Wednesday, March 31, 2010

वकीलाचा कुत्रा.

“माझा मोती मला प्रत्येक गोष्ट मी माझ्या ताब्यात ठेऊ शकत नाही,आणि त्याची जरूरीही नाही ह्याची एक प्रकारे समज देतो.”

रिधमहाऊस मधून मदनमोहनच्या काही सीडीझ विकत घेण्यासाठी म्हणून मी चर्चगेटवरून फौन्टनच्या दिशेने जायला निघालो होतो.हायकोर्टचा रस्ता आल्यावर पुढे पुढे फौन्टनपर्यंत जाऊन वळण्यापेक्षा हायकोर्टच्याच रस्त्यावर वळलो. कोर्टाच्यासमोर काळे कोट घातलेले बरेच वकील आपआपल्या सहाकारी मित्राबरोबर बोलण्याच्या नादात होते. सुरेश प्रधानाला पाठमोरा पाहिला.तोही त्याच्या वकील मित्राबरोबर गप्पात रंगला होता.मला पाहून हंसला आणि हाताने थांब जरा म्हणून खूणावू लागला.मित्राला बाय करून माझ्याशी बोलायला आला.
“अरे,तू असतोस कुठे?”
असं खास मालवणी पद्धतीने मला विचारायला लागला.
“मी पण तुला तेच विचारतो”
असं मी सुरेशला म्हणालो.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मला म्हणाला,
“खरंच तू पुढल्या रविवारी माझ्या घरी ये.तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत.”

त्याच्याकडे जाण्याचं आश्वासन देऊन मी रिधमहाऊसच्या दिशेने जायला निघालो.
त्या रविवारी त्याचं घर शोधीत जाता जाता सुरेशच रस्त्यावर भेटला.
“तू घरी आल्यावर तुला बसून राहायला सांगायचं मी माझ्या बायकोला सांगून आमच्या मोत्याला चक्कर मारून आणीन म्हणून खाली उतरलो.बरं झालं तू इकडेच भेटलास ते.”
सुरेश मोत्याच्या पाठीवर हात फिरवीत मला म्हणाला.

सुरेशचा मोत्या आलसेशन-जर्मन शेफर्ड- जातीचा होता.मी त्याच्या अंगावरून हात फिरवला.त्याचं उघडं तोंड त्याने बळेच बंद करून माझ्याकडे मान करून बघायला लागला.
“चावणार नाही ना बाबा?”
मी सुरेशला विचारलं.
“चल, तू पण आमच्याबरोबर चक्कर टाकायला ये.मोत्या तुला मुळीच काही करणार नाही.”
सुरेश मला खात्रीने सांगत होता.
“वकीलाचा कुत्रा आहे.कायद्याचं पालन करणाराच.”
मी सुरेशला कोपरखीळी दिली.

सुरेश हंसत हंसत मला म्हणाला,
“मोत्याला बाहेर फिरायला घेऊन जायला मला आवडतं.तसं मला दांत स्वच्छ ठेवायला आवडतं,बाजापेटीवर रियाज करायला आवडतं,फळं आणि भाज्या खायला आवडतात,पण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तरी चालतं म्हणा.पण मोत्याला बाहेर न नेऊन चालणार नाही.”

“त्याची काय बाहेर फिरण्याची ठरावीक वेळ असते का?”
मी सुरेशला विचारलं.
“मी घरी आल्यावर मोती दारातच उभा असतो.अगदी नम्रकसा, पण चुळबूळ करून तंग करत रहातो, मी केव्हा एकदा त्याच्या मानेला साखळी लावीन याची वाट बघत असतो.काही कर्तव्यं आहेत,काही गोष्टींना सीमारेषा असतात ह्याची त्याला ठूम पर्वा नसते.त्याला आणि त्याच्याबरोबर मला एव्हडंच माहित की फक्त बाहेर फिरायला जायचं.”
सुरेश सांगू लागला.

“मोत्याला बाहेर घेऊन जाण्याने शरीरात प्राणवायु वाढवून घ्यायच्या व्यायामाचा-एरोबीकचा- प्रकार केला जातो असं मुळीच नाही.फक्त बाहेर चक्कर मारून आल्यासारखं होतं.
अधुनमधून वाटेत थांबावं लागतं.त्यामुळे मोत्याला त्याच्या लांब, सुरेख,कळीदार नाकातून अलीकडचे नवीन वास हुंगून ठेवायला मिळतात.आम्ही जवळच्या पार्कमधे जातो,पावाच्या बेकरी जवळ जातो किंवा आजुबाजूच्या शेजारात भटकून येतो.ह्या सर्व ठिकाणी जायला मोती अधीर असतो. तो एका टोकाला आणि मी साखळीच्या दुसर्‍या टोकाला असतो.वेळ मजेत जात असतो.कुणी म्हणेल थोडा बाहेर जाऊन व्यायाम होतो म्हणून कुत्रा बाळगतात.किंवा त्याला फिरायला घेऊन जाण्याचं निमीत्त साधून घराबाहेर पडायला मिळतं म्हणून कुत्रा बाळगतात.पण माझ्या बाबतीत तसं काही नाही.”

“तुमच्या वकिली व्यवसायात, सतत वापरण्याची नेहमीची आयुधं म्हणजे कायद्याचा आणि शब्दांचा वापर.
आणि असल्याच गोष्टी सतत तुमच्या डोक्यात असतात पण मोत्याला घेऊन बाहेर पडल्यानंतर नेहमीचे जगातले देखावे पहाण्यासाठी आणि वास हुंगण्यासाठी, मोती जो तुला वाटेत रोखून ठेवतो त्यामुळे व्यवसायतल्या गोष्टी डोक्यात न येण्यासाठी मोत्याचा उपयोग होत असेल.नाही काय?”
मी सुरेशला माझ्या मनातलं सांगीतलं.
मला सुरेश म्हणाला,
“माझ्या अगदी मनातलं सांगीतलंस.
वकिल नेहमी कायदे,करारनामे,वचनबंधने ह्यानी बांधलेले असतात.
कुणाचं किती दायीत्व आहे आणि कशासाठी आहे आणि ते बंधनकारक होण्यासाठी आम्ही शब्दांच्या व्याख्या करतो. नंतर ती दायीत्वं वास्तवीकतेशी जोडण्याचा प्रयत्न करून कुणाच्याही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो.अशावेळी मोत्याबरोबर चक्कर मारून आल्यावर माझ्या कामावर मन केंद्रीत करायला मला सुलभ होतं.”
एव्हडं सांगून सुरेश गप्प झाला नाही.

मला म्हणाला,
“मोत्याकडून चक्कर मारायला जवळजवळ माझ्यावर जबरदस्तीच होत असते.अशावेळी मला कायदेकानू आणि वास्तविकता ह्याकडे लक्ष देण्याचं बंद करून,आत्ता इथे काय होत आहे त्याकडे लक्ष केंद्रीत करावं लागतं.जसे कांव कांव करणारे कावळे गुलमोहरच्या झाडावर बसून गलगलाट करतात तेव्हा माझा मोती तिथेच थांबून झाडाकडे मान उंचावून एक टक पाहत नसता तर झाडावर काय चालंय ते दृश्य मला चुकलं असतं.
कुणातरी लहान मुलाचा एकच लालभडक पायमोजा पाहून तो उचलून तोंडात घेण्यासाठी मोती जर का मला ओडत ओडत रस्त्याच्या कडेला घेऊन गेला नसता आणि आपली जीत झाली असं कुत्र्याच्या भाषेत दाखवण्यासाठी माझ्या जवळ तो पायमोजा घेऊन आला नसता तर तो पायमोजा ओलांडून मी पुढे गेलो असतो.”

मला हे सुरेशचं विश्लेषण ऐकून गंमतच वाटली.
मी हंसत हंसत त्याला म्हणालो,
मोत्याला घेऊन चक्कर मारायला गेल्याने तुला जरा हलकं वाटत असणार.आणि तुझ्या डोक्यांत व्यवसायाबद्दल लक्ष घालण्यापेक्षा आजुबाजूच्या जगातल्या छोट्या छोटया अनपेक्षीत आनंदाकडे लक्ष घालायला तुला फुरसत मिळत असणार.”

“माझा हा मोती मला घरातल्या चार भिंती-काम,घड्याळ,कंप्युटर आणि फोन – पासून बाहेर आणून वास,रंग आणि आकस्मिक लाभाच्या दुनियेत आणून सोडतो.माझा मोती मला प्रत्येक गोष्ट मी माझ्या ताब्यात ठेऊ शकत नाही,आणि त्याची जरूरीही नाही ह्याची एक प्रकारे समज देतो.”
मोत्याच्या अंगावर हात फिरवीत सद्गदीत होऊन सुरेश सांगू लागला.पुढे म्हणाला,
“काही धर्मात पायीचालण्याची क्रिया ही चिंतनाची पातळी आहे असं सांगीतलं जातं.म्हणून काय मी त्या पातळी पर्यंत पोहोचत नाही.मी साधारण चमत्कारावर विश्वास ठेवतो.जसे गलगलाट करणारे ते कावळे,तो, लालबुंद पायमोजा आणि हे माझं वृद्धत्वाकडे झूकणारं शरीर अजून काम करतंय असल्या चमत्कारावर मी विश्वास ठेवतो. म्हणूनच मी लक्ष केंद्रीत करण्यावर,चक्कर मारण्यावर विश्वास ठेवतो.अगदी मनापासून सांगायचं तर मी मोत्याला घेऊन बाहेर चक्कर टाकण्यावर विश्वास ठेवतो.”

सुरेशबरोबर बोलता बोलता त्याची चक्कर पूर्ण झाली आणि त्याच्या बिल्डिंगकडे केव्हा आलो ते एरव्ही कळलं नसतं. मोती जेव्हा भुंकायला लागला तेव्हा सुरेशने मोत्याची साखळी त्याच्या मानेपासून अलग केली,आणि मोती धुम ठोकत जीना चढत गेला आणि आपल्या घराच्या बंद दरवाज्यावर उभा राहून जोराजोरात भुंकत राहिला.

“बघ,हा आणखी एक तुझ्या मोत्याचा फायदा मला दिसला.तुला वर जाऊन दरवाज्यावरची बेल दाबायचा व्याप त्याने सोडवला.तुझ्या बायकोला नक्कीच कळलं असणार की तुझी चक्कर संपून तू आला आहेस.”
असं मी म्हणत म्हणत, आम्ही दोघे जीने चढत वर गेलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 29, 2010

कोकणातले बोंडू.

“आठवणी येतात,आठवणी जात नाहीत पण गेल्या तर मात्र असं डोळ्यात पाणी आणून जातात.खरं ना?”

माझी बहिण मालिनीताई माझ्या पेक्षा सतरा वर्षानी मोठी आहे.मी जेव्हडं माझ्या आजोबांना पाहिलं असेल त्या पेक्षा खूप वर्ष माझी ताई माझ्या आजोबांच्या सहवासात होती.ह्या आठवड्यात ती आमच्याकडे राहायला आली होती. सकाळीच मी बाजारात जाऊन भाजी आणताना पाच सहा काजूसकट बोंडू आणले होते.स्वच्छ धूऊन त्याची करमट करावी म्हणून पिशवीतून बोंडू बाहेर काढलेले पाहून ताईच्या डोळ्यात एकदम पाणी आलं.ती डोळे पदराने पुसत असताना पाहून मी तिला काय झालं म्हणून विचारलं.मान हलवून काही झालं नाही असं भासवून ती आत स्वयंपाक घरात गेली.
संध्याकाळी जेव्हा आम्ही गप्पा मारीत गच्चीवर बसलो होतो तेव्हा मी सकाळची घटना ताईला विचारली.

ती म्हणाली,
“बरेच दिवसानी बोंडू पाहून मला आपल्या आजोबांची आठवण आली.आणि माझे डोळे पाणावले.”
माझ्या ताईचं आमच्या आजोबावर खूप प्रेम होतं.हे मला माहित होतं.पण बोंडूचा किस्सा काय तो मला माहित नव्हता. तेव्हा मी तिला म्हणालो,
“आजोबांच्या तुला अनेक आठवणी आहेत हे मला माहित आहे.कधी कधी वाटायचं की तुझ्याकडून काही आठवणी ऐकून घ्याव्या.आज चांगलाच मोका आहे,तेव्हा सवित्सर ऐकायला मजा येईल.”
ताई पण बरीच मुडमधे होती.

मला म्हणाली,
“मी माझ्या आजोबांचीच नात. माझे आजोबा जगात सर्वोत्कृष्ट असायलाच हवेत असं मला नेहमी वाटायचं. शिवराम आजगावकर अशा तर्‍हेची व्यक्ति होती,की जिला “आजोबा” म्हणायला अगदी शोभून दिसेल.आणि मी मला नशिबवान समजते कारण अशा व्यक्तिची मी नात आहे.”
“इतकी वर्षं तू त्यांच्याबरोबर खेड्यात राहिलीस.सांग तरी त्यांच्या गमतीजमती.”
मी ताईला जोर देत म्हणालो.

“आम्ही खेड्यात रहाणारे लोक.शुक्रवारच्या दिवशी माझे सर्व मामा,मावश्या आणि त्यांची मुलं रात्रीच्या जेवणाला हजर असायलाच हवीत.आणि त्या दिवशी जेवणं झाल्यावर बाहेर पडवीत आम्ही सर्व जमून सुरेल आवाजात कुणी तरी चांगल्या कविता म्हणायची.कुणी प्रसिद्ध भावगीत गायचं.कुणी सुचवल्यास गाण्याच्या भेंड्या खेळायच्या.”
ताई अगदी जून्या आठवणी काढून काढून सांगायला लागली.पुढे म्हणाली,

“उन्हाळा आला की आम्ही मुलं आजोबांबरोबर सकाळी मागच्या परसात जाऊन कुठच्या झाडाला किती फळं आली, कुठच्या पानवेली किती उंच झाल्या.सोनचाफ्याला ह्या उन्हाळ्यात भरपूर फुलं येणार की नाही,नागचाफा एव्हडा का रोडावला,माडाचे कवाथे किती जोमाने उंच होत आहेत, केवड्याच्या वनात साफसफाईची जरूरी आहे का, सदैव पाण्याने तुडूंब असलेली विहिर ह्या उन्हाळ्यात इतकी कशी आटली,अश्या सारख्या गोष्टींची चर्चा करीत असूं.

सकाळची वेळ असल्यास जास्वंदीची,शेवंतीची,पांढर्‍याचाफ्याची,तसंच झाडाखाली सडा पडलेल्या प्राजक्ताच्या फुलांची जमवाजमव करून आजोबांनी धरलेल्या फुलाच्या परडीत भरभरून ठेवायचो.दुपारच्या पुजेच्या वेळी आजोबा जांभळ्या रंगाचं पितांबर नेसून यायचे.वरून उघडे असायचे,आणि लांब सफेद,स्वच्छ जानवं खांद्यावरून कमरेपर्यंत लटकत ठेवीत त्याला गाठवलेली त्यांच्या कपाटाची चावी लटकताना दिसायची.माझे आजोबा गोरेपान असल्याने त्या वयात पण राजबिंडे दिसायचे. आमच्या पैकी एक- पण बरेच वेळा मी- आजोबांसाठी सुगंधी खोडाचं चंदनाचं गंध सांडेवर उघळून
ठेवायचं. मग आजोबा उजव्या किंवा डाव्या हाताच्या मधल्या बोटाने आपल्या दोन्ही दंडावर, मानेच्या दोन्ही बाजूला, आणि कपाळावर ते गंध फासायचे.आणि नंतर पूजा व्हायची.
आजोबा गायीत्री मंत्र आणि इतर पुजेच्या प्रार्थना करून झाल्यावर, ताम्हाणात जमलेलं आचमनाचं पाणी आणि फुलांच्या पाकळ्या घेऊन घरासमोरच्या औदुंबराच्या चौथुर्‍यावर चढून जायचे आम्ही पण त्यांच्या बरोबर वर चढून ते काय करतात ते न्याहाळायचो. औदुंबराला पाच प्रदक्षिणा घालताना आम्ही आमच्या आजोबांच्या मागे असायचो.”
औदुंबराच्या फळांविषयी मी ताईकडून पूर्वी ऐकलं होतं.त्यांना ती गावठी अंजीर म्हणायची.त्याच्याबद्दलच ती सांगत होती.

“औदुंबराची पिकलेली फळं चौथुर्‍यावर पडून फुटल्यावर,फळांच्या चीरातून मुंग्या आत शिरून मध खायच्या.एखाद्या फळाला मुंग्या शिवल्या नसल्या की आम्ही ती फळं घरी नेऊन धूवून खायचो. अंजीरासारखी दिसणारी ही फळं आतून अंजीरासारखीच दाणे दार असायची.

खेड्यात असल्याने थंडी बरीच पडायची.बाहेर आल्यावर आजोबा आपला जूना ठेवणीतला स्वेटर फुसून, झटकून वापरायला काढायचे. आम्ही पण आमचे रंगीबेरंगी स्वेटर वापरायला काढायचो.
दिवाळसणात मोठया बायका अंगण सारवून रांगोळ्या घालायच्या. आजोबा आराम खूर्चीवर बसून नीट अवलोकन करायचे.जरूर पडल्यास सुचनाही द्यायचे.सकाळ संध्याकाळ गरम गरम पेजेचा नीवळ पिण्याचा शिरस्ता असायचा. थंडीच्या दिवसात शरीर गरम न ठेवल्यास निमोनीया होईल असं आजोबा आम्हाला हटकून सांगायचे.
दिवाळीत फक्त फुलबाज्या जाळायचो.मोठे आवाज करणारे फटाके आजोबांना आवडत नसायचे.लहान मुलं,पाळीव प्राणी आणि वयस्कर लोकांना त्याचा त्रास होतो हे आम्हाला समजावून सांगायचे.”

“हे सगळं ऐकून खूपच बरं वाटलं पण मुळ विषय बोंडूचा होता.त्याचं काय झालं? तुझ्या डोळयात सकाळी बोंडू पाहून पाणी का आलं?ते अजून कळलं नाही”
मी ताईला म्हणालो.
“ऐक सांगते”
असं म्हणून पुढे म्हणाली,
“मला आजोबांची सर्वात जास्त आठवण येते जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर जवळच्या डोंगरावर चढून बोंडूच्या झूडपातून बोंडू काढायला जायचो तेव्हा. कधी कुणी मुलं नसली तर मला आजोबा निक्षून घेऊन जायचे.त्यांच्याबरोबर डोंगराच्या पायवाटेवर चढून जाताना दिसेल त्या झुडपातून बोंडू देठापासून पिरगळून काढताना मजा यायची.हावरटासारखं, काजूसकट ते फळ बरोबर घेतलेल्या गोणपाटाच्या पिशवीत जमा करायचो. लाल-भडक,पिवळे-धमक,हिरवे-गार,रंग मिश्रीत,बोंडू झाडावर लटकत असताना सुंदर दिसायचे.आजोबांना दिसण्यापूर्वी मला एखादं फळ दिसलं की मी झूडपात बोट दाखवून आजोबांच्या लक्षात आणून द्यायचे.आणि त्यांनाही दिसल्यावर ते जेव्हा आनंदाने “ह्हे!” असं ओरडून सांगायचे त्यावेळी त्यांचा चेहरा पहाण्या सारखा असायचा.

जेव्हा गोणपाटाची पिशवी पूर्ण भरून जायची तेव्हा माझे आजोबा मला जवळ घेऊन माझी पाठ थोपटायचे.मला खूप बरं वाटायचं.मग ते माझ्याकडून पिशवी घेऊन आपल्या जवळ उचलून घ्यायचे.मला त्या पिशवीचा भार सहन करता येत नाही हे त्यांच्या नजरेतून अजिबात चुकायचं नाही.
जड पिशवीची समस्या आपल्या अंगावर घ्यायचे.बिचार्‍यांना त्या वयात पिशवीचं वजन जेमतेम तोलायचं.फिरकीच्या तांब्यातून आणलेलं पाणी पेल्यातून काढून दोघांच्या चेहर्‍यावर झपकारायचे आणि मग ते आमच्याच विहिरीतलं बर्फासारखं थंडगार पाणी त्या रखरखत्या उन्हात प्यायला द्यायचे.”

“आज बाजारात बोंडू पाहिल्यावर त्याची करमट करायची माझ्या मनात आलं कारण मी पण कोकणात बोंडूची करमट खायचो.मला खूप आवडायची.
तुला ही आवडते म्हणून मुद्दाम घेऊन आलो होतो.चौकशी केल्यावर कळलं पालघर होऊन काही बायका हे बोंडू आणतात. नाहीतर मुंबईत हे फळ किती लोकाना आवडत असेल माहित नाही.”
मी ताईला बोंडू का आणले ते सांगत होतो.

आपली कोकणातली आठवण काढून ताई सांगायला लागली,
“घरी आल्यावर ती सर्व फळं आमच्या घरात काम करणार्‍या बाईकडून स्वच्छ धुवून घेऊन त्याचे काजू निराळ्या भांड्यात बाहेर सुकायला ठेवायला आजोबा सांगायचे.आणि विळीवर बोंडूच्या फोडी करून पितळीमधे थोडं मीठ आणि थोडं तिखट शिंपडून “बोंडूची करमट” आम्हा सगळ्या लहान मुलांना खायला द्यायचे.हात खराब होऊ नयेत म्हणून केरसूणीच्या हिराची कांडी वितभर तोडून प्रत्येकाला फोडीत खूपसून बोंडूची फोड तोंडात कशी घालायची ते पण शिकवायचे.

काजू उन्हात चांगले सूकून आल्यावर मांगरात जाळ करून त्यात ते काजू भाजून काढायचे.काजू भाजत असताना आतलं तेल उडतं आणि अंगावर पडल्यावर तो भाग भाजतोच शिवाय त्याचा अंगावर डाग रहातो म्हणून ते आम्हा सर्व मुलांना दूर बसायला सांगायचे.
भाजलेल्या काजूची टरफलं विटेने फोडून आतला काजूगर निराळा करायचे.ही सर्व कामं आमच्या घरातल्या गड्याकडून करून घ्यायचे.
भाजून आलेले काजूगर मुठभर प्रत्येकाला खायला द्यायचे.जास्त खाल्यास पित्त होतं हे ही सांगायचे.”
हे सांगून झाल्यावर माझी ताई थोडी फिलॉसॉफिकल झाली.आवंढा गिळून,थोडी गंभीर झाल्यासारखी होऊन म्हणाली,

“माझ्या आजोबांबरोबर बरीच कामं करतानाच्या आठवणी जरी मला असल्या तरी डोंगरातले बोंडू काढायला जाण्याची आमची प्रथा मला विशेष वाटायची. आता आजोबानंतर जीवन जगताना जीवनातल्या समस्या म्हणजेच,आंबट गोड बोंडू चाखताना आजोबा माझ्या बाजूला असणार ह्याचा मला भास होत असतो.आणि प्रत्येक बोंडू पिरगळताना आणि पिशवी जड झाल्यावर ते तिचं ओझं माझ्याकडून काढून घेऊन आपण सांभाळीत तशा आता माझ्या समस्या सांभाळतील अशी फक्त आशाच करण्यात रहावं लागतं. सर्व कठीण समस्या साभांळताना त्याचं ओझं आपल्याकडे घेऊन मला मदत
करणारे माझे आजोबा मला दूरून पहात असतील अशी फक्त कल्पनाच करावी लागते.
डोंगरावर जाऊन झुडपातून बोंडू पिरगळून ओझं होईतो भार कसा संभाळायचा हे माझ्या आजोबांनी मला नकळत शिकवलं होतं.

आता जेव्हा तू आणलेले बोंडू मी सकाळी पाहिले तेव्हा मी मनात हंसले आणि रडले…दोन्ही कारणानी माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी पदराने डोळे पुसले.कारण त्याच वेळी माझ्या मनात आलं की वरून माझे आजोबा पण माझ्याशी हंसत असतील.”
माझ्या ताईला मी जवळ घेत म्हणालो,
“आठवणी येतात,आठवणी जात नाहीत पण गेल्या तर मात्र असं डोळ्यात पाणी आणून जातात.खरं ना?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, March 27, 2010

निरंतर चित्र काढतो

“शेवटी महत्वाचं म्हणजे तू जनतेवर विश्वास ठेवतोस.त्यांच्या जीवनात थोडीशी हास्याची भर घालण्यात तुला अपार आनंद होत असणार.”

“सूर्या,तू आता प्रसिद्ध व्यंगचित्रकार झाला आहेस हे मला माझ्या एका मित्राने सांगीतलं.तुला कधीतरी तुझ्या ऑफिसमधे येऊन भेटायचा माझा विचार होता.आज तुझी इथेच गाठ पडली हे बरं झालं.”
मी जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समधे काही कामासाठी गेलो होतो.तिथे सूर्यकांत कानडे मला भेटला त्याच्याशी बोलत असताना मी त्याला म्हणालो आणि आम्ही कॅन्टीनमधे गप्पा मारण्यासाठी जाऊन बसलो.

“तसं पाहिलंत तर मी चार पाच वर्षाचा असल्यापासून चित्र काढायला लागलो.अगदी पहिलं चित्र मी काढलं होतं ते मला आठवतं”.
सूर्या लहानपणाच्या आठवणी काढून मला सांगायला लागला.

“माझ्या आई बरोबर मी माझ्या मावशीची गावाला जायचो.आम्ही तिकडे एकदोन आठवडे रहायचो.कोकणात जी छोटी मोठी शहरं आहेत त्यापासून दूर दूर गेल्यावर निसर्गसुंदर खेडी पहायला मिळतात. माझी मावशी जिथे रहायची ते असंच सुंदर खेडं होतं. भात-शेतीचा प्रदेश असल्याने कुणग्या कुणग्यात भात लावलं जायचं,दोन कुणग्यातल्या उंचवट्याला मेर म्हणतात.शेती तुडवत न जाण्यासाठी ह्या मेरीवरून कसरत करत जावं लागायचं.
जाता जाता उंच उगवलेल्या भाताच्या रोपट्यावर आलेल्या कोवळ्या तांदळाच्या कुसराला ओढून त्यातले कच्चे तांदूळ खाताना गाईच्या दुधाची लज्जत यायची.”

मी म्हणालो,
“सूर्या तू नुसता चित्रकार नसून एक चांगला लेखकही आहेस.तू जे वर्णन करून सांगतो आहेस ते लेखातही लिहू शकशील.”
सूर्या खजील झाला.मला म्हणाला,
“एका चित्रकाराला चित्र काढण्यापूर्वी दृष्याचा आढावा घ्यावा लागतो.काही चित्रकार तो आढावा मनात साठवून ठेवतात आणि मग चित्र काढायला लागतात.मी माझं मन फक्त तुझ्याकडे उघडं करून सांगत आहे.”

“सांग,सांग मला ऐकायला आवडेल.आणि मी पण कोकणात वाढलो असल्याने माझ्या बालपणातल्या आठवणीचा देखावा तू उभा करीत आहेस, याच्यापेक्षा आणखी कसला आनंद व्हायचा.”
मी सूर्याला बरं वाटावं म्हणून म्हणालो.

“तर मी काय सांगत होतो? हां! शेती संपता संपता नदी दिसायची. कोकणातल्या नद्या फक्त पावसात दुथडी भरून वाहतात.एरव्ही उन्हाळात पाण्याची ठणठण असते. नदीकडे जाण्यासाठी शेताच्या मधून पायवाटा असायच्या.
शेतकर्‍यांची गुरं-गाई,वासरं,म्हशी,रेडकं-नदीत धूवायला आणि म्हशीना पाण्यात डुबवून ठेवण्यासाठी नदीवर आणल्या जायच्या. मला हे दृष्य पाहायला फारच आवडायचं.माझे मावस भाऊ त्यांच्या गुरांना नदीवर घेऊन येताना मी त्यांच्याबरोबर न चुकता जायचो.
मग नदीजवळच्या एखाद्या खडकावर बसून कागदाच्या पॅडवर हे दृष्य -ती नदी,नदीवर येणारी गुरं,बेवारशी हडकुळी कुत्री,त्यांच्या बरोबरचे माझ्या भावांसारखे इतर शेतकरी,तसंच डोक्यावर कळश्या घेऊन रंगीबेरंगी लुगडी नेसलेल्या बायका नदीकडे किंवा नदीकडून जाताना पाणी आणताना- पाहून त्याचं चित्र काढायला हुक्की यायची.माझं अगदी पहिलं चित्र होतं ते एका शेतकर्‍याच्या मागे एक संतप्त झालेली म्हैस पाठलाग करतानाचं.”

मी म्हणालो,
“अगदी पहिलं चित्र सुद्धा किती लक्षात असतं बघ.ते तू सांभाळून ठेवलं असशील ना?”
“हो.मी माझी सर्व चित्र सांभाळून ठेवतो.काही वेळेला माझे मित्र त्यावेळी माझी चित्र घरी दाखवायला घेऊन जायची.पण परत आणून देण्याच्या बोलीवर मी त्यांना द्यायचो.
त्या वयात सुद्धा मला कुठचीही गोष्ट चित्रीत करायला मजा यायची. कधीतरी मी मोठा चित्रकार व्हावं असं मनोमन वाटायचं. माझी घरची मंडळी विशेषकरून माझी आई मला खूप प्रोत्साहन द्यायची. पुढे पुढे मला आठवतं माझ्या खोलीत चित्र काढायला लागणार्‍या बर्‍याचश्या गोष्टी इतस्ततः पडून असायच्या. शहरात आल्यावर माझ्या मित्रांबरोबर आर्टगॅलरीझ, म्युझियम,आणि वाचनालयाला माझ्या नियमीत भेटी असायच्या.
मी माझं जे.जे.कॉलेज संपवून काम शोधायला लागलो त्यावेळी मी नव्या जगात पदार्पण केल्या सारखं वाटलं.ख्याली खुशालीचे दिवस आता संपले होते.कधी कधी मी माझी चित्रं घेऊन निरनीराळ्या कचेर्‍यात जाऊन ती दाखवायचो.बरेच वेळा त्यात कोकणातल्या सृष्टीसौन्दर्याचे सीन,घरातल्या हॉलमधे लटकवण्यासारखे म्युरल्स,कुणाच्या तरी मावशीचे पोर्टेट,किंवा मासिकासाठी मुख्यपानावरची काही चित्र असायची.”

“तुझी पत्नी पण चित्रकार आहे असं तो मित्र मला म्हणाला होता.ती तुझी क्लासमेट होती असं काहीतरी तो म्हणाल्याचं आठवतं.”
मी सूर्याला म्हणालो.
“अगदी बरोबर.”
असं म्हणत सूर्या पुढे सांगू लागला,
“तोपर्यंत माझं लग्न झालं होतं.जरी माझ्या ह्या व्यवसायात वर यायला मला खूप दिवस लागले तरी माझ्या पत्नीनें मला खूप आधार दिला.कधी कधी आम्ही जेवण विसरायचो.पण आम्ही आशा सोडली नव्हती.हे सर्व सांगण्याचं कारण आमच्या प्रगतीला लोकानी आणि परिस्थितिने हातभार लावला होता.मी माझी घमेंड केव्हाच विसरून गेलो होतो. मला नेहमीच वाटतं की मी इतरांचं देणं लागतो.”

मी म्हणालो,
“मला वाटतं की कुणीही ह्या जगात एकदम स्वर्गातून उतरून येत नाहीत.अगदी सर्व दृष्टीने तयार झालेले,पोक्तपणा आलेले आणि आल्याआल्या इतरांवर आपल्या कलेचा, पान्डित्याचा आणि पाणीदारपणाचा वर्षाव करायला तयार असलेले असे कोणही स्वर्गातून येत नाहीत.”

सूर्या म्हणाला,
“मला जर का माझ्या लहानपणी माझ्या नातेवाईकांकडून शिकण्यासाठी असं सहजासहजी प्रोत्साहन आणि संधी दिली गेली नसती तर कॉलेजचं शिक्षण संपल्यावर आलेल्या काळात मी दम धरून राहू शकलो नसतो.माझ्या लहानपणी माझ्या जवळ असलेल्या घमेंडीचं, स्वतःवर भरवंसा सांभाळण्यात रुपांतर झालं नसतं.
हे मला फक्त चित्रकारीबद्दलच वाटतं असं नाही तर सर्व तर्‍हेच्या शिक्षणाबाबत वाटतं.आणि हे सर्वांना लागू आहे असं मला वाटतं. अर्थात हे एकमेकावर अवलंबून असतं.मी जो आज आहे ते माझ्या जीवनात घडलं म्हणून आहे.भूतकाळातल्या अनुभवाचा वारसा मिळाल्याने असा आहे.”

“पण आता तू या व्यवसायातून काय शिकलास ते समजून घेण्याची मला उत्सुकता आहे.”
मी सूर्याला म्हणालो.

“चित्रकलेतून मी एक शिकलो की मनसोक्त आणि सुखी जीवन मिळवण्यासाठी दुसर्‍याला समर्पण करावं लागतं. प्रत्येकजण कशात ना कशात प्रवीण असतो.एकदा त्याने त्याला हव्या असलेल्या गोष्टीची निवड केली आणि त्यात प्रगती करण्याची संधी घेतली मग मात्र तसं करणं त्याचा हक्कच बनतो.त्याला ते आव्हान असतं.मी माझ्या कामाची निवड ह्याच तत्वावर केली आहे.खूप पैसे मिळवण्याच्या दृष्टीने नव्हे.”
सूर्याने आपलं प्रांजाळ मत दिलं.

“पण तू आता व्यंगचित्रकार म्हणून ह्या लाईनीत कसा वळलास?”
माझा दुसरा प्रश्न करून मी त्याच्या चेहर्‍याकडे पहात होतो.
अगदी आनंदी चेहरा करून सूर्या म्हणाला,
“आता मी जो व्यंगचित्रकार झालो आहे त्याचं कारण ते काम मला आवडतं.आणि हे काम एक हास्य-जीवनातली अतिशय जरूर असलेली विक्रीची वस्तु असावी असं मला वाटतं.ही कला तुल्यकारक आणि संतुलन ठेवणारी आहे. तुल्यकारक एव्हड्यासाठी की चांगले विनोद, कामाच्या सर्व प्रांतातल्या लोकांना आवडतात आणि संतुलन ठेवणारी, कारण कुणालाही जीवनाकडे कडवटपणे पहावं लागत नाही.”

उठता,उठता मी सूर्याला म्हणालो,
“परिणामकारक आणि समयसाधून हास्यातून केलेलं अवलोकन -मग ते शब्दातून असो,चित्रातून असो किंवा दोन्हीमधून असो-अर्थ हरवलेल्या वचनातून आणि उघड सत्यातून छेद घेऊन जातं.
शेवटी महत्वाचं म्हणजे तू जनतेवर विश्वास ठेवतोस.त्यांच्या जीवनात थोडशी हास्याची भर घालण्यात तुला अपार आनंद होत असणार.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, March 25, 2010

दिसतेस तू तशीच अगदी

अनुवाद. (चॉंद सी महबूबा………)

असावी माझी प्रिया चंद्रमुखी
कल्पित होतो मी कधी एकदा
दिसतेस तू तशीच अगदी
कल्पिले होते मी सदा सर्वदा

ना कसली रीत ना कसला रिवाज
ना कधी वाद ना कधी नाराज
रूप असे भोळे भाळे
नयन टपोरे काळे काळे
कल्पित होतो असेच रूप कधी एकदा
दिसतेस तू तशीच अगदी
कल्पिले होते मी सदा सर्वदा

मम आनंदाची तू वाटेकरी
मम दुःखाला तू सहनकरी
नको म्हणशी राजे राजवाडे
अंतरी रहाण्या भाजीशी मांडे
दुनिया मधे तूच एखादी
दिसतेस तू तशीच अगदी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 22, 2010

असंच एक कोकणातलं गाव.

“हे तुझं निसर्गाचं वर्णन ऐकून आणि तुझ्या गावातलं तळं आणि आजूबाजूचं सृष्टी सौन्दर्य पाहून मला पुढेमागे इथेच स्थाईक व्हावं असं वाटायला लागलंय.”

“आमच्या कुटूंबात मी पहिलाच कॉलेजात जाणारा ठरलो.आमचा शेतकी व्यवसाय असल्याने व्यवहारापूरतं पुस्तकी ज्ञान असलेलं पूरं असं माझ्या इतर नातेवाईकाना वाटायचं.शेतीतून पैसा येत असल्याने जीवनात लागणार्‍या इतर गरजा भागवल्या जायच्या.पण माझ्या आजोबांचं तसं नव्हतं.ते जरी सातवी पर्यंत शिकले असले तरी मिळेल ते ज्ञान संपदान करताना पुस्तकी ज्ञानाच्या जरूरीचं महत्व त्यांना माहित झालं असावं”
शंकर माझा- शाळकरी- मित्र मला सांगत होता.

शेतकी व्यवसायवर डिग्री घेऊन त्याने आपल्या शेतीवाडी परिसरात प्रचंड सुधारणा केली होती.जेव्हा जेव्हा मला तो मुंबईला भेटायचा तेव्हा तेव्हा तो माझ्या मागे लागायचा,आणि म्हणायचा,
“एकदा तरी येऊन बघ आमचं शेत आणि आजुबाजूचा परिसर.केवळ जादा ज्ञान घेतल्याने मी ह्या परिसराचा कायापालट केला आहे.पैसे असायचे पण पैसे सर्व काही नसतं.पैशाबरोबर ज्ञानाचा उपयोग करूनच असं करता येतं.”

आज योग आला होता.मलाही एक आठवड्याची फुरसत मिळाली होती.वाटलं शंकरच्या गावी जावं,मला बघूनही तो खूशही होईल. आणि मला पण तो काय म्हणायचा ते प्रत्यक्ष बघता येईल.
मला पाहून शंकरला खूप आनंद झाला.शंकरचं घर डोंगरावरच्या एका सपाटीवर होतं.रिक्षातून उतरल्यावर पायी वर चढून जावं लागायचं.वर गेल्यावर मात्र एकदम मोकळं वाटलं.मागे वळून पाहिल्यावर खालच्या सपाटीवरचं दृष्य अगदी डोळ्याचं पारणं फेडील असं दिसलं.पण काळोख व्हायला आला होता.जेवणं झाल्यावर काळोख जरी झाला होता तरी घराच्या अंगणात गप्पा मारीत बसलो होतो.खाली रस्त्यावरून जाता-येताना बरीच मंडळी दिसत होती. मधून मधून शंकरला हात करून सलामी देत होती.शंकरच्या घराशेजारी एक घर होतं.त्याचे मालक सुरेश देसाई असं शंकर मला म्हणाला.
तेव्हड्यात सुरेश देसाई आम्हाला अंगणात बसलेले पाहून गप्पा मारायला म्हणून येऊन बसले.शंकरने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली.

गप्पा मारताना मला शंकर म्हणाला,
“उद्या सकाळी लवकर उठून आपण शेतावर जाऊया.सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी इथे उभं राहून खाली पहिल्यावर तुला किती रम्य वाटेल ते तुच ठरव.”
मी म्हणालो.
“मी मघाशी आलो तेव्हा जरा पाठ फिरवून मागे बघीतलं तेव्हाच मला कल्पना आली होती.पण नंतर पटकन काळोख झाला. तू म्हणतोस तसं नक्कीच रम्य दिसेल यात शंका नाही.”

“मी माझं आयुष्य अधिक ज्ञान संपादन करण्यासाठी वाहून घेतलं होतं.मला वाटतं ज्ञानाच्या ठिणगीमुळे एखाद्याचं जीवन दैदिप्यमान होत असावं. ज्ञान हे असंच काहीतरी आहे की ज्यामुळे मनुष्याला माणूसकीच्या वरच्या पातळीवर उचलून ठेवलं जात असावं.नियतीचा मनुष्यप्राण्याला त्या जागी आणून ठेवण्याचा पूर्वनियोजीत विचार आसावा.माझ्या आजोबांना मिळेल ते ज्ञान संपादन करायचं वेडच होतं.माझ्या आईने माझ्या आजोबांना नेहमीच आदर्श मानलं होतं.”
शंकर आपले पूर्वीचे दिवस आठवून सांगत होता.

मी आजोबापासून दूर शिकण्यासाठी म्हणून गेल्याने आई योग्य तेच करीत असावी असं मला त्यावेळी वाटायला लागलं होतं.”
शंकर तल्लीन होऊन मला सांगत होता.
बरीच रात्र झाली होती.
“उद्या सकाळी शेतावर जाता जाता आपण गप्पा करूंया.”
असं सांगून शंकरने मला झोपायची खोली दाखवून गुड नाईट केलं.
सकाळी लवकरच उठलो.चहा नास्ता झाल्यावर आम्ही खाली शेताकडे जायला निघालो.

खरंच उंच डोंगरावरून पाहिल्यास एखाद्या रंगीत साडी नेसलेल्या स्त्रीच्या साडीचा पाठीवरचा लोंबता पदर पसरून दाखवल्यावर किती हिरवा दिसतो त्याची कल्पना ह्या भातशेतीच्या कुणग्याकडे पाहून होत होती.
खाली आल्यावर पोफळींची -सुपारीची- उंचच उंच झाडं माडाच्या बनाशी जणू उंचीसाठी स्पर्धा करताना दिसत होती.

मला शंकर म्हणाला,
“तळ्याजवळचे सपाट शेतीचे कुणगे जरी उन्हाळ्यात भकास दिसले तरी पाऊस येऊन भाताची पेरणी होऊन दोन तिन महिने गेल्यावर आमच्या गावी यावं.कोकणातलं नंदनवन दिसेल.”
“सुरेश देसाई इकडे केव्हा पासून राहायला आले?”
मी सहज प्रश्न केला.
मला म्हणाला,
“अलिकडेच ते आमच्या गावात येऊन स्थाईक झाले आहेत.माझ्या शेजारचं घर आणि वाडी त्यांनी विकत घेतली. माडा-पोफळीच्या झाडांबरोबर आंब्याची कलमी झाडं पण त्या वाडीत होती.पुर्वीच्या मालकाने ही सर्व इस्टेट त्यांना विकून तो मुंबईला धंदा करायला गेला होता.
सुरेश देसायांचा मुंबईत कार डिलर्सचा धंदा आहे.तो त्यांनी आपल्या मुलाला सोपवून ते आमच्या गावात येऊन स्थाईक झा्ले.”

पुन्हा आपल्या आजोबांच विषय काढून शंकर म्हणाला,
“लोकं माझ्या आजोबांच्या ज्ञानाचा,त्यांच्या सज्जनपणाचा, सन्मार्गीपणाचा आणि मदतीचा हात पुढे करण्याच्या वृत्तिचा आदर करीत असंत.माझे आजोबा रात्र जागून वाचन करायचे. नुसतंच त्यांच्या मनाला पटतं तेच वाचत नव्हते तर दुसर्‍याचं म्हणणं काय असावं हे पण मोठ्या उत्साहाने, उत्सुक्ततेने वाचत असायचे.उघडं मन ठेवून पक्षपाती न रहाता दुसर्‍याचा दृष्टीकोन समजाऊन घेत असायचे.
वाचनाच्या वेडाने माझे आजोबा ज्ञानी झाले.त्यांचं ज्ञान आणि त्यांच्या नम्रतेने वागण्याच्या स्वभावामुळे ते लोकांच्या डोळ्यात भरले जायचे.”
मी शंकरला म्हणालो,
“तुझं तुझ्या आजोबावर फारच प्रेम होतं असं दिसतं.शहरात शिकायला गेलास त्यावेळी त्यांना सोडून जायला तुझ्या जीवावर आलं असेल नाही का?”

“काय सांगू तुला?”
मी जणू शंकरच्या जून्या आठवणीना उजाळा देत होतो.
“मला वाटतं जवळच्या नातलगापासून दूर राहणं म्हणजे महाकठीण असतं, आणि एकाकी वाटण्यासारखं असतं.आणि अशावेळी माझ्या घराची आणि विशेष करून माझ्या आजोबांची मला आठवण आल्याशिवाय कशी राहिल?”
शंकर त्याना सोडून जातानाच्या आठवणी काढून म्हणाला,
“मी ज्यावेळी कॉलेजमधे शेतकी इंजिनीयरींग शिकायला जायाला निघालो तेव्हा माझे आजोबा शरीराने सशक्त होते. आणि त्यांना वाटत असलेल्या श्रद्धेबद्दल ते खंबीर होते. त्यांचं जीवन हे माझं मार्गदर्शन झालं होतं.मला माहित आहे की त्यांच्या सुखाचा उगम त्यांच्या श्रद्धेमधून झाला होता.मी त्यांच्या पासून दूर राहायला जात्त असताना मला अशिर्वाद देऊन वर ते मला म्हणाले होते की,
“तू ज्ञान मिळवण्यासाठी जात असल्याने मी अतिशय खूष आहे.”
त्याना वाटणार्‍या त्या आनंदाने त्यांच्या डोळ्यातली चमक अजून माझ्या लक्षात आहे. आणखी ज्ञान मिळण्यासाठी त्यांना जाणं वयामुळे कठीण होतं तरी माझ्या सारखं कुणी जवळचं जात आहे हे पाहून त्यांना समाधानी वाटत होती. मला ते नेहमी म्हणायचे,
“हताश होऊं नकोस आणि श्रद्धेवर भरवंसा ठेव.”
हे सांगत असताना त्यांचा चेहरा विशेष खुलून दिसायचा.ही साधी घटना मला वेळोवेळी आठवते.आणि माझ्या अडचणीच्या वेळी मला आधार देते.त्यांच्याकडून मिळणारी अविरत मदत आठवते.”

मी शंकरला म्हणालो,
“निरहंकारी राहून मिळेल ते ज्ञान घेण्याची कोशीश करत रहाणं खरंच फायद्याचं ठरतं. जीवनात दृढवि़श्वास ठेवून आणि आशा बाळगून पावलं टाकीत राहिलं पाहिजे.मला वाटतं आपलाच आपण शोध घेतला पाहिजे.त्यामुळे इतराना समजायला मदत होते.”

“तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे”
असं सांगून शंकर म्हणाला,
“मी माझ्या जवळच्या नातेवाईकापासून दूर राहिल्याने माझ्या जगातल्या लोकांना समजू शकलो होतो.माझे आजोबा सांगायचे,
“सर्व धर्मात सत्य आणि स्वातंत्र्यावर सारखच प्रेम करावं असं म्हटलं गेलं आहे.आणि हा मार्ग शांतीचा ठरतो. त्यामुळे एकमेकातले हेवेदावे कमी होऊन मन जुळायला मदत होते. भयभीति तसंच गैरविश्वास, अज्ञानातून जन्म घेतात.आणि ह्या सर्व दूराव्यामधले पूल ज्ञानाद्वारे बांधले जातात. ज्ञानामधूनच विश्वास आणि मैत्रीचे दुवे माणसा-माणसामधे निर्माण केले जातात.”
माझे आजोबा जर कॉलेजपर्यंत शिकले असत तर नक्कीच प्रोफेसर झाले असते.”

आपल्या आजोबांबद्दलचं प्रेम आठवण काढून काढून सांगत शंकर आपलं मन माझ्याकडे मोकळं करीत होता.
त्याच्या शेतीच्या परिसरात रोजच फिरत फिरत शंकर बरोबर अशाच गप्पा मारीत आठ दिवस कधी निघून गेले ते कळलंच नाही.
मला निरोप देताना शंकर मला म्हणाल्याचं आठवतं,
“आंब्या-फणसाच्या दिवसात कोकणात कुणी ही कुठे ही जावं.पण आमच्या गावात आल्यावर नुसतेच फणस आणि आंबेच झाडावर दिसणार नाहीत आणखी अनेक तर्‍हेची फळं, झाडावर दिसतील त्यात पांढरे जांब,लाल केशरी रातांबे-ज्या पासून आमसोलं करतात-आंबट गोड फाल्गं,रसाळ हिरवे गार रायआवळे,चॉकलेटी रंगाची -साल फूटल्यामुळे -दिसणारे आंबट गोड चिंचांचे फाद्यांवर लटकणारे घोस.एक ना दोन.”

मी त्याला निरोप देताना म्हणालो,
“हे तुझं निसर्गाचं वर्णन ऐकून आणि तुझ्या गावातलं तळं आणि आजूबाजूचं सृष्टी सौन्दर्य पाहून मला पुढेमागे इथेच स्थाईक व्हावं असं वाटायला लागलंय.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, March 20, 2010

जयदेवचं हंसणं.

“जेव्हा जाणंच कठीण गोष्ट होते तेव्हा हंसण्याची वेळ आलेली असते.”

कमल आपल्या दोन मुलांना घेऊन आमच्या घरी आली होती.तिचा मोठा मुलगा जयदेवसारखा-तिच्या भावासारखा- दिसत होता.
मला जयदेवची आठवण आली.
“जयदेवला जाऊन आता किती वर्ष झाली असतील?”
मी कमलला विचारलं.

“सोळा वर्षापूर्वी माझा भाऊ जन्माला आला होता.मला आठवतं त्यावेळेला गावात प्रचंड वादळ आलं होतं.हे माझ्या नीट लक्षात आहे कारण मला आठवतं,माझी आजी त्याला पाहायला आली असताना ती ओल्या जमिनीवरून घसरून पडली होती. आणि तिचा पाय लचकला होता.पण जेव्हा आजी माझ्या पिटुकल्या भावाला गोधडीत घेऊन बसली होती,तेव्हा त्याच्या शांत, हंसर्‍या चेहर्‍याकडे पाहून तिची दुखापत ती विसरून गेली होती.”
कमल आपल्या भावाची आठवण काढून सांगत होती.आणि पुढे म्हणाली,
“एक म्हण आहे की “जेव्हा जाणंच कठीण गोष्ट होते तेव्हा कठीण गोष्टच जात असते” ही म्हण ऐकून थोडं ज्ञानवर्धक वाटतं खरं,पण मी ह्यापेक्षाही जरा सखोल विचार करणारी गोष्ट मनात आणते.तो विचार माझ्या भावाने-जयदेवने- माझ्या मनात आणून दिला.
मला वाटतं जेव्हा,
“जाणंच कठीण गोष्ट होते तेव्हा हंसण्याची वेळ आलेली असते.”

मी कमलला म्हणालो,
“मला वाटतं,जयदेवने त्याच्या जन्माच्याच दिवशी आजीपासून हंसण्याची जादू दाखवायला सुरवात केली होती.”
जयदेवची आठवण काढून कमल जरा खजील झाली होती.म्हणाली,
“मला जयदेव खूप आवडायचा.त्याची मोठी बहिण म्हणून मी नेहमीच त्याच्याशी आऊचा बाऊ करून त्याला पीडायची. इतरांची भावंड कशी करतात तसं केव्हा एकदा जयदेव मोठा होऊन माझ्या बरोबर दंगामस्ती करील याची मी वाट पहायची.”

मला आठवत होतं की कमलचा जयदेव बर्‍याच उशिराने चालायला लागला होता.कमलचे आईवडील खूप उपचार करून थकले होते.
“इतरांपेक्षा जयदेव जरा उशिराच चालायला लागला.तुम्ही त्याला उचलून घ्यायचा.त्याचे पाय थोडे अधू वाटायचे.केव्हा पासून तो चालायला लागाला?”

मी कमलला विचारल्यावर म्हणाली,
“जयदेव चालायला लागला तोच मुळी दोन वर्षाचा झाल्यावर.तो जेमतेम जिना चढायचा.आणि चढलाच तर आजुबाजूचा आधार घेऊन स्वतःला वर ढकलंत चढायचा.अगदी सुस्थ झाल्यासारखा करायचा.त्याला जोरात धावता येत नव्हतं.लांब उडी मारता येत नव्हती.मला वाटतं त्याचे पाय त्याला हवं ते करत नव्हते.”

“अमेरिकेहून एक निष्णात डॉक्टर आले होते.त्याला दाखवणार आहो असं तुझे वडील मला म्हणाल्याचं आठवतं.”
मी कमलला म्हणालो.

“तो ज्यावेळी चार वर्षाचा झाला त्यावेळी त्याला त्या डॉक्टरनी तपासून पाहिल्यावर सांगीतलं की त्याचे स्नायू एक एक करून निकामी व्हायला लागले असून पायापासून सुरवात करून हळू हळू त्याच्या ह्र्दयावर आणि फुफ्फुसावर पण परिणाम होणार आहे. जेमतेम आणखी दहा एक वर्ष तो राहिल असं डॉक्टर पुढे म्हणाले. खरं तर हे ऐकून मला माझं उरलेलं आयुष्य त्याला द्यावसं वाटलं.”
कमल हे सांगताना खूपच कष्टी झालेली दिसली.

“जयदेव सात वर्षाचा झाल्यावर त्याला व्हिलचेअर वापरावी लागली. ज्या वयात इतर मुलं क्रिकेट मधे धांवा काढायची, स्केटींग करायची त्या वयात जयदेव चढाव-उतारावर वर-खाली खेळ खेळण्यासाठी म्हणून जायचा. इतर मुलं तो असं करीत असताना त्याच्याकडे टक लावून पाहायची त्याकडे तो दुर्लक्ष करायचा.त्याने ते मनाला कधीच लावून घेतलं नाही. ती वेळ तो हंसून घालवायचा.एखादा वात्रट मुलगा त्याला “ए पांगळ्या” असं म्हणायचा तेव्हा जयदेव त्याला हंसून प्रत्युत्तर द्यायचा.”
कमल सांगत होती.

“त्या डॉक्टरनी पुढे पुढे मोठा झाल्यावर त्याला व्हिलचेअर द्या असं सांगीतलं होतं. असं तुझे वडील म्हणाले होते.आणि त्यासाठी ते सिंगापूरला गेले आणि त्याच्यासाठी एक व्हिलचेअर घेऊन आले होते.मला आठवतं”
मी कमलला म्हणालो.

“व्हिलचेअरचा आणि जयदेवच्या हंसण्याच्या संवयीचा किस्सा सांगते”
कमल त्या प्रसंगाची आठवण काढून आणि त्याच्या हंसण्याच्या संवयीची आठवण काढून म्हणाली,
“एकदा तो हंसला होता ज्यावेळी त्याची व्हिलचेअर चिखलात रूतून तो खाली पडला होता. आणि त्याच्या हाताला खरचंटलं होतं.एकदा तो हंसला होता ज्यावेळी मी त्याच्या अगोदर जाऊन फ्रिझमधून आईसक्रिम काढलं आणि तो तसं माझ्या अगोदर करू शकला नव्हता.नेहमीच असंच काहीतरी असायचं जेव्हा जयदेव हंसण्यावर भागवायचा.
जयदेव आम्हाला हंसायला लावायचा.आम्ही हंसूच याची तो खात्री करायचा.”

“मला आठवतं,त्याचं जेव्हा जास्त झालं त्यावेळी तुच त्याला गाडीत घालून हॉस्पिटलात नेलं होतंस.तुझे वडील घरी नव्हते. आणि तो हॉस्पिटल मधून परत आलाच नाही.माझं बरोबर आहे ना?तुला आठवत असेल तो प्रसंग.”
मी कमलला म्हणालो.

“तो प्रसंग मी कसा विसरीन. तो आम्हाला सोडून जाण्यापूर्वी जेव्हा मी त्याला गाडीत बसवून हॉस्पिटलमधे ड्राईव्हिंग करीत नेत होते.
तो खूपच क्षीण झाला होता.त्याची फुफ्फुसं एव्हडी निकामी झाली होती की त्याला ऑक्सिजन सिलिंडर लागायचा. त्याच्याकडे बघायला सुद्धा मला कठीण व्हायचं.
“अग,ताई तुला माहित आहे का पुरषांपेक्षा बायका जास्त का जगतात?”
“कां?”
मी नेभळटासारखी त्याला प्रश्न करून गाडी पार्किंगसाठी इकडे तिकडे जागा शोधून काढण्याच्या प्रयत्नात होते.

“कारण,देव त्यांना पार्किंगची जागा शोधून काढण्यासाठी त्यांच्या आयुष्यात जादा समय देतो. हो ना?”

त्याला खात्री होती की तो आता जास्त जगत नाही.पण त्यावेळीही त्याने मला हंसवलं. नव्हे तर मी नक्की हंसेन ह्याची खात्री केली.
जयदेव निघून गेल्यावर अश्रू ढाळले गेलेच पण हंसू पण होतं. प्रत्येकजण आठवून आठवून जयदेवचं काहीतरी गमंतीदार वागणं सांगायाचा.
आज,जयदेवच्या जीवनाच्या पुस्तकातून ते पान मी काढून घेत आहे.माझ्या वादळी जीवनातून मी हंसत आहे.कारण जेव्हा जाणंच कठीण गोष्ट होते तेव्हा हंसण्याची वेळ आलेली असते.”

मला हे ऐकून राहवलं नाही.मी शेवटी कमलला म्हणालो,
“आता माझ्या चांगलंच लक्षात येतंय, किती सुंदरतेने जयदेवने आपलं जीवन हास्यमय केलं होतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, March 18, 2010

” ******आणि देव देत नाही दोनही डोळे.”

“जीवनातल्या अन्यायाशी दोन हात केल्याने जीवन संपन्न होतं.जीवन दोषहीन नसणं हे एका अर्थी बरं आहे असं म्हटलं पाहिजे. नाहीपेक्षा जीवन जगायला काहीच राहिलं नसतं.”

“आपण ज्यावेळी लहान असतो त्यावेळी आपल्याला सांगीतलं जातं की,
“चांगलं वागा”
“आपल्या जवळ असेल त्यातून भागीदारी करून दुसर्‍याला द्या.”
“तुम्हाला जर कुणी चांगलं वागवायला हवं तर दुसर्‍याशी तुम्ही चांगलं वागा.”
हे सगळे अगदी अनमोल उपदेश आहेत असं म्हटलं पाहिजे.”
अरूण परदेसी मला आपल्या लहानपणाच्या आठवणी काढून सांगत होता.

त्याचं असं झालं,मी माझ्या मित्राला भेटण्यासाठी तो रहात होता त्या वृद्धाश्रमात गेलो होतो.त्याच्याच रूममधे अरूण परदेसी रहायला आला होता.
“अरूण एका संशोधन संस्थेत सुरवातीला लिफ्टमन म्हणून कामाला लागला.आणि नंतर तीथूनच निवृत्त झाला.जवळचं असं कोणीच नातेवाईक नसल्याने त्याने वृद्धाश्रमात जाऊन रहावं असा त्याला सल्ल्ला दिला गेला.”
अरूण परदेसीची ओळख करून देत माझा मित्र मला म्हणाला.

अरूण तसा बोलका-बडबड्या वाटला.माझा मित्र पण मला म्हणाला,
“मला दिवसभर काही ना काही तरी जीवनातले अनुभव सांगत असतो.माझा वेळ ही मजेत जातो,आणि माझी करमणूकही होते.”

मी अरूणला म्हणालो,
“आपण दुसर्‍याशी चांगलं वागलो तर दुसरे आपल्याशी चांगलं वागतील अशी आपण अपेक्षा करीत असतो. आपण मोठे होत जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं आपण इतरांशी चांगलं वागलो तरी आपलं जीवन तेव्हडं काही चांगलं जात नाही. आपल्या जीवनात येणार्‍या प्रश्नांशी आपण सामना करायला गेलो की लक्षात येतं की काही गोष्टी न्यायसंगत नसतात.”

मला वाटलं अरूणला माझं हे म्हणणं पटलं असावं.लगेचच मला तो म्हणाला,
” मग त्यावर एकच उपाय असा की सकारात्मक वृत्ति ठेवून आनंदी राहाण्याच्या प्रयत्नात राहिलं पाहिजे.जरी सामाजीक गळचेपी सहन न करण्याचा आपण आपल्या मनात घाट घातला तरी शारिरीक हानि झाली असल्यास ती स्वीकारून त्यावर मात करायच्या प्रयत्नात आपल्याला रहावं लागतं.”

हे अरूण कडून ऐके पर्यंत माझ्या लक्षात आलं नाही की अरूण परदेसीला चांगलं दिसत नसावं.त्याला अंशतः अंधत्व असावं. त्याने सांगीतलेल्या पुढच्या निवेदनावरून ते माझ्या लक्षात आलं.
मला अरूण म्हणाला,

“माझ्या बाबतीत विचाराल तर सुरवातीपासून माझ्या आयुष्याने माझ्याशी अन्याय केला होता.माझी दृष्टी पहिल्यापासून अधू होती.शाळेत शिकत असताना माझ्या लक्षात आलं की काही क्षेत्रात मला इतर मुलांपेक्षा जोमाने काम करायची पाळी आली होती.मी भरपूर गृहपाठ घेऊन घरी यायचो.आणि इतर माझे मित्र सिनेमा नाटकाला जायचे, क्रिकेट मॅच बघायला जायचे. मी मात्र माझे गृहपाठ करायचो.

मी वर्षानूवर्ष माझ्या आईला म्हणायचो,
“हा अन्याय आहे.”
आणि त्यावर ती म्हणायची,
“बाळा,जीवनात अन्याय होत असतो.”

मला अरूणची कीव आली.उभ्या आयुष्यात ह्या व्याधीमुळे त्याला किती कष्ट काढावे लागले असतील याला सीमाच नसावी. मी त्याला बरं वाटावं म्हणून म्हणालो,
“प्रत्येकाच्या जीवनात अन्याय होत असतो.एखाद्याचे आई किंवा वडील आजारी असतात, एखाद्याची गरीब परिस्थिति असते किंवा आणखी काही कारणाने जीवन अन्यायाने भरलेलं असतं.सकारात्मक वृत्ति आणि मिळालेले आशिर्वाद ह्यानेच जीवन सुखी होत असावं.कुणाचंच जीवन दोषहीन नसतं.”

हे माझं ऐकून अरूणला आपल्या आईची आठवण आली असावी. मला म्हणाला,
“माझ्या पूर्‍या आयुष्यात माझ्या आईचं म्हणणं खरं आहे हे कधी कधी मला वाटायचं.मी ते स्वीकारलं.एक वास्तविकता म्हणून स्वीकारलं आणि आयुष्याचा पुढचा मार्ग पत्करला.”

“मग तू लिफ्टमन म्हणून त्या संस्थेत कसा काय राहिलास?.तुला त्या संस्थेचा पत्ता कुणी दिला?”
मी कुतूहलाने त्याला प्रश्न केला.

“माझ्या नातेवाईकांकडून, माझ्या गुरूजींकडून आणि मित्रांकडून मला जे प्रोत्साहन मिळायचं ते मी संपूर्ण समजण्यापेक्षा जास्त होतं.अशाच माझ्या एका मित्राने मला त्या संस्थेत अर्ज करायला सांगीतलं.तो मला म्हणाल्याचं आठवतं की ह्या संस्थेचे संस्थापक बरीच वर्षं अमेरिकेत शिकायला आणि तीकडच्या संस्थेत कामाला होते.अमेरिकेचे पूर्वीचे एक प्रेसिडेंट पोलियोच्या रोगाने अपंग होते.त्यांनी अमेरिकेतल्या अपंग लोकांसाठी स्वानुभवामुळे बरेच कायदे करून खूप सोयींची आणि त्यांच्या व्यवसायाची कायद्याने तरतूद करून ठेवली होती.ते पाहूनच ह्या संस्थेत आमच्या सारख्या अपंगाना आम्हाला जमेल ते काम लक्षात आणून त्याची तरतूद करायचा नियम आणला असावा.त्यामुळे मी अपंग असल्याने मला लिफ्टमनचं काम तिकडे मिळालं.”

“अमेरिकेत अपंग लोकांसाठी बर्‍याच सोयी असतात.होटेल,रेस्टॉरंट,हॉस्पिटल,चित्रपटगृह वगैरे जागी जीथे लोकांची वरदळ असते तीथे अपंगासाठी रॅम्प्स,एलिव्हेटर्स असतात.लाईन लागली असल्यास त्यांना सर्वांच्या अगोदर जायला मुभा असते.स्वच्छतागृहात त्यांच्यासाठी खास सीट असते.
सीटपर्यंत जाण्यासाठी आधार लावलेले असतात.ज्यांना ड्राईव्हिंग करता येईल अशाना ड्राईव्हींग सुलभ व्हावं म्हणून मोटारीतली ड्राईव्हर सीट आणि क्लच-ब्रेक विशेष पद्धतीचे असतात.पार्किंगसाठी त्यांच्यासाठी जागा राखून ठेवलेल्या असतात.रस्त्यावरून चालण्याची जीथे सोय आहे किंवा इमारतीत प्रवेश करण्याची जीथे सोय आहे तीथे अपंगाजवळ असलेला वॉकर,रोल्याटर,व्हिलचेअर असल्या सुवीधांचं कोणतीही अडचण न होता वापर करता येण्यासाठी सोय करून ठेवावी लागते. थोडक्यात माणूस वापरील अशी कुठचीही वापरण्याजोगी गोष्ट तयार करताना अपंगसुद्धा त्याचा वापर करतील अशी सोय करण्याचं कायद्याने बंधन करून ठेवलं आहे.एका वाक्यात सांगायचं झाल्यास,
“अपंगत्व हे शाप नसून वरदान आहे”
एव्हडं तरी त्यांच्या मनाला समाधान मिळावं असा एक माणूसकीच्या विचाराने आणि कायद्याने प्रयत्न केलेला असतो. खरंच तू नशीबवान आहेस.अशा संस्थेत राहून तू निवृत्त झालास.त्या संस्थेतल्या लोकांचे चांगले संस्कार तुला मिळाले असल्याने आणि तुझ्या आईचं म्हणणं तू लक्षात ठेवल्याने सुखी झालास.”
मी अरूण परदेसीला सद्बदीत होऊन म्हणालो.त्यालाही बरं वाटलं.

मला म्हणाला,
“शाळेत असताना आयुष्यात सुखी होण्यासाठी मी एका मार्गाची नीवड केली.जरी मला खूप गृहपाठ करावे लागले तरी माझ्या मित्रांबरोबर मला शाळेत जाता येत होतं आणि परत घरी येता येत होतं.ती नीवड केली नसती तर मला अंध मुलांच्या शाळेत जाऊन रहावं लागलं असतं.माझ्या जीवनात मी उदास रहाण्यापेक्षा माझ्यावर ईश्वराने केलेल्या दुसर्‍या कृपेकडे लक्ष केंद्रीत केलं.माझी स्मरणशक्ति इतकी चांगली होती की शाळेतून मिळणारी प्रचंड माहिती मी लक्षात ठेवीत असल्याने त्याची मला फारच मदत व्हायची.”

मी म्हणालो,
“मला वाटतं आनंदी असावं की नसावं हे आपल्या निवडीवर असतं”.
“तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.”
असं सांगून अरूण म्हणाला,
“शाळेत असताना जमतील त्या इतर खेळांच्या चढाओढीत मी भाग घ्यायचो आणि मी एकही स्पर्धा जिंकलो नाही ह्या विचारावर मन केंद्रीत करण्याऐवजी मला चढाओढीत भाग घेता आला ह्याचा मी आनंद मनमुराद घेत होतो.त्यानंतर मी शाळेच्या संगीताच्या वाद्यवृंदात बासरी वाजवण्याच्या कामात भाग घेतला होता.”

उठता,उठता मी माझ्या मित्राला आणि अरूण परदेसीला उद्देशून म्हणालो,
“जीवनातल्या अन्यायाशी दोन हात केल्याने जीवन संपन्न होतं.जीवन दोषहीन नसणं हे एका अर्थी बरं आहे असं म्हटलं पाहिजे. नाहीपेक्षा जीवन जगायला काहीच राहिलं नसतं.”

अरूण परदेसी मला शाळेतल्या आठवणी सांगत होता त्याचं कारण माझ्या लक्षात आलं नव्हतं.त्याचे आईवडील गेल्यानंतर त्याला खूपच कष्टाचं जीवन काढावं लागलं.पण ज्या आनंद देणार्‍या आठवणी आहेत त्याच दुसर्‍याला सांगून आनंद द्यावा अशा मताचा अरूण असल्याने तो आपल्या शाळेतल्या आठवणी सांगत होता असं माझ्या मित्राने मला नंतर स्पष्टीकरण केलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, March 16, 2010

सजणा! हीच का रे प्रीतिची रीत

अनुवाद. (बहे न कभी नैन से नीर…..)

वाहू न जावी आसवें माझ्या लोचनातूनी
उठेना! काहूर नाजूक माझ्या अंतरातूनी
सजणा! हीच का रे प्रीतिची रीत

मनातल्या आशा जाती लुप्त होऊनी
जाईना! आर्तस्वर माझ्या हृदयातूनी
पाहूनी मृदुहास्य तुझ्या ओठातूनी
घेईना अंतरीची ओळख पटवूनी
ह्यातच झाली तुझी रे जीत
सजणा! हीच का रे प्रीतिची रीत

दीप जळे घरी अन पतंग असे बाहेरी
खेचून आणी प्रीत तयाला दीपा जवळी
शुद्ध हरपूनी विसरे भीति जळण्याची
आवेश येऊनी उमंग आली प्रणयाची
गात राहिली दुनिया त्याचे गीत
सजणा! हीच का रे प्रीतिची रीत

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, March 14, 2010

जीवनातली सूत्रं.

“हळू हळू उन्हं कमी व्हायला लागली.अंगावर सावली पडल्यावर थंडी वाजायला लागली.विषय इकडेच थांबवलेला बरा असं माझ्या मनात आलं.”

वसंत ऋतू येत आहे ह्याची चाहूल लागली.अलीकडे न दिसणारे पक्षी दिसायला लागले आहेत.मलबरी झाडाला आता पून्हा पालवी फुटायला लागली आहे.इकडे पानं पडून गेलेल्या झाडांना पुन्हा पालवी फूटताना फुलं येतात.त्यातून मग पानं येतात. नंतर ज्यावेळी फळं यायची वेळ येते तेव्हा पून्हा झाडाला फुलं येतात.त्यातून मग फळं जन्म घेतात.चक्क उन पडत असल्याने उन्हात बसायला बरं वाटतं हे खरं असलं तरी उन भासत नाही कारण बाहेरचं तापमान थंडी वाटेल एव्हडं असतं.जरा ढग येऊन सावली आली की एकदम कुडकुडायला होतं.निदान आमच्या ह्या वयावर असं वाटतं.
वसंत ऋतूचा पहिला दिवस असल्याने प्रो.देसायाना फोन करून विचारलं की ते आज तळ्यावर येणार का?.भाऊसाहेब हो म्हणालेच आणि वर म्हणाले येताना प्रि.वैद्यांना पण घेऊन येतो.
प्रोफेसरांच्या मनात आज काही तरी नवीन चर्चा करण्याचा विचार दिसतो अशी माझ्या मनात कल्पना आली.आणि ती खरी ठरली.

संध्याकाळी तळ्यावर उन चांगलंच पडलं होतं.मी बराच लवकर येऊन बसलो होतो.येताना चिं.त्र्य.खानोलकरांची कोंडुरा कादंबरी वाचायला म्हणून घेतली होती.पर्शरामतात्यांचं त्यांच्या मनाविरूद्ध तात्यामहाराज म्हणून परिवर्तन कसं होतं आणि लोकच त्याला कसे कारणीभूत असतात हे वर्णन वाचत होतो.प्रो.आणि प्रि. केव्हा आले ते कळलंच नाही.

“कोकणातले संस्कार माणसाना कसं बनवून तयार करतात ह्याचं खानोलकरानी सुंदर विश्लेषण केलं आहे.मी ही कादंबरी वाचली आहे”
असं पुस्तकाचं नाव वाचून भाऊसाहेब म्हणाले.आपल्यावर आपल्या आईचे आणि आजोबांचे संस्कार कसे झाले हे सांगावं असं त्यांच्या मनात आलं असावं.

प्रो.देसाई मला म्हणाले,
“माझ्या आईचा आणि आजोबांचा दुसर्‍याला मदत करण्याबाबत गहन दृढ विश्वास असायचा.अगदी साध्या पद्धतिने, राहून, विचारपूर्वक राहून,उदार राहून आणि नाम रहित राहून मदत करायची त्यांची पद्धत असायची. आणि हे करीत असताना मनात ते प्रामाणिक श्रद्धा बाळगून असायचे.मी फार क्वचीत माझ्या आईकडून कुणाची अवहेलना झालेली पाहिली आहे. कुणाच्याही संपर्कात आल्यावर त्याच्या अंगचे उत्तमोत्तम गुण ती पाहायची. शेवट पर्यंत ती परिपूर्ण जीवन जगली.चूपचाप भविष्याकडे नजर ठेवून कोणत्याही बदलावासाठी तीचं दार नेहमी ती उघडं ठेवायची.”
हे सांगून झाल्यावर भाऊसाहेबानी प्रि.वैद्यांकडे वळून त्यांना त्यांचं मत विचारलं.

प्रि.वैद्य प्रो.देसायाना म्हणा्ले,
“जीवनातल्या सूत्रांचं विश्लेषण करून ते शब्दात उतरायला जरा कठीणच असतं.ही सुत्रं इतकी आपल्या मनात खोलवर असतात की त्यावर आपली कृती आपण आपोआपच करत असतो.ज्यावेळी मी ह्या कृतींचा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्याची उत्पत्ति काही माझ्याकडून होत नाही.मी जे काय ऐकलंय आणि मी जे काय स्वप्नात पाहातोय त्यातून ही उत्पत्ति होत असते.माझी कृती दुसर्‍यांच्या कृतीवर अवलंबलेली असते. मिळत असलेल्या उदाहरणावरून त्या कृतींचं आयोजन होत असतं.”

हे ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
“मी ह्याच तत्वावर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वागायचं ठरवलं. त्याचा फायदा मला एव्हडा झाला की लोकांकडून मला माझ्यात विश्वास निर्माण करायला मिळाला.कुणाचीही प्रशंसा केल्याने सुखाला आणि यशाला मार्ग खूला होतो हे मला माहित झालं.
व्यक्तिपेक्षा आयुष्य खूपच मोठं असतं.असं असलं तरी जसा मी मोठा होत गेलो तसं माझ्या लक्षात आलं की आपलं त्यामधलं योगदान बरंच कमी असतं.आणि त्यामुळे आपल्यातल्या थोडक्यांचंच नाव इतिहासाच्या पानावर फडकत असतं.”

मी काहीतरी म्हणावं असं भाऊसाहेबांच्या चेहर्‍यावरून दिसलं.ते तसं म्हणण्यापूर्वीच मी त्यांना म्हणालो,
“पण तुम्ही तुमचं काम निष्टेने करीत राहिला,ज्यात विश्वास ठेवत होता त्यासाठी ते केलं,तुम्ही ते काम स्वार्थी न राहाता केलं,जर तुमच्यातलं कसब तुम्ही तुमच्यासाठी न वापरता दुसर्‍या कशासाठी वापरलं,तर मग तुम्हाला त्यात नाम रहित अमरत्व मिळेल अशी माझी धारणा आहे.तुमचा चांगूलपणाचा अंश ह्या जगात तुमच्या पश्चात जो राहिल तो राहिल.पण ह्यात काही नवीन असं काही नाही, अपवादात्मक असं काही नाही.परंतु ते तुमच्या विचारसरणीचं वैशिष्ट्य ठरेल एव्हडं नक्की.”

मला प्रो.देसाई म्हणाले,
“माझी स्वप्न साकार करताना मला अपयश येणार हे मला माहित होतं. तरीपण मी प्रयत्नात राहिलो. आज जे काय जगात चालंय,जे काही तणाव आहेत, कुट विवाद आहेत ते मला दुःखी करतात. प्रजातंत्रावर माझा भरवंसा आहे. राजकारणी संप्रदाया्चं प्रजातंत्र मी म्हणत नाही.मी म्हणतो ती प्रजासत्ता ज्यात मुळ कल्पना असते की कुणीही कुणापेक्षा श्रेष्ट वा कनिष्ट नसतो.ह्या जगात जो जन्माला येतो तो स्वतः स्वताचं निवारण करायला येतो. प्रत्येकाला हवी ती संधी मिळायला हवी.मेहनत करून किंवा योगायोगाने काही प्राप्त करू शकला तर ते शक्य झालं पाहिजे.आणि त्याचं प्रतिक म्हणून त्याला इतरांसाठी त्याच्यावर आलेला कर्तव्याचा भार जास्त वाढला आहे हे कळलं पाहिजे.”

मी म्हणालो,
“द्वेष,पक्षपात,विरोध ह्यांची उत्पति वेगळ्या उद्धिष्टाने पाहिल्यावर होते. हे पाहिल्यावर मला याचा अचंबा वाटायला लागतो. नवीन आणि अपरिचीत बाबींकडे प्रत्येकाने मन उघडं ठेवून राहायला पाहिजे. कारण त्यात बदलाव असतो.आणि जीवन म्हणजेच बदलाव आहे ह्यात काहीही वाद असू नये.”

प्रि.वैद्य म्हणाले,
“शक्यतो आपले आदर्श वरच्या पातळीवरचे असावेत.ज्यात विशेषता असते आणि व्यवस्था पण असते.म्हणून जीवनात ह्यापेक्षा चांगली गोष्ट होणार नाही असं कधीच म्हणता येणार नाही.जर का आपल्याला पूर्ण विश्वास असेल,आपल्यात कौशल्य असेल,दृढ निश्चय असेल तर आपण हजारोना आनंदी करू शकू.मनुष्याच्या ज्ञानात भर टाकू शकू.ह्या सर्व गोष्टी आश्चर्य वाटावं अशा तर्‍हेने आपल्या जीवनाला मार्गदर्शक ठरतात.निक्षून सांगायचं झाल्यास ह्यात काही नवीन असं काही नाही.एकच हा एक सकारात्मकपणे विश्वासलेला विचार आहे.”

हे ऐकून झाल्यावर दोन मिनटं कुणीच काही बोलेना.माझ्या लक्षात आलं,हळू हळू उन्हं कमी व्हायला लागली.अंगावर सावली पडल्यावर थंडी वाजायला लागली.विषय इकडेच थांबवलेला बरा असं माझ्या मनात आलं.सर्वांनीच ते कबूल केलं आणि आम्ही घरी जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, March 11, 2010

माधव आणि त्याचे आजोबा.

“मी टॉर्चचा उपयोग करतोच शिवाय शब्दकोशही जवळ ठेवतो. काही शब्द असे पाहिलेत “कर्जफेड”, “अमुच्या गावा”, “आई” “ईश्वर”.

नातवंडांचं आजोबावर प्रेम असणं स्वाभावीक आहे.ती एक नैसर्गीक प्रक्रिया आहे असं म्हटलं तरी अतीशयोक्ती होऊ नये. काहींना आजोबा आपले लाड करतात म्हणून ते आवडता.काहींना आईबाबा रागवल्यानंतर आजोबा आपल्याला जवळ घेऊन आपली बाजू सावरतात म्हणून आवडतात.काहींना आपले आजोबा अनुभवाच्या गोष्टी सांगून समजावतात म्हणून आवडतात. अशी अनेक उदाहरणं देता येतील.पण माधवला आपले आजोबा आवडतात ह्याचं कारण मला जरा जगावेगळं वाटलं.हे कारण कदाचीत जगावेगळं नसावं,मला वाटतं,माधवची अवलोकन करण्याची वृत्ती जरा जगावेगळी वाटली.

त्याचं असं झालं,माधव माझ्या नातवाबरोबर अभ्यास करायला म्हणून आमच्या घरी आला होता.जर्न्यालिझमची दोघानाही आवड आहे.कधी कधी चर्चा करण्यासाठी दोघे एकमेकाला भेटत असतात. माझा नातू त्याच्या आईबरोबर डॉक्टरकडे गेला होता.तो येईपर्यंत मी माधवला बसायला सांगीतलं होतं.

मी त्याच्या आजोबांच्या प्रकृतीविषयी त्याचेकडे पृच्छा केली.ते सांगायला त्याने जी सुरवात केली ती ऐकूनच मी त्याचं अवलोकन बघून थक्क झालो.
माधवने सुरवातच अशी केली.तो मला म्हणाला,
“गेल्या एकदोन वर्षापासून माझ्या आजोबाना हळू हळू अंधत्व येऊ लागलंय असं वाटतंय.माझे आजोबा कॉलेजात प्रोफेसर होते. लिहिणं आणि वाचणं ह्या दोन गोष्टीवर त्यांचं प्रचंड प्रेम आहे.
इच्छा शक्तिवर माझा विश्वास आहे.पण इच्छाशक्तिची वर्णनं पेपरमधे येतात त्या इच्छाशक्तिबद्दल मी म्हणत नाही.जसं माऊट एव्हरेस्टवर चढून जाण्याचं किंवा गेटवे ऑफ इंडीयाकडून एलिफंटाकडे पोहून जाण्य़ाचं अशा प्रकारच्या इच्छाशक्तिचं मी म्हणत नाही.मी म्हणतो ती इच्छाशक्ति जी जीवनात आलेल्या कसोट्यांना,बेअदबीना सामोरी जाऊन पुढे “आगे बढो” असं म्हणते त्या इच्छाशक्तिबद्दल मी म्हणतोय.”

हे ऐकून माझी खात्री झाली की माधवच्या आजोबांच्या प्रकृती विषयीच्या माझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून माधव नक्कीच काहीतरी त्याच्या आजोबाच्या गंभीर आजाराविषयी सांगण्याच्या प्रयत्नात असणार.
म्हणून मी त्याला म्हणालो,
“वृद्धत्व आल्यावर प्रकृतीच्या संबंधाने काही ना काही कटकटी येतच रहातात.म्हणून कुणीतरी म्हटलंय,
“जन्मापासून मरण येई पर्यंत जीवनात ज्या अवस्था येत असतात. त्यात सर्वांत उत्तम अवस्था म्हणजे म्हातारपण.”

एव्हडं अर्धवट बोलून मी माधवकडे कुतूहलाने बघून त्याची काय उस्फुर्त प्रतीक्रिया येते ते पहात होतो.मला माधव म्हणाला,
“मात्र भरपूर पैसा आणि उत्तम प्रकृती असली तरच.”
माझ्या मनातलं बोललास असं सांगून मी पुढे म्हणालो,
“इतर कुठल्याही जीवनातल्या अवस्थेत,
“गप रे ! तुला त्याचा अनुभव नाही,त्यासाठी वर्ष काढावी लागतात.” असं म्हटलेल्ं ऐकून घेण्याची पाळी येत असते पण आजोबांच्या वयावर तसं त्य़ांना कोण म्हणू शकेल का? हे एक उदाहरण दिलं.पण एकुण सर्व बाबतीत ह्या उतार वयात इतर वयाच्या तुलनेत ह्या वयाचा आदर ठेवला जातो. निदान आपल्या संस्कृतीत तरी.म्हणून मी तसं म्हणालो.”

माधव म्हणाला,
“माझ्या आजोबांकडे भरपूर पैसा नसला तरी आता पर्यंत त्यांची प्रकृती उत्तम होती.म्हणून ते मजेत दिवस काढीत होते. अलीकडे त्यांनाच त्यांच्या प्रकृतीतला फरक दिसायला लागला आहे असं वाटतं.अलीकडे माझे आजोबा भिंग घेऊन वाचायचा प्रयत्न करतात. अलीकडे त्यांचं ऐकणं पण जरा कमी झालं आहे त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करणं जरा जिकीरीचंच झालं आहे. त्यामुळे ते भारीच वैतागत असतात.इतकी वर्ष वापरात असलेली त्यांची दृष्टी आता एक वाक्य वाचू शकत नाही. माझ्यात आणि माझ्या धाकट्या भावात त्यांना फरक दिसत नाही.मला कळतं की ते काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. ते कुढत बसलेले दिसतात.निराश झालेलेही दिसतात. माझी आई तीला जमेल तेव्हडं त्यांच्याबरोबर जवळ बसून त्यांच्यासाठी वाचन करीत असते तरीही त्यांची तक्रार असतेच. सर्व ध्यानात रहावं म्हणून ते प्रयत्नात असतात.लिहिण्या-वाचण्याचा तो समय भरून काढण्याच्या प्रयत्नात माझे आजोबा असतात.अंधत्वाची चाहूल त्यांना लागली असली तरी ते वाचण्याच्या प्रयत्नात असतात. जेवणाच्या टेबलावर बसून मोठ्या पेनाने मोठ्या अक्षरात ते कागदावर लिहित असतात.”

मी म्हणालो,
“तुझ्या आजोबांनी तरूण वयात पुस्तकं लिहिलीली आहेत.काही त्यांची पूस्तकं टेक्स्ट बूक म्हणून शाळेत लावलेली मला आठवतात.”

“त्यांना पुस्तक लिहायला खूपच दिलचस्पी असायची.शाळेला लागणारी पुस्तकं ते जेवण्याच्या टेबलावर बसून लिहायचे. आजुबाजूला कितीही गडबड असली तरी त्यांची नजर लिहित्या पानावर केंद्रीत असायची.एखादं वास्तव त्यांच्या सापळ्यात सापडल्यावर ते तसंच वहीत लिहिलं जायचं. इंग्रज भारतात क्रिकेट खेळायला येत होते तिथपासूनचं रेकॉर्ड त्यांच्या पिवळ्या वहित लिहिलेलं असायचं.”
माधवने त्याच्या लहानपणी जे काही त्याच्या आजोबांचं अवलोकन केलं होतं ते तो मला अगदी आनंदाने सांगत होता.

मी म्हणालो,
“मग अलीकडे कसा वेळ घालवतात?”

“अलीकडे ते मित्रांना निरनीराळ्या विषयावर पत्रं लिहायचे.शिवाय दिवाळी,नववर्ष,आणखी कुणाच्या वाढदिवसाला शुभेच्छा पत्र लिहायची माझ्या आजोबाना पूर्वी पासून लय हौस असायची.”
माधव सांगू लागला आणि पुढे म्हणाला,
“माझे आजोबा काहीही वाचायला नेहमीच तयार असतात.चुकून कुणी एखादं पुस्तक वाचता वाचता खाली ठेवलं की ते हरवलं म्हणून समजा. कल्पितकथेचं,किंवा सत्यकथेचं पुस्तक असो,एखादी कादंबरी असो,मासिक असो त्यांच्यासाठी त्यांना सर्वच सारखं असतं.कुणी त्यांना जर का दोन तीन पुस्तकं दसर्‍यादिवशी वाचायला दिली तर दिवाळी येण्यापूर्वी त्यांनी ती वाचून फस्त केली म्हणून समजा.”

“अरेरे,म्हणजे ज्याची जरूरी आहे ते डोळेच अधू झाल्यावर त्यांची खूपच पंचाईत होत असेल.”
मी म्हणालो.
“तेच तर मला दुःख होतं.पण त्यांनी त्यांची जीद्द सोडलेली नाही. लिहिण्याबद्दलची त्यांची इच्छाशक्ति जब्बर आहे.”
असं सांगून माधव वाईट वाटल्यासारखा चेहरा करून म्हणाला,
“पूर्वी सारखंच अजून स्वतःचं लक्ष केंद्रीत करून ते लिहिण्याच्या प्रयत्नात असतात. पण ते ठळक अक्षर वाचायला त्यांना तेव्हडं सोपं जात नाही. त्यांनी लिहिलेल्या वाक्यांचा शेवट काळ्या ठिपक्यात होतो.किंवा शब्द रेषेच्या वर खाली लिहिले जातात.कधी कधी त्यांच्याकडून कागदाच्या बाहेर जाऊन जेवणाच्या टेबलावर लिहिलं जातं.पण आजोबा लिहितच असतात.कारण लिहिण्याचं सोडलं तर सर्वच सोडून दिल्यासारखं होईल असं त्यांना वाटतं.”

“किती रे,प्रेम करतोस तुझ्या आजोबावर.एव्हडं लक्ष देऊन तू त्यांची लिहिण्यासाठीची धडपड पहात असतोस.”
मला राहवंलं नाही म्हणून मी माधवला असं म्हणालो.

मला म्हणाला,
“तुम्हाला माझ्या आजोबांची आणखी गंमत सांगतो.
त्यांचं हस्तलिखीत आटोपशीर जरी असलं तर ती टेबलावरची अक्षरं सहजा सहजी वाचता येत नाहीत.त्यांचं ताजं ताजं लिहून झाल्यावर किंवा त्या अगोदर कधीतरी त्यांनी जेवणाच्या टेबलावर बसून लिहिल्यावर टेबलावर चुकून लिहिल्या गेलेल्या त्या शब्दांचा किंवा अक्षरांचा अर्थ मी काढण्याच्या प्रयत्नात असतो.अशावेळी मी टॉर्चचा उपयोग करतोच शिवाय शब्दकोशही जवळ ठेवतो.
काही शब्द असे पाहिलेत “कर्जफेड”, “अमुच्या गावा”, “आई” “ईश्वर”.
मी त्या शब्दांचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न करतो.पण ह्या वयावर त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे याचा थांगपत्ता लागत नाही.”

मला माधवची खूपच किंव आली.त्याला त्या शब्दातून अर्थ काढता येत नव्हता असं नाही.कारण त्याचे पाणावलेले डोळे मला अर्थ सांगत होते.मी त्याला जवळ घेत एव्हडंच म्हणालो,
“धन्य तू आणि तुझे आजोबा”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, March 8, 2010

सुरेखाचं दुसरं लग्न.

” प्रेमासारख्या गोष्टीवर मी जर भरवंसा ठेवला आणि भीतीविरहीत निर्णय मी घेत गेले तरच नव्या परिस्थितिचा मला स्वीकार करता येईल असं त्यावेळी वाटत होतं.”

“एखाद्या झाडाला निरोगी फळं लागतात पण एखाद दुसरं फळ किडकं पण असूं शकतं.माझं अगदी तसंच झालंय.माझा मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ सशक्त आणि निरोगी आहेत.माझ्या बाबतीत जन्मतःच माझ्या शरिराला आवश्यक होतं त्याच्या पेक्षा माझं हृदय लहान होतं.असं डॉक्टरानी माझ्या आईबाबाना सांगीतलं होतं.त्यामुळे मी जितकी वर्षं जगेन तेच माझं आयुष्य ठरेल असं भाकित केलं होतं.”
असं अरविंद चिटणीस मला त्यावेळी म्हणाल्याचं आठवतं.

आम्ही एकाच वर्गात होतो.अरविंद माटूंग्याहून आमच्या शाळेत यायचा.पहिल्यापासून त्याचं बोलणं अगदी क्षीण आवाजात असायचं.प्रकृतीने अगदी “पाप्याचं पित्तर” होता.पण स्वभावाने खूपच प्रेमळ होता.चेहरापण खूप मोहक होता. अभ्यासात अवि हुशार होता.त्याचं अक्षर अतीशय सूंदर असायचं.
पुढे खूप शिकायचं असं त्याला नेहमी वाटायचं.त्याच्या वडलांचं दादरला फर्निचरचं दुकान होतं.अरविंदच्या घरी मी कधी गेलो की त्याची आई अरविंदबद्दल काळजीत असायची हे माझ्या लक्षात नेहमीच यायचं.तीच्या तीन मुलात हा एक असा प्रकृतीने अधू असल्याने ती त्याच्यावर जास्त प्रेम करायची.ते मला दिसून यायचं. आणि कुणाच्याही आईला असं वाटणं स्वाभावीक आहे.ती मला म्हणायची,
“शिकतोय तेव्हडा शिकू देत.त्याच्यासाठी त्याच्या वडलानी भरपूर तजवीज करून ठेवली आहे.आमच्या पश्चात त्याचं कसं होणार देव जाणे?.”
“आई माझी उगाचंच काळजी करीत असते.जे विधीलिखीत आहे ते होणारच.”
असं अवि मला म्हणायचा.

करता करता अरविंद बी.ए पास झाला.आणि वडलांच्या फर्निचरच्या दुकानात त्यांना मदत करायला जायाला लागला. काही दिवसानंतर त्याची आई त्याच्या मागे लागायला लागली की त्यांने लग्न करावं.मला एकदा म्हणाला,
“आईला समजत कसं नाही.माझ्याशी लग्न करून त्या मुलीचं भविष्यात नुकसान नाही का होणार?आणि माझ्या अश्या ह्या प्रकृतीला मला कुठची मुलगी पसंत करणार?”
मला आठवतं मी त्याला म्हणायचो,
“असं बघ,ती आई असल्याने तुला तसं सांगते.तीला वाटत असेल की तीच्या पश्चात तुला पहायला कुणीतरी असावं.आणि तुच म्हणतोस ना विधीलिखीत आहे ते होणार.असेल एखादी मुलगी माळ घेऊन.”

आणि खरंच सुरेखा सुळे माळ घेऊन उभी होती.दोघांचा सुखाचा संसार चालला होता.अरविंदला एक मुलगा पण झाला. अविच्या आईला खूप आनंद व्ह्यायचा.ती सुरेखावर पण खूप प्रेम करायची.तीला तीन मुलगे होते.मुलगी नव्हती.त्यामुळे ती सुरेखाला आपल्या मुली सारखीच पहायची.आपल्या पश्चात अविला पाहायला आपल्या सारखीच कुणी तरी आहे हे पाहून तीला समाधान होत असावं.
लग्न होऊन दोन वर्षानंतर अरविंदची प्रकृती ढासळायला लागली. थोडसं काम केल्यावर त्याला थकवा येऊ लागला. आवाज खूपच क्षीण होत गेला. नंतर नंतर तो फर्निचरच्या दुकानात जायचा बंद झाला.पूर्वी बरेच वेळा मी त्याला त्या दुकानात भेटत असायचो.

एकदा मी अरविंदला पाहायला त्याच्या घरी गेलो होतो.त्याची प्रकृती पाहून त्याचं काही खरं नाही असं मला वाटायला लागलं होतं. बिचार्‍या सुरेखाकडे बघून मला दाटून आलं होतं.अविची आई एकाएकी खूप वयस्कर झालेली मला दिसली.
आणि शेवटी,
“जे घडू नये तेच घडलं”
अरविंद सर्वाना सोडून गेला.अगदी लहान वयात सुरेखावर मोठी जबाबदारी आली.पदरात लहान मुलगा.त्याचं पूरं संगोपन व्हायचं होतं.काही दिवस निघून गेल्यावर सुरेखाची सासू तीच्या मागे लागली,
“तू दुसरं लग्न कर.तुला पूरं आयुष्य काढायचं आहे.”

अरविंद गेल्यानंतर मी चिटणीसांच्या घरी वरचेवर जायचो.एकदा सुरेखाबद्दलचा विचार अविच्या आईने माझ्या जवळही काढला होता. सुरेखाला दिलेला अविच्या आईचा सल्ला मलाही बरोबर वाटत होता.
मी जरी सुरेखाला सरळ सरळ काही सांगू शकलो नाही तरी मी माझ्या मनात प्रार्थना करायचो की देवा तीला तशी बुद्धि दे.

नंतर बरीच वर्ष माझा आणि चिटणीसांचा प्रत्यक्ष संपर्क राहिला नाही.पण त्यांच्या विषयी कुणा ना कुणाकडून माहिती कळायची.
सुरेखाने दुसरं लग्न केलं,अविचे आई आणि वडील जगात राहिले नाहीत.त्यांचं फर्निचरचं दुकान त्यांनी विकलं होतं वगैरे वगैरे.
आज मी माटूंग्याला आलो होतो.चिटणीसांच्या घरी जायला वेळ होता म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो.मला सुरेखाने ओळखलं.सुरेखाचा मुलगा आता चांगलाच मोठा झाला होता.तो घरी नव्हता.पण सुरेखा म्हणाली तो अगदी अरविंद सारखाच दिसतो.
मी सुरखेकाकडून सर्व काही ऐकायला उत्सुक्त झालो होतो.मला म्हणाली,
“तरूण आणि एकट्याच आई बरोबर एक मुल एव्हडी जबाबदारी घेऊन नुसतंच मुलाचं संगोपन करायला मला धडपड करावी लागली नाही तर त्यापुढे जाऊन ज्या कुटूंबावर माझी श्रद्धा होती,ज्या मनोरथावर भविष्य पहात होते तेच कुटूंब डोळ्यासमोर कोसळत आहे हे पाहून माझी जगण्याची धडपड मी करीत राहिले.
ती घटना होऊन बरीच वर्ष संपली.आणि आमच्या धडपडीमुळे नवं जीवन निर्माण करता आलं. त्या गेलेल्या दिवसातून मी एक शिकले उत्तमोत्तम निवडी प्रेमातून केल्या जातात आणि असं करताना आड येत ती गोष्ट म्हणजे भयभिती.”

कुतूहल म्हणून मी सुरेखाला विचारलं,
“तुला कशाची भीती वाटायची?”
मला म्हणाली,
“मला भिती वाटायची की मी पुरी पडेन का,आमच्या जवळ हवं ते पर्याप्त असेल का,आमच्या नशीबात असलेला आमचा हिस्सा मिळेल का,येऊ घातलेल्या संकटाना आणि व्याधीना मी पूरी पडेन का.जास्त करून मला भिती वाटायची की माझ्या मुलाला वाईट संगत लागेल का.मी माझ्या मुलाला मर्मभेदी दुःखापासून संरक्षण करू शकले नाही.मुळात अशा तर्‍हेचं संरक्षण असू शकतं हा एक भ्रम आहे म्हणा. श्रीगणेशा पासून पुन्हा कुटूंबाची सुरवात करणं हे मला त्यावेळी जिकीरीचं काम होतं.”

मी म्हणालो,
“नुकसान झाल्यावर पुनर्बांधणी करायला खूप जिकीरीचं जातं.”
मला सुरेखा म्हणाली,
“जरी मनावर जबरदस्त ताण येण्यासारखं काही नसलं,जीवन वाचवण्यासाठी केलेली नाटकी दृश्य नसली,एखादी गोष्ट तात्काल होण्याची घाई नसली तरी ते एक निरस काम होतं,त्यात संगतता होती.ज्यामुळे रोज सकाळी उठल्यावर जिकीरीचं काम करण्याची आठवण करून दिली जायची.आणि हे सर्व करीत असताना जे पूर्वी उपभोगलं ते आता हरवल्याचं स्मरण दिलं जायचं.”

हे ऐकून सुरेखाची मला किंव आली.मला माझ्या मनात जे आलं ते सांगावंसं वाटलं.मी म्हणालो,
“मला वाटतं पुनःप्रस्थापीत न झाल्याने जे हरवलं ते साचपत रहाण्याचा प्रयत्न केल्या सारखं होत असतं.जे करायला हवं त्यापासून पलायन करण्याचा प्रयत्न झाल्यास ज्या गोष्टीपासून आपण भय बाळगून रहातो त्याच संकटाच्या जवळ आल्यासारखं होतं.हे माहित असून भयाचा कुणाला समुळ नाश करता येणार नाही,किंवा त्यातून मार्ग काढता येणार नाही ही गोष्ट अलायदा म्हणा.त्याला सामोरं जाणंच उचित असतं.असतील तेव्हडे भयभीतीचे प्रकार समोर आणून त्यांच्याशी दोन हात करायला हवेत.तू केलंस ते अगदी बरोबर केलंस.”

सुरेखाला माझं ऐकून खूप बरं वाटल्याचं तीच्या चेहर्‍यावरून मला दिसलं.मला म्हणाली,
“तुमच्याकडून असं ऐकून मला खूपच धीर आल्यासारखं वाटतं.कारण माझं काहीच चुकलं नाही ह्याला दुजोरा मिळतो.
कोसळलेल्या परिस्थितितल्या कुटूंबाचा शेवट केवळ आशा बाळगून आणि चांगले सल्ले मिळवून पुर्णत्वाला येत नाही. तरी पण त्यावेळी मला आशा होती आणि माझ्या जवळ योजना पण होती.प्रेमासारख्या गोष्टीवर मी जर भरवंसा ठेवला आणि भीतीविरहीत निर्णय मी घेत गेले तरच नव्या परिस्थितिचा मला स्वीकार करता येईल असं त्यावेळी वाटत होतं.
कारण अंशतः ते काम आमच्या जून्या जीवनशैलीच्या सुक्ष्मपरिक्षणाखाली होणार होतं.त्या जून्या दिवसातल्या मौजमजेच्या आठवणी आता फक्त आठवणीच राहाणार होत्या.प्रत्येक निर्णय परिस्थितीचा विचार करून घ्यावा लागणार होता.माझं कुटूंब आता परस्पर विरोधी निष्टेच्या जाळ्यात अडकलं होतं.जणू आताचं जीवन स्वीकारल्यास पुर्वीचं जीवन भ्रष्ट होणार होतं.जणू नवीन कुटूंब स्वीकारून जो काही आनंद चेहर्‍यावर दिसेल तोही छिनला गेला जाणार होता.असंच कधी कधी वाटायचं.”

बराच वेळ झाला होता.माझी माटूंग्याची खेप काही दुसर्‍याच कामासाठी होती.पण सुरेखाला भेटून मला खूप बरं वाटलं. जुन्या आठवणीना उजाळा आला.उठता उठता मी तीला म्हणालो,
“तुझ्या मुलाला पहायला मी पुन्हा कधीतरी येईन.तो अरविंदसारखा दिसतो हे तू सांगीतल्याने मला त्याला पहायची उत्कंटा वाढली आहे.पण जाता जाता मला तुला एक सांगावंसं वाटतं की कुटूंब आणि प्रेम एकमेकाला पूरक असतात पण तसं असलं तरी बंधन मुक्त असतात.तसंच ते भावार्थाने पाहिल्यास क्रियाशील आणि उदार असतात. माझी खात्री आहे की भयभीती नव्हे तर प्रेमच आपल्याला सहनशीलता प्राप्त करून देतं आणि मर्मभेदी दुःखातून सावरतं.”

बेल वाजल्याने मला उठायलाच लागलं.पण सुरेखाने दरवाजा उघडल्यावर दर्शन झालं ते अरविंदच्या मुलाचं-किशोरचं.
अरविंदची आठवण येऊन माझ्या डोळ्यात पाणी आलं.किशोर ने मला वाकून नमस्कार केला.मी त्याला अलिंगन दिलं. पुन्हा लवकरच भेटू म्हणून सांगून रुमालाने डोळे पुसत मी खाली उतरलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, March 6, 2010

अबोल राहूनी काय साधीशी

अनुवादीत. (वो चूप रहे तो मेरे दिलके दाग जलते है……..)

होशी तू अबोल तेव्हा
अंतरंग माझे जळते
होशी तू बोलती तेव्हा
विझती वात जळते

सांग जळून वा विझून जावे
का असेच ह्या मार्गी चालावे
विझावे जसे अंतरंग विझते
का
जळावे जशी वात जळते

तुझी दूर झुकलेली नजर फेक
वळेलना एकदा तरी माझ्या वरी
दूर तीथे दिसेल तुला वणवा पेटताना
इथे दिसेल प्रीतिचा बगिचा धुमसताना

ऐकीन थोडे तुझ्याकडूनी
का
ऐकशील थोडे माझ्याकडूनी
अबोल राहूनी काय साधीशी
का
प्रमाथ करीशी माझ्या वरती

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, March 4, 2010

सुरेश कामताची प्रवृत्ति.

“जीवनात आपल्याला सुख मिळायला सर्वात मोठा वाटा आपल्या प्रवृत्तिचा असतो. आलेल्या परिस्थितिचा नसतो.”

ह्यावेळी सुरेश कामतची आणि माझी गोव्याच्या एका होटेलमधे पुन्हा एकदा भेट झाली.ह्यावेळी आम्ही दोघे भेटलो तेव्हा पण गोव्यात पावसाचे दिवस होते.मला पहिल्यापासून कोकणातल्या पावसाळातल्या दिवसात कोकणात वेळ घालवायला खूप आवडतं.सुरेशचं पण तसंच आहे.तो पूर्वीपासून पावसाळयाच्या दिवसात गोव्याला पंधराएक दिवसाच्या सुट्टीवर येतो. त्याला गोव्याची काजूपासून केलेली फेणी फार आवडते.रशीयन लोकाना व्होडका आवडते तशीच गोव्याच्या लोकांना फेणी आवडते. गोव्याच्या बिचच्या जवळ एखाद्या होटेलात समुद्र दिसेल अशी रूम घेऊन तासन तास खिडकीत बसून फेणीची चव घेत तो दिवस घालवतो.समुद्रात अशा दिवसात तुफानाचं वातावरण असतं.कधी हवा आणि पावसाच्या पाण्याचा एव्हडा कहर होतो की खिडकीतून समुद्राकडे पाहिल्यावर समुद्र दिसतच नाही.

अशावेळेला काही कोळी एकट्याला झेपेल असं जाळं आणून किनार्‍यावर पाण्यात ते जाळं पसरून लाटेच्या प्रवाहाच्या जोराबरोबर एकटा दुकटा मोठा मासा वाहून आल्यास जाळ्यांत पकडण्याच्या अपेक्षेत असतो.आणि अशा प्रकारच्या बिचवरच्या वातावरणात बिनदास मजा पाहायला येणार्‍यांची
“जाळ्यात काय गावलं काय? “
हे पहाण्यासाठी कुतूहलता शिगेला पोहचलेली असते.आणि माझ्यासारखा एखादा लागेल ती किंमत देऊन तो मासा विकत घेण्याच्या मनस्थितित असतो.एव्हड्या ताज्या माशाची तीख्खट आमटी किंवा आंबट-तीख्खट तीखलं “दोम्पारच्या जेवणात” मिळाल्यास काय विचारता? आणि सुरेश कामाता सारख्या मुळ गोव्यातल्या माणसाला ह्या जेवणा बरोबर फेणीची संगत “लय भारी” वाटली तर नवल कसलं?

ह्यावेळेला सुरेश एकटाच आला होता.त्याच्या पत्नीबरोबर तो बरेच वेळा आलेला आहे.कधी कधी त्याचा मोठा मुलगा त्याला कंपनी देतो.सुरेशचे मुंबईत दोन पेट्रोल पंप आहेत.पावसाळ्यात मुंबईत पेट्रोलचा खप जरा कमीच असतो.त्यामुळे पंधरा दिवस गोव्यात घालवायला त्याला उसंत मिळते असं मला त्याने पूर्वी सांगीतलं होतं.त्यामुळे सुरेशची भेट मला अपेक्षीत होती.होटेलच्या रजीस्टरमधे माझ्या नावासमोर सही करताना मी सुरेश कामत हे नाव वाचलं.होटेलच्या काऊंटरवरच मी एक फेणीची बाटली विकत घेतली.मी सुरेशला भेटल्याबरोबर ती फेणीची बाटली त्याच्या हातात प्रेझेंट म्हणून दिली.

“आज एक दिवस तू माझ्या खोलीत बस.आपण गप्पा मारूया.मला माहित आहे तू काही “घुटूं” घेत नाहीस.पण तुला जुन्या गोष्टी काढून तासनतास गप्पा मारायला आवडतात.आज पाऊस खूपच पडत आहे.नाहीतरी तू बिचवर फिरायला जाऊ शकणार नाहीस.”
असं म्हणून सुरेशने माझ्यासाठी वेलची घातलेली पाणीकम दुधाची कॉफी आर्डर केली.
“तुला त्या दुधाऐवजी कडक काळ्या स्ट्रॉन्ग कॉफीत दिलचस्पी नाही हे मला ठाऊक आहे.”
असं वर मला म्हणाला.
“कळलं,कळलं हे तू बोलत नाहीस फेणी बोलतेय.”
असं माझ्याकडून बोलून झाल्यावर आम्ही दोघे मनमुराद हंसलो.

फार पूर्वी एकदा सुरेश आणि त्याचा मुलगा असाच गोव्याला पावसाच्या दिवसात गेला होता.आणि गोव्याहून परत आल्यावर पेट्रोलपंपावर ठेवलेल्या त्याच्या गाडीची मागची काच आणि दरवाजाच्या काचा फुटलेल्या अशा स्थितित मी त्याची गाडी पाहिली होती.त्या ट्रिपमधे काहीतरी हातसा झाला होता.त्याची आठवण येऊन मी त्याला म्हणालो,
“आठवतं का तुला तो आंबाघाटातला प्रसंग.ते पावसाचे दिवस,आणि तुझी झालेली चोरी”

“एरव्ही आठवलं नसतं पण तू याद दिल्याने आणि आता पडतोय तो पाऊस बघून त्या प्रसंगाची आठवण यायला वेळ लागणार नाही.”
असं म्हणत सुरेश मला म्हणाला,
“मी आणि माझ्या मुलाने भर पावसाळ्यात आमची गाडी काढून मुंबई ते गोवा चार दिवसाचा प्रवास करायच्या आमच्या विक्षिप्त निर्णयानंतर, नशिबाबद्दलचा विषय पहिल्यांदा आमच्या दोघात निघाला.गोव्याला ऐन पावसात पंधराएक दिवस राहून तिकडच्या बिचवरची मजा लुटायची,पावसात मासे पकडायला समुद्रात पडाव जात नसल्याने खाडीतले मासे गुंजूले, सूळे, शेतकं,बुरयाटे असल्या मास्यांवार ताव मारायचा, भर पावसात सावंताच्या हाटलात जाऊन कांद्याची भजी आणि दुध-कम-पाणी असलेला चहा मारायचा,शांतादूर्गा,मंगेशीच्या मंदिरात जाऊन किर्तनात भागघ्यायचा,ह्यासारख्या मजा करायचं ठरवलं होतं.”

हल्ली तरी हवामान खात्याचा अंदाज बराचसा बरोबर येतो.त्या दिवसात हवामान खात्याच्या अंदाज एक असायचा आणि प्रत्यक्ष घडायचं ते अगदी उलटं असायचं.त्या दिवसात शेतकर्‍याचं भाकित खरं ठरायचं.ते कसं? असं विचारल्यावर कोकणातला कुठचाही शेतकरी सांगायचा,
“सोपं आहे,आम्ही हवामान खात्याचा अंदाज ऐकून ते सांगतील त्याच्या विरूद्ध भाकित करायचो.भाताच्या लावणीला प्रारंभ करू नका पाऊस उशीरा पडणार आहे असं हवामान खात्याने फरमान काढल्यावर आम्ही लावणीच्या तयारीला लागायचोच.”

हे सर्व माहित असल्याने, आम्ही दोघांनी हवामान खात्याचा अंदाज,
“दोन चार दिवसात कोकणात आणि गोव्या परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत तेव्हा प्रवास जपून करावा”
असं लिहीलेलं पेपरात वाचून निदान प्रवासात पावसाचा त्रास होणार नाही असा अंदाज केला होता.कारण तो हवामान खात्याचा अंदाज होता ना! मग शेतकर्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे उलटं होणारच.
पण गंमत म्हणजे उलट्याचं उलटं झालं. ह्यावेळी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि ऐन प्रवासात आम्हाला कोकणातल्या पावसाला सामोरं जावं लागलं.
कोल्हापूर सोडल्यानंतर आंबाघाटात जी पावसाला सुरवात झाली ती घाट उतरून गेल्यानंतरही पाऊस थांबेना.पुढे गेल्यावर एका गावाच्या बाहेर गाडी रस्त्यावर ठेऊन काचा वगैरे लाऊन बंद करून एका छोट्याश्या होटेलमधे रात्र काढायची ठरवलं.बाहेरून कुणी संगीतकार मंडळी त्या होटेलात रहायला आली होती.
आणि त्यांचा संगीताचा प्रोग्राम होता.त्यामुळे आमची ती रात्र मजेत गेली.पण दिवस उजाडला तरी पाऊस काही थांबेना. सुट्टीतले दिवस फुकट जाऊ नयेत म्हणून सकाळी उठून आम्ही पुढच्या प्रवासाला निघायचं ठरवलं.
गाडीजवळ येऊन पहातो तर दरवाजाच्या काचा फुटलेल्या दिसल्या.धो,धो पडणार्‍या त्या पावसात जेमतेम छत्रीचा आधार घेत निरीक्षण करताताना लक्षात आलं की आमची कपड्याची सुटकेस चोरीला गेली होती.जरा आणखी विचार केल्यावर आमच्या लक्षात आलं की आम्ही तसे नशीबवान होतो.गाडीत असतानाच जर का चोरट्यांनी गाडी थांबवून आम्हाला लुटायचं ठरवलं असतं तर कदाचीत आमच्या प्राणावर बेतलं असतं.आम्ही आपआपसात विनोद करीत होतो की आमच्या पाचदाहा जुन्या वापरलेल्या कपड्यासाठी चोरानी जेलमधे जाण्याचा धोका पत्करलेला दिसतोय.
अर्थात आमच्या ह्या घटनेत काही तरी उपयोगातल्या वस्तूंची चोरी झाल्याचं उदाहरण होतं.नशीबाबद्दलचा प्रश्न जास्त किचकट होतो जेव्हा जनन-मरणाचा सवाल येतो तेव्हा.”
सुरेशचा हा नशीबाबद्दलचा तर्कवितर्क ऐकून मला माझ्या वहिनीच्या आजाराची आठवण आली,मी सुरेशला म्हणालो,

“मग मी काय म्हणतो ते ऐक,नित्याची गोष्ट म्हणून माझी वहिनी वार्षीक हेल्थ-चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेली होती. ब्लडप्रेशर,वजन,आणि ब्लडशूगरची चांचणी केल्यावर लक्षात आलं की तीचं कलेस्टरॉल वाढलेलं आहे.आणि तीला ऍन्जियोप्लास्टी करावी लागेल.हृदयालाच रक्ताचा पुरवठा करणार्‍या नळ्यांमधे चरबी जमल्याने चोंदलेल्या नळ्यातून रक्तपुढे जायला रुकावट आली होती.ती दूर करण्यासाठी ऍन्जियोप्लास्टी करावी लागते.काही लोकांचं म्हणणं की माझी बहिण तशी नशीबवान समजली पाहिजे.तीचा “तारणारा” तीच्या पाठीशी होता.सर्व साधारणपणे आजारी पडल्याशिवाय लोकं डॉक्टरकडे जात नाहीत असं असताना माझी बहिण वार्षीक हेल्थ-चेक करायच्या फंदात पडली म्हणून ती नशीबवान समजली पाहिजे.
पण माझी बहिण नशीबवान होती असं मानलं तर जेव्हा चरबी तीच्या नळ्यात सांचत होती तेव्हा हा “तारणारा” कुठे गेला होता?.का चोंदलेल्या नळ्या शोधल्या गेल्यामुळे ती नशीबवान होती कारण त्या नळ्या साफ करता येतात.?का ती कमनशीबी होती कारण तीला हॉस्पिटलमधे जाऊन शस्त्रक्रिया करावी लागावी.?
माझ्या बहिणीची घटना जास्त किचकट व्हायला लागली कारण तीच्या दोन वर्षाच्या मोठ्या मुलाकडून प्रताप घडल्यावर हे सर्व जास्तच किचकट मिश्रण व्हायला लागलं होतं.त्याचं असं झालं की माझ्या बहिणीची शस्त्र्क्रिया होण्यापूर्वी तीची नणंद तीला मदत आणि आधार द्यायला तीच्या गावाहून मुद्दाम आली होती.घरी माझ्या बहिणीची दोन लहान मुलं होती.ती सकाळी येऊन पोहचते ना पोहचते तेव्हड्यात बहिणीचा मोठा मुलगा सकाळीच पलंगावरून घसरून खाली पडला आणि त्याचं मनगटाचं हाड दुखावलं गेलं.त्याला ताबडतोब त्याच हॉस्पिटलात प्लास्टर लावण्यासाठी न्यावं लागलं.
सुरेश, तू आता सांगा,त्याची आत्या त्याचवेळी घरी आल्याने तो नशीबवान होता का?का कमनशीबवान होता कारण त्याच हॉस्पिटलात त्याची आई एका खोलीत सर्जरी झाल्यावर सुधारत होती आणि हा प्लास्टर लावून दुसर्‍या खोलीत उपाय करून घेत होता.
अलीकडे माझ्या वाचनात आलं की कुणीसं म्हटलंय,
“वृत्तिपेक्षा सत्यस्थिती जास्त महत्वाची असते.”

माझा हा किस्स्सा ऐकल्यावर सुरेश जरा गंभीर झालेला दिसला.त्याचा चेहरा तसा दिसत होता.पण माझं अनमान चुकलं असं मला वाटलं.कारण सुरेशचा चेहरा माझ्या किस्स्यामुळे गंभीर झाला नव्हता.फेणीची चव जरा जास्तच झाली असावी.पण तो प्रासंगिकता ठेऊन बोलला.आणि मला त्याचं बोलणं पटलं.
मला म्हणाला,
“ह्या हिरव्यागार धरतीवर रहाणारा प्रत्येकजण कमनशीबाचा अनुभव चाखणारा प्राणी ठरतो.
“अशुभ न बोलेलं बरं”
असं म्हणून किंवा कुणाच्या,
“पांढर्‍या पायामुळे झालं “
असं म्हणून काही त्यात बदल होणार नाही.समीक्षात्मक मुद्दा असा की जीवनातल्या नकारात्मक घटनेला कोण कसा प्रतीसाद देतो ते पहायला हवं.मला अशावेळी आपली पहाण्याची प्रवृत्ति जास्त भावते.
तुझ्या बहिणीला सर्जरीनंतर प्रकृती नीट व्हायला काही दिवस उपायाना तोंड द्यावं लागलं.पण ती सकारात्मक राहिल्याने आता ती हदयाला झटका येण्यापासून दूर राहिली.ती़च्या मुलाची झपाट्याने सुधारणा होऊन तो आपल्या लहान बहिणीशी खेळायलाही तयार झाला असेल.
ह्या सर्व प्रकारातून मी एका अपरिहार्य निर्णयाला आलो की,कुणी म्हटलंय ते खरं आहे,
“जीवनात आपल्याला सुख मिळायला सर्वात मोठा वाटा आपल्या प्रवृत्तिचा असतो. आलेल्या परिस्थितिचा नसतो.”

माझ्या कपातली कॉफी केव्हाच संपली होती.फेणीची शेवटची चव घेऊन झाल्यावर, सुरेशने जेवणाची ऑर्डर दिली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, March 2, 2010

“जे शोधाल तेच सापडेल”

“हा क्षण माझ्या आयुष्यात गेले वीसएक वर्षं माझ्या डोक्यात ठाण मारून बसला आहे.”

“बहुतेक वेळा लोकं ज्याच्या शोधात असतात तेच त्यांना सापडत असतं असं मला वाटतं. सर्वजण एकाच वास्तविक परिस्थितीत भाग घेत असतात असा मी नेहमी विचार करायचो.पण एकदा माझ्या शाळेत असताना मी निराळाच प्रकार पाहिला.”
माझा मित्र मनोहर मला आपले जूने दिवस आठवून एक प्रसंग समजावून सांगत होता.

तो म्हणाला,
“ते खूपच उकाड्याचे दिवस होते.प्रत्येकजण पावसाची वाट पहात होता.एकाएकी जोराचा वारा आला आणि रस्त्यावरचा आणि आजुबाजूचा कचरा वार्‍याबरोबर हवेत उडत होता.हवेच्या स्पर्शाने अंगावर थंडावा वाटायला लागला.आणि सर्वांना वाटायला लागलं होतं की आता मस्त पाऊस पडून पावसाळ्याची सुरवात होणार आहे.
माझ्या सकट आम्ही सर्व आमच्या वर्गात जायला निघालो.आणि आपआपल्या सीटवर जाऊन बसलो.ढग आल्याने खिडकीतून पाहिल्यावर बाहेर एकदम काळोख होऊन रात्र झाल्याचं भासत होतं.आमच्यातला एक प्रफुल्लीत होऊन मोठ्या आवाजात ओरडून सांगत होता,
“असे आल्हादायक दिवस आल्यावर प्रत्येकजण खूश नाही का होणार?”
एका क्षणाचाही विलंब न लावता आमच्यातला एक दुसरा पुटपूटला,
“खरं सांगू का,ही नुसती वावटळ आहे पाऊस नक्कीच पडणार नाही.ह्या वर्षी पावसाळा खूपच लांबवलेला आहे.असं म्हणतात.”

मनोहरने हा वर्णन केलेला प्रसंग ऐकून मला वाटलं की त्याला नक्कीच काहीतरी चिंतनीय गोष्ट सांगायची आहे.कारण असे छोटे,छोटे प्रसंग लक्षात ठेऊन कुठचंतरी तत्वज्ञान सांगायची त्याची पहिल्यापासूनची हातोटी मी जाणून होतो.

तो पुढे म्हणाला,
“हा क्षण माझ्या आयुष्यात गेले वीसएक वर्षं माझ्या डोक्यात ठाण मारून बसला आहे.कारण त्यावेळी माझ्या डोक्यात चक्क प्रकाश पडला होता आणि तो धक्कादायक होता की जीवघेण्या उकड्यातून एकदाचा सुटकार मिळण्याच्या आशेत असताना त्याऐवजी त्या दुसर्‍याने चलाखी करून सोन्याच्या तुकड्याकडे पितळ म्हणून पाहिल्यासारखं केलं. कारण तो चलाखी करून दाखवून देत होता की हे जग जणू शुभचिन्तकानीच भरलेलं आहे.क्षण एकच होता वातावरण एकच दिसत होतं तरीपण विचार भिन्न भिन्न होते. उन्हाळ्याचे दिवस एकदाचे संपुष्टात आले म्हणून मी मनात पाघळत राहिल्याने ज्या शोधाची मला जरूरी होती तेच मला सापडत होतं.आणि त्या माझ्या मित्राचं पहिलं पाघळणं म्हणजे ती त्याची चलाखी जी त्याला सांगत होती की जग खोट्या आशेत आणि विश्वासघातात असतं.तो पण ज्या शोधात होता ते त्याला सापडलं होतं.”

हे ऐकून मी मनोहरला म्हणालो,
“तू शिक्षक आहेस त्यामुळे तुझ्या असल्या चिंतनाचा तुझ्या विद्यार्थ्याना भरपूर फायदा होत असेल.”
मला म्हणाला,
“अलबत,माझ्या विद्यार्थ्याना काही सांगायचं झालं तर मी एकही संधी सोडत नाही.
मी शिक्षक असल्याने माझ्या विद्यार्थ्यानी जगात कशाच्या शोधात असावं हे समजावून सांगण्याची माझी जबाबदारी आहे हे माझ्या लक्षात येत असतं.ज्यामुळे माझ्या विद्यार्थ्यात आशा,विश्वास आणि स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे. मला हे दाखवण्यासाठी एखादा नकाशा काढून दाखवता येणार नाही की तो पाहून ते यशस्वी होऊन आत्मसंतुष्ट होतील. समजा जर का त्यांना भासलं की ते घाबरले आहेत आणि सापळ्यात अडकून एखाद्या रानात हरवले आहेत तर मग त्यांचं पहिलं पाऊल ह्या रानातून सुटका करून घेण्यासाठी योग्य मार्ग पहाण्याच्या शोधात पडलं पाहिजे.
पण ह्यातून मार्ग नाही असं जर का त्यांनी मनात आणलं तर मात्र कशाचाही शोध ते घेणार नाहीत.”

“म्हणजे,तुझ्या वर्गातल्या त्या मित्राप्रमाणे तुझे विद्यार्थी समजा फक्त पुराव्यासाठीच शोध करू लागले उदाहरणार्थ, त्यांना कसलाच दर्जा नाही,त्यांच्यामुळे जगात काही फरक पडणार नाही,किंवा त्यांची स्वप्न वेडपटासारखी आहेत तर तो सर्व पुरावा त्यांना शोध घेतल्यामुळे सापडेलही.असंच काहीसं तुला म्हणायचं आहे ना.?”
असा प्रश्न करून मी मनोहरला अप्रत्यक्षपणे म्हणत होतो की “शोधा म्हणजे सापडेल असं तुला म्हणायचं नसून “जे शोधाल तेच सापडेल” असं म्हणायचं आहे.

“अगदी माझ्या मनातलं बोललास”
असं चेहर्‍यावर खूश झाल्याचं दाखवून मनोहर म्हणाला,
“उलटपक्षी मी जर त्यांना विचार करायला लावलं की त्यांच्यात यशस्वी होण्याचा मार्ग आहे,त्यांना स्वाभिमान आहे,तर ते तो सापडूं शकतील.कारण लोकं ज्याच्या शोधात असतात तेच त्यांना सापडतं. ह्यावर माझी श्रद्धा आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com