला वाटतं,हे मी करू शकले याचं कारण मी कुठे होते ते नसून,ते तसं वातावरण होतं त्यामुळेच ते होऊ शकलं.सुरवातीला जी गोष्ट मला वाईट म्हणून दिसायची तिच माझ्यासाठी अप्रत्यक्षपणे कृपादान झाली.कुणास ठाऊक त्या माझ्या कठीण काळात मला वाचनाचा छंद लागला नसता तर आज जी मी आहे ती झालेच नसते.
जे काही होत असतं ते काही कारणास्तव होत असतं ह्यावर माझा विश्वास आहे."



ललिताला आणि कमाआत्याला मी म्हणालो,
"योगायोगाने का होईना आज मी तुमच्याकडे आलो त्याचं सार्थक झालं असं मला वाटतं.एखाद्याच्या उभ्या आयुष्याची एव्हड्या थोडक्या शब्दात उजळणी ऐकून आणि त्यातून एक चांगला संदेश ऐकायला मिळावा हे खरंच माझ्या दृष्टीने भाग्याचं आहे."




श्रकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, January 18, 2012

दोन हृदयं.




"किती व्यवस्थीतपणे माझ्या आजोबांनी माझी समजूत घातली."

दिनकर बालचिकित्सा तज्ञ आहे.त्याचे आजोबा अलीकडेच गेले.दिनकरचं आजोबावर खूप प्रेम होतं.मला तो नेहमीच आजोबांच्या गप्पा सांगायचा. ह्या भेटीत तो मला त्याच्या लहानपणी आपल्या आजोबांशी केलेल्या एका चर्चेची आठवण काढून सांगत होता.


मला म्हणाला,
"माझे आजोबा निवृत्त झाल्यावर आपल्या जुन्या घरी कोकणात येऊन राहिले.शाळेला सुट्टी असताना कधी कधी वेळ काढून मी आजोबांना भेटायला कोकणात त्यांच्या घरी रहायला जायचो.
आजोबांच्या झोपायच्या खोलीला लागुनच माझी झोपायची खोली होती.पण ती माझी खोली स्वयंपाकघराला लागून होती.
त्या माझ्या भेटीत एकदा मध्य रात्री स्वयंपाक घरातून भांड्यांचा आवाज आला.माझ्या आजोबांनी सफेद लेंगा घातला होता.वरती मलमलची पैरण होती.माझ्या आजोबांना त्या वयातही डोक्यावर भरपूर केस होते.ते विसकटलेले दिसत होते.
आजोबांनी पितळेच्या डब्यातून एक साखरेचा लाडू एका बशीत काढून घेतला.थोडं दुध कपात गरम करून घेतलं.
मी माझ्या बिछान्यावरून उठून स्वयंपाक घरात येऊन एका खुर्चीवर मिणमीणते डोळे करीत बसलो आणि त्यांना म्हणालो,
"आजोबा?मध्य रात्रीची तलफ काय?"


त्यांच्या चेहर्‍यावरचं हसू आणि दोन्ही गालावरच्या खळ्या खुललेल्या पाहून मला गम्मत वाटली.
"रात्रीचे दोन वाजले वाटतं!.काय थोडा लाडू खाणार?"
त्यानी गालात हसं ठेवूनच मला विचारलं.
"नको थॅन्क्स.एखादं फुलपात्र भरून पाणी पितो."
डोळे चोळत मी त्यांच्याकडे पहात होतो.
"आठवतं तू आणि तुझी बहिण माझ्या कचेरीत येऊन"
आजोबा मला आठवण काढीत सांगत होते.
"आणि तुझी आजी तुमच्याबरोबर,थालीपिठं,लोण्याचा गोळा आणि थरमॉसातून गरम कॉफी देऊन पाठवीत असायची?"


"आणि थालीपिठं खाऊन झाल्यावर मुखशुद्धी म्हणून ताज्या शहाळ्याच्या कातळ्या द्यायची."
मी आजोबांच्या आठवणीत भर घालून म्हणालो.
"तू शहाळ्याचं पाणी एका बाटलीत घेऊन यायचास.कधी तुझी आजी मला आवडतं म्हणून, कुळथाची पिठी उकड्या तांदळाचा भात आणि तोंडाला लावायला भाजलेला सुका बांगडा आणि त्यावर खोबर्‍याच्या तेलाचे दोन थेंब टाकून घेऊन यायचास?."
आजोबा आणखी आठवण काढून म्हणाले.
कुळथाची पिठी आणि सुकाबांगडा हे समिकरण त्यांच्या लय आवडीचं.पण अलीकडे त्यांना ते खायला मिळालं असेल का कुणास ठाऊक.


"तो तुमचा कार्डीआलॉजीस्ट काय म्हणाला?
असं मी विचारल्यावर मला आजोबा म्हणाले,
"माझं एक हृदय इतकं काही चांगलं नाही."
त्यांच्या जाड भुवंया जरा वर गेल्या.
"तो मठ्ठ स्नायु तितकासा चांगला नाही."
मला म्हणाले.
"आणि तुमचं दुसरं हृदय?"
मी लागलीच त्यांना प्रश्न केला.


चेहरा जरा प्रसन्न करून म्हणाले,
"मस्त! ते हृदय नेहमीच अर्ध्या भरलेल्या ग्लासातून पितं.मी अजून जीवंत आहे.मी खेडवळ आहे.तुझी प्रेमळ आजी अजून माझ्याबरोबर आहे.माझी दोन मुलं आहेत.तुम्ही नातवंडं आहात.हो! ते हृदय छान आहे."
 

मी थोडा मोठा झाल्यावर माझ्या आणि माझ्या आजोबांच्या आयुर्वृद्धिबद्दल विचार करायला लागलो.त्यांना काय वाटत असेल ह्याचा विचार माझ्या मनात यायचा.
त्या मध्य रात्री त्यांचा अर्धा लाडू संपता संपता मी त्यांना विचारलं.


ते खांदे उडवीत मला सांगू लागले,
"ते तसंच असतं.आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत यातना आणि पीडा असतात.अगदी तान्ह्यांना पोटदुखी असते,लुटुलुटु चालणार्‍या मुलांना पडण्याची भीती असते,विद्यार्थी दशेत टेस्टसची,कुमार वयात प्रिय आणि प्रियाबद्दल काळजी,तरुणाना काम आणि पैसा नंतर मुलांच्या काळज्या, शिवाय प्रत्येकाला दंगे धोपे आतंकवादी यांची भीती असते आणि हे असं चालायचंच.नुसता बदल आणि बदल.सवय होते.आणि पुन्हा बदल होत रहातो."


मी आजोबांना विचारलं,
"तुम्हाला कधी थकवा येतो का?"
"जर मला थकवा आला तर मी एक डुलकी काढतो.
आजोबांनी मला उत्तर दिलं.

"मला म्हणायचंय,म्हातारं व्ह्यायला होतंय म्हणून,जगण्याचा कंटाळा येतो म्हणून विचार येऊन थकवा येतो का?तुम्ही म्हातारे होत चालला आहात ह्याचा विचार येऊन मी उदास होतो"
मी आजोबांना म्हणालो.

"कदाचीत तुझी तुलाच भीती वाटत असावी."
ते म्हणाले.
"मला आठवतं मी जेव्हा तुझ्या वयाचा होतो तेव्हा असे विचार आल्यावर चिंतामुक्त व्ह्यायचा प्रयत्न करायचो.असं हे होतच असतं.तसं लक्षात येणं जरा कठीणच असतं.आठवणी व्यतिरिक्त सर्वकाही जाऊ द्यायचं."
ते मला पुढे असं म्हणाले.


"मग मन एव्हडं भीत का असतं?"
मी आजोबांना म्हणालो.

मला म्हणाले,
"कारण तू अजून तेव्हडा मोठा झाला नाहीस.तुला जे माहित आहे त्यापेक्षा तुला जे माहित नाही ते जास्त भीतीदायक आहे."


किती व्यवस्थीतपणे माझ्या आजोबांनी माझी समजूत घातली.आता मी बालचिकित्सक तज्ञ म्हणून काम करीत असताना मी बर्‍याच आईवडीलाना पाहिलेलं आहे की ते आपल्या मुलांना रोग होऊन आजारी पडण्याच्या शक्यतेने किती चिंतातूर असतात.
आणि जेव्हा रोगनिदान होतं,अगदी धक्कादायक असलं तरी,ते समजल्याने त्यांचं मन थोडं चिंतामुक्त होतं.कारण दैत्याचं नाव सापडल्यामुळे तसं होत असावं.


"माझ्या खोलीतला तो भिंतीवरचा फोटो तू पहिलास ना?"
माझे आजोबा म्हणाले,
"तो माझ्या कॉलेजमधला माझा फोटो आहे.काळे भोर केस.तिच वेळ होती आम्ही निरनीराळ्या गावाला सहलीला जायचो.ब्रिटीशांना देशातून हाकलून द्यायची चळवळ चालू झाली होती.प्रत्येक दिवस रोमांचक असायचा.माझ्या आजोळी मी माझ्या आईला भेटायाला गेलो होतो.माझ्या आजोबांची ती शुश्रूषा करीत होती. आता मी जगाचा विचार करून जास्त शोधाशोध करीत नाही किंवा अर्थ काढीत बसत नाही.जे आहे ते आहे."


आजोबांनी उसासा सोडला.जणू आपलेच विचार बोलून त्यांना हायसं वाटलं असावं.
"माझी काळजी करू नकोस."
ते म्हणाले,
"किंवा तुझी पण.चिंतामुक्त होऊन आनंदी रहायला खूप गोष्टी आहेत.जमेल तेव्हडा लाभ घे.
नक्की तुला लाडू खायचा नाही?"

अलीकडेच माझे आजोबा हृदयविकाराचा झटका येऊन गेले.तो स्नायु कुचकामी झाला होता.पण त्यांच्या दुसर्‍या हृदयाने कशाशीही समझोता केला नाही."



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Sunday, January 15, 2012

सौन्दर्याची निवड.




"सौन्दर्य आपल्या अवतीभोवती असतं आपण निवड करून ते शोधलं पाहिजे."


माधव आपल्या आईवडीलांबरोबर लहानपणी पार्ल्याला रहायचा.नंतर काही वर्षानी ती जाग सोडून ते शहरात रहायला आले.आमचे शेजारी झाले.
जुन्या आठवणी येऊन माधव आपल्या पार्ल्याच्या घराबद्दल त्या दिवशी सांगत होता.
मला म्हणाला,
"सौन्दर्याचं संभाव्य आपल्या अवतीभोवती जसं असतं तसंच संभावनात असलेलं सौन्दर्यही आपल्या अवतीभोवती असतं.ह्या तथ्यात खरंच सत्य असतं.कारण मी त्याचा अनुभव घेतला आहे.


खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे.त्यावेळी आम्ही पार्ल्याला रहायचो.त्यावेळी गिरगावातून पार्ल्याला येणं म्हणजे शहरातून खेड्यात गेल्यासारखं वाटायचं. पार्ल्यात तेव्हा  खूप नारळाची झाडं होती.आणि कौलारू घरं होती. लांबच्यालांब बैठी घरं म्हणजे त्यावेळच्या त्या चाळी असायच्या.पार्ल्यात त्यावेळी डास-मच्छराचं थैमान असायचं.गिरगावातला माणूस सुट्टीत पार्ल्याला राहिला आणि परत तो गिरगावात गेल्यावर डास-मच्छर चावल्याने आजारी पडायचा.


अशाच एका वाडीत आम्ही एका जुन्या घरात रहायला होतो.घराच्या समोरून मुख्य रस्ता जात होता.त्यावेळी पार्ल्यात गटारं उघडी असल्याने ह्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूचं रेन-वॉटर-ड्रेन असं संबोधून गटारं उघडीच असायची.पाणी तुंबल्याने त्यात पावसात खूप डास व्ह्यायचे.शिवाय येता जाता लोक कचराही टाकायचे. आमच्या घरासमोर स्वच्छता दिसावी म्हणून आम्ही घराच्या समोर सुंदर फुलझाडांची छोटीशी बाग केली होती.अतिशय घाणेरड्या परिसरात आमच्या घरासमोरची बाग उठून दिसायची.येणारा जाणारा सुंदर रंगीबेरंगी फुलं पाहून आनंदायचा.काही शेजारचे, देवाच्या पुजेसाठी म्हणून जासवंदीची किंवा सदाफुलीची फुलं खुडून घेऊन जायचे.


पण ही बाग तयार करायला आम्हाला सुरवातीला खूप कष्ट पडले होते.घर इतकं जुनं होतं की ते बांधताना भिंतीना लागणार्‍या सिमेन्टचा रबल जमीनीत इतस्तः फेकला गेल्याने अनेक पावसाळ्यातून तो रबल जमीनीत गच्च बसून राहिला होता.रबल काढून मग आम्ही त्या जागी चांगली माती आणून त्यात खत घालून फुलझाडांसाठी ती जमीन पोषक व्हावी म्हणून चांगलाच खर्च केला होता.दुसर्‍या पावसाळ्यात आम्ही तिथे फुलझाडं लावली.
रस्त्या्वरून येणारे-जाणारे आम्हाला सावध करून सांगायचे की आमची मेहनत फुकट जाणार.मन विचलित न करता जिद्दीने आम्ही मेहनत घेत होतो. तिसर्‍या वर्षी आमच्या बागेला थोडं स्वरूप आलं.आमच्या मेहनतीला फुलं आली.


आमचं हे जूनं घर पाडून आमचा घरमालक नवीन घर बांधण्याच्या विचारात होता.एक दोनदा त्याने आम्हाला तसे संकेतही दिले होते.
एक दिवशी विकेंडला आम्ही गिरगावात आमच्या एका नातेवाईकाकडे भेटीला गेलो होतो.दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्हाला फोन आला की आमच्या घराला आग लागली आहे आणि आम्ही ताबडतोब घरी यावं.
आम्ही जाई तोपर्यंत घर पूर्ण जळून गेलं होतं. आमचं घर आगीने धुमसत होतं.नेत्र शल्य झालं होतं.पण आम्ही उभारलेल्या बागेला जरासुद्धा आगीची झळ लागली नव्हती.


आम्ही सर्व घराबाहेर उभे राहून जळतं घर बघत होतो.आणि पाठ फिरवून बागेकडे अचंबीत होऊन पाहात होतो.इतक्यात एक वयस्कर गृहस्थ माझ्या वडीलांकडे येऊन म्हणाले,
"मला थोडी ती लालबूंद दिसणार्‍या फुलांची रोपटी मिळतील काय?"
त्याचा प्रश्न ऐकून माझे वडील चक्रावले गेले.कुणी एखादा एव्हडा असंवेदनाशील होऊन एव्हड्या दुर्दैवी घटनेकडे डोळे झाक करून नगण्य़ अशा लालबूंद फुलांच्या रोपासाठी विचारपूस करील.?


नंतर माझ्या लक्षात आलं की,त्या जळून गेलेल्या घराकडे त्याचं लक्ष नसावं.त्या कोसळून पडलेल्या गजाच्या खिडक्या त्याने पाहिल्याच नसाव्यात, आगीच्या धगाने निर्माण झालेला तो जुनाट घराचा उग्र वास त्याच्या नाकात गेलाच नसावा.त्याचं ध्यान फक्त आमच्या बागेमधल्या सुंदर लालबूंद फुलांकडेच होतं.
माझ्या वडीलांनी आणि मी काही रोपटी जमीनीतून उपटून त्याला दिली.त्या अनोळख्याने नकळत त्या लालरंगाच्या फुलांची निवड आणि लाल भडकदार आगीने भस्मसात झालेलं घर यामधली सर्वमान्य विचारधारा सुचित करण्याचा जणू प्रयत्न केला होता. ती रोपटी हातात पडल्यावर तो अनोळखी, जमलेल्या गर्दीतून वाट काढत कुठे दिसेनासा झाला.आपल्या सर्वांचंपण असंच होतं.रोजच्या कामाच्या घाईगर्दीत एखादं महत्वाचं काम असंच दुर्लक्षीत होतं.


त्या सुंदर लालबूंद फुलांचं मुळ वंश कुठचा ते माहिती करून घेण्याच्या प्रयत्नात मी नेहमीच असतो.परंतु,मला माहित आहे की त्याचं मुळ आणखी कुठच्याही बागेत सापडण्यासारखं नाही.त्याचे परिणाम मात्र माझ्याच खोल अंतरात आहेत.
म्हणूनच मला नेहमी वाटतं,सौन्दर्य आपल्या अवतीभोवती असतं आपण निवड करून ते शोधलं पाहिजे."

माधवचं हे म्हणणं मला एकदम पटलं.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Thursday, January 12, 2012

आजोबांची ती आरामखुर्ची.



"म्हणूनच मी म्हणतो, सर्वांनीच "त्या गोष्टीची" दुसरी बाजू शोधून पहाण्याचं धाडस करून पहावं मग "ती गोष्ट" काही का असेना."


एकदा मी राजेन्द्राला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो.घरात राजेन्द्र नव्हता.त्याच्या पत्नीने माझ्या हातात वर्तमान पत्र देऊन ती मला म्हणाली,
"ते केस कापायला सलुनात गेले आहेत.इतक्यात येतील तोवर तुम्ही हॉलमधे पेपर वाचत बसा.मी तुमच्यासाठी गरम ताजा चहा बनवते."
"नको नको मी राजेन्द्राबरोबर चहा पियीन.तो पर्यंत बाहेर बाल्कनीत पेपर वाचत बसतो."
असं म्हणून मी त्यांच्या बाल्कनीत गेलो.तिथे एक आरामखुर्ची मी पाहिली.त्या आरामखुर्चीत बसून मी पेपर वाचीत होतो.वाचता वाचता मला डुलकी लागली.आणि दिवास्वप्न पडलं.मी माझ्या आजोबांच्या आरामखुर्चीला स्वप्नात पाहिलं.नंतर मला सर्व काही आठवायला लागलं.


कोकणातल्या आमच्या घराच्या पडवीला लागून एक खोली होती.ती माझ्या आजोबांची खोली होती.खोलीला दोन समोरासमोर गजाच्या खिडक्या होत्या.दोन्ही खिडक्या उघड्या ठेवल्यावर क्रॉस-व्हेन्टीलेशन मुळे खोलीत वारा वहायचा.पूर्वेकडे असलेल्या खिडकी जवळ माझे आजोबा एका आरामखुर्चीवर बसायचे. खिडक्याना उंची असली तरी त्या भिंतीत सखल भागावरून बसवल्या होत्या त्यामुळे आजोबा आरामखुर्चीवर बसून घराबाहेरचं सृष्टीसौन्दर्य सहजपणे पहायचे.


माझे आजोबा जर का पलंगावर झोपलेले नसले तर नक्कीच ह्या खूर्चीवर बसलेले दिसायचे.कधीकधी खुर्चीवर बसल्या बसल्या त्यांना लखणी यायची.अर्थात ती जागृत झोप असायची.मी आजोबांबरोबर गप्पा गोष्टी करायला आलो असताना त्यांच्या जवळच ठेवलेल्या एका स्टुलावर बसायचो.

त्यांच्या खूर्चीवर ती रिकामी असताना बसायचं मी कधीच धाडस केलं नाही.माझ्या आजोबांनी मला खूर्चीवर बसायला कधीच मज्जाव केला नव्हता.ही त्यांच्या खोलीतली आरामखुर्ची अशा धाटणीत खिडकीजवळ ठेवलेली असायची की तिची जागा काहीशी अडचणीची वाटायची.जवळच असलेल्या एका स्टुलावर आजीनेच वीणलेला एक रंगीत पोश असायचा आणि त्यावर तांब्याचा तांब्या आणि त्यावर पितळेचं फुलपात्र ठेवलेलं असायचं.
विहीरीतल्या थंडगार पाण्याने तो तांब्या सकाळीच भरून ठेवलेला असायचा.माझ्या आजोबांची तशी शिस्त असायची.


आजोबांच्या खुर्चीची मजेदार गोष्ट म्हणजे,माझे आजोबा असेपर्यंत आणि त्यानंतरही ती खुर्ची जागच्या जागी ठेवली जायची.माझे आजोबा असताना आणि ते गेल्यावरही मला कुणाचा अटकाव नसतानाही त्या खुर्चीवर मी कधीच बसलो नव्हतो.एकदापण नाही,पण एकदिवशी,म्हणजे माझे आजोबा गेल्यानंतर साधारण एक महिन्यानंतर मी त्या आरामखुर्चीवर बसलो.


माझे आजोबा हयात असण्यापासून रोज सकाळी,सूर्योदय झाल्यावर,किंवा साधारण सकाळच्या सहा वाजता, मी उठून सकाळची नित्याची कामं उरकल्यावर शर्ट आणि खाली सफेद लेंगा चढवून कोल्हापूरी चप्पल घालून माझ्या रॅले सायकलवर आरूढ होऊन दोन मैलावर असलेल्या पावाच्या बेकरीत जाऊन पाव विकत घेऊन यायचो.माझ्या आजोबांना आवडणारे,वरून तांबूस रंगाचे गोड मऊ, गरम गरम बनपाव आणायचो.आजोबा
सकाळीच चहात बुडवून बनपाव खायचे.


 आजोबांच्या आरामखुर्चीशी माझा पहिला आकस्मिक सामना ज्या दिवशी झाला तो दिवस शनिवार होता.खूप दिवसानी मी शनिवारचा घरी होतो.मी सकाळी उठायला जरा उशीर केला.जाग आल्यावर बिछान्यातून उठून, धडपडत स्वयंपाकघरात जाऊन किट्लीत होता तो कपभर चहा कपात ओतून
बाहेर येण्यासाठी पडवीत आलो.अर्धवट झोप डोळ्यात होती.आजोबांच्या खोलीत सहजच डोकावून पाहिलं.मला बराच थकवा आल्यासारखं वाटत होतं.
गेले दोन महिने सतत कामाच्या झालेल्या ओझ्याने माझ्या झोपेचा चुराडा झाला होता.कसलाच विचार न करता ओणवा होत आजोबांच्या खुर्चीत जाऊन बसलो.


झापड आलेले डोळे किंचीतशे किलकीले करून खुर्चीवर बसल्या बसल्या खिडकीतून बाहेरचा देखावा मी पाहू लागलो.यापूर्वी अशा पोझमधे मी बाहेर कधीच पाहिलं नव्हतं.
वडीलांच्या मांडीवर बसायला सावत्र आईने मनाई केलेल्या ध्रुव्वाला, वडीलांच्या मांडीवर बसायला मिळावं तसंच काहीसं मला माझ्या ह्या आजोबांच्या खुर्चीवर पहिल्यांदाच बसल्यावर वाटलं.


तेव्हड्यात माझ्या लक्षात आलं की मला कधीही आजोबांनी बसायला मनाई न केलेल्या ह्या खुर्चीवर मी प्रथमच बसलो असताना त्यांची ती खोली मला भव्य आणि शानदार वाटत होती. त्या खूर्चीवर मी बसल्यानंतर त्याच सूर्यप्रकाशाने माझ्या आजोबांच्या खोली्ला एव्हडं प्रकाशीत केलं होतं की ती खोली मी तशी कधीच पाहिली नव्हती.ध्रुवावाला वडीलांच्या मांडीवर बसल्यावर वाटलं असेल त्याच्या पेक्षा कतीतरी पटीने मला ह्या खुर्चीवर बसल्यावर वाटलं.


मी तिथेच अगदी शांतपणे बसलो होतो.नव्याने दिसणार्‍या त्या खोलीत मी अगदी तल्लीन झालो होतो.निस्तब्ध असलेल्या त्या माझ्या प्रतिवर्तनांच्या क्षणात आजोबांच्या खोलीत,अडचणीत ठेवली आहे असं भासणार्‍या, त्या खू्र्चीने मला काहीसं परिवर्तनशील जीवन समजावण्यासाठी मदत केली.
शिवाय त्या आरामखुर्चीने जो मला धडा शिकवला त्याने एक नवी श्रद्धा प्रतिपादित करायला मला मदत झाली.


त्यानंतर मला नेहमी असंच वाटायला लागलं की,एखाद्या गोष्टीशी तुम्ही कितीही परिचित आहात असं तुम्हाला वाटलं तरी त्या गोष्टीकडे पहाण्याचा नेहमीच दुसरा दृष्टीकोन असू शकतो.
जरी तुम्ही कितीही वेळा एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्याला पाहिलंत किंवा अनुभवलंत,तरी त्याला नेहमीच दुसर्‍या बाजूने अनुभवता येतं,ज्याची तुम्ही कदाचीत कल्पना करायलासुद्धा सुरवात केली नसेल.
ह्या साध्या कल्पनेने त्यानंतर माझ्या जीवानातून नैराश्याला दूर केलं गेलं.कारण जिथे एखाद्या गोष्टीला दुसरा छुपा दृष्टीकोन असू शकतो तिथे नैराश्याला जागाच नसते.


त्या दिवशी ज्या आरामखुर्चीला मी थोडीशी अडगळीत आहे असं समजत होतो त्याच खुर्चीने मला शिकवलं की,मी कुणालाही अडगळ म्हणू शकत नाही.कारण अशी शक्यताही असू शकते की,त्या गोष्टीला दुसरी एखादी मजेदार किंवा असामान्य बाजू असू शकते ज्यामुळे माझा दृष्टीकोन बदलू शकतो.
म्हणूनच मी म्हणतो, सर्वांनीच "त्या गोष्टीची" दुसरी बाजू शोधून पहाण्याचं धाडस करून पहावं मग "ती गोष्ट" काही का असेना.माझा ह्या म्हणण्यावर विश्वास आहे."

राजेन्द्र केस कापून घरी केव्हाच आला असावा.
बहुदा,मला जाग आली आहे असं पाहून तो चहाचा कप घेऊन मला द्यायला बाल्कनीत आला.आजोबांच्या आरामखुर्चीच्या ह्याच आठवणी मी त्याला वर्णन करून सांगीतल्या.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com    


 

Monday, January 9, 2012

ती पण मुलंच आहेत.




"माझ्या कानाजवळ त्याचा श्वास-उश्वास ऐकून,त्याच्या प्रत्येक हालचाली पाहून मंत्रमुग्ध होऊन मी जागंच रहाण्याच्या प्रयत्नात होते."


कोदेवकीलांच्या घरी सर्वच वकीलीपेशात लागले होते.कोदे स्वतः,त्यांची दोन मुलगे,एक मुलगी आणि आता त्यांची मोठी सून सर्वच वकील होती.
कोद्यांची मोठी सून म्हणजेच मुणाल माझ्या परिचयाची होती.तिच्यामुळेच माझी कोदे कुटूंबाशी ओळख झाली.
मृणालचं लग्न होऊन झाली असतील पाचएक वर्षं.तिला आता दोन मुलं आहेत.लहान मुलगा असेल एक वर्षाचा.मी शहरात गेल्यावर मृणालची किंवा तिच्या नवर्‍याची आणि माझी कोर्टापाशी बरेच वेळा भेट व्हायची.कधी कधी दोघंही एकाच वेळेला भेटायची. रस्त्यावरून चालतानासुद्धा त्यांच्या कायद्याच्या गप्पा चालायच्या.
ह्यावेळेला मला मृणालचा नवरा एकटाच दिसला.चौकशी केल्यावर कळलं की मृणाल आता सबर्बनमधे जुवनाईल कोर्टात केसीस घेते.लहान मुलांवर झालेल्या आरोपातून पब्लिक डिफेन्डर म्हणून तिला काम करण्याची संधी मिळाल्याने ती फारच स्वारस्य घेऊन काम करते.


"मुणाल तुमची आठवण काढते.बरेच दिवस तुम्ही आमच्या घरी आला नाही.तेव्हा वेळ काढून कधीतरी या"
असं मृणालचा नवरा मला त्यावेळी म्हणाला होता म्हणून मी आज त्यांच्या घरी गेलो होतो.


"तुझा नवीन जॉब कसा काय आहे? जुवनाईल कोर्टात कसं चालतं ह्याचं मला कुतूहल आहे म्हणून विचारतो."
असं मी मृणालला म्हणाल्यावर,ती मला म्हणाली,
"अगदी नव्यानेच मी हा जॉब करीत आहे.त्यामुळे रोजचं काम हा माझा ह्या विषयातला नवीन अनुभव म्हणून जमा होत आहे.
असं म्हणून,मांडीवर घेतलेला आपला मुलगा मृणालने पाळण्यात ठेवला आणि त्याच मुलाचा विषय काढून माझ्या जवळ येऊन मला म्हणाली,
"कालचीच घटना मी तुम्हाला सांगते.
काल रात्री माझा मुलगा माझ्या हाताच्या घडीवर जणू पाळण्यात झोपावं तसा झोपला होता.माझ्या खांद्यावर त्याचं ते इवलूसं डोकं,माझ्या छातीवर त्याचा इवलूसा हात आणि त्याचे दोन्ही पाय माझ्या कंबरेवरच्या निर्‍यात खोचले गेलेले अशी त्याची पोझ होती.


माझ्या कानाजवळ त्याचा श्वास-उश्वास ऐकून,त्याच्या प्रत्येक हालचाली पाहून मंत्रमुग्ध होऊन मी जागंच रहाण्याच्या प्रयत्नात होते.त्याचं झोपेतलं खिदखिदणं पाहून,एक वर्ष वयावर काय मजा येत असेल ह्याचा मी विचार करीत होते.त्याला वाटत असावं की,आईच्या सानिध्यात आपण किती सुरक्षीत आहो.त्याचं शरीर  आईच्या अंगावर आराम घेत आहे, त्याचं श्वसन हळुवार झालेलं आहे पण सावध झालेलं आहे ते मला भासत होतं.
त्याच्या सभोवतालचं वातावरण शांत असल्याचा त्याला वाटणारा भास सूदंर असावा.माझी तीन वर्षाची मुलगी बाजुच्याच कॉटवर शांत झोपली होती.
दिवसभराच्या घाईगर्दीच्या जीवनातून ती थकलेली होती.माझं तिच्याकडेही लक्ष होतं.कदाचीत ती जागी झाल्यास सर्व काही आलबेल आहे हे तिला चटकन कळावं हा माझा उद्देश होता.एव्हड्याश्या तिच्या जीवनात ती बरीचशी स्वावलंबी झाली होती.


हे माझं माझ्या घरातलं वातावरण होतं.रोज सकाळी मला माझ्या कामावर गेल्यावर जे वातावरण माझं स्वागत करतं ते ह्या माझ्या घरच्या वातावरणाशी पूर्णपणे असादृश्य आहे.पब्लिक डिफेन्डर म्हणून कोर्टात वकीली करण्याचा माझा जॉब असल्याने,मला कोर्टात मुलांचे असे नमुने दिसायचे की समाजाने त्याच्यावर "गुंड","चोर," "बलात्कारी" "छेड काढणार" असली लेबलं लावली होती.आणि ही लेबलांची यादी मोठी होती.पण ती लेबलं दूर केल्यास ती पण मुलंच होती.


ह्या मुलांच्या सानिध्यात राहून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिल्यावर आणि त्यांच्याशी त्यांच्या जीवनाविषयी,त्यांच्या घराविषयी,त्यांच्या स्वप्नाविषयी चर्चा करायला मला संधी मिळते.त्यांच्या जवळ बसून डोळे पाणावतात,माझ्या मनात समाजाचा राग आणला जातो,समाजातील विषमतेचा उद्वेग येतो पण जास्त करून माझं मन दुःखीच होतं.त्या मुलांच्या मनातलं खोल दुःख त्यांच्या नजरेतून चमक देऊन जातं.
त्यांना हरवले गेल्याचं,त्यागल्याचं,यातना दिल्याचं,लेबल लावल्याचं,फेकून दिल्याचं,भिरकावून टाकल्याचं दुःख मला सलतं.
समाजातल्या विषमतेतून निर्माण झालेल्या समस्येतून,गरीबीतून, जमेल तेव्हडी जोपासना करणार्‍या कुटूंबातून ही मुलं आलेली असतात.त्यांची अजीबात गय केली गेली नाही अशा कुटूंबातून ही मुलं आलेली असतात.


बर्‍याच जणांचे आईबाप,पण जास्त करून आयाच,कोर्टाच्या लॉबीमधे दिवसा मागून दिवस येऊन बसलेल्या मी पाहिल्या आहेत.त्या मुलांवर कसलेही दारुण आरोप लावून,कसलीही लेबलं लावून त्यांना तिथे आणली गेली असताना,त्या निन्दनीय रस्त्यावर पोरकी झालेल्या त्या मुलांची सोडवणूक करण्यासाठी ती मंडळी आलेली असते.
काहीवेळा त्या मुलांचे असेही आईबाप मी पाहिलेले आहेत की,ते त्यांच्या मुलांचा तिकडेच कायमचा त्याग करून जाण्याच्या तयारीने आलेले असतात.दरदिवशी मी कोर्टात माझ्या कामावर गेल्यावर माझ्या आशेचा भंग झालेला पाहिला आहे.


प्रत्येक वेळेला एखाद्या मुलाची संस्थेत भरती होते,किशोर वयाच्या मुलांची बंदीखान्यात रवानगी होते,एखाद्या मुलाला प्रौढांच्या कोर्टात नेऊन निकाल मिळाल्यावर आयुष्यभर बंदीखान्यात रवानगी होते.ह्या मुलांच्या भावी स्वप्नांचा त्याग केला जातो.
मला नेहमीच वाटतं की,ही मुलं हे समाजाचं भवितव्य आहे.जरी आपल्याला हे कबूल करायचं नसेल,जरी आपल्याला ती उपद्रवी वाटत असलं तरी.


ती मुलंसुद्धा आपल्या आईच्या खांद्यावर झोपी गेलेली असतील किंवा झोपी जावं अशी त्यानी इच्छाही केली असेल,त्यांनाही स्वप्न असतील,उमेद असेल,कल्पना असतील.तीही त्यांच्या लहान वयात झोपेत खिदखीदली असतील.
पण नंतर काहीतरी घडलं असेल,काहीतरी शोकजनक,काहीतरी उदध्वस्त झालं असेल की ज्यामुळे त्यांचं तारूण्य़,त्यांच्या आशा-आकांक्षा,त्यांचा आनंद धुळीला मिळाला असेल.
माझ्या मनात नेहमी येत असतं की एकनाएक दिवस हे नष्ट झालेलं बालपण,ही त्यागलेली स्वप्नं आणि धुळीला मिळालेली जीवनं परत मार्गावर आणता येतील.


दरदिवशी जेव्हा मी घरी पोहोचते तेव्हा माझ्या मुलांना मी छातीशी कवटाळते आणि त्यांच्या कानात परत परत पुटपूटते,
" तुम्ही माझे प्राण आहात"
आणि मी जेव्हा अशी आशा करीत असते तेव्हा कामावर सोडून आलेल्या त्या मुलांचा मला विसर पडत नाही. मी दोन विश्वात वास्तव्य करते.एक वचनबद्ध विश्व आणि एक शोकांन्तिकेचं विश्व.
मी ह्या गोष्टीचा विसरही पडूं देत नाही की ही माझ्या कामावर भेटणारी मुलं,त्यांच्यावर कसलेही आरोप असोत,समाज त्यांच्या विषयी काहीही म्हणत असो,त्यांच्यावर कसलीही लेबल्स लागलेली असोत,ती मुलंच आहेत,आपलीच मुलं आहेत आणि आपलंच भवितव्य आहे.आणि मी हे पक्कं जाणलेलं आहे."

मृणालकडून हे सर्व ऐकून मला सर्रर्र झालं.ह्या जगात असंही चालतं हे पाहून माझं मन उदास झालं.मी मृणालला म्हणालो,
"तू नुसती वकीली करीत नाहीस तर एक समाजकार्य करीत आहेस असं मी म्हणेन.चांगल्या मार्गाला लागलेल्या त्या प्रत्येक मुलाकडून तुला दुवा मिळत रहाणार.अप्रत्यक्षपणे तुझ्या मुलांचं भलं होणार."
माझं हे ऐकून सहाजीकच मृणालचा चेहरा आनंदला.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com


Friday, January 6, 2012

अनवाणी चाल.



"अनवाणी चालण्यात मला जे सुख मिळतं ते मी निसर्गाशी एकरूप आहे ह्याचा विचार मनात  येऊन मला मिळतं."

दत्तू बांदेकराची नातवंडं अमेरिकेत असतात. त्यांना सुट्टी पडली की ती कधी कधी कोकणात आपल्या आजोबाकडे रहायला येतात.भारतात आल्यावर कुठल्याही शहरात जायला त्यांना कंटाळा येतो.जे अमेरिकेत नेहमीच दिसतं तेच तेच भारतातल्या शहरात दिसतं.ते पहाण्यात त्यांना गम्य वाटत नाही.कोकण आणि गोवा परिसर त्यांना खूपच आवडतो.कोकणात आपल्या आजोबांच्या घरी असताना सकाळचा नास्ता झाला की कोकणातल्या डोंगर दर्‍यात फिरायला जातात.काही डोंगरात त्यांनी स्वतःच्या पायावाटा काढल्या आहेत.


दोन्ही नातवंडं वनस्पतिशास्त्रात दिलचस्पी घेत असल्याने कोकणातल्या डोंगरावरच्या आणि रानातल्या निरनीराळ्या वनस्पती बघून त्यांना खूप आनंद होतो.भारताचा बराचसा भाग विषुववृत्तावर असल्याने कोकणातल्या डोंगरावरच्या वनस्पतीत त्यांना नाविन्य सापडतं.


डोंगरावर सापडणारी लाजाळुची झुडपं,निवडूंगातले प्रकार,अमाप जातीची फळांची झाडं,अनेक प्रकारची फुलं,वेली ह्या गोष्टी त्यांना तिकडे मुळीच पहायला मिळत नाहीत.त्याशिवाय कडूलिंबाच्या झाडाच्या पानाची औषधी गुण,तुळशीच्या पानांतली जंतुविरहित करण्याची द्र्व्य,अशा बर्‍याच विषयावर त्यांना खूप स्वारस्य आहे.


मागल्या खेपेला मी जेव्हा दत्तूला भेटायला कोकणात गेलो होतो तेव्हा तो आपल्या नातवंडांबद्दल सांगत होता.आणि हे सर्व सांगताना एक सांगायला विसरला नाही म्हणजे ती मुलं पायात वापरत असणार्‍या पायतानाबद्दल.त्यांचे ते निरनीराळ्या कारणासाठी वापरले जाणारे शुज पाहून दत्तू खुपच अचंबीत होतो.जॉगींगसाठी निराळे शुज,हायकींग आणि ट्रेकींगसाठी निराळे शुज,कुणाच्या घरी जायचं झाल्यास निराळी शुजची जोडी.


नातवंडांच्या शुज वापरण्याच्या सवयीवर माहिती देत असताना, दतू मला आपल्या लहानपणातल्या सवयी सांगत होता ते आठवलं.
मला द्तू म्हणाला होता,
"अनवाणी चालायला मला बरं वाटतं.मला आठवतं,कोकणात आमच्या गावी माझ्यासारखी आम्ही पाच-सहा मुलं होतो कुठेही गेलो तर अनवाणी जायचो.काही लोक आमच्या त्या वागण्याला पाहून म्हणायचे ही भंपकगीरी आहे.काही सांगायचे आम्हाला की तुमचे पाय खरचटून खराब होतील.पण आम्ही कुणाच्याच म्हणण्याची पर्वा केली नाही.


मला आठवतं की खूप उन्हाळा असला की आम्ही फक्त आमच्या घराच्या आजुबाजूलाच अनवाणी फिरायचो.मात्र थंडी आणि पावसाळा आला की आम्ही अनवाणीच फिरायचो.बाहेर खेळायला मैदानात गेल्यावर आमच्या उघड्या नागड्या पायानी चिखलात,गवतावर,सुकल्या पाचोळ्यावर आम्ही  चालत असायचो.
माझ्या काही मित्रांचे आईबाबा म्हणायचे की हे आम्ही करतो तो शुद्ध वेडेपणा आहे आणि एकनाएक दिवस आम्ही दुखापत होऊन आजारी पडणार. पण असं कधीच झालं नाही.उलटपक्षी आमच्यासारखी निरोगी मुलं आमच्या आम्हीच होतो.


फक्त उन्हाळ्यात अनवाणी चालण्याने थोडा त्रास व्हायचा.पण उन्हाळा संपता संपता आमच्या पायांचं रुपांतर पायताण होण्यात व्हायचं.पायचे तळवे एव्हडे दमदार मजबूत व्हायचे की आम्ही कशावरही चालायचो. रानातून चालत जाताना पाण्यात बुडलेल्या गवतावरून,पायवाटेवर येणार्‍या उंचवट्यावरून,जमिनीवर आलेल्या झाडांच्या मुळावरून सहजपणे चालायचो.


कधीकधी एकमेकात धावण्याची चुरस लावून खडबडीत रस्त्यावरून धावताना,रस्त्याच्या कडेला जमलेल्या चिखलमिश्रीत पाण्याच्या डबक्यात पाय बुडवून पायाचे तळवे थंड करून घ्यायचो.बाजारात जायचं झाल्यास गरम पायवाटेवरून धावत जायचो,मे महिन्याच्या कडक उन्हाळात,अगदी गरम झालेल्या फरशीवर चालताना पाय चुरचुरून यायचे.कुठेही गेलो तरी अनवाणीच फिरायचो.
कधी कधी घरी आल्यावर पायाकडे पाहिल्यावर खरचटलेली पायाची बोटं आणि चर आलेले पायाचे तळवे पाहायला मिळायचे.पण त्यामुळे आम्ही खच खाल्ली नाही.कारण अनवाणी चालणार्‍याचा आमचाच कंपू होता.


आमच्यापैकी कुणीही आपल्या बाबांबरोबर बाजारात खरेदीसाठी गेलो असताना मधेच जरका बाबांनी आम्हाला अनवाणी चालताना पाहिलं तर घरी परतून जायला सांगायचे.घरी जाऊन पायताण घालून यायला सांगायचे.आम्ही परत जायचंच टाळायचो.भर बाजारात आम्ही अनवाणी आहोत असं त्यांच्या लक्षात आल्यास,
"अनवाणी पायानी आत येण्यास मनाई आहे"
असा बोर्ड असलेल्या हॉटेलात आम्हाला आवडीची भजी आणि बटाटेवडे खायला मिळायचे नाहीत.


आता ह्या वयातही मला चप्पल,बूट पायात वापरायला कंटाळा येतो.कुठेही अनवाणी जाण्याचा आमचा लहानपणाचा शिरस्ता मी कधीही विसरणार नाही.माझी मुलं जरा मोठी झाली की तीही माझं अनुकरण करतील अशा आशेवर मी असायचो.अनवाणी चालण्यात मला जे सुख मिळतं ते मी निसर्गाशी एकरूप आहे ह्याचा विचार मनात येऊन मला मिळतं.
अनवाणी चालण्यावर माझा भरवसा आहे."


हे सर्व दतूचं पादत्राणांवरचं लेक्चर ऐकून मी त्याला म्हणाल्याचं आठवतं,
"बाबारे दत्तू,मुलं तुझी आहेत ती कदाचीत तुझं अनुकरण करतील हा तुझा विचार ठीक होता. पण नातवंडं तुझ्या मुलांची मुलं आहेत आणि अमेरिकेत असल्यावर तुझं अनुकरण सोडाच आपल्या बाबांचही अनुकरण करणार नाहीत कारण जमाना बदललेला आहे आणि तिकडचा जमाना व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेला आहे."




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com



Tuesday, January 3, 2012

"ते शक्य आहे आणि ते करीनच"




"हा काही माझा पहिला किंवा माझा पन्नासावा नकार मिळण्याचा अनुभव नव्हता."


तो रविवार होता.पेपर वाचून झाल्यावर,टीव्हीवरची सकाळची न्युझ बघून झाल्यावर कंटाळा घालवण्यासाठी शेजारच्या वामनच्या घरी सहज गप्पा मारायला गेलो होतो.वामन पास टाईम म्हणून त्याच्या लॅपटॉपवर इमेल वाचत बसला होता.मला पाहून ते काम बंद करून माझ्याशी गप्पा मारायला बसला.


तेव्हड्यात त्याची मुलगी सुनंदा आली आणि त्याला म्हणाली,
"आम्ही जीवश्च-कंटश्च तीन मैत्रिणी पण आमच्या पैकी एकीला आम्हाला मिळाला त्या कॉलेजात तिला प्रवेश नाकारला.ती खूपच नर्व्हस झाली आहे.त्या कॉलेजच्या प्रिन्सिपालची आणि तुमची ओळख आहे.काही करून पहाल का?"


वामनने त्याच्या मुलीला प्रयत्न करून पहातो पण आश्वासन देत नाही.असं उत्तर दिलं.ती निघून गेल्यावर मला म्हणाला,
"नकार मिळणं,अस्वीकार होणं,नापसंती दाखवली जाणं ह्या गोष्टींचा जीवनात जो अनुभव मिळतो त्याबद्दल मला नेहमीच विशेष वाटत असतं.शाळेत असताना,शेवटचा नंबर मिळणं,अस्वीकार होणं,शाळेतल्या खेळातल्या टीममधे निवड न होणं ह्याबद्दलही मला त्यावेळेला विशेष वाटायचं.
तसंच माझ्या स्वतःच्या जीवनात किंवा माझ्या व्यावसाईक जीवनात काहीतरी अगदी आवश्यक आहे असं वाटत असताना ते मिळणं अशक्य आहे असं मला सांगीतलं जावं ह्याबद्दलही मला विशेष वाटतं.


मला मनोमनी वाटतं की,हा एकच अनुभव आहे त्यातून आपल्याला अप्रत्यक्षपणे समजतं की आपण जीवनात अग्रगति येण्यासाठी, भरपूर कष्ट घेण्याच्या प्रयत्नात आहो,जीवनात भरपूर धोका पत्करण्याच्या प्रयत्नात आहो.जर का आपल्याला नकार मिळण्याचा अनुभव मिळत नसेल तर समजावं आपण कोणताही नवा किंवा कठीण प्रयत्न करीत नाही.हे असं होणं खरोखरच जास्त यातनादायक,आणि तथ्य असलेली बाब आहे.
"जोखिम नाही तर लाभ नाही"
ह्या उक्ति पेक्षाही.


मी जेव्हा अगदी लहान होतो,किशोर वयात होतो तेव्हाही,प्रत्येक नकार मला खूप यातना देऊन जायचा.कधी कधी हा नकार स्वीकारताना माझ्या डोळ्यात पाणी यायचं, निष्टूर आलोचना व्हायची.तसा माझा स्वभाव खूपच भावनाप्रधान आहे.मी आवडला जावा असं मला वाटायचं, तसंच इतराना खुशीत ठेवायला मला आवडायचं.


अलीकडेच माझ्या जीवनात एक घटना घडली.त्यामुळे माझ्या लहानपणी झालेल्या निष्टूर आलोचना आणि माझ्या किशोर वयात मला मिळालेल्या सर्व नकारांचा मी ऋणी झालो आहे.


हा काही माझा पहिला किंवा माझा पन्नासावा नकार मिळण्याचा अनुभव नव्हता,पण काही कारणास्तव ह्या घटनेचा मला झालेला दंश पूर्वीच्या झालेल्या घटनांच्या दंशापेक्षा कित्येक पटीने जहरी होता.


मी एका योजनेत भाग घेण्यासाठी अर्ज केला होता.मला तेव्हा वाटलं होतं की मला जे काही आयुष्यात करीअर म्हणून मिळवायचं होतं ते साध्य व्हायला हा चांगला मोका मिळत आहे.पण जे नकारात्मक पत्र मला आलं ते विनम्र किंवा साभार परत अशा पद्धतीचं नव्हतं.परंतु,ते काहीसं हानिकारक आणि खालच्या दर्जाची प्रत्यालोचना करण्यासारखं होतं.
"तुम्ही ह्यासाठी लायक नाही आणि कधीही नसणार"
असा तो मजकूर होता.


तरीसुद्धा सुरवातीला मला मिळालेला धक्का सहन केल्यानंतर -मी अभिमानाने म्हणेन माझ्या डोळ्यात एकही अश्रू आला नाही.-उलट माझ्यातला पक्का इरादा वाढू पहात होता की माघार न घेता आपल्या मनातला उद्देश साध्य करायला झटावं.माझ्या मनातलं साध्य करण्याचा इरादा,नकार मिळाल्याच्या यातनाना,पार करून जात होता.ह्यातून माझ्या एक लक्षात आलं की,नकार मिळण्याच्या अनुभवातून माणूस आपली प्रगति कशी करू शकतो ते.

माझा आता भरवसा बसला आहे की,खेळपट्टीवर होणार्‍या अवमानाने आणि शाळेत होणार्‍या अशाभंगाने,तरल किंवा तितकीसे तरल नसलेले अवमान आपल्या प्रौढ वयात सहन करायाला आपण तयारीत असतो. नकार मिळाल्याने आपल्याला खरंच काय हवंय,किती हवंय आणि त्यासाठी किती
जोखिम घ्यावी हे समजायला मदत होते."


वामनचं हे सर्व ऐकून झाल्यावर मी त्याला उठता उठता म्हणालो,
"मला वाटतं अवमानातून आपल्यात क्षमता येते. मला वाटतं,ते क्षण जेव्हा दुसरा कोणही तुम्हाला म्हणतो,
"तुम्हाला ते शक्य नाही आणि तुम्ही ते करू नका"
तेव्हा आपल्या अंतर मनातला आवाज सांगतो
"ते शक्य आहे आणि ते करीनच"



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com