Friday, November 30, 2007

घडत असते घडता घडता

घडत असते घडता घडता

इशारा देते ही संध्या जाता जाता
जीवनात एक एक गोष्ट
घडत असते घडता घडता

सहचरा शिवाय मन लागेना
जीवन सुने सुने राहाता येईना
मिळे कुणी असाच जाता जाता
जीवनात एक एक गोष्ट
घडत असते घडता घडता

असता मन माझे उत्साही
कटाक्ष टाके कुणी हंसूनी
न व्हावी माझी परिणती
उश्वास मी घेता घेता
जीवनात एक एक गोष्ट
घडत असते घडता घडता
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

नको माझे स्वप्न मोडू

नको माझे स्वप्न मोडू

हळू हळू जा तू चंद्रा
हळू हळू तू जा
नको तू रात्र ढळू
नको माझे स्वप्न मोडू

पाहूनी त्याला नजर फिरवीली
कशामूळे मी नजर झूकवीली
गुणगुणत गाणे वारा गाई
हळू हळू जा तू चंद्रा
हळू हळू तू जा

भेट झाली आम्हा दोघांची
लागण झाली हजारो दिव्यांची
अगणित हार गुंफिले फुलांचे
कुजबुज होई अमुच्या मिलनाची
हळू हळू जा तू चंद्रा
हळू हळू तू जा

नको तू रात्र ढळू
नको माझे स्वप्न मोडू
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

प्रीत तुझ्यावर सदैव करी

प्रीत तुझ्यावर सदैव करी

मन माझे खूळे होऊनी
प्रीत तुझ्यावर सदैव करी
जरी येशी सामोरा मला पाहूनी
तरी शब्द ओठी जाती राहूनी

समजावू किती ह्या मनाला
खूलवू किती ह्या मनाला
भोळे हे मन काही न समजे
रात्रंदिनी ही उदास असते
मन माझे खूळे होऊनी
प्रीत तुझ्यावर सदैव करी

क्षणोक्षणी सतावते हे मन माझे
रात्र सारी जागवीते हे मन माझे
ठाऊक नसे हे तुला कधी
परी जीव टाकीते तुझ्यावरी
मन माझे खूळे होऊनी
प्रीत तुझ्यावर सदैव करी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

भाली

भाली
खरं म्हणजे आम्ही त्यांना भाली म्हणत असलो तरी त्यांच खरं नांव भालचंद्र रेडकर.भाली तसे दिसायला स्मार्ट होते. तरतरीत नाक,गोल चेहरा,गुबगुबीत शरिरयष्टी अणि अतिशय लाघवी स्वभाव त्यांचा.आयुष्यभर भाली ब्रम्हचारी राहीले.आणि त्याला एक कारण होतं.गावात जेव्हा देवीची लागण होती तेव्हा भालीच्या नशिबी आजारपण आलं.सर्व आंगावर देवीचे व्रण उठले आणि त्यांचा चेहरा त्या व्रणानी भरला.त्यामुळे एखाद्दया पितळीच्या अथवा तांब्याच्या कळशीवर जशी ठोकणे दिसतात अगदी तशीच ठोकणे त्यांच्या चेहऱ्यावर आली होती.आणि " ह्या विद्रुप चेहऱ्याच्या मला कोण मुलगी देणार? आणि माझ्याशी कोण मुलगी लग्न करणार?" असा प्रामाणिक प्रश्न मनात आल्याने "मी लग्नाचा विषयच मनातून काढून टाकला" असं ते मला म्हणत.

भरपुर घोळ असलेला शुभ्र सफेद लेंगा, त्यावर लांबसडक कुठल्याही रंगाचा उभ्या लाईन्स असलेला शर्ट,पायात चप्पल आणि आता ह्या वयात डोक्यावर टक्क्ल,स्थुल शरिर घेऊन गिरगांवातल्या फुटपाथवर सामोरा आलेल्या ओळखीच्या व्यक्तिला "अरे तू असतोस कुठे?बरा आहेस ना?" असे एका श्वासात विचारलेले वाक्य कानावर ऐकू आल्यास खचितच मागे वळून पहाण्याची जरूरी न भासता हा भालीच असणार ह्याची खात्री व्हायची.
शिक्षण मॅट्रिक पुरते,इंग्रजी लिखाणावर हातखंडा,आणि मेक्यानिकल गोष्टीकडे जास्त कल असल्याने माझगाव डॉकमधे कारकूनाची नोकरी मिळणे त्यांना कठिण झालं नाही.ऑफिसात तोच ड्रेस तोच गावभर कुणाकडेही जायला तोच ड्रेस असायचा.त्यामुळे "उच्च विचारसरणी आणि साधी रहाणी "ह्या उक्तीचा समर्पक अर्थ भालीकडे पाहून मनात यायचा.हा मराठी लोकांची बाणा आहे असे त्यांना वाटत असायचे.

कुठेही सगीत क्लासची वर्गणी भरून क्लासिकल गाणे शिकल्याचे ऐकीवात नसता,कुठल्याही शास्त्रोक्त गाण्याच्या संगीत मेळाव्यात किंवा रेडियोवर चाललेल्या गाण्याचा कुठचा राग आहे ते भाली बिनचूक सांगायचे,आणि त्यामुळे ह्या गृहस्थाला संगीताची उपजतच देणगी असावी अशी खात्री व्हायची.भालीचा दुसरा छंद ड्राईव्हिंग करण्याचा.ग.म.लाडांच्या ऑफिसने दिलेल्या गाडीतून लाडाना गावोगावी टूरवर नेण्यासाठी कोण उत्सुक्तता असायची.अशावेळी लाडांच्या ऑफिसने दिलेल्या ड्रायव्हरला बाजुला बसायला सांगून गाडीचे चक्र आपल्या हातात घेण्यात कोण अभिमान त्यांना वाटायचा.अशा संवयीमुळे जवळ जवळ सर्व महाराष्ट्र त्यानी पालथा घातला होता.
संध्याकाळी चारच्या सुमारास डॉकयार्ड सुटल्यावर "F" रूटने भाली पांच मिनीटात घरी लगबगीने गिरगावात यायचे. म्हाताऱ्या आईने झाकून ठेवलेला कपभर चहा आणि बाजूला एका बशीत ठेवलेले कधी कधी कांदे पोहे तर कधी तिखट शिरा तर कधी थालीपीठ घशाखाली घालून "आई येतो गं! " असं म्हणत तिन मजले उतरून गिरगावच्या फुटपाथवर चालू पडायचे ते थेट करंड्यांच्या ताईला भेटायला किंवा कामथांच्या काकाशी चार गोष्टी करायला किंवा शिरश्वेकरांच्या आजींची चौकशी करायला म्हणून निघायचे ते थेट संध्याकाळी लाडांच्या दादरच्या हिदूकॉलनीतल्या "GIP" रेल्वेसमोरच्या ब्लॉकवर रात्रीच्या मुक्कामाला जायचे.संध्याकाळचं जेवण बहुदा लाडांकडेच असायचं.

जस जसं वय होत गेलं तस तसं भालीच्या रोजच्या रिवाजात खंड पडत गेला. आणि रिटायर्ड झाल्यावर आठ तास ऑफीसात जात असलेला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडू लागला.घरी बसण्याची संवय नसल्याने उगाच कुणाच्याही घरी जावून बसणं कठीण होवू लागलं. "बाबारे, म्हातरपण कुणालाही नको.आणि असलंच तर उत्तम प्रक्रृती आणि भरपूर पैसा असेल तर म्हातारपणा सारखी मजा नाही" असं मला कधीतरी म्हणायचे."रोज सकाळी उठ्ल्यावर प्रकृतीच्या काही ना काही तरी कटकटी असतात बघ" असं म्हणून झाल्यावर पु.लं चा जोक सांगायला विसरायचे नाहीत."सकाळी उठल्यावर जर का आपले गुड्घे दुखले नाहीत की समजावं की आपण मेलो" असं म्हणून मनसोक्त हंसायचे.हा जोक सांगायचा नसल्यास दुसरा एक जोक सांगायचे "हे बघ, आपला कोणही सल्ला घेत नाही हे लक्षात आल्यावर आपण समजावं की आपण आता खरंच म्हातारे झालो,आणि हा सल्ला आपल्याकडून मिळाला असता तर बरं झालं असतं असं जर त्यांच्या मनांत आलं तर समजावं की आपण खरंच मेलो ."

मी ईकडे आल्यानंतर भालीचा आणि माझा संपर्क जवळ जवळ तुटला म्हणायला हरकत नाही.नाही म्हटलं तर अलिकडे माझ्या एका मित्राने ईमेलवर बातमी दिली की भाली निर्वतले.रात्री झोपी गेल्यावर सकाळी अंथरूणातूनउठेनात. हे पाहून कळायला कठीण झालं नाही की भाली झोपेतच गेले.
माणसाला झोपेची आवश्क्यता नसती तर भाली सतत असेच पायाला चक्र लागल्यासारखे ईकडून तिकडे फिरतच राहिले असते.कदाचित ईश्वराला त्यांची दया आली असावी म्हणूनच की काय त्यांना त्याने "चीर नीद्रेत "पाठवले तर नाही ना?
भालचंद्र रेडकर जाण्यासमयी ऐंशी वर्षाचे होते.
श्रीकृष्ण सामंत ( स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

Saturday, November 24, 2007

कसं आहे तुझं

कसं आहे तूझं

कुणी विचारेल का
माझ्या दुःखी मनाला
कसं आहे तूझं
कसं आहे तूझं

नशिबा तुझं निराळंच वागणं
छळायचंच तर खूप छळणं
फूल बहरलं तर डहाळी तुटणं
कुणी बरोबर तर कुणी चुकणं
म्हटलं ज्याला अगदी जवळचं
नजरच म्हणाली आहे ते चुकीचं
करण्य़ा गेलो अतिव स्नेह
पदरी पडला अतिरेकी विरह

पहिल्या पाऊली झाली घाई
शेवट होऊनी ठोकर खाई
घालवून बसलो आझादी
कुणी समजावे कुणी जाणावे
प्रेमापासून होई कशी उतराई
कुणी विचारेल का
माझ्या दुःखी मनाला
कसं आहे तूझं
कसं आहे तूझं
श्रीकृश्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

दाजी "पोष्ट्मन"

दाजी "पोष्टमन"
भास्करभाऊना दाजी धरून सहा मुलं.दोन मुलगे अणि चार मुली.दाजी सर्वांत मोठा.तशी दाजीला आणखी दोन भावंड होती,परंतु ती लहानपणीच निर्वतली.भाऊ एकटे कमविणारे, गुंडू जोश्यांच्या दुकानात कारकूनाची नोकरी करून किती पगार मिळणार.एव्हडी मुलं झाल्यावर गरिबी ठाण मारूनच बसणार.
दाजी जेमतेम इंग्रजी ४ थी पर्यंत शिकला.मराठी ४ ईयत्ता आणि इंग्रजी ४ ईयत्ता.खूप झालं असे त्याला वाटलं.पण खरं कारण ते नव्हतं.इंग्रजी शाळेत दीड रुपया मासिक फी होती.आठ,आठ आण्यानी वाढून ४ थीत ती दीड रुपया झाली होती.जस जशी दाजीची भावंड वाढू लागली तस तशी भाऊंच्या खर्चाला मेळ बसणे कठीण होवू लागलं.दाजी वेळेवर फी भरत नाही, म्हणून मास्तर त्याच्यावर रागवू लागले.नंतर नंतर ते त्याला पुरा तास बाकावर उभे करून शिक्षा देवू लागले.पहिली बाकावर उभं राहाण्याची शिक्षा भोगताना, दाजीला खूप वाईट वाटलं होतं,कारण घोडग्यांची शालू आणि पुन्हाळेकरांची मालू त्याला बाकावर उभा राहिलेला बघून हंसली होती.घरी आल्यावर तो आईच्या कुशीत जाऊन खूप रडला होता.वडील फीचे पैसे देऊ न शकल्याने त्याला शाळेत खूप शरमेने रहावं लागतं,त्यामुळे त्याचं अभ्यासातपण लक्ष लागत नव्हतं.आई त्याला वडीलांची बाजू घेऊन समजावून सांगत होती.ते दाजीला कळत होतं पण वळत नव्हतं.हळू हळू तो पुस्तकं घेऊन घरून निघाला तरी शाळेत जात नव्हता.थोडे दिवस तो ईकडे तिकडे वेळ घालवत राहीला.कुणाच्यातरी दुकानात जाऊन गप्पागोष्टी करीत राहिला.शाळा सुटण्याच्या वेळी घरी यायचा.परिक्षेत बऱ्याच अश्या विषयावर लाल लाईन्स आलेल्या पाहून भाऊनी त्याला विचारल्यावर त्याचा त्यांच्याशी वाद व्हायचा.भाऊना तोंड बंद बुक्याचा मार सहन करावा लागायचा.एकदा त्याला इंगळ्यांचा चिंतामणी रस्त्यावर भेटला असता म्हणाला हेड पोस्टात जाऊन गरीब अशिक्षीत लोकांच्या मनीऑर्डरी किंवा पत्र लिहून पैसे का कमवीत नाहीस? ईकडे तिकडे वेळ का घालवतोस.दाजीला ही कल्पना नामी वाटली.तसे तो करू लागला.रोजाना चार पैसे खिशात पडू लागले.हे गुपित फक्त त्याने आपल्या आईला सागितलं.तिला पण घरखर्चाला त्याच्याकडून मिळू लागल्याने भाऊंच्या तुटपुंज्या कमाईत हाल करून घेण्यापेक्षा हा मार्ग तिला सुखकर वाटला.लहान वयात दाजीला शिक्षणाला दांडी देवून असं करावं लागतं त्याचं तिला वाईट पण वाटत होतं.
कधी कधी रविवारी ताटात सरंग्याची तळलेली कापं आणि सुंगटाच कालवण जेवताना भाऊना अचंबा वाटायचा पण कदाचित बायको दिलेल्या पैशातून काटकसर करीत असेल अशी भाबडी समजूत करून घेऊन जेवून झाल्यावर मुकाट्याने हात तोंड धुऊन उठून जायचे.नंतर काही दिवसानी कानावर कुणकुण आल्यावर त्याने सर्व बाबतीत दुर्लक्षच केलं.अशा तऱ्हेने दिवस जात होते.
आम्ही काही दिवसासाठी उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात आलो होतो.दाजीच्या आईने माझ्या आईकडे दाजीचा विषय काढून त्याला आमच्या बरोबर मुंबईल नेऊन नोकरी लावण्याची कल्पना दिली.आणि अश्या तऱ्हेने दाजी मुंबईला राहू लागला.असाच एकदा दाजी दादर पोस्टात नोकरी मिळेल का यासाठी गेला असता योगायोगाने त्याला चिंतामणी भेटला .चिंतामणी पोस्टात क्लार्क म्हणून काम करत होता.पोस्टमास्तराच्या ओळखिने त्याने दाजीला पोस्टात चिकटवलं.सुरवातीला पोस्टात शिपाई म्हणून त्याला नोकरी मिळाली.पोस्टमनांचेच कपडे घालायला फुकट मिळाले.महिना चाळिस रुपये पगार मिळू लागला.दाजीने आईला पहिल्या पगारात मनिऑर्डर करून खाली दोन ओळीत लिहीले की "तुझ्या आशिर्वादाने मी पोस्टात नोकरीला लागलो.दर महिन्याला मी तुला २० रुपये पाठवित जाईन.भाऊना नमस्कार सांगावास." दाजीच्या आईचा आनंद गगनांत मावेना.ज्याला त्याला ती सांगू लागली की "आमचो दाजी पोष्ट्मन झालो"
त्यानंतर दोन वर्षात दाजीला खरोखरच पोस्टमनच्या जागेवर बढती मिळाली,दाजीच्या आईचे शब्द खरे ठरले.निवडीच्यावेळी दाजीला पत्रावरचे मराठीत,हिंदीत,आणि इंग्रजीमधे पत्ते वाचायला सांगितले होते,ते त्याने न चुकता वाचले तसेच दादर भागातील निरनिराळ्या रस्त्यांची नावं वाचायला दिली ती पण त्याने बिनचूक वाचली.
दाजीला आता चार खाकी प्यान्ट्स,चार खाकी बुशशर्टस आणि चार पोस्टमनच्या खाकी टोप्या मिळाल्या.आठ्वड्याला ते कपडे धोब्याकडे धुवायला अलाउन्स मिळू लागलं.आमच्याकडे राहात असल्याने तो आईला खर्चाचे पैसे देऊ करीत चक्क आईला साष्टांग नमस्कार घालून बसला.आईने त्याला आशिर्वाद दिले पण त्याचे पैसे घेतले नाही.उलट पोस्टात स्वतःच्या नावावर सेव्हिंग खाते उघडून घेऊन पैसे जमा करण्याचा सल्ला दिला.आता दाजी नोकरीत खूप रुळला होता.दादर एरिया त्याची पाठ झाली होती.प्रामाणिकपणा,साधा स्वभाव आणि मद्तीला पुढे धावणारी वृत्ती असल्याने दाजीची प्रगती होत गेली.आता त्याला सांताकृझला सरकारी क्वार्टरसमधे तिन रूमचा ब्लॉकपण मिळाला.तो आता तिकडे राहायला गेला.दर रविवारी आमच्या घरी यायचा.येताना एक डझन उत्तम केळी घेऊन यायचा.माझ्या हातात देताना म्हणायचा "हिरव्या सालीची आसत पण आतून मात्र पिकी आसत हां! " हे त्याचे बोलणे ऐकून आई हंसायची."मावशे हंसू नकोस आता मी शुद्ध मराठीत बोलतंय हां! " असं तिला निक्षून सांगायचा. आई म्हणायची "अरे दाजी,आता लग्न कर बघू! म्हणजे तुझ्या पायाच्या चाकाना ब्रेक लागेल." त्यावर तो म्हणायचा " मावशे, पोस्टमनाच्या पायांक सदाचीच चाकां,पत्रां टाकूक गांवभर फिरूक लागतां. " दाजी एकटाच एव्हड्या मोठ्या ब्लॉकमधे राहतो म्हणून लोक त्याला पेईंग गेस्ट ठेव म्हणून सुचना करायचे पण दाजी कसला रिटायर्ड होई पर्यंत त्याने आपला हेका सोडला नाही." मी सरकारी नोकर असल्याने कायद्दयाने मला असं करता येत नाही,जे करतात त्याना बापड्याना करू देत,मी कोर्टाची पायरी चढणार नाही " असं ठासून सांगायचा.
एका वर्षी दाजीचे वडील त्याच लग्न करून टाकण्यासाठी पहिल्यांदाच मुंबईला आले होते.वडीलाना तो आमच्या घरी घेऊन आला होता.आईकडे वडीलांसमोर लग्नाचा विषय काढून कसा म्हणतो" मावशे, पोस्टमनाच्या जातीक लग्न परवडूचां नाय.बायकोच्या लिपस्टीक आणि पावडरीत सगळो पगार संपतलो,मग महिनाभर खावूंचा काय? " आई नेहमीप्रमाणे हंसायची.त्यांच्या मुक्कामात वडीलानी मोठा प्रयत्न करून एक मुलगी दाखवली तिचा इंटरव्ह्यू घेणार म्हणून त्यांच्या खणपटीला बसला.आणि त्यात त्याने तिला स्पष्ट विचारलं " काय हो,तुम्ही माझ्याशी लग्न करायला निघालात पण तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळाला नाही काय ? " मुलीच्या बापाने कपाळावर हात मारून घेत त्याची रजा घेतली.नंतर कंटाळून दाजीचे वडील कोकणात परत गेले.
दाजी कायमचा ब्रम्हचारी राहीला आणि रिटायर्ड होवून ६० वर्षावर कोकणात परत गेला.आता तो त्याच्या वडीलांच्या गावी आजगावात रहातो.आई वडील केव्हाच निर्वतले.दाजी जाताना सरकारी कपडे घेवून गेला.गावात फिरताना ते मधून मधून वापरतो.नोकरीवर असताना पावसाळ्याच्या दिवसात सरकारने त्यांना लांब प्यांन्ट भिजूनयेत म्हणून शॉर्ट प्यान्ट्स (तो त्याला "हाफ प्यांन्ट" म्हणायचा.) त्याही नेल्या होत्या.त्या "हाफ प्यांन्ट्स " घालून कोकणात खूप उकडतं म्हणून वरती उघडाच राहून गांवभर भटकत असतो.आपल्या ४० वर्षाच्या सरकारी नोकरीतला अनुभव न विचारला असतानाही सांगत असतो.त्याच्या उजव्या हाताचा आंगठा सरळ न रहाता खांद्दयाकडे वळलेला दिसतो त्यावर कुणी प्रश्न केल्यास "रिटायर्ड होता होता सॉरटरची जागा मिळाल्याने हजारो पत्रे सॉर्ट करून करून आंगठा हा असा वाकला "असे अभिमानाने सांगत असतो.कुणी म्हणतात "दाजीचं डोकं फिरलंय" म्हणून तो असा बडबडत असतो.एकएकाच्या आयुष्यात कायमचा संघर्ष असल्यावर "डोकं फिरलं नाही तर नवलच म्हटलं पाहिजे"
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

Monday, November 19, 2007

अर्धी नियत छुपी छुपी

अर्धी नियत छूपी छूपी

स्वभाव ज्यांचा छूपा छूपा
कसल्या कराव्या अपेक्षा
नकली चेहरा सामोरा येई
असली भाव छपून राही

स्वतःशी स्वतः लपून छपून
कसली अपेक्षा ओळखीची
कसली द्दयावी अलिंगनें
कसल्या कराव्या शुभेच्छा

अर्धी नियत उभारलेली
अर्धी नियत छूपी छूपी

दिलदारीचे ढोंग रचवून
जाळे पसरवीत गप्पांचे
ढकलती जीवन दिवसाचे
सुखं शोधती रात्रीचे
दुःख अंतरी ओठी येई
दुःख शरिरी छपून राही

अर्धी नियत उभारलेली
अर्धी नियत छूपी छूपी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

Saturday, November 17, 2007

आली फिरून उत्कंठा जगण्याची

आली फिरून उत्कंठा जगण्याची
पदर ओढिला काट्यानी
चाळ तोडिला पायानी
उडत्या माझ्या मनाला
कुणि आता नका आवरूं
चालले होऊन माझे मन
जणू वाऱ्या वरचे पाखरूं

आली फिरून उत्कंठा जगण्याची
आला फिरून ईरादा मरण्याचा

गत रात्रीच्या कभिन्न अंधारातून
देखिले चोहिकडे नयन मिचकावून
बहरले जीवन फुला फुलातून
निश्चय झाला मग हे देखून

आली फिरून उत्कंठा जगण्याची
आला फिरून ईरादा मरण्याचा

का भारावलेले असे माझे जीवन
का मोकाट सुट्लेले मी असे तुफान
मन होई साशंक करीता जीवन प्रवास
वाटे जाईन हरवून मी तुझा सहवास

आली फिरून उत्कंठा जगण्याची
आला फिरून ईरादा मरण्याचा

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

लपून छ्पून येई दुलहन

लपून छपून येई दुलहन

ढळून होई दिवसाचा अस्त
होवून संध्या दुलहन मस्त
लपून छ्पून येई
छंदिष्ट माझ्या मनाच्या अंगणी
लावील का कुणी
स्वपनांच्या दीपज्योती त्याक्षणी

असेच केव्हा होती जेव्हा
बोजड निश्वास
भर भरूनी येती जेव्हा
अश्रू नयनी
मुरडत मुरडत येऊनी तेव्हा
करील का कुणी
मजवरी प्रेमाचा वर्षाव

दोन मने का कधी न जुळती
कुठून आली जन्माची नाती
वैरी होऊनी अपुले मन
असून अपुले
का दुःख साही ईतरांचे

न जाणे मन माझे भेद गहिरे
न जाणे स्वप्न माझे कसे सुनहरे
स्वप्न माझे माझेच असुदे
असून माझे
न होई केव्हाही वेगळे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

Friday, November 16, 2007

उत्कंठा मला किनाऱ्याची

उत्कंठा मला चंद्रताऱ्यांची

उत्कंठा मला चंद्रताऱ्यांची
मिळे भेट मला अंधाऱ्या रात्रीची
असून सूर मी न मिळे प्रेमाची मह्फील
भटकंती करून मी न मिळे ईच्छीलेली मंझील

उत्कंठा मला मोहरलेल्या बागेची
मिळे भेट मला विषारी काट्यांची
शोधत असता मी न मिळे कुणाचा आधार
मार्ग काटीत मी न दिसे तारकांचा हार

उत्कंठा मला सुंदर चेहऱ्याची
मिळे भेट मला उद्विग्न महिलेची

झाल्या निराळ्या दिशा दोघांच्या
आस्थेच्या नजरा बदलल्या त्याच्या
उत्कंठा मला त्याच्या सहाऱ्याची
मिळे भेट मला कठोर विरहाची

केली मी प्रेमाची आशा
मिळाली कुरकुरूनी निराशा
ईच्छा केली सुखशांतीची
मिळाली हवा वादळाची

डुबत्या माझ्या मनाला
उत्कंठा असे किनाऱ्याची

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

Thursday, November 15, 2007

एकद्दयाचे कायते होवून ज्याउद्दये ! ईती:-पिंग-पॉंग-च्यू

" एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये " इती, पिंग-पॉन्ग-चू
त्याचं काय झालं, मी अलिकडेच लिहीलेला एक लेख " माणूस मुलतः शाकाहारीच आहे " वाचून माझ्या एका स्नेह्यानी मला लिहीलं " नमस्कार , काल तुमच्या ब्लॉगला भेट दिली. २-३ कविता आणि माणुस शाकाहारी प्राणी कसा आहे ते वाचले. पण सर्व लोक शाकाहारी झाले तर अन्न-धान्य पुरेल का ? अन्न-धान्य यांच्या किंमती किती वाढतीले ? अशी भीती वाटते. " असो. त्यांचा प्रश्न फार चांगला होता.पण त्यांचा प्रश्नाचा आशयपाहून असं दिसून आलं की जणू अन्नधान्य अगदी पुरण्या इतकं विपूल मिळूं लागलं, आणि अगदी खूप स्वस्तपण झालं तर " आपण बुवा शाकाहारी व्हायला तयार आहो " असंच त्याना म्हणायच आहे.माणूस मुलतः शाकाहारी असावा हा प्रश्न निसर्गानेच हाताळला आहे.हे मी माझ्या त्या लेखांत काही उदाहरणे देऊन चर्चा केली आहे.इतकं करून अन्नधान्याचे भाव वाढतील म्हणून काही एखादा मांसाहारी होत नाही.धान्याचे भाव आणि धान्याच्या उत्पन्नाची पुर्तता,तसेच त्याच्या मधले राजकारण,मांस उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्याची " लॉबी " असे अनेक गहन प्रश्न आडवे येणारच.आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी किंवा अति गहन करण्यासाठी राजकारणी जन्माला आले आहेतच.माझा उद्देश एव्हडाच आहे की " तुम्ही जन्माने शाकाहारीआहात मग मांसाहारी का होता? शाकाहारी असल्याने तुमच्या तब्यतीच्या समस्या कमी असतात कारण ते निसर्गाला मान्य आहे.म्हणून " मऱ्हाठा तितुका मिळवावा शाकाहारी धर्म पाळावा" त्यासाठी असा एक प्रपंच.
मांसाआहार सोडून शाकाहारी होणं तिककं सोपं नाही हे मला पण माहित आहे.कारण मांसाहाराला माणूस एव्हडा ऍडिक्ट झाला आहे की त्याच परिवर्तन व्हायला अनेक उपाय योजावे लागतील.सध्या जगात काहिही अशक्य नाही.शेती मधे इतकी सुधारणा झाली आहे की किडमुंग्या आणि टोळ(भैरव!)उभ्या उभ्या एव्हडं शेत फस्त करतात ते होऊ नये म्हणून बीजाचे जीन बदलून त्याला किड लागणारच नाही असा बंदोबस्त केला जातो.शेतीचे उत्पादन भरपूर वाढवण्यासाठी एव्हडे उपाय उपलब्ध आहेत की श्रीमंत देशात शेतमालाचा बाजारपेठेत भाव कमी होऊ नये म्हणून धान्य जाळून टाकतात.तेव्हा माणसाने जर का ठरवलंच की शाकाहारी होणार तरते व्हायला अशक्य काही नाही." ईच्छा आहे तिथे मार्ग आहे " तेव्हा शाकाहारी अन्न कमी पडतं म्हणून मांस खावं लागतं अशातला प्रकार नसावा.म्हणून म्हटलं माणूस मुलतः शाकाहारी असताना मांसाहारी कसा झाला.कारण माणसाला निसर्गाने (देवाने म्हणा हवं तर) बुद्धिचातुर्य दिलं आहे ना! हेच मी माझ्या त्या लेखात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.आता यांच्या प्रश्नाला उत्तरच द्दयायचे म्हटल्यास दुसरा उपाय करून पाहू या असा विचार केला.त्यासाठी थोडं संशोधन करावं लागलं."शेळी जाते जीवानीशी आणि खाणारा म्हणतो वातड" अशी एक म्हण आहे.मांसाहाऱ्यांसाठी प्राण्याना कुठ्ल्या दिव्यातून जावं लागतं ह्याचा जरा कानोसा घेतला.आणि मग ठरवलं " एकद्दयाचं कायते होओन ज्यावूद्दया " (ईती दिलीप प्रभावळकर त्यांच्या चिनी माणसाच्या भुमिकेतलं एक वाक्य) असो.प्रत्येक मांसाहारी माणसाने अर्ध्यानें मांस कमी खाल्लं तर अब्जानें प्राण्यांवरचे दुष्ट अत्याचार कमी होऊन त्यांचे मरण्यापासून प्राण वाचतील.जरी तुम्हाला मांस खायाला आवडलं,तरी प्राण्यांवर होणारा दुष्ट अत्याचार वाचवुं शकता.पाश्चात देशातील खेड्यातल्या सुंदर शेतीवाडी वरच्या वर्णनांवरच्या आनंदायी कवितांचे रुपांतर आता दुर्गंधीयुक्तकारखान्यातल्या प्राण्यांच्या शेतीत झाले आहे.दहा,दहा हजार कोंबड्या एके ठिकाणी पिंजऱ्यात बघून मनस्वी धक्का बसतो.अंडी देणाऱ्या कोंबडींना अतिशय गर्दी असलेल्या पिंजऱ्यात डांबले जाते,तसेच गरोदर डुक्करीना हलायला पण जागा नसलेल्या कोंडाण्यात जखडून ठेवतात.पाश्चात्य देशात गेल्या अर्ध्या शतकानंतर प्राण्यांची शेती घरोघरी करण्या ऐवजी आता मोठमोठ्या कारखानावजा शेतात केली जाते.आणि प्राण्यांकडे दुःख आणि छळ सहनकरणारा जीव असे न पाहता एक वस्तु म्हणून पाहिले जाते.लोकाच्या नजरेपासून दुर ठेवून प्राण्यांच्या मोठमोठ्या शेतीच्या जागी त्यांचा होणारा छळ दुर्लक्षीत झाला जरी,तरी अलिकडे अधीक अधीक लोक अशा गोष्टीना विरोध करू लागले आहेत. पृथ्वी वरचे वाढते तपमान,समुद्राची वाढती पाण्याची पातळी, धृवावरची बर्फाच्छादनाची वाढती वितळण्याची क्रिया , महासागराच्या प्रवाहामधे होणारे बदल, वातावरणात होणारे बदल,तपमानात होणारे बदल हे सर्व मनुष्यजातीला सामोरे जाणारे आव्हान आहे. घरगुती प्राण्यांची मोठ्या प्रमाणातील शेतीचा, वरिल गोष्टीना कारणीभूत व्हायला १८% ग्रीनहाऊस गॅसCO2 च्या रुपात निर्माण करायला सहभाग आहे.आणि हा सहभाग दळणवळणापासून होणाऱ्या सहभागापेक्षा जास्त आहे.
माझ्या मते मांसाहारी लोक जर का ह्या घरगुती प्राण्यांच्या मोठया शेतीकारखान्याला एकदा भेट देतील आणि पाहातील की ह्या ठिकाणी ह्या प्राण्यांचे कशाप्रकारे उत्पादन होते आणि त्यांच्यावर कशाप्रकारे प्रकिया होतेतर ते पाहून आच्शर्यचकीत होतील,आणि कदाचित अशी प्रतिज्ञापण करतील की पुन्हा मांस खाणार नाही.म्हणूनआधूनिक घरगुती प्राण्याचा शेतीव्यवसाय करणाऱ्या लोकाना वाटते की जितके म्हणून होईल तितके मांसाहारी व्यक्तिला त्याच्या आहाराच्या थाळीत प्रत्यक्ष मांस पडेपर्यंत काय घडत असेल त्याची वाच्यता न झालेली बरी.आणि हे जर खरं असेल तर हे नितीमत्येच्या दृष्टीने योग्य होईल का? हे काय चालले आहे हे कळण्यास नकारात्मक राहील्याने मांसाहारी, शाकाहारी होतील ही आपली काळजी दूर होईल असं त्यांना वाटतं.
एकाच पिंजऱ्यात अनेक प्राणी ठेवल्याने आर्थिक दृष्ट्या सुलभ असते.प्रत्येक प्राण्यामागे लाभ कमी झाला तरी प्रत्येक पिंजऱ्यामागे लाभ वाढतो.एका पिंजऱ्यातगर्दी करून प्राण्याना ठेवल्याने त्यांची हालचाल कमी होते त्यामुळे अन्न खाऊन त्याचे वजन वाढते आणि त्यामुळे प्रत्येक प्राण्यामागे मांस जास्त मिळून मांसाचे ऊत्पादन वाढते आणि प्रत्येक प्राण्यापेक्षा पिंजऱ्याची किंमत जास्त असल्याने शेवटी कमी पिंजरे वापरून प्राणी चोंदून ठवल्याने जास्त फायदा होतो.म्हणजेचप्राणी स्वस्त असतो आणि त्यामानाने पिंजरा महाग असतो.
डुक्करांची कथाशेतीवरच्या लोकांना उपदेश दिला जातो." डुक्कर हा एक प्राणी आहे हे विसरा आणि त्याला एक कारखान्यातले यंत्र आहे असे समजा" सतत पिंजऱ्यात असल्याने ह्या प्राण्याला त्यांच्या अपुऱ्या आयुष्यात कधीही सूर्यदर्शन होत नाही.सुकल्या गवतावर लोळायला मिळत नाही.चिखलात कुदायला मिळत नाही.गर्भवती डुक्करीणीला कधी पिंजऱ्यात जरा हलायला मिळत नाही.खाली लोखंडाच्या नळ्या असल्याने त्यावर झोपावं लागत.आणि त्यांची विष्टा त्या मधल्या फटीमधून खाली असलेल्या डबक्यांत पडते,आणि चोहिकडे दुर्गंधी सुटलेली असते.
खाटिकखान्याला जर का कांचेच्या भिंती असत्या तर हे दृश्य दिसलं असतं.प्राण्याना मारण्यापुर्वी त्यांना अर्धबेशुद्ध करण्याचा कायदा आहे,पण......त्यांना अतिशय कृरतेने मारतात,त्याचे वर्णन करणे पण कठीण आहे.म्हणून म्हणतो,मनुष्यजातीला निसर्गाने उपजतच वैचारीक शक्ति आणि कल्पना करण्याचे सामर्थ्य दिले असताना, तिचा मुखोद्वारे किंवा लेखाद्वारे प्रचार करणेही शक्य असताना, युगानयुगे जमलेल्या ज्ञानाचा, नितीमत्ता आणि बरे,वाईट यातला योग्य निर्णय घेण्याचेही सामर्थ्य असताना,त्यांचा स्वतःच्या खाजीसाठी विशेषेकरून भूक किंवा अन्नआहारच्या दृष्टीने आवश्यक्यता नसताना, ज्या जीवाना भावना आणि अंतरज्ञान असते, त्यांचा केवळ चवीष्ट मांस म्हणून जीव घेण्याचा अधिकार मनुष्य म्हणून आपल्याला आहे काय?प्रश्न ह्या प्राण्याना आपली बाजू मांडता येत नाही हा नाही,प्रश्न त्याना बोलता येत नाही हा पण नाही,तर प्रश्न हा आहे की त्यानी हालहाल होऊन मरावे काय?
अंदाजे २ लाख डुक्करे खाटिकखान्यात मृतावस्तेत आणली जातात.आणि त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण त्याना आणताना अपुरी हवा आणि अतिशय गरम वातावरणात आणले जाते हे आहे. ते खाटिकखान्यात येण्यापुर्वीच मरतात.
सहजतेने हाताळले जावे म्हणून हे मांसासाठी वाढवलेले प्राणी विजेचा धक्का देऊन अर्धमेले केले जातात.परंतु,ही पद्धत त्यांना खरोखरच अर्धमेले करतात का? कधीकधी त्या विजेच्या धक्क्याच्या गुंगीत ते अतिशय निघृण दुखापतीत जीवंत राहून, हे सर्व प्राणी अशा परिस्थितित जेव्हा उकळत्या पाण्याच्या टाकीत टाकले जातात तेव्हा ते पाण्यात उकळून तरी मरतात किंवा त्या पाण्यात बुडून मरतात.गुप्त व्हिडीयो टेपने सर्व रेकॉर्ड करून हे उजेडात आणले आहे.
कोंबड्या ह्या प्राण्याबद्दल सर्वसाधारण समजूत आहे ते खरं नाही.त्या अगदीच बावळट नसतात.उलट त्यांची वागणूकबरीच गुंतागुंतीची असते.शिकण्यात बऱ्याच तत्पर असतात मिळून मिसळून रहाण्यात फार उत्सुक असतात.आणि निरनिराळ्या आवाजाला साद देण्यात फार तल्लख असतात. तसेच त्यांच्या समुहात प्रत्येकाची स्वतःची ओळख असते.
पाश्चात्य देशात घरातल्या पाळीव प्राण्याचा (कुत्रा,मांजर,ससा वगैर) छळ होऊ नये म्हणून जे कडक कायदे आहेत ते जर ह्या मांसोद्पानासाठी शेती होत असलेल्या प्राण्याना लागू केले तर बेकायदा वागणुकीसाठीजबर शिक्षा होईल.कुत्रा,मांजरे,ससा वगैरे प्राण्यांचा समुह आणि कोंबडी,डुक्कर,गाई,म्हशी ह्यांचा समुह ह्या दोन समुहात पहिल्या समुहाला कायद्दयाचे संरक्षण असावे हा पंक्तिप्रपंच का असावा?ही दुर्लक्षीत वागणूक तशीच चालू राहाण्याचे कारण खूप कमी लोकाना त्या प्राण्यांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीचीमाहिती असते.आणि त्यापेक्षाही कमी लोकांना त्यांच्यावरहोणाऱ्या अत्याचाराची माहिती असते.पण जर का याचीजागृती झाली तर बऱ्याच लोकांना मानसिक धक्का बसेल,आणि त्याचे कारण प्राण्यांच्या सुलभतेने जगण्याच्या ह्क्कावरून नसून,त्यांचा विश्वास बसेल की प्राण्याना पण ईजा होते आणि दुखते सुद्धा.त्याशिवाय माणूस सुद्धा माणुसकीच्या दृष्टीने आणि नितीमत्तेच्या दृष्टीने कुणालाही असे दुःख देण्यापासून परावृत्त होईल.
गाईला बछडा(बछडी नव्हे) झाल्यावर भविष्यात त्याचा दुध उत्पन्नासाठी काहीच उपयोग नसल्याने त्याचा जन्म होताच एक दोन दिवसानंतर आई पासून दूर करून त्या बछड्यासाठी निराळ्या प्रकारचे दुधवजा अन्न दिले जाते.आणि गाईचे दुध उद्पातीत करतात.नंतर हा बछडा १८,२० आठवड्यानंतर कोवळे गुलाबी मांस (tender pale coloured meat) म्हणून खाण्यासाठी कत्तलखान्यात नेतात.
ऐतिहासीक दृष्टीने मनुष्य जेव्हा नितीमत्तेची गरज खूप विकसीत करीत जात होता तेव्हा अज्ञान आणि मुळगरजा कमी करीत गेला, प्रथम कुटुंब आणि जमातीच्या पलिकडे जाऊन, नंतर धर्म ,जात,आणि देशाच्या पलिकडे जाऊन. ही त्याच्या नितीमत्तेची विकसीत होण्याची मर्यादा वाढवून ईतर प्राण्यांनापण सामाऊन घेण्याच्या निर्णयासाठी, सध्यातरी तो अशी टोकाची भुमिका घेईल हे कल्पने पलिकडचे वाटते.पण एक दिवस,म्हणजे दशके गेल्यानंतर किंवा शतके गेल्यानंतर कदाचित त्याला "सुसंकृतीच्या" नांवाखाली ह्या प्राण्यांना सामाऊन घेण्याचा विचार करावा लागेल.
माणसाचे आणि प्राण्यांचे एकमेकाचे नातेसंबध असे विचीत्र आहेत की एकाच वेळी माणसाचे प्राण्याविषयी भावनीक प्रेम आणि क्रुरपणा शेजारी शेजारी वास्तव्य करत असतात.एकदा मझ्या वाचनात आलं " अमेरिकेत नाताळच्या उत्सवात कुत्र्या मांजराना बक्शीशी दिली जाते,अन त्याच वेळेला डुक्कराच्या दुरदैवी आयुष्याची कुणालाही चुकून सुद्धा आठवण येत नाही,कुत्र्या मांजरा एव्हडे त्याला सुद्धा तेव्हडीच बुद्धिमत्ता असून संध्याकाळच्या जेवणात "खिस्मस हॅम "(डुक्कराचे मांस) ही चवदार "डिश" मेजवानी म्हणून फस्त केली जाते.
शाकाहारी व्यक्तिची प्रकृती ठिकठाक असते.रक्तदाब कमी असतो,वजन कमी असतं,कोलेस्टेरोल कमी असते,टाईप टूडायाबीटीस,हृदय रोग,प्रोस्टेट कॅन्सर आणि कोलन कॅन्सर हे रोग कमी असतात. असे असण्याच्या अनेक कारणापैकीमांसाहार न घेणे हे पण एक कारण असावे असे ज्ञानी लोकाना वाटू लागले आहे.
एक निरपराधी मुल एका पाणकोंबडीवर ह्ळुवारपणे हात फिरवीत म्हणते कसं " If I knew you, I wouldn't eat you"काही दृष्टीने हे खरंच तितकं सोपं आहे.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

परतव माझ्या आठवणी

परतव माझ्या आठवणी

यादे माझी आहेत तुझ्याजवळी
श्रावणमासी ओलेते दिवस मात्र
अन माझ्या कोऱ्या कागदावरची
लिपटलेली ती काळोखी रात्र
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी

ग्रिष्मातली पानांची पडझड
पडत्या पानांची ती सळसळ
वहात्या झऱ्याची ती खळखळ
कानी माझ्या अजूनी वाजती
यादे माझी आहेत तुझ्याजवळी
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी

पडझडणाऱ्या त्या पानांची
गदगदणारी ती फांदी
अजूनही करते गदगद
मोडून टाक ती आधी
यादे माझी आहेत तुझ्याजवळी
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी

पडक्या एका छ्ताखाली
भिजत होतो आपण दोघे
अर्धे ओले अन अर्धे सुके
सुके होऊनी परतल्यावरही
होते माझे मन तरीही ओले
नको करू ते आता सुके
यादे माझी आहेत तुझ्याजवळी
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी

त्या पौर्णिमेच्या चांदण्या रात्री
अन गालावरची तुझी ती खळी
ती अळीमिळी आणि गुपचीळी
अन खोटी खोटी दांभिक बोलणी
यादे माझी आहेत तुझ्याजवळी
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी

दे मज एकच परवानगी
करण्या दफन ह्या आठवणींचे
घेईन मग मी चीरशांती
ह्या दफनामधे कायमचे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

ईज्जत

ईज्जत
जिथे नाही कुणाला ईज्जत
तिथे जाण्यात कसली लज्जत

जीवनासाठी लागते अन्न
श्वासासाठी लागते हवा
तान्हेसाठी लागते पाणी
लाजेसाठी लागते वस्त्र
जिथे नाही कुणाला ह्याचे भान
तिथे कसाला आला सन्मान

चांगल्या वागण्याकरिता असावा सदाचार
चांगल्या निर्णयाकरिता असावा सुविचार
जिथे अति होतात आचारविचार
त्यालाच नाही का म्हणत लाचार
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

Marathi Blogs.Com

Marathi Blogs.Com