Friday, May 30, 2008

तू यावे,तू यावे,तू यावे

गुणगुणे सारी ही हवा
खणखणती साऱ्या ह्या दिशा
मन माझे आनंदूनी बोले
तू यावे,तू यावे,तू यावे

झुमझुमती सारे ऋतू
घळघळती सारे घन
स्वप्ना मागून स्वप्ने सांगती
तू यावे,तू यावे,तू यावे

धडधडत्या मनावरली तुटली बंधने
प्रीतिच्या दंवानी धुवूनी गेली शरिरे
मनातल्या उत्कंठेने तोडली सारी वचने
प्रीतिच्या नशेतूनी सारे श्वास धुतले
स्वप्ने सजू लागली स्वर गाऊ लागले
फुला मागूनी फुले सांगती
तू यावे,तू यावे,तू यावे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, May 29, 2008

एखादा वेटर सुद्धा छोटासा संदेश देवून जातो

” एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात, मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं.”
तसा मी वरचेवर गोव्याला जात येत असतो.एखादा आठवडा राहायचं असल्यास मी माझ्या नेहमीच्या रेस्टॉरंट मधे राहतो.त्यामुळे माझा आजुबाजूच्या लोकांशी परिचय झालेला आहे.त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा ख्यालीखुषालीच्या गप्पाही होतात.असंच एकदा त्या होटेल मधल्या एका वेटरशी हलो-हाय झाल्यावर मी त्याला सहजच म्हणालो,
“तुला मी इकडे नवीनच पहात आहे.”
ते ऐकून तो म्हणाला,
“होय, मला इकडे येवून दोन तीन महिने झाले.मी पुर्वी मुंबईच्या एका होटेलमधे काम करीत होतो. माझ्या एका मित्राने मला ह्या होटेलची माहिती दिली.मी पुर्वीपण गोव्याला येत जात असे.मला तसं गोवं मुंबई पेक्षा खूप आवडतं.
मी त्याल विचालं,
“असं का?”
तो म्हणाला,
मुंबईच्या मानाने गोवं खूपच लहान आहे.इकडचे लोक मला जास्त प्रेमळ वाटतात.आता तुमचंच घ्या ना,तुम्ही माझ्याशी मुद्दाम वेळ काढून बोलत आहात.मुंबईच्या लोकाना कुठे वेळ आहे.एखादं हास्य फेकतील किंवा हलो-हाय करतील.त्यांचा पण दोष नाही.कारण त्यामानाने गोव्याचं लाईफ जरा स्लोच आहे.”

हे त्याचं म्हणणं ऐकून मला पण थोडं त्याच्याशी बोलावसं वाटलं आणि तो पण माझ्या सारखा बडबड्या आहे असं वाटलं.
“तू ह्या होटेलमधे काय काम करतोस?”
ह्या माझ्या दुसऱ्या प्रश्नाची तो जणू वाटच पहात होता असं वाटलं.लगेचच म्हणाला,
“मी इकडे वेटरचं काम करतो.आलेल्या गिऱ्हाईकाला प्रथम कॉफी देतो.इकडच्या होटेलचा तसा रिवाज आहे.मुंबईच्या होटेलमधे गिऱ्हाईकाच्या डोळ्यामधे मला एकमेकाचा दुवा साधणारी नजर कमी दिसते.ते येतात,इकडे तिकडे बघतात,मेनु ऑर्डर करतात बस झालं.त्यांच्या नजरेत किंवा मनात कुणाशीही दुवा साधण्याची इच्छा नसतेचमुळी.
हल्लीच्या जीवनात ऑन-लाईन-चॅट,ऑन- लाईन- शॉपिंग आणि बरचसं ऑन-लाईन झाल्यामुळे माणसा माणसा मधल्या दुव्यासाठी कुणालाही भूक नसते.
इकडे त्यामानाने हे सर्व कमीच असल्याने,घरी दुध घेवून माणूस केव्हा आला,पेपर टाकून पोऱ्या केव्हा गेला,नातवंडं आता काय करतात असल्या गोष्टीवर बोलायला अजून वेळ सापडतो.कधी कधी माझी पण चौकशी करतात.माझं कसं चाललंय म्हणून पण विचारतात.
असलं हे जीवन इकडे जास्त जीवंत वाटतं.”

मला म्हणाला,
“काका,तुम्हाला वेळ असेल तर एक किस्सा सांगतो”
एव्हडं बोलणारा हा वेटर काय सांगतो म्हणून ऐकण्याची माझी पण जिज्ञासा वाढली.मी आणखी एक कॉफी ओतायला सांगून म्हणालो,
“तुझं ऐकायला काढतो वेळ हवा तर”
हे ऐकून त्याला बरं वाटलं.
मला म्हणाला,
“एकदा,मी इकडच्या होटेलच्या मागे एक “फुंकणाऱ्या” लोकांसाठी एक स्पेशल खोली आहे,तिथे कॉफी घेवून गेलो होतो.एक म्हातारी आजी बराच वेळ वाट बघत असलेली दिसली.तिला मी कॉफी दिली.मला माझ्या आजीची आठवण आली
मला म्हणाली,
” मला एक पाव आणि मटण प्लेट मिळेल काय?”
तिचा तो पेहराव आणि चेहऱ्यावरून ती एक दोन दिवस उपाशी असल्या सारखी दिसली.मी तिला एक पाव आणि आमलेट आणून दिलं.मी खोटं खोटंच तिला सांगितलं की एका गिऱ्हाईकाने त्याची ऑरडर कॅनसेल केली ते मी तुला आणून दिलं. खावून झाल्यावर ढेकर देत ती मला म्हणाली,
” मला पाचएक रुपये मिळतील काय?”
मी माझ्या टिप मधली मिळकत तिला दिली.
मला म्हणाली,
“मी परत आल्यावर तुझे पैसे परत करीन.”
असं म्हणत ती आनंदी चेहरा करून मेन दरवाजातून निघून गेली.
ती तिन आठवड्यानंतर ती सकाळीच आली आणि माझे पैसे देवून गेली.तिला कुठेतरी काम मिळाल्याने तिच्या कमाईतून तिने मला पैसे दिले.मला तिने सकाळचा ब्रेकफास्ट पण देऊ केला.

मी त्या वेटरला म्हणालो,
” ह्यातून तू काय शिकलास?”
मला तो वेटर सांगू लागला,
” एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं.
मी गिऱ्हाईकाला कॉफी देताना त्याच्या नजरेशी नजर मिळवतो,”कसं काय?” म्हणून विचारतो.आणि मग तो काय म्हणतो ते ऐकतो.माझा जॉब गिऱ्हाईकाची सेवा करण्याचा आहे पण मला वाटतं ह्यातून एकमेकाचा दुवाही साधला जातो आणि एकमेकाच्या मदतीला हात पुढेही करता येतो.”
हे सर्व ऐकून मी मनात म्हणालो,
” एखादा वेटर सुद्धा छोटासा संदेश देवून जातो.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, May 28, 2008

थोडक्यात, न विचारलेला विचार.

“सुख जवापाडे दुःख पर्वता एव्ह्डे”
यालाच,
”जीवन ऐसे नांव ” असं म्हणतात.
जीवनात,
”कधी खुषी कधी गम”
असतं,
बालपण,तरूणपण आणि म्हातारपण हे शेवट पर्यंत जगल्यावर आयुष्यातल्या ह्या अनुभवायच्या पायऱ्या आहेत असं वाटतं.
वसंत,ग्रीष्म वगैरे आयुष्यात ऋतु येतच राहणार.
“नाचरे मोरा आंब्याच्या वनांत “
असं म्हणता,म्हणता

“कां नाही हंसला नुसते मी नाही म्हटले नसते”
असं म्हणे पर्यंत,
”मोहूनीया तुज संगे नयन खेळले जुगार”
असं म्हणताना
“जीवनात ही घडी अशीच राहूदे”
असं म्हणावसं वाटत नाही असं मुळीच नाही.
आणि,नंतर
“थकले रे नंदलाला”
असं म्हणायला काहिही वाटत नाही.
”जन पळभर म्हणतील हाय,हाय “
म्हणण्याची वेळ केव्हां येऊन ठेपली हे ही कळे पर्यंत
“आम्ही जातो अमुच्या गांवा”
म्हणावं लागतं,
थोडक्यांत काय
”फिरून जन्मेन मी”
असं धडधडीत म्हणावं असं शेवटी शेवटी वाटतं.
असं जाणकार म्हणतात.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

अरे! माझ्या भोळ्या मना

अरे! माझ्या भोळ्या मना
दुःखाने तू घाबरू नको ना
एकदा तरी समजून घेईल
दुनिया झालेल्या अवहेलना
उमेदीने भरल्या मना मधे
जखमाना जरा जागा दे
भडकलेल्या निखाऱ्याना
थंड अशी झुळक दे
होवूनी जावू दे हवे तर
हे जीवन कथेचा खजाना
एकदा तरी समजून घेईल
दुनिया झालेल्या अवहेलना

साधणार काय फिरयाद करूनी
मिळणार काय अश्रू ढाळूनी
निष्फळ आहे हे सगळे
होणार असे काय निराळे
क्षणभरात अपुले होईल
काय हे कळेना
अरे! माझ्या भोळ्या मना
दुःखाने तू घाबरू नको ना

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, May 26, 2008

सुखाची निवड

“जीवनात कसलाही प्रसंग आला जरी, तरी माझा माझ्या सुख निवडण्याच्या क्षमतेवर विश्वास द्विगुणीत झाला.”

शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मृणालिनीच्या आयुष्यात स्थित्यंतर घडवून आणलं.
त्याच असं झालं,तेव्हा मृणालिनी कोकणातल्या एका खेड्यात रहायची.कोकणातल्या खेड्यात कुठे आलेत मनोविज्ञानीक डॉक्टर. Autism-म्हणजेच स्वतःमधेच गुंतून राहणं,दुसऱ्या बरोबर सुसंवाद ठेवण्यात कमतरता असणं आणि दुसरी आपल्या सारखीच माणसं आहेत हे कटाक्षाने न समजणं-अशा तऱ्हेचा व्याधि असूं शकतो हे तिथे कसं कुणाला माहित असावं. मग अशी व्यक्ति जरा विक्षिप्त वागू लागली की त्याला फक्त वेड्यात काढणं ह्याच्या सारखं दुसरं अनुमान असूच शकत नाही ही भावना सर्वांच्या मनात राहिल्यास त्यासाठी कुणाला दोष देणार.मग मृणालीसारख्या चतुर,प्रेमळ मुलीला डॉक्टर रमेश शिरवईकरने समजावून सांगितल्यावर तिच्या उभ्या आयुष्यात परिवर्तन झाल्यास काय नवल.आणि हा योगायोग यायला मृणालिनीचं नशिबच कारण असावं.
डॉक्टर शिरवईकर आणि मृणालिनीचा भाऊ उन्हाळ्याच्या सुट्टीत शिरोड्याला गेले होते.त्यावेळी मृणालीच्या मुलाला पाहून डॉक्टर तिच्या भावला म्हणाला ह्या मुलाला Autism चा व्याधि आहे. आणि ही सर्व गोष्ट तिने मला अलिकडेच सांगितली.
मला म्हणाली,
“पुर्वी मी विश्वास करत असायची की अनिश्चीत-भविष्यचक्र माझं भविष्य ठरवित असावं.कधी चांगलं म्हणून तर कधी वाईट म्हणून.मी मला भवितव्याचाच बळी झालेली समजत असे.माझं आयुष्य जणू एक कच्चा दोरा आहे असं संभोधून त्याला माझ्या अनिश्चित जगात मनमानेल तसं गरगर फिरवावा,मोजावा आणि निष्टूर होवून तोडूनही टाकावा.आता मी जरा नव्याने विश्वास करू लागले आहे.मला वाटतं,सुखी असणं ही आपली स्वतःची निवड आहे.
नऊ वर्षापुर्वी माझ्या लक्षात आलं की सुखाची निवड करणं न करणं हे माझ्या ताकदीवर अवलंबून आहे.माझा मुलगा सात वर्षाचा झाल्यावर खूपच बडबड करायचा.पण आपल्याच विश्वात असायचा.आजुबाजुचं त्याला कसलंच ध्यान नसायचं.एका जाग्यावर बसायचा नाही.एकडून तिकडे पळत सुटायचा.विनाकारण ओरडायचा.थोडक्यात आजुबाजुच्याला नाही म्हटलं तरी त्रास होईल असं करायचा.शाळेतून त्याच्या बद्दल शिक्षकाच्या खूप तक्रारी यायच्या.
मी हे सर्व बघून पुर्ण गर्भगळीत झाले.सारख्या नकारात्मक भावना माझ्या मनात येऊ लागल्या.दुःख,हतबलता,राग आणि दुसवास ह्या गोष्टी मनात सतत घर करून राहिल्या.त्याचा माझ्या प्रकृतीवर पण दुष्परिणाम होवू लागला.आल्यागेल्याशी माझे संबंध दुरावले.
हळुहळु मला वाटू लागलं,की सुख हे माझ्या नशिबातच नाही.
अशा ह्या माझ्या अत्यंत कठिण प्रसंगी डॉक्टर शिरवईकरानी माझे डोळे उघडले.त्यानी मला एक गिफ्ट दिली.ते एक पुस्तक होतं.मला माझ्या मानसिक धक्क्यातून उत्तेजीत करण्यासाठी त्या पुस्तकात बरंच काही लिहिलं होतं.मला त्यांच खूपच कौतुक वाटल.
मला आठवतं मी खूप सद्गदीत झाले.एखादा पुस्तकातला विषय वाचून झाल्यावर माझ्या विचारात मला मदत करू शकेल असं त्यांना वाटावं ह्याने मी थोडी खजील झाले.मी रात्र जागून ते पुस्तक वाचून काढलं.कसं का होईना त्यांच्या त्या छोट्याश्या कृतीचा आणि अपेक्षा आणि अपेक्षाभंग होण्याबाबतच्या त्या पुस्तकात असलेल्या विषयाबद्दल विचार करून मला नक्कीच वाटलं,की मी माझी परिस्थिती जरी बदलू शकली नाही तरी मी त्या परिस्थितीला सामोरं जाण्यात बदल करू शकते.
कालांतराने मी माझी पुर्वीच्या मनस्थितीला विसरून जाण्याची धडपड करू लागले.कुणाशीही दुसवास करायचं मी सोडून दिलं.आणि मुलाला घरीच शिकवायला लागले. माझ्या मधेच मनःशांति आणण्याचे उपाय मी करू लागले.
आता मला वाटू लागलं की सुख मिळणं दुरापास्थ नाही.आपलं भवितव्य हे आपल्या निवडीवर अवलंबून आहे अघटीत घटनेवर नाही.मला आता कळून चुकलं की आपण कसलाच अपराध केला नाही अशी समजूत करून किंवा यातना आपल्याला होणार नाहीत अशी समजूत करून घेवून सुद्धा सुख हे पटकन मिळणारं भाग्य नाही.माझ्या जीवनातल्या अत्यंत कठीण समयामुळे नवा मुद्दा मला दिसू लागला. जीवनात कसलाही प्रसंग आला जरी, तरी माझा माझ्या सुख निवडण्याच्या क्षमतेवर विश्वास द्विगुणीत झाला.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, May 24, 2008

दाखविली मातेची व्यथा कौतुके

तू जन्मी येता देवून प्रचंड वेदना
न्याहळते ती तुला घेवून गोड चुंबना
घेई तुला ती माऊली पोटाशी
रडून मात्र तू जग डोक्यावर घेशी

वेळी अवेळी जवळ घेवूनी
पाजिते ती तुला घेवूनी पदराशी
दुदु पिताना तू मात्र तिला
लाथेने धुसक्या मारिशी

शिकविले चालण्या जिने तुला
हांक मारता दूर धावशी सोडून तिला
तुला खेळण्या आणे ती खेळणी
एक एक करूनी टाकशी तू मोडूनी

गोड खाऊ करूनी देते तुला बशी
जमिनीवर तू खाऊ तुझा उडवून देशी
छान छान कपडे तुला तिने आणिले
खेळुनी मातीत तु ते सर्व मळविले

शिकवीण्या शाळेमधे घेवून गेली तुला
न जाण्याचा रडूनी गोंधळ तू घातला
संगीत शिकण्या दाखल केले शाळेला
रियाज करण्याचा सराव तू सोडुनी दिला

मित्रासंगे घेवूनी गेली ती सिनेमाला
दूरच्या रांगेत सांगशी तिला बसायला
पाठवी तुला ती दहा दिवसाच्या शिबीराला
नाही लिहिले एक ओळीचे पत्र तिला

शाळा कॉलेज संपवूनी झालास तू मोकळा
विचार करिला तिने तुझ्या साठी आगळा
विचारे तुला ती करियर कसली घेशी
म्हणशी तू तिला तुला कशाला चौकशी

सुचविले तिने तुला कराया लग्नाला
आई…प्लिज! असे म्हणालास तिला
झाले लग्न तुझे थाटाने
बदली करून घेतलीस हट्टाने

म्हणाली ती घरात पाळणा हलू दे
म्हणालास तू निर्णय आम्हाला घेवू दे
नाही जमले भेटाया तिला
तिच्या पन्नासाव्या वाढदिवशी
म्हणालास तू “होतो बिझी त्यादिवशी”

नंतर एकदा झाली ती आजारी
पत्र पाठविले तिने तुला सत्वरी
आले तुझ्या मनी झडकरी
म्हातारी मंडळी ताप देती भारी

एके दिवशी शांतपणे ती निघून गेली
पश्चातापाची वीज तुझ्या मनात चमकली

(एका लेखाच्या आधारावर काव्य माझे)

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, May 22, 2008

अंजली अंजली तूच माझी रागिणी

अंजली अंजली पुष्पांजली
फुले देवून देतो ही पुष्पांजली
पायी तुझ्या ही स्वरांजली
गीतात गातो ही गीतांजली
प्रिय वाटे ही कवितांजली

प्रीतीने भरलेले तुझे भोळे मन
तुला पाहूनी सजणी धडके हे मन
जेव्हां मनी माझ्या वाजे प्रीतीची बांसुरी
तेव्हां स्वप्नी माझ्या खुलते एक चांदणी

जीवनाची बहार मिळे मला
प्रीतिचे शिखर मिळे मला
अंजली अंजली तूच माझी रागिणी
संगीतलहरीने डोले माझे मन
प्रीतिरागिणीने डोले माझे तन

भासे मला कशी जादू जाहली
दिसे मला गोड स्वप्ने मनी छपली
गोड गोड धुने सरगमची
धुंद धुंद लहरी सुरांची

प्रीतिच्या पुजनी सुरांच्या जीवनी
फुलानी भरलेली ही पुष्पांजली
लहरीची तुला नृत्यांजली
गीताने भरलेली ही गीतांजली
कविना माझी ही कवितांजली

पाहिले तुला जेव्हां झालो तुझा तेव्हां
प्रीति कशी होईल तुजविणा
कविता कशी होईल तुजविणा
चंद्रमाच्या चांदणीसम तू सजणी
फुलांच्या फुलदाणीसम तू सजणी
अंजली अंजली तूच माझी रागिणी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, May 20, 2008

“ही तुमचीच मुलगी का?”

कुणी तरी म्हटलंय.
” एखाद्दयाला समजून घेण्यातच वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार. “

काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.गेले दोन तिन दिवस भाऊसाहेब तळ्यावर येत नव्हते.म्हटलं आपण स्वतः जावून त्यांची चौकशी करावी.त्यांच्या घरी पाहुण्यांची गडबड दिसत होती.जरा जपून जपून आत गेलो.मला पाहून कुणीतरी दार उघडलं.मला पण ती मुलगी जरा अनोळखी वाटली.तिने “भाऊसाहेबाना सांगते” म्हणून सांगून मला आत बसायला सांगितलं.
मला पाहून भाऊसाहेब म्हणाले,
“तुमचीच आठवण काढली होती.आम्ही सर्व तळ्यावर जात होतो.वाटलं तुम्ही आम्हाला भेटणारच.मी तुमची माहिती माझी पुतणी आली आहे तिला सांगत होतो.”
तिला हांक मारीत,
“अगं भावना जरा बाहेर ये.ह्यांच्याच बद्दल मी तुला सांगत होतो.चला आता आपण सगळेच मिळून तळ्यावर जावू या.”
असं म्हणत आम्ही लागलीच बाहेर पडून तळ्यावर जायला निघालो.भावनाच्या अंगावर एक छोट्टशी मुलगी झोपली होती.तिला तसंच थोपटंत थोपटंत ती आमच्या बरोबर यायला निघाली.बोलत बोलत आम्ही सर्व तळ्यावर येवून पोहचलो.एका लांब रूंद बाकावर आम्ही सर्व बसलो.भावनाने त्या मुलीला आपल्या मांडीवर घेवून ती बाकावर बसली.त्या झोपलेल्या मुलीला पाहून मी तिला म्हणालो.
“किती निष्पाप चेहऱ्याची ही मुलगी आहे.तिचे हे कुरळे केस,तरतरीत नाक अणि एव्हडीशी जीवणी पाहून खरंच कौतुक करावसं वाटतं” असं मी सहजच भावनाला म्हणालो.


माझं ते कौतुक ऐकून भावना अशी काय हंसली की तिचं हंसणं काहीतरी बरचसं सांगून गेल्याचं मला भासलं.
मी जरा तिला भित भितच विचारलं,
“काय गं! माझं काय चुकलं काय?”
मला म्हणाली,
” काका,व्यक्ति तशा प्रकृति”
मी तिला विचारलं,
“म्हणजे गं काय?”
प्रो.देसायांकडे पाहून जणू त्यानीच तिला मला काहीतरी सांगावसं असं अगोदरच सांगून ठेवलं आहे आणि ती आता त्यांची संमती घेत आहे असं भासवून सांगू लागली.
“माझ्या मुलीकडे बघून एका बॅंकेतला कारकूनाने एकदा मला विचारलं,
“ही तुमचीच मुलगी का?” ते मला आठवलं.
असा प्रश्न ऐकून घेण्याची माझी ही काही पहिलीच वेळ नव्हती.असल्या खोचक प्रश्नाला खोचक उत्तर देण्याची माझ्या मनात कधीही तयारी असायची. पण त्या ऐवजी माझ्या मुलीसाठी तिच्या जीवनात येऊ घातलेल्या प्रश्नावर मी माझ्या एकाग्रतेत जास्त लक्ष घालीत असे.
खोचकपणे विचारलेल्या प्रश्नाला मी जराशी घुसमटली जायची आणि त्या कारकूनाला मी म्हणाले,
“ती सुंदर आहे,हुशार आहे,आणि शिस्तीत वागणारी आहे.”
माझ्याकडे तो कारकून जरासा विस्मयीत होवून म्हणाला,
“असं,असं”
जणू त्याच्या तो प्रश्नच मला समजला नाही असं त्याला वाटलं.
मी मनात हसले,मला त्याचा प्रश्न त्याचवेळी कळला होता,आणि त्याला खरं उत्तर द्दयायला सुचू लागलं होतं.
श्वेताला मी त्या अनाथाश्रमात पहिल्यांदा पाहिलं होतं.अगदी नाजूक प्रकृतीची,कानाने ऐकू न येणारी काहीशी सावळ्या वर्णाची ती त्यावेळी दोन वर्षाची होती.मी त्यामानाने जास्तच गौर वर्णाची असल्याने लोकांच्या नजरेत हा विरोधाभास यायचा.
श्वेताचे डोक्यावरचे ते काळेभोर कुरळे कुरळे केस,नाजूक चेहरा,तिच्या गालावर एक छोटासा काळा ठिपका,तुकतुकीत कान्ती आणि काळेभोर टुकटुकीत डोळे पाहून कुणाचेही लक्ष जाईल असं तिचं लक्षण होतं.तिला पाहून एकच नाव ठेवायचा विचार येईल “संपुर्णा”
आपल्या अंतरात नेहमीच कुत्सित विनोदाची चाड ठेवून रहाणारे बरेच लोक असतात. डोळ्याला घोड्याचा चष्मा लावून फक्त समोरच्याच नजरेने पहाण्याची त्यांना संवय असते.
त्यामुळेच अगदी पहिल्यांदाच अशाच एका अनोळखी व्यक्तिने माझ्या आणि श्वेताच्या नात्यासंबंधी प्रश्न विचारला होता.आम्हीच दोघं जणू सारखे दिसत नाही हे विसरूनच गेलो होतो.दुसऱ्यावेळी असाच काहिसा प्रश्न विचारल्यावर मी अगदी अदबीने कल्पना दिली की मी आई आणि ती माझी मुलगी आहे,पण तिची जात काही मला माहित नाही.
विसाव्या वेळी असाच प्रश्न विचारल्यावर मी त्या व्यक्तिचा प्रश्न कसा असंदर्भीत आहे हे त्याला समजावून सांगितलं.चाळिसाव्या वेळी असाच प्रश्न विचारल्यावर मी प्रश्न ऐकला नाही ऐकला असंच दाखवलं.
आता बराच काळ लोटून गेल्यावर त्या प्रश्नामागचा आशय माझ्या जीवनाचा मोठ्यात मोठा धडा झाला तो असा.
नातं,हे असा दुवा आहे,की त्याची गहिरता जन्मावर,रंगावर,जातीवर असण्या पेक्षाही खोल आहे.आपल्या पैकी ज्याना खऱ्या प्रेमाचा अर्थ समजला आहे त्यांना ते त्यांच्या अंतरातूनच कळतं.आणि त्याची जाणीव असणं ही एक खास देणगी समजली पाहिजे.
ज्यावेळी एखाद्दयाचं मन मोकळं असतं,आणि नवीन नातं जुळवून घेण्याची तयारी असते, त्यावेळी एकमेकात साम्यच जास्त दिसू लागतं.कधी कधी मनात नवी नाती जुळवण्याची इच्छा येते,कुणी तरी अगदी जीवाभावाचं वाटतं,कधी कधी जवळीक असून सुद्धा मनात कायमचं नातं जुळत नाही.पण सभोवतालच्या माणसांबद्दल आस्था रहाते.एकदा एखाद्दया बद्दल चांगला समज झाल्यावर, वरवरच्या तर्कावरून समजूत करून घेण्याची गरज भासत नाही.
म्हणूनच मघाशी तुम्ही श्वेताचं कौतुक केलंत ना,ते ऐकूनच मी म्हणाले होते,
“व्यक्ति तशा प्रकृती”
आता तुमच्या सर्व लक्षात आलं असेल ना?
कुणी तरी म्हटलंय.
” एखाद्दयाला समजून घेण्यातच वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार. “
खरंच भावनाकडून हे सर्व ऐकून असं मला वाटलं.प्रो.देसायानी आज मला भावनाच्या तोंडून सुंदर लेक्चरच दिलं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, May 18, 2008

सजणे! तू कमाल करीशी

पिटुया का आज आपण
अपुल्या प्रीतिचा डंका
का दाखवुया आज आपण
अपुल्या ओळीखीची शंका

करू का भरल्या सभेत
तुजवर जीवघेणी प्रेमचेष्टा
का करूया अपुल्या आपण
प्रयत्नाची आसूरी पराकाष्टा

सांगण्या तू घाबरशी
मनाला लावून घेशी
सजणे! तू कमाल करीशी

नजर लाजूनी तू हसशी
गोड बोलूनी तू लुबाडशी
गरम श्वासातूनी नरम स्पर्शातूनी
मनातल्या ताऱ्याना गुदगुदल्या करीशी

विचारता मतलब तुझ्या मनातला
लालबूंद तुझा चेहरा करीशी
सजणे! तू कमाल करीशी

का न तू गुपचुप राहशी
कसला नवा न्याय आणिशी
अजब तुझे हे वागणे
का एव्हडा गहजब करीशी
सजणे! तू कमाल करीशी

सजणा!
समजू कशी प्रीतिची भाषा
का समजू निव्वळ निराशा
कधी काळी तू मज भेटशी
उलट सुलट प्रश्न करीशी
सजणा! तुही कमाल करीशी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, May 16, 2008

" त्या अनोळख्याने माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."

"मला वाटतं,मी माझे डोळे उघडे ठेवून सर्वांकडे पाहत असावं.आणि त्यांच्या बुध्दितून शिकावं.मला वाटतं,आपले जवळचे आपण गमावले तरच आपलं सर्वस्व आपण गमावतो.
मला वाटतं, त्या अनोळख्याने मला त्या झालेल्या बोलण्यातून माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."असे उद्गार काढण्याची माझ्या एका मित्रावर पाळी आली.ती त्याची कथा सांगताना,
मला म्हणाला,
" मनुष्याच्या आत्म्यावर माझा विश्वास आहे आणि इतरांबरोबर दुवा ठेवण्याच्या आत्म्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. सभोवतालच्या वातावरणा बद्दल जागृततेची क्षमता असण्यावर माझा विश्वास आहे.अपेक्षा नसतानाही माझ्या आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या घटना मधे आलेल्या एका घटनेवर माझा विश्वास आहे."
आणि मला पुढे सांगू लागला,
"त्यादिवशी मी शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घरी आलो.सर्दी खोकला जब्बर झाल्याने कधी एकदां अंथरूणावर पडतो असं झालं होतं.शेजारच्या घरात पार्टी चालली होती त्यांच्या आवाजानें माझी झोप जागृतच होती.
माझ्या तुटपुंज्या स्वप्नाचा बाहेरून येणारा आवाज भंग करू शकला.कांचा फूटल्याचा आवाज मला पुर्ण जागं करू शकला.माझ्या खिडकीतून दिसणारं रात्रीचं आकाश आगीच्या डोंबाने शेंदूरी रंगाचं दिसू लागलं.अरुंद जिन्याला आगिच्या ज्वाळानी घेरलं होतं.बाहेर जाण्याचा तिथूनच दरवाजा होता.माझे शेजारी माझ्या किचनच्या खाली उभे राहून तिकडच्या खिडकीतून उडी मारण्याची मला आवर्जून सांगत होते.

दोन तिन आठवड्यानंतर मी सर्व प्रकरणांची जंत्री घेत घेत ज्यावेळी विमानात बसून सीट बेल्ट लावून झाल्यावर त्या घटनेचा विचार करू लागलो तेव्हा मला राग आणि संतापाने घेरलं,
"मलाच हे असं कसं झालं"
असा विचार मनात आला.
"मी जवळ जवळ मृत्युच्या जबड्यातून बाहेर पडलो होतो आणि माझं सर्वस्व मी गमावून बसलो होतो.मी असं काय केलं होतं की मलाच हे प्रायश्चित मिळालं?"
माझ्या शेजारच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला बघून मी माझ्या ह्या विचारातून बाहेर पडून त्याच्याशी बोलायला लागलो.तो दिल्लीला चालला होता आणि तो डॉक्टर होता.मद्रासला झालेल्या सायंटीफिक कॉनफरन्सला हजर राहून दिल्लीला आणखी काही कंपनीच्या कामाला चालला होता.त्याचं आणि माझं साध्या साध्या गोष्टीवर बोलणं चाललं होतं. परदेशातही तो बरेच फिरून आला होता.गेल्या वर्षी मेडिकल कनव्हेनशनसाठी तो पॅरिसला गेला होता.नंतर मी त्याला आणखी प्रश्न विचारले. त्याच्या फॅमिली बद्दल आणि तो कुठल्या प्रांतात राहतो त्याबद्दल.त्याचे डोळे थोडे पाणवळल्या सारखे दिसले.
तो महाराष्टात मुंबईत राहत होता.असाच एकदा तो युरोपला गेला असताना,मुंबईत झालेल्या दंगलीत त्याची अख्खीच्या अख्खी फॅमिली मारली गेली होती.असं सांगता सांगता त्याने माझा हात हातात घेवून घट्ट धरला.माझे पण ते बघून डोळे पाणावळले.मी माझे डोळे पुसले.
मी ज्यावेळी त्याची बोटं माझ्या हातात कुरवाळली,तेव्हा माझ्या मनात क्षणभर आगीत झालेल्या माझ्या नुकसानीचं स्मरण माझ्या दैवाच्या अगणीत उपकाराच्या भावनेत रुपांतरीत झालं.मी त्या आगीतून जीवंत होतो.जळलो पण नव्हतो.माझे नातेवाईक मला सभोवताली घेरून होते,माझे प्रिय मित्र मला आधार देत होते.मला हवं असलेलं सर्व काही माझ्या जवळ होतं.

माझ्या ह्या प्रवास-मित्राचं नंतर काय झालं ते मला माहित नाही.आम्ही एकमेकाचे पत्ते किंवा फोन नंबर्स घेतले नाहीत.आम्ही एकमेकाला गुडबाय म्हटल्यानंतर मला लक्षात आलं की मला त्याचं फक्त पहिलं नांवच माहित होतं.पण त्याची ती कथा मी माझ्याबरोबर घेतली होती.त्याची ज्या ज्यावेळी मला आठवण यायची त्यावेळेला मी त्याचे मनात आभार मानत होतो कि तोच मला जीवनात मोठा फरक काय असतो ते स्मरण करून देत होता.

मला वाटतं,मी माझे डोळे उघडे ठेवून सर्वांकडे पाहत असावं.आणि त्यांच्या बुध्दितून शिकावं.
मला वाटतं,आपले जवळचे आपण गमावले तरच आपलं सर्वस्व आपण गमावतो.
मला वाटतं, त्या अनोळख्याने मला त्या झालेल्या बोलण्यातून माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, May 14, 2008

शोधित मी असतो तिला

शोधित मी असतो तिला
रात्रीच्या स्वप्ना मधे
मिळे ना ती मला
पहाटेच्या उजाळ्या मधे

मधूर प्रीतिचे स्मरण
माझ्या सजंणीचे स्मरण
घेतलेल्या वचनाचे स्मरण
दिलेल्या नकाराचे स्मरण
लपलेला असे एकच किंतू
ह्या सुंदर अश्या कुढी मधे
शोधित मी असतो तिला
रात्रीच्या स्वप्ना मधे

होतात जे असेच दुःखी
ते होतात तसेच सुखी
राहती जे दुखावलेल्या मनाने
बोलती ते सदैव नाराजीने
आहे पुरा गुंतलो मी
उदासिनतेच्या जाळ्या मधे
शोधित मी असतो तिला
रात्रीच्या स्वप्ना मधे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, May 13, 2008

“जसा व्याप तसा संताप!”

तिचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.मनात म्हणालो “आपण प्रकृती बद्दल इतका गंभीर विचार कधीच केला नाही.
anorexia चा कधी विचारच आला नाही.कुणीसं म्हटलंय ना “जसा व्याप तसा संताप!” हेच खरं.”

रघूवीर देशपांडे आमचे जुने शेजारी.त्यांच्या मुली आता मोठया झाल्या.त्यात त्यांची मोठी मुलगी,अंजना म्हणजेच आता सौ. रंजना रमाकांत रणदीवे जिला आम्ही गंमतीत “अंरंरर” म्हणायचो ती आता दोन मुलांची आई झाली आहे.ती दोन मुलांची आई झाली तरी अजून तिची तब्यत ठेवून आहे.तशीच किडकीडीत,पण सतेज चेहऱ्याची,चुटपुटीत आणि सदैव एनर्जीने भरलेली अजूनही असते.आणि हे असण्याचं कारण तिची लहानपणची मैत्रिण शोभा.
मला केव्हा कळलं,की मी तिला एकदा मुद्दाम अर्थात कुतहलाने विचारलं,
“ह्या वयात सुद्धा तू अशी तब्यत ठेवून कशी आहेस?”
हे ऐकून ती मला म्हणाली,
“ह्या सर्वाचा कारण माझी जीवश्च कंटश्च मैत्रिण शोभा.मला आठवतं शोभा त्यावेळी आरशात पण बघायला घृणा करायची.अगदी निष्ठुरपणे ती आपलीच चामडी ओढायची आणि चिमटे घ्यायची,जणू प्रत्येक वेळी असं करून तिच्या शरिरावरच्या कमतरताना शिक्षाच करायची. तिचे हात आणि पाय ह्या असल्या आघाताने चट्टे आलेले दिसायचे.शोभा नेहमीच दुर्मुखलेली दिसायची,आणि त्याबाबत तिला काही वाटतही नव्हतं.रखरखत्या आणि दमट उन्हाळ्यात सुद्धा ती स्वेटर चढवायची आणि थरथरण्याचा अविर्भाव करून त्यातच काही विशेष केल्याच्या आनंदात असायची.सहजगत्या माझ्या मनात आलेल्या तिच्या बद्दलच्या हेव्याची आणि तिच्या त्या कमजोर सौंदर्याच्या कौतुकाची मला आठवण यायची.तिचे ते किडकीडीत शरिर,आणि फ्फु केल्यास वाऱ्यावर उडून जाण्याईतप असलेल्या त्या शरिराची, कल्पना येतायेताच ती त्याग करून काय मिळवीत आहे याचं गांभिर्य लक्षात आणलं.”

मी अंजनाला म्हणालो,
“हे तिने कसं आचारणात आणलं?”

त्यावर माहिती देत म्हणाली,
“सुरवातीला ती तांदळाची पेज,किंवा तत्सम सुपं घ्यायची.मग जरा वरच्या थराचं लंघन करायला लागली.नंतर नियमाने चुर्ण घ्यायची. मग दिवसातून सफर्चंदा सारखं एखादं फळ खायची.कधी कधी अर्ध सफर्चंद खायची. शेवटी तिची सर्व खाण्यावरची इच्छाच मेली. आम्ही तिच्या मैत्रीणी,तिला सुरवातीला काहीच बोलत नव्हतो.त्यावेळी आम्ही सर्व एकशिवडी प्रकृती ठेवण्यात वेड लागल्या सारखे मनात ठेवून डायटींग करणं हे आमच्या आयुष्याचं ब्रिद वाक्य असायचं.असं करताना काही खाण्याच्या गोष्टीचा त्याग करायला कसलेच सीमा नव्हती.
त्यामुळे शोभाची वागणूक पाहून तिला स्वारस्य न दाखवणं म्हणजे एक तऱ्हेने तिच्या आनंदाला आणि तिच्या स्वपनाना तिलांजली दिल्यासरखं होत होतं,आणि चूपचाप बसणं म्हणजे तिच्यावरच्या प्रेमाची परिसीमा दाखवणं असं होत होतं.

मी अंजनाला म्हणालो,
“तुम्हा मुलींना ’शेवग्याच्या शेंगेसारखी’ आपली प्रकृती ठेवण्याचं एका ठरावीक वयात एक प्रकारचं वेडंच असतं नाही काय?”
अंजना म्हणते,
“त्या वयात प्रत्येक मुलगी कुठचा तरी एक दिवस जागी होवून स्वतः दिसते त्या आपल्या शरिराकडे पाहून कष्टी मनाने जागृत होत असते. आमच्या सारख्या अतिजागृत मुलींसाठी हा दिवस जरा लवकरच उगवतो,आणि येणाऱ्या प्रत्येक पहाटेला रेंगाळत ठेवतो.
परंतु,मी मला anorexia-म्हणजेच स्थुल होण्याच्या भितीने आहाराकडे दुर्लक्ष करणं- होवू दिला नाही.कदाचीत मी खंबीर मनाची असेन किंवा नसेन.कारण शोभा आमच्या सर्वांत अतिशय खंबीर असावी.ती तिच्या शरिराच्या सांगाड्यात सर्व काही दोषविरहीत कोरून ठेवलं आहे असं समजत असावी.तिच्या शरिराचं वजन प्रत्येक पौंडाने कमी होण्यात तिला आपलं भविष्य लपलेलं आहे असं वाटायचं.कायपण भविष्य म्हणायचं?.
तिच्या वडीलानी तिला शेवटी नर्सिंग होम मधे नेवून परत आणल्यावर ती जरा निरोगी दिसू लागली.पण बरीच मानसिक रुग्ण दिसू लागली.तिला पुन्हा नर्सिंग होम मधे न जाता ह्या रोगावर घरी बसून आणि घरच्या लोकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या आधारावर उपचार करायचा होता.
इतरांप्रमाणे मी पण थोडी साशंक होते.तिला परत नर्सिंग होम मधे नेल्यावर मी काही विषेश विरोध दाखवला नाही.ती घरी राहून बरं होणं पसंत करीत होती पण आमचा कुणाचा त्यावर विश्वास नव्हता.आम्ही ती आशा केव्हाच सोडली होती.
मी माझ्या मनात समजूत करून घेत होते की कदाचीत डॉक्टर आणि मनोवैज्ञानीकांकडून तिच्यावर आमच्या संगतीत राहण्यापेक्षा जास्त चांगले उपचार होणार.पण खरं सांगयचं तर कुणाचीच तिच्या रोगावर मात करण्याची हिम्मत झाली नाही आणि तिच्या येवू घातलेल्या मृत्युशी झुंज द्दयायला हिम्मत झाली नाही.मी तिला माझ्या दृष्टीतून आणि मनातून काढायला बघत होते.मी तिच्यावर पाणी सोडलं होतं.मी तिच्यावरचा विश्वास सोडला होता.तिच्या मनाची क्षमता आणि तिची इच्छाशक्ति ह्या दोन्ही बद्दल मी साशंक होते.
माझ्या लक्षात आलं नाही की प्रत्येक व्यक्ति स्वतंत्र असते आणि डॉक्टर काही जादूगार नसतात.मला वाटतं तिने पण तसंच समजून तो नाद सोडला आणि शेवटी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा सांगायचा मतितार्थ असा की शोभा सारखी एक टोकाची भुमिका न घेता मी सुद्दृढ, सशक्त राहून माझ्या शरिरावर प्रेम करू लागले.
कोणत्याही परिस्थितीत प्रेम म्हणजेच, श्रद्धा असणं आणि विश्वास असणं.कधीही हताश न होणं म्हणजेच प्रेम.अगदी संकटाची पराकाष्टा झाली असतानाही इच्छा-शक्ति घालवू न देणं आणि मनुष्याच्या बदलावाच्या क्षमतेचा संशय पण मनात न आणणं म्हणजेच प्रेम.मला वाटतं प्रत्येक व्यक्तिने विनाअट प्रेमात असावं”

हे तिचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.मनात म्हणालो “मी प्रकृती बद्दल इतका गंभीर विचार कधीच केला नाही.
anorexia चा कधी विचारच आला नाही.कुणीसं म्हटलंय ना ’जसा व्याप तसा संताप!’ हेच खरं.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, May 10, 2008

आई..! तुझी, आ..ठ..व..ण येते…!

आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं.
मॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली!
“आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)”
म्हणजेच,
”अगं मी येते!, अरे मी येते! “
असं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती “आई”
तिच माऊली,
तिच मॉं,
तिच माय,
म्हणजेच “my”- माय- माझी,
MOM म्हणजेच My Own Mother, तिच शब्दशः आई.

नुसता “आई” हा शब्द्च पहाना,
पहिलं अक्षर, “आ” म्हणजे आकाशा एव्हडी प्रचंड मन असलेली.
दुसरं अक्षर “ई” म्हणजेच जी ईश्वरा एव्हडी देवतुल्य.
म्हणूनच ती “आई.”

आईचे गोडवे किती गावेत.आई बद्दल कुणी कुणी आणि किती किती लिहावं.किती कविता आहेत किती लेख असतील.तरीपण
”मी पण आणखी लिहू कां?”
असे कुणाला नाही का वाटणार?
आणि कुणीही कितीही लिहीलं तर ते पुरं पडत का?
पण आज Mother’s day असल्याने माझ्या आईची आठवण आल्याने थोड काही तरी आई विषयी लिहावसं मला वाटणं स्वाभावीक आहे.
आता,माझी आई हयात नसलेल्याना मला, कवी माधव ज्युलियनची ही कविता प्रकर्षाने जाणवते.
“प्रेम स्वरूप आई
वात्सल्य सिंधू आई
बोलावू तुज आता
मी कोणत्या उपायी
आई!”
असं लिहून झाल्यावर,
अण्णा (भालचंद्र ) पेंढारकरांचा “दीगू” गातो ते आठवतं,
“आई… तुझी, आ..ठ..व..ण येते
सुखद स्मृतींच्या कल्लोळानी
काळिज का जळते
आई काळिज का जळते”

असं म्हणून झाल्यावर कुणी म्हणतं,

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”
किंवा कुणीतरी सवाल केला आहे,
“कुबेरानं आपलं सर्व धन देऊ केलं तरी आईचे उपकार फिटतील का?”

नऊ महिने आपल्या उदरात वाढवून (आणि वाढवत असतां लाथा खाऊन) मुलांच्या मोठ्या वयांत परत त्यांच्याच कडून कदाचित लाथा खाऊन सुद्धा, प्रेयसीने सांगितलं म्हणून आईचं काळिज कापून थाळीत ठेवून प्रेयसीला दिमाखानं दाखवायला जात असताना, मुलाला ठेच लागून ते काळीज खाली पडल्यावर ते वळवळणारं आईचं काळिज,
” बाळा,तुला लागलं का रे? ” असं सुद्धा विचारतं,
अशी जी दंतकथा आहे त्यातून पण माणुसकीचा परमोच्य असलेल्या आईचं वर्णन पराकोटीचं नव्हे काय?.
ती प्रेयसी-म्हणजेच पुढे होणारी तिच्या बाळाची “आई” - त्या मुलाची निघृण कृती पाहून,
“मी सांगितलं म्हणून माझ्यावर प्रेम दाखवायला खरंच एव्हडया पराकाष्टेला जाशील असं मी स्वप्नात सुद्धा आणलं नव्हतं “
असं म्हणून ती त्याला झिडकारते हा या दंतकथेचा पुढला भाग वेगळा म्हणा.

“मानव कुठले?देव देवताही
फुलती तुझ्याच पदरी
दुनियेत हा स्वर्ग असे
पायतळी तुझ्याच तो वसे

ममतेने भरती नयन जिचे
देवमुर्ती पहाण्याची काय जरुरी?
अगं,आई
कमलमुखी तूं सुंदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?”

असं मी माझ्या,
”माझी सुंदर आई”
ह्या कवितेत भारावून जाऊन लिहीलं ते आठवलं.
एकदां प्रो.देसाई मला तळ्यावर भेटले.मला म्हणाले,
”खूप दिवसानी बघा मला अलिकडे माझ्या आईची आठवण येते.ह्या वयांत असं होतं.माझे आजोबा मला मी लहान असताना असंच म्हणायचे.आता मला ते पटलं.
देव आहे हे आपण प्रथम आपल्या आई कडून शिकतो.मला आठवतं माझी आई सांगायची की,
”देव खूपच सुंदर दिसतो”
असं सांगून भाऊसाहेब म्हणतात,
खरं तर कुणी पाहिले आहे हो त्याला?”
पण त्या लहान बाळाला आई असं सांगत असताना वाटत असणार की,
”आई मी काही देवाला पाहिलं नाही पण खरं सांगू, तुच मला त्याच्या पेक्षां सुंदर दिसतेस”
हे सर्व भाऊसाहेबांकडून ऐकून मला एक हिंदी सिनेमातलं गाणं सुचलं.
” ओ मॉं! तेरी सुरतसे अगर,भगवान की सुरत क्या होगी”
आणि कविता सुचण्याअगोदर,असा सीन मी माझ्या डोळ्यासमोर आणला,
“लहान बाळाला आपल्या पदराखाली घेऊन, त्याला आई जेव्हा दुध पाजत असते, तो तिचा फुटलेला पान्हा मनोमनी पिणाऱ्या त्या बाळाचं लक्ष, तिच्या चेहऱ्याकडे केंद्रित झालेलं असतं, अशावेळी माझ्या मनात त्या बाळाच्या मनातले विचार येवून वाटलं की ते बाळ जणू आईला आठवण करून विचारतं,

” आई कोण हा देव? ज्याची तू नेहमी प्रशंसा करतेस?”
ह्यावर आई त्या बाळाला सांगते,
”बाळा, तू त्याला पाहिलं नाहीस, आणि मी पण पाहिलं नाही रे!. पण माझ्यावर विश्वास ठेव.
आई गाण्याच्या दोन ओळीत सांगते,
“स्वरूप त्याचे किती मनोहर
रती मदनाहूनी किती तरी सुंदर”
देव असा आहे असं म्हणतात.
आपल्या आईकडे टकमक पाहाणारं ते बाळ आईला म्हणतं,
“ नसेल पाहिले त्या देवाला जरी
परि पहाण्याची असे काय जरूरी
अगं,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रुप देवाचे कसे वेगळे ?”

पृथ्वीला तिन फेऱ्या घालून पैजे साठी गेलेला श्रीगणेशाचा भाऊ, आणि आपल्या आईला तिन फेऱ्या घालून तोच उद्दयेश साध्य करणारा श्रीगणेश!, किती श्रद्धा आईवर त्या गणेशाची?.

“रक्तहि जेथे सूड साधते,तेथे कसली माया
कोण कुणाची बहिण भाऊ,पती पुत्र वा जाय़ा”

ही ह्या दोन ओळीत आईचीच व्यथा आहे. कारण सूड साधणारी आई होऊच शकत नाही, असं कवीला म्हणायचं आहे.
आईचे डोळे प्रत्येक प्रसंगात ओलेच झालेले दिसतात. ते आनंदाश्रु अथवा दुःखाश्रु असतात.त्या तिच्या नेत्राश्रुमधे अंतरातलं कारुण्य,तृप्ती आणि शाबासकीचे भाव असतात.
मूल जन्माला येताना आईला किती व्यथा होते.मुलाचा जन्म होईतो ती वेदनेने रडत असते. आणि जन्माला आल्यावर तिचं मुल रडतं.
रडताना ते मूल आईला जणू सांगत असतं,

” प्रथम पाहिले तुला मी रडताना
जन्म देऊनी भाग्यवान मला करताना
मी पण रडलो तुला पाहूनी
माझ्यासाठी तू कण्हताना

सुखदुःखाच्या तुझ्या अश्रूमधला
फरक मला कळेना
नेत्रात तुझ्या सदैव अश्रू असती
कारुण्याचे,तृप्तीचे अन शाबासकीचे “
आणि नंतर मोठं झाल्यावर ते मूल नेहमीच म्हणतं,

“कधी दुःखाचे ऊन असे
कधी नैराश्याचा मेघ बरसे
हे कमलहस्त तुझ्या दुवांचे
सरसावती मम माथ्यावरती”
आणि पुर्ण मोठं, झाल्यावर तिच्या झालेल्या उपकाराची जाणीव म्हणून म्हणतं,
“असतां जवळी दुनियेची दौलत जरी
तुझ्यापुढे आम्हा त्याची काय जरुरी
अगं,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रुप विधात्याचे कसे वेगळे? “

आंधळ्या आई बाबाना तहान लागल्याने आपला बाळ झऱ्यावरून पाणी आणतो आणि पाणी देताना आपल्याशी का बरं बोलत नाही? हे पाहून त्या श्रावणबाळाची आई त्याला अतिशय सद्गदीत होवून विचारते,

“बाळा तू असा आमच्याशी बोलत का नाहीस?आमची सेवा करताना तुला खूप कष्ट होतात का रे? ” दशरथ राजाला हे त्यांचे उद्गार ऐकून हुंदका दिल्याशिवाय राहवत नाही. आणि मग तो खरा प्रकार त्याना सांगतो,नंतर मुलाच्या दुःखाने ते मातापिता प्राण सोडतात.ह्या कथेवरून आईच्या प्रेमाचं महत्व कळतं.

अशी पण एक आईवर माझी कविता….

आई कुणा म्हणूनी
मी आईस हांक मारू?
येईल कां ती मज जवळी
ही ऐकुनी आर्त हांक

आई तुझ्या उच्चारात
“ब्रम्ह”दिसे मजसी
“आ” मधूनी दिसे ते आकाश
अन
“ई” मधूनी भासे तो ईश्वर

“आई”,”आई” असे म्हणूनी (मै आई)
येतेस तूं सदैव कामा
तुझ्या कष्टाला नसे कसली सीमा
अन
तुझ्या त्यागाल नसे कसली तमा
तुझ्या ममतेला नसे कसली तुलना
अन
तुझ्या कर्तव्यापुढे न येई आड भावना

तूं जन्म देतेस थोराना
शूर आणि थोर
कधीही तुला विसरेना

आई,थोर तुझे उपकार
कुणी ते फेडू शकेल का?
ऐरावती वरचे रत्न देऊनी
कुबेरही ऋणमुक्त होईल का?

किंव येते त्या अभाग्यांची
नसे ज्याना ती माउली
दुर्भागी ते असती
नसे ज्याना तिची साउली

स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी



कचेरीत जाताना आई बाळाला आजीकडे ठेवून जाते,अशावेळी बाळाच्या मनातले विचार असे आहेत अशी मी कल्पना करून ह्या कवितेतून मांडले आहेत.

रविवारच्या दिवशी
चिमुकली तनुली
आईला म्हणाली
इतर दिवशी
असता मी सकाळी उठलेली
पाहुन तुला घरात नसलेली
होई मी किंचीत अळकुळी

मग
घेई मज आज्जी जवळी
पाहुनी माझ्या डोळी
म्हणे मला ती
“नको होवू तू अळकुळी
तुजसम तुझी आई असता
अशीच घेही मी पण
जवळी तिला त्यावेळी
पण जवळी असे मी
तिच्या वेळी अवेळी”

“पक्षिण उडे आकाशी
परी लक्ष असे पिल्लाशी
आहे ना मी तुझ्या जवळी
मग का होतेस तू अशी अळकुळी
येइल तुझी आई संध्याकाळी”

प्रो.देसाई आज भेटल्यावर मला म्हणाले,
“आज आपण तळ्याच्या काठावर बसण्याऐवजी जरा फेरफटका मारत गप्पा मारुया.
मी म्हटलं, ”आज काय विशेष विषयावर गप्पा दिसतात”
तसं काही नाही ,फक्त एक गूढ माझ्या मनांत राहून गेलंय.
ते असं ईश्वरानें माणसाला आनंदात आणि दुःखात अश्रु ढाळण्याची क्षमता दिली आहे.
शास्त्रज्ञ म्हणतात की ह्या रडण्यानें माणूस ेआपल्या ह्र्दयावरचा भार हलका करण्याच प्रयत्न करतो.
माणूस दूःखात नक्कीच रडतो.खुपच आनंद झाल्यास माणूस डोळ्यात अश्रू आणताना मी पाहिलं आहे.आणि ते पण अपवादाने. एक व्य्क्ती अशी आहे की आनंदात आणि दुःखात डोळ्यात अश्रू आणून आपल्या “पदरानें “पुसते तुम्ही नक्कीच पाहिली असेल.
” भाऊसाहेबांचा ईशारा मला कळला.”
“ओळखा पाहूं “
असे म्हणण्या पूवीच मी समजलो होतो. मला हंसताना पाहून ते चटकन म्हणाले
“ओळखा पाहूं मला कोणत्या व्यक्ती बद्दल म्हणायचं आहे?”
मी पटकन म्हणालो,
“अहो, माय माऊली आपली आई”

“तुम्हाला कसं पटकन कळलं ?”
त्यावर मी म्हणालो
“भाऊसाहेब.अशी आपल्याच पदरानें डोळे पुसणारी दुसरी कोणच व्यक्ती असूं शकत नाही.”
“अगदी बरोबर “
प्रोफेसर म्हणाले.
“लहानपणी बघा, मी विचारत असे माझ्या आईला”
“आई,मी तुला दुःख दिलं तरी तूं रडतेस,आणि मी तुला आनंदाची बातमी दिली तरी तूं मला जवळ घेवून पदरानें डोळे पुसतेस.असं का गं करतेस आई?”
त्यावर ती फक्त हंसायची.
“हे काय गुढ आहे ते तुम्ही कवितेतून सांगा.”
यश आणि अपयश मिळालेलं पाहून आईचे डोळे ओले होतात.त्यावर मला खालील कविता सुचली.
मुलगा आईला म्हणतो.

नको रडूं तूं आई
मी तुला दुःख देणार नाही.
कळत नाही मला
तुझ्या दुःखाचे कारण काही.

पाहिले प्रथम तुला रडताना
जेव्हां होऊन मी भाग्यवान
तूं घालीशी जन्मा मला
मी पण रडलो
तुला पाहुनी
माझ्यासाठी कण्हतानां

सुख दुःखाच्या अश्रू मधला
फरक मला कळेना
यशापयशाच्या प्राप्ती
मधला अर्थ जूळेना

काय चुकले माझ्याकडूनी
गोंधळतो मी तुला पाहूनी
पदराने डोळे पुसताना

कळले आता विचारांती
आईच्या अंतरी असते
अश्रूंची नेहमी भरती

जरी होई माझी
प्रगती अथवा अधोगती
नेत्रात तुझ्या सदैव
अश्रू भरून असती
कारुण्याचे अन त्रुप्तीचे

प्रत्येक व्यक्ति रोज स्नान करताना आपल्या पोटावरच्या नाभिकडे-बेंबीकडे- बघून आपल्या आईला म्हणत असावी,

“तुझ्या उदरातून येण्याचा प्रथम क्षण
दुवा तुझा नी माझा कापिते सुवीण
नऊ महिने केलेस ज्यातून माझे पोषण
विसरून जाईन कधितरी तुझी आठवण
म्हणुनच ठेवली का गं आई!
ही माझ्या उदरावर कायमची खूण?”


“म्हणून आयुष्यातली एखादी घडी आपल्या आईसाठी ,तिच्या सन्मानासाठी ,कौतुकासाठी अधून मधून असू दे.या जगातील इतर कोणतीही व्यक्ती आईची जागा घेवू शकत नाही.
स्वतःवर जितके प्रेम करतो त्याहूनही अधीक प्रेम तिच्यावर करूया.
कारण आई शिवाय जीवन निरर्थक आहे.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, May 9, 2008

अशा ह्या दुनियेत मी एकटा निराळा

भल्या मोठ्या दुनियेत भला मोठा मेळा
अशा ह्या दुनियेत मी एकटा निराळा

सजणे! भेटूनी घडीभर बोलू थोडे मात्र
अशा एकांत समयी कशी घालवू रात्र
मिळे सर्वां साथी आली मिलन वेळा
अशा ह्या दुनियेत मी एकटा निराळा

गत जखमांच्या अंधूक खुणा बाकी
जखम विझून गेली धूर असे बाकी
दुखल्या मनाने किती कष्ट केले गोळा
अशा ह्या दुनियेत मी एकटा निराळा

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, May 8, 2008

मग समजावे माझी प्रीती तुजवरती

जगणे कठीण झाले
ते तुझ्या कारणे झाले
दुःखाची आवड वाढली
मग समजावे प्रीती झाली

हळू हळू मन डुले
धुंदित अपुल्या ते बोले
नयनी काजळ जमले
मग समजावे प्रेम जहाले

रात्री नाचती गाती
तारे पावा वाजवीती
मेघ मस्तीने झुमती
मग समजावे झाली प्रीती

अकारणे कंगणे खणखणती
छ्न छ्न छन छन घुंघुर वाजती
प्याले नयनाचे खणखणती
मग समजावे माझी प्रीती तुजवरती

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, May 7, 2008

कविता कसली करू तुजवरती

करू दे मज तुजवर प्रीती
कविता कसली करू तुजवरती

निष्टा माझी दरवळेल होवूनी सुगंध
राहिल तुझी अभिलाषा होवूनी बेबंध
करू दे मज तुजवर प्रीती
कविता कसली करू तुजवरती

दिवस तो येईल होवूनी मी नशिबवान
मिळेल मला तुझेच फक्त अलिंगन
सूर शहनाईचे सजवतील मिलनाची धुन
करू दे मज तुजवर प्रीती
कविता कसली करू तुजवरती

तुजवीण दुनिया भासे सदैव सूनी
तुझे नी माझे श्वास गाती गूंजन मिळूनी
करू दे मज तुजवर प्रीती
कविता कसली करू तुजवरती

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, May 5, 2008

“ठेविले अनंते तैसेचि रहावे!”

अनंताचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटलं.त्याला त्याचं काहीच वाटल्याचं दिसलं नाही. कदाचित,
”ठेविले अनंते तैसेचि रहावे.”
असं त्याला वाटत असावं, असं मी मनात आणून त्याचा निरोप घेतला.

अनंत नाडकर्णी आमच्या समोरच्या कॉलनीत रहायचा.त्याची आमच्याशी ओळख वसंत सबनीसमुळे झाली.वसंत सबनीसचा हा मेहुणा.
अनंता एम.कॉम होता.त्याला एका बॅंकेत सिनीयर मॅनेजरची नोकरी होती.त्याचं लग्न झालं होत आणि त्याला एक लहान मुलगा होता.
अनंताला दोन तीन बहिणी होत्या. सर्वांची लग्न पण झाली होती.अनंताचे वडिल मुळ कोकणातले.जेमतेम शेतीभाती होती,संसार चालतच होता.पण त्यांना दारूचं व्यसन होतं.आणि त्या व्यसनामुळे त्यांची परिस्थिती खूपच खालावली होती.अनंता आणि त्याच्या बहिणी यातून चांगल्याच होरपळून गेल्या होत्या.
आपल्याला असं व्यसन कदापी लावून घेणार नाही असं अनंत नेहमी छातीठोकपणे सांगायचा.नव्हेतर वडिलांची ती परिस्थिती पाहून त्याला दारूची पुरी घृणा होती.
खूप वर्षानी मी आमच्या जुन्या कॉलनीला भेट देण्यासाठी अंधेरी स्टेशनच्या समोर सातबंगल्याला जाणाऱ्या बसस्टॉपवर उभा होतो.
“मला ओळखलं नाहीत,मी अनंत नाडकर्णी.”
असं म्हणणारी एक व्यक्ति माझ्या समोर उभी होती.गटारात लोळून खराब झालेले दिसतात तसे अंगात कपडे,ते पण काही ठिकाणी फाटलेले,एखाददोन दिवस न जेवलेला भिकारी कसा दिसावा असा पेहराव असलेल्या ह्या व्यक्तिला पाहून हा अनंत नाडकर्णी आहे ह्याचावर माझा विश्वासच बसे ना.
“मला एक पाव आणि चहा घेण्यासाठी पैसे द्दयाल का “
असं आवर्जून सांगणाऱ्या ह्या अनंत नाडकरण्याला पाहून मी खरोखरच संभ्रमात पडलो.इकडे तिकडे आजुबाजुला बघून थोडासा लाजतच मी त्याला हाताने खुणावून माझ्याबरोबर चल असं दाखवलं.आणि स्टशनसमोरच्या इराण्याच्या हॉटेलमधे शिरून तडक फॅमिली रूम मधे त्याला घेवून गेलो.
“अरे! अनंता काय हे तुझी दशा करून घेतलीस?झालं तरी काय तुला?तू बॅंकेत होतास ना? तुझी बायको आणि मुलगा बरी आहेत ना?तू दारूला न शिवणारा ह्या परिस्थितीत कसा आलास?”
असे एक ना दोन एकामागून एक मी त्याला प्रश्न विचारत राहिलो हे पाहून अनंत गालातल्या गालात हसत वेटरने आणून दिलेल्या पाण्याच्या ग्लासातलं पाणी रिकामं करीत म्हणाला,
“माझी कर्म दशा.आणखी काय? “
मी त्याच्यासाठी चार पावाची एक लादीच मागवली आणि तीन कप चहा त्याच्यासाठी आणि एक कप चहा माझ्यासाठी मागवून वेटरला पिटाळून लावलं. त्याच्याकडून हावऱ्या सारखं ऐकून घ्यायला मी उत्सुक्त होतो.
अनंत आता सांगू लागला,
“उच्च श्रेणीतली नोकरी करत असताना आपल्या श्रद्धा ढळू न देता सभोवतालच्या परिस्थितीत चळू न जाता आपले संस्कार लक्षात ठेवून, न राहिल्याने मला ही किंमत मोजावी लागली.पण आता इतराना दोष देवून काय उपयोग.म्हणून मी मघाशी म्हणालो, माझी कर्म दशा.”

अनंत आता अगदी गंभिर होवून सांगू लागला
“व्यसन हे माझ्या आयुष्याच्या प्रवासाचा मैलाचा दगड झाला आहे.मी व्यसना शिवाय कधीच नसतो.प्रेमी युगुले येतात आणि जातात,युद्ध हरली जातात आणि जिंकली जातात.हरणं आणि जिंकणं सारखच होत असतं.पाऊस पडतो,बर्फ पडतं,तारे आकाशातून कोसळतात.हे होत असताना माझं व्यसन माझ्या बरोबरच असतं.मी ते वापरो न वापरो ते नेहमीच माझ्या बरोबर असतंच.
मी सर्व व्यसनी लोकांच्या घोळक्यात राहून प्रत्येकाची हकिकत ऐकत असतो.कनवाळू असणं,स्विकार करणं,प्रामाणिक असणं, अवहेलना करून घेणं,आणि शरण येणं ह्याचा वापर आपण जीवनात करीत असतो.मी स्वतः ह्या गोष्टीना सामोरा जावू शकत नाही.
व्यसनी म्हणून मी निष्टुर,तोंडफटकळ,आणि दबाव ठेवण्यात प्रवीण आहे.मी कावेबाजीत दर्दी आहे.घाबरल्याने मी खोटं बोलायला प्रवृत होतो.प्रामाणिक राहवसं मला जमत नाही.मला कुणी समजून घ्यावं असं वाटत नाही.माझ्या व्यसनाला मी खतपाणी द्दयावं असं वाटतं. बहुदा मला हे सर्व असंच असावं असं वाटतं.
सिनेमा नाटकातल्या कहाण्या पाहून व्यसनातून बाहेर पडणं खूप दुःखदायी आणि भडक असतं हे कळून येतं आणि सरतेशेवटी त्यापासून सुटका झाल्यावर ते लाभदायी होतं असं दाखवलं जातं.खरं म्हणजे कुठल्याही गोष्टीतून सुटका होणं म्हणजे महाकष्टदायी असतं.त्याच, त्याच चुका मी परत, परत करतो.मला समजून कसं राहावं हे कळतच नाही.सत्य कसं ओळखावं हे कळतच नाही मग सत्य बोलायला कसं येणार?.कबूल व्हायला मला आवडत नाही,माझा त्याच्यावर जोरच नाही. उरलेलं आयुष्य अशा तऱ्हेने कसं राहायचं हे मला उमजतंच नाही.असं हे हताश,असं यकःश्चित, असं सदा हतबल राहून कसं जीवन जाणार हे कळत नाही.
पण एक नक्की,मला प्रयत्न सोडू नये असं वाटतं.चांगल करावसं वाटतं.मला वाटतं की मी अनेक वेळा अपयशी झालो,अनेक वेळा पडलो तरी पुन्हा माझा मला सावरून पुढे जावं असं वाटतं.माहित नाही ह्यात मी यशस्वी होईन की नाही.
माझ्या आयुष्याचे जमतील असे छोटे छोटे क्षण पाडून पहातो.मला समजलंय की एखाद्दया क्षणातून मी विनासायास सुटतो. आता मला असुरक्षित वाटलं तर ते तेव्हड्या पुरतं.दुसऱ्या क्षणाला ते बदलेलही.माझं व्यसन माझ्या कानात ह्या क्षणाला फुसफुसतंय ” बाबारे!वाटेल चांगलं तुला. कसं ते तुला माहित पण आहे.” आणि मला खरंच पुढच्या क्षणाला बरं ही वाटेल.
तेव्हा तो क्षण यायची मी वाट बघतोय.
मला वाटतं अशाच तऱ्हेने मी एक एक क्षण करून चांगल जीवन जगत राहिन.आताच मला मी चांगली निवड करू शकेन. आताच मी मला काय हवं ते करू शकेन.हेच मी खरं बोलून जाईन.ह्याच क्षणाला जे काय माझ्याकडे आहे त्याबद्दल मी उपकृत राहिन.सर्व विसरून जाण्याची मी पराकाष्टा करीन.आणखी पाच मिनीटानी काही तरी मुर्खासारखं मी करून जाईन.पण अगदी ह्या क्षणाला मी माझं जीवन बदलायचा प्रयत्न करू शकेन.
शेवटी मला वाटतं,जे काय आहे ते हे सगळं माझ्याजवळ आहे.अगदी ह्या क्षणाला.आणि मला वाटतं ते पुरं आहे.फरक व्हायला ते पुरं आहे.चांगली व्यक्ति व्हायला ते पुरं आहे.मला ह्यातून सुटकेसाठी हवं आहे तो मी ह्या क्षणी आहे …अगदी ह्या क्षणी आहे.”

हे सर्व त्याचं भाषण मी निमूट ऐकत होतो.एम.कॉम होवून बॅंकेत मॅनेजर म्हणून राहिलाला हा माणूस मी वेडा समजू की शहाणा हेच त्या क्षणी मला समजत नव्हतं.पण म्हणतात ना दारूच्या नशेत माणूस खरं तेच बोलतो तेव्हा तो काय जे बोलत होता ते त्याला मी त्याची वाफ जावू द्दयायला-स्टिम आऊट- करायला देत होतो.

अनंताची नोकरी केव्हांच गेली होती.दारुच्या व्यसनाने तो वेळेवर ब्यॉंकेत जात नसायचा. त्याची पुर्वीची सेवा पाहून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न झाला.पण नंतर नंतर अति व्हायला लागल्यावर त्याला नोकरीवर नको येवू म्हणून सांगितलं गेलं.
त्याचं व्यसन जसं वाढत गेलं तसं त्याची पत्नी त्याला सोडून मुलाला घेवून माहेरी गेली.ती येईचना.अनंताला हाऊसिंग बोर्डची जागा सोडावी लागली.तो बेघर झाला.हे केवळ दारुच्या व्यसनामुळे झालं.

माणसाच्या मेंदुमधली रक्ताच्या सरक्युलेशन मधून सततच्या अलकोहलच्या प्रादुर्भावामुळे एक जागा इतकी प्रभावित होते की नंतर त्याची त्या अलकोहलसाठी कोलाहल होते.ह्यालाच इंग्रजीत addict -व्यसनी- म्हणतात.आणि तेच अनंताचं झालं.त्याशिवाय मला वाटतं हे काही प्रमाणात आनुवंशिक पण असावं.दारुच्या व्यसनात एखाद्दयाला मुलं झाली तर त्या मुलांच्या जिनम मधे ते व्यसन उतरत असावं. असं मी कुठे तरी वाचल्याचं आठवतं.हे व्यसन त्याला त्याच्या वडिलांकडून आलं असावं. आणि माझ्या माहितीतली पण अशीच काही उदाहरणं आहेत.ज्याठिकाणी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या व्यक्ति प्राप्त परिस्थितीत एखादं लटकं कारण दाखवून असं व्यसनी व्हायला उद्दयुक्त झालेली.

अनंताचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटलं.त्याला त्याचं काहीच वाटल्याचं दिसलं नाही.

कदाचित,
”ठेविले अनंते तैसेचि रहावे.”
असं त्याला वाटत असावं, असं मी मनात आणून त्याचा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, May 3, 2008

का उघडशी द्वार तुझ्याच हाताने

दूर जाताना माझ्या प्रीतिला
का बांधून ठेवीसी तुझ्याच पदराने
न जाण्याच्या तुझ्या इशाऱ्याला
का खुणवून सांगसी तुझ्याच नयनाने

उजाडता पहाट उद्दयाची
करीन मी तयारी जाण्याची
जाईल सारा दिवस तूझा
होशिल मग उदास रात्रीची

उभी राहूनी वाट पहाशी
ठेवूनी हात कंबरेवरती
जाईल मग रात्र निघूनी
ठेवूनी भरवंसा प्रतिक्षेवरती

येईल परत अशीच रात्र
पाहू नको तू वाट मात्र
दूर कुठेतरी थकून जावून
होईन मी पुरा बरबाद

स्मरूनी क्षण माझ्या विरहाचे
रडुनी होतील आभास निराशेचे
फिरूनी म्हणशी मलाच निर्दय
का उघडशी द्वार तुझ्याच हाताने
दूर जाताना माझ्या प्रीतिला
का बांधून ठेवीसी तुझ्याच पदराने

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, May 1, 2008

आगे बढो!

खरंच,पाटी पुर्ण पुसून टाकल्यास जगात गुन्ह्यापासून झालेली होरपळ,आपण केलेली बदल्याची होरपळ, उघड उघड विसरून जावून जर का “आगे बढो” म्ह्टलं तर किती बरं होईल.

हल्ली त्यामानाने खूपच लोकांचे प्राण जातात.काहींचे अपघातात तर काहींचे मारामारीत,कांही मरतात आतंगवाद्दयाकडून वगैरे.
हे शहरात जास्त होत असतं. त्यामानाने खेड्यात असले प्रकार फारच कमी होतात.एकवेळा मुंबई अशी होती की येव्हड्या मोठ्या शहरातपण त्यामानाने खून खराबे कमीच होत.मग शहराच्या बाहेर आणि खेड्यात तर कधीतरी एखादा खून व्हायचा.आणि वर्तमानपत्रात खेड्यात रकानेचे रकाने भरून येत.
माझे वडिल तेव्हा रत्नागिरी जिल्हयात पोलिस खात्यात चांगल्या हुद्दयावर होते.त्यांच्या मित्राचा एक मुलगा त्यांच्या हाताखाली पोलिस इन्स्पेक्टरचे काम करायचा.गावात कुठेही दरोडा पडला तर ह्या मंडाळीना दरोडखोराच्या मागावर जावं लागायचं.
एका अशाच दरोडेखोराच्या हातापायीत गोळी लागून त्या इन्स्पेकटरचा खून झाला.त्यावळी अकरा वर्षाचा असलेला त्यांचा मुलगा अलिकडेच मी रत्नागिरीत गेलो असताना मला भेटला.मला पाहून त्याला तो काळ आठवला.
मला तो सांगू लागला,
“मध्य रात्री आमच्या दरवाज्यावर कोणी तरी थाप मारली.माझ्या आईने दरवाजा उघडला. माझ्या आईला तो माणूस म्हणाला,
“तुमचे पति दरोडेखोराची गोळी लागून गेले.”
आणि आमच्या घरात भुकंप झाल्या सारखं झालं.
त्यानंतर त्या दरोडेखोराला पकडलं गेलं,आणि त्याला फांशीची शिक्षा झाली.नंतर वरच्या कोर्टात त्याला जन्मठेपीची शिक्षा झाली.आणि अजून तो तुरंगातच आहे.
मी त्या खून्याबद्दल जमेल तेव्हडा विसर पाडून घ्यायचा प्रयत्न करीत राहिलो.एक तर असं राहणं किंवा त्या खून्याचा द्वेष करीत राहून बळी पडावं हे दोनच उपाय होते.
त्याऐवजी हळू हळू मी माझ्या स्मरणातून त्याचं नांवच काढून टाकण्याचा प्रयत्न करीत होतो. कदाचित इकडे तिकडे काही तरी घटना घडून कुठे तरी वर्तमानपत्रात बातमी येवून त्या खून्याला पॅरोलवर सोडला हे समजलं जायचं किंवा एखादा माझा मित्र “अमक्या अमक्याचं असं असं झालं” असं सांगून आठवण करून द्दयायचा.आणि नंतर मला परत त्याचा विसर पाडायला भाग पडायचं.
हे काही सर्व सोपं नव्हतं.सर्वसाधारण ज्याच्या त्याच्या मनात,अशा परिस्थितीत,
”मुलाने आपल्या बापाच्या खूनाचा वचपा घ्यायला हवा”असले विचार येत असत.
“हरामखोराचा घे वचपा” असं म्हणणारे काही असत.
तुम्हाला आता पटणार नाही पण मला ते त्यावेळी वेगळंच दिसत होतं. माझ्या वडीलांसारखा दुसरा कोणी ऑफिसर असाच मारला गेला हे मला कळल्यावर, किंवा कॅलेंडरवर फादर्सडेचा दिवस बघितल्यावर, मला माझ्या वडलांचं स्मरण व्हायचं.
त्यांच्या मृत्यूचा माझ्या मनात विचार यायचा.आणि त्या खून्याचं अस्थित्वच मी माझ्या मनात नाकारत होतो.
आता सुद्धा हे मी तुम्हाला सांगत असताना,त्याचं नाव माझ्या मनात उचल खातं आणि ज्या जागी माझ्या मनात गाडलंय तिथून मला ते नांव मोकळं करण्याचा प्रयत्न करतं. ह्याचाच अर्थ सतत डोक्यात राग ठेवून मला जगण्याची जरूरी नव्हती.

ह्याचाच दुसरा अर्थ इतिहासाच्या त्या घटनेत मला जखडून राहण्याची जरूरी नव्हती.ह्याचाच अर्थ मी माझं जीवन जगत राहून,माझ्या वडलांवर असलेल्या माझ्या प्रेमाचा, मी कधीच विसर पडू देवू नये,किंवा त्याना आपल्या प्राणाची आहूती देताना काय वाटलं असेल ह्याचाही विसर पडू देवू नये, आणि बदला घेण्याच्या विचारही मनात येऊ नये.

विसरून जाण्याचं अंगी असलेल्या क्षमतेवर माझा विश्वास आहे.जगात कितीतरी जूनी किलमीशं जुलूम करण्याच्या मनसेने बदला घेण्याच्या इर्षेने आगीचा डोंब अजून उठवतात.
झालेल्या घटना विचारात घेवून बदला घेवून किती लोकाना प्राण गमवावे लागत आहेत.
खरंच,पाटी पुर्ण पुसून टाकल्यास जगात गुन्ह्यापासून झालेली होरपळ,आपण केलेली बदल्याची होरपळ, उघड उघड विसरून जावून जर का “आगे बढो” म्ह्टलं तर किती बरं होईल.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com