Sunday, November 30, 2008

माझ्या यशाची पहिली चव.

कोकणातल्या पिंगुळी गावात जाऊन एका शाळेला भेट देण्याचं कारण,मी माझ्या मावशीच्या मांडकूली गावात गेलो होतो.तिथे पिंगुळी गावचा विषय- नलिनीने- माझ्या एका मावस बहिणीने काढला.ती मला म्हणाली,
“अरे पिंगुळी गावात वसुंधरा साने नावाची माझ्या वयाची मुलगी माझ्या जवळ फार पूर्वी आली होती.आणि मी तुझी त्यावेळी तिच्याशी ओळख करून दिल्याचं तुला आठवत असेल.ती आता तशी मुलगी राहिली नाही.मुंबईत चांगलं शिक्षण घेऊन तिकडेच नोकरी करण्याचं नाकारून आपल्या गावाची उर्जितावस्था करण्याच्या इराद्दाने,पिंगुळीला आली.बरीच वर्ष ती इकडे आहे आणि तिने शिक्षणाच्या दृष्टीने खूपच कायापालट केला आहे.हवं तर आपण तिला भेटायला जाऊया.तू तिची स्टोरी ऐकून नक्कीच खजील होशील.मला ही तिला बरेच दिवसानी भेटण्याचं निमीत्त मिळेल.
दुसर्‍या दिवशी आम्ही वसुंधराला भेटायला पिंगुळीला गेलो.मांडकूली पासून ते अवघ्या तीन मैलावरच आहे.आम्ही चालत चालत गेलो.आम्हाला पाहून वसुंधरेचा आनंद गगनात मावेना.आमचं आगत-स्वागत वगैरे करुन झाल्यावर आमची तिच्या एकंदर कार्याची चर्चा झाली.
मी तिला म्हणालो,
“ह्या व्यवसायात तू स्वतःला कसं झोकून दिलंस?”
मला वसुंधरा म्हणाली,
“जेव्हां जव्हां मी इकडे यायची तेव्हा तेव्हा इथल्या लोकल जनतेचं सांगणं,
“आम्ही खूप प्रयत्न करतो पण मुलंच शिकत नाहीत.”
माझा माझ्या शिक्षणातला अनुभव जमेला धरून मी हे एक चॅलेंज घेतलं की ही सबब खोटी करुन दाखवायची.
मुलं शिकत नाहीत ही सबब मी कधीच स्वीकारू शकत नाही.तुम्हाला मुलांना दोष देता येणार नाही.मुल जर शिकण्यात यशस्वी झालं नाही तर समजावं की त्याच्या सानीध्यात असलेल्या माणसाचं ते अपयश आहे,मुलाचं नाही.
मी ज्यावेळी म्हणते की सर्व मुलं शिकू शकतात आणि हे असं मी मानते हे ऐकल्यावर काही लोकांचा गैरसमज होतो.
कारण मी माझ्या गावातल्या अगदी गरीब लोकांच्या वस्तितल्या मुलांशी जवळून गेली पंचवीस वर्षे काम करीत आलेली आहे.काही लोकाना वाटतं की त्या वातावरणातल्या मुलांमधल्या चांगल्या हुषार मुलांविषयी मी बोलत असते त्या मुलांमधल्या बुद्धिवान मुलांना चांगलं शिक्षण दिलं तर ती यशस्वी होतात असं मला म्हणायचं आहे असं वाटून बोलते.तसं होणं हे अगदी खरं आहे.पण मला तसं मुळीच म्हणायचं नाही.
हे पहा,मला अगदी मनापासून वाटतं की सर्व मुलं शिकू शकतात.मी तसं मानते.मी ते पाहिलंय.आणि मी त्याचा अनुभवही घेतलाय.
मी माझं शिक्षण घेताना अगदी कठीण समस्या असलेल्या मुलांबरोबर काम केलं आहे.भावना दुखावलेली मुलं,स्वलीन(autistic)मुलं,थोड्या मंद बुद्धिची मुलं,वागायला कठीण जातील अशी मुलं,थोडक्यात त्या मुलांच्या आईबाबानी संभाळायला त्यानी हात टेकलेली मुलं अशा प्रकारच्या मुलांबरोबर काम केलं आहे.
एक साधी गोष्ट पहा.मी आणि माझे सहकारी ह्या मुलांबरोबर एखादी खाण्याची गोष्ट कशी बनवायची ह्या पासून सुरवात करायचो.आता नानकटाई बनवण्याचंच घ्या.त्याना बेकिंग पावडर आणि मीठ ह्यातला समोर बघून फरक कळत नसायचा.पण एकदा का ती गरम गरम नानकटाई भट्टीतून काढून त्यावर थोडं साजूक तूप आणि मधाचा एक चमचा वाढून त्यानी खाल्ली,का मग ती मुलं नवीन नानकटाई कशी करायची ह्यासाठी प्रेरीत व्ह्यायची.

एकाएकी जी मुलं स्थीर न बसता सारखी चुळबुळ करीत र्‍हायची किंवा नीट एकाग्र होत नसायची ती आता एखादी डीश बनवली तर त्याला लागणार्‍या निरनीराळ्या मूळ पदार्थाचं प्रमाण किती असतं त्याकडे निक्षून बघायची.साध गणीत किंवा स्पेलिंग करायची.कालान्तराने मला आठवतं त्यांचे आईबाबा ही त्यांची प्रगती पाहून आनंदाने रडायची.

नानकटाई,बर कां,खूप चवदारी होती.आणि आता आज मला त्याची चव आठवते. आणि त्याशिवाय त्यानी मला शिकवलेला धडा आठवतो की जरका आपण मोठी माणसं,त्यांच्यासाठी योग्य अशी प्रेरणा त्या मुलासाठी निर्माण केली तर ते मुल शिक्षीत व्ह्यायची आशा करायला हरकत नाही.
सध्या मी आजूबाजूच्या खेड्यातली मुलं शाळेत जावी म्हणून शाळा निर्माण करायच्या खटपटीत असते.शेकडो मुलांबरोबर मी संपर्क ठेवून असते.माझ्या सर्व सहकर्‍याना माहित आहे,की मला अमुक अमुक मुल शिकत नाही ही सबब मुळीच पसंत नाही.मुलांना तुम्ही दोषी ठरवू शकत नाही.माझ्या कारभारात जर का मुल यशस्वी होऊ शकलं नाही तर त्याचा अर्थ त्याच्या भोवतालची मोठी माणसं अपयशी ठरली आहेत.
त्याचं कारण अति कठीण समस्या घेऊन मुलं एकाएकी स्वतःला शिकवायला जाणार नाहीत.मी मानते की मोठ्यानी त्यांना मदत केली पाहिजे.आणि ते प्रत्येक मुलाकडे निरखून पाहून त्यांना कशाने स्फुर्ती मिळते ते पाहून त्यांच्या त्या स्फुर्तीला अगदी नीगरघट्ट होवून चालना देता आली पाहिजे.

माझे वडील हयात नव्हते.माझ्या आईने आम्हा चार मुलांना वाढवलं.मी तर अभ्यासात दुर्लक्ष करीत राहिले.जर का माझी त्या दोन शिक्षकांशी भेट झाली नसती तर मी कुठच्या कुठे वाईट मार्गाला लागले असते.त्यानी मला आवडतील अशी पुस्तकं-साने गुरजींच काही पुस्तकं,काही सुंदर सुंदर कवितांची पुस्तकं देवून माझ्या मनात वाचनाची गोडी आणून दिली नसती तर हा माझ्यातला फरक तुम्हाला दिसलाच नसता.
अशा चांगल्या चांगल्या लेखकांच्या पुस्तकांचं वाचन माझ्या पचनी पडलं.आता मी माझ्या ह्या गावातल्या आणि आजुबाजूच्या गावातल्या मुलांसाठी वाहून घेतलं नसतं तर माझी होणार असती ती परस्थिती आज त्या मुलांची झाली असती.ती मुलं आयुष्यातून फुकट गेली असती.

माझ्या यशाची पहिली प्रचिती त्यावेळी झाली की ज्यावेळी त्या गावातल्या मुलानी मला जी गरम गरम नानकटाई आणून दिली आणि त्याची चव इतकी मधूर होती की मी मानते तुमच्या डोळ्यातून अश्रू टपकले असते.
मी वसुंधरेला म्हणालो,
“तुझी ही तपश्चर्या बघून माझ्या डोळ्यातून अश्रू नक्कीच टपकले हे निश्चीत.पण तुझ्या नानकटाईची चव मात्र मी घेतल्या शिवाय इकडून जाणार नाही.”
मला वसुंधरा म्हणाली,
“अरे,नानकटाई अवश्य खा.पण त्या अगोदर कर्ली नदीतून गुंजूल्याच्या गातनी एका कोळ्याने मला आज त्याच्या मुलाचा शाळेत पहिला नंबर आला म्हणून खूष होऊन आणून दिल्या आहेत.त्याचं चांगलंच तिखलं करते तू आणि नलिनी जेवूनच जा. मला पण बरं वाटेल.”
मला कुणाच्या आग्रहाला नकार देऊन नाराज करता येत नसल्याने आम्ही दोघं वसुंधरेकडे जेवायला राहिलो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होजे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, November 28, 2008

शेवटी कविताच जन्माला आली

संध्याकाळची वेळ होती.नदी खळाळत वहात होती.वीजा चमकत होत्या.राजा-राणी पल्याड जायला आतूर होती. पल्याडला त्या वटवृक्षाखाली त्यांच घरकूल होतं.आत्तांच परत येऊ अशा समजूतीने ती दोघं मुलाना एकटच सोडून नदीच्या अल्याड आली होती.भन्नाड वारं सुटलं होतं.
चमकत्या वीजेच्या प्रकाशात जेव्हा त्याना नाव दिसली तेव्हा केव्हा एकदा नावेत बसून नदी ओलांडून मुलाना भेटू अशी राणीला उत्कंठा लागली होती.
हे चित्र मनात आलं जेव्हा,
(हंसर्‍या)मुमुक्षुने एक ओळ दिली.
“खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव”
आणि दुसरी ओळच काय ती लिहायला सांगितलं.
पण दुसरी ओळ लिहून झाल्यावर,ओळीवर ओळी आठवायला लागल्या त्याला काय करणार.शेवटी कविताच जन्माला आली.

खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
लखलखत्या वीजेमुळे किनारी दिसे नाव
वल्हवतवल्हवत कधी जाउं या पल्ल्याड
सांग साजणा! कभिन्न रात्र येईल का रे आड

घन घन घटा जमूनी कोसळतील धारा
सजणा बिलगू देईना हा खट्याळ वारा
नको रे चंद्रा! लपू तू ढगा मागे
पडू दे लख्ख चांदणे अमुच्या मार्गे

आवर ग! सरिते आता तुझी खळखळ
होईना सहन अमुच्या बछड्यांची हळह्ळ
दिसू लागले अमुचे घरटे वटवृक्षा खाली
पिल्लाना गोंजारण्याची वेळ आता आली



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, November 26, 2008

दुसर्‍याच्या नेत्रातून जीवन पहावं.

लहानपणी आम्ही आमच्या आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो.आजगावला आमचा ब्राम्हणांचा एक वाडा होता. दहा पंधरा घरं असतील एका वाड्यात.घरातली सर्व कामं नोकर चाकर येऊन करायची.पण गाई म्हशीना चरायला न्यायचं,त्याना नदीवर धुवायचं,घरी त्याना आणून गोठ्यात बांधून ठेवायचं,त्यांच्या समोर चारा वाढायचा,उरलेल्या अन्नाचा-पेज,उष्ट अन्न,-आंबवण त्याना खाऊ घालायचं ही कामं गावतल्या महारवाड्यातून काळू महार आणि त्याच्या बायका, मुलं येऊन करायची.
जाता जाता त्याला उरलेलं जेवण देऊन त्याच्या हातावर चवली ठेवायचं माझ्या आजीचं आणि चुलत आजीचं रोजचं काम असायचं.
माझी आई दरखेपेला अशीच आमच्याबरोबर येताना न चूकता आमचे जूने कपडे काळू महाराच्या मुला मुलीना वापरायला द्दायची.त्यांची ही गरिबी बघून मला त्यावेळी खूपच त्यांची दया यायची.काळूचा बाप आणि आजा मरेपर्यंत असलीच काम येऊन करायचे.हे त्यांचं पिढीजात काम असायचं.असं माझे आजोबा सांगायचे.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यावर ही सर्व आजोळची वहिवाट पाहून मी त्यात स्वारस्य घेऊन पहायचो. मुंबईला असले व्यवहार होत नसल्याने हे बघायला जरा कौतूक वाटायचं.आणि दुःखही व्ह्यायचं.काळू महाराचा मुलगा-दगडू- मात्र असली कामं करीत नसे.तो शाळेत जाऊन शिकत असल्याने त्याचा अभ्यास करण्यात वेळ जायचा.
शिक्षणामुळे त्याच्या इच्छाशक्तिचा आणि शैलीचा उपयोग उपयुक्त प्रारंभीक सामाजीक क्रियांच्या व्याख्या करण्यात आणि वापर करण्यात झाला. धर्माचा खरा उपयोग अश्या काही लोकाना होतो की ज्याना त्यांच्या मनुष्य म्हणून जन्माला येण्याच्या योग्यतेच्या पलिकडे त्या धर्माची गरज, सहारा घेण्यात आणि दिलासा घेण्यात होते.एकप्रकारची मंत्रमुग्ध सुंदरता दुःखाने भरून वहाणार्‍या खोल नदीतून उफाळून येऊन,ती सुंदरता जणू मानवी जीवनाच्या छपलेल्या झर्‍यांना छूत आणि अछूत यातल्या धार्मिक अभिव्यक्तीला स्पर्श करते.शिक्षीत दगडूला हे आता भासू लागलं होतं.माझी खात्री आहे की,मनुष्याला चांगला किंवा वाईट हे समाजच बनवतो.हाच समाज आपल्या व्यक्तित्वाला, नीतिशास्त्राला आणि आपल्या सामाजीक आदर्शाना रूप देतो.
दगडू महाराचा विचार केल्यावर त्याच्या जीवनाच्या तर्कशास्त्रात माणसा माणसातल्या असमानतेचा असंधिक्त विचार मी करू लागलो.
मला असं वाटतं,ज्यावेळेला माझी आई ह्या समाजातल्या लोकाना बोलावून आमचे सर्वांचे,तसेच आमच्या शेजार्‍यापाजार्‍यांचे वापरलेले कपडे मुद्दाम जमा करून आणून त्यांना द्दायची त्यावेळी त्या महारवाड्यातून त्यांच्या आया बहिणी कच्ची बच्ची सर्व आशाळभूत होऊन यायची. ते देण्यात कुणाला काय तर कुणाला काय दिलं जायचं.पण मग मला आवर्जून वाटायचं,की जरी कपडे देण्याच्या क्रियेत असामनाता राहिली तरी मुळातच त्या अच्छूत गरिबांच्या सामाजिक आणि आर्थिक वातावरणात असमानता असण्यात कसली प्रामाणिकता आली असावी.

हे सांगण्याचं कारण एका वर्षी माझ्या आईने हे दरवर्षीचं कपडे देण्याचं काम एकदा माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर सोपवलं.ह्या मिळालेल्या संधीतून मला वरील विचार सुचला.ह्या संधीने मला अचंबा होण्यासारखा,आणि नवीन जागृती होण्यासारखा एक मार्ग दिसू लागला.त्यामुळे सामाजीक धारणे बाबत एका महत्वाच्या बाबीवर माझा मजबूत दृढविश्वास बसाला. आणि तो असा की कुणाही व्यक्तीची ईमानदारीने पारख करायची झाल्यास त्याच्या नेत्रातून जगाकडे दृष्टी टाकली पाहिजे.मग ती त्यांची गरीब आजी असो किंवा तरूण बहिण असो,किंवा म्हातारा आजा असो.त्यानंतर ज्या ज्या वेळी मी माझ्या आजोळी येत असे त्या त्या वेळी मी हे कपडे तर घेऊन यायचोच,त्या शिवाय लहान मुलाना खेळणी, शाळेत जाणार्‍याना गंमतीच्या गोष्टी असलेली पुस्तकं आणि वृद्धासाठी त्या वयात लागणारी नेहमीची औषधं आणून द्दायचो.अशा तर्‍हेने मी माझ्या अंतरदृष्टीचं आयोजन करायचो.

आतापावेतो दगडू चांगलाच शिकून मोठा झाला होता.मी त्याला विचारलं,
“तुझे वाडवडील ज्या तर्‍हेने राहायचे आणि आता तू शिक्षण घेऊन तुझी जी प्रगती केलीस त्यानंतर तू तुझ्या जीवनाकडे कसं पहातोस?”
त्यावर तो मला म्हणाला,
“जीवनाकडे मी अशा दृष्टीने पहातो की जे सतत पुनर्रचनेच्या प्रक्रियेत आहे.अशी पुनर्रचना की जीला नेहमीच बदलत्या दृश्यांची आणि परिस्थितीची जरूरी भासावी.पण त्यातून मी अशी आशा करतो की ती परिस्थिती जीवनातल्या येणार्‍या कठिण संबंधातून काही पोषक गोष्टी खेचून घेत असेल.जीवन हे मला अंत नसलेलं आव्हान आहे.असं आव्हान की ज्यावर निसर्गाचे आणि सामाजिक जीवनाचे दबाव लादलेले आहेत.मला असं अनुभवायला आवडेल की ते जगातलं आत्मीक जीवन आहे आणि जे दुनियादारी,हाव आणि संवेदनाशुन्यता ह्या ज्या माणसाच्या मोठ्यात मोठ्या गरजा आणि अभिलाषा आहेत त्यावर त्याचा मोठा दबाव असेल.
काही लोक त्या आत्मीक जीवनाला “निसर्ग” समजतात तर काही “देव” समजतात.”

दगडू महाराचं हे छोटसं भाष्य ऐकून मला इतका आनंद झाला की निदान ह्याच्या पिढीला नव्हेतर ह्याच्या नंतरच्या कुठच्याच महाराच्या पिढीला आमची ती कामं करावी लागणार नाहीत आणि मला जुने कपडेपण कुणाला द्दायला नकोत.त्याला दोन कारणं झाली.एक म्हणजे माझ्या मामानी गाईम्हशीना डेअरीत देऊन टाकून तो गाईम्हशीचा गोठा बंद करून टाकला आणि आता त्याना सेंट्रल डेअरीतून मुबलक दुध मिळायला लागल.आणि दुसरं कारण म्हणजे दगडू पासूनची आणि नंतरची पिढी हळू हळू सुशिक्षीत होऊन त्याना साजेशी कामं करायला लागली. तो त्याच्या पूर्वीच्या पिढीचा आशाळभूतपणा डोळ्यासमोर आल्यावर मला खूप दुःख होतं.पण ही नवीन सुधारणा पाहून मात्र अत्यानंद होतो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, November 24, 2008

गुरू शिवाय विद्दा कसली?

नृत्यकलेत योग्यते शारिरीक हावभाव करावे लागतात.त्या नृत्यातून नृत्यकरणार्‍याचं अविर्भावातलं सत्य विशद व्हावं लागतं.आणि त्याचं व्यक्तित्व प्रदर्शीत व्हावं लागतं.हे मी रोहिणीकडून ऐकलं.
यशोधरा साखरदांडे आणि हिची मुलगी रोहिणी,जी आता रोहिणी गायतोंडे म्हणून ओळखली जाते ती नृत्यकलेत निपूण असून अलिकडे रंगमंचावर अभिनय करते हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी अंधेरीतल्या एका नृत्यशाळेत तिचा अभिनय पहाण्यासाठी एका मित्रा बरोबर गेलो होतो.रोहणी त्यावेळी आपल्या विद्दार्थिनीबरोबर रियाज करण्यात दंग झाली होती.
मी तिच्या आईवडीलांना चांगलाच ओळखतो. तिचे वडील माझ्या बरोबर टाटा इन्सस्टिट्युटमधे माझे सहकारी होते. त्यांच्या घरी मी बरेच वेळा जातयेत असे.यशोधराचं आणि माझें दूरचं नातं होतं.रोहिणी त्यावेळी अगदीच लहान होती.मला इतक्या वर्षानी पाहून तिला तिची लहानपणाची आठवण आली.

तिचे वडील आता हयात नाहीत.ती ज्यावळी माझ्या बरोबर बोलायाला म्हणून रंगमंचावरून खाली आली.तेव्हा सहाजीकच तिच्या वडीलांचा विषय निघाला.जुन्या आठवणीना उजाळा आला.मला ती म्हणाली,
“काका तुम्ही माझ्या घरी नक्कीच या.मी इस्ट अंधेरीला गोल्डस्पॉटच्या फॅक्टरीच्या बाजूला उंच इमारत आहे त्या बिल्डिंगच्या एकदम वरच्या मजल्यावर राहते.जेवायलाच या.माझी आई पण तुम्हाला भेटेल.खूप वर्षानी तुम्हाला पाहून तिला खूपच आनंद होईल.”
मी तिचा पत्ता घेतला आणि विकएंडला तिच्या घरी गेलो.
यशोधरेला बघून मला आणि तिला खूपच आनंद झाला.इकडच्या तिकडच्या गप्पा होई पर्यंत रोहिणीने चार पाच फोन करून घेतले.
रोहीणी मला म्हणाली,
” ह्या व्यवसायात पडल्यावर आपलं जग आपलं राहत नाही.सदाची मी बिझी असते.तुम्ही आज येणार म्हणून मी शक्यतो मला मोकळी ठेवली आहे.माझा सेक्रेटरी आता काय ते संभाळून घेईल.”
मी तिला म्हणालो,
“ह्या व्यवसायाची मला विषेश माहिती नाही.पण नृत्याबद्दल माहिती असावी असं मला नेहमी वाटायचं आणि त्याचं मला कुतुहल पण आहे.आणि तुझ्या इतक्या जवळच्या व्यक्तिशिवाय मला वर्णन करून कोण सांगणार?तेव्हा तू मला सगळं समजावून सांग.त्यातल्या खाचा आणि खळगे सुद्धा.

रोहिणी मला म्हणाली,
“माझ्या बाबांचेच उद्गार मी प्रथम तुम्हाला सांगते.
ते नेहमी म्हणायचे,
” आपण सर्व ह्या पृथ्वीवर थोड्याच काळासाठी आहो आणि त्या काळात आपण काहीतरी चांगलं करावं.ते पुढे म्हणायचे मला वाटतं ह्या वास्तविकेत पावित्र्य आहे ते असं की “चांगले व्हा” हेच सांगणं.हे उद्गार माझ्या वडीलानी निर्वतण्यापूर्वी काढले”
माझ्या जीवनात आणि माझ्या कलाकृतीत मला असं दिसून आलं आहे की सत्यनीष्टा आणि चांगुलपणा बरोबरीने असतात. माझी आई म्हणते,
“स्वतःशी प्रथम प्रामाणिक असावं”
माझ्या रियाज करण्याच्या स्टूडियोमधे वास्तविक राहण्याचा मी प्रयास करते.
माझा स्टुडियो ही मला एक पवित्र जागा आहे जिथे स्वतःचं व्यक्तित्व आणि स्वतःच्या भावना प्रदर्शीत करता येतात.जणू माऊंट एव्हरेस्टवर उभं राहून श्वास घेतल्या सारखं वाटतं. ह्या स्टुडियोतल्या उंचीवर एकजीव राहून काहीतरी उद्देश्यपूर्वक करीत असल्यासारखं वाटतं.
मी नर्तकी म्हणून आहे आणि नृत्य-परिक्ष्क म्हणून पण अनुभव घेतला आहे.दोनही पार्ट मला माहित झाले आहेत.नर्तकी नृत्य-प्ररिक्षकाला समर्पीत होते आणि नृत्य-परिक्षक नर्तकीला समर्पीत होतो.आम्ही निष्कारण तयार झालेले भावनांचे कटू थर उतरून ठवतो.
छुपीवृत्ति नाहिशी होते,आणि सत्यनिष्टा आणि नीश्छलता असलेलं आमचं बालवय उभारून येतं.अशा तर्‍हेने एकमेकात आत्मसमर्पीत झाल्यावर काहीही होऊं शकतं.

नृत्यकलेत योग्यते शारिरीक हावभाव करावे लागतात.त्या नृत्यातून नृत्यकरणार्‍याचं अविर्भावातलं सत्य विशद व्हावं लागतं.आणि त्याचं व्यक्तित्व प्रदर्शीत व्हावं लागतं.
एकदा माझी एक नृत्य करणारी विद्दार्थिनी दिसायाला सुंदर आणि शरिरसौष्टव मोहक असलेली असतानाही तिला हावभाव प्रकट करता येत नव्हते.एकदा आम्ही नृत्याची रियाज करीत असताना तिचं पाच मिनीटांच सोलो नृत्य होतं.एकदा करून तिला श्वास लागला.मी तिला परत करायला सांगितलं.ती करण्यात मग्न झाली.ती तिच्याशी प्रामाणिक होती.सरते शेवटी तिने अत्युत्तम नृत्य केलं.

नर्तक म्हणून आम्हाला आमचा सर्व अनुभव रंगमंचावर आणावा लागतो.आम्हाला किती फिरक्या घेता येतात किंवा किती उंच उड्डाण करता येतं,किती उंचीवर पायाची हालचाल करता येतं हे दाखवून प्रेक्षकाला रोमांचीत करायचं नसतं.सतत केलेल्या संवयीने बर्‍याच लोकाना ते करता येईल.आम्हाला आमच्या सत्यनिष्टेशी एकरूप व्हावं लागतं.त्याचा एक हिस्सा व्हावं लागतं. जेव्हा अभिनय वाखाणला जातो तेव्हा नुसते हातवारे मनात ठेवावे लागत नाहीत. तर अभिनयातून एक प्रकारची संवेदना येते,आणि ती संवेदना नृत्यकाराच्या प्रकटनातून येते.
रंगमंचावरच्या उत्तम अभिनयाने श्रोतेगणाना अशा पातळीवर न्यावं लागतं की ते त्यातून स्वतः बद्दल काही तरी शिकतील.हे आपल्या सर्वांसाठी आहे असं त्याना वाटावं.हे सर्व निपूणता प्राप्त करण्यासाठी आहे असं त्याना वाटावं.आणि सर्वांत जास्त ते सत्यनिष्टेशी संबंधीत आहे हे तर नक्कीच वाटावं.
माझी खात्री आहे की स्वतःहून चांगलं असणं म्हणजेच जसं माझे बाबा म्हणायचे, तसं आपण आपल्याशी सत्यनिष्ट असणं. “

नृत्य करणं दिसायला सहज सुलभ वाटतं.पण रोहिणीने जे समजावून सांगितलं ते ऐकून माझ्या मनात आलं की गाण्याबरोबर हातवारे करणं इकडून तिकडे उड्या मारणं हे करत असताना आणखी ज्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात त्याची माझ्या सारख्या सर्व साधारण माणसाला कल्पना पण करता आली नसती.गुरू शिवाय कसली विद्दा हेच खरं.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, November 22, 2008

“शब्दांवाचून कळले सारे”

मी तळ्यावर पुस्तक वाचत प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो तेव्हड्यात एक व्यक्ति माझ्या जवळ येऊन हंसली.मी पण त्याच्याशी हंसलो.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर माला कळलं ही व्यक्ति भाऊसाहेबाना पण ओळखते.त्याच्या बरोबर एक मोठा सफेद रंगाचा कुत्रा होता.तो सतत वळवळ करत होता.
मी म्हणालो,
“तो तुम्हाला घरी जावूया म्हणून सांगतोय.”
त्यावर ते गृहस्थ मला म्हणाले,
“नाही नाही प्रो.देसाई समोरून येत आहेत ते त्याने लांबून पाहिलंय.त्याना तो चांगलाच ओळखतो.भाऊसाहेब पण त्याच्यावर खूप प्रेम करतात.प्रोफेसर जेव्हा जवळ आले तेव्हा तो जास्तच चूळबूळ करू लागला.भाऊसाहेब जवळ आल्यावर म्हणाले,
“ह्या मोत्याच्या मागे गंमतीदार इतिहास आहे.सांगा हो ह्याना जे तुम्ही मला सांगितलंत ते ह्या मोत्या बाबत.”
पडत्या फळाची आज्ञा घ्यावी तसंच भाऊसाहेबांच्या विनंतीला मान देऊन ते गृहस्थ सांगू लागले,

“तो ज्या तर्‍हेने आपलं जीवन जगतो ते मी मानतो. आणि त्याच्या सारखं आपण जगावं असा माझ्या मी प्रयत्न करतो. त्याच्या सुखाची पातळी पाहून त्या पातळीवर येण्याचा मी प्रयास करतो.जसं तो जेव्हा जेव्हा त्याच्या प्रत्येक जेवणाकडे किती प्रशंसाकरून आणि संतुष्ट होवून पहातो अगदी तसं. जसं मी फ्रिझमधून प्रत्येक खाणाच्या वस्तु पाहून हे खाऊ का ते खाऊ असा विचार करताना आणि अमुक अमुक वस्तु खायला नाही हे पाहून थोडा नाखूष होतो,तसाच तो जमिनीवर गोल गोल फिरून उत्तेजीत होऊन तेच तेच जेवण तेव्हडाच वाटा आणि तेच नेहमीच्या वेळी रोज मिळणार म्हणून अपेक्षीत असतो.
तो वर्तमानात रहातो हे मी मानतो.
ज्यावेळी माझा दिवस तणावाने भरलेला,गर्दीच्या प्रवासाने कंटाळवाणा झालेला,अगणीत अंतिम निर्णयाने अपेक्षीत झालेला असतो त्यावेळी मी घरात एकटाच असलेल्या मोत्याची आठवण काढतो.त्याचा दिवस कंटाळवाणा आणि थकलेला असावा पण मी घरी आल्यावर तो ह्या सर्व बाबी विसरून माझ्याशी एकरूप होतो.कुणी कुठच्याही जातीचा,धर्माचा आणि कसाही दिसणारा असेना सगळ्याशी मोत्या समान भावनेने वागतो.त्याला कसलाच फरक दिसत नाही.तो कधीच पुर्व-ग्रहीत नसतो.
मोत्या माझ्या घरी येण्यापूर्वी मी रसत्यावरून जाताना कुणाशीही बोलत नसायचो ना कुणाकडे बघत बसायचो,किंवा कुणाशिही ओळख व्हावी याचाही विचार करायचो.मोत्याबरोबर रसत्यावरून जाताना ह्या सगळ्या गोष्टीत आता माझ्यात बदल झाला.आता कुणी माझ्याशी हंसल्यास मी पण हंसतो आणि मोत्या शेपटी हलवीत एखाद्दाकडे थांबला तर मी पण त्याना हलो करून त्याच्या बरोबर थांबतो.

पूर्वी माझ्याकडे कुत्रा नव्हता.एका माझ्या मित्राने माझ्यावर दबाव आणला माझं एकाकी जीवन पाहून त्याला त्याच्या जीवनाची आठवण येऊन तो प्रभावित झाला.आणि हा मोत्या मला त्याने दिला.रात्री रात्रीपर्यंत कामावर राहायचं,विकएंडचा एकटेपणा,किंवा एकदोन फोन ऐकून होय नाय बोलण्यापुरते संवाद करायचे. आणि फोनवर तरी कसली बोलणी? माझ्याबद्दल सारं आणि माझ्या जीवनात काय कमजास्त आहे ते.एकतर मी कामावर असायचो किंवा कामाबद्दल बोलायचो त्यामुळे मला कुणी मित्र वेळ घालवायला बोलवायचेच नाही.
एका रविवारी मला एकाएकी लक्षात आलं,की कुणाशी ही सहजासहजी माझी मैत्री होण्याची चिन्ह कमीच आहेत पण जर का मीहून प्रयत्न केला तर होईल.आणि म्हणून मी मोत्याला माझ्या मित्राकडून आणलं.
एकाएकी जिथे माझ्यावर कुणी अवलंबून नसण्याची प्ररिस्थिती होती तित मोत्यामुळे बदल आला.माझ्या अंगावरचा स्वार्थीपणा पूरा धुऊन निघाला.

बाहेर घेऊन जा,जेवायला घाल,साफ कर.ह्यामुळे माझ्यावर कुणीतरी अवलंबून आहे हे मला आवडायला लागलं.त्याच्या जरूरती मी भागवायचो आणि तो माझ्या.
मोत्याची उत्कृष्ट ईमानदारी मी मानली.माझा दरवाज्याजवळचा हासभास त्याला माझं स्वागत करायला उत्तेजीत करायचं.
आता माझी पत्नी कामावरून परत आल्यावर मी तिचं स्वागत करायला मोत्याकदून शिकलो.”

त्याच हे सर्व वर्णन ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“मग आता तुमच्या पत्नीला ह्याच्या बरोबर राहायला जमेल का?”
मला म्हणाला,
“ती माझी पत्नी होण्यापूर्वी मी तिला हीच मोत्याची हकिकत सांगितली.आणि तिच्या प्रतिक्रियेची वाट बघत होतो.लगेचच तिने मोत्याला जवळ घेऊन त्याला गोंजारायला लागली.”
असं म्हणून तो माझ्या प्रतिक्रियेची वाट पहात राहिला.
मी गुणगुणलो,
“शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले”
माझी ओळ संपता संपता तो म्हणाला,
“प्रथम तिने ऐकिले अन,मना सारखे घडले”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, November 20, 2008

प्रत्येक व्यक्ती सन्मानाला पात्र असते

आज प्रो.देसाई खूप दिवसानी आपल्या नवीन मित्राबरोबर तळ्यावर आले होते.माझी ओळख करून दिल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा करायला सुरवात केली.त्यांचा हा माझा नव्याने ओळख झालेला मित्र आपली नोकरीत असतानाचे काही अनुभव सांगण्याच्या ओघात एका मजेदार किस्याला त्यानी हात घातला.ते एका सॉफ्टवेअर कंपनीचेसि.इ.ओ होते ते ओघाओघाने मला कळलं.
ते म्हणाले,
“कामानिमीत्त मी एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना बरेच वेळा त्या कंपनीची गाडी येऊन मला त्यांच्या मिटींगच्या जागी घेऊन जायची.पण कधी कधी मला एअरपोर्टवरचीच टॅक्सी करून जावं लागायचं.असंच एकदा बंगलोर एअरपोर्टवर टॅक्सीत बसल्यावर ड्राईव्हर बरोबर हलो-हाय झाल्यानंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी करीत असताना,माझ्या लक्षात आलं की तो ड्राईव्हर साधारण साठएक वर्षाचा असावा.माझ्या मनात आलं की ह्या वयावरही त्या बिचार्‍याला हा साधा जॉबकरून मेहनत करायला किती कष्ट पडत असतील.नंतर चौकशी केल्यावर लक्षात आलं की तो पण एका मोठ्या कंपनीतून चीफ फायनॅन्स मॅनेजर होऊन रिटायर्ड झाला होता.आणि पुन्हा आपल्या अनुभवासाठी त्याला दुसर्‍या कंपन्या मिटिंगसाठी बोलवत राहयचे.तिच तिचमंडळी तेच तेच विषय याला तो कंटाळून त्याला ती कामं नकोशी झाली.आणि हा टॅक्सी चालवायचा जॉब त्याने घेतलाहोता.मी हे ऐकून थोडा स्तिमीतच झालो.मी असं का म्हणून विचारल्यावर मला म्हणाला,
“इतर जगाशी संबंध रहावा,निरनीराळे लोक भेटावे, आणि वेळ निघून जावा यासाठी टॅक्सी चालवण्याची त्याला कल्पना सुचली.जाता जाता त्याने मला फायनॅनशीयल बाबतीत एक उपयुक्त उपदेश पण दिला.मला वाटतं,प्रत्येक माणूस आदर सन्मानाला पात्र असतो.आणि प्रत्येकाकडून नवीन काही शिकायाला मिळतं.
त्यामुळे मी एक निर्धार केला होता की टॅक्सी ड्राईव्हर पासून साध्या चपराश्यापर्यंत त्यांच्या गोष्टी ऐकून घ्याव्या.आणि त्यामुळे प्रत्येकजण मला त्या जागी- मी कधी भेट दिली नसती अशा जागी- येण्याचा अवसर द्दायचा, किंवा मी स्वतःहून कधीच केली नसती अशी गोष्ट करायला मोका द्दायचा.
मी पाहिलंय की बरेचसे लोक माझ्याशी समजूतदारपणे वागतात.जेव्हा मी त्यांच्यात स्वारस्य दाखवतो आणि त्यांना सन्मानाने वागवतो तेव्हा.ते काय म्हणतात ते सारं ऐकून घेतो तेव्हा.सन्मान द्दायचा याचा अर्थ प्रत्येक गोष्टीत त्यांच्याशी सहमत झालं पाहिजे असं काही नाही.माझ्या कामातही शंका, गैरसमज,आणि चूका व्हायला वाव असायचाच.
प्रत्येक बाबतीत सभ्यता ठेऊन वागायचं आश्वासान देता जरी आलं नाही तरी मला आठवत नाही एखाद्दाच्या संस्थळावर जाऊन त्या लेखावर कटूप्रतिक्रिया देऊन झाल्यावर खरमरीत प्रतिसाद त्यावर आला नसावा. आणि कालांतराने मी अपमानजनक वागल्याचं आठवून मलाच अनुचीत आणि खराब वाटायचं.
काही लोकाना वाटतं ही संस्थळं माणसामाणसातला जीवंत संबंध विलग करतात.पण मला ते पटत नाही. प्रत्यक्षपणे ते एक दुवा ठेवण्याचं माध्यम आहे.
कधी कधी संस्थावळरच्या विचारांची देवाण-घेवाण चिडचीडी झाली की बरेच वेळा इमेलने किंवा फोन करून त्यातील सामुहीक संकेत थोडे विचारपूर्ण करून कटूता कमी करता येते.
निव्वळ शब्दाचं वाचन बरेच वेळा अनर्थाला आमंत्रण देतं.हे चांगलं लक्षात ठेवून राहणं ही संस्थळाच्या वाचनाची क्लुप्र्ती आहे.
संस्थाळावर असो किंवा प्रत्यक्षपणे असो मी ज्यावेळी नव्या लोकाशी परिचय करतो त्यावेळी मी जर का उघड मनाचा, आणि जिज्ञासू राहून वागलो तर मी नवीन गोष्टी नक्कीच शिकतो.
मला वाटतं,दुसर्‍या व्यक्तिला सन्मानाने वागवणं हे अत्यावश्यक आहे-वाटलं तर स्वार्थीपणाचं-म्हटलंत तरी चालेल.
भाऊसाहेबांच्या ह्या नवीन मित्राबरोबर चर्चा करण्यात माझा वेळ मात्र मजेत गेला.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, November 17, 2008

घडता घडता घडेल ते घडेल

माझा एक मित्र अरूण ढवळे जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधे डिप्लोमा घेऊन झाल्यावर एका नावजलेल्या वर्तमानपत्रात कार्टूनीस्ट म्हणून काम करायचा. धोबीतलावला त्याचा एक स्टुडियो पण आहे. आणि बरं चाललं आहे.मी मेट्रोसिनेमा जवळ बसची वाट बघत उभा असताना आमची नजरा नजर झाली. मला त्याने बसला उभ्या राहिलेल्यांच्या रांगेत हाताला ओढून माझ्या बरोबर चल म्हणून घेऊन गेला,तो एकदम त्याच्या स्टूडियोत.
निरनीराळे फोटोझ,फ्रिहॅन्ड स्केचीस,कार्टून्स,म्युझीयम मधे ठेवण्यालायक काही आडव्या फोटो फ्रेम्स,लॅन्डस्केप्स वगैरे बघून मला बरं वाटलं.
एका गिर्‍हाईकाला पटवून झाल्यावर माझ्या बरोबर गप्पा मारायला बसला.लंच टाईम असल्याने शेजारच्या हॉटेल मधून दोन प्लेट्सची ऑर्डर देऊन आला.जुन्या आठवणीना उधाण आलं.माझ्याकडून काही गोष्टी त्याने ऐकल्यावर मी म्हणालो,
“आता तुझा जीवन प्रवास कसा झाला तो सांग”
अरूण सांगू लागला,
“माझ्या पूर्वीच्या कथा ऐकशील तर तू तोंडात बोटच घालशिल.कुठे हा माझा फोटो स्टुडियो आणि कुठे मी सुरवातीला कित्येक वर्षापूर्वी प्रयत्न केलेली आणि असफल झालेली माझी खानावळ.
कोकणात काहीच नाही जमलं तर खानावळ घालण्याचा प्रयत्न अगदीच असफल होईल असं नाही.म्हणजे मी तो धंदा काही असातसा समजत नाही.पण अन्नछत्र उघडण्याचं एक पुण्यकर्म करतो हे वाटत असताना अगदी नव्याने प्रयोग करण्यात खूप काही भांडवलाची जरूरी भासत नाही.
असाच विचार करून मी वेंगुर्ल्या जवळ उभ्यादांड्यावर एक छोटीशी खानावळ उघडली.सुनील गांवसकरचं हे मुळगांव हे तुला माहित असेलच.चिं.त्र्य. खानोलकरची पण अशीच एक खानावळ होती.आणि त्या धंद्यात त्यांच लक्ष लागत नव्हत.पण पोट्यापाण्याची सोय म्हणून करीत होते.
खानोलकरांच उदाहरण देण्याचा मतितार्थ असा की कुठे खानवळीचा धंदा आणि कुठे शेवटी महान नाटककार कथाकार म्हणून नावाजायला येणं.माझं थोडंफार तसंच झालं.त्या अयशस्वी प्रयत्नातून पुढे जे.जे स्कूल ऑफ आर्टसमधे शिकून इथे आता हा स्टुडियोच्या धंद्यात गुरफटणं.”तरट्यात”काय लिहून ठेवलेलं असतं हे कळत नाही तेच बरं.
मी म्हणालो,
“तुझ्या त्या खानावळीचं काय झालं ते सांग”
अरूण म्हणाला,
“तेच सांगायचं आहे.सहा ताटं,तीन फूलपात्र असली तरी बारा लोकांची जेवायची सोय करायला कठीण वाटण्याचं काहीच कारण नाही.चहाचे कप,किंवा पितळेच्या वाट्या पाणी पिण्यासाठी,आणि केळीची पानं किंवा फणसाच्या पानाच्या पत्रावळी ताटं म्हणून वापारता येतात.एकदा एका मित्राच्या घरी पार्टी होती म्हणून चिकन तयार करण्यापूर्वी चिकन कापायला एकच सूरी होती तरी मी कात्री वापरून काम पार पाडलं होतं.मी तसा ह्या बाबतीत सुधारणावादी आहे.ही माझी वृत्ति उत्तेजन देणारी, साहसी,आव्हान देणारी आणि सृजनशील बनायला अवसर देते.
योजना आखून,निर्धारीत मार्ग पत्करून अडकून रहाण्यापेक्षा अशा तर्‍हेने काम करताना गंमतीदार गोष्टी घडायला मोका मिळतो.पदार्थ बनविण्याच्या सुची प्रमाणेच डीश बनवली पाहिजे असं नाही.मी नेहमीच एखाद्दा पदार्थात तूप आणि लसूण सुचीपेक्षा जास्तच वापरायचो.एकच दुष्परीणाम म्हणजे थोडं वजन वाढतं.

मी कुणाकडून खानावळ कशी चालवायची याचे धडे घेतले नव्हते.घडता घडता घडेल ते घडेल हीच वृत्ती ठेवली.खानावळ चालवण्याच्या स्वैर कल्पनेने मी भारावलो होतो.त्यात मी अपयशी होईन असं मला कदापी वाटलं नव्हतं.खानावळ चालू केल्यावर तसं होईल असा मला भासायला लागलं.पण त्याला उशिर झाला होता.
आणि अर्थात पैसे कमविण्याचा मुद्दा माझ्या यादीत अगदी शेवटचा होता.त्यामुळे काही तरी अद्भुत करून पाहाण्याकडे लक्ष केंद्रीत करायला मला स्वातंत्र्य मिळालं. कुठलीही गोष्ट कशी असावी ह्याचं माझ्याकडे कसलंच अनुमान नव्हतं.गाडा मी पुढे रेटीत गेलो आणि ना ना तर्‍हेच्या संभावनांचा शोध लावला,बरोबर खूप चूका पण केल्या.खरंच ह्यामुळे शिकायला मोठी संधी चालून आली.एखादी गोष्ट यशस्वी झालीच तर ठीक आहे. झालीच आहे.आणि नाहीच झाली तर मात्र मला का नाही झाली ह्याचा विचार करावा लागायचा आणि यशस्वी व्हायला नंतर कुठला दुसरा मार्ग हुडकून काढावा लागायचा.

चुका होतानाच शोध लागतात.कलिंगड खाताना चिमूट भर मीठ चोळ तेच कलिंगड किती गोड लागतं हे लक्षात येईल.विश्वास ठेव माझ्यावर.एकदा करून बघ.साखरेच्या चिमूटा ऐवजी मी चुकून मीठाची चिमूट कलिंगडाला लावली होती.
माझ्या खानावळीत वेटर म्हणून शिकलेली पोरं मी ठेवली नाहीत.ते इतकं मला महत्वाचं वाटलं नाही.जोपर्यंत गिर्‍हाईकाला काय हवंय हे ओळखणं,त्यांच्याशी चांगली वागणूक ठेवणं, आणि गिर्‍हाईकाचं समाधान होईल अशी त्याना ट्रिटमेंट देणं हे झाल्यावर वेटरला युनीफॉर्म असला पाहिजे ह्याची मी कधीच पर्वा केली नाही.त्यांचे कपडे स्वच्छ असले म्हणजे झालं.
खरं म्हणजे विचित्रताच प्रत्येकाला विपुलता आणते.

काही लोक मला म्हणाले खानावळीचा माझा धंदा अपयशी ठरला.का तर मला दिवाळखोरी करावी लागली.खरं तर मी एव्हडा धनवान-पैशाच्या दृष्टीने नव्हे- होतो की दुसरा एखादा यशस्वी खानावळवाला एव्हडं स्वपनातही आणू शकणार नाही.
माझ्या सुधारणावादावरच्या विश्वासाला माझी खानवळ बंद करून पुष्टी मिळाली.खानावळ सरळ बंद करून मी चालू पडलो.मी कसलेच प्लॅन केले नाहीत.मागे सगळं टाकून मुंबईला आलो.चित्रकला शिकलो आणि हा स्टुडियो घातला.
मला वाटतं कोणतीही गोष्ट करायला एकच मार्ग नसावा.जो मार्ग माझ्या कामाला येतो तो आता आहे तोच.पण हा उद्दा बदलू शकतो.”
अरूण ढवळ्याचं हे सर्व ऐकून त्याचं एक म्हणणं पटलं की “कुणाच्या तरट्यात काय लिहून ठेवलंय कुणाष्टाऊक”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, November 15, 2008

“किती सुंदर दिसतात हे फुलांचे ताटवे!”

मी पालघरला पहिल्यांदाच गेलो.माझा मित्र पावलु फर्नांडीस माझ्या नेहमी मागे लागायचा,की एकदा तरी ये आमच्या घरी.पावलु मुळचा वसईचा.वसईला एव्हडी वस्ति वाढायाला लागली की त्याने तिथून स्थलांतर करायचं ठरवलं.त्याचे मामा आजी वगैरे मंडळी पालघरला रहायचे.पावलू ने तिथे एक छोटसं एक-मजली घर बांधलं.वसईची जागा आणि शेतीवाडी विकून त्याला बराच पैसा मिळाला. त्याच्या घराजवळ आणखी काही छोटी छोटी बंगलेवजा घरं होती.प्रत्येकाच्या घरामागे परसात असून भरपूर झाडी होती.त्यामुळे पालघर थोडं खेड तर थोडं शहर वाटायचं.
पावलुच्या घरी जाता जाता त्याचा सर्व आजूबाजूचा परिसर मला खूपच छान वाटला.
मी त्याला म्हणालो,
“आजूबाजूचं सृष्टीसौंदर्य बघून ते तसं ठेवल्या बद्दल लोकांच कौतूक करावसं वाटतं.”
त्यावर पावलु मला हंसून म्हणाला,
“ही जी पहाट तुला दिसते आहे त्याच्यापूर्वी रात्र होती.”
आणि पुढे थोडासा दम घेऊन म्हणाला,
“मी येण्यापूर्वी इथे खूपच बेशिस्त होती.जो तो आपलं घर मात्र साफ ठेवायचा आणि घरातला कचरा आपल्याच घराच्या समोर बाहेर फेकून द्दायचा.
आमच्या बाल्कनीत उभं राहून बिल्डिंगच्या सभोवती मी ज्यावेळी बघत असायचो त्यावेळी मला कसं मनात अगदी समाधान वाटत असायचं.आणि ज्यावेळेला मी माझी दृष्टी आणखी चारीबाजूला फिरवायचो तेव्हा असं दिसाचं की ज्याला आपण सर्व साधारण कचरा समजतो अशा वस्तू म्हणजे,फेकून दिलेल्या प्लॅस्टिक पिशव्या,रबराच्या वस्तू,जूनी वर्तमानपत्र,लाकडाचे तुकडे,जूने कपडे ह्या सर्व वस्तू कारण नसताना साठा करून घरी वाढवत असतो.आणि मग कधी तरी बाहेर फेकून देतो.प्रत्येक वस्तू कधी ना कधी उपयोगात येत असते,आणि त्याचा तसा उपयोग जर आपण करू शकलो तर? हे ह्या समजूतीचं कारण असावं.आणि म्हणून आपण त्याची सांठवण करून ठेवतो.वस्तू पुन्हा वापरात आणण्याच्या समजूतीवर मी जास्त भिस्त बाळगून होतो.

आमच्या आजूबाजूच्या परिसरात लोक आपल्या मागच्या परड्यात किंवा समोरच्या अंगणात पडत असलेली झाडांची पानं,फुलं वगैरे घराच्या समोर ढिग करून ठेवतात मग म्युनिसीपालीटीची गाडी येऊन घेऊन जाईल ह्या इराद्दाने,तसं करतात.
माझ्या ह्या कचर्‍याबद्दलच्या-पुन्हा वापरात आणण्याच्या- समजूतीचा प्रेमाप्रित्यर्थ मी एक नवी योजना आखली.जे जे त्यांच्या घरासमोर पालापाचोळा टाकत असत त्या जागी लाकडाचे तळ नसलेले लांब लचक खोके तयार करून “ह्यात तुमचा पालापाचोळा टाका” अशी पाटी लिहून ठेवली.जसजसा त्यात कचरा वाढत चालला तसतसं मी त्यात पावसाळी गटारातलं पाणी शिंपडू लागलो.त्या साठी आणखी काही होतकरू कच्चेबच्चे मला मदत करण्यात उपयोगात आणले.आजू बाजूची गटारातली माती त्या पाल्यापचोळ्यावर टाकून त्याची उपयुक्त माती तयार करून जागोजागी सजावटी बाग तयार केली.रंगीबेरंगी रानटी फुलांच तो बगिचाच झाला.

टाकून दिलेली वस्तू पुन्हा वापरत आणणं ही गोष्ट मी क्षुल्लक ही समजत नाही किंवा विलक्षण ही समजत नाही.जो कचरा आपण तयार करतो तो बहुदा आपण अति गर्दीच्या जागी जिथे गरिब लोकांची वस्ति असते तेथे नेऊन टाकतो.
खरंच कुठचीच वस्तू फेकून देण्यालायाक नसते.थोडी मेहनत घेतली तर प्रत्येक वस्तू पुन्हा वापरात आणता येते. उदाहरणार्थ,आंघोळीचं पाणी बागेला वापरता येतं.फुलं,भाजी तयार करता येते.
मला वाटतं चूका आणि कमजोरी मधूनच काही तरी शिकायचं असतं.नक्कीच त्याचं परिवर्तन चांगल्या गोष्टीत होतं.

आमच्या पपीचंच घे.ह्या कुत्रीला मी ज्यावेळी न्याहाळून बघतो त्यावेळी ती माझ्या जीवनातली एक आनंददायी बाब म्हणून पहातो.पण खरं तर ही पपी कुणीतरी रस्त्यावर सोडून दिली होती.अगदी लहान असलेल्या त्या पिल्लाला डोळे उघडायला सुद्धा येत नव्हते.ती आता झकास पपी झाली आहे.तिला पाहिल्यावर कसल्या संकटातून तिला जावं लागलं याची आठवण येऊन माझं मन खिन्न होतं.
कधी कधी वाटतं,होईन कदाचित मी पण एकदा असाच पुन्हा वापरण्या साठी उपयोगी.आणि माझ्यातलं गुप्त धन हूडकून काढायला कुणाचं तरी मन धजावेल. जसं मी पुन्हा वापरात आणण्यासाठी प्रत्येक वस्तूकडे पहातो अगदी तसं.जसं त्या रानटीफुलांच्या छोट्या छोट्या बगिच्याकडे पाहून एखादा बाजूने जाणारा म्हणेल,
“किती सुंदर दिसतात हे फुलांचे ताटवे!”

हे सर्व ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“खरंच,मी जर तुझ्या घरी प्रत्यक्ष पाहायला आलो नसतो तर नुसतं वर्णन करून समजून घेण्यासारखं हे प्रकरण नव्हतं. रिसायकलींग हा प्रकार मी ऐकला आहे.म्युनीसिपालीटी प्लास्टीक,रबर,लाकडाचे तुकडे जूने कपडे यांची विल्हेवाट लावेल पण पाल्या पाचोळ्याचा विनीयोग तू खरंच मोठया कल्पकतेने केलास म्हणूनच मी प्रथमच ज्यावळी हे फुलांचे ताटवे आणि बगीचे प्रत्येक घरसमोर पाहिले तेव्हा मनात म्हणालो कुणाची तरी मनापासून आणि तू म्हणतोस तशी प्रेमाप्रित्यर्थ केलेली मेहनत असायलाच हवी.”
पावलु फर्नांडीस मिश्कील हंसत म्हणाला,
“म्हणूच मी तुला पालघरला ये म्हणून मागे लागलो होतो.हे बघून तू ऍप्रिशीयेट करणार हे मला ठाऊक होतं.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, November 13, 2008

दयाशील आणि परोपकारी हृदय

नंदा प्रधान मॉन्ट्रीयला गेल्यापासून बरीच वर्ष परत आलीच नव्हती.तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती हे मला नक्कीच माहित होतं.तिची मुलं लहान होती त्यावेळेला ती दोन एक महिने इकडे राहिली होती.तिचा मोठा मुलगा दिलीप का नाही आला असं मी विचारल्यावर तिचा चेहरा कावराबावरा झालेला पाहून मलाही थोडं धक्कादायी वाटलं.
नंदाने सुरवात अशी केली की काहितरी अघटीत झालं असावं ह्याची मला खात्री झाली.
ती मला म्हणाली,
माझ्या मुलामुळे माझा दृढविश्वास वाढला. निस्वार्थी होवून कुणालाही देण्यात मी विश्वास मानू लागले आहे.
आठ वर्षापूर्वी माझा मुलगा दिलीप हृदय विस्तारल्याने आजारी झाला होता.डॉक्टरी भाषेत सांगायचं झाल्यास- दुःखी आईला त्याचा अर्थ तेव्हडाच महत्वहीन म्हणा-”कार्डीओमायोपथी”.
बरेच महिने दिलीप लाईफ सपोर्टवर होता.आम्हावर- तो हळू हळू निष्प्रभ होत असताना- त्याच्या जवळ उभं राहून त्याला पहाण्याची एक प्रकारची सक्ति झाली होती.आणि त्याचवेळी त्याचे मित्र निरनीराळे खेळ खेळताना,आपआपल्या मित्रांबरोबर हातात हात घालून फिरताना,स्वतःच्याच बिछान्यावर झोपताना पाहून, माझ्या मुलाला मात्र हॉस्पिटलच्या बिछान्यावर झोपून जवळच हृदय चालू परिस्थितीत ठेवणार्‍या मशिनला जोडलेल्या परिस्थितीत मला पहावं लागत होतं.
आईच्या भुमिकेतून माझं रडून झाल्यावर,नंतरची प्रतिक्रिया म्हणजे क्रोध,आणि नंतर मी देवाकडे सौदा करण्याच्या प्रयत्नात.
“देवा! मी खूप आयुष्य भोगलं रे! पण त्याला अजून खूप काही करायचं आहे.”
तसंच माझ्या अवतिभोवती जे लोक जमले होते ते कुणाचं तरी हृदय मिळावं म्हणून प्रार्थना करित होते.पण माझा मलाच खूपच राग आला होता आणि मी थोडी चक्रावलीपण होते.कारण मला माहित होतं तसं घडायला हवं असेल तर कुणाच्या तरी बाळाला मरण प्राप्त व्हायला हवं.मग अशा परिस्थितीत त्यासाठी कुणी प्रार्थना करावी?

मला अजून चक्क आठवतं सकाळी आम्हाला फोन आला की एक हृदय मिळण्याजोगं आहे.जेव्हा आम्ही दिलीपच्या हॉस्पिटलच्या खोलीत असताना त्याला शस्त्रक्रियेसाठी तयार करताना पाहून कडूआनंदाचा खर्‍या अर्थाने अनुभव घेत होतो तेव्हा दिलीपचे वडील आणि मी नकळत सहमत झालो होतो, एकामुद्दावर. आणि तो मुद्दा म्हणजे अगदी त्या क्षणाला आम्ही त्याच्याजवळ एव्हडे उमेदीने आणि इतके प्रेमाने उभे असताना,अगदी त्याचवेळी दुसरं एखादं कुटूंब कुठेतरी कुणाला अलविदा म्हणत असणार.
आम्ही एकमेकाचा हात घट्ट हातात घेऊन रडलो. आम्ही त्या कुटूंबासाठी देवाची प्रार्थना केली,आणि निस्वार्थी राहून त्यांनी दिलेल्या ह्या भेटी बद्दल त्यांचे आभार मानले.
दहा दिवसानंतर दिलीपला बर्‍याच महिन्यानी घरी आलेला पाहून आम्ही विस्मयीत झालो आणि आमच्याच डोळ्यावर आमचा विश्वास बसेना.
हॉस्पिटलातच तो चवदा वर्षाचा झाला होता.आणि इतक्या कोवळ्या वयात त्याला पुनर्जन्म मिळाला होता.पुढल्या दोन वर्षात त्याला शाळेत जायला लागलं मित्रांबरोबर खेळायला मिळालं.त्याच्या बरोबर आम्हा सर्वांना हिंडायला मिळालं.
दिलीपने आपल्या करकरीत नव्या हृदयाचा उपयोग रोज देवाची प्रार्थना करण्यात,वयस्कर गरजूना मदत करण्यात आणि हंसण्यात खिदळण्यात केला.

दिलीपचं नवं हृदय तो सोळा वर्षाचा असताना बंद पडलं.दुर्दैवी घटना नक्कीच,पण आम्ही ह्या घटनेला अद्भुत चमत्कार म्हणून पाहू लागलो.कारण आम्हाला अमुल्य अशी दोन वर्ष त्याच्यासंगतीत राहायला मिळाली.आणि त्या दुसर्‍याने त्याच्या हृदयाची भेट दिली नसती तर हे शक्यच नव्हतं.

आमच्या जवळ दिलीपचे बरेच फोटो आहेत. त्याच्याबरोबर घालवलेल्या क्षणांच्या आठवणी आहेत आणि अत्यंत संतोषजनक परिस्थितीची जाणीव आहे की तो त्याच्या आयुष्याच्या उत्तेजित घटना आणि प्रमुख टप्पे अनुभवू शकला.
जेव्हा तो गेला ते आम्हाला खूपच कठिण गेलं. परतफेड करण्याच्या दिलीपच्या वृत्तीची जाणीव लक्षात ठेवून त्याचे डोळे ज्या कुणाला जग पहायचं होतं त्याला दिले गेले.एखादा ज्याला आपल्याला प्रेम करणार्‍या कुटूंबाचे चेहरे पहाण्याची उत्सुकता असेल अशाला दिले गेले.
मला वाटतं एक-ना-एक दिवस मी असा चेहरा पाहीन की तो कुणाच्या मुलाचा किंवा मुलीचा असावा आणि ते दिलीपचे काळेभोर डोळे मला टवकारून पहातील-निस्वार्थी राहून दुसर्‍याला देण्याची साक्ष म्हणून.”
नंदाचं हे सगळं कथनाक ऐकून माझं डोकंच सून्न झालं.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, November 11, 2008

“हलो” ह्या शब्दातली क्षमता.

आज तळ्यावर प्रो.देसायांचा नातु नितीन- आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र असावा- असे दोघे येताना पाहिले.
नेहमी प्रमाणे भाऊसाहेबानी त्यांना येता येत नाही म्हणून त्यांच्या नातवाबरोबर मला निरोप देण्यासाठी पाठवलं होतं.
नितीनने त्याच्या मित्राची ओळख करून देताना सांगितलं,
“हा माझा मित्र सुरेश पेंढारकर.ह्याने कॅडवर-कंप्युटर एडेड डिझाईन वर-पिएचडी केली असून आता एका कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो.मघाशी येता येता आमचं पब्लिक रिलेशनवर बोलणं चाललं होतं.”हलो” ह्या शब्दात किती पावर आहे हे मला सुरेश त्याचा अनुभवातून सांगत होता.मी त्याला म्हणालो नाहीतरी तुमच्या जवळ अर्धा तास बसल्यावर काही तरी विषय निघणारच मग तुम्हाला घेऊनच बोलूया.”
मला हे ऐकून खूपच बरं वाटलं.
मी म्हणालो,
“सुरेश ऐकू या तर खरं तुझा काय अनुभव सांगतोस ते”
सुरेश सांगू लागला,
” मला जे समोर दिसतात त्या सर्वांशी मी बोलतो.मग मी कुठेही असलो तरी.मला कळालंय की लोकांशी बोलण्याने त्याच्या विश्वात एक मार्ग करता येतो.आणि ते पण मग माझ्याही विश्वासाच्या मार्गात येतात.

मी जिथे काम करतो तिथे शेकडो लोक काम करतात.मी नक्की सांगू शकणार नाही की मी त्या सर्वांना ओळखतो म्हणून. पण बर्‍याच लोकाना ओळखतो हे नक्कीच. मला वाटतं बहुतेक सर्व मला ओळखत असावेत.आणि त्यामुळेच मी म्हणेन की हेच कारण आहे की मला जिथे वाटेल तिथे मी जाऊ शकतो कारण तसंच विश्व मी माझ्या भोवती केलं आहे. आणि ते एकदम साध्या सिधान्तावर आधारीत आहे.आणि तो सिधान्त असा की प्रत्येक स्वतंत्र व्यक्ति ओळख करून घेण्यास पात्र असते.
मी जेव्हा दहा वर्षाचा होतो आणि माझ्या आईच्या हातात हात घालून एकदा रसत्यावरून जात होतो. माझी आई करमरकरांशी बोलायला थांबली.माझं लक्ष दुसरीकडेच होतं.समोरच्या “स्टॉप” साईनच्या “ओ” कडे बघण्यात मी गर्क होतो.मी त्या गृहस्थाना पूर्वी पाहिलं होतं.म्हणून मी त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही.
“बरंय”असं त्यांना आईने सांगून झाल्यावर आम्ही पुढे निघाल्यावर मला आई जे म्हणाली ते अजून पर्यंत माझ्या डोक्यात बसलेलं आहे.
ती म्हणाली,
” आता जे केलंस ते शेवटचं समजून जा.कुणाशी ही मी थांबून बोलत असताना तू निदान तुझं तोंड उघडून थोडं तरी बोलायला हवं.कारण एखादं कुत्र्याचं पिल्लू ही तुला रसत्यात पाहून आपली शेपटी हलवतं.”
हे तिचं उदाहरण दिसायला अगदी साधं वाटतं.पण माझ्या दृष्टीने ते एक दिशा दाखवणारी पाटी आहे, आणि माझ्या “स्व” त्वाचा पाया आहे.
स्वतःला आरशात न्याहाळून आपण कोण आहे हे पहावं आणि आपलं आचरण काय आहे हे ही लक्षात आणावं.माझ्या लक्षात आलं की माझं आचरण दहा वयावरच मजबूत झालं होतं. मला दिसून आलं की जेव्हा मी कुणाशीही बोलत असतो तेव्हा ते पण माझ्याशी बोलतात.आणि त्यामुळे मला ही बरं वाटतं.
ही काही माझी नुसती समजूत नाही,तर ते एक माझ्या आयुष्यातलं वळण झालं आहे.मला वाटतं प्रत्येक व्यक्तिला वाटत असतं की त्याचं तिथे असणं हे दुसर्‍याच्या लक्षात आलं पाहिजे.भले ती व्यक्ती कितीही नम्र वृत्तिची का असेना किंवा ती किती महत्वाची का असेना प्रत्येकाला तसं वाटत असतं.

कामावर असताना मी माझ्या बॉसच्या बॉसशी पण हलो करतो आणि कसं काय चालंय म्हणून विचारतो. आणि कॅन्टीन मधल्या लोकांशी पण बोलतो आणि चपर्‍याशी पण बोलतो त्यांची मुलंबाळं कशी आहेत म्हणून पण विचारतो.माझ्या कंपनीच्या डायरेक्टरशी असंच हलो-हाय करण्याच्या संवयीमुळे एकदा त्यांच्या बरोबर मिटिंग घेण्याचं धारिष्ट पण मला झालं.आम्ही दोघं खूप बोललो.एकदा तर मी त्यांना विचारलं, त्यांना काय वाटतं की ह्या कंपनीत मी किती वर्ष अजून राहू शकतो?त्यानी मला चक्क सांगितलं की तुला जितकी वर्ष राहयचं आहे तितकी वर्ष तू राहू शकतोस नव्हे तर माझी जागा मिळे पर्यंत राहू शकतोस.
आता मी ह्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट झालो आहे.पण माझी लोकांशी बोलण्याची संवय काही मी अव्हेरली नाही.मी अजून माझ्या आईचे ते शब्द आठवतो.
मला जे समोर दिसतात त्या सर्वांशी मी बोलतो.मग मी कुठेही असलो तरी.मला कळालंय की लोकांशी बोलण्याने त्याच्या विश्वात एक मार्ग करता येतो.आणि ते पण मग माझ्याही विश्वाच्या मार्गात येतात.
तुम्हाला कसं वाटतं?”
असा शेवटी प्रश्न मला त्याने केला.
मी म्हणालो,
“खरंच साधं हलो म्हणून ओळख केल्यावर त्याचे दूरवर किती फायदे असतात हे तूं तुझ्या अनुभवातून छानच पटवून दिलं आहेस.इतका खोलवर विचार मी तरी केला नव्हता.”हलो” ह्या शब्दातली क्षमता मला समजली”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, November 9, 2008

कार्यरत राहिल्याने हिम्म्त येते.

स्मिता करमरकरला जर का तुम्ही लहानपणी पाहिली असतीत तर आता एव्हडं धारिष्ट दाखवणारी आणि एव्हडं विश्वासाने बोलणारी हीच का ती, असा मनात संभ्रम झाला असता.निदान मला तरी तसं वाटतं.
“तुझ्यात एव्हडं परिवर्तन कसं झालं?”
ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर द्दायला सुंदर संधी आली आहे असा विश्वास चेहर्‍यावर दाखवून ती मला म्हणाली,
“माझा भाऊ एका अपघातात गेला.माझ्या आईला त्या घटनेचा एव्हडा धक्का बसला होता की तिचं सान्तवन करणं महाकठीण होतं.मी त्यावेळी फक्त चार वर्षाची होती.त्यामुळे माझ्या आईचा सुरक्षतेकडे बघण्याचा कल किती बदला ते माझ्या लक्षात आलं. एकाएकी आमच्या सभोवतालचं सर्व विश्वच संभवतःच धोक्याचं झालं होतं.एका रात्रीत आमचं विश्व खेळाच्या मैदानाकडेही खतरनाक जागा आहे अशा दृष्टीने पाहू लागलं.
मला वाढताना माझ्यात बरेचसे प्रतिबंध अणि नियमावलीत बसून वाढावं लागलं.कारण तसं करणं हे माझ्या संरक्षणासाठी होतं असं गृहित धरलं जात होतं.मला एकटिला शाळेतून घरी येता येत नव्हतं.माझ्या मैत्रिणी मात्र बिनदास्त येत असायच्या.
मला शाळेच्या सहलीवर जाता येत नव्हतं.कारण मला काहीतरी झालं तर.?
जशी मी मोठी होत गेले तशी माझी ह्या भितीची यादी मोठी व्हायला लागली.दीर्घ आयुष्यासासाठी माझं सारं जीवनच काही गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि काही गोष्टी केल्याच पाहिजेत अशा दोन समजूतीत वाटल्या गेल्या होत्या. मला माहित होतं की माझी आई मी सुरक्षीत रहावी म्हणून हे करीत होती.माझ्या भावाच्या जाण्यानंतर मी घरातली एकटीच होती म्हणून हे आई करीत होती ह्याची मला जाणीव होती.आणि मला काहीतरी झालं तर?असा तिच्या मनात प्रश्न यायचा.
त्यामुळेच आता मी स्वाभाविक चिंता करणारी झाली. मला कॅन्सर झाला तर,माझी पर्स हरवली तर,मी कुठच्या गाडी खाली आले तर,माझा जॉब गेला तर,म्हणजेच संकटं लहान मोठी, खरी, काल्पनीक आली तर?
गमंत म्हणजे ही गोष्ट माझ्या जीवनाकडे बघून तुमच्या मुळीच लक्षात येणार नाही.कारण जी गोष्ट मला चिंतेत टाकते किंवा ज्या गोष्टीमुळे मी भितीग्रस्त होते त्याच गोष्टी करण्यात माझ्यावर मी जोर करते.
खरं तर मी माझाच एक नियम बनवला आहे.जर एखादी गोष्ट मला भितीग्रस्त करीत असेल तर मी एकदा करून बघते.माझ्या आईने काळजी केल्या असत्या अशा मी बर्‍याच गोष्टी केल्या आहेत.
आणखी एका गोष्टी बद्दल मी सहसा बोलत नाही.तो माझ्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे.मी चवदा वर्षाची असताना माझी आई गेली.तिला गाडी खाली अपघात झाला.माझ्या आईचं जाणं आणि माझ्या भावाचं त्या अगोदर जाणं ह्याने मला लटकच करून टाकलं असतं.पण मी माझी आई गेल्यावर एक निश्चय केला होता.एकतर मी उरलेल्या आयुष्यात “सुरक्षीत” रहाण्यात दक्ष राहावं नाहीतर साहसपूर्वक सामना करून संतुष्ट,उत्तेजीत,आणि होय, भयग्रस्त जीवन जगावं.
माझ्या आई बद्दल असं लिहून मी तिच्याशी प्रातारणा करते असं माझ्या मनाला खातं.पण तिच खरी माझ्या जीवनाचा मार्ग दाती होती.आणि सरते शेवटी माझी खात्री आहे की तिला माझा गर्वच वाटला असता.
हिम्मत ही काही माणसाची नैसर्गिक विशेषता नाही.मला वाटतं त्या हिम्मतीसाठी आपल्याला प्रयत्न करायाला हवेत.जणू स्नायु विकसीत करतो तसंच. जेव्हा जेव्हा म्हणून काही गोष्टी करताना मी भयभयीत होते,किंवा मला त्या गोष्टी बेचैन करतात त्यामधूनच माझ्या लक्षात येतं की मला जमणार नाही, ह्या माझ्या समजूती पेक्षा मी काही जास्त करू शकते ही समजूत जास्त महात्वाची वाटायची.
जरी मी माझ्या आईचा सतर्क रहाण्याचा स्वभाव आई कडून घेतला असला, तरी एक माझ्या लक्षात आलं की भय असणं ही खरीच चांगली गोष्ट आहे.जर का आपण तिच्याशी सामना करू शकलो तर?.आणि ह्यावर विश्वास ठेवल्याने माझं विश्व कमी भितीग्रस्त झालं आहे.
मी स्मिताला म्हणालो,
“तुझ्याकडून मी एक शिकलो की तुझ्या मनाला जे योग्य वाटलं ते करण्यासाठी भावनाशील न होता जास्र्त व्यवहारीक काय आहे ह्याच्याकडे तू जास्त लक्ष दिलंस,म्हणून आता तू तुझं विश्व कमी भितीग्रस्त करू शकलीस.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, November 7, 2008

दुःखाची देवाण-घेवाण.

श्रीधर त्या दिवशी आपल्या पत्नी बरोबर तळ्यावर फिरायला आलेला पाहून मला आनंद झाला.आणि त्या आनंदात भर पडण्याचं कारण त्याच्या अंगावर एक चिमुकलंस मुल पाहून झाला.
गेल्या वर्षी मी त्याच्या घरी गेलो होतो ते त्याचं सांत्वन करण्यासाठी.त्याला त्यावेळी लग्न होऊन वर्ष झालं होतं आणि नवीन पाहूण्याच्या आगमनाच्या बातमीने तो खूपच खूष झालेला दिसला होता.मुलाचा जन्म झाल्या नंतर ती त्याची खूषी जास्त दिवस टिकली नाही.दुरदैवानं ते मुल होता होताच गेलं.त्या धक्क्यातून सावरता सावरता हे दुसरं मुल पाहून मला सहाजिकच आनंद झाला.मला त्याच्या बरोबर त्या घटनेचा विषय काढायचा नव्हता.पण त्यानेच तो विषय काढला आणि म्हणाला,
“मला वाटतं,दुःख करणं बरं असतं.कधी कधी माणूस दुःख कसं करायाचं ते विसरून जातो.गेल्या वर्षी झालेल्या घटनेची आठवण येण्यासाठी तुम्हाला पाहून मला अवसर मिळाला.
माझी पत्नी सातव्या महिन्यावर गरोदर होती.आणि तिचा रक्तदाब एकाएकी उंचावला.तिची लिवर बंद पडायच्या मार्गावर आली.तेव्हा डॉक्टरनी तिचं सिझरीन करून बाळंतपण कराण्याचं ठरवलं त्यामुळे आईचे आणि बाळाचे प्राण वाचणार होते.
पहिल्यावेळी जेव्हा माला माझ्या मुलाचं दर्शन झालं,ते त्याला इनक्युबेटर मधे ठेवलं असताना.त्याच्या नाकापासूनच्या श्वास नळ्या नर्ससीस साफ करीत होत्या.एखादा पाण्यातला मासा पहातो तसं त्याने मला पहिल्यांदा पाहिलं असा मला भास झाला.मी अशी कमजोर चिमुकली बेबी पहिल्यांदाच पाहिली असेल.
पुढल्या दोन आठवड्यात माझ्या पत्निची प्रकृती बरीचशी स्थिर झाली होती.पण माझ्या मुलाची स्थिती खपूच बिघडली होती.अपरिपक्वपणे जन्मलेल्या बाळाची फुफ्फुसं कोपर्‍यातल्या त्या कोळ्याच्या जाळ्यासारखी नाजूक,कमजोर असतात आणखी हलक्याश्या दबावाखाली चक्काचूर होतात.क्षणभर मला वाटलं की मी त्याला माझ्याच छातीच्या आत ठॆवावं आणि माझी फुफ्फुसं देऊन श्वास घ्यायला मदत करावी.आम्ही त्या बाळाला आमच्या छातीजवळ घेतलं,त्याच्या इवल्याश्या कपाळ पट्टीवर हात ठेवला आणि शेवटी सगळ्या तारा आणि नळ्या दूर सरकवून त्याच्या हाताच्या मागे एकच बोट सरकवून हाताला आधार द्दायला यशस्वी झालो.
काही वेळाने त्याची फुफ्फुसं निकामी झाली आणि आम्हाला तो सोडून गेला.तो कधीच रडला नाही.मी आणि माझ्या पत्नीने दोघानी त्याला जवळ घेतलं, त्याला आंघोळ घातली,त्याचे केस पुसले,त्याला इवलेसे कपडे घातले आणि मग तो त्याच्या शेवटच्या प्रवासाला निघून गेला.एक देवदूत येऊन त्याने आमच्या मुलाच्या सभोवती हात घालून त्याला उचलून घेऊन जणू एखादं सोन्याचं नाणं खिशात ठेवतात तसंच ठेवलं असं माझ्या मनात आलं.त्यावेळी तुम्ही माझ्या घरी आला होता ते मला आठवलं.
जसे दिवसा मागून दिवस जाऊ लागतात,तसं तुम्ही डोळे मिटून तुमच्या दुःखाला एक एका बोटातून निसटू देऊन,अपरिमीत झालेली हानी तुमच्याच आत प्रस्थापीत करायला बघता.तुम्ही आणि तुमचं दुःख ह्या मधली ही देवाण घेवाण म्हटली पाहिजे.मनातल्या तणावाचा पूढे मागे होणारा हा एक झोका समजला पाहिजे.एखादी होडी पालथी होवून पाण्यात डुबून जावी असं जीवन वाटतं.सरते शेवटी तुमचं दुःख तुम्हाला स्थीर करतं,आणि आलेल्या वाईट परिस्थितीत स्थैर्य निर्माण करतं.
मी एक चांगला पति आहे.तसाच चांगला बाप आणि चांगला माणूस म्हणून माझ्या हानीकडे मी पहातो.मी दयाशिल,आणि सहानुभूती ठेवणारा आणि जरूरी प्रमाणे गोष्ट करणारा आहे.आमचं लग्न नव्याने रुपाला आलं.आमच्या संबंधात असलेली घाण मुलाच्या मरणाच्या भट्टीत जळून गेली.आपल्या मुलाजवळ त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्याच्या सहवासात राहायला मिळणारं भाग्य थोड्याच भाग्यवान लोकांच्या नशिबात असतं.आणि माझा मुलगा त्याच्यावर प्रेम करणार्‍यांच्या बाहूपाशात राहून मग गेला.
आता दहा महिन्यापूर्वी माझ्या पत्निने एका सुदृढ मुलीला जन्म दिला.आणि माझ्या मुलाच्या जाण्याने झालेल्या हानीची भरपाई माझ्या मुलीच्या जन्माच्या आनंदाने भरून आली.कारण आता आमच्याकडे काय राहिलं आहे त्याची आम्हाला जाणीव झाली.देवदूताने आपले दोनही हात फैलावले आहेत.जेव्हा माझी मुलगी माझ्याकडे पहिल्यांदा पाहू लागली तेव्हा मी तिला जवळ घेऊन सुखावलो.आता मी खूष आहे.
माझी पत्नीपण आनंदात असते.त्यामुळेच मी सुरवातीला म्हणालो की मला वाटतं,दुःख करणं बरं असतं.कधी कधी माणूस दुःख कसं करायाचं ते विसरून जातो.”
मला त्याचं हे सर्व बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं.विषय बदलण्यासाठी मी लगेचच त्याला विचारलं ह्या मुलीचं नांव काय तू ठेवलंस.तो समजायचा ते समजून गेला.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gamil.com

Wednesday, November 5, 2008

तनुलिचं गद्य,पद्य

तनुलीचे आजीआजोबा जेव्हा परत जायला निघाले त्यावेळी तनुली आपल्या आईबाबाबरोबर त्यांना पोहचवायला गेली होती. त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की हे आता परत येणार नाहीत,त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून नंतर ती मनांत म्हणाली

का असे गेलात तुम्ही
ना बोलता ना सांगता
सहवासाच्या संगतीची
हिच का हो वाच्यता?

नंतर घरी अल्यावर आईबाबांचे बोलणे तिने ऐकले.

आईबाबा आले घरी
म्हणती एकमेकामधे
ठेऊया हिला उद्या डेकेअरमधे

तनुली रात्री झोपली नाही.आजीआजोबांची तिला सतत आठवण येत होती.

झोप येई ना मला
वाटे आईला मज भूक लागली
जवळ घेऊनी देई दुदु मला
कसे सांगू मी तिला
येई आठवण त्यांची मला

दुसर्‍या दिवशी डेकेअरमधे टॉम,जेरी,क्याथरीन आणि सेरा म्हणाली तिला
” रडूं नकोस अशी, येतील तुझी आईबाबा संध्याकाळी.”
मी मनात म्हणाले
“कसं सांगू मी त्याना की,आईबाबांचे पण आईबाबा असतात,ते आता कसे परत येणार?”

समजाविले मला आईने रात्री
रडूं नकोस तूं त्याच्यासाठी
येतील ते पुढच्या वर्षी
आहे मला त्याची खात्री

हे एकून तनुलीला बरं वाटलं.ती आईला म्हणाली.

लाविला मी त्यांना लळा
रडुन सुकला माझा गळा
असतील ते तिथे बेचैन
जातील हे ही दिवस झटकन
होईन मी तोवरी मोठी पटकन

लुडुलुडु चालण्या एव्हडी
गुलुगुलु बोलण्या एव्हडी
घेतील ते मज कमरेवरती
सांगिन मी मग त्यांना सत्वरी
“का असे गेलात तुम्ही
ना बोलता ना सांगता
सहवासाच्या संगतीची
हिच का हो वाच्यता?”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Monday, November 3, 2008

बार-ऍट-लॉ

त्यादवशी मी मुंबईच्या चौपाटीवर अमळंसा फिरायला गेलो होतो.सूर्य अस्थाला जाण्याची वेळ आली होती.
सूर्यास्त पहायला मला खूपच आवडतं.तिथे ठेवलेल्या एका बाकावर बसायला गेलो.आणि त्याच बाकावर आणखी एक बसलेली व्यक्ती माझ्या बरोबर जणू जूनी ओळख आहे असं दाखवून माझ्याशी हंसली.मी पण हंसलो.मला खरंच त्या गृहस्थाला ओळखता आलं नाही.
“अहो मी,समीर शिरवईकर.गोव्याला आपण शेजारी शेजारी राहयचो.तुम्ही तुमच्या वहिनीच्या माहेरी लहानपणी सूट्टीत राहायला यायचा.कित्येक वर्षानी आपली भेट झाली.”
मी त्याना म्हाणालो,
“तुम्ही मला पटकन इतक्या वर्षानी कसं ओळखलत?”
“तुमच्या गालावरची खळी कुठे लपणार.तुम्ही माझ्या जवळ बसताना हंसलात त्याचवेळी मला लक्षात आलं.
की तुम्ही सामंतच असणार.”
“मग तुम्ही काय करता?”
असा पुढचा प्रश्न मी त्याना केला.
“मी कॉलेजात कायदा शिकवतो.आता काळोख बराच झालाय.मी चर्चगेट स्टेशन समोरच राहतो.चला आपण माझ्या घरीच जांऊया.”
नंतर आम्ही दोघे चालत चालत त्यांच्या घरी गेलो.
मला समीर म्हणाला,
“सध्या माझी बायको आणि मुलगी गोव्याला गेली आहेत.आता जेवायची वेळ झाली आहे आपण गिरगावतल्या अनंताश्रमातून डबा मागवूया.”
मला कुणाचा आग्रह टाळता येत नाही.मी ओके म्हणालो.
त्याने त्याच्या नोकराला पाठवून सरंग्याची तळलेली काप,तिसर्‍याचं सुकं,कोलंबीची आमटी,तळलेली कोलंबी,सोलाची कढी,भात आणि चपात्या आणायला सांगितल्या.
डबा येई पर्यंत,काही तरी बोलत रहावं म्हणून मी त्याला म्हणालो,
“तू ह्या वकिलाच्या लाईन मधे गेलास त्याचं मला नवल वाटत नाही.कारण मला आठवतं,तू त्यावेळीसुद्धा तुझे मामा लंडनला राहतात आणि ते बॅरिस्टर आहेत,त्यांच्या सारखं तुला शिकायचं आहे म्हणायचास ते मला आठवतं.तसच केलंस की काय?”
समीर म्हणाला,
“हो मी मामाकडे लंडनला राहात होतो.तिथे बार -ऍट -लॉ झालो.आणखी इकडे आल्यावर थोडे दिवस प्रॅक्टीस करत होतो.मला मुळात शिकवायची आवड असल्याने मी इकडच्या लॉ-कॉलेज मधे शिकवतो आणि प्रॅक्टीस पण करतो.”
मी म्हणालो,
“तू क्रिमीनल केसीस घेतोस,मग त्या लाईनची मला माहिती ऐकायला मजा वाटेल”
समीर सांगू लागला,
“मी माझ्या विद्दार्थ्याना नेहमी सांगतो की कुणाचाही बचाव करायला मागे पुढे पाहू नका.मग त्या व्यक्तीने काही केलेलं असो.
“तुम्ही पटाईत गुन्हेगाराचा बचाव कराल काय?तुम्ही एखाद्दा खून्याचा बचाव कराल काय?”
असे मला नेहमीच प्रश्न विचारले जायचे.माझं त्याला एकच उत्तर असायचं,
”होय,मी करीन.”
आणि असंच उत्तर हवं.कारण मला वाटतं,कुणी काहिही केलेलं असलं तरी त्या व्याक्तीची कमीत कमी कुणी एकाने तरी बाजू घेतली पाहिजे.
माझं पूरं आयुष्य गुन्हेगाराच्या वकिलाचं काम करण्यात गेलं.मी जनतेचा समर्थक होतो.माझी अशिलं अत्यंत घृणा येईल असे कल्पना करवणार नाही असे गुन्हे केलेले असायचे.मी माझं सर्व कसब वापरून,रचनात्मकता आणून,असेल ती दृढता लक्षात घेऊन त्यांचा बचाव करायचो.
शेवटाला माझ्या अशिलाना कहिना काही कारणाने गुन्हेगार ठरवलं जायचं. कारण गुन्ह्याची गार्‍हाणी ऐकणार्‍या न्यायपालीकेचं ते स्वरूप होतं.कारण कुणावरही गुन्हेगारीचा आरोप झाल्यावर त्या न्यायपालेकेशी मुकाबला करणं कठीण काम होतं.त्या प्रांतात असलेली त्यांची शक्तिशाली ताकद,साधन, पोलीस यंत्रणा,आणि अभियोग त्या व्यक्तीवर फेकलेले असायचे.आणि फक्त त्याचा बचाव करणारा म्हणजे एक वकील.पण असं अजीब असून सुद्धा मी बर्‍याच लोकांची सुटका करण्यात मदत केली आहे.कधी कधी मी न्यायमूर्तीला कायदेशीर तृटी दाखवून राजी करत असायचो.कधी कधी ज्युरींकडून “निरपराधी” म्हणून निकाल मिळायला यशस्वी व्हायचो.

बर्‍याच लोकांची मी सुकटा करून घेत असे ते दोषी असायचे.काही सुटून पुन्हा गुन्हा करायचे.एकाला तर खूनाच्या गुन्हातून मुक्त केल्यावर सुटल्यावर त्याने दुसर्‍या कुणाचा खून केलेला असायचा.आणि मी परत त्याचा बचाव केला असायचा.तरीपण त्याला शिक्षा व्हायची पण त्यावेळी माझ्या कडून त्याचा बचाव करण्याचा जोश कमी नसायचा.
हे काम करून आता तीस वर्ष झाल्यावर मला आता कसं वाटत असेल असं विचारलंत तर मी म्हणेन मला माझ्या कामाचा गर्व आहे.माझ्या विवेकाशी नैतीक संवाद ठेवून मी झुंज दिली म्हणत असाल तर खरंच आहे ते.
कोर्टात मी गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तिशी सामना केला आहे.त्यांच जीवन,शरिर,बहूतेक वेळा त्यांचा आत्मा, कायमचा दुखावलेला असायचा.बरेच वेळां मी त्यांच्या डोळ्यात माझ्या कुटूंबातली व्यक्ति पाहायचो.कधी कधी त्यांच्या डोळ्यात मी मलाच पहायचो.

माझ्याच आतल्या माझ्याशी होणारा संघर्ष भिषण असायचा.आणि तो संघर्ष रात्रीच्या जागरणात,चिंतेत, आणि उदासिन ठेवण्यात माझा वचपा काढायचा. पण अखेर शेवटी,मी जे काय अंगिकारलं होतं त्यावरच्या माझ्या श्रद्धेची माझ्या आशंकावर जीत व्हायची.
मला माहित आहे की बर्‍याच लोकाना हे कळायला जरा कठिण व्हायचं.खरंतर काही ऐकून भयभयीत व्हायचे.आणि क्षणभर दर्शवायचे पण.

लोकशाहीचा हा एक फायदा आहे की प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तीस्वातंत्र्य संभाळलं जातं.आपण कायद्दाचा आधार घेऊन निषेध करण्यासारखं जरी कुणाचं वर्तन पाहिलं तरी त्याला कायद्दाचं संरक्षण दिलं जातं.ते वर्तन कसंही असलं तरी त्या व्यक्तीची बाजू घेणारी आणखी एक व्यक्ती असूं शकते.
हे संरक्षण काढून घेतलं की आपले लोकशाहीचे सर्व हक्क निरर्थक होतात.वकिलाकडून जर का प्रतिकार झाला नाही तर तो वकिल आणि ज्यांच्यावर अभियोग चालवला जातो ते त्याचे प्रतिनीधी असतात, त्या सर्वांच्या स्वातंत्र्यावर गदा येते. कारण जे शक्तीशाली असतात ते त्यांच्या शक्तीचा गैरवापर ज्यांच्याजवळ नाही त्यांच्यावर करू शकतात.

माझ्या विद्दार्थ्याना मी अशावेळी त्या लोकांसाठी झुंज द्दायला सांगतो.परंतु,ती झुंज फार दृढ निश्चय ठेवून,त्यांच्याकडे असलेल्या प्रतिभा,आणि कौशल्याची वापर करून झाली पाहिजे.
तुम्ही काहिही गुन्हा केलेला असो एक व्यक्ती तुमची बाजू घेणारी असली पाहिजे.त्याचमुळे आपलं व्यक्तीस्वातंत्र्य जोपसलं जाणार.अशी माझी श्रद्धा आहे.”
वेळ कसा गेला ते कळलंच नाही.तोपर्यंत अनंताश्रमातून डबा आला.भूकही दाबून लागली होती आणि त्यातल्या त्यात अनंताश्रमातलं मालवणी जेवण.मग काय विचारता!


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com