Sunday, May 31, 2009

“आजचाच दिवस योग्य आहे तुम्हाला तुमच्यासाठी तुतारी विकत घ्यायला”

त्यादिवशी मी दादरला एका मित्राकडे गेलो होतो.घरी परत येताना दादर स्टेशन जवळच्या दादर बुक डेपोत जाऊन नवीन पुस्तकं चाळत होतो. कवी बोरकरांच्या कवितेचा एक संग्रह घेतला.पावती देताना पावतीवर नांव काय लिहू असं मालकानी विचारल्यावर म्हणालो,
“श्रीकृष्ण सामंत”
माझ्या बाजूला एक गृहस्थ अशीच पुस्तकं चाळत असताना,माझं नांव ऐकून कुतूहलाने मला त्यांनी विचारलं,
“ते मिपामधे लिहिता ते तुम्हीच कां?”
सहाजीकच मला हो म्हणावं लागलं.
“तुम्हाला वेळ असेल तर चला आपण जरा गप्पा मारूया.जवळच मामा काण्यांचं हॉटेल आहे.”
कुणी आग्रह केला तर मला त्याचं मन मोडवत नाही.
मी म्हटलं,
“चला”
दोन प्लेट बटाटेवडे आणि दोन कप चहाची ऑर्डर देऊन आम्ही गप्पा मारायला लागलो.
माझी त्यांनी एव्हडी चौकशी केल्यावर मला त्यांच्या विषयी विचारणं स्वाभाविक वाटलं.
मी म्हणालो,
“तुम्ही सध्या काय करता?”
“मी माझं दुसरं पुस्तक लिहितोय.त्या पुस्तकाचं नांव आहे,
“आजचाच दिवस योग्य आहे तुम्हाला तुमच्यासाठी तुतारी विकत घ्यायला.”
माझ्या चेहर्‍यावरचं असाधारण कुतूहल बघून ते गृहस्थ मला म्हणाले,
“तुम्हाला हा पुस्तकाचा विषय जरा विक्षिप्त वाटला असेल.त्याचं कारण देण्यापूर्वी प्रथम मला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.त्या साठी मला थोडं भूतकाळात जावं लागणार आहे.
यापूर्वी मी माझं पहिलं पुस्तक छापलं. मी तसा मुळचा नाटकात काम करणारा नट.हवं तर नाटक्या म्हणा.माझा नट होण्याचाच विचार होता.आणि पुस्तक लिहिण्याचा मी कदापीही विचार केला नव्हता.
मी एक छोटीशी गोष्ट लिहिली होती.आणि माझं नशीब असं की त्या गोष्टीला बक्षीसपण मिळालं.त्यातून उत्तेजन मिळून मी दुसरी गोष्ट लिहायला घेतली.सात एक पानं लिहून झाल्यावर मी तो नाद सोडला.आणि काही वर्ष मी लेखनाचं सर्व विसरूनच गेलो.आणि एक दिवस माझा एक मित्र त्या गोष्टीची ती सात पानं वाचून मला म्हणाला,
“जा,लिहित जा. सर्व संपे पर्यंत लिही.”
आणि मी तसंच केलं.
दिवसा साधारण एक पान लिहिणं, असं करीत मी माझं पहिलं पुस्तक पूरं केलं. ते पूरं करायला जवळ जवळ एक वर्ष लागलं.पूर्वीच्या माझ्या गोष्टीला बक्षीस मिळालं असल्याने, साहित्यिक जगात मी चाचपडून पाहिलं.पटकन मला एक एजंट भेटला त्याने ते माझं हस्तलिखीत एका पब्लिशरकडे पाठवलं.
नंतर त्या हस्तलिखीताची कॉपी एका सिनेमाच्या प्रोड्युसरकडे पाठवली.हे सांगताना मला नेहमीच गुदगुदल्या होतात आणि माझ्या अंगावर कांटा येतो.

मी नंतर नट व्हायचं की लेखक व्हायचं ह्याच्यावर खूप विचार करीत होतो.आणि ही विचाराची प्रक्रिया माझ्या नकळतच संपली.काहीतरी प्रचंड झालं आणि माझ्या नजरेतून चूकलं.जीवनातल्या मोठ्या घटना लाल दिव्याच्या उघड-झापिकडे दुर्लक्ष करीत नाहीत.
कधी कधी ते वर्षानुवर्ष दृष्टीपथात येत नाहीत.आणि जेव्हा त्याचे छोटे तरंग आणि प्रतिबिंबं दिसायला लागले की नजरेतून ते सुटत नाहीत.

जरी ही घटना मला त्यावेळी लक्षात आली नाही तरी मला मागे वळवून पाहिल्यावर आता अचूक माझ्यात काय बदलाव झाला ते दाखवतं.
मला ज्यावेळी तो मित्र म्हणाला,
“जा,लिहित जा. सर्व संपे पर्यंत लिही.”
खरं सांगायचं तर त्याने त्यावेळी पुस्तक लिहायला सांगितलं असतं,तर मी त्याला वेड्यात काढलं असतं.मी पुस्तक कधीच लिहलं नसतं.
पण त्या शांत वेळी त्याचे ते बिनदास पण उचित शब्द ऐकून माझ्या मनात भितीचा लवलेशही राहिला नाही.
“नक्कीच” मी म्हणालो,”कां नाही?”
त्यानंतर मी ओळखी-अनओळखी लोकात बसून माझ्या पुस्तकाबद्दल बोलायचो आणि त्याचे त्यांच्यावर विस्मयजनक परिणाम होत होते .
त्या माझ्या पहिल्या पुस्तकाचं नांव आहे,
“मी पण अमक्या अमक्या सारखा झालो असतो तर?”
पुस्तकाचा विषय स्वैर-कल्पनेवर आहे.-मी अमुक अमुक व्यक्ति सारखं गायलो असतो तर, मी अमुक व्यक्ति सारखं वाजवलं असतं तर,मी अमुक व्यक्ति सारखं नाचलो असतो तर,मी अमुक व्यक्ति सारखा विनोदी असतो तर, मी काऊच्या चिमणरावासारखा झालो असतो तर वगैरे वगैरे.
ह्यावरची माझी चर्चा ऐकून माझ्या पुस्तकाच्या विषयाचा होणारा सम्मिश्र परिणाम आणि माझा कसलाही आधी विचार नकरता घेतलेला माझ्या व्यवसायचा निर्णय ह्या दोन्ही गोष्टी लोकांना प्रेरीत करून त्यांच्या अपेक्षा वाढवीत होत्या.मी त्यांना नेहमी चांगलंच नवीन काहीतरी करा म्हणून उत्तेजन देतो.तसं करायला ते राजी होतात.
मला हिमालय चढायचा आहे….मला चित्रकार व्हायचं आहे…..आणि एक पंचाहत्तर वर्षाचा यशस्वी व्यापारी म्हणतो मला एक तुतारी विकत घेऊन वाजवायची आहे……
मी ह्या वयस्कर गृहस्थाना विचारलं,
“तुम्ही कुठे रहाता?”
“दादरला”
“प्लाझा सिनेमा समोर एक वाद्यांच दुकान आहे तिकडे जाऊन विकत घ्या,आजचाच दिवस योग्य दिवस आहे तुम्हाला तुमच्यासाठी तुतारी विकत घ्यायला”
आणि त्यानी खरोखरंच तिकडे जाऊन तुतारी विकत घेतली.
एक गोष्ट मला न विसरता नक्की सांगायला हवी की,मी त्यावेळी पन्नासएक वर्षाचा असेन ज्यावेळी मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं.आणि त्यानंतरच्या काही वर्षात मी काही धडे शिकलो. पहिलं म्हणजे,
मी घाबरायचं सोडून दिलं.भय कधीही तुमच्या मदतीला येणार नाही.आणि दुसरं म्हणजे जास्त करून “नाय” म्हणण्यापेक्षा “होय” म्हणायला शिका. आणि ह्यावर माझा विश्वास आहे.
आणि म्हणून मी नेहमीच म्हणतो,
“आजचाच दिवस योग्य आहे तुम्हाला तुमच्यासाठी तुतारी विकत घ्यायला.”
आणि ह्याच विषयावर मी माझ्या दुसर्‍या पुस्तकाचं रोज एक पान लिहित आहे.निरनीराळी प्रकरणं माझ्या डोक्यात येत आहेत.बघूया केव्हां हे लेखन संपत ते?
निघण्यापूर्वी मी त्यांना म्हणालो,
“तुमचं हे सर्व ऐकल्यावर,माझ्या डोक्यात तुमच्या त्या मित्राचा सल्ला चांगलाच बसला आहे आणि तो सल्ला मला खूप आवडला.
“जा,लिहित जा. सर्व संपे पर्यंत लिही.”
त्यामुळेच तुम्ही दुसरं पुस्तकं लिहिण्याच्या प्रयत्नात आहात.”
माझं वाक्य संपता संपता ते हंसत हंसत मला म्हणाले,
“आणि तुम्ही पण असंच मिपावर आणि तुमच्या ब्लॉगवर “सर्व” संपे पर्यंत लिहित जा”
माझ्या संभ्रमीत चहेर्‍याकडून बघून ते गृहस्थ माझी पाठ थोपटीत म्हणाले,
“मी त्या अर्थाने नाही म्हटलं बरं का!”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, May 29, 2009

“मला तुझ्यावर भरवंसा आहे.” चार जादूचे शब्द.

माझा भाऊ सुधाकर त्यादिवशी माझ्या घरी सहजच म्हणून मला भेटायला आला होता. त्याच्या बरोबर जी व्यक्ति आली होती तिला पाहून माझी स्मृती माझ्या तरूण वयात गेली. त्या गृहस्थाने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केलं.त्या हंसलेल्या त्याच्या चेहर्‍याकडे पाहून माझी स्मृती मला आणखी ताण द्यायला लागली.ह्यालापाहिलंय, पण कुठे ते आणि याचं नांव काय हे लक्षात येत नव्हतं.
“काय मला ओळखलं नाही?”
असा त्याने पहिला प्रश्न केल्यावर परत माझी आठवण मला त्याच्या आवाजाची माझ्या मेमरीतली लोकेशन त्रास द्यायला लागली.
मी थोडं शरमल्यासारखं करून गंमतीत म्हणालो,
“age became”
तो हंसला आणि म्हणाला,
“अरे बाबा! खूप दिवस गेले की नांव विसरायला होतं.
त्याला “इव्ह्यापोरेटीव्ह मेमरी” म्हणतात.”
“आता लक्षात आलं.तू बबन सावरडेकर ना?”
असं मी त्याला उस्फुर्त विचारलं.
“अगदी बरोबर.एव्हडं काय तुला औपचारीक व्हायला नको मला तू “बबन्या” म्हणायचास, आठवतंना?”
आता माझी गाडी रूळावर आली.
“अरे पण तू सैन्यात गेला होतास ना? शिक्षणाचा तुला वैताग आला होता.काही तरी देशासाठी करावं आणि आपलाही रोजगार संभाळावा.असं काहीतरी तू बोलल्याचं आठवतं”
असं मी म्हणाल्यावर इतका वेळ गप्प बसलेला माझा भाऊ सुधाकर म्हणाला,
“अरे, हा कारगीलच्या फ्रंटवर गेला होता.मरणातून वांचला. बबन बाबा तुच तुझं सर्व ह्याला सांग.”
बबन म्हणाला,
“मला एक छान पत्नी आहे,आणि तितकेच छान दोन मुलगे आहेत.मी तसा यशस्वी वकील आहे.
गेली कित्येक वर्षं आम्ही संसार करीत आलो आहो.आणि त्याच जागी आम्ही सोळा वर्षे राहत आलो आहोत.आता पर्यंत सर्व दिवस सुखदायक चालले आहेत.परंतु तसं नेहमीच चालत आलं आहे असं नाही.”
“पण तू शाळा सोडल्यावर सैन्यात कसा वळलास?आणि कारगीलच्या युद्धात केव्हा सामील झालास?”
मोठ्या कुतूहलाने मी त्याला प्रश्नाचा भडिमार केला.

“ज्यावेळी मी मधेच शाळा सोडली,त्यावेळी मला जरूरी भासली तरी, तेव्हडे कोणही माझ्या मदतीला आले नव्हते.त्यावेळी माझ्यावर कुणाचा भरवंसा नव्हता असावा,आणि माझापण माझ्यावर विशेष भरवंसा नव्हता. परंतु,जीवनातल्या मार्गात वळणं आडवळणं असतात आणि आता मी जरा मागे वळून पाहिल्यावर,मी कुठून आलो ते आठवतं,आणि अजून मला त्या लोकांचे चेहरे आठवतात, ज्या लोकांचा माझ्यावर भरवंसा होता. माझ्यात काय क्षमता आहे ते त्यावेळी लोकांना माहित होतं पण मला नव्हतं.त्यांचे ते प्रोत्साहन देणारे दिवस मला अजून आठवतात.ते म्हणायचे,
“आम्हाला तुझ्यावर भरवंसा आहे.”
हे चार महत्वाचे शब्द कुठल्याही भाषेत असायलाच हवेत असं आपलं मला वाटतं.काही गोष्टी माझ्यासाठी त्यावेळे महत्वाच्या होत्या.त्यावेळी जीवनाकडे पहाण्याची माझी दूरदर्शिता धूसर झाली होती, मला काहीशी अंधदृष्टि आली होती ती अशी की माझंच जीवन मला काय बहाल करतंय त्याकडे माझं लक्ष नव्हतं. मात्र कुणीतरी माझ्या भोवती दोर टाकून मला माझ्या नैराश्येतून मागे ओढून घेऊन म्हणायचं,
“मला तुझ्यावर भरवंसा आहे.”

अगदी माझ्या सुरवातीच्या नोकरीत- कारगीलच्या युद्धात- मी जवळ जवळ म्रृत्यूच्या दाढेत गेलो होतो तेव्हा मला वांचवण्यसाठी सल्ला देऊन,
“मला तुझ्यावर भरवंसा आहे.प्रयत्न कर”
असं म्हटलेले ते माझ्या सहकार्‍याचे उद्गार मला अजून आठवतात.

शाळेच्या शेवटच्या वर्षात मला वाटू लागलं होतं,की मी यातून काही यशस्वी होऊन बाहेर पडणार नाही,आणि मी त्या रात्री एका बारमधे बसून भरपूर नशा करीत होतो, माझा सैन्यात जाण्याचा विचार मी कुणाला तरी सांगावा म्हणून इकडे तिकडे बघत होतो.अशावेळी योगायोगाने एक अनोळखी व्यक्ति माझ्या जवळ येऊन बसली मी त्या व्यक्तिला माझ्या मनातला विचार सांगितला.त्यावर ती व्यक्ति मला म्हणाल्याचं आठवतं,
“हे बघ,तुला मी पूर्ण ओळखत नाही.पण कदाचीत तू काय विचार करीत आहेस ते तुझ्याच ध्यानात येत नसावं.तुला काय हवंय ते तुला माहित आहे.तू कुठे चालला आहेस ह्याची ही तुला जाणीव आहे.आणि जरी तुला माहित ही नसलं,किंवा अन्य कुणाला माहित नसलं,तरी,
”मला तुझ्यावर भरवंसा आहे.”
मी बबनला म्हणालो,
“कारगीलचं युद्ध संपल्यावर तूं सैन्यातून सुट्टी घेतलीस हे मला कुणी तरी सांगितलं होतं. मग तू सुट्टी घेऊन पूढे काय करीत होतास?”

“कारगीलचं युद्ध संपल्यानंतर मी बरेच दिवस बेकारच होतो.पण मी नंतर जीद्दीने माझं कॉलेजचं शिक्षण पूरं केलं होतं.
माझ्या मनात वकील व्हायचं होतं पण त्या नैराश्येत मी तो विचार जवळ जवळ सोडून द्यायचं ठरवलं होतं.मी हा विचार माझ्या होणार्‍या सासर्‍या जवळ बोलून दाखवला होता. त्यावेळचे माझ्या भावी सासर्‍यांचे उद्गार मला आठवतात,
“मला तुमच्यावर भरवंसा आहे.”
हे वरचेवर त्यांच्याकडून ऐकून मी वकीली परिक्षा द्यायची ठरवली.आणि शेवटी वकीलांच्या बारचा सभासद झालो.
संसाराच्या धकाधकीत खर्चाची जुळवाजुळव करताना मेटाकुटीला यावं लागायचं.पण मित्रमंडळीकडे बघून त्यांच्या नवं घर घेण्याच्या प्रयत्नाकडे बघून माझ्या मनातली स्वप्नं बाजूला ठेवून नेटाने काम करावं लागलं.वकिली चांगली चालते असं पाहून मला सुद्धा नवं घर घेण्याचं मनात यायला लागलं.माझं हे मत पाहून माझी पत्नी मला जोराने प्रोत्साहन देताना तिचे शब्द मला अजून आठवतात,
“मला तुमच्यावर भरवंसा आहे.”

आता पन्नास अधीक वर्षात अनुभवाने शिकून मी सांगू शकतो की,एखाद्याल्या त्याच्या अडचणीतून बाहेर काढायला, त्याची संसराची गाडी पटरीवर आणायला, त्याला स्वतःला काहीतरी बनायला एखादी “ठिणगी” द्यायला विशेष काही लागत नसावं.एखाद्या खर्चीक कलाविवरणाची,किंवा एखादी अपव्ययी चलाखीची, किंवा फुकाच्या भाषणांची जरूरी लागत नाही.जे काय लागतं ते त्या व्यक्तिच्या नजरेत नजर घालून म्हणावं,
“मला तुझ्यावर भरवंसा आहे.”
ह्या चार शब्दात एखाद्याच्या आयुष्यात बदलाव आणण्याची क्षमता आहे.माझ्यात तरी तसं झालं.”

सुधाकर म्हणाला,
“बबन्या,नशा करायला तू बार मधे जायचास.आणि त्याच बारमधे तुला एका अनोळख्याने ते तुझे चार जादूचे शब्द सांगितले,
“मला तुझ्यावर भरवंसा आहे”
आणि तेच जादूचे शब्द तुला भावी सासर्‍याने सांगितले. पण फरक एव्हडाच झाला की तो “नशेचा बार” सोडून तू “वकीलाच्या बारमधे” सामील झालास.आहे बाबा! त्या चार शब्दात खरीच जादू”
हा सुधाकरचा विनोद ऐकून आम्ही सगळेच हंसलो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, May 27, 2009

चानी (च्यानी नव्हे चानी चांगल्यातला चा )

कोकणात खारीला-squirrel-चानी म्हणतात.हा तोंडाकडून उंदरासारखा दिसणारा प्राणी पूरा पाहिल्यास फारच मोहक वाटतो.पूर्वी परदेशात मोठ्या चान्यांच्या कातड्याच्या श्रीमंत स्त्रीया पर्स म्हणून वापरायच्या.प्रभू रामचंद्रांच्या लंकेपर्यंत सेतू बांधण्याच्या प्रयासात चानीचा वाटा होता.समुद्राच्या पाण्यात अंग भिजवून मग किनार्‍यावरच्या वाळूत लडबडून झाल्यावर अंगावरची वाळू पुलावर टाकायला मदत केल्याच्या प्रयत्नाबद्दल भावूक होऊन प्रभू रामचंद्रानी प्रेमाने तिच्या पाठिवरून बोटं फिरवली. तिच ती बोटं तिच्या पाठिवर दिसतात अशी आख्यायीका आहे.

"चानी" नावाची कादंबरी चिं.त्र्य.खानोलकरानी लिहिली आहे.त्यानंतर राजकमल कला मंदिरचा "चानी" म्हणून चित्रपट व्ही.शांताराम यानी ह्याच कादंबरीच्या आधारावर काढला होता. कोकणातल्या धामापूर ह्या गावात त्या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरझालं होतं.

हे सर्व एव्हड्यासाठी आठवलं की आमच्या कोकणातल्या घरातल्या मागच्या पोरसात चान्या खूपच दिसतात.ह्या चान्या ज्यावेळी काहीही कुरतडत असतात त्यावेळी मला अगदी वैताग येतो. ज्यावेळी घराच्या अगदी जवळ येऊन त्यांचे इवलुशे पाय एखाद्या वस्तूवर खरड खरड खरडतात त्यावेळी मला कशावरही ध्यान देता येत नाही.एव्हडा तो आवाज मला एकाग्र राहू देत नाही. परंतु,मी हे सर्व निभावून नेत असे कारण मी ह्या जगात काही एकटाच रहायला आलेला नव्हतो. एखादा लहानसा खडा तिच्या अंगावरून फेकून ओरडायचो,
"जा चालते व्हा इथून".
पण माझ्याकडे त्यांच लक्ष कुठे असायचं. खारी,मांजरं उंदीर माझे सहचर किंवा साथी आहेत असं मला वाटायचं.
रोज सक्काळी मी कोकणातल्या रानातून फिरायला जायचो.चालताना,पाया खाली सुकलेला पाचोळा चूरचूर करी असायचा. जांभळांची उंच झाडं,रातांब्याची झाडं-त्यावरच्या लालबूंद फळापासून कोकम करतात- तसंच केवड्याची बनं, औदुंबराची, वडाची, पिंपळाची मोठ मोठी झाडं गर्द रानाची आठवण करून द्यायची.

जवळपासची ओली दलदलीत जमीन,आणि मधून मधून येणारे मातीचे उंचवटे कित्येक वर्षापासून होणार्‍या स्तित्यंतराची आठवण करून द्यायची.रानटी गवताच्या कडेकडेने जाताना ओबडधोबड दगडांच्या राशीत रचून ठेवल्यासारखे दिसणारे पण नैसर्गिकरीत्या तयार झालेली संथ झर्‍याची वाट शेवटी उतारावर येणार्‍या मोठ्या डबक्यात जाऊन संपते ते पाहून निसर्गसुद्धा त्यानेच केलेले नियम तोडत नाही हे लक्षात यायचं. मी ह्याच झर्‍य़ाचं दोन ओंजळी स्पटिकासारखं स्वच्छ पाणी तहान भागवण्यसाठी पित असे.पण आता इथे वस्ती वाढत असल्याने पूर्वीचं वातावरण राहिलं नाही.पाणी दुषीत झालं असावं उगाचच वाटतं.
उजाडत आहे हे चारी बाजूच्या पिवळ्या किरणांनी झाडांच्या फांद्या फांद्यातून शिरकाव करून जमिनीवरचा रंग पिवळा केल्याने ध्यानात यायचं.पुढे गेल्यावर त्या सूर्यनारायणाचं दर्शन झाल्यावर मन अगदी प्रसन्न व्हायचं.सूर्य हे जीवन आहे असं कुणी म्हटलं ते खोटं नाही.

रात्री कधी तरी पाऊस पडून गेला असायचा.पाऊस कसला एखादी सर येऊन गेली असावी.कारण झाडा झुडपावरची पानं आणि फुलं ओली झालेली दिसायची.
मला आठवतं ऐन पावसाळ्यात मी ह्या ठिकाणी उभापण राहू शकत नव्हतो.चालायचं झालं तर चिखलातून फार कष्टाने पावलं टाकावी लागायची.वरून पावसाचे मोठाले थेंब उंच झाडांच्या पानात जमून खाली पडताना कुणी मुद्दाम अंगावर पाणी शिंपडीत असावं असं वाटायचं.जमलेल्या पाण्याच्या पाणवाटा आणि हवेतल्या प्राणवायुमुळे बनलेले बुडबुडे आपोआप बनायचे आणि फुटून पण जायचे.

कोकणातला पाऊस! तो पडून गेल्यावर धबधब्या सारखा पूर आणायचा.हे सर्व पाणी जातं कुठे म्हणून अचंबा वाटून शोध लावला तर दिसून येईल ह्या लहान लहान पाणवाटांचे झरे व्हायचे,हे झरे डबक्यांत ओतले जाऊन ती डबकी पूर्ण भरल्यावर ओतून जायची,आणि ती लबालब भरलेली डबकी दिसेनाशी होऊन त्यातून छोट्या तलावात रुपांतरीत व्हायची. आणि ते तलाव भरभरून नाले बनायचे.ह्याच नाल्यांची नदी बनून शेवट समुद्रात मिसळून जायची.आणि तो समुद्र इथून पाच पन्नास मैलावर दिसायचा. ह्या रानात पडलेल्या पावसाच्या थेंबांचा प्रवास अशा तर्‍हेने शेकडो मैलांचा व्हायचा.

कधी कधी एखादा लहानसा नाला ओलांडून जायचं झाल्यास कंबरभर पाणी असायचं.नाल्यात आत शिरताना चिखल आणि बाहेर पडतानाही चिखल असायचा.जरा पाणी जमा झालं की कोकणातली जमीन चिखलात रुपांतरीत होते.मग त्या चिखलात बेडूक,गोडे मासे आणि आजुबाजूला डांस उत्पन्न व्हायचे.एका हातात काठी असेल आणि दुसर्‍या हातात केवड्याचं फूल असेल तर ह्या डांसांचा उपद्र्व आणि गुणगुणणं चुकवायला दोन्ही हाताचा खांद्या कडचा भाग कानाजवळ उंचावून उपयोगात आणल्या शिवाय गत्यंतर नसायचं.

हे चिखलातले बेडूक हळू हळू चिखलातून बाहेर पडून झाडावर राहायला जायचे.माझ्या पायाच्या अंगठ्यापेक्षा मोठे नसलेले हे प्राणी ओरडायला लागले की माझ्या कानाचे पडदे एव्हडे कंप पावायचे की असलं संगीत कुठेही न ऐकल्याचं आठवायचं.
हे सर्व प्राणी त्याशिवाय सरपटणारे बुरयाटे-मास्यांचाच प्रकार- काही जंगली बदकं असल्या ह्या क्वचीतच दिसणर्‍या प्राण्यामधे मला मी हजर असलेला पाहून माझी मलाच गंमत वाटायची.
मला आठवतं मी इकडे केवळ कुतूहल म्हणूनच येत नव्हतो.किंवा मनोरंजन होण्यासाठी येत नव्हतो.इथे आल्यावर मला वाटायचं की मी पण ह्यांच्यातला एक प्राणीच आहे.निसर्गाची नाडी मला भासायची.ह्या कबिराच्या विणलेल्या शेल्यामधे मी एखादा टाकां असावा.
ह्या रानातून मी रोजच फेरफटका मारायचो.ते किटक,ते प्राणी,तो पाऊस ती झाडं,त्यांच्या सानिध्यात झाडांच्या पानावरची ओली माती माझ्या कपड्यांना लागायची.
कधी कधी मी घसरून चिखलात पडायचो.त्या चिखलात कुजून गाडलेली जूनी पानं,मेलेले बेडूक जवळून पहायला मिळायचे.
पहाटेचा काळोख संपून उजाडल्यावर हे निसर्गाचं मंदिर उजाळून यायचं.
जेव्हड्या निसंदेहाने मला हवेतून श्वास घ्यावा लागायचा,तहानेसाठी पाणी प्यावं लागायचं,भूकेसाठी खावं लागयचं तेव्हडंच मला वाटायचं की निसर्गाचा ह्या धरतीचा,पाण्याचा,आगीचा,हवेचा मी एक अंश आहे. म्हणूनच मी रोज पहाटे उठून ह्या रानातून फेरफटका मारायचो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

निसर्ग म्हणजेच मुक्ति देणारा,निवारण करणारा.

ह्यावेळी जेव्हा मी वेंगुर्ल्याला भेट दिली तेव्हा कोळी वाड्यातल्या माझ्या जुन्या मित्रांना निक्षून भेटण्याचं ठरवलं होतं.समुद्रामार्गे बाहेरून आलेला व्यापार्‍यांचा माल मांडवीवर उतरवतात.ही मांडवी म्हणजे समुद्राला मिळणारी खाडीच असते.बरेचसे कोळीवाडे ह्या मांडवीच्या परिसरात विखुरलेले आहेत.
फास्कू फर्नांडीस आणि पावलू फर्नांडीस हे दोघे भाऊ माझे जुने दोस्त आहेत.फास्कू आता इंग्लंडला स्थाईक झाला आहे असं मला कुणीतरी सांगतलं होतं.निदान पावलू भेटेल ह्या आशेने कोळीवाड्यात आज गेलो होतो.सकाळची वेळ होती.त्याच्या घरी गेल्यावर मला कळलं,पावलू आणि इतर कोळी समुद्र किनार्‍यावर गेले असून रापण ओढून दुपारच्या बाजारासाठी मासे निवडायला गेले आहेत.
वेंगुर्ल्याच्या समुद्रावर मला नेहमीच जायला आवडतं.किनार्‍यावर बरेच खपाटे लागले होते.आणि प्रत्येकाच्या रापणी ओढल्या जात होत्या.रापण ओढणं म्हणजे समुद्रात टाकलेलं जाळं ओढणं.त्यात अडकेलेले मासे किनार्‍यावर निवडून टोपल्यात जमा करायचे. किनार्‍यावर विचारत विचारत पावलूची रापण कुठे आहे ते कळलं.पावलूला हुडकून काढलं.मला बघून तो इतका खूश झाला की म्हणाला,
"चल आपण घरी जाऊया.दुपारी जेवायला आमच्याकडेच रहा.अगोदर आपण "काजूची" घेऊं या."
असं म्हणून माझ्याकडे मिष्किल बघत राहिला.मी पण हंसलो दोघे समजायचं ते समजलो.
जेवण झाल्यावर जुन्या गोष्टी निघाल्या.पावलू लहान असताना समुद्रात बुडून कालवश व्हायचा वाचला हे मला माहित होतं.पण संपूर्ण हातसा माहित नव्हता.
मी म्हणालो,
"काय रे झालं त्यावेळी? फास्कू कडून मी ऐकलं होतं.आता तू मला चांगला रंगवून रंगवून सांगशीलच कारण आता तू लेख लिहितोस लोकल वर्तमानपत्रात.मी वाचले आहेत ते."
पावलू जरा खजील होऊन मला म्हणाला,
"काय रे माझी टिंगल करतोस काय? मला आता पंचवीस वर्ष मागे जाऊन सर्व गोष्ट रंगवावी लागेल तुझ्यासाठी."
"मी आजचा दिवस तुझ्याकडेच घालवायला आलो आहे.तेव्हा मला वेळ भरपूर आहे तुला ऐकायला."
परत "काजूची" घेत घेत मला म्हणाला,
"ही घेतल्याशिवाय मला मूड येणार नाही.
निसर्गाच्या शक्तिवर माझा भरवंसा आहे.माझ्या अंतरातली घमेंड तो चांगलीच उतरूं शकतो. निसर्गाचं बळ केव्हढं तरी प्रभावशाली आणि रहस्यपूर्ण आहे आणि माझ्यात असलेला अहमगंड मिटवून टाकून ज्या गोष्टी अविनाशी आहेत आणि दृढ आहेत त्यांची रूपं मला त्याच्याकडून पहायला मिळाली.
वेंगुर्ल्याच्या समुद्रकिनारी अगदी लहानपणा पासून वाढलेला मी. निसर्गाचा सगळ्यात आश्चर्यजनक आणि हानिकारक डावखेळणारा जो-समुद्र त्याच्या सानिध्यात वाढलेला मी."
मी म्हणालो,
"अरे तुम्ही गाबित लोक समुद्राच्या अंगा-खांद्यावर खेळणारे,मग तुला कसला आला धोका?"

"मी पट्टीचा पोहणारा.मासे पकडणार्‍या जमातीत जन्माला आलो असल्याने समुद्राच्या पाण्यावर प्रेम करीत होतो.माझ्या वडीलांबरोबर समुद्राच्या पाण्यात मी पहिली डुबकी मारली.तुला माहित आहेच तुझ्या सारखं आजकाल मी लेखन करतो.समुद्र आणि समुद्राच्या मासेमारीबद्दल पोटतिडकीने लिखाण करतो.मी समुद्राचं आनंद देण्याचं वातावरण पाहिलंय तसंच त्याचा प्रकोप आणि त्याने केलेला विनाशही पाहिला आहे."
"तू काही ही म्हण,पण मला त्या समुद्राच्या लाटाबघून धडकी भरते.आणि तुम्ही लोक बिनधास्त लहान लहान होड्या घेऊन वल्व्हत असता."
असं मी मधेच त्याला थांबवून म्हणालो.
हाताने ऐक माझं असं दर्शवीत मला पावलू म्हणाला,

"समुद्राच्या अचाट शक्तिची ओळख मला एकदा अगदी चांगलीच जाणवली त्याला बराच काळ होऊन गेला.तो सुंदर उन्हाळ्यातला दिवस होता.आकाश अगदी निरभ्र होतं.गोव्याच्या दिशेने येणारा
गरम वारा वादळी हवे सारखा वाटत होता.जरी मी त्यावेळी नुकताच पंचवीशीतला तरूण होतो तरी अगदी लहानपणापासूनची माझी समुद्राशी ओळख होतीच. मी अगदी निश्चिंत होतो.समाधान होतो.तरीसुद्धा अंगात असलेला आवेश आणि तरूण रक्ताचा जोश असतानाही मी अगदी उजाड वातावरणाचे मूलभूत धडे विसरलो होतो.-मर्यादेत राहणं आणि एकटंच नसणं.समुद्रातले दर्दी पोहणारे ह्या घमेंडीला "मार खाणं"म्हणतात. उंचच उंच लाटेला हे संबोधून आहे.ह्या शक्तिमान लाटा किती शारिरीक हानि देऊं शकतात ह्याचं वर्णन करणारा धडा ऐकताना तो धडा जास्त गहरा वाटतो.

त्यादिवशी एक उंच प्रचंड आणि सुंदर लाट येते हे पाहून मी त्या लाटेत शिरायला नको होतं.त्या राक्षसी लाटेच्या जबड्यात मी खेचला गेलो होतो.आणि वळकटणार्‍या त्या लाटेच्या घडीत माझे दोन्ही पाय सुन्न झाले होते.माझ्या दोन्ही पायांच्या संवेदना गेल्या असं वाटायला लागलं. ती फुगलेली लाट निरंतर प्रचंड व्हायला लागली तसा मी किनार्‍याकडे झेप घेण्याच्या प्रयत्नात राहिलो.आता मी त्या लाटेच्या आधीनच झालो.आणि काही क्षणात त्या प्रचंड लाटेने मला किनार्‍यावरच्या वाळूत थुंकून टाकलं.मी अगदी स्तम्भित होऊन एकडे तिकडे पहात होतो.वारा सारा पूर्वी सारखाच वाहत होता.पक्षी एकमेकाला आकाशात पकडापकडी करीत होते. दुसरी लाट आली,वळकटली गेली आणि फुटली आणि हे होत असताना सूर्य किरणं पूर्वी सारखीच चमचमत होती.प्रकृतीवाद्यांचं म्हणणं "जपून चाल करावी".मी जवळ जवळ डुबलो होतो.
समुद्रातल्या माझ्या पोहण्याच्या अनुभवाचं नांवनिशाण नव्हतं. असलीच तर माझ्या मनातली फक्त समजूत होती.अनेक क्षेत्रात मनुष्य जसा अपरिचीतासारखा असतो तसं समुद्राचं क्षेत्रपण त्याला असतं.हा समुद्र रहस्यमय असतो,त्याचं क्षेत्र अज्ञेय असून त्याच्या प्रतापाचं प्रकटन अनुभवातूनच कळतं. मी मात्र त्या समुद्राच्या सामर्थ्याला मानतो.त्याची मनोहरता-असं म्हणणं कदाचित विरोधाभासी वाटेल-पण त्या सूर्याच्या उन्हाने चमकणार्‍या दिवशी वेंगुर्ल्याच्या समुद्राकडे बघून मी निसर्गाला मुक्ति देणारा,निवारण करणारा असं मानतो.त्यादिवशी मी वेंगुर्ल्याच्या समुद्रात माझा निरर्थक समय बरबात करीत होतो, आणि मला मात्र त्याने किनार्‍यावर फेकून देऊन माझी जागा मला दाखवली.जणू त्यादिवशी त्याने मला समजावलं की,
"जा तू तुझ्या गोतावळ्यात जा,त्यांची समज घाल आणि सांग त्याना त्या क्रमावलीत त्यांची जागा कुठे उचित आहे ती.त्यामुळे आपण सर्व एकमेकाचे समर्थक राहूं."
पावलू पित पित सांगत होता.पण मीच त्याला आवर घातला.
"मी आहे आणखी कांही दिवस वेंगुर्ल्यात.येईन तुझ्याकडे गप्पा करायला"
असं सांगून मी पावलूचा निरोप घेतला.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, May 23, 2009

आयुष्यात येणार्‍या धूसरपणाला मी मानते.

आज एक गंमतच झाली.ईंगळ्यांची यमी आमच्या घरी बसायला आली होती.तशी यमी मला लहानच.
आमच्या बालपणात कोकणात मृगनक्षत्रात पावसाच्यापहिल्या सरीत बाहेर अंगणात जाऊन पावसात न्हाऊन घ्यायची आमच्यात चढाओढ असायची.
“सर्वांत प्रथम तू सुरवात करायचीस होना यमे?”
असा मी प्रश्न केल्यावर यमी म्हणाली,
“हो एकदा मला आठवतं माझ्या अंगात एक ताप होता.ते ढगांचं गडगडणं,विजांचं चमकणं,पाहून मला अंथरूणात पडून रहायला कसंसंच वाटत होतं.मी बाबांचा डोळा चुकवून सर्वांच्या अगोदर अंगणात आले होते.”
“हो मला आठवतं त्यावेळी तुझ्या बाबांनी तुला बाहेर येऊन फरफटत घरात नेलं होतं.तू रडत होतीस. आणि काही वेळाने घरातून तू आमच्याकडे पावसात न्हाताना हताश होऊन पहात होतीस.आम्ही तुला चिडवायला वाकुल्या दाखवीत होतो.”
असं मी म्हणाल्यावर,
“अरे सगळ्यांचेच आईवडील बाहेर जास्त वेळ न्हाऊं नका आजारी पडायला होईल. आणि मग शाळा चुकेल”असं ओरडून सांगायचे.पण अंगणातली आरडाओरड ऐकून वाड्यातली सर्वच मुलं घरात बसायला कबूल नसायची.”
असं सांगून यमी म्हणाली,
“माझ्या लहानपणी कुणी पावसाळ्याला बघून किंवा ढगाळ आकाशाकडे बघून कुरकुर केली तर ते मला आवडत नसे.हे तर खरे माझे आवडीचे दिवस असायचे. प्रखर उन्हाचे दिवस मला जास्त बचैन करायचे. मला करडे ढग आकाशात तरंगताना पाहून,किंवा काळेकूट्ट पाण्याने भरलेले वादळी ढग जमलेल्या पाण्याचा भार ह्या धरतीवर मुक्त करणारे ढग पाहून मन प्रसन्न व्हायचं. वीजेची चकमक आणि ढगांची गर्जना ऐकून मी अचंबित व्ह्यायचे.
कधी कधी शांत करड्या ढगानी आच्छादलेलं आकाश मला परम संतोष द्यायचं.
ह्या धूसर रंगाच्या ढगानी आच्छादलेल्या आकाशाचं माझं वेड माझ्या प्रौढतेतपण वाढत गेलं.त्यावेळी मी माझ्या मुलांना आमच्या मागच्या परसात नेऊन झोपाळ्यावर बसवून गार हवेचा,नाकात शिरणार्‍या वासाचा,आणि आवाजाचा अनुभव घेण्यासाठी,आणि मृगनक्षत्राच्या आगमनाची आठवण करून देण्यासाठी जागृत रहायची.ह्या वातावरणाची त्यांच्या मनात भिती येऊ नये ह्याची दखल घ्यायची. लहानपणातल्या माझ्या मनातला ह्या वातावरणाचा विस्मय त्यांनाही अनुभवायला द्यायची.”
असं यमी आवर्जून सांगत होती.
मी म्हणालो,
“पण यमे,आतापण तुझ्या नातवंडाना पावसात न्हायाला देतेस का?
की अरे,पावसात भिजून आजारी व्हाल असं आजीच्या नात्याने त्यांना ओरडतेस?”
थोडं मिष्किल हंसून म्हणाली,
“काय रे माझी थट्टा करतोस.
आता मी वयस्कर झाली आहे. मुलंपण मोठी झाली आहेत.नातवंड पण आता नव्या जमान्यातली आहेत.माझ्या पतीना आणि मुलांना आणि नातवंडाना पण उन्हाळ्याचे दिवस चांगले वाटतात.आणि त्यांच्याबरोबर मी पण लख्ख उन्हाच्या दिवसांबद्दल प्रशंसा करायला लागली आहे.माझ्या कुंटूबाच्या आनंदात मश्गुल होण्यात मी माझ्या वृतीत बदलाव आणला आहे.

त्या माझ्या प्रौढवयात ज्यावेळी मी स्वतःच्या विचारधारांचं आणि मूल्यांचं अन्वेषण करायची त्यावेळी जास्तकरून प्रत्येक गोष्टीत माझी निवड एकतर फक्तकाळं किंवा सफेद ह्याच दृष्टीकोनातून पहाण्यात असायची. पटकन निर्णय घ्यायची. पटकन कोणतीही गोष्ट अस्वीकार करायची.आणि पटकन माझंच खरं मानायची. मला त्यावेळी वाटायचं की योग्य मार्गाची निवड करणं, नैतिकतेची वरची पातळी निवडणं ही एक ज्याची त्याची स्वाभाविक पसंती असते.”
“आणि त्यानंतर तू डॉक्टर झालीस.तुझ्या विचारसरणीत सहाजीकच त्यामुळे आणखी बदलाव आला असावा.”
“हो अगदी बरोबर बोललास”
असं म्हणून यमी म्हणाली,
”नंतर माझ्या डॉक्टरी पेशामधे जशी मी आजा‍र्‍यांना आणि त्यांच्या कुटूंबियाना हाताळायची तशी माझ्या लक्षात यायला लागलं की पुष्कळशी आव्हानं आणि जीवनात येणारी वादळं क्वचितच संपूर्ण काळी किंवा संपूर्ण सफेद असतात. माझे बरेचसे सहकारी एखाद्या आजार्‍याला तो व्यसनी आहे म्हणून निकाल द्यायचे, त्यावेळी मी समजायचे की ह्यातील बरचसे आजारी निष्ठा ठेऊन असायचे की एक ना एक दिवस ते सुधारणार आहेत.आपल्या आजारावर मात करणार आहेत.फक्त फरक एव्हडाच की त्यांच्याहून त्यांना सुधारायला ते असमर्थ आहेत.
मी ह्यातून शिकले की क्वचितच ह्या व्याधींची चिकित्सा अशीच काळी तरी किंवा सफेद तरी असावी.ह्या चिकित्सा पुस्तकात लिहिल्या प्रमाणे बहुदा नसायच्या.काही व्याधी तर अश्या आहेत की त्यांच्या चिकित्सा शंभर टक्के खात्रीलायक असणं दुरापास्त आहे. एखाद्या साध्या कानाच्या दुखण्याचं गांभिर्य अनेक छटामधे दिसून येईल.
हे प्रकृतीचे औषोधोपचार सर्व कूट प्रश्नात सामाविष्ट आहेत.त्यांना स्वाभाविक किंवा सहज उत्तरं नाहित.त्याचं उत्तर काळं तरी किंवा सफेद तरी असं मुळीच नाही.

परंतु,आता मात्र माझ्या बालपणात वाटायचं तसं ह्या धूसर वाटणार्‍या जीवनामधे मला शांती मिळायला लागली आहे.सहजगत्या आणि पटकन निर्णय घेणार्‍या बर्‍याच लोकांकडे बघून मी उदासिन होते.माझ्या कुटूंबात, माझ्या विचारसरणीत, माझ्या व्यवसायात,माझ्या मैत्रीत आणि माझ्या वयक्तिक मुल्यांत मला रंगांचा वर्णक्रम दिसतो,तसंच एक सातत्यही दिसतं.
ह्या धूसर वाटणार्‍या जीवनात मला उदासिनतेची नव्हे तर शांती आणि समाधानाची उपलब्धता होते.”
हा विषय बदलण्यापूर्वी मी यमीला म्हणालो,
“यमे,हा हवामानाचा परिणाम की वयोमानाचा परिणाम असावा?”
“तुझी आपली नेहमी थट्टाच असते”
असं म्हणून यमीने हा विषय बदलला.


श्रीकृष्ण सामंत (कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, May 21, 2009

जनावरांच्या सानिध्यात मिळणारी शांती.

“ते २००६ साल होतं.मी निवृत्त झालो होतो.निवृत्ती नंतर वेळ कसा घालवायचा हा माझ्या पुढे आलेला मोठा प्रश्न होता.हा प्रश्न मला एक आव्हान होतं.तशी आता पर्यंतच्या जीवनात मी अनेक आव्हानं स्विकारली आणि त्यातून बाहेर पण पडलो. पण हे आव्हान जरा जबरी होतं.मला हवी तशी आणि मला जरूरी आहे तशी एकही गोष्ट लक्षात येत नव्हती.मुंबईला माझ्या घरात बसून सतत चिंता करण्या पलिकडे काही जमत नव्हतं.मला वाटायचं की अशी चिंता करीतच माझं आयुष्य संपणार की काय? तसं माझं पैशाचं सेव्हिंग जरूरी प्रमाणे होतं.रस्त्यावर येण्याची काही पाळी नव्हती.एक निर्बल करणारी उत्कंठा होती की घर सोडून मुंबईहून बाहेर जाणं म्हणजे एक महत्वपूर्ण व्याप होता. “

माझा मावसभाऊ जून्या आठवणी काढून मला हे सांगत होता. आता हा माझा मावसभाऊ कोकणात मांडकूलीला राहत आहे. हे गांव कोकणात कुडाळ पासून तीन मैलावर आहे.भावाची शेतीवाडी,गाई-गुरं आहेत.घरही तसं मोठं आहे.मी त्याला भेटायला गेलो होतो.

“काही तरी स्वेच्छेने काम करावं असं मनात येत होतं. शेती आणि त्यासाठी लागणारी माहिती शहरात वाढलेल्या मला कुठून मिळणार.सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत मिटिंग्स मिटिंग्स आणि मिटिंग्स घेण्यात आणि मिटिंगला हजर राहण्यात आयुष्य गेलं.हातपाय मोडून कंबर कसून काम करायची जबाबदारी जरा हटकून वाटत होती.”

मी त्याला म्हणालो,
“लहानपणी मावशीकडे शाळेच्या सुट्टीत मी येऊन राहयचो. तिची शेती आणि गाई-गुरं संभाळून कंबर कसून काम करण्याची जीद्द मी पाहिली होती.जोताला लावलेली पवळ्या-ढवळ्या बैलाची जोडी आठवते, कपिला आणि तिचं वासरूं तानु आणि त्यांची नीगा ठेवण्याची कामं, मावशी नोकरांकडून करून घ्यायची. गाईला चारा घालून झाल्यावर सकाळच्या वेळी चकचकीत घासलेली पितळेची दुधाची चरवी आणून गाईच्या आंचळांना चरवीतल्या थंड पाण्याने झपकारून झाल्यावर तानुचा दावा सैल करून सोडून दिल्यावर ते चार खूरावर उंच उड्या मारीत आपली शेपटी उंच ताठ करून आपल्या आईच्या आंचळाना लुचायला जाताना आणि कपिलापण आपलं बाळ दुध प्यायला आल्यावर प्रेमाने त्याला चाटून चाटून गोंजारातना पाहून ह्या मुक्या प्राण्यांचं निष्पाप प्रेम बघून माझा जीव कासाविस व्ह्यायचा.तानु सुद्धा आपल्या आईचं दुध लुचता लुचता आणि जबड्यातून दुध बाहेर पडत असताना सुद्धा आणखी धार मिळावी म्हणून आईच्या आंचळाना ढुसक्या मारताना पाहून माझ्या मनात यायचं की किती हा अधिरेपणा? पण ती अधिरता नव्हती ते एक पुन्हा त्या मुक्या प्राण्याचं -तानुचं- गगनातल्या आनंदाचं प्रतिक असावं.”

माझं हे लहानपणातलं अनुभवाचं वर्णन ऐकून मला माझा भाऊ म्हणतो कसा,
“हे मीही पाहिलं होतं.पण एकदा मुंबईत आल्यानंतर इकडच्या दुनियादारीत आणि व्यापात जीवन इतकं गुरफटून गेलं होतं की,कधीतरी आईला भेटायला म्हणून कोकणात गेलो तर दोन चार दिवसाची धांवती भेट असायची,आणि मुंबईतल्या कामाचाच बोजा डोक्यावर सतत असल्याने हे बालपणातलं जीवन आठवून मश्गुल व्हायला मनस्थिती नसायची.
तू आता म्हणालास तेव्हा माझ्या आठवणी जागृत झाल्या.
पण कपिला बिचारी गेली.तानुला आता दोन पाडसं झाली आहेत.कपिले सारखीच तानू दूध भरपूर देते. आईच्याच वळणावर गेली आहे.”

“तू बरं केलंस.निवृत्त झाल्यावर तुझा इकडे येण्याचा विचार मला आवडला.नोकरी करणार्‍यानी शहरात विशेष करून मुंबई सारख्या शहरात गर्दी करून राहणं निराळं आणि निवृत्तीत आल्यावर संध्याकाळी बाल्कनीत बसून किती बसीस गेल्या आणि किती ट्रक रस्त्यावरून पास झाले ह्याची गणती करण्यात जीवन कामी लावण्यात काही अर्थ नाही.आणि जास्त करून तुझ्यासारख्या लोकानी ज्यांना कोकणात शेतीवाडी आहे अशा लोकानी तर जरूर तसं करूं नये.”
असं मी म्हणाल्यावर मला भाऊ सांगू लागला,
“तुला खरं सांगायचं तर ही प्राण्यांची ओढ मला निवृत्त होऊन इथे आल्यावर तू मघाशी वर्णन केल्यास त्या बालपणाच्या आठवणी येऊन मुंबईच्या त्या धकाधकीच्या जीवनाची उबग आणायची. ह्या प्राण्यांच्या सानिध्यात राहाण्यासारखं दुसरं स्थान मला जगात मिळणार नाही अशी मनात आता खात्री झाली आहे.
अश्या ठिकाणी मी आनंदी राहिन आणि माझी ह्या प्राण्यांना जरूरीही भासेल हे मनात येऊन माझ्या मनाला तृप्ति मिळायला लागली.
इथे येऊन राहण्यापूर्वी माझ्या मनात भय होतं आणि माझ्या जीवनाच्या त्या टप्प्यात कशाचीच खात्री नसलेल्या गोष्टींच्या विवंचनेत राहाण्याचं स्थित्यंतर त्यावेळी आलं होतं.”

आता माझी मनातली भिती गेली आहे.आणि त्याचं कारण हे मुकेप्राणीच आहेत. गाई,वासरं,बैल,शेळ्या,कोंबड्या हे पाळीव प्राणी मला आता परिचीत झाले आहेत आणि ते मला आत्मिक अनुभव देत आहेत.ह्या प्राण्यांच्या सानिध्यात असल्यावर एक कायापालट झाल्या सारखं वाटायला लागलं.शहरात राहून जी परंपरा अनुभवीत असायचो त्याचा विचार येऊन,
“गेली ३५ वर्षं मी कुठे होतो?”
असा प्रश्न कधी कधी आपसूप मनात येतो. आता मी ह्या मुक्या प्राण्यांच्या सानिध्यात त्यांचं अवलोकन करतो, त्यांना मदत करतो.त्यांचा साथी आणि सहयोगी अशीच भुमिका पार पाडताना माझं मन प्रसन्न होतं.
अलीकडे माझ्या लक्षात आलं की मी विचारही करूं शकणार नाही अश्या प्रकारे माझं क्षितिज मी विकसित केलं आहे. ह्या प्राण्यांची देखभाल करता करता मी स्वतःच माझा फायदा करून घेत आहे.
ह्या मुक्या प्राण्यांच्या सहवासात राहून माझ्या मनाला शांती मिळत आहे.”
जेवायची वेळ झाली होती.उठतां उठतां मी त्याला म्हणालो,
“हे सगळे समजूतीचे खेळ आहेत.जनावरांच्या सानिध्यात जर का तुला शांति मिळते,तर ते अगदी नैसर्गिक आहे.आणि ते तू सांगू शकतोस.पण क्षणभर विचार कर त्या मुक्या प्राण्यांना तुला त्यांच्या सानिध्यात पाहून त्यांना किती आनंद होत असेल.
मी तर म्हणेन तुम्हा दोघां मधली ही निसर्गाचीच ओढ असावी. फक्त ते प्राणी मुके असल्याने तुला तसं ते सांगू शकत नाहीत एव्हडंच.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, May 19, 2009

जुन्यात जूनं अलौकिक औषध.

अलिकडेच फार्मसूटीकल डिग्री घेऊन नोकरीला लागलेला माझा भाचा मला आपल्या नोकरीचा अनुभव सांगत होता.
मी त्याला म्हणालो,
"अनेक रोगावरची औषधं घ्यायला तुझ्या फार्मसीत लोक येत असतील.पण तुला विशेष वाटलेलं औषध कुठलं की ज्याने तुला कुतूहल वाटत असेल?"
मला म्हणाला,
"तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला.इतर अनेक औषधं
घ्यायला लोक येतात.पण जे लोक उदासिनता कमी होण्यासाठी-Anti-Depressant- औषधं घ्यायला येतात जसं Prozac किंवा Xanax सारखी औषधं घेऊन जातात त्यांच मला जास्त कुतूहल वाटतं.
तुम्हाला माहितच आहे की आत्ताच मी एक नवीन जॉब घेतला.एका फार्मसीत मी कामाला लागलो.मला हा माझा जॉब आवडतो आणि मी नियमीत जॉबवर जातो. क्वचीत वेळा आनंदी लोकांपेक्षा रागीष्ठ लोकांशी माझी गाठ पडते.ह्या रागीष्ठ लोकांचं मी पाहिलंय अगदी बरेच वेळा हे लोक कसलं ना कसलं राग कमी करण्याचं औषध घेत असतात.ह्यामुळे मला आश्चर्य वाटतं की कदाचीत ह्या लोकांच्या जीवनात- ह्या दोन चार गोळ्यांच्या औषधापेक्षा- आणखी काही तरी कमी पडत असणार.
शेकडो नव्हेतर हजारो वर्षापासून ह्या व्याधीवर हास्य हे अगदी नैसर्गिक औषध असावं हे सर्वांना माहित आहे.काही म्हणतात हंसत राहिल्यामुळे आपली शरिरातली प्रतिकार-शक्ति उचल खाते,हृदयाला मजबूत केलं जातं आणि उच्च रक्तदाब असला तर तो कमी होतो.
सर्वात महत्वाचं म्हणजे हंसण्यामुळे एखाद्याची चित्तवृत्ती उचल खाते.मनावरचा भार कमी होतो आणि सर्वसाधारणपणे सभोवतालचं वातावरण चांगलं वाटतं.
कुणी तरी म्हटलंय,
"औषधाच्या उपायाची कला अशी आहे की आजार्‍याला जमेल तेव्हडं आनंदी ठेवायचं आणि मग त्याचा रोग निसर्गच बरा करतो."
डॉक्टरकडे जाण्यापूर्वी तोंड ओळख म्हणून काही लोक सहजच मला ह्या व्याधीवर एखादं जास्त खप असलेलं औषध आहे का म्हणून कुतूहलाने विचारतात."
"मग तू डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय एखादं औषध सांगतोस का?"
ह्या माझ्या प्रश्नावर माझ्या भाचा मला सांगतो,
"ते कसं शक्य आहे?ते बेकायदा होईल.नव्हेतर माझ्या ज्ञानाची सीमा मी ओलांडल्या सारखं होईल."
माझा भाचा मला पूढे सांगतो,
"मी माझ्या एका डॉक्टर मित्राला एकदा विचारलं,
मला एक कोडं पडलंय ते मी तुला विचारतो, मागल्या कुठल्या वेळेला तुझा एखादा पेशंट हंसहंस हंसला आणि मग रडायला लागला, कां असं पण झालं असेल कां एखादा हंसण्याच्या औषधाची गोळी तुझ्याकडून मिळावी म्हणून वाट पहात होता.?"
तो माझा डॉक्टर मित्र मला म्हणाला,
" मला एक माहित आहे की, मनावरचा भरपूर भार आणि मनावरचं दुःख हे माणसाच्या जीवनात एखाद्या अघटित किंवा दुःखद घटनामुळे येतं."
हे त्या डॉक्टरचं मत ऐकल्यावर माझा भाचा मला सांगतो,
"ही वास्तविकता मला चांगलीच माहित आहे.माझी स्वतःचीच कथा मी एखाद्या मासिकात देऊ शकतो. माझ्यावर आलेल्या एकूण दुःखद प्रसंगातून माझ्या लक्षात आलंय की,ह्या सर्व हलक्या वेदना कमी करणार्‍या औषधापेक्षा अवतिभोवती असलेल्या जगाबरोबर हंसत रहाणं हे मला जास्त उपायकारक वाटतं.माझ्या जीवनातला अगदी दुःखद दिवस म्हणजे जेव्हा माझ्या अगदी जवळच्या मित्राचे वडील निधन पावले तो दिवस.

ते त्याचे वडील जणू मला माझे दुसरे वडील कसे होते.ज्या दिवशी मला त्यांची दुःखद घटना कळली मी तसाच दोन अडीच तासाचा गाडीचा प्रवास करीत माझ्या मित्राच्या घरी गेलो.
आम्ही दोघे आमच्या घरी परत येत होतो तेव्हा गाडीत अगदी शांत बसलो होतो.घर जवळ येता येता कुठून कुणाष्ठाऊक पाण्याचा पाईप फुटावा तसा माझा मित्र एकाएकी आम्ही पूर्वी ऐकलेला टीव्हीवरचा एक विनोद सांगू लागला.आणि त्या शांत वातावरणात एक हास्याची लहर निर्माण झाली.त्यावेळी आमच्या दोघांच्या लक्षात आलं की त्या उदास वातवरणात पण एखादा आनंदाचा फुलोरा उडतो.
मला अजून वाटतं की आमच्या विनोदितामुळेच- sense of humor- त्याच्या वडीलांच्या जाण्यानंतरच्या पुढच्या दिवसात आम्ही मार्ग काटू शकलो."
हे सर्व ऐकून मी माझ्या भाचाला म्हणालो,
" तुझ्या मित्राच्या वडीलांच्या दुःखद निधनाची गोष्ट आणि त्यानंतर तुमचा तो आनंदाचा फुलारा ह्याबद्दल जे मला तू सांगितलंस ते मला अगदी पटतं.पण
बाहेरच्या जगाला हे संवेदानाशून्य वाटेल.
परंतु,दिलीप प्रभावळकर आणि लक्शा बेरडे यांच्याजवळ असलेल्या हंसवण्याच्या शक्तिची मी अशावेळी जास्त कदर करतो."
माझं हे मत ऐकून माझा भाचा खूष झाला.
मला म्हणाला,
"हे विनोदी लोकच हंसण्याच्या ह्या जुन्यात जून्या नैसर्गीक औषधाचं नकळत फैलाव करीत असतात.
आणि Anti-depressant घ्यायची इतराना पाळी येत नसावी."
तसं पाहिलं तर माझ्या ह्या भाचाचं म्हणणं किती खरं आहे हे नाही काय?


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, May 17, 2009

बाबल्या मोचेमाडकर आणि आरती प्रभू

बरेच वर्षानी मी माझ्या आजोळी म्हणजे कोकणात आजगांवला जायला निघालो होतो.आजगांवला वेंगुर्ल्याच्या मार्गाने जाताना वाटेत शिरोडं लागतं.गोव्यात पण ह्याच नावाचं एक गांव आहे.ह्या शिरोड्या गावात वि.स.खांडेकर-प्रसिद्ध सिद्धहस्त लेखक,ज्ञानपीठ अवार्डचे मानकरी-राहत असायचे.वाटेत त्यांच घर लागतं.ह्या भागात येणारे टूरिस्ट वि.सं.च घर बघायला येतात.लांबून त्यांच्या घराला नमस्कार पण करतात. पण शिरोडं येण्यापूर्वी वेंगुर्ल्या मार्गे आजगांवला जायचं झाल्यास वाटेत मोचेमाडची नदी लागते.ती नदी पार करून जावं लागतं.

ह्यावेळी मी मोचेमाडला जरा उसंत घ्यायचा विचार केला.गरम गरम कांद्याच्या भजांचा वास आल्याने मी त्या ” हाटलात” शिरलो.एक प्लेट भजी आणि कपभर चहाची ऑर्डर दिली.जवळच पडलेलं लोकल वर्तमानपत्रात वाचत असताना,
“भावड्या मोचेमाडकराची खानावळ” अशी जाहिरात वाचली.मनात आलं “आपल्या” मुंबईला रहाणारा बाबल्या मोचेमाडकरची तर ही खानावळ नसेल ना?
“हाटलात” गल्ल्यावर बसलेल्या मॅनेजरकडे चौकशी केल्यावर कळलं की हो ती त्यांचीच खानावळ आहे.भावड्या हे बाबल्याच्या वडलांचं नाव.चाचपत चाचपत त्या पत्यावर गेलो.आणि खानावळीत डोकावून पाहिलं.
उघडा बंब खाली स्वच्छ पांढरा पंचा नेसून मला जवळ जवळ मिठी द्यायला तयार असलेला बाबल्या,
“अरे,तू हंय खंय?”
असा टिपकल मालवणीतून प्रश्न विचारीत माझ्या समोर येऊन ठपकला.
मी म्हणालो,
“बाबल्या,ह्याला म्हणतात, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी”
अरे मी विचार करीत होतो दुपारचं जेवण कुठे घ्यायचं?मी पेपर काय वाचतो आणि तुझी खानावळ काय जाहिरातीत दिसते?”
” मग चल जेवायला बस.मोचेमाडच्या नदीच्या खाडीतले गुंजूले आहेत,वेंगुर्ल्याहून मस्त पैकी सुरमई आणली आहे,गुंजूल्याचं तिखलं आणि सुरमईची तळलेली कापं खाऊन नंतर मस्त गप्पा मारूया.
अरे हो पण तू “घुटूं ” घेत नाहीस ना?पण हरकत नाही आज सोवळ्या ब्राम्हणाबरोबर पंगत आहे समजेन.”
हे बाबल्याचं आग्रहाचं भाषण ऐकून ते मालवणी जेवण मी कसं अव्हेर करणार?.
मी म्हणालो,
“असे योग पुन्हा पुन्हा येत नसतात.सर्व मंजूर आणि तू हवं तर तुला घूटू घेऊं शकतोस”
मालक आणि गिर्‍हाईक एकाच टेबलावर बसून मास्यांवर ताव मारायला लागलो. जेवणावर ताव मी मारत होतो आणि बाबल्या घूटूं चवीने पीत होता. तीरफळं घालून नारळ्याच्या जाड रसातलं तिख्खट तिखलं आणि उकड्या तांदळाचा गरम गरम भात मला एका तंद्रीत नेत होता तर बाबल्याची तंद्री जुन्या आठवणीच्या विश्वात त्याला घेऊन जात होती.
दुपारची वेळ असल्याने जेवायला दुसरी गिर्‍हाईकं येऊन जेवून जात होती.
“तू मुंबई सोडून लहान वयात इकडे आलास आणि आम्हाला विसरलास”
असं मी जरा लागट बोलल्यावर बाबल्या शेवटचा घुटूचा घोट संपवून मला म्हणाला,
“एव्हडं रातांब्याच्या सोलाचं सार आणि भात जेऊन घेतो आणि आपण वर माडीवर जाऊन गप्पा मारुया.”
माडीवर गेल्यावर बाबल्या बोलू लागला,
“त्यावेळी आम्ही मोचेमाडच्या नदीच्या खोर्‍यात ह्या गावात खानावळ काढली होती. मी त्यावेळी टीनएजर वयात होतो.मुंबईच्या शहरी वातावरणात वाढलेला मी ह्या खेड्यातल्या वातावारणात येऊन जरा बुजलो होतो.तसं मला शहरातून ह्या खेडवळ वातावरणात यायला आवडलं नव्हतं असं नाही.उलट मला नदी,नदीतल्या होड्या-खपाटे,मासे मारण्याच्या आणि जाळी टाकून मासे पकडून गावात विकायला आणण्याच्या कामात मजा यायची.”
हे ऐकून मी बाबल्याला म्हणालो,
“आजुबाजूचा डोंगराळ प्रदेश आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी हिरवी गार भाताची शेतं,डोंगर्‍याच्या माथ्यापासून खालपर्यंत त्या झाडांच्या गर्दीत काजूच्या झाडांची झूडपं, करवंदाची काटेरी झूडपं,झाडयाआब्यांची उंचच उंच झाडं,गावातल्या गुराख्यांनी चरण्यासाठी आणलेली गाई-गुरं आणि शेळ्या-बकर्‍या हे वातावरण पाहून कुणाही शहरातल्या सिमेंटकॉंक्रीटच्या जंगलात वाढलेल्या तुझ्या-माझ्या सारख्याला भारावून न गेल्यास नवलच म्ह्टलं पाहिजे.”
माझं हे आजूबाजूच्या प्रदेशातलं सृष्टीसौंदर्याचं वर्णन ऐकून मला बाबल्या म्हणतो कसा,
“तू पण माझ्या बरोबर त्यावेळी यायला पाहिजे होतं.मग तुझं कवी मन आणि माझं वाचनाचं वेड यातून काहीतरी घडलं असतं.”
मी म्हणालो,
“बाबल्या अजून तू ह्या खानावळीचा व्याप सांभाळून वाचनाचं वेड चालूंच ठेवलं आहेस कां?”
“अरे मी ह्या गल्यावर बसून चिं.त्र्यं.खानोलकर,मंगेश पाडगांवकर,वि.स. खांडेकर ह्यांची जवळ जवळ सर्व पुस्तकं वाचून फस्त केली आहेत.आरती प्रभू या नावाने चिं.त्र्यं.नी लिहिलेली कवितेची पुस्तकं त्यावेळी तू आणि मी आवडीने वाचायचो.आठवतं तुला?
“ये रे घना ये रे घना” ही कविता आणि लता का अशाने ते गायलेलं आणि श्रीनिवास खळ्यांचं संगीत ऐकायला काय मजा यायची.अजून ते गाणं कधीकधी रेडोयोवर लागतं.”
असं मी म्हणाल्यावर,बाबल्या आपल्या आयुष्यातल्या गंमती सांगू लागला,
“परंतु,मी आमच्या नवीन थाटलेल्या आमच्या फॅमेलीबिझीनेसला तसा तयार नव्हतो. त्या आव-जाव टाईपच्या लोकांच्या खानावळीत जेवायला येण्याच्या रोजच्या संवयीला मी मनापासून तयार नव्हतो. मुंबईतल्या त्या शहरातल्या विस्मयजनक आश्रीत असलेल्या जीवनशैलीशी आणि ह्या गावातल्या वातावरणाशी तुलना होऊच शकत नाही.
त्या वयात ह्या लोकांकडून काही चमत्कारीक घटना,गडबड असावी अशी वागुणूक आणि विस्मयजनक संकेत पहात असायचो.
एखाददिवशी मी अक्षरशः डोळ्यात पाणी आणायचो.एकदा मी माझ्या आईला विचारलं पण,
“आई हे लोक कुठून कुठून येतात गं!”
एक उदाहरण म्हणून सांगतो,
“तुम्ही मुलाला नदीत पोहायला पाठवू नका.कोणतरी म्हणत होतं की, मोचेमाडच्या नदीत मोरी-मुशी सारखे मांसे आहेत.”
असले बिनबुडाचे सल्ले माझ्या आईला द्यायचे.
मला माहित होतं की ह्या मोरी माशाला इंग्रजीत shark म्हणतात.हा मासा बहुदा खार्‍या पाण्यात असतो.आणि त्याला गोड्या पाण्यातले मासे खायला आवडत नाही. मोचेमाडच्या नदीचं पाणी अर्थात गोडं होतं,मोरी मासा समुद्रात पोहणार्‍या माणसांच्या शरिराचे लचके तोडतो.एव्हडीच भिती घालून मला नदीतल्या मजेदार जीवनापासून माझी फारकत करायला ही मंडळी पहात होती.मला खूप राग यायचा.
ही लक्षात आलेली एकच घटना मी तुला सांगितली. अश्या अनेक गोष्टी हे लोक जेवायला आले की करायचे. अश्या तर्‍हेच्या गोष्टी त्या वयात ऐकून आणि मिळालेला अनुभव घेऊन कुणालाही मनुष्याच्या शक्की स्वभावकडे बघून माझ्या सारख्याला त्यावेळी ह्या लोकांचं कौतूक वाटायचं आणि राग ही यायचा.
मला वाटायचं की हे लोक अज्ञानी आहेतच त्याशिवाय बुद्दु असून जागे असताना झोपेत चालल्यासारखं स्वतःच्या दिनक्रमात करीत असतात. मी मात्र ह्या लोकांपेक्षा नक्कीच तल्लख होतो.

पण जसं वय वाढत चाललं होतं तसा मी जास्त नम्र होत होतो.एक कारण की मी जसा जगात वावरायला लागलो तसा मी एखाद्या मठ्ठ व्यक्तिसारखा विस्मयजनक चूका करायला लागलो.मुख्यतः मी चलाख लोकांच्या सहवासात राहून चलाख व्हायला लागलो पण तसं पाहिलं तर आम्ही सर्व अजून मठ्ठच होतो.हळू हळू माझ्या लक्षात यायला लागलं की आपण बरेच जण असेच बर्‍याच गोष्टीबद्दल आणि बरेच वेळा संभ्रमात असतो.”
हे बाबल्याचं चिंतन ऐकून मी समजलो की बाबल्याचं घुटूं नक्कीच उतरलं होतं. आणि तो अगदी खुशीत येऊन बोलत होता.
“तसं पाहिलंत तर मानवाचा इतिहास ही एक अज्ञानता आणि पागलपणाची नामावली म्हणावी लागेल.आणि रोजचीच त्यात नवीन प्रकारच्या भयाची भर होत असते.पण हा इतिहास इतका सदोष असला तरी सगळेच भुकेने मरत नाहीत, बरेचसे तरूण भयंकर रोगाने मरत नाहीत,जीवन चालूच असतं.जरी ते जीवन उत्कृष्ट नसलं तरी बरचसं यथोचित असतं.”
मी बाबल्याला म्हणालो,
“आपल्याला शेती करता येते,दवादारू,संगीत,आणि कलेचं सानिध्य आहे. आता तर इंटरनेट आहे,टीव्ही आहे रेडियो आहे. जरी आपल्या अतृप्तीची आणि अपेक्षांची मोजमापं केली तरी ती समाधानकारक वाटतील.”
मला बाबल्या म्हणाला,
“तू म्हणतोस ते अगदी योग्य आहे.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती अशी की ही सर्व फलश्रुती “त्यांची” आणि “ते” लोक जे अज्ञानी आणि बुद्दु असे मला वाटले आणि ज्यानी माझ्या किशोरावस्थेत माझं जीवन हराम केलं त्यांची आहे.
मी मात्र चकित करणार्‍या ह्या मानवी आचारशिष्टतेची ही बलवत्ता मानतो. ही आचारशिष्टता जरी लडखडणारी, विपत्तीच्या सीमारेषेवर असणारी,दोन पाउलं पुढे आणि एक पाऊल मागे असलेल्या घोळात असलेली जरी भासली तरी असं असून सुद्धा आपण सर्व सांभाळून घेत आहोत.खरंच हे आश्चर्य करण्यालायक आहे.”
मी म्हणालो,
“अरे तुझी खरंच कमाल करावी लागेल.ह्या खानावळीच्या धंद्यात राहून सुद्धा तू तुझी साहित्यीक विचारसणी जास्त राखून ठेवली आहेस,हे अचंबा करण्यासारखे आहे.”
माझं हे ऐकून मला बाबल्या जरा मान उंचावून कॉलर ताठ केल्याचा बहाणा करून-कारण तो अजून वरून उघडाच होता-म्हणाला,
“हे तुझ्याकडून ऐकून मला बरं वाटतं.खरं सांगायचं तर चिं.त्र्यां.ची पण अशीच खानावळ कोकणातच होती.पण त्यांच धंद्यात लक्ष लागेना म्हणून ते सर्व गाशा गुंडाळून मुंबईला गेले.आणि मग ते साहित्यात किती नावजले हे तुला माहित आहेच?”
बोलण्यात वेळ कधीच निघून गेला होता.मला संध्याकाळची मोचेमाड ते शिरोडा ही एसटी गाठायची होती.आणि तिकडून तीन मैलांची पायी रपेट आजगांव पर्यंत करायची होती.
लगबगीने उठत मी बाबल्याला म्हणालो,
“परत येताना वेळ साधून तुझ्या खानावळीत जेवायला येतो.आजचं जेवण मस्तच होतं”
“येण्यापूर्वी फोन कर.म्हणजे खाडीतली ताजी सफेद सुंगटं घेऊन ठेवतो आणि मस्त सुंगटाची आमटी करतो आणि पेडव्याचं सूकं करून ठेवतो.मग परत चिं.त्र्यं.खानोलकरांवर आणि आरती प्रभूवर गप्पा मारूया?”
असं म्हणून झाल्यावर मला सोडायला बाबल्या एसटी स्टॅन्डवर आला.मात्र वरती खादीचा सदरा आणि गांधी टोपी घालायला आणि नेसता पंचा सोडून पांढरं स्वच्छ धोतर नेसायला विसरला नाही.
एसटी सुटता सुटता मी हंसत हंसत त्याला म्हणालो,
“बाकी एखाद्या मंत्र्याक लाजवशीत असो दिसतंस हां!”
हे ऐकून हाताने बाय बाय करणार्‍या बाबल्या मोचेमाडकराचा हंसरा निष्पाप चेहरा बघून मी मनात पुटपुटलो,
“बिचारा बाबल्या”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, May 15, 2009

“प्रतिसाद मनी धरोनी,कुणी लेख लिहित नसावे”

“प्रतिसाद मनी धरोनी
कुणी लेख लिहित नसावे”

लेखांची वाचनं अनेक होत असतात.लेखांना प्रतिसाद मिळाला की लेखकाला निश्चीतच बरं वाटतं.मग तो प्रतिसाद कसाही असो.लेखन ही ज्याची त्याची निर्मिती आहे असं मला वाटतं.सर्वच वाचक लेखक नसतात,पण लेखकाला मात्र वाचक असावं लागतं.त्याशिवाय त्याला त्याच्या लेखनाच्या विषयांची कल्पना येणार नाही.मात्र एखादा उस्फुर्त लेख लिहिला जाणं निराळं.अनेक प्रसिद्ध लेखकांची वाचनं प्रचंड असतात.ही वाचनं निरनीराळ्या भाषेतली पण असतात.
काही लेख इतके पारदर्शक असतात की त्यांना,
“लेख आवडला” किंवा,
“लेख छान लिहिला आहे”
ह्या व्यतिरीक्त वाचकाला काही लिहिण्याची जरूरी भासत नसावी.काही वाचकांना तेही लिहिण्याची जरूरी भासत नाही.आणि ते स्वाभाविक आहे.
आता ब्लॉग झाले आहेत.एखादा लेख वाचून त्याला ताबडतोब प्रतिसाद देण्याची सोय झाली आहे.पूर्वी वर्तमान पत्रात किंवा मासिकात लेख यायचे.अजूनही येतात म्हणा.आणि त्यावेळी त्या लेखाला ताबडतोब प्रतिसाद द्यायची सोय कुठे असायची?

अनेक लहान लहान लेखांचं एखादं पुस्तक लिहिलं गेलं तरी त्यावर देण्यात आलेली प्रतिक्रिया,किंवा एखाद्या पुस्तकावर “समिक्षा” म्हणून देण्यात आलेली प्रतिक्रिया कुठल्यातरी वर्तमानपत्रात आली तर यायची.
तर हे सर्व सांगण्याचा मतितार्थ एव्हडाच की,
“इंस्टंट प्रतिसाद ” मिळाला की लेखकाला वाचून बरं वाटतं.आणि ती त्याची इच्छा अलिकडच्या ब्लॉग लेखनाने पुरी होत आहे.ह्यावरून एक कविता सुचली ती अशी,
“प्रतिसाद”
(चाल:- प्रतिमा उरी धरोनी ह्या गाण्याची आणि आधार त्याच गाण्याचा)

प्रतिसाद मनी धरोनी
कुणी लेख लिहित नसावे
ते लेख निर्मितीचे
विचार करोनी लिहावे

उस्फुर्त भावनानी
स्वप्नात गुंग व्हावे
पुष्पात गंध जैसा
लेखात भाव तैसा

अद्वैत लिखणीचे
त्यां जीवनी असावे
तुम्ही सप्तरंग वाचनाचे
व्हावे अनेक मतांचे

विषय जीवनाचे
चर्चीत कुणी बसावे
का वाचकास वाटे
प्रतिसाद कुणा भावे

ते भावस्वप्न कुणाचे
बेकार कां करावे
प्रतिसाद मनी धरोनी
कुणी लेख लिहित नसावे



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, May 13, 2009

ह्या विश्वात आपलं अस्तित्वच का असावं?

असा प्रश्न मी आज प्रो.देसायानां केला.मला खात्री होती की भाऊसाहेब मला ह्यावर काहीतरी समजावून सांगतील.थोडावेळ विचार करून मला म्हणाले,“हा कायमस्वरूपी प्रश्न असून हा प्रश्न आपल्या अस्तित्वाबद्दल आणि आपल्या मुल्याबद्दल असलेल्या मुलभूत आकांक्षांचं ज्ञान प्रकट करतो.”“तेच ज्ञान काय आहे हे मला तुमच्याकडून आज समजावून घ्यायचं आहे.”असं मी म्हणताच,प्रो.देसाई म्हणाले,“मी मला काय वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न करीन,पण ते तुम्हाला किती पटतं किंवा तुम्ही त्यातून किती समाधान मानून घ्याल ते तुमच्यावर अवलंबून आहे.”“सांगा तर खरं”असं मी म्हणाल्यावर भाउसाहेब सांगू लागले, ”माझं इथं अस्तित्व कशासाठी आहे?ह्याचा विचार केल्यावर माझ्या मनात येतं की माझ्याबाबत बहूतांश लोकाना स्पष्ट कल्पना असावी,ती अशी की, माझ्या पत्नीला वाटत असावं की मी तिला मदत म्हणून घरातला केरकचरा साफ ठेवावा,मुलांना गृहपाठ करून घेण्यात मदत करावी,आणि जरूर वाटल्यास तिच्या स्वयंपाकात मी तिला मदत करावी.माझ्या बॉसला वाटतं की मी त्याचा जॉब सांभाळावा. माझ्या मोगोमाग येणार्‍याला वाटतं माझ्या गाडीमुळे ट्रॅफिकमधे अडथळा येत असावा. परंतु,ह्या सर्वांच्या अपेक्षा सांभळत जर मी राहिलो तर मला हवं असलेलं उत्तर काही मिळणार नाही. पण असा विचार करण्यात काही काळ जाऊं दिल्यानंतर मला वाटतं पूर्ण नाही तरी काही प्रमाणात मला उत्तर मिळेल.अगदी स्पष्टपणे मला आठवतं,ह्या जगात माझ्या अस्तित्वाची चुणूक मला यापूर्वीच मिळाली आहे.“ते कसं?”असं मी म्हणाल्यावर प्रो.देसाई म्हणाले,“मला जुन्या गोष्टींची आठवण आली.मी जिथे काम करीत होतो त्या संशोधन संस्थेत एकदा गच्चीत दुर्बिण उभी केली होती आणि सर्वांना आकाशात पहाण्याची सोय करून दिली होती.एक दिवशी आम्हाला शनी हा ग्रह दिसणार म्हणून सांगितलं,आणि शनीवर ती दुर्बिण फोकस करून ठेवली होती.मी प्रथमच त्या दुर्बिणीतून शनी पाहिला.यापूर्वी मी फक्त हे ग्रह चित्रातून पाहिले होते.एखाद्या लहानश्या वॉशरमधे एक तितकाच लहान मणी तरंगत ठेवावा तसा तो शनीग्रह दिसत होता.त्यावेळी मात्र ह्या विश्वाकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोनच अचानक बदलला.माझ्या बौद्धिक क्षमतेच्या आधारावर मला नेहमीच माहित असायचं की आकाशात जे झगमगतं ते आकाशातले तारे आणि ग्रह आहेत.पण अगदी सहज मनात आल्यावर मी विचार केला की हे सर्व ग्रह-तारे दुसरं तिसरं काही नसून विश्वाच्या छ्प्परामधून टोचून भोकं पाडलेल्या टांचण्यांच्या वरच्या टोप्या-pinheads- आहेत.शनीग्रहाला दूर्बिणीतून पाहिल्यावर खरं वाटायला लागलं.ग्रह-तारे-आकाशगंगा ह्या खर्‍याच आहेत.हे विश्व अनंतापर्यंत एव्हडंपसरलंय की ते माणसाच्या समजूतीच्या पलिकडचं आहे.मनात यायला लागलं ह्याच कारणास्तव मोठ मोठ्ठ्या संशोधकानी अवलोकन करताना ते इतराना समजावून सांगण्याच्या प्रयत्नात त्यानी तुरुंगात जाण्यापासून ते देहदंड मिळेपर्यंत तो धोका पत्करला.आणि अशाच काहीश्या कारणास्तव भावीवक्ते पण तुरुंगात आणि फाशी जाऊन पण धर्मसंबंधाने आपले ऊपदेश देत राहिले.त्यानी काहीतरी अद्भुत गोष्टी शोधून काढून मनुष्याच्या ज्ञानात भर घालताना ह्या जगतसृष्टित आपलं स्थान काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.तसं पाहिलं तर बरेचसे लोक जिथे आहेत तिथे सुखी आहेत.आणि त्यांच्या सध्याच्या असलेल्या विचारसरणीत फरक झाला तर ते प्रतिकार करायला मागे पुढे पहाणार नाहीत.पण माझी खात्री आहे की मनुष्य आपली प्रगती करीतच रहाणार आणि नवीन नवीन ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नात असणार. मग ते ज्ञान शास्त्रीय असो अथवा आध्यात्मिक असो.विज्ञान आध्यात्माशिवाय भावशून्य आहे आणि आध्यात्म विज्ञानाशिवाय अभिलाषा कल्पित चिंतन होईल.मग आपलं इथलं अस्तित्व कशासाठी आहे?ह्याचं उत्तर असं वाटतं की आपला जीवनमार्ग काटत असताना आपण कशावर विश्वास ठेवतो आणि प्रत्यक्ष काय समजतो ह्याचा समतोल संभाळण्यासाठी कदाचीत हे अस्तित्व असेल.आणि मला वाटतं अशा समजूतीवर मला समाधान मानून घ्यायला हरकत नाही.तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी मला वाटतं तसं दिलं असं मला वाटतं.”मी म्हणालो,“भाऊसाहेब मला पण तुम्ही समाधान मानून घेता तसं घ्यायला हरकत नाही.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)shrikrishnas@gmail.com

Monday, May 11, 2009

“तुझ्या डोक्यावर आलेली बला टोपीने झेलली.”

आज मी गुरूनाथला विचारलं,“तुझी ती गांधी टोपी,किंवा सफेद टोपी म्हणूया ती वापरायचं तू केव्हा पासून सोडून दिलंस?” त्याच्या त्या सफेद टोपीची “ष्टोरी” माझ्या अजून लक्षात आहे हे समजल्यावर गुरूनाथ हंसायला लागला.“अरे तू एव्हडा हंसतोस का?”असं मी त्याला म्हणालो.“ती टोपी आणि मी हंसतो कां? ह्या दोन्ही गोष्टी मी तुला सांगणार आहे.”असं म्हणून गुरूनाथने पहिल्या पासून सुरवात केली,“आमच्या आजोळी खूप गाई-गुरं होती.सहाजीकच मी पण आमच्या गुराख्यांबरोबर रानात जात असे.ह्या गुराख्यांकडून मी त्यावेळी खूपच शिकलो.मी नेहमी पाहिलंय की माझ्या जीवनाच्या वाटेवर प्रत्येक पायरीवर कुणी तरी मार्ग दाखवायला यायचं. एकाअर्थी ते माझे संरक्षण करणारे जणू देवदूतच होते आणि मला योग्य मार्गदर्शन करायचे.मनाशी कोणताही प्रश्न न करता ही जीवनात येणारी विक्षिप्त वळणं मी स्विकार करीत असायचो.”मी म्हणलो,“तू अगदी लहान होतास त्यावेळी.”
“मी त्यावेळी दहाएक वर्षांचा असेन.त्यावेळी खानोलीच्या तरूआक्काचा बबन्या माझा मित्र होता. त्याने मला नदीतून मासे कसे पकडायचे,जाळं कसं फेकायचं, मोठा बुळबुळणारा मासा हातात कसा घट्ट धरून ठेवायचा,असल्या गोष्टी शिकवल्याच आणि त्यापुढे जाऊन प्रेमळ कसं असावं आणि जीवनात विपत्ति आल्यावर त्याला हंसत-खेळत तोंड कसं द्यायचं हे ही शिकवलं.“अरे गुरूनाथ,मला आठवतं त्यावेळी खादी टोपी सर्रास लोक वापरायचे.शाळेत तर प्रत्येक मुलाच्या डोक्यावर खादीची टोपी असायची.काही त्याला गांधी टोपी पण म्हणायचे.मुंबईहून मी सुट्टीत गावाला आल्यावर तुम्ही लोक मला टोपी शिवाय पाहून बोडका म्हणून चिडवायचे.”हे मी बोलल्यावर गुरूनाथ परत हंसला,आणि म्हणाला,“ती दिवाळसणाची वेळ होती.माझ्या वडीलानी मला एक पांढरी शुभ्र टोपी दिली होती.दुकानात निरनीराळ्या कपड्यांच्या टोप्या होत्या पण ही जाड खादीची शुभ्र टोपी मला जास्त आवडली.मी ती मोठ्या दिमाखाने डोक्यावर चढवायचो.मी त्याटोपीची नीट नीगा ठेवायचो.त्यादिवशी आम्ही- माझी मामेबहिण यमी- तिच्याकडे जेवायला गेलो होतो.यमीताई माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी होती.मी तिच्या मुलांचा मामा असून त्या माझ्या भाचांच्याच वयाचा होतो.त्यादिवशी संध्याकाळी आम्ही बाजारातून आणलेली रताळी, कणगी,करांदे बाहेरच्या अंगणात शेकोटी सारखी आग करून त्यात भाजत होतो.अशी भाजून आलेली ही कंदमूळं खाताना गोड लागतात.बाहेर तसं बरंच थंडहोतं.आम्ही सर्व इकडच्या तिकडच्या काटकोळ्या जमा करून त्या आगीत टाकण्यासाठी तयार ठेवीत होतो.माझा एक भाचा -कुमार- आम्हाला जादूचे प्रयोग करून दाखवत होता.ते झाल्यावर त्या शेकोटीभोवती बसलो असताना दुसरी भाची-कल्पना-वि.स.खांडेकरांच्या पुस्तकातल्या वाचलेल्या लहान लहान गोष्टी सांगत होती.तू सांगतोस तसं त्यावेळी आम्ही सर्व मुलं घराच्या बाहेर पडल्यावर डोक्यावर टोपी चढवून जात असूं. परत घरी येई पर्यंत टोपी डोक्यावरच असायची.मला तर टोपी खूपच आवडायची म्हणा.
आमच्या डोक्यावरून एक काळा गरूड पक्षी उडत उडत निघून गेला.त्याची ती लांबच लांब आणि काळीकूट्ट पंख हलत असताना मोठ्ठा आवाज झाला.आणि झपकन माझ्या डोक्यावर काहीतरी पडल्याचा आवाज आला.क्षणभर सगळेच आवाक झाले.आणि एकामागून एक माझ्या टोपीकडे बघून हंसायला लागले.कां ते कळायला मला वेळ लागला नाही.कारण तोपर्यंत मला टोपीच्या खालच्या भागातगरम वाटत होतं,आणि दुर्गंधीचा दर्प येऊं लागला.लगेचच उठून मी आणि यमीताईचा गडी -भगवान-विहीरीकडे धांवत गेलो.आणि कळशीभर पाणी काढून टोपी साफ करायला लागलो.पण वरची घाण जरी निघून गेली तरी त्याचा डाग काही जाई ना.त्या गरूड पक्षाने जे काय खाल्लं होतं ते जब्बर होतं.आमच्या शिकोटीच्या वरून उडताना त्यांच्या अंगाला आगीची धग लागली असावी आणि घाबरून त्या पक्षाने हा प्रकार केला असावा.भगवानाने माझी टोपी त्याच्या जूनकट राठ हातात घेऊन तो त्या डागावर घासायला लागला. घासता घासता त्याच्या चेहर्‍यावरचं ते दांतविचकतानाचं हंसं मला अजून आठवतं.आणि माझी समजूत घालण्यासाठी मागाहून बोलल्याचं ते धीर देणारं वाक्य आठवतं,“तुझ्या डोक्यावर आलेली बला टोपीने झेलली.”बोलून झाल्यावर परत आपले डोळे मिचकावत तोंडावर हंसं आणून मग मोठमोठ्यांदा हंसायला लागला.“मग ती टोपी तू टाकून का दिली नाहीस?”असं मी विचारल्यावर गुरूनाथ म्हणाला,
”नंतर ती माझी टोपी माझ्या जवळ खूप दिवस होती.आणि त्यावर आणखी खूप डाग ही पडले होते.परंतु,त्या पहिल्या डागाचा धडा मी कधीच विसरलो नाही.ते त्या भगवानाचे शब्द पूढे कसल्याही संतापजनक प्रसंगातून सावरायला मला उपयोगी पडले.मला ते त्याचं वाक्य, मी आणि माझं स्वामित्व ह्या मधलं खरं अंतर दाखवत राहिलं.माझ्या मनासारखं काहीही झालं नाही तर चेहर्‍यावर हंसूं आणण्याची मला आता संवय झाली होती.त्या संवयीमुळेच मी आता मनासारखं झालं किवा नाही झालं तरी हंसत रहातो.”गुरूनाथचं हे हंसत रहाण्याचं तंत्र मला आवडलं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)shrikrishnas@gmail.com

Saturday, May 9, 2009

मातृदिन

“अगं, आई!
कमलमूखी तू सुंदर असता
रूप विधात्याचे कसे वेगळे?”

ह्याचं उत्तर जाणण्यासाठी,
आईला “आई”च का म्हणतात हे जाणण्यासाठी,
ज्यांची आई हयात आहे त्या सौभाग्यांसाठी,
ज्यांची आई हयात नाही त्या माझ्यासारख्या अभाग्यांसाठी,
“बाळा! तुला लागलं कारे?”
हा आईचा प्रश्न जाणण्यासाठी
आईची व्यथा जाणण्यासाठी,
आईचे डोळे नेहमीच ओले का असतात हे समजण्यासाठी,
चिमुकली तनुली आईला काय सांगते हे समजण्यासाठी,
प्रत्येक व्यक्तिच्या पोटावरची खूण कां आहे ते जाणण्यासाठी,
आई..! तुझी, आ..ठ..व..ण येते…!
हा माझा लेख वाचला असेल तर आज परत वाचण्यासाठी,
वाचला नसेल तर प्रथम आज जरूर वाचण्यासाठी,
माझ्या ब्लॉगवर “Top Post” च्या यादीत
“आई तुझी आ…ठ…व…ण येते!”
ह्या शिर्षकाचा लेख
किंवा
माझा May 10, 2008चा हाच लेख आज मातृदिनी जरूर वाचण्यायोग्य आहे.
shrikrishnasamant.wordpress.com ही माझी website
आणि
कृष्ण उवाच हे माझं होम पेज.जरूर भेट द्या

प्रत्येकाची आई अगदी अशीच असते.
आजच्या मातृदिना सारखा जरूर आठवण आणणारा दिवस चुकवून कसं चालेल?
आईला ह्या मातृदिनी आठवणार नां?



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, May 7, 2009

निदान त्याचा तुम्हाला अपाय होणार नाही.

आज प्रो.देसाई हंसत हंसत येताना पाहून मला खात्री झाली की काही तरी ते मला आनंदाची बातमी सांगणार आहेत.वाटेत ओळखीचा असो नसो ते सर्वांशी हंसत होते.हे जरा मला निराळंच वाटलं.एका लहान मुलाने त्यांना,
“हाय ग्रॅन्डपा!”
असं म्हटल्यावर थांबून त्याच्या पाठीवर थोपटून हंसत होते.
जवळ आल्यावर मी त्याना विचारलं,
“काय भाऊसाहेब,आज बरेच आनंदी दिसता.मघापासून मी बघतोय तुम्हाला तुमचा चेहरा हंसरा दिसतो.म्हणजे तो एरव्ही नसतो अशातला भाग नाही,पण आज जरा विशेष,काय गौडबंगाल आहे.?”
“कर्माचं गौडबंगाल,अहो मला तुम्हाला माझी जुनी एक आठवण न विसरता सांगायची होती.म्हणून निघतानाच त्याची पूर्व तयारी करीत आलो आहे.”
हे त्यांच्याकडून ऐकल्यावर माझं कुतूहल वाढणं स्वाभाविक होतं.
“सांगा तर तुमची जूनी आठवण.”
असं मी म्हणाल्यावर,जरा खाकरून भाऊसाहेब सांगू लागले,
“साधारण तिस वर्षापूर्वी म्हणजे मी जेव्हा पन्नाशित गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझे सहकारी, कॉलेजातले विद्यार्थी ज्यांना मी शिकवत असायचो, आणि माझे मित्र हे सगळेच मला विचारायचे,
“तुम्ही थकला का?
तुम्हाला बरं नाही काय?
काही विषेश झालं नाही ना?”
अर्थात माझं प्रत्येक प्रश्नांना उत्तर
“नाही ” हेच होतं.
परंतु,माझ्या त्या वयाच्या जवळपास,चेहर्‍यावरची उत्सुकता जाऊन गांभिर्य आलं होतं.
खरं पाहिलं तर,मी ज्यावेळी विसावलेला आणि शांत असायचो,त्यावेळी मी जरा गंभीर आणि थकलेला दिसायचो.तो दिसू नये म्हणून मी चेहरा हंसरा ठेवायला लागलो.”
“मग हेच तुम्ही आता पुन्हा चालू केलं की काय.?”
असं मी म्हणाल्यावर भाऊसाहेब म्हणाले,
“ऐकातर खरं,ज्याच्या त्याच्याशी मी त्यावेळी हंसून पाहू लागलो.तसं काही कारण नसतानाही केवळ दिखावा म्हणून सहज हंसायचो.कुठे रस्त्यात,दुकानात गेलो तर, माझ्या कॉलेजमधे,कॉलेजच्या लॉबीमधे कुणी दिसल्यास.
आता हंसायची मला एक संवयच झाली.आणि ते लोकांच्या लक्षात यायला लागलं. कॉलेजच्या हॉलमधे एकदा एक अनोळखी व्यक्ति मला म्हणाली,
“तुम्ही खूप खुशीत दिसतां”
मी माझा चेहरा जास्त हंसरा करून, मान हलवली आणि चालू पडलो.
मला वाटतं की आपण जसा अविर्भाव करतो तसेच आपण दिसतो.”
मी म्हणालो,
“मला आठवतं त्याप्रमाणे- अर्थात तुम्हीच सांगितलं होतं- की त्यावेळी तुम्ही कॉलेजात शिकवत होता.”
“हो मी कॉलेजात शिकवत होतोच पण बरोबरीने नाटकातही काम करीत होतो ते दिवस मला आता आठवतात.तो काळ माझ्या तिशीच्या शेवट शेवटचा होता. नाटकात भुमिका करायचो,करून घ्यायचो,शिकवायचो, लिहायचो, आणि त्याबद्दल विचारही करायचो.जवळ जवळ आणखी वीस वर्षं असं करत होतो.कॉलेजात शिकवणं हा माझा दुसरा व्यवसाय होता.

एक वर्षी एक दिवस असा आला की मला खरंच वाटू लागलं की मी जात्याच कलाकार आहे.
जसं एखादा एकाएकी भक्तिभावात आपलं मन रमवून घेतो अगदी तसं.जे काही मी करायचो ते माझ्या कलेच्या भिंगातून पाहायचो.”
असं म्हणून भाऊसाहेबानी जरा उसंत घेतली.
मग म्हणाले,
“हे जर खरं असेल तर–जे एखादा करतो तसा तो होतो-तर मग मला वाटलं हंसतमुख असणं म्हणजेच आनंदी असणं. खोटं हंसू आणि खरं हसूं ह्यातला फरक आपल्या सर्वांना माहित असतो.आपण कॅमेर्‍या समोर उभे राहून,
”आता प्लिझ हंसा”
असं म्हटल्यावर हंसतो ते खोटं हंसू.ज्या लोकांचा व्यवसायात चेहर्‍यावरचे हावभाव पाहून निर्णय द्यायचा असतो,किंवा ज्यांना कोर्टातले ज्युरी निवडण्याचं काम असतं, किंवा ज्यांचा वकिली व्यवसाय असतो की ज्यांना गुन्हेगाराकडे बघून प्रश्न विचारायचे असतात त्या सर्वांना हे हंसू माहित असतं.चेहर्‍यावरचे स्नायु पाहून जे स्नायु खरा आनंद प्रकट करतात ते स्नायु ते बरोबर ओळखून काढतात.”
“चेहर्‍यावरून असं ओळखून काढण्यासारखं असं खास काय आहे.? माणूस हंसायला लागला की त्याचा चेहराच ते प्रदर्शित करतो.”
असं मी म्हणाल्यावर मला ह्या बाबतीत,अज्ञान आहे असं प्रोफेसरांच्या लक्षात बहुदा आलं असावं. माझ्याकडे बघून हंसत हंसत-पण हे त्यांच हंसणं जरा निराळं होतं- मला म्हणाले,

“तुम्ही अपेक्षा कराल तसे हे स्नायु चेहर्‍याभोवती नसतात.हे स्नायु गालांच्या वरच्या भागात,नाकाच्या आणि डोळ्याच्या अवती-भोवती असतात.हे स्नायु जेव्हा आकुंचन पावतात,तेव्हा मेंदू चारही प्रकारचे आनंद पावण्याचे रस सोडतो आणि तुम्ही आनंदी होता. तेव्हा आनंदी होण्यासाठी आपले हे “हंसमुख” करणारे स्नायु क्रियाशील केले म्हणजे झालं.मला वाटतं हे मी म्हणतो ते खरं आहे.”
असं सांगून झाल्यावर आपल्या खिशातलं एक पेन काढीत मला म्हणाले,

“तुम्हाला फक्त एव्हडंच करावं लागेल.हा आवाज काढा,
“ईईईईईईई. प्रयत्न करा ईईईईईई.”
वाटलं तर जरा शांत राहून पहा.एखादी पेन्सिल दातांच्यामधे आडवी ठेवून पण पहा तोच परिणाम दिसेल.मी एक निर्दिष्ट केलेलं हे पेन माझ्या जवळ ठेवतो. आणि आठवण होईल तसा त्याचा वापर करतो.कधी एखादवेळी हंसण संभवनीय नसेलं तरी-एखाद्या संकट काळीही- हे हंसमुख करणारे रस मेंदू कडून सोडण्याच्या प्रयत्नात रहा,आणि आनंदी नसला तरी ज्ञात व्हा.
माझं स्वतःचं हंसू तसं शक्तिशाली आहे.मला त्यानं जास्त आनंदी केलं आहे.आणि ते “संसर्गजन्य” आहे हे मात्र नक्कीच.
प्रयत्न करा निदान त्याचा तुम्हाला अपाय होणार नाही.
मी म्हणालो,
“भाऊसाहेब,ह्यालाच मी मघाशी सांगा तुमचं गौडबंगाल असं तुम्हाला म्हणालो होतो.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, May 5, 2009

अंकिता नव्हे प्रश्नांकिता.

काल माझी आणि अंकिताची धाकेकॉलनीच्या अपनाबाजारात अचानक गाठ पडली. अंकिताचं लग्न झालं असं मला कुणी तरी सांगितलं होतं.मी तिला म्हणालो,
“काय तू मला लग्नाला बोलवायला विसरलीस वाटतं?”
“असं काय काका? कुणाचं लग्न म्हणता?माझ्या लग्नाला मी तुम्हाला विसरेन कशी? आणि लग्न झालं तर माझ्या गळ्यात तुम्हाला मंगळसूत्र दिसणार नाही काय?”
नेहमी प्रमाणे प्रश्नावर प्रश्न विचारणार्‍या अंकिताला मी गंमतीत “प्रश्नांकिता” असं नाव ठेवलं होतं.
ह्यावेळीपण ती प्रश्न करायला विसरली नाही.
“अगं, लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही मुली साड्या नेसत नाही.आणि मंगळसूत्र म्हणे साडीशिवाय इतर पोषाखावर “ऑड” दिसतं.असं कुणी तरी म्हणाल्याचं मला आठवतं. तेव्हा म्हटलं…. म्हणजे माझी कुणीतरी फिरकी घेतलेली दिसते.पण ते जाऊदे. मला एक आठवलं,त्याला खूप वर्ष झाली म्हणा.तू पाच सहा वर्षाची असशील. तू एकदा तुझ्या आजोबाना विचारलं होतंस,
“आजोबा,तुम्ही माझ्या लग्नाला याल का?” आठवत असेल तुला”
थोडी आश्चर्यचकीत होऊन मला अंकिता विचारते,
“म्हणजे काय? ते तुम्हालाही माझ्या आजोबानी सांगतलं होतं?”
परत तिचे प्रश्न पाहून मी मनात हंसलो.
“हो,पण मला पूर्ण किस्सा माहित नाही.”
मी म्हणालो.

सध्या आंब्यांचा सिझन असल्याने अपनाबाजारने त्यांच्या दुकानाच्या बाहेरच्या लॉबीमधे मंडप घालून आंब्याच्या पेट्या विकण्यासाठी ठेवल्या होत्या. गिर्‍हाईकं तिकडे येऊन आंब्याच्या पेट्या खरेदी करायाची.त्यांना बसण्यासाठी एक दोन बाकं ठेवली होती.
अंकिता म्हणाली,
“काका,चला आपण त्या बाकावर जाऊन बसूया.मी तुम्हाला तो किस्सा सांगते.”
मला तिचं मन मोडवेना. आम्ही दोघं एका बाकावर जाऊन बसलो.
अंकिता म्हणाली,
लहानपणी मी आणि माझी धाकटी बहिण आमच्या आजीआजोबा बरोबर सदा आमचा अवसर घालवायचो.
माझ्या आईकडच्या मंडळींचे संबंध अगदी घनिष्ठ असायचे.
आमच्या मावशांची घरं जवळ जवळ होती.माझे नातावईक हेच माझे खरे मित्र मी समजते.आणि म्हणून त्यांना हृदयात जपून ठेवायला हवं.
मला आठवतं,त्यावेळी मी पाच एक वर्षाची होते.मला माझे आजोबा एकदा देवळात घेऊन गेले होते.घरी परत येताना पौर्णिमेचं पिठूळ चांदणं पडलं होतं. आम्ही दोघं हातात हात घालून चालत असताना वर आकाशात हजारो लाखो तारे पाहून माझ्या मनात आलं. आणि मी आजोबाना म्हणाले,
“आजोबा तुम्ही माझ्या लग्नाला येणार ना?
लग्न आणि लग्न समारंभाचं मला त्यावेळी का कुणास ठाऊक विशेष आकर्षण होतं.
मला आजोबा म्हणाले,
“हे बघ बाळा”,
मला माहित होतं,माझ्या आजोबांकडून असला प्रतिसाद मला ऐकाचा नव्हता.
“मी तोपर्यंत कुठे असणार?”
मी ती त्यांची थट्टा असं समजून त्याचं उत्तर उचित वाटावं म्हणून मी त्यांना म्हणाले,
“आजोबा, असं कसं?माझं लग्न तुम्हाला कसं चुकेल?”
तेही हंसले आणि मी पण.
“हो गं, माझ्या नाती! मी नक्कीच असणार”
असं ते मला म्हणाले.
मी ज्यावेळी सहा वर्षाची झाले म्हणजे त्यानंतर एक वर्षानंतर माझे आजोबा गेले. ती चांदणी रात्र मला अजून आठवते.ते पुस्सट आणि उदास चलचित्र मी तुटू-फुटू कसं देऊं?

मला आठवतं रात्रीचे दहा,अकरा वाजले असतील, इतक्या उशिरापर्यंत न जागणारी मी डुलक्या काढू लागले होते.
तोपर्यंत माझे आईवडील घरी आले.माझी मावशी आमच्याबरोबर होती.त्यांची कुजबुज त्या त्यावेळच्या शांत वातावरणात ऐकूं येत होती.मी माझ्या अंथरूणात उठून बसले.त्या कुजुबूजीकडे कान लावून ऐकलं आणि समजले.
माझ्या आजोबानी मला वचन दिलं होतं.पण….
मरण हे कुणाला चुकलेलं नाही हे मला समजतं.पण आपलं प्रेमळ माणूस सर्वांसम्मत जुळून येणारी वेळ साधून कसं जाणार?

मी पण माझ्या लग्नात सप्तपदी करताना, होमा भोवती फिरताना, देवा-ब्राम्हणासमोर माझ्या भावी पतीला,
“मी जन्मो-जन्मी तुझ्याबरोबर राहिन”
हे वचन आतूरतेने ऐकणार्‍य़ा त्याला देणारच आहे ना?”
असं म्हणून तिच्या आजोबांची आठवण काढून अंकिता डोळे पुसत होती.आम्ही दोघं जाण्यासाठी उठलो.
तिला बरं वाटावं म्हणून मी तिला जवळ घेत म्हणालो,
” व्हायचं ते होऊन गेलं.तू वाईट वाटून घेऊ नकोस.
मी येईन ना तुझ्या लग्नाला.तुझ्या आजोबांच वचन खरं करायला.पण मला बोलवायला विसरूं नकोस हां!”
” असं काय म्हणता काका?मी तुम्हाला कसं विसरीन?”
खरंच,असं जाता जाता प्रश्न विचारून जाणारी अगदी नावासारखी प्रश्नांकिताच ती म्हणा.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, May 3, 2009

मन तृप्त झालं आहे पण उत्साह स्वस्थ बसूं देत नाही.

माझ्या “कृष्ण उवाच” ह्या ब्लॉगवर आज पावलाख वाचनं झाली.
निरनीराळ्या विषयावर एकूण ३९२ लेखनं मी केली.

त्यामधे,
अनुवादीत कविता (129) आई विषयी (8) माझ्या कविता (43)
माझ्या कवितेतून माझे विचार (18) गम्मत (12) गोष्ट (23) चर्चा (6) चिंतन (14) टिका (2) प्रश्नोत्तरे (1)भाषण (2) लेख (87) वर्णन (2) विचार (31)

विडंबन(1) व्यक्ती आणि वल्ली(11) श्रद्धांजली (1)

२००७ जानेवारी पासून मी माझं लेखन लिहायलासुरवात केली.
२००७ मधे एकूण —–३,५१८ वाचनं झाली.
२००८ मधे एकूण ——१४,७११ वाचनं झाली.
२००९ मधे एप्रिल पर्यंत —-६,७५१ वाचनं झाली.
२००९ मधे दर महिन्याला सरासरी १,६०० वाचने होत आहेत.
१०जानेवारी २००९ मधे ह्या एका दिवशी –१६८ वाचनं झाली.
दर दिवशी सरासरी ५० वाचने होत असतात.
मी माझ्या सर्व मायबाप वाचकांचे आभार मानतो. आणि माझ्या ब्लॉगवर त्याचं स्वागत करतो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Friday, May 1, 2009

मला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.

काल मी तळ्यावर प्रो.देसायांची वाट बघून बघून थकलो.आता घरी जावं म्हणून उठून चालायला लागलो.वाटेत एका बाकावर एक गृहस्थ पुस्तक वाचताना मी पाहिलं.वाचनात ते अगदी गर्क झालेहोते. सध्या पानांच्या पडझडीचा-फॉलचा- मोसम असल्याने माझ्या पावलांची पाचोळ्यांवरून जातानाची होणारी चूरचूर ऐकून पुस्तकातून डोकं वर काढून मान वळवून माझ्याकडे पाहून ते हंसले.सहाजिक मीही हंसलो.हलो-हायचे सोपास्कार झाल्यावर,त्यांच नांव श्रीकांत फडके असं कळल्यावर त्यांच्या जवळच बसलो.बोलता बोलता कळलं की हे डॉ.फडके इंग्रजीतून पीएचडी करून साऊथ इंडियामधे कुठल्यातरी कॉलेजमधे प्रोफेसर राहून आता निवृत्तीत आपल्या मुलाकडे राहत होते.त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत. असं त्यांच्या बोलण्यावरून कळलं.
“मी कल्पित कथा-फिकशन- लिहितो,कधी कधी काव्यपण करतो.”असं मला म्हणाले.
मला सुद्धा काव्यात आणि कथेत दिलचस्पी आहे हे मी त्याना सांगितल्यावर सहाजिकच त्यांना बरं वाटलं.
मग काय विचारता! फॉल संपून वसंत ऋतूचं आगमन होण्याच्या खूणा दिसत असल्याने सूर्यास्त जरा लांबणीवर पडायला लागला होता.कोळख होईपर्यंत गप्पा मारायला संधीच मिळाली.
“तुम्ही तुमच्या कथानका विषयी सांगाल कां?”
त्यावर ते म्हणाले,
“काही व्यक्ति भिन्न वेळी नाना विषयामधे विश्वास ठेवतात,आणि त्यासुद्धा कधी कधी एकाच दिवशी.
ह्या वयातही माझ्या मनात सहज विचार आला की सृजनात्मक लेखन हा मनुष्याच्या मुल्यांकनाचा एक भाग असावा. मग ते लेखन काव्य असो किंवा कल्पित कथानक असो,किंवा यथार्थतेचा वा आत्म-अभिव्यक्तिचा प्रकार असो,किंवा कदाचीत तो उत्पतिचा आणि चैतन्याचा जो डबल चमत्कार आहे त्याच्या सन्मानाचा प्रकार असो.
वाचकाशी संपर्क ठेवण्याच्या ह्या खास प्रकारच्या मुल्याच्या विरोधात,जर तथ्यात्मक प्रतिवेदन आणि विश्लेषण करण्याचं लेखन केलं तर तो एक सुस्पष्टता करण्याचा प्रकार होईल.
या उलट कथानक किंवा काव्य ही अनुभवाची वास्तविक रचना किंवा गुढता असून ते लेखन वाचकाशी निकटता आणतं.”
मला हे त्यांच प्रकटन आवडलं.मी त्यांना म्हणालो,
“कल्पित कथानकात काल्पनिक व्यक्ति खर्‍या वाटतात.त्याउलट एखाद्या खर्‍या कथेत नावाजलेल्या प्रतिष्टित व्यक्तिंचा नुसता आभासही एखाद्या अफवेच्या घटनेत उल्लेखलेला असला तरी त्याचा खरा मामला आणि कपटी व्यवहार अंधरात ठेवावा लागतो.”
“अगदी बरोबर “
असं म्हणून मला त्यांनी छान उदाहरण दिलं.ज्याला मी ही परिचीत होतो.
ते म्हणाले,
“एखादी कल्पित रूपरेखा उदाहरणार्थ चि.वी.जोश्यांचा “चिमणराव” आणि “गुंड्याभाऊ” लक्षात ठेवण्या इतपत उजेडात राहतात.आणि त्यांच्या बरोबर त्यांच्याबद्दल वाटणारी सहानुभूति,करूणा आणि त्यांच अभिज्ञान चांगलच लक्षात राहतं.
माझ्या स्वतःच्या लेखनात फक्त कल्पित कथानक आणि क्वचित काव्य, पूर्णपणे मला काय वाटतं, आणि मला काय ज्ञात आहे हे समजण्यासाठी माझ्या मर्यादेची कसोटी पहात असतं.माझ्या एखाद्या लेखनातला साधा-स्पष्ट तपशिल ह्या लेखनाच्या पेशामधे वापरत असताना, मला सनसनाटीची आणि त्याच्या वापर करण्याच्या प्रवृत्तीला दोन हात दूर ठेवावं लागतं.”
हे ऐकून मला प्रो.देसाय़ांची आठवण आली.भाऊसाहेबांना हा आमचा संवाद आवडला असता. त्यांनीही ह्यात भाग घेतला असता.
माझा शास्त्रज्ञ जागृत झाला.मी डॉ.फडक्यांना म्हणालो,
“लौकिक दृष्ट्या पाहिलं तर माझं मन द्विधा होतं.आकाशगंगेचं अणू,परमाणू आणि त्यांच्याहून अतिसुक्ष्म कणांशी असलेल्या चालचलनाबद्दल भौतिक विज्ञानाची समजावून सांगण्याची क्षमता विवादित आहे हे मान्य करावं लागेल.आणि ही क्षमता आधुनिक बुद्धिची सर्वोपरि कीर्ति आहे हे तितकंच खरं आहे.”
“तुम्हाला काय वाटतं?”
असा प्रश्नही मी त्यांना केला.त्यांना तो प्रश्न आवडला.
हातातलं पुस्तक त्यांच्या पिशवीत टाकून,
“चला आपण निघूया.कोळोख होत आला आहे.आपण चालता चालता बोलूया मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो”असं म्हणून उठता उठता ते मला म्हणाले,
“उलटपक्षी मनातली हलचल,आकांक्षा आणि कदाचित भ्रमसुद्धा विचारात घेऊन केलेली रचना म्हणजे आपल्या अस्तित्वाचं मुळ आणि धर्मविचार ह्या गोष्टींचं निरनीराळ्या रूपातलं निवेदन आणि निर्मिती असून ते वाचकांच्या समाधानीला कारणीभूत होतं.
मला वाटतं,धर्मश्रद्धा ही मनुष्य जीवनाची एक आवश्यकता होऊन रहाणार आहे. जशी मलाही या वयात वाटते.”

“नंतर आपण कधी तरी बोलूं”
असं म्हणत आम्ही दोन दिशेला गेलो.
आज तळ्यावर भाऊसाहेबांची गैरहजेरी मला भासली नाही.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com