Tuesday, June 30, 2009

दुःखाचे दुसरे नामकरण

क्षणो क्षणी क्षय होते संध्या
तसेच जणू असावे हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन

तेच असे नभांगण
तिच असे ही धरती
गैर असे हे ठिकाण
का? गैर आहो आपण
अनोळखी नजेरे सम
दिसे का हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन

का राहू उभा ह्या वाटेवरी
ही वाटच माझी पहूडली
आपुली मन कामनाही
का?आपुल्याशी रुसली
भटक्या विहंगा सम
असे का हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलोफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, June 28, 2009

मी माझ्या वयाच्या सातव्याच वर्षी प्रेमात पडलो.

“हातात हात घेऊन रस्त्याच्या कडेकडेने बिलगून जाणार्‍या त्या प्रेमी युगूलाला वाटणारं ते प्रेम नव्हतं.”

मी त्यादिवशी अरविंदाला म्हणालो,
“तुझे मी खूप लेख वाचले.मला माहित आहे की लहानपणापासून तुला लेखनाचं वेड होतं. तुझ्या त्या वह्या मी उघडून वाचल्या होत्या.तुझ्या एकदोन कथेवर आपण चर्चा पण केली होती.”
मला अरविंद म्हणाला,
“तू ज्याला वेड म्हणतोस त्याला मी प्रेम म्हणतो.वेड तेव्हड्यापुरतंच असतं पण प्रेम मात्र कायमचं असतं.आणि ते प्रेम जर बिनशर्त असेल तर मग प्रश्नच नाही.माझं लेखनावर तसंच बिनशर्त प्रेम आहे.

मी जर म्हणालो की माझ्या सातव्या वर्षीच मी प्रेमात पडलो,तर कुणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.कुणी म्हणेल प्रेमात पडायला हे माझं वंय खूपच लहान आहे.पण हे काही खरं नाही.मात्र एक खरं आहे की हातात हात घेऊन रस्त्याच्या कडे कडेने बिलगून जाणार्‍या त्या प्रेमी युगूलाला वाटणारं ते प्रेम नव्हतं ,किंवा आई आपल्या बाळाकडे बघून मनात आणणार्‍या त्या प्रेमासारखं ते प्रेम नव्हतं,किंवा एखादी मोठी बहिण आपल्या भावाला प्रथमच मांडीवर घेउन बसते तसं ते प्रेम तर मुळीच नव्हतं.
मी सांगतो ते प्रेम म्हणजे,जेव्हा एखादा चित्रकार आपल्या पहिल्याच चित्रीत केलेल्या चित्राकडे बघून त्याला जसं वाटेल तसं ते प्रेम होतं,किंवा एखादा खेळाडू त्याला जिंकू देणार्‍या त्या गोलकडे बघून त्याला जसं वाटेल तसं ते प्रेम होतं,किंवा एखाद्या सुगृहिणीने केलेल्या चटकदार पदार्थाला बक्षीस मिळतं त्यावेळी तिला त्या थाळीकडे बघून जसं वाटतं तसं ते प्रेम होतं.एखाद्या व्यक्तिला त्याच्या कामगीरीबद्दल वाटणारं प्रेम असतं तसं ते प्रेम होतं.माझ्या सातव्या वर्षी मी केलेल्या माझ्या लेखनावर मी प्रेम करू लागलो.
दुसर्‍या वर्गातली ती सुरवात होती.आणि आम्हां उत्सुक्त असलेल्या प्रत्येकाला नवीन वही मिळाली होती.वहीत शंभर नवी कोरी पानं होती.सातव्या वयातल्या मुलाचे विचार खरडून घ्यायला ती वही तयार होती.
माझी वही मला मिळाल्यावर अधीरता हा पहिला विचार माझ्या मनात आला.”

“पण अरविंदा, तसं पाहिलंस तर पहिल्या वर्गातपण आम्हाला वह्या मिळाल्या होत्या.आणि खरंच ती वही निरनीराळ्या विचारांनी खरडली गेली होती,आणि अनेकानी सुरवात करून खरडलेल्या काही गोष्टी त्यात होत्या.”
असं मी म्हणाल्यावर अरविंद म्हणाला,
“माझ्या बाबतीत तरी त्यातली एखादी गोष्ट मला पूर्ण करायची होती.ह्यावेळी ज्या क्षणी मला पेन्सिल दिली गेली,तेव्हा मी वेड्या सारखा वहित खरडायला लागलो.जे गेल्यावर्षी मला करणं अशक्य झालं होतं ते मी पूर्ण करायचा प्रयत्न केला.मी माझी कथा संपवली. “
मी अरविंदला म्हणलो,
“दुसर्‍या इयत्तेतल्या मुलांना आपल्या रोजच्या जीवनात येणार्‍या घटना लिहून ठेवण्यासाठी बर्‍याच मुलांनी-माझ्या सकट- आपली वही डायरी कशी वापरली. खरं आहे ना?”

होय,तुझं म्हणणं खरं आहे. पण मी माझ्याबाबतीत तुला सांगतो,
“मी मात्र थोडावेळ परिश्रम घेऊन एखाद्या उचीत कथेची संकल्पना शोधीत असताना, शेवटी जी गोष्ट मला जास्त आवडली तीच लिहिण्याचं मला सुचलं.
कथानक अगदी साधं होतं.कथानकाचा नायक एक तरूण मुलगा होता.हा नथुराम एक नाटक रचीत होता.माझ्या कथेचं नांव मी “नटेश्वर नथुराम” द्यायचं ठरवलं होतं.त्यावेळी हे कथेचं नांव ऐकून काही त्यावेळी हंसले होते.मला त्यावेळी कळलं नव्हतं त्यांनी का हंसावं ते.
मागे वळून पाहिल्यावर “नटेश्वर नथुराम” ही एक साधी गोष्ट होती.काहीतरी विस्मयजनक असावं अशी ती सुंदर सुरवात होती. ह्या कथेचा गुंथा करताना मी खरोखर आनंदीत होतो. भाऊबीजेचा दिवस येऊ लागला तशी मी एक मनात कल्पना तयार केली. माझ्या बहिणीला भाऊबीजेदिवशीची भेट म्हणून कुठच्याही भेटी पेक्षा चांगली भेट असावी आणि जी जणू माझा प्राण होती-ती कथा माझा प्राण झाली होती-अशी भेट देण्यापेक्षा कुठची भेट असूं शकेल.
माझ्या बहिणीला माझ्या कथेचीच भेट मी कां देऊ नये?

माझ्या दुसर्‍या इयत्तेत मी लेखनाच्या प्रेमात पडलो.पण खरं सांगायचं तर माझ्या मनातलं काम पुढल्यावर्षीच सफल झालं.
दुसर्‍या वर्षाला जेव्हा मी माझ्या बहिणीला ह्या कथेची भेट दिली आणि माझ्या परिश्रमाचं काय फळ मिळालं ते पाहिलं तेव्हा मी खरोखरंच माझ्या लेखनाच्या प्रेमात पडलो होतो.
आम्हा चार भावात ती माझी एकच बहिण होती.तसंच माझ्या चार चुलत भवाना पण बहिण नव्हती.त्यामुळे सर्व भाऊ ह्या एकट्या बहिणीची भाऊबीज करायला जमायचे.इतर भावानी दिलेल्या चकमकीत कागदाच्या आवरणातल्या भेटींच्या ढिगार्‍यात हातानेच कागदाने लपेटलेली माझ्या कथेची भेट मी ठेवली. सरतेशेवटी माझी ही छोटीशी भेट त्यात गडप झालेली दिसली.पण नीट पाहिल्यावर त्या सर्व भेटीत माझी भेट सोनेरी किरणानी चमकताना मला दिसली.

“नटेश्वर नथुराम” ही माझी पहिलीच कथा आणि तिच्याबद्दल माझ्या हृदयात खास प्रेम होतं.त्यानंतर मी मोठ्या मोठ्या कथा लिहायला लागलो.आणि सात वर्षाचा असताना ज्या प्रेमाने मी लिहायचो त्याच प्रेमाने आतापण मी माझं लेखन करतो.माझ्या कुठच्याही लेखनात सर्वांत माझी प्रिय गोष्ट म्हणजे त्या कथेतल्या प्रत्येक भुमिकेची रचना करणं आणि त्या भुमिकेच्या चारित्र्याचा सांचा बनवणं.प्रत्येक भुमिकेच्या चर्येवरचा आणि चारित्र्यावरचा विस्तार सर्वतोपरीने दाखवणं मला आवडतं.जीवन निर्माण करायला आणि व्यक्ति निर्माण करायला मला आवडतं. एखाद्या माझ्या कथेतली भुमिका प्रत्येकवेळी चांगलं काम प्रदर्शित करत असते त्यावेळी मला व्यक्तिगत अभिमान आणि उपलब्धि झाल्या सारखी वाटतं.

माझं लेखन हे एक चिकित्सा सत्र झालं आहे. दिवसाभर्‍यातले झालेले आघात, पश्चाताप, आणि आनंद मी भुमिकेत आयोजीत करतो.त्या भुमिकेमधून मी प्रतिनिधिक राहिल्याने माझ्याच मला सहायता होते. माझ्या सृजनशिल प्रतिभेला बळ मिळतं.आणि त्यामुळे मी समानुभूति दाखवयाला लायक होतो.लेखकाला समानुभूतिक असायला हवं.त्या भुमिकेच्या जागी जाऊन त्यांच्या नंतरच्या करतूताच्या दिशेची आंखणी करावी लागते.मला अगदी मनापासून वाटतं की ह्या लेखनाने माझं व्यक्तिमत्व सुधारलं आहे.”

हे अरविंदाचं सर्व ऐकून मी चकित झालो.मी त्याला म्हणालो,
“अरविंदा,आमचे कॉलेजचे प्रोफेसर म्हणायचे,
“वर्गात नोट्सवर लेक्चर देणे वेगळे, आणि प्रत्यक्षात स्वत:च्या प्रतिभेने लेखन करणे वेगळे.थोडेबहूत लेखन आपल्यालाही करता यावे असे मात्र प्रत्येकाला सतत वाटत असते. प्रतिभावंत असणं ही एक दैवी देणगी असते असे माझे स्वत:चे मत आहे.”
तुझ्या बाबतीत आमच्या प्रोफेसरांचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे रे!.”
“कसच्चं,कसच्चं” म्हणत अरविंदाने विषय बदलला.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, June 26, 2009

त्या पायलटचं नांव काय?

"आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल जे मुलभूत प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्यासाठीचा हा ह्या कथांचा प्रयास असतो."

अरविंद चिटणीस ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत शिक्षक म्हणून लागला.सुरवाती पासून त्याला कुणालातरी शिकवायची आवड होती.वर्गात मॉनिटर म्हणून

राहिल्यास मुलांना कसली ना कसली तरी गोष्ट सांगण्यात स्वारस्य घ्यायचा.माझ्या वर्गात असताना हा त्याच्या अंगचा गूण मी पाहिला होता.
आमचे क्लासटिचर नंतर प्रसिद्ध झालेले कवी कारखानीस होत.
क्लासटिचर किंवा दुसरा कसलाही तास घेणारे शिक्षक त्यादिवशी गैरहजर असले तर आमचे हेड्मास्तर श्री. नाबरसर त्या क्लासाला यायचे.त्यांचा शिरस्ता म्हणजे

ते हातात एक नवी "लायन" ची पेन्सिल घेऊन यायचे.आणि त्या तासात एक किंवा दोन गोष्टी सांगायचे.गोष्ट सांगून झाल्यावर दहा प्रश्न विचारायचे.ज्यांची दहाही

प्रश्नांची उत्तर अचूक येतील त्यांना ते ती नवीन पेन्सिल द्यायचे.कधी कधी समयसुचकता जाणण्यासाठी मुलांना कोडी घालून विचारायचे.अचूक उत्तर दिल्यास

आणखी एक पेन्सिल द्यायचे.

मला आठवतं एकदा नाबरसरानी एक अतिरंजीत करून, विमान अपघात होण्याचा कसा टाळला गेला ही कल्पित गोष्ट सांगितली होती.आणि गोष्ट सांगून झाल्यावर

एकच प्रश्न विचारला होता.त्याचं अचूक उत्तर फक्त अरविंद चिटणीसच देऊ शकला.
"ह्या गोष्टीचा मी एकच प्रश्न विचारणार"
असं त्यांनी अगोदरच सांगून टाकलं होतं.
त्या वयांवर आमच्या बुद्धिची पातळी तेव्हडीच असल्याने हेडमास्तर नाबरसर जे सांगत ते आम्हाला खूपच वाटायचं.
त्या न झालेल्या विमान अपघाताची गोष्ट ऐकण्यात आम्ही सर्व एव्हडे गुंग झालो होतो की जर नाबरसरानी प्रश्न विचारला तर त्यांचं अचूक उत्तर देण्यासाठी

शक्यतो प्रत्येक मुद्यावर ध्यान ठेवून ऐकत होतो.ते विमान जंगलातल्या एका पठारावर सुरक्षीतपणे उतरून रात्रीच्यावेळी लोकांची त्रेधा कशी उडाली ह्याचं

त्यांच्याकडून वर्णन ऐकण्यात बरचसे आम्ही गुंगून गेलो होतो.

आम्हाला वाटलं विमानात माणसं किती होती हे त्यांनी सांगितलं होतं त्याचा आंकडा विचारतील.किंवा रात्री किती वाजता ते विमान त्या जंगलात उतरलं होतं

त्याची वेळ त्यांनी सागितली होती ती वेळ विचारतील म्हणून आम्ही ती वेळ लक्षात ठेवली होती.विमानात बायका आणि मुलं किती होती त्याचा आंकडा

सांगितला होता तो प्रश्न विचारतील म्हणून तो आंकडा आम्ही लक्षात ठेवला होता.
पण कुठचं काय आणि कुठचं काय?
त्यांनी एकच प्रश्न केला तो असा विक्षीप्त होता की तो प्रश्न ऐकून आम्हाला वाटलं कुणालाही त्याचं उत्तर माहित नसावं आणि ही नवी पेन्सिल ह्यावेळी नाबरसर

कुणालाही देणार नाहित.
सरांनी विचारलं,
" विमान चालवणार्‍या पायलटचं नांव काय?"
उत्तर देण्यासाठी कुणी ही हात वर केला नाही फक्त एक अरविंद वगळता.नेहमी पेन्सिल बक्षीस घेणारा अरविंद चिटणीस ह्यावेळी असफल होणार अशी आमच्या

सर्वांची बालंबाल खात्री झाली होती.
अरविंद हात वर करून म्हणाला सर मी सांगू का? कुणास ठाऊक एरव्ही नाबरसरांचा अरविंदच्या समयसुचकतेवर विश्वास असला तरी ह्यावेळी त्यांना खात्री

नसावी असं आम्हाला वाटलं. सांग, म्हणून नाबरसर म्हणाले. आम्ही सर्व अरविंदकडे आं-वासून बघत होतो.
तो म्हणाला,
"सर त्या पायलटचं नांव आहे नाबरसर"
हे उत्तर ऐकून नाबरसरांना खरोखरच कौतुक वाटलं.
ते म्हणाले,
"अरविंद तुझं उत्तर अगदी बरोबर आहे.आणि ही घे पेन्सिल."
नाबरसर निघून गेल्यावर आम्ही अरविंदला घेराव टाकला आणि विचारलं,
"खरंच अरविंद तुझी कमाल आहे हे नांव तुला कसं कळलं?"आम्हाला एव्हडं सोपं कसं माहित झालं नाही?"
अरविंद म्हणाला,
"सर जेव्हा रात्रीचा तो जंगलातला प्रसंग रंगवून, रंगवून सांगत होते,त्यावेळी त्यांची आपल्या सर्वांच्या कुतहलाकडे नजर होती.आणि स्पष्ट-अपस्पष्ट आणि झटकन

सर बोलून गेले होते,
"ते विमान मी चालवत होतो"
ते ऐकून मला त्यावेळी जरा विक्षीप्त वाटलं होतं,पण मी ते लक्षात ठेवलं होतं."

अरविंदला कथा-कहाण्या खूप आवडायच्या.अलीकडेच तो त्या शाळेचा हेडमास्तर होऊन रिटायर्ड झाला होता.
त्याच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला तो माझ्या कडे आला होता.मी त्याला जुन्या आठवणीचा उल्लेख व्हावा या दृष्टीने म्हटलं,
"या कथाकार आज काय विशेष?"
आमंत्रण देऊन झाल्यावर मी त्याला बसवून घेतलं.आणि म्हणालो,
" जरा जुन्या गप्पा मारूंया."
मी दिलेला टोमणा लक्षात ठेवून मला म्हणाला,
"तू मला वाटलं तर कहाणीकार किंवा कथाकार म्हण. शिक्षक असल्याने मी रोज वर्गात एक कथा सांगत असायचो.कधी मी एखादी गोष्ट वाचून सांगायचो.पण

बहुदा मी गोष्ट सांगत होतो.जेव्हा मी गोष्ट सांगतो तेव्हा न चुकता एखाद-दुसर्‍य़ा विद्यार्थ्याकडून किंवा विद्यार्थिनीकडून,
"ही गोष्ट खरी आहे कां?"
असं विचारलं जायचं.आणि मी नेहमीच होय म्हणायचो.
मी गोष्ट खरी नसून खरी आहे असं सांगितल्यावर ती आश्चर्य चकित चेहरा करून माझ्याकडे बघत असायची.
मनुष्य स्वभाव, आवश्यकता,आणि जी वैशिष्ट -वाचकाला किंवा ऐकणार्‍याला- अभिज्ञेय असतात त्यांच्या भोवती एखादी अद्भुत आणि अत्यंत कल्पनाशील कथा

सुद्धा, परिभ्रमण करीत असते."
अरविंद पुढे म्हणाला,
"आपले नाबरसर होते.ते नेहमी कथा सांगत. माझ्या अनेक शिक्षकामधे ह्या शिक्षकाची मला नेहमी आठवण येत असायची.अजून पर्यंत त्यांच्या कथा माझ्या

लक्षात आहेत.
कधी कधी नाबरसर अशा कथा सांगत असत की त्यातून संस्कार,धडे आणि युक्त्या ते व्यक्त करीत आणि कधी कधी मला वाटतं अंमळ आम्हाला करमणुकीच्या

आनंदात टाकण्यासाठी नेहमीच्या वाकप्रचाराची प्रचुरता वापरून कथा सांगत.

तू म्हणशील मी रिटायर्ड होऊन झालो तरी क्लासात बोलल्या सारखा तुला लेक्चर देत आहे.पण खरं सांगू,अश्या आपल्या ह्या कथा म्हणजे भूत आणि भविष्याला

बांधलेली गांठ समजली पाहिजे.आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल जे मुलभूत प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्यासाठीचा हा ह्या कथांचा प्रयास

असतो.वर्षानुवर्ष समाजाने ह्या कथांच्याद्वारे आपली जीवन-शैली एका पिढीतून दुसर्‍या पिढीत व्यक्त करण्यासाठी वापरली आहे. ज्या समाजाने आपल्या कथा

हरवल्या आहेत तो समाज आपलं अस्तित्वच हरवून बसला आहे.हरवलेल्या कथांची आठवण येऊन एकदा मी बराच दुःखी झालो.ज्यांच्या त्यावेळच्या

अस्तित्वाबद्दल सुद्धा आपण जागृत नव्हतो अशा प्राचीन लोकांची आठवण काढून हे दुःख मला करावं लागलं.त्यांच्या कहाण्या ह्या आपल्याच आहेत ह्यावर मी

आता भरवंसा करायला लागलो आहे.मला वाटतं अख्या जगात एखाद्या गोष्टीचा विषय आणि मूलभाव लक्षात घेऊन त्याचा प्रतिलेख लिहिला जातो. वाटलं तर

मानवजातिचं अध्ययन करणार्‍याला विचारल्यास तो नक्की असंच सांगेल."
मला वाटतं,प्राचिन प्रवाश्यानी आपल्या कहाण्या,त्यांच्या नंतर येणार्‍या पिढीजवळ हस्तांतरीत केल्या परत त्या पिढीने नव्या पिढीजवळ तसंच केलं असावं आणि

अखेर मला त्या कथा मिळण्याची सोय केली.तुला कदाचीत माहित नसेल मी अलीकडे "नवीन कथा"नांवाचं पुस्तक लिहित आहे.मी जरी त्यात नवीन कथा

लिहिली तरी ती तशी नवीन नसते उलट पूर्वापारच्या मानवी विचारधारेतून निर्माण झालेल्या असंख्य कहाण्यामधून कल्पित करून तयार झालेली असते.
हल्लीची परिस्थिती पाहून माझ्या मनात काय येतं ते तुला सांगतो.

ह्या कथा आपलं जीवन संपन्न करतात.टीव्ही आणि चित्रफितीतून आधूनिक पद्धतिने ह्या कथा फैलावल्या जात आहेत.साध्या सरळ शब्दातून सांगितलेल्या ह्या

कहाण्या मात्र आपल्याच अंतरात वास करतात. आपल्यावर दबाव आणून मेंदूतल्या कल्पकतेच्या साधनाला परिश्रम घ्यायला उत्तेजीत करतात.
मला वाट्तं मुलं ह्या कहाण्या ऐकणार.तासन-तास टीव्ही पहात असणारी मुलं पण कहाण्या ऐकणार,अगदी एखादं दुर्लक्षीत झालेलं किंवा भूकेलेलं मुलसुद्धा ह्या

कहाण्या ऐकत राहाणार.माझा अगदी विश्वास आहे की ह्या कथाच आपल्या समाजाचं अस्तित्व टिकवून ठेवणार आहेत आणि यात संदेह नाही."
मी अरविंदाला म्हणालो,
"अरविंदा, हे पण तू चालता चालता कहाणी सांगितल्या सारखंच केलंस.मी तुला सुरवातीला कथाकार म्हणालो ते माझ्या पचनी पडलं म्हणायचं"


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, June 24, 2009

ती तात्या अभ्यंकरांची भयंकर ओळ,
"बापाने यावं आणि दोन सणसणीत कानशिलात ठेऊन द्याव्यात असं आजही कुठेतरी वाटतं!"
आई आणि मुलांत जसे भावबंध असतात, तसे बाप मुलांत का निर्माण होत नाहीत. बापाबद्दल कायम भीती का वाटत राहाते?

त्याचं काय झालं मंडळी,सौ. अनुराधा सचिन म्हापणकर ह्यांनी ही खालील सुंदर कविता लिहिलेली माझ्या वाचनात आली,

आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

वा.. बेटा .. वा..!!
आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

पुन्हा पुन्हा डोळे भरून येतात..
तू मात्र डोळ्याला डोळाही देत नाहीस
असं रे काय.. निघता निघता..
साध्या आशीर्वादालाही वाकत नाहीस
.
का आशीर्वादाच्या हक्कापासूनही आम्हाला तू तोडलंस
वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

नव्हतं पटतं मान्य..
कदाचित आमचंही काही चुकलं असेल
आमची लूडबूड.. अधे मधे करणं..
तुम्हालाही कधी खटकलं असेल
.
म्हणून का रे अडगळीसारखं घराबाहेर फेकलंस..
वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

सवंगडी सखे सोबती.. इथे
आम्हाला भरभरून म्हणे मिळतील
गप्पागोष्टी .. नी थट्टा मस्करीत
आमचे दिवस भरभर म्हणे पळतील..
.
पण नातवाशी खेळायचं होतं.. ते स्वप्न का मोडलंस…
वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

वेळ भरभर जाणार..
हो.. म्हणजे शॉर्टकटने मृत्यूला गाठायच..
चार पावलावर उभा आहेच तो
नाहीतरी आता कोणासाठी आहे साठायचं..
भळभळत्या जखमेला कसं अचूक वेळी छेडलंस..

वा.. बेटा .. वा..!!
आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..
आयुष्याच्या मावळतीला ….
आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन तू सोडलंस…

ह्या कवितेखाली त्यांच्या एका वाचकाचा प्रतिसाद मी वाचला तो असा होता,
"कवितेतल्या त्या मुलाचा किंवा मुलीचा दृष्टीकोन वेगळा असूं शकेल ना?कदाचीत त्यांची मतं ह्या वृद्धांच्या व्यथेपेक्षां भिन्न असतील ना?"
आणि ते वाचक सौ.म्हापणकरांना पुढे लिहितात,
"आता मला तुमच्याकडून एखादी कविता मुलांच्या दृष्टीकोनातून,म्हणजे वृद्धांबद्दल त्यांचं मत मांडणारी
कविता अपेक्षीत आहे."

झालं,मी ती कविता वाचून आणि ती प्रतिक्रियावाचून आमच्या कवीमनाचा किडा चाळवून घेतला.
वरील कवितेचं किंचीत-विडंबन किंवा-आणखी काही म्हणा- केल्यासारखं करून आपणच मुलांचा दृष्टीकोन लिहावा असं मनात आलं आणि कविता लगेचच तयार

झाली.

शिर्षक होतं,
तुमचं ऋण फेडायला कधी चान्स देता?

तुमचं ऋण फेडायला कधी चान्स देता?

वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

पुन्हा पुन्हा डोळे भरून येतात
तुम्ही मात्र डोळ्याला डोळा देत नाहीत
असं हो काय…निघता निघता
साध्या आशीर्वादालाही दोन हात लावत नाहीत
का आशीर्वादाच्या हक्कापासून आम्हाला तुम्ही वंचीत करता
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

नव्हतं पटंत मान्य..
कदाचित आमचंही काही चुकलं असेल
आमची अडचण…अधे मधे करणं
तुम्हालाही कधी खटकत असेल

म्हणून काहो कचऱ्यासारखं घराबाहेर फेकतां
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

मित्र मंडळी…तिकडे
आम्हाला भरभरून म्हणे मिळतील
गप्पागोष्टीत…नी थट्टा मस्करीत
तुम्हाला विसरण्यात जातील

पण नातवाशी खेळायचं होतं..ते स्वप्न कसं पुरं होणार…
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

वेळ भरभर जाणार….
हो..म्हणजे शॉर्टकटने सोयीना गाठायच..
लांब लांब पावलावर उभ्या आहेत त्या
नाहीतरी आता कोणासाठी त्या करायच्या..
घाबऱ्या घुबऱ्या जीवाला कसं अचूक वेळी सोडता…

वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता
आयुष्याच्या सुरवातीला…
आम्हाला वेगळं घर घ्यायला सांगता..

मंडळी,तात्यांच्या प्रतिक्रियेला अन्वय यांनी त्यांच्या उत्तरात म्हटलंय,
"पण आई आणि मुलांत जसे भावबंध असतात, तसे बाप मुलांत का निर्माण होत नाहीत. बापाबद्दल कायम भीती का वाटत राहाते, हा प्रश्‍न अजून सतावतो

आहे."
मंडळी खरं सांगू का,वडलांचं चुकतं की मुलांचं चुकतं ह्याचा सर्व साधारण न्याय देणं कठिण आहे.त्याला अनेक कारणं आहेत.प्राप्त परिस्थिती,व्यक्तित्व,संस्कार

आणि असे अनेक दबाव त्याला कारणीभूत आहेत.आणि हे मी पूर्वीच्या तरूण मुलाच्या भूमिकेतून आणि आता म्हातार्‍या बापाच्या भुमिकेतून स्वानुभवावरून

सांगत आहे.पण एक मात्र नक्की मग ते वडील असोत की मुलं असोत,
"जो तो आपल्या अक्कले प्रमाणेच वागत असतो."
नाहीपेक्षा सर्वच ज्ञानेश्वर माऊली का होत नाहीत?
माऊली वरून आठवलं,ती परमपूज्य माऊली-एकाशी लग्न करून आणि दुसर्‍याला जन्म देऊन- ह्या बाप-मुलांच्या वादात हजर असतानाही एका कोपर्‍यात बसून

बिचारी दुःखाने अश्रू ढाळण्यापलिकडे काही करूं शकत नाही.
कदाचीत,
"लळा जिव्हाळा शब्दच खोटे"
असंच तिचे अश्रू सांगत नसतील नां?
म्हणून म्हणतो तात्यानु,
"तरच आपल्या पितृत्वाचं सार्थक होईल...!"
ह्या आपल्या म्हणण्याशी मी पण सहमत आहे.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, June 22, 2009

लहान लहान विचार.

लहानपणी आम्ही मुंबईहून न चुकता उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आंबे,गरे,बोंडू खाण्यासाठी आणि विश्रांती आणि मजा मारण्यासाठी जात असूं.
आता संसाराच्या रग्याड्यात,तसंच ऑफिसच्या कामाच्या व्यापात कोकणातल्या आमच्या खेपा त्यामानाने कमीच झाल्या आहेत.
पण कधी कधी उलटं होतं.अलीकडे कोकणातून उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची मित्रमंडळी आणि नातेवाईक मुंबईला येतात.त्यांना मुंबईला येऊन मजा करायची असते. हल्ली कोकणात पैशाचे व्यवहार वाढल्याने आणि धंदापाणी करण्याचं महत्व कळल्याने लोकांच्या हातात पैसा खेळू लागला आहे.पूर्वीची कोकणातली गरिबी आता तेव्हडी राहिलेली नाही.
कोकणातून ह्या सुट्टीत माझा मावसभाऊ रमाकांत खूप दिवसानी माझ्या जवळ राहायला आला होता.सहाजीक एक दिवस गप्पा मारताना मी त्याला प्रश्न केला,
“काय रे,कोकणातली खेडी आता खेडी राहिली नाहीत.कसं काय परिवर्तन झालं आहे मला जरा कुतूहल वाटतं म्हणून तुला विचारतो.”
रमाकांत म्हणाला,
अलीकडे आमच्या गांवातल्या शाळेत संध्याकाळी स्पेशल क्लासिस भरतात.निरनीराळ्या विषयावर चर्चा होते.एकदा चर्चेचा विषय होता,
“काहीतरी मोठ्ठ करावं”
मोठ्या गोष्टीवर विचार करायची संवय असावी. मोठी स्वप्नं बाळगावीत,मोठमोठाल्या कल्पना असाव्यात.

मी असल्या विषयाच्या मिटींग मधे कधीच समरस झालो नाही.मला वाटतं लहान स्वप्न बाळगली,लहान कल्पना असल्या,आणि लहानसंच काहीतरी केल्यावर आपल्यावर जादा परिणाम होतो.लहान लहान गोष्टीच जास्त महत्वाच्या असतात अशी माझी धारणा आहे.
उदाहरण म्हणून मी सांगतो,आमच्या गांवतल्या हॉटेलात जमलो की बरेच वेळा आम्ही लहान गोष्टींचाच विचार करीत असतो.गांवातले पेपर्स लहानश्याच छापखान्यात छापले जातात.त्यात बातम्यापण लहान लहान असतात.
आज गांवातल्या वर्तमानपत्रात काय वाचलं?
आज अमक्या अमक्यांच्या मुलीचं लग्न थाटात झालं.
आपल्या शाळेतल्या क्रिकेट टिमने शेजारच्या गांवच्या टिमला पाच विकेट्स राखून हरवलं.
गांवतल्या मुलांची संगीताच्या चढाओढीचा कार्यक्रम होऊन पाटलांच्या मुलीला पहिलं बक्षीस मिळालं.
अमुक अमुक गृहस्थ वयाच्या पंचाणाव्या वर्षी वारले.”

मी म्हणालो,
“आता कोकणात कंप्युटर्सपण आले असतील.”
“हो,आमच्या लहानश्या गांवात आता कंप्युटर्स आले आहेत.बर्‍याच लोकांचं आता “फेस-बूक” खातं आहे.त्यावरून ते एकमेकाला टिपण्या पाठवतात,चित्र पाठवतात,किंवा लहान लहान कोडी पाठवून चर्चा करतात.उदाहरणार्थ,
“कोणती बॉलीवूडची नटी तुला आवडते?”
आणि नंतर कंप्युटरवरून “गमन” केल्यावर परत त्या गप्पा-टप्पा करण्याच्या चहाच्या टेबलावर येऊन बसतात.समोरा-समोरची चर्चा त्यांना हवी असते.एकमेकाला जवळ बसवून घेत,डोळ्यात डोळे घालून,कानात सूर-परिवर्तन करून,त्यांना ज्या गोष्टींची चिंता असते त्या गोष्टीवर चर्चा होते.”
मी रमाकांतला विचारलं,
“लोकल समस्येवर बरेच वेळा अशा हॉटेलातच चर्चा पूर्वी पण व्हायच्या.आतापण होत असतील नाही?”

“असल्या लहानश्या हॉटेलात ह्यावेळी मान्सून कसा आहे आणि आपल्या गांवतल्या शेतीवर काय परिणाम होणार आहे ते गांवातल्या हवामान तज्ञाने कसं भाकित केलं आहे इथपर्यंत बोललं जातं.
आमच्या ह्या लहानश्या गांवातल्या लोकांना गांवातली शाळा आवडते,कुस्तीचा आखाडा आवडतो.मॅट्रीकच्या परिक्षेत ह्यावेळी गांवातून पहिल्या आलेल्या मुलीचं सत्कार करून कौतूक करायला आवडतं.
“तो अमुक अमुक माझ्या माहितीतला आहे.”
असं कुणीतरी म्हणतं,
“तो हुशार आहेच पण तो जास्त माणूस आहे.”
असंही म्हणून कुणी मोकळे होतात.ह्या सर्व गोष्टी जरी लहान लहान असल्या आणि जास्त महत्वाच्या नसल्या तरी त्यांना माहित असतं की ही गांवातली वहिवाट आहे.आणि वर येणार्‍या पिढीवरत्याचे नकळत परिणाम होत असतात.”
मी म्हणालो,
“आता जग लहान झालं आहे.आणि कोकण काय जगाच्या बाहेर नाही.तेव्हा जगाच्या “गजाली” पण होत असतील.”
हंसत हंसत रमाकात सांगू लागला,
“चहाचा दुसरा कप मागवून किंवा आणखी एखादी भज्याची प्लेट मागवून हे लोक गांवाच्या बाहेरच्या जगाच्या पण चौकशीत असतात.
सरकारने नवा कायदा काढून काय मिळवलं.?
देशातलं उष्णतामान खूपच वाढलं आहे.
पर्यावरणाचा परिणाम देशावर कितपत आघात करणार आहे.?वगैरे.

परंतु,ह्यातले प्रत्येक जण उद्या सकाळी जेव्हा अंथरूणातून उठतील तेव्हा त्यांच्या नव्या दिवसाची सुरवात त्यांच्या समोर आलेल्या त्या क्षणांच्या कामाची पुर्ती कशी करायची ह्याची विवंचना करण्यात जाते.ही लहानशीच गोष्ट असते.आणि त्यांच्या आवाक्यातली असते. तसंच त्या गोष्टीवर त्यांचं सर्वांत जास्त ध्यान असतं.ह्या लहान लहान गोष्टींनांच मतलब असतो आणि दिवसाच्या शेवटी ह्या लहान गोष्टीचीच कायम स्वरूपी छाप पडते असं मला वाटतं.”
मी रमाकांतला म्हणालो,
“खरं आहे तूझं.मोठ्या मोठ्या गप्पा मारायला मोठी शहरं आणि त्यांचे मोठे प्रश्न कारणीभूत असतात. आणि तसे मोठे राजकरणी लोकपण असावे लागतात.कुणाची कुणाला माहिती नसते.इकडे गांवात पिढ्यांन पिढ्याची माहिती एकमेकाला एकमेकाची असते,तेव्हा राजकारण सुद्धा जपूनच करावं लागतं.”
रमाकांत फक्त एकच वाक्य बोलून उठला,
“जसा व्याप तसा संताप.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, June 20, 2009

मोटरसायकलसाठी रदबदली.

काल प्रो.देसायांचा नातू माझ्या जवळ येऊन आजोबांची तक्रार करीत होता.कारण काय तर त्याला मोटासायकल घ्यायची आहे आणि कसंतरी त्याने आपल्या आईबाबांना समजूतीने पटवून दिलं.पण त्याचे आईबाबा म्हणाले की आजोबांचा होकार मिळे पर्यंत काही खरं नाही.
मला म्हणाला,
“काका,तुम्ही जर का आजोबांची समजूत घातली तरंच हे शक्य आहे.कारण तुमचं ते कसंतरी ऐकतात.”
मी त्याला म्हणालो,
“बाबारे,असल्याबाबतीत ते माझं कसं ऐकतील? कारण मी कधीही मोटरसायकल चालवली नाही.आणि तोच प्रश्न मला ते प्रथम विचारणार.”
“मग काय करायचं? तुम्हाला काही युक्ति सुचते का?
कारण बि.एम.डब्ल्यु. सेलवर आल्या आहेत.आणि मला तिच दुचाकी घ्यायची आहे.”
असं तो अगदी हताश होऊन म्हणाला.

“एक आठवलं. माझा एक मित्र आहे श्रीधर टिपणीस म्हणून.आम्ही कॉलेजात असताना तो मोटरसायकल घेऊन यायचा.आणि बरीच वर्षं दुचाकी चालवायचा.
त्याचा सल्ला घेतो.त्याला हा तुझा प्रॉबलेम सांगतो.बघू या यातून काय निष्पन्न निघतं ते?”
हे माझं बोलणं ऐकून तो बराच आशाळभूत झाला.
मी श्रीधरकडे गेल्यावर हा मोटरसायकलचा विषय मुद्दाम काढला.
श्रीधर मला म्हणाला,
”हल्ली मोटरसायकल चालवण्याची प्रवृत्ति जास्त बळावत चाललेली दिसते. फार पूर्वी शाळेत असताना आणि नंतर कॉलेजमधे गेल्यावर मोटरसायकल चालवायला पेशा समजून अनेकामधे माझ्यासारखा तिचा वापर करायचा.
त्या दिवसात मी जीवाची नीट काळजी न घेता सैर करायचो.मोटरसायकलींची पण हवी तशी देखभाल होत नसायची.
कशी चालवायची ह्याचं शिक्षण पण यतातथाच असायचं.आमचं सुरक्षतेचं साज-सामान हास्योत्पादक असायचं.आणि आमच्यापैकी बरेचसे वयस्कता गाठीत नव्हते.
मी त्याला म्हणालो,
“पण आता तसं नाही.मोटारचंच घे,अलीकडच्या नव्याघाटाच्या मोटारगाड्यामधे, पाहिल्यावर त्यातील मजबूत पॅसिंजर सीट्स,थ्री पॉइंट बेल्ट्स,पूढे आणि बाजूला असलेल्या एअरबॅग्स, गाडीचा चक्काचूर होऊ नये म्हणून फ्रेममधे घेतलेली काळजी,हे सर्व पाहिल्यावर एखाद्या अचंबीत करणार्‍या अपघातातून सहीसलामत वाचण्याचा प्रसंग ह्यात येऊ शकतो हे सत्य आहे.”
ह्या बाबतीत श्रीधर माझ्याशी सहमत झाला.
मला म्हणाला,
“दुचाकी किंचीत वेगळी आहे.मात्र ही दुचाकी तुमच्या आईने किंवा आणखी कुणी तुम्हाला न चालवण्याचं पटवून देऊन झाल्यावर तुमचा तिच्या म्हणण्यावर विश्वास बसण्याइतकी ती भ्रांत नसावी. मोटरसायकल जरी अपघातापासून संरक्षण विरहीत आणि निष्क्रीय प्रकारातली असली तरी तुमची तुम्ही आपघातापासून बचावण्याच्या सुस्पष्ट संभावनेत सुधारणा करू शकता.

कसलीच दारू पिऊन चालवायची नाही, नेहमीच अतिशय सुधारीत अशी संरक्षण करणारी साधन- सामुग्री वापरायची,दुचाकी चालवायला अंगात खरी निपुणता येईल अशी कला आत्मसात करायची,आणि डोकं ठिकाणावर ठेऊन चालवायची. शेवटी बचावाची, संरक्षणाची आयुधं वापरणं हे तुमच्या चातुर्यावर आहे आणि ती वापरली पाहिजे हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे.”
“पण नंतर कॉलेज संपल्यावर तुला कधी मोटरसायकल चालवताना मी पाहिलं नाही.का असं काय झालं?” मी.

“नंतर आम्ही कुटूंबवत्सल झालो. त्यावेळी पैशाची तंगी असल्याने,घरची बंधनं आल्याने, नोकरीच्या दबावामुळे मोटरसायकल चालवण्यापासून दूरच राहिलो.थोडक्यात बाईक घ्यायला पैसे नसायचे आणि चालवायला वेळ नसायचा. मोटरसायकल चालवण्याबाबत एक ना एक कानावर सतत किरकीर यायची.कुणा कुणाची किरकीर अशी असायची की हे दुचाकी वाहन म्हणजे भयग्रस्त वाटणार्‍या मनस्थितीत ठेवणारी ही एक वस्तु आहे.
आणि गंमत म्हणजे असा प्रचार करण्यात भाग घेणार्‍या व्यक्ति म्हणजे,आई,सासु किंवा पत्नी.”
“आणि आता आजोबा.”
मी मधेच म्हणालो.
“हे कोण आजोबा मला कळलं नाही.?”
ह्या श्रीधरच्या प्रश्नावर प्रो.देसायांची आणि त्यांच्या नातवाची मोटरसायकल विकत घेण्यासंबंधाने निर्माण झालेली मतभिन्नता आणि माझ्याकडून त्याच्या आजोबाना वशिला लावण्याबद्दलची त्याची विनंती याची हकिकत मी त्याला सांगितली.
“माझ्या बाबतीत असंच झालं.सडाफटींग असताना हे दुचाकी वाहन भरपूर वापरलं जातं. पण आता पुन्हा वापरण्याची इच्छा दाखवण्याचा प्रयत्न केल्यास,
“पण आता तुझ्यावर कुटूंबाची जबाबदारी आहे.समजा बरं वाईट झालं तर?”
हे वाक्य घरातल्या माणसांकडून ऐकल्यावर डोक्यात येणारी भन्नाड कल्पना मग ती बि.एम.ड्ब्ल्यु साठी असो की आणि कुठच्या तरी दुचाकीसाठी असो,ती क्ल्पना बासनात जाऊन पडायची.”

जरी ह्या लोकांची सुरक्षतेची भावना असली तरी आणि ती कल्पना कितीही विचारात घेण्यायोग्य असली तरी ती जरा अतिरंजीत वाटायची.सत्यतेत जास्त स्वारस्य असणं आवश्यक आहे हे मात्र खरं.प्रश्नच नाही की दुचाकी चालवण्यात कसलंही अपघातातून संरक्षण नसल्याने त्यात जादा जोखिम असते.”

“मग नव्याने दुचाकी चालवू पहाणार्‍या एखाद्या तरूणाला तू काय उपदेश देशील?”
असा मी प्रश्न केल्यावर श्रीधर पुढे म्हणाला,
“मी नेहमीच माझ्या मोटरसायकल चालवणार्‍या मित्राला म्हणायचो की,काही झालं तर झालं पण सर्वांत सुखदायी वाटणारी गोष्ट म्हणजे तू दुचाकीवर बसून बाहेर पडला आहेस त्यातंच तुला सूख आहे.त्या वाहनाला आता सामोरा जा.
मनात जरी संभ्रम आला तरी त्यातून दिलासा मिळणारी गोष्ट अशी की,त्या दुचाकीवर बसून ऐन पावसाच्या दिवसात शंभरएक मैलावर गेल्यावर अचानक डोक्यावर येणारे ते वादळाचे ढग पहाण्याचं अपूर्व समाधान.
जोपर्यंत तुमच्याजवळ दुचाकी चालवण्याचं कौशल्य आहे आणि जोपर्यंत तुम्ही मजल मारण्यासाठी तिची रीतसर डागडूजी केली आहे तोपर्यंत हा सगळा आनंद घेण्यासारखा आहे.मी त्यामानाने त्यावेळी तरूण असल्याने जीवनात असलेली अनिश्चितता आणि येणारी आव्हानं यांना खूशीने तोंड द्यायला लागणार्‍या इतरांच्या मानसिक समाधानीचं मला काही फारसं कौतुक वाटत नव्हतं.मध्यम वयातल्या जीवनात मात्र मला काहीतरी स्वारस्य ठेवावं असं वाटायचं. कधी कधी ते अत्युत्सुक आणि जोखमीचं वाटायचं.

सध्याच्या आपल्या जीवनाला आधूनिक संस्कृतीचा मुलामा चढवलेला जरी असला तरी हे जीवन सदैव हानी विरहित नसतं.आपण सध्या पहात असलेले अत्याचार आणि जीवनाची हानी पाहून असंच मला वाटतं.
अगदी खर्‍या अर्थाने मला वाटतं मोटारसायकल हे एक जीवनाचं असंच एक छोटसं लक्षण आहे.
त्यावेळी माझ्या मित्राला माझा संदेश असा असायचा,
“गड्या! शेवटी काय तुझ्या वाहानावर तू आहेस.”

श्रीधरचं सांगून संपलं आहे असं पाहून मी त्याला म्हणालो,
“प्रो.देसायांचा नातू तू त्यावेळी होतास तसाच सध्या सडाफटींग आहे.आणि त्याला सेलवर आलेली मोटरर्बाईक घ्यायचीच आहे.एकदिवस तू माझ्याबरोबर त्यांच्या घरी चल.आणि तुझा अनुभव त्यांना सांग.माझी खात्री आहे की तू त्यांचं मतपरिवर्तन करू शकशील. त्याचे आईवडिल त्याला परवानगी द्यायला तयार झाले आहेत. पण प्रो.देसाई त्यांच्याही मागच्या जनरेशनचे आहेत.त्यामुळे ते जास्त खंबीर आहेत.”

एक दिवस आजोबा मागे आणि नातू पुढे बसून नवी बी.एम.डब्ल्यु चालवीत माझ्या घरी आले.आणि नातू म्हणाला,
“काका हे पेढे तुम्हाल घ्या आणि हे श्रीधरकाकांना द्या. मिशन ऍकंप्लीश्ड “
प्रो.देसायांच्या चेहर्‍याकडे बघत बघत मी समजायचं ते समजलो.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, June 18, 2009

प्रोफेसरांचा लेख आणि माझी लेट प्रतिक्रिया

“जेणूं काम तेणूंच थाय
बीजा करे तो गोता खाय”

(मंडळी,हे आमचे नेहमीचे प्रो.देसाई नव्हेत.)
मला आठवतं तो १९४० चा काळ होता मी सात वर्षाचा होतो.
त्या दिवसात मराठीत बिगरी,पहिली,दुसरी, तिसरी आणि चौथी झाल्यावर, इंग्रजी १ली ते ७वी म्हणजे मॅट्रिकची परिक्षा.म्हणजेच आता १२वीतून कॉलेजात जातो तसं होतं. माझ्यात आणि माझ्या थोरल्या भावात दहा वर्षांचा फरक होता.”फरक होता” म्हणायचं कारण माझा भाऊ आता हयात नाही.
माझ्या आईवडिलानी मला इंग्रजी शाळेत घातलं ते दादरच्या हिंदूकॉलनीतल्या “किंग जॉर्ज हायस्कूल” मधे.आता त्याला राजा शिवाजी विद्यायलय म्हणतात.
त्यावेळी इंग्रजी चित्रपट फक्त धोबीतलावरच्या मेट्रो थिएटरात दाखवले जात.काही वर्षांनंतर वांद्र्याच्या “बॅन्ड्रा टॉकीज” मधे दाखवले जायला लागले.इंग्रजी सिनेमाचं थिएटर असल्यानें “वांद्रा टॉकीज” न म्हणता “बॅन्ड्रा टॉकीज” असं म्हणणं जास्त समर्पक असावं.
हे संगळं सांगण्याचं कारण असं की मी इंग्रजी शिकायला लागलो मग इंग्रजी चित्रपट मला बघायाला मुभा मिळाली.
“झोरो अगेन इन टाऊन”
हा तो मी पाहिलेला पहिला चित्रपट होता. तो पाहायला माझा मोठाभाऊ आपल्याबरोबर मलाही घेऊन गेला.
“हॅन्डस अप”
हा इंग्रजी उच्चार मला तेव्हडा समजला. बाकी थिएटरातले लोक हंसायचे,आणि माझा थोरलाभाऊ हंसायचा म्हणून मी हंसायचो.नाहीपेक्षा मला काही तो सिनेमा कळला नाही.
जेव्हा आमच्या वाडीतल्या माझ्या मित्रमंडळीने मला विचारालं की,
”कसा होता चित्रपट?”
त्यावर उगाचच आव आणून मला सांगावं लागलं,
“झोरोचे डायलॉग ऐकण्यासारखे होते.”

जे मला कळत नसायचं ते कळतं, असं दाखवून भाव मारायची मला संवय झाली होती.
प्रोफेसरांच्या लेखाबाबत त्यांच्या लेखाला प्रतिसाद देताना माझं असंच होणार की काय असं मला वाटूं लागलं. त्यांच्या लेखावरच्या इतरानी दिलेल्या प्रतिक्रिया वाचून पाहिल्यावर मला कळलं की,काही वाचकांनी चक्क,
“लेख अप्रतीम आहे.”
“लेखन फारच सुंदर झालं आहे”
अशा प्रतिक्रिया दिल्या.लेख समजण्याइतकी क्षमता त्यांचात असायलाच हवी.त्या शिवाय ते असं कसं लिहितील.? असं मला खात्रीपूर्वक वाटलं.
प्रोफेसरांच्या लेखातलं काही लेखन हाय लाईट करून -अर्थात मला तर ते मुळीच कळलं नव्हतं-त्याच्यावर पण काही वाचकांनी आपला प्रतिसाद दिला होता.
“हा तुमचा विचार मला खूपच आवडला.” वगैरे वगैरे.
एका वाचकाने आपल्या प्रतिक्रियेत लिहलं होतं,
“मला तुमचा लेख मुळीच कळला नाही. आपण लोकांना कळण्यासारखं लिहावं”
असा वर त्याचा उपदेशपण होता.

माझं मन प्रोफेसरांच्या लेखाला प्रतिसाद देण्याच्या विचारात द्विधा झालं होतं.
एक-
मी प्रतिसाद द्यायलाच हवा का?
दोन-
प्रतिसाद दिलाच तर तो
“अप्रतिम लेख”
असा द्यावा,की,
तिन-
लेख आवडला नाही म्हणून द्यावा?
का लेख,
“कळला नाही म्हणून द्यावा?
असे एकामागून एक विचार यायला लागले.कारण लेख
“अप्रतिम लिहिला आहे”
असं लिहिण्याची माझी क्षमता नाही हे मला कळत होतं.लेख
“आवडला नाही”
असं स्पष्ट लिहिणं माझ्या स्वभावाला धरून नव्ह्तं.
“लेख कळला नाही”
असं लिहिणं मला जरा ऑक्वर्ड वाटत होतं.कारण मी अगदीच
“हा”
आहे असं कुणाला तरी वाटेल किंवा मी मुद्दाम उपरोधीक लिहित आहे असं इतराना वाटेलच त्याउप्पर प्रोफेसरना पण वाटेल त्याचं मला वाईट वाटत होतं.
मी दहा बारा वर्षाचा असताना मला माझ्या आईवडीलानी पंडीत नारायणराव व्यास ह्यांच्या दादर शिवाजीपार्कच्या संगीत क्लासात घातलं होतं.तसा माझा आवाज गोड होता असं इतर म्हणायचे.पण थोडं गाणं शिकल्यानंतर मी न चुकता वार्षिक सार्वजनीक गणेश उत्सवात गाण्याच्या चुरशीत भाग घ्यायचो.तसं पहिलं बक्षीस मला कधीच मिळालं नाही पण
“उत्तेजनार्थ”
बक्षीस हटकून मिळायचं.
नंतर मला एकदा माझ्या थोरल्या भावाने पं.भास्करबुवा वझ्यांच्या शास्त्रिय संगीताच्या महिफीलीत नेलं होतं.मालकंस राग सुरवातीला गाताना
“मोहे कछु नाही मालुम”
हे झप तालातले बोल होते आणि नंतर
”ज्या मै ना! गाऊंगी”
असे द्रुत तालातले बोल होते. हे अनाऊन्सरने गाणं सुरू होण्यापूर्वी असंच काहीतरी सांगीतलं होतं. ते माझ्या भावाला बाजूला बसलेल्या दुसर्‍या एका व्यक्तिने स्पष्ट करून सांगताना ऐकून मी नीट लक्षांत ठेवलं होतं.बाकी पुर्‍या मैफीलीत माझ्या भावाबरोबर आणि इतरांबरोबर,
“वहावा,बहूत अच्छे”
असं मी एक दोनदांच सूरात सूर मिळवून बोललो होतो.खरं म्हणजे हलकं फुलकं गाणं म्हणण्या व्यतिरिक्त मला संगीतातलं काहीच कळत नव्हतं.व्यासांचा संगीताचा क्लास मी केव्हाच सोडला होता.
आमच्या वाडीतल्या मित्रमंडळीनी न चुकता बुवांच्या गाण्याबद्दलचा माझा अभिप्राय विचारला होताच.
मी बुवांचं नांव घेऊन-दोन्ही कानांच्या पाळ्यांना न विसरतां हात लावून त्यांना आदर प्रदर्शित करून- म्हणाल्याचं आठवतं,
“मैफिल अप्रतिम झाली”
बुवांनी -परत माझ्या कानाला हात लावून-
“मुझे कुछ नही मालूम”
हे बोल सुंदरच आळवले.
आणि
“जा मैना गायेगी”
हा गाण्याचा उत्तरार्ध पण स्मरणात ठेवण्यासारखा गायला.”
असं ठोकून दिलं.
कळलं नाही तरी प्रतिक्रिया देण्याची ही माझी संवय लहानपणापासूनची असल्याने आणि हल्ली मी बरंचसं लेखन करीत असल्याने,
“मला तुमचा लेख कळला नाही”
असं उघड उघड प्रोफेसरांच्या लेखाला प्रतिक्रिया द्यायला-खरं असलं तरी- कससंच वाटत होतं.

समयाची किमया म्हटली पाहिजे.माझ्या ह्या लेखापूर्वीच्या लेखाचं शिर्षक योगायोगाने -जरी विषय निराळा असला तरी-तेच सांगून जातं,
“समयाकडून मिळणारा दिव्य दिलासा.”
प्रोफेसरांच्या लेखावरच्या माझ्या प्रतिक्रियेबद्दल लिहीता लिहीता हे असं विषयांतर झालं म्हणायचं.

आणखी एक गंमत सांगतो.गाण्याच्या कलेची चव घेता घेता चित्रकलेची पण चव घेण्याची बरोबरी मी माझ्या थोरल्या भावाबरोबर केली आहे.तसं पाहिलंत तर माझा थोरला भाऊ जे.जे.स्कूल ऑफ आर्टसचा मान्यवर पदवीधर होता.त्याची आणि माझी बरोबरी कसली?
जहांगीर आर्ट गॅलरीत त्याच्या लॅंडस्केपांची बरेच वेळा प्रदर्शनं झाली आहेत.आणि त्याला बक्षीसंही मिळाली आहेत.
असंच एकदा एका आर्ट गॅलरीत प्रदर्शन होतं.त्याने त्याच्या चित्राबरोबर मला ही एखादं चित्र काढून लावायची गळ घातली.
आणि झालं काय त्याच्या चित्राला पहिलं बक्षीस मिळालंच पण मला ही नेहमी प्रमाणे “उत्तेजनार्थ ” असं बक्षीस मिळालं.
सहाजीकच आमच्या वाडीतल्या मित्रानी नेहमी प्रमाणे माझ्या आणि माझ्या थोरल्या भावाच्या बक्षीसाबद्दल पृच्छा केलीच.
पण घरी आल्यावर मी आणि माझा थोरला भाऊ बक्षीस मिळाल्याने हंस हंस हंसलो.
तुम्हाला कारण ऐकून गंमत वाटेल.
माझा थोरला भाऊ मला म्हणाला,
“मी हंसतोय त्याचं कारण मला नेहमीच बक्षीसं मिळतात,पण ह्यावेळेला मी आपल्या रामाला मला मदत म्हणून काही माझी चित्रं लटकायला सांगितली होती. त्याने एक माझं चित्र उलटं लटकवलं. आणि त्याच चित्राला मला लोकानी उत्तम चित्र म्हणून वाखाणणी केल्याने बक्षीस मिळालं.कारण माझं नाव पण लोकांच्या माहिततलं ना! म्हणून मी हंसत होतो.पण तू का हंसत होतास?”
असं त्याने मला विचारल्यावर मी म्हणालो,
“अरे,तू माझ्यावर चित्र लावण्याचं प्रेशर आणल्यावर मी आपल्या वाडीतल्या सुताराकडून लाकडाची फ्रेम करून त्यावर टाईट कॅनव्हास बसवून घाई घाईत रस्त्यावरून येत असताना त्या उघड्या कॅनव्हासवर एका उनाड मुलाने सायकलवरून जाताना एका खड्यात चाक घातलं आणि त्यातल्या चिखलाचे शिंतोडे माझ्या कॅनव्हासवर उडाले.आता परत तो उपद्व्याप करायला वेळ कुठे होता.मी ते चित्र तसंच आर्ट गॅलरीत लावलं आणि मलापण “उत्तेजनार्थ” बक्षीस मिळालं.
मग सांग मी हंसू की रडूं?”

मंडळी,ह्यातला विनोदाचा भाग सोडल्यावर मतितार्थ एव्हडाच की,जेव्हा समय येतो आणि तुमच्या भाग्यात असलं तर तुम्हाला मिळणार्‍या प्रात्पीला कुणीही काहीही करू शकत नाही.कुणी आड येऊं शकत नाही.
म्हणतात ना!
“होणारे न चूके जरी त्या ब्रम्हदेव ही आडवा.” अगदी तसं.

प्रोफेसरांच्या लेखाचं मात्र असं नाही.त्यात असलेली त्यांची मेहनत,शिक्षण,बुद्धिमत्ता आणि लेखनशैली ह्या सर्वांचा मेळ बसल्याशिवाय असा लेख लिहिला जाणार नाही.
तो लेख कुणाला कळो न कळो, कुणाला अप्रतिम वाटो न वाटो,कुणी त्याला प्रतिसाद देवो न देवो,कुणी त्याला लेख कळला नाही म्हणून म्हणो न म्हणो,
मी फक्त प्रोफेसरांच्या लेखाचा आणि प्रोफेसरांचा आदर करून एव्हडंच म्हणेन की सर,
“असा लेख दुसरा कुणीही लिहूं शकणार नाही”
म्हणूनच माझी ही प्रतिक्रिया,
“जेणूं काम तेणूंच थाय
बिजा करे तो गोता खाय”



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 16, 2009

दुःखाचे दुसरे नामकरण

क्षणो क्षणी क्षय होते संध्या
तसेच जणू असावे हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन

तेच असे नभांगण
तिच असे ही धरती
गैर असे हे ठिकाण
का? गैर आहो आपण
अनोळखी नजेरे सम
असे का हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन

का राहू उभा ह्या वाटेवरी
ही वाटच माझी पहूडली
आपुली मन कामनाही
का?आपुल्याशी रुसली
भटक्या विहंगा सम
असे का हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलोफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, June 14, 2009

समयाकडून मिळणारा दिव्य दिलासा.

वनिता शर्मा माझ्या मुलीची शाळकरी मैत्रीण.कॉलेज संपून नंतर लग्न झाल्यावर ह्या मैत्रीणी आपआपल्या निर्माण केलेल्या जगात संसार करायला निघून गेल्या.पण पृथ्वी गोल आहे आणि जग लहान होत चालंय.परवां तिच्या ह्या मैत्रीणीचा फोन आला.घरी मी एकटाच होतो.माझ्या मुलीची तिने चौकशी केली.

कुणीतरी तिला पत्ता आणि फोन नंबर दिला होता. मी तिला म्हणालो,
” तू एक दिवस आमच्या घरी ये.मी तुला अगदी लहान पाहिली आहे.आपण सर्व बसून गप्पा मारूंया.”
“नक्कीच येईन”
असं सांगून तिने फोन ठेवला.
ज्यावेळी ती आली तिला पाहून मी खरोखरंच अचंबीत झालो.तिच्या लहानपणाची छबी जी माझ्या मनात होती तिला धक्काच बसला.
“तू अशी दिसत नव्हतीस.काय झालं तुला.तुझी तब्यत बरी आहे ना?”
असा मी प्रश्न विचारून झाल्यावर तिची चर्या पाहून मी सरळ सरळ असं विचारायला नको होतं असं मला वाटलं.
“तू सुंदर दिसायचीस.तुम्ही दोन्ही मैत्रीणी अभ्यासात ही हुषार होता आणि शाळेच्या नाटकात भाग घ्यायचा.”
तिची प्रशंसा करण्याच्या दृष्टीने आणि तिला बरं वाटावं म्हणून मी असं म्हणून माझ्या मला मी सांवरायला बघीतलं.
मला वनिता म्हणाली,
“काका,तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.पण माझ्या आयुष्यात तसंच काही घडलं.आणि मनाला लागणारी गोष्ट घडल्यावर प्रकृतीवर नक्कीच त्याचा परिणाम होतो.मी तुम्हाला कारण सांगते”

पंधरा वर्षापूर्वी माझ्या वडलांचा निघृण खून झाला होता.मध्यरात्री ते कामावरून परत येत होते.त्या दुर्दैवी रात्री एका माथेफिरूने त्यांच्या जवळ असलेले पैसे हिसकावून घेऊन झाल्यावर त्यांचा अंत केला.लांबून पहाणारे सांगतात,त्यांनी त्या दुष्टाशी दयावया करण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्यावर गोळी झाडली गेली.

जे लोक एखाद्या निरपराध्याचा आत्मा ह्या जगातून असा हिसकावून घेऊन कधीही परत येणार नाही अशा परिस्थितीत ह्या आसमंतात भिरकावून देतात त्यांच्या मनिस्थितीचा विचार करून माझ्या मनात नेहमी पेच निर्माण होत राहतो.”

मी आणि माझी मुलगी हे ऐकून खूपच दुःखी झालो.
माझी मुलगी तिला म्हणाली,
“तुझे वडील मला खूप आवडायचे.फिरतीवरून आल्यावर ते नचूकता नेहमी आपल्यासाठी च्युइंगम घेऊन यायचे.आपला हात मागे लपवून आपल्याला म्हणायचे,
“डोळे मिटा आणि उजवा हात पूढे करा.”
हातात वस्तु ठेवल्यावर म्हणायचे,
” सांगा काय ते?”
आणि आपण दोघीही मोठ्याने ओरडायचो,
“चिंगम!”
मग ते ओरडून सांगायचे,
“अंह,च्युइंगम”
आणि आपण मुद्दाम परत म्हणायचो,
“चिंगम”
आणि नंतर आपण सगळे तिघेही हंसायचो.आणि हा शॉट आपण कॉलेजात जाई पर्यंत करायचो.”
वनिता तिच्या वडलांच्या त्या दुःखी घटने नंतर आता विचाराने पोक्त झाली होती. कधी कधी माणसाच्या आयुष्यात “टर्नींग पॉइंट” येतो म्हणतात ना तसं.हे तिच्या बोलण्यावरून कळलं.

” एकाएकी आणि संक्षीप्तात डोंगरावरच्या रंगीबेरंगी फुलांच्या बहाराची रमणीयता पाहून निसर्ग आपल्या स्वरुपाचं अविरत प्रदर्शन करीत असतो असं वाटतं.
पुरामूळे झाडं उमटली जातात,घरं उद्वस्त होतात आणि लोक पुन्हा मागे फिरून आपली वस्ती उभारतात.आकाशातून एखादं विमान जमीनीवर पडून अपघात होतो, आतल्या लोकांचं त्या धुमस्त्या आगीत अंत होतो, त्यांच्या प्रियजनावर अविचलीत आणि दुर्दम आघात होतो.”
हे वनिताचं बोलणं ऐकल्यावर मी तिला म्हणालो,
“बोल,बोल तू काय बोलतेस ते ऐकायला मला आवडतं.वेदनेतूनच निर्मिती होते.तशीच विचारांचीपण निर्मिती होते”
वनिताला हे ऐकून खूपच बरं वाटलं.
ती पूढे म्हणाली,
“असं झाल्यावरही असल्या विनाशकारी घटनेचा परिणाम पाहिल्यानंतर जसा समय जात रहातो तसंच एखादं बी पेरलं जातं आणि त्यातून पुढला समय काय आहे ते हळू हळू स्पष्ट होत गेल्याचं दिसून येतं.अश्या ह्या नवीन रोपं उगवणार्‍या बियाणाकडून आसमंतात परिवर्तन करण्याची निसर्गाची क्षमता स्पष्ट होते.
होवून गेलेल्या कुठल्याही घटनेचं अशा तर्‍हेने रुपांतर करण्याच्या निसर्गाच्या क्षमतेकडे पाहून नकळत माझ्या मनात विचार येतो,
“निसर्गा मी तुला मानलं.”
माझ्या मुलीने तिला मधेच थांबवीत म्हटलं,
“वेळ कसा निघून जातो नाही काय?”

“माझे वडील गेल्यानंतर माझ्या दुःखाची पंधरा वर्षं होऊन गेली आणि मी अशा एका मनस्थितीत येऊन पोहचले आहे की,त्या निरपराध्याची-म्हणजे माझ्या वडीलांची, माझ्या मित्राची-आठवण काढून त्यांची हानी झाल्याचं पाहून,आणि त्याबरोबरीने त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रियजनांच्या शोकाला पाहून मी दुःख करीत राहाणं हे स्वाभावीक आहेच, आणि एव्हडंच नाही तर,ते अतिभयंकर कृत्य करणार्‍या त्या अपराध्याच्या आत्म्याचं सुद्धा मला दुःख करायला हवं असं वाटायला लागलंय.

जशी वेळ जात राहिली आहे, तसं माझ्या लक्षात यायला लागलं आहे-आणि जे इतरांच्या पण लक्षात येतं- की मृत व्यक्ति आपल्यात कशी वास करून राहते ते.
मी माझ्या वडीलांच्या स्मृतिचे झरोके त्यांच्या रुपात, त्यांच्या भावप्रदर्शनात,किंवा एखाद्या म्हणी मधूनही पहाते आणि समाधानी करून घेते.
उदाहरण द्यायचं झाल्यास,
“भुकेलेल्या अन्नाची चव कसली?”
मी वनिताला म्हणालो,
“मुलीचं वडलांवर नेहमीच जास्त प्रेम असतं.एकतर मुलगी ही भावी आई असते आणि स्त्रीला निसर्गानेच प्रेमळतेची देणगी दिली आहे.जननी जन्मदाती असं स्त्रीला म्हणतात मी तर स्त्रीला जननी प्रेमदाती म्हणतो”
वनिताला वडलांची आठवण आली.म्हणाली,
“जो पर्यंत माझा अंत होत नाही तो पर्यंत कसलीही विनाशकारी ताकद त्यांना माझ्यातून निखळून नेऊं शकत नाही. आणि म्हणूनच काही काळ निघून गेल्यावर त्या खून्याबद्दलची दुःखद व विषादग्रस्त, सहानुभूति मला वाटायला लागली आहे.तसंच माझ्या मनांत येतं की तो भिषण प्रकार झाला नसता तर माझी विचारसरणी अशी झालीच नसती. मला वाटतं त्या घटनेला दिलासा मिळण्याचा अवधी मिळाला.

असं बघा,आता हा माझा मुलगा तिचाकी घेऊन अंगणात फिरतोय तो माझ्या ह्या मांडीवरच वाढला ना?प्रत्येक वसंत ऋतुत जीवन नव्याने येतं,आणि हा ऋतू नवीन फुलं, गवत आणि झाडं देतं.रात्री सृष्टीचे तारे उंच आकाशात घुमत असतात. असं हे आपल्याला परिचीत असलेलं जीवन वाढतं आणि पोसतं.”

माझ्या मुलीला आणि वनिताला उद्देशून मी म्हणालो,
“आपल्या जीवनात आलेल्या आंबटगोड घटनाना पण जडं असतात.पण एक मात्र खरं की त्या घटनांची निराळीच सृष्टी असते.आणि अशा ह्या विक्षीप्त आणि अपरिचीत सृष्टीतलं भूदृश्य हृदयातून पोसलं जातं, बलशाली शक्तिरूपी सूर्य प्रकाशाने उजळलं जातं आणि समयाच्या जळाने भिजवलं जातं.”
मी माझ्या ह्या विचाराने वनिताला वेगळीच ट्रिगर देण्याचा प्रयत्न केला.पण आटोपतं घेत वनिता म्हणाली,
“अलीकडे ह्या निराळ्याच जगतात माझं मी परिवर्तन करून घेतलं आहे.समयाच्या बळाने मी दुर्दम समस्येत डुबून ह्या माझ्या नव्या सृष्टीतल्या उजाड आणि पडीक जमिनीतून जबरदस्तीचं बिज उगवण्याच्या प्रयत्नात आहे.”

उठता उठता मी वनिताला सांत्वन करीत म्हणालो,
“तू अशी दिसत नव्हतीस.काय झालं तुला. तुझी तब्यत बरी आहे ना?”
हा सुरवातीला प्रश्न विचारून तुला उगीचंच त्रास दिला असं त्या क्षणी मला वाटलं होतं.पण खरं सांगू का,मी तुझ्याकडून तुझे विचार ऐकून जीवनाकडे पाहायलो शिकलो.”
वनिताच्या डोळ्यात मला तिचे वडील दिसले.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, June 12, 2009

नका देवू कुणी दोष मला

अंग तुझे चंदनासम
नजर तुझी चंचल
हळुच तुझे खुदकन हंसणे
नका देवू कुणी दोष मला
झालो जर मी हिचा दिवाना

तुझी देहयष्टी भावलेली
तुझे नयन काजळलेले
सिंदुरबिंब तुझ्या माथ्यावरती
लाल निखारे ओठावरती
पडे कुणावरी तुझी छाया
दुःख मनातले जाईल वाया

तू सुंदर तनाची सुंदर मनाची
मुर्ती असे तुझी सुंदरतेची
वाण असो कुणा कदापी
परि जरुरी आज मला तुझी
केव्हाचा असे मी बेचैनलेला
नको बेचैन करू तू आता मला


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे केलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, June 10, 2009

वास्तविकता आणि भ्रम

" त्या बाईला दुःखाच्या वेदना होत असताना ती रडताना पाहून त्याच क्षणाला माझी धडधडणारी वेदना मला जर नसती तर मी तिच्यासाठी रडले असते का?"

सुमतीची परिस्थिती बघून मला कवी सुरेश भट्ट यांची आठवण आली.त्यांच्या पायाला पोलिओ झाला होता.सुरेश भट्टाना त्याबद्दल खूप खंत व्हायची. अगदी लहानपणी शाळेत वक्तृत्व स्पर्धेत त्यांना उस्फुर्त विषय देऊन बोलायला सांगितलं होतं. विषय होता,
"देवाने मला परत जन्म दिला तर!"
भट्टानी पहिलच वाक्य सांगितलं,
"मी देवाला सांगेन,देवा मला असा अपंग करू नकोस"
आणि त्यांचे डोळे पाण्याने भरले होते.
भटांचे वडिल डॉक्टर होत आणि आई एक प्रसिद्ध समाजकार्यकरती होती.

भटांच्या कविता वाचल्या तर बरेच वेळा त्यांच्या मनातलं उदासिनतेचं प्रतिबिंब दिसून यायचं.
असंच उदाहरण एका प्रसिद्ध मराठी संगित दिग्दर्शकाचं आहे.
सर्व काही मनासारखं असून केवळ अपंगत्वामुळे त्यांना नेहमी मायुसी येत राहते.
पण म्हणून ह्या दोन्ही व्यक्ति खंत करित राहिल्या नाहीत.एकाने कवितेची आणि साहित्याची भरपूर सेवा केली.आणि मनाला भावतील अश्या कविता लिहिल्या. तर दुसर्‍यानी अतिशय मोहक चाली देऊन गाणी ऐकण्याजोगी केली.

त्या दिवशी मी जेव्हा सुमतीला खूप दिवसानी भेटलो तेव्हा ह्या सर्व आठवणी फ्लॅशबॅक कशा माझ्या डोळ्यासमोरून गेल्या.
मी सुमतीला ह्या दोन व्यक्तिंची जी मला माहिती होती ती देत गेलो.ती निमूट सर्व ऐकत होती.नंतर मला म्हणाली,

"मला लहानपणीच पोलिओ झाला होता.मी त्यावेळी सहा वर्षाची असेन.मला अजून आठवतं की माझ्या पहिल्या इयत्तेतल्या त्या शाळकरी मैत्रीणी कडून दिले गेलेले आणि लक्षात ठेवण्याजोगे कटाक्ष आणि ते पहात असताना माझ्या चालताना येणार्‍या टोचर्‍या वेदना मला मसमुसून रडूं आणायच्या.माझ्या लक्षात आलं होतं की कुणालाही स्वतःमधे निमग्न असलेली रडकुंडी बेबी आवडत नसावी.

परंतु, तसं असलं तरी मला असं कधीच अनुचीत वाटलं नाही की माझ्या इतर शाळकरी मैत्रीणीना औषध घ्यावं लागत नाही, शारिरीक उपचार करावे लागत नाहीत,रक्त तपासावं लागत नाही,आणि कधी कधी इंजक्षन पण घ्यावं लागत नाही.मला ते जीवंत रहाण्यासाठी करावं लागत होतं,आणि त्या बालवयात मी ताडलं की ही वास्तविकता मला खाली ओढत नव्हती तर उलट उंचीवर नेत होती.

मला असं वाटतं की वास्तविकता ही भ्रमापेक्षा जास्त पसंत करण्याजोगी बाब आहे. सत्य मला जेव्हडं लवकर कळेल तेव्हडं लवकर त्याच्याशी मी अनुरूप होईन.वास्तविकता निवडल्याने मी कधी कटु बनले नाही किंवा दोषदर्षी बनले नाही. उलटपक्षी माझ्या लक्षात आलंय की वास्तविकतेचा अगदी पराकोटीचा घृणा येईल असा अनुभव घेतल्यावरही खर्‍या सुंदरतेला मी समजू लागले आहे.

मला आठवतं ज्यावेळी मला वाकून काही करता येत नव्हतं तेव्हा माझी आई मला मदत करायची.पण हळू हळू माझ्या लक्षात आलं की माझी आई मला जन्माला पुरवलेली नाही.म्हणून माझी मीच प्रयत्न करायचे.अनेकवेळा सकाळच्या वेळी माझे मला कपडे चढवायला कष्ट व्हायचे.माझ्या मीच मला म्हणायचे,
"हे काय खरं नाही."
दमून दमून कोंडमारा झाल्यावर शेवटी हे काम संपायचं.
माझ्या आयुष्यात आलेला एक उत्तम धडा मी शिकले.सत्य लपवणं काही बरं नाही-ह्या माझ्या कधीही बर्‍या न होणार्‍या व्याधी बाबत-जे दुःख माझ्या भाग्यात आलं आहे त्यापासून फक्त जेव्हडं मला जमेल तेव्हडं मी करावं.

नक्कीच,माझी टिंगल-मस्करी झाल्यावर मला वाईट वाटायचं.माझ्या काही मैत्रीणी माझी चालण्याची नक्कल करीत असताना मी त्यांना पाहिलं आहे. माझ्या पहिल्याच जॉबच्यावेळी माझ्या मागे माझा बॉस कुणाला सांगताना माझा "लंगडी" असा संदर्भ द्यायचा,ते माझ्या मनाला लागायचं. मला वाटत नाही की मला त्याने कमी सुरक्षित वाटायचं.किंवा मला कमी निश्चिंत वाटायचं.फक्त मला नवल वाटायचं की लोक किती संवेदनाश्यून्य असावेत.मला हळू हळू लक्षात यायला लागलं होतं की, स्वतःमधे निमग्न असणं ही अगदी सामान्य बाब आहे. आणि वर मी मनात म्हणायचे ते जर सामान्य नसलं तरी मला त्याचं काही देणं घेणं नाही.

मी सोळा वर्षाची असताना एका पावाच्या बेकरीत पुढल्या भागात विकण्यासाठी रचून ठेवलेल्या पाव-केक-बिस्किटाच्या दुकानात काम करायचे.एक बाई आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी केक विकत घ्यायला आली असताना रडत होती.ते लहान मुल एका उंच जागी चढून खाली पडलं होतं आणि गंभिर स्थितीत हॉस्पिटलात होतं.आपल्याच मुलांची ह्या लोकाना काळजी कशी घेता येत नाही? आणि मग त्या दुर्घटनेच्या दुःखाने ह्याना वेदना कश्या सहन होतात? असा मला प्रश्न पडला होता. आणि रडूं ही आलं होतं.

आज मी मलाच विचारते,
"त्या बाईला दुःखाच्या वेदना होत असताना ती रडताना पाहून त्याच क्षणाला माझी धडधडणारी वेदना मला नसती तर मी तिच्यासाठी रडले असते का?"
ह्यातूनच माझा दुसरा महत्वाचा धडा मी शिकले तो म्हणजे एक, त्या वेदना होणं,दुसरं,त्याला मिळणारा माझाच प्रतिसाद, आणि शेवटी इतराना होणारी वेदना पाहून मला रडूं येई त्याबद्दल मनात बसलेली माझी पक्की समज,अश्या ह्या तिन्ही गोष्टींचा विचार केल्यावर मी माणूस म्हणून मला दैविकतेचा,पावित्र्याचा, आणि त्या शाश्वततेचा आभास होत राहिला,आणि मी त्यातून एक परिभाषा शिकले."

मी सुमतीला विचारलं,
"ह्या अलंकारिक शब्दांचा मी अर्थ तरी काय काढावा?"
ती म्हणाली,
"सोप्यात सोपं म्हणजे दैविक संकेत मनात बाळगावा की माझ्यासाठी मी जेव्हडं करते तेव्हडंच दुसर्‍याबद्दल मी परवा ठेऊन करावं.
दोन दिवसापूर्वी माझे पती सहा महिन्याच्या टूरवर दक्षिणेत नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी गेले आहेत.ते पोलिसात आहेत.माझ्या मनातली पहिली प्रतिक्रिया म्हणजे माझ्यासाठी मी दुःखी झाले.दुसरी प्रतिक्रिया म्हणजे मी माझ्याशीच प्रातार्णा करू लागले की सर्व काही ठीक होणार आहे.ते नक्कीच सुरक्षीत घरी येणार आहेत.पण मला सत्य परिस्थितीशी सामना करण्याविना गत्यंतर नाही.एकतर मी विधवा होईन किंवा,देवावर विश्वास ठेवून माझ्या मनात तरी स्फोट होऊ देणार नाही.
त्यामुळे आता मी एकटीच घरी असल्याने माझे शेजारी,माझे सहकारी आणि माझे मित्रगण मला बरं वाटावं म्हणून झटत आहेत.
मग मला निराशजनक होऊन कसं चालेल?"

"आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन वास्तविकता नजरे आड न करता उगाचच भ्रमात राहून जीवन कसं जगू नये हे तुझ्या कडून ऐकून आणि कवी सुरेश भटांचं उदाहरण पाहून मला तरी वाटायला लागलं आहे की तुम्ही सर्व ग्रेट आहात."
असं म्हणून मी सुमतीची पाठ थोपटली.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, June 8, 2009

स्वप्न

(ॠणनिर्देशः हिंदीत,मराठीत,आणि इंग्रजीत लिहिणारे कवी आणि
"वाचून बघा"
ह्या ब्लॉगचे लेखक श्री. सतीश वाघमारे यांच्या
"ख्वाब"
ह्या हिंदी कवितेचा अनुवाद.)

स्वप्न

पहात आलो अनेक दिवस हे स्वप्न मी
तुजसम होऊन मलाच पाहिले मी
ह्या नयनातून त्या नयनात न्याहाळले मी
त्या मलाच तू पाहिलेस माझ्यातला मी

ऐटबाजी नजरफेक अन हास्याचे ताने
नखर्‍यांचे खंजीर अन निष्पापी बहाणे
पवनाचे पण आता असेच होई सतावणे
आणूनी सुगंधा फिरूनी होई माझे लुभावणे

दिनभर ही तुझी भ्रांती दर्शनाची
तुझी नी माझी रात्र असे स्वप्नाची
सांगाया दे स्मृती अपुल्या शपथेची
दाखव जरा असेल जर घडी विरहाची

मानले अजूनी जरी अतीव अंतरे असती
पाहूया दैवाची कोणती असे अनुमती
उमेदीची नित्य नवी अवलोभने वाढती
प्राप्त तुलाच करण्या उत्तूंग अभियाने येती



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, June 6, 2009

आठवणींची निर्मिती.

आज आमच्या शेजारांच्या घरात खूपच गडबड आणि आवाज होत होता.त्यांना दरवाजा खटखटून चौकशी करण्याचा माझा मानस नव्हता.पण काही वेळाने माझाच दरवाजा खटखटून गडकर्‍यांची भारती आली आणि मला म्हणाली,
"काका,एकदोन खूर्च्या कमी पडतायत,तुमच्या खुर्च्या मिळतील काय?"
मी म्हणालो,
"त्यात विचारायचं काय घे तुला हव्या तेव्हड्या. पण काय गं भारती कसली गडबड चालली आहे बर्‍यांच बायकांचा आवाज येतोय."
मला म्हणाली,
"आज आमच्या घरी "पॉटलक" आहे."
"म्हणजे ग काय?"
ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता हात करीत म्हणाली "मग सांगते. "
आणि नंतर ती गडबडीत यायचीच विसरून गेली.
तिची आई सरिता गडकरी अशीच दोन तीन दिवसानी गप्पा करायला आली होती.
त्या दिवसाची आठवण करून मी तोच प्रश्न तिला विचारला.
मला म्हणाली,
"अहो,अमेरिकेत त्याला "पॉटलक" म्हणतात ना तोच प्रकार इकडे करतात.
आमच्या आईच्या आणि मावशीच्या हाता खाली जेवण शिकून मी तयार झाले,आणि माझ्या हाताखाली माझी मुलगी आता जेवण करण्यात तयार झाली आहे.तिच्या मैत्रीणी महिन्याला एकदा सर्व जमून पार्टी करतात.हा एक चांगला सामाजीक कार्यक्रम असतो.त्यावेळी प्रत्येक जण आपआपली डीश तयार करून घेऊन येतात.सर्वच जणी ह्यामुळे एकमेकाची डीश वाटून घेऊन नुसती खात नाहीत तर त्यातून एकमेकाच्या डीश करण्याच्या पद्धतीची चर्चा करतातच आणि खाऊन त्यांच्या जीवाला तृप्ती मिळते.
माझी भारती सांगत होती की,एका पार्टीला तिच्या एका मैत्रीणीने आंब्याचं पन्हं करून आणलं होतं.ते सर्वांना इतकं आवडलं की त्याची करण्याची पद्धत सर्वांनी लिहून घेतली.नंतरच्या एका पार्टीला माझ्या मुलीने कानडी "एल्लापे" करून नेले होते ते खाऊन सर्वांनी फस्त केले.तुम्हाला माहित आहे की भारती कर्नाटकत दिली आहे.काही कानडी डीश ती शिकली आहे.उरलं सुरलं अन्न मग ही मंडळी घरी नेऊन आपआपल्या कामवाल्या बायकाना वाटतात असं माझी भारती मला सांगत होती.

तुम्हाला सांगू का,स्वयंपाकी फक्त स्वयंपाक तयार करीत नाहीत-म्हणजे जेवणाची निर्मिती करीत नाहीत- ते आठवणींची पण निर्मिती करतात.
माझ्या स्वतःच्याच जून्या आठवणीमधे स्वयंपाक करणार्‍या व्यक्तिंच्या पण आठवणी आहेत.
माझ्या लक्षात आलंय की ही मंडळी माझं पोट नुसतं रुचकर जेवण करून भरत नव्हती तर माझ्या स्मृतित सजीव गोड सुगंधाने भरलेल्या स्वयंपाक खोल्यांच्या छब्यांची निर्मिती करीत होती.

माझी आई आणि मावशी समारंभाला घरीच जेवण करीत.मला आठवतं माझी आई चवदार कोशिंबीरी करायची. चटण्यांचे अनेक प्रकार करायची.कोथिंबीर घालून नारळाच्या चूनाची चटणी,मिरचीपूड घालून खसखसट्लेल्या नारळाच्या चूनाची चटणी,कवटाच्या - हे पोपटी रंगाचं गोल आकाराचं कडक फळ असतं- किसात कैरीचा कीस टाकून केलेली चटणी,दाणे,सुकं खोबरं किसून,तीळ आणि सुक्यामिरच्या घालून कुटलेली सुकी चटणी,कच्च्या कैर्‍या कापून त्याच्या लहान लहान फोडी करून त्यात मिठ मिरची टाकून करमट करायची,अश्या नानातर्‍हेच्या चटण्या खाल्याची आठवण येते.
मी म्हणालो,
"तुझी मावशी सुद्धा स्वयंपाक करण्यात तरबेज होती ना?"
"माझी मावशी स्वयंपाकघरात काही अपरिचीत पाहूणी नव्हती.तिनेच मला समजायला मदत केली की विशेष पदार्थ तयार करून इतराना तृप्तीचा आनंद कसा देता येतो.माझ्या चक्षूस्मृतित ती आता दिसते.निरनीराळी कडधान्यं मिसळून खमंग पिठ घरच्याच जात्यावर दळून गरम गरम थालिपीठं करून त्यावर ताज्या लोण्याचा गोळा वाढून समोर ठेवायची."
"मला आठवतं तुम्ही सगळे लहानपणात सुट्टीत कोकणात न चुकता जात होता.जवळ जवळ अर्धी एस.टी तुम्ही बूक करायचा.डी.एन. नगरमधे एस.टीच्या खास गाड्या येऊन सर्वाना कोकणात जाण्याची सोय केली जायची हे मे महिन्यात व्हायचं त्याशिवाय गणपती उत्सवात परत ती सोय दिली जायची."
असं मी म्हटल्यावर सरिता आपल्या लहानपणाच्या गोष्टी अगदी तालात येऊन सांगायला लागली.

"लहान असताना मी माझ्या मावशीच्या घरी सुट्टीत जायचे.पिंगुळी गावात मावशीचं टुमदार घर होतं.आजुबाजूची वनश्री डोळ्यांना आल्हादायक वाटायची.जेवणाची सर्व तयारी झाल्यावर पाट-पाणी ठेवण्यासाठी मी तिला मदत करायचे.सर्वांना जेवायला बोलवल्यावर मावशी ताटात एक एक पदार्थ वाढायची.
उकडलेल्या बटाट्याची भरपूर कांदा घातलेली भाजी, पोरसातलं माजलेलं अळू काढून आणल्यावर स्वच्छ धूवून लसणीची फोडणी दिलेली अळूची लोण्यासारखी शिजलेली भाजी,गरम गरम उकड्या तांदळाच्या वाफेला खमंग वास येणारा भात,फणसांच्या घोट्या घालून केलेली हिंगाचा सुगंध येणारी डाळीची जाड आमटी आणि वाटी वाटी आमरस असा बडेजाव असायचा.

दिवाळी,दसरा,गणपती उत्सव हे सण फक्त धार्मिक आणि आणि सांस्कृतीक घटना लक्षात ठेवण्यासाठी नसून ते प्रसंग नातेवाईक आणि मित्र-मंडळीना एकत्र येऊन खास केलेले पदार्थ वाटून घेऊन खाण्यासाठीही आहेत.अन्न आणि स्मृति एकत्र असतात.

जशी मी वयाने मोठी होत चालेय,तशी माझे ह्या बाबतीतले विचार पण पोक्त होत चाल्लेत.स्वयंपाक करणारी व्यक्ति नुसतीच स्वयंपाक करीत नाहीत तर स्वयंपाक करण्या व्यतिरिक्त आठवणींची पण निर्मिती करते हे मी पक्क लक्षात आणलं आहे.
तुम्ही हंसता कां?"
असा मला सरिताने प्रश्न केल्यावर मी म्हणालो,
"पुढच्या खेपेला हे पॉटलक केलंत तर मला पण एक शेयर डीश आणून दे.मी पण माझ्या आठवणीची निर्मिती पुढे कधी तरी उपयोगात आणीन."
"हे आपलं बरं"
एव्हडंच सरिता बोलून जायला उठली.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gamil.com

Thursday, June 4, 2009

हा विचार आता सतावी मला

जीवन तुझ्या संगतित आणिते मला
चंद्राहूनी बेहत्तर दिसे धरती मम नजरेला

रिझवी सुगंध लालफुलांचा मम मनाला
दिन ढळता साद तुझी बोलावे मला

कधी गुण्गुणूनी वा कुजबुजूनी
स्मरण तुझे जागवी रात्र मला

हर एक भेट संपते वियोगामधे
हा विचार आता सतावी मला



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, June 2, 2009

“आनंदी आनंद गडे!”

आज बरेच दिवसानी प्रो.देसायांचा नातू आणि त्याचा मित्र असे दोघे लगबगीने माझ्याजवळ येताना पाहून मी समजलो की आज भाऊसाहेब काही तळ्यावर फिरायला येत नाहीत.
“आम्हाला पाहून तुम्ही समजला असालंच”
असं म्हणता म्हणता निमीश म्हणाला,
“हा माझा मित्र नितीन मतकरी.आत्ताच हा वकीली परिक्षा पास झाला, आणि सध्या एका कंपनीत काम करतो.सध्या म्हणण्याचं कारण, तो ही कंपनी सोडून दुसर्‍या एका कंपनीत वरच्या पोस्टवर जॉईन होणार आहे.”

हे ऐकून मी म्हणालो,
“बरं आहे तुमचं,आमच्या जमान्यात आम्ही एका कंपनीत काम करायला लागलो की निवृत्त होई पर्यंत त्याच कंपनीत चिकटून असायचो.आणि त्यावेळी आम्हाला तेव्हडे मोके मिळत नव्हते.पण एक मात्र खरं मोके मिळत नसतात मोके घ्यायचे असतात.पण ते राहूदे तुझे आजोबा आज येणार नाहीत ह्या शिवाय मला काहीतरी तुला सांगायचं आहे असं वाटतं.बोल.”

“हा माझा मित्र नितीन पुरा नास्तिक आहे.ह्याचा माझ्या आजोबांशी वाद चालला होता.
आजोबांचं म्हणणं असले वाद ही तरूणपणातली त्यांच्या शब्दात “खूळं ” असतात.जसं जसं वय होत जातं,दुनियादारी करावी लागते,जीवनात “ठक्केठोपे” खायची पाळी येते तसं तसं माणूस थोडा स्वभावाने नरम होतो.आणि मग थोडाफार देवाच्या अस्तित्वाला मानायाला लागतो.अर्थात ह्याला काही अपवाद असूं शकतात.
काका,तुमचं काय म्हणणं आहे ह्या विषयावर?”

मी म्हणालो,
“हे बघ नितीन, ह्या विषयावर अगणीत वाद झाले आहेत.तुला मला ते नवीन आहेत.तुझे आजोबा म्हणतात त्या अपवादातला मी पण एक आहे.पण हे सर्व बोलण्यापूर्वी तुझा हा मित्र नितीन काय म्हणतो ते तरी ऐकतो.बोल रे नितीन.”

“मला प्रथम श्रद्धे विषयी उघड उघड बोलण्यापूर्वी माझी श्रद्धा काय आहे ते सांगू देत.
मी देवावर विश्वास ठेवत नाही.देव आहे हे मी मानत नाही.काही श्रद्धा ठेवतात त्या देवावर, सर्वव्यापी परमेश्वरावर किंवा ज्याच्याजवळ ह्या विश्वाचं रहाटगाडगं चालवण्याचं बळ आहे त्या विधात्यावर, पण मी विश्वास ठेवीत नाही.
मी नास्तिक आहे.अनीश्वरवादी आहे. अज्ञेयवादामागे-ईश्वराचं अस्तित्व आहे की नाही यावरचा वाद-मला दडून राहायचं नाही.किंवा पैजे मागे लपून राहायचं नाही. माझी अशी श्रद्धा आहे की हे विश्व,ही सृष्टि भौतिक तत्वावर,आणि अंतरिक्षीय योगायोगावर चालते.”

नितीनला मधेच थांबवून मी म्हणालो,
“भाऊसाहेब सांगत आहेत ते त्यांच्या अनुभवावरून सांगत असावेत.अनुभव ही अशी गोष्ट आहे की ती अनुभवल्याशिवाय कशी कळणार.?खाडी पोहून जाण्याची कल्पना करता येईल पण ती पोहून गेल्या शिवाय अनुभव येणार नाही असं उदाहरण देता येईल.तरीपण तुझ्या विचारांचा पण आदर केला पाहिजे.”

नितीन म्हणाला,
” माझे हे विचार बर्‍याच लोकाना धक्कादायी वाटतात.माझ्या सर्वात दुःखदायी स्मृतिची ती संध्याकाळ,मला आठवण करून देते जेव्हा मी अगदी माझ्या तारुण्यात असताना माझ्या आईबाबाना -जे देवभाविक असून ज्यानी मला त्या माझ्या तरूणपणाच्या दिवसात एकाही मंदीरात नेण्यापासून सोडलं नाही,एकाही देवाच्या उत्सवात जाण्यास वंचित केलं नाही, त्यांना मी माझ्या श्रद्धेबद्दल आणि माझ्या देवावरच्या अविश्वासाबद्दल सांगितलं.त्यांना ऐकून मनस्वी धक्का बसला.त्याना माझ्या मोक्ष मुक्तिची काळजी वाटली आणि माझं नीट संगोपन करण्यास ते असफल झाले असं त्यांना वाटलं.त्यांनी अशी कल्पना करून घेतली की मी नैतिकतेची सीमा गमावून बसलो आहे.
जरी मी त्या कल्पित सर्वव्यापी परमेश्वराबद्दल मनुषाच्या मनात असलेली छबी स्वीकार करायला असमर्थ असलो तरी माझ्या जवळ जबर नैतीक श्रद्धा आहे.

मी मानतो की दुसर्‍या जीवजंतूना मारणं किंवा जखमी करणं हे अगदी अयोग्य आहे.मी शांतीवादी आहे.वाटेत एखादा कीडाजरी दिसला तर त्याला मारायला मी टाळीन.पण त्याचबरोबर मी हे ही मानतो की क्वचीत प्रसंगी कुणी जर का अत्याचार करीत असेल तर त्याच्याबरोबर दोन हात करणं जरूरीचं आहे.तसंच मी मानतो की मला माझं जीवन जगताना,योग्य निर्णय घेणं आणि प्रामाणिकता ठेवणं ह्यावर जास्त भर ठेवण्याची आवश्यकता आहे. एकदा मी बाजारात कुणाची तरी शंभराची नोट खाली पडलेली पाहून दोन बसस्टॉप त्या माणसाच्या मागे धावून त्याला परत करण्याचा प्रयत्न केला होता.

काका,तुम्ही म्हणता तेच मला वाटतं,
प्रत्येकाने दुसर्‍याचा आदर केला पाहिजे आणि त्याच्या श्रद्धेचापण आदर केला पाहिजे.अमूक देवायलाला पैसे द्या म्हणून माझा दरवाजा खटखटला तर मी पैसे द्यायला कबूल होत नाही. पण काही सामाजिक कार्याला मदत मागितली तर मी अवश्य देतो.”

मी नितीनला म्हणालो,
“प्रोफेसर म्हणतात त्याप्रमाणे ह्या वयात माझ्याही स्वभावात नरमपणा आला आहे.तरीपण मी ह्या वयात तुझ्या नास्तिक असण्याच्या श्रद्धेशीही सहमत आहे. पण माझ्या स्वभावाचा नरमपणा मी “सिलेक्टीव्हली” वापरतो.ज्यावेळी माझी पत्नी रोज देवाची पूजा करून झाल्यावर मला गणपतीच्या मुर्तिला नमस्कार करायला सांगते त्यावेळी निमुट नमस्कार करतो.आणि तिने दिलेला प्रसाद आणि तीर्थ न चुकता उजव्या हातात घेऊन प्राशन करतो.
माझा उद्देश एकच असतो की माझ्या असं करण्याने तिला जर का आनंद होत असेल तर सहाजीकच त्यात मलाही आनंद होतो.
तसंच तुझ्या सारखा नास्तिक जेव्हा म्हणतो की,
“हे विश्व,ही सृष्टि भौतिक तत्वावर,आणि अंतरिक्षीय योगायोगावर चालते.”
हे पण मला तंतोतंत पटत असल्याने तुझ्याशी मी देवाच्या अस्तित्वावर वाद घालायला प्रवृत्त होत नाही.आणि सहाजीकच तुलाही आनंद होत असावा.”

माझं हे म्हणणं ऐकून खूश होऊन नितीन म्हणाला,
“बरेच वेळा पाहिलंय की माझ्या सारख्या विचार असलेल्या माणसाची, देवावर विश्वास ठेवणारे लोक अवहेलना करतात. म्हणतात की आमच्या सारख्यांना नैतिक मुल्य नाहीत आणि आमच्या जीवनाला अर्थ नाही.मी एव्हडीच इच्छा करतो की माझं जीवन असल्या विचाराचं खंडण करण्यात गेलं तरी भले.

माझ्या आयुष्यातला अगदी आनंदाचा दिवस तो होता की जेव्हा माझी आई तिचं निधन होण्यापूर्वी काही वर्ष अगोदर ह्या माझ्या नास्तिकपणाच्या विचारावर माझं बोलणं आठवून मला म्हणाली होती की, त्या विचाराव्यतिरीक्त तिला माहित होतं की मी तिने दिलेल्या मुल्यांच पालन केलं आणि त्यामुळे मला स्वर्गात मोक्ष प्राप्त होणार.
मी जरी तिला स्वर्गात भेटू शकलो नाही तरी त्याहीपेक्षा माझा आनंद ह्यात आहे की निदान माझ्या श्रद्धेच्या आचरणाची तिच्याकडून मला पुष्ठि मिळाली होती.”

ह्या सर्व चर्चेत निमीश फक्त ऐकण्याचं काम करीत होता. मी काहीतरी त्याला विचारणार हे पाहून म्हणाला,
“काका,तुमच्या ह्या वयातल्या सर्वांना आनंदी करण्याच्या नरम स्वभावाचा उपयोग मी माझ्या ह्या वयात वापरायचं ठरवलं आहे.
त्यामुळे मी, माझे आस्तिक आजोबा आणि माझा नास्तिक मित्र नितीन असे आम्ही तिघेही आनंदी राहूं.तुमचं काय म्हणणं आहे?”

एव्हाना तळ्यावर काळोख झाला होता.उठत उठत मी दोघांची पाठ थोपटत म्हणालो,
“माझं एक म्हणणं की तू प्रो.देसायांचा नातू शोभतोस.आणि दुसरं नितीनचं “आर्ग्युमेंट” अगदी कोर्टात मांडल्या सारखं वाटलं.”

हे ऐकून दोघेही हंसायला लागले.आणि मी मनात पुटपुटलो,
“आनंदी आनंद गडे!
इकडे तिकडे चोहिकडे!”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com