Sunday, January 30, 2011

आवेश.

“अगदी खरं सांगायचं तर,ही ठिणगी माझ्यात केव्हा पडली की ज्यामुळे मी रंगमंचावर प्रज्वलित होऊ शकले ह्याची मला कल्पनाच नाही.आणि ह्यातच सर्व महात्म्य पुरून उरलं आहे.”

ह्यावेळी कोकणात मी सुनंदाबाई वाडकर यांच्या घरी गेलो होतो.
सुनंदाबाई आता खूपच थकल्या आहेत.आमच्या लहानपणी त्या दहीकाल्यात आणि छोट्या,मोठ्या नाटकात कामं करायच्या.माझी त्यांची ओळख होती.दिगसकर नाटक कंपनी,पारसेकर नाटक कंपनी ह्या नावाच्या दोन तिन नाटक कंपन्या होत्या. त्यात ती कामं करायची.सुनंदाची मुलगी कधीही नाटकात रमली नाही.तिचं मुंबईतल्या एका व्यापार्‍याशी लग्न झालं आणि ती आपल्या संसारात रममाण झाली.पण तिची मुलगी रेवती मात्र आपल्या आजीच्या वळणावर गेली.

रमाकांत परूळेकराने मला ही सर्व माहिती दिली.रेवती लहान असताना कोकणातल्या खेडेगावांत नाटक कंपनीतून कामं करायची.तिची कंपनी मुंबईला आल्यावर भायखाळ्याजवळ एका लहानश्या नाट्य-गृहात त्यांचे खेळ व्हायचे.रमाकांतला नाटकाचं फार वेड होतं.फार पूर्वी एकदा मी त्याच्या बरोबर असंच एक नाटक बघायला भायखाळ्याला गेलो होतो.पार्ल्याचं दिनानाथ नाट्य-गृह,वरळीचं नाट्य-गृह,दादरचं नाट्य-गृह,गिरगावातल्या केळेवाडीतलं नाट्य-गृह अशी मोठमोठाली पांढरपेशा वस्तीतली नाट्य-गृह जरी असली तरी ह्या भायखाळ्यातल्या छोटश्या नाट्य-गृहात आजुबाजूच्या वस्तीला लहान नाटक कंपन्यांची नाटकं बघायला आवडायची.मलाही हे नाट्य-गृह पहिल्यांदाच पाहायला मिळालं होतं.

त्यावेळेला रमाकांतने माझी रेवतीशी ओळख करून दिली होती.आपण सुनंदा वाडकरची नात हे मला तिनेच सांगीतलं होतं.
अलिकडे रेवतीने स्वतःचीच नाटक कंपनी काढली आहे आणि तीही नाटकं करते.आणि ती पण कंपनी घेऊन कोकणात दौर्‍यावर जाते.तिची आजी आजारी आहे हे मला तिनेच अलीकडे सांगीतलं.म्हणून मी कोकणात सावंतवाडीला सुनंदाला भेटायला गेलो होतो.

रेवती अशिक्षीत राहिली नाही.तिने बीऐ पर्यंत शिकून पुढे नाटक कला शिकायला एका इन्स्टीट्युटमधे कोर्स केला होता. वडील व्यापारी असल्याने रेवतीला पैशांची समस्या नव्हती.
सुनंदा मला म्हणाली की तिच्या नातीचं आता बरं चाललं आहे आणि ती आता चांगलीच श्रीमंत झाली असून मुंबईला प्रकाश पेठे मार्गावर एका बिल्डिंगमधे तिने एक मजला विकत घेतला आहे.रेवतीचा पत्ता घेऊन तिलाच भेटायला अलीकडे मी गेलो होतो.

मी रेवतीला म्हणालो,
“तुझी नाटकं मला फार आवडतात.तू मुंबईला आलीस की मी तुझं नाटक बघायला वेळ काढून येतो.सगळ्यात चांगली गोष्ट तू केलीस म्हणजे आवश्यक ते शिक्षण घेतलंस.आणि मग ह्या नाटकाच्या फंदात पडलीस.तुझी आजी नाटकात काम करायला खूप तरबेज होती.पण त्यावेळी लोकांना शिक्षणाचं महत्व तितकसं नव्हतं.आणि शिक्षण घ्यायला पैसापण नव्हता.”

मला रेवती म्हणाली,
“माझ्या वडीलांच्या उपदे्शामुळे आणि आमच्या चांगल्या आर्थिक परिस्थितीमुळे मला हे करायला जमलं.मी जरी इन्स्टिट्युट मधून शिकले असले तरी वेळो वेळी मी माझ्या आजीचा सल्ला घेत असते.कोकणात तिला भेटायला गेल्यावर आमच्या दोघांच्या नाटकाच्याच विषयावर गप्पा चालतात. माझी आजी आपल्या भाषेत मला भुमिके विषयी समजावून सांगत असते.आवेश बाळगून भुमिका करावी असं ती मला नेहमी सांगत असते.”

मी रेवतीला म्हणालो,
तुझ्या आजीची मी लहान असताना नाटकं बघीतली आहेत.त्यावेळच्या नट-नट्या अंगात आवेश आणूनच कामं करायची.प्रत्येक भुमिका जरा जास्त नाटकी वाटली तरी नाटक पहाण्यात मजा यायची.”
आपल्या आजीची नाटकं पाहिलेला मी पहिलाच तिला भेटलो असावा.आजी आवेशपूर्ण नाटकं कशी करायची हे माझ्याकडून कळायला तिला उत्सुकता होती.
मला म्हणाली,
“आवेशाबद्दल मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे.माझी आजी नाटकातली निरनीराळी आणि लांब लांब वाक्यं आवेशात कशी म्हणायची ह्याचं प्रात्यक्षीक करून मला दाखवतेच पण तुमचे विचार मला ऐकायचे आहेत.”
हे ऐकून मलाही बरं वाटलं.रेवतीच्या आजीची-सुनंदाची-आणि आता हिची-रेवतीची- नाटकं मी बघीतली असल्याने मला जे काय आवेशाबद्दल वाटतं ते मी रेवतीला सांगण्याचा प्रयत्न केला.
मी म्हणालो,
“आपल्या अंगात आवेश कुठून येतो याची मला नेहमीच जिज्ञासा राहिली आहे.आवेश जीवनात गती आणतो. आवेश, सकारात्मक दृष्टीकोनात आपले रूपांतर करून, जास्तीत जास्त वास्तवीक व्हायला,आणि त्यादृष्टीने प्रयत्नात असायला कारणीभूत होतो.

आवेशात कधीही न उलगडणारी अशी जादू असते; तो घामाघूम करतो,रडवतो,दुखावतो,त्याच्याकडून मरणही उद्भवलं जातं.आणि कुणालाही कळत नाही की,असं असूनही माणसं एव्हडी आवेशात का जातात.मला वाटतं की, आवेश येऊ पहात आहे अश्या क्षणाला,तुमच्यातलं काहीतरी, तुमच्या अस्तित्वासंबंधीच्या आकर्षणाला पकडून ठेवतं आणि त्याची पकड एव्हडी घट्ट असते की,तुम्ही त्याला सोडून देऊ शकत नाही. जे साधं म्हणून करायला जाता ते तुमच्या रोजच्या जीवनाचा, तुमच्या हृदयाचा,आणि आत्म्याचा एक भाग म्हणून रहातो.”

रेवतीला, माझं हे ऐकून, तिचा भूतकाळ आठवला.
मला म्हणाली,
“मला माझ्या लहानपणाच्या आठवणी आहेत.
मी लहानपणी शाळेतल्या रंगमंचावर पु.ल.देंच्या
“नाचरे मोरा”
ह्या गाण्याच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर,
हायस्कूल मधल्या,
“मज आणून द्या तो, हरीण अयोध्यानाथा”,
ह्या गदिमांच्या गीत रामायणातल्या गाणेवजा नाचात भाग घेतल्या नंतर, कॉलेजात हिंदी सिनेमातल्या
“होंठों में ऐसी बात मैं दबाके चली आई”
ह्या नाचात भाग घेतल्या नंतर…..आणि हे आणखी असेच काही स्नॅपशॉट्स माझ्या स्मृतिंच्या कॅटलॉगामधे विशेष लक्ष दिलेल्या गोष्टी म्हणून आहेत असं समजत गेले आणि तेच माझं जीवन झालं आहे.ह्या सर्व घटनांमुळे मी सुखदरूपाने आनंदी होत असते,त्यांचा विचार केल्यावर माझ्या मनात प्रश्न आल्यावाचून रहात नाही की ह्यांचा रंगभूमीशी,गाण्याशी, नाचण्याशी आणि भुमिका करण्याशी काय संबंध असावा.
माझ्या लहानपणी निरनीराळ्या चालीची गाणी ऐकल्यामुळे, किंवा मोठेपणी नावाजलेली नाटकं पाहिल्यामुळे त्याचा परिणाम माझ्यावर झाला असावा.

अगदी खरं सांगायचं तर,ही ठिणगी माझ्यात केव्हा पडली की ज्यामुळे मी रंगमंचावर प्रज्वलित होऊ शकले ह्याची मला कल्पनाच नाही.आणि ह्यातच सर्व महात्म्य पुरून उरलं आहे.”

मी रेवतीला म्हणालो,
“तुमच्या जीवनात विशेष काहीच रोमांचक घडत नाही अ्से बरेच क्षण येतात.पण कधीतरी विजेचा झटका अंगातून आरपार निघून जातो.मला वाटतं,असं काहीही घडत असेल की तसं वाटायला हा झटका तुम्हाला सक्रिय करतो.आणि त्यातला उत्तम भाग तो की, तुम्हाला हे कुठून घडलं हे कळतच नाही.
कधी ध्यानातही नसलेलं एखादं स्पंदन तुमच्यातून निघून जातं आणि सांगतं की,ह्या क्षणाला तुमचं जीवन उच्चतम आहे. तुम्ही हंसा,होत आहे त्या घटनेचा आनंद भोगा आणि तुम्ही कुठे आहात,कुणाबरोबर आहात,आणि काय करीत आहात ह्याचं बारीक निरक्षण करून त्याचं डबोलं करून तुमच्याजवळ ठेवा.”

आपल्याला कार्यक्रम करताना काय वाटतं हे सांगण्यासाठी रेवती उत्सुक्त होती.
मला म्हणाली,
“मी ज्यावेळी गाते,भुमिका करते त्यावेळी मला असंच भासत असतं.त्या हर्षोत्फुल्ल घटनेचा गुप्त मार्ग माझ्याकडून हाताळला गेला आहे असंही भासत असतं.रंगमंचावरच्या दिव्याच्या झगमगाटाने माझे डोळे दिपले गेले असताना, माझ्या अंगठ्याने मी मायक्रोफोनचं बटन दाबते. एक आंवढा गिळते, चांगला श्वास घेते,नंतर उच्चतम स्वरात गाण्यासाठी गळ्याचा पडदा तयारीत ठेवते. दिवे,प्रेक्षक,स्वरात गाण्यासाठी ताणलेल्या माझ्या शिरा ह्या सर्व गोष्टी मला उत्तेजीत करतात.वर्णन करता येणार नाही असा आनंद मला सुखदायी वाटतो.उचंबळून आलेल्या माझ्या भावना मला नशेत आणतात. मला गिळंकृत करून टाकतात. माझ्या रंद्रा,रंद्रातून ओथंबून बाहेर येणारा आवेश मला प्रेरित करीत असतो. रंगमंचावर तुमची भुमिका तुम्ही क्रियान्वीत करीत असताना,आवेश येणं आणि आवेश जगणं हा नुसता त्या स्वर्गसुखाचा आनंद भोगणं एव्हड्यापुरतंच नसतं तर—
माझ्याकडून झालेली चूक प्रेक्षकांच्या आलोचनात्म्क नजरेत पाहून रडू कोसळण्यातला आवेश,चालू असलेल्या कार्यक्रमासाठी घेतलेल्या पूर्वतयारीच्या मेहनतीचा आवेश.असे हे आवेश,तुमची उन्नति होण्यासाठी घेतलेली जोखिम असते असं मी माझ्या मनात म्हणत असते.नाटकातलं एखादं कठीण गाणं,आळवून,आळवून गाण्यात घेतलेलं धैर्य, आणि भुमिका करीत असताना स्वतःची गैरसोय करून टोकाचा सीन करण्याची तयारीत असणं, ह्या गोष्टी जोखिमीच्या सदरात मोडतात असं मी मनात ठरवते.

हो,हा आवेश कुठून येत असतो हे माझ्या मनातलं नेहमीचंच गुढ आहे.आणि मला वाटतं हे गुढ माझ्या मनात कायमचंच असणार.
आपल्या ह्या समाजात जे माहित नाही ते हुडकून काढण्यात लोक नेहमीच चिंतीत असतात.सर्वच गुढं उकलली जात असताना,मला वाटतं,हा आवेश कुठून येतो ह्याबद्दल वाटणारं एखादं गुढ उकललेलं राहिलं तरी हरकत नसावी.

मला आवेशाबद्द्ल आणि ते आमच्या जीवनात काय परिणाम करतं ह्याच्याबद्दल विशेष वाटतं.डोळे दिपून जावेत,ह्रुदय जोरात धडधडावं,कार्यक्रमाची पूर्व तयारी करीत रहावं,प्रयत्न करावेत,अपयशी व्हावं,आणि यशसंपादावं ह्याबद्दल मला विशेष वाटत असतं.”

“नुसतीच नाटककला,गाण्याची कला ह्याचीच तुला आवड नाही,तर तुझ्या मनातले विचार तुला दुसर्‍याला समजावून सांगायला तुझ्याकडे शब्द पण आहेत हे पाहून मला आनंद होतो.मला वाटतं तू चांगली शिकलीस म्हणून हे तुला साध्य होत असावं.तुझ्या आजीतला आणि तुझ्यातला हा फरक मला प्रकर्षाने जाणवला.अर्थात हा पिढी-पिढीतला फरक आहे हे उघडंच आहे.पण जुन्या लोकांकडून एखादं मार्मिक वाक्य,जसं तुझी आजी तुला म्हणयची,
“आवेश बाळगून भुमिका करायची”
हे वाक्य सर्व काही सांगून जातं.हे ही तितकच खरं आहे.तुझ्याशी चर्चा करून मजा आली.”
असं म्हणून मी जायला उठलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, January 27, 2011

तू साद मला देऊ नकोस

अनुवाद.

अशा एकांतातल्या रात्री
तू साद मला देऊ नकोस
अशा सुरांनी रडू यावे
ते वाद्य मला देऊ नकोस

शपथ घेतली तुला न भेटण्याची
माहित नसावे माझ्यावर बेतण्याची
घेऊन शपथ बहकून जाईन
असे मला तू करू नकोस
अशा एकांतातल्या रात्री
तू साद मला देऊ नकोस

मन माझे डुबले उमेद माझी तुटली
हातून माझ्या माझी सुखाणू सुटली
अशा वादळाच्या रात्री
काठावरूनी इशारा देऊ नकोस
अशा एकांतातल्या रात्री
तू साद मला देऊ नकोस

किती जाळ केला तरी उजेड कुठे दिसेना
किती प्रयत्न केला तरी विसर तुझा पडेना
विकल झालेल्या मला
तू विकलता देऊ नकोस
अशा एकांतातल्या रात्री
तू साद मला देऊ नकोस

कोणत्या कारणी तू दूर राहिलीस
होईन भटका कसे विसरलीस
लपून रहायचे असल्यास
कधी आठव काढू नकोस
अशा एकांतातल्या रात्री
तू साद मला देऊ नकोस

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, January 24, 2011

सुट्टी

“उत्तम उपाय म्हणजे आता लग्न कर.म्हणजे सुट्टीचा आनंद घ्यायला आणि कामाचा तणाव कमी वाटायला हा पण एक उत्तम उपाय आहे हे तुला दिसून येईल.”

आमच्या फ्लॅटमधून बाहेर आल्यावर खाली उतरताना दुसर्‍या मजल्यावर कमलाकर रहातो.रोज मी सकाळी कामावर जाताना त्याच्या फ्लॅटच्या दरवाजावर भलं मोट्ठं कुलूप बघतो.आणि तसंच संध्याकाळी येताना कुलूप दिसतं.त्याचा अर्थ कमलाकर माझ्या अगोदर निघून जातो आणि माझ्या नंतर घरी येतो.कमलाकर कुठे बाहेर गावी जायचा झाल्यास आमच्या घरी तसा निरोप ठेवून जातो.
गेले दोन तिन दिवस पहातोय त्याच्या दरवाजावर कुलूप नसतं.तो घरीच असावा असा मी अंदाज केला.पण दोन चार दिवस घरी रहाणारा कमलाकर नाही.कमलाकरची आई दोन महिन्यासाठी कोकणात गेली आहे हे मला माहित होतं.पाचव्या दिवशी घरी येताना कमलाकरच्या दरवाजावर कुलूप नाही असं पाहून मी बेल दाबून पाहिली.त्यानेच दरवाजा उघडला.

“इतके दिवस घरीच आहेस,तेव्हा आजारी वगैरे आहेस काय म्हणून कुतूहलाने मी तुझी चौकशी करावी म्हणून बेल दाबली.”
मी कमलाकरला त्याच्या घरात प्रवेश करताना म्हणालो.

“इतके दिवस म्हणजे मी चक्क दोन आठवड्याची सुट्टी घेऊन घरी आहे.सुट्टी नसती घेतली तर मात्र आजारी पडलो असतो हे खचित”
हंसत,हंसत मला कमलाकर म्हणाला.
पुढे सांगू लागला,
“मला सांगावसं वाटतं की,प्रत्येकाने थोडी सुट्टी घ्यावी.सतत काम करून शारिरीक आणि मानसिक ताण येतो.नकळत थकवा येतो.सुट्टीमुळे ह्या गोष्टी दृष्टीप्रांतात येतात.ह्या बाबतीत प्रत्येकाचं सांगण्यात एक यमक असतं,किंवा कामामुळे ताण येतो हे ठळक कारण दिलं जातं.

असंच मला माझ्या कामाबद्दल वाटत असतं.आत्ताच मला सुट्टी घ्यावी लागली.दोन आठवड्याची सुट्टी घेऊन मी कुठेही गेलो नाही,सुट्टीचा उधळेपणा केला नाही..माझ्या घरातच चिकटून राहिलो.मला किती बरं वाटलं हे सांगण्या पलीकडचं आहे.दोन आठवडे मी माझ्या कामाचा विचारपण मनात येऊ दिला नाही.त्यामुळे मन इतकं ताजं-तवानं राहिलं की परत कामावर गेल्यावर मस्त वाटणार आहे.”

मी म्हणालो,
“मला माहित आहे प्रत्येकाला आपलं काम निराळं वाटत असेल.पण प्रत्येक काम तिच समस्या उभी करतं.मानसिक आणि शारिरीक थकवा.
काम तुमच्या मनाशी खेळ खेळतं.तुमच्यात आहे नाही ते सर्व काढून घेतं.म्हणून मला वाटतं प्रत्येकाने सुट्टी घ्यावी. कटकटीच्या समस्यातून थोडा विरंगुळा मिळतो.कधी कधी हेच काम तुम्हाला एव्हड्या खोल खड्यात खेचून घेतं की त्यातून बाहेर येणं मोठं जिकीरीचं होतं.”

माझं हे ऐकून कमलकर म्हणाला,
“एकदा तर गम्मतच झाली.एव्हडा कामाच्या भाराखाली मी चेपून गेलो असताना माझा बॉस माझ्याकडे येऊन दुसर्‍याचं काम माझ्यावर टाकून गेला का तर त्यांच्याकडून त्याला दुसरी काही कामं करून घ्यायची होती.मी हतबल झालो.पण आठ तास काम करीत राहिलो.दिवसाच्या शेवटी एव्हडा थकलो की घरी जाण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.
घरी आल्यावर एव्हडा थकलो होतो की,माझी वैयक्तिक कामं करायला पण कठीण झालं.

रोज कामावरून घरी येईपर्यंत,ट्रेन,बस,गर्दीतून चालणं पार पाडल्यावर,जीव अगदी मेटाकूटीला येतो.आल्या,आल्या सरळ कोचावर पडून रहावसं वाटतं.
दुसर्‍या दिवशी पुन्हा कामावर जाण्या अगोदर जेव्हडी विश्रांती मिळेल तेव्हडी घ्यावी असं वाटतं.सुट्टी,माझ्या सारख्याला,एक विस्मयकारक औषध वाटतं.”

“कुणीही जरा विचार करावा.दिवसा मागून दिवस काम केल्याने एक प्रकारचं दडपण येतं.तुम्हाला सुट्टी आवश्यक असते. सुट्टी हा एक,मनावरचा भार कमी करायला आणि शरिरावरचं द्डपण कमी करायला,विस्मकारक मार्ग आहे.”
मी कमलाकरला म्हणालो.

“माझ्या दोन आठवड्याच्या सुट्टीत मी कुठेही न गेल्याने,घरात पडून राहिलेली बरीच कामं मला करता आली. नातेवाईकांशी आणि मित्र मंडळीशी वेळ घालवायला मिळाला.खरंच,सुट्टीही,कामापासून होणार्‍या तणावावर,चारही बाजूने होणारा इलाज आहे हे नक्की.”

कमलाकरचं हे ऐकून मी उठता उठता त्याला म्हणालो,
“उत्तम उपाय म्हणजे आता लग्न कर.म्हणजे सुट्टीचा आनंद घ्यायला आणि कामाचा तणाव कमी वाटायला हा पण एक उत्तम उपाय आहे हे तुला दिसून येईल.”
नेहमी प्रमाणे कमलाकर गालातल्या गालात हंसला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, January 21, 2011

रंगरंगोटी.

“सरतेशेवटी तुझ्या म्हणण्य़ावरून माझं मत मी तुला सांगतो.सौन्दर्य प्रसाधनं लावून चेहर्‍याची रंगरंगोटी माननीय दिसायला हवी.आणि त्याकडे कुणी उपेक्षितपणे पाहता कामा नये.”

शुभदाची लहानपणापासूनची ख्याती म्हणजे साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी.अशी मी तिला बरेच वर्ष पहात आलो आहे.मधे तिचा माझा संपर्क कमी झाला.शुभदा एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करण्यासाठी बंगलोरला गेली आहे असं तिचे वडील मला एकदा बोलल्याचं आठवतं.एक वर्षासाठी तिला युरोपला तिच्या कंपनीने पाठवलं होतं,हेही मी ऐकलं होतं.
शुभदा बंगलोरवरून रजेवर येणार आहे असही तीच्या वडीलानी मला सांगीतलं होतं.
त्यादिवशी तिच्या घरी फोन केला आणि तो शुभदानेच उचलला.मला घरी येण्याचा फार आग्रह केला.रोज दिसणार्‍या माणसाला,खूप दिवसाच्या अंतराने परत भेटायला नक्कीच बरं वाटतं.मी रविवारी तिच्या घरी गेलो होतो.

बेल वाजल्यावर दरवाजा उघडून शुभदाच समोर आली होती.माझ्या चेहर्‍यावर कसलाच भाव न पाहिल्याने,कारण मला तिने ओळखलं,पण मी तिला अजीबात ओळखलं नव्हतं, जोर जोरात हंसून माझ्याकडे पहात राहिली. माझ्या लक्षात आल्यावर मी तिला आवर्जून सांगीतलं,
“तू एव्हड्या जोरात हंसली नसतीस तर खरंच मी तुला ओळखलं नसतं.रस्त्यात दिसली असतीस तर शंभर टक्के तू म्हणून ओळखली नसती.”

“हो,माझ्या रहाणीत खूप फरक झाला आहे.आता मी पूर्वीची राहिली नाही.”
मला शुभदा म्हणाली.
“तुझ्या चेहर्‍यावरच्या रंगरंगोटीवरून आणि तुझ्या पेहरावावरून मला ते उघडंच झालं.पण तू कुठेतरी बाहेर जात आहेस वाटतं?”
मी शुभदाला प्रश्न केला.

“तुम्ही माझ्या बाबांबरोबर गप्पा मारीत बसा.एका तासात मी येते.माझी एक मैत्रीण बंगलोरहून आली आहे.तीला भेटून येते.ती जवळच रहाते.”
असं सांगून शुभदा खाली उतरली.

मी शुभदाच्या बाबांशी गप्पा मारताना म्हणालो,
“सगळं जग बदलत चाललेलं आहे.माझ्याही विचारसरणीत मी बदल करीत असतोच.पण कधी कधी एखाद्या व्यक्तिचा आपला मनात इमेज असतो.तुझी शुभदा पावडरसुद्धा चेहर्‍याला लावत नसायची.आज तीचा मेकअप पाहून आणि पेहराव पाहून मी अचंबीत झालो.”

“तिलाच येऊदे.तिलाच तू विचार.तिची बाजू तिच मांडील.”
मीतभाषी शुभदाचे वडील मला म्हणाले.

शुभदा आल्यावर मी तिला म्हणालो,
“बंगलोरला राहून तू फारच बदललीस.अर्थात हल्ली मुली घरात सुद्धा मेकअप करून रहातात.निदान टीव्हीवरच्या मालीकेत सगळी घरातली मंडळी विशेष करून बायका मंडळी अगदी बाहेर जायला निघाल्यासारखी टाप टीप,रंगरंगोटी करून, चेहर्‍याची सजावट करून, रहातात असं दाखवतात.अर्थात त्यात गैर काही नाही.जमाना बदलतो आहे.आणि बदललापण पाहिजे.”
शुभदाला जरा तीची कळ काढल्या सारखंच म्हणालो.

मला म्हणाली,
“सौन्दर्य प्रसाधनाबाबत सर्वसाधारण लोकमत चांगलं नसतं. भडक सौन्दर्य प्रसाधनाचा वापर करून खोट्या रुपाच्या मागे दडण्यासाठी हिकमती लढवायला बरेच लोक टाळाटाळ करतात.हे खरं आहे.
खरा उद्देश साधण्यात ह्या मताची मदत होत नाही.मी सौन्दर्य प्रसाधनं वापरते ते माझे दोष लपवण्यासाठी मुळीच नाही. माझ्याजवळ असलेला आत्मविश्वास प्रदान करता येईल हे अनुभवण्याचं समाधान मला मिळतं.

प्रत्येका जवळ नैसर्गीक सौन्दर्य असतं.पण प्रसाधनं वापरून आपल्या आवाजावर हेच सौन्दर्य जादू करूं शकतं.मी मानते की मी ह्याबाबतीत थोडी आधीन झाले आहे.जास्त करून ह्यात माझ्याजवळ कौशल्य आहे असा माझा समज आहे.
सौन्दर्य प्रसाधनातून मी मला अभिव्यक्त करते असं मला वाटतं.माझा चेहरा हा एक तैलचित्राचा कपडा आहे,आणि माझ्या चेहर्‍याची रंगरंगोटी ही एक कला आहे असं मला वाटतं.गैरसमज करून घेऊ नका.माझ्याजवळ रचनात्मकता मुळीच नाही.मला चित्र काढायला दिलंत तर माणसाचं माकड काढलं जाईल.खरंच मी मस्करी करीत नाही.परंतु,चेहरा रंगवण्याचा कुंचला माझ्या हाताला सापडला तर माझ्या दहाही बोटांतून रचनात्मकता नुसती वाहत असते,आणि त्यातून मला हवीती कला साध्य करायला,निर्मिती करायला,ती मदत करते,आणि त्याचा मला अभिमान वाटतो.”

“किती लोक आपली कला निर्मिती आपल्या चेहर्‍यावर प्रदर्शित करून दाखवतील.?”
मी शुभदाला प्रश्न केला.माझा उद्देश तीच्याकडून आणखी ऐकायचं होतं.

माझं हे ऐकून शुभदा रंगात येऊन म्हणाली,
“चेहर्‍याच्या रंगरंगोटीचा प्रयास सहजपणे करता येतो ही समजूत चुकीची आहे.खरंतर,सुसूत्रतेची झाक,सम्मिश्रणाची झाक,आणि दुसर्‍या खिचकट कौशल्याच्या गोष्टी,निराळंच चित्र उभं करतात.
नुसतं चेहर्‍यावर रंग फासण्यापेक्षा,प्रयास घेऊन कौशल्य दाखवण्यात निराळेच फायदे असतात.ह्या फायद्यामधे,हात आणि डोळ्याचं सुसूत्रीपणा सुधारणं, तसंच निरनीराळे रंग आणि त्यांची झाक मिळून उठावदारपणा आणता येणं हे अंतर्भूत असतं.चेहर्‍यावर रंगाची नियुक्ती करणं आणि सम्मिश्रण करणं ह्यातून सहनशीलता आणि चिकाटी कशी करायची ते शिकायला मिळतं.कलाकुसर चांगली दिसण्यासाठी रचनात्मकतेवर भार वाढवल्याने हे काम जरा जिकीरीचं होतं,आणि ह्याच्याकडे बरेच वेळा दुर्लक्ष केलं जातं.
काही प्रकारचा आत्मविश्वास येणासाठी चेहर्‍यावर रंगरंगोटी करण्यातसुद्धा फायदा असतो.मला मान ताठ करून उभं रहायला,जरा खुसखुसून हंसायला बरं वाटतं. आणि माझ्या दिखावटीबद्दल मला आरामदायक वाटतं.रोज जरासा आत्मविश्वास वाढला तर कुणाला नको होईल.?”

मी शुभदाला म्हणालो,
“सरतेशेवटी तुझ्या म्हणण्य़ावरून माझं मत मी तुला सांगतो.सौन्दर्य प्रसाधनं लावून चेहर्‍याची रंगरंगोटी माननीय दिसायला हवी.आणि त्याकडे कुणी उपेक्षितपणे पाहता कामा नये.”

“अगदी माझ्या मनातलं सांगीतलंत”
असं म्हणून झाल्यावर आईने हांक मारली म्हणून शुभदा आत गेली आणि बाहेर आल्यावर चहाचा कप पुढे करून मला म्हणाली,
“तुम्ही दिलेलेल्या मताबद्दल थॅन्क्यु”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, January 18, 2011

व्रण

“जेव्हडे म्हणून माझ्यावर व्रण आहेत ते माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे मी भोवलेले आहेत.”

मला माझ्या लहानपणी नेहमीच वाटायचं की,माझी मुलं त्यांच्या बालपणाचं आकलन,त्यांच्या जवळ किती खेळणी होती,ह्यावरून नकरता त्यांच्या अंगावर किती व्रण मोजता येतील यावरून करतील.मला व्रणाबद्दल विशेष वाटतं. व्रणावरून माझ्या मनुष्यपणाचं लक्षण अजमावलं जातं,कारण प्रत्येक व्रणाला स्वतःचा म्हणून एक इतिहास आहे. मग तो व्रण किती लहान का असेना,विषयवस्तु म्हणून तो लक्षात येतो.मुख्य कारण म्हणजे प्रत्येक व्रणाने
मला काहीना काही धडा शिकवला आहे.उदाहरण सांगायचं झाल्यास,एखादी वस्तु फारच गरम असताना त्याला स्पर्श करायचा नाही,तसंच एखादी वस्तु धारदार असल्यास तीला उघड्या हाताने हाताळायचं नाही.
प्रत्येक व्रण माझ्या कडून झालेल्या चूकीची दूरवर आठवण करून देतो.खरंच माझ्यावर खूपच व्रण आहेत.

ह्यातल्या काही चूकावरून मी शिकलो आहे,आणि काहीवरून अजीबात शिकलेलो नाही.काही गोष्टी आपण करतो आणि करतच रहातो. उदा.अनवहाणी-उघड्या पायाने-अणकुचीदार वस्तुवरून चालणं.
जेव्हडे म्हणून माझ्यावर व्रण आहेत ते माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे मी भोवलेले आहेत.
कधीही मी कोकणात गेलो की माझ्या आजोळी जावून आल्याशिवाय रहात नाही.आणि मग रेडीच्या चौपाटीवर गेल्या शिवाय सोडत नाही.रेडी गावात चौपाटीला लागून असलेल्या एखाद्या होटेलात दोन दिवसासाठी खोली घेऊन रहातो.समुद्राचं मला खूपच आकर्षण आहे.ऐन भरतीच्यावेळी फेसाळलेल्या लाटा फुटतानाचं दृश्य किनार्‍यावर उभा राहून मी तासनतास न्याहळत असतो.अशावेळी कानावर आपटणार्‍या ,फोफावलेल्या वार्‍याचा आवाज मला वेडं
करून सोडतो.दूरवरून दिसणार्‍या एकामागून एक येणार्‍या लाटा प्रथम पाण्यावर हेलकावे खात येत असतात. त्यातली सर्वांत पुढची लाट वार्‍याकडून कवटाळली गेली की ती फुटलीच म्हणून समजा.कवटाळलेल्या लाटेतलं पाणी किती वळकट्या घालतं त्यावर तिला फुटून किती फेस निर्माण व्हावा हे अवलंबून असतं.हे झालं भरतीच्या वेळी.

ओहोटी असली की पाणी चौपाटीपासून इतकं आत गेलेलं असतं की एरव्ही कधीच न दिसणारी खडकं दिसायला लागतात.नदीला जसा अचानक पूर-फ्लॅश फ्लड-येतो तसा समुद्राला ओहोटी आल्यावर अचानक भरती येत नाही. मधे बरेच तास निघून जावे लागतात.त्यामुळे ओहोटीच्यावेळी खडकांपर्यंत समुद्राच्या पोटात बिनदास चालत जावं.

एक दिवशी असंच झालं.रेडीला माझा मुक्काम असताना, चौपाटीवर फिरायला गेलो होतो.ओहोटी येऊन बराच वेळ निघून गेला असावा.आणि भरतीला सुरवात होऊन थोडावेळ झाला होता.दूरवरची खडकं दि़सत होती.काही खडकांवर पाणी आदळत होतं.कडक रखरखीत उन्हाचा तो दिवस होता. खडकावर उभं राहून मासे गळ लावून पकडण्याचं उत्तम वातावरण होतं.मी मासे पकडण्यासाठी गळ घेऊन गेलो होतो.एका उंच खडकाला आपटून लाटा फुटत होत्या. त्याच खडकावर उभं राहून पहावं म्हणून त्या खडकापर्यंत गेलो.ही पहिली चूक केली. दुसरी चूक म्हणजे खडकावर चढून वर जाण्यापूर्वी पायातले बूट काढून घेतले.
खडकावर चढून गेल्यावर एका धारदार जागी माझा पाय पडला.समुद्राच्या पाण्याच्या सततच्या मार्‍याने ही खडकाची जागा घासून घासून धारदार झाली असावी.

खार्‍यापाण्यामुळे माझ्या तळव्याला चूरचूरायला लागलं.मी खडकावरून खाली वाळूत उतरलो.मागे किनार्‍यावर चालत चालत येताना मागे वळून पहात होतो.वाळूत रक्ताची धार दिसत नव्हती.पण नंतर जखमेत वाळू शिरल्यामुळे रक्त यायचं बंद झालं होतं.पण मला तो पाय वापरून चालणं कठीण व्हायला लागलं.किनार्‍यावरचं माझं होटेल अर्ध्या मैलाच्या आत असल्याने लंगडत चालायला मला कठीण झालं नाही.

अभिमानने सांगावसं वाटतं,पहिली गोष्ट म्हणजे,पंधरा,वीस मिनिटांच्या लंगडत चालण्याने मी एकदाचा माझ्या खोलीत पोहोचलो.आणि अभिमानाने सांगावसं अशीच दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन एक व्रणाची खूण माझ्या तळव्यावर आहे हे शेखी मिरवून सांगता आलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, January 15, 2011

चिकटमातीच्या बाहुल्या.

“चित्राच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून मी तिला जवळ घेतलं.ते अश्रू आनंदाचे होते आणि दुःखाचेही होते.”

अलीकडे मुंबईत खूप पाऊस पडला की पाणी प्रचंड तुंबून रहातं.सगळे व्यवहार ठप्प होतात.तसं पूर्वी होत नव्हतं.त्याचं कारण काय असावं ह्याचा विचार करण्या ऐवजी माझं मन तो दिवस आठवण्यात मग्न झालं.असाच मी एकदा अंधेरी स्टेशन जवळ वरसोवाच्या बससाठी लाईनीत उभा होतो.पाऊस जोरात पडत होता.माझ्या मागे चित्रा उभी होती.तिने मला हाय म्हटल्यावर माझ्या लक्षात आलं.

ते पावसाळ्याचेच दिवस होते.बसमधे आम्हा दोघाना उभं राहून प्रवास करावा लागला होता.चित्रा नवरंग जवळ रहात असल्याने ती माझ्या अगोदर उतरणार होती.उतरण्यापूर्वी मला म्हणाली,
“आम्ही ठाण्याला घोडबंदर जवळ एक टुमदार बंगलावजा घर घेतलं आहे.आणि लवकरच तिकडे रहायला जाणार. पाऊस संपण्यापूर्वी तुम्ही वेळ काढून तिकडे या.पावसात तिकडे मजा येते.”

चित्रा तेव्हा निवृत्त होणार होती.तिचा नवरा आदल्यावर्षी निवृत्त झाला होता.
“मी नक्की येईन.”
असं सांगेपर्यंत तिचा स्टॉप आला.आणि ती उतरली.
चित्राला एक मुलगी होती.तिचं लग्न होऊन तिला एक मुलगी होती.

मी ज्यादिवशी चित्राच्या घोडबंदरच्या बंगल्यावर गेलो त्यादिवशी भरपूर पाऊस पडत होता.मला चित्राच्या मुलीने अंधूकसं ओळखलं पण तेव्हड्यात चित्रा आली.मला पाहून तिला खूप आनंद झाला.

चित्राची नात बाहेर अंगणात पावसात खेळत होती. बंगल्यासमोर छान बाग होती.आणि छोटसं पटांगण होतं.चित्राची मुलगी आपल्या मुलीला आत घरात ये म्हणून ओरडून सांगत होती.पण ती छोटी येणार नाही म्हणून हाताने दर्शवीत होती.तिच्या अंगावर लाल रंगाचा रेनकोट होता आणि खाली पायात लहान मुलांचे रेनबूट होते.
चित्रा आपल्या मुलीकडे बघून हंसत होती.आणि मुलगी रागावलेला चेहरा करून आईला चिडून म्हणाली,
“तुच तुझ्या नातीचे वेडे लाड करीत आहेस.आजारी झाली तर? आणि चिखलात ती आता घातलेले कपडे मळवून येणार आहे त्याचं काय?”

हा त्यांचा संवाद मी आल्या आल्या ऐकत होतो.मला तो सीन पाहून जरा गंमत वाटली.
जेवणं झाल्यावर मी सहज चित्राला विचारलं,
“तुझ्या नातीला घरात यायला सांगण्या ऐवजी तू हंसत का होतीस? ती चिखलात नाचत होती आणि कपडे खराब झाले होते हेही खरं आहे.”

“माझे लहानपणीचे दिवस मला आठवत होते.म्हणून मी हंसत होते.”
चित्राचं हंसं लक्षात ठेवून मी त्या संबंधाने प्रश्न विचारला ह्याचं कौतूक करीत ती मला असं म्हणाली.
आणि पुढे सांगू लागली,
“कोकणात पावसाच्या दिवसात आमच्या घरामागच्या परड्यात पाणी साचल्यावर चिकण मातीतून छान छान आकाराच्या बाहुल्या आम्हाला तयार करता यायच्या.लहान असताना माझा ह्या गोष्टीवर खूप भरवसा होता.असा एकही पावसाळा गेला नाही की मी माझ्या लहानपणी रेनकोट अंगावर घेऊन आणि पायात माझ्या बाबांचे रेनबूट घालून परड्यात तासनतास राहून चिखलात खेळत नसायची.खरं म्हणजे कपडे एकदम मळून जायचे.”

“म्हणून तू तुझ्या नातीला पावसात मनमुराद खेळायला देत होतीस की काय?”
मी चित्राला प्रश्न केला.

“नाही,नाही, गंमत पुढेच आहे.”
असं म्हणून, जाणून घेण्याची माझी उत्सुकता वाढवीत चित्रा पुढे सांगू लागली,
“मी जेव्हा आई झाली,तेव्हा पार विसरून गेली की,लहान मुलांनी आपले कपडे मळवायचे असतात.मला आठवतं माझी हीच मुलगी लहान असताना चिखलात खेळताना पाहून, चिखलाच्या बाहूल्या तयार करताना पाहून,लहानपणी मी स्वतः माझ्या आई समोर अशीच चिखलात खेळत असतानाही, तिने आपल्या हातात चिकण माती घेऊन कपडे मळवताना पाहून मात्र मी माझं नाक मुरडल्या शिवाय राहिली नाही.
मला आठवतं माझे बाबा, मला चिखलात खेळताना पाहून,माझ्या जवळ येऊन म्हणाले आहेत की चिखलात खेळून कपडे मळवूनसुद्धा तू चांगलीच मुलगी होणार आहेस.”

“आतां माझ्या लक्षात यायला लागलंय.पिढी,पिढीतला फरक जाणवायला लागलाय.”
मी म्हणालो.

मला समजावून सांगताना म्हणाली,
“माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर जीवनातले महत्वाचे धडे शिकत असताना,मी मात्र तिच्या मळक्या कपड्याविना दुसरं काहीच मनात आणीत नव्हते. खरं म्हणजे,ती जीवनात शिकत होती की,जे आपल्याला आवडतं,जे करताना आपल्याला आनंद होतो,ते करायला कुणाचीच हरकत नसावी,मात्र जोपर्यंत त्याचा कुणाला उपद्र्व होत नाही तोपर्यंत.ती शिकत होती की अगदी साध्या गोष्टीतून जीवन जगण्यालायक असतं.ती शिकत होती की लहान मुलांनी कपडे मळवले तरी चालतं.

एकदा मला आठवतं, माझी मुलगी साधारण सहा वर्षांची असताना एका पावसाळ्या दिवशी दरवाज्यात येऊन उभी ठाकली.पूर्ण भिजलेली होती. पायातले बुट काढून झाल्यावर ओले चिंब मोजे काढून त्यातलं पाणी पिळून काढून कोपर्‍यात टाकून घरात आली.नंतर अभ्यास करायला बसली असताना कुरकुरायला लागली.तिची पावलं खूपच दुखत होती.म्हणून मी तिची पावलं न्याहाळून पहात असताना,मला दिसून आलं की,ती एव्हडी ओली चिंब भिजली होती की,गच्च भिजल्यामुळे तिच्या पावलांना सुरकुत्या आल्या होत्या.बादलीत पाणी घेऊन त्यात तासनतास पावलं बुडवून कशी व्हावीत तशीच झाली होती.मी तिला विचारलं,
“कितीवेळ तुझे पाय पाण्यात होते.?”
अगदी निष्पापपणे म्हणाली,
“अं,अं, शाळेतल्या मैदानातल्या चिखलात पहिल्या सुट्टीपासून खेळत होतो.”
माझ्याच डोक्यात थोडं गणीत करून पाहिल्यावर दोन-तीन तास ती पाण्यात आणि चिखलात खेळत होती असं माझ्या लक्षात आलं. पावलं दुखली तर त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नव्हतं अशी मी समजूत करून घेतली.
मी बरीच भावनावश झाली होते,आणि तिला सांगावसं वाटलं होतं की,
“तू काय केलंस ते बरोबर नव्हतं”
पण ज्यावेळेला मी तिच्या डोळ्यात पहायला लागली तेव्हा मलाच माझा चेहरा दिसायला लागून माझी आई मला बाबांचे रेनबूट कुठे ठेवले आहेत तेच सांगत आहे असं भासलं.मी माझ्या मुलीला माझ्या मिठीत घेतलं आणि तीला म्हणाले,
“तुझ्या आईने तुझ्या वयावर असंच केलं होतं.चिखलात खेळणं मजेचं असतं.पण त्या अगोदर तुला रेनबूट घेऊया,परत तू असंच करण्यापूर्वी मात्र.”

प्रत्येक पावसाळ्यात एखाद्या दिवशी चिखलात,चिकट मातीत कसं खेळून मजा करायची ते जे मी शिकले होते,ते काही पाऊस आणि चिखल ह्याच्याच संबंधाने नव्हतं,कारण साधीशी गोष्टपण कारणीभूत होऊ शकते. मला वाटतं,जीवन संपूर्ण जगावं,आणि एकही क्षण असा दवडू देऊ नये की तोंडावर हसूं न यायला तो क्षण कारणीभूत व्हावा.

माझ्या लहानपणी आलेल्या अनेक अशाच पावसाच्या दिवसातला एकतरी दिवस माझ्या मुलीला मिळावा आणि मला मिळालेला आनंद तिलापण मिळावा आणि पुढे माझ्या नातीला पण मिळावा असं माझ्या मनात त्यावेळी आल्याशिवाय राहिलं नाही.”

“हे तुला आणि तुझ्या मुलीला माहित असूनही, आईच्या जीवाला शेवटी आपलं मुल आजारी पडेल ह्याची रुखरुख मनात असल्याने,तुला काय आणि तुझ्या मुलीला काय आपल्या मुलाला पावसात खेळताना पाहून त्याला रागावल्या शिवाय राहावत नाही,हे मला तरी अगदी स्पष्ट झालं आहे.
कुणीतरी आईबद्दल म्हटलंय,
“आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक,आईच्या पायी”

चित्राच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून मी तीला जवळ घेतलं.ते अश्रू आनंदाचे होते आणि दुःखाचेही होते.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, January 12, 2011

रंगमंच.

“मी ती धून नुसतीच वाजवली नाही तर मी वन्स-मोअर घेतला.”

लग्नाचा समारोप झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी एकाच्या घरात पार्टी होती.मला त्या पार्टीला आमंत्रण होतं.रात्री गाण्याचा कार्यक्रम होणार होता हे मला माहीत नव्हतं.पार्टी संपल्यावर मी निघून जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्या घराची बेल वाजली आणि बघतोतर मृणाल खरे आणि तिच्याबरोबर पेटी,तबला,व्हायोलीन वाजवणारे दोन-तीन लोक होते.मला पाहून मृणालला आश्चर्य वाटलं.
“जाता कुठे थांबा ना!”
मला मृणाल म्हणाली.
तेव्हड्यात घरातले यजमान पण म्हणाले,
“तुमच्या आमंत्रणात पार्टीनंतर गाणं आहे हे लिहिलेलं होतं.घरी जाऊन खास काम नसेल तर बसा.आज शनिवार आहे.उद्या सुट्टीच आहे.थोडं जागरण झाल्यास हरकत नसावी.”
एव्हडा दोघांकडून आग्रह होताच मी गाण्याला बसायचं ठरवलं.त्याशिवाय मृणालचं गाणं मी कित्येक युगांत ऐकले नव्हतं.ती लहान असताना लहान,लहान कार्यक्रमात गायची त्या कार्यक्रमाला मी हजर असायचो.आता ती कुणाच्या घरी जाऊनसुद्धा गाणं म्हणते हे मला आजच कळलं.त्यादिवशी पहाटे पर्यंत गाण्याचा कार्यक्रम मस्त एन्जॉय केला.
“तुझ्या घरी मला एक दिवस यायचं आहे.”
मी मृणालला त्या पहाटे घरी जाता जाता म्हणालो.
“नक्कीच या मला खूप आनंद होईल.”
मला मृणाल म्हणाली.

असाच एकदा तिला वेळ आहे हे समजल्यावर तिच्या घरी गेलो होतो.अर्थात गप्पा झाल्याच.
मी मृणालला म्हणालो,
“तुझ्या लहानपणी मी तुझ्या गाण्याचे कार्यक्रमाना हजेरी लावली आहे.आता तर तुझी चांगलीच प्रगती झाली आहे.त्यादिवशीच्या कार्यक्रमात मला तू अगदी निपूण झालेली दिसलीस.”

मृणाल जरा हंसली.मला म्हणाली,
“मी जेव्हा शाळा संपवून कॉलेजात जाण्याच्या मार्गावर होते,तेव्हा माझ्या आईची जवळ जवळ खात्रीच झाली होती की मी कॉलेजच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून नाटक-गाण्याच्या उपक्रमात जास्त लक्ष केंद्रीत करणार आहे.त्यामुळे मुळ अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मी माझी करियर निष्फळ करून घेणार आहे.
तसं मला नाटक-गाण्याच्या कलेत मनापासून आवड होती.पण मी शाळेत असताना ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं.

माझी आई मला सतत आठवण करून द्यायची की,
“तुला कॉलेजमधे शिकण्याचा एकच चान्स आहे.”
खरंतर,माझी आवड मी जर का शाळेत असताना करण्याच्या प्रयत्नात राहिली असती तरी आई काय म्हणायची त्याची मला कसलीच भीति वाटली नसती.परंतु,नंतर मला माझी वाट पूर्ण मोकळी झाल्याचं भासत होतं.

मी शाळेत एखाद-दुसर्‍या कार्यक्रमात गायची.एखाद-दुसर्‍या नाटकात भाग घ्यायची.शाळेच्या वाद्यवृंदात पेटी किंवा व्हायोलीन वाजवायची.शाळेच्या मुला-मुलींच्या ग्रुपमधे कसल्याही उपक्रमात माझा भाग असायचाच.रंगमंचावर मी हटकून असायची.हायस्कूलमधे जाण्यापूर्वी मी भीत,भीतच काम करायची. पण तेव्हडी मजा येत नव्हती.मला आवड होती म्हणून मी हिरीरीने भाग घ्यायची.”

“मग तू कॉलेजात गेल्यावर नाटकात, वाद्यवृंदात भाग घ्यायला लागलीस का?”
मी मृणालला प्रश्न केला.
“अगदी बरोबर”
असं म्हणून मृणाल पुढे म्हणाली,
“हायस्कूलमधे गेल्यावर रंगमंचाचा चमत्कार मला दिसायला लागला.शाळेच्या शेवटच्या वर्षात मला दिसून आलं की, मी उगाचच भीतिने रहायची.
आता कॉलेजात भलामोठा वाद्यवृंद होताच त्याशिवाय नाटकाचा पण मोठा-खरंच मोठा- गृप होता.नाटकातलं एखादं गाणं मी उच्चतम स्वरात गायची.वाद्यवृंदात अक्षरशः मला कधीकधी एकटीला-सोलो-पेटीवर साथ द्यायला लागायची. आणि ह्यात भर म्हणून,काही कार्यक्रमात आमचे संगीताचे गुरूजी अख्या वाद्यवृंदात मला उभी रहायला सांगून व्हायोलीनवर धुन वाजवायला सांगायचे.त्यामुळे अख्खी धून संपेपर्य़ंत मला उभं रहावं लागायचं.अख्ख्या कार्यक्रमात इतका महत्वाचा भाग मला पूर्वी कधीच मिळाला नाही. प्रामाणीकपणे सांगायचं झाल्यास अक्षरशः माझी भंबेरी उडायची.

एकदा अशाच एका कार्यक्रमात माझ्या तणावपूर्ण मनाची फूटतूट झालेली होती.त्या, एकट्यानेच वाजवा्च्या व्हायोलीनवरच्या धूनेची वेळ येऊन ठेपल्यावर उभं रहाण्यासाठी माझे पाय लटपटू लागले.व्हायोलीनचा बो घेतल्यावर हात थरथरू लागले.रंगमंचावरचे दिवे मला जरूरी पेक्षा जास्त प्रखर दिसायला लागले.मला चक्कर येते की काय असं वाटायला लागलं.माझ्या मला मी कशी समजूत घालून घेतली आठवत नाही.दोरखंडावरून टेकडी वर चढून गेल्यावर दोरखंड कापल्यासारखं वाटलं. काहीतरी झालं खरं,एकाएकी एका हत्तीचं बळ माझ्या अंगात आलं.”

मी थोडा अधीर होऊन मृणालला विचारलं,
“मग शेवटी धून वाजवलीस का नाही?”

“मी ती धून नुसतीच वाजवली नाही तर मी वन्स-मोअर घेतला.मी हर्षोत्फुल्ल झाले ते अवर्णनीय आहे.मला आठवतं माझ्या मनात विचार आला की एखादा “घुटू” घेणारा,घेतल्यावर भावना उचंबळून कशा येतात ते सांगतो त्याचा प्रत्यंतर आला.
त्यानंतर कधीही रंगमंचावर आल्यावर मागे बघणे नाही.मला असं वाटायला लागलंय की,एखादा उपक्रम तुम्हाला आनंदी करून जात असेल तर दुसरासुद्धा तेच करणार.आवाहन घेणं म्हणजे ते अगदी चटक लावणारं असतं.निर्वाणाला गेल्यासारखं असतं.इहलोकांत नसल्यासारखं वाटतं.माझ्या मते “घुटू” न घेता बेहोशी आल्यासारखं वाटतं.”
मृणाल अगदी रंगात येऊन मला सांगत होती.

“मी तुझा गाण्याचा कार्यक्रम अलीकडेच पाहिला.मस्तच झाला.आता तुझ्या नाटकाच्या कार्यक्रमाला मला यायचं आहे.”
असं मी म्हणाल्यावर,मृणाल म्हणाली,
“अगदी अवश्य या.पुढल्याच आठवड्यात माझं नाटक आहे.मी तुम्हाला नाटकाचा पास पाठवीन.”
नंतर मी तिचा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, January 10, 2011

लाली लज्जेची आली गालावरती

अनुवाद

शब्दा शब्दाला तू रूसूं नकोस
तुला स्वतःला फसवूं नकोस
रंग बदलत राहे हे जीवन
तुझ्याच भाग्यावरी रूसूं नकोस

लाली लज्जेची आली गालावरती
ओल्या होऊनी पापण्या हळूच झुकती
लाली नयनामधे अन अंतरी प्रीति
लपून छपून येई हंसू ओठावरती

ढळल्या रात्री काळोखा घेऊनी
नव्या पहाटे येती दिशा बहरूनी
भरूदे जीवन दुःखानी वा सुखानी
नशिबी आहे रहाणे ह्याच स्थानी

फुले खुशीची हरएक घेई
नयनातील आसवें कुणी न पाही
हंसेल दुनिया पाहूनी तुझे हंसणे
अथवा लागेल एकट्याला रडणे

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, January 7, 2011

डुलकी.

“थोडक्यात मी म्हणेन सगळं जग निश्चिंत आणि शांत रहाण्यासाठी लोकांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमात थोडा डुलकी घेण्यासाठी वेळ ठेवावा.”

आज शुक्रवार होता.मी ऑ्फिसमधून जरा लवकर निघालो.लवकर निघण्याचं आणखी एक कारण होतं.अपनाबजारमधे हापूसचे आंबे आले आहेत हे मी दुकानाच्या बाहेर लिहून ठेवलेली पाटी सकाळी ऑफिसात जाताना वाचली होती.
एक चांगली देवगडच्या हापूस आंब्याची पेटी घेऊन दुकानाच्या बाहेर पडत असताना मदन घारपुरेला त्याच्या बिल्डिंगमधे चढताना पाहिलं.तो अपनाबजारच्या समोरच रहातो.आंब्याची पेटी घेऊन त्याच्या घरी कुठे जायचं म्हणून काय करावं याचा विचार करीत होतो तेव्हडयात माझ्या पुतण्याची गाडी दिसली. त्याला थांबवून ती पेटी त्याच्याजवळ घरी नेण्यासाठी देऊन मदनकडे जरा गप्पा मारायला जायचं म्हणून ठरवलं.

मदनला बिल्डिंगमधे चढताना पाहिल्यानंतर ह्यात अर्धा तास निघून गेला होता.
मदनबरोबर एखादा चहाचा कप ढोसावा म्हणून त्याच्या घरच्या पायर्‍या चढत वर गेलो.बेल दाबल्यावर त्याच्या मुलीने, प्रियाने,दार उघडलं.माझ्याच तोंडावर हात ठेऊन मला जोराने बोलण्याचा प्रतिबंध करून आत बोलावलं.आणि कानात हळू बोलली,
“बाबा आत्ताच आले आहेत आणि झोपले आहेत.”
मी प्रियाला विचारलं,
“काय त्याला बरं आहे ना?”
मला म्हणाली,
“ते अर्धा तास डुलकी काढून मग उठणार आहेत.त्यांना अशी डुलकी काढण्याची संवय आहे.तुम्हाला त्यांनी अपनाबजारात उभे असताना पाहिलं.मला म्हणाले,
तुम्ही आलात तर बसवून घे.”
खरंच अर्ध्या तासाने मदन उठला,फ्रेश होऊन माझ्या जवळ येऊन बसला.
मी मदनला म्हणालो,
“अरे,हे डुलकी काय प्रकरण आहे.?एकदा मी तुझ्या ऑफिसमधे आलो होतो.तुझ्या कॅबिनच्या बाहेर बसलेला शिपायी मला म्हणाल्याचं आठवतं,
“साहेब लंच अवरमधे जरा डुलकी काढतात.कुणी आलं तर थोडावेळ बाहेर बसवून घ्यायला सांगीतलंय.”
मी तुला त्यावेळी विचारलं नाही.पण आता तुला घरी विचारल्याशिवाय राहवत नाही.”
डोळ्यावरचा चष्मा हातात घेऊन टॉवेलने फुसता फुसता थोडावेळ हंसत राहून मला म्हणाला,
“डुलकी काढण्याबद्दल मला विशेष वाटतं.एखाद्या कटकटीच्या दिवशी,किंवा एखाद्या खूप परिश्रम झालेल्या दिवशी,घरी आल्यानंतर थोडीशी आरामदायी डुलकी काढल्यानंतर ताजेतवाने होण्यात जी मजा असते ती वेगळीच म्हटली पाहिजे.आता ह्या डुलकीला काही म्हणतात “उर्जादेती डुलकी.” ही साधारण तासभराची असते,पण माझं पाहिलंत तर मला अर्ध्या तासाची डुलकी पूरी पडते.ह्या डुलक्या कधीकधी आळसात येतात आणि कधीकधी आदल्या आणि रात्रीच्या झोपेच्या कमतरतेमुळेसुद्धा येतात.पण इतरवेळी डुलकीमुळे नक्कीच थोडा सुट्कार मिळतो.”

मी मदनला म्हणालो,
“हे काय मी नवीनच ऐकतोय.कुठेतरी सांयटिफीक सेमिनारला जाऊन आल्यावर एखाद्या चर्चेच्या विषयात डुलकीबद्द्ल कुणीतरी रिसर्च करून पेपर वाचल्यासारखा वाटतो.”

“तसं काही नाही.मी हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो.”
असं म्हणून जरा गंभिर होऊन मदन मला सांगायला लागला,
“डुलकीबाबत चांगलं सांगायचं म्हणजे,तुम्ही एकदा डुलकी काढलीत आणि त्यातून जागं झाल्यावर नुसतंच ताजंतवानं वाटत नाही तर तुम्ही चांगल्या लहरीतपण म्हणजेच मुडमधेपण येता.मला बरं न वाटल्यास, मी उपचार करण्यापूर्वी एक डुलकी काढतो.मला जर का कटकटीचा दिवस गेला,कुणाशी वादविवाद होऊन मन वैतागलं असल्यास,चिडचीडेपणा अंगात आला असल्यास,मी सरळ घरी जातो आणि एक डुलकी काढतो.नंतर मात्र एकदम ताजातवाना होतो,मला स्फुर्ती येते.बॅटरी चार्ज कशी करतात तसं वाटतं.काही काम करावं असं वाटतं,खाली जाऊन एखादी चक्कर टाकावीशी वाटते.

प्रामाणीकपणे सांगायचं झाल्यास, डुलकी काढून झाल्यावर उठायला अंमळ जीवावर येतं. पण एकदा उठल्यावर तासनतास काम करायला मी तयार असतो.
कुठचीही गोष्ट यशस्वीपणे हाताळण्यासाठी लागणार्‍या क्ल्रुप्तिचा जरा विचार केला तर: तुम्हाला बरं वाटावं म्हणून टीव्हीवर एखादी मालिका बघण्यात वेळ घालवण्या ऐवजी,किंवा ते एखादं खिन्नं करणारं गीत ऐकून झाल्यावर परत परत ऐकण्यासाठी तुम्ही प्रयत्नात असण्याऐवजी मी तुम्हाला सुचवीन की उब येण्यासाठी एखादी चादर लपेटून,आणखी एक उबदार उषी घेऊन, तुमच्या बिछान्यात किंवा तुमच्या सोफ्यावर पडून राहून डुलकी काढण्यात आराम करावा.

मौज मजा करण्याचा विचार केला तर: इकडे तिकडे भटकण्यात आपण वेळ घालवतो,गाडी काढून लांब कुठेतरी फिरून येतो त्याऐवजी डुललकी काढावी. डुलकी तशी दिसायला साधारण दिसते,खरंतर ती एक छोट्याश्या विश्रामाचा प्रकार आहे.तिच्यामुळे तुम्हाला ताजंतवानं वाटतंच शिवाय पुढे घेतल्या जाणार्‍या जबाबदार्‍यांना ती तुम्हाला नवजीवन देते.”

मदनचं हे सर्व डुलकीबद्दल पुराण संपताच त्याची पत्नी चहाचे कप घेऊन आली आणि मला एक कप देत म्हणाली,
“थोडक्यात मी म्हणेन सगळं जग निश्चिंत आणि शांत रहाण्यासाठी लोकांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमात थोडा डुलकी घेण्यासाठी वेळ ठेवावा हे तात्पर्य.”

मला वाटलं,मदन काहीतरी रागावून आपल्या पत्नीला बोलेल.
पण तो आत्ताच डुलकीतून जागा होऊन आल्यामुळे ताजातवाना आणि लहरीमधे म्हणजे मुड्मधे होता, हे त्यांने आम्हा दोघांकडे पाहून आपल्या चेहर्‍यावरचं हास्य दाखवलं,त्यावरून मी समजलो,
“हा डुलकीचा परिणाम असावा.”
असं मी मनात निश्चित केलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनेया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, January 4, 2011

शोभनेची सहजता.

“मला एव्हडं माहीत झालं आहे की,जीवनातल्या साध्या गोष्टी,ज्या मामूली आणि नगण्य वाटतात त्याच खरं जीवन जगण्यालायक करतात.”

शोभना न्युरॉलॉजीमधे पीएचडी आहे.इंग्लंडला शिकली.तिकडेच प्रकाश जोशी ह्या बिझीनेसमनशी ओळख झाल्यावर काही दिवसात प्रेमात पडली.अलीकडेच ती दोघं मायदेशात लग्न करण्यासाठी आली आहेत.
मी तिच्या सर्व लग्न सोहळ्यात सहभागी झालो होतो.जीन आणि टॉपमधे दिवसभर रहाणारी शोभना,लग्नात नऊवारी लुगड्यापासून,नथ,हार बांगड्या, हिरव्या काचेच्या बांगड्या हातात भरून,हाताला मेंदी लावून अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आणि रुढीनुसार लग्न करायला सज्ज झाली होती.

लग्न व्यवस्थीत पार पडून झाल्यावर एकदिवशी मी शोभनाबरोबर गप्पा मारायला बसलो होतो.
उत्तमपणे पार पाडलेल्या तिच्या सोहळ्याचं अभिनंदन करून मी तिला म्हणालो,

“सहजता”,म्हणजेच,सहज वाटणार्‍या गोष्टी,जशा वळवाचा पाऊस,नीळं आकाश,लहानशा मुलांचं हंसणं.
वयस्कर मोठ्या आवाजात सांगताना ऐकलं असेल
“ह्याच गोष्टीने लक्ष वेधलं जातं”
मग ह्या सर्व गोष्टींना साधं,सोपं का म्हणावं?”
असा कुणीतरी प्रश्न केल्याचा मला आठवतं.तुझं काय म्हणणं आहे?”
मी शोभनाला प्रश्न केला.

“आपल्याच जीवनात मागे वळून पाहिलं,आणि समजा ज्या गोष्टींचा अनुभव आला किंवा ज्या गोष्टी विशेष वाटल्याने स्मरणात ठेवल्या,त्याचा विचार केल्यावर प्रथम काय मनात येतं?
ग्रॅड्युएट झाल्याची घटना?प्रथमच नोकरी लागल्याची घटना? शाळेत किंवा कॉलेजमधे प्रथमच मिळालेलं बक्षीस घेतानाचा दिवस? परदेशात शिकायला जाण्याची घटना, ह्या काही मोठ्या घटना म्हणाव्यात का?
आता मी जी आहे ती होण्यासाठी ह्या सर्व घटना कारणीभूत आहेत असं तुम्हाला वाटतं का?”
शोभनानेच मला उलट प्रश्न केला.

मी म्हणालो,
“व्यक्ति तशा प्रकृति.तुझं मत मला ऐकायचं आहे.”

मला शोभना म्हणाली,
“ह्या किंवा अशाच काहीशा आकर्षक, भुरळ घालणार्‍या घटना तुम्ही जे आहात ते व्हायला कारणीभूत झाल्या का?
माझ्या जीवनात म्हणाल तर,असल्या घटना विस्मयकारी असून आणि मागे वळून पाहिल्यावर त्यांच्या स्मरणाने आनंद जरूर होतो ह्यात प्रश्नच नाही. परंतु,खरोखर मोठा परिणाम माझ्यावर होऊन मी जी आता आहे ते घडण्यात झाला असं मी मुळीच म्हंणार नाही.

माझ्या वयक्तिक अनुभवातून मी म्हणेन,वेळोवेळी मी शिकत आले आहे की,माझ्या जीवनाची व्याख्या करायला,आणि मला बनवायला काही अगदी साध्या साध्या गोष्टीनी मला शोभना व्हायला मदत केली आहे.मला अपूर्व अनुभव आणून देणार्‍या घटनामधे मला स्मरतात त्या माझ्या धाकट्या बहिणीबरोबर,रंजना बरोबर,झालेल्या लुटूपुटुच्या विश्वातल्या घटना. आम्हाला एकमेकाशी जखडून ठेवणार्‍या त्या अगदी साध्याश्या घटना म्हणायला हरकत नाही.

आम्ही चौपाटीवर गेल्यावर दोघी मिळून वाळूत डोंगर आणि भुयारं बनवायचो.डोंगराच्या खालून कोरून काढलेल्या भुयारातून हात घालत असताना वरचा डोंगर कोसळणार नाही ह्याची काळजी घ्यायचो.आणि एकमेकाचे हात एकमेकाला भेटल्यावर जो आनंद व्ह्यायचा त्याला सीमा नसायची.

आमच्या घराच्या समोरच्या पायवाटेवर खडूने चित्र काढायचो.झोपडी,माडाची झाडं,वहाती नदी,गाई,गुरं, नदीतून वहात जाणारी होडी असा अनेक गोष्टीचा समुदाय काढताना तासनतास मग्न व्हायचो.

शेजार्‍यांच्या पपीला झालेल्या चार पाच पिल्लाना आंघोळ घालून दुध पाजायचो,गळ्यात दोरी बांधून जवळच्या रानात फिरायला न्यायचो.ह्यात तासानतास वेळ घालवायचो.आम्हाला ह्यात प्रचंड आनंद व्हायचा.ह्या साध्या साध्या गोष्टीतून आम्हा दोघा बहिणीत निर्माण झालेला शक्तिशाली दुवा कुणीही तोडू शकला नाही.मग ह्या घटनाना साध्या घटना का म्हणावं?

माझ्या जीवनात दुसर्‍या साध्या घटनानी प्रभाव आणला त्या; माझ्या शाळेतल्या पहिल्या दिवसालाच माझ्या जीवलग मैत्रीणीने आपली प्रथम ओळख करून दिली तो दिवस,मला माझ्या आईने आणून दिलेल्या वि.स.खांडेकरांच्या वीरधवल ह्या कांदबरीचं शेवटचं पान मी वाचलं तो दिवस,मी चिं.त्र्य.खानोलकरांची कोंडूरा ही कादंबरी लायब्ररीतून स्वतः आणून वाचायला घेतली तो दिवस,मी इंग्लंडला जाण्यापूर्वी माझ्या आईने मला स्वतःलाच एकवीस उकडीचे मोदक बनवून गणपतीला नैवेद्य म्हणून ठेवायला दिलेला मान.
मी शांत बसून प्रत्यक्ष विचार करते,तेव्हा मला “मी” बनवण्यासाठी एक किंवा दोन मोठ्या घटनांकडे पाहून अचूक हेरता येत नाही.मी अनेक साध्या पण महत्वाच्या घटनांचा संग्रह आहे असं मानते.मला कुणी बाहेरच्या कव्हरवरून किंवा शिर्षकावरून ओळखू शकणार नाही.कारण मी सर्व पानं आणि सर्व शब्द ह्या मधली आहे.
मला एव्हडं माहीत झालं आहे की,जीवनातल्या साध्या गोष्टी,ज्या मामूली आणि नगण्य वाटतात त्याच खरं जीवन जगण्यालायक करतात.
सहजता वाटते तितकी साधी नसते….ती नुसती विस्मयजनक असते असं मला वाटतं.”

उठता,उठता मी शोभनेला म्हणालो,
“तुझ्या लग्नाच्या सोहळ्यात मी बारकाईने पहात होतो.मला तुझ्यात साधेपणाच जास्त दिसला.त्यामुळे मी तुला नेमका “सहजतेवर” प्रश्न केला.तुझं उत्तर ऐकून माझं कुतूहल स्पष्ट झालं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishas@gmail.com

Saturday, January 1, 2011

ऐका लहानश्या मुलीची मोठीशी कहाणी

अनुवाद.

ऐका लहानश्या मुलीची मोठीशी कहाणी
ऐकते तारकांची कहाणी जशी रात्र शहाणी

होते नशिबी तिच्या दुःखाचे बिछाने
आंसवे होती खेळणे
वेदनेची खूशी अन दुःखाची लोचने
नव्हते कसले घरटे अन भीतिची सावटे
होते दुःख तिच्या पदरी
अन डोळ्यात पाणी
ऐका लहानश्या मुलीची मोठीशी कहाणी

होती अभिलाषा अंतरी तिच्या
असावा छोटासा बंगला
असाव्या चांदीच्या खिडक्या
अन दरवाजा चांगला
खेळही जीवनी मेळही जीवनी
निघून गेले बालपण अन
आली आंसवे भरूनी जवानी
ऐका लहानश्या मुलीची मोठीशी कहाणी

असावा चंदाचा हिंदोळा
अन दामिनीचा बाजा
असावी डोलीत राणी
अन अश्वारूढ राजा
असावी वाट प्रीतिची
अन बरसात फुलांची
होऊ पहात होती ती तार्‍यांची राणी
ऐका लहानश्या मुलीची मोठीशी कहाणी

क्षणात तुटले स्वपनांचे मोती
अन लुटली गेली ज्योती
राहून गेला अंधःकार
अन उजाडून गेला प्रातःकाल
कहाणी झाली इथेच पूरी
अन राहिली काहीशी अधूरी
परिणति ह्याची न जाणे कुणी
ऐका लहानश्या मुलीची मोठीशी कहाणी

प्रसन्नता आली प्रीतिच्या रजीनीवर
हलत डुलत आली पवनावर
मेघ दुःखाचे मिटले
अन चंद्र झाला पैंजण
रमणीयता बहरून आली
अन झोके घेत लहरली
हंसले तारे अंगभरूनी
अन चांदणी झाली शहाणी
ऐका लहानश्या मुलीची मोठीशी कहाणी

यथार्थ झाली मनोकामना अन स्वपने
गीताचे झाले उसासे
अन सर्व झाले अपुले
हिलाच म्हणावे जीवनाची गति
अन अंतराची जवानी
ऐका लहानश्या मुलीची मोठीशी कहाणी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com