Friday, October 30, 2009

“अमृताहूनी गोड नाम तुझे आंबा”..देवगडचा हापूस आंबा.

मे महिन्याचे दिवस होते.उष्मा मी म्हणत होता.कोकणातून माझ्या मामाने मला देवगड हापूस आंब्याची एक पेटी पाठवली होती.त्या हापूस आंब्याचावास माझ्या घरभर दरावळला होता.आंबे पुर्णपणे पिकले आहेत हे वासाने ते आंबे आपल्याला समज देतात.अंमळ फ्रेश हवा घ्यावी म्हणून मीआमच्या बाल्कनीत आलो. समोरच्या बसस्टॉपवर मला राजेंद्र उभा असलेला दिसला.बहुदा तो बसची वाट पहात असावा.मला हाताने खूणावून येईन कधीतरी तुझ्याकडे असं काहीसं मला सुनावत होता.
एक वयस्कर माणूस वाकून त्याला हात जोडून काहीतरी सांगत असावा असं मी पाहिलं.तेव्हड्यात बस आली.राजेंद्राने घाईघाईत त्या वयस्कर माणासाच्या हातात काही तरी दिल्याचं मी पाहिलं.तेव्हड्यात मला घरातून हांक आली म्हणून मी आत गेलो.

दुसर्‍या दिवशी अचानक माझी आणि राजेंद्राची अपना बाजार मधे गाठ पडली. आताच घरी चल म्हणून मी त्याच्यावर दबाव आणला.
“अरे निदान देवगडचे आंबे खाण्यात आनंद घेऊंया.आणि गप्पा मारूंया.”असं मी त्याला म्हणालो.
मला माहित होतं राजेंद्राला आंबे खूप आवडतात.तो अपनाबाजारातल्या आंब्यांच्या पेटीच्या ढिगार्‍याकडे घुटमळत होता.ते आंबे जरी रत्नागीरीचे म्हणून बाहेर पाटीवर लिहिलं होतं तरी देवगडच्या आंब्यांचा स्वाद निराळाच असतो.किंबहुना देवगडचा आंबा आणि रत्नागीरीचा आंबा ह्यातला फरक फक्त जाणकारच जाणतात.

आकाराने बेताचाच,जर्द केशरी रंगाचा, कापल्यावर आतला बाठा अगदीच लहान, आंबा उत्तम पिकल्यावर सालीला सुरकुत्या दिसतात,”एलिझाबेथ परफ्युम”चा एकवेळ वास दरवळणार नाही पण ह्या आंब्याचा वास लपवणं अगदी कठीण.पूर्ण पिकलेला आंबा कापताना लोणी कापल्यासारखं वाटतं, पण तोच जर कच्चा असेल तर सुरीला खसखस आवाज येतो.तो देवगडचा हापूस आंबा असतो.

मुळात आंब्याला नाक लावून सुगंध पण येत नसेल तर तो कापण्याची घाई करण्यात अर्थच नसतो.कापलाच तर तो नक्कीच आंबट लागणार.
चिंच म्हणणार,
”हाच माझा सख्खा भाऊ!.”एव्हडा तो आंबट असतो.
पण तोच जर पिकलेला कापला आणि जिभेवर आंब्याचा गर ठेवल्यावर,
”अमृताहूनी गोड नाम तुझे आंबा”
असं म्हणायला तिच जीभ तयार होणार.हे वाचून कदाचीत वाटेल की मी आंब्याचा जाणकार आहे.पण ते काही खरं नाही.
मला ही आंब्याची मेख माझ्या मामाने अनुभवाने सांगितली होती.देवगडच्या आंब्याची बरीच कलमं त्याने आपल्या पोरसात लावली आहेत. घरात ठेवून झाल्यावर उरलेले आंबे तो पण मुंबईला विकायला पाठवतो.त्यातलीच एक पेटी मला त्याने आठवणीने पाठवली होती.

देवगडचा हापूस आंबा खायला राजेंद्र नाही कसं म्हणेल.दोघेही आम्ही घरी गेलो.दार उघडताच,
”हाः हाः काय मस्त वास येतो” असं दोघे म्हणत घरात शिरलो.
मी दोन आंबे कापून आणले.एका थाळीत आंब्याच्या शिरा आणि एका थाळीत दोन त्यांचे बाठे ठेवले. आग्रह करण्यापूर्वीच राजेंद्राने आंब्याच्या शिरा फस्त करायला सुरवात केली.त्याचं ते आंब्यावरचं प्रेम पाहून मी ही कौतुकाने त्याच्याकडे बघत होतो.

कालची बस्टॉपवरची घटना मला आठवली आणि मी राजेंद्राला म्हणालो,
“काय रे,तो कोण वयस्कर माणूस होता,आणि तुझा मित्र तुझ्या कानांत काय खूसखूसत होता.?”
“वाः तुझं अवलोकन फारच नामी आहे.”
गालाला लागलेला आंब्याचा रस रुमालाने पुसत राजेंद्र सांगू लागला,
“मी माझ्या घरातून बाहेर पडून नुकता रस्त्यावर आलो होतो,तेव्हड्यात एक वयस्कर माणूस माझ्या जवळ येऊन,
” एखाद्या रूपयाची मदत होईल का?” म्हणून विचारू लागला.
“काहीतरी दुपारच्यावेळी जेवीन”असं तो पुढे मला म्हणाला.
मी माझ्याकडची खिशात असलेली मोड चाचपत असताना माझा मित्र मला कानाकडे येऊन म्हणाला,
“हे पैसे तो दारू पिण्यात खर्च करणार.”

मी त्याला माझ्याजवळ असलेली मोड दिली कदाचीत ती मोड रुपायापेक्षा जास्त ही असावी.पण तो प्रश्न नव्हता.प्रश्न असा होता की,मी किंवा माझा मित्र कधीही जाणू शकणार नाही की त्या माणसाने खरोखरच त्या रुपयाचं काय केलं असावं. एक रुपया मला काहीच नव्हता.पण निदान त्याची दुपारची भूक भागली असावी. माझ्या मित्राचं बोलणं किती न्याय आहे किंवा माझं करणं किती न्याय आहे हे काही मी पहायला जात नाही.
आपणा सर्वांचे ह्या विषयावर निरनीराळे विचार असूं शकतात.”

मी राजेंद्राला म्हणालो,
“ह्या विषयावर बर्‍याच लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मला वाटतं आपल्या पैकी काहीना वाटत असतं की हे अशी मदत मागणारे लोक हा समाजाला एक प्रकारचा उपद्रव आहे.आणि हे लोक आपल्या दयनीय वागण्याने इतरांच्या सुसंस्कृत आणि साफसुथर्‍या जीवनाचा विचका करतात.आणि काहीना वाटतं हे लोक आळशी आणि व्यसनाधीन असतात.काही तर त्यांच्या जीवनाचा उपहास करतात.आणि त्यांना असं वाटत असतं की हे लोक अशी जीवनशैली मुद्दाम अंगिकारतात आणि म्हणून आपल्याकडून त्यांना न मिळणार्‍या सहानुभूतीलाच ते पात्र असतात.”

“अगदी माझ्या मनातलं बोलास बघ”असं म्हणून राजेंद्र नंतर म्हणाला,
”मी बरेच वेळा चकित होत असतो की माझे हे हितचिंतक मित्र मी एखाद्या रुपायाचं दान दिलं तर मला ते न देण्याच्या उपदेशचा प्रयत्न करतात आणि उलटपक्षी मी अनावश्यक महागड्या जेवणावर आणि पिण्यावर खर्च केला तर चुकून ब्र पण काढत नाहीत.याचा अर्थ माझे हे स्नेही उदार किंवा दयाळू नाहीत असं मला म्हणायचं नाही.ते खचीत दयाळू आहेत.ते त्यांच्याकडचे पैसे निरनीराळ्या कारणास्तव देऊन बर्‍याच गरजूंचं जीवन सुखकरही करत असतील.
मी एखादा रुपया दान दिला तर तो मला मी उदार मनाचा आहे हे दाखवण्यासाठी मुळीच करीत नाही. किंवा ज्याला दिला त्याची भुक शमवण्यासाठी देतो असंही नाही, शिवाय ह्या रुपयामुळे मी माझ्या जीवनशैलीच्या सुविधा पासून वंचित होतो असा ही प्रकार नाही.मी तो रुपया देतो त्याचं कारण मला अशावेळी नेहमीच मनापासूनचे आणि निष्कपट आशीर्वाद अशा व्यक्तीकडून मिळतात की ज्याला मी माझ्याकडचा आणखी एखादा रुपया देऊन किंवा काही मोड देऊन ते आशीर्वाद घेतो. त्या व्यक्तीची शालीनता माझ्या हृदयाला भिडते आणि मला मी भाग्यवान समजतो.”

मी म्हणालो,
“आजच्या जगात मनापासूनचे आशीर्वाद मिळणं जरा कठीणच आहे बघ.पण रस्त्यावरच्या एखाद्याला एक रुपया देऊन मात्र अनंत आशीर्वादाचं दान मिळतं.मला वाटतं त्या व्यक्तीची शालीनता आणि दुवा तू दिलेल्या रुपयापेक्षा कित्येक पटीने मौल्यवान असावी.तुझ्या जवळ राहीलेला रुपया त्याच्याकडे राहील्याने त्याला जास्त महत्वाचा वाटत असावा.”
राजेंद्र म्हणाला,
“अगदी बरोबर. रस्त्यावर येण्याचं त्याचं काही ही कारण असलं तरी त्याच्या जीवनातला त्याचा दर्जा समाजानेच अप्रतिष्ठित केलेला आहे.
परंतु,माझ्या एक लक्षात आलं आहे की,त्याची दयनीय परिस्थिती असली तरी त्याची शालीनतेने रहाण्याची क्षमता कुणी जरी त्याला दान कमी दिलं असलं तरी मुळीच कमी होणार नाही.आणि ही त्याच्या कडून मिळालेली शिकवणूक माझ्या मनात मी नेहमीच ठेवणार.मला वाटतं ज्याला माझ्याकडून तो रुपया मिळतो तो नकळत मला समजही देत असावा की त्या रुपयाचं मुल्य किती सहजगतीने मी कमी लेखत असलो पाहिजे.

माझ्या लक्षात आलंय की ह्या दान करण्याच्या माझ्या संवयीमुळे माझी उदारता माझ्याकडे अतिरिक्त पैसा रहाण्या इतपत विस्तारली गेली आहे.जीवन आरामात गुजरण्यापासून मी कधीही वंचित झालो नाही.मी असंही म्हणेन दुसर्‍याला जेवायला दिल्याने माझं जेवण मला कधीही चूकलं नाही.माझ्या मनात मला एव्हडीच शरम वाटते की मी माझी जरूरी झाल्यानंतर उरलेलं मी त्याला दिलं.मला असंही वाटायला लागलं आहे की दान दिलेल्या व्यक्तीला माझ्या रुपयाच्या गरजेपेक्षा मलाच त्याच्याकडून मिळणार्‍या आशीर्वादाची जास्त जरूरी भासत आहे”.

“माझ्या मनात काय आलं ते सांगू का?”असा प्रश्न करून, तो “हो!,” म्हणण्यापूर्वीच मी म्हणालो,
“कधी कधी मला असंही वाटायला लागलंय की,कुणा जवळ उदारता असणं किंवा नसणं ह्याची परिक्षा जेव्हा त्याला स्वतःला जर आणि जेव्हा ज्या काही गोष्टीची जरूरी भासेल तेव्हा त्याचा अंश जरी मिळण्यात झाला तरी त्या परिक्षेला तो उतरला अशी त्याची समाधानी होईल.”

“यापुढे मला आशा आहे की मी कोणताही ढिंढोरा न पिटता आणि गाजावाजा न करता असाच त्या आशीर्वाद देणार्‍या रस्त्यावरच्या वयस्कर व्यक्ती सारख्याला रूपया देण्यात उदारता दाखवीन.”

असं म्हणून राजेंद्र हंसायला लागला.आणि वर मला सांगतो कसा,
“पण आता तू आणखी दोन आंबे कापून आण आणि तुझी उदारता मला दाखव.”
आणि मी दुसरे दोन आंबे कापून आणेपर्यंत लागलीच राजेद्र दुसर्‍या थाळीत ठेवलेले आंब्याचे बाठे चोखायला लागला.

मला राजेंद्राचं आंब्यावरचं प्रेम पाहून कौतूक वाटलं, जणू तो मला म्हणत असावा,
“लपविलास तू हापूस आंबा
सुगंध त्याचा लपेल का?
बाठा चोखून चालेल का?”





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, October 27, 2009

“गाथनी होयेत गेsss?”

“मला समजलं.तुझ्या डोक्यावरचे केस गेले तरी तुझा स्वभाव होता तसाच आहे. चल हातपाय धूवून ये आपण जेऊंया”.. इती भाग्यश्री.

चेरापुंजी नंतर मला वाटतं कोकणातच इतका पाऊस पडत असावा. कोकणातला पाऊस ज्यांनी पाहिलाय त्यांना मी काय म्हणतो ते कळायला वेळ लागणार नाही. काळा कभिन्न काळोख,काळे कुट्ट ढग, आभाळ आणून दिवस असला तरी घरातले दिवे लावायला मजबूर करायचे.त्यातच विजांचा चमचमाट आणि विज पडल्यावर होणारा कानठिळ्य़ा बसणारा कडकडाट.
घरातली लहान मुलं तर घाबरून जायची,आणि अगदी लहान असली तर रडायची पण.

मला स्वतःला मात्र अशा पावसाच्या दिवसात कोकणात जायला आवडतं.समुद्राचं वातावरण वादळी झाल्याने समुद्रात मास्यांची रापण टाकायला कुणी धजत नाही. त्यामुळे खाडीतल्या मास्यांची आवक वाढते.गुंजूले,शेतकं,काळूंद्री,सुळे असल्या चवदार मास्यांच्या “गाथनी” करून -माडाच्या झावळ्यातल्या हिराचा वापर करून मास्यांच्या गालफडातून तो हीर ओवून केलेली मास्यांची माळ- दारोदार कोळणी हे मासे विकायला येतात.
“गाथनी होयेत गेsss?”
असा बाहेरून ओरडलेला आवाज ऐकून, असेल तसं धांव्वत आईकडे जाऊन,
“आई,तिख्खट सूकं तिखलं कर गं! अशा पावसात खायला मजा येते बघ.”
अशी आईकडे केलेली विनवणी आई शिवाय कोण मान्य करणार?
”गे माय! इकडे आण बघू तुझ्या गाथनी”
असं बाहेर जाऊन कोळणीला ओरडून सांगायला आईच्या परवानगीची पण वाट पहावी लागत नव्हती.
दोन तीन गाथनी विकत घेऊन ते मासे स्वच्छ धुऊन चांगली मिठ मिरची लाऊन खोबर्‍याच्या रसात शिजवलेलं जाड चवदार तिखलं आणि जोंधळ्याची गरम गरम भाकरी,मग काय विचारता?
जिरेसाळ तांदळाच्या गरम गरम भाताला पण कोण विचारतोय? पण जर का फणसाच्या घोट्या घालून केलेली डाळीची आमटी असेल तर मात्र भात जेवायला मजाच मजा.

आता आई कुठे आहे? फक्त तिच्या आठवणी मात्र आहेत.मग एक दिवस ठरवलं ह्या पावसाळ्यात कोकणात जायचंच.पण कुणाकडे जाणार? मग लक्षात आलं की सावंतवाडी जवळ एका खेड्यात माझी एक बहिण राहायची.सांगायचं म्हणून मामेबहिण पण खरं तर ती सख्या बहिणी सारखीच होती.तिचं खरं नाव भाग्यश्री, पण आम्ही सर्व तिला लहानपणी “भित्रीभागू” म्हणायचो.

सावंतवाडीला सकाळीच आल्यावर,तडक मासळी बाजारात गेलो.वेंगुर्ल्याहून मासे घेऊन येणार्‍या गाड्या सकाळी नऊच्या दरम्यान येत्तात.तसाच माल बाजारात रवाना होतो.
बाहेर पाऊस फार पडत होता.मासे घेऊन भाग्यश्रीच्या घरी ती जेवण तयार करण्याच्या पूर्वी पोहोचेन किंवा कसं ह्याची उगाचच शंका मनात येत होती.पण रिक्षावाल्याने धीर दिला.
“तां आमकां लागलां.तुम्ही आमचे पावणे मां?,तुमच्या बहिणीकडे वेळेवर पोचल्यात म्हणजे झालां मां?”
इतकं आश्वासन मिळाल्यावर माझा “जीव “भाड्यांत पडला.

भाग्यश्रीचं घर मंगळोरी कौलांचं होतं.जवळपास पिंपळांची झाडं बरीच होती. घराच्या समोर त्यांच्या भातशेतीचे कुणगे होते.त्या पलिकडे उंच डोंगर होता. कोकणात भरपूर पाऊस पडत असल्याने “बोडके” डोंगर दिसणं कठीण.डोंगरावर आणि वरती सपाटीवर झाडांचं जंगल असल्याने,वाघ सिंह सोडल्यास रान-डुकरं, ससे,आणि रानटी पक्षी दिसायचे.
मला पाहून भाग्यश्री आश्चर्यचकीत झालीच आणि आनंदी ही झाली.
कारण मी तिला खूप वर्षांनी पहात होतो.
“किती वर्षांनी बाबा तुका आमची आठवण झालीs?ये ये ह्या पावसान गेले चार दिवस नुसतां धुमशाण घातला.”
मला पावसाने चिंब भिजलेला पाहून सहानुभूती देत ती मला म्हणाली.

“तुला भेटायला आणि ते सुद्धा ह्या पावसाळ्यात यायचं मी ठरवलं होतं.ही मास्यांची पिशवी घे.ह्यात सुळ्याच्या गाथनी आहेत.मस्तपैकी तिखलं कर बघू.”
असं म्हणून तिच्या घराच्या पडवीतून मी घरात आलो.
“गरम गरम चहा कर” असं मी म्हणताच म्हणाली.
“अरे ते काय सांगायला हवं? आधी तुझं ह्या टॉवेलने डोकं पूस,केस पूस असं म्हटलं असतं पण तुझ्या डोक्यावर केस कुठे दिसत नाहीत.” असं म्हणून हंसली.
“तुला हंसताना पाहून आणि तुझ्या गालावरची खळी पाहून आपल्या लहानपणाची आठवण आली.भित्रीभागू कुठली!”

असं मी म्हणताच मला म्हणाली,
“आता मी भित्रीभागू राहिली नाही.आता माझ्यात खूप फरक झाला आहे.
“तो कसा?” असं मी म्हणताच,
“तुला जर दुपारपर्यंत जेवण हवं असेल तर माझ्याबरोबर स्वयंपाकघरात चल. आणि ह्या पाटावर बस.जेवण करता करता मी तुला माझी हकीकतथोडक्यात सांगते”
असं म्हणून माझ्या हातात पाट देत हातातली मास्याची पिशवी एका बाईकडे देत तिला म्हणाली,
“हे मासे नीट करून मला आणून दे”

गरम गरम चहाचा पेला माझ्या हातात देत म्हणाली,
“जीवन निर्भय असावं असं मला वाटतं.ज्या अनेक गोष्टी जीवनात असाव्यात असं आपल्याला वाटत असतं,त्यापैकी ही निर्भयता असावी यासाठी मी झटत असते.मी शक्यतो ह्या भया पासून दूरच असते.
खासकरून मी मृत्युला तशी घाबरत नाही.मला असं वाटतं आपल्या मृत्युनंतरही आपल्यासाठी काहीतरी राखून ठेवलेलं असावं. मला नक्की ते काय आहे हे माहित नाही पण तसं असावं असा माझा विचार सांगतो एव्हडंच. त्या पुर्वानुमानाचं मी पुर्वानुमान करते.आणि त्यासाठी योग यायची वाट पहात आहे. अर्थात सध्यातरी जगून खूप गोष्टी करायच्या आहेत म्हणा.एव्हडी काही मी म्हातारी झाली नाही.”
मी म्हणालो,
“हे स्थित्यंतर केव्हा पासून झालं.?प्रत्येक गोष्टीत तू भित असायची़स.”

“माझी स्वतःची ताकद आणि माझ्या मनातला भरवंसा हुडकून काढण्यापूर्वी, तसंच माझा माझ्या मनावर ताबा येण्यापूर्वी गेली वीसएक वर्षं मी भयभितीतच काढली.आणि त्याची उदाहरणं म्हणजे,अशा काही हास्यास्पद कल्पना,
जसं एखादं वादळ येऊन आमच्या घरासमोरचं पिंपळाचं झाड घरावर कोलमडून पडलं तर?,
माळ्यावर ठेवलीली पाण्याची टाकी फुटली तर?,
कोसळणार्‍या आणि न थांबणार्‍या पावसात आपली गाडी तुंबलेल्या पाण्यात अडकून पडल्यावर दरवाजे न उघडल्यास दरवाजाच्या काचा फोडाव्या लागल्या तर?
आणि त्यासाठी मी मोठा हातोडा पण गाडीत सहज मिळेल असा ठेवला होता.
भरपावसात घरून निघाल्यावर गाडी जवळच्या नाल्यात घसरून आत गेली तर?
अर्थात नाला काही एव्हडा खोल नव्हता की मी त्यात बुडणार होती.
पण ही माझी सर्व भिती काही तर्कसंगत नव्हती.

जग बुडती होईल म्हणून मी बरीच वर्ष काळजीत असायची.धान्याची आणि इतर गरजांची मी भरपूर सोय करून ठेवायची.कुणी चोर चिलटा येऊन घर लुटेल म्हणून शिवाय माझ्या मुलांच्या संरक्षणासाठी म्हणून मी माझ्या नवर्‍याला सांगून लायसन्स काढून एक पिस्तुल पण त्याला ठेवायला सांगितलं होतं.
आमच्या घराच्या मागच्या परड्यात भाजी,मिरच्या,वगैरेची झाडं लावली होती.वीज गेली तर जेवायाला पंचाईत होऊ नये म्हणून मी जळावू लाकडांचा पण साठा करून ठेवला होता.”
मला हे ऐकून हंसू येतंय हे पाहून,मला भाग्यश्री पुढे म्हणाली,
“मी तुला आणखी काही गोष्टी सांगितल्या तर तू पोटभर हंसशील.”
मी भाग्यश्रीला विनोद करीत म्हणालो,
“नाही नाही माझं पोट मला तुझ्या मास्यांच्या जेवणाने भरायचं आहे. सांग तू पुढे.”

“मला आठवतं माझ्या नवर्‍याला आणखी एक टुमदार घर बांधायचं होतं आणि ते सुद्धा आमच्या समोरच्या शेतीच्या मळ्यांच्या पलिकडे दिसणार्‍या डोंगराच्या पायथ्याशी.पुन्हा माझी तर्कसंगती अशी होती की समजा मुसळधार पावसात डोंगरावरून दरड कोसळून आपल्या घरावर पडली तर?”
तिला मधेच थांबवीत मी म्हणालो,
“ह्यात काही तुझी चूक नाही.कोकणातला पाऊस इतका मुसळधार असतो की हा तुझा विचार मला पटतो.झाडांची मुळं कमकुवत झाली की माती अस्थीर होते आणि दरडपण कोसळते.पण असले हे भितीचेच विचार तुझ्या मनात येण्याचं कारण काय?”

“खरं म्हणजे माझ्या ह्या असल्याप्रकारच्या विचाराचं कारण माझ्या लहानपणी माझ्या एका लांबच्या मामाबरोबरची माझी संगत.माझा हा मामा माझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा होता.कुठल्याही जोखमीबद्दल तो अतिशयोक्ति करून दाखवायचा, आणि कुठल्याही भयगंडाबद्दल माझं मन उकसायचं काम करायचा. त्यामुळे माझा त्याच्याशी नेहमीच वाद व्हायचा आणि मी भयभीत रहायची.
आता मला वाटतं अशा त्याच्या वागण्याने त्याला ते त्याच्या सुरक्षिततेच्या कारणाचं मूळ आहे असं वाटत असावं.खरं म्हणजे त्याला शिकारीची आवड होती. आमच्या डोंगरासमोरच्या जंगलात जाऊन लहानसहान प्राण्याची-ससा, कवडे, रानटी कबुतरं,आणि कधीकधी रानडुकरांच्या शिकारीला पण जायचा. स्वतःला संरक्षक समजायचा,सध्या असलेल्या समाजाचं एक ना एक दिवस पतन होणार आहे असं माथेफिरू सारखं उघड उघड मनोरथ करायाचा.इतर लोकाना सांगायचा की तो चुकीच्या शतकात जन्माला आला आहे. पुरूष पुरूषांसारखे वागायचे त्या शतकात जन्माला यायला हवं होतं अशी इच्छा दाखवायचा.
अशातर्‍हेने त्याला कुठच्याही गोष्टीची अतिशयोक्ति केल्या शिवाय राहवत नव्हतं आणि मला मात्र तो त्याचा नित्याचा डोस देत राहायचा. आणि त्यामुळे त्यातून त्याला जो आनंद व्ह्यायचा ते त्याला तो तसा आहे याचा आनंद होण्यासाठी व्हायचा.”
“मग तू एव्हडी धीट कशी आणि केव्हा झालीस?”
मी तिला विचारलं.

“ह्या अशा काळ्या सावल्यातून बाहेर पडायला मला बराच अवधी लागला. त्यानंतर मी कसल्याच आपत्तीबद्दल किंवा कसल्याच दुर्घटनेबद्दल विचार करायचं सोडून दिलं.आणि त्याचं मुख्य कारण माझा नवरा होता.मला समजावून सांगायला त्याला फार वेळ लागला तरी त्याची त्याबाबतची चिकाटी वाखणण्यासारखी होती.माझी मुलंपण मोठी झाली.त्यांच्याकडून आता मला समजावयाचा डोस मिळत गेला.

पण दुःखाची गोष्टी अशी की माझ्या मामाशी आम्ही प्रयत्न करूनही कुणी मुलगी लग्नच करीना. आमच्याकडून त्याला बर्‍याच मुली सांगून पाठवल्या.पण मुलींची मुलाखत घेताना सुद्धा,
“माझ्याशीच तुला लग्न करावं असं का वाटतं?तुला माझ्याही पेक्षा चांगला मुलगा भेटला नाही काय?”
असे विचित्र प्रश्न करायचा.मुलींचे बाप कपाळावर हात मारून निघून जायचे.
अलिकडेच मला कुणीतरी सांगितलं की त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याने सध्या त्याच्यावर उपाय चालू आहेत.”

भाग्यश्री हे सांगताना थोडी भावूक झाली.मी विषय बदलावा म्हणून तिला म्हणालो,
“तू बोलता बोलता केव्हा जेवण केलंस ते कळलं नाही.पण ज्यावेळी तू मासे फोडणीला टाकलेस त्याचा आवाज ऐकून आणि फोडणीचा वास घेऊन मला परत लहानपणाची माझ्या आईची आठवण आली.
ताट-पाट घ्या रे,जेवण तयार आहे म्हणून ओरडून सांगायची”

बाहेर पाऊस धो धो पडत होता.दिवसाच काळोख झाल्याने भित्रीभागूने दिवे पेटवले. काळा कभिन्न काळोख,काळे कुट्ट ढगानी आभाळ आणून दिवस असला तरी घरातले दिवे लावायला तिला मजबूर केलं. त्यातच विजांचा चमचमाट आणि विज पडल्यावर होणारा कानठिळ्य़ा बसणारा कडकडाट होत होता.मला खूप वर्षानी कोकणात आल्याचा आनंद झाला.
“गाथनी होयेत गे?”
असा उगाचच आवाज माझ्या कानात घुमत होता.
“मला समजलं.तुझ्या डोक्यावरचे केस गेले तरी तुझा स्वभाव होता तसाच आहे. चल हातपाय धूवून ये आपण जेऊंया”
मला भाग्यश्री म्हणाली.

खरं सांगू,मला भाग्यश्री माझ्या आईच्या जागीच वाटली.
मी पडत्या फळाची आज्ञा कशी अव्हेर करीन?



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, October 25, 2009

पदकमली आपल्या लागेल रहावे

लज्जेने तरी आज वाटते सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे

रोष करूनी जगले ते जीवन कसले
दोष अनेक घेतले अन दोष दिले
यापुढे मात्र नसेल काहीही सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे
लज्जेने तरी आज वाटते सांगावे

आपल्या प्रीतिची साथ आहे अमुच्या मनी
आपल्या दुःखाची व्यथा आहे अमुच्या जीवनी
यापुढे आपणा न लागो दुःखाला सहावे
लज्जेने तरी आज वाटते सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, October 23, 2009

प्रेम काय आहे ते आता मला कळलं.

.”प्रेम—म्हणजे ज्यात माणसाचा दृढनिश्चय असतो,हानीत आणि मोठ्या नैराश्येतही हास्याचा अंतरभाव असतो” इती मकरंद

धाके कॉलनीतून लिंकरोडवर येऊन जुहूच्या दिशेने जात गेल्यास,अमिताभच्या बंगल्यावर उजव्या गल्लीत वळून पुढे जात गेल्यास हेमामालिनीचा बंगला लागतो, ती गल्ली संपता संपता आडवा रस्ता येतो तो जुहू चौपाटीला समांतर जातो.ह्या रस्त्यावर पेट्रोलपंपाच्या समोर आजगांवकरांचा बंगला आहे.

मी घरून रोज जुहूवर सकाळीच चालत जायचो.त्यादिवसात अगदी सकाळी चौपाटीवर कुत्रं पण दिसत नसायचं.म्हणजेच मला सांगायचं आहे की कुणी माणूस दिसत नसायचा.पण खरं म्हणजे जवळच्या बंगल्यातल्या श्रीमंतांची कुत्री वाळूत खेळताना नक्कीच दिसायची. एखादं कुत्रं चावेल म्हणून हातात एक छोटी काठी ठेवावी लागायची. चौपाटीवर पार्ल्याच्या दिशेने जाऊन नंतर वरसोवाच्या दिशेने परत येताना थोडा उजेड व्हायचा.
दोन पांढर्‍या छोट्याश्या कुत्र्यांबरोबर खेळताना दोन सारखीच दिसणारी सारख्याच वयाची मुलं आणि त्यांचे आईवडील नेहमीच मला भेटायचे.हेच ते आजगांवकर आणि त्यांची दोन जुळी मुलं.आनंद आणि मकरंद.चौपाटीच्या ह्या ओळखीवरून नंतर त्यांची आणि माझी स्नेहात गट्टी जमली.बरेच वेळा ते मला बंगल्यावर सकाळच्या चहाला आग्रहाने घेऊन जायचे. बरीच वर्षं त्यांचा आणि माझा संबंध राहिला होता.नंतर मधे ब‍र्‍याच वर्षाचा खंड आला. तरी वीसच्या वर वर्षं झाली असतील.मधे मी एकदा त्यांचेकडे गेलो होतो तेव्हा त्यांचं घर बंदच होतं.तसं ते घर पूर्वी शाळांच्या सुट्टीत नेहमीच बंद असायचं हे मला परिचयाचं होतं.त्यावेळी आजगांवकर कुटूंब दर सुट्टीत मुलाना घेऊन कुठे ना कुठे निरनीराळ्या जागी फिरायला जायचे.

बंगल्यातल्या म्हातार्‍या माळ्याकडे चौकशी केल्यावर मला कळलं, आणि तो मला म्हणाला,
“मुलांची कॉलेजची शिक्षणं होई तो सर्व इकडेच रहायचे.नंतर सर्वजण बंगलोरला निघून गेले.आणि हा त्यांचा बंगला त्यानी कुणाला भाड्याने दिला होता.लवकरच त्यांचा एक मुलगा मकरंद इथे थोडे दिवस राहायला येणार आहे असं त्याने कालच फोनने कळवल्यामुळे आजच मी बंगला साफ करायला आलो आहे.मी आपल्याला त्यांचा फोन देतो.आपण त्यांना फोन करून मग या.”

असं म्हणून त्याने मला त्या बंगल्याचा फोन दिला.दुसर्‍याच रवीवारी मी फोन केल्यावर तो मकरंदनेच घेतला.सहाजीकच माझ्याशी फोनवर बोलून त्याला आनंद झाला.त्याच रवीवारी संध्याकाळी मी त्याला भेटायला गेलो होतो.
इतर गप्पा झाल्यावर मी त्याला ते सर्व सुट्टीत नेहमीच बाहेर जायचे ह्याची आठवण करून दिली.
“त्याचं काय गुपित आहे रे?”
असं मी मकरंदला विचारलं.
मला म्हाणाला,
“तो किस्सा मजेदार आहे.फार लहानपणातली गोष्ट आहे.
एकदा मी आणि माझा धाकटा भाऊ आमच्या आईवडीलांबरोबर रात्री जेवायला बसलो असतांना आम्हाला आमच्या बाबानी आंध्रप्रदेश राज्याची राजधानीचं नाव विचारलं.तसा अगदी सोपा प्रश्न होता.आमच्या बाबांना आम्ही सर्व जेवत असताना भुगोलाचे प्रश्न विचारायला आवडायचं.त्यादिवशी आईने मास्यांचं जेवण केलं होतं.आम्हा दोघानाही मासे खायला खूप आवडायचे. तिसर्‍याचं सुकं आणि सुंगटांची आमटी केली होती.मला हे पक्कं आठवतं,बरोबर उकड्या तांदळाचा भात होता.मासे आणि भात ह्यांचं संयोजन छानच असतं.ताटात आईने गरम गरम भात वाढल्यावर भाताच्या वाफेतून येणार्‍या वासाने जीवघेण्या भुकेला आंवर घालता येत नव्हता.आम्ही समुद्रावर खूप खेळून घरी यायचो त्यामुळे भूक खूप लागायची.

बाबांच्या प्रश्नाकडे लक्ष कसं असणार? आम्हां दोघांनाही अचूक उत्तर सांगता आलं नाही.आम्ही अभ्यासापेक्षा खेळातच जास्त वेळ घालवतो असा त्यांचा समज झाला. माझ्या आईला आणि बाबांना आमची जरा काळजी वाटू लागली.मला वाटतं त्यावेळी आम्ही दुसर्‍या तिसर्‍या इयत्तेत होतो असावे. दुसर्‍याच दिवशी माझे बाबा दादर बूक डेपोमधे गेले आणि भारताचा रंगीत नकाशा घेऊन आले.ते नकाशावरून आम्हाला भुगोलाची माहिती द्यायचे. अशी बरीच जेवणं होऊन गेली. आणि बरेच भुगोलाचे प्रश्न विचारले गेले. त्यांना दिसून आलं की ह्या नकाशाने काही आमच्यामधे बदल होतनाही. आमची उत्तरं चुकायची.”

“मला आठवतं तुम्ही गोव्याला गेला होता आणि मला येण्याचा खूप आग्रह करीत होता.माझं गाव गोव्याला आहे हे तुम्हाला मी सांगितलं होतं म्हणून तुम्ही मला बोलवत होता.पण काही कारणास्तव मला ते जमलं नाही.तुम्ही दोघं खूप नाराज झाला होता.”
अशी मी त्याला आठवण करून दिली.

“तेच सांगतो.आम्हालाही त्यावेळी नवल वाटलं होतं.पण गोव्याला जायला मिळणार म्हणून आम्हाला आनंदही झाला होता.”
असं म्हणत मकरंद पुढे म्हणाला,
“आम्हा दोघांच्या नकळत आमच्या आईबाबानी आमच्या येणार्‍या शाळेच्या सुट्टीत नवीन नवीन गावांना सहली करायचं ठरवलं.आम्ही त्याला गंमतीत “देशाची जेवणावळ” म्हणायचो.त्यानंतर पहिल्याचवेळी आमची सहल गोव्याला गेली.रात्री पोहोचल्यावर आणि दुसरे दिवशी सकाळी उठल्यावर आम्ही चौघं सकाळीच मडगांवच्या चौपाटीवर फिरायला गेलो.माझ्या बाबानी पोर्तुगीझ पेहराव केला होता.वरती हॅट आणि खाली रंगीबेरंगी पायजम्या सारखा पोषाख होता. आईने आंखूड पॅन्ट,वर रंगीत टॉप,केसाचा आंबाडा,आणि पायात टेनीस श्युझ घातले होते.सकाळीच समुद्रावर फिरून आल्यावर ब्रेकफास्टला चौपाटीवरच्या एका हॉटेलात आम्ही गेलो होतो.माझ्या बाबानी गोव्या बद्दल माहिती असलेलं पुस्तक विकत घेतलं होतं.त्यातले महत्वाचे मुद्दे ते आम्हाला वाचून दाखवत होते.

गोव्याच्या स्थानीक लोकांचा पेहराव,त्यांच्या संवयी,खाणं पिणं, कुटीर उद्योग, प्रसिद्ध चर्चांची माहिती वगैरे वगैरे समजावून सांगितली.
ह्या सुट्टीनंतर पुढे येणार्‍या निरनीराळ्या सुट्टीत आम्ही पश्चिमेला गुजराथ, राजस्थान, तसंच दक्षिणेला कर्नाटक,आंध्रप्रदेश,मद्रास याठिकाणी जाऊन आलो. आणि त्या त्या ठिकाणचे स्थानीक लोकांचे नेसायचे पेहराव ते विकत घेऊन दोघही नेसायची.मद्रासमधे बाबानी सफेद लूंगी आणि वर उघडे राहून अंगावर बेज रंगाचं उपरणं घेतलं होतं.आणि आईने टिपीकल साऊथ-इंडियन साडी नेसून दोन्ही नाकपुड्यात चमक्या घातल्या होत्या. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी किंवा रात्री/दुपारी जेवताना असले कपडे नेसून आम्हाला त्या त्या प्रांताची माहिती वाचून दाखवायचे. कधी कधी स्थानीक लोकांपैकी कुणाला तरी बोलावून जेवणाचं आमंत्रण देऊन त्यांच्या तोंडून माहिती काढून आम्हाला ऐकवायचे.मग नगर/हवेलीच्या बंदरांची माहिती, किंवा हैद्राबादच्या टिपू सुलतानाच्या राजवाड्याची माहिती,तर कधी कलकत्यातल्या हावडा ब्रिजवर कुणाबरोबर नेऊन हावडा ब्रिजची माहिती द्यायचे.”
मी मकरंदला म्हणालो,
“बाबारे,तुझे वडील शेअर बाजारात ब्रोकर होते.त्यांनाच हे असलं परवडणार.!
पण पैसा असला तरी तो योग्य कारणाला खर्च करायचा पण कळलं पाहिजे हे पण खरं आहे.”

मकरंद पुढचं सांगण्यापूर्वी जरा कष्टी झालेला दिसला.त्याला त्याच्या बाबांची आठवण येऊन तो थोडा भाऊक होऊन म्हणाला,
”मी आणि माझा भाऊ सहा वर्षाचा असल्यापासून माझे बाबा एका दुर्धर रोगाशी लढत देत होते.आमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना हाडाचा कॅन्सर रोग झाला होता.माझी आई आणि ते कुणी कुणी सुचवल्याप्रमाणे देशात विमानाने तर विमानाने जाऊन आपल्यावर उपाय करून घेण्याच्या प्रयत्नात असायचे. माझ्या बाबांचा शेअर ब्रोकरचा धंदा होता.त्यांचा धंदा चांगला चालायचा.आणि म्हणून त्यांना ते परवडायचं. माझे बाबा आजारी असूनही नंतरच्या सोळा वर्षात मला आणि माझ्या भावाला त्यांना हॉस्पिटलात पेशंट म्हणून राहिलेले कधीही पाहिल्याचं आठवत नाही आणि आमची “देशाची जेवणावळ”पण कधी थांबल्याची आठवत नाही”
“मग आजगांवकर केव्हा गेले?मला कसं कळलं नाही.?”
मी आश्चर्य करीत त्याला एका मागून एक प्रश्न करीत राहिलो.
तो म्हणाला,
“मी तेवीस वर्षाचा असताना माझे वडील गेले.आणि त्यानंतर पाच वर्षानी आमची आई गेली. पण आमचे बाबा गेल्यानंतर बर्‍याच वर्षानी माझ्या लक्षात आलं की आम्ही दोघा भावानी आणि आमच्या आईने आमच्या “आजारी ” बाबांबरोबर आमचा बराचसा अवधी घालवला.
माझं वय वाढत असताना मला वाटत राहिलं की,आमच्यापासून नामानिराळा असणारा कुठचाही “आजार” तो फक्त अशाच लोकांना व्हावा की जे हंसत नाहीत. निदान आमचे आईबाबा आणि आम्ही भरपूर हंसत राहायचो.
ह्या घटने नंतर मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की ही सतत हंसत रहाण्याची देणगी आमच्या आईबाबांकडून आम्हाला मिळाली. पण त्यासाठीफार किंमत त्यांना द्यावी लागली.”
मी म्हणालो,
“तुमचे आईवडील खूपच प्रेमळ होते.”
“हो तेच मला तुम्हाला शेवटी सांगायचं आहे”
मकरंद सांगत राहिला.
“प्रेम काय आहे ते आता मला त्यांच्याकडून कळलं.प्रेम—म्हणजे ज्यात माणसाचा दृढनिश्चय असतो,हानीत आणि मोठ्या नैराश्येतही हास्याचा अंतरभाव असतो, आणि आमच्या जीवनात त्या गुणांची आम्हाला देणगी व्हावी म्हणून माझ्या आईबाबांकडून झालेला त्यांचा मनस्वी प्रयत्न.”
बिचारे दोघेही भाऊ भाऊ पोरके झाल्याचं पाहून मी ही सद्नदीत झालो.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, October 21, 2009

पंढरीचा विठोबा…माझा प्रेसिडेन्ट भाग चवथा.शेवटचा.

पंढरीचा विठोबा…माझा प्रेसिडेन्ट भाग चवथा.शेवटचा.
अमेरिकन निवडणूकीत दोन्ही पार्टीचे उमेदवार प्रेसिडेन्टच्या अखेरच्या निवडणूकीसाठी निवडून आले की त्यांची नोव्हेंबरच्या अखेरच्या निवडणूकी पुर्वी तिन,चार डिबेट्स होतात.ही डिबेट्स न्युझमिडीयाचे लोक घडवून आणतात.प्रत्येक डिबेटला लाखो अमेरिकन फार महत्व देतात.सुरवातीला जरी टिव्हीवर तेव्हडी गर्दी नसली तरी शेवटच्या डिबेटला खच्चून गर्दी करून लोक प्रतिसाद देतात.

ओबामा आणि मेकेनच्या डिबेटमधे पहिल्या पासून ओबामाचीच सरशी होती. ओबामा बोलायला फाकडा होता,त्याची विश्वासपुर्वक पुर्व तयारी असायची,आणि त्याचा शांत स्वभाव हे त्याचे गुण त्याला फायद्याचे होत होते.उलट मेकेन उत्तर देताना विचलीत व्हायचा,थोडाफार चिडून बोलायचा, आणि त्याच्या इतक्या वर्षाच्या राजकारणातल्या जीवनाबद्दल त्याला अभिमान होता. त्याची तुलना तो ओबामाशी त्याच्या अगदीच तुटपुंज्या राजकारणातल्या अनुभवाशी करायचा. विशेषकरून मेकेनचा मिलिटरीतला अनुभव नक्कीच डोळ्यात भरण्यासारखा होता. त्यामानाने ओबामाला त्या क्षेत्रात अनुभव नगणतीतला होता म्हणायला हरकत नाही.पण ओबामा मेकनेच्या मिलटरीतल्या क्षेत्राच्या अनुभवाचा आदर ठेवून स्तुती करायचा.आणि एकॉनॉमी,अमेरिकन घटना,आणि प्रे.बुशच्या असफल झालेल्या फॉरेन-पॉलिसीबद्दल अचूक निदानं करायचा.

आणि एक दिवस एका डिबेटच्यापुर्वी अमेरिकन एकॉनॉमी जाम कोसळली.चवदा हजारच्या टंकशीवर गेलेला डाऊजॉन एकदम सात हजारावर येऊन आदळला. बॅन्का कोसळायला लागल्या.प्रे.बुश काळजीत पडला.कॉन्ग्रेसची आणि सिनेटची तातडीची मिटीन्ग बोलवण्यात आली.नाहीतरी मेकेनची आदल्या दोन डिबेट्समधून घसरण चालूच होती.मेकेन ओबामाला म्हणाला,
“येणारं डिबेट रद्द करूया”.
ओबामाचं म्हणणं डिबेट रद्द करण्याची काही आवश्यक्यता नाही. प्रेसिडेन्ट झाल्यावर कुणालाही अश्या एकावेळी दोन तीन समस्यांना तोंड देण्याची पाळी आल्यास एका वेळी एक समस्या सोडवायची विलासीता कशी घ्यायला जमणार?. आपण डिबेटची तारीख न बदलता ही समस्या सोडवूया.असा प्रस्ताव त्याने मेकेन जवळ मांडला.डिबेट घेणार्‍या कमिटीने पण ओबामाचीच बाजु धरली. पण मेकेन अतिशय गंभिर घटना असताना असं करणं बरोबर नाही असं म्हणून ताबडतोब वाशिन्गटनडीसीला निघून गेला.आपण भावी प्रेसिडेन्ट आहे अशा अविर्भावात तो प्रे.बुशने बोलावलेल्या मिटिन्गला हजर झाला.बुशने अर्थात मेकेनला महत्व दिलं नाही हा भाग वेगळा. ओबामा आरामात मिटिन्गच्या आदल्या दिवशी वाशिन्गट्नडीसीला गेला होता.

ही घटना सांगण्याचा उद्देश असा की देशाला समस्या आल्यावर प्रेसिडेन्ट झाल्यास मेकेन सैरभैर होऊ शकतो आणि हा त्याचा कमकुवतपणा आहे. असा ह्यातून लोकानी उलट अर्थ काढला.

ओबामाच्या लहानपणी जेव्हा तो आईबरोबर इंडोनेशीयाला गेला होता तेव्हा तिथे तो हायस्कुलला जाई पर्यंत शिकत होता.मधल्या काळात त्याच्या आईने त्यावेळी इंडोनेशियात स्थाईक झालेल्या आणि पुर्वी इडोनेशियातून हवाईला शिकायला आलेल्या आणि तिकडे तिच्याबरोबर कॉलेजमधे शिकणार्‍या माणसाबरोबर दुसरं लग्न केलं. आणि तिला त्याच्या पासून एक मुलगी झाली.तिच ओबामाची सावत्र बहिण.तिचं नाव माया होतं. ओबामाचं तिच्यावर खूप प्रेम होतं.ह्या दोघां लहान मुलांना सांभाळून नोकरी करताना त्याच्या आईचे नाकीनऊ यायचे.एकदा काय झालं, ओबामा म्हणतो,

“एकदा शाळेतून घरी येत असताना बरोबरच्या एका शाळा सोबत्याबरोबर माझी बाचाबाची होऊन जमिनीवर पडून माझ्या हातापायाला लागलं होतं.कामावरून घरी आल्यावर आईने मला त्या परिस्थितीत पाहून धसका घेतला.क्लिनीकमधे नेऊन माझ्यावर उपचार केले.पुढेमागे मी उनाड होईन असं समजून लवकरच माझी हवाईला आजीआजोबाकडे तिने रवानगी केली.”

ओबामा आजीआजोबांकडे राहून हायस्कूलचं शिक्षण पूर्ण करून झाल्यावर मेनलॅन्ड अमेरिकेत कॅलिफोरनीयात लॉसएन्जालीसला आला.तो लॉसएन्जालीसच्या ऑक्सिडेन्टल कॉलेजमधे दाखल झाला. नंतर ओबामा तिथून निघून न्युयॉर्कच्या कोलंबीया युनिव्हर्सिटीला जॉईन झाला.इथे ग्रॅज्युएट झाल्यावर अवघ्या तेवीस वयावर तो शिकागोला आला.आणि तिथे त्याने लोकोपयोगी कामं करायचं ठरवलं.गरीब वस्तीत फिरून तो त्यांच्या समस्या सोडवायच्या प्रयत्नाला लागला.व्हालेन्टियर होऊन वर्षाला मिळणार्‍या अवघ्या बारा हजार डॉलरवर तृप्त राहिला.नंतर त्याच्या लक्षात आलं की जनसेवा करताना थोडी कायद्याची माहिती असण्याची गरज आहे.म्हणून तो हार्वर्ड लॉकॉलेज मधे दाखल झाला.हार्वर्ड लॉकॉलेजमधे कायद्याचा अभ्यास पुर्ण करताना अमेरिकेच्या घटनेचा त्याने जीव टाकून अभ्यास केला.लॉकॉलेजमधे त्याने स्टुड्न्टयुनीयनची निवडणूक जिंकून तो त्या युनियनचा प्रेसिडेन्ट झाला.इथेच त्याला लोकांसमोर बोलायाची संवय लागली. पब्लिकस्पिकींगचा त्याने अभ्यास केला.नंतर तो भाषणाची तयारी करून झाल्यावर लिहिलेल्या भाषणाची कसलीही मदत न घेता मुद्देवार स्मृती ठेवून अस्खलीत बोलायला लागला.ह्याची त्याला शिकागोला त्या राज्याच्या सिनेटमधे निवडून यायला मदत झालीच त्या शिवाय पुढे देशाच्या सिनेटमधेही निवडून यायला सफल झाला.हल्ली तर तो कसलेही भाषण फक्त त्याची तयारी करून येतो आणि उस्फूर्तपणे देतो.कधीकधी मुळ भाषण बाजूला ठेऊन आणखी काही उस्फुर्त बोलतो.हार्वर्डमधे शिकून झाल्यावर तो अमेरिकेच्या घटनेवर शिकवायला काही दिवस हार्वर्डमधेच प्रोफेसर म्हणून राहिला.आज त्याला प्रेसिडेन्ट झाल्यावर ह्या विषयाच्या अभ्यासाचा पुरेपूर फायदा होत आहे.

ओबामाने सुरवाती पासून इराक युद्धाला विरोध केला होता.युद्धाने प्रश्न सुटत नाही हे तो जीव तोडून सांगायचा.इराक युद्धाला कंटाळलेली अमेरिकन जनता,
”मी प्रेसिडेन्ट झालो तर इराक मधून सैन्य काढून घेईन”
हे त्याच्या तोंडातून ऐकायला आतूर व्हायची.
उलट मेकेन,
“असं सैन्य काढून घेतलं तर,अमेरिकेची नामुष्कि होईल”
असं म्हणायचा.
शेवटी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूकीचा दिवस उजाडला.मेकेन हरला.रिप.पार्टी हरली.ओबामा जिंकला.डेमो.पार्टी जिंकली.
दोन वर्षं अगोदर पासून मेहेनत घेऊन केलेल्या कष्टाचं ओबामाला फळ मिळालं.
त्या समयामधे तो युरोपला,इराकला,अफगाणीस्थानला,इझराईलला भेटी देऊन आला.युरोपमधे जर्मनीमधे एका सभेला त्याला बघायला दहालाखाच्यावर गर्दी जमली होती.
“तो मनापासून बोलत आहे.अमेरिकेच्या उतरत्याकळेला वर नेईल.”
असं लोकाना वाटायचं.
गेल्या आठवर्षाच्या बुशच्या कारभाराला-युद्धखोरीला- अमेरिकाच नव्हे तर सर्व जगच कंटाळलं होतं.
ओबामा जिंकून आल्यावर झालेल्या पहिल्याच सभेला अतोनात गर्दी झाली होती.
सभेत तो बोलत असताना गोर्‍यापासून काळ्यापर्यंत,लॅटिनोपासून एशियनापर्यंत अनेकजण आश्चर्याने आणि आनंदाने रडत होते.टिव्हीचे कॅमेरे ही दृष्य उस्फूर्तपणे टिपीत होते.
“यस विई क्यान”
चा उदघोष होत होता.

आणि नव्या वर्षाच्या २००९च्या जानेवारीच्या २० तारखेला प्रे.बुशकडून देशाचा कारभार ओबामाने हाती घेतला.तेव्हा,
ओबामाच्या डोक्यावर एक ट्रिलियन डॉलर्सचं -१,०००.०००,०००,०००- (एक निखर्व डॉलर्सचं) कर्ज होतं.एकॉनॉमी रसा तळाला गेली होती. अमेरिकेबद्दल रिप.पार्टीच्या आठ वर्षाच्या धोरणामुळे जगात नाचक्कीचं वातावरण निर्माण झालं होतं,उत्तर कोरिया आणि इराणकडून न्युक्लीअर बॉम्बच्या धमकीचं ओझं होतं, आतंकवाद्यांनी धुमाकूळ घालून न्युक्लीअर बॉम्ब असलेल्या पाकिस्तान सारख्या देशाला गिळंकृत करायचा चंग लावला होता,घराच्या कर्जाचा हाप्ता फेडता येत नाही म्हणून लाखो अमेरिकन लोकाना घरं सोडून रस्त्यावर येण्याची पाळी आली होती.महिन्याला सात लखावर लोकाना नोकरीवरून काढलं जात होतं,मोठ मोठ्या बॅन्का कोसळत होत्या,आणखी किती गोष्टींचा पाढा सांगावा?
अशा परिस्थितीत -संदर्भ नसताना- शक्यतो कुणालाही दोष न देता, कुणावरही ठपका न ठेवता,कुणावरही न चिडता,सतत हंसरा चेहरा ठेवून, ओबामाने कारभार हाती घेतला होता.

कुरूक्षेत्रावर ह्या अनेक “संकटरूपी कौरवांच्या” सैन्यांचा पाडाव करण्यासाठी रथाचं सारथ्य करारायला पुढे आलेला हा,
“धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे”
म्हणणार्‍या कृष्णासारखा मला वाटू लागला.
अजूनही ह्या पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला अमेरिकन वारकर्‍यांची दिंडी गाजत वाजत येत असते.
“विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल”
“ओबामा,ओबामा,ओबामा…”
असा गजर करतात.
म्हणूनच,
“पंढरीचा विठोबा..ओबामा. माझा प्रेसिडेन्ट म्हणायला मी काहीसा भारावून उद्युक्त झालो आहे.एव्हडंच.
समाप्त.




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, October 19, 2009

पंढरीचा विठ्ठल..ओबामा.माझा प्रेसिडेन्ट. भाग तिसरा.

एक स्पष्टीकरण….
आम्ही हे लिहित आहो हे आमच्या विचारान्वये करीत आहो.ओबामा विषयी आम्हाला खास पुळका आहे अशातला भाग नाही.आम्ही रिप किंवा डेमोपार्टीचे नाही.इंडीपेन्डट आहो.उद्या डेमो पार्टीचं आमच्या दृष्टीने चुकलं तर तसंच लिहिणार. कुणाच्याही अंगातले चांगले गुण आम्हाला भावले तर सहाजीक आमचे मन आम्ही उघडे करतो.ह्यात कुणीही परसनल घेऊ नये.
कृपाकरून लेख वाचून आनंद घ्यावा.हिच वाचकाना विनंती आहे……

जॉन मेकेनला काळजी लागली होती की आपला व्हाईस प्रेसिडेन्ट कुणाला नेमावं.इतर त्याच्याच पार्टीच्या जवळ जवळ सगळ्याच उमेदवाराबरोबर त्याचं जमत नव्हतं.मेकेनजवळ खर्च करायलापण जास्त पैसा नव्हता.त्याची बायको एका श्रीमंत बिझीनेसमनची मुलगी असल्याने तिच्या कडून पैसा घेऊन तो निवडणूकीला खर्च करीत होता.पैसा जमवण्यासाठी प्रेसिडेन्टचा उपयोग करून घेण्यासाठी वापर करावा तर त्याचा-त्याच्या पार्टीचा-प्रसिडेन्ट भरपूर बदनाम झालेला होता.शेवटी शेवटी तर बुशला इराकमधे बुटांचा अहेर मिळाल्यानंतर अमेरिकेत सोडाच सगळ्या जगात बदनाम झाला होता.रिप.पार्टीचे कोणही उमेदवार बुशला जवळ करीत नव्हते.

आणि एकाएकी एक दिवशी सारा पेलन ह्या अलास्काच्या गव्हर्नरची मेकेनने व्हाईस प्रेसिडेन्टसाठी निवड केल्याचं जाहिर केलं.ही सुंदरी बोलायला फाकडी होती.ती आपल्या सर्व कुटूंबियाना घेऊन स्टेजवर यायची.रिप.पार्टीच्या पुराणमतवादी लोकांवर तिने चांगलीच भुरळ टाकली होती.जिथे जेमतेम चारपाचशे लोक सभेला जमायचे तिथे आता चारपाच हजार लोक सभेला जमायला लागले.मेकेन नेहमी तिलाच पुढे करायचा.ती पण काही अक्कलेचे तारे तोडायची,ते विचारूं नका.एकदा पत्रकारांना मुलाखत देतानां म्हणाली म्हणे “रशियाचा पुतीन विमानातून जाताना तिच्या खिडकीतून बरेच वेळा दिसायचा.”
“तो आपल्याला बाय बाय करायचा ” असं म्हटल्यांच काही पत्रकारानी आपली भर टाकून तिची खिल्ली उडवायचा प्रयत्नही केला.

एका स्त्री पत्रकाराने तिची खास मुलाखत घेतली होती.त्यात देशाच्या काही फोरेन पॉलिसी बाबत तिचं धोरण काय असेल ह्या प्रश्नावर उत्तर देताना तिने इतका गोंधळ माजवला होता की तिला काय म्हणायचं आहे ऐकणार्‍याला कळलंच नाही. अशा तर्‍हेने आणि मेकन-डॅडीबरोबर समुदाया समोर भाषण करताना केलेल्या भाषणांच्या भंबेर्‍या लक्षात घेऊन “सॅटरडे नाईट लाइव्ह” ह्या आठवड्याच्या टीव्हीवरच्या नकलांच्या प्रोगामचा टीआरपीतिच्या कडून वाढवला गेला.

हे सर्व सांगण्याचं कारण असं की सुरवातीला सभेत प्रचंड संख्येत जमणारी लोकं हळू हळू ओसरू लागली.मग तिला सोडून अंकल मेकेन दोन तिनशे लोकांच्या टाऊन हॉल मिटींग घेऊं लागला. सेरा पेलनबाई आपण स्वतंत्र मिटिंग घेऊ लागली.तिच्या मिटिंगला खूप लोक जमायचे पण बरेच म्हणतात की सुरवातीच्या गर्दीचं कारण म्हणे तिला बघायलाच जास्त जमायचे.मेकेनने बहुदा तिला “तोंड फटकळपणा” करायला मुभा दिली असावी.

आणि ती तशी स्वभावाने होती ही.कारण ती बरेच वेळा ओबामाची निंदा नालस्ती करायची.

“तो कम्युनीस्ट आहे,निवडून आल्या्स टॅक्स वाढवणार आहे.तो इराक मधून नामुष्कीने फौजा काढून घेणार आहे वगैरे. मेकेन ओबामाला आपल्या बरोबर ह्या टाऊन हॉल मिटींगस मधे डिबेटींगसाठी यायचा आग्रह धरूं लागला.ओबामा कसा येईल?.त्याच्या सभेला दहापंधरा हजारावर लोक यायचे.
“माझ्याबरोबर डिबेट करायला ओबामा घाबरतो” असा तो प्रचार करायचा.ओबामा त्याच्याकडे लक्षच देत नव्हता. ओबामाच्या अंगात निवडणूकीचं वारं भरलं होतं. निवडून येणार याची त्याला खात्री वाटत असावी.पण तो तसं कधीच भासूं देत नव्हता. प्रथमच काळा प्रेसिडेन्ट निवडून येणं तितकं सोपं नव्हतं.
इथे काळ्याला काळा असंच म्हणतात. “कृष्णवर्णीय,सावळा,निमगोरा”असली विशेषणं लावत नाहीत.ब्लॅक किंवा व्हाईट सरळ सरळ संबोधलं जातं.

सात आठ वर्षाचा असताना हा कृष्णकन्हैया हवाई स्टेट सोडून आपल्या आईबरोबर इंडोनेशियाला गेला.त्याच्या वडिलाने आईशी काडीमोड घेऊन ते केनियाला परत गेले.”माय फादर” ह्या नावाच्या ओबामाने लिहिलेल्या पुस्तकात त्याच्या इंडोनेशियातल्या मुक्कामाबाबत बरंच काही लिहलं आहे.

हवाईला कॉलेजचं शिक्षण पुरं झाल्यावर आणि नवरा सोडून गेल्यावर स्वतःच्या उर्जितावस्तेसाठी त्याची आई जॉबच्या शोधात होती.लहान बाळकृष्ण पदरी होता. तिच्या वडिलांचं हवाई मधे फर्नीचरचं दुकान होतं आणि तिची आई एका लोकल बॅन्केत व्हाईस प्रेसिडेन्ट म्हणून होती. आजीआजोबाकडे लाडात वाढून शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल म्हणूण आपल्या मुलाला आपल्या सहवासात चांगलं शिक्षण मिळावं,आपल्या देखरेखीखाली असल्याने वाईट मार्गापासून दूर राहिल, म्हणून त्याला ती आपल्या बरोबर घेऊन गेली होती.असं ओबामा आपल्या पुस्तकात लिहितो.
त्याच्या आईची खूप शिस्त असायची.एका कम्युनीटी बॅन्केत ती काम करायची. ही बॅन्क त्या देशातल्या गरिब स्त्रीयांना पैसे क्रेडीटवर देऊन लहानलहान धंदे उभारून उपजिवीका करायला प्रोत्साहन द्यायची.त्या गरिब स्त्रीयांची स्थिती पाहून आणि नवरे मंडळी आपल्या बायकांना सोडून गेल्यावर मुलांच्या जबाबदार्‍या घेऊन त्या स्त्रीया किती हालअपेष्टा काढायच्या ते ती आपल्या डोळ्याने पहात असायची.तिची परिस्थिती थोड्या फार प्रमाणात त्या स्त्रीयांसारखीच होती.सकाळी पाचला उठून आई आपलं होमवर्क घ्यायची.सकाळी सहाची तिची ड्युटी असल्याने आणि संध्याकाळी यायला उशीरहोत असल्याने पहाटे उठून अभ्यास करण्या पलिकडे त्याला गत्यंतरच नव्हती.त्या लहान वयात सकाळी उठायला खूप वाईट वाटायचं पण आई माझी कडक स्वभावाची असल्याने शिक्षणा पलिकडे आयुष्याला अर्थ नाही असं ती नेहमी माझ्या मनावर बिंबवायची.कधी कधी मला ती अंथरूणातून उठवून बसवायची.असं करताना ती खूप कष्टी व्हायची, रडायची आणि ते बघून मी पण खूप दुःखी व्हायचो.

हिंदू,बुद्ध धर्माबद्दल मला तिने खूप पुस्तकं वाचायला दिली होती.ती अजून माझ्या लायब्ररीत आहेत.भगवत गीतेतले काही श्लोक तिने माझ्या कडून पाठ करून घेऊन त्याचा पूर्ण अर्थ माझ्या कडून ऐकून घ्यायची.महात्मा गांधीबद्दल मला खूप आदर आहे.कुराणा मधून पण मला खूप गोष्टी वाचून कळल्या आहेत. असं ओबामा म्हणतो.
ह्या नंतरची माहिती चवथ्या भागात.
क्रमशः…


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, October 17, 2009

पंढरीचा विठोबा..ओबामा, माझा प्रेसिडेन्ट. भाग दुसरा.

.


“माझ्या वाचकाना दिवाळीच्या शुभेच्छा”

सत्तरी ओलांडलेला बुड्डा जॉन मेकेन यापूर्वी दोनदा प्रेसिडेन्ट होण्यासाठी असफल प्रयत्न करून थकला होता.रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीच्या चढाओढीत मेकेन अगदी नगणतीत होता.पण निवडणुकीचे वारे कसे फिरतील हे सांगणं कठीण. व्हीएटनाम युद्धात ऍट्याक पायलटचं काम करीत असता युद्धकैदी म्हणून पाच एक वर्ष व्हीऍटनाममधे तुरंगात होता.कैद्याला टॉर्चर कसं करतात ते त्याने चांगलंच अनुभवलं होतं.त्याचे वडील अमेरिकन नेव्हिच्या इस्टर्न फ्लिटचे ऍडमिरल होते.त्यासाठी शत्रुपक्षाकडून त्याला शिक्षेत मुभा मिळाली असती. नव्हेतर तसा प्रस्ताव आला ही होता पण ह्या बच्चम जीने तो प्रस्ताव धुडकावून लावला होता.त्यावेळी त्याचा छ्ळ करून कम्युनीस्टानी त्याचे दोन्ही हात वांकडे करून ठेवले होते.

आदल्या निवडणुकीत बुशबरोबर निवडणूक-डिबेटमधे त्या दोघांचे खटके उडाले होते.बुश अगदी खालच्या थराला गेला होता.
बंगलादेशमधून एका काळ्या अनऔरस मुलीला मेकेनने दत्तक म्हणून बाळगलं होतं.बुश त्याच्या फालतु विनोदाच्या पद्धतीत त्याबद्दल मेकेनला म्हणाला होता की,
“ही तुझी काळ्याबाईशी तुझ्या लफड्यातून झालेली मुलगी आहे”
असं ह्या शब्दात अगदी स्पष्ट बोलला. आणि ते खोटं आहे हे माहित असून सुद्धा तो असं बोलला.हे सांगण्याचा उद्देश असा की त्यावेळी मेकन बुशवर खूपच चिडला होता.कुणीही चिडला असता म्हणा.परंतु चिडखोरपणा हा मेकनेच्या हाडांमासांत भिनला होता.
”ओबामासारखा पोरकट माझ्याशी लढत तरी कशी देतो?”
ह्याचा त्याला खूप राग यायचा.माझा अनुभव, माझं वय, माझा त्याग, अमेरिकन लोक नक्कीच लक्षात घेतील असा त्याला भ्रम झाला होता.एका डिबेटमधे त्याने ओबामाकडे अंगुली निदर्शन करून “द्याट ” असं म्हणून त्याला फाल्तु माणूस आहेस असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता.पण ओबामाने हे ऐकून त्याच्या इश्यु न करता नेहमी प्रमाणे दोन्ही हाताने आपले खांदे झटकले.

ह्या विठोबाने सुरवाती पासून निरनीराळे अवतार घेतले होते.
ओबामाचा शांत स्वभाव त्याच्या आईकडून आणि त्याच्या गोर्‍या आजोबाकडून आला आहे असं तो म्हणतो.हा गोर्‍या देवकीचा सावळाकृष्ण देवकीनेच आपल्या आईवडीलांकडे वाढायला ठेवला होता.
हवाई ह्या अमेरिकेच्या पन्नासाव्या राज्यात गोकुळात हा मनमोहन आजीआजोबांच्या छायेखाली वाढत होता.हे राज्य अमेरिके़च्या मेनलॅन्डपासूनसहा हजार मैलावर आहे.तिथे वाढत असताना अधून मधून त्याला “गवळ्याचं पोर” म्हणून हिणवण्यात काही गोरे लोक भाग घ्यायचे असं तो म्हणतो. आणि त्याची गोरी आजी त्या लोकांना रागाने प्रत्युत्तर द्यायची.आजी बरोबर बाजारात किंवा पार्कवर गेल्यावर लोक त्याला हिणवून म्हणायचे.पण लहान असूनही ओबामा आपल्या आजीला समजावून सांगायचा.

“आजी,त्यांना म्हणू देत.माझ्या अंगाला काही खड्डे पडत नाहीत आणि तुझ्या अंगाला पण. आजोबा कसे शांतपणे सहन करतात,ते मला आवडतं.त्यांना प्रत्युत्तर देऊन तुझ्याकडून त्यांना उगाच महत्व मिळतं.”मौनम सर्वार्थ साधनम” असं येशू म्हणतो असं तूच ना मला सांगतेस?”
आजी त्याला हृदयाजवळ कवटाळून घ्यायची.
“लहान असून तू किती रे विचारी आहेस.”
असं म्हणून ती डोळे ओले करायची.असं ओबामाबद्दल,
“फ्रॉम प्रॉमिझ टू पॉवर”
ह्या त्याच्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकात म्हटलं आहे.
निवडणुक लढाईत तो मेकेनचा पुरेपूर सन्मान करायचा.पण कधी कधी त्याचा मान ठेवून खिल्ली उडवायचा.
अमेरिकेची सांपत्तिक परिस्थिती जेव्हा कोसळली,तेव्हा मेकेनला पत्रकारानी विचारलं होतं,
“तू ह्यावर काय उपाय सुचवतोस?”
“मला तेव्हडं एकॉनॉमित फारसं कळत नाही” असं मेकेनने आपलं प्रांजाळ मत दिलं होतं.
“जॉन(मेकेन) अनुभवी आहे,हुशार आहे,युद्धात खूप त्याने दुःख सहन केलं आहे. पण आता जे काय तो एकॉनॉमीबद्दल म्हणतोय ते त्याला कळत नाहीय.”
असं त्याला उद्देशून म्हणायचा.
मेकेन हे ऐकून त्याच्यावर गोरामोरा व्हायचा पण निरुत्तर व्हायचा.
एक वेळ अशी आली होती की मेकेनच्या सभेला शेपाचशे लोक जमायचे आणि ह्या “गवळ्याच्या पोराची” प्रचंड सभा व्हायची.
“विठ्ठल,विठ्ठल,जय हरी विठ्ठल म्हणत”
त्याचे वारकरी लांब लांबच्या गावातून आदल्या दिवसापासून सभेला जमायचे. त्यांच्या रंगीबेरंगी बावट्यावर लिहिलेलं असायचं,
“यस वीई क्यान”,”
नो मोअर बुश फॉर नेक्स्ट फोर इयरस”
हा मेकेनला टोमणा असायचा.
तो सभेत आल्यावर पुढल्या पाच मिनटात लोकं उभे राहून टाळ्यांचा गजर करायचे.
“थॅन्क्स,थॅन्क्स,थॅन्क्यु व्हेरी मच” असं त्याला तेव्हडाच वेळ ओरडून सांगावं लागायचं.काही वेळाने लोक खाली बसायचे.
हे सर्व मेकेन आणि त्याच्या पार्टीचे लोक पेपरात वाचायचे आणि टीव्हीवर बघायचे.
हा “फ्लुट पायपर”- “कान्हा” -आपली फ्लुट-बांसरी- वाजवीत लोकांना आपल्या जवळ खेचून घ्यायचा.
शेवटी मेकेनने एक आयडीया शोधून काढली.
त्याबद्दल तिसर्‍या भागात.

खास…. ओबामाने व्हाईट हाऊसवर दिवाळी साजरी करायला दिवे, पणत्या लावल्या आहेत.आणि यात खास बात अशी की,हा पहिलाच प्रेसिडेन्ट ज्याने व्हाईटहाऊस दिवाळीसाठी सजवलं आहे.
बुश-४३ने बाजूच्या बिल्डिंगमधे दिवे लावून दवाळीसाठी सजावट केली होती.बूश आपण स्वतः कधीच प्रत्यक्ष हजर राहिला नाही.आपलं भाषणवाचायला देत होता.
ओबामाने स्वतः मेणबत्ती घेऊन समई उज्वलीत केली.भटजींशी हस्तान्दोलन केलं.आणि भारतीय पाहूण्यात मिसळून लाडू,करंज्याचा आस्वाद घेत होता.

क्रमशः…


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, October 15, 2009

पंढरीचा विठोबा..ओबामा, माझा प्रेसिडेन्ट. भाग पहिला

“आज ओबामाने व्हाईटहाऊसवर दिवे,पणत्या लावून दिवाळी साजरी केली.”

एका वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन सांगायचं तर,
“धर्म संस्थापना्र्थाय संभवा मी युगे युगे”
हे म्हणणं खरं करण्यासाठी ह्या “पंढरीच्या विठ्ठलाने ” -ओबामाने- ह्यावेळी अमेरिकेत जन्म घ्यायचं ठरवलेलं दिसतंय असं मला वाटतंय.
रि.प पक्षाच्या शंभर कौरवानी गेली आठ वर्ष अमेरिकेत आणि जगात धुमाकूळ घालून मनुष्यधर्म बुडवला.बुशरूपी दुर्योधनाने इराकच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करून लाखो निरपराध लोकांना यमसदनी पाठवलं.सादाम जरी दुष्ट असला तरी ९/११ ला तो कारणीभूत नव्हता.ब्रिटनचा पंतप्रधान टोनी ब्लेअर शकूनीमामा त्याला सामील झाला होता.

“यु गेट वॉट यु डिझर्व्ह”
ह्या म्हणण्याप्रमाणे ह्यावेळी डोकं ठिकाणावर ठेवून अमेरिकन जनतेने आपला प्रेसिडेन्ट निवडला.बरेच वेळेला तीस पसतीस टक्के मतदान करणारी जनता ह्यावेळी पन्नास पंचावन्न टक्क्यावर मतदान करायला आली होती.पंढरीच्या विठोबाकडे जशी भक्तांची गर्दी जमते तशीच ह्या विठोबाच्या सभेला लोक जमत असत,
.”विठ्ठल विठ्ठल गजरी,अवघी दुमदुमली पंढरी “
तसंच ह्याचं भाषण ऐकून लोकांचं व्हायचं.
“यस वीई क्यान”
हे त्याचं पालूपद एव्ह्डं लोकाना आवडायचं की पहिली दहा मिनटं ह्या वाक्याचा गजर व्हायचा.
“जय हरी विठ्ठल जय श्री विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल”
ह्या धरतीवर “ओबामा,ओबामा,ओबामा “
असा लोक आणखी तीन मिनिटं गजर करायची.

प्रायमरी निवडणूकीत आयोवा स्टेट मधून ओबामा जास्तीत जास्त मतानी निवडून आला.गंमत म्हणजे आयोवा स्टेट मधल्या लोकवस्तीत गोर्‍या लोकांचं प्रमाण पंचाणव टक्के आहे.आणि ह्या पंचाणव टक्के गोर्‍या लोकानी विठोबाला निवडून देऊन अख्या देशाला दाखवून दिलं की वारे असे वाहत आहेत.

हा सत्तेचाळीस वर्षाचा तरूण सत्तेवर आणला गेला. राजकारणाच्या वयोमनात सत्तेचाळीस वर्ष म्हणजे ओठ पिळले तर दुध येईल असलं वय.नाही तरी अमेरिकन राज्यकर्ते, वय झालेले, पोटाच्या घड्या पडलेले ढेरपोटे,डबल चीन-हनुवटी-असलेले कुणीतरी शागिर्द हात पकडून ओढत ओढत स्था्नापन्न करण्यासाठी लागणारे,दंतांजीचे ठाणे सुटले,फुटले दोन्ही कान,नन्ना म्हणते मान अश्या काहीशा वयाचे सिनेटर किंवा कॉन्ग्रेसमन औषधाला पण सापडणार नाहीत. आता एखादा म्हातारा अपवाद असलाच तर विरळाच.आणि अपवादाने तो जर असलाच तर मग तो प्रचंड कार्य करीत असलेलाच असल्याने, एव्हडी वर्ष सतत निवडून येत असावा.पण प्रकृतीने मात्र तो शेवग्याच्या शेंगे सारखा असायला हवा.अमेरिकन जनता शक्यतो ढेरपोट्यांना निवडून द्यायला तयार नसते. नव्हेतर असले लोक ही आपल्या “इमेजचा” विचार करून निवडणूकीत उभं राहायला दोनदा विचार करतात.

जसं,
“विठू माझा लेकूरवाळा,संगे गोपाळांचा मेळा”
तसंच ह्या विठूने बाळ गोपाळांना-बर्‍याच तरूण अमेरिकनना- आपल्या भोवती जमवलं होतं.
“मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म साधावा”
ह्या म्हणण्याप्रमाणे ह्या बाळ शिवरायाने मेक्सीकन,एशीयन,लॅटोनोझ असे मावळे जमवले होते.त्या शिवाय त्याची विठ्ठल सेना जवळ जवळ नव्याणव टक्के त्याच्या बाजूची होती.हायटेक प्रणाली वापरून इंटरनेटवरून,
”तुम एक पैसा दोगे तो दस लाख मिलेंगे”
असा मेसेज देऊन त्याने सर्व साधारण मतदाराकडून पाच,पाच,दहा, दहा डॉलर घेऊन दशलक्षानी डॉलर्स जमा केले.त्याचा त्याला निवडणूकीत प्रचारासाठी वापर करून खूप फायदा झाला. एक वेळ अशी आली होती की हिलरी क्लिन्टन हवालदिल झाली.कर्ज काढून काढून थकली.आणि एकदा पत्रकारांसमोर अक्षरशः रडली होती.हा विठोबा आता ऐकत नाही.असं पाहून प्रे.क्लिन्टन पण हताश होऊन एकदा म्हणाला होता,
“हे विठ्ठलपंथी लोक राज्य करू शकणार नाहीत, असं इतिहास सांगतो.”
पण जेव्हा विठोबाची सरशी व्ह्ययला लागली,आणि आपली बायकोची निवडून येण्याच्या शक्यता कमी झाल्याचं पाहून प्रे.क्लिन्ट्न म्ह्णणाल्याचं आ्ठवतं,

“कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।”

ओबामा यापुढे मागे बघायला तयार नव्हता.एका मागून एक तो राज्य जिंकायला लागला.एकदा क्लिन्टनबाई चिडून म्हणाली होती,
“ओबामा,शेम ऑन यु”
पण ओबामा शांतीचा मेरू होता.त्याला पत्रकारानी विचारलं होतं,
“तुला कुणाची चीड कशी येत नाही?”
ओबामाने आपल्या कोटाच्या दोन्ही बाह्या खांद्यावर झटकून दाखवलं,आणि म्हणाला,
“मी कुणी काही म्हटलं तर असं करतो.”
शेवटी पंढरीचा विठू डेमॉक्रटीक पार्टीचा उमेदवार म्हणून निवडला गेला. रिपब्लिकन पार्टीचा बुढ्ढा जॉन मेकेन त्याच्या विरूद्ध उभा होता.
आणखी पुढच्या भागात.
कमशः….





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, October 13, 2009

माझे 125 वर्षाचे आजोबा.

“कदाचीत माझे आजोबा आता मला माझ्या जीवनात मार्ग दाखवण्याच्या रुपात असतील,माझ्या स्मृतीच्या रुपात असतील किंवा आणखी काही रुपात असतील,हे खरंच मला सांगता येणार नाही.”

आज माझे आजोबा जीवंत असते तर ते 125 वर्षाचे असते.माझ्या दहाव्या वर्षी ते गेले.त्यावेळी ते साठ वर्षाचे होते.त्यावेळी माणसाला आयुर्मान कमीच असायचं.
माझ्या आजोबांवर माझं खूप प्रेम होतं.आणि त्यांचं प्रेम आम्हा सर्व नातवंडावर होतं.माझे गोरेपान आजोबा स्वच्छ जांभळ्या रंगाचं सोवळं नेसून, वरून उघडे आणि खांद्यावरून कमरेकडे लोंबणारं त्यांचं जानवं, हातात ताम्हाण घेऊन गायत्री मंत्र मनातल्या मनात पुटपुटत संपलेल्या पुजेचं आचमन करून झालेलं ताम्हाणातलं पाणी आणि फुलं औदुंबराच्या चवथुर्‍यावर चढून औदुंबराच्या मुळाशी असलेल्या देवांच्या मुर्तिवर अभिषेक करण्या्साठी जाणारे माझे आजोबा मला अजून माझ्या चक्षु सामोरे येतात.

वय होत गेलं आणि त्यांची ही सर्व हालचाल कमी कमी होत गेली. नंतर नंतर ते आपल्या जीवाला अगदी कंटाळले.
अगदी सरते शेवटी जेव्हा माझ्या आजोबांनी अन्न-पाणी सोडून देलं आणि यापुढे जगायचं नाही असं ठरवलं ते ऐकल्यावर मी माझ्या आई बरोबर त्यांना भेटायला गेलो होतो.ह्या पूर्वी मी माझं जवळचं कुणीही हरवलं नव्हतं.म्हणून त्यांना भेटायला जायला मला मन होत नव्हतं.जणूं तसं केल्याने ते जीवंत राहणार होते.
तरीपण मी तिकडे पोहोचल्यावर, जीवन,मरण,आपलं कुटूंब आणि प्रेम ह्या गोष्टी काय ते मी समजलो.जणू माझ्या त्या जाण्याने माझे आजोबा माझ्या मनात जास्त जीवंत राहिले.
ह्यावेळेला प्रथम जेव्हा मी माझ्या आजोबांना पाहिलं,तेव्हा मोठ्या धक्क्याने घाबरून गेलो होतो.मी माझ्या आजोबांकडे पाहिलं तेव्हा ते कमजोर, दिसले आणि त्यांचं म्हातारं शरिर मृत्युशय्येवर निपचीत पडलेलेले होतं.मी पाहिलेले त्या प्रफुल्लीत चेहर्‍याचे ते माझे आजोबा मला दिसत नव्हते. आणि ज्यावेळेला मला हुंदका आला तेव्हा तडक न्हाणी-घरात गेलो-माझे दुःखाश्रू मला कुणाला दाखवायचे नव्हते.थोडा शांत होऊन मी परत त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या डोळ्यात पाहू लागलो तेव्हा माझ्या नेहमीच्या नजरेतले माझे आजोबा मला दिसले.
तो सदाचा हंसमूख चेहर्‍याचा माझा “आजा ” जो आम्हा सर्व नातवंडाना माडा-पोफळीच्या बनात नेऊन निसर्गावर कविता म्हणून दखवायचा,तोच माझा “आजा” जो औदूंबराच्या चवथुर्‍यावर माझ्या आजी बरोबर बसून गुजगोष्टी करताना तिच्या पासून दूर बसूनसुद्धा सरळ सरळ तिच्यावर प्रेम करताना भासलेला.

त्यावेळी दिवसातल्या निरनिराळ्या वेळेला माझ्या आजोबांच्या बिछान्याजवळ बसून उरलेल्या सर्व दिवसात आम्ही त्यांच्याशी बोलायचो ते बरचसं बोलणं त्यांच्या पेक्षा आमच्यासाठीच असायचं. पण असं बोलत असताना त्यांच्या ओठावरचं ते हास्यस्फुट पहात राहायचो त्याची आठवण आता जागृत होते.मला वाटतं ते त्यांचं हंसणं ते काहीतरी बोलण्याच्या प्रयत्नात असावेत असंही भासवून द्यायचं.

त्यावेळचे त्यांचे ते बोलके डोळे, प्रेम आणि जीवन आठवून नाचत होते. त्या डोळ्यांच्या शक्तिबद्दल मला वाटत नाही की त्यावेळी त्यांना त्याची कल्पना येत असावी.कधी कधी तो त्या डोळ्यांचा नाच
आशावादी असायचा तर कधी कधी उदास आणि हृदय हेलावणारा असायचा.हे सर्व त्यांचा शेवट होई पर्यंत होतं.कधी थोडं रडण्यात,कधी कधी अनुभव घेण्यात, कधी थोडं हंसण्यात आणि कधी निष्कर्षाला येण्यात मी तो काळ घालवला. विश्वास ठेवण्यासारख्या माझ्या मनात पुष्कळ गोष्टी आहेत पण सर्वांवर मात करणारा विश्वास म्हणजे जीवन सुंदर आहे हा.मला वाटतं मी काही प्रमाणात हे मानत होतो.पण एव्हडी निश्चितता त्यात नव्हती.

आता मात्र मला वाटतं की ही सुंदरता आपल्या अस्तित्वातच आहे, काही समयासाठी हे अस्तित्व उसन्या शरिरात वास्तव्य करतं,ही सुंदरता आत्म्यात वास करून असते पण डोळ्य़ामधून नाचत असते. जीभेकडून होऊ शकत नाही म्हणून ती डोळ्यातून बोलकी होते.ही सुंदरता पडद्या आडचं रहस्य किंवा चमत्कार असते,आणि मृत्यु होताच शरिर सोडून जाते परंतु स्वतः मृत होत नसावी.

माझ्या हे सर्व ध्यानात आलं त्याचं फक्त कारण माझ्या आजोबांना शेवटचं अलविदा करताना ह्या दुःखाच्या दाहाला आणि भितीला मी सामोरा गेलो होतो. मला असंही वाटतं,मला त्यावेळी हे माहित नव्हतं कारण मी खरोखरीने अलविदा त्यांच्या शारिरीक अस्तित्वाला केला होता,एका अर्थी हे ही खरं आहे की माझे आजोबा एव्हडी वर्ष होऊन गेली तरी जेव्हडे माझ्या स्मृतित अजून राहिले आहेत की तेव्हडे त्यावेळी नव्हते.कदाचीत माझे आजोबा आता मला माझ्या जीवनात मार्ग दाखवण्याच्या रुपात असतील,माझ्या स्मृतीच्या रुपात असतील किंवा आणखी काही रुपात असतील,हे खरंच मला सांगता येणार नाही. परंतु,मला वाटतं ही अनिश्चितताच खरी सुंदर आहे आणि हे रहस्य जीवनाच्या रहस्यासारखंच आहे हे मात्र निश्चित आहे.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, October 11, 2009

विसरशील मला अखेर का रे?

उंच उंच गगनात नेऊनी मजला
पुन्हा धरतीवर फेकणार का रे?

विराजूनी तुझ्या हृदयामधे
विसरशील मला अखेर का रे?

आजच्या रात्री ह्याच समयी
गगनात चमकती चांदण्या हजारो

एक एक चांदणी उचकून गगानातून
उधळीन सार्‍या कुणाच्या नजरेवर

ही रंगीत स्वप्ने अपुली असता
रंगवूनी ती भंगणार का रे?

संगतीत तुझ्या राहून सखया
जाऊ अपुल्या लक्षाकडे

जर साथ तू देशील मजला
लक्ष चालून येईल अपुल्याकडे

निश्चिंत माझे मन असता सखया
धोका तू मजला देणार का रे?

ही रंगीत स्वप्ने अपुली असता
रंगवूनी ती भंगणार का रे?




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, October 9, 2009

“सखी शेजारणी तू हंसत रहा”

शरद,रमेश आणि सुमन ही तिन भावंडं घरात किंवा बाहेर सदाची मजा-मस्करी करण्यात दिसायची.कदाचीत हे गुण त्यांना त्यांच्या आईकडून आले असावेत. त्यांची आई प्रत्येक उच्चारलेल्या वाक्यागणीक हंसून समारोप करायची.मला ह्या कुटूंबात वेळ घालवायला आवडायचं.मी दुसर्‍या मजल्यावर राहत असल्याने आणिहे कुटूंब पहिल्या मजल्यावर असल्याने ह्यांच्या घरावरून जावं लागायचं. ह्याच्या घराच्या जवळ आल्यावर हस्याचे फुलोरे ऐकायला मिळायचे.बरं वाटायचं. ह्यांचे वडिल मात्र स्वभावाने अगदी मख्खं. गालावर माशी बसली तरी ते ती हाकलण्यासाठी गाल हलवत नसत.ही एक दुसर्‍या टोकाची व्यक्ती होती.

सुमन स्वभावाने शांत पण वागायला भावांसारखी मिष्कील होती. बरीच बोलकी पण होती.लग्न होऊन आता ती दुसरीकडे राहायला गेली.तिलाही तिन मुलं होती. नवरा पुन्हा अमेरिकेला काही दिवस कामासाठी गेल्याने ती थोडे दिवस माहेरी राहायला आली होती.मी त्यांच्याकडे गप्पा मारायला गेलो होतो.
हंसत हंसत माझं सगळ्यानी स्वागत केलं.अर्थात ते स्वाभाविक होतं.

गप्पा मारताना कसलातरी विषय निघाला.मी सुमनला म्हणालो,
“धंद्यात आणि राजकारणात एक उक्ति आहे, आणि त्यात सुचना आहे की पैसा कमवायचा असेल तर समजून घ्या की लोक जसे वागतात ते तसे का वागतात?.”
सुमन म्हणाली,
“हे असं म्हटलं तरी मला वाटतं,जीवनात आणखी अनेक महत्वाच्या वयक्तिक पसंती- जशा, मैत्री,प्रेम,लग्न,पेशा असल्या तरी हंसतमूख असण्यासारखी दुसरी महत्वाची गोष्ट नसावी.”
“हे तू मला सांगू नको सुमन.दिवसाची सुरवात आणि शेवट तुमच्या घरी ह्याच गोष्टीनी होते हे काय मला माहित नाही काय?”
असं मी तिला म्हणाल्यावर हंसत हंस्त सुमन म्हणाली,

“गप्पा,गोष्टी,गजाली आणि हंसणं-खिदळणं भरपूर असलेल्या कुटूंबात मी वाढले. रात्रीचं जेवण नेहमीच लांबलेलं असायचं,बडबडीचं असायचं आणि योग्य वेळी आदेशाचे हस्तक्षेप यायचे बाबांकडून,
“जेवा रे! आता”
माझा एक भाऊ रमेश,कुणाच्याही नकला करण्यात निपुण होता तर दुसरा शरद “गजाली” सांगण्यात श्रेष्टत्व दाखवायचा.मी मात्र त्यामानाने भोळीभाळी होते, त्यामुळे आनंदी आनंद वाढायचा.”
“पण लग्न झाल्यावर तुझं हेच वातावरण तुला नवर्‍याच्या घरी न्यायला मिळालं काय?” मी तिला विचारलं
“सांगते ऐका” असं म्हणून सुमन म्हणाली,
”अजीब गोष्ट अशी की काही काळ मी हंसण्या-खिदळण्याचा नाद थोडासा हरवून बसले.माझं लग्न एका गृहस्था बरोबर ठरलं होतं. त्यामुळे माझ्या वातावरणात थोडा बदल झाला.ते स्वाभावीक होतं.एकदा तो मला म्हणाला,
“ते हंसण्याचे दिवस आता गेले. परत येणं कठीण”
हे सांगितल्यावर मला ऐकून आश्चर्य वाटलं,मी म्हणालो,
“असं कसं तो म्हणाला?”

“खरं म्हणजे असं म्हणून तो त्या दिवसांची कदर करीत होता.पण माझ्या डोक्यात काय आलं की हे हंसणं खेळण्याचं वातावरण यापुढे वाढण्या ऐवजी कमीच होत जाणार.मी मनात म्हणाले की ह्याची ही हेव्यामुळे नवी अटकळ असेल.नंतर त्याच्याशी आणखी काही कारणामुळे लग्न ठरलं नाही हा वेगळा भाग झाला.”
असं सुमन माझ्या प्रश्नाला उत्तर देत बोलली.

मी म्हणालो,
“सुमन मग तुझ्या मनासारखा जोडीदार तू कसा काय मिळवलास?
तो पुर्वा अमेरिकेत राहायचा ना?असं मी ऐकलं होतं”
सुमन म्हणाली,
“होय तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.
“त्या नंतर,
”हा माझा जोडीदार व्हायला काहीच हरकत नाही”
असं म्हणून मी ज्याला पसंत केलं त्याची माझी पहिली भेट तो ज्यावेळी भारतात आला होता त्यावेळी माझ्या एका मैत्रीणीच्या घरी झाली.आणि ती सुद्धा आम्ही सर्व जेवत असताना.त्याने एक गमतीदार गोष्ट सांगितली.तो म्हणाला,

“मी अमेरिकेत असताना एकदा आमच्या मित्र मंडळी बरोबर आम्ही सहलीला गेलो होतो.ती सुद्धा समुद्राची सहल होती.ज्या होडीत आम्ही बसलो होतो आणि बरंच अंतर काटल्यावर आमच्या होडीच्या निशाणाचा वरचा भाग वार्‍याने अडकला गेला.कुणी तरी वर चढून तो गुरफटलेला भाग सोडवायला हवा होता. आम्ही होडीत अडकले गेलो. आम्हां चोघां पैकी माझ्या मित्राचा हात दुखावल्यामूळे त्याचा हात प्लास्टर मधे बांधला होता.त्याची बायको गरोदर होती.आणि दुसरा मित्र मुळातच लंगडा होता.राहाता राहिलो मी. पण मला उंचीवरचढण्याची मुळातच भिती होती.”
पुढे त्याची पुर्ण गोष्ट ऐकण्यापूर्वीच मनात मी त्याला माझा जोडीदार ठरवून गेले. जेवताना गंमतीदार गोष्ट सांगणारा मला हा नवरा म्हणून पसंत होता.ती नुसतीच गंमतीदार गोष्ट नव्हती तर त्यामधे तो स्वतःच्या त्रुटी,कमीपणा सांगायला आणि स्वतःचं हंसं करून घ्यायला सुद्धा कचरत नव्हता.
आता पंधरा वर्षा नंतर मी माझ्या नवर्‍याला गर्दी मधे सुद्धा त्याच्या सात मजली हंसण्याच्या स्टाईलवरून हूडकून काढू शकते. आमची मुलं सुद्धा जेवणाच्या टेबलावर जमल्यावर गंमतीदार गोष्टी सांगतात.आणि त्यातला माझा एक मुलगा नकला करण्यात निपुण आहे.एव्हडं नक्की की हे हंसणं- खिदळणं नुसतंच प्रेम जारी ठेवत नाही तर मैत्री आणि कुटूंब पण,आणि हा विपत्तीत सुद्धा मार्ग काढण्याचा नक्की आणि सोयीस्कर उपाय आहे.हसणं हे एक कामावरच्या सदाचाराचं निर्देशक आहे.कदाचीत ह्यामुळेच कामाचा बोजा सहजगत्या उतरता येत असावा.ज्या ठिकाणी हंसण्यात वाटेकरी होतात त्या ठिकाणी सख्य, ईमानदारी,प्रामाणिकपणा,आणि आत्म बोध-ह्या सर्व चांगल्या गोष्टी जीवन उभारायला उपयोगी पडतात.म्हणून मी माझ्या मुलांना नेहमी म्हणते,
“तुमच्या आणि इतरांच्या हंसण्या-खिदळण्यात भाग घ्या आणि ऐका.ज्यावर तुम्ही प्रेम करता-लोक,स्थान आणि तुमचा पेशा ह्या गोष्टींच्या जवळ तुम्हाला नेण्याच्या प्रयत्नात ही संवय उपयोगी होईल.”
“म्हणूनच मी तुमच्या घरी वरचेवर येत असतो.मी असं म्हटलं म्हणून हंसू मात्र नकोस” असं मी सुमनला म्हणाल्यावर,
“ते कसं शक्य आहे?” असं म्हणत सुमन जोरात हंसली.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, October 6, 2009

आज दिसेना द्रव ही नयनी

(अनुवादीत… खाली हाथ श्याम आयी है)

अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा
आज दिसे ना कुणी एखादा
अशीच परतूनी जाईल बहूदा
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा

आज दिसले नाही अश्रु
आज दिसेना द्रव ही नयनी
आज ही अशीच रिक्त रजनी
अशीच रिक्त जाईल बहुदा
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा

अंधारलेली ही रात्र कुणी
प्राप्त होऊनी दूर करेना
आज दूरावा न झाल्याने
उद्या फिरूनी ती येईल ना
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
Shrikishnas@gmail.com

Sunday, October 4, 2009

माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.

“फक्त मला एव्हडंच माहित आहे की तो एकदा तरी समुद्रावर आला आणि माझ्या दृष्टीने समुद्रावर येण्याचा मतलब साध्य झाला.”

मला वाटतं प्रत्येक माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.मी माझ्या अगदी लहानपणापासून समुद्राशी एकरूप झालो आहे.वेंगुर्ल्याचा समुद्र आणि आमचं घर जेमतेम तिन मैलावर आहे.
तेव्हापासून समुद्राचा मला दिलासा लाभला आहे. आतापर्यंतच्या माझ्या जीवनात मला प्रेरणा देण्याच्या समुद्राच्या क्षमतेपासून मला सदैव प्रसन्नता मिळाली आहे.त्याच्याकडून मला नेहमीच उत्साह मिळाला आहे.माझे वडील त्यावेळी नौसैन्यात असल्याने प्रत्येक वेळी बंदराजवळ आलेल्या लहान सहान जहाजावर अथवा बोटीवर जाण्याची मला संधी मिळायची.पश्चिमेकडून रेडीचा किनारा आणि दक्षिणेकडून गोव्याला जाण्याच्या क्षितीजाची सीमा मी बंदराजवळ असलेल्या लाईट- हाऊसमधून पहात आलो आहे. किनार्‍यावरच्या लहान लहान होड्यामधे बसून, येणार्‍या मोठ्या लाटांवर हेलकावे घेण्याचा नाद मी मनमुराद उपभोगला आहे.कधी कधी माझ्या इतर मित्रांबरोबर फेसाळलेल्या लाटांवर आरूढ होऊन किनार्‍यावर सरपटत येण्याचा खेळ मी अनेक वेळा खेळलो आहे.बरेच वेळा माझ्या त्या वयात मला भासणारी मोठाली लाट माझ्या होडी सकट मला वर ऊचलून गरगर फिरवून पाण्याच्या फेसात फेकून देताना येणारी मजा मला कधीच विसरता येणार नाही.आणि त्या फेसाळलेल्या पाण्याच्या वेगात किनार्‍याकडे जायला आतूरलेलं ते लाटेचं पाणी मला एखाद्या बंदूकीतून सुटलेल्या गोळी सारखं वाळूत फेकून द्यायचं.आज माझ्या ह्या वयावरही ते दृष्य माझ्या डोळ्यासमोर दिसतंय.मला कधी कधी वाटतं,माझ्या मनातले जेव्हा हे असले अविस्मरणीय क्षण विसरण्यात गेले तर तो एक माझ्या आयुष्यातला
दुःखद टर्नींग-पॉइंट होईल.
लहानपणी माझ्या पायावर आलेल्या एक्झीम्याला समुद्राचं खारंट पाणी आणि किनार्‍यावरचा भरपूर सूर्यप्रकाश बरं करण्यात उपयुक्त ठरला.
तुम्ही जर समुद्राला भेट दिलीत तर कदाचीत समुद्र तुमचे गुढघे कधीच ओले करणार नाही.वाळुतून चालणं आणि पाऊलभर फेसाळलेल्या पाण्यातून पाणी उडवत चालणं ह्यातच तुमचा सहभाग मजेशीर होऊ शकतो.ज्याचा त्याचा सहभाग ज्याला जसं वाटेल तसा असावा.जीवनात प्रत्येकाला निदान एकदातरी समुद्राला भेट देण्याची जरूरी आहे असं मला वाटतं.
मला आठवतं माझा एक मित्र होता.आम्ही त्याला बबन म्हणायचो.तो समुद्राच्या इतका जवळ रहायचा तरीपण त्याने एकदाही समुद्रावर येऊन वाळूत चालून आणि पाण्यात पाय देऊन मजा करण्याचा प्रयत्न केला नाही ह्याचं मला राहून राहून नवल वाटायचं.आणि एकदा त्याने प्रयत्न केला तो पहाताना मला ते दृष्य रोमांचकारी वाटलं.
नेहमी प्रमाणे मी एकदा कुंद सकाळी पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात बुचकळून पुढे जाण्यासाठी तयार होतो न होतो तो मी बबनला पाहिलं.एक रंगीत शॉर्ट घालून दोन हाताची क्रॉस घडी करून हाताचे तळवे खांद्यावर टाकून फुटलेल्या लाटेचे तुषार अंगावर उडाल्यानंतर अंगावर शहारे येणार्‍या गंमतीचा तो अनुभव घेत होता.मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणालो,
“आपण दोघं पोहूया,तू चल माझ्या बरोबर”
गावातल्या विहीरीत पोहायची संवय असल्याने बबनला समुद्रात पोहायला तितकसं कठीण जात नव्हतं.आम्ही समुद्राची लाट फुटण्यापूर्वी लाटेपर्यंत पोहत जात होतो.आणि लाट फुटता फुटता तिच्यावर आमच्या पोटावर (उपडी) झोपून त्या धमाकेदार लाटेवरच्या भ्रमणाची मजा लुटीत होतो.अशा एक दोन अनेक लाटांवर आरूढ होत होतो. हंसता हंसता कधी कधी बबनची शॉर्ट त्याच्या गुडघ्यापर्यंत खाली उतरायची,आणि किनार्‍यावर पोहचल्यावर ओली वाळू काना, नाका, तोंडात आणि डोळ्यात जायची.पहिल्याच खेपेला मला आठवतं,असं झाल्यावर त्याने खार्‍या पाण्यात लघुशंकाच केली.जणू तो आपल्या जीवनातल्या वर्जित निग्रहापासून-समुद्रावर न येण्याच्या निग्रहापासून-मनमोकळा झाला होता.
मला वाटतं बबनला समुद्र आता आशेचे किरण दाखवीत होता. त्यानंतर काही दिवसानी त्याचा नी माझा संपर्क तुटला.तो डॉक्टर झाला की इंजिनीयर हे मला ठाऊक नाही.फक्त मला एव्हडंच माहित आहे की तो एकदा तरी समुद्रावर आला आणि माझ्या दृष्टीने समुद्रावर येण्याचा मतलब साध्य झाला.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, October 2, 2009

मनात आकांक्षा ठेऊन जगावं.

आज मी प्रि.वैद्यांच्या घरी गेलो होतो.अलीकडे प्रो.देसायांना बरं नसतं म्हणून ते घरीच असतात.मी वैद्यांना म्हणालो आपण दोघे बोलत बोलत तळ्यावर फिरायला जाऊंया.माझी कल्पना त्यांना आवडली.
मी वैद्यांना म्हणालो,
“प्रिन्सिपल साहेब,बरेच वेळा मी पाहलंय की काही माणसं स्वतःला खास समजतात. ही ह्या लोकांची वृत्ती कशी निर्माण होते.?”
माझा प्रश्न ऐकून प्रि.वैद्य हंसत हंसत मला म्हणाले,

“कोणी काही खास नसतो.उदाहरण म्हणून, रस्त्यावरून जाणारी एखादी स्त्री चापचापून साडी नेसलेली असली आणि ठुमकत ठुमकत चालत असेल तरी ती काही खास आहे असं म्हणता येत नाही.एखादा स्वतःला अगदी आदर्श समजणारा सुद्धा काही खास नसतो.पण कृपाकरून माझ्या म्हणण्याचा गैरसमज करून घेऊ नका.कुणीही दोषहीन नसतो,किंवा कुणाला स्वतःची खास शैली नसते किंवा कुणाला काही प्रतिभा नसते अशातला भाग नाही. अशा म्हणण्यावर माझा मुळीच विश्वास नाही.मला जरा विस्ताराने सांगू द्या.हा माझा प्रतिसाद त्या लोकांना उद्देशून आहे की जे,
“तुम्हाला काही कळत नाही”
असं म्हणून स्वतःला अलिप्त ठेवत असतात. कदाचीत असं म्हणणार्‍यापैकी तुम्ही ही असाल कबुल करा.कबूल करतो, मीही पण असेन.पण खरं सांगायचं तर प्रत्येकाला हे सगळं कळत असतं.”
हे ऐकून मी वैद्यांना म्हणालो,
“जरा विस्ताराने सांगितलंत तर बरं होईल.”
मला म्हणाले,
“असं बघा,एका स्थरावर प्रत्येकाला मृत्यु येणार,कुणाचं प्रेमभंग होणार,कुणाला जीवनात अपयश येणार हे माहित असतं कळतही असतं.प्रेमाचा अनुभव प्रत्येकाला येत असणार,कुणी कधी चकित होऊन आनंदी होत असणार, अचानक जवळच्याची भेट होऊन कधी कुणी प्रसन्नही होत असणार. पण ह्या बाबी सामान्यपणे प्रस्थापित झालेल्या असतात.”
पुढे जाऊन मी म्हणालो,
“प्रत्येकाला कर्ज म्हणजे काय,भयभीती होणं म्हणजे काय आणि आजार म्हणजे काय असतो हे माहित असतं कळत असतं. व्यसनी कुणाला म्हणावं,कुरकुर करणारी सासू कशी असते हे पण प्रत्येकाला माहित असतं”
पण प्रश्न असा आहे वैद्य साहेब मग पुढे काय?”

वैद्य म्हणाले,
“समस्या अशी आहे की जे कोणी स्वतःला खास समजत असतात ते प्रत्येकातल्या ह्या सर्वसामान्य गोष्टी समजून घ्यायला अपयशी होतात.”
एव्हड्यात आम्ही तळ्यावर केव्हा आलो ते कळलंच नाही.एक चांगला बाक बघून त्यावर बसलो.आणि प्रि.वैद्य पुढे सांगू लागले,
“बसमधे तुमच्या समोर बसलेला तो अस्थव्यस्थ कपडे घातलेला माणूस कदाचीत प्रेमभंग झाल्याने काळजीत असेल.तुमच्या समोरच्या घरातलं चारजणांचं वरवर अगदी पर्फेक्ट आहे असं तुम्हाला वाटणारं कुटूंब, पण त्या कुटूंबातले आईवडील मुलांचं संगोपन करण्यात ह्या सदा बदलणार्‍या समाजात मेटाकुटीला येत असतील.तुम्हाला ही कदाचीत अशाच प्रकारच्या चिंता असण्याचा संभव आहे”
अजून माझ्या प्रश्नाला उत्तर न मिळाल्याने मी वैद्यांना परत विचारलं,
“मग पुढे काय”?
“सागतो,सांगतो तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आहे.”
असं म्हणत वैद्य पुढे म्हणाले,
ह्यातून एकमेकाची सहायता करण्याची वृत्ती आपण आणूं शकतो. या विविधतापूर्ण समाजातल्या उणीवां ज्या समानतेचा वाटेकरी होण्यास आणि भेदभावांना सामावून घेण्यात अडथळे आणतात त्या उणीवामधून निर्माण झालेली पोकळी भरायला आपण सुरवात करू शकतो..ह्यावरून एकमेकाशी संबंध प्रस्थापित कसे करायचे हे तुम्हाला माहित होऊ शकतं.”
हे ऐकून माझ्या मनात एक विचार आला.मी वैद्यांना म्हणालो,
“वैद्यसाहेब,हे तुमचं सर्व ऐकून माझ्या मनात एक प्रस्ताव सुचवावा असं आलं आहे.”
उठता उठता वैद्य म्हणाले,
“सांगा तुमचा प्रस्ताव.काळोख झाला आहे.घरी जाता जाता एकूया.”

“मला वाटतं,आकांक्षा ठेवून जीवन जगावं,लक्ष देऊन ऐकावं,उद्देश ठेवून शिकावं आणि हृदयात दयाळूपण विकसित करावा. पूर्वानुमान करून आणि संपर्क न ठेवून हे साध्य होणार नाही.बसमधल्या किंवा दुकानातल्या एखाद्या अनोळख्याशी बोलायला आपण संकोच करू नये.” असं मी सांगितल्यावर प्रि.वैद्य म्हणाले,

“तुम्ही अगदी माझ्या मनातलं सांगितलं.तुमच्या म्हणण्याचा विचार प्रत्येकाने करावा आणि प्रयत्न करण्याची हिम्मत करावी.”



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com