Sunday, May 30, 2010

अभिवचन.

“हल्ली माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलांना मी नवीन वचनं देत असतो.विपत्तिशी परिचित असल्याने पुन्हा एकदा, ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच कवटाळून असतो.”

त्यादिवशी मी लालबागचा गणपति बघायला म्हणून गेलो होतो.मंडपात मला रघू घुर्ये,त्याची पत्नी सुलभा आणि त्यांची दोन गोंडस मुलं भेटली. कित्येक वर्षानी मला रघू भेटला.मला पाहून तोही खूप आनंदी दिसला.

“तुमच्याशी मला खूप खूप काही बोलायचं आहे.या नां माझ्या घरी येत्या रविवारी.मी तुम्हाला पत्ता देतो.”
असं म्हणून आपलं व्हिझीटींग कार्ड मला त्याने दिलं.

“येत्या रविवारी येईन असंच काही मला सांगता येणार नाही.पण वेळात वेळ काढून एखाद्या रविवारी तुझ्याकडे जरूर येईन. पण येण्यापूर्वी फोन करीन.”
मी रघूला म्हणालो.रघू खूप खुश झालेला दिसला.मला म्हणाला,
“सुलभा,तिरफळं घालून बांगड्याची आमटी मस्त करते.तुम्ही जरूर जेवायला या.”

“अरे आपण गणपतिच्या मंडपातच मास्याबद्दल बोलतोय.हे अशुभ नाही ना?”
असा मी विनोद केला.पण सुलभा माझ्याकडे बघून हंसली.त्यातच मी यावं अशी तिची संमत्ती आहे असं मला वाटलं.

त्या रविवारी आमच्या खूपच गप्पा झाल्या.रघू मला म्हणाला,
“मी दोन वचनं माझ्या मला दिली होती.एक आईबद्दल आणि दुसरं माझ्या बाबांबद्दल.
मी वचनावर भरवंसा ठेवतो.ही वचनं कोणत्या प्रकारची माहित आहेत का?, जी वचनं दिलेली असतात किंवा दिली आहेत हे गृहीत धरली जातात,जी वचनं विनवण्या केल्याने दिली जातात किंवा स्वेच्छापूर्वक दिली जातात,ज्या वचनांचा आदर केला जातो किंवा जी वचनं पूर्ण केली जातात. अशी वचनं की जी स्वतःला दिली जातात किंवा दुसर्‍याला दिली जातात.जी वचनं न-जन्मलेल्याला, जन्मलेल्या आणि दिवंगत झालेल्यांना दिली जातात.जी वचनं बोलून दिली जातात वा न-बोलूनही दिली जातात.
तुम्हाला काय म्हणायचं आहे?”

“हलकी-फुलकी वचनं असतात ती उस्फुर्तपणे उफाळून येतात,ती आपल्या हृदयातून उसळून येतात.ती आनंदायी असतात आणि अपेक्षापूर्ण असतात.ही वचनं संभाळून ठेवायला आपल्याला अवधी नसतो.एक ना एक दिवस समुद्रावर जाऊन सूर्यास्त पहाण्याच्या कल्पनेने भारावून जाऊन दिलेल्या वचनासारखी ती वचनं असतात.
काही वचनं कठीण असतात,गंभीर असतात,दडपणाने भयभीत होऊन,गोंधळून जाऊन अनिच्छापूर्वक दिलेली असतात.त्या वचनांबद्दल मनात खात्री नसते किंवा वचनपूर्ती कशी व्हावी हे माहित नसतं.”
वचना बाबत माझ्या विचाराची मी भर टाकून बोलत होतो.

“तसंच तीव्र दुःखाचा क्षण असताना दिलेली वचनं,आपलं हरवलेलं अगदी जवळचं माणूस,शोधून काढण्यासाठी दिलेलं वचन, मुलांच्या सुरक्षीत आणि उज्वल भवितव्यासाठी केलेलं वचन.
ही पण एकप्रकारची वचनं आहेत.
प्रत्यक्षात मात्र ह्या असल्या सार्‍या वचनात आपल्या मनातल्या प्रार्थनेपेक्षाही थोडा अधिकांश असतो.”
असं रघूने म्हटल्यानंतर रघूच्या मनात काय चाललं आहे, त्याचा मला अंधूक अंदाज आला.
त्याच्या आईबाबांना तो लहानपणी दुरावला होता.आणि त्याचं त्याला खूप वाईट वाटायचं. हे स्वाभाविक होतच,पण त्याच्या मनात त्याबद्दल खंतही होती.

मी रघूला म्हणालो,
“आनंदाच्या उच्चांकात असताना,लग्नात दिलेलं वचन,जसं,
“आनंदात वा दुःखात असो,आजारात वा सधृड असताना असो,फक्त मृत्युच आपल्याला एकमेकापासून दूर करील.”
असलं हे वचन कदाचीत नैराश्येच्या दरीत कोसळावं लागलं तरी ते गहन असल्याने सन्मानीत केलं जातं.
मला वाटतं वचन देणं हे आपलं पवित्र कर्तव्य असून, असं वचन निष्ठेत सीमित ठेवून त्या निष्ठेमार्फत अगदी गहन दायित्व म्हणून लादलं जावं.
मला वाटतं,आपली मोठ्यातमोठी वचनं बरेचदा मूक असतात. तरीपण,जीवनभर आपल्याला जखडून ठेवून आपल्याच व्यक्तित्वाचा निश्चित अर्थ लावतात.”
माझं म्हणणं रघूला अगदी पटलेलं दिसलं.नव्हेतर त्याच्या मनात जे काही खतखतंत होतं ते अप्रत्यक्षपणे त्याने मला सांगण्यासाठी मी त्याला उद्युक्तच करीत आहे असं त्याला वाटलं असावं.

मला म्हणाला,
“आत्महितापासून दूर राहिल्याने आपण काय करायला हवं हे आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं.वचन देण्यासाठी आलेल्या संधीवर कार्यरत होण्याऐवजी जर का आपण सहजपणे दूर राहिलो तर आपण दुर्बळ झालो असं आपल्याला वाटायला लागतं. पण मात्र एक आहे,हा आपल्यात कायापालट होण्यासाठी आलेला क्षण पुन्हा कदापी उपस्थित होणार नाही हे निश्चीत.
वचानामधूनच आपण आपल्या स्वभावधर्माच्या उच्चांकाला अंगीकारणाच्या प्रयत्नात असतो. जसं, आपल्यात असलेल्या उत्तम प्रवृतीमुळे आपण चांगलं आचरण करण्याच्या प्रयत्नात रहातो, जसं,दुसर्‍या कुणाच्या दैवाची चिंता करून कदाचीत त्याचं केवळ आणखी चांगलं व्हावं ह्या विचारमार्गदर्शनामुळे, आपल्याला जणू वरून आलेला संदेश असावा हे स्वीकारण्याच्या तयारीत रहातो.”

असं सांगत असताना रघू अजूनही मनातलं खरं काय ते सांगायला आढेवेढे घेतोय हे माझ्या लक्षात आल्यावाचून राहिलं नाही.मी म्हणालो,
“एकदा आपण वचन दिलं की आपल्याकडून नुसतं उत्तम नव्हेच तर अत्त्युतम वागणं व्हायला हवं,हे अपेक्षीत असतं. त्या शाश्वत क्षणी जणू (नव्हेतर खरंच) अख्या मानवतेचं भवितव्य निष्ठेने केलेल्या आपल्या सहाय्यावर जग अवलंबून आहे असं अपेक्षीत असतं.सर्व आत्म्यातलं नातं हा जणू मानवी श्रुंखलेतला दुवा आहे असं मान्य करणं अपेक्षीत असतं.
कसं झालं तरी योग्य ते करावं हे आपल्याला माहित असतं.फक्त त्यातला अदभूत प्रकार हा की त्याचं जे समर्पक उत्तर येतं त्याचा उगम कुठून होतो आणि आपण त्याबाबत संपूर्णपणे असंदिग्ध कसे असतो हे माहित असणं.”

आता मात्र रघूला रहावेना असं मला दिसून आलं.अगदी भावनाप्रधान होऊन रघू मला म्हणाला,
“मला वाटतं जे वचन देतात ते “निवडले गेलेले”असतात.वचन अंगीकारणं हे नुसतं दायित्व नसून एक वरदान मिळाल्यासारखं असतं.वचन देण्यासाठी आपल्याला कुणी दुसर्‍याने निवडलं, की आपल्या आपण आपल्याला निवडलं, ही बाब अगदी असंबद्ध आहे.खरा मतलब वचन स्वीकारण्यात आहे.
माझ्या लहानपणी मी दोन वचनं माझ्या मलाच दिली होती.पहिलं म्हणजे माझ्या आईला शोधून काढण्याचं वचन.
माझा मामा सांगायचा त्याप्रमाणे सुरवातीला माझ्या आईबाबांचं ठीक चालायचं.माझ्या जन्मानंतर त्यांचे खटके उडायचे. माझ्या मामाच्या म्हणण्याप्रमाणे माझे बाबा थोडे सरफिरे होते.कुणाचाही राग ते माझ्या आईवर काढायचे. खूपच वैतागायची. असंच एकदा जरा मोठं भांडण झालं.त्यावेळी मी दोनएक महिन्याचा असेन,असं मला मामा म्हणाला. माझे बाबा घरातून तोंड घेऊन निघून गेले.माझ्या मामाने मला आणि आईला आपल्या घरी आणलं. माझ्या आईच्या डोक्यावर घोर परिणाम झाला होता.माझी आई मी तीन वर्षाचा असताना मला सोडून कुठेतरी निघून गेली.

माझ्या मामाकडे मला सोडून ती कुठे गेली ते कळलंच नाही. माझ्या मामाने माझं संगोपन केलं.आणि मी शिक्षणाच्या वयाचा झाल्यावर मामाने मला बोर्डींगमधे शिकायला ठेवलं. मधून मधून तो मला भेटून जायचा.मला कुणी विचारलं तर माझ्या लहानपणी मी सांगायचो की मला आईच नाही.त्यानंतर जवळजवळ तीसएक वर्षं मी माझ्या मनातच म्हणायचो की मी माझ्या आईचा तिरस्कार करीत आहे.परंतु एक मात्र खरं की माझ्या रागाची शक्ति मला तिच्याशी बांधून ठेवायची.तसं मी तिला सहजासहजी विसरायला तयार नव्हतो.कधी ना कधी कुठे ना कुठे मला तिला शोधून
काढायचंच होतं.मग तिला शोधून काढण्यासाठी मी देशात कुठेही जायला तयार होतो.
मला माझ्या आईला समजावून घ्यायचं होतं.मला ती अशीकशी सोडून गेली हे विचारायचं होतं. एक तर मी मुल म्हणून विकृत होतो नाहीतर ती आई म्हणून विकृत होती असं माझ्या मनात यायचं.मला नेहमीच वाटायचं की ह्यात दोन कुठचीतरी विकृत स्पष्टीकरणं मिळण्याचा संभव आहे.”

“मग तुझ्या आईला तू शोधून काढलंस की नाही?”
जरा उतावीळ होऊन मी रघूला प्रश्न केला.

“प्रथम ज्यावेळी मी माझ्या आईला भेटलो,तेव्हा ती मला म्हणाली,
“मी तुला जन्म दिला.तुझं माझ्यावर प्रेम असायाला हवं.”
मी तिला प्रतिसाद देताना म्हणालो,
“तेच तर तू माझ्यावर कधीही केलं नाहीस.”
रघू मला सांगू लागला,
“पण आम्हा दोघांमधला जो कच्चा धागा कित्येक वर्षं निरंतर राहिला होता तोच मला माझ्या आईला वरचेवर भेटायला उद्युक्त करीत होता.त्यानंतर बरीच वर्षं मी तिला भेटत असायचो.तिचं निधन होण्यापूर्वी अनेक वर्षें मी तिला भेटत राहिलो. एकमेकाला समजून घेऊ लागलो.
आमच्या दोघांमधल्या ताटातूटीचं कारण ती किंवा मी विकृत असण्यात नव्हतं.किंबहूना,आम्हा दोघांना जे भोगावं लागलं तेच मुळी विकृत होतं.आईला मुलाची,किंवा मुलाला आईची हानि होणं हे खरोखर विचारापलिकडचं आहे. ताटातूटीच्या दुःखातून आम्ही जेमतेम सावरलो गेलो होतो.”

“मग तू तुझं दुसरं वचन-तुझ्या बाबांना शोधून काढण्याचं पुरं केलंस की नाही?”
मी असं विचारल्यावर,रघू जरा हळवा झाला.मला म्हणाला,
“माझ्या बाबांना शोधून काढण्याचं,माझं दुसरं वचन अजून अधूरंच राहिलं आहे.कदाचीत अधूरं राहिलही असं मला कलकत्याला जाईपर्यंत उगाचच वाटायचं.
कलकत्याला जाण्याचं,आणि माझ्या बाबांचा माग काढण्याचा माझा प्रयत्न होता.मुंबईला एका मोठ्या रेस्टॉरंटमधे ते कामाला होते.त्या रेस्टॉरंटची शाखा कलकत्याला होती.तिथे ते गेले होते म्हणून मी ऐकलं होतं.
जेव्हा मी पहिल्यांदा कलकत्यात गेलो त्यावेळी,ज्या जागी ते रहात होते असं मला कळलं होतं त्या जागी ते भेटतील ह्या विश्वासावर मी होतो.ती माझ्या मनातली भावस्पर्शी वास्तविकता होती.ती माझी एकतर्‍हेची खात्री होती.
कलकत्याच्या हावडा ब्रिजवरून ज्या ठिकाणाहून त्यांनी हुगळी नदीत उडी मारली होती त्या जागी मला त्यांच्या शेजार्‍याने नेलं.मी त्याठिकाणी फुलाचा गुच्छ ठेवला.आणि कलकत्याहून परत येताना त्यांची आठवण राहिल अशा त्यांच्याच वस्तू घेऊन आलो.”
आपल्या बाबांच्या वस्तू मला दाखवायला म्हणून आणण्यासाठी आतल्या खोलीत रघू गेला.मला हे सर्व ऐकून रघूची खूपच किंव आली. जीवनात सुखापेक्षा दुःखच किती आहे असा विचार माझ्या मनात आला.

मला रघू म्हणाला,
“मी जर का माझी ही दोन वचनं विसरून गेलो असतो,तर आता मी जो आहे तसा दिसलो नसतो-हट्टी,आग्रही,संघर्षाशी हातमिळवणी करण्यासाठी आणि दुःखाला भिडण्यासाठी तत्पर.
हल्ली माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलांना मी नवीन वचनं देत असतो.विपत्तिशी परिचित असल्याने पुन्हा एकदा, ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच कवटाळून असतो.”

“ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड”
असं म्हणतात.मला जे काही तुला सांगायचं होतं ते सांगून तुला नक्कीच बरं वाटलं असणार.”
असं मी रघूला जवळ घेत म्हणालो.त्याला बरं वाटलं हे त्याचा चेहराच सांगत होता.

तेव्हड्यात रघूच्या पत्नीने-सुलभाने,पानं वाढलीत म्हणून आतून ओरडून सांगीतलं.तिरफळं घालून केलेली बांगड्याची आमटी आणि भात खूप दिवसानी जेवायाला मी तरी अधीर झालो होतो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, May 27, 2010

माझी खरी जीवनसाथी.

“आजुबाजूच्यांच्या संसारात होत असलेल्या घटनांकडे पाहून आम्ही एकमेकांकडे विस्मयीत होऊन,भयभीत होऊन पहात असतो.”

“माझ्या मनात नेहमीच वाटायचं,की माझी पत्नी माझ्यावर प्रेम करते.ह्याचं काय कारण असावं ह्याचा मला नेहमीच अचंबा वाटायचा.पण खरोखर ती प्रेम करते.”
हे गणेश सकपाळचं अगदी सुरवातीचं वक्तव्य होतं.पश्चिम रेल्वेच्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर आम्हा दोघांची भेट झाली.आणि नंतर आम्ही मामा काण्यांच्या स्वच्छ उपहारगृहात चहा आणि बटाटेवड्याचा आस्वाद घेताना एकमेकाशी बोलत होतो.मी दादरच्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर डहाणू फ्रुट शॉपच्या जवळच्या बाकावर बसून अंधेरी लोकलची वाट पहात बसलो होतो.
खाकी रंगाची शॉर्ट,वरती खादीचा सफेद टी शर्ट,हातात खाकी रंगाची पिशवी असलेल्या गणेश सकपाळला मी सहजा सहजी ओळखू शकलो नसतो.मला पाहून तो हंसला आणि माझ्या जवळ येऊन बसला.
“मी तुम्हाला ओळखलं नाही!”
मी त्याला म्हणालो.
“पण मी तुम्हाला ओळखलं!”
गणेश म्हणाला.
“कसं काय?”
मी गणेशला उलट प्रश्न केला.
“हंसल्यावर उजव्या गालावर ठसठशीत खळी पडलेली पाहून मी क्षणार्धात दहा वर्षं मागे गेलो.तुमच्या डिपार्टमेंटमधे मी स्टेशनरी आणि फायलींग सेक्शनमधे होतो. मी गणेश सकपाळ.”
हे ऐकल्यावर माझी स्मृति पण दहा वर्षं मागे गेली.
गरीब परिस्थितिमुळे खूप शिक्षण झालं नसलं तरी तल्लख बुद्धिचा,गरीब स्वभावाचा आणि समयसुचकता असलेल्या गणेशला मीच निवडला होता.

आमच्याकडे दोन तिन वर्षं काम करून झाल्यावर राजीनामा देऊन तो आणखी कुठे कामाला लागला होता.आमच्याकडे असेपावेतो नेहमीच तो माझ्याबरोबर सुख-दुःखाच्या गोष्टी करायाचा.मला त्याची खूपच किंव यायची.एक म्हणजे तो स्वभावाने भोळसट,गरीबीने पछाडलेला आणि कोकणातला रहिवाशी.आणि दुसरं म्हणजे,निष्कपटी,आणि भाबडा होता.
“खूप दिवसानी मामा काण्यांचा बटाटेवडा खातोय.”
गणेश कपातल्या चहाचा शेवटचा घोट घेत म्हणाला.
मी लगेचंच वेटरला बोलावून आणखी चहा आणि वडे मागवले.
“नको,नको,माझा तसं म्हणण्याचा अर्थ नव्हता.”
मला शपथ घालीत आणखी ऑर्डर करू नका हे गणेश आवर्जून सांगू लागला.
मी मनात म्हणालो,
“हाच तो निष्कपटी भाबडेपणा”
“असू देत रे! मी पण तुझ्या सारखा बरेच दिवस काण्यांच्या उपहारगृहात आलो नव्हतो.पण ते जाऊंदे मघाशी तू तुझ्या बायकोच्या प्रेमाचं काय सांगत होतास,ते पुढे सांग.”
मी विषयांतर करीत गणेशला म्हणालो.

“माझ्या म्हणण्याचा गैरसमज होऊ देऊ नका.मी अगदी धष्ट-पुष्ट आहे,अगदी सुधृड आहे आणि माझी खात्री आहे की मी स्वाभिमानीही आहे.जीवनात येत असलेल्या अनेक असंभावना आणि समस्या ह्यांच्याबद्दल मी कधीही चिंतन करीत असताना बराच समय मी ह्या बाबतीत -प्रेमाबाबतीत- विचारात घालवतो.”
गणेश सांगू लागला आणि पुढे म्हणाला,

“तसं पाहिलंत तर आमची गरीब परिस्थिति असायची.मी बारीक-सारीक धंदे केले पण त्यात काही बरकत होत नव्हती. लहान-सहान नोकर्‍या केल्या पण त्यासुद्धा कायमच्या अश्या नव्हत्या.मिळकत नसली तर उपासमार होऊ नये म्हणून आम्ही घरात काही तरी किडूक-मिडूक ठेवायचो.एखादा महिना त्यातून निभावून जायचा.कधी कधी हे किडूक-मिडूक तळाला जायचं आणि आम्हाला प्रचंड काळजीत टाकायचं.”

“पण नंतर तू दादर पोस्टात पोस्टमनची नोकरी करायचास,असं मला कुणीतरी सांगीतल्याचं आठवतं.तुला पोस्टात भेटायला यावं असं मला अनेकदा वाटायचं पण काही जमलं नाही.”
मी गणेशला म्हणालो.

“हो पोस्टमनची सरकारी नोकरी मिळाल्यावर मला जरा स्थैर्य आलं.”
गरम गरम चहा बशीत ओतून तोंडाने सूर्रकन आवाज काढीत चहा पीत,पीत सकपाळ मला सांगू लागला.
“नंतर लग्नाची काही वर्ष उलटल्यावर माझ्या पत्नीला परळ भागात एका महिला संस्थेत जेवणाच्या भटारखान्यात चपात्या लाटून देण्याचं काम मिळालं.ते कामसुद्धा मोठ्या योगायोगाने मिळालं.मी जिथे कामाला होतो तिथल्या पोस्टमास्तरांची पत्नी त्या परळच्या महिलामंडळाची सभासद होती. तिची आमच्यावर कृपा झाली.मुंबई शहरात दुपारच्या वेळी ह्या महिलाकार्यातून शेकडो लोकांना जेवणाचे डबे जायचे.
सुरवातीला ही योजना लहान प्रमाणात चालायची.नंतर त्याचा व्याप एव्हडा वाढला आणि जेवणात रोज हजारावर चपात्या लागायच्या.दोन चार बायकांचं ते काम नव्हतं.पन्नास बायकानी सकाळी सहा वाजता चपात्या लाटायला घेतल्या की दहावाजे पर्यंत जेमतेम तेव्हड्या चपात्या भाजून तयार व्हायच्या.”

“जास्त न शिकलेल्या पण जेवण करण्यात आवड असलेल्या महिलांना रोजगार देऊन त्यांची आर्थिक परिस्थिति सुधरवण्यासाठी ही उपाय योजना करणार्‍या त्या महिलामंडळाचा प्रयत्न खरंच स्तुत्य होता.”
मी गणेशला म्हणालो.

“पण सांगायचा मुद्दा असा की,माझ्या पत्नीने हे काम पत्करून आमच्या संसारात स्थिरता आणली.आणि अनेक दृष्टीने ते खरंच होतं.त्याशिवाय माझ्या पत्नीत बदलावही आला.ती त्यामुळे जास्त पोक्त आणि व्यवसाईक झाली.तिला संसारात रस घ्यायला हुरूप येऊ लागला आणि माझ्यावर प्रेमही करीत राहिली.”
गणेश अगदी खूशीने सांगत होता.
“आमचं लग्नाचं आयुष्य म्हणजे एका आनंदमेळातल्या गोल चक्रीसारखं होतं.त्या चक्रातच आम्ही गोल गोल फिरत असायचो. आम्ही कधी मधुचंद्राला गेलो नाही, नाकधी फिरायला हिंडायला,माथेरान-महाब्ळेश्वरला,गेलो.आमची आर्थिक स्थितिच अशी होती की हे कधी जमण्यासारखं नव्हतं.”

“फिरायला,हिंडायला जाण्याचा उद्देश प्रेक्षणीय स्थळं पहाण्याचा जरी असला तरी मुलतः एकमेकाच्या सहवासात असण्याची ती कोशिश असते.”
मी गणेशला त्याबद्दल नाराजी वाटूं नये म्हणून म्हणालो.

“तुमची कंपनी सोडल्यावर ह्याच गोष्टीची मला उणीव भासायची.
तुम्ही अगदी दुसर्‍याच्या मनातलं सांगता.”
गणेशला आमच्या कंपनीत होता त्या दिवसाची त्याला आठवण आली असावी.म्हणाला,
“आम्ही नवरा-बायको एकमेकाच्या सहवासात असतो हेच आम्हाला समाधानीचं आहे.आमचे आनंदाचे क्षण म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या मुलांना खेळताना-बागडताना आणि शाळेचा अभ्यास करताना पहातो.कधी कधी आमचा धाकटा मुलगा- जरा मतिमंद आहे- त्याच्याशी संपर्कात असताना त्यानेच त्याच्यासाठी तयार केलेल्या भाषेतून आम्हाला समजण्यासारखे अर्थ काढायला,त्याच्याबरोबर वेळ घालवण्यात आनंद घेतो.
मी आणि माझी पत्नी एकमेकात संतुष्ठ राहून संसारातल्या जाणीवा-उणीवाबद्दल आणि मुलांच्या संगोपनाबद्दल शांत आणि सौजन्यपूर्वक राहून चर्चा करून मार्ग काढतो.आमच्या दोघापैकी कुणालाही
“अहो (किंवा अग) मला काही बोलायचं आहे.”
असं एकमेकांना सांगावंच लागलं नाही.आम्ही नवरा-बायको असल्याने संसारासंबंधी एखाद्या समस्येबाबत काहीना काही बोलणं भागच असतं.”

“हेच,हेच तुझं कोकणीपण तू आमच्या कंपनीत असताना मला भावायचं.कांटेरी फणसातला आतल रसाळपणा, खडबडीत सीताफळाच्या आतलं माधुर्य, कांटेरी करली मास्याचा गोड आणि चविष्टपणा,हे कोकणी मातीतले आणि समुद्रातले गोड अंश कोकणी माणसात न आले तरच नवल.”
गणेश सकपाळचा हात माझ्या हातात घेऊन मी भाऊक होऊन बोललो.

“माझ्या बर्‍याच जणांशी ओळखी आहेत.रोज अनेक लोकांना बघायला,त्यांच्याशी बोलायला बरं वाटतं.मला कुणीही शत्रू नाही. आणि माझी पत्नी, सुलभा,माझी एक खरी जीवनसाथी आहे.मी जसा आहे तसा तिला पसंत आहे,आणि माझ्याकडून कधी चुका झाल्या असल्यास त्या दृष्टीने तिने आपलं मत कधीच बनवलं नाही.
आम्ही एकमेकाचे साथी म्हणूनच रहातो.एकमेकाला सहयोग देतो.आजुबाजूच्यांच्या संसारात होत असलेल्या घटनांकडे पाहून आम्ही एकमेकांकडे विस्मयीत होऊन,भयभीत होऊन पहात असतो. त्यांचे भांडण,बखेडे आम्हा दोघाना घाबरवून सोडतात.आम्ही एकमेकाची कदर करतो.आणि सगळं स्वय़ंसिद्ध आहे असं समजून रहात नाही.अर्वाच्य भाषा बोलणं आणि एकाने दुसर्‍याला गप्प करणं हे थट्टा-मस्करीतसुद्धा चालू देत नाही.”
सकपाळ मला आपलं मन उघडं करून सांगत होता.

मला गहिंवरून आलं.मी गणेश सकपाळला म्हणालो,
“थोडक्यात सांगायचं झाल्यास,जरी तुमच्या जीवनात,तसंच संसारात स्थैर्य नसलं,आणि काही वेळा परिस्थिति हाताबाहेर गेल्यासारखी झाली असली, तुमची अनिश्चीत आणि असंभवनीय हालत असली तरी,एका गोष्टीची तू विवंचना करीत नाहीस आणि ती गोष्ट तुझ्या अंतरात ठाम बसून राहिली आहे,ती म्हणजे तुझी पत्नी तुझ्यावर प्रेम करते आणि तू तिच्यावर.”
माझं हे ऐकून सकपाळ गालातल्या गालात हंसला.एव्हड्यात,

“साहेब आणखी काही हवंय का?”
वेटरने आमच्या जवळ येऊन विचारल्यावर मी समजायचं ते समजलो.गणेश सकपाळचा हात मी माझ्या हातात पुन्हा घट्ट धरला पण तो भाऊक होऊन नव्हे.त्याने आपल्या खिशात हात घालून बिल देऊ नये यासाठी.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, May 25, 2010

दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला तर

अनुवादीत (बात निकलेगी तो……..)

लोक अकारण निमत्त विचारतील उदासीनतेचं
विचारतील कारण तुझ्या बेचैन होण्याचं
बोटं दाखवतील सुकलेल्या तुझ्या केसांकडे
दृष्टी लावून पहातील व्यतीत झालेल्या काळाकडे
पाहून कंकणाकडे काही करतील पोटात मळमळ
पाहून कापत्या हाताला करतील काही खळखळ

होऊन आततायी ताने देतील अनेक
बोलण्या बोलण्यात करतील माझा उल्लेख
नको होऊस प्रभावित त्यांच्या बोलण्यावर
समजून जातील पाहूनी छ्टा चेहर्‍यावर
नको विचारू प्रश्न त्यांना काही झाले तर
नको बोलूंस त्यांच्याकडे माझ्या विषयावर

दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला तर

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, May 22, 2010

“माझ्या चुकीची तू पुनरावृत्ति करू नयेस.”

“जीवनात, तुझ्या स्वपनाला तू कधीही तिलांजली देऊ नकोस, स्वतःचं अस्तित्व विसरू नकोस नाहीपेक्षा सगळं आयुष्य तू पश्चातापात घालवशील.”

“माझ्या आईनेच भर देऊन समझोत्याचं महत्व काय याची मला कल्पना दिली होती. पण नकळत तिच्याच कृतीला शरणागतीचा दर्प येत होता.तिचं संगोपन जुन्या वळणाच्या परंपरेच्या घरात झालं असल्याने,घरातला सर्व कर्तव्याचा भार तिच्याच डोक्यावर पडला होता.मुख्य कारण म्हणजे ती सर्वात मोठी होती आणि सगळ्यांना तिच्याकडून सहनशीलतेची अपेक्षा होती.”
रंजना आपल्या आईची आठवण काढून आम्हाला सांगत होती.

त्याचं असं झालं,मी रंजनाला माझ्या मुलीची मैत्रीण म्हणून लहानपणापासून ओळखत होतो.रंजनाच्या ऐन पंचविशीत रंजनाची आई तिला सोडून गेली होती.माझी मुलगी आणि मी तिला भेटायला तिच्या घरी गेलो होतो.रंजनाचं नुकतंच लग्न झालं होतं.

रंजना आम्हाला आपल्या आईबद्दल पुढे सांगू लागली,
“वयाने मोठी झाल्यानंतर ती तशीच होती.आत्म-त्यागी होती आणि कसल्याही कौतूकाला अपात्र होत होती.मी मोठी होईतोपर्यंत तिने हीच भुमिका घेतली होती.आणि हळू हळू ही, तिच्या हौतात्म्याची विशिष्ठता, माझ्या व्यक्तिमत्वात झिरपत गेली.बहूमताचा विजय मानणं माझी आई पसंत करायची.मी पाहिलं की,ह्या वृत्तिने इतरांबरोबर चालवून घ्यायला सोपं व्हायचं. आणि मोठी अडचण आल्यावर तक्रार असो वा समस्या असो त्यांना
फालतू समजलं जायचं “

मी रंजनाला म्हणालो,
“प्रत्येक कुटूंबात एकतरी “कानफाटा” असतोच.ज्याच्यामुळे घरात वैताग निर्माण होण्याचे आणि अश्रू ढाळण्याचे प्रसंग येतात.आणि तसंच कुणीतरी त्याच कुटूंबात दुसरा एखादा नेहमीच राजी करण्यात आणि अतिप्रसंग होण्यापासून टाळण्याच्या प्रयत्नात असतो.”

रंजना म्हणाली,
“आमच्या कुटूंबात मी दुसर्‍या प्रकारची व्यक्ति होते.काहीही गैर होऊं द्यायचं नाही ह्या वृत्तिने रहाण्याच्या मी सतत प्रयत्नात असायची.
मग माझ्या शाळेत माझ्या शिक्षांबरोबर,खेळाच्या मैदानात माझ्या मैत्रिणी बरोबर,माझ्या नात्या-गोत्यात आणि नक्कीच माझ्या कुटूंबातल्या व्यक्तिबरोबर मी त्या वृत्तिने वागायची.
जेव्हा कधी कसलाही बेबनाव व्हायचा प्रसंग आला,की मला वाटायचं की मीच पुढाकार घेऊन सर्व सुरळीत करायला हवं. आणि जर का काहीच जमलं नाही तर मी समजायचे की मीच अपयशी झाले.
माझी आई तिच्या साठाव्या वयावर आणि त्याचवेळी मी माझ्या पंचवीशीत असताना आम्ही दोघं सारख्याच समस्येशी दोन हात करीत होतो.शेवटी मला जाणीव झाली की तिला मलाच काहीतरी सांगायचं होतं.”

रंजनाचं बोलणं ऐकून चटकन माझ्या मनात एक गोष्ट लक्षात आली आणि ते मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला.
“एक गोष्ट तुझ्या अजिबात लक्षात आली नसावी आणि ती म्हणजे कदाचीत तुझ्यात ती स्वतःला पहात असावी, आणि आपण सापडलेल्या सापळ्यातून तुझी सुटका करण्याच्या ती प्रयत्न करीत असावी.माझं म्हणणं कदाचीत तुला चुकीचं वाटत असेल.”
माझं म्हणणं ऐकून रंजना थोडी विचारात पडली.

“तुमचं म्हणणं मला एकदम पटलं.”
असं म्हणत रंजना सांगू लागली,
“माझ्या आईच्या स्वभावातला दोष मी चांगली तरूण होईपर्यंत माझ्या लक्षात आला नाही.माझ्या बाबांनी घालून-पाडून केलेल्या आलोचनेचा ती कसा विस्फोट करायची आणि वैतागून तिच्या कपाळावर आठ्या कशा यायच्या हे माझ्या लक्षात यायचं.
मी तिच्याबरोबर एकटी असताना पाहिलंय की बर्‍याच कटकटीपायी तिचं मन खट्टू व्हायचं.ती माझ्या डोळ्यात डोळे घालून मला सांगायची
“जीवनात तुझ्या स्वपनाला तू कधीही तिलांजली देऊ नकोस, स्वतःचं अस्तित्व विसरू नकोस नाहीपेक्षा सगळं आयुष्य तू पश्चातापात

“मग पुढे काय झालं?”
माझ्या मुलीने रंजनाला कुतूहल म्हणून

“अनेक घटनां झाल्या असताना मी माझ्या आईला सामना करताना पाहिल्याचं आठवतं. तिच्या जीवनात तिने स्वतःकडे दुर्लक्ष करून दुसर्‍यासाठी किती मेहनत घेतली आहे हे मी पाहिलं आहे. पण त्यावेळी मला त्याची जाणीवही झाली नाही. मला कळत नव्हतं की ती मला असं का सांगायची कदाचीत मला मी दोषी समजावं म्हणून असेल.मी मला दोषी समजायची.आणि मी माझी त्याबद्दलची नाराजी तिलाबोलूनही दाखवायची.”
रंजना सांगत होती.
पुढे म्हणाली,
“अलीकडे झालेल्या एकामागून एक घटनेचा दुवा आणि त्यात मी पूरी डुबून गेल्याचं पाहून माझा अगदी कडेलोट झाल्याचं मला वाटू लागलं. माझा वापर केला जातोय आणि माझ्याकडून फायदा उपटला जातोय जणू मी स्वतः काही न घेता दुसर्‍यासाठीच करावं हे धरून चाललं जात होतं.कधी कधी मी कोलमोडून जाऊन मला रडकुंडीला आल्याचं पाहिलं आहे.ह्या परिस्थितितून गाढ निद्राच माझी सुटका करायची.इतर कशाहीपेक्षा मी माझ्यावरच रागवायची.”

मी रंजनाचं सान्तवन करीत म्हणालो,
“आता बोलून काय उपयोग.व्हायचं ते होऊन गेलं.तुझ्या आईचा इरादा चांगला होता.तिच्याकडून झालं ते तुझ्याकडून होऊ नये यासाठी ती तुला अनेक मार्गाने सुचवायचा प्रयत्न करीत होती.कधी ती तुला स्पष्ट सांगायची तर कधी खट्टू मनाने पण तुला न बोलता तुझ्या लक्षात आणून द्यायची.
सांगण्याच्या पद्धति जरी निरनीराळ्या असल्या तरी संदेश एकच होता.
“माझ्या चुकीची तू पुनरावृत्ति करू नयेस.”

आम्ही जायला निघालो तेव्हा रंजना शेवटी म्हणाली,
“मी तिच्यावर प्रेम करायची आणि मला तिच्याबद्दल आदर वाटायचा तरीसुद्धा मला तिचं जीवन जगायचं नव्हतं.शरणागती पत्करण्यापेक्षा,खंबिर कसं रहायचं ते तिने माझ्या मनात भरवलं होतं.आणि माझी पण खात्री झाली आहे की ज्याने त्याने स्वतःसाठीच जगायचं. दुसर्‍यासाठी नव्हे.”

मी रंजनाला जवळ घेत म्हणालो,
“ह्या तुझ्या विचाराने तुझ्या आईच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळेल.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, May 19, 2010

सचोटी.

“तुझ्या बाबांचे संस्कार तू नीट पाळले आहेस.पण त्यांना जमलं ते तुला जमेलच असं शक्य नाही.कारण त्यासाठी पराकाष्टेची मेहनत आणि हृदयापासून श्रद्धा असावी लागते.”

“सचोटी ह्या शब्दाचा ढिंगोरा माझ्या डोक्यात पिटत रहायचा तो मला कंटाळा येई पर्यंत,वैताग येई पर्यंत तासनतास दिवसानदिवस टिकायचा.एकदा मी ह्या विरूद्ध बंड करायचं ठरवलं.पण मला मोनोमनी वाटायचं हे असं करणं बरोबर नाही.”
करमकरांची मालती मला सांगत होती.

कमरकर कुटूंब म्हणजे खरोखरच आदर्श कुटूंब म्हटलं पाहिजे.प्राप्त परिस्थितित सच्चाईने रहाण्याची करमरकरांची धडपड वाखाणण्यासारखी आहे.
आर.टी.ओ.च्या ऑफिसमधे एका जबाबदार हुद्यावर काम करीत असताना,कोणत्याही लोभाला बळी पडायला मन विचलित न करता शेवटी चाळीस वर्षं त्याच खात्यात नोकरी करून निवृत्त झाल्यावर त्याच रहात्या जागेत ते राहात होते.
त्यांच्या बरोबरचे बरेच सहकारी, नोकरीतून लवकर राजीनामा देऊन जमवलेल्या पैशातून मोठमोठ्या टॉवर्समधे केव्हाच रहायला गेले होते.मालतीला आपल्या बाबांबद्दल फार अभिमान होता.

मला म्हणाली,
“सचोटी ह्या शब्दातून माझ्या बाबांच्या जीवनाची गोळा-बेरीज होईल.सचोटी अगदी साधा शब्द आहे.सच किंवा खरं ह्या शब्दातून त्याचा उगम झाला असावा.सचोटी म्हणजे जे खोटं नाही ते.
माझे बाबा ह्याच मार्गाने गेले.एखादं बॅन्डचं पथक बॅन्डच्या संगीताबरोबर जसं त्या लयीत मार्ग काटीत असतं अगदी तसंच आहे.त्या संगीताची लय अजून माझ्या कानात घुमत आहे.”

मी मालतीला म्हणालो,
“मला वाटतं तू तुझ्या बाबांची परंपरा चालवीत आहेस.मोठ्या कठीण प्रसंगातून मार्ग काढीत असताना तू हा सचोटीचा धडा शिकली असावीस.सचोटीने तुझं जीवन तू जगायला हवं असं तुला वाटायला लागलं असावं.”

मला मालती म्हणाली,
“मला लहानपणीचा एक प्रसंग आठवतो. माझ्या इतर मैत्रीणींना मिळायची तशी मला खर्ची मिळत नसायची.एकदा मी टेबलावर पडलेले सुटे पैसे घेतले आणि माझ्या इतर मैत्रीणीबरोबर मजा करण्यात उडवले.ते माझं वयात येणारं वय होतं.मी माझ्या मैत्रीणीना सांगीतलं की,माझ्या आईबाबांना त्या पैशाने फरक पडणार नाही,आणि त्यांना ते माहितही होणार नाही.”

मी मालतीला म्हणालो,
“मला आठवतं सचोटी ह्या विषयावर तुझ्या बाबांशी माझी चर्चा झाली होती.त्यांनी मला सचोटी ह्या शब्दाचा सुंदर अर्थ सांगीतला होता.मला म्हणाल्याचं आठवतं तेव्हडं तुला सांगतो.”

मला तुझे बाबा म्हणाले होते,
“सचोटी ह्याचा अर्थच असा की मी माझा शब्द पाळला पाहिजे.मी जे म्हणतो तसंच केलं पाहिजे. मला करावंसं वाटो न वाटो मी करीन असं म्हटल्यावर त्याच मार्गाने गेलं पाहिजे.ह्याचा अर्थ दरदिवशी मी कसं जगावं ह्याची निवड करायला हवी.”अशी अपेक्षा” आहे ह्या शब्दांची निवड करण्याची चिल्हाट जी माझ्या कानात होत असते त्याबद्दल मी सतर्क राहिलं पाहिजे.”

हे ऐकून मालतीला रहावेना.तो लहानपणचा प्रसंग सांगून झाल्यावर पुढे काय झालं ते मला सांगू लागली.
“काही दिवसानंतर एकदा मी घरी आले असताना माझ्या लक्षात आलं की माझे आईबाबा माझ्याशी बोलण्यासाठी माझ्या येण्याची वाट पहात होते.
माझ्या आईला खूपच काही सांगायचं होतं.आणि ते तिने सांगीतलं आणि ते सुद्धा मोठा आवाज काढून,मोठ्या नाटकी ढंगाने सांगीतलं. माझे बाबा तिथेच तिच्या मागे उभे होते पण एक चक्कार शब्दही बोलले नाहीत.त्यांची ती शांतताच मला तो शब्द ओरडून सांगत होती,सचोटी.
नंतर,मला त्यांनी सरळ विचारलं की मला एक सच्चा माणूस व्हायचं आहे की नाही आणि त्यांना भरवंसा वाटत होता की, त्यांना वाटत होतं तशी मी व्यक्ति बनण्याची माझ्यात क्षमता आहे.खरंच, त्यांचा तो हळूवार आवाज,एकच वाक्य,क्षण भरंचंच बोलणं आणि त्यांच्या मनात असलेली मोठी धारणा मला अजून आठवते.”

मी मालतीला म्हणालो,
“तुझ्या बाबांचे संस्कार तू नीट पाळले आहेस.पण त्यांना जमलं ते तुला जमेलच असं शक्य नाही.कारण त्यासाठी पराकाष्टेची मेहनत आणि हृदयापासून श्रद्धा असावी लागते.”

“लवकरच,सचोटी हा शब्द माझी सावली होऊन राहिला.माझ्या अंगाच्या प्रत्येक रंध्रात घट्ट चिकटून राहून,अन्य काही चांगल्या आणि चमक-दमक गोष्टीचा इशारा आला तरी माझ्या पासून अलिप्त व्ह्यायला तयार नव्हता.”
मालती आपल्या जीवनाचा अनुभव मला सांगत होती.

“मी माझ्याकडून हा शब्द झटकून टाकण्याचा प्रयत्न केला,गाडून टाकण्याचा प्रयत्न केला,नव्हेतर त्याचं घातक अस्तित्व माझ्या जीवनातून नाकारण्याचाही प्रयत्न केला.
प्रत्येक वेळी मी त्या शब्दाकडे काणाडोळा करण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाले असं मला वाटता वाटता,माझ्या बाबांचा आवाज कुजबुजून मला मार्गस्त करायचा.त्यांचा आवाज मला कष्ट करण्याची जबरदस्ती करून विचारणा करायचा की ईश्वरी देणगीचा मी सन्मान करते की नाही.”

“पण मग आता तुझी मुलं तुला कसं सहकार्य देतात?”
मी कुतूहल म्हणून मालतीला विचारलं.

“आता माझ्या मुलांना आपल्या आतल्या आवाजाची हांक ऐका असं सांगीतल्यावर ते आपले डोळे फिरवतात.मी ज्यावेळी कामातल्या, शाळेतल्या, संबंधातल्या किंवा कुटूंबातल्या कुचराई किंवा लबाडी बाबतच्या परिणामाची पडणारी किंमत सांगायला गेले की ते एका कानानेच ऐकतात.पण मला ठाऊक आहे की,मी त्यांच्याशी बोलत राहिलं पाहिजे.माझी खात्री आहे की,माझ्या शब्दांकडे आणि गोष्टीकडे ती आपलं लक्ष वेधून घेत असावीत.
शांतीचं लाभदायक जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनमुल्यांशी एकरूप असणं हा एकच मार्ग आहे,जसा मी अंगिकारला आहे.ही परंपरा माझ्या बाबांकडून माझ्याकडे,आणि माझ्याकडून मुलांकडे येत आहे.”
मालतीने भरवंसा ठेऊन सांगीतलं.

मी तिला शाबासकी दिली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, May 17, 2010

मसालेदार जीवन.

आज माझी आणि प्रो.देसायांची एका नवीनच विषयावर चर्चा झाली.
मी प्रो.देसायांना म्हणालो,
“मला वाटतं,जीवनात आपत्ति आल्याने जीवन थोडं मसालेदार होतं.
मला वाटतं, जर तुम्ही पूरा दिवस मौज-मजेत घालवलात आणि तुम्ही कोणतंही आवहान स्वीकारताना तुम्हाला कसल्याच अडचणी आल्या नाहीत, तुमचं रक्त सळसळलं नाही किंवा तुमची पिसं पिंजारली गेली नाहीत तर जीवन संतोषजनक होणार नाही.
भाऊसाहेब,तुमचं काय म्हणणं आहे?”

प्रो.देसाई म्हणाले,
“आपल्या वयक्तिक जीवनातली आतली आणि बाहेरची आवहानं आपल्या आत्म्याला उभारी आणण्यात आणि वयक्तिक अनुभवाची सीमा वृद्धिंगत करायला मदत करतात.”

मी प्रो.देसायांना म्हणालो,
“मी माझ्या आयुष्यातला एक किस्सा तुम्हाला सांगतो.तो ऐकून मग त्यावर तुमचं मत द्या.ही माझ्या लहनपणातली गोष्ट आहे.
मी ज्यावेळी शाळेत होतो तेव्हा माझा एक जवळचा मित्र जयदेव कुस्तिच्या आखाड्यात कुस्ति खेळत असताना एकाएकी हृदय बंद पडून गेला.माझ्या जीवनातला हा एक मोठा दुर्दैवी प्रसंग होता.मी अगदी उदास झालो होतो, आणि मनोमनी समजू लागलो होतो की जीवनात काही खरं नाही.तसंच हे जीवन निर्णायक राहून स्वतःला नष्ट करायला तप्तर असतं असा माझा पक्का समज झाला होता.
माझ्या मित्राच्या निधनानंतर माझ्या मनावर आघात करणार्‍या त्या अनुभवाकडे पहाताना माझ्या मनात जो दृष्टीकोन परिपक्व झाला तो माझ्या जीवनातच बदल करीत असल्याचं मला दिसून आलं.माझ्या जीवनातला रोजचा दिवस जो मी जगत होतो, तो यापुढे जशाचा तसा मी स्वीकृत करायला तयार नव्हतो.कारण मला माहित होतं की जीवन कायमचं नसतं आणि प्रत्येक दिवसाला दाद दिलीच पाहिजे असं नाही.माझा मित्र गेल्यानंतर माझ्या इतर मित्रांशी असलेल्या माझ्या संबंधाचं मी मुल्यांकन करायला लागलो.इतरांशी असलेले माझे दुवे मजबूत व्हायला लागले.आणि त्यामुळे गेलेल्या मित्राचा दुरावा कमी वाटायला लागला.”

भाऊसाहेब म्हणाले,
मित्राच्या नुकसानीच्या राखेतून नव्या मित्रत्वाची मुळं आणि खोडं उगवायला लागतात.आणि ती खोडं नंतर मोठे बुंधे होतात.मित्र असावा ही कल्पना तुम्हाला स्वीकृत करायला वास्तवीकतेने दिलेल्या हादर्‍यातून शिकायला मिळत असते. जीवनाची क्षणभंगूरता पाहून प्रत्येक दिवसाकडे आशाळभूत होऊन रहावं लागतं.जीवन वावटळी सारखं असतं अगदी अनिश्चित असतं.
जीवन एक नदी आहे.अनुभवाच्या पाण्याने दुथडी भरून वहात असली तरी आपल्या लहरीपणे ती मार्ग बदलीत असते.”

मला प्रो.देसायांचं हे बोलणं एकदम पटलं.आणि मी त्यांना म्हणालो,
“जीवन हा असा मार्ग पत्करीत असताना,कोणती आपत्ति कोणता खुमासदार मसाला जीवनात छिडकवून चव आणील हे सांगता येणार नाही.तरीपण एखादवेळी एखादी आपत्ति कधी कधी खूपच उग्र अथवा सौम्य मसाला छिडकवून जीवनात स्वाद निर्माण करून तोंडाला खरी चटक आणू शकते.
म्हणून म्हणावं लागतं की जीवनात आपत्ति आल्याने जीवन मसालेदार होतं.”
हे ऐकून प्रो.देसाई नुसते हंसले.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, May 15, 2010

बगीच्याची क्षमता.

“दुःखाची भरपाई करण्याच्या बगीच्यातल्या क्षमतेमुळे आपल्या जवळचं माणूस आपल्या हृदयात सामावून ठेवता येतं हे मला विशेष जाणवतं.”

“माझे आजोबा सत्तर वर्षाचे असताना जेव्हा एकाएकी गेल्याचं मी ऐकलं,तेव्हा,माझ्या मनाला एव्हडा धक्का बसला की ती परिस्थिति स्वीकारायला माझं मन तयारच होईना.आणखी त्यात भर म्हणजे गेले कित्येक महिने मी त्यांना भेटू शकलो नव्हतो.”

प्रमोद मला आपल्या आजोबांच्या जाण्याने त्याची झालेली हानी आणि त्यांची भेट घेऊ शकला नाही ह्याचा त्याला होणारा पश्चाताप समजावून सांगत होता.
हे सगळं बोलणं, मी जेव्हा त्याच्या नव्याने बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमात कोकणात गेलो होतो त्यावेळी मला ऐकायला मिळालं.

त्याचं असं झालं,प्रमोदचं लहानपण,त्याचं शिक्षण सर्वकाही त्याच्या आजोळी झालं.नंतर लग्न झाल्यावर तो शहरात नोकरीसाठी आला.आणि अधुनमधून आजोळी जायचा.नंतर नंतर कामाच्या व्यापामुळे त्याला त्याच्या आजोबांना नियमीतपणे भेटायला जमेना.
पण अजोबांनी बांधलं तसं एक घर कोकणात बांधायचं आणि निवृत्त झाल्यावर त्या घरात जाऊन रहायचं हे त्याचं स्वपनं होतं.ते त्याने आता प्रत्यक्षात आणून त्या घराची वास्तुशांती करत होता.

मी त्याचं घर आणि आजुबाजूचा परिसर फिरून पाहिला.घराच्या मागे आणि सभोवती त्याने खूपच सुंदर फुलांचा बगीचा केला होता.त्या बगीच्याबद्दल मी त्याला विचारलं.

मला म्हणाला,
“दम्याच्या आजाराने आजोबांची प्रकृति इतकी क्षीण झाली होती की त्यांच्या अंगावर मांसच कुठे दिसत नव्हतं. त्यांचं जाणं इतकं अनिवार्य होतं जीतकं उन्हाळा,पावसाळा वाटावा तसं. परंतु,माझ्या मनाला चांगलाच धक्का बसला होता.

त्यांनी आणि माझ्या आजीने मिळून घराच्या सभोवताली इतकी सुंदर बाग विकसित केली होती की येणारे जाणारे थोडावेळ थांबून रंगीबेरंगी आणि सुवासिक फुलं बघून वाः! म्हटल्या शिवाय पुढे जात नव्हते.
नाना तर्‍हेची फुलझाडं होती.गुलाब-निरनीराळ्या जातीचे आणि रंगाचे,मोगरा,चाफा-अनेक जातीचा,साईलीचे वेल,केवड्याची झुडपं किती सांगावं?.
पडवीत खूर्ची टाकून बसल्यावर संध्याकाळच्या वार्‍याच्या झुळकीबरोबर एकनाएक फुलांच्या सुगंधाची दरवळ नाकावर आल्याशिवाय चुकायची नाही.

गळून पडलेल्या फुलांच्या पाकळ्या वेचताना,झुडपांची काटछाट केल्यावर पडलेल्या फांद्या उचलताना,गवताची तृणं उचकून काढताना,आणि अनेक प्रकारे,मी लहान असताना माझ्या आजोबांना,मदत करताना,
“या आमच्या नातवाला मदत करा.मी तुम्हाला थोडा व्यायाम करायला देईन”
असं म्हणून आजोबा बाग-बघ्यांची छेडखानी करीत असत.ते पाहून मी थोडा लाजायचो.त्याची मला अजून आठवण आहे.”

“तुझ्या आजोबांवर तुझं किती प्रेम होतं हे तुझ्या ह्या बारीकसारीक गोष्टी तू लक्षात ठेवल्या आहेस ते बघून लक्षात येतं.”
मी प्रमोदला म्हणालो.

“माझे आजोबा बागेत उभे असतानाची त्यांची प्रतिमा माझ्या हृदयात मी ठेव म्हणून जोपासली आहे.ते त्यांच्या वरखाली असलेल्या दातांच्या रांगेतून केलेलं मिष्किल हास्य,त्यांच्या जाड चष्म्याच्या भिंगातून दिसणारी ती त्यांची बेरकी नजर, पानवेलीवरून काढलेल्या ताज्या पानात काथ घालून केलेला विडा खाल्याने झालेलं लाल तोंड मधनूच हलवून करतानाचं ते चरबटणं, खादी-ग्रामोद्यकातून आणलेला जास्तित जास्त जाड्भजरी असलेला आणि एखाद दुसरी गुंडी काजातून बळेच सुटलेला तो त्यांचा नेहरूशर्ट,कोकणातल्या तांबड्या मातीमुळे धुऊन धुऊन स्वच्छ केला तरी तांबडट दिसणारा कमरेवरचा तो त्यांचा पंचा,ही हुबेहूब छबी मी कशी विसरेन.”
प्रमोद अगदी तल्लिन होऊन मला सांगत होता.

“त्यांच्या जाण्याने आणि त्यानंतरच्या तुझ्यावर झालेल्या त्यांच्या जाण्याच्या (दुःखी)परिणामाने,तुझी बागेवरची श्रद्धा आणि मानसिक जखमेची भरपाई करण्याची त्या श्रद्धेची क्षमता तुझ्या मनात कुठेतरी खोल रुतून बसवायला मदत झालेली मला दिसत आहे.”
प्रमोदने तेव्हड्याच तत्परतेने त्याच्या नव्या घराचा परिसर सुशोभित केलेला पाहून प्रमोदची शिफारस करावी म्हणून मी असं म्हणालो.

मला प्रमोद म्हणाला,
“पैशाच्या रूपाने फारसा नसलेला,पण त्यांच्या जीवनातल्या प्रचंड त्यागाच्या रूपाने मिळालेला वारसा माझे आजोबा मला मागे ठेवून गेले. ही वारश्याची ठेव आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी बॅन्केत ठेवणं जरा चुकीचं वाटायाला लागलं. त्यापेक्षा त्यांना कदाचीत जिथे हवं होतं त्या बागेत झाडं रुजवायचं आम्ही ठरवलं.आम्ही नव्याने बांधलेल्या घराच्या मागच्या परड्यात ढोपरभर उंच रानटी गवत वाढलेलं होतं.आणि त्या परड्याच्या मागे उंचच उंच पिंपळाची आणि चिंचेची झाडं होती.त्या परड्यात ही ठेव रूजवायचं आम्ही ठरवलं.”

“हे सर्व करायला तुला खूप मेहनत घ्यावी लागली असेल.”
मी प्रमोद्ला म्हणालो.

“खूप दिवसांची नव्हेतर खूप महिन्यांची मेहनत करावी लागली. अजूनही काम पुरं झालेलं नाही.मी शहरातून बरेच वेळा इकडे येत असतो.आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना पण घेऊन येतो. उन्हाळ्याच्या मोसमात एखाद्या संध्याकाळी, जाईचा सुगंध वार्‍यात दरवळतो.माझी लहान मुलं फुलझाडांच्या गर्दीतून वाट काढून बोवाळत असतात.एखादं नवीन रोपटं शोधून काढतात.फुलांचा नवीन बहर पाहून आनंदी होतात.
“बाबा,या इकडे बघा,आम्हाला काय दिसलं ते!”
असं म्हणून माझा हात ओढत ओढत त्या ठिकाणी घेउन जातात.”
प्रमोद मला सांगत होता.आणि मधेच जरा थांबून आणखी काहीतरी आजोबांबद्दल सांगावसं त्याला वाटलं असावं.

“हे सांगत असताना परत मला आजोबांची आठवण आली.”
असं म्हणून मला सांगायला लागला.
“माझे आजोबा करायचे तसं मी मुलांना त्यांचे डोळे मिटायला सांगून केवड्याच्या झुडपाकडे नेऊन त्या केवड्याच्या पिवळ्या फुलांचा सुगंध घ्यायला सांगतो.ही केवड्याची फुलं मला त्यांची आठवण प्रकर्षाने करून देतात.”

“तुम्हाला त्यांचा एक किस्सा सांगतो”
प्रमोद पुढे सांगू लागला,
“एकदा,घाणेरीच्या फुलांच्या झुडपाखाली असलेला आणि रुतून बसला असल्याने उचकून वर घ्यायला किंचीत परिश्रम देणारा एक काळा दगड त्यानीच वर काढल्यावर,
“हे! हे बघा काय मिळालं! ह्या दगडाच्या सर्व बाजूनी भू-छत्र्या (अळमी) उगवली आहेत.रात्री भाजी करूंया! छान! छान!”
असं ओरडून सांगणारे माझे आजोबा मला बागेत दिसतात.
कुड्याच्या विडीचं थोटूक नाम मात्र ओठात धरून नव्याने आकार घेणार्‍या बागेत धुडगूस घालून कुदणार्‍या माझ्या बरोबरीच्या मुलांकडे पाहून एका कोपर्‍यात उभे असलेले माझे आजोबा बागेला संबोधून म्हणायचे,
“बघा,बघा माझी बेबी हळू हळू मोठी होत आहे!”

“किती रे,प्रेम करतोस तुझ्या आजोबावर.तू विकसीत केलेली ही बाग बघायला तुझे आजोबा जीवंत असते तर त्यानी नक्कीच तुला आपल्या छातीजवळ कवटाळून घेतलं असतं.”
माझं हे बोलणं ऐकून प्रमोद बराच भाऊक झाला.

“माझ्या आजोबांमुळे,आजोबांवरच्या प्रेमामुळे विकसीत झालेल्या ह्या बागेत मी वावरत असताना माझं जीवन त्यातून प्रतिबिंबीत होतं.प्रत्येक नव्याने येणार्‍या मोसमाचा मी कृतज्ञ असतो.माझ्या आजोबांचे ते विचित्र विनोद, खसखसून हंसणं आणि त्यांच्या डोळ्यातली चमक ह्या पासून होणारं दुरावलेपण मला जाणवत असतं.दुःखाची भरपाई करण्याच्या बगीच्यातल्या क्षमतेमुळे आपल्या जवळचं माणूस आपल्या हृदयात सामावून ठेवता येतं हे मला विशेष जाणवतं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, May 13, 2010

“गबदूल,आळशी आणि ऐतखाऊ!”

नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
कर तुही निर्मिती कवितेची
दाखव चुणूक तुझ्या प्रतिभेची

“मला तिसावं लागेपर्यंत कळलं नाही की बर्‍याच अडचणीत असलेला तो माझा मामाच असण्याची शक्यता होती.
कारण मला एक फोन आला की बर्‍याच वर्षांच्या दारूच्या व्यसनाने बरबाद झालेली त्याची लिव्हर फुटली आणि त्यातच त्याचा अंत झाला आणि खरं म्हणजे तो माझा मामाच होता.
त्याचे ते शब्द मात्र मागे राहिले.पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्या शब्दांनी माझी व्याख्या करण्याची आता कुणालाही जरूरी भासणार नाही.”
अगदी काकूळतेला येऊन मालती मला सांगत होती.

मालती आईवडीलांची एकुलती एक मुलगी.तिच्या वयाच्या आठव्या वर्षीच तिचे बाबा दम्याच्या पीडेच्या आहारी गेले.त्यांनी खूप त्रास काढला.मी त्यांना मोठमोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो आहे.पण त्यांची फुफ्फुसं जन्मतःच कमजोर होती.त्यामुळे दम्याचा ऍटेक आल्यावर एकतर प्राणवायुचा सिलिंडर वापरून सावरून घ्यायचं किंवा औषधावर भरवंसा ठेवून रहायचं.शेवटी शेवटी त्यांना सिलिंडर वापरण्याविना गत्यंतरच नव्हतं.बिचारे कंटाळून
जायचे.
“आयुष्यात रहाण्याची इच्छाशक्तिच गेली”
असं मला एकदा वैतागून म्हणाले होते.मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करायचो.पण शेवटी,
“जावे त्याच्या वंशी त्यालाच कळे “
हेच खरं ठरलं.त्यांची अन्नावरची इच्छाच गेली.आणि नंतर व्हायचं तेच झालं.

मालती आणि तिची आई मालतीच्या आजोळी कोकणात गेली.
मालतीचे आजी आजोबा पण बरेच वृद्ध झाले होते.पण ह्या दोघांना दुसरा आधार नसल्याने त्यांना आपल्या घरी ठेऊन घेण्याविना त्यांना पर्याय नव्हता.मालतीला एक मामा होता.
मामा जरा सरफिरा आणि गरम डोक्याचा होता.आपल्या आईला घालून-पाडून बोललेलं मालतीला आवडत नव्हतं. आपली आई रडायची हे पाहून मालतीला दुःख व्हायचं.आजीआजोबांचं काही चालायचं नाही.

जून्या आठवणी काढून मालती मला सांगत होती.
“माझ्या मामाच्या अश्लाघ्य शब्दांशी मी नेहमीच सामना करीत आले.आणि ते सुद्धा माझ्या शब्दांनी.माझ्याच खोलीत थोडावेळ निपचित पडून झाल्यावर,माझ्या जाडजूड बोटांनी,माझ्या आठव्या वयातसुद्धा मी काही गोष्टी किंवा कविता खरडून काढायची.माझे लिहिले गेलेले शब्द रात्रभर माझ्या आजुबजूला,माझ्या बिछान्यावर पडून असायचे.जणू ते शब्द माझ्यासाठी ढाली सारखे असायचे. माझं संरक्षण करण्यासाठी.त्या रात्रीतून माझी सुटका
करण्यासाठी.”

“मला आठवतं मी एकदा कोकणात आलो होतो तेव्हा तुझ्या घरी आलो होतो.तू त्यावेळी घरी नव्हतीस.मी विसरणार नाही, मी तुझ्या खोलीत एका भिंतीवर पाटी लटकवलेली वाचली होती.
“हे ही दिवस जातील”
मी मालतीला आठवण देत म्हणालो.

“हो मी त्यावेळी सोळएक वर्षांची होती असेन.”
असं म्हणत मालती आपल्या लहानपणाच्या आठवणी काढून काढून मला सांगत होती.
“पण दुसर्‍या दिवशीच्या सकाळाच्या पारीला माझ्या मामाचे शब्द मला पुन्हा हलवून हलवून जागं करायचे.ते शब्द म्हणजे,
“गबदूल,आळशी आणि ऐतखाऊ “
हे शब्द त्यावेळी झोपेतच माझ्या डोक्यात प्रतिध्वनी सारखेचे वाजायचे. आणि ज्यावेळी मी माझे डोळे उघडायची आणि मला त्यातली अश्लाघ्यता पटायची, त्यावेळी लगेचच उठून मी ते आदल्या रात्री खरडलेले शब्द नष्ठ करून टाकायची.”

“हे असं तुझा मामा कुठपर्यंत करायचा?”
मी मालतेला कुतूहलाने प्रश्न केला.

मला म्हणाली,
“मी वयात येईतोपर्यंत ह्या अश्लाघ्य शब्दांचा भडिमार माझ्यावर रोजच झाला आहे.आणि मी मोठी बाई झाले तरी तो टिकून राहिला.त्या शब्दांनी माझ्या मनाला,माझ्या आत्म्याला आणि माझ्या द्रष्टेपणाला घडवलं गेलं.मी जेव्हा आरशात पहायची तेव्हा का कुणास ठाऊक,खरीच मी माझा मामा म्हणायचा तशी

“गबदूल,आळशी आणि ऐतखाऊ”
मलाच भासायची.”
मला मालती कडून हे ऐकून खूपच वाईट वाटत होतं.पण तिच्या मनाचा ओघ जाण्यासाठी मी ती सांगत होती ते निमूट ऐकत होतो.

“आणि असं असून सुद्धा दिवसभरात ते शब्द त्याच्या तोंडून ऐकल्यावर प्रत्येक रात्री,मी काहीतरी खरडत रहायची.मी अशा अविर्भावात लिहायची की जणू त्या लिहिलेल्या शब्दांवर माझं जीवन निर्भर होतं.मी माझं ते लेखन,ते शब्द वाचायची आणि मला ते सर्व ठीक आहे असं वाटायचं.आणि जेव्हा हे शब्द माझ्या डोक्यात घुसायचे तेव्हा माझ्या मामाने उच्चारलेले आणि माझ्या डोक्यात बसलेले ते अश्लाघ्य शब्द त्यांना हुसकावून काढायचे.”
मालती मला सांगत होती.

“ज्यावेळी माणसाला मनस्वी दुःख होतं तेव्हा त्याला आपलं दुःख कुणाकडेतरी उघडं करावं असं खूपच वाटत असतं. काही दुसर्‍यांना सांगून आपल्या तोंडच्या शब्दानी ते उघड करतात. तर काही कागदावर लिहून आपलं मन हातातून येणार्‍या शब्दातून -लेखातून -उघड करतात.पण एक मात्र नक्की, दुःखानेच प्रतिभा उभारून येते.
साहित्यातल्या अनेक विषयामधे दुःखाने जर्जर होऊन लिहिलेले विषय वाचकाला भावत असतात.असं मला तरी वाटतं.सुरेश भटांच्या कविता वाचून मी काय म्हणतो ते तुला नक्कीच कळेल.बिचारे सुरेश भट पोलिओ मुळे एका पायाने अधू होते.आणि ते त्यांना नेहमीच खटकायचं.एका कवितेतत्यांनी लिहिलंय की,
देवा मला दुसरा जन्म दिलास तर अधू करू नकोस “
मी मालतीच्या प्रयत्नांची स्तुतीच करीत होतो.

माझं हे बोलणं ऐकून मालतीला आनंद झालाही आणि आनंद झाला नाहीही.
मला म्हणाली,
“आणि असं असून सुद्धा रोज रात्री नव्याने खरडलेल्या त्या माझ्या शब्दात मला गम्य वाटायचं.जणू माझ्या लेखणीच्या फटकार्‍याने माझी भावस्पर्शी स्थिति निपटूनच जायची.माझा आत्मसंदेह एखाद्या अतीप्रिय रजईसारखं मला गुरफटून ठेवीत असायचा.
कुणी नवीन मैत्रीण मला मिळाली किंवा एखादी संधी माझ्या जवळ चालून आली की मी ह्या रजईचा मला गुरफटून घेण्यात उपयोग करायची.
असं असूनसुद्धा त्यानंतर मी माझं लेखन नष्टच करायची.कदाचीत त्यामुळे मला वाटायचं की मला कुणीही मी किती विक्षिप्त दिसते हे सांगणार नाही.पण असं करणं कायम टिकलं नाही.”

मालती हे म्हणाली ते ऐकून मला अचंब्यातच तिने टाकलं.
“कायम टिकलं नाही म्हणजे काय झालं?”
मी तिला सरळ सरळच प्रश्न केला.

मला म्हणाली,
“त्यानंतर, मी आतापर्यंत अनेक रात्री माझ्या अंथरूणात बसून काहीतरी लिहून काढायची.मी रकानेच्यारकाने भरून लिहलं आहे. त्यात माझा मामा, माझं जीवन आणि माझी श्रद्धा ह्याबद्दल खरडंत गेलेलं आहे.
आणि असंच एकदा सकाळी उठून मी ते वाचायला घेतलं.आणि नंतर मी माझ्या मनात निश्चीत केलं की माझे लिहिलेले शब्द असे फेकून देणं,नष्ट करणं हे शुद्ध मुर्खपणाचं आणि लज्जास्पद होईल,म्हणून ते लेखन नष्ट करायचं नाही.”

“तू मला एकदा तुझं कवितांचं पुस्तक वाचायला आणून दिलेलं आठवतं.आणि तुझ्या कविता वाचून मी तुला म्हणाल्याचंही आठवतं की तुझ्या कविता दुःखी वाटतात.ते ऐकून तू फक्त हंसली होतीस. आणि मी ही त्यावेळी जास्त ताणून धरलं नव्हतं.”
मी मालतीला म्हणालो.

“जसे दिवस निघून गेले तसं मला माझंच वाटायला लागलं की मी किती सफल लेखिका आहे ते.
मी मग निर्णय घेतला की मी माझ्या कविता छापायच्या. आणि ते फक्त एव्हड्याच कारणासाठी की माझा मामा मला म्हणायचा तशी मी नाही हे दाखवायला.आणि असं करीत असताना माझ्या वयक्तिक भावना कागदावर लिहून त्या कुणालाही वाचायला मोकळ्या झाल्या तरी चालेल.
माझ्या मनात आलं, की जरी लोकाना ते लेखन आवडलं नाही तरी चालेल.मी लिहितंच राहिन.त्यातलंच एक कवितेचं पुस्तक मी तुम्हाला दिलं होतं.”
मालतीने अगदी अभिमानाने मला सांगून टाकलं.

आता मला भरंवसा वाटायला लागलाय की तुझ्या मामाचं तुझ्याबद्दलचं अश्लाघ्य बोलणं नष्ट होऊन, त्या,
“गबदूल,आळशी,ऐतखाऊ”
मुलीला स्वतःला,
“बुद्धि,धैर्य,आणि सौंदर्य आहे”
हे उघड झालं आहे.
मी तुझ्या अनेक पुस्तकांची वाचनं करायला उत्सुक आहे.आणि त्यातला तुझ्या कविता दुःखी असल्यातरी चालतील. नव्हे तर त्या दुःखीच हव्यात. सुखात असतीस तर एव्हडं लेखन आणि कविता तुझ्या हातून कदाचीत झाल्या नसत्या.माझीच कविता मला आठवते.

प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वां उल्हासित करावे
गुलाब, जाई,जुई अन मोगरा
घाणेरी, लाजेरी,कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे

नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
कर तुही निर्मिती कवितेची
दाखव चुणूक तुझ्या प्रतिभेची

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, May 10, 2010

वंदनाची यमूताई.

वंदना,काल माझ्या घरी आली होती.तिची मोठी बहीण यमूताई,बरीच आजारी आहे हे सांगायला आली होती.मला ते ऐकून धक्काच बसला.यमूचं तेव्हडं काही वय झालं नव्हतं.

वंदना मला म्हणाली,
“अलीकडेच ताईने मला बोलावून घेतलं.मला म्हणाली,
“किमोथेरपी करायचं मी सोडून दिलं आहे”.
आणि पुढे माझी ताई मला हंसत हंसत म्हणाली,
“मी नेहमीच म्हणत होते की मला आईचा विसरभोळेपणा येईल.पण त्या ऐवजी हा कर्क रोग कसा झाला कळेना.”

श्रीयुत आणि श्रीमति वालावलकरांना चार मुलं आहेत.मोठी यमुना.
वालावलकर निवृत्त होऊन लगेचच गेले.यमुची आई त्यानंतर बरेच दिवस राहिली.पण बिचारीला उतारवयात विसरभोळेपणाचा व्याधी झाला होता.

मुलांनी तिची खूप सेवा केली.पण त्यातच ती गेली.
माझा आणि वालावलकर कुटूंबाचा चांगलाच स्नेह होता.काही झालं की, त्यांच्याकडून कोण ना कोण मला सांगायला यायची.

मी वंदनाला म्हणालो,
“मला वाटतं,बहीणी,बहीणीमधे खास दुवा असतो.तुझ्या नशीबाने तुला दोन बहीणी आणि एक भाऊ आहे.तुम्हाला तुमची माती माहित आहे.आणि तुमची मुळंही समान आहेत.वाटलं तर,चांगलं किंवा वाईट म्हण, उन्हाळा असो वा पावसाळा तुम्ही भावंडं एकमेकाला समजून उमजून असतां.”

माझं हे ऐकून,आपल्या मोठ्या बहीणीची, यमूनेची, आठवण येऊन वंदना मला म्हणाली,
“माझी मोठी बहीण यमूताई सोळा वर्षांची होती जेव्हा माझा जन्म झाला.मी ऐकलं की माझी आई माझ्या वेळी गरोदर आहे हे ऐकून त्यावेळी ती थोडीशी नाखूष होती.आणि त्यावेळी तिची खात्री नव्हती की ती माझ्या बरोबर प्रत्येक वेळी माझ्यात सहभाग घेईल.पण जशी माझी यमूताई दिसते आहे तशी पाहिल्यावर तिने माझ्या बरोबर सहभाग न घेण्याचं सोडूनच द्या,माझ्यावर केलं तितकं तिने कुणावरही प्रेम केलं नसेल.मी म्हणेन असं प्रेम फक्त मोठीच बहीण करूं शकते.”

पूर्वीच्या आठवणी येऊन मी वंदनाला म्हणालो,
“मला आठवतं,तुझ्या ताईचं लग्न झाल्यावर ती तुमच्यापासून फार दूर रहायला गेली.तू त्यावेळी जेमतेम बारा वर्षांची असशील.तरीपण तुमच्या आणि तिच्या घरामधल्या “डोंगर-दर्‍या” ओलांडून तुम्ही एकमेकाला वर्षातून एकदा तरी भेटत असायचा हे मी पाहिलं आहे.”

वंदनाला त्यांच्या भेटी आठवून आणखी सांगावं असं वाटलं,
” आमच्या वार्षीक भेटी पहाटे,पहाटे पर्यंत गप्पा मारण्यात,भाजेलेल्या भूईमुगाच्या शेंगा सोलून खाण्यात गेल्या आहेत. कुटूंबात येणार्‍या कटकटी आम्ही एकमेकात कुजबुजत असताना,एकमेकाच्या संपत आलेल्या वाक्याची नकळत पुनरूक्ती करण्यात गेली आहे.”

“तुझी आई आजारी झाल्यानंतर तुझी यमूताई तुम्हा भावंडांना आईसारखीच वाटत असावी”
मी वंदनाला म्हणालो.

“माझ्या यमूताईकडे परत परत कतीदा तरी मी माझ्या जीवनातल्या अडचणी,माझे विचार आणि माझे आनंदाचे क्षण घेऊन जायची.”
वंदना म्हणाली.आणि सांगू लागली,
“माझं लग्न होण्याच्या बेतात असताना,माझं कुणावर प्रेम होतं,आणि नंतर मी कुणाशी लग्न करायला तयार झाले आहे ते पण मी तिला सांगीतलं आहे.माझ्या मुलांना घ्यावे लागणारे परिश्रम आणि त्यांच्या जीवनातल्या कटकटीत मी माझ्या ताईला सहभागी करून घेतलं आहे.आमचे बाबा गेल्यावर पाच एक वर्षांनतंर आमच्या आईला उतार वयात आलेला विसरभोळेपणा आणि त्यासाठी आम्हाला काढाव्या लागणार्‍या मानसिक प्रयासाबद्दल तिला चिंता वाटायची.
आमच्या दोघांतलं हंसणं बरेच वेळा आमच्या नवर्‍यांना गोंधळात टाकायचं.आम्ही दोघं घरासमोरच्या अंगणात बसून तासन-तास गप्पा मारताना वेलची मिश्रीत दुधाची कॉफी पीत पीत म्हणायचो रोज असं करायला शक्य होईल तर किती आनंद होईल.”

“तुझी यमूताई खरोखरच प्रेमळ आहे.माझ्याशी बोलताना तिच्या प्रेमळ स्वभावाची मला प्रचिती यायची.आपला संसार संभाळून तुम्हा भावंडांबद्दल ती नेहमीच आस्था दाखवायची.आईच्या प्रकृतिबद्दल काळजी करीत बसायची.”
मी यमुनेबद्दलचं माझं मत वंदनाला सांगत होतो.

“झाडापेडात फिरायला,राजकारणावर बोलायला,आणि आमच्या आईच्या हातून केलेल्या निरनीराळ्या पदार्थाबद्दल,विशेष करून आईने केलेल्या डाळीच्याआमटीबद्दल आम्ही एकमताने सहभागी व्हायचो.आमची आई विसरभोळेपणाच्या आजाराशी दोनहात करून शेवटी गेली.”
आईची आठवण येऊन वंदना थोडी भाऊक झाली.

मी म्हणालो,
“मला आठवतं मी तुझे बाबा हयात असताना तुझ्या घरी केव्हाही आलो तरी तुझी ताई तुझ्या आईला आराम करायला सांगून आपण काम करायची. मला वाटतं यमुनेला तुझ्या आईच्या आजाराची अंधूक अशी कल्पना येत असावी.पण ती कुणाला बोलून दाखवत नसायची.”

वंदना म्हणाली,
“माझ्या यमूताईबरोबर मी आमच्या आईच्या व्याधीवर खूप चर्चा केली होती.त्यापासून होणारे क्लेश आणि त्यातून होणारा अंत ह्यावरही चर्चा केली.
काही झालं तरी हीच व्याधी आपल्यातल्या कुणाला झाल्यास आपण एकमेकाची काळजी घेऊच,असं एकमेकात पक्क ठरवलं होतं.कारण आम्हाला खात्री होती त्या व्याधीपासून आमची सुटका नव्हती.
यमूताई माझी जीवश्च-कंटश्च मैत्रीणही आहे आणि बहीणही आहे. तिने मला कांटा न लागता कर्ली हा मासा कसा खायचा,कच्च्या फणसाची-कुयर्‍याची-भाजी कशी करायची पासून अपराध करणार्‍या कुणालाही माफ कसं करायचं हे शिकवलं आहे.ति्ची ज्यावर श्रद्धा आहे त्याला ती चिकटून असते.आणि तसं करताना न डगमगता, सहजसुंदरतेने आणि आपल्या ढंगात करते.तिच्या जीवनात ती आवेशपूर्वक राहून आणि अनुभव घेत घेत जगत आहे.
आता तिला गर्भाशयाचा कर्क रोग झाला आहे.रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात तिच्या हाडात पसरला आहे.”

“तुम्ही सर्व तुमच्या ताईला वरचेवर भेट देत असाल.कारण हा रोग वाढायला लागला की झपाट्याने वाढतो.मला तू सांगीतलंस ते बरं झालं.मी लवकरात लवकर तिला भेटतो.”
मी वंदनाला म्हणालो.

“माझ्या भावंडांबरोबर तिच्या घरी आम्ही खूपदा जात असतो.जे काही तिने आपल्या जीवनात मिळवलं त्यात तिला आपल्या मुलांबद्दल जास्त अभिमान आहे.मी तिचा हात हातात घेतला आहे. चमच्याचमच्याने आईस्क्रीम घेऊन तिला भरवून तिला झोप आलेली पाहिली आहे.जून्या आठवणी काढून हंसलो आणि रडलोही आहोत.ती शरपंजरी होत असतानाही तिच्या अंगातली ताकद पाहून मला अचंबा वाटतो.”
वंदना सांगत होती.

“आता जे होणार आहे ते चूकणार नाही.आधूनीक औषोधोपचाराने चमत्कार घडवले आहेत.आपल्याला नेहमीच सांगीतलं जातं की योग्य अशा सकस आणि पौष्टीक आहाराने आणि नियमीत व्यायामाने दीर्घायुष्य मिळतं आणि निरोगी स्वास्थ्य मिळतं.”
मी वंदनाला धीर येण्यासाठी म्हणालो.

वंदना म्हणाली,
“पण आमची यमूताई हे सांगायला साक्ष झाली आहे की,
“होणारे न चुके.”
म्हणजेच आपल्या हातात काहीच नाही.
अनेक वर्षं उचित खाणं खाऊन,रोज चालण्याचा व्यायाम घेऊन, योगासनं करूनही ती जाण्याच्या पंथाला लागली आहे.
ती आमची मोठी बहीण आहे.आम्हा सर्वांना तिने एकत्रीत ठेवलं.
आम्हाला वयात येताना तिने पाहिलंय.आणि ह्या निष्ठूर जीवनप्रवासात वाटचाल करतानाही ती आमच्याकडे पहात राहिली,आम्हाला मार्ग दाखवीत राहिली.आम्ही तिला नेहमीच आमच्या जवळ येताना पाहून सर्व काही ठीक होणार याची खात्री बाळगून असायचो. ती आमची ताई आहे.तिच्याशिवाय जीवन अशक्य आहे.”

मी वंदनाला म्हणालो,
“तुझ्या आईच्या व्याधीवर आता बरंच संशोधन झालं आहे.जरी ती व्याधी आनुवंशीक असली तरी त्यावर औषधं आली आहेत.त्याशिवाय शारीरिक व्यायामाबरोबर मानसीक व्यायाम घेत राहिल्यास हा विसरभोळेपणाचा रोग बराच दुरावला जातो असं माझ्या वाचनात आलं आहे.”

“रोज वाचन करून, कोडी सोडवून, थोडं फार लिहूनही निश्चीतच,कधी काळी,आईचा तो व्याधी, माझ्या डोंबल्यावर येऊन बसणार आहे हे मला जाणवत आहे.
सतत गोंधळात टाकणार्‍या त्या व्याधीने माझी आई कशी जर्जर झाली होती ते आठवून माझं मन भित्रं होतं.
मला माहित आहे मी वेळोवळी अडखळणार आहे,शेजार्‍यांचं नाव काय ते माझ्या लक्षात रहाणार नाही,किंवा चहाचा कप कुठे ठेवला आहे ते विसरणार आहे.
पण तुम्हाला खरं सांगू का,माझा कुटूंबव्यवस्थेवर,त्या समान मुळांवर,जीथे आनुवंशिकता आहे,त्यावर विश्वास आहे.तसंच माझ्या आईच्या डाळीच्या आमटीवरपण विश्वास आहे.
माझी ताई जाण्याच्या पंथावर आहे पण तिचा आत्मा,जो तिचं व्यक्तिवैशिष्ट्य आहे, ते जीवंत रहाणार.आणि कदाचीत मी माझ्या गोष्टीसाठी विसरभोळी राहीन पण तिचं व्यक्तिवैशिष्ट्य विसरणार नाही.मी माझ्या यमूताईला,माझ्या मोठ्या बहीणीच्या प्रेमला विसरणार नाही.”

यमुताईला निश्चितच भेटायला येण्याचं आश्वासन मी वंदनाला दिलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, May 7, 2010

“तुझ्याच अनुभवासाठी जातीने हजर रहायला!”

“चित्रात गणपतिबाप्पाकडे पाहिल्यावर पहाणार्‍याला सान्तवन वाटेल अशी बाप्पाची नजर होती.मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात हॉलमधल्या एका भिंतीवर ही तस्वीर टांगलेली होती.”

आयुष्यात वेळोवेळी असे प्रसंग येतात की,काहीना काही निर्णय घेण्याची पाळी येते.पण एखादा प्रसंग खरोखरच आपलीच सत्वपरिक्षा घेण्यासाठी निर्माण होतो आणि त्यावर निर्णय घ्यायला आपल्याला विवश करून टाकतो.

मायाचं असंच झालं.तिच्या आईवडीलांचं घर कोकणात होतं.वडील अलीकडेच वार्धक्याने गेले.तिची आईपण बरीच थकली होती.ती जवळ जवळ बॅण्णव वर्षाची झाली होती आणि एकटीच होती.माया एकूलती एक मुलगी होती.माया तिला वरचेवर भेटून जायची.आईच्या सुशृषेसाठी मायाने बराच खर्च करून योजना आखल्या होत्या.तिला रोज स्पंजींग करायला आणि तिच्या औषध पाण्याची नीगा ठेवायला एका नर्सला कायमची ठेवली होती.हे सगळं मायाने स्थाईक डॉक्टरच्या सुचनेवरून केलं होतं.

अलीकडे माया आपल्या आईला भेटायला आली असताना डॉक्टर तिला म्हणाले,
“माया,तुझी आई जास्त दिवस काढील असं दिसत नाही.तरीपण कुणाचा मृत्यू केव्हा येईल हे सांगणं फारच कठीण असतं. माझ्या सांगण्यावरून तू पैशाच्या मदतीने तुझ्या आईची अत्यंत उत्तम सेवा करण्यात कर्तव्य बजावलंस.पण जे पैशाने होणार नाही ते तू तुझ्या आईजवळ जातीने हजर राहून होईल.त्यासाठी तुझा काय तो निर्णय तू घे.”

आईला सोडून आपल्या घरी परत येत असताना मायाला गाडीत सतत डॉक्टरांचे उद्गार डोक्यात येऊन अस्वस्थ व्हायला होत होतं.
विशेषकरून ते डॉक्टरांचं वाक्य.
“आईजवळ जातीने हजर राहून होईल.”

माया एक दोन वर्षात निवृत्त होणारच होती.ते आईसाठी अगोदरच करावं की काय हा विचार ह्यावेळी तिने आपल्या नवर्‍याला विचारायचं ठरवलं होतं.
माया अलीकडेच दोनतीन दिवसासाठी आईला सोडून आपल्या नवर्‍याकडे आली होती.त्यावेळी आपलं मनोगत मला सांगत होती.
माया मला म्हणाली,
“माझा नवरा खरंच देवमाणूस आहे.मी त्याला विचारल्यावर मला म्हणाला,”
“माया तू तुझ्या नावासारखीच मायाळू आहेसच,पण आपल्या आईच्या अखेरच्या दिवसात अशा परिस्थितित कुणालाही तुला वाटतं तसंच वाटणार.तू खुशाल राजिनामा दे.नोकरी परत करता येते.त्याच्यासाठी तुझं आयुष्य पडलेलं आहे.पण तुझी आई तुला परत मिळणार नाही.”

“मग तू काय निर्णय घेतलास?”
मी मायाला विचारलं.

“मी आई हयात असे पर्यंत तिची सेवा करायचं ठरवलं.मी लवकर निवृत्त झाले.आणि नवर्‍याला आणि मुलांना सोडून आईच्या घरी रहायला आले.”
माया मला सांगू लागली.
“सुरवातीला फारच कठीण जायचं.एकदाचे रात्रीचे दिवे काढल्यावर आणि कंटाळवाण्या सबंध दिवसाच्या समाप्ति नंतर एक मोठा उसासा टाकून मी माझ्या मलाच विचारायची,
” हे सर्व कशासाठी चाललं आहे?”माझं वयक्तिक आणि व्यवसाईक जीवन मधेच सोडून माझी आई जी आता बॅण्णव वर्षाची आहे तिच्या बरोबर का रहायला आले आहे?”

मला मायाची कींव आली.मी तिला म्हणालो,
“खरंच विवश करणारा हा निर्णय आहे.तुला तुझ्या आईच्या प्रेमापोटी असं करणं स्वाभाविक आहे.पण तुझ्या नवर्‍याने आणि मुलांनी दिलेलं सहकार्य वाखाणण्यासारखं आहे.
पण तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळाली का?

मी उलट प्रश्न करताच माया मला म्हणाली,
“माझ्या मनात मी प्रश्न आणल्यावर माझंच मन मला लगेचच उत्तर द्यायचं.
“तुझ्याच अनुभवासाठी जातीने हजर रहायला!”
नंतर ही जातीने हजर रहाण्याची कारणं काय असावीत हे हुडकून काढायला मला जोर यायचा.”

“मला तुझ्या मनातली कारणं ऐकायला नक्कीच आनंद होईल.”
असं मी म्हणताच,मायाने एका मागून एक कारणं द्यायला सुरवात केली.ते ऐकून मी थक्कच झालो.
मला म्हणाली,
“माझ्या आईला औषधाच्या दुकानातून रोजचंच जे काय लागतं ते आणण्यासाठी,जातीने हजर रहायला.
सतत चालणार्‍या मोठ्या आवाजातल्या टीव्हीचा सहन न होणारा आवाज ऐकायला,जातीने हजर रहायला.
जेव्हा माझी आई ती बसलेल्या खुर्चीवरून उठण्याचा प्रयास करताना, तिची धडपड चालली असताना,जमिनीवर तिचे पाय ती घट्ट ठेवताना आणि अशावेळी ती पडू नये म्हणून मी तिला आधार देताना,आलेले जणू असे क्षण की काळ क्षणभर थांबला असावा की काय हे भासवून घेण्यासाठी, जातीने हजर रहायला.
माझ्या आईच्या मनात घर केलेल्या भितीमुळे तयार झालेल्या नकारार्थी आवरणाला दूर करण्यासाठी काहीतरी तिच्या कानावर पडावं म्हणून ज्ञानेश्वरीतून आणि गीतेमधून वाचून दाखवण्यासाठी, जातीने हजर रहायला.
माझ्या भावनाना मृत्यूच्या मार्गाने जाण्यात येणारा आनंद आणि चमत्कार समजावून देण्यासाठी,जातीने हजर रहायला.
माझ्या बालपणातल्या आठवणी उजळण्यासाठी,गेल्या तीस वर्षातल्या जीवनाची उजळणी करण्यासाठी,जातीने हजर रहायला.
अशी एकामागून एक कारणं मी शोधून काढायची.”

“ग्रेट”
मी मायाला म्हणालो.

“माझ्या आईच्या घरात एक सुंदर गणपतिची तस्वीर आहे.मला लहानपणापासून चित्र काढण्याचा नाद होता. जे.जे.स्कूलमधे जाऊन चित्रकलेवर मी डिप्लोमा पण घेतला.पण हे चित्र मी वयाच्या चौदाव्या वर्षावर काढलं होतं. आता माझं वय सत्तावन्न आहे.”
माया मला मन मोकळं करून सांगायला लागली.

“चित्रात गणपतिबाप्पाकडे पाहिल्यावर पहाणार्‍याला सान्तवन वाटेल अशी बाप्पाची नजर होती.मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात हॉलमधल्या एका भिंतीवर ही तस्वीर टांगलेली होती. किचनपासून माझ्या आईच्या बेडरूमकडे आणि परत किचनकडे जाण्याच्या मार्गात ही तस्वीर दिवसातून पाच-दहावेळेला माझ्या नजरेसमोरून जायची. आईला पाणी आणून दे,तिला औषधाच्या गोळ्या आणून दे,तिला हवी असलेली पण ती आणायला विसरलेली एखादी वस्तू तिला आणून दे असे फेरफटके व्हायचे.आईने हे सगळं आणायचं ठरवलं तर तिला तिच्या वेगात चालण्यात अर्धा दिवस जायचा.आणि ते करताना सुद्धा वाटेत काही कागदाचा कपटा पडला आहे म्हणून किंवा अशीच काहीतरी बारिक सारिक गोष्ट उचलून घेण्यात तिचा वेळ गेल्याने सरतेशेवटी कोणत्या वस्तूसाठी ती उठून आली होती तेच ती विसरून जायची.

“माया ग,मी काय आणायला आले होते?”
ती ओरडून विचारायची.मी तिला उत्तर मुळीच देत नसायची.पण तिला काय हवं होतं ते लक्षात घेऊन तिला मुळीच न सांगता,तिनेच हुडकून काढावं आणि अशा तर्‍हेने कदाचीत तिच्या पुस्सट होत जाणार्‍या स्मृतिची बचत करायला मी तिला मदत करायची.”

मी मायाला म्हणालो,
“जातीने हजर रहाणं” ही एक तुझ्याकडे उक्ति किंवा वचन झालं असेल नाही काय?.एखादा उच्च कार्यविधि झाला कसं झालं असावं.पण तू ते आचरीत आहेस.
तुला एव्हांना ठाऊक झालं असेल की तुझी आई आता तुझीच शिक्षीका झाली आहे आणि तू तिची आई झाली आहेस.”

माझं हे ऐकून माया खरोखरंच भावनाप्रधान झाली.
मला म्हणाली,
“आमच्या घरातल्या,त्या हॉलमधल्या भिंतीवरच्या गणपतिबाप्पाच्या असंदिग्ध अस्तित्वामधून, मी माझ्या आईचा हात धरला असताना माझा कोपर धरल्याचा भास होण्यात,माझा तोल जाऊ नये म्हणून सज्ज राहून,त्या क्षणाच्या वजनाखाली पडून उठण्याच्या धडपडीत उठवण्यासाठी प्रयत्न होण्यात,पाय घसरल्यावर तोल संभाळण्यासाठी मदत होण्यात,मी आणि माझी स्वपनं ह्या मृत्युमार्गाकडच्या वाटचालीच्या प्रक्रियेत हरवून न जाण्यात ते अस्तित्व माझ्या मागे सज्ज आहे असं मला वाटायला लागलं आहे.”

मला मायाचं हे ऐकून, खरोखरंच माझा तिच्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला.माझ्या चेहर्‍यावरचे भाव पाहून ती हंसली.आणि मला म्हणाली,
“माझी गति माझ्या आईच्या गति एव्हडी हळुवार झाल्याने,माझ्या जीवनाच्या सीमेभोवती असलेली प्रेमाची झुळूक मला भासू लागली आहे. मृत्यूला दारातच उभा ठाकायचा इशारा देण्याची ही वेळ असताना,त्याच्याच डोळ्यात डोळा घालून आणि एखादा मार्ग काढून,उघड्या मनाने मी आणि माझी आई बसले आहे त्या बैठकीकडे त्याचं स्वागत करावसं वाटत असताना,हवेतला हलकासा आनंदाचा सुगंध मी घेत आहे.”

मायाचं हे सर्व ऐकून मी खिशातून रुमाल काढून माझे डोळे पुसले.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, May 4, 2010

“आईआज्जी तू पण!”…(काळजी घे).

“ज्यावेळी बाहेर जाण्यासाठी मी तिच्याकडे पाठमोरी होऊन बाहेर पडायला लागले त्यावेळी मी माझ्या कानात अस्पष्ट शबद ऐकले,
“काळजी घे”

“लहान वयातच मला समजायला लागलं होतं की माझ्या आईआज्जीकडून तसं प्रेम मला मिळणार नाही जसं माझी आई मला जवळ कवटाळून माझा मुका घेऊन रोजच द्यायची.
शोभना मला आपल्या मनातली, आपल्या आजीची तक्रार-वजा चिंता वर्णन करून सांगत होती.

“माझ्या आजीने मला जवळ घेऊन कधीच कवटाळलं नाही.अगदी गरज लागली तरच,नाहीपेक्षां ती क्वचितच माझ्याशी बोलली असेल..मी वयात येत असताना मला वाटायचं की,आजीकडून ऐकली जाणारी- श्रावणबाळाची, धृवबाळाची, गोकूळातल्या कृष्णाची- अशा प्रकारच्या गोष्टीपासून मी वंचित झाले आहे.

जेव्हा दुसरी मुलं आपल्या आजीबद्दल बोलायची,

“आमच्या आजीने नेहरू,गांधीची भाषणं ऐकली आहेत,बेचाळीसचा लढा पाहिला आहे,सुखदेवला फांसावर लटकवल्याची बातमी पेपरात वाचली आहे,”

की माझ्या लक्षात यायचं की, मी आजीजवळ बसल्यानंतर मनातल्या मनात ईच्छा करायची माझी आजीसुद्धा एका रात्रीत बदलून अशाच काहीश्या गोष्टी मला सांगील.मी माझ्या आजीला प्रेमाने “आईआज्जी” म्हणायचे.”

मला शोभनाकडून हे सर्व ऐकून गंमत वाटलीमी तिला म्हणालो,

“अग,तू आजीला आईआज्जी म्हणायचीस.म्हणजे एका प्रेमळ नावात आणखी एक प्रेमळ नाव घालून तू तुझ्या आजीवर किती प्रेम करायचीस हेमाझ्या लक्षांत येतं.पण आजीचं राहूंदे.तुझ्याकडून तुझ्या आजीवर किती प्रेम व्हायचं?”

“मी जर कधी,
” माझी आईआज्जी”
असं तिच्या जवळ जाऊन, तिला मिठी मारून म्हणाले तर मग तिच्या ओठावरून,
“माझी ती बाय “
असे शब्द निसटून यायचे.”
आपल्याकडून होणार्‍या प्रेमाची बाजू शोभना पटकन सांगून गेली.

आणि पुढे म्हणाली,
“माझ्या मनात यायचं की आजीच्या खोलीत गेल्यावर मला ती जवळ कवटाळून घेईल आणि म्हणेल,
“घराच्या पाष्ट्यावर मणीयार जातीची सर्पटोळी दिसली,किंवा हे कपिलेचं चौथं पाडस आहे,किंवा ह्या पिढीतल्या तुम्ही मुली नशिबवान आहात कारण तुम्हाला बिनदास शिक्षण घेता येतं वगैरे”
असं काहीतरी एखाद्या विषयावर घोटून घोटून सांगील.पण अशी कधीच वेळ आली नाही की आजी माझ्याजवळ बसून आमची चर्चा झाली,आणि अशी कधीच वेळ आली नाही की आजीने आपणहून मला जवळ घेऊन,
“माझी ती बाय”
असं म्ह्टलं असेल.”

मला शोभनेची दया आली.मी तिला म्हणालो,
“जे कोण आहे ते तसेच असणार”
हे कसं स्वीकारायचं ते त्या वयात तुला न कळणं स्वाभाविक आहे.
जोपर्यंत प्रेम आपल्या जीवनात अनुपस्थित रहात नाही तोपर्यंत प्रेमाचं मुल्य आपल्याला कळत नाही.”
मी शोभनाची समजूत घालीत म्हणालो.
आणि तिच्याकडून आणखी काढून घेण्यासाठी मी शोभनाला म्हणालो,
“मग तू तुझ्या आईला आजीबद्दलचं कारण विचारलंस का?”

“हो तर!”
अगदी खणकून मला शोभना सांगू लागली.
“एक दिवशी निव्वळ कुतूहल म्हणून आणि नैराश्यापोटी मी माझ्या आईला विचारलं की,
“मला इतर प्रेम दाखवतात तसं माझी आईआज्जी मला का दाखवत नाही? “
माझी आई मला सांगायला लागली,
“आजीला सात भावंडं होती,अगदी लहान असताना तिला तिच्या मामाने दत्तक म्हणून घेतली होती.तिच्या मामाला लग्न होऊन बरीच वर्ष झाली तरी मुल होत नव्हतं.तिची मामी चागली होती.
पण मामा काहीसा व्यसनी होता.त्यामुळे तिला खर्‍या प्रेमाची चुणूकसुद्धा दाखवायला त्याला संधी मिळाली नाही. अखेर ती प्रेमाने परिपूर्ण असून सुद्धा ते प्रेम प्रकट करायला अपूर्ण राहिली.”
माझ्या आईआज्जीची पूर्वपिठिका ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की मी तिला मिठी देताना तिचे दोन्ही हात अनिच्छापूर्वक का वर यायचे.मला जवळ घेऊन इतर आज्यांसारखी तासनतास गंमतीच्या गोष्टी का सांगत नसायची.”

“तिच्या बालपणी संगोपनाचं नातं काय असतं ते तिने अनुभवलं नसल्याने प्रेम कसं द्यायचं ते तिला ठाऊक झालं नसावं.”
मी शोभनेच्या आजीची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत म्हणालो.

शोभनेला आपल्या आजीची कींव आली असावी.आंवढा गिळत मला म्हणाली,
“मला एक घटना चांगलीच आठवते.मी त्यावेळी सतरा वर्षाची होती.आईआज्जीला बरं वाटत नव्हतं.तिला दवाखान्यात ठेवलं होतं.माझी आई आणि मी तिच्याबरोबर तीनएक तास तिच्या बिछान्याजवळ बसून होतो.आई निघून गेली आणि आणखी थोडावेळ मी आईआज्जीजवळ बसून होते,ते थंडीचे दिवस होते.दिवस लहान होऊन काळोख लवकर पडायचा.मी पण आता घरी जाण्यासाठी तयारी करीत होते.बाहेरच्या गर्दीच्या यातायातीची तिला
कल्पना असायची.ज्यावेळी जाण्यासाठी मी तिच्याकडे पाठमोरी होऊन बाहेर पडायला लागले त्यावेळी मी माझ्या कानात अस्पष्ट शबद ऐकले
“काळजी घे”
मला आठवतं जणू मला कुणी तरी शीवी दिली की काय अशा विस्मयात मी त्यावेळी पडले.मी फिरून तिच्याकडे पहायला लागले. अवघडल्यासारखा चेहरा करून पुढे काय करायचं अशा अविर्भावात तिला पाहून,

मी तिला म्हणाले,
“तू पण.” …..(काळजी घे)
तिची अवघड कमी करण्याच्या प्रयत्नात मी होते.

त्यानंतर तिचे ते,
“काळजी घे”
हे शब्द कायमचे माझ्या मनात रेंगाळत राहिले.एकदाच प्रथम माझ्या आईआज्जीला वाटलं असावं की कुणाला प्रेम दाखवून जगबुडती होणार नाही.
आणि त्यानंतर नेहमीच ती जाणीवपूर्वक प्रयत्न करून तिला प्रकट करता येईल असं प्रेम मला दाखवायला लागली.पण अजून ती प्रेमाच्या संकल्पनेशी धडपडत असते.आणि कष्टप्राय होऊन ते दाखवीत असते.
पण एक नक्की की ते दाखवताना त्यावर तिचा ताबा आहे हे तिला जाणवतं.
आईआज्जी दवाखान्यातून घरी आल्यानंतर,मी बाहेर जाताना माझा एकही दिवस गेला नाही की मला म्हटले जाणारे ते दोन शब्द मी आजीच्या तोंडून ऐकले नाहीत.
“काळजी घे”

आणि मग मी म्हणायचे,
“तू पण”
आम्हा दोघांना त्या दोन शब्दानी मौल्यवान धडा शिकवला.
हे शब्द आता आमच्या घरात एक परिभाषा झाली आहे.जीवनातलं एक वळण झालं आहे.जगण्याचं आयुध मिळालं आहे.आणि अंतरात असं भिनलं आहे की, हे शब्द आम्ही कधीही त्यागणार नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनेया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, May 2, 2010

लयीसम भासे मजला जीवनगती

अनुवाद. (संसार है इक नदिया…….)

नदी सम भासे मजला हा संसार
अन सुख-दुःखाचे दोन किनारे
न जाणे कुठे चाललो आपण
प्रवाहाला देती जन्म हे वारे

लयीसम भासे मजला जीवनगती
अन राग-सूराचे दोन बिछाने
सप्त सूरांच्या मधले भ्रमण
सूरमय संगीताला देई जन्म

अंबराच्या नयनातून बरसे श्रावण
पडत्या थेंबातून फिरूनी होती घन
बनण्या बिघडण्याच्या परंपरेने
गुरफटती संसारात सारे जन

कुणी कुणासाठी नसे अपुला वा पराया
नात्या रिश्त्याच्या प्रकाशामधे
हरएक जण असे छाया
नियतीच्या खेळामधला हा न्याय पुराणा

आहे का जगती कुणी पाप केल्याविणा
खुडले का बागेतूनी फुल कुणी कांट्याविणा
निष्कलंक कुणीही नसती या संसारी
लयीसम भासे मजला जीवनगती

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com