Sunday, August 30, 2009

मौनभंग केल्याने इरादा असत्यभासाचा आहे असं वाटेल.

आज प्रो.देसाई जरा गंभीर दिसले.
“तळ्यावर फिरायला आल्यावर सर्व विवंचना घरी ठेवून यावं”
असं सांगणारे स्वतः भाऊसाहेब आज कसली विवंचना घेऊन आले आहेत ह्या विवंचनेत मी पडलो.मी भित भितच त्यांना विचारलं,
“घरी सर्व ठिक आहेना?”
“ठिक नसायला काय झालं?.जो तो आपली जबाबदारी संभाळत आहे.नातवंड शाळा कॉलेजात दंग आहेत.मुलं आपल्या काम धंद्यात बिझी आहेत.कामावर तरी निदान बिझी असल्यासारखं दाखवावं लागतं.सध्या जॉब टिकण्याची काही खात्री नाही.राहाता राहिलो आम्ही म्हातारी कोतारी माणसं.सकाळी उठल्यावर गुडघे दुखत नाही हे समजल्यावर समजावं आपण ठिक आहो.ह्यावरून कळलं ना तुम्हाला की सर्व ठिक आहे ते.?”
प्रो.देसायानी एव्हडं सविस्तर स्पष्टीकरण केल्यावर माझ्या लक्षात आलं की काही तरी जगाच्या विवंचनेत भाऊसाहेब आहेत आणि त्यावर माझ्याशी त्यांना बहुदा चर्चा करायची असणार.मला म्हणाले,
“मी जगातल्या हिंसेबद्दलच्या बातम्या ऐकून हैराण झालो आहे.लोक बरेचसे आपमतलबी आणि स्वार्थी झाले आहेत.समोर हिंसा होत असताना मौन राखून असतात.”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब,
हिंसेबद्दल मौन राखलं गेलं म्हणजे हिंसा मौन आहे असं नव्हे.हिंसेचा प्रकार हाच मुळी मौन सोडून सर्व काही असं मानलं पाहिजे.जेव्हा हिंसा केली जाते तेव्हा हा उघड उघड माणसाच्या आत्म्यावर हल्ला आहे”

“जंगलात एखादा वृक्ष कोसळून पडला आणि तो पडताना कुणीही तिथे होणारा आवाज ऐकायला नसला तर कोण कसं बरं सांगणार की प्रचंड आवाज झाला होता. मला वाटतं एखाद्याचा कोपर्‍यापासूनचा हात काठीचा मार वाचवण्यासाठी उंचावलेला असताना त्याला लागलेला फटका एव्हडा दाह देणारा असतो की त्यावेळचं त्याचं किंचाळणं सुद्धा त्याच्या लक्षात येत नसावं.पण म्हणून हिंसा होत असताना वातावरण शांत राहिल कां?”
ही प्रो.देसायांची उदाहरणं ऐकून मी मनात नक्की ठरवलं की भाऊसाहेब हिंसे विरुद्ध आवाज उठवण्याच्या लोकांच्या समानुभुतीबद्दल आवर्जून सांगणार असावेत. आणि माझा अंदाज खरा ठरला.
“अश्रू निमुटपणे ओघळत असतात,विरोध गिळून टाकला जातो,चेहरा भावनाशुन्य दिसतो,सुन्न होतो,दगडा सारखा दिसतो.आणि मौन वातावरण जगाला संदेश देतं की सगळं काही आलबेल आहे.
चोप देण्याच्या आणि ढकलाढकलीच्या प्रबलतेमुळे भिती,लज्जा,आणि धाकटधपटशा जागीच दाबली जाते.दाह झाल्याचा आक्रोष रात्रीच्या शांततेला छेदून टाकण्याच्या प्रयत्नात असताना त्याहून कानठिळ्या बसतील अश्या मानहानिच्या आणि जबरदस्तीच्या कबुली जबाबाच्या ओरडण्याच्या दबावाखाली माणूस दबून जातो.
“खेळ संपला मंडळी, आता घरची वाट पकडा.काही बघण्यासारखा तमाशा नाही”
असं अत्याचार करणारा ओरडून सांगतो.आणि बघे मुक सम्मती देतात.शेजारीपाजारी खिडकी दरवाज्याचे पडदे ओढून गप्प बसतात.शांत मनाने विचार करतात आणि तर्काचा आधार घेतात. आणि स्वतःशीच म्हणतात,आम्ही सामील का व्हावं? अशावेळी पीडित झालेली व्यक्ती प्रार्थाना करीत असते की कुणी तरी ह्या हिंसेची दखल घ्यावी आणि मौन भंग करावं.झालेला परिणाम प्रत्येकाच्या कानात घुमत असतो जणू तोफखान्यातून गोळे फुटल्यासारखा छाती धडधडणारा आवाज असतो.द्सरे कुणी ऐकत नसतील का?
सुनासुना भास,सतर्क,रहस्यमय कुजबुज,आणि क्षणिक नेत्रपल्लवी ओरडून सांगते “काही सुद्धा बरं नाही” निशःब्द संकेतातून मित्राना सांगतात किंवा कुटूंबियाना सांगतात.आणि जे बाहेर ऐकलेलं नाही तेही ते सांगत असतील एकमेकाच्या फोन मधून, पण नंतर फोन हळूहळू शांत होतात,त्यामुळे मित्राना आणि कुटुंबीयांना सोपा मार्ग खूला होतो.जणू ते त्यांच्या स्वतःच्या मौनातून होणार्‍या बेचैनीतून मोकळे झाले असं त्यांना वाटतं..पण हे त्यांचं मौन मात्र जे हिंसा करतात त्याना चक्क मोकळं मैदान खुलं करून देणारं ठरतं.”
मला वाटलं प्रो.देसायानी एव्हडं आवर्जून सांगितल्यावर आपलं ही मत द्यावं.मधेच त्यांना थांबवीत मी म्हणालो,

“भाऊसाहेब, माझं मत असं आहे की मौनभंग करणं जरा जिकीरीचं आणि कठीण आहे.तो काही सोपा प्रवास नाही.मौनभंग केल्याने कान किटण्या इतक्या जोरजोरातल्या घाबरलेल्या आणि शांत असलेल्या हृदयाची धडधड ओढून घेतली जाते. आणि असं माहित असून की तिथे उपस्थित राहाणं म्हणजे नक्कीच मरण ओढवून घेणं,स्वतःच्या अस्तित्वाचं मरण नसेलं तरी आत्म्याचं मरण.
निर्भयतेची आयोजना करावी लागते आणि हृदयभंगही होतो.मौन तोडलं म्हणजे ते सत्याला सामोरं आणतं आणि तेच काहीना बेचैन करतं की जे नैतीक निर्णयाच्या सबबीचा आधार घेऊन दुखावलेल्या हातापासूनच्या किंवा दुखावलेल्या आत्म्यापासूनच्या वास्तविकते पासून दूर जायची संधी पहातात.”
मला वाटलं माझा हा विचार ऐकून प्रो.देसाई मला काही तरी आणखी सुनावतील.पण त्यांना हा विषय आवरता घ्यायचा होता असंदिसलं,मला म्हणाले,
“मला वाटतं मौन सोडल्याने पीडा देणार्‍याकडे पीडा देण्याबद्दलची जबाबदारी येते.तरीही खोट्या समर्थनाच्या मौनरूपी गुहेतून त्यांना उचकून काढल्याने ते दबले जाऊनही विकसीत होण्याच्या प्रयत्नात असतात.मौन तोडल्याने मुक्तिची मुभा मिळते.पीडा देणार्‍यांना कठोर दन्ड दिल्याने कसलीही लज्जा किंवा भिती न ठेवता आवाज वाढवल्याने जे दुसर्‍याचा अनादार करतात, हिंसा करतात हे स्विकारणीय नाही. कोणत्याही परिस्थितीत अस्विकारणीय आहे.हा उघड उघड संदेश दिला जातो.पुढल्या खेपेला आपण ह्या विषयावर आणखी विस्ताराने बोलूंया”
असं म्हणून त्यानीच आवरतं घेतलं.
“हो,नक्कीच असं मी म्हणालो”
आणि घरी जायलो निघालो.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, August 27, 2009

पांढर्‍याचं काळं.

त्याला खूप दिवस होऊन गेले.मी एकदा गिरगावात गेलो होतो.पॉप्युलर बूकडेपोत काही पुस्तकं चाळत होतो.विं.दा.करंदिकरांचं कवितेचं एक पुस्तक आवडलं. आलो होतो चिं.त्र्यं.च्या चानी ह्या कादंबरीसाठी.मिना साठे आणि तिचे यजमान बुकडेपोतच भेटले.माझी त्यांची फार पुर्वीची ओळख आहे.त्यानंतर आज आमची भेट झाली ती योगायोगानेच.माझी पत्नी मला म्हणाली खूप दिवस आपण खडप्यांच्या अनंताश्रमात जेवायला गेलो नाही.म्हणून आज आम्ही जायचं ठरवून आलो होतो.बाजूच्या फॅमेलीरूम मधे साठे पतीपत्नी बसली होती.साठ्यांना मासे खूप आवडतात.मीच त्यांना अनंताश्रमाची माहिती दिली होती. पापलेटची आमटी आणि तळलेल्या सरंग्याचं काप हे समीकरण त्यांना खूप आवडायचं.त्यांचा आवाज आणि ही त्यांची ऒरडर ऐकून माझी खात्री झाली होती की हे मिस्टर साठेच असणार.कुतुहल म्हणून जरा धीर करून माझ्या जागेवरून उठून कॅबिनच्या वरच्या उघड्या भागातून भित भित न्याहाळून पहाण्याचा प्रयत्न केला.आणि माझा अंदाज खरा ठरला.
जेवणं झाल्यावर चहाला आमच्या घरी यायला पाहिजे म्हणून मिनाने मला निक्षून सांगितलं.साठे कुटूंब झावबाच्या वाडीत रहातात.आमची काही खरेदी करायची होती ती करून झाल्यावर आम्ही त्यांच्या घरी गेलो.
गप्पागोष्टीला सुरवात झाल्यावर,आमचा पिकलेले केस आणि त्यावर कलप-हेअर डाय-लावण्याच्या संवयीवर चर्चा रंगली.

मिना म्हणाली,
“डोक्याचे केस जसे दिसतात तसेच दिसावे ह्या मताची मी आहे.पण जर का केस काही सफेद आणि काही काळे असतील तर थोडे दिवस ते काळे दिसायला हेअर-डाय लावून आणि नंतर काही दिवसानी त्याचा असर कमी झाल्यावर काळे पांढरे दिसले तरी मला चालतं.कुणाच्या तरी लग्नाला जायचं झाल्यास,किंवा कुठल्यातरी पार्टीला जायचं झाल्यास माझे केस काळे असावे लागतील. असले तात्पुरते हेअर-डाय मला लावायला आवडतील. कारण अशा प्रकारचा हेअर-डाय लावल्याने जसं मनात आपण दिसायला पाहिजे तसं तात्पूरतं दिसता येतं आणि शिवाय पूर्वी कशी होते ते कायमचं विसरायला होत नाही.दुसरं म्हणजे ते प्रकार की ज्यामुळे केस काळे किंवा सफेद दिसण्याबद्दलची मनातली विसंगती, जिच्यामुळे विरोधाभास असलेला,जटिल समस्यात अडकलेला मनुष्य प्राणी म्हणून मी दिसली जाऊं नये.थोडसं ढोंगी किंवा पाखंडी असायला काय ही हरकत नाही असं मला वाटतं.
ह्या त्तात्पुर्त्या हेअर-डायमुळे अमर्यादित मुभा असलेल्याला माझ्यासारखीला थोडीशी निर्भयता असल्यासारखं वाटतं.एक गोष्ट स्विकार करायची आता मला वेळ आली होती,की हे असंच माझ्या जीवनात आहे आणि त्यावरमला आता अवलंबून राहावं लागणार आहे आणि जरी ते केसांच्या कोशातल्या भागात्त असलं तरीही,कारण मी “मुळाला” मानते.”

मिनाचं हे केसाबद्दलचं प्रांजाळ सांगणं ऐकून मी तिला म्हणालो,
“मला तरी वाटतं की निसर्ग जे ज्यावेळी देतो ते निमुटपणे स्विकारावं.नाहीतर तोंडावर सुरकुत्या आल्या आहेत.कण्याला बाक आली आहे.आणि राजेश खन्ना सारखं दिसावं म्हणून विग वापरल्यावर वयाला शोभून दिस]णार नाही.निसर्गाने दिलेलं टक्कल निमुट स्विकारावं.तुला कसं वाटतं माझ म्हणणं?”
मिना माझ्याशी पूर्ण सहमत होऊन मला म्हणाली,
“तुमचं म्हणणं मला पटतं.अलीकडे माझी आई मला सांगत असते की जे स्थित्यंतर माझ्या केसात दिसत आहे ते माझ्या आताच्या वयाला शोभूनच दिसतं.आणि मलाही माझ्या अंतरात खात्री करून घ्यायची आहे की जे मला मिळत आहे,आणि जे काही घडत आहे ते मी स्विकार करणं जास्त उचित आहे.समजा कदाचित मी माझ्या आईवडीलांच्या घरात आता पर्यंत येत जात राहिले ते मला यापुढे करता येणार नाही.कदाचित ज्या लोकांना मी माझे समजून राहत आली ते माझे राहाणार नाहीत.कदाचित माझे काळे पांढरे केस पाहून मी नाराज होत राहिन किंवा राहाणार नाही.पण हे मात्र नक्की की असेच केस माझ्या बरोबर असणार आणि त्यानेच मी यापुढे चांगली दिसत राहणार.
मी ज्याला ढोंग म्हणाले किंवा पाखंडी म्हणाले ते असं आहे.ज्या ज्या वेळी मी बाहेरच्या जगात जाते आणि विचारात पडते त्या त्या वेळी मी माझा पुनःअविष्कार करून घेते.आणि माझ्या संबंधाने ज्या गोष्टी मला परिचीत आहेत त्यांनाच मी चिकटून बसते.निर्भय असणं म्हणजे बाह्य भागाला मर्यादा आणणं असं नव्हे,तर जीवनातल्या अंतर भागालाही चिकटून असणं.आणि त्यामुळे कदाचीत संदर्भ बदलला तरी बेहत्तर.कारण अगदी प्रामाणिकपणे विचार केला तर ह्या वयात कायमचे सफेद केस ठेऊन राहाण्याचा प्रयत्न करून पाहिल्याशिवाय मी किती असाधारण दिसते हे कळणार नाही.एव्हडं मात्र नक्की एक ना एक दिवस माझे सगळे केस सफेद होणार आहेत ह्याची मला जाणीव ठेवावी लागणार आहे.
माझ्या जीवनात अविचलनीय गोष्टी घडल्या आहेत याची मला जाणीव असल्याने जगातल्या कठीण परिस्थितीला तोंड देण्याची माझी तयारी आहे.आता काय माझं वय नवतरूणीचं नाही.तसंच जूना अनुभव एव्हडा आहे की त्यावर ध्यान देणं म्हणजे जरा अती होईल. म्हणून मला वाटतं की स्थायी बदलच बरा.”
“चहा घेता घेता असा एखादा निष्पाप विषय़ घेऊन चर्वीचरण करायला कुणाचं काय जातं?” असं मी मनात म्हणालो.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, August 24, 2009

आयुर्वृद्धितीतली सुंदरता.

गिरगावातल्या कुडाळदेशकर निवासातल्या सहा नंबरच्या चाळीत माझा मित्र भाली(भालचंद्र) रेडकर राहायचा.अलीकडेच तो गेला.त्याची मोठी बहिण अर्थू रेडकर त्याच्याच घरी राहायची. तिने लग्न केलं नव्हतं.वयस्करपणाचा परिणाम तिच्या चेहर्य़ावर उठून दिसत होता.मी अर्थूला ओळखलंच नाही.मला तिने ओळखलं.तिला पाहून माझा चेहरा तिला काही तरी सांगून गेला हे केव्हाच माझ्या लक्षात आलं.
मला म्हणाली,
“तू मला ओळखणार नाहीस.कित्येक वर्षानी आपण भेटतोय.तू मात्र आहेस तसाच आहेस.”
“पण तू इतकी खराब कशी झालीस?.
असं मी म्हणता म्हणता मला अर्थू म्हणाली,
“अरे हे सर्व प्रश्न दारातच विचारणार की आत येणार?”
मी आत गेल्यावर प्रथम सहाजीकच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.चहापाणी झालं.आणि नंतर अर्थू मला म्हणाली,
“मगासच्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला सविस्तरपणे सांगते.
आता माझं वय सत्तरीकडे आलं आहे.तू मला पाहिलंस त्यावेळचा माझा चेहरा अजून कसा रहाणार?
आयुर्वृद्धि होत असतानाच्या प्रक्रियेतील सुंदरता मला भावते. जी नैसर्गिक आयुर्वृद्धि आहे,जी सन्मानाने होणारी आयुर्वृद्धि आहे,जी आयुर्वृद्धि होत असताना चेहर्य़ावरच्या सुरकुत्या जशास तशा राहत आहेत अशी आयुर्वृद्धि मी म्हणते.”
मी अर्थूला म्हणालो,
“मला वाटतं ऐन तारुण्य आणि त्या तारुण्याचं वैभव उपभोगताना न सापडणारी उदाहरणं उतार वयात सापडतात.खरं आहे ना?”
मी तिची बाजू घेऊन बोलतोय हे समजायला अर्थू खूळी नव्हती.मला म्हणाली,
“खरं म्हणजे, तारुण्य अनेक आणि विशिष्ट उदाहरणाने ओतोप्रत भरलेलं असतं.ही गोष्ट नाकारताही येत नाही आणि त्याचं महत्व कमी होत नाही.पण एकप्रकारची अंगात आलेली विनम्रता,चेहर्यावरच्या सुरकुत्यांची आठवण करून देणारी विनम्रता,पिकलं जाणं,केस विरळ होणं,कंबर जाड होणं हे सर्व आयुर्वृद्धिची आठवण करून देतं.तसंच विनम्रता ठेऊन जीवनाकडे पहाण्याचा प्रयत्न केल्यास तो डोळ्यांना दिसणारा प्रकाशपुंजही आठवण करून देतो.”
“अर्थू,तुझ्याशी चर्चा करायला नेहमीच मजा येते.तू दादरच्या कन्याशाळेत शिक्षीका होतीस. तिथूनच निवृत्त झालीस असं भाली मला बोलला होता.नंतर तू क्लासिस्स घ्यायचीस.तुझं वाचनही दाणगं असणार.तू आत्ता म्हणालेल्या मुद्यावरून माझ्या लक्षात आलं की तू कुठच्याही गोष्टीचा सारासार विचार करून तुझं मत बनवित असावीस.खरं ना?”
माझं हे बोलणं ऐकून अर्थूला मला काहीतरी आणखी सांगायचं आहे असं तिच्या चर्येवरून मला भासलं.
मला म्हणाली,
मी तुला एक किस्सा सांगते. मागे एकदा चौपाटीवर फिरत असताना मला वाळूत एक जूना खडबडीत झालेला शंख दिसला.तो मी उचलून घेतला.तो मी घरी आणला.नंतर गंमत काय झाली, दिवस निघून जाऊ लागले आणि पावसाळा जाऊन थंडी आली थंडी जाऊन उन्हाळा आला आणि मी तो शंख नेहमी उचलून उलटा सुलटा ठेऊन न्याहाळत असायची. माझ्या हाताची बोटं त्या शंखावरून फिरवताना डोक्यात नेहमी त्या शंखाच्या भंगुरतेचे आणि त्याच्या बळाचे विचार यायचे आणि वाटायचं की मला हा शंख इतका जगावेगळा का वाटत आहे?
तो जसा गुळगुळीत होता तसा सर्व ऋतुतून मुरून गेला होता.झिजून गेला होता.काही जागेवर तो चांगलाच झिजलेला दिसत होता. त्यावरची काही छिद्र पाहून माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं.
हल्ली एकदा दिवाळीच्या एका थंडीच्या दिवसात मी चहा घेत बसले होते.एक गमतीदार दृश्य माझ्या डोळ्यांना दिसलं.तो शंख खिडकीच्या पट्टीवर ऐटबाज बसलेला दिसला.आणि नंतर माझ्या चहाच्या गरम गरम वाफेतून पलिकडे पाहिल्यावर थंडीच्या वातावरणातला वाटणारा मंद प्रकाश त्या शंखाच्या छिद्रातून बाहेर पडताना दिसत होता.त्याचं ते खडबडीतपण, घासून गेलेलं,आणि क्षीण झालेलं अंग त्या प्रकाशाला बाहेर येऊं देत होतं.
तो एक साधा क्षण होता,जो अजून माझ्या बरोबर आहे.”
मी अर्थूला मधेच अडवीत म्हणालो,
“मला वाटतं निसर्ग देवतेला ती काय करते ते अवगत असावं.”
“माझ्या अगदी मनातलं बोललास”
असं म्हणत अर्थू मला म्हणाली,
“माझ्या घरातल्यांचे,माझ्या मैत्रिणींचे आणि माझे पण चेहरे मृदु-कोमल होत आहेत हे पाहून चेहर्‍यावरची प्रत्येक सुरकुती मला आवडते,पिकलेला प्रत्येक केस मला आवडतो. आता समजायला लागलंय की मला सगळंच काही माहित नाही.मी आता ऐकायला शिकले आहे. हंसायला चालू केलं आहे.आणि ते सुद्धा दहा मजली हंसणं.मी देणं तसंच घेणं शिकत आहे.माझा प्रेमाचा अनुभव मी विकसीत करायला शिकत आहे.शेवटी “मी आहे म्हणून कसं असावं” हे शिकत आहे.मलापण आता थोडा नरमपणा आल्यासारखं थोडं झीज झाल्यासारखं वाटत आहे.मला वाटतं माझ्यावर पण एखाददुसरं छिद्र असल्याचा भास होत आहे.आणिकदाचीत त्यातून तो मंद प्रकाश पण येत असल्यासारखं वाटत आहे.तू कदाचीत माझे हे विचार ऐकून मला हंसशील,पण खरं सांगायचं तर जावे त्याच्या वंशातेव्हां कळे.”
“अर्थू,मी तुझ्या विचारांना मुळीच हंसणार नाही.तू इतकी खराब कशी झालीस हे तुला विचारल्याबद्दल सुरवातीला मला वाईट वाटलं होतं.पण जर ते मी म्हटलं नसतं तर मला हा तुझा शंखाचा अनुभव कसा कळला असता ह्याचा विचार येऊन आता बरं वाटतं.”
असं मी म्हणाल्यावर अर्थूचे डोळे पाणावले,मी तिचा हात माझ्या हातात घेत म्हणालो,
“ह्यातून सर्वांना जावं लागतं.आज तू आहेस उद्या मी असणार.”


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, August 20, 2009

अतुलचा भयगंड

आमच्या शेजारच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर पूर्वी खाडिलकर राहायचे.नंतर ती जागा विकून ते गोरेगांवला राहायला गेले. खाडिलकरांचा एकुलता एक मुलगा अतुल तेव्हा खूपच लहान होता.त्याचे आईवडिल त्याला खूपच जपायचे.मी खाडिलकरांच्या जेव्हा घरी जायचो तेव्हा नेहमीच ते अतुलच्या घाबरून रहाण्याच्या संवयीबद्दल काळजी करीत असत.
“ह्याचं पुढे कसं होणार?”
ही त्यांची नेहमीचीच काळजी.
मला आठवतं मी त्यांना नेहमी म्हणायचो,
“जसा तो मोठा होईल तसा सुधारेल”
अतुलच्या वडीलांना हे ऐकून बरं वाटायचं.मला म्हणायचे,
“तुमचं म्हणणं बरोबर आहे.मी उगीचच काळजी करीत असतो.सर्व अंगावर पडल्यावर त्याला जबाबदारीने वागावं लागेल.”
इतर मुलांच्याबरोबरीने अतुल खरंच जरा काळजी करण्यासारखा वागायचा.मागे मागे रहायचा. आपल्याला हे जमणार नाही असं त्याला प्रयत्न करण्यापूर्वीच वाटायचं.
पण तो त्यावेळी लहान होता.काल मी बर्‍याच वर्षानी गोरेगांवला खाडिलकरांच्या घरी गेलो तेव्हा माझं अतुलनेच स्वागत केलं. हाच अतुल हे मी ओळखलंच नसतं.
“अतुल कोण आलंय रे?”
असा नामनिर्देश करून आतून प्रश्न विचारला गेला,त्यामुळे हा अतुल हे मी ओळखलं.
मला पाहून अतुलला त्याचं लहानपण आठवलं असावं.
आमच्या गप्पा चालू झाल्यावर मला तो म्हणाला,
“आपण खूप वर्षानी भेटतोय.पुलाखालून बरंच पाणी निघून गेलंय. माझ्या जीवनातल्या भूतकाळात डोकाऊन पाहिल्यावर काही गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या.
काही घटना उत्साहित करतात नव्हेतर आनंदही देतात.
काही घटना मला खूप बेचैनही करतात. जेव्हा माझ्या लक्षात येतं, की मी माझ्या सुरवातीच्या आयुष्यातला समय जवळ जवळ सर्व बाबीबद्दल घाबरून राहण्यात व्यय केला तेव्हा मला खूपच वाईट वाटतं.तसंच त्यावेळचा काही उरलासुरला वेळ मोठ्या चलाखीने माझ्या मनातली भिती इतरांपासून कशी लपून छपून ठेवायची हे शिकण्यात घालवला तेव्हा ही वाईट वाटतं.
हे सर्व लक्षात आल्यावर सहाजीक मी बेचैन होतो,कारण मी भयहीन होतो असं इतराना अगदी साफ साफ हानिरहित दिसणारं भ्रमात टाकणारं माझं कृत्य मलाच शेवटी भ्रमात टाकून गेलं होतं.”
मी त्याला म्हणालो,
“जेव्हा कुणी स्वतःला भयभीत स्थितीत ठेवतो तेव्हा त्याच्या विशिष्ट स्वरूपाच्या जीवनातून संपूर्ण आयुष्याच्या अर्थाला आणि वैधतेला योगदान देण्याचा त्याला मिळालेला मोका तो निष्फळ करून टाकतो. “
अतुल म्हणाला,
“माझ्या जीवनातला एव्हडा मोठा हिस्सा भितीने व्यापला ह्याचा जेव्हा मला एकाएकी पडताळा आला त्याने मला बरंच धक्कादायक वाटलं,कारण जेव्हडं म्हणून माझ्या जीवनावर मी प्रेम करावं तेव्हडं मी केलं आणि अशावेळी मनापासून मानलं होतं की ते जगण्यात मी प्रयोगशील होतो.”

“खरं आहे तुझं म्हणणं, नुसतंच जगायचं असं ठरवल्यास कुणावरही एक जबरदस्त जबाबदारी येते,आणि ती जबाबदारी केवळ स्वतःपूर्तीच नसून एकमेकावरचीही असते.”
माझा हा विचार ऐकून अतुल म्हणाला,
“मला वाटतं,अशा भयभीत परिस्थितीत असल्यानेच आपण असहिष्णुता आणि पूर्वग्रह मनात ठेवण्याचा अपराध करतो. त्यापलिकडे जाऊन मला वाटतं,कदाचीत सगळ्यात दुःखद आणि गंभीर अपराध म्हणजे परिवर्तनाला-बदलावाला- आपला विरोध असणं.मी हेच करण्यात माझी भलाई आहे असं बरीच वर्ष समजत राहिलो.”
“हा परिवर्तनाचा तुझा मुद्दा मला आवडला. परिवर्तन हे ज्ञान मिळवण्याचं आणि विकास करून घेण्याचं नैसर्गिक लक्षण आहे आणि ते उत्तम लक्षणही आहे.आपण नेहमी जे परिचित असतं त्याच्याशी जखडून बसतो.कारण ते परिचित आहे म्हणून ते निःशंक आहे असं आपल्याला वाटत असतं.आपण एका फटक्यात जे अपरिचित आहे त्याचा निकाल लावतो आणि जे न्याय्य आहे त्याचाही निकाल लावतो.”
माझं हे बोलणं ऐकून अतुल पुन्हा आपल्या भयभीतीच्या मुद्याकडे वळला.म्हणाला,
“भयभीत झाल्याने आपण आपल्यापुरतंच प्रेम मिळवण्यच्या प्रयत्नात असतो.मात्र आपल्यात असलेल्या प्रेमाचा शोध करायला आपण विसरतो.भितीमुळे आपण आपल्या श्रद्धेमधे एक निराळीच विचार-शैली आणतो. आणि एव्हडंच नाही तर देवावर आपली श्रद्धा बळावते. देव निवडण्यात असं तादात्म्य स्थापित करतो की जीवनात आपल्या ज्या काही आवश्यकता असतात, श्रद्धा ठेवण्याचा आपला जो प्रयास असतो आणि आपलेच हित साधण्यासाठी आपल्यात जी क्षमता असते त्याहीपेक्षा देवाचं महत्व आपल्याला जास्त वाटायला लागतं.”
माझ्या मनात आलं की अतुलला ह्याच वेळी आपल्या अनुभवातून दोन शब्द उपदेशाचे सांगावे.मी म्हणालो,
“अतुल,तू माझं मान किंवा नको मानूं, माझा विश्वास आहे की येणार्‍या उद्यात आशा ठेवून राहिलं पाहिजे. एव्हडा जर येणार्‍या उद्यामधे तुझा विश्वास असेल तर तू भितीग्रस्त होऊन तो आजच्यापेक्षा निराळा असावा असं समजून चालणार नाही.मला वाटतं तुला जे काही माहित आहे ते मानण्यापासून सुरवात करून आणि जे माहित नाही त्याबद्दल यत्किंचीतही भिती न बाळगून पुन्हा कधीही भितीग्रस्त होणार नाही अशी अटकळ मनात ठेवून राहिलं पाहिजे.”
अतुल चांगला पोक्त झाला आहे.त्याला चूका आणि दोष,जबाबदारी आणि अवलंबून राहणं ह्याचा अर्थ चांगलाच कळला असणार. मी उठता उठता मला म्हणाला,
“प्रत्येकाला आपल्यात असलेला दोष ज्ञात असतो.तसंच प्रत्येकजण एकाकी असतो.मला वाटतं दोषी आणि एकाकी असे आपण सर्वच इकडे मिळुनमिसळूनच असतो.”

मी त्याची पाठ थोपटीत म्हणालो,
“अगदी लाखातलं एक बोललास.”


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, August 16, 2009

या सुखानो या!

आज मी प्रो.देसायांची तळ्यावर वाट पहात बसलो होतो.ते येई पर्यंत पुस्तक वाचून वाचून कंटाळा आला.जरा अंमळ पाय मोकळे करावे म्हणून तळ्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत फेरफटका मारावा म्हणून उठलो.समोरून एक गृहस्थ येत होते.माझ्याशी हंसले.एकमेकाची आम्ही चौकशी केली.नेहमी प्रमाणे ते प्रो.देसायाना ओळखत होते.आपण प्रि.वैद्य अशी ओळख करून दिल्यावर माझ्या लक्षात आलं पूर्वी मी ह्यांना माझ्या घरी ते भाऊसाहेबांबरोबर आले असताना भेटलो होती आणि बोललो पण होतो.पण त्याला आता बरेच दिवस होऊन गेले. वयोमाना प्रमाणे हल्ली जरा मेमरी फशी पाडते असं उगाचंच वाटलं.नंतर माझ्या लक्षात आलं की प्रि.वैद्यांबरोबर अशाच एका विषयावर मनोरंजक चर्चा झाली होती.त्यानीच मला ती आठवण करून दिली. तळ्याच्या कडे कडेने चालत चालत आम्ही एका नव्या विषयावर चर्चा करायला सुरवात केली.
मी प्रि.वैद्याना म्हणालो,
“माणूस सुखी असतो का?”
मला ह्या विषयावर जरा निराळंच विवरण करायचं आहे.मला असं वाटतं की माणूस सुखी असतो.ह्यात निराळेपणा एव्हडाच की जो सुखी असतो तो क्वचितच मी सुखी आहे असं सांगतो.जो सुखी नसतो तो माणूस नेहमी अभिव्यक्तिशील असतो.तो आपल्या विचारचं आदान-प्रदान करीत असतो.असा माणूस जग कसं चुकतंय हे सांगायला उत्सुक्त असतो आणि बरेच श्रोते जमवायला त्याच्याकडे चांगलीच कला असते.ही एक आधुनिक शोकांतीका आहे की नैराश्येला अनेक प्रवक्ते असतात आणि आशेला अगदीच कमी.
म्हणून मला वाटतं की आपण सुखी आहे असं माणसाने जाहिर करीत असावं.अशाप्रकारचं म्हणणं जरी निराशावाद्यांपेक्षा कमी प्रभावशाली आणि कमी मनोरंजकअसलं तरी जाहिर करावं.”

माझं हे विवरण ऐकून प्रि.वैद्य विचारात पडल्यासारखे दिसले.आणि म्हणाले,
“मी सुखी आहे असं का म्हणावं बरं?तसं पाहिलंत तर मी ज्यांच्यावर प्रेम करीत होतो त्यांना मृत्युने माझ्यापासून वंचित केलं.माझ्या घोर प्रयत्नांचा दारूण अपयशाने पिच्छा पुरवला.लोकानी माझा आशाभंग केला.मी पण त्यांचा आशाभंग केला.आणि मी माझ्या स्वतःचा आशाभंग केला.मी आंतर्राष्ट्रीय उन्मादाच्या दबावाखाली आहे हे मला माहित आहे. हे असले काळेकुट्ट ढग पुढे कधीतरी फुटून अणुबॉम्बच्या वर्षावाखाली लाखो लोकांचं आयुष्य रसातळाला जाणार आहे. आणि मी ही त्यातला एक असणार.
ह्या सर्व साक्षीवरून मी मुळीच सुखी नाही अशी जबर वस्तुस्थिती स्थापित करूं शकत नाही काय? “

माझ्या पुर्वीच्या प्रश्नाला वैद्यांनी आव्हान दिल्यासारखं होतं.मी पण ते आव्हान स्वीकारून म्हणालो,
“हो, मी स्थापित करूं शकेन पण ते एक चुकीचं चित्र तयार होईल.ते इतकं चुकीचं होईल की जणू पडझड झालेल्या पानाच्या झाडाकडे बघून झाड नेहमीच असंच दिसतं असं म्हटल्यासारखं होईल.
मी ज्यांच्यावर प्रेम करतो आणि जे मेले नाहीत अशा लोकांची यादी करून ठेवल्यासारखी होईल.
माझ्या अनेक अपयाशामधे काही उभारून आलेल्या यशाची स्वीकृति दिल्यासारखी होईल.
मला निरोगी प्रकृतीचं वरदान असल्यानेच मी उन्हापावसात भटकू शकतो असं दाखवून दिल्यासारखं होईल.
माणसाच्या अंगात असलेल्या चांगुलपणामुळेच तो सरतेशेवटी बुराईच्या लढाईत यशस्वी होऊं शकतो ह्या माझ्या श्रद्धेला धक्का बसल्यासारखं होईल.”
मला उत्तर द्यायला प्रि.वैद्य म्हणाले,
“हे सर्व प्रत्येकाच्या जीवनातले तेव्हडेच हिस्से आहेत जेवढी चिंतेची सावटं पण त्यांच्या जीवनात आहेत.मला वाटतं चांगल्या- वाईटातल्या संघर्षाचा शेवटी एका गाढ्या पेचात विलय होतो.”
मी म्हणालो,
“वैद्यसाहेब,तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल न व्हाल.खरं सांगायचं तर, कुणीही सद्गुण आणि सौंदर्याला,यश आणि हशीखूशीला वेगळं करू शकत नाही,तसंच कुरूपता आणि दुराचरण किंवा अपयश आणि अश्रुपूर्णतेच्या संपर्कात कुणालाही कुणी ठेवू शकत नाही. जो माणूस असल्या असंयुक्तिक आनंदासाठी परिश्रम घेतो तो तोंडघशी पडण्याच्या प्रयत्नात आहे असं समजावं.तो असंयुक्तिक अंधकारात गुंफला जाणार असं समजावं.तुम्हाला माझा विचार कसा वाटतो.?”

“मला वाटत नाही की कुणी ही जीवनातल्या त्रुटि स्वीकारल्या शिवाय ह्या जगात आनंदाने राहिल.
त्याला माहित असावं लागेल आणि स्वीकारावही लागेल की त्याच्यात त्रुटि आहेत,इतरात त्रुटि आहेत आणि ह्या त्रुटिकडून त्याच्या आशाआकांक्षां उद्वहस्त व्हाव्यात असा त्याने विचार करावा हे पोरकटपणाचं होईल.”
असं वैद्यांच म्हणून झाल्यावर तेच म्हणाले आपण जवळच्या एका बाकावर जरा आराम करायला बसूंया.तेव्हड्यात प्रो.देसाई लगबगीने येताना दिसले. मी भाऊसाहेबाना आमच्या चर्चेचं थोडक्यात वर्णन करून सांगितलं.प्रोफेसरच ते.
आम्हा दोघांना म्हणाले,
“ह्या त्रुटिवर मी एखादं उदाहरण देऊन सांगू का?
निसर्गाचंच घ्या.माणसापेक्षा तो प्राचिन आहे.आणि निसर्ग परिपूर्ण नाही.अगदी ठराविक तारखेला त्याचा ऋतु बदलत नाही. निसर्गातले किडे-मकोडे आणि इतर किटक निसर्गाच्या उद्देशाच्या,इराद्याच्या, पलिकडे जाऊन वागतात.निसर्गाने सुशोभित केलेल्या खेड्यापाड्यातल्या पानाफुलांना आणि अंकूराना हडप करतात.जमिनीला खूपच कोरडेपणा आल्यानंतर पावसाच्या सरी येतात. आणि कधीकधी हा पाऊस इतका प्रचंड असतो की सुबत्ता होण्याऐवजी नुकसानी होते.
परंतु,वर्षानुवर्षे निसर्गाच्या ह्या त्रुटितून आणि चुकातूनही चमत्कार होतच असतात.”

“वाः काय मस्त उदाहरण दिलंत तुम्ही भाऊसाहेब.मला तुमच्याकडून त्याची अपेक्षा होती.”
आता इथेच बसलो तर बराच काळोख होईल.त्यापेक्षा निघावं म्हणून आणि माझं घर उलट्या दिशेला असल्याने,चर्चेचा समारोप करताना मी म्हणालो,

“मला वाटतं एखादा चांगलं करण्याची कोशिशी करीत असताना,चांगलं करण्याच्या कोशिशीपेक्षा आपल्यात असलेल्या त्रुटिच्या मार्गाने जाऊन,चुका करून, ह्या विस्मयकारी, उत्तेजीत करणार्‍या,सुंदर अशा जीवनाच्या तूफानातून स्वतःची सुटका मरणाच्या दिवसापर्यंत करीत राहिल्यास त्याची ती नादानी ठरेल.”
परत भेटूं असं म्हणत आम्ही जायला उठलो.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, August 14, 2009

सहवास तुझा रिझवी माझ्या जीवाला

तुला मिळवूनी मिळविले सार्‍या जगताला
फुलाला खुलवूनी खुलविले सार्‍या बगिच्याला

तू सूर्य अन मी सूर्यमुखी रे सजणा
कसा जाईल दिवस माझा तुझ्याविणा
सहवास तुझा रिझवी माझ्या जीवाला
तुला मिळवूनी मिळविले सार्‍या जगताला

विलक्षण असती हे अनुबंध सजणा
बंध बांधले तुझे न माझे धाग्याविणा
हातात घेऊनी हात जाऊया फिरायला
तुला मिळवूनी मिळविले सार्‍या जगताला

न होवो कधीही अपुली ताटातूट रे
तू माझा दिवा तर मी तूझी वात रे
विझविली तर विझेल दे तिला जळायला
फुलाला खुलवूनी खुलविले सार्‍या बगिच्याला

तुला मिळवूनी मिळविले सार्‍या जगताला
फुलाला खुलवूनी खुलविले सार्‍या बगिच्याला


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, August 11, 2009

अद्भुत प्रकाराचा अनुभव.

“मला त्या जागा शोधण्यासाठी एव्हरेस्टवर किंवा ऍमॅझॉनच्या जंगलात हा अवर्णनीय अनुभव घ्यायला जायला नको.”

फास्कूच्या घरी मी खूप दिवसानी गेलो.खरं त्याचं नांव पास्कल.पण आम्ही सर्व त्याला फास्कूच म्हणायचो.तशी मला समुद्राची ओढ लहानपणापासूनची.फास्कू हा कोळी जमातीतला. समुद्र ही त्याची कर्मभुमी.माडाच्या झावळ्या शिवून त्याची झापं बनवून ती झापं झोपडीवर शाकाहरतात.आणि झोपडीच्या आत ह्या झापांच्या आडोशाच्या भिंती करून खोल्या बनवतात.बाहेर उन खूप असलं तरी झोपडीच्या आत एकदम थंड वाटतं.
झोपडीच्या आजूबाजूला बांबूंची तिरकांडी उभी करून एकपदरी सुंभाच्या दोर्‍या बांधून पिळाच्या चिमटीत बांगडे,तारल्या किंवा कोलंबी अडकवून कडकडीत उन्हात सुकायला ठेवतात. त्याचे सुके बांगडे,सुक्या तारल्या किंवा सुकी सुंगटं तयार होतात.कोकणात समुद्रात बोंबील आणि पापलेटं औषधाला सुद्धा मिळणार नाहीत.बोबंलासारखा एखादा गिळगीळीत मासा जाळ्यात आला तर मास्यांची निवड होत असताना त्याला वाळूत फेकून देतात. त्यामुळे मुंबईला वेसाव्याला दिसतात तसे इकडे सुके बोंबील कदापी नाहीत.
सुका बांगडा चूलीत भाजायला टाकून कोकणात लोक जेवायला बसतात.त्याच्या वासावरच भूक लागून अर्ध जेवण होतं.मग कांटा काढून तो बांगडा सोलून खोबर्‍याच्या तेलात फासून ताटात वाढल्यावर उरलेलं अर्ध जेवण होतं.

फस्कूच्या घरी गेलो तेव्हा तो काही घरी नव्हता.म्हणजे मग त्याला शोधून काढायचं दूसरं ठिकाण म्हणजे किनारा.किनार्‍यावर गेल्यावर सगळेच कोळी लांबून सारखेच दिसतात.वरून उघडे बंब,खाली त्रिकोणी लंगोटी.पार्श्व भाग पुरा उघडा.गळ्यात जड सोन्याची चेन,आणि तोंडात पानाचा तोबरा.ही सर्वांचीच रहाण्याची स्टाईल असते.मला पाहून फास्कू खूप आनंदला.
“काय बामणा खूप दिसानी आठवण काढून इलंस?”
असं म्हणून त्याने माझं स्वागत केलं.
“चल घरा जांवया.इल्ली इल्ली काजूची मारूंया.आणि गप्पा करूंया.”

मला हंसताना पाहून म्हणतो.
“हंसतंस कित्याक?हल्ली बामण सुद्धा इटांबलेत.माशे मटाण आणि घुटूं घेतल्या शिवाय तेंची उंडी नाकाच्यावर जाऊंची नाय.”
“अरे फास्कू मी सोवळा ब्राम्हण आहे रे.अजून मी विटंबलो नाही.फॉरेनला असलो तरी वरण भात तूप आणि लिंबाची फोड हवीच.”
घरच्या वाटेवर असतानाचे हे संवाद चालले होते.फास्कू माझ्याबरोबर कॉलेजात होता.घरचा श्रीमंत म्हणून त्याच्या वडलानी त्याला खूप शिक म्हणून मुंबईला पाठवलं होतं.शिक्षण पुरं झाल्यावर नोकरी करण्याची त्याला जरूरी नव्हती.परत आपल्या वाडवडीलांच्या व्यवसायात जावंस वाटतं अस मला बरेच वेळा म्हणायचा.
काजूची मारून झाल्यावर फास्कू रंगात आला.जेवायला अजून दोन तास होते.फास्कूला चमत्कार,अद्भूत प्रकार असल्या विषयावर लय दिलचस्पी.
मीच विषय काढून त्याला म्हणालो,
“फास्कू अद्भुत प्रकारावर तुझा विश्वास आहे का रे?”
“आता ह्या सांगताना तुझ्याशी मालवणीत बोलून चलूचा नाय.” इती फास्कू.
मला म्हणाला,
“काही अद्भुत प्रकार होणं ह्यावर माझा विश्वास आहे.मग तो अद्भुत प्रकार निसर्गात होवो अथवा आपल्या आयुष्यात होवो.
माझ्या आतापर्यंतच्या जीवनात मी अद्भुत गोष्टी पाहिल्या आहेत.पण सर्वात अद्भुत गोष्टी माझ्या जवळच्या परिसरात झाल्या आहेत.अलीकडे माझ्या समुद्रकिनार्‍याच्या वातावरणात जिथे मी आता कायमचा असतो त्याबद्दल मी म्हणतो.”
उन्हाळ्यात ह्या किनारपट्टीवर मासे पकडणारे कोळी गर्दी करून असतात.त्यांचे पडाव, खपाटे. त्यांची जाळी आणि होड्या.त्या मोठमोठाल्या मासे घेऊन जाण्यासाठीच्या बांबूच्या टोपल्या.त्यांच्या रंगीबेरंगी साड्या नेसलेल्या बायका. वाळूत थबकट मारून एकमेकाशी खेळण्यात गुंग होऊन गेलेली त्यांची उघडी नागडी पोरं.हे दृश्य बघून मजा येते.
दूरवर समुद्र जास्त खोल झालेला आहे तिथे मास्यांची रापण भर समुद्रात टाकून पकडलेले मासे जाळ्यातून टोपल्यात टाकण्याचं काम किनारा येईपर्यंत करीतकरीत येणार्‍या होड्या दिसतात.
मी फास्कूला म्हणालो,
“तुम्ही कोळी उन्हाळात अगदी बिझी असता आणि पावसाळ्यात काय करता रे?”
” एकदा पावसाळा चालू झाला की सर्व संपलं.ह्या सगळ्या होड्या आता माडांची झापं विणून बांधलेल्या आडोश्यात ठेवल्या जातात.आणि पावसाळा संपेपर्यंत आम्ही कोळी आराम करतो. काही जण जाळी विणतात कधी कधी काही लोक पोट भरण्यासाठी इतर व्यवसाय करतात.”
मी फस्कूला म्हणालो,
“पावसाळ्यात समुद्रकिनार्‍यावर जायला मला विशेष मजा येते. पावसाळ्यात किनार्‍यावर मासे सापडत नसल्याने बरेच़से पक्षी कुठेतरी किनार्‍यावर येऊन झाडावर किडे मकोडे खाऊन रहातात.पण काही रानटी पक्षी भर पावसात खवळत्या समुद्राच्या पाण्यावर तरंगणार्‍या लहान मोठ्या मास्यांवर गुजराण करतात.
“जीवो जीवस्य जीवनम” ह्या उक्तिनुसार हे मोठमोठे कर्कश आवाज करणारे पक्षी, दिसला मासा का एखाद्या बाणासारखे तीर मारून त्या मास्याला चोचीत धरून उंच आकाशात भरारी मारताना आणि चोचीतला तो मासा जीव वाचण्यासाठी जीवाचा आटापीटा करून त्याच्या चोचीतून निसटण्यासाठी करीत असलेली धडपड करताना पाहून कुणाची कीव करावी जीव जाणार्‍या मास्याची की भुकेने व्याकूळ झालेल्या पक्षाची हेच कळत नाही. भर पावसात किनार्‍यावर येऊन हे दृश्य बघायला मला खूप आवडतं.”
हे वर्णन ऐकून फास्कू खूश झाला.मला म्हणाला,
“तुम्ही शिकलेले बामण साहित्यात बोलता.हे तू वर्णन केललं दृश्य आम्ही नेहमीच पाहतो. पण असं आम्हाला समजावून सांगता येत नाही.खरंच पावसाळ्यातला सीन तू उभा केलास.”
मी म्हणालो,
“फास्कू,उगाचच हंबल होऊन बोलू नकोस.तू बामणाला मागे टाकशील, एव्हडं ज्ञान पाजळशील. आता तू आपला ह्या व्यवसायात पडून वेळ घालवतोस पण आपण कॉलेजात होतो त्यावेळी तू वकतृत्व स्पर्धेत वरचा नंबर घ्यायचास. सांग,सांग मला तुझे अद्भुततेबद्दलचे विचार ऐकायचे आहेत.”
काजूची जरा उतरली असं दिसलं.आता मुडमधे येऊन पास्कल म्हणाला,
ह्या अद्भुततेतूनच जगाचं संरक्षण होत असतं असं मला वाटतं. अद्भुतता ही नेहमी उजाड, निर्जन वनप्रांतातच होत असते असं लोक चुकून मानतात. ऍमॅझॉनच्या खोर्‍यात किंवा एव्हरेस्टवर कसलेही बंधन नसलेली अद्भुतता असते.पण मला वाटते ती अद्भुतता कुठेही होऊ शकते.ती जंगलातही दिसेल किंवा घराच्या मागच्या परिसरातही दिसेल.ही अद्भुतता फक्त जागेशी निगडीत नसते.ही अद्भुतता एक संवेदना आहे.कुणाची ज्यावेळी कमीत कमी अपेक्षा असते त्याच वेळी हिचा उदय होतो.”
“तुला ह्या अद्भुततेचा खरा अनुभव आला आहे का?”
असं मी विचारल्यावर म्हणाला,
“तेच तर तुला मला सांगायचं आहे.तू विश्वास ठेव किंवा नको ठेवूस.
माझ्या कुटूंबात माझ्या जीवनातल्या दोन अद्भुत गोष्टी झालेल्या मी अनुभवल्या आहेत.
माझे आजोबा दिवंगत होताना त्यांचे हात मी माझ्या हातात घेऊन राहिलो असतानाचा तो अनुभव.मी त्यांचे शेवटचे श्वास ऐकले आहेत.ते श्वास खूप जड होते आणि मी त्यांचा हात एव्हडा गच्च धरला होता की त्यांच्या हृदयाचे शेवटचे ठोके मला भासत होते.
त्या दिवशी माझ्यात काहीतरी उचंबळून आलं.कहीतरी खोल खोल, पाश्वीक, अनपेक्षीत, काहीतरी जे मी कधीच अनुभवलं नव्हतं असं,आणि नंतर सहा वर्षानंतर तसंच अनुभवलं जेव्हा मला मुलगी झाली.
ह्या मुलीच्या जन्मापूर्वी बर्‍याच लोकानी मला चेतावणी दिली होती.माझ्या जीवनात काहीतरी फरक होणार आहे.त्या म्हणण्याचा आशय असा की माझं जीवन आजोबा गेल्याने नीरस होणार. पण जे घडलं त्यात कहीही नीरसपणा नव्हता.माझ्या चिमुकल्या मुलीचं जन्मणं,आणि जीवनाच्या उत्पतिचं ते अद्भुत रुदन कानात पडणं आणि त्या चिमुकल्या बाळाचे चिमुकले हात डोक्याकडे वर उंचावले जाऊन जणू जीत झाल्याचं प्रदर्शन पहाणं. ही घटना होता होता मी एक तीव्र प्रवाहाचा आवेश अनुभवला.

खरंच तो एक शारिरीक अनुभव होता त्यात गुदगुदल्या होत्या,सर्वांगावर कांटा आला होता. पण त्यात आणखी काहीतरी होतं.एक अद्भुत झोत होती. हानी नंतरहोणार्‍या लाभाचा तो प्रकार होता.
मला वाटतं जीवन मरणाच्या ह्या घटना आपल्या मौलिक स्वत्वाशी दुवा ठेवतात.आठवण करून देतात की रोजच काहीतरी अद्भुत होण्यासाठी छपून राहिलेलं असतं.आणि ते होऊन गेल्यावर आपण आपल्या सामान्य जीवनाकडे परततो पण बदलाव होऊन आणि आवेशात येऊन परततो.”
फास्कूचा हा अनुभव ऐकून मी त्याला म्हणालो,
“लोक अद्भुत गोष्टी पाहायला जगाची सफर करतात.रोजच्या जीवनात असं काही दिसणार नाही.निसर्गाकडूनच त्याच्या अपेक्षा असल्याने ते निसर्गाच्या सानिध्यात जायला कष्ट घेतात.जे त्याना त्यातून आकलन होतं ते पुस्तकात लिहीतात.तुला तर समुद्रकिनारी राहून हे सर्व आकलन झालं आहे.”
“फास्कू भुसांक तयार आसां,चला आता उठां”
फास्कूच्या आईने जेवण तयार आहे असं सांगीतलं.

“जरी मी ह्या अद्भुत जागांच्या शोधात राहिलो तरी मला माहित आहे,मला त्या जागा शोधण्यासाठी एव्हरेस्टवर किंवा ऍमॅझॉनच्या जंगलात हा अवर्णनीय अनुभव घ्यायला जायला नको.
ह्या इथे जीथे माझा आवडता समुद्रकिनारा आहे,जीथे मी सुरवातीला माझ्या आईचा हात हातात घेऊन चाललो,आणि नंतर जीथे माझ्या आजोबांच्या अस्थी सोडल्या त्या तीथे माझ्या घराच्या जवळच्या ह्या अद्भुत घटना आहेत.”
फास्कू हे सगळं गंभीर होऊन बोलत होता.
आणि आता ह्याच समुद्रकिनार्‍यावर मी रोज माझ्या मुलीचा हात धरून इथे फिरायला येतो, मनात गुपचुप आशा करतो की माझी मुलगी जेव्हा आता माझ्यासारखी कमीतकमी अपेक्षा करीत असेल तेव्हा तिच्याही आयुष्यात त्या अद्भुत घटना आपणच वर उठून येतील.”
फास्कूच्या आईने केलेली कोलंबीची आमटी,आणि तळलेले बांगडे खाण्यासाठी पोटात कावळे कांव कांव करीत होते.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, August 9, 2009

माझ्या भूताला माझे धन्यवाद.

“मी भूताना आता मानू लागली.जेव्हा मला हवं त्यावेळी ते नेहमीच माझ्या जवळ असतं.”

“लेखिका सौ.मालती मुकुंद प्रभू”
असं लेखाच्या खाली नांव असलेला एक लेख मी अलीकडेच एका लोकल मासिकात वाचला.गोष्ट भूताची होती.आणि वातावरण आणि परिसर कोकणातला होता.
कोकणात भूताखेताच्या,देवचाराच्या,संबंधी,खवीसाच्या आणि मुंज्याच्या गोष्टीना तोटा नाही. फार पूर्वी कुणावरही अन्याय झाल्यावर तो अन्याय सहनशिलतेच्या मर्यादा ओलांडून गेला की त्याची परिणीती शेवटी जीव देण्यात व्हायची.बहुदा हे अन्याय बालविधवेवर,नव्या लग्न करून आलेल्या सूनेवर,”वेडसर” म्हणून आपआपसात ठरवलेल्या एखाद्या ऐन तारूण्यातल्या मुलावर किंवा मुलीवर आणि सरतेशेवटी म्हातारपणाला कंटाळून जीव नकोसा झालेल्या बाईवर किंवा बुवावर व्हायचे.तसंच जीव देण्याचं सोपं आणि इनस्टंट साधन म्हणजे खोल विहीर असायची.बरेच वेळा ही विहीर पडीक परिस्थितीतली असायची.कधी कुणी त्या विहिरीतल्या पाण्याचा वर्षानुवर्षे वापर केलेला नसायचा.पाण्यात जवळपासच्या झाडांचा पालापाचोळा पडायचा आणि पाण्याला दुर्गंधी असायची.कीर्र रानातली ही विहीर अशा ह्या पीडीत लोकांना जीवाचा शेवट करायला उपयुक्त वाटली तर नवल नाही.पु.लं.नी आपल्या लेखनात कोकण्यातल्या भुताखेताच्या गोष्टींवर सुंदर विचार लिहिले आहेत.

हे सगळं लिहिण्याचं कारण की,वर उल्लेख केलेली लेखिका ही माझी सख्खी मामेबहिण आहे हे मला अलीकडेच कळलं.आणि ते सुद्धा योगायोगानेच कळलं.
मालतीने लिहिलेली एक भूतावरची गोष्ट मी वाचत होतो.गोष्टीतलं सर्व वातावरण माझ्या आजोळचं होतं.एव्हडंच नाही तर त्या गोष्टीतली पात्रं आणि घटना माझ्या स्मृतीशी जूळत होत्या. एका पुस्तकपंढरीच्या मेळाव्यात माझी आणि मालतीची गाठ पडली.तिचं पुस्तक विकत घेणार्‍याच्या पुस्तकाच्या कॉपीवर ती सही देत होती.


खूप वर्षानी मी तिला पाहत होतो.दुडत्या अंगाची, सोन्याच्या बांगड्यानी दोन्ही हात भरलेले, मोठ्ठं कपाळावर कुंकू लावलेली, सुबक ठेंगणी,हिरवी पैठणी नेसलेली,गोरी पिठ्ठं बाईला बघून ही मालूच असावी असं माझ्या मनात आलं.आणि ते खरं ठरलं.
मग काय विचारता?रेवडीवाल्याला गंडेरीवाला भेटल्यासारखं झालं.वेळ काढून मी तिच्या घरी एकदा गेलो.आणि मग गप्पांना सुमारच राहिला नाही. आजोळच्या बालपणातल्या आठवणीत राहिलेल्या प्रसंगाना चर्चेत आणायला उतच आला.
मी मालूला विचारलं,
“तू केव्हा पासून भूतावर विश्वास ठेवायला लागलीस?”
“मी कधीच भूताखेतावर विश्वास ठेवला नव्हता.पण मला त्यांच्याशी बोलायला शिकवलं गेलं होतं.माझी आई मला नेहमी आठवण करून द्यायची, की मला ती देणगी आहे.
हे सर्व उदयाला आलं जेव्हा मी चार वर्षाची होते तेव्हा एकदा माझ्या आईकडे मी एक खोटं बोलले होते.
त्याचा संदर्भ सांगायचा झाल्यास,माझ्या आईच्या ध्यानात ती घटना होती.मी एक दिवशी रात्री झोपायला जायला तयार नव्हती.मी आईला म्हणाले की आपल्या न्हाणीघरात भूत आहे.
माझ्या आईला हे ऐकून हर्षच झाला.तिला वाटलं की मी भूतांबद्दल गोष्टी सांगणारं त्याचं एक माध्यम आहे.
त्यानंतर कधीही अकल्पीत असं काही झालं की आई मला विचारायचीच.एकदम अचानक वार्‍याची झुळूक आली किंवा एखादं शिंक्यावर ठेवलेलं भांडं अचानक पडलं की आई मला म्हणायची,
“ती तिथे आहे!”
ती म्हणजे माझी चुलत आजी.
मी जेव्हा अगदी लहान होते तेव्हा मला आईने सांगितलं होतं की माझ्या चुलत आजीने विहिरीत उडी मारून जीव दिला होता. तिला मुल नव्हतं आणि आमची पंजी-म्हणजे तिची सासू -तिला खूप छळायची.माझी आई तेव्हा दहाएक वर्षाची होती.आणि तिने ही घटना डोळ्याने पाहिली होती.”
मी मालूला म्हणालो,
” मला हे आठवतं.तुझ्याच आईने मलाही ही गोष्ट सांगितली होती.मला वाटतं तुझ्या आईवर त्या घटनेचा जबर परिणाम झाला असावा.”
“अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं.पुढे तर ऐक”
असं म्हणत मालू रंगात येऊन पुढे सांगू लागली,
“मी ज्यावेळी सोळावर्षाची झाले त्यावेळी माझ्या थोरल्या भावाला भ्रम झाला होता.मला आठवतं माझी आई माझ्या हातापाया पडून मला सांगायची की चुलत आजीला सांग की भावाला बरं कर.माझा भाऊ काही वर्षानी वारला आणि त्यानंतर माझी आई त्याच्याशी बोलायला मला सांगायची.मला आठवतं मी त्यावेळी तिला विरोध करून म्हणायचे,
“मला माहित नाही कसं (बोलायचं)”
माझी सख्खी आजी त्यानंतर सहा महिन्यानी वारली.माझी आई माझ्या खणपटीलाच लागली.तिला हवं होतं ऐकायला की माझी आजी-म्हणजे तिची आई-शेवट पर्यंत तिच्यावर-आईवर- प्रेम करायची.
तिला हवं असलेलं उत्तर मी तिला सूचित करायची,मी म्हणायची,
“होय नेहमीच (म्हणायची)”
“पण अजून तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस”
अशी मी तिला परत आठवण करून दिल्यावर मालू म्हणाली,
“तेच तर मी तुला सांगणार आहे.
अलीकडे मी काल्पनीक कथा लिहायला लागल्या पासून एकदा मी एक गोष्ट एका बाईची लिहिली होती.तिने विहीरीत उडी घेतली होती. नवर्‍याच्या जाचाला कंटाळून तिने कसा जीव दिला ही ती गोष्ट होती.माझ्या आईने ती गोष्ट वाचल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं.
आता माझ्या आईला खरं ते कळलं.माझी चुलत आजी माझ्याशी बोलून तिने मला ही खरी गोष्ट सांगितली असं तिला वाटायला लागलं.
“नाहितर माझी चुलत आजी अपघाताने न मरता जीव देऊन मेली हे तुला कसं कळलं असतं?”आईने मला विचारलं होतं.
“ती इथेच आहे” असं ती वर म्हणाली.
मी तिला शपथ घेऊन सांगतलं,
“मला ठाऊक नाही.”
नंतर काही वर्ष आणखी काही अवांतर घडलेल्या गोष्टींचं स्पष्टीकरण माझ्या लेखनात येत गेलं.हे माझ्याहून मला माहित नसावं. उदा.जागा,आणखी एखादी व्यक्ती,एखादं गाणं वगैरे. भूतांच्या गोष्टीत काही संकेत एव्हडे विपुल असायचे की कधी कधी मला माझंच हंसू यायचं. माझ्या नशिबाचे मी आभार मानण्यापेक्षा मी माझ्या भूतांचेच आभार मानायचे.”

मी मालूला परत म्हणालो,
“पण तू खरंच भूतावर विश्वास ठेवतेस का?”
परत,परत तोच प्रश्न मी विचारला हे पाहून मालू हंसत हंसत मला म्हणाली,
“पांच वर्षापूर्वी मी खरोखरंच एक भूत पाहिलं.आणि ते माझ्याशी बोललं पण.
ती माझी आई होती.प्रत्यक्षापेक्षा तिचं डोकं दसपट मोठं होतं. आणि ते चमकदार प्रकाशासारखं स्पंदन करणारं थ्री-डायमेन्शल चलचित्र होतं.मी आश्चर्यचकीत झालेली पाहून माझी आई मला हंसत होती.ती माझ्या अगदी समिप आली.माझ्या छातीत एखादा गुद्दा मारल्यासारखं मला वाटलं.माझ्या फुफ्फुसातला श्वास निघून जाऊन काहीतरी सुनिश्चित गोष्टीने माझी छाती भरली होती.त्यात प्रेम होतंच आणखी शांती आणि आनंद होता.आणि त्यामुळे प्रेम शांती आणि आनंद हे सगळं सारखंच आहे असा माझा समज झाला.
आनंद प्रेमातून मिळतो,शांती प्रेमातून मिळते.
पुढे ऐक,माझी आई काय म्हणाली,
“आता तुला माहित झालं!”
माझी आई त्यावेळी मला म्हणाली.
मी भूताना आता मानू लागली.जेव्हा मला हवं त्यावेळी ते नेहमीच माझ्या जवळ असतं. माझी आई, माझी चुलत आजी, माझी भूतं.”
मालतीचं हे सर्व स्पष्टीकरण ऐकून मी तिला म्हणालो,
“तू काही म्हण.कोकणातलं त्यावेळचं वातावरण भूताना पोषक होतं.ते मोठे मोठे पिंपळ,आणि वार्‍याने सळसळणारी त्यांची पानं.लाजाळूची झुडपं आणि स्पर्श झाल्यावर ती चटकन मिटणारी त्या पानांची धडपड.उंच माडाच्या वरल्या टवशीवर माडी साठी बांधून ठेवलेली ती मातीची मडकी माणसाच्या डोक्यासारखी भासून त्याला कुणी तरी म्हणायचं की संतापून भूत माडावर चढून बसलंय.आमावस्येच्या रात्री वडाच्या मोठ्या मोठ्या एका झाडातून दुसर्‍या झाडात जळत जाणारी चुडताची पेड, असली खरी किंवा कुणी सांगितल्यामुळे खरी वाटणारी दृश्य पाहून आणि आता आठवून तुझ्या सारख्या लेखिकेला भूतांच्या गोष्टी लिहायला चांगलच खुराक सापडलं असं म्हणायला पाहिजे.”
माझं म्हणणं मालूला पटलं असं वाटलं.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, August 7, 2009

संगीतप्रेमी विरेन

“संगीत ही एक विद्युनय भुमि आहे आणि त्यामधे चैतन्य राहतं,अनुसंधान राहतं आणि अविष्कार रहातो.”

कुणी तरी म्हटलंय,
“जेव्हा शब्द नाकाम होतात तेव्हा संगीत बोलू लागतं.”
हे सत्य मी मानतो.संगीत हा कानाला वाटणारा नुसता निनाद नाही.किंवा कानाच्या पटलावर आपटून येणारा नुसता ध्वनि नाही.संगीत हा एक स्वर आहे,औषध आहे, उपचार आहे,संवेदना आहे,बोली आहे,आणि जीवनाचा उगम आणि आवेश आहे. संगीता शिवाय हे जग काळंकूट्ट झालं असतं.नीरस वाटलं असतं.संगीतातून शिकायला मिळतं, प्रोत्साहित व्हायला होतं,संगीत जोडतं,प्रेरित करतं.”

“किती रे,एखाद्या पंडितासारखा बोलतोस?”
असं मी विरेनला उद्देशून म्हणालो.त्याचे वरचे उद्गार ऐकून माझ्या मनात आलं की सामंतगुरूजींचा हा मुलगा नुसतंच त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालत नाही तर आणखी काहीतरी शिकला आहे.
त्याचं असं झालं,सामंतगुरूजीनी जेव्हा गाण्याचे क्लासिस काढले त्यावेळी विरेनचा जन्मसुद्धा झाला नव्हता.सामंतगुरूजी आता बरेच थकले आहेत. त्यांना आता क्लासात जाणं जिकीरीचं झालं आहे.
विरेन त्यांच्या तालमित संगीत शिकून तयार झाला होता.काही वेळा तो महाराष्ट्रात दौरे पण काढायचा. अजूनही काढतो.
माझ्या एका मित्राच्या मुलीला त्याच्या क्लासात संगीत शिकायला जायचं होतं.त्यासाठी भेटायला म्हणून मी विरेनच्या घरी गेलो होतो.

मी त्याला म्हणालो,
“संगीत ही विश्वाची भाषा आहे ते हृदयस्पर्शी आहे.संगीताला स्वतःची अशी भाषा नाही,ते फक्त प्रेमाची भाषा जाणतं.”
माझं हे बोलणं ऐकून मी जणू विरेनला आणखी बोलायला ट्रिगरच दिली.नव्हेतर मला त्याच्याकडून आणखी ऐकायची हुक्कीच आली होती.छान बोलतो तो.
मला विरेन म्हणाला,
“काका,तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलला. प्रत्येक व्यक्ति ती संगीताची भाषा समजते. कुठल्याही भाषेतलं नाटक अथवा चित्रपट असो,त्यातलं संगीत ऐकून कोणही आनंदाने मान डोलवतो.संगीताने एकमेकचा दुवा सांधला जातो.सर्व संगीतप्रेमीना एक गोष्ट मान्य असते ती ही की सर्वाना एकत्रीत करण्याची संगीतात क्षमता आहे. विभिन्न लोकाना एकत्रीत करून संगीत त्यांना आपल्या क्षमतेत सामाविष्ट करून घेतं.

मला वाटतं,संगीत आपले सर्व मनोभाव,आवेश जागृत करतं.संगीतातली वेगळी वेगळी शैली वेगळी उमंग आणते.आवेश आणि संवेदना शिवाय जीवन खूपच कंटाळवाणं झालं असतं. संगीत हृदयातले घाव भरू शकतं,मनात बदलाव आणू शकतं आणि जीव मोकळा करूं शकतं. एखाद्याच्या गौरवाचे दिवस आठवून देऊ शकतं.”
विरेनबरोबर चर्चेला बराच रंग चढला होता.मी त्याला म्हणालो,
“मला एखादं उदाहरण देऊन सांगितलंस तर बरं वाटेल.”

जरा विचारात पडून मला विरेन म्हणाला,
“समजा एखाद्या शाळेच्या मैदानकडून जाताना बॅन्ड वाजवीत शाळेतली मुलं कवायीत करीत असताना पाहून एखद्या सैनिकाला त्याच्या तरूणपणातले गौरवाचे दिवस आठवून त्याच्या चेहर्‍यावर हास्य निर्माण करायला ते बॅन्डचं संगीत कारणीभूत होतं.एखादा ऑर्केस्ट्रा ऐकून आपल्या जुन्या आठवणी येऊन संगीत डोळ्यात पाणी आणूं शकतं. अंथरूणावर निपचित पडलेल्या एखाद्या रुग्णाला सुंदर गोड गळ्यातलं गाणं ऐकून संगीत त्याला उत्साहित करूं शकतं. “
हे त्याचं उदाहरण ऐकून मला कोकणातली आठवण आली.मी त्याला म्हणालो,
“तुझं हे उदाहरण ऐकून माझं मन कोकणात गेलं.कारण कोकणातला निसर्ग रमणीय आहे.आणि तो रमणीय होण्याचं एक कारण संगीत आहे.”
माझं हे म्हणणं ऐकल्यावर विरेन आपला अनुभव सांगण्यासाठी मला मधेच अडवीत हात करून म्हणाला,
“काका,ह्या उन्हाळात वेळ काढून मी आणि माझा एक मित्र अलीकडे कोकणात गेलो होतो. वेंगुर्ल्याहून खानोलीला हायकिंग करीत-घाटी चढत- गेलो होतो.खानोलीचा फेसाळ समुद्र पाहून आणि अजुबाजूच्या डोंगरावरचं रान पाहून मला संगीताची आठवण आली.
निसर्ग म्हणजेच संगीत आहे.निसर्ग संगीताने परिपूर्ण भरला आहे.झाड्यांच्या पानांची सळसळ,मधुमाशांचं गुणगुणणं,भिणभीणत्या पहाटे समुद्राच्या लाटांचं किनार्‍यावर वाळूत कोसळून झालेला तोच तोच आवाज,निरनीराळ्या पक्षांचं गान,भर उन्हाळ्यात जंगलात लागलेल्या आगीचा चटचट होणारा आवाज,आणि फांद्या मोडून खाली पडणार्‍या झाडांचा कोसळतानाचा आवाज,असे एक ना अनेक न संपणार्‍या यादीत लिहून ठेवणारं निसर्गाचं संगीत वाजतच असतं.हे संगीत -किंवा त्याला आवाज हवं तर तुम्ही म्हणा- परिसरातल्या वातावरणात मनोभावांची भर घालतात.”

मलाही ह्या विरेनच्या निसर्गाच्या संगीताच्या वर्णनावरून एक सांगावं असं वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“विरेन, तू जे आता कोकणातल्या डोंगरातल्या परिसरातलं वातावरण आणि समुद्राचा आवाज ह्याचा निसर्गाचं संगीत म्हणून उल्लेख केलास,आणि जरी संगीत वेळोवेळी बदलत असलं तरी संगीत कालातीत आहे.संगीत हे एक अभिव्यक्त करण्याचं साधन आहे,वाणी आहे. गाण्यातून राजनितीक निवेदन करता येतं,मदतीची हांक देता येते,संगीत त्यामुळे राजकीय वातावरणात बदलाव आणण्याचं निमित्त होऊ शकतं. ह्या जगात बरेच “मौन” लोक आहेत आणि त्यांचा आवाज ऐकला जात नाही.त्यांच्या गार्‍हाण्यांकडे कान दिला जात नाही.ते उपेक्षीत राहतात,बाजूला ढकलले जातात,किंवा त्यांची काळजी घेतली जात नसावी.मला वाटतं अश्या लोकाना संगीताच्या सह्याने ऐकलं जात असावं.”

विरेन म्हणाला,
“मला ह्या तुमच्या विचारावरून एक गोष्ट आठवली.उदाहरण म्हणून सांगतो,एखादा दोन दिवसाचा भुकेलेला रस्त्यावर बसला आहे आणि बाजाची पेटी हीच त्याची संपत्ती आहे. अशा परिस्थितीत त्याचे फाटके कपडे आणि दाढीचे खूंट चेहर्‍यावर बघून कुणीही त्याच्याशी ढुंकून बोलणार नाही.
समजा त्याने त्या बाजाच्या पेटीवर एखादं मधूर गाणं वाजवायला सुरवात केली की त्याच्या भोवती घोळका होईल.काही पैसे देतील.काही त्याच्याकडे ध्यान देऊन बघतील.तो सहाजीकच संगीताचा उपकृत होईल.म्हणून म्हणतो,
संगीत हा एक सुटकारा आहे.नेहमीच्या तनावपूर्ण जीवनापासून दूर राहण्याचा तो एक सुटकारा आहे.
संगीत हे जणू आत्म्याला संदेशासारखं आहे.
कुणीतरी महान संगीतकाराने म्हटलंय,
“संगीत ही एक विद्युनय भुमि आहे आणि त्यामधे चैतन्य राहतं,अनुसंधान राहतं आणि अविष्कार रहातो.”

विरेनबरोबर संगीतावरची चर्चा ऐकून मी माझ्या त्या मित्राच्या मुलीचे मनात धन्यवाद मानले.तिचं निमीत्त करून मी ह्या संगीत पंडीताला भेटायला आलो होतो पण कुठचंही वाद्य न वाजवता आणि न ऐकवता संगीताच्या महतीचे विरेन कडून धडे शिकलो.
म्हणून जाता जाता विरेनला म्हणालो,
“अरे,ती मुलगी तुझ्याकडे संगीत शिकायला येईल तिला तुझ्याकडून शिकलेले संगीताच्या महतीचे धडे मी शिकवीन.पण तू मात्र तिला कसं वाद्य वाजवायचं आणि कसं गायचं हे शिकव.”
“म्हणजे काय काका?”
असा प्रश्न विचारत माझ्या जवळ येऊन विरेन मला कडकडून भेटला.
बोलून चालून संगीतप्रेमी विरेन होता तो.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, August 5, 2009

वेदना.

माझं आणि शुभदाचं आपल्याला होणार्‍या वेदना ह्यावर चर्वीचरण चाललं होतं.तिची आई म्हणाली तुम्ही चर्चा करा तो पर्यंत मी अपना बाझारमधे जाऊन येते.
मी शुभदाला म्हणालो,
“वयाबरोबर वेदना साथ देत असतात.लहानपणचं आठवलंस तर कधी कधी आईने जवळ घेऊन घेतलेला मुका आणि जखमेवर केलेली मलमपट्टीसुद्धा वेदना कमी करू शकत नाही.
जसं वंय वाढत जातं,तस तसा आपला सर्वात मोठ्या वेदनेचा अनुभव सुरू होतो तो निकामी झालेल्या गुडघ्यापासून ते उघड्या डोळ्यांना पण दिसणार नाहीत अश्या गहन भावुक वेदना मिळेपर्यंत हा अनुभव वृद्धिंगत होत राहतो.”

जेव्हा जेव्हा शुभदा मला भेटते तेव्हा काहीना काहीतरी जुन्या घटना आठवून आमचं बोलणं होत रहातं.
मी तिला म्हणालो,
“लोक नव्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं ते शिकतात. पण काही वेदनेचे अनुभव जीव मोडकळीला येई पर्यंत विवश करतात. परंतु ह्या वेदना- भले त्याचा काहीही निष्कर्ष येवो- त्या व्यक्तिला संपूर्ण बदलूनही टाकतात. “
हे माझं बोलणं ऐकून झाल्यावर, शुभदा कसलातरी विचार करताना दिसली.पण लगेच मला म्हणाली,
“काका,तुम्ही असं बोलून माझी जूनी आठवण ताजी केलीत.
मला आठवतं दोन वर्षापूर्वी मी आणि माझी आई देवळात गेलो होतो.भटजी आम्हाला म्हणाले की एका- आम्हाला परिचय असलेल्या- मुलीला देवाज्ञा झाली असं आजच त्यांना कळलं.त्या मुलीला आमच्याबरोबर देवळात येताना त्या भटजीने बरेच वेळा पाहिलं होतं. अलीकडे ती आम्हाला भेटली नव्हती.बातमी ऐकून माझी छाती सहाजीक धडधडायला लागली.समय हळू हळू चाललाय असं वाटूं लागलं.त्या मुलीचं नांव ऐकून माझे कान बधीर झाले.माझ्या आईचे डोळे पाणावले.
ती मुलगी माझ्या थोरल्या बहिणीची मैत्रीण होती.हे असं कसं झालं ह्याच्या कित्येक दिवस मी विचारात होते.पूर्वी कधीतरी मला आठवतं एकदा एका प्रवचनात मी ऐकलं होतं की माणसं रडतात ते माणूस गेल्याने रडत नाहीत तर ते माणूस पुन्हा आपल्याला दिसणार नाही म्हणून रडत असतात.
ती मुलगी आशावादी होती,खेळकर होती,दयाशील होती,सच्ची होती.एव्हडंच नाहीतर ती भेटल्यावर दिवस प्रसन्न जायचा.तिचं हंसणं एक प्रकारचं सांसर्गीकहोतं.आम्ही ही तिच्याबरोबर हंसायचो.आणि जेव्हा ती हंसत नसायची तेव्हा समजावं पुन्हा हंसण्यापूर्वीचा तो तिचा थोडासा विलंब होता.तिची आठवण काढणारेफक्त तिच्या मृत्युबद्दलच विचार करीत हे पाहून मी खूपच दुःखी व्हायची.”

मी म्हणालो,
“शुभदा,मला आठवली ती मुलगी.तुझ्या थोरल्या बहिणीबरोबर हंसत हंसत रस्त्यावरून जाताना बरेच वेळा मी आमच्या बालकनीतून तिला पाहिली आहे.तू तिचं वर्णन केलस ते अगदी बरोबर असावं.ही बातमी ऐकून मला पण खूप वाईट वाटलं.”
शुभदालाही खूप वाईट वाटल्याचं मला जाणवलं.कारण ती म्हणते कशी,
” कधी कधी लोकांशी जवळीक करताना हे पूर्व संचित कुणाच्याही लक्षात येत नाही. असंच चालणार असं जो तो गृहित धरून चालतो.आणि शेवटी अश्या तर्‍हेने त्याचं वेदनेत रूपांतर होतं.हे झालं जवळीक करण्याच्या बाबतीत.पण काही वेळा लोकांशी जवळीक करताना आणि त्याबरोबर एखादी जोखिम घेताना त्याचा परिणाम ही वेदनेत होतो.
काका,तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं दिसतं.ऐकते मी.”

“बालपणातल्या वेदना मामुली वेदना असायच्या.जरा आपल्या बालपणात जाऊन डोकावून पाहिल्यास दिसेल जर का आपण काही अविचारपणे केलं आणि जखम झाली,काहीतरी गंमत करताना असं काही अचानक झालं,आणि इजा झाली तर त्या वेदना तात्पुरत्या असायच्या,त्याचा व्रण दिसायचा.आणि तो व्रण कायम राहायचा.”
शुभदाचा त्या घटनेची आठवण येऊन झालेला विरस पाहून मी विषयांतर करण्यासाठी लहानपणांचा अनुभव सांगून तिला शांत करण्याचा प्रयत्न करीत होतो.

पण तिला आणखी काहीतरी सांगायचं होतं.ती म्हणाली,
“मृत्यु ही आकस्मिक दुर्घटना आहे.पण त्या मृत्युच्या पश्चात, व्रण आणि त्याची स्मृती आपल्याबरोबर कायम असते.
ह्या झालेल्या व्रणांना स्मृतीच्या वेदना असं समजून त्या वेदनाकडे पाहिलं जातं. पण मला वाटतं असं वाटून घेऊं नये.ज्यामुळे तो व्रण झाला त्या घटनेची स्मृती असायला हवी. आपल्या आयुष्यात लोक येतात, आपल्याला हवे तेव्हड्या काळासाठी ते आपल्याबरोबर नसतात.अश्या वेळी त्यांनी आपल्याला काय दिलं ह्याचा बहूमान व्ह्यायला हवा.ते सोडून गेले ह्याचा कायमचा आपल्याला विलाप होवूं नये असं मला वाटतं.”
तेव्हड्यात शुभदाची आई अपनाबाजार मधून खरेदी करून आली आणि आमचा विषय तिथेच थांबला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, August 3, 2009

छपवूं कशी ही सारी वादळे माझ्या लोचनी

हलवूं कशी नजर तुझ्या चेहर्‍यावरूनी
येऊं कसा शुद्धीवरती शुद्ध माझी हरपूनी

मेघासम कचपाशाची मेहक तुझी दरवळे
पाजती तुझी लोचने पीत राहिलो पिणे
सांगू कसे सदैव त्या कैफात राहूनी
येऊं कसा शुद्धीवरती शुद्ध माझी हरपूनी

भिती तशीच प्रीति दिसेल माझ्या नेत्रातूनी
लालसा अन मोनोकामना दिसतील निक्षूनी
छपवूं कशी ही सारी वादळे माझ्या लोचनी
हलवूं कशी नजर तुझ्या चेहर्‍यावरूनी

हे तीक्ष्ण कटाक्ष तुझे चंचल होऊनी
कधी रूसतील अन कधी जातील पलटूनी
निभावूं कसा मी तुझ्या संमत्ती वाचूनी
हलवूं कशी नजर तुझ्या चेहर्‍यावरूनी



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, August 1, 2009

शरदाचं चांदणं.

गांवाला आमच्या शेजारीच शरदचं घर होतं आणि त्याच्या शेजारी त्याच्या काकांचं घर होतं. आम्ही सर्व मुलं त्याच्या काकांच्या घरी खेळायला जायचो.हे मला पक्कं आठवतं.
शरदची राहणी अगदी साधी पण विचारसरणी मात्र उच्च होती.त्यावेळी त्याच्या सहवासात असतानाच त्याच्या ह्या वृत्तीचा मला पडताळा आला होता.शरद मुळातच गरीब स्वभावाचा होता.दुसर्‍याच्या भावना आपल्या कडून दुखवल्या जाऊं नयेत म्हणून तो पराकाष्टा करायचा हे माझ्या नजरेतून चूकलं नव्हतं.
आता मला भेटला तेव्हा मला आमच्या बालपणाची आठवण प्रकर्शाने जाणवली.
मी शरदला म्हणालो,
“मी माझ्या लहानपणी तुझ्याकडून खूप शिकत होतो. मला तुझा स्वभाव खूप आवडायचा. पापभिरू म्हणतात तसा तू वागायचास.मला ही त्याचं कुतूहलवाटायचं.पण त्यावर चर्चा करण्या इतकं त्यावेळी समजत नसायचं.पण आता मागे जाऊन पाहिल्यावर ह्या आपल्या वयात बालपणाच्या जीवनाची उजळणी करायला मजा येते.तुला काय म्हणायचं आहे?”

ह्या माझ्या प्रश्नावर शरद बराच खजील झाल्या सारखा दिसला.आणि मला म्हणाला,
“माझ्या बालपणाच्यावेळी झालेल्या विशेष महत्वाच्या नसलेल्या घटनानी माझ्या स्वभावावर झालेले अगदी खोलवरचे परिणाम मला अजून आठवतात.
माझे आईवडिल मला घरातला मोठा मुलगा म्हणून आणि कुटूंबातला महत्वाचा घटक म्हणून आणि जबाबदारीचा हिस्सेदार म्हणून वागवत होते.त्यावेळी माझ्या एक लक्षात आलं की आमच्या कुटूंबाच्या आणि आमच्या काकांच्या रहाणीमानात बराच फरक होता. आणि हे ही लक्षात आलं की माझ्या वडीलांच्या मनावर कसलातरी ताण होता.तसं असलं तरी मला तेव्हडी चिंता वाटली नाही जेव्हडी एका घटनेने माझ्या बाल मनावर त्यावेळी खराच प्रभाव पाडला.”
हे ऐकून मी शरदला म्हणालो,
“तुझे काका आणि तुझी चुलत भावंडं पण फार प्रेमळ असायची.आपल्याला त्यांच्याकडे असलेले खेळ खेळायला मनमुराद मोकळीक द्यायचे.त्यांच्याकडे एक भोंवरा होता त्याला दोरीने गुंडाळून ती दोरी जोराने ओढल्यावर भोंवरा एव्हडी जोरात फिरकी घ्यायचा की फायरब्रिगेडची गाडी आल्यासारखा मोठयांनदा आवाज करायचा.तुला आठवत असेल.मी हे कां लक्षात ठेवलं कारण तुझे काका आपल्यावर कधीही रागवायचे नाहीत.उलट खेळ खेळायला प्रोत्साहन द्यायचे.”
शरदला काकांची ही प्रेमळ वागणूक आवडायची.मला नेहमी म्हणायचा,
“माझे काका आणि काकी आमच्यावर खूपच प्रेम करतात.”
सॉरी,मी तुला सांगताना अडवलं तू काही तरी तुझ्या बाबांबद्दल सांगत होतास”
शरद पूढे सांगू लागला,
“मी माझ्या बाबांना एकदा सहज म्हणालो,
“बाबा,आपल्या काकांच्या घरात मुलांसाठी एव्हडी खेळणी आहेत की ती बघून मी चाटच झालो.”
माझे बाबा हे मी सांगत होतो ते निमुट ऐकत होते आणि त्यांच्या चेहर्‍यावर खेद दिसत होता.माझं सांगून झाल्यावर मला जवळ घेऊन माझ्या डोक्यावर थोपटू लागले.नंतर मला म्हणाले,
“मी तुला एव्हडी खेळणी देऊं शकत नाही म्हणून तू नाराज आहेस का?”
ते ऐकून माझं मन एव्हडं खट्टू झालं की मला तो प्रसंग त्यावेळी मोठी माणसं समजावून सांगतील असं त्यांना सांगता आलं नाही.
त्या प्रसंगात खेदाचा,प्रेमाचा आणि आदराचा अंश होता.
“नको मला मुळीच खेळणी नकोत”
असं मी खूळ्याचा आंव आणून त्यांना म्हणालो.मला वाटतं त्यानंतर ह्या क्षणापर्यंत बाह्य बडेजाव आणि छानछोकीपणाकडे मी दुर्लक्षच केलं.”
मी म्हणालो,
“तू कधी विचारात असलास,कधी चिंतेत असलास की तडक आपल्या गावातल्या नदीच्या किनारी विशेष करून चांदण्या रात्री जाऊन त्या वडाच्या झाडाजवळच्या मोठया खडकावर बसायचास.तुझ्या शोधात असताना मला तू हटकून तिकडे आढळायचास.आठवतं तुला?तू असं का करायचास?”
ह्या माझ्या एका मागून एक विचारलेल्या प्रश्नाना ऐकून शरद म्हणाला,
“हो ती संवय मी मला लावून घेतली होती.त्याचं मुख्य कारण मला त्या वडाच्या झाडाजवळच्या खडकावर आणि त्या नदीच्या खळखळणार्‍या पाण्याच्या आवाजात मन एकाग्र करायला बरं वाटायचं.शुभ्र चांदण्याच्या प्रकाशात मी वेडा होऊन जायचो.असं मी बरेच वेळा केलंय.एकदाची मी तुला गंमत सांगतो.

मला आठवतं मी त्यावेळी अठरा वर्षाचा असेन.आमच्या गावाच्या नदीच्या कडे कडेने मी फिरत फिरत जात होतो.
माझं मन अनेक प्रश्नांनी तुडूंब भरलं होतं.शेवटी मी त्या वडाच्या झाडाजवळच्या खडकावर बसलो.आणि माझ्या मनात एका मागून एक प्रश्न यायला लागले.
जीवनाचा अर्थ काय? आणि जीवनाचं प्रयोजन काय? समाज म्हणजे तरी काय?आणि सूख कसं मिळवावं? न्याय कसा पर्याप्त होतो?भाग्यावर विश्वास ठेवणं उचित आहे काय?

खूप रात्र झाली होती.नदी घों घों करीत वाहत होती.माझ्या प्रश्नांचा विचार करीत मी त्या नदीच्या उसळलेल्या प्रवाहाकडे टक लावून पहात होतो.चांदणं लख्ख पडलं होतं.नदीच्या लहरींच्या पृष्टावर एक लहानशी झाडाची डहाळी वरखाली होताना पाहिली.काही कारणास्तव माझे सर्व प्रश्न त्या खळबळणार्‍या पाण्याच्या पृष्टावरच्या वरखाली होणार्‍या डहाळीत एकत्र झाल्यासारखे वाटू लागले.मी माझ्या चिंतनात तल्लीन झालो होतो.

जेव्हा मी माझ्या दिवास्वप्नातून जागा झालो,तेव्हा मला माझ्या जीवनात मोठ्या प्रमाणात भाग घेतलेल्या तत्वविचारांना हूडकून काढायचं होतं.जीवन शेवटी संपतं. लोक त्या वरखाली होणार्‍या डहाळी सारखे असतात. ते अनिच्छापूर्वक जन्म घेतात.ते अनिच्छापूर्वक जीवन जगतात.आणि ते अनिच्छापूर्वक जीवन संपवतात. ज्यांचं रूप-रंग जे स्वतः निर्माण करतात त्यांना त्यापासून वंचित केलं तर त्यांची खरी मुल्यं दिसून येतात.नाममात्र गोष्टींसाठी जे लोक धडपडत असतात त्यांना फक्त दयनीयता प्राप्त होते.मात्र जीवनातल्या सुखाच्या मार्गाच्या जे शोधात असतात त्यांना तो मिळतो.जर का मी अहंभाव आणि लालसा फेकून दिली आणि स्नेह,सहयोग, चांगुलपणा, दया आणि न्याय ह्यावर माझं लक्ष केंद्रित केलं तर सुख माझ्या आवाक्यातलं होईल असं मला वाटतं.”
शरदचं हे चिंतन ऐकून मला खरोखरच अचंबा वाटला.
मी म्हणालो,
“आता तू शेवटी कोणत्या निर्णयाला आला आहेस.तुझ्या पत्नीकडे बघून आणि तुझ्या मुलांकडे बघून तुझा सुखी परिवार आहे असं म्हणण्याने मी कसलं धारिष्ट करतोय असं मला वाटत नाही.”
शरद माझा हात त्याच्या हातात घेऊन मला म्हणाला,
“तुझं हे म्हणणं ऐकून मला आनंद होतो.आपल्या बालपणाच्या सोबत्याबरोबर ह्या वयात जुन्या आठवणीना जो उजाळा येतो तो अवर्णनीय आहे.
आता तू विचारतोस तर माझा निर्णय मी तुला सांगतो.
ह्या माझ्या तत्वविचाराचा माझ्याशी आणि इतरांशी असलेल्या माझ्या वागणूकीवर निर्णायक प्रभाव झाला आहे.ते एक माझ्या मधून मला मुक्त करण्याचं वरदान होतं. त्यामुळे मला हवं तेव्हडं सुख मिळालं.आता माझ्या मुलांनी ह्या स्वाधीनतेची प्रशंसा करून ती त्यांच्यासाठी त्यांनी जिंकावी अशी मी आकांक्षा करतो,तुला कसं वाटतं?”
आता तू पण विचारतोस म्हणून सांगतो,
“तुझे हे तत्वविचार आणि ते चिंतन ह्याला प्रामुख्याने ती नदी,ते वडाचं झाड,ते खडक आणि ते खळखळणारं नदीचं पाणी कारणीभूत आहे.आणि त्याहीपेक्षां ते चांदणं!
म्हणून मी त्या चांदण्याला “शरदाचं चांदणं” असं म्हटलं तर वावगं होणार नाही”
आणि आम्ही दोघे मनापासून खळखळून हंसलो.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com