Monday, June 28, 2010

सतार वादक.

“ही सतार माझ्या खांद्यावर टेकवायला मिळते त्याबद्दल मी नशिबवान आहे असं मला मी समजतो.”

“अनेक तासांचा रियाज करून मी सतार-वादक झालो.त्याबरोबर ह्या प्रक्रियेत असताना,मानवीय परिसीमेची प्रशंसा करणं आणि स्वीकृति करणं ह्या गोष्टी मी माझ्यात विकसीत करू शकलो.पण ही वास्तविकता लहान वयात,मला आठवतं,मुळीच समजून घेता येत नसायची,आणि मग प्रौढ झाल्यावर जर समजून घेतली गेली तर आस्ते आस्ते माझ्याकडून त्याची स्वीकृति केली जायची.”
सुरेश मेहेंदळे मला सांगत होता.
तो चांगल्यापैकी सतार वादक होऊन आता त्याने सतार शिकवायचे क्लासीस काढले आहेत.

गेल्या आठवड्यात मी मेट्रो सिनेमाकडून क्राफर्ड मार्केटच्या दिशेने जात असताना वाटेत एका दुकानात डोकावून पाहिलं.ते संगीत वाद्यांचं दुकान होतं. बाहेरच्या शोकेसमधे निरनीराळी वाद्यं नीट रचून ठेवली होती.कुतूहल म्हणून एक एक वाद्य मी न्याहळून पहात होतो.मला बराच वेळ शोकेसजवळ न्याहळीत उभा राहिलेला पाहून आतून एक व्यक्ति बाहेर येऊन माझ्याकडे चौकशी करू लागली. त्यांची बोलण्याची ढब पाहून हा सुरेश मेहेंदळे असणार असं मला वाटलं.आणि ते खरं ठरलं.त्याने मला आत बोलावलं.

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी सुरेशला विचारलं,
“ह्या संगीताच्या जगात तू कसा काय शिरलास?”

मला सुरेश म्हणाला,
“माझ्या जीवनात परिपक्वतेची शंतिपूर्ण अवस्था यायला मला सतारीची मदत झाली.माझ्या गत आयुष्याकडे मी मागे वळून पाहिल्यावर,माझ्या लक्षात आल्याशिवाय राहिलं नाही की मी माझं अपमानीत जीवन टाळण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते.मूळपासून मला धंदा करण्यात स्वारस्य होतं.
व्यापार-धंद्यात माझं काही खरं नव्हतं.मी काही धिरूभाई अंबानी नव्हतो किंवा मित्तल नव्हतो. माझ्या मध्यम-जीवनातला संकट-काल आला हे जेव्हा उघड झालं तेव्हा रंगकला किंवा शिल्पकला शिकून त्यात व्यवसाय करायची वेळ कदाचीत आली असं मला वाटायला लागलं होतं.
पण हे ही खरं की, अनेक वेळा त्या महान लेखकाच्या-वि.स.खांडेकरांच्या-कांदब‍र्‍या वाचून वाचून त्यातली काही महान वाक्यें अनेकदा स्वतःलाच प्रकट करण्यासाठी रात्री-मध्यरात्री माझ्या मनात येऊन जायची,त्याचा आधार घेऊन काहीतरी लिहिण्याचा उद्योग अंगीकारण्याचंही मनात येऊ लागलं होतं.पण लेखन अगदी सुरवातीपासून सुरू करायची वाटत असलेली संभावना मला नाउमेद करणारी होती.”

मी म्हणालो,
“मला तू एक लेखक होशील असं पूर्वी पासून वाटायचं.कारण आपण शिक्षण घेत असताना मी पाहिलं होतं की, तुला वाचानाची खूप आवड असायची.तू लहान लहान गोष्टी लिहून मासिकात छापायला पाठवायचास हे मला माहित होतं. पण संगीताकडे वळशील हे माझ्या ध्यानात कधीच आलं नाही.”

“त्याचीच तर गंमत सांगतो.”
सूरेश खूशीत येऊन सांगू लागला,
“हे सर्व मनन करीत असताना मधेच मी माझ्याजवळ असलेल्या जुन्या सतारीच्या काही तारावर अकुशलतेने का होईना बोटं फिरवण्याचं ठरवलं.
आणि नंतर माझ्या लक्षात आलं की,अशा तंतू-वाद्यावर हात फिरवल्यावर ते वाद्य असे सूर निर्माण करतं आणि ते सूर असे निनादतात की त्यातून निघणारी ध्वनी आणि त्याची स्पष्टता केव्हडी तरी शुद्ध आणि सुंदर वाटत असल्याने माझं मन उल्हासित होत होतं. ते सूर ऐकून सर्व प्रकारचे जाणूनबजून होणारे उपक्रम स्तब्ध व्हायला कारणीभूत होत होते.हेही आश्चर्यकारक वाटायचं.
पण हे सर्व हवं तसंच होतं. तरीपण हे सूर क्षणभंगूर असतात. निर्माण होता होताच ते हवेत विरून जातात,आणि मागे त्यांचा मागमूस रहात नाही.
रंगार्‍याच्या कुंचल्याचे कॅनव्हासवर मारलेल्या फटकार्‍यासारखे,किंवा शिल्पकाराच्या चिकण-माती सारखे वाटतात. माझं आयुष्य कितीसं दैदीप्यमान होतं,माझ्या कलात्मक जीवनाचा विस्तार कितीसा महान होता, हे येणार्‍या पिढीला सांगायला ते सूर अस्तित्वातच नसणार हे ह्यावरून नक्कीच जाणवत असायचं.माझा अहंपणा संकटात आला होता असं मला वाटायचं आणि मला दूरवरून माझ्याच अंताची पावलं आवाज देत होती असं वाटत
होतं.तरीसुद्धा मी निश्चय केला होता की मी माझ्या सतारीशी काही काळ वचनबद्ध रहाणार आहे आणि मला पहायचं होतं की माझ्या मध्य-जीवनातले विषाद मी हुसकावून लाऊ शकतो का? किंवा कमीत कमी मी त्यांना निभावून नेऊ शकतो का?”

“पण मग तू सतार वाजवायला कुठे शिकलास?”
मी सुरेशला प्रश्न केला.

“माझा मुलगा शोभेल अशा एका सतार-वादकाकडून मी् सतार वाजवायचे धडे घेऊ लागलो.तशी माझी प्रगति चांगलीच होती.पण इतर हजारों लोक करतात तसं, मुलभूत शिकायच्या गोष्टी माझ्याकडून निसटून गेल्या होत्या. पण ही नवीन विद्या मी उत्साहाने हाताळली.”
सुरेश मला सांगू लागला.
अलीकडे तर मी ह्या संगीत शास्त्राची उंची आणि कला-विस्तार गाठत असताना आणि प्रत्येक क्षणी नवा उच्चांक गाठत असताना,
“का तुझा वेळ तू निष्फळ दवडतो आहेस? कदापी तू त्याच्या सारखं किंवा ह्याच्या सारखं वाजवूच शकणार नाहीस.तू घेतलेल्या मेहनतीची फळं कुठे आहेत? तुला मिळणारा समय तू आणखीन काही महत्वाच्या गोष्टी करायला वापरू शकतोसच ना?”
असे माझ्या मनातल्या एका कप्यातून येणारे दुष्ट विचार मी उधळून लावीत होतो.”

मला सुरेशची जीद्द पाहून नवल वाटलं.मी म्हणालो,
“मला माहित आहे त्याप्रमाणे ह्या संगीत शास्त्रात रियाज करण्याची खूपच जरूरी असते.त्यासाठी निग्रह आणि निश्चय असण्याची जरूरी असते.तू हे कसं काय साधलंस?”

सुरेश म्हणाला,
“सर्वच गोष्टी मी जीवंत असे पर्यंत मला शक्य होणार नाहीत.आणि सर्वच गोष्टी मला मिळणारही नाहीत अर्धमुर्ध आयुष्य उरलं असताना असल्या गोष्टीत तुमचं मन जास्त केंद्रीत होत असतं.
जाता जाता, प्रथम माझ्या उरलेल्या जीवनाचा अवधी लक्षात घेऊन आणि नंतर महान वाद्यवादकांची प्रतिभा लक्षात घेऊन,मी त्यांच्या सारखा सतार वाजवू लागल्यास मला किती वेळ लागेल याचा अंदाज, तर्क करून आणि ठाकठोळे पाहून, सतार-वादक म्हणून मी माझ्या प्रगतिचा आढावा घेण्याच्या प्रयत्नात राहिलो.माझ्या प्रयत्नाची बढत होत होती पण उच्चांक गाठायला बरचसं अंतर राहिलं होतं.जर का मला सर्वोत्तम होता येत नाही तर प्रयत्न तरी कशाला हवा?असंही मनात येऊ लागलं होतं.”

मला एका सतार-वादकाचं आत्मचरित्र वाचल्याचं आठवलं.मी सुरेशला म्हणालो,
“एका महान सतार-वादकाबद्दल मी वाचलं होतं की तो रोज नचुकता तीन तास रियाज करायचा.आणि असं हे त्याने मरे पर्यंत केलं होतं.मला वाटतं, की त्याने आपण आपल्या समयाचा कसा विनियोग करतो आहो याचा विचारही केला नसेल.पण त्याने पुढे लिहिल्याचं आठवतं की, कदाचीत कुठल्याही गोष्टीवर प्रभूत्व असणं ही एक मनातली भ्रांति असते.आणि ती भ्रांति म्हणजेच,
आपण जो शौक करतो त्यात निपूणता आणण्यासाठी अनेकप्रकारचे मार्ग पत्करणं,जीवनाच्या मार्गात एक पाऊल एका वेळी घेणं.
जागतीक कीर्ति आणि धन, तरूण वयात मिळवताना पहातो,ते सुद्धा उंचं उडी घेण्याच्या प्रयत्नात असताना,पायाची टांच आणि पुढची बोटं एकाच वेळी एकदा टेकवतात.
आणि जर का ते विचारशील,सावध आणि आपली प्रतिष्टा संभाळून असतील तर ठोकर खाणं आणि तोंडघशी पडणं ते होऊच देत नाहीत.”

सुरेश मेहेंदळेला एका महान सतार-वादकाचं मी सांगीतलेलं मत ऐकून जरा स्फुर्ती आली.मला म्हणाला,
“जरी मी महान वादक नसलो तरी,जसा मी विचार करतोय,तसंच त्या महान वादकाने असं ही लक्षात घेतलं असेल की काही गोष्टी केवळ क्षणिक फायद्यासाठी करायच्या असतात.जसं बागकाम करणं,काही समारंभाना हजर रहाणं,संवादात भाग घेणं,कुणी कधीही ऐकणार नसला तरी एखादी संगीत रचना करणं.
हे शहाणपण काहीनां तरूण वयात येतं,पण माझ्या सारख्या इतराना त्यातून मिळणारं प्रतिफळ केवळ त्याबद्दल चिंतन केल्यामुळे, मग ते कसल्याही प्रकारचं असेना का, आणि जीवन कसं समृद्ध होईल ह्याचाही विचार केल्यामुळे, हेच शहाणपण थोडं उशीरा येतं.”

मला सुरेशचे हे विचार ऐकून खूपच बरं वाटलं.मी लगेचच त्याला म्हणालो,
“तुझ्या चिंतनात,तुझ्या वादनात आणि जीवनात इतर कसलाही आनंद घेण्यात तू तुझ्यात सुधारणा करण्याच्या प्रयत्नात राहिलास हे मला स्पष्टच दिसतंय. ज्याचा लाभ व्हायचा असेल त्याबद्दल वास्तविकता बाळगून,स्पष्ट ध्येयं ठेऊन, जीवनाशी शांतपणे सामोरं जाणं तुला ह्यामुळे शक्य झालं असावं.तू संगीत शिकवायचे क्लासीस घेतोस,शिवाय हे दुकान चालवतोस हे काय कमी झालं काय?”

“ही सतार माझ्या खांद्यावर टेकवायला मिळते त्याबद्दल मी नशिबवान आहे असं मला मी समजतो.जेव्हा मला आराम करावासा वाटतो किंवा लक्ष केंद्रित करावं असं वाटतं,तेव्हा मी सतारीच्या जादू निर्माण करणार्‍या तारा छेडतो आणि त्याने बरेचदा माझ्या मनाचं संतुलन आणि विचाराच्या दिशा काही क्षणात संतुलित होतात.
मी माझ्या मला त्या उबदार बुडबूड्यात बुडवून घेतो म्हणजेच त्या मनोहर सूरात जो त्या लाकडी भोपळ्यातून निर्माण होतो,किंवा तारांच्या स्पंदनाने निनादतो त्यात माझं मन आणि शरीर एकजीव करून घेतो. उत्कंठा हीच माझ्या जीवनाची सामान्य स्थिती होण्यापूर्वी,बालपणात जसं माझं श्वसन, मंद,पूर्ण आणि शिथिल स्थितीत होतं तसंच हे सूर ऐकल्यावर होतं.बरेच वेळां ज्यावेळी मला झोप येत नाही असं होतं त्यावेळी मी ह्या सप्त सूरांचं चिंतन करतो.त्यामुळे माझं मन शांत होऊन मनावरचा ताण कमी करण्यात मदत होते.दुसर्‍या दिवसाची कामं सुलभ होतात.सहजा सहजी झोप येते.सतारीच्या संगीतातून आंतरीक शांती मिळते.”

सुरेशने आपल्या मनातलं सत्य माझ्याजवळ प्रकट केलं.शेवटी मी त्याला म्हणालो,
“योगायोगाने आपण इकडे भेटलो.मला तुझं सतार वादन ऐकाचं आहे.तू कुठे रहातोस त्याचा मला पत्ता दे.मला तुझ्याबरोबर थोडा वेळ घालवायला आवडेल.”
“अवश्य,अवश्य”
असं म्हणून सुरेशने त्याचं कार्ड मला दिलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, June 23, 2010

घरगुती जेवण.

“आज तरी मालवणी जेवणाची मजा लुटूया”

त्यादिवशी दादरला दुर्गाश्रमात जाऊन मालवणी जेवण जेवायची मला हुक्की आली होती.नंदाच्या-माझ्या भाचीच्या-घरी तिला आणि तिच्या नवर्‍याला, मला कंपनी द्या,म्हणून फोनवर कळवून त्यांना न्यायला घरी येतो म्हणून सांगीतलं.दादरला जाताना वाटेत, बाहेर जेवण्याच्या संवयीवर, विषय निघाला.

मला नंदा म्हणाली,
“अलीकडे आम्ही बाहेर जेवायचं टाळतो.आता तुम्ही आग्रह करून बोलावलंत म्हणून तुमचं मन मोडवेना.पण आम्ही दोघं ठरवून बाहेर जेवायला जायचा अलीकडे विषयच काढीत नाही.”

“का असं काय झालं? घरगुती जेवणाची सर बाहेरच्या जेवणात येत नाही हे मला मान्य आहे.पण कधीकधी बायकानाच घरचं जेवण करून करून कंटाळा येतो.”
मी नंदाला असं सांगून बाहेर जेवायला नजाण्याचा तिचा निर्धार कोणत्या कारणामुळे झाला हे काढून घेण्याच्या उद्देशाने बोललो.

“एक मी मान्य करते की कंटाळा आला म्हणून कधीतरी बाहेर खानावळीत जाऊन जेवण्याचं तुम्ही म्हणता तसं एक कारण आहे.तसंच बाहेरच्या जरा निराळ्या वातावरणात जेवायलाही एक मजा असते.”
असं म्हणून थोडा विचार करीत आणि आणखी सांगू की नको असा काहीसा चेहर्‍यावर अविर्भाव आणीत नंदा म्हणाली,
“का कुणास ठाऊक,उलट अलीकडे मला जेवण्यासाठी बाहेर जाण्याचाच कंटाळा यायला लागला आहे.माझी आजी आजारी झाल्यापासून तिची जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून मी बरेच दिवस घरीच जेवण करते.गेल्या महिन्यात जेव्हा आजी हॉस्पिटलात गेली होती, त्यावेळी हॉस्पिटलातलं जेवण असलं तरी आणि नर्सीस तिला भरवत असले तरी स्वतःच्या हाताने जेवणार्‍या माझ्या आजीला कुणा परक्याकडून भरवलेलं पाहून मला खूपच वाईट वाटलं.आणि आजीला ते जेवणही आवडत नसल्याचं मी पाहिलं.डॉक्टरांची परवानगी घेऊन त्यांच्या सुचनेप्रमाणे मी घरीच जेवण करून हॉस्पिटलात आणीत होते.
शरीराने क्षीण झाल्याने स्वतःचं जेवण जेवायला कष्ट होत असलेल्या आपल्या आजीला हॉस्पिटलात असताना चमचा,चमचा घरचंच जेवण भरवण्यासारखी दुसरी विनयशीलता नसावी.असं माझ्या मनात आलं.”

घरगुती जेवणाच्या महत्वाची नंदाकडून होणारी प्रशंसा ऐकून मला माझ्या लहानपणाची आठवण आली.मी नंदाला म्हणालो,
“लहानपणी मला घरी बनवलेल्या जेवणाबद्दल विशेष वाटायचं.प्रचंड उकाडा होत असताना बाहेरून घरात आल्या आल्या फ्रिझमधे आईने ठेवलेलं जेवण,काढण्यापूर्वी फ्रिझचं दार उघडून जेवण बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना फ्रिझमधून थंड गार हवेचा तेव्हड्या पुरता अंगावर येणार्‍या त्या भपकार्‍यामुळे मन प्रसन्न होत असता असता मागून माझ्या आजीने येऊन,
“जपून काढ रे!”
म्हणून ओरडून सांगीतल्यावर आपल्या मायेच्या माणसाचं छत्र डोक्यावर आहे हे समजल्यावर आणखी बरं वाटायचं.
मनात कसलाही संताप असताना जेव्हा तुम्ही थकून-भागून शेवटी घरी येता तेव्हा आदल्या दिवशी खाऊन उरलेलं झणझणीत मटन फ्रिझमधे तुमची वाट पहात आहे हे लक्षात आल्यावर वाटायचं,जणू माझ्याजवळ वाच्यता नकरता ते मटण मला म्हणतंय,
“मी वाटच पहात होते तुझी!”

नंदाच्या नवर्‍यालाही आपला अनुभव सांगावासं वाटलं असावं.तो म्हणाला,
“घरी बनवलेला एक एक कप गरम गरम चहा आणि डीश भरून गरम गरम चवदार तिखट भजी, बर्‍याच दिवसानी भेटलेल्या मित्र-मैत्रिणीबरोबर गप्पा करताना सप्पा करायला मिळणारं सुख आगळंच म्हटलं पाहिजे.
आईने केलेल्या चकल्या फस्त करून झाल्यावर डब्यात उरलेला चूरा सुद्धा कधी कधी कामाला येतो.तसंच,मामुली आजार आल्याने,घरी अंथरुणावर पडून रहायला जबरदस्ती झाल्याने दिवसातून तिनदा प्यावा लागणारा उकड्या तांदळाचा निवळ,किंवा पेज ढोसल्यावर आजार, **त शेपटी घालून पळून जातोच.”

नवर्‍याचा प्रतिसाद पाहून नंदा जरा खुलून आलेली दिसली.नवर्‍याचं बोलणं संपता संपता म्हणाली,
“आई आणि तिची मुलगी एकत्र येऊन, हंसून-खिदळून,गोपनीय बाबीत सहभागी राहून,वेळ पडल्यास डोळे ओले होऊ देऊन, जीवश्च-कंटश्च असलेल्यांसाठी जेवण करण्यात वेळ घालवण्यासारखं पवित्र कर्म नाही.
ते क्षण बहुमूल्य आणि क्षणिक असल्याने माझ्या अंतरात ते मी अनमोल रत्न समजून राखून ठेवते.मला वाटतं, प्रेमाला मूर्त स्वरूप त्यावेळी येतं ज्यावेळी आपले प्रियजन आपल्या घरी येण्याच्या अपेक्षेत असताना त्यांना आवडणारं जेवण करण्यात आपण मग्न होतो.अशावेळी थोडसं जास्त जेवण करून त्यातलं थोड शेजारच्या एकट्याच असलेल्या काकांना किंवा काकींना देण्यात माणसातलं दयाळूपण दाखवायला मला बरं वाटतं.”

“तुमच्याच जवळच्या कुणीतरी तुमच्या जेवणाची वारेमाप स्तुती केल्याने आणि पुन्हा पुन्हा खाण्याची मनिषा दाखवल्याने तुमच्या मनात वाटणार्‍या समाधानी सारखी दुसरी समाधानी नसावी.आपलं असलेलं विश्व थोडं सुलभ होण्यासाठी,थोडं कनवाळू होण्यासाठी,थोडं जास्त सौम्य होण्यासाठी घरगुती जेवणात निराळीच क्षमता असते.”
असा माझा मुद्दा सांगेपर्यंत दुर्गाश्रम जवळ आल्याचं पाहून मीच नंदाला म्हणालो,
“आज तरी मालवणी जेवणाची मजा लुटूया”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, June 21, 2010

शांततेबद्दल मला विशेष वाटतं.

“हल्लीच्या काळी जिथे शब्दच एव्हडे व्यक्तिनिष्ठ असतात,जिथे युक्तिवाद झाल्याने आवश्यक परिणाम म्हणून स्पष्टीकरण लगोलग झालंच पाहिजे असं नसतं, तिथे शांततेला खास अर्थ येतो.शांततेच्या पोकळीतच सत्य दडलेलं असतं.”

आज प्रो.देसायांना तळ्यावर भेटल्यावर मी म्हणालो,
“भाऊसाहेब,सध्या जगात गजबजाटच खूप होत आहे.विमानांच्या आवाजापासून,अतिरेक्यांच्या बॉम्ब फुटण्यापर्यंत कानठिळ्या बसेपर्यंतचे आवाज आहेतच त्याशिवाय रस्त्यावरचे मोर्चे,मिरवणूका,विसर्जनं,सणावारी किंवा आनंद किंवा विजय प्रदर्शित करण्यासाठी केलेली फटाक्यांची आतषबाजी आणि त्यातून निघणारे कर्कश आवाज ऐकून शांततेचं महत्व मला प्रकर्षाने जाणवतं.तुमचं काय म्हणणं आहे.?”

प्रो.देसाई चेहर्‍यावर हंसू आणून मला म्हणाले,
“शांततेची अनुभूति मला खूप आवडते.एखाद्या तळ्याच्या परिसरात कुंद आणि धूसर हवेचं वातावरण कसं असतं तसं वाटतं. मला वाटतं अगदी मुळ वास्तविकतेवर प्रचंड शांत वातवरण कुरघोडी करू शकते.समयाला क्षणभर रोखून ठेवण्यात, संवेदनेत बदलाव आणण्यात आणि वस्तुस्थितीत बळ आणण्यात किंवा तिचा नाश करण्यात शांततेच्या अंगी क्षमता असते.
शांततेचं पूर्णत्व बघून मला तिच्या विषयी खास वाटतं.जसा पांढरा प्रकाश हा सर्व रंगाच्या वर्णक्रमामुळे बनला आहे तशीच शांततासुद्धा व्यापक स्वरूपाची असते.तुम्ही म्हणता ती शातंता भंगाची उदाहरणं सोडाच,व्याख्यान किंवा संभाषणाच्यापलीकडे जाऊन भाषेच्या सीमेला शांतता डावलून टाकू शकते.”

मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“पण मला शांततेची दुसरी बाजू आठवते.आठवणीत ठेवण्यासारखी शांततेशी सामना करण्याची माझी पहिली वेळ मला शाळेत शिकताना आली.शाळेत न्यायिक पद्धतिचा भाग म्हणून शांततेची संस्थापना झालेली असते.वर्गातल्या एखाद्या मुला्च्या गैरवागणूकीला -वर्गाच्या शेवटच्या बाकावर दोन हाताची घडी घालून अर्धातास शांत बसवून ठेवण्यात- उत्तर दिलं जातं.मी माझ्या शाळेतल्या जीवनात ह्या मानहानीच्या तख्तावर बसण्यापासून टाळलं. पण ह्या तख्तावर स्थानापन्न होणार्‍या काही कमनशिबी मुलांबद्दल मी नेहमी ऐकत असायचो.मला वाटतं शांततेचा उपयोग त्यावेळी भयभीतिसाठी केला जायचा.”

माझं शांततेविषयीचं मत ऐकून भाऊसाहेबांना संगीतातली शांतता आठवली.प्रो.देसायानी त्यांच्या तरूणपणात संगीताचे धडे घेतले होते ते मला त्यांच्या या स्पष्टीकरणावरून आताच कळलं.
ते म्हणाले,
“शाळेतल्या ह्या शांततेच्या भयभीतिबद्दलच्या तुमच्या उदाहरणावरून मला ही मी तरूण वयात संगीत शिकतानाची आठवण आली. संगीताचे धडे घेताना माझ्या गुरूजींकडून शांततेविषयी बरीच माहिती मिळाली होती.पाव श्रूति,अर्धी श्रूति आणि पूर्ण श्रूतिची शांतता म्हणजे काय ते मी शिकलो होतो.मला शिकवलं गेलं की ह्या ठरवून वापरलेल्या शांततेच्या श्रूत्यांची संगीतात आवश्यक्यता असते.संगीताच्या संरचनेत पूर्वानुमान आणि अत्यावशकता यांची भर असणं जरूरीचं असतं.माझे संगीताचे गुरूजी सांगायचे की, संगीत रचना करणारे दर्दी संगीतकार आपल्या प्रसिद्ध रचनेत तीन लयी मधली शांतता संभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करायचे.खरं म्हणजे कुठचंही संगीत म्हणजेच शांततेत आलेली बाधा म्हणायला हवी. जिथे संगीत संपतं तिथे शांततेला सुरवात होते.परंतु,निसर्गाचे मुळ नियम स्पष्ट केल्याशिवाय संगीत आणि शांतता यामधलं विभाजन दाखवता येत नाही.”

“मी जरका शांततेविषयी तुमच्याशी बोललो नसतो तर दोन गोष्टीना मी मुकलो असतो.”
मी प्रो.देसायांचे आभार मानत म्हणालो.
आणि त्यांना सांगीतलं,
“पहिलं म्हणजे,तुम्ही तुमच्या तरूणपणी संगीत शिकत होता हे मला नव्यानेच कळलं.आणि दुसरं म्हणजे संगीतात पण शांतता असते हा विरोधाभास आजच तुमच्याकडून कळला.”

“असं असेल तर मग तुम्हाला मी माझ्या शाळेतल्या वरच्या वर्गातल्या अनुभवाची आणखी माहिती सांगतो”
असं सांगून प्रो.देसाई म्हणाले,
“मी शाळेच्या वरच्या वर्गात असताना माझी मतं आणि माझ्या धारणा यांचा इतरांशी सहभाग करताना माझ्याकडून व्यवहारिकतेसाठी शांततेची मनोहरता गमवली जायची.तुम्हाला सांगतो शांतता,वादविवादावर जय आणू शकत नाही.मला अजून एखादा भाषा शिकवणारा शिक्षक पहायचा आहे की जो कोरा कागद एक वैध निबंध म्हणून स्वीकार करील. काही बाबतीत शांतता ही त्रुटिशी संबधित असते असं समजलं जातं.कधी कधी शांतता
म्हणजेच आत्मविश्वासाचा किंवा ज्ञानाचा आभाव असणं असं समजलं जातं.अनेक आकर्षक बाबींसारखी शांततासुद्धा वास्तविकतेच्या आवश्यकतेची मागणी झाल्यास थोडी हतबल होते.”

“परंतु,शांततेतला हा विरोधाभास तिचं महत्व मुळीच कमी करीत नाही उलट वृद्धिंगत करतो.”
शांततेचं महत्व मला प्रकर्षाने जाणवतं हे म्हणणारा मी शांततेची बाजू न घेऊन गप्प कसा राहू? हे मनात आणून,मी भाऊसाहेबांना शेवटी म्हणालो,
“हल्लीच्या काळी जिथे शब्दच एव्हडे व्यक्तिनिष्ठ असतात,जिथे युक्तिवाद झाल्याने आवश्यक परिणाम म्हणून स्पष्टीकरण लगोलग झालंच पाहिजे असं नसतं तिथे शांततेला खास अर्थ येतो.शांततेच्या पोकळीतच सत्य दडलेलं असतं.”

आता तळ्यावर बराच काळोख झाला होता.पुढे कधीतरी ह्याच शांततेच्या विषयावर प्रो.देसायांकडून आणखी माहिती मिळवण्याच्या निर्धाराने मी विषय इथेच संपवता घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, June 18, 2010

पश्चाताप.

“सरतेशेवटी जे काही मागे वळून पहायचं असेल ते तुम्ही घेतलेल्या निर्णयांकडे आणि तुमच्या जीवनाकडे पहावं लागतं.”

माझ्या मित्राचे वडील वारल्याचा नोरोप घेऊन त्यांचा मुलगा, त्याचे आजोबा गेल्याचं, सांगायला माझ्याकडे आल्यावर मी होतो त्या कपड्यात त्याच्या बरोबर जायला निघालो.
कुणाच्याही अंतयात्रेला जाण्यात मला थोडं भीतिदायक किंवा थोडं गूढ वाटतं.गेलेल्या व्यक्तिबरोबर आपल्याला आलेले अनुभव पुन्हाः जागृत होतात.
आज ज्या गृहस्थांच्या अंतयात्रेला मी गेलो होतो तेही माझे स्नेही होते.किती लोकाना त्यानी भारावलं असेल बरं.ते नुसतेच कौटूंबीक गृहस्थ नव्हते तर एक विख्यात वकील होते,एक लोकोपकारी होते.

त्यानंतर बरेच दिवस निघून गेले.पुन्हा एकदा जेव्हा त्यांचा नातू मला भेटला तेव्हा त्यानेच माझ्याशी विषय काढला.
मला म्हणाला,
“त्या अंतयात्रेत अनेकांची भाषणं होत असताना मी तुमच्या चेहर्‍याकडे पहात होतो तुम्ही बरेच अस्वस्थ दिसत होता. कारण विचारण्याची ती वेळ नव्हती.पण कधी पुन्हा भेटाल त्यावेळी विचारीन म्हणून ठरवलं होतं.”

विचारतोय तर कारण सांगून टाकावं म्हणून मी त्याला म्हणालो,
“त्यावेळी माझ्या मनात असं आलं की,मी गेल्यावर मलाही ह्यांच्याचसारखं आठवणीत ठेवलं जावं.”
मी त्याला पूढे सांगीतलं,
“अशावेळी कदाचीत तुम्हाला रडू येण्याचाही संभव असतो.त्या व्यक्तिबरोबर तुमचा खास दुवा होता म्हणून नसेल किंवा तो तुमच्या खास मैत्रीतला होता म्हणून नसेल,तर तुम्ही पण जाल किंवा तुम्हाला अगदी प्रिय असलेलं कुणी जाईल म्हणून कदाचीत तुम्हाला भीति वाटत असेल.तुम्ही तुमचं जीवन प्रतिबिंबित करायला लागता.तुमच्याकडून झालेल्या चूकांचं तुम्ही समर्थन करायला लागता.कदाचीत स्वतःलाच विचारता-माझी अंतयात्ना कशी असेल?
त्यादिवशी मला त्यातल्या एका अनुभवाची जाणीव झाली.”

माझं हे सांगणं ऐकून त्यांचा नातू मला म्हणाला,
“मघा़शी म्हणाला तसं,तुम्हाला रडू येत होतं,ते माझ्या आजोबांच्या जाण्यानेच फक्त नव्हे, आणि जरी तुमच्या मित्रासाठी तुम्ही निराश झाला असला तरी तुम्हाला दुःख होत होतं ते तुमच्या भविष्याबद्दल.आज जर तुम्ही गेला तर अंतयात्रेत तुमच्या विषयी लोक शोक कसा करतील असा विचार तुमच्या मनात येत होता.असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना?”

मी त्याला म्हणालो,
“अगदी बरोबर.बचैन होऊन मी त्यावेळी विचार करीत होतो.मी काही तुझ्या आजोबा एव्हडा प्रसिद्ध नाही.
मी काही त्यांच्या एव्हडा परामर्शदाता नाही.पण कुणीही आपल्या जीवनात काही अपेक्षा करीत असतो.खरंतर माझ्या जीवनात मी काहीसा रीताच आहे.आणि मी काही साध्यही केलं नाही.मी अशा विचारात असताना एकाएकी तुझे वडील शोकसभेत बोलत असतानाचं ऐकून माझ्या डोळ्यावर आलेल्या ह्या विचार्‍याच्या धुक्याला बाजूला केलं गेलं.”

“हो मला आठवतं माझे बाबा काय म्हणाले ते.”
ते म्हणाले,
“माझ्या वडीलांच्या तोंडातून आलेले शेवटचे शब्द म्हणजे,
“मला कसलाही पश्चाताप नाही”
त्याचाच अर्थ काहीही गमवल्याचं किंवा अपराध घडल्याचं मला दुःख नाही.
पाऊणशे वर्षावर माझ्या आजोबांचे जाता जाता असे उद्गार यावेत हे माझ्या बाबांनी सांगीतलेले शब्द मी पण ऐकले.ते ऐकून मलाही जरा नवल वाटलं.”
त्यांचा नातू आपल्याला काय वाटलं आणि माझ्या सारखं त्यालाही वाटलं हे खास सांगत होता.

मी त्याला आणखी सांगण्याचा प्रयत्न केला.
म्हणालो,
“त्यानंतर माझ्या लक्षात आलं की खरोखरीच माझ्या बाबतीत ह्या गोष्टींसाठीच मला भीति वाटत होती आणि रडू येत होतं.माझ्या मानसिक उद्रेगाच्या असंतुलनातून मी मला बाहेर काढायचं ठरवलं. आणि या निर्णयाला आलो की कसल्याही खेदाशिवाय जीवन जगावं. खेद नसावा याचा अर्थ असं नाही की घरात बसून जगाची भीति करीत बसावी. उलट मी म्हणेन जीवनातला प्रत्येक क्षण पुरंपूरा जगावा.जरी ते अर्थहीन वचन वाटलं तरी चालेल. सरतेशेवटी जे काही मागे वळून पहायचं असेल ते तुम्ही घेतलेल्या निर्णयांकडे आणि तुमच्या जीवनाकडे पहावं लागतं.
अगदी मनापासून सांगतो, मला तुझ्या आजोबासारखं असावं असंच वाटतं.माझ्या कुटूंबातल्या मंडळीकडे पाहून मी म्हणावं,
” मला कसलाही पश्चाताप नाही.”

“माझे आजोबा खरंच ग्रेट होते.”
डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, June 14, 2010

वाचण्याची संवय.

“पु.लं. सांगतात की त्यांना वयाच्या नवव्या वयापासून पेटी वाजवण्याची संवय लागली होती.त्यांच्या वडीलानी त्यांना नवी पेटी आणून दिली होती. आणि शिकवण्यासाठी मास्तर ठेवले होते.”

आज बरेच दिवसानी माझी आणि डॉक्टर मुकूंद पारसनीसची भेट झाली.मी ज्या संशोधन संस्थेत कामाला होतो त्याच संस्थेत मुकूंदही होता. मुळपासून मुकूंद अभ्यासू स्वभावाचा होता.नेहमीच तो एखादं पुस्तक उघडून वाचत असलेला दिसायचा.मग तो बसच्या रांगेत उभा असलेला असो, गाडीची वाट बघत स्टेशनवर एखाद्या बाकावर बसलेला असो किंवा त्याच्या घरी जाऊन बेल वाजवल्यावर दरवाजा उघडताना मुकूंद आला तर कसलंतरी पुस्तक त्याच्या हातात दि़सायचं.

ह्यावेळी मी त्याला विचारायचं ठरवलं,
“तुला पुस्तकं वाचण्याची एव्हडी संवय कशी लागली?”

माझा प्रश्न ऐकून मुकूंद मला म्हणाला,
“ते ऐकण्यासाठी तुला माझ्या बालपणात मला घेऊन जावं लागेल.
मी सहावीत शिकत असण्यापासून माझे आईबाबा काम करायला जायचे.माझी शाळा गावातल्या वाचनालयाच्या अगदी जवळच होती.शाळा सुटल्यावर मी वाचनालयाच्या सुंदर दगडी इमारतीकडे चालत जायचो.माझं पुस्तकाचं दप्तर माझ्या पाठीवर मारलेलं असायचं.वाचनालयात जाण्याची एक कल्पना होती की माझा गृहपाठ पूरा करायला जाऊन माझ्या बाबांची वाट पहात बसण्याची.ते मला मग घरी घेऊन जायचे.खरंतर, मी गृहपाठ करायला मोठा तत्पर नसायचो.काही तरी करून ते करण्यापासून टाळण्याच्याच प्रयत्नात मी असायचो.त्यावेळी माझ्या लहानपणी आता सारखे लक्ष दुसरीकडे केंद्रीत करायला मोबाईल फोन,आयपॉड,लॅपटॉप नव्हते त्यामुळे लायब्ररीतल्या पुस्तकाच्या रॅकवरून निरनीराळी पुस्तकं चाळण्यापलीकडे दुसरं विरंगुळ्याचं साधन नव्हतं.”

“कामावर असतानासुद्धा मी तुला पाहिलंय की एक दोन पुस्तकं घरी जाताना नेहमीच तुझ्या हातात असायचीच.”
मी मुकूंदला म्हणालो.

“ही संवय मला लहानपणापासूनच लागली होती.”
मुकूंद सांगायला लागला.
“लहानपणी वाचनालयातून एक,दोन पुस्तकं वेचून काढून मी घरी वाचण्यासाठी न्यायचो.स्वैर कल्पना असलेली पुस्तकं,विज्ञानाच्या कल्पित कथा असलेली पुस्तकं मला आवडायची.अरामात बसून पुस्तक वाचणार्‍यापैकी मी नव्हतो. बिछान्यावर लेटून दिवा-स्वपनं पहाणार्‍यापैकी मी होतो. कोचावर लेटून किंवा बिछान्यात पडून वाचण्याचे माझे आवडते छंद असायचे.माझ्या त्या दिवसात आळशासारखं पायपसरून वाचायला वाचनालयात आरामखूर्चीच्या सोयी नव्हत्या.
विस्ताराने,राजे-महाराजे,देव-दैत्य,शूरवीर,गॅमारेझ,बाहेरच्या जगातली माणसं,स्पेस ट्रॅव्हल,ह्या विषयात मला स्वारस्य असल्याने संदर्भासाठी पुस्तकाच्या ढिगार्‍यातून भूतकाळातल्या खर्‍या कथा शोधण्यात आणि विज्ञानातलं भविष्य-कथन असलेला विषय शोधण्यात माझा वेळ जायचा. आणि ही पुस्तकं घरात व्यर्थ पडून रहाणार्‍यापैकी नव्हती.उलट ती टेबलावर पसरून ठेवून त्यातली चित्र, त्यावरची शीर्षकं,विस्तारित अनुच्छेद मला तासनतास
मंत्रमुग्ध करायची.
जोपर्यंत माझे गृहपाठ माझ्या दप्तरात एकाकी आणि अस्पृष्ट पडून असायचे तोपर्यंत,मी डार्विन, आईनस्टाईन, बाराव्या शतकातली वास्तुकला,ह्यावर माहितीच्या शोधात असायचो.पुस्तकाच्या नामसूचीमधून आणि संदर्भग्रंथसूचीमधून मार्गनिर्देशन कसं करायचं ते मी शिकल्यामुळे मला आवडत अ्सलेले विषय असलेल्या पुस्तकातून, नुकताच वाचत असलेला एखादा विषय की ज्याने माझी उत्सूकता जागृत केली जायची त्यातून नव्याने लक्षात आलेली काही निरक्षणं समजून घ्यायला मदत होण्यासाठीच्या मी प्रयत्नात असायचो.”

“तुझी ही बौद्धिक जिज्ञासा तुझ्या प्रौढ जीवनात तुझा पाठपूरावा करीत राहिली असणार.त्यामुळे कधीही नसंपणार्‍या ज्ञानभंडारातून माहितीचा शोध घेण्यात तू तत्पर राहिला असणार.पहिल्याच दृष्टिक्षेपात,ह्या पद्धतिचं अनुसरण काहीसं समाजाच्या नियमाला प्रतिकूल वाटेल,पण खरं तर ते अगदी उलटंच आहे.”
मी मुकूंदला म्हणालो.

“नवीन विषयाची चांचणी करण्यास तुम्ही वचनबद्ध असल्यास, विस्तीर्ण आणि जोशपूर्ण ढंगाने वाचन केल्यास तुमच्या लक्षात येईल की,त्या विषयाची अधीक माहिती असलेल्या इतरांशी दूवा सांधला जातो,तसंच त्यांच्याकडून आपल्या स्वारस्यात भर टाकली जात असताना त्यानी केलेल्या निरक्षणात,त्यांच्या प्रतिभेत आणि अवलोकनात सहभागी झाल्यासारखं होतं.”
हे मुकूंद सांगत असताना,मलाही एक उदाहरण द्यावंसं वाटलं.

मी म्हणालो,
“एखाद्या पार्टीत बातचीतीला सुरवात करायची झाल्यास कुठच्याही क्षुल्लक विषयाला हात घाला,आणि बघा नुसती बातचीतच होत नाही तर दुसर्‍याला एखाद्या विषयावर चावी कशी द्यावी हे ही शिकायला मिळतं.”

” अजूनही ह्या वयावर माझ्यावर एखाद्या वाचनालयात वेळ घालवायची पाळी आल्यास मी अजून उत्तेजीत होतो.ते भरपूर ज्ञानाने भरलेले मोठमोठे ग्रंथ पाहून, जरी त्यात असलेल्या ज्ञानाची मला माहिती नसली तरी मी उत्तेजीत होतो.आता इंटर्नेटमुळे ज्ञान चारीबाजूला उपलब्ध आहे.त्यात मोफत सहभागी होता येतं.नवीन मित्र,नवीन बातचीत करायला सुरवात करता येते.”
मुकूंद सांगायला लागला.

मी म्हणालो,
“मन म्हणजे आपल्याला मिळाली देणगी आहे.सहजपणे कुठल्याही विषयावर मग तो विषय संगीताचा असो,अन्न शिजवण्याचा असो किंवा आणखी कुठलाही असो त्या विषयाचं मोफत अन्वेषण करता येतं.”

माझं म्हणणं मुकूंदला एव्हडं पटलं की तो शेवटी म्हणाला,
“काहीतरी नवीन शिकण्यातली मजा अशी असते की बालपणातल्या जिज्ञासा आणि आश्चर्याचा बोध आपल्याला नवोदित ठेवतं.औदार्य आणि सहिष्णुता हे दोन शब्द समानार्थी असण्याचं कारण आहे. जेव्हा तुम्ही नव्या गोष्टी शिकण्याचं आणि समजून घेण्याचं ठरवता,त्यावेळी मुल्यांकन आणि अहंपणा तुम्ही दूर करून आपोआप चारही बाजूचा विचार करण्यास प्रवृत्त होता.तुम्ही सर्व दृष्टीकोन लक्षात घेता.तुम्ही विचार करायला खरोखरीने मुक्त असता.”

“तुझ्या पुस्तकं वाचण्याच्या वेडाची संवय तुला कशी लागली हे समजून घ्यायचं माझं बरेच दिवसाचं कुतूहल होतं. कुठचीही संवय अंगात भिनण्यासाठी बालपणापासूनचे संस्कार कारणीभूत होतात. पु.लं सांगतात की त्यांना वयाच्या नवव्या वयापासून पेटी वाजवण्याची संवय लागली होती.त्यांच्या वडीलानी त्यांना नवी पेटी आणून दिली होती.आणि शिकवण्यासाठी मास्तर ठेवले होते.”
मी पण उठता उठता मुकूंदला म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, June 12, 2010

माझा गाव,माझं घर.

“एकाएकी त्या क्षणाला ध्यानी मनी नसताना माझ्या लक्षात आलं की मी माझ्या घरी आहे.जन्मभर अशाच जागेचं अस्तित्व असावं ह्या शोधात मी होतो.”

गंगाधर शिर्के सैन्यात होते.माझी त्यांची जूनी ओळख होती.त्यांना दोन मुलं आहेत.मोठा मुलगा माझ्याकडे यायचाजायचा. वडील नेहमीच फिरतीवर असल्याने लहानपणापासून तो देशात निरनीराळ्या गावी राहून असायचा. नंतर मोठा झाल्यावर मुंबईत नोकरी करून रिटायर्ड झाल्यावर खेड्यात एक स्वतःचं घर असावं म्हणून एका गावात घर घेऊन राहायला लागला.

मला खूप आग्रह करून आपल्याच गाडीतून अलीकडे आपल्या घरी घेऊन गेला.
मला त्याचं घर खूप आवडलं.ऐसपैस किचन, बाहेर छोटीशी बाग आणि आजुबाजूला शांत वातावरण पाहून मलाही बरं वाटलं.
“ह्या गावात घर घेण्याचा तुझा विचार कसा ठरला?”
मी त्याला विचारलं.

मला म्हणाला,
“माझं गाव हेच माझं घर अशी कल्पना करण्यात मला विशेष वाटतं.
मी इथला नाहीच आहे.मला माझं असं गांव कधीच नव्हतं.मला लहानपणाचे संवगडी असे नाहीच.अगदी बालवाडी पासून माझा मित्र म्हणजे माझा भाऊ.माझं आयुष्य सैनिकी वातावरणात गेलं. माझ्या बाबांना ऑर्डर्स मिळाल्या की आम्ही निघालोच.माझी आई सर्व पॅकिंग करण्यात तत्पर असायची.आमचं विंचवाच्या पाठीवरचं जणू बिर्‍हाडच असायचं.

कुठच्याही गावाला आम्ही गेलो की आम्हाला माहीत असायचं की इथे काही आम्ही कायम नाही.परत ऑर्डर येईपर्यंत कायम असायचो.
त्यामुळे आम्ही सर्व प्रवास विनाभार करायला शिकलो.तयारी मनाची आणि तयारी जाण्याची.नव्या जागी नवे जॉब आणि अनोळखी परिसर.शिवाय पुढे कधीतरी “निघालो अमुच्या प्रवासा” हे भविष्यात लिहीलेलंच असायचंच. आतापर्यंत चार वर्षे एकेठिकाणी स्थीर राहिलो असं एकदाच घडलं.”

“मग हे घर तू केव्हा घेतलंस?”
मी विचारलं.

मला म्हणाला,
“सहा वर्षापूर्वी मी ह्या गावांत माझं असं हे घर घेतलं.गाव सुंदर आहे.अगदी शांत वातावरण आहे.गावाच्या बाहेर लोकांची शेतीची जागा आहे.दोन गावामधून एक संथ नदी वाहते.नदीवर सुंदर लोखंडी पूल आहे.हाच दोन गावातला दूवा आहे.मी रहातो त्या गावात एक बाजाराची जागा आहे.
आठवड्यातून एकदा बाजार भरतो.गावाचं नाव घेऊन लोकांची आडनावं झाली आहेत.त्यामुळे आडनावाने सगळेच गावकर आहेत.”

“हे गाव तुला कसं वाटलं?लोक कसे आहेत?”
असं मी विचारल्यावर मला म्हणाला,
“ह्या गावात घर घेऊन रहाण्यापूर्वी मी थोडा द्विधा मनस्थितित होतो.
गावातले लोक एकमेकाची दखल घेण्यात थोडे कंजूष आहेत असं मला कळलं होतं.पण मला त्याची संवय होती. बाबांबरोबर गावं फिरताना लोकांत मिसळण्याचा प्रसंग कमीच यायचा.प्रत्येक वेळी आम्ही काही इथे कायम रहाणारे नाही ही आमची वृत्ति झाली होती.त्याकारणामुळे आम्हाला कुणाचंही लक्ष न वेधण्याची संवय झाली होती.
पण ह्या गावात आल्यावर माझा बेत फसला.नव्या घरात सामानसुमानाची लावालाव करण्यापूर्वीच गावातले लोक, शेजारी-पाजारी स्वतःहून येऊन आपली ओळख करून मला देऊं लागले.काहीनी गावात तयार झालेली फळं आणि भाजी आणून मला दिली.रोज रविवारी संध्याकाळी गणपति मंदिरात काहीना काहीतरी कार्यक्रम असतात त्याचं काही आमंत्रण देऊन गेले.मला कसलीच जरूरी भासली तर अनमान करूं नका म्हणून काही सांगून गेले.ज्या साध्यासुध्या पद्धतिने माझा त्यांनी गावात स्विकार केला,माझं स्वागत केलं त्याचं मला खूपच आश्चर्य वाटलं.
माझ्या पूर्वकल्पित विचाराना मला बगल द्यावी लागली.

नंतर नंतर मला घरी चहापाण्यासाठी,जेवणासाठी आमंत्रण यायला लागली.कधीही आमच्या घरावरून गेला तर आमच्या घरी यायचं टाळू नका अशी सुचनापण मिळू लागली.गावातल्या पुस्तकवाचनालयाच्या मुख्याधापकानी माझी इतर सभासदांशी ओळख करून दिली.मी गावात नसताना माझ्या घरावर शेजारी लक्ष ठेऊन रहायचे.माझ्या बाबांचा निरोप आल्यावर गावातले पोलिस अधिकारी मला भेटून जायचे. मला सल्ला देऊन जायचे.”

मी म्हणालो,
“खरंच तू नशिबवान आहेस.गाव लहानसा असल्याने जवळीक रहात असावी.अर्थात लोकपण संस्कारीत असावे लागतात.तू केलेल्या वर्णावरून त्याचा पडताळा येतो.पण तुझ्यावरही नातं ठेवणं अवलंबून आहे.अर्थात तू तुझ्या बाबांबरोबर देशात इतकी गावं फिरला आहेस की त्यामुळे नकळत तुझ्यावरही चांगले संस्कार झाले आहेत.आपलं स्वतःचं एखादं घर असावं हे ही तुला अनुभवाने कळलं असावं.सैन्यात काम करणार्‍या बर्‍याच लोकाना कुठेतरी स्थाईक व्हावं असं वाटणं स्वाभाविक आहे.”

“चांगलं नातं ठेवणं हे एकमेकावर अवलंबून आहे हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.”
असं म्हणत मला म्हणाला,
“मी सकाळच्या प्रहरी व्यायामासाठी रस्त्यावरून धावत जात असताना लोक मला हात वर करून सलामी द्यायला लागले.मी पण काही प्रतिष्टाना घरी जेवायला बोलवू लागलो.जणू आपलंच घर आहे असं समजून गावातले ठेकेदार माझ्या घराची डागडूजी करू लागले.आता मी गावातल्या सभेत भाग घेऊन प्रश्नही विचारू लागलो.”
“मी तुम्हाला एक किस्सा सांगतो”
असं म्हणत पुढे सांगू लागला,
“एकदा, मी एका चहाच्या दुकानाच्या समोरून जात असताना एका गावकर्‍याने माझ्या नावानीशी हांक मारून मला सलाम दिला.मी त्याला ओळखतही नव्हतो.मीही हातवर करून त्याला साद देत त्याचं नाव काय असावं ह्याचा विचार करीत होतो.
एकाएकी त्या क्षणाला ध्यानी मनी नसताना माझ्या लक्षात आलं की मी माझ्या घरी आहे.जन्मभर अशाच जागेचं अस्तित्व असावं ह्या शोधात मी होतो..
ती व्यक्ति कोण होती ते अजून मला आठवत नाही. परंतु,पुढल्यावेळेस भेटल्यावर मी त्याचं नाव त्याला नक्कीच विचारीन.आपलं नाव सांगताना तो ते हंसत हंसत सांगण्याची संभावना जास्त आहे.
मला आता माहीत झालंय की मी इथल्या जागेच्या शेल्यात गुंतला गेलेलो आहे आणि मला इकडून जायचं झाल्यास तो शेला नक्कीच फाटून जाईल.मी इथला जरी नसलो तरी मी आता या गावाला माझं घर समजायला लागलो आहे.”

“तू योग्य तोच निर्णय घेतलास.मला तुझं घर आवडलं,गाव आवडला आणि गावातले लोकही आवडले.त्यांचे संस्कार आवडले.
तुझ्याकडे पुन्हा कधीतरी यावसं वाटतं.”
असं मी त्याला शेवटी म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, June 10, 2010

माझी आजी,माझी हिरो.

“माणूस आहे त्याची चूक ही होणारच.पण चूक लक्षात आणून त्याची कबूली देणं ह्यातच माणूसकी आहे.पण एक तितकंच खरं आहे,तिच चूक परत परत करणारा मात्र माणूस नसतो.”

ज्याज्यावेळी मी मेधाला भेटायचो त्यात्यावेळी मी तिच्या आजीची हटकून चौकशी करायचो.आणि मेधाचं उत्तर यायचं,
“आजी फारच किटकिट करते.”

एकदा मी मेधाला विचारलं,
“किटकिट म्हणजे तुझी आजी काय करते गं?”

मेधाने मला सांगायला सूरवात केली,
“माझी आजी जेव्हा तरूण होती तेव्हा अर्थातच ती सुधृडही होती.मी तिच्याच जवळ झोपायचे आम्ही दोघी मिळून एल्लापे, घावण,गवल्याच्या खिरी सारखे अनेक गोडधोड पदार्थ कयायचो.कसल्याना कसल्या विषयावर आम्ही बोलत बसायचो.अलीकडे आजीच्या वागण्यात फरक व्हायला लागला. आणि तो वाढतच गेला.तिला बोलायला जरा कठीण व्ह्यायला लागलं.वृत्तिनेपण थोडी कोती व्हायला लागली.मला वाटायला लागलं की आता ती माझ्यावर प्रेम करीत नाही. आणि त्याहून वाईट म्हणजे मला असंही वाटायला लागलं की मी ही तिच्यावर प्रेम करीत नाही. तिच्या खोलीत जायचं मी टाळायची.तिलाच टाळायची.”

“मला आठवतं तुच म्हणायचीस की,
“माझी आजी,माझी हिरो,माझी विश्वासपात्र जीवलग. मग हे केव्हा पासून झालं?”
अगदी सरळच प्रश्न मी मेधाला केला.

“हो मला नेहमीच असं आजीबद्दल वाटायचं.”
मेधा सांगू लागली,
“मी लहान असताना माझी आजी इतर आज्यांसारखी वागायची.
सकाळीच उठल्यावर मला नास्त्याला कांदे पोहे करून द्यायची,कधी गोडा शिरा करून द्यायची,रात्री झोपताना पुराणातल्या गोष्टी सांगून, मला थोपटून झोपवायची.”

“आणि आता ती तुझा मोठ्यातमोठा खेद-धारक केव्हा पासून झाली.?”
माझा मेधाला दुसरा प्रश्न.

“अलीकडे,माझी आजी तर स्वतःहून एक वाक्य नीट बोलून दाखवू शकत नाही.मग स्वतःची स्वतः आंघोळ करून घ्यायचं सोडूनच द्या.तिला आंघोळ घालायचं माझंच काम झालं.एव्हडंच नाही तर तिला पातळ नेसवायचं,तिला भरवायचं आणि तिची खोली नीट झाडून-पुसून नीटनेटकी ठेवायचं काम माझंच झालं.”

“जसजसं वय होत जातं तसतसं म्हातार्‍या मंडळीची कसली ना कसली कटकट चालूच असते.मग ती शरीराची असो वा वागणूकीबद्दल असो.इतरानी त्यांना समजून घेतलं पाहिजे.ही पाळी म्हातारवयात प्रत्येकाला येते.”
मी मेधाला सांगण्याचा प्रयत्न केला.

मेधाला माझं हे सांगणं जरा जीव्हारी लागलं.डोळ्यात पाणी आणून मला म्हणाली,
“पूर्वी,रात्री झोपताना मी माझ्या आजीसाठी बिछान्यात रडायची.माझी पूर्वीची आजी गेली असं मला वाटायचं.जी आहे ती काय माझी आजीच नाही असं वाटायचं.आणि आता मी जशी वयाने मोठी होत चालली आहे तसं मला तिचं जास्त काम करावं लागत आहे.मी त्याचा तिरस्कार करायला लागली आहे.कुठे तरी निघून जावं असं मला वाटायला लागलं आहे.
मी माझ्या आजीचा तिरस्कार करायला लागली आहे.तिची मला लाज वाटायला लागली आहे,तिची मला किटकिट वाटायला लागली आहे.”

मला मेधाचं हे म्हणणं ऐकून तिची तसंच तिच्या आजीची किंव आली.
मी मेधाला म्हणालो,
“पण तुझी आजी अलीकडे खूप आजारी होती असं तू मला म्हणाल्याचं आठवतं आता ती कशी आहे?”

“हो,आता ती बरी आहे.त्याला खूप दिवस होऊन गेले.त्याचं काय झालं,”
मेधा सांगू लागली,
“एक दिवशी ती घरातच पडली.तिला हॉस्पिटलात ठेवावं लागलं. ती अशी का वागते ह्याची आम्ही डॉक्टरकडे विचारणा केली. ते म्हणाले,
“वृद्धत्वामुळे तिला भ्रम व्ह्यायला लागलाय.आणि दिवस जातील तसं तो आणखीच वाढत जाणार आहे.ह्या व्याधीमुळे तिच्या मनातल्या भावना गोंधळतात.”
हे ऐकून माझे डोळे उघडले.काही गोष्टी कळण्यासाठी काही गोष्टी व्हाव्या लागतात.ती हॉस्पिटलात गेलीच नसती तर तिच्या वागण्याबाबत आम्हाला डॉक्टरना विचारायची बुद्धिच झाली नसती.”

मी मेधाला म्हणालो,
“पण गंमत म्हणजे जरका तुला एव्हडं जरी कळलं असतं की तुझी आजी इतकी तिरस्कार करण्यासारखी नव्हती तर मग तू तिच्यासाठी जे काही करीत होतीस ते काहीच नव्हतं असं तुला वाटायला लागलं असतं.जीवनात एक धडा शिकण्यासारखा आहे की कुणा व्यक्तिवर प्रेम करायचं झाल्यास ती व्यक्ति सर्व दृष्टीने निपुण असण्याची गरज नसते.”

“तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे.”
मेधा सांगू लागली,
“डॉक्टरांचं ऐकून मी मनात म्हणाले इतके दिवस माझी आजी जी माझ्याशी कोत्या वृत्तिने वागायची हे खरं असलं तरी ती आपलं प्रेम किती आहे हे दाखवायच्या प्रयत्नात असायची.पण तिच्या भावना गोंधळायच्या.पण मी मात्र केवळ माझ्यावर ती प्रेम करीत नव्हती म्हणूनच तिचा तिरस्कार करायची आणी हेच मला पटेना.
आता मी परत रात्री बिछान्यात रडायला लागते आणि त्याचं कारण दुसरं असतं.मी माझ्या आजीवर प्रेम करीत नव्हते म्हणून माझाच मी तिरस्कार करायला लागले होते.”

माझ्या मनातला विचार मेधाला स्पष्ट्पणे सांगायला मला धीर आला.
मी म्हणालो,
“हे जर का पूर्वीच तुझ्या लक्षात आलं असतं तर तू तुझाच तिरस्कार केला नसता्स,तू पश्चातापी झाली नसतीस.
तुझी आजी अगदी निपुण नसेना का? आणि तुझी आजी निपुण का नसावी?.तुझ्याच डोळ्यावर तू पूर्वी पट्टी बांधली होतीस.हे समजण्यासाठी तू खूपच आंधळी झाली होतीस.”

“तुम्हीच माझे डोळे उघडलेत.माझी डोळ्यावरची पट्टी काढलीत.”
मेधा थोडी भावूक होऊन मला सांगत होती.
“आता मला वाटायला लागलं की माझ्या आयुष्यात माझ्याकडून मोठी चूक झाली की कुणाही व्यक्तिवर प्रेम करायचं झाल्यास ती व्यक्ति अगदी निपुण असायला हवी अशी माझी विचारधारणा होती तेच चुकीचं होतं.एखाद्याच्या अंगात दोष किती आहेत हे पहाण्यापेक्षा, त्याच्या हृदयात प्रेम किती आहे हे पाहूनच प्रेम केलं पाहिजे.”

मेधाला शाबासकी देत मी म्हणालो,
“माणूस आहे त्याची चूक ही होणारच.पण चूक लक्षात आणून त्याची कबूली देणं ह्यातच माणूसकी आहे.पण एक तितकंच खरं आहे,तिच चूक परत परत करणारा मात्र माणूस नसतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, June 7, 2010

लोकरीची लडी.

"अतिश्रमाने मनावर येणारा ताण काहीतरी सुखदायी वस्तूत रुपांतरित व्हावा हा माझा उद्देश आहे.लोकरीचं सूत माझ्या जीवनात थोडी उब आणतं."



सुनंदा माझ्या घरी येऊन एक पुडकं देऊन गेली.मी घरी नव्हतो.
"वेळ काढून कधीतरी माझ्या घरी या"
असा निरोप ठेवून लगबगीने गेली.



पुडकं उघडल्यावर मला आतली वस्तू पाहून आश्चर्यच वाटलं.तो एक उबदार स्वेटर होता.सुनंदाने माझ्यासाठी विणला होता. सुनंदा माझ्या धाकट्या भावाची एकूलती एक मुलगी.मी वरचेवर फिरतीवर असतो म्हणू थंडीच्या दिवसात वापरायला आणि आठवण यायला उत्तम भेट म्हणून माझ्यासाठी तिने स्वेटर विणून आणला होता.
मी तिचे मनस्वी आभार मानायला तिच्या घरी गेलो होतो.



"तुला लहानपणापासून लोकर विणण्याचं वेड आहे हे मला माहित आहे.ह्याची कशी काय सुरवात झाली?"
मी तिला भेटल्यावर विचारलं.
मी असा काहीतरी प्रश्न विचारावा,असं तिच्या मनात आलेलं तिच्या चेहर्‍यावरून दिसलं.



"मला त्याचा इतिहास सांगायला आवडेल."
असं म्हणत सुंनदा म्हणाली,
"लोकर पाहिल्यावर माझ्या मनात विशेष येतं.अनेक गंमतीदार गोष्टी पहाताना भावनावश होणार्‍या मला,डाव्या हाताच्या आंगठ्या जवळच्या बोटावर एक फेर गुंडाळलेला लोकरीचा धागा,आणि उजव्या हातातली कोचणारी ती टोकदार प्लास्टिकची सळी परत परत त्या लोकरीच्या लपेटल्या जाण्यार्‍या फांस्यामधे मंत्रमुग्ध करणारी आत-बाहेर होणारी क्रिया,आणि त्यातून तयार होणारी वीण, पहायला खूप मजा यायची.
मला स्वतःला वाटायचं की माझ्या हातून,लोकरीच्या धाग्याने गुंडाळलेल्या लडीतून सुटून येणा्र्‍या एकाच धाग्यातून,तीन दिशांना विस्तारलेली एखादी पांघरण्याजोगी वस्तू तयार होणं अगदीच अशक्यप्राय होतं. तसंच मला ह्या विस्मयपूर्वक वाटणार्‍या विलंब लावणार्‍या अनुभवातून निर्माण होणारा भरवसा त्या वस्तूचा आत्मा होता असं वाटायचं."


"हो,पण तुला ह्याचं वेड कसं लागलं हे सांगीतलं नाहीस"
मी म्हणालो.

"मी दहाएक वर्षांची असेन.माझ्या आजीने मला लोकरीने विणायला शिकवलं.त्यानंतर इतकी वर्ष गेल्यावर, माझे हात,ती सळी,तो लोकरीचा लडी,आणि माझं हृदय यांच्या संयोगाने,बनवले गेलेले हातमोजे,पायमोजे,शाली,गळपट्टा आणि स्वेटर्स मला कमी का मंत्रमुग्ध करीत असावेत?.
जीवनातल्या असंख्य अर्थ हरवलेल्या,वापरून,वापरून गुळगुळीत झालेल्या आणि एकमेकात गुंतलेल्या आठवणीना लक्षात आणून त्यातून निभावून जाणं मला शक्य झालं,पण ह्या लोकरीच्या धाग्याला,तसं विसरता येत नव्हतं."


सुनंदा हळू हळू सांगू लागली.
"एकदा मी शहरातून एका खेड्यात माझ्या आजी आणि आईबरोबर बसने जात होते.आमच्या कॉलनीतल्या बर्‍याच मंडळीने गणेशपूरीतल्या त्या भक्तिधामाला भेट द्यायचं ठरवलं होतं.मला माझ्या आईकडून जेव्हा कळलं की हा बसप्रवास बराच लांबचा आणि कंटळावाणी असतो तेव्हाच मी पिशवीत लोकरीच्या लड्यांचा साठा घेऊन ठेवला होता.काहीतरी विणायचा माझा विचार होता.आता मी ते काय विणलं ते विसरले पण तो कंटाळवाणी प्रवास विणण्यात वेळ घालवल्यामुळे सुखकर झाला ते माझ्या नक्की आठवणीत आहे.
त्या प्रवासात माझ्या लक्षात आलं नाही,पण माझ्या आईने आणि आजीने बर्‍याच वर्षांनी त्या ट्रिपचा विषय निघाल्यावर मला सांगीतल्याचं आठवतं की,मी बसमधे लोकर विणत असताना बसमधल्या बर्‍याच बायका माझ्याकडे कुतूहल म्हणून पाहून एकमेकात कुजबूजत होत्या.एव्हड्या लहान वयात माझं विणण्यातलं प्रेम बघून त्या कौतूक करीत होत्या."


मला सुनंदाचं कौतूक करावंस वाटलं.
मी म्हणालो,
लोकरीच्या शालीत गुरफटून घेण्यात,गळ्याला लोकरीचा गळपट्टा गुंडाळून घेण्यात,गुलाबी थंडी पडल्यावर पहाटे,पहाटे स्वेटर चढवून उब घेण्यात,एकप्रकारे अत्यंत सुखदायी वाटतं.आणि असं वाटत असताना कुण्याच्यातरी प्रेमळ बोटांनी ते विणलं गेलंय हे लक्षात आल्यावर आणखी विशेष वाटतं.
तुझ्या घरात अशी ही सुखदायी आवरणं,भरपूर् आहेत.तुझे,तुझ्या आईचे आणि आजीचे ते उपक्रम असावेत."


"अगदी बरोबर"
असं म्हणत सुनंदा सांगू लागली,
"आता माझ्या पलंगाच्या खाली पाहिलंत तर निरनीराळ्या रंगाच्या लोकरीच्या लड्या असलेल्या पिशव्या सापडतील.अंगावर पांघरण्यासाठी रंगी-बेरंगी,लांब रूंद शाल तयार करण्याचा सध्या माझा उपक्रम चालू आहे.व्यस्त कामामधे मधून मधून विरंगूळा मिळाल्यावर त्याचा ही शाल विणण्यात विनीयोग करण्याचा हा प्रयत्न आहे.अतिश्रमाने मनावर येणारा ताण काहीतरी सुखदायी वस्तूत रुपांतरित व्हावा हा माझा उद्देश आहे.
लोकरीचं सूत माझ्या जीवनात थोडी उब आणतं.माझ्या रोजच्या कटकटीना मी विण देण्यात,किंवा दुसर्‍यांच्या कटकटी माझ्यावर लपेटून घेण्यात हा माझा उपक्रम साधला तर काही फरक पडत नाही. मी माझ्या घरात माझ्या लोकरीत जेव्हडी संतुष्ट असते,खूश असते तेव्हडी कुठेच नसते.एक लांबच लांब लोकरीचा धागा स्वतःशीच गुंडाळत असताना निर्माण झालेला प्रकार कुणालाही त्यात लपटण्यात उपयोगी होतो.म्हणूनच मला लोकरीच्या धाग्याबद्दल विशेष वाटतं."


"तू दिलेला स्वेटर वापरताना आणि लोकरीची उब घेत असताना, मला त्या मागच्या तू घेतलेल्या मेहनतीपेक्षा तुझं प्रेम,तुझ्या भावना जास्त उब देतील यात शंका नाही.खूप खूप आभार."
असं मी सांगीतल्यावर सुनंदा सद्गदीत झाली.





श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, June 4, 2010

आगावू केलेली परतफेड.

“जेव्हडं म्हणून खोलवर जाऊन दुःख तुमच्या मनात कोरलं जातं, त्यापेक्षा जास्त आनंद तुम्ही तुमच्यात सामावून घेऊ शकता.”
असं कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं.हे म्हणणं तुझ्या बाबतीत जास्त लागू पडतं असं मला वाटतं.”
मी मेघनाला सांगत होतो.

“माणासा-माणसातली नाती, सभोवतालचं सौंदर्य,उत्कृष्ट मैत्रीतली मुल्यं,दुनियाने प्रदान केलेला बहुमूल्य ठेवा या सर्वांकडे डोळे,कान आणि मन उघडं ठेवून पहाण्यात मी विश्वास ठेवते.”
असं ज्यावेळी मेघना मला म्हणाली त्यावेळी मला सांगावं लागलं.

मेघना मला पुढे म्हणाली,
“अगदी स्वतःपूरतंच पाहिलं तर मला असं वाटतं की जीवनाकडून मिळणार्‍या समाधानासाठी जीवनच मला आगाऊ फेड करण्याची संधी देतं.परिश्रम जेव्हडे कठीण असतील,भार जेव्हडा वजनदार असेल,दुःख जेव्हडं तीव्र असेल किंवा परिक्षा जेव्हडी कठीण असेल, तेव्हडं हे इनाम उत्कृष्ट असतं.
निष्पत्ती म्हणून,जेव्हा काही अघडीत घडतं,जेव्हा काही अनपेक्षीत असताना वाईट होतं,अशावेळेला मला जाणवतं की काहीतरी चांगलंच होण्याच्या मार्गावर आहे.माझं मन कधीच विचलीत झालेलं नसतं.कारण मला माहित असतं की काहीतरी चांगलं होणार आहे.लहानपणी मला पडणारी स्वपनं आता सत्यात उतरत आहेत.
सुखी संसार,हंसती-खेळती मुलं,मित्रमंडळीना यावसं वाटणारं,त्यांना आमंत्रीत करणारं घर ही कुठच्याही गृहिणी्ची मोठ्यात मोठी पूर्ती असते.”

मेघनाचा नवरा गेली दोन वर्ष अमेरिकेत अधीक शिक्षणासाठी गेला आहे.आता सहा महिन्यात तो परत येणार आहे. तेव्हा हे सहा महिने अमेरिकेत आपल्याबरोबर रहाण्यासाठी त्याने मेघनाला बोलावलं आहे.आणि तिचं तिकीट पण पाठवलं आहे. मला जेव्हा हे कळलं तेव्हा ती अमेरिकेत जाण्यापूर्वी माझ्याकडे चहापाण्याला म्हणून मी तिला बोलावलं होतं.त्यावेळी आमचा हा संवाद चालला होता.

मेघना सांगू लागली,
“फार पूर्वी पासूनची माझ्या मनातली प्रार्थना मला कोड्यात टाकण्यासारख्या निर्णायक क्षणाला आणून सोडीत आहे. त्याच प्रार्थनेने मला सुखी संसाराचा,मातृत्वाचा,आणि मला वाटतो तसा विवेकपूर्ण समतोल ठेवून घरात आणि बाहेर वावरण्याचा मार्ग दाखवला आहे.ही अंधश्रद्धा नव्हे तर माझ्या मनातला अटल दृढविश्वास असल्याने,मी अत्युत्तम भविष्याची अपेक्षा सतत करावी असं मझ्या मनात येत असतं.”

मला जे काही श्रद्धेबद्दल वाटतं ते मेघनाला सांगावं म्हणून मी म्हणालो,
“इतर कुठल्याही स्वाभाविक शक्ती प्रमाणे श्रद्धेवर जास्त भर देत गेलं की श्रद्धा जास्त मजबूत होते.प्रत्येकाने नेहमीच आपली श्रद्धा कार्यान्वित करीत रहावं.जसं कार्य सिद्धीला जातं तशी श्रद्धा गूढ होत जाते.”

माझा विचार मेघनाला पटलेला दिसला.आपल्याला काय वाटतं ते सांगण्यासाठी,थोडा विचार करून मेघना मला म्हणाली,
“मला वाटत असतं की,आपल्या परिस्थितिकडे, आपल्याला येत असलेल्या विचारातून होणार्‍या स्पष्टीकरणाने,आपण पहात असल्याने, मी असकारात्मक वृत्तिपासून दूर रहाण्याच्या प्रयत्नात असते. काही तरी चांगलं होणार हे मनात असल्याने आशापूर्ण दृष्टी मी ठेवीत असते. अशी वृत्ति हा श्रद्धेचा दुवाच असून मी अतिशय कठीण परिस्थितितून जात असताना,वेळोवळी ह्या गोष्टीचा विचार करीत असते.
मी कठीण प्रसंगात असताना,आणि कोणत्याही तणावाखाली असताना,माझी श्रद्धा सतर्क ठेवल्याने ती आपोआप माझ्या कामाला येते.जसं धुक्याने भरून गेलेल्या समुद्रावरच्या वातावरणात समुद्राची भरती दिसल्याशिवाय रहात नाही तसंच काहीसं होतं. भरती दिसली नाही तरी ती येणार आहे हे माहित असतं.हे सर्व “आगाऊ फेडण्याच्या” माझ्या कल्पनेशी सुसंगत आहे.संतुष्टी नक्कीच येणार कारण अगोदरच परिश्रम उपभोगलेले असतात.

मला मेघनाचे विचार आणि तिने दिलेलं उदाहरण फारच आवडलं. मी तिला म्हणालो,
“हे तुझे तत्वविचार तुझ्यासाठी यशस्वी झाले आहेत असं मला दिसतं.तू जे काही करतेस त्यावर होणार्‍या प्रभावाशी तू परिचित झालेली असतेस हे उघडच आहे.”

“एक गोष्ट गंमतीने सांगते.”
मेघना म्हणाली,
“जेव्हा कुठचीही गोष्ट सुलभतेने पार पडते तेव्हा मी मुळीच न-धास्तावता उत्सुकतापूर्वक तिचा स्वीकार करते. अशावेळी, हे अशक्यातलं शक्य झालं, किंवा मला ह्याची भविष्यात केव्हातरी फेड करावी लागेल असं माझ्या मनात येत नाही.मी जर का भूतकाळात वळून पाहिलं तर मला दिसून येतं की ह्याची परतफेड अगोदरच झालेली असते.”

“तुला अमेरिकेत जाण्याचा योग आला हा सुद्धा तुझ्याकडून झालेल्या कसल्यातरी परतफेडीचा परिणाम असावा. दुसर्‍यांदा हनिमून आणि तो सुद्धा अमेरिकेत करायला मिळणार आहे हे काही कमी नाही.हे भविष्य “आगाऊ फेडण्याच्या” तुझ्या कल्पनेशी नक्कीच सुसंगत आहे ह्याबद्दल वाद नाही.”
असं मी मेघनाला गंमतीने म्हणाल्यावर मला लाजून म्हणाली,

“चहा थंड होतोय नाही काय?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 1, 2010

गोल-गोल सोनेरी रंगाचे अनारसे.

“माझी आजी किचनमधे माझ्या जवळ बसल्याचा मला भास होणार.आणि डायनींग-टेबलाच्या पलिकडे माझ्या दोन्ही मुली एकाग्र होऊन मला पहात असणार”

सुलभाकडे मला दरदिवाळीला फराळासाठी बोलावलं जातं.मला अनारसे आवडतात हे सुलभालाही माहित आहे.त्यांच्या फराळात अनारसे निक्षून असायचे.मी ते आवडीने खाताना सुलभाची आजी मला टक लावून पहायची.आणि माझ्या चेहर्‍यावरचं समाधान पाहून तिही खूश व्हायची.
“वाः! काय सुंदर झालेत अनारसे”
असं मी म्हटल्यावर,
“मोठे कष्ट पडतात बाबा! पण खाणार्‍याचा चेहरा पाहून सर्व कष्ट पार विरून जातात.आणखी हवे तेव्हडे मागून खा”
असा नेहमीचा आमचा दिवाळीचा संवाद व्ह्यायचा.
ह्यावेळी दिवाळी पूर्वीच आजी गेल्याने ह्या वर्षाची दिवाळी सहाजीकच सुलभाच्या घरी साजरी झाली नाही.
पण नंतर एक दिवस सुलभा मला आपल्या घरी येण्यासाठी निरोप घेऊन आली.
“काय विशेष काय?”
मी सुलभाला विचारलं.
“ते तुम्हाला आमच्या घरी आल्यावर कळेल.पण नक्की न-विसरता या मात्र.”
असं म्हणून मिष्कील हंसली.

त्या दिवशी मी सुलभाच्या घरी गेलो.गप्पा मारीत असताना सणावाराच्या रीति-रिवाजाबद्दल विषय निघाला.
मी सुलभाला म्हणालो,
“रीति-रिवाजाबद्दल मला विशेष वाटतं.ती एक जबरदस्त प्रकिया आहे.रोजच्या जीवनात हे रीति-रिवाज निरनीराळ्या दृष्टीकोनाना खास अर्थ देतात.मला नेहमीच वाटतं की हे सणावाराचे रीति-रिवाज, कुटूंबातल्या मंडळीना अगोदरच्या पिढीबरोबर दुवा साधायचं काम करतात.”

“मी लहान असताना दिवाळी हा असाच रीति-रिवाजाचा सण वाटायचा.पण दिवाळ-सण आल्याचं तोपर्यंत भासत नसायचं, जोपर्यंत घरात माझी आजी आणि आई फराळाची तयारी करीत नसत.त्या अनेक पदार्थात मला अनारस्याचं विशेष वाटायचं.
हे गोल-गोल सोनेरी रंगाचे अनारसे खायाला कुरकुरीत,चवीला अंमळ गोड-गोड आणि त्याच्यावर पेरलेली खसखस जेव्हा दातात अडकायची-विशेष करून दाढेत-अडकायची तिला जीभेने हलकेच बाजूला करून पुन्हा दाताखाली चिरडून खायला मजा यायची.”
सुलभाने आपलं मत देताना तिच्या आजीची आठवण काढून सांगीतलं.

मी सुलभाला म्हणालो,
मला पण अनारसे खूप आवडतात.विशेषतः तुझ्या आजीने केलेले. ह्या दिवाळीत तिची खूप आठवण आली.
एकावेळाला भराभर हे दोन-तिन अनारसे पटकन खाऊन फस्त व्हायचे पण ते तयार करायला लागणारे श्रम आणि कष्ट, त्याची तयारी करण्यापासून ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळाच्या ताटात येईपर्यंत,आई आणि आजीच्या चेहर्‍यावर उमटून दिसायचे.
जास्त करून तुझ्या आजीच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर.”

“आता तुम्ही अनारस्याचा आणि माझ्या आजीचा विषय काढल्यावर आणखी सांगते”
असं म्हणून सुलभा म्हणाली,
“अनारसे तळून काढण्याचा झारा आणि चमचा खास असायचा आणि तो माझ्या आजीकडून आईकडे परंपरेने आलेला होता. ती आईला आजीची गिफ्ट होती.माझी खात्री आहे की ती गिफ्ट आईकडून माझ्याकडे येऊन मग ती मी माझ्या मुलींकडे पोहोचवणार आहे.”

“कष्ट म्हणजे असं काय काय करावं लागतं? मला तुझ्याकडून ऐकायचं आहे.”
मी सुलभाला म्हणालो.

“दिवाळी येण्यापूर्वी फार अगोदर पासून अनारस्याची तयारी करावी लागते. तीन दिवस माझी आजी अनारस्यासाठी तांदूळ भिजवून ठेवायची.रोज ते पाणी बदलायची.चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवून मग पंच्यावर घालून कोरडं करून घ्यायची. नंतर एकदम बारीक करून चाळणी मधून चाळून घ्यायची.किसलेला गूळ आणि चमचाभर तूप ह्या पीठात घालून ते पीठ घट्ट मळून पाच-सहा दिवस एका डब्यात घालून ठेवायची.

माझी आई माझ्या आजीकडून हे शिकून घेण्यासाठी एकही क्षण वाया जावू द्यायची नाही.बर्‍याच वर्षाच्या माझ्या पहाणीनुसार अनारसे बनवण्याची ही प्रक्रिया जरा शांती-समाधानीने घ्यायची ही प्रथा असावी.मी त्यावेळी जरी लहान असले तरी,माझ्या लक्षात यायचं की पाच-सहा दिवसानी ते पीठ बाहेर काढणं,मध्यम आचेवर तेल गरम करणं,सुपारी एव्हडे गोळे करून पुरी सारखं खसखशीवर लाटणं, तळताना खसखसीचा भाग वर ठेवणं,चुकून पुरी पलटल्यास खसखस जळून जाऊ शकते याची काळजी घेणं,तेलात पूरी पसरते तेव्हा त्या खास झार्‍याने आणि चमच्याने ती पसरलेली पूरी हलकेच धरून फुटूं न देणं, तळून आलेले अनारसे तेल नितळून जाण्यासाठी चाळणीत उभे करून ठेवणं,हे सर्व सोपस्कार माझ्या आईला खास रीति-रिवाजच वाटायचे.”
हे सगळं सुलभाकडून ऐकून ती सुद्धा अनारसे करण्यात नक्कीच प्रविण झाली आहे हे कळायला मला वेळ लागला नाही.

मी तिला म्हणालो,
“तुझ्या आजीने तुझ्या आईला शिकवलं आणि आता तू पण तुझ्या आईकडून शिकून वारसा पुढे चालवणार आहेस हे निश्चीत आहे.”

“आजी आणि आई अनारसे करीत असताना मी त्यात मग्न होऊन, आईची एकाग्रता,तिचा सोशिकपणा,आणि प्रत्येक अनारसा नीट तळून आणाण्यासाठी ती घेत असलेली आस्था पहाण्यात विशेष रस घ्यायची.मला आठवतं अनारसे तळले जात असताना घरभर पसरलेला तो तेला/तूपाचा सुवास कमी कमी होत गेल्यानंतर,तो प्रत्येक अनारसा हलकेच उचलून पसरट डब्यात नीट रचून ठेवताना एकूण किती अनारसे झाले त्याची गणती ती न चूकता घ्यायची.आणि येणार्‍या पाहूण्यांना आवडीने खायायला द्यायची.”
सुलभाने असं सांगून माझ्या विचाराला बळकटीच आणली.

“आज माझी आजी नाही. त्यानंतरची आमची पहिली दिवाळी ती नसल्याने तिची आठवण काढण्यात गेली.आज माझ्या आजीचा जन्मदिवस आहे.
आठ दिवसापूर्वी माझ्या बाबांनी मला सुचित केलं की आजीच्या वाढदिवसाला अनारसे करावेत.मी आणि माझ्या आईने, आजीने दिलेला झारा,चमचा आणि बाकी सामुग्री जमा केली.त्या सामुग्रीसोबत आजीने आपल्या हाताने लिहिलेली अनारस्याची रेसिपी मला मिळाली.

जसं लिहलं होतं तसंच मी ते वाचून आम्ही दोघीने अनारसे केले.
तिच्या जन्मदिवशी ते आम्ही तिची आठवण काढून खावेत असं ठरलं.नंतर माझ्या लक्षात आलं की दरदिवाळीला तुम्ही येता आणि ह्यावेळी अनारसे खायचं तुम्हाला चुकूं नयेत म्हणून त्यादिवशी मी तुम्हाला बोलवायला आले होते.आजीचा जन्मदिवस आणि अनारसे करण्याचा बेत तुमच्यासाठी सरप्राईझ होतं.
आता प्रत्येक दिवाळी-साणाच्या दिवशी इतर फराळात अनारस्याची तयारी केली जाणार.”

हे सगळं सांगून मला सुलभाने खरोखरंच सरप्राईझ दिलं.
मी सुलभाला म्हणालो,
मला वाटतं हे सणावारी केलेले रीति-रिवाज म्हणजेच मागल्या पीढीच्या सन्मासाठी आणि त्यांच्याबद्दल आदर बाळगण्यासाठी केलेले प्रयत्न असतात.
आणि हीच संधी घेऊन आपल्या पुढच्या पीढीला देऊ केलेली रीति-रिवाजाची प्रथा असावी.मला वाटतं,सणांचे रीति-रिवाज कुटूंबाला एकमेकात गुंफून ठेवतात,आणि आपणां सर्वांना काही क्षणासाठी शाश्वत करून ठेवतात.”

“आता मी पण दरदिवाळीला न-विसरता अनारसे करणार.आजीची रेसिपी वाचून मी अनारसे करीत असताना माझी आजी किचनमधे माझ्या जवळ बसल्याचा मला भास होणार.आणि डायनींगटेबलाच्या पलिकडे माझ्या दोन्ही मुली एकाग्र होऊन मला पहात असणार.”
सुलभाचा ठराव पाहून मला आनंद झाला.

“मी पण दरदिवाळीला तू न-बोलवता तू केलेले अनारसे खायला हटकून येणार.आणि आज तू आणि तुझ्या आईने केलेले अनारसे तुझ्या आजीच्या जन्मदिवशी तिची आठवण काढून काढून अवश्य खाणार.”
माझं हे ऐकून सुलभा आत गेली आणि थाळी भरून अनारसे आणून माझ्या जवळ ठेवून डोळे ओले करीत म्हणाली,
“अलबत”

सुलभाच्या चेहर्‍यावर तिच्या आजीच्या चेहर्‍याची छटा पाहून मला राहवलं नाही.पहिलाच अनारसा खाताना मी ओघानेच म्हणालो,
“वाः! काय सुंदर झालेत अनारसे”
हे ऐकून,
“आणखी हवे तेव्हडे मागून खा”
असं म्हणायला सुलभाची आजी मात्र नव्हती.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com